संत गोणाई जीवनचरित्र

॥ संत गोणाई ॥

संत नामदेव कुटुंबीय पंढरपूर येथे रहात होते. संत नामेदवांच्या आई गोणाई यांचे जन्मठिकाण, तारीख व समाधी शक मिळत नाही. त्या अतिशय पुत्रवत्सल असून नामदेवांच्या देवपित्रेपणामुळे त्रस्त झालेल्या होत्या. त्या संपूर्ण कुटुंबाला सावरणान्या होत्या. नामदेव गाथ्यामध्ये त्यांची नाममुद्रा असलेले सुमारे सव्वीस अभंग मिळतात. नामदेवांच्या बालवयातील विठ्ठलभक्तीने त्या भारावलेल्या होत्या. पण पुढे त्यांचे प्रपंचाकडे दुर्लक्ष होत असल्याने संत गोणाई नेहमी काळजीत असत. विठ्ठलभक्तीने पिसे झालेल्या नामदेवांना पाहून गोणाई माऊलीला काळजी वाटते. त्या विठ्ठलाबद्दल पुढे संताप व्यक्त करतात. विठ्ठलाला बोल लावतात. संत गोणाईची कुटुंबासाठी एक अपेक्षा होती. नामदेवाने चारचौघांसारखे वागावे, आपला प्रपंच सांभाळावा, परादाराकडे लक्ष द्यावे.

‘नवमास वरी म्या वाहिलासी उदरी आस केली थोडी होसी म्हणूनी सांडी देवपिसे नको करू ऐसे बळे घर कैसे बुडविसी ।।’

या अभंगातून आईच्या अस्वस्थ मनाचे मायेच्या भूमिकेतून दर्शन घडते. मुलाच्या कल्याणाची तळमळ, त्यातून येणारा संताप त्या व्यक्त करताना दिसतात. मंदिरात जाऊन विठ्ठलाशी गोणाई स्पष्ट बोलतात.

 “माझे घर त्या पूर्वीच बुडविले जे दर्शनासी आले बाळ माझे।।” किंवा “ऐसे काय केले नाम्या चाळविले । समूळ बुडविले आपणा माझी आम्हा दुर्बळांचा करुनिया घात केला वाताहत घराचा तो त्वा आपुल्या लावियला सोई। नव्हे मज काही ऐसा केला ।।

माझा पुत्र नामाला मला परत द्या, अशी विनवणी संत गोणाई विठ्ठलाकडे करतात. माझा नामा घरादाराकडे, प्रपंचाकडे दुर्लक्ष करून चंद्रभागेच्या वाळवंटी नामाच्या गजरात रममाण होऊन संसाराचे वाळवंट करीत आहे. नामदेवाविषयीच्या जिव्हाळ्यातून चिंतेतून गोणाई माऊली विठ्ठलाविषयी (भक्तीतून) संताप व्यक्त करीत आहे. गोणाईंच्या बहुतेक रचनांमधून माता-पुत्र यांचा प्रेमवत्सल कलह पाहावयास मिळतो. केवळ आईच्या हृदयातील अनन्यसाधारण माया, जिव्हाळा, पुत्राविषयी वाटणारी चिंता, त्यांच्या प्रपंचाची काळजी अशा विविध स्वरूपाच्या उत्कट भावना संत गोणाईच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या दिसतात.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या