संत भगवानबाबा
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.
जन्म आणि बालपण
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी संत भगवान बाबा चा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव ‘आबा’ किंवा ‘आबाजी’ ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.
गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. ‘पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते’ अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरुन गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.
आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव ‘भगवान’ ठेवले.
असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
संत भगवानबाबा