संत आडकोजी महाराज

information in marathi


संत आडकोजी महाराज  (sant aadkoji maharj )

राष्ट्रसन्त तुडोजी महाराज यांचं नाव सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसे त्यांचे गुरु आडकोजी महाराज. ते आणि तुकडोजी महाराज ही जशी गुरुशिष्यांची जोडी तशीच जनार्दनस्वामी आणि एकनाथ यांची जोडी. श्रीगोविंदप्रभु (गुंडम राऊळ) आणि श्रीचक्रधरस्वामी यांच्या बाबतीत असंच म्हणता येईल. गुरुचा नाम निर्देश केला की शिष्याचं नाव आठवतं नि शिष्याचा नामनिर्देश केला गुरुचं.

आडकोजींचा जन्म १८२३ मध्ये झाला. आडकोजी बालपणापासूनच काहीशा कलंदर वृत्तीचे होते. त्यांनी विवाह केला पण प्रापंचिक जीवनात त्यांनी कधी रस वाटलाच नाही. मौनातच चिन्तन करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. चाळीसाव्या वर्षापासून तर ते जणू पूर्ण विदेहीच झाले. वस्त्राचेही भान त्यांना नसे. एवढंच नव्हे तर खाण्यापिण्याचंही भान नसे त्यांचे भक्त त्यांची काळजी घेत पण त्यांना आपल्या भक्तांपासूनदेखील कशाचीच अपेक्षा नसे.

त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिका व चमत्कार-कथा प्रचलित आहेत. त्यांनी जे केलं ते लोकहितासाठी केलं. आपण काही चमत्कार करतो, असं त्यांनी कधीही म्हटलं नाही कारण त्यामुळं अंधश्रध्दा नि बुवाबाजी वाढते.

राष्ट्रसंतांचं मूळ नाव होतं माणिक. पण आडकोजींमुळे त्यांचं तुकडय़ा असं नामकरण झालं. तुकडय़ादास गुरु का प्यारा असं स्वत: तुकडोजी महाराजींनीच म्हटलं आहे.

आडकोजी महाराज विदर्भातले व राष्ट्रसंतही विदर्भातलेच. आडकोजी महाराजांचं मूळ गाव आर्वी. पुढे ते वरखेडला आले. राष्ट्रसंतांच्या लहानपणीच त्यांची भेट आडकोजींशी झाली व तुकडोजींनी आडकोजींच शिष्यत्व स्वीकारलं. राष्ट्रसंतांची आडकोजींवर अनन्य श्रद्धा होती.

त्यांची हीच प्रवृत्ती त्यांचे शिष्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यामध्येही आपल्याला आढळते. राष्ट्रसंतांनी तर भाबडय़ा भक्तीला व अंधश्रद्धाना कडाडून विरोध केला व समाजाला सद्सद्विवेक बुद्धीचं महत्त्व पटवून दिलं.

ते कासार जातीचे होते. खरं तर संतांना कुठ जात असते का ? ते तर सर्वांचेच असतात. सर्व जाती-धर्म त्यांना सारख्याच असतात. कारण ते मानवतावादी असतात. इथं जातीचा उल्लेख यासाठी केला की महाराष्ट्रात सर्वच जातीधर्माच्या संतांनी भक्तीचा प्रसार केला व आध्यात्मिक प्रबोधन केलं. त्यात जातिधर्माचा अडसर कुठंच आला नाही.

आडकोजी महाराजांचा कार्तिक पौर्णिमेस झाला, त्याचप्रमाणं एका शतकानंतर त्यांनी याच दिवशी महासमाधी घेतली. संत गुलाबराव महाराजाचे त्यांच्या विषयीचे आदरयुक्त उद्गार असे आहेत.

पापे करुनी झाली । कलियुगी नरभृतांची वाढ खुजी ।वास्तवजन ताराया । झाले संत आडकुजी ।।

(संदर्भ व सौजन्यः महान्यूजमधील डॉ.यू.म.पठाण यांचा लेख)


संत आडकोजी महाराज समाप्त.

View Comments