सद्गुरु देवनाथ महाराज

सद्गुरु देवनाथ महाराज

नाथ संप्रदायाची परंपरा भारत भूमीत विस्तारित झाली आहे. भगवान शंकरापासून ही परंपरा सुरू होते. या परंपरेविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथात भाष्य करतात .आदिनाथ शंकरापासून ही परंपरा श्री ज्ञानेश्वर माऊली पर्यंत येऊन पुढे अनेक शाखांमार्फत तिचा विस्तार झाला आहे .

१) ज्ञाननाथ -सत्यमनाथ  गैबीनाथ- गुप्तनाथ -उद्बोधननाथ -केसरी नाथ -देवनाथ -शिवदिन केसरी.

२)ज्ञानेश्वर -सच्चिदानंद बाबा -वासुदेव हतूदिनाथ- दिनेश -भानुदास.

३) ज्ञानेश्वर -सत्यमनाथ- दीनानाथ- अनंतराज- अमलनाथ -प्रल्हाद- भूमानंद- माधवेश्वर -गोपाळ.

४) ज्ञानेश्वर- सदाशिव -गणेश- उद्धव- केशव -बाळनाथ -श्रीनाथ.

५) ज्ञाननाथ -विसोबा नामदेव -चोखामेळा इत्यादी परंपरांचा उल्लेख विविध साहित्यात येतो.

या सोबतच एक परंपरा आणखी आहे ती म्हणजे ज्ञानेश्वर- देवनाथ- चुडामणी गुंडा महाराज देगलूरकर- विरनाथ महाराज औसेकर. या परंपरेतील देवनाथ हे उत्तर भारतातील गुजरात राज्यातील बलसाड प्रांतातील होते. त्यांचे नाव शिवदेव भगत असे होते .त्यांचे आजोबा गोरक्षनाथांचे शिष्य होते. गोरक्षनाथांनी त्यांच्या आजोबास आशीर्वाद दिला होता…” तुझ्या कुळात महान भागवत भक्त जन्मेल परंतु पुढे तुझा वंश विस्तार होणार नाही .

” यानुसार देवनाथांचा जन्म सावकार कुटुंबात झाला. त्यांचे माता-पिता कृष्ण व महादेव तथा गिरणार पर्वतावरील अंबेची भक्ति करत होते. देवनाथ सात वर्षाचे होते तेव्हा त्यांचे माता-पिता निवर्तले . त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला. महाराष्ट्राच्या जवळील भागातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. ते सतत देवी व कृष्णाची भक्ती करत असत. त्यांना व त्यांच्या पत्नीला देवीभक्तीमुळे देवीचे दर्शन झाले .देवीने त्यांना आळंदीस जाण्याची आज्ञा दिली.

इंद्रायणी तीरावर आल्यानंतर त्यांना एक वारकरी भेटला ज्याने त्यांना ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा मार्ग दाखवला. त्यांनी माऊलींच्या समाधीसमोर २२ दिवस व २१ रात्र निराहार राहून एका पायावर उभे राहून साधना केली .ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना या साधनेमुळे दर्शन दिले. ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी देवनाथांना दिला आणि आपला अनुग्रह देवनाथांना दिला .ज्ञानेश्वरीची साधना करावी अशी आज्ञा ज्ञानेश्वर माऊलींनी देवनाथांना दिली .प्रवरा तीरावर नेवासा या गावी जाऊन ज्ञानेश्वरीची साधना करून ज्ञानप्राप्ती करून घेण्याचा ज्ञानेश्वर माऊलींचा आदेश देवनाथांना प्राप्त झाला .या आदेशानुसार देवनाथांनी नेवासे गावी येऊन ज्ञानेश्वरी ची साधना सुरू केली. परंतु मराठी भाषेचे ज्ञान त्यांना फारसे नव्हते .त्यांच्या पत्नीचे गाव महाराष्ट्राच्या सीमेवरील असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्यांना मराठी भाषेचे ज्ञान होते. परंतु सात दिवस ज्ञानेश्वरीचे पाठ करूनही ज्ञानेश्वरी समजेना.

ज्ञानप्राप्ती होईना. म्हणून त्यांनी आपली जीभ छाटून टाकली. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना दर्शन देऊन त्यांची जीभ पूर्ववत केली .ज्ञानेश्वरी ची साधना नेवासे या गावी राहून देवनाथांनी सुरू केली. प्रवरेचे त्रिकाळ स्नान करावे मोहिनी राजाचे दर्शन घ्यावे आणि ज्ञानेश्वरीचे अध्ययन करावे असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. ज्ञानेश्वरांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरी ची साधना केल्यानंतर त्यांना ज्ञानेश्वरीचे ज्ञान प्राप्त झाले. पुढे ज्ञानेश्वरांच्या आज्ञेनुसारच ज्ञानेश्वरीतील हे ज्ञान विस्तारित करण्यासाठी देवनाथांचे कार्य सुरू झाले .

देगलूर प्रांतातील चुडामणी यांना देवनाथांनी अनुग्रह दिला. ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत त्यांनी चुडामणींकडे सोपवली आणि ज्ञानेश्वरी तील हे ज्ञान व भक्तीचा विस्तार करण्याची चुडामणी महाराजांना आज्ञा दिली .देवनाथांनी समाधी कुठे घेतली किंवा पुढे देवनाथांचे कार्य काय झाले .याविषयी मात्र कोणत्याही साहित्यात माहिती उपलब्ध होत नाही .

देवनाथांच्या शिष्य परंपरेतीलच एक परंपरा कोल्हापूर जवळील रूकडी येथे सुरू आहे .रुकडी संस्थांचे सद्गुरु माधवनाथ सांगवडेकर महाराज यांना देवनाथांच्या समाधीचा शोध घेण्याचा ध्यास लागला होता. परंतु देवनाथांची समाधी किंवा देवनाथांविषयीची पुढील काही माहिती मात्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सतत अथक असे दहा वर्ष प्रयत्न करावे लागले . देवनाथांच्याच प्रेरणे मधून २००१ स.देवनाथांची समाधी पैठण येथे गोदावरी नदीच्या काठावर सापडली. देवनाथांनी संजीवन समाधी घेतली आहे. रुकडी येथील संस्थान तर्फे देवनाथांच्या या संजीवन समाधी परिसराचा विकास करण्यात आला आहे. इसवी सन २०२३ मधील अधिक श्रावण वद्य अष्टमी रोजी देवनाथांच्या संजीवन समाधीस तीनशे वर्षे पूर्ण झाली.

– प्रा. – अपर्णा गुरव


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या