संत नरसी मेहता (सोळावे शतक). प्रख्यात गुजराती वैष्णव संतकवी. त्याच्या कालाबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. नवीन संशोधनावरून त्याचा काल १४१४ ते १४८० ऐवजी सोळावे शतक मानला जातो. या कृष्णभक्त कवीच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडीत झाल्या आहेत. भावनगरजवळील तळाजा या आजोळच्या गावी वडनगर नागर कुटुंबात नरसीचा ( संत नरसी मेहता ) जन्म झाला.
मातापिता दयाकुंवर व कृष्णदास हे जुनागढ येथे रहात होते. लहानपणीच नरसीचे आईवडील वारल्यामुळे त्याचे पालनपोषण त्याच्या जुनागढ येथील चुलतभावाने केले. तेथेच तो वाढला. लहानपणी तो फार हूड होता व अभ्यासाकडेही त्याचे लक्ष नसे. साधुसंग आणि भजनकीर्तनाचे त्याला प्रथमपासूनच विलक्षण वेड होते. त्यांत तो तहानभूक विसरे. घरी परतायला उशीर झाल्यामुळे भावजयीची बोलणी बसत.
अशाच एका प्रसंगी त्याला घरी परतायला फार उशीर झाला. आता भावजय रागावेल म्हणून घरी परत न जाता तो जंगलातील एका शिवालयात गेला व तेथे शिवाची आराधना करू लागला. सात दिवसांनी त्याला शिवाचे दर्शन झाले व शिवाने त्याला कृष्णाच्या रासक्रीडेचे दर्शन घडविले, असे तो आपल्या एका रचनेत म्हणतो. तेव्हापासून तो निःसीम कृष्णभक्त बनला व कृष्णभक्तीची गीते रचू-गाऊ लागला.
काही दिवसांनी त्याच्या चुलतभावाने त्याला परत घरी आणून माणकेबाई नावाच्या मुलीशी त्याचा विवाह करून दिला तथापि त्याचे कृष्णभक्तीचे वेड कमी झाले नाही. त्याने संसार मांडला, कामधंदा सुरू केला, त्याला दोन अपत्येही (मुलगा शामळशा व मुलगी कुंवरबाई) झाली तथापि त्याचा संसार हा संन्याशाचाच संसार राहिला त्याचे मन त्यात कधीच रमले नाही. पुढे त्याचा मुलगा वारला, नंतर त्याची पत्नीही वारली, मुलगी विधवा झाली व लौकिक अर्थाने संसाराची वाताहत झाली. तरीही ह्या आघातांस तो इष्टापत्ती समजून ‘आता मी सुखाने हरिभजन करीन’ असे म्हणतो.
त्याची काही पदे तात्त्विक व नीतिपरही आहेत. त्याच्या पदांत अनेक वेळा राधाकृष्णाचा शृंगारही वर्णिलेला आढळतो. हातांत करताल घेऊन त्याच्या तालावर तो ही स्वरचित पदे तल्लीन होऊन गात असे. असे असले, तरी व्यवहार पाठीशी होताच. कुंवरबाईला पुत्र झाला होता व त्यासाठी ‘मामेरूं’ (बाळंतविड्यासारखा प्रकार) नेणे भाग होते. शामळशाचेही लग्न व्हावयाचे होते. यासाठी पैसा हवा होता पण निष्कांचन नरसीजवळ तर करताल, कृष्णावरील श्रद्धा व सन्मित्र यांशिवाय काहीच नव्हते. लोक निर्धन नरसीस हसू लागले. तथापि कोणीतरी सन्मित्राने त्याची ही रूढियुक्त कर्तव्ये योग्य वेळी यथास्थित पार पाडण्यास मदत केली. नंतरच्या कवींनी प्रत्यक्ष कृष्णानेच त्याला याबाबत मदत केल्याची वर्णने आपल्या काव्यांत केली आहेत. अशा अनेक आख्यायिका त्याच्या जीवनाभोवती गुंफल्या गेल्या.
तो मूर्ख नव्हता वा केवळ कवी नव्हता. त्याच्या जीवनाला थोर तात्त्विक अधिष्ठान होते. सर्वच व्यक्तींबाबत त्याचा समानतेचा दृष्टिकोन होता. त्याने जातिभेद, कुलाभिमान यांवर कोरडे ओढले. दीनदलित, क्षुद्र यांमध्ये भेदभाव न मानता त्याने कृष्णभक्तीचा पुरस्कार केला. जुनागढच्या नागरांना जेव्हा नरसी धेडाकडे भजनासाठी गेल्याचे कळले, तेव्हा त्यांनी त्याला जातपंचायत भरवून वाळीत टाकले. या प्रसंगामुळे नरसी कळवळून म्हणतो, की ‘प्रभो मला पुन्हा दारिद्र्यात व नागर जातीत जन्मास घालू नको!’ या प्रसंगास अनुलक्षूनही नंतरच्या कवींनी नागर जातीच्या एका भोजनप्रसंगी प्रत्येक ब्राह्मणाच्या शेजारी धेड जेवावयास बसल्याचे दिसू लागल्याचा चमत्कार घडला, अशी आख्यायिका गुंफली. गांधीजींच्या प्रार्थनेतील
हे प्रसिद्ध पद नरसीनेच रचले आहे. त्याने रचलेली अनेक भावपूर्ण पदे प्रभाति या नावाने गुजरातीत प्रसिद्ध आहेत. ‘गुजरातीचा आदिकवी’ म्हणून नरसीचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. गुजराती भक्तियुगाचा व गुजराती साहित्याचा आरंभही त्याच्यापासूनच मानला जातो. गुजरातीतील आख्यान काव्याचीही बीजे त्याच्या काव्यात दिसतात.
नरसीने विपुल काव्यरचना केली. त्याने रचलेली पदे अनेक शतके मौखिक परंपरेने टिकून राहिली. वल्लभाचार्यांच्या अनुयायांनी त्याला भक्तियुगाचा ‘वधाइआ’ (अग्रदूत) मानून त्याच्या पदांना विशेष महत्त्वाचे स्थान दिले. आज जी पदे नरसीची म्हणून उपलब्ध आहेत, त्यांतील नेमकी नरसीची पदे किती आहेत, याचा निर्णय करणे अवघड होऊन बसले आहे. त्यांतील बरीच रचना प्रक्षिप्त, अन्य कवींची व मूळ काव्यभाषेत बदल केलेली असावी, असे अभ्यासक मानतात. उदा., हारमाला हे नरसीने रचलेले (नरसीच्या जीवनातील एका आख्यायिकेवर) काव्य मानले जाते तथापि ते नंतरचे म्हणजे १६५० च्या सुमाराचे आहे. १६७८ मध्ये प्रेमानंदाने वा अन्य कुणा कवीने या काव्याची पुनर्मांडणी व पुनर्लेखन करून त्याचा जवळजवळ दुप्पट विस्तार केल्याचे अभ्यासकांना आढळून आले.
त्याची काव्ये सांगितली जातात.
शामळशानो विवाह हे नरसीने त्याचा मुलगा शामल याच्या विवाहानिमित्त लिहिलेले अधिकृत असे आत्मचरित्रपर काव्य आहे. कुंवरबाईनुं मामेरुंहेही त्याचे ह्या प्रसंगाबाबतचे आत्मचरित्रपर काव्य होय. शृंगारमाला मध्ये नरसीची मधुराभक्तीने ओतप्रोत अशी ७४० पदे आहेत. कृष्णाला तो प्रियकर मानतो. यांतील भावनेची खोली व आत्मनिष्ठा विशेष लक्षणीय आहे. राससहस्रपदी त कृष्ण व गोपींच्या रासक्रीडेबाबतची फक्त १२३ पदे आहेत. रासप्रसंग साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य त्याच्या ह्या पदांत आहेत. कल्पनेची झेप आणि काव्यगुणांचा प्रत्यय या पदांत प्रकर्षाने येतो. वसंतनां पदो मधील पदे ‘फाग’ नावाच्या गुजराती उत्सवात मोठ्या आवडीने म्हटली जातात. गुजरातमध्ये ही पदे अत्यंत लोकप्रिय आहेत. हिंडोलानां पदो तील पदेही कृष्णाशी संबंधित अशा दुसऱ्या एका गुजराती लोकोत्सवात म्हटली जातात. नरसीच्या व संतनां पदोला गुजराती जनजीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे.
नरसीची कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारलेली आख्यानपर पदेही महत्त्वपूर्ण आहेत.
बाललीला, नागदमण, दाणलीला, मानलीला, सुदामचरित्र, गोविंदगमन इ.
त्याची आख्यानपर पदे विशेष सरस आहेत.
आख्यानकाव्ये म्हणून त्याची ही रचना भालणच्या आख्यानांहून सरस आहे तथापि प्रेमानंदाच्या आख्यानकाव्यांइतकी ती सरस नाही.
भागवता वर आधारित अशा ह्या नरसीच्या रचनेस गुजरातची पार्श्वभूमी लाभली असल्यामुळे ती त्याची सर्वस्वी स्वतंत्र रचनाच वाटते.
गुजराती आख्यानकाव्याची बीजे त्यांत स्पष्टपणे दिसतात.
सुरतसंग्राम हे त्याचे काव्य कल्पना व अभिव्यक्ती यांबाबत स्वतंत्र अशी रचना असून तीत कृष्णाच्या प्रेमलीला त्याने वर्णिल्या आहेत.
नरसीच्या इतर आख्यानकाव्यांहून याचे साहित्यिक मूल्य वरच्या दर्जाचे आहे.
प्रभातियातील रचना ज्ञानवैराग्यपर असून ती संथ चालीची,
हळुवार शब्दनादाने व संगीताने ओतप्रोत आहे.
भक्तिपर व ज्ञानपर पदांतील नरसीची शैली सर्वोत्कृष्ट आहे.
त्यांतून वेदान्ती, लौकिक सुखदुःखांचा आनंदाने स्वीकार करणारा,
ईश्वराच्या चांगुलपणावर अढळ श्रद्धा असणारा,
सर्व भेदभावांच्या अतीत झालेला वैष्णव संत म्हणून नरसीचे व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते.
त्याची वृत्ती भावरूप आहे.
त्याच्या पदांतील अनुभव सच्चा असून त्यांतून त्याच्या जिवंत श्रद्धेचे व प्रतिभेचे विलोभनीय दर्शन घडते.
जुनागढ येथे भजेवाडी दरवाजाजवळ ‘नरसिंह महेतानो चोरो’ नावाचे एक ठिकाण आहे.
तेथे नरसीचे राहते घर होते.
आज तेथे कृष्णमंदिर असून नरसी तेथे कृष्णाची उपासना करीत असे.
नरसीच्या उपासनेतील कृष्णमूर्तीच या मंदिरात बसविली आहे.
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीस तेथे मोठी यात्रा भरते.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: vishwakosh