संत जोगा परमानंद 

संत जोगा परमानंद माहिती

संत जोगा परमानंद 

संत जोगा परमानंद पूर्ण माहिती 

जीवन चरित्र

“संत जोगा परमानंद यांची जन्मतिथी उपलब्ध नाही. समाधी सत काळ माघ वद्य चतुर्थी शके १२६० (इसवी सन १३३८) संत श्री नामदेवांच्या समकालीन परिवारातील संत म्हणून जोगा परमानंद यांचा उल्लेख करता येईल. ‘भक्तविजय’ या ग्रंथात महिपती म्हणतात, “जोगा परमानंद जातीने शूद्र होते, त्यांचे स्वतःचे नाव ‘जोगा’ तर त्यांच्या गुरूंचे नाव परमानंद होते, म्हणून त्यांचे नाव ‘जोगा परमानंद’ असे सर्वांना परिचित झाले.” जोगा हे तेली समाजाचे असावेत, असे अनेक अभ्यासकांचे एकमत आहे. जोगा परमानंद हे बार्शी येथे राहात असत. ते पंढरीच्या पांडुरंगाचे परमभक्त होते. मोगलाई हद्द त्यांना जवळ होती. ते भगवंताची नित्यनेमाने भक्ती करीत असत. त्यांनी आयुष्यभर अतिशय कडकडीत वैराग्य पाळले. ते विठ्ठलाचे निःसीम भक्त असल्यामुळे त्यांची सर्वव्यापी आणि विशाल दृष्टी होती. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी त्यांना चांगल्या ज्ञात होत्या. त्यांच्या मते प्रपंचातील सुख हे क्षणभंगूर, क्षणैक आहे, शाश्वत सुखप्राप्त करावयाचे असल्यास परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे. ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्येक माणसाने संपूर्ण आयुष्य वेचले पाहिजे, हे त्यांनी जीवना- विषयीचे तत्वज्ञान स्वीकारले होते.

संत चरित्रकार महिपती त्यांच्याविषयी म्हणतात,

“जोगा परमानंद भक्त। बारस्त ग्रामात होता राहत॥

अखंड आणि विरक्त। वैराग्य भरीत सर्वदा ॥ “

या साधू व वैराग्यवृत्तीने ते लोकांच्या आदरास पात्र झाले. जोगा परमानंद वृत्तीने अतिशय विरक्त होते. त्यांनी कायम साधुत्व स्वीकारले होते. त्यांनी जीवनभर कशाचीही लालसा धरली नाही, ते अतिशय सत्त्वशील साधुपुरुष म्हणून मानले जात असत, शिवाय प्रतिभा असलेला वरच्या दर्जाचे कवी होते. त्यांचा सदा सर्व काळ भजनात जात असे. पृथ्वीतलावर सर्वाभूती परमेश्वर भरलेला आहे. इतकेच नव्हे तर या जगातील सर्व प्राणिमात्र परमेश्वराचे निरनिराळे अवतार आहेत. असा त्यांचा दृढ विश्वास होता, त्याप्रमाणे ते वागत, जगत होते. ते नामदेवांच्या परिवारातील असल्याने नेहमीच पंढरपूराला जात होते. ते पंढरीच्या विठ्ठलाचे निष्ठावान उपासक असल्याने, माणसांविषयी, संतसज्जनांविषयी व्यापक अशी समान दृष्टी त्यांनी सांभाळली होती. ‘प्रेमभरीत अंतःकरणात देव प्रगटावा, अशी त्यांची सतत इच्छा होती. अशा संतांची चरित्रे सतत प्रेरणादायी असतात.

प्रत्यक्ष ईश्वराने (कृष्णाने) सांगितलेली गीता, यावर त्यांची फार मोठी श्रद्धा व प्रेम होते. भगवद्गीता त्यांची तोंडपाठच नव्हती तर ते त्या गीतेतील तत्त्व ज्ञानाप्रमाणे दैनंदिन जीवन जगत होते, त्यातच त्यांचा पारमार्थिक आनंद दिसत होता. तो आनंद, परमार्थ शोधण्यासाठी ते रोज भगवंताच्या मंदिरात जात. মगवद्गीतेचा एक एक श्लोक ते म्हणायचे व एक एक नमस्कार जमिनीवर घालीत देवळाकडे जायचे असा त्यांचा नित्याचा क्रम असायचा, असे जोगा परमानंदांबद्दल म्हणले जाते.


चमत्कार कथा

संत जोगा परमानंदांविषयी एक चमत्कार कथा सांगितली जाते की, जोगा रोज देवळाकडे नमस्कार करीत जात असत, त्यांच्या कृपाप्रसादामुळे एका सावकारास पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या सावकाराने संत जोगाना श्रीमंती थाटाचा भरजरी पीतांबर नेसविला; नेसलेले नवे वस्त्र धुळीत मळेल म्हणून जोगा यांनी सकाळी देवळाकडे जाताना नमस्कार जरा हळूहळू घातले. त्यामुळे जोगांना मंदिरात पोहोचण्यास बराच उशीर झाला. रोजच्याप्रमाणे नमस्कार घातले पाहिजेत तसे ते घातले जाईनात. दुपारचे बारा वाजले, तरी ७०० नमस्काराची संख्या पुरी होईना. आपल्या नित्याच्या नमस्कारास नवा पीतांबरच कारणीभूत ठरला आहे, पीतांबराचा आपणास मोह पडल्याने नमस्कारांतून भगवंताच्या भक्तीची पूर्तता झाली नाही, यासाठी त्यांनी देहास कठोर शासन करण्याचे ठरविले. देवळातील आरतीची वेळ साधता आली नाही त्यामुळे जोगा मनात फार खिन्न झाले होते, आणि त्यांनी कायमची विरक्ती स्वीकारली.

जोगांनी एका शेतकऱ्याकडून पीतांबराच्या बदल्यात दोन बैल घेतले. बैलाच्या जुवास दोन बाजूस दोऱ्या बांधल्या. त्या स्वतःच्या पायात अडकविल्या, बैलाच्या पाठीवर चापकाचे फटकारे मारून बैल उधळले. वाट फुटेल तिकडे बैल उधळले.

बैलामागे ते ओढले गेले, त्यामुळे जोगाना खूप मोठ्या जखमा झाल्या; कातडी सोलून निघाली, ‘देहदुःख ते सुख मानित जावे’ या स्वभावाचे असल्यामुळे या भयंकर दुःखाची त्यांनी पर्वा केली नाही.

“वृषभ पळती अरण्यात। त्यामागे ओढत जातसे॥”

कंठी प्राण धरून जोगा परमानंदाने पांडुरंगाचे सतत स्मरण चालविले. शेवटी विठ्ठलास दया आली, देवाने दोर तोडून बैलांना सोडून दिले. महिपती भक्तिविजयात म्हणतात,

“मग आपुले सोडूनि चरण। तयासी दिधले अलिंगन।

कृपादृष्टी पाहतांचि जाण। दिव्य शरीर जाहले॥”

श्रीविठ्ठल जोगा यांना म्हणतात, देहास एवढे कडक शासन का केले? ईश्वरी कृपाशीर्वादाने जोगाचे शरीर पूर्ववत झाले. अशा वैराग्यशील संतांची चमत्कार कथा संतांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत जाते.


अभंगरचना

जोगा परमानंदांचे नावावर आज सहा अभंग रचना उपलब्ध आहेत, (महाराष्ट्र कवी चरित्र ज० र० आजगावकर) ते उत्तम दर्जाचे कवी म्हणून त्या काळात प्रचलित होते. परम विठ्ठलभक्त असल्याने ईश्वरचिंतनातून, भावभक्तीच्या बळावर त्यांनी अनेक अभंग लिहिले असावेत; पण आज ते अभ्यासक संशोधकांच्या हाताशी उपलब्ध नाहीत. जोगांचे अभंग उतरून घेण्याचे काम संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांनी केले आहे. याबद्दल संत जनाबाई सांगतात, ‘परमानंद खेचर लिहित होता.’ (संत जनाबाईचे अ० क्र० २७२) त्यांच्या कविता रचनेने अल्प असल्या तरी त्यांच्या कविता विविध विषयाला स्मरून लिहिलेल्या आहेत. श्रीविठ्ठल भेट, सद्गुरुकृपा, परामेश्वर भेट, संतदर्शन व त्यांच्याबद्दल सद्भाव यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी अभंगरचना केल्या आहेत.

जशी नामदेवांच्या अभंगात आत्मप्रगटीकरणाची प्रेरणा बलवत्तर होती, तशी अनेक भक्तांच्या जीवनात आर्तता, अनुताप, वात्सल्य, कारुण्य, विस्मय इत्यादी भावनांची उत्कटता अभंगातून दिसून येते, त्याप्रमाणे समकालीन संत जोगा परमानंदाच्या अभंगातून उत्कटतेचा प्रत्यय येतो. सद्गुरुकृपेमुळे मनाची कशी स्थिती होते, याचे आत्मभाव स्वरूपात वर्णन केले आहे. नाव जोगा व परमानंद गुरू यांच्या भावरूपाचे वर्णन

“रोमांच स्वरवित। स्वेदबिंदु डळमळितु॥

पाहता नेत्र उन्मलितु। मग मिटोत मागुते॥

ऐशी इवयी प्रकटसी। के माझ्या नरहरी॥

देखता तनु कापे। मनबुद्धि ही हारपे॥

सकळही अहंभाव लोपे। एकतत्त्वचि उरे।”

अशा प्रकारची चिंता परमगुरू परमानंदांविषयी सदा सर्वकाळ लागून राहिल्यावर संत जोगा यांना परमानंदाच्या भेटीचा आनंददायी लाभ मिळाला. जोगाने अभंगाच्या प्रत्येक शब्दांमध्ये मनातील भावउर्मी व्यक्त केल्या आहेत. होल्यांची जन्मीलित अवस्था, डोळ्यांचे सहज मिटणे, केवळ सदगुरुंच्या कृपेमुळे आभाव लोप पावतो आणि आत्मानंदाची प्राप्ती होते, ही भावावस्था या अभंगांमधून व्यक्त केली आहे. असाच एक अनुभव पुढील अभंगातून ते मांडतात,

“मन निवाले निवाले। कैसे समाधान झाले।

संत आलिया अवसरी। नवल आरतीयांची परी।”

केवळ (सद्गुरूभेटीने) गुरूंबद्दलची भावावस्था व्यक्त करतात. सद्गुरू भेटीने होल्यांमध्ये आनंदाश्रू आले आहेत; असे सांगून जोगी म्हणतात संताची संगत सोबत, त्यांचा आंतर्यामी सहवास म्हणजे आनंद सोहळाच होय.

‘आनंदले नरनारी। परमानंद प्रगटले।’ सद्गुरूंचे दर्शन म्हणजे समाजातील सर्व स्त्री-पुरुषांचा सुखाचा सोहळा होय.

“परामानंदे वाहे पूर। तेणे गहिवर न संवरे।

प्रेम पाझरती लोचन। पाहता जगजीवन।”

अशा प्रकारची जोगांची भक्तिभावना आहे. त्यांच्या इदयाच्या खोल कातळात अष्टसात्त्विक भावाचे रूप विकसित झाले होते. भक्तीच्या भावाने ते टवटवीत झाले आहे, प्रेमस्वरूपाची फळे त्याला लगडलेली आहेत. साधुसंत घरी आल्यानंतर त्याला कोण आनंद बरे!

“द्यावया आलिंगन। बाह्या येतसे स्फुरण।

सजल झाले लोचन। जैसे मेघ वर्षती॥

आजी सुदिन सोहळा। संत जीवनाची कळा ॥

जोगा विनवितो सकळा। भेटी परमानंदासी॥”

यासारखा त्यांच्या मनाचा संतविषयक प्रेमभाव प्रेमभक्ती आहे. संतांच्या व गुरुच्या भेटीची मनाची अवस्था, स्थिती या अभंगातून चित्रित केली आहे.


कवित्व विशेष

जोगा परमानंद यांच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष त्यांची कविता भक्तिभाव-। संपन्न आहे. तसेच त्यांची वर्णनशैली अत्यंत प्रवाही आहे.

असाच एक अनुभव पुढील त्यांच्या अभंगात पाहावयास मिळतो.

“वाचा लोधावली गुणा। स्वरुपी पाहिले लोचना॥

चरणी स्थिरावले मन। जगजीवन देखिलिया॥

तो म्या देखिला देखिला। विठ्ठल पंढरीचा राजा ॥

भानुबिंबे अति सुढाळ। मन मंडित वःक्षस्थळा ॥

चरणी तेजाचे झळाळ। मुगुटी किरणे फाकती ॥

ऐसा नयनी देखिला। तो मज असुमाई झाला॥

जोगा विनवितो विठ्ठला।वोसंडला आनंदु॥”

(जोगा परमानंद)

ज्याच्या दर्शनाने आनंद झाला त्या विठ्ठलाचे मनोहर, विलक्षण विलोभनीय रूप, आणि त्या रूपाच्या दर्शनाने झालेला अद्वितीय आनंद, शब्दांमध्ये पकडण्याचा जोगा परमानंदाने केलेला हा प्रयत्न त्यांच्या कवित्वाची साक्ष देणारा आहे. जोगा परमानंदाची भाषाशैली, मृदू व सुकोमल अशीच आहे. मनातल्या खऱ्या भक्ति भावनेने त्यांचे शब्द काहीसे ओलावले आहेत. ‘सजल झाले लोचन। जैसे मेघ वर्षती।’ ही स्थिती पाहून संतांच्या भेटीचा ओलावा, आनंदाश्रू हे प्रसंग मुळातच भक्तिभावना व्यक्त करण्यासाठी आवेगाचा गहिवर आहे. त्यांचे काव्य भक्तिरसपूर्ण आहे.

आपल्या मनातील संतांविषयी वाटणारी आदराची भावना, संतांचे परमार्थ कार्य, ईश्वरविषयक भक्तिभाव जोगा आपल्या कवितेतून व्यक्त करतात.

जोगा परमानंदांनी श्रीकृष्णभक्तीविषयी काही अभंगरचना केली आहे. गोकुळातील कृष्णाची भेट, कृष्णमुख पाहून दृष्टीला मिळालेले सुख, हे जर हृदयात प्रगट झाले तर याशिवाय दुसरे भक्ताला काय पाहिजे. हे केवळ गुरू परमानंदांमुळे मला प्राप्त होत आहे. ‘उठोनि प्राप्त काळी। येती कृष्णाजवळी। जोगा म्हणे तेणे। परमानंद काज।’ असे स्पष्ट ईश्वरभक्तीचे वर्णन जोगा कवितेतून सांगताना दिसतात. कृष्णाचे सुंदर रूप, त्याचे विविध चमत्कार, स्वरूप विषयांचे सुंदर वर्णन साध्या सोप्या भाषेत जोगानी केले आहे.


गुरगुंडी रूपक

अभंगांशिवाय त्यांनी काही पदे, आरत्या यांच्या रचना केल्या आहेत. त्यांनी एक सुरेख पण अर्थपूर्ण रूपक रचले आहे. हे संपूर्ण रूपक तंबाखू ओढण्याच्या गुरगुंडीवर (चिलीम) आधारित आहे.

जोगांना चिलीम ओढण्याचे व्यसन होते, असे म्हणले जाते. ही गुरगुंडी

खालील अभंगातून वाचण्यासारखी आहे.

“बैसोनि संता घरी हो। घेतली गुरगुंडी ॥ ध्रु०्॥

आधी ब्रह्मांड नारळ। मेरू सत्त्व तो आढळ ॥

निर्मळ सत्रावीचे जळ। सोहं गुरगुंडी, गुरगुडी।।

चिलमी त्रिगुण त्रिविध। मी पण खटा तो अभेद।।

तमतमाखू जाळून शुद्ध। वैराग्य विरळा घडघड़ी ॥

सावधान लावुनिया नळी। मीपण झुरका विरळा गिळी॥

जन्ममरणाची मुरकुंडी सांभाळी। धूरविषयाचा सोडी।

लागला गुरू गोडीचा छद। झाला प्रसन्न परमानंद।।

जोगी स्वामी तो अभंग। गुरुचरण न सोडी।

बैसोनि संताघरी हो। घेतली गुरगुंडी गुरुगुडी।”

हे पण वाचा: संत परिसा भागवत संपूर्ण माहिती

(जोगा परमानंद अ००१)

नळीत तंबाखू टाकून ओढण्याच्या झुरका मारण्याच्या वस्तूला चिलीम म्हणजे गुरगुंडी म्हणतात. यावर त्यांनी एक अध्यात्मपर असे सुंदर रूपक आपल्या कवितेमधून केले आहे. हे त्यांचे ‘गुरगुंडी’ नावाचे पद रूपकात्मक असून ते संप्रदायामध्ये लोकप्रिय झाले आहे. संतापरी गुरगुंडी, ब्रह्मांड नारळ, सत्रावीचे जल, सोहं गुरगुंडी, चिलीम त्रिगुण, मीपण झुरका, जन्ममरण मुरकुंडी, धूर-विषय, गुरगुंडी-छंदा यांसारखे शब्द वापरून संतकृपेबरोबर रूपकातून अध्यात्मविचार सहजपणे सांगितला आहे.

सत्व, रज, तम हे त्रिगुण ‘मी’पणाचा अहंकार विषयाचा धूर निघून जाणे आणि आत्मानंदाचा आनंद संतकृपेने मानवी देहाला लाभणे, अशी एक रूपकातून अर्थपूर्ण रचना पारमार्थिक विचार व्यक्त करण्यासाठी जोगा परमानंदांनी सर्वसामान्यांना सांगितली. जेणेकरून अनाकलनीय, आध्यात्मिक विचार सर्वसामान्यांना सहज समजावा. म्हणूनच त्यांनी रूपकाचा वापर काव्यरचना मधून केला आहे. हे रूपक म्हणजे त्यांचा स्वतःचा अध्यात्मिक अनुभव म्हणून सांगितला आहे.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

संदर्भ: नामदेवरायांची लेखक: डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते आहे.

2 thoughts on “संत जोगा परमानंद माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *