महती संताची

संत दामाजी पंत माहिती

मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. त्यांपैकी संत दामाजी पंत, चोखामेळा व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत. संत दामाजी पंत यांच्या अस्तित्वाचा काल शालिवाहन शके १३०० ते १३८२ हा आहे. ते बिदर येथील महंमदशहाच्या दरबारात सैन्याचे सेनापती होते. त्यांनी अब्दुलशहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार पद देण्यात आले. त्यात हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदारपदी नेमणूक झाली. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील, पण अंगच्या हुशारीमुळे त्यांना ती पदे मिळाली. शके १३७६ मध्ये भयंकर दुष्काळ पडला. पुन्हा १३७७ सालीही पाऊस पडला नाही.

त्या पुढच्या १३७८ सालीपण भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली. दामाजीपंतांनी धान्याची दोन कोठारे बांधली होती. त्यांनी धान्याने भरलेली ती कोठारे लोकांसाठी खुली केली. बादशहाने त्यांना अटक करण्यासाठी सैन्य पाठवले व बिदर येथे येण्यास फर्मावले. दंतकथा अशी आहे, की त्या प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेऊन बादशहाला सव्वा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या मोहरा देऊन त्याची पावती घेतली व दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. दामाजीपंतांची सुटका होऊन त्यांचा सत्कारही झाला. दामाजीपंत शके १३८२ मध्ये मरण पावले. त्यांची समाधी साध्या स्वरूपात होती. नंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पूत्र राजाराम याने तेथे घुमटवजा छोटे मंदिर बांधले. त्यात विठ्ठल, रुखमाई व दामाजीपंतांची मूर्ती स्थापली.

पेशवाईच्या काळात मंगळवेढा हे सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांच्या अंमलाखाली गेले.

‘संत दामाजी संस्था’ एक एकर एकोणीस गुंठे जागेवर आहे. मंदिराला मोठा सभामंडप आहे.

तेथे दररोज दोनशे-अडीचशे लोकांना जेवण दिले जाते.

चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघ वारीला तेथे येणाऱ्या वारकऱ्यांना निवासासाठी दोन मजली इमारत बांधली आहे.

वारकऱ्यांना भात व साराचे जेवण दिले जाते.

एका वारीसाठी (पंधरा दिवसांसाठी) तीस-पस्तीस क्विंटल तांदूळ लागतात.

दरम्यान तेथे अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. तो खर्च भक्त व दानशूर लोकांच्या देणग्यांतून भागवला जातो.

हे पण वाचा :संत निळोबारायांच्या गौळणी


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

src:google.com