वारकरी संप्रदाय वर्धिष्णू , आद्यसंत
श्री भोजलिंग काका सुतार
याच साठी केला हा अट्टहास…
कोणत्याही संताची दोन चरित्रे असतात- धार्मिक आणि सामाजिक. धार्मिक चरित्रात त्या संताचे काव्य आणि त्याच्या कथा, अध्यात्म आणि चमत्कार हे असते. साहजिकच ते लोकप्रिय असते. जनमानसावर त्याचाच पगडा असतो. पण संतांचे अध्यात्म हे काही आभाळातून पडलेले नसते. म्हणजे, त्यांच्या भक्तांना तसे वाटत असले तरी ते तसे नसते. अखेर कोणत्याही धर्माची, धर्मसंकल्पनांची मुळं ही भौतिक परिस्थितीत असतात. संतांच्या अध्यात्माचा उगमही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतून होत असतो. या अर्थी त्यांचे अध्यात्म हे त्या महामानवांची जीवनगाथा असते.
वारकरी संप्रदायातील संत-परंपरा पाहता अभंग,साहित्यातून संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत अलुते-बलुतेदारीतील अनेक संत महामानवाचा जीवनसंघर्ष व बहुजनहितकारी कार्याचा चलचित्र डोळ्यासमोर उभे राहते. प्रत्येक लोकचळवळीच्या मागे एक ठरलेलं व ठरवलेलं ‘ पॉलिटिक्स ‘ असतं अगदी त्यातून इत्तर अध्यात्मिक चळवळीसह बहुजनांची “वारकरी सांप्रदायिक” चळवळ हि सुटलेली नाही. कालानुरूप व्यक्तिपरत्वे त्यामध्ये वर्गीकरण करण्यात आले.
प्रक्रियेत अनेक महामानवांची खरी ओळख उपेक्षित म्हण्यापेक्षा दुर्लक्षित झाली. हेच ‘ पॉलिटिक्स ‘ ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत ते अगदी पहिला वारकरी,अभंगकार,कीर्तनकार असणाऱ्या संत नामदेवांपर्यंत पोहचलेले आहे. या संदर्भान्व्ये विठ्ठलपंतांना अभय देणारे, धर्ममार्तंडाचा रोष पत्करून बहिष्कृत ज्ञानदेवादी भावंडांचे संगोपन.. अर्थाने सर्वांगाने प्रतिभा संवर्धन करणारे आद्यसंत श्री भोजलिंग काकांचा जीवनपट हि मर्यादितच राहिला…अगदी आळंदीच्या समाधिमंदिरातील साळुंका व फलकापुरताच !
शिंप्यांचा नामदेव,कुणब्याच तुकोबा,माळ्याचा सावता, चांभाराचा रोहिदास, सोनारांचा नरहरी,अगदी गोरोबा कुंभार ते चोखामेळा पर्यंत जातीसह नामोल्लेखलेल्या संत मंडळीत सुतारांच्या भोजलिंगालाही केवळ “व्यवसायाने सुतार” केला. वर्णाने शूद्र, व्यवसायाने बलुतेदार व जातीव्यवस्थेत सुतार असणाऱ्या आजच्या सुतारांनाही भोजलिंग स्वीकारण्यास बराच कालावधी घालावा लागला.
जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही,तसेच अजाणतेपणे धर्माच्या दांभिकतेतून मिथ्या अहंकार स्वीकारतो तेंव्हा सर्वसामान्य समाज आपले ‘संचित’ सोडून पदर उसना इतिहासाकडे आकर्षित होतो. संत भोजलिंग काकाचे अध्यात्मिक व आदिभौतिक स्थान समजून घेतल्यास समाज परिवर्तनातील सर्व निकष, अध्यात्मिक दिशा हि सार्थकी लागते.
सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या समाजासाठी ‘आयकॉन’ म्हणून भोजलिंग माथी मारण्यात कोणताही रस नाही, उलट कालानुरूप प्रस्थापित धर्मसत्तेविरुद्धचा संघर्ष स्वतः होऊन स्वीकारणारे व महाराष्ट्राच्या भूमीतील वारकरी संप्रदायाला संत ज्ञानदेवासारखा अलौकीक ‘ज्ञानप्रकाश’ देणारे ‘महामानव’ ओळख करून देण्याचा प्रयत्न असेल.
माझ्याठायी भोजलिंगकाका तुमच्या आमच्यासारखाच सर्व सामान्य पण त्यांनी फार मोठ्या ध्यासाने मानवतेची लढाई लढून मनात जपली..उभारली. हा संदर्भ इतिहासाच्या काळजावर कोरलेला आहेच. भोजलिंगच्या नावे समाज एकत्र येईल, फार फार तर ‘सोशियल अजेंडा’ ठरवून त्यांना विशिष्ट्य जातीमध्ये मर्यादित केले जाईल. पण यापुढे काय ? त्याकाळच्या धर्ममार्तंडांना धाडसाने भिडणारे ते ‘सुतार’ होते का? हि लढाई केवळ त्याकाळापुरतीच नव्हती तर आजपासून नऊशे वर्षांपासून उभ्या महाराष्ट्रातील समाजात समता व सामाजिक चैतन्य जपणाऱ्या वारकरी संप्रदायाची होती. वारकरी सांप्रदाय या लोकचळवळीचे महासमनव्यक व संघटक म्हणून भोजलिंकाका स्वीकारताना आद्य वारकरी,अभंगकार व पहिले कीर्तनकार संत नामदेव, संप्रदायाला संजीवनी देणारे संत ज्ञानदेवांसह, वारकरी संप्रदायाला लोकचळवळीचे स्वरूप देणारे जगतगुरु तुकोबाराय यांच्या वाट्याला आलेला जीवनसंघर्ष समजून घ्यावाच लागेल.
आज आठशे-नऊशे वर्षानंतर भोजलिंग काकांचा परिचय होत आहे, आणि एक पर्वाची सुरुवातही होत आहे. पुढे-मागे संत भोजलिंगच्या नावे सोशियल मीडिया हि गाजेल, बहू उद्देशीय संस्था,संघटना हि होतील. सामाजिक कार्याच्या नावे वधुवर परिचय सोहळे व ठरलेले मॅनेजड ‘समाजभूषण’ हि वाटप होतील. आणि असेच जर भोजलिंगाबाबतही घडले तर समाजकार्याच्या नावावर समाजावर होणार हा अन्याय आहे. बाह्यपणा जपणारी हीच मंडळी समाजासाठीची नवी गुलामगिरी भक्कम करतील. समाजबाह्य शक्तीसमोर लुळे पांगळे असणारे पुन्हा मनासाठी शूरवीर ठरतील. त्यापेक्षा समजून न उमजलेला महामानव पुन्हा दुर्लक्षित केलेलाच बरा..
भोजलिंग काकांच्या विद्रोह व समकालीन धर्म-राजसत्ता
संत भोजलिंग काकांचा जीवनप्रवास हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजेच १२ व्या शतकातला काकांचा जन्म संदर्भीय सनावळी नुसार शके ११४७ चा, म्हणजे संत नामदेवाआधी ४५ ते ५० वर्षाच्या आसपासचा. नामदेवांचा जन्म इसवीसनाप्रमाणे १२७०चासंशोधनामध्ये आहे. नामदेव व ज्ञानदेव या संतांमधील वयाचे अंतर हे पाच वर्षाचे होते. आपेगावचे विठ्ठलपंत व पांचाळेश्वरचे भोजलिंग व नरसीचे नामदेव हे मराठवाड्यातील, त्या काळच्या देवगिरीच्या यादवांच्या राज्यातले. यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज समजत. यादव शासक राष्ट्रकूट व चालुक्य यांचे सामंत होते. नुकतेच आमणदेव या आपल्या चुलतभावाचे डोळे काढून, त्याला कारावासात टाकून रामदेवराय याने देवगिरीचे राज्य ताब्यात घेतले होते. हा मोठा कर्तापुरुष. दक्षिणेत अधिराज्य स्थापन केल्यावर त्याच्या फौजांनी थेट बनारस जिंकले होते. यादवकालीन राजतंत्रावर राष्ट्रकूट व चालुक्य यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा प्रभाव होता. यादव शासकांनी पृथ्वीवल्लभ, श्रीवल्लभ, चक्रवर्ती अशा मोठमोठ्या पदव्या धारण केलेल्या दिसतात.
यादवकाळात कृषी, उद्योग व व्यापार यांचा विकास झाला. पैठण, ब्रह्मपुरी, तेर, चौल, दौलताबाद ही महत्त्वाची व्यापारी व उत्पादन केंद्रे होती. शेतीची मालकी व्यक्तिगत असली तरी तीवर नियंत्रण गावाचे असे.अल्लाउद्दिन खिलजीच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे उत्तरेशी संपर्कात वाढ झाली. यादव काळात देवगिरी, पैठण, नाशिक ही विद्याकेंद्रे होती. शिक्षणाचे माध्यम संस्कृत असे. समाजात कर्मकांडांचे प्राबल्य वाढले होते.
हेमाडपंथी पद्धतीच्या बांधकामांना यादव काळात सुरुवात झाली. महादेव मंदिर (परळी), जबरेश्वर (फलटण), गोंडेश्वर (सिन्नर), महादेव मंदिर (झोडगे) इत्यादी मंदिरांत हेमाडपंथी तंत्राचा वापर झालेला दिसतो. त्या मंदिरांच्या बांधकामात चुना अथवा माती वापरली गेली नाही. यादवसत्ता तेव्हा वैभवाच्या शिखरावर होती. याच यादवांच्या पदरी हेमाडपंत तथा हेमाद्री पंडित व त्यांचा पाईक बोपदेव यासारखे धर्ममार्तंडी प्रकांड पंडित प्रमुख हुद्द्यावर होते, यादव राजांच्या कारकिर्दीत तो अनुक्रमे मंत्रीन्द्रचूडामणी, सकलकरणाधिप, महाप्रधान या प्रतिष्ठित पदांवर होता आणि शाही दप्तरखान्याचा प्रमुखही होता. शिवाय तो सेनापती म्हणून अनेक युद्धांत सहभागी असल्याचे उल्लेख आढळतात. पूर्वमीमांसा, स्मृती व धर्मसूत्रे यांतील आचारधर्माचा व व्रतादिकांचा तो कट्टर पुरस्कर्ता होता. त्यासाठी त्याने चतुर्वर्गचिंतामणि हा विश्वकोश सदृश बृहद्ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे व्रत, दान, तीर्थ व मोक्ष असे चार खंड असून शिवाय परिशेष नावाचा पाचवा पुरवणी खंड आहे. या ग्रंथातील कर्मकांड, विधिविधाने, देवदेवता, तीर्थक्षेत्रे, प्रतिमाप्रतीके इ. माहिती ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्वाची ठरते. राज्य जरी यादवांचे होते तरी सत्तासूत्रे हेमांडपंतांकडे होती. परंतु हेमाद्रीच्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ने राज्यात धुमाकूळ घातला होता. या ग्रंथातील ३६५ दिवसांसाठीच्या दोन हजार कर्मकांडांनी सामाजिक जीवनाला वेढून टाकले होते. पुरोहितशाहीचे वर्चस्व अतोनात वाढले होते आणि उत्पादकवर्ग मातीत चालला होता. ज्ञानेश्वरीत ‘कुळवाडी रिणे दाटली’ असा उल्लेख येतो. वैभवाच्या शिखरावर फक्त सत्ताधारी वर्गच होता. आज ९०० वर्षांनीही त्यात फारसा फरक पडलेला नाही, हे एक विशेष. एकीकडे समाजजीवनाला विळखा घालून बसलेली, वैदिक परंपरेशी पुनरपि नाळ जोडून घेतलेली ब्राह्मणशाही हे तेव्हाचे एक वास्तव होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात चक्रधरासारख्या महामानवाच्या पुढाकाराखाली महानुभाव संप्रदाय वाढत होता. बौद्ध धर्म कमकुवत झाला होता, पण जैनमत प्रभावी होते. हे दुसरे वास्तव आणि त्याच वेळी हिंदुस्थानात इस्लामी धर्माच्या आक्रमणाखाली येथील राजसत्ता नामशेष होत चालल्या होत्या- हे तिसरे वास्तव. या तिन्ही वास्तवांनी वारकरी संप्रदाय व या चळवळीतील अर्ध्वयू ठरलेल्या व्यक्तिरेखांचे सामाजिक चरित्र आकाराला आले आहे.
यादवांच्या काळात ब्राह्मणी धर्माचे बळ वाढलेले दिसत असले तरी त्यातच सामाजिक ऱ्हासाची चिन्हेही दिसत होती. समाजातील सर्वात मोठा- जो खालचा स्तर तो नाडलेला होता. महानुभाव आणि जैनांहून अत्यंत बलिष्ठ असे सुफी इस्लामचे आव्हान निर्माण झाले होते. यातून निर्माण झालेला सामाजिक विस्कळीतपणा दूर करणे आणि सनातन धर्मावरील आक्रमण परतवून लावणे हा ज्ञानदेवांच्या गीतेवरील टीकेचा हेतू दिसतो. त्यांची ही समाज सांधण्याची आकांक्षा त्यांच्या अद्वैताच्या मांडणीतून स्पष्टच दिसते. ही मांडणी अर्थातच अध्यात्मापुरती मर्यादित राहिली. सामाजिक समतेच्या बाबतीत ज्ञानेश्वरी ‘जैसे थे’वादीच राहिली. मात्र स्त्री, शूद्र आणि पापीही अंत:करणपूर्वक भक्ती करील तर तो मोक्षाचा अधिकारी बनू शकतो, ही गीतेची भूमिका मांडून त्यांनी पुरोहितशाहीविरोधात मोठीच क्रांती केली. ज्ञानदेवांच्या या तत्त्वज्ञानाने भागवतधर्माला नवी उभारी दिली. सुतार, लोहार, महार, मांग, कुंभार, चांभार, परीट, न्हावी, भाट, तेली, गुरव आणि कोळी हे १२ बलुत्ये आणि तांबोळी, साळी, माळी, घडशी, तराळ, सोनार,शिंपी, गोंधळी, रामोशी, खाटीक, डावऱ्या आणि कळवंत हे १२ अलुत्ये यांच्यातूनच पुढे संत चळवळ फोफावली, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. नामदेव जातीने शिंपी होते. जनाबाई दासी होत्या. नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, सावता माळी, बंका तसेच चोखा महार होते. हे ज्ञानेश्वरीचे कार्य होते आणि या धर्मचळवळीचे नेते नामदेव होते. पंढरपूर हे तिचे केंद्र होते. ईश्वराच्या कल्पनेचे लोकशाहीकरण ही चळवळीची भूमिका होती.
यानंतर नामदेवांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना येते- ती तीर्थाटनाची. ज्ञानेश्वरांच्या आग्रहाखातर त्यांनी काही संतमंडळींसमवेत तीर्थाटन केले. ज्ञानेश्वर-नामदेवांबरोबर त्या यात्रेत अन्य कोण होते याचा उल्लेख नाही. पण तेथून आल्यानंतर पंढरपुरात जी जेवणावळ झाली तिला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, सावता माळी, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका महार, गोरा कुंभार ही मंडळी असल्याचे ‘तीर्थावली’तून दिसते. हे नामदेवांनी उभारलेले जाळे होते. महाराष्ट्र, गुजरातमधील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर ते उत्तरकडे गोकूळ, वृंदावन, मथुरा, काशी, प्रयाग असे करत पंजाबात गेले. हे साधे तीर्थाटन नव्हते. त्या त्या भागातील धार्मिक चळवळींना दिशा देणारी अशी ही मार्गदर्शन यात्रा होती. ती भक्तिसंप्रदायाची प्रचार मोहीम होती आणि इस्लामच्या धार्मिक आक्रमणाविरोधातील एल्गारही होता, हेही ध्यानी घेतले पाहिजे.
अल्लाउद्दीन खिलजी या तुर्काने १२९६ मध्ये देवगिरीचा पाडाव केला, पण त्याआधी अनेक वर्षे इस्लामचा धोका स्पष्ट दिसत होता. तेराव्या शतकाच्या प्रारंभी शहाबुद्दीन घोरीच्या दुसऱ्या आक्रमणाच्या वेळी त्याच्यासोबत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे सुफी संत दिल्लीला आले होते. तेथून त्यांनी अजमेर हे आपले केंद्र बनविले. भारतातील इस्लामच्या प्रचाराचे मोठे श्रेय त्यांना जाते. दक्षिणेपुरतेच बोलायचे झाल्यास याच कालखंडात सुफी समरस्त हा सुफी संत गुलबर्गा जिल्ह्यात शहापूरला स्थायिक झाला होता. त्याने तेथील राजास ठार मारून जम बसवला होता. वऱ्हाडात मंगळूरपीर येथे हयात कलंदर हा सुफी संत वास करून होता. त्याने तेथील राजाला मारून अनेकांना इस्लामची दीक्षा दिली होती. इस्लामचा प्रभाव एवढा वाढत चालला की पुढे गुरुदेव दत्ताने फकिराच्या वेशात भक्तांना दर्शन दिले, या कथेत कोणाला काही वावगे वाटेनासे झाले.
नामदेवांच्या चळवळीपुढे हे सुफींचे मोठे आव्हान होते. उत्तर हिंदुस्थानात तर ते अधिक कठीण होते.
ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुन्हा हिंदुस्थान यात्रा करण्यास जातात हे येथे लक्षणीय आहे. ते दक्षिणेत गेले. गुजरात, सौराष्ट्र, सिंध, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल या भागांत बराच काळ राहिले. तेथील भाषा शिकले. त्यांचे साहित्य आणि व्यक्तित्व यांचा त्या त्या प्रदेशांतील लोकांवर पडलेला प्रभाव अजूनही दिसतो. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे नामदेवांची मंदिरे आहेत. त्या काळातील व नंतरच्या रोहिदास, धना, तुलसीदास, कबीर, मीराबाई, नरसी मेहता या संतांच्या वाङ्मयातून त्यांचा नामोल्लेख येतो. पंजाबात तर ते अठरा वष्रे राहिले. १३५० साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १०९ वर्षांनी नानक येतात. आणि तब्बल २३१ वर्षांनी- १५८१ मध्ये शिखांचे पाचवे गुरू अर्जुनसिंह यांच्या काळात ग्रंथसाहेबची निर्मिती सुरू होते. या ग्रंथात नामदेवांची ६१ पदे येतात, यावरूनच त्यांच्या स्मृती किती गडद होत्या हे लक्षात यावे.
आता समाजमनात कुणाचा आठव असा जागृत असणे याचा अर्थ सामाजिक कृतज्ञतेमध्येच शोधावा लागतो. बाबा नामदेवजींबाबत शीख समाजात जी भक्ती आहे ती त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे. ती प्रेरणा वारकरी संप्रदायाची होती, आध्यात्मिक समतेची होती आणि सामाजिक आत्मविश्वासाची होती. नामदेवांच्या मुखबानीतील काही पदे यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत. ‘मैं अंधुले की टेक तेरा नाम खुन्दकारा’ (संसारात अंध झालेल्या माझ्यासारख्या दीन माणसाला हरिनाम हाच एक आधार आहे.) हा विचार कर्मकांडांचे जोखड झुगारून देण्याचा होता. ‘हिंदू पुजे देहुरा, मुसलमान मसीत, नामा सोई सेविया, जहाँ देहुरा ना मसीत’ ( हिंदू देवळात, मुसलमान मशिदीत पूजा करतात. परंतु मी जिकडे ना देऊळ आहे ना मशीद अशा ठिकाणी पूजा करतो.) हा विचार हिंदू आणि मुसलमान यांच्या देवस्थानांना आव्हान देणारा होता.
समाजातील वरिष्ठ वर्ग जेव्हा मुस्लीम सत्तेच्या पायाशी जाऊन बसलेला होता तेव्हा शूद्रातिशूद्र वर्गाला आत्माभिमान देण्याचे हे काम होते. मध्ययुगीन कालखंडात जेव्हा सगळ्याच प्रेरणा धार्मिक असतात तेव्हा सगळ्या लढायाही धार्मिकच असतात.
सर्वप्रथम “संतसाहित्य” प्रकाशनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, आपण माझ्याकडून लिखित आद्यसंत भोजलिंग काकांच्या माहितीचे प्रकाशन केले आहे.
या लेखा पुढील संत भोजलिंग काकांच्या अध्यात्मिक कार्याचे लेखन चालू आहे, आपण प्रकाशित करून सहकार्य करावे.
आणखी संदर्भ : https://santbhojlingkakamanch.blogspot.com
आपलाच कृपाभिलाषी,
बाळासाहेब पांचाळ
९५२७७८००९९