Skip to content
पाहा हो कलिचें – संत कान्होबा अभंग – ४७
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन ।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥१॥
ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।
केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥२॥
थोर य युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ।
सांडूनिया द्विजवर । दावला पीर स्मरताती ॥३॥
ऐसें यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ ।
नाहीं ऐसी झाली नीत । हाहा भूत पातलें ॥४॥
शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया ।
ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगलें ॥५॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।
म्हणवितां रामराम । महा श्रम मानिती ॥६॥
येर भोरप्याचेविशीं । धांवती भूतें आमिषा तैसीं ॥
कथा पुराण म्हणतां सिसी । तिडिके उठे नकरियाची ॥७॥
विषयलोभासाठीं । सर्वार्थेसी प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठीं । मागतां उठती सुनीसी ॥८॥
धनाढ्य देखोनि अनामिके । तयांतें मानिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्विक संपन्न ॥९॥
पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनाचिया दासी । सासा झाल्या आंदण्य ॥१०॥
खोटें झाले आली विवसी । केली मर्यादा नाहींसी ।
भार्या ते भ्रतारासी । रंक तैसी मानिती ॥११॥
नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।
पोटासाठीं खौसा । वंदिती म्लेंच्छाच्या ॥१२॥
बहुत पाप झालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।
अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरिती कोणाचा ॥१३॥
कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राह्मण । अविंधवाणी वदताती ॥१४॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासींचीं चुंबिती ।
सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१५॥
मद्मपानाची शिराणी । नवनीता न पुसे कोणी ।
केळवल्या व्यभिचारिणी दैन्यावाणी पतिव्रता ॥१६॥
केवढी दोषाची सबळता झाली पाहा हो भगंवता ।
पुण्य धुडावोनी संतां । तीर्थां हरी आणिली ॥१७॥
भेणें मंद झाली मेघवृष्टि । अकांतली कांपे सृष्टी ।
देव रिघाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१८॥
अपीकें धान्य दिवसेंदिवसें । गाई म्हैसी चेवल्या रसें ।
नगरें दिसती उदासें । पिकलीं बहुवसें पाखाडें ॥१९॥
होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें ।
जपतपादि साधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥२०॥
अठरा यातींचा व्यापार । करिती तस्कराई विप्र ।
सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२१॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।
अश्वाचियेपरी विकिती । कुमारी वेदवक्ते ॥२२॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकांद्या करिती तयांची ।
आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२३॥
मुख्य सर्वोत्तम साधनें । ती उच्छेदुनि केलों दीनें ।
कुडीं कपटी महा मोहनें । शठ दुर्जनें मिरविताती ॥२४॥
कलाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं ।
विधिनिषेधाच्या वाही । एकही ऐसीं नाडिलीं ॥२५॥
जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होती वैरागी दिगांबरी ।
निस्पृही कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरीं न सुटती ॥२६॥
कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें वर्तताती ॥२७॥
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविले अवघें जन ।
याती अठरा चार्ही वर्ण । कर्दमकरूनि विटाळविले ॥२८॥
पूर्वीं होतें भविष्य केलें । संतीं तें यथार्थ झालें ।
ऐकत होतों तें देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥२९॥
आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्यें वावरावें ।
देवाशी भाकोनी करुणारवें । वेगें स्मरावें अंतरीं ॥३०॥
अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसी या कौतुका ।
धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३१॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पाहा हो कलिचें – संत कान्होबा अभंग – ४७