जनीनें बोलिलें तैसेंच – संत जनाबाई अभंग – ६८
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें ।
साद्य परिसिलें तुह्मीं संतीं ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुह्मा ठावें ।
येणें काय लहाणीव आणिली आह्मां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण ।
सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल ।
स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई ।
अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी ।
जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥