आई मेली बाप मेला – संत जनाबाई अभंग – ५१
आई मेली बाप मेला ।
मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥
हरीरे मज कोणी नाहीं ।
माझी खात असे डोई ॥२॥
विठ्ठल म्हणे रुक्मिणी ।
माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी ।
केंस विंचरुन घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ ।
जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा ।
करी दुबळीचा सोहळा ॥६॥