माय मेली बाप मेला ।
आतां सांभाळीं विठ्ठला ॥१॥
मी तुझें गा लेकरुं ।
नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी ।
ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण ।
माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा ।
थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या जीवना ।
ह्मणे जनी नारायणा ॥६॥