वियोग नाम्याचा न साहे गोपाळा ।
न जाय राउळा पांडुरंग ॥१॥
पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर ।
कळे समाचार रुक्मिणीसी ॥२॥
चलावें मंदिरीं स्वामी पुरुषोत्तमा ।
येईल गे नामा माझा जेव्हां ॥३॥
तयाविण मज दाही दिशा ओस ।
न लगे चित्तास गोड कांहीं ॥४॥
जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची ।
म्हणोनियां त्याची झालें दासी ॥५॥