धांवा धांवा नगरवासी ।
लास भक्षिते लेंकुरासी ॥१॥
अवघे होऊनियां गोळा ।
कोणी न जातो देउळा ॥२॥
जाळ करोनी पाहती ।
शेण धुळी धोंडे माती ॥३॥
मारोनी बाहेर घातली ।
केली डोंबाचे हवालीं ॥४॥
हिच्या करा शिरच्छेदाला ।
तंव तो आज्ञापी रायाला ॥५॥
रायें घेऊनियां तिला ।
आणियेलें ठिकाणाला ॥६॥
म्हणे करीं हो स्मरण ।
तुझें कुळदैवत कोण ॥७॥
खर्ग पुसोनियां धारा ।
घाव घाली जो शिरा ॥८॥
ऋषि धांवला सत्वरी ।
वरच्यावरी कर धरी ॥९॥
म्हणे माग मी प्रसन्न ।
येरी बोले हास्यवदन ॥१०॥
रोहिदासा ऐसा पुत्र ।
हरिश्चंद्र राजा भ्रतार ॥११॥
याचक विश्वामित्रा ऐसा ।
जन्मोजन्मीं दे जगदीशा ॥१२॥
बापा भली केली सीमा ।
तप वोपितों मी तुम्हां ॥१३॥
गगनीं विमानें दाटती ।
सुमनभार वरुषती ॥१४॥
वेगीं उतरलें विमान ।
नामयाची जनी म्हण ॥१५॥