Categories: जनाबाई

ऐसें क्रमितां अवधारीं – संत जनाबाई अभंग – २३६

ऐसें क्रमितां अवधारीं – संत जनाबाई अभंग – २३६


ऐसें क्रमितां अवधारीं ।
विश्वेश्वराची नगरी ॥१॥
देखियेली वाराणसी ।
थोर आनंद मानसीं ॥२॥
म्हणती घ्यावें शिवदर्शन ।
तेणें श्रम निवारण ॥३॥
बाप येऊनि चौबारा ।
उभा धरुनि पदरा ॥४॥
म्हणे कोठेंरे दक्षणा ।
बरा होसी चुकावणा ॥५॥
जो का राजा सूर्यवंशीं ।
छत्र चामरें जयासी ॥६॥
माथां बांधोनियां तृण ।
घाली विक्रया आपण ॥७॥
राणी म्हणे प्राणेश्वरा ।
आधीं विक्रा माझा करा ॥८॥
रोहिदास कर जोडुनी ।
चरणीं मस्तक ठेवुनी ॥९॥
आधीं माझिया द्रव्यासी ।
तुम्ही द्यावें कौशिकासी ॥१०॥
ऐसें दोघांचें उत्तर ।
नवल करी ऋषिश्वर ॥११॥
काय करा याच्या बोला ।
म्हणे वजनीं सोनें घाला ॥१२॥
अग्निहोत्री तो ब्राम्हण ।
उभा रायापें येऊन ॥१३॥
देई तारामती तुक ।
एक भार हा कनक ॥१४॥
रोहिदास म्हणे ताता ।
माता स्नेह माझ्या चित्ता ॥१५॥
राव बोलिला वचन ।
शीघ्र यावें बा भेटोन ॥१६॥
उभी राहोनी वेल्हाळा ।
पोटीं बाळाचा उमाळा ॥१७॥
अश्रु ढाळिती लोचन ।
हा हा शब्दें करी रुदन ॥१८॥
बोले कौशिक ये माते ।
स्नेह सोड चाल पंथें ॥१९॥
करुनियां ताडातोडीं ।
पाहे कवतुक आवडी ॥२०॥
माता म्हणे बाळकासी ।
ममता असूं दे मजपाशीं ॥२१॥
रोहिदास ताराराणी ।
तेही घेतली ब्राम्हणीं ॥२२॥
मोल देऊनियां दुणें ।
राव घेतला डोंबानें ॥२३॥
घेऊनियां घरा आला ।
येऊन सांगतो भार्येला ॥२४॥
सेवक आणिला तुम्हांसी ।
सेवा घ्यावी आवडेल तैसी ॥२५॥
घागर घेऊनियां हातीं ।
पाणी आणी शीघ्र गति ॥२६॥
कुंभ घेऊनि चालिला ।
खडा हाणोनि फोडिला ॥२७॥
रिक्तपाणी येतां त्यासी ।
अवघे धुमसिती रायासी ॥२८॥
हा तो पहिलाच शकून ।
पुढें येणें काय करणें ॥२९॥
म्हणती हा तो नव्हे भला ।
यासी ठेवा स्मशानाला ॥३०॥
राव रक्षी स्मशानासी ।
म्हणे नामयाची दासी ॥३१॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसें क्रमितां अवधारीं – संत जनाबाई अभंग – २३६