येतां देखोनिया बाळ ।
ऋषि धांवला तात्काळ ॥१॥
कडे घेऊनि तयाला ।
ऋषि आश्रमासी आला ॥२॥
तुझें मायबापीं प्रेम ।
होय पाहोनी आराम ॥३॥
सुखें करुनी भोजन ।
सुवासित उदकपान ॥४॥
करुनी क्रमियेलें पंथा ।
तिहीं सांगितली वार्ता ॥५॥
बाळ येतसे मागून ।
त्याचा परामर्ष करणें ॥६॥
म्हणोनी सारिलें विंदान ।
पुढें वाढिलें दिव्यान्न ॥७॥
रडे मोकलुनी धाय ।
येथें कल्पांतीं न राहे ॥८॥
पुढें लागला पंथासी ।
ऋषि तटस्थ मानसीं ॥९॥
वदनीं बोट घाली वोजा ।
ऋषि करीतसे चोजा ॥१०॥
ऐसें सत्त्वादिकांपुढें ।
तप खद्योत बापुडें ॥११॥
काय करणें ऐशियांसी ।
व्यर्थ मुकलों तपासी ॥१२॥
मार्गी तिघें एक झालीं ।
दासी जनी आनंदली ॥१३॥