ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसी ।
नाहीं ह्रुषिकेशी म्हणतसे ॥१॥
सांगितलें एक भलतेंचि बोलसी ।
आहे याची भ्रांति ज्ञानेश्वरा ॥२॥
बाहियेलें त्वरें ऐसें कांहीं काम ।
उठे मेघः- शाम तातडीनें ॥३॥
निरोप येवोनि सांगावा एकांतीं ।
म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥४॥
देव म्हणे नाम्या ऐकावें वचन ।
येईल साधोन वेळ तुझी ॥५॥
जनी म्हणे आतां समजलें मज ।
धरीन उमज येथोनियां ॥६॥