पूर्वी काय तप नेणें – संत जनाबाई अभंग – २
पूर्वी काय तप नेणें पैं हो केलें ।
निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळूं लागे अंगें ।
रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी ।
वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी ।
घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥
ऐसें जेथें काम करी चक्रपाणी ।
तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥