ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां ।
चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें ।
मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ॥२॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार ।
परमानंद खेचर लिहित होता ॥३॥
सांगे पूर्णानंद लिही परमानंद ।
भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव ।
कर्म्याचा वसुदेव काईत होता ॥५॥
चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग ।
म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ॥६॥