भिल्लणीचीं फळें कैशीं – संत जनाबाई अभंग – १६
भिल्लणीचीं फळें कैशीं ।
चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी ।
सर्वाहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावें ।
राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥
वान्नर अवघे भुभुःकार ।
बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा करावी आह्मांसी ।
रावण आणितों तुह्मापासीं ॥५॥
तुझ्या नामच्या प्रतापें ।
हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करुनी आला ।
दासी जनीस आनंद झाला ॥७॥