नामयाचें ठेवणें जनीस लाधलें ।
धन सांपडलें विटेवरी ॥१॥
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश ।
धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय ।
दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें दैवत तोहा पंढरिनाथ ।
तेणें माझा अर्थ पुरविला ॥४॥
संसारींचें सुख नेघे माझे चित्तीं ।
तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥५॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला ।
ह्रुदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥