शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो – संत जनाबाई अभंग – ११६
शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे ।
जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण ।
दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥
स्वयें सुखें धाला आपणातें विसरला ।
तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥
नामयाची जनी सागरीं मिळाली ।
परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥