त्या वैष्णवांच्या माता – संत जनाबाई अभंग – १११
त्या वैष्णवांच्या माता ।
तो नेणे देवताता ॥१॥
तिहीं कर्मे हें पुसिलें ।
अकर्म समूळ नाहींसें केलें ॥२॥
कानाचा हो कान ।
झालें धरुनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा हो डोळा ।
करुनी झालें प्रेम सोहळा ॥४॥
तोही वसे नरदेहीं ।
जनी दासी वंदी पायीं ॥५॥