वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । ह्मणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥ संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥ नामरुपा आदि दळियेलें सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥ नवल हा देव बैसला दळणीं । नाहीं केली जनी नामयाची ॥४॥