वामसव्य दोहींकडे – संत जनाबाई अभंग – १०४
वामसव्य दोहींकडे ।
देखूं कृष्णाचें रुपडें ॥१॥
आतां खाले पाहूं जरी ।
चहूंकडे दिसे हरी ॥२॥
चराचरीं जें जें दिसे ।
तें तें अविद्याची नासे ॥३॥
माझें नाठवे मीपण ।
तेथें कैंचें दुजेपण ॥४॥
सर्वांठायीं पूर्ण कळा ।
दासी जनी पाहे डोळां ॥५॥