संतभार पंढरींत – संत जनाबाई अभंग – १०२
संतभार पंढरींत ।
कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथें असे देव उभा ।
जैशी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत ।
प्रेमें हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर ।
नामयाचें जो जिव्हार ॥४॥
ऐशा संतां शरण जावें ।
जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥