स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास ।
साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥
संतांचे घरची दासी मी अंकिली ।
विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥
विदुर सात्त्विक माझिये कुळीचा ।
अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥
न विचारितां कुळ गणिका उद्धरिली ।
नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥
ऋषींचीं कुळें उच्चारिलीं जेणें ।
स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥
नामयाची जनी भक्तितें सादर ।
माझें तें साचार विटेवरी ॥६॥