कान्हो पाठक गीतासार भावार्थ

कान्हो पाठक गीतासार भावार्थ एकूण १८ अध्याय

श्री कान्होपाठक महाराज ध्यान
शांतं ब्रह्मपरं जलधितकरं श्रीशंभूतेजोद्भवम् ।
कान्होपाठकं सर्वज्ञं तं द्विजवरं ध्यायेदहम् सर्वदा ।।

शांतस्वरूप, परब्रह्मपरायण, श्रीगंगेस धारण करणाऱ्या श्रीशंभूरूप तेजापासून प्रगट झालेल्या, व सर्वज्ञ ईश्वरस्वरूप अशा द्विजश्रेष्ठ श्रीकान्होपाठक महाराजांचे मी सदैव ध्यान करीत आहे.

स्वर्गंगानयनाप्तकीर्तिमनसस्तलं नद्यासरे ।
श्रीबोधीद्र्मरूपीणं च शशिनोप्ततीर मायांकृता ।।१।।

श्री गंगामातेस पृथ्वीवर आणण्यास कारण झाल्यामुळेज्यांची कीर्ति सर्वत्र आहे, व गंगाप्रवाह धारण करणाऱ्या अशा भगवान शंकरास तसेच अश्वत्थ वृक्षस्वरूप अशा मायाधिपति श्रीविष्णुस मी सर्वदा ध्यात आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ।।
॥ हरिः ॐ ॥
कृष्णं कमलपत्राक्षं । पुण्यश्रवणकीर्तनम् ।।
वासुदेवं जगद्योनीं । नौमि नारायणं हरिम् ।।१।।
कमलपत्राप्रमाणे ज्यांचे नेत्र आहेत, ज्यांच्या कथेचे श्रवण व कीर्तन अत्यंत पुण्य (पवित्रस्वरूप) आहे. वसूदेवपुत्र किंवा ज्यांचे सर्व जगांत वास्तव्य आहे, समस्त विश्वाचे कारण अशा श्रीहरि नारायणस्वरूप श्रीकृष्णास मी नमन-वंदन करीत आहे.

सप्तशत तत्त्वपदार्था । पदभावना, भावटीका ।
ज्ञानदेवी आत्मज्ञानार्था । प्रकृत पद वक्ता ||२||


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय १ ला

ॐ नमो जी भगवंता । पुराणपुरुषा अव्यक्ता ।
परियेसा भगवद्गीता । महापातके हरतील ।।१।।

हे ॐ कार स्वरूप! षड्गुणैश्वर्यसंपन्न ! पुरातन असूनही नित्य नुतन! इंद्रियातीत परमपुरुषा! या गीता श्रवणाने महापातके सुद्धा नाश पावतील. हे महाराजा आपणास नमस्कार असो, (आपण किंवा हे श्रोतेगणहो!) श्रीमद्भभगवद्गीता ऐकावी,

धृतराष्ट्रे प्रश्न केला । तव संजयो अनुवादिला ।
कौरवभार देखिला । मग काय बोलिला अर्जुन ||२||

धृतराष्ट्राने प्रश्न विचारला तेव्हां संजय धृतराष्ट्रास म्हणाला- अर्जुनाने कौरवांचे सैन्य पाहिले त्यावेळी अर्जुन काय म्हणाला ते सांगतो, आपण ऐकावे.

हे सकळही गोत्र बंधू । यांचा करू नये वधू ।
धर्मद्रोही महाबाधू । येणे राज्यचाड नाही ||३||

युद्धासाठी उपस्थित झालेले हे सर्व आमचे गोत्रज आणि बांधव आहेत, म्हणून यांचा बध करू नये. त्यामुळे धर्माशी द्रोह, प्रतारणा आणि विश्वासघात केला असे होईल म्हणून अशा प्रकारे राज्य संपादन करण्याची (माझी) इच्छा नाही.

मोह पडला पांडवा । धनुष्य ठेविले गांडीवा ।
म्हणे अपराध माधवा । घडत घडत मज चुकला ||४||

अर्जुनाला अशा तऱ्हेने मोह झाला आणि म्हणून त्याने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवले. आणि तो भगवंताला म्हणाला- माधवा माझ्या हातून आता फार मोठा अपराध होत होता, परंतु तो होता होता मी त्यापासून बचावलो.


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय २ रा

तयाचे ऐकून बोलणे । मग काय म्हणितले नारायणें ।
मारिजे मरिजे कवणे । आत्मस्वरूप अविनाश ।।१।।

अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भगवंत अर्जुनाला महणाले, अरे अर्जुना कोण मारतो आणि कोण मरतो. आत्मस्ववरूप तर अविनाशी आहे.

सांडी सांडी देहवासना । न धरी विषयाची कल्पना ।
निवारेल भवबंधना । कृष्ण म्हणे रे अर्जुना ||२||

भगवंत अर्जुनाला म्हणतात – या भव बंधनातून तुला सुटायचे असेल तर, देह मी आहे, हे विषय सत्य आहेत, ही जी तुझी कल्पना आहे ना, ती सोडून दे. असे द्विवार सांगतात.

न तुटे न बुडे न जळे । येता जाता कवणाही न कळे ।
इच्छे आपुलिया खेळे । ये वैष्णवीचेनि संगे ।।३।।

(आत्म्याचे स्वरूप सांगतात) हा आत्मा तुटत नाही, बुडत नाही, जळत नाही. तो आलेला आणि गेलेला कळत नाही. तो स्वेच्छेने आपल्या प्रकृती-मायेबरोबर खेळतो ही सर्व त्याची लीला आहे, आभासिक आहे.

मी मारितो ऐसे न म्हण । अनादि सिद्ध ते कारण ।
मनसंकल्प क्रिया जाण । फळ उद्देश न धरी गा ।।४।।

मी मारतो, असे म्हणू नकोस. कारण तो अनादी काळचा आहे आणि पुढेही तसाच राहणारा आहे. तो सर्वांचे कारण म्हणजे मूळ आहे. मनाने केलेले संकल्पव्यर्थ म्हणजे क्रियेचे केवळ भान आहे, म्हणून त्यापासून कर्तृवाचे फळ प्राप्त करण्याचा विचारही करू नकोस.

न करी सुखदुःखाचा विचारू । अभंग भंगेना निर्धारू ।
ज्ञान दृष्टी पाहे विचारू । नाही पाप युद्धाचे ।।५।।

मला सुख मिळेल का दुःख मिळेल याचा विचारही करू नकोस. ज्ञानदृष्टीने विचार करून पाहिल्यास तो आत्मा अभंग आहे, त्यामध्ये कोणताही विकार निर्माण होत नाही. अशा प्रकारे जाणून युद्ध केलेस तर तुला कोणतेही पाप लागणार नाही.

इति द्वितीयोध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ३ रा

पंचभूतांचा एकवटा । ते हे शरीर गा सुभटा ।
कर्म करिते जे जया निष्ठा । तैसीच फळे गा पावती ॥१॥

हे शूर योद्ध्या पंचमहाभूतांचा एकत्रित झालेला मिलाप म्हणजे हे शरीर आहे. जो ज्या निष्ठेने श्रद्धेने विश्वासाने कर्म करतो, त्याला तशाच प्रकारच्या फळाची प्राप्ती होते.

यज्ञ करिती मन कामना । जे जे रूचे जया वासना ।
ती पावती निज भावना । हे विपरीत ऐक पां ॥२॥

अर्जुना ही एक अत्यंत विपरित (आश्चर्यकारक) गोष्ट ऐक! ज्याला ज्याला ज्याच्या बासनेने जे जे आवडते, ते ते त्याचीच इच्छा मनांत धरून यज्ञ करतात व मग ती ती आपली इच्छा पूर्ण करतात!

अनाश्रयें कर्मे करिती । कर्म-कर्ते, ते नव्हेती ।
नाही कर्माची फळप्राप्ती । ये कल्पने वाचोनिया ||३||

ही सर्व कर्मे करणारी तर प्रकृति आहे, मी अकर्ता-अभोक्ता-असंग निष्क्रिय ब्रह्मरूप आत्मा आहे. अशा यथार्थ समजुतीनंतर जे लौकिकदृष्टीनें कर्म करतात, ते वस्तुत: त्या कर्माचे कर्ते नसतात. व त्यांना त्यापासून कोणत्याही फलाची प्राप्ती होत नाही, कारण या कर्तृत्वाच्या कल्पनेवाचून ( मी कर्ता या भावने वाचून) फलप्राप्ती होत नाही.

सत्त्व रज तम त्रयोगुणी । प्रकृति अज्ञान गवसणी ।
ज्ञान लोपलें द्वैत घणी । कर्म इंद्रियाचेनि संगे ||४||

सत्त्व-रज-तमात्मक प्रकृतिरूप अज्ञान हे आत्मरूपास आवरक-अच्छादक झाले म्हणून आत्मविषयक यथार्थज्ञान विस्तीर्ण द्वैतरूप घनाच्या सत्यत्वनिश्चयरूप आघाताने लुप्त झाले (लोपले) व प्रकृतिकार्य अशा इंद्रियांच्या संगतीमध्ये (आसक्तिमुळे)  जीव नाना प्रकारची कर्मे करू लागला.

इति तृतीयोध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ४ था

चक्रपाणी म्हणे वीरा । मज तुज संख्या नाही अवतारा ।
अमित्य केल्या येरझारा । अझुनि नाही निमणे ।।१।।

ज्याच्या हातांत सुदर्शन चक्र आहे असे भगवान श्रीकृष्ण वीर अर्जुनाला म्हणतात माझ्या आणि तुझ्या होऊन गेलेल्या अवतारांची गणना करता येणार नाही. आत्तापर्यंत आपले अनेक अवतार झालेले आहेत. ते अद्यापही थांबलेले नाहीत.

माझे ऐसिची अवतरणे । धर्म रक्षावया कारणे ।
साधुसंता प्रतिपाळणे । दुष्टा दुःख द्यावया ||२||

माझे अवतार हे धर्माचे रक्षण करणे, साधुसंताचे पालन-संरक्षण करणे आणि दुष्टांना दुःख देण्यासाठी होत असतात.

सहज देहीं निपजत । ते ब्रह्मार्पण करीत ।
आपुले म्हणून नाही ठेवित । यातायातिचेनि भेदे ||३||

शरीराकडून जे जे सहज कर्म होते ते (मी) केले म्हणून त्याचे नृत्य स्वतःकडे न घेता ते ब्रह्मार्पण करावे, त्यामुळे कर्मफळाच्या कचाट्यातून आपली सुटका होते.

त्याचे सर्वस्व जेतुले । ते मजचि अर्पिले ।
आपुले म्हणूनि नाही ठेविले । पुढती जन्मा यावया ।।४।।

त्याने केलेले जेवढे म्हणून कर्म आहे ते सर्व तो जर मला अर्पण करील, माझे म्हणून स्वत:कडे काहीही ठेवणार नाही तर त्याला पुढील जन्म घ्यावा लागणार नाही.

इति चतुर्थोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ५ वा

जे करूनि मज अर्पिती । ते सायुज्यता मीच होती ।
सम, सारिखे सकळ भूती । ते संन्यासी भगवंत ।।१।

जे (कर्म) करून ते मला अर्पण करतात, त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होते. त्यांना सर्व भूतांच्या ठिकाणी समतेचा अनुभव येतो. तेच खरे खऱ्या अर्थाने संन्यासी आहेत, तेच भगवंत आहेत.

इच्छा दंभ काम क्रोध । नाही इच्छेचा अनुवाद ।
अनुभविता सोऽहंबोध । आत्मतत्त्वी राहिले ॥२॥

ते “ब्रह्म मीच आहे” अशा अनुभवाला प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी इच्छा, दंभ, काम, क्रोध निर्माण होत नाहीत. ते आत्मस्वरूपी रममाण होऊन राहतात.

पहाणे, ऐकणे, स्पर्शणे । ग्रहणे अवग्रहणे, आश्वासणे ।
चालणे बोलणे श्वसणे । कहीच वृथा न धरिती ||३||

पहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, ग्रहण करणे, त्याग करणे, आश्वासित करणे, चालणे, बोलणे, श्वसन करणे हे असे कोणतेही व्यर्थ कर्म ‘मी केले’ म्हणून त्याचे कर्तृत्व आपल्या ठिकाणी होत नाहीत.

आचरता सांख्ययोगे । प्राणापान सम संयोगे ।
ते जीव जाताती सोहं संगे । स्वये बुध जाहलिया ॥४॥

सांख्ययोगाचे आचरण करीत असताना, प्राण आणि अपान सम-समान करून ते जीव सोऽअहं (ते ब्रह्म मी आहे) या बोधावर आरूढ होतात. स्वतः ब्रह्मरूप होतात.

इति पंचमोऽध्यायः समाप्तः ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ६ वा

गोविंद म्हणे पंडुसुता । योगी राहे पां निरुता ।
जितेंद्रिय होई सर्वथा । न करी चिंता देहाची ॥१॥

गोविंद (गो=इंद्रिये, विंद=ताब्यात ठेवणारा) इंद्रियांना आपल्या ताब्यांत ठेवणारा गोविंद पंडुसुताला म्हणजे अर्जुनाला म्हणतात- तू (निरूता= खरा) योगी हो. तू देहाची चिंता करू नकोस, जितेंद्रिय हो ।

परतोनी आपण पाही । मनी चिंतू नको कांहीं ।
सदा अनुभवचि राही । तरी तूं ठायीच निवशील ||२||

तू जर मनांत कोणतीही चिता न करता अंर्तमुख होऊन स्वतःकडे पहाशिल तर तू नित्य ब्रह्मरूप असल्याच्या अनुभवास प्राप्त होऊन आहे त्याच ठिकाणी परम सुखरूपतेला प्राप्त होशील.

शब्द स्पर्श रस गंध रूप । हा विषयो अतिसमीप ।
याते देखोनिया लपणी लप । आपणिया देखो नेदी ||३||

शब्द, स्पर्श, रूप रस, गंध हे जे विषय आहेत ते अगदी तुझ्या समीप म्हरजे जवळ: आहेत. परंतु तू त्या विषयांना तुझ्याकडे पाहू देऊ नकोस, त्यापासून लपून रहा.

धनंजयो म्हणे अवधारी । हे मन चंचल गा, भारी ।
देव म्हणे वैराग्य धरी । तरी सहजचि राहील ।।४।।

यावर धनंजय म्हणजे धनावर विजय मिळविणारा अर्जुन अशी शंका उपस्थित करतो की, हे मन फारच चंचल आहे. त्यावर भगवंत म्हणात की, तू वैराग्याचा अंगीकार कर म्हणजे मग हे चंचल असणारे मन सहजच स्थिर होईल.

इति षष्ठोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ७ वा

मी सकळिकांसी दुर्गमू । एकासीच होय सुगमू ।
जे सांडिती द्वैत भ्रमू । आत्माराम म्हणोनिया ।।१।।

मी सर्वांना दुर्गम म्हणजे प्राप्त करण्यास अवघड आहे. परंतु जे हे सर्व जगत् आत्माराम आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. असे चिंतन करतात व म्हणून जे द्वैत भ्रमास सोडतात त्यांना मात्र मी सुगम आहे म्हणजे सहज प्राप्त होणारा आहे.

माझे साकार प्रकृती भजन । पृथ्वी आप तेज वायू गगन।
मी सकळ जीवा जीवन । उत्पत्ती प्रळयो मजमाजी ||२||

पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश ही माझी साकार प्रकृती असून मी सर्व जीवांचे जीवन आहे. सर्वांची उत्पत्ती आणि प्रलय माझ्यामध्येच होतात,

दिव्य तेज प्रकाशत । तेणे चंद्रसूर्य उजळत ।
ध्वनी आकाशी उमटत । हेचि ओळख माझी ||३||

माझ्या दिव्य प्रकाशाने चंद्रसूर्य प्रकाशित होतात. आकाशात ध्वनी निर्माण होतो. ही माझी ओळख आहे.

हेचि अनुस्यूतपद लक्षण । मज जाणावया कारण ।
माझे स्वरूप कां निर्वाण । परब्रह्म तूचि होसी ॥४॥

अनुस्यूत अखंडत्व असणे हेच माझे लक्षण असून, तेच मला ओळखण्याचे मुख्य साधन आहे. मोक्ष हेच माझे स्वरूप असल्याने मला जाणल्यास तूच परब्रह्म पदाला प्राप्त होशिल,

इति सप्तमोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ८ वा

अर्जुन म्हणे ऋषिकेशा । ब्रह्म निर्णयो कैसा ।
देह जातसे अपैसा । कैशापरी भेटशील ।।१।।

अर्जुन ऋषीकेश म्हणजे भगवंताला म्हणतो-ब्रह्मपदाचा निर्णय कसा करायचा, हा देह तर अचानक पडत असतो, मग त्यावेळी तूं मला कसा काय भेटशील?

देव म्हणे सदाकाळीं । जे मज ध्याती हृदयकमळी  ।
त्यांसी भेटेन अंतकाळी । म्हणोनि माते स्मर पां ||२||

भगवंत म्हणतात- जे माझे अंतःकरणांत नित्य-निरंतर ध्यान करतात त्यांना मी (त्यांच्या) अंतकाळी भेटत असतो, म्हणून तूं माझे नित्य-निरंतर ध्यान कर.

माझेनि नामे मज भजती । त्यासी नाही पुनरावृत्ति ।
मज वेगळे सुख चिंतिती । ते पावती दुःखाते ||३||

माझे नाव घेऊन माझे भजन करतात, त्यांना परत जन्म घ्यावा लागत नाही, मात्र मला विसरून अन्याचे चिंतन करून सुख मिळवू पाहतात, त्यांना दु:खाचीच प्राप्ती होते.

दाने व्रते जपे तपे । काळी नाकळे, नव्हे सोपे ।
ते पाविजे येणे स्वरूपे । श्रीगुरुकृपा झालिया ॥४॥

दाने, व्रते, जप, तप करून काळावर विजय मिळविणे तेवढे सोपे नाही, परंतू गरुकृपा झाली असता स्वरूपाची म्हणजे माझी प्राप्ती होते आणि काळावर मिजय मिळविता येतो.

इति अष्टमोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ९ वा

मी हे व्यापून अघवे । माझे स्वरूपे जगजीवे ।
न लिंपे सुखदुःखाचेनि भावे । स्वभावे वर्तत असे ||१||

या सर्व जगाला मीच व्यापलेले असून हे जग माझ्या स्वरूवरच भासत आहे. (असे असले तरी) मला कोणाच्याही दुःखाने दुःख किंवा कोणाच्याही सुखाने सुख होत नाही. मी जगाच्या सुखदु:खापासून अलिप्त असतो.

मी अधिष्ठान ये प्रकृति । भूते आपोआप होती ।
साकार सांडूनी कल्पिती । ते होऊनिया नव्हेती ||२||

मी या प्रकृतीचे अधिष्ठाण असून प्रकृतीपासून भूतसृष्टी आपोआप निर्माण होते. ही भूतसृष्टी साकार होऊन भासत असली तरी कल्पित आहे. त्यामुळे ती असून नसल्यासारखीच आहे.

नाही मज वाचूंनिया दुजे। ऐसे कल्पूनि राहिजे ।
त्याचिया संसाराचे ओझे । मजचि जाण पडियेले ||३||

माझ्या शिवाय दुसे कांहीच नाही, असा ज्याचा निश्चय आहे, त्यांच्या संसाराचा भार माझ्यावरच पडतो, म्हणजे त्याला ह्या संसार-दुःखातून मी पलिकडे घेऊन जातो.

पत्रपुष्प फळ उदक । जे मज अर्पिती भाविक ।
आणिक निपजले साहजिक गुणदोष मज अर्पी ||४||

झाडाचे पान, फूल अथवा पाणी जे भाविक भक्त मला अर्पण करतात तसेच त्यांच्याकडून घडणारी चांगली वाईट कर्मे आणि त्यांच्या ठिकाणी असणारे गुणदोपही जे मला अर्पण करतात.

इति नवमोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय १० वा

मी विश्वाधिकारी सृष्टी । तू अपेक्षिले गा किरिटी ।
तरी देवाचिया गोष्टी । काय मजवाचूनि वेगळिया ।।१।।

हे अर्जुना ! मी संपूर्णविश्वाचे कारण असून मीच विश्वरूपानेही प्रगट होतो. माझी पासना करता यावी म्हरूनमी कोणत्या कोणत्या विशेष रूपांनी अभिव्यक्त होतो? अशी तुला अपेक्षा असेल तर मला सांग, ज्या ज्या या जगांत विभूती आहेत त्या त्या काय माझ्याहून वेगळ्या आहेत काय?

कृष्ण म्हणे मी एकला । विश्व भरितसे भरिला ।
रिता ठाव नाही उरला । तेचि आता सांगेन ||२||

भगवान कृष्ण म्हणतात मी एकटाच या विश्वात भरून राहिलेलो आहे. मी नाही असे या विश्वात एकही ठिकाण नाही. तेच आता तुला सांगत आहे.

मी रवि शशी सामवेदू । व्यास कपिल मुनी नारदू ।
अर्जुन गरुड प्रल्हादू । विभूती विराट विश्वरूप ।।३।।

मीच सूर्य, चंद्र, सामवेद आहे. मीच व्यास, कपिलमुनी आणि नारद आहे. अर्जुन, गरुड, प्रल्हाद आणि विराट विश्वरूप ह्या माझ्याच विभूती आहेत.

म्हणोनि हे जीवजाते । साकार विस्तारले भूते ।
न करी भिन्न भेद द्वैते । तरी तू सहजमुक्त ||४||

म्हणून हे सर्व चराचर विश्व जे साकार अशा भूतसृष्टीने भरलेले आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद पाहू नकोस. असे केले तर तूं सहजच मुक्त होशिल.

इति दशमोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय ११ वा

संतोषोनि म्हणे पार्थु । मज उत्कंठा मनोरथू ।
जे निजस्वरूप ते, तू मज । प्रत्यक्ष दाखवी पां ॥१॥

(हे ऐकून) अर्जुन संतुष्ट झाला आणि भगवंताला म्हणाला की, भगवंता तुमचे जे मूळ स्वरूप आहे ते पहाण्याची मला अनावर इच्छा झाली आहे. तेव्हा ते स्वरूप आपण मला दाखवावे.

तव संजय म्हणे दाखविले । नेत्री, लव नाही, लक्षिले ।
देखोनि मन मावळले । अनुवाद खुंटला ॥२॥

(हे अर्जुनाचे वाक्य ऐकल्या बरोबर भगवंताने आपले विश्वरूप अर्जुनापुढे मगट केले. ही गोष्ट संजय धृतराष्ट्रास सांगत आहे.) तेव्हा संजय म्हणाला- (भगवंताने) आपले विश्वरूप अर्जुनास दाखविले. ते दाखविताना भगवंताने कांहीही राखून ठेवले नाही.

आनंदे आसुवे सद्गदीले । अंग कांपत रोमांच उठिले ।
यानंतर जे वर्तले । ते अनुभवी जाणती ||३||

(ते विश्वरूप) पाहून अर्जुनाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली, परीणामी दोघांचा संवाद थांबला. आनंदाने अर्जुनाचे अंतःकरण सद्गतीत झाले. अंगावर रोमांच उभे राहिले आणि यानंतर जे कांही घडले ते अनुभवी महात्मे जाणतातच.

इति एकादशोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय १२ वा

तव घातले होते दंडवत । उठोनि आसवे पुसित ।
म्हणे धन्य धन्य विष्णुभक्त । जे सदासुख पावले ।।१।।

विश्वरूप दर्शनाच्या शेवटी अर्जुनाने भगवंताला दंडवत घातलेले होते तो अर्जुन उठून आता स्वतःचे अश्रूंनी डबडबलेले डोळे पूसू लागला आणि भगवंताला म्हणाला भगवंता विष्णुभक्त खरोखर धन्य आहेत, कारण त्यांना भगवंताचे नित्य सुख प्राप्त होते.

तव सावरी म्हणता हे कृष्णू । आणिक ऐक एक प्रश्न ।
भक्तियोगे पाविजे विष्णू । न करी चिंता कासयाची ||२||

तेव्हा भगवंत अर्जुनाला सावध करतात आणि सांगतात अणिक एक प्रश्न सांगतो तो ऐक. भक्तियोगाने विष्णूची प्राप्ती होते. म्हणून तू कशाचीही चिंता करू नकोस (फक्त भक्तियोगाचे अनुष्ठान कर)

न सोडोनी आपुला यातीधर्म । मजउद्देशे करिती कर्म ।
इच्छा न धरिती अनुश्रम । मन इंद्रिये दाहिली ||३||

जे आपली जात-धर्म न सोडता मन व इंद्रियांना ताब्यात ठेवून कोणतीही इच्छा न करता माझ्यासाठी कर्मे करतात.

कौतुके नाचरती पापपुण्य । जाणोनि नेणती ते धन्य ।
सकळ देवा मज मान्य । ध्याती शून्य साकार ||४||

माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही हे जे जाणत असूनही ते माझ्या सगुन साकार अथवा निर्गुण निराकार स्वरूपाचे ध्यान करतात. परंतु कौतुकानेही ते पापात्मक अथवा पुण्यात्मक कर्म करीत नाहीत ते सर्व भक्त मला मान्य आहेत म्हणजे मला आवडतात.

इति द्वादशोऽध्यायः समाप्त |


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय १३ वा

पुढती एक पां निवृत्ती । मुनी पावले परमशांती ।
सकळ भाव बीज उत्पत्ती । मी देह ते आत्मा ॥१॥

पुढे एक गोष्ट महत्वाची आहे, ती अशी- मननशील असे मुनी निवृत्तीमार्गाने परमशांतीला प्राप्त झाले, तसेच पंचमहाभूतादि संपूर्ण विकार यांची उत्पत्ति माझ्यापासून झाली, अशा माझ्या स्वरूपाला आत्मत्वाने जाणणारे भक्त माझा आत्मा व मी देह आहे.

त्रिगुण प्रकृती निपजे । सत्त्वे उत्तम गती पाविजे ।
रजे मध्यम होईजे । तामसे जाईजे अधोगती ॥२॥

प्रकृतीपासून (सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण) अशा तीन गुणांची निर्मिती होते. सत्त्वगुणामुळे उत्तमगती मिळते, रजोगुणामुळे मध्यम गती मिळते तर तमोगुणामुळे अधोगती प्राप्त होते.

हे गुणत्रयी अनादिसिद्ध । तेणे शरीर हो बद्ध ।
संगदोष नव्हे शुद्ध । भवजाळी गुंतल्या ||३||

हे त्रिगुण अनादीसिद्ध म्हणजे मूळचेच आहेत. त्यांच्या मुळे शरीर बांधले गेलेले आहे. या भव म्हणजे संसार सागरांत पडलेल्या जीवांसाठी ह्या त्रगुणांची संगती चांगली नाही.

म्हणोनि निर्विकार हो पां । संग अवघाचि सांडी पां ।
तू तत्त्व विचार घे पां । सहज मुक्त आहेसी ।।४।।

म्हणून तूं या सर्वच गुणांचा संग सर्वथा सोडून दे आणि तत्त्वाचा विचार कर असे केलेस तर तूं सहजच म्हणजे कांहीही न करता मुक्तच आहेस.

इति त्रयोदशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १४ वा

वर्म सांगे मधुसूदना । जेणे न ये, न कळे माझिया मना ।
अनुभवाविण अनुमाना । आले काय करावे ॥१॥

मधु दैत्याचा वध करणारा तो मधुसूदन म्हणजे भगवान श्रीकृष्णास अर्जुन म्हणतो एखादी गोष्ट अनुमान प्रमाणानें सिद्ध झाली तरी ती मला कलत नाही आणि पटतही नाही. म्हणून तू मला त्या गोष्टीचे वर्म सांग.

आहे अनित्य हे शरीर । कैसे याते वागविता,
हे कवण ऐसा भ्रांतीचा शीण । हरी माझा केशवा || २ ||

शरीर हे अनित्य आहे. या शरीराशी कसे वागावेहे नेमके कसे आहे, या विषयी भ्रमात पडलेलो आहे. म्हणून माझी भ्रांती दूर करून तू माझा शीण म्हणजे दुःख हरण म्हणजे नाहीसे कर.

गोविंद म्हणे पंडुनंदना। हे शरीर पंचभूत भावना ।
देही आत्मा मी कारणा जगत्रय गा माझेनि ||३||

गो म्हणजे इंद्रिये बिंद म्हणजे जिंकणारा असा भगवान श्रीकृष्ण पंडुनंदन म्हणजे अर्जुनाला म्हणाला हे शरीर पंचमहाभूतां पासून तयार झालेले आहे, परंतु या शरीरांत असणारा देही म्हणजे आत्मा मात्र मी आहे. आणि हे जगत्रय म्हणजे मृत्युलोक, स्वर्ग आणि पाताळ हे सर्व मीच आहे.

यत्र जीव तत्र शीव । हा गुरुमुखे असे अनुभव |
इतुकेन बुझावला पांडव । म्हणे हा देव हृदयीचा ॥४॥

यत्र म्हणजे जेथे जीव आहे, तत्र म्हणजे तेथे शीव आहे. याचा अर्थ जेथे जीव आहे, तेथेच शीव आहे आणि गुरुमुखाने ऐकल्यामुळे अर्जुनाचा संशय दूर झाला आणि माझ्या हृदयांत असणारा देव मीच आहे. एन्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं ‘मी अमुका’ आहे ऐसी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ||१५| |४२१||

इति चतुर्दशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १५ वा

सांगत परमार्थ गुज । सकळही भोगणे मज।
माझिया आनंदाचे भोज्य । हे त्रैलोक्य पाहे पां ।।१।।

परमार्थाचे गुह्य मी तुला सांगत आहे, की या संपूर्ण विश्वाच्या रूपानें तूं मलाच पहा. कारण हे त्रैलोक्य माझ्याच आनंदस्वरूपाचे भोज्य आहे. (माझ्याच स्वरूपावर भासलेले आहे.)

पुण्यपाप घडे देही । तेही मीच करितो पाही ।
मज वाचूनी दुजे नाही। बरवे वोखटे मजमाजी ।।२।।

देहांत घडणारे पुण्य-पाप हे माझ्यामुळेच घडते. माझ्याशिवाय दुसरे कांहीच नाही. चांगले अथवा वाईट सर्व कांही माझ्यांतच आहे.

मी दीप्त हुताशनू । इंद्रिये आणि मनू ।
सौंदर्य मूर्ती मदनू । अष्टभोग मीच भोगी ||३||

मीच प्रदीप्त अग्नी आहे. इंद्रिये आणि मन सुद्धा मीच आहे. सौंदर्याची मूर्ति सुद्धा मीच आहे.अष्टभोग मोगणाराही मीच आहे.

म्हणूनि साकार निराकार । हे समस्त माझे अंकुर ।
तू आपणियाते विसर । मीच होऊनि राहे ||४||

म्हणून साकार आणि निराकार सर्व मीच आहे. हे दिसणारे (सर्व विश्व) मंजि आहे. (यासाठी) तूं स्वत:ला बिसर आणि मीच होऊन रहा.

इति पंचदशोऽध्यायः समाप्त: ।


कान्हो पाठक गीतासार भावार्थ – अध्याय १६ वा

शंका न धरीजे जन्म मरणा । म्हणसी अधोगती कवणा ।
या तव प्रकृतीच्या गुणा । माझे असुनी अलिप्त ।।१।।

जन्म आणि मरणाची शंका धरू नकोस. (जन्म मरण) हे प्रकृतीचे गुण (लक्षणे) आहेत. तूं म्हणशील अधोगती कोणाला प्राप्त होते? तर ही शंकाच तुला मत्स्वरूप असूनही माझ्याहून तुला वेगळे करते.

मन हेचि लिंगदेह जाण । कल्पना याची खूण |
मनावाचून न दुजेपण । गर्भवासा यावया ॥२॥

मन हेच लिंगदेह असून संकल्प-विकल्पात्मक कल्पना करणे हेच त्याचे कार्य आहे. गर्भवासाला येण्याचे मनाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही.

यालागी रचलासे वेद । चालावया विधीनिषेध |
आचार धर्म ज्ञान भेद । कुलधर्म न सांडावे ||३||

विहित आणि निषिद्ध धर्म आणि अधर्म या पैकी कशाचे आचरण करावे यासाठीच वेदाची रचना असून तूं विहित आणि धर्माला अनुकुल असेच आचरण कर.

जव जाणितले नाही ब्रह्म । तव कासया त्यजील कर्म ।
तो ही अधम चुकला वर्म । पाषाण निर्णयी पडियेला ||४||

जोपर्यंत स्वस्वरूपाचा म्हणजेच ब्रह्माचा अनुभव प्राप्त होत नाही तो पर्यंत त्याच्याकडून कर्माचा त्याग होणार नाही. (ब्रह्मस्वरूपलच्या अनुभूतीशिवाय जर एखादा कर्माचा त्याग करील तर त्याला वर्म समजलेले नसून त्याचा तो निर्णय म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या मार्गातील तो मोठा अडथळा आहे.

इति षोडषोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १७ वा

पार्थ म्हणे ते सांगावे । त्रिविध कर्म बोलिले देवे ।
जे जाणोनि भजती भावे । त्या काय फळ असे ? ।।१।।

अर्जुन भगवंताला म्हणत आहे- भगवंता आपण जे तीन प्रकारचे कर्म सांगितले आहे समजावून घेऊन जे भक्त भगवंताची सेवा करतात. त्यांना त्या कर्माचे काय फळ मिळते?

ऐक सात्त्विके जे भजती । ते देवलोका जाती ।
दंभे प्रपंच भजती । ते होती कुरु राक्षस ||२||

भगवंत म्हणातात- ऐक, जे सात्त्विक भक्ती करतात ते देवलोकाला प्राप्त होतात. जे दांभीक आहेत ते माझ्या भक्तीचे केवळ ढोंग करतात आणि प्रपंचाची भक्ती करतात, ते कौरबांच्या सारखे कुरु कुळात जन्मूनही राक्षसी वृत्तीचे होतात.

सक्रोधे भजती तामसे होती प्रेत पिशाच्च ते ।
काया वाचा आणि मानसे । यातायाती उद्देश ||३||

काया म्हणजे शरीर, नामसी लोक शरीराने वाचेने आणि मनाने दुसऱ्याला त्रास व्हावा या हेतूने क्रोधयुक्त भक्ती करतात. त्यांना मृत्युनंतर प्रेत किंवा पिशाच्च यानी प्राप्त होते.

आधी देवाचे तोंड धरी । मग करू नये तेचि करी ।
बाह्य असोनि लोक व्यवहारी । अभ्यंतरी कळो नेदी ।।४।।

प्रथम देवाचे तोंड बंद करतात आणि मग जे करायला नको तेच करतात. असे लोक बाह्य दृष्टीने लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसत असले तरी त्यांच्या अंतःकरणांत काय आहे ते मात्र कळत नाही.

इति सप्तदशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १८ वा

कर्म करावे सकळ । न कल्पावे कर्मफळ ।
करी भजन गा निर्मळ । हा उपदेश ऐक पा ।।१।।

सर्व (वेद-बिहित) कर्मे करावित, मात्र ती करताना कर्मफळाची अपेक्षा आणि कर्तृत्वाचा अहंकार न ठेवता करावे. यालाच निर्मळ कर्म म्हणतात. भगवंताचे भजनही तसेच करावे. हा माझा उपदेश आहे, तो तूं ऐक.

भावे भक्ति माझी करी । दोन्ही चित्तें तू न घरी ।
सर्वाभूती नमस्कारी । अष्टांगे विनये ||२||

अंतःकरणांत शुद्ध भाव ठेवून माझी भक्ती कर पाप-पुण्य या दोहोंचाही विचार तूं चित्तांत आणू नकोस. सर्व भूतांच्या ठिकाणी मीच आहे या भावनेनें विनयपूर्वक तूं त्यांना साष्टांग नमस्कार कर

अर्जुन म्हणे परमानंदा । मी विसरलो जी भिन्न भेदा ।
धाकुटपणाचिया संवादा । क्षमा कीजे स्वामिया ||३||

सर्वांना श्रेष्ठ आनंद देणाऱ्या भगवंताला अर्जुन म्हणतो देवा, व्यवहार हा तर द्वैतांत होतो आणि मी तर भेदभावाला विसरून गेल्याने मला तर द्वैत दिसतच नाही मग मी हा व्यवहार कसा करावा. माझे हे बोलणे अज्ञानांतील आहे, म्हणून आपण मला क्षमा करावी.

म्हणोनि घातले लोटांगण । आनंदे आसुवे स्फुंदन ।
उचलोनि दिधले आलिंगन । म्हणे जे विसरलो जी सखया ||४||

असे म्हणून अर्जुनाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले त्याने भगवंताला लोटांगण घातले, ते पाहून भगवंतांनी अर्जुनाला उचलून घेतले आणि त्याला म्हणाले सख्या तुझे बरोबर आहे. माझेच चुकले.

इति अष्टादशोऽध्यायः समाप्त:

अशा रीतीने तत्त्वांश प्राकृत गीतेचा अठरावा अध्याय संपूर्ण झाला.


हे वेदशास्त्रांचे सार । उपनिषदांचे गौरव ।
साकारी निराकार । सगुण निर्गुण निवडिले ॥१॥

हे म्हणजे श्रीमद्भगवद्गीताशास्त्र, हे वेदांचे सार असणाऱ्या उपनिषदांचा गौरव करणारे आहे. यामध्ये (भगवंताच्या) सगुण आणि निर्गुण स्वरूपाचा स्पष्ट असा निवाडा केलेला आहे.

सर्व आगमीचे मथिले । ते कृष्णे अर्जुना कथिले
थोडेनि बहु विस्तारले । अध्यात्म निभ्रांति ॥२॥

सर्व आगम म्हणजे वेदांचे जे मंथनरूप सार काढून कृष्णानें ते अर्जुनाला सांगितले. हे सार अतिशय कमी दिसत असले तरी त्यामध्ये अध्यात्माचा मोठा विस्तार सामावलेला आहे.

मेरूमांदाराचेनि तुके । जे केली असतील महापातके ।
हरतील निमिषे एके । आत्मज्ञान झालिया ||३||

मेरू आणि मंदार पर्वता एवढी मोठी आणि अनंत पापे जरी एखाद्याने केलेली असतील तरी त्याला आत्मज्ञान झाले असता त्या सर्व पापांचा एका क्षणांत नाश होईल.

गुरु उपदेशी नागनाथु । पाठक कान्हु जीवनमुक्तु ।
तत्त्वमसि असे चिंतितु । आत्मज्ञान शिवयोगी ||४||

ज्यांना नागनाथ गुरुंचा उपदेश प्राप्त झालेला आहे असे कान्होबा पाठक हे जीवनमुक्त असून ते तत्त्वमसि महावाक्याचे सतत चिंतन करणारे शिवयोगी आहेत.

इति श्रीमद्भगवद्गीता | स्वाध्याय पाठक मान्होकृता ।
अध्याय अष्टादश समान्त । शुभं भवतु सकळांचे ।।५।।

अशा तऱ्हेने श्रीमद्भगवद्गीतेचा स्वाध्याय म्हणजे दररोज नियमाने करावयाचा अभ्यास कान्होराज पाठकांनी तयार केलेला आहे आणि या बरोबरच तत्वां प्राकृत गीतेचा अठरावा अध्याय समाप्त झालेला असून या स्वाध्याचे अनुष्ठाण करणाऱ्या सर्वांचे कल्याण व्हावे.


हे पण वाचा: संत कान्हो पाठक यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *