संत सेना महाराज

संत सेना महाराज गौळणी

संत सेना महाराज  गौळणी

१३४. गोपिका वेल्हाळा। अवघ्या मिळोनी सकळा । चालिल्या यमुना जळां । तंव सन्मुख देखिला सांवळा वो ॥१॥

राधा म्हणे बहु चालक होसी । नसतां आळ कां आम्हांवर घेसी । त्यां देखिलें येशोदेसी। हां लबाडा लटका ऋषीकेशी बा ॥ २॥

यशोदा म्हणे कवटाळिणी। नसती खोडा करितां देखूनी। सांगतां गा-हाणे येऊनी। गुणातीत हा चक्रपाणी वो ॥३॥

राधा म्हणे यशोदा सुंदरी । चोरटा शिंदळ तुझा मुरारी। आम्हां ठाऊक अंतरीं । हा न करी ते करी काय सांगु वो ॥४॥

हा ब्रह्मांडनायक। येणें मोहिले तिन्ही लोक । सेना म्हणे यदुनायक । कर्मातीत परिपूर्ण वो ॥५॥

 

१३५. दूती जाणवित स्वामिनी। काम दाटला ह्ृदयभुवनीं । कोपा नयेची सारंगपाणी । सेजे पाहतां न दिसे नयनी ॥१॥

मज भेटवागे श्रीहरी । लागला वेध त्याचा अंतरीं । ध्यानीं बिंबलागे मुरारी। प्राण रिघो पाहे जरी ॥२॥

गोड न लगे काम धंदा कांहीं । नावरे चीर चोळी पाही। सुमनसेज रुपती बाई। चित्त वेधलें हरी पायीं हो ॥३॥

वृत्ति स्वानंदीं निमग्न । गेली देहभाव विसरून । रंगीं रंगली परिपूर्ण। धन्य धन्य सेना म्हणे ॥४॥

 

१३६. गाय चारी घननीळा । सवें गोपाळांचा मेळा। मोहिलें वेणुनादें सकळां । स्वानंदे गाई नाचती। गोपिका परमानंदें गाती। गोपाळ प्रेमें डुल्लती ॥१॥

भला भला तूं श्रीहरी रे ॥ धृ. ॥ वेडे वांकुडे पांगुळे । बोबडे मुके आंधळे । धांवतां पडे अडखळे । हरी म्हणे गोपाळांसी। तुम्ही बैसा मजपाशीं । मिळवितों गाईसी  भला ॥ २ ॥

नसो संगती ऋषीकेशी । आम्हां गाई वळी म्हणसी । आम्हां दुरी दवडीसी । मज ठाऊक अंतरीं । तुज ओळखी खरीच। भला ॥३॥

गाय पाळुनी दुधासी। आपण सगळेची खाशी। आम्हां धमकावुनी ठेविसी । काय सांगू तुझी मात । भेद नाहीं तुम्हां आम्हांत । सेना म्हणे गोपीनाथ । समाधान कर्तारे। भला ॥४॥

 

१३७. पोवा घोंगडी घेऊनी पाही। संगें गोपाळ घेउनि गाई। वृंदावनी आले लवलाही। वेणू वाजविला सुस्वरें बाई हो ॥१॥

उतावेळ झाल्या गौळणी । वेणुनाद पडियेला कानीं । भोवत्या पाहती अवलोकुनी। नयना न दिसे सारंगपाणी हो ॥ २॥

विसरल्या कामधंदा । सासु सासऱ्याची नाही मर्यादा। कोण जाणे त्या कोण जावा नणंदा। वृत्ति वेधली परमानंदा हो ॥ ३॥

अवघा हरपला देहभाव । पुसिला जन्ममरणाचा ठाव । वृत्ति स्वानंदें मुराली पहावो । सेना म्हणे भाग्य उदया हो ॥४॥

 

१३८. जाती मिळोनि पांच सात गवळणी । गोरस विकूं मथुरे लागोनी। वाटे आडवोनी । दान मागे चक्रपाणी ॥धृ.॥ सोडी सोडी मज जाऊं दे हरी। नको वाटा आडवू म्हणे मुरारी। घरी जावा नणंदा जाचिती कीं भारी ॥१॥

म्हणती गवळणी हरिसि हसुनी। देऊं तुज लागि नवनीत चोरुनी। जाऊं पाहती ठकवूनी हरीसी गवळणी ॥२॥

ब्रह्मांडाचा नायक म्हणे गोपिकांसी । ब्रह्मज्ञानी महान चाळविले ऋषी । गाई गोपाळ चोरिले नाडिले ब्रम्हयासी ॥३॥

भक्तिभावे गौळणी रिघाल्या शरण । वृत्तिसहित बिंबल्या अवघ्या परिपूर्ण । सेना म्हणे विसरल्या कार्य आठवण ॥४॥

 

१३९. ऐक येश्वदे साजणी । या कृष्णाची करणी । दहीं दूध खातो चोरुनी टाकी माजणें फोडोनी ॥धृ.॥१॥

सांभाळ आपुला हरी गे । उगा न राहे क्षणभरी गे। येणें धमकाविल्या पोरि गे। काय सांगों भांडखोरी गे ॥२॥

करी करणें कळेना गे । हृदयीं धरितो सुना गे। भोग भोगितो शहाणा गे। आंगी लागूं देईना गे ॥ ३॥

हा दिसतो भोळा गे। येऊनि घालितो डोळा गे। सावळा करितो गोळा गे। नाही काळ वेळा गे॥४॥

सावळा जगजेठी गे । चित्त चोर कपटी गे। हा न कळे वेद श्रुती गे। येणे हरली काम वृत्ती गे ॥५॥

हें बाळक नंदाचें। भाग्य फळलें गवळ्याचें। सेना म्हणे धन्य साचें पुण्य त्या गोपींचें ॥६॥

 

१४०. राधा जाणवित दूर्ती। कामें व्यापिलें न गमे राती। कां बा गोवळा नये निश्चिती। यानें वेधली चित्तवृत्ती ॥धृ.॥ मज दाखवागे हरिसी। ध्यान लागलें मानसी। त्याविण न गमे दिवसनिशीं। डोळां ऋषीकेशी दावा मज ॥१॥

मिळोनि गोपींनी मोहिला। कीं सत्यभामेनें दान केला। नारद हरिसी घेऊनि गेला । नेणो गुंतला सदैवा घरीं ॥२॥

धाडिलें गरुडासी । वेरगी आणावे हनुमंतासी। अभिमान होता सत्यभामेसी। नेउनिया सभेसी विटंबिली ॥३॥

माया लाघवी सुत्रधारी । बोलतां बोल खुंटली वैखरी। धरिला गोपिकांनीं अंतरी। सेना म्हणे धन्य त्या नगरी हो ॥४॥

 

१४१. कृष्ण आला ऐकुनि गोपिका सुंदरी। विव्हळ झाल्या पहावया हरी। एकी त्या धांवल्या नगरा बाहेरी। कायावाचा मने वेधल्या नारी ॥धृ.॥ आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेसी । मोहियलें मन देखोणी रूपासी। झाली उतावीळ पहावया ऋषीकेशी। नेत्रिचें काजळ लाविलें मुखासी ॥१॥

एक ती बैसली होती पति शेजारी। नग्नचि धांवत आली बाहेरी। विसरुनी चीर ठेवि माथियावरी। देहभाव हरपला देखोनि मुरारी ॥२॥

एकी त्या ताटक घातलें पायीं। विरुद्या जोडवीं कंठाचे ठाई। घेऊनि पाल्होर खोविले डोई। बाळ्या वाक्या बांधिल्या कानाचे ठायीं ॥३॥

एकीनें कडिये घेतला दह्याची माथण । बाळक ठेविलें शिंकीया जाण। नाही पुत्रलोभ देखोनी कृष्ण । निजसु मनीली नाहीं आठवण ॥४॥

करितां मंथन हरिआला ऐकुनि कानीं। तैशीच धांवली रवी दोर घेऊनी। नाकीचे मुक्ताफळ खोविलें वेणीं। मोतियाची जाळी घाली गुडघ्यालागुनी ॥५॥

कृष्णसंखा मीनल्या अवघ्या सुंदरी। लाज भय मोह शंका दवडविल्या दुरी। सेना म्हणे वृत्ति झाली तदाकारी। परतुनि संसारा नुरेचि उरी ॥६॥

 

१४२. सोडिल्या शिदोरी। काला करी दहीं भात ॥१॥

घ्यारे अवघे समस्त। हरी गोपाळांसि देत ॥२॥

कांही न ठेवा उरी। आजी देतो पोटभरी ॥३॥

सेना बैसला द्वारीं । प्रसाद वाटितो श्रीहरी ॥४॥

 

१४३. श्रीगुरुनिवृत्तिराय सांप्रदाय दाविला अलंकापुरवासिनी अधिकार तया दिधला ॥१॥

आदिनाथें मूळ गुप्त होतें ठेविलें। निवृत्तिकृपेनें ज्ञानदेवें प्रगट केलें ॥२॥

बडतां भवसागरीं जगा काढिलें बाहेरी। दावियेला तारु विठ्ठल या तीं अक्षरीं ॥३॥

विटेवरी उभा नीट वैकुंठींचा राणा । दावियली खूण म्हणे न्हावीयाचा सेना ॥४॥


https://www.krushikranti.com/

संत सेना महाराज गौळणी संत सेना महाराज गौळणी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *