rama ekadashi information in marathi video
रमा एकादशी मराठीत माहिती विडिओ सहित
नवचैतन्य, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी ही अत्यंत शुभ, धन, समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादाशी रमा एकादशी नावाने ओळखली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. तसेच अश्विन महिन्याच्या वद्य पक्षातील येणारी एकादशी चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची शेवटची एकादशी असल्यामुळे रमा एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे.
यंदा अश्विन महिना अधिक आल्यामुळे चातुर्मासातील महिन्यांची संख्या पाच, तर वर्षभरातील एकूण एकादशींची संख्या २६ झाली. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. अश्विन महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या रमा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन, व्रतकथा जाणून घेऊया
रमा एकादशीचे महत्त्व – (rama ekadashi importance)
वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, रमा एकादशीला श्रीविष्णूचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. घरातील धन, धान्य, समृद्धी वृद्धिंगत होते. पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.
रमा एकादशी व्रतपूजन / पूजा विधी – (rama ekadashi vrat / rama ekadashi puja vidhi)
रमा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्रीकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी. श्रीकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास गीता पठण करावे. या एकादशीची व्रतकथा ऐकवी. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
रमा एकादशीची कथा – (rama ekadashi katha)
पौराणिक कथेनुसार, मुचुकंद नामक महाप्रतापी राजा होता. मुचुकंदच्या कन्येचे नाव चंद्रभागा होते. तिचा विवाह चंद्रसेन नामक राजाचा पुत्र शोभन याच्याशी झाला. शोभन शारीरिक दृष्टिने अत्यंत दुर्बल होता. त्याला भूक सहन होत नसे. एकदा दोघे जण मुचुकंद राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते, तो दिवस रमा एकादशीचा होता. एकादशी व्रताबाबत चंद्रभागाने शोभनला सांगितले. यानंतर दिवसभर अन्न ग्रहण न करण्याचा निर्णय शोभनने घेतला. मात्र, भूक सहन न झाल्याने तो बेशुद्ध होतो. मात्र, पतीचे निधन झाले, असे समजून चंद्रभागा वडिलांकडे येऊन एकादशीचे मनोभावे व्रत करते. दुसरीकडे, शोभनला एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होऊन त्याला जीवनदान मिळाले. इतकेच नव्हे, तर त्याला देवपूर ते राज्यही प्राप्त झाले.
शोभन व चंद्रभागा भेट – (rama ekadashi story)
देवपूर राज्यात असीम धन, धान्य, ऐश्वर्य, वैभव असते. एक सोम शर्मा नामक व्यक्ती शोभनला ओळखतो आणि त्याला या सर्व प्रकाराबाबत विचारतो. शोभन रमा एकादशीचे व्रत आणि नंतर झालेल्या पुण्य फलाबाबत सांगतो. यावर हे सर्व धन, धान्य, ऐश्वर्य स्थिर राहण्याचा उपाय विचारतो. यावर सोम शर्मा काही न बोलता थेट चंद्रभागेला गाठतो आणि सर्व हकीकत सांगतो. चंद्रभागा शोभनची भेट करून देण्याची गळ सोम शर्माला घालते. शेवटी चंद्रभागा आणि शोभन यांची भेट होते. तेव्हा चंद्रभागा सांगते की, गेली ८ वर्षे नियमितपणे रमा एकादशीचे व्रत केल्याचे जे पुण्य मिळाले आहे, ते सर्व आपणास अर्पण करते. यामुळे देवपूरचे वैभव, ऐश्वर्य, धन, धान्य, संपत्ती स्थिर होते. सर्वजण आनंदाने नांदू लागतात, अशी व्रतकथा सांगितली जाते.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: maharashtratimes