हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला‘रक्षाबंधन'(raksha bandhan) म्हणतात.
श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननळ, म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.
नारळी पौर्णिमेच्या निमीत्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. अनेक कोळी पाडयांवर रावस माश्याचा तळलेला तुकडा देखील नैवेद्यामधे ठेवला जातो.त्यानंतर आपापल्या कोळी पाडयांवर पारंपारीक गिते गायली जातात. मिरवणुका काढल्या जातात. नारळ फोडण्याचा खेळ खेळला जातो. विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोळी स्त्रिया भरजरी कपडे घालुन पारंपारीक नृत्य करतात.
“राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.
या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
View Comments
खूप सुंदर माहीती.
रक्षाबंधन करतेवेळी एक मंत्र म्हटला जातो तो काय आहे कळेल का?