संध्याकाळी देवासमोर दिवा लावून “शुभं करोति कल्याणम्” म्हणून घरातील वडीलधार्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.
दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले,धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.
या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू , फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा.
यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.