दहीहंडी सणाची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे
श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला / दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. गाणी, नाच, उंच चढणार्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे.
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. मासिक पाळी, अशौच व स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने कमी होतो. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती व अंती वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला’ हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. `काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. `गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
source : sutrasanchalan.com