अजा एकादशी जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, मान्यता व व्रत-पूजाविधी :-
संपूर्ण चातुर्मास हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव, प्रथा-परंपरा यांसाठी ओळखला जातो. चातुर्मासातील पहिला महिना श्रावण हा व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांचा राजा मानला जातो. श्रावण महिना आता अखेरच्या टप्प्यात आहे. श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी श्रावण पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. तर, श्रावण महिन्याच्या वद्य पक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत…
तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. सन २०२० मधील चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा अश्विन पुरुषोत्तम महिना असल्याने हा काळ पाच महिन्यांचा झाला आहे. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रावण वद्य पक्षातील अजा एकादशीचे व्रत कठीण असते. या एकादशीचे महत्त्वही वेगळे आहे, असे सांगितले जाते. अजा एकादशीचे व्रत कसे करावे? व्रताचरण पद्धती, महत्त्व, मुहूर्त, व्रतकथा यांबाबत जाणून घेऊया…
अजा एकादशीचे महत्त्व, व्रतविधी :-
शास्त्रांमधील काही उल्लेखांनुसार, अजा एकादशीचे व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे. या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्यफलप्राप्ती होते, असे सांगितले जाते. अजा एकादशीचे व्रत आचरणे कठीण असते. हे व्रत दशमीपासून सुरू केले जाते. दशमीला सात्विक आहार घ्यावा. अजा एकादशीच्या आदल्या दिवशी केवळ दुपारी भोजन करावे. यानंतर दिवसभर शक्यतो काही आहार घेऊ नये. अजा एकादशीचे पूजन केल्यानंतर संपूर्ण दिवस केवळ फलाहार घ्यावा. शक्य असलेल्यांनी हे व्रत निर्जळी करावे. अन्यथा अन्य आहार सेवन करू नये, असे सांगितले जाते. हे व्रत आचरल्यास सर्व पापांचा नाश होतो. पुण्यप्राप्ती होते, अशी मान्यता आहे.
अजा एकादशी मुहूर्त :-
वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. अजा एकादशी दिनी केलेल्या व्रतामुळे पुण्याची प्राप्ती होऊन सर्व पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील ही दुसरी एकादशी असल्याने याचा विशेष महत्त्व प्राप्त होते.
अजा एकादशी : ३ सप्टेंबर २०२१
एकादशी प्रारंभ : २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी
एकादशी समाप्ती : ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी .
अजा एकादशी व्रतपूजन :-
अजा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर अजा एकादशी आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. चौरंगावर स्थापना करावी. यानंतर पंचामृत अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
अजा एकादशी व्रत सांगता :-
अजा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
अजा एकादशी व्रतकथा :-
अजा एकादशीच्या व्रताची कहाणी सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांच्याशी निगडीत आहे. राजा हरिश्चंद्र केवळ वीर, प्रतापी नव्हते. तर ते उदार आणि दानशूरही होते. एकदा दिलेल्या दानाचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्र आणि पत्नीचाही त्याग केला. स्वतः एका चांडाळाकडे सेवक म्हणून राहिले. गौतम ऋषींची भेट घेण्यासाठी राजा हरिश्चंद्र गेले असता, त्यांना सत्यकथन केले. गौतम ऋषींनी त्यांना यातून बाहेर पडण्याचा उपाय म्हणून अजा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व नियम पाळून राजा हरिश्चंद्रांनी अजा एकादशीचे व्रत केले. राजा हरिश्चंद्राकडून घडलेल्या सर्व पापांचे निवारण झाले. व्रतपूजनामुळे त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. सर्व उपवासात अजा एकादशीचा उपवास सर्वश्रेष्ठ मानला जातो. चित्त, आहार, इंद्रिये आणि व्यवहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे व्रत आचरावे, असे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही अर्जुनाला या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता आहे.