एकनाथी भागवत

एकनाथी भागवत अध्याय 11

एकनाथी भागवत अध्याय 11

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥

ॐ नमो द्‍गुरु सच्चिद्‍घन । वर्षताहे स्वानंदजीवन ।
मुमुक्षुमयूरकूळें जाण । हरिखें उड्डाण करिताति ॥१॥
हे ओंकाररूप श्रीगुरो ! तुला नमस्कार असो. तूं सत् आणि चित् ह्यांचा मेघ आहेस. स्वानंदजीवनाची तूं वृष्टि करतोस. तेणेंकरून मुमुक्षुरूपी मयुरांना आनंद होऊन ते मोठ्या हर्षाने नाचूं उडू लागतात १.

तो सजल देखोनि मेहो । ‘सोहंभावें’ फोडिती टाहो ।
रोमांचपिसीं पसरूनि पहा हो । सत्त्वें लवलाहो नृत्याचा ॥२॥
तो भरून आलेला मेघ पाहून ते ‘सोऽहं’ म्ह० ‘मी ब्रह्म आहे’ ह्या भावनेचा टाहो फोडतात. आणि रोमांचरूपी पिसारा उभारून, सत्त्वाचा मोठ्या झपाट्याने नाच करूं लागतात २.

नाचती स्वानंदाचेनि मेळें । तेणें सर्वांगीं निघाले डोळे ।
पिसें देखणीं जाहलीं सकळें । तें शिरीं गोपाळें वाहिलीं ॥३॥
ते स्वानंदाच्या भराने नाचत असल्यामुळे त्यांच्या साऱ्या अंगालाच डोळे फुटून ती सारी पिच्छेच देखणी होऊन जातात; म्हणूनच ती पिसें श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर धारण करतो ३.

तो मेघ देखोनि संमुख । आर्त चातक पसरिती मुख ।
बिंदुमात्रें पावले सुख । नित्य निर्दोख ते जाहले ॥४॥
तो मेघ समोर पाहून आत (भक्त सुमुक्षु) रूपी चातक तोंडे पसरतात. तेव्हां तोंडांत एक बिंदु पडला की पुरे, ते सुखी आणि नित्य निर्दोष होऊन राहतात ४.

आर्ततृषा तत्काळ वोळे । निवाले तेणें स्वानंदजळें ।
मग हरिखाचेनि कल्लोळें । सुखसोहळे भोगिती ॥५॥
आर्ताची तृषा तत्काळ नाहीशी होते. ते स्वानंदजलानें तृप्त होऊन हर्षकल्लोळाचे सुखसोहळे भोगतात ५.

सुभूमि देखोनि निर्मळ । जाणोनि वर्षती काळवेळ ।
वर्षों लागले जी प्रबळ । जळकल्लोळ अनिवार ॥६॥
उत्तम आणि निर्मळ भूमी पाहून व काळवेळ लक्षात आणून ते मेघ वृष्टि करतात. त्यांची ती सारखी व जोराची वृष्टि सुरू झाली म्हणजे पाण्याच्या अनिवार लाटा उसळतात ६.

तेणें वोळलेनि कृपाभरें । शिष्यसरितेसी पूरु भरे ।
विकल्पवोसणें एकसुरें । महापूरें वाहविलीं ॥७॥
त्या कृपेचा वर्षाव सुरू झाला म्हणजे शिष्यरूप नदीला पूर येतो. आणि विकल्परूप केरकचरा तो महापूर सरसकट वाहून नेतो ७.

तेणें प्रवाहनिर्मळजळें । चिदैक्यसागरीं सरिता मिळे ।
मग समरसोनि तेणें जळें । राहे निश्चळें निजरूपें ॥८॥
नंतर ती निर्मळ प्रवाहाच्या जलाची नदी चिदैक्यसागराला जाऊन मिळते. आणि त्याच्याशी समरस होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते ८.

वैराग्यराबें शुद्ध केली । पृथ्वी निजवोला वोळली ।
कठिणत्वेंवीण मार्दवा आली । नाही अंकुरली बहुबीजें ॥९॥
नंतर वैराग्याच्या राबाने शुद्ध केलेली जमीन आपल्या अंगच्या ओलाव्याने आपोआपच भिजते व कठिणत्वाला टाकून मृदु होते. पण तींत बी उगवून रान माजलेले नसते ९.

अखंड वर्षतां जळमेळीं । वासनेचीं ढेपें विरालीं ।
सद्‍भावाची वोल जाहली । वाफ लागली बोधाची ॥१०॥
अशा त्या भूमीवर पाण्याचा सतत वर्षाव होऊ लागला म्हणजे वासनेची डिखळें विरून जातात. आणि सद्‌भावाची ओल चढून ज्ञानाची वाफ निर्धू लागते १०.

तेथें न पेरतांचि जाण । सहज निजबीजें परिपूर्ण ।
अंकुरली आपणिया आपण । सिद्ध संपूर्ण स्वभावें ॥११॥
तेव्हां तेथें आत्मबीज न परतांच आपोआप परिपूर्ण अंकुर फुटून शेत स्वभावत:च जोमाने पिकते. त्यांतील दाणा जात्याच भरीव असतो ११.

ते परम कृपेचिये पुष्टीं । स्वानंदें पिकली समदृष्टी ।
परमानंदें कोंदली सृष्टी । ऐक्यें संवसाटी जीवशिवां ॥१२॥
परमकृपेच्या पोषणाने समदृष्टीची कणसें पिकतात. परमानंदाने सृष्टि भरून जाते. आणि ऐक्याने जिवाशिवाची देवघेव होते (दोघे एकरूप होतात) १२.

फिटला दुःखदुष्काळु । पाहला सुखाचा सुकाळु ।
वोळळा सद्‍गुरु कृपाळु । आनंदकल्लोळु सच्छिष्यां ॥१३॥
दुःखरूप दुष्काळ नाहीसा होऊन सुखाचा सुकाळ उदयास येतो. कृपाघन सद्गुरु कृपेचा वर्षाव करूं लागला म्हणजे सच्छिष्यांमध्ये आनंदाचा कलोळ उत्पन्न होतो १३.

वर्षतां निजपर्जन्यधारा । वर्षला नाना अवतार-गारा ।
कार्यानुरूपें तदाकारा । विरोनि निराकारा त्या होती ॥१४॥
आत्मज्ञानरूप पर्जन्याच्या धारांचा वर्षाव होऊ लागला, की त्याबरोबर अनेक अवताररूपी गारांचीही वृष्टि होते. त्या गारा कार्यानुरूप त्या त्या आकाराच्या होऊन शेवटी विरून निराकाराला पोंचतात १४.

त्या पर्जन्याचा वोसडा । दैवें लागल्या जडामूढां ।
तो सरता होय संतांपुढां । अवचटें शिंतोडा जैं लागे ॥१५॥
त्या पर्जन्याचे तुषार दैवयोगाने जडमूढाला लागले, व त्यांचा शिंतोडा जरी अकस्मात् त्यांच्या तोंडांत पडला, तरी तो संतांच्या सभेत मान्य होऊन बसतो १५.

तो महामेघ श्रीहरी । सद्‍गुरुकृपा वोळे जयावरी ।
तोचि धन्य चराचरीं । पूज्य सुरनरीं तो कीजे ॥१६॥
श्रीहरिस्पी सद्गुरुमहामेघाची कृपा ज्यावर वळेल, तोच चराचरामध्ये धन्य होऊन देवांत व मानवांतही पूज्य होतो १६.

गुरुनामें अति घनवटु । शिष्य तारूनि अति हळुवटु ।
ज्याचा आदि-मध्य-शेवटु । न कळे स्पष्टु वेदांसी ॥१७॥
‘गुरु’ शब्दाचा अर्थ अत्यंत जड (वजनशीर) होय. पण (भवसागरांत) तो स्वतः तरून शिष्यालाही तारतो इतका तो हलका आहे. त्याचा आदि, मध्य आणि अंत वेदांना सुद्धा स्पष्ट कळत नाही १७.

तो सद्‍गुरु श्रीजनार्दनु । वोळलासे आनंदघनु ।
तेणें एका एकु केला पावनु । सांडवोनु एकपण ॥१८॥
तो आनंदघन सद्गुरु श्रीजनार्दन मला वळला, आणि त्याने एकपणा नाहीसा करून या एका एकाला [एकनाथाला] पावन करून मोबळे १८.

एक तेंचि अनेक । अनेक तेंचि एक ।
हेंही केलें निष्टंक । स्वबोधें देख बोधोनि ॥१९॥
आणखी पहा ! आत्मज्ञानाचा बोध करून एक तेंच अनेक व अनेक तेंच एक हेही निश्चित करून दिले १९.

बोधोनियां निज‍ऐक्यता । ऐक्यें लाविलें भक्तिपंथा ।
मज प्रवर्तविलें श्रीभागवता । निज कथा गावया ॥२०॥
निजामक्याचे ज्ञान करून देऊन त्या ऐक्यानेच भक्ति मार्गाला लावून दिलें, आणि आपलीच कथा वर्णन करण्याकरिता मला श्रीभागवत सांगण्याला पुढे केलें २०.

तेचि श्रीभागवतींची कथा । दशमाध्यावो संपतां ।
ते बद्धमुक्तांची व्यवस्था । उद्धवें कृष्णनाथा पूशिली ॥२१॥
त्या भागवतांतील कथा हीच की, दहाच्या अध्यायाच्या शेवटी उद्धवाने श्रीकृष्णाला बद्धांची आणि मुक्तांची व्यवस्था विचारली २१.

सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनियां श्रीकृष्ण ।
निजहृदयींचें गुह्यज्ञान । उद्धवासी जाण सांगेल ॥२२॥
उद्ध्वाचा प्रश्न फार गहन. तो श्रीकृष्णांनी ऐकल्यावरून ते आता आपल्या अंतःकरणांतील गुह्य ज्ञान उद्धवाला सांगणार आहेत २२.

येणें प्रश्नोत्तरश्रवणें । उठे जन्ममरणांचे धरणें ।
संसाराचें खत फाडणें । फिटलें लाहणें विषयांचें ॥२३॥
ती प्रश्नोत्तरे श्रवण केली असता जन्ममरणाचे धरणें उठेल, संसाराचे खत फाडले जाईल व विषयांचे घेणेदेणेही चुकेल २३.

मोक्षमार्गींचे कापडी । साधनीं शिणती बापुडीं ।
तिहीं शीघ्र यावें तांतडी । जिणावया वोढी बंधमोक्षांच्या ॥२४॥
मोक्षमार्गातील यात्रेकरू जे विचारे अनेक साधने करून बेजार झाले असतील, त्यांनीही बंधमोक्षाच्या ओढी जिंकण्याकरितां झटपट इकडे येण्याची त्वरा करावी २५.

जे कष्टती जपतपसाधनें । शिणती ध्येय-ध्यान-अनुष्ठानें ।
ते ते शीघ्र या विंदानें । ज्ञानाज्ञानें जिणावया ॥२५॥
आणखीही जे जे कोणी जपतपादि साधने करून किंवा ध्येयध्यानादि अनुष्ठाने करून हैराण झाले असतील, त्यांनी त्यांनीही लौकर येऊन या साधनाने ज्ञानाज्ञाने जिंकून टाकावीत २५.

ऐशी कथा आहे गहन । श्रोतीं व्हावें सावधान ।
एका विनवी जनार्दन । स्वानंदघन तुष्टला ॥२६॥
अशी ही कथा मोठी गहन आहे. याकरितां श्रोत्यांनी सावध व्हावें. एकनाथ विनति करतो की, आज स्वानंदधन असा जो जनार्दन तो प्रसन्न झाला आहे २६.

अकरावे अध्यायीं जाण । इतुकें सांगेल श्रीकृष्ण ।
बद्धमुक्तांचें वैलक्षण्य । आणिक लक्षण साधूचें ॥२७॥
या अकराव्या अध्यायामध्ये बद्ध आणि मुक्त ह्यांतील भेद आणि साधूचे लक्षण इतकें श्रीकृष्ण सांगेल २७.

तेणेंच प्रसंगें जाण । सांगेल भक्तीचें लक्षण ।
अकराही पूजेसी अधिष्ठान । इतुकें निरूपण हरि बोले ॥२८॥त्यांतच प्रसंगानुसार भक्तीचे लक्षण व अकराही पूजेची अधिष्ठाने सांगण्यात येतील. इतकें निरूपण श्रीहरि आता करणार आहेत २८.

श्रीभगवानुवाच
बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ।
गुणस्य मायामूलत्वात् न मे मोक्षो न बन्धनम् ॥ १ ॥भगवान श्रीकृष्ण म्हणाले – आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणेसुद्धा माझ्या अधीन असणार्‍या गुणांच्या उपाधीमुळे आहे हे खरे नव्हे गुण मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्ष नाही की बंधन नाही. (१)

उद्धवा बद्ध-मुक्त-अवस्था । जरी सत्य म्हणसी वस्तुतां ।
तरी न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥
उद्धवा ! बद्ध आणि मुक्त ह्या अवस्था तूं खऱ्या आहेत असें म्हणशील तर त्या मुळीच खऱ्या नाहीत त्या कशा ? ते आता सांगतों ऐक २९.

बद्ध-मुक्त-अवस्था । माझे स्वरूपीं नाहीं तत्त्वतां ।
हे गुणकार्याची वार्ता । संबंधु तत्त्वतां मज नाहीं ॥३०॥
खरे म्हणशील तर माझ्या स्वरूपामध्ये बद आणि मुक्त ह्या अवस्थाच मुळी नाहीत. तो सारा गुणांच्या कार्याचा परिणाम आहे. त्यांचा संबंध खरोखर माझ्याकडे काहीच नाही ३०.

माझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । बद्धमुक्तता दोनी नाहीं ।
बद्धता मुक्तता गुणांच्या ठायीं । आभासे पाहीं गुणकार्यें ॥३१॥
माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बद्धपणाही नाही, आणि मुक्तपणाही नाही. हे पहा ! गुणांच्या कार्यानींच गुणांमध्ये बद्धतेचा आणि मुक्ततेचा भास होतो ३१.

गुण ते समूळ मायिक । मी गुणातीत अमायिक ।
सत्यासी जैं बाधे लटिक । तैं मृगजळीं लोक बुडाले ॥३२॥
गुण ते समूळ मायिक आहेत. मी मायेपासून वेगळा असून गुणातीत आहे. सत्याला जर असत्य बाध आणील, तर सारे लोक मृगजळांतही बुडतील ! ३२.

चित्रींचेनि हुताशनें । जैं जाळिजती पुरें पट्टणें ।
कां स्वप्नींचेनि महाधनें । वेव्हारा होणें जागृतीं ॥३३॥
चित्रांतील वणव्याने जेव्हां गांवचे गांव जळून फस्त होतील, किंवा स्वमांतील द्रव्याच्या ढिगाने जेव्हां देवघेव चालेल ३३;

सूर्यासी प्रतिबिंब गिळी । छाया पुरुषातें आकळी ।
समुद्र बुडे मृगजळीं । तैं मज गुणमेळीं बद्धता ॥३४॥
किंवा सूर्याला जेव्हां प्रतिबिंब गिळून टाकील, पुरुषाला छाया बांधून घालील, समुद्र हा मृगजळांत बुडून जाईल, तेव्हांच गुणांच्या त्रिकुटीने मी बांधला जाईन ३४.

जैं जिभेसी केंसु निघे । जैं तळहातीं वृक्ष लागे ।
डोळ्यांमाजीं पर्वत रिगे । तैं मी गुणसंगें अतिबद्धु ॥३५॥
जिभेला जर केस फुटतील, तळहातावर जर झाडे उगवतील, डोळ्यांत जर पर्वत शिरेल, तरच मी गुणांच्या संगतीने जखडला जाईन ३५.

आकाश खोंचे सांबळीं । काजळ लागे वारया निडळीं ।
कां विजूचे कपाळीं । बाशिंग सबळी बांधावें ॥३६॥
आकाश जर सांबळींत अडकून राहील किंवा वाऱ्याच्या कपाळावर जर काजळ चढेल, किंवा विजेच्या मस्तकावर जर लोक बाशिंग बांधतील ३६,

गगन तुटोनि समुद्रीं बुडे । सपर्वत धरा वारेनि उडे ।
सूर्य अडखळोनि अंधारीं पडे । तरी मी सांपडे गुणांत ॥३७॥
किंवा आकाश तुटून समुद्रात पडेल; पर्वतांसहवर्तमान सारी पृथ्वी वाऱ्याने उडून जाईल; सूर्य अंधारामध्ये अडखळून पडेल; तरच मी गुणामध्ये सांपडेन ३७.

अंतरिक्षगगनीं सरोवर । त्यामाजीं कमळें मनोहर ।
तो आमोद सेविती भ्रमर । ऐसें साचार जैं घडे ॥३८॥
केवळ अधांतरी आकाशांत सरोवर असावे, त्यांत अनेक प्रकारची मनोहर कमळे उगवावी व त्यांतील मकरंद भ्रमरांनी सेवन करावा, असे जेव्हां खरोखरच घडेल ३८,

तैं मी आत्मा गुणसंगे । नाना विषयभोग संभोगें ।
मग त्या विषयांचेनि पांगे । होईन अंगें गुणबद्धु ॥३९॥
तेव्हांच मी आत्मा गुणांच्या संगतीने नानाप्रकारचे विषयभोग भोगून मग त्या विषयांच्या लालचीने स्वतः गुणांनी बांधला जाईन ३९.

त्रिगुण-अंगीकारें वर्ततां । गुणकार्य-तदात्मता ।
तेणें बद्ध-मुक्त-अवस्था । भासे वृथा भ्रांतासी ॥४०॥
तीन गुणांच्या अधीन होऊन वागू लागले म्हणजे गुणकार्याशी तादात्म्य होते. आणि त्यामुळे भ्रमिष्टाला बद्ध व मुक्त ह्या अवस्थांचा व्यर्थ भास मात्र होतो ४०.

गुणा आत्म्यासी भिन्नता । म्हणसी मानली तत्त्वतां ।
परी गुणसंगें आत्मा असतां । अवश्य विकारिता येईल ॥४१॥
आतां तूं म्हणशील की, गुण आणि आत्मा हे भिन्नभिन्न आहेत हे जरी खरे मानले, तरी गुणांच्या संगतीत आत्मा असला म्हणजे तो अवश्य विकारी होईल ४१.

अग्निसंगें पात्र तप्त । पात्रतापें जळ संतप्त ।
जळतापें धान्यपाकु होत । तेवीं विकारवंत नव्हे आत्मा ॥४२॥
पण बाबा ! अप्रीच्या संगतीने भांडे तापते; भांड्याच्या संगतीने पाणी तापते; पाणी तापले म्हणजे धान्य शिजतें; त्याप्रमाणे आत्मा काही विकार पावणारा नव्हे बरें ! ४२

अग्नितापाआंत । आकाश नव्हे संतप्त ।
तेवीं गुणसंगा आंत । विकारवंत नव्हे आत्मा ॥४३॥
अग्नीच्या तापाने आकाश कांही तापत नाही, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतींत असला तरी विकार पावत नाही ४३.

नट अंधत्वें अवगला । परी तो आंधळा नाहीं जाहला ।
तैसा आत्मा गुणसंगें क्रीडला । तरी असे संचला निर्गुणत्वें ॥४४॥
नट आंधळा झालेला दिसला, तरी तो कांहीं आंधळा झालेला नसतो, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतीने वावरत असलेला दिसला तरी तो निर्गुणपणानेच स्थित असतो ४४.

नटु अंधत्वें नव्हे अंधु । आत्मा गुणसंगें नव्हे बद्धु ।
गुण मायिक आत्मा शुद्धु । या त्या संबंधु असेना ॥४५॥
सोंगाड्या आंधळेपणाच्या कृतीने काही खरोखर आंधळा होत नाहीं; त्याप्रमाणे आत्माही गुणांच्या संगतीने बद्ध होत नाही. कारण गुण हे मायिक आहेत, आणि आत्मा हा शुद्ध आहे. त्यांचा आणि ह्याचा अर्थाअर्थी कांहींच संबंध नाही ४५.

आत्मा व्यापक गुण परिच्छिन्न । याही हेतु न घडे बंधन ।
सकळ समुद्राचे प्राशन । केवीं रांजण करूं शके ॥४६॥
आत्मा हा व्यापक आहे ; आणि गुण हे एकदेशीय आहेत. ह्या दृष्टीने पाहिले तरी सुद्धा त्याला बंधन शक्य नाही. कारण, रांजण समुद्राचा घोंट कसा घेऊ शकणार ? ४६.

मोहरीमाजीं मेरु राहे । पशामाजीं पृथ्वी समाये ।
मुंगी गज गिळोनि जाये । खद्योत खाये सूर्यातें ॥४७॥
मोहरीमध्ये जर मेरु पर्वत राहील; पशामध्ये जर पृथ्वीचा समावेश होईल ; मुंगी जर हत्तीला गिळून टाकील; काजवा जर सूर्याचा घास करील ४७;

मशकु ब्रह्मांडातें आकळी । पतंगु प्रळयानळ गिळी ।
तरी आत्मा गुणाचे मेळीं । गुणकल्लोळीं बांधवे ॥४८॥
माशी जर ब्रह्मांड बगलेत मारील ; पतंग जर प्रलयानलाचा स्वाहा करील; तर आत्म्याला, गुणांना एकत्र होऊन गुणांच्या पाशांत बांधता येईल ४८.

यापरी न संभवे बद्धता । बद्धतेसवें गेली मुक्तता ।
बद्धमुक्त‍अवस्थांपरता । जाण तत्त्वतां आत्मा मी ॥४९॥
ह्याप्रमाणे बद्धता प्राप्त होणे हेच मुळी असंभवनीय आहे. बद्धता गेली की तिच्या बरोबर मुक्तताही गेलीच. म्हणून मी आत्मा म्हणून जो आहे, तो खरोखर बद्ध मुक्त अवस्थांच्याही पलीकडचा आहे ४९.

स्वप्नींचा अत्यंत सुकृती । अथवा महापापी दुष्कृती ।
दोन्ही मिथ्या जेवीं जागृतीं । तेवीं बद्धमुक्ती आत्मत्वीं ॥५०॥
स्वप्नांतला मोठा पुण्यवान् किंवा महापातकी दुष्ट, हे दोन्ही जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे मिथ्या; त्याप्रमाणे आत्म्यामध्येही बद्धपणा आणि मुक्तपणा हे दोन्ही मिथ्या होत ५०.

हो कां जीवात्म्यासीची बद्धता । सत्य नाहीं गा तत्त्वतां ।
मा मज परमात्म्यासी अवस्था । बद्धमुक्तता ते कैंची ॥५१॥
म्हणून जीवात्म्याला बद्धता आहे म्हणतात तें खरे नव्हे. मग मला परमात्म्याला बद्धमुक्त-अवस्था कशाची ? ५१.

बिंबीं प्रतिबिंब नाहीं । मध्यें आरिशाचे ठायीं ।
मळ बैसले ते पाहीं । प्रतिबिंबाचे देहीं लागले दिसती ॥५२॥
बिंबांत किंवा प्रतिबिंबांत मळ नाहीं; तो आरशाच्या काचेत असल्यामुळे प्रतिबिंबाच्या देहावरच मळ लागला आहे असं वाटते ५२.

तो मळु जैं पडे फेडावा । तैं आरिसाची साहणें तोडावा ।
परी प्रतिबिंब त्या साहणे धरावा । हें सद्‍भावा मिळेना ॥५३॥
तो मळ जर काढावयाचा असेल, तर तो आरसाच चरकावर धरून घांसला पाहिजे. ते सोडून, प्रतिबिंबच सहाणेवर घांसावें हें सयुक्तिक नव्हे ५३.

तेवीं जीवीं शिवीं दोष नाहीं । दोष अंतःकरणाच्या ठायीं ।
तें चित्त शुद्ध केल्या पाहीं । बंधमोक्षां दोंही बोळवण ॥५४॥
त्याप्रमाणे जीवामध्ये आणि शिवामध्ये दोष नसतो, तो अंत:करणामध्ये असतो. ते चित्तच शुद्ध केले म्हणजे बंधाची आणि मोक्षाची दोघांचीही बोळवण झाली ५४.

तैसें आविद्यक हें सकळ । गुणकार्य नानामळ ।
जीवा अंगीं प्रबळ । मूढमती स्थूल स्थापिती ॥५५॥
त्याप्रमाणे गुणांच्या कार्यापासून उद्‌भवणारे जे नानाप्रकारचे दोष आहेत ते सारे अविद्यात्मक आहेत. ते मूर्ख लोक स्थूल बुद्धीने जीवाच्याच अंगाला लावतात ५५.

जैं सत्त्वें गुण निरसे सबळ । तैं आविद्यक फिटती मळ ।
तेचि सद्विद्या होय निर्मळ । जीवचि केवळ शिव होये ॥५६॥
प्रबळ झालेले गुण जेव्हां सत्त्वबुद्धीने झडून जातात, तेव्हांच अविद्येपासून लागलेले दोष नाहीसे होतात. आणि अविद्याच निर्मळ सद्विद्या होते; व जीवच शिव होऊन राहतो ५६.

तेव्हां जीवशिव हीं नामें दोनी । जातीं मजमाजीं समरसोनी ।
तैं मीच एकवांचूनी । आन जनीं वनीं असेना ॥५७॥
जीव आणि शिव ही दोन्ही नावेही जेव्हा माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात, तेव्हा माझ्याच एकाशिवाय दुसरे ह्या जनांत किंवा वनांत कांहींच रहात नाही ५७.

जीवभावनें मीचि जीवु । शिवभावनें मीचि शिवु ।
मी एकला ना नव्हे बहु । माझा अनुभवु मीचि जाणें ॥५८॥
जीवभावने। पाहिले तर मीच जीव आहे, आणि शिवभावनेने पाहिले तर मीच शिव आहे. मी एकही नव्हें आणि अनेकही नव्हें, माझा अनुभव मलाच माहीत ५८.

झणीं आशंका धरिशी येथ । ‘जरी जीव शिव तूंचि समस्त ।
तरी ते शुकवामदेवचि कां मुक्त । येरां म्हणत जड जीव ॥५९॥
आतां येथे कदाचित तूं अशी शंका घेशील की, “जीव शिव सारेच जर तूं आहेस, तर शुकवामदेव हेच कां मुक्त ? आणि इतरांना जड जीव कां म्हणतात ? ५९.

जरी तूंचि जीवरूपें तत्त्वतां । तरी हे ऐशि कां विषमता ।
शुकवामदेवांची अवस्था । वेदशास्त्रार्था सम्मत ॥६०॥
जीवाच्या रूपानेही खरोखर जर तूंच आहेस, तर हा असा भेदाभेद का ? ही शुकवामदेवांची अवस्था वेदशास्त्रसंमत आहे ६०;

तींही लोकांमाजीं जाण । वेदवचन तंव प्रमाण ।
हें बोलणें विलक्षण । अप्रमाण जैं मानिशी’ ॥६१॥
वेदवाक्य तर तिन्ही लोकांत प्रमाण धरतात, त्यामुळे हे बोलणे विलक्षणच दिसते, म्हणून खोटें आहे असे जर म्हणशील ६१;

हो कां वेद म्हणे जें निश्चित । तें बोलणें माझें निःश्वसित ।
तो मी स्वमुखीं जे बोलत । तें तूं अयुक्त म्हणतोसी ॥६२॥
तर तसेंच का होईना ! वेद म्हणतो ते खरेच आहे. तें वेदाचे बोलणे म्हणजे माझे श्वासोच्छवास आहेत; पण तोच मी स्वतः आपल्या तोंडाने जे सांगतो, त्याला तूं खोटें कां म्हणतोस ? ६२.

जो मी वेदांचा वेदवक्ता । सकळ शास्त्रांचा मूळकर्ता ।
त्या माझें वचन म्हणसी वृथा । अतियोग्यता तुज आली ॥६३॥
जो मी वेदांनाही बोलविणारा सर्व शास्त्रांचा मूळकर्ता, त्या माझें भाषण तूं खोटें म्हणतोस, तेव्हां तूं मोठाच शहाणा झालास ! ६०.

वेदांचें जाण त्रिविध बंड । त्रिकांडीं केला तो त्रिखंड ।
वेदबळें बा पाखंड । वाजवी तोंड अव्हासव्हा ॥६४॥
वेदांचे बंड तीन प्रकारचे आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी त्याची तीन कांडे म्हणजे तीन विभाग केलेले आहेत. पाखाडी मनुष्य त्या वेदवाक्यांवरूनच अवाच्यासवा तोंड सोडतो ६४.

भासले बहुसाल मतभेद । वेदबळें नाना वाद ।
तो वेद माझा परोक्षवाद । तेणें तत्त्वावबोध केवीं होय ॥६५॥
वेदाच्या अनुषंगानेच नाना मतभेद व नाना प्रकारचे वाद मात्र उपस्थित होतात. पण तो वेद माझा परोक्षवाद म्हणजे केवळ शब्दज्ञान आहे. त्यापासून तत्त्वज्ञानाचा बोध कसा होईल ? ६५.

शब्दज्ञान ब्रह्मज्ञान । बाह्यदृष्टीं समसमान ।
जेवीं वाल आणि वालभर सुवर्ण । तुकितां पूर्ण समता आली ॥६६॥
शब्दज्ञान आणि ब्रह्मज्ञान ही दोन्ही बाह्य दृष्टीने सारखी दिसतात. ज्याप्रमाणे वाल आणि वालभर सोने ही दोन्ही वजनांत सारखी होतात ६६;

परी वाला सुवर्णा समता । मोलें कदा नव्हे तत्त्वतां ।
तेवीं वेदवादयोग्यता । ब्रह्मानुभविता सम नव्हे ॥६७॥
परंतु वालाची आणि सोन्याची मोलामध्ये मात्र कधी बरोबरी व्हावयाची नाहीं; त्याप्रमाणे वेदवाद आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव ही दोन्ही सारखी नव्हत ६७.

जो मी हरिहरां प्रमाण । त्या माझें वचन अप्रमाण ।
तूं म्हणसी हा ज्ञानाभिमान । हेंही जाणपण सांडावें ॥६८॥
जो मी हरिहरालासुद्धा मान्य आहे, त्या माझे बोलणें तूं अप्रमाण समजतोस ; हा केवळ तुझा ज्ञानाभिमान आहे. हाही ज्ञानाभिमान सोडून दे ६८.

माझें वचन सत्याचें सत्य । सत्य मानूनि निश्चित ।
येणें भावें साधे परमार्थ । हें ब्रह्मलिखित मद्वाक्य ॥६९॥
माझे भाषण म्हणजे सत्यांतील सत्य आहे असें खात्रीने समज. तरच परमार्थ साधेल. हे माझें वचन ब्रह्मलिखित समज ६९.

उद्धवा मज पाहतां । वसिष्ठवामदेवादि समस्तां ।
न देखे बद्ध आणि मुक्तता । हा माझा तत्त्वतां निजबोधु ॥७०॥
उद्धवा ! माझ्या दृष्टीने वसिष्ठ-वामदेवादि सर्व लोकांत मला बद्ध किंवा मुक्त असा भेदच दिसत नाही. हाच माझा खरा आत्मानुभव आहे ७.

मुक्तांचिये दृष्टीं । मुक्तच दिसे सकल सृष्टी ।
तेथें शुकवामदेवांची गोष्टी । वेगळी पाठीं केवीं राहे ॥७१॥
मुक्तांच्या दृष्टीने पाहिले तर सारी सृष्टि मुक्तच दिसते, तेव्हां शुकाची आणि वामदेवाची गोष्ट तेथें वेगळी कशी राहील ? ७१.

बद्धमुक्तांहूनि भिन्न । परमात्मा मी चिद्‍घन ।
जरी म्हणसी जीवासी बंधन । तेहीं सत्यत्वें जाण घडेना ॥७२॥बद्धमुक्ताहून भिन्न असा मी चिद्धन परमात्मा आहे. आतां तूं जीवाला बंधन आहे असें म्हणशील तर तेही खरेपणाने घडत नाही ७२.

शोकमोहौ सुखं दुःखं देहापत्तिश्च मायया ।
स्वप्नो यथात्मनः ख्यातिः संसृतिर्न तु वास्तवी ॥ २ ॥[श्लोक २] शोक, मोह, सुख, दुःख आणि देहाची प्राप्ती या सर्वांना मायाच कारणीभूत आहे स्वप्न हा जसा बुद्धीचा भास आहे; तसाच आत्म्यासाठी संसार भास आहे, खरा नव्हे. (२)

दोन मुहूर्त स्वप्नवृत्ती । त्यामाजीं देखे जन्मपंक्ती ।
तेथें पावला नाना याती । तेवीं मिथ्या प्रतीती भवभावा ॥७३॥
स्वप्नाची स्थिति दोन घटकाच असते; पण तेवढ्या वेळांत अनेक जन्म अनेक जातींत झालेले दृष्टीस पडतात ! त्याप्रमाणेच संसार व त्यांतील अनुभव मिथ्या आहे ७३.

नसता आभासु मावळे ठायीं । त्यालागीं हाहाकारु उठे देहीं ।
गेले मेले नाहीं नाहीं । ‘शोक’ पाहीं त्या नांव ॥७४॥
नसता भास जेथल्यातेथें मावळतो, त्यामुळे देहामध्ये मोठा हाहा:कार उडून जातो ! गेलें गेलें, मेलें मेलें, नाही नाही असे म्हणतात. त्याचे नाव ‘शोक’ ! ७४.

भग्नपात्रीं भरिलें जळ । तेथें बिंबलें चंद्रमंडळ ।
तें पात्र पोटेंशीं धरी बाळ । रत्‍न प्रबळ हें माझें ॥७५॥
फुटक्या भांड्यात पाणी भरले, आणि त्यांत चंद्राचे प्रतिबिंब दिसू लागले म्हणजे माझे सुंदर रत्न म्हणून मूल ते भांडे पोटाशी आवळून धरतें ७५.

जळ गळोनि जाय सकळ । चंद्रमा हरपे तत्काळ ।
त्यालागी तळमळी तें बाळ । ‘शोकु’ केवळ या नांव ॥७६॥
पण पाणी सारे लवकरच गळून जाते आणि लागलाच चंद्रही नाहीसा होतो. त्यामुळे ते मूल तळमळत बसते. ह्याचंच नांव ‘शोक’ ७६.

अथवा घटचंद्र धरूं जातां । तो न ये बालकाचे हाता ।
यालागीं करी जे जे व्यथा । ‘शोक’ सर्वथा या नांव ॥७७॥
अथवा घागरीतील चंद्र धरावयाला गेले तर तो मुलाच्या हातांत येत नाही, म्हणून ते जें जें दुःख करिते त्याचेंच नांव ‘शोक’ ७७.

काढावया आरशांतील धन । करी दर्पणामाजीं खनन ।
फुटल्या नागवलों म्हणे जाण । ‘शोक’ दारुण या नांव ॥७८॥
आरशांतील द्रव्य काढण्याकरिता आरशांतच खोदूं लागतो, आणि तो फुटला म्हणजे बुडालों म्हणतो, ह्याचंच नांव भयंकर ‘शोक’ ७८.

नसते वस्तूच्या ठायीं जाण । मी माझें हा अभिमान ।
तेंचि ‘मोहाचें’ लक्षण । ममता दारुण ते संधी ॥७९॥
नसलेल्याच वस्तूच्या ठिकाणी मी आणि माझे हा अभिमान बाळगतो, तेंच ‘मोहाचे’ लक्षण होय. त्याच संधीला भयंकर ‘ममता’ उत्पन्न होते ७९.

देखोनि मृगजळाचें तळें । येणें पिकती रायकेळें ।
यालागीं मृगतृष्णेचीं जळें । आठै काळें राखतु ॥८०॥
मृगजळाचे तळे पाहून त्याने रायकेळी पिकतील म्हणून मृगतृष्णेचे पाणी अष्टौप्रहर राखीत बसतो ८०.

मृगजळाकडे कोणी भंवे । त्यासी सक्रोधें भांडू धांवे ।
अतिमोहित मोहस्वभावें । विवेकु न करवे सत्याचा ॥८१॥
त्या मृगजळाकडे कोणी फिरकू लागला की, चवताळून त्याच्याशी तंटा करावयाला धावतो. असा भ्रांतीने मोहांध झाल्यामुळे सत्याचा विवेक करवत नाही ८१.

तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ती । माता पिता होईल म्हणती ।
शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांति पुत्रमोहो ॥८२॥
त्याप्रमाणे पुत्रापासून मोठी सुखप्राप्ति होईल असें आईबाप म्हणत असतात; हा भ्रांतीने केवळ त्यांस मोह पडलेला असतो. कारण, शेवटीं पुत्र त्यांना आंगठाच दाखवितात ! ८२.

गंधर्वनगरींची रचना । देखोनि अभिलाष होय मना ।
ते घ्यावया मेळवी सेना । नानासूचनाउपायें ॥८३॥
गंधर्वनगरांतील रचना पाहुन मनाला अभिलाष उत्पन्न व्हावा, आणि ते घेण्यासाठी ज्याप्रमाणे मोठ्या खटपटीनें सैन्य तयार करावें ८३,

तैसा मिथ्या देहीं अभिमान । देहसंबंधाची ममता गहन ।
हेंचि मोहाचें मूळ लक्षण । ममताभिमान प्राणियां ॥८४॥
त्याप्रमाणे देहांतील अभिमान हा मिथ्या होय. देहसंबंधी ममता फार कठिण असते. प्राण्यांना ममतेचा अभिमान लागून राहतो. हेच मोहाचें मूळ लक्षण आहे. ८४.

एवं अहं आणि ममता । हेचि मोहाची मातापिता ।
त्याचेनि उत्तरोत्तर वाढतां । जनमोहिता व्यामोह ॥८५॥
तात्पर्य, ‘अहं’ आणि ‘ममता’ हीच मोहाची मातापितरे आहेत. त्यांच्याच योगाने उत्तरोत्तर बळावून ‘मोह’ हा जनांना भूल घालून सोडतो ८५.

प्रियविषयीं आसक्ति देख । त्याची नित्यप्राप्ती अनेक ।
त्याचि नांव म्हणती ‘सुख’ । जेवीं चाखितां विख अति मधुर ॥८६॥
एखादे विष चाखायला गेले असतां मधुर लागते; त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या विषयांची आसक्ति धरतात; आणि त्यांची अनेक प्रकारे सतत प्राप्ति झाली, म्हणजे त्यालाच ‘सुख’ असें नांव देतात ८६.

विषयप्राप्तीं जो हरिख । तया नांव म्हणती ‘सुख’ ।
विषयविनाश तेंचि ‘दुःख’ । परम असुख त्या नांव ॥८७॥
विषयलाभामध्ये जो हर्ष होतो, त्यालाच ‘सुख’ असें म्हणतात आणि विषयाचा नाश झाला की तेच ‘दुःख’, त्यालाच ‘असुख’ असें नांव देतात ८७.

शोक-मोह-सुख-दुःख । येणेंचि ‘देहाची प्राप्ती’ देख ।
देहाभिमानें देह अनेक । दुःखदायक भोगवी ॥८८॥
शोक; मोह; सुख, दुःख ह्यानेच ‘देहाची प्राप्ति’ होते. देहाभिमानामुळेच अनेक दुःखदायक देह ध्यावे लागतात ८८.

जे जेणें तीव्रध्यानें मरे । तो तेंचि होऊनि अवतरे ।
कां जो निमे अतिद्वेषाकारें । तो द्वेषानुसारें जन्मतु ॥८९॥
जो ज्या तीव्र ध्यासाने मरण पावतो, त्याच रूपाने जन्म घेऊन येतो. किंवा जो अतिशय द्वेषरूपानेच मरण पावतो, तो द्वेषरूपानेच जन्मास येतो ८९.

सर्प मुंगुस पूर्ववृत्ती । वैराकारें जन्म पावती ।
जे जे वासना उरे अंतीं । ते ते गती प्राण्यासी ॥९०॥
सर्प आणि मुंगूस ह्यांची पूर्वजन्मींची वृत्ति वैराचीच असते. म्हणून वैराच्याच स्वरूपाने जन्मास येतात. मरणकाली जी जी वासना शिल्लक राहते. ती ती गतिच प्राण्याला प्राप्त होते ९०.

यालागीं हृदयामाजीं निश्चितीं । जे सबळ वासना उठे अंतीं ।
तो तो प्राणी पावे तिये गती । श्रुति बोलतीं पुराणें ॥९१॥
म्हणून अंत:करणामध्ये अंतकाली खरोखर जी प्रबळ वासना उत्पन्न होते, त्या गतीला तो तो प्राणी जातो. असें वेद आणि पुराणेही सांगतात ९१.

पुरुषासवें वृथा छाया । तैशी ब्रह्मीं मिथ्या माया ।
ते उपजवी गुणकार्या । देह भासावया मूळ ते ॥९२॥
पुरुषाबरोबर छाया जशी मिथ्या, तशी ब्रह्मामध्ये माया ही मिथ्या आहे. तीच गुणाच्या कार्याला उत्पन्न करते. आणि देहाचा भास करून देण्यालाही मूळ तीच ९२.

जेवीं का स्वप्नीं एकलें मन । नानाकार होय आपण ।
तेवीं चैतन्याचें अन्यथाभान । तें हें जाण चराचर ॥९३॥
ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मन एकटेंच असते तरी तें अनेक प्रकारची स्वरूपें धारण करते, त्याप्रमाणे चैतन्याचें जें अन्यथाभान तेच हे चराचर होय ९३.

एवं वस्तुतां संसार नाहीं । तेथें सुखदुःख कैंचें कायी ।
देहेंवीण छाया पाहीं । कोणें ठायीं उपजेल ॥९४॥
तात्पर्य, संसाराला खरोखर अस्तित्वच नाही. तेथे सुखदुःख कोठचे आणि काय ? हे पहा ! देहाशिवाय छाया ही पडणार कोठे ? ९४.

जें उपजलेंच नाहीं । तें काळें गोरें सांगों कायी ।
अवघें स्वप्नप्राय पाहीं । वस्तुतां नाहीं संसारु ॥९५॥
जे जन्मालाच आले नाही ते काळे आहे का गोरे आहे, हे काय सांगावें ? सारेच मुळी स्वप्नासारखे आहे. वास्तविक संसार नाहींच नाहीं ९५.

इहीं दोहीं श्लोकीं अगाधु । परिहरिला वस्तुविरोधु ।
आतां प्रतीतीनें जो अनुरोधु । तो सत्यासी बाधु करूं न शके ॥९६॥
त्याप्रमाणे ह्या दोन श्लोकांमध्ये वस्तुविरोधाचा उत्कृष्ट रीतीने परिहार केला. आता अनुभवाने जी खूण पटते, तीही सत्याला कधी बाध आणीत नाही (ह्याविषयी सांगतात ) ९६.

डोळां अंगुळी लाविती । तेणें दोन चंद्र आभासती ।
गगनीं दों चंद्रा नाहीं वस्ती । मिथ्या प्रतीती निराकारीं ॥९७॥डोळ्याला बोट लावले म्हणजे दोन चंद्र दिसू लागतात ; पण आकाशांत काही दोन चंद्र असत नाहीत; त्याप्रमाणेच निराकारामध्ये मिथ्या भास होतो ९७.

विद्याविद्ये मम तनू विद्ध्युद्धव शरीरिणाम् ।
मोक्षबंधकरी आद्ये मायया मे विनिर्मिते ॥ ३ ॥[श्लोक ३] हे उद्ववा ! विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत त्या मनुष्यांना अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणार्‍या आहेत या दोन्ही अनादी असून माझ्या मायेने रचलेल्या आहेत. (३)

निजबोधें येत बोधा । ‘ब्रह्माहमस्मि’ स्फुरे सदा ।
ते जाण शुद्ध ‘विद्या’ । जें अविद्याछेदक ॥९८॥
जिचा आत्मज्ञानानेच प्रत्यय येतो; ‘अहंब्रह्मास्मि’ अशी निरंतर भावना राहते ; तीच ‘शुद्ध विद्या’ होय आणि तीच अविद्येचा नाश करणारी आहे असे समज ९८.

मी पापी मी सदा निर्दैवो । ऐसा नित्य स्फुरे भावो ।
तेचि सबळ ‘अविद्या’ पहा हो । जे नाना संदेहो उपजवी ॥९९॥
मी पापी; मी कपाळकरंटा, अशीच जेथें निरंतर भावना स्फुरत असते, तीच सारी ‘अविद्या’ होय आणि तीच अनेक प्रकारचे संशय उत्पन्न करते ९९.

एकी जीवातें घाली बंदी । एकी जीवाचें बंधन छेदी ।
या दोनी माझ्या शक्ति अनादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥१००॥
एक जीवाला बंदीत घालते ; आणि एक जीवाचे बंधन तोडून टाकते. हे उद्धवा ! या दोन्ही माझ्याच अनादि शक्ति होत १००.

‘तूं चिन्मात्र चैतन्यघन । चित्‍स्वरूपें वृत्तिशून्य ।
तुज शक्ती कैंच्या जाण । निर्धर्मकपण सर्वदा ‘ ॥१॥
‘तूं चिन्मात्र चैतन्यघन आहेस, चित्स्वरूप असल्यामुळे वृत्तिशून्य आहेस, सदासर्वदा निर्धर्मपणाने राहणारा आहेस, तेव्हां तुला शक्ति कशाच्या ?’ १.

उद्धवा हे आशंका वाया । कारण नाहीं करावया ।
या शक्ती जन्मवी माझी माया । जे न ये आया सुरनरां ॥२॥
अशी व्यर्थ शंका काढण्याचे कारण नाहीं; जी सुरनरांच्याही कवज्यांत सांपडत नाही, ती माझी मायाच ह्या शक्तींना जन्म देते २.

‘सत्’ म्हणों तरी तत्काळ नासे । ‘असत्’ म्हणों तरी आभासे ।
जिणें नामरूपांचें पिसें । लाविलें असे जगासी ॥३॥
तिला सत् म्हणावी तर ती तत्काळ नाश पावते. असत् म्हणावी तर तिचा भास होतो. तिनेच जगाला नाम व रूप यांचे वेड लावून दिले आहे ३.

नातुडे संतासंतबोली । माया ‘अनिर्वचनीय’ झाली ।
तिणें विद्या-अविद्या इये पिलीं । वाढविलीं निजपक्षीं ॥४॥
तिला खरी किंवा खोटी असे म्हणताच येत नाही. म्हणून तिला ‘अनिर्वचनीय’ म्हणजे शब्दांनी वर्णन करतां न येणारी असें म्हणतात, तिनेच विद्या आणि अविद्यारूप पिले आपल्या पंखाखाली वाढविली आहेत ४.

आजि काळींच्या केल्या नव्हती । विद्या अविद्या अनादि शक्ती ।
बंधमोक्षातें भासविती । या दोनी वृत्ती मायेच्या ॥५॥
विद्या आणि अविद्या ह्या काही आजकाल केलेल्या नाहीत, त्या अनादि शक्ति आहेत. मायेच्या या दोन वृत्ति आहेत. यांच्या योगानेच बंधाचा व मोक्षाचा भास होतो ५.

ते ‘माया’ तूं म्हणसी कोण । तुझी ‘कल्पना’ ते माया पूर्ण ।
बद्धमुक्तता-स्फुरण । तीमाजीं जाण स्फुरताति ॥६॥
तूं म्हणशील अशी ही माया कोण आहे ? तर तुझी ‘कल्पना’ तीच माया होय, तिच्यामध्येच बद्धता आणि मुक्तता ह्यांचे स्फुरण होत असते, हे लक्षात ठेव ६.

बंधमोक्षांची राहती स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती ।
ऐक उद्धवा निश्चितीं । यथानिगुतीं निवाडें ॥७॥
आतां बंध-मोक्षाची जी स्थिति असते, ती मी तुला स्पष्ट व यथातथ्य रीतीने सांगतो ती लक्ष देऊन ऐक ७.

स्वप्नीं न देखे आराधन । ज्यासी नाहीं माझें भजन ।
अविद्या त्यामाजीं संपूर्ण । प्रबळ जाण वाढत ॥८॥
ज्याला माझी आराधना स्वमांतसुद्धा माहीत नाही. ज्याला माझे भजन घडत नाही, त्याच्यामध्येच संपूर्ण अविद्या भरून जोराने वाढत असते ८.

तो माझ्या ठायीं अतिसादर । भजनशीळ आठौ प्रहर ।
तेंचि ब्रह्मविद्येचे घर । तेथें निरंतर ते वाढे ॥९॥
आणि जो माझ्या ठिकाणी अत्यंत तत्पर असतो, अष्टौप्रहर भजनांत मग्न असतो, तो ब्रह्मविद्येचें घर होय. त्याच्या ठिकाणी ती निरंतर वाढत असते ९.

जेथ माझ्या भजनाचा उल्हासु । तेथ अविद्येचा निरासु ।
तोचि ब्रह्मविद्येचा प्रवेशु । हा अतिविश्वासु भक्तांचा ॥११०॥
जेथे माझ्या भजनाचा उल्हास असतो, तेथें अविद्या नाहीशी होते. त्याच्यातच ब्रह्मविद्येचा प्रवेश होतो, असा भक्तांचा पक्का विश्वास असतो ११०.

येथ बद्धाचें कारण । आणि मोक्षाचें साधन ।
भक्तीचें दृढ स्थापन-। अर्थास्तव जाण बोलिलों ॥११॥
येथपर्यंत मी बंधाचे कारण आणि मोक्षाचे साधन हे भक्तीची दृढ स्थापना होण्यासाठी म्हणून बोललों ११.

‘ज्या बंधमोक्ष दोनी वृत्ती । त्या तूं मायेच्या म्हणसी शक्ती ।
तेव्हां माया झाली मोक्षदाती । हें केवीं श्रीपति घडेल ॥१२॥
(यावर उद्धव म्हणाला ) बंध आणि मोक्ष म्हणून ज्या दोन वृत्ति आहेत, त्या तूं मायेच्या शक्ति म्हणतोस, तेव्हां माया हीच मोक्षदाती झाली; पण हे कृष्णा ! असे कसे घडेल ? १२.

जरी माया झाली मोक्षदाती । तरी कां करावी तुझी भक्ती ।
हेंचि सत्य काय श्रीपती । सांग निश्चितीं निवाडु’ ॥१३॥
कारण मायाच जर मोक्षदाती झाली, तर तुझी भक्ति तरी, कशाला करावी ? तर हे श्रीकृष्णा ! ह्यांतील सत्य कोणतें ? त्याचा निश्चय सांगावा” १३.

कृष्ण म्हणे उद्धवासी । स्वयें चलन नाहीं छायेसी ।
तेवीं सामर्थ्य नाहीं मायेसी । केवीं मोक्षासी ते देईल ॥१४॥
तेव्हां कृष्ण उद्धवाला म्हणाले, “छायेला काही स्वतः चलनवलन नाही ; त्याप्रमाणे मायेलाही काही स्वतःचे सामर्थ्य नाही. मग ती मोक्ष कशी देईल ? १४.

जो मायेचा नियंता । तो विष्णु मोक्षाचा दाता ।
तोडूनि जीवाची बद्धता । सायुज्यता देतसे ॥१५॥
मायेचा नियंता जो विष्णु तोच मोक्षाचा दाता आहे. तोच जीवाचे बंधन तोडून सायुज्यता देतो १५.

म्हणशी अविद्या-कामकर्मादृष्टें । जीवासी बंधन लागे मोठें ।
तें ब्रह्मविद्या-निष्कर्में तुटे । हा बोध करी नेटें गुरु श्रुतिद्वारा ॥१६॥
ह्यावर तूं म्हणशील की, अविद्येने आणि काम्यकमोद्‌भत अदृष्टाने जीवाला मोठे बंधन घडते, ते ब्रह्मविद्येने आणि निष्कर्मानें तुटते. असा बोध गुरुही श्रुतीच्या द्वारे मोठ्या निश्चयाने करीत असतात १६.

‘येथ विष्णु काय झाला कर्ता । मा तो होईल मोक्षदाता’ ।
हे विकल्पाची वार्ता । न घडे सर्वथा उद्धवा ॥१७॥
ह्यांत विष्णु हा कर्ता झाला काय ? नाही. मग तो मोक्षदाता कसा होईल ?’ पण उद्धवा ! अशा विकल्पाची गोष्ट सुद्धा काढू नको १७.

गुरुरूपें विष्णु जाण । श्रुत्यर्थ विष्णुचि आपण ।
शमदमादि साधन । तेंही जाण विष्णुचि ॥१८॥
कारण, गुरुरूपाने विष्णुच असतो, श्रुतीचा अर्थही स्वतः विष्णुच, आणि शमदमादिक जे साधन आहे तेंही विष्णुच होय, असें तूं समज १८.

शिष्यबुद्धीसी बोधकता । विष्णुचि जाण तत्त्वतां ।
यापरी गा निजभक्तां । मोक्षदाता श्रीविष्णु ॥१९॥
इतकेच नव्हे, तर शिष्याच्या बुद्धीला जें ज्ञान होतें तेंही खरोखर विष्णुरूपच आहे हे लक्षात ठेव. अशा प्रकारे श्रीविष्णुच आपल्या भक्तांना मोक्ष देणारा आहे १९.

त्या मोक्षाचा जो परिपाक । ते समाधि श्रीविष्णुचि देख ।
समाधीचें समाधिसुख । आवश्यक श्रीविष्णु ॥१२०॥
त्या मोक्षाचा परिपाक जी समाधि तीही श्रीविष्णुच होय. समाधींतील समाधिसुख तेही खरोखर श्रीविष्णुच १२०.

परमात्मा परिपूर्ण । तो मी विष्णु ब्रह्मसनातन ।
भक्तभवपाशमोचन । कृपाळू जाण करीतसें ॥२१॥
सनातन ब्रह, परिपूर्ण परमात्मा असा जो विष्णु तो मीच आहे. मी कृपाळूपणानें भक्तांना भवपाशांतून मुक्त करतों ” २१.

गत श्लोकींचेनि अनुवादें । ‘शरीरिणाम्’ येणें पदें ।
जीवासी बद्धपण उद्‍बोधे । तेंही विनोदें निवारितसे ॥२२॥
आता गेल्या म्ह. तिसऱ्या श्लोकांतील आलेले पद जें ‘शरीरिणां’ त्या पदावरून जीवाला बंधन घडते असा ध्वनितार्थ निघतो. त्याचेही लीलेने निवारण करतात २२.

एकाशीच बद्धमुक्तता । घडे न घडे तत्त्वतां ।
या उद्धवाच्या प्रश्नार्था । विशद आतां करीतसे ॥२३॥एकालाच खरोखर बंध मोक्ष घडतो का घडत नाही, या उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर आतां स्पष्टपणाने देत आहेत २३.

एकस्यैव ममांशस्य जीवस्यैव महामते ।
बन्धोऽस्याविद्ययानादिर्विद्यया च तथेतरः ॥ ४ ॥श्लोक ४] हे महाबुद्धीमान उद्धवा ! माझाच वंश असलेल्या एकट्या जीवालाच अविद्येमुळे अनादी बंधन आहे आणि विद्येमुळे मोक्ष आहे. (४)

रितीवाढी असे अग्नीशी । तेथ फुणगे उसळले आकाशीं ।
रितीवाढी नाहीं स्वरूपासी । अंश भासावयासी ठावो कैंचा ॥२४॥
लाकडाच्या कमीजास्तपणामुळे अग्नि हा कमीजास्त होतो, त्यांतलीच एखादी ठिणगी आकाशात उडून जाते ; पण आत्मस्वरूपात घटणे किंवा वाढणें नाही. मग त्याचा ‘अंश’ भासावयास अवकाश कोठचा १ २४.

जेणें पाविजे निजबोधातें । ते बुद्धी उद्धवापाशीं वर्ते ।
यालागीं कृष्ण म्हणे ‘महामते’ । उद्धवातें अतिप्रीतीं ॥२५॥
ज्याच्या योगाने आत्मज्ञान उत्पन्न होईल अशी ‘बुद्धि’ उद्धवापाशी होती. म्हणून मोठ्या प्रेमाने श्रीकृष्ण त्याला ‘महामते !’ असे म्हणाले २५.

अतिप्रीतीं पुरस्करून । उद्धवासी म्हणे सावधान ।
ये श्लोकींचा अर्थ गहन । ते धारणा जाण धरावी ॥२६॥
अशी मोठ्या प्रेमाने हाक मारून उद्धवाला म्हणाले, ऐक. नीट लक्ष दे. ह्या श्लोकाचा अर्थ फार खोल आहे. ह्याची धारणाच धरली पाहिजे २६.

यालागीं कृष्णजगजेठी । उद्धवाची पाठी थापटी ।
अतिगुह्याची गुह्य गोष्टी । तुझे कृपेसाठीं मी बोलतों ॥२७॥
म्हणून जगजेठी श्रीकृष्णांनी उद्धवाची पाठ थोपटली. आणि म्हणाले, ही अतिशय गुह्यांतील गुह्य गोष्ट. तुझ्यावर कृपा आहे म्हणूनच तुला सांगतों २७.

पाठी थापटावयामिसें जाण । करीत स्वशक्तिसंचरण ।
तेणें अद्वयबोधलक्षण । उद्धवासी जाण प्रकाशी ॥२८॥
पाठ थोपटण्याच्या निमित्ताने आपली शक्ति त्याच्या अंगांत घातली, आणि त्यायोगानें उद्धवाच्या अंत:करणांत अद्वैत ज्ञानाचे लक्षण प्रगट केले २८.

जीव एकचि त्रिजगतीं । हें जाण उद्धवा निश्चितीं ।
जेवीं नाना दीपांचिया दीप्ती । तेजाची ज्योति अभिन्न ॥२९॥
हे उद्धवा ! ज्याप्रमाणे दिवे पुष्कळ असले तरी प्रकाश एकच अभिन्न असतो, त्याप्रमाणे खरोखर त्रिभुवनामध्ये जीव हा येथून तेथून एकच आहे २९.

दोनी दीप एक होती । तैशी टिवळीं ऐक्या न येती ।
जडत्वापाशीं भेदप्राप्ती । ऐक्यवृत्ती अजडत्वीं ॥१३०॥
दोन दिवे एक होतात, त्याप्रमाणे दोन पणत्या कांहीं एक व्हावयाच्या नाहीत; भेद हा जडापाशी उत्पन्न होतो, आणि अजडामध्ये ऐक्यवृत्ति असते १३०.

चंदनकुटके बहुवस । परी सर्वीं एकुचि सुवास ।
तेवीं जीवरूपें मी अविनाश । परमपरेश आभासे ॥३१॥
चंदनाचे तुकडे पुष्कळ असतात, पण त्या सर्वामध्ये सुवास एकच असतो. त्याप्रमाणे जीवरूपाने मी अविनाश परमात्मा भासमान होतों ३१.

‘जीवरूपें तूं श्रीकृष्ण । हें सत्य मानावें वचन ।
तैं भवपाशादि बंधन । तुजचि जाण आदळलें ‘ ॥३२॥
‘आता जीवाच्या रूपानें तूं श्रीकृष्णच असतोस हे बोलणे खरे मानले, तर संसारपाशादि जें बंधन आहे ते तुलाच लागते’, असे म्हणावें लागेल ३२.

ऐशी कल्पिशी जरी वार्ता । ते मज न घडे गा सर्वथा ।
जेवीं शरीरासी प्राण चाळिता । शरीर‍अवस्था त्या नाहीं ॥३३॥
अशी जर कल्पना करशील तर ती गोष्ट मात्र कधीच घडायची नाही. ज्याप्रमाणे शरीर चालविणारा प्राण असतो, पण त्याला काही शरीराच्या अवस्था लागत नाहींत ३३.

लिंगशरीरीं स्वयंभ । जीव तो मदंशें प्रतिबिंब ।
त्यासी देहादि बंधनभांब । मिथ्या विडंब आभासे ॥३४॥
सूक्ष्मदेहामध्ये स्वयंभु असणारा जो जीव तो माझ्याच अंशाने प्रतिबिंबित झालेला आहे. त्याला बंधनाची भावना ही केवळ मिथ्या विटंबनाच भासते ३४.

घटें आवरिला अवकाश । त्या नांव म्हणती ‘घटाकाश’ ।
घटभंगें त्या नव्हे नाश । तेवीं मी अविनाश जीवत्वीं ॥३५॥
घटाने पोकळी आवरलेली असते, त्याला ‘घटाकाश’ असे म्हणतात. पण तो घट फुटून गेला तरी त्या आकाशाचा काही नाश होत नाही, त्याप्रमाणेच मीही जीवत्वामध्ये अविनाशरूपाने असतों ३५.

थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । तो गगन सांडोनि थिल्लराआंतौता ।
नाहीं रिघाला तत्त्वतां । तेवीं मी जीवत्वा अलिप्त ॥३६॥
डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य काही आकाशांतून निघून त्या डबक्यांत शिरत नाही. त्याप्रमाणे मीही जीवपणाला अलिप्त असतों ३६.

रवि थिल्लरीं बिंबला दिसे । तेवीं मी लिंगदेहीं आभासें ।
मिथ्या तेथींचें भोगपिसें । तें बंधन कैसें मज लागे ॥३७॥
सूर्य डबक्यांत प्रतिबिंबित झालेला दिसतो, त्याप्रमाणे सूक्ष्म देहांत माझा आभास होतो. तेथच्या मिथ्या भोगाच्या वेडाचे बंधन मला कसें लागणार ? ३७.

येथें बोलणें न लगे बहु । प्रतिबिंबा नांव ‘जीवु’ ।
मुख्य बिंब तो मी ‘शिवु’ । विशद उगवु हा जाण ॥३८॥
आतां अधिक सांगावयाला नको. प्रतिबिंबाचे नांव ‘जीव’ आणि मुख्य बिंब मी ‘शिव’ हाच जीवशिवांचा मुख्य उलगडा आहे ३८,

तळाव विहिरीं नाना थिल्लरीं । सूर्यु प्रतिबिंबे त्यांमाझारीं ।
तितुकीं रूपें दिवाकरीं । पाहतां अंबरी तंव नाहीं ॥३९॥
तलाव, विहिरी, ठिकठिकाणची डबकी ह्यांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, पण आकाशांत पाहिले तर सूर्याची रूपें कांही तितकी नसतात ३९.

तैसें एकासी जें अनेकत्व । तें मिथ्या जाण जीवत्व ।
हें भागवताचें निजतत्त्व । शुद्ध सत्त्व ज्ञानाचें ॥१४०॥
त्याप्रमाणे एकाला अनेकत्व देणारें जें जीवत्व, तें मिथ्या आहे हे लक्षात ठेव, भागवतांतील मुख्य तत्त्व, आणि ज्ञानाचे शुद्ध सत्त्व तें हेच १४०.

थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । चंचल निश्चल मळिनता ।
हे थिल्लराचे गुण तत्त्वतां । प्रतिबिंबमाथां मानिती ॥४१॥
डबक्यांत सूर्याचे प्रतिबिंब पडले म्हणजे ते हालते, तें निश्चळ आहे, तें गढ़ळ झालें, इत्यादि जे खरोखर डबक्याचे गुण असतात तेच त्या प्रतिबिंबाच्या माथ्यावर लादले जातात ! ४१.

तेवीं शिवासी बाधकता । पाहतां नाहीं गा सर्वथा ।
हें अविद्याकार्य तत्त्वतां । जीवाचे माथां मानिती ॥४२॥
त्याप्रमाणे पहावयास गेले तर शिवाला कधींच बाधकता नाही. हे खरोखर अविद्येचे कार्य असून ते जीवाच्या माथ्यावरच ठेवले जाते ४२.

एवं मिथ्या जीवभेद सर्वथा । त्यासी बद्धता आणि मुक्तता ।
विद्या अविद्या निजपक्षपाता । दावी तत्त्वतां निजकर्में ॥४३॥
म्हणून जीवभेद हा निखालस मिथ्या आहे. त्याला विद्या आणि अविद्या ह्याच खरोखर आपल्या कर्माप्रमाणे आणि गुणाप्रमाणे मुक्तपणा व बद्धपणा दाखवून देतात ४३.

त्या जीव‍आभासासी प्रस्तुत । नित्यबद्ध नित्यमुक्त ।
एकासी दोनी अवस्था येथ । असे दावित विद्या अविद्या ॥४४॥
त्या एका जीवभावालाच प्रस्तुत नित्यमुक्त आणि नित्यबद्ध ह्या दोन अवस्था येथे विद्या व अविद्या याच दाखविण्याला कारणभूत होतात ४४.

जेवीं जळीं बिंबला सविता । त्या जळाची चंचळनिश्चळता ।
या प्रतिबिंबासीच अवस्था । मुख्य सविता ते नेणें ॥४५॥
ज्याप्रमाणे पाण्यांत सूर्यबिंब प्रतिबिंबित झाले तर पाण्याची चंचलता किंवा स्थिरता या अवस्था त्या प्रतिबिंबालाच असतात. मूळच्या सूर्याला त्याची दादही नसते ४५.

तेवीं जीवांची बद्धमुक्तता । परमात्म्यासी नलगे सर्वथा ।
जेवीं का अंधारींच्या खद्योता । न देखे सविता कल्पांती ॥४६॥
किंवा ज्याप्रमाणे अंधारांत असलेला काजवा कधी कल्पांतीसुद्धा सूर्य पहात नाही, त्याप्रमाणे जीवाची बद्धता किंवा मुक्तता परमात्म्याला मुळींच लागत नाही ४६.

जळीं आकाश दिसे बुडालें । परी तें कांही नाहीं झालें वोलें ।
तेवीं अविद्येसी अलिप्त ठेलें । असें संचलें निजरूप ॥४७॥
पाण्यामध्ये आकाश बुडालेले दिसते, पण ते काही ओले होत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूप हेही अविद्येपासून अलिस राहून जसेच्या तसेंच असते ४७.

एक बद्ध एक मुक्त । हें जीवामाजीं भासत ।
तेंही मी सांगेन निश्चित । सावचित्त परियेसीं ॥४८॥
एक बद्ध आणि एक मुक्त, हा जीवांतलाच भास आहे. हेही मी सिद्ध करून दाखवितों. लक्ष देऊन ऐक ४८.

सहस्रघटीं जळ भरितां । एकचि सहस्रधा दिसे सविता ।
तेथ ये घटींची जी अवस्था । त्या घटस्था लागेना ॥४९॥
हजार घागरींमध्ये पाणी भरले तर एकच सूर्य त्या घागरींमध्ये हजार रूपांनी दिसतो; पण एका घागरीची अवस्था काही दुसऱ्या घागरीला लागू पडत नाही ४९.

तेथ जो घट होय चंचळु । त्यांतील प्रतिबिंब लागे अंदोळूं ।
परी दुजे घटीं जें निश्चळु । तें नव्हें चंचळु याचेनि ॥१५०॥
त्यांपैकी जी घागर हालत असते, तीतील प्रतिबिंबही हाल लागते; पण दुसऱ्या घागरीत में प्रतिबिंब निश्चळ राहिलेले असते, ते काहीं हिच्यामुळे हालं लागत नाही १५०.

तेथ एकें दैवबळें । सूक्ष्म छिद्रें घटजळ गळे ।
तें प्रतिबिंब निजबिंबीं मिळे । येर सकळें तैसींचि ॥५१॥
त्यांतल्याच एखाद्या घागरीला दैवयोगाने लहानसें भोंक पडले, तर त्या घागरीतील पाणी गळून जाऊन तीत पडलेले प्रतिबिंबही आपल्या मूळच्या बियांत मिळून जाते. आणि बाकीची प्रतिबिंबें जशीच्या तशीच असतात ५१.

तेवीं गुरुकृपाउजियेडें । ज्याचें लिंगदेह विघडे ।
त्यासी परमात्म्यासी ऐक्य घडे । येर ते बापुडे देहबंदीं ॥५२॥
त्याप्रमाणे गुरुकृपेचा उदय झाला असतां ज्याचा सूक्ष्म देह विरून जातो, त्याचे परमात्म्याशी ऐक्य घडते. आणि बाकीचे बिचारे देहाच्या बंदिखान्यांत पडून राहतात ५२.

हेंचि निरूपण पुढें । श्लोकसंगती सुरवाडें ।
तें मी सांगेन वाडेंकोडें । अतिनिवाडें निश्चित ॥५३॥हेच निरूपण पुढील श्लोकाच्या अनुरोधाने मोठ्या आनंदाने, आवडीनें व चांगली फोड करून मी सांगणार आहे ५३.

अथ बद्धस्य मुक्तस्य वैलक्षण्यं वदामि ते ।
विरुद्धधर्मिणोस्तात स्थितयोरेकधर्मिणि ॥ ५ ॥[श्लोक ५] प्रिय उद्धवा ! आता बद्ध आणि मुक्त या दोहोंमध्ये जो भेद आहे, तो तुला सांगतो, मुक्त ईश्वर आनंदस्वरूप असून नियन्ता आहे, तर बद्ध जीव शोकग्रस्त असून नियम्य आहे असे हे दोघे विरूद्ध धर्मांचे एकचा शरीरात राहातात. (५)

येणेंचि प्रसंगें जाण । मागील तुझे जे प्रश्न ।
बद्धमुक्तांचे लक्षण । तेहीं निरूपण सांगेन ॥५४॥
ह्याच प्रसंगानुरूप बद्ध-मुक्ताचे लक्षण सांगण्याविषयीं तुझे जे प्रश्न आहेत, त्यांचेही निरूपण करतों ५४.

दोघांही देहीं असतां । दिसे विरुद्ध धर्म स्वभावतां ।
एक तो सदा सुखी सर्वथा । एक दुःखभोक्ता अहर्निशीं ॥५५॥
हे दोघेही देहामध्ये असून त्यांचे धर्म स्वभावाच परस्परविरुद्ध दिसतात. एक सदासर्वकाळ सुखी असतो; आणि एक रात्रंदिवस दुःखच करीत असतो ५५.

येथ विलक्षणता दों प्रकारीं । एक ते जीव-ईश्वरामाझारीं ।
एक ते जीवांसी परस्परी । बद्ध मुक्त निर्धारीं निश्चित ॥५६॥
असे ह्यांचे दोन प्रकारचे दोन भेद आहेत. एक जीव-ईश्वरभेद; आणि एक जीवांजीवांमध्ये परस्परभेद. ह्याप्रमाणे बद्धमुक्ताचाही भेद निश्चित आहे ५६.

पहिली जीवेश्वरांची कथा । तुज मी सांगेन विलक्षणता ।
मग जीवाची बद्धमुक्तता । विशद व्यवस्था सांगेन ॥५७॥
तुला प्रथमतः जीवेश्वराची कथा आणि त्यांच्यांतील भेद सांगतो. आणि मग जीवाच्या बद्धमुक्ततेची व्यवस्था स्पष्ट करून सांगेन ५७.

जीवेश्वरांचें वैलक्षण्य । अडीच श्लोकीं निरूपण ।
स्वयें सांगताहे नारायण । भाग्य पूर्ण उद्धवाचें ॥५८॥याप्रमाणे जीवेश्वरांतील भेद अडीच श्लोकांनी स्वतः नारायण सांगू लागले, हे उद्धवाचे मोठे भाग्य होय ५८.

सुपर्णावेतौ सदृशौ सखायौ यदृच्छयैतौ कृतनीडौ च वृक्षे ।
एकस्तयोः खादति पिप्पलान्नम् अन्यो निरन्नोऽपि बलेन भूयान् ॥ ६ ॥[श्लोक ६] या शरीररूपी झाडावर घरटे बनवून अनिर्वचनीय मायेमुळे एकमेकांबरोबर राहाणारे हे दोन पक्षी आहेत दोघे एकमेकांचे मित्र असून समानधर्मी आहेत या दोघांपैकी एक जीव हा या शरीरद्वारा केल्या जाणार्‍या कर्मांच्या फळांचा उपभोग घेतो, पण दुसरा पक्षी जो परमात्मा त्यांचा उपभोग घेत नसूनसुद्धा ज्ञानादी शक्तींनी अधिक शक्तिशाली आहे. (६)

‘सुपर्ण’ म्हणिजे पक्षी । ये वृक्षींचा जाय ते वृक्षीं ।
तैसा देही देहांतरातें लक्षी । यालागीं ‘पक्षी’ म्हणिजेत ॥५९॥
‘सुपर्ण’ म्हणजे पक्षी. तो ह्या वृक्षावरून त्या वृक्षावर जातो. त्याप्रमाणे देह धारण करणारा जीवही ह्या देहांतून, त्या देहांत जात असतो. म्हणून त्यालाही ‘पक्षी’ असे म्हणतात ५९.

पक्ष्यांच्या ऐशी यांची गती । हा देह सांडूनि त्या देहा जाती ।
‘पक्षी’ म्हणावया हे उपपत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६०॥
पक्ष्यासारखीच यांची गति म्हणजे स्थिति असते. एक देह सोडून दुसऱ्या देहांत ते जातात. पक्षी म्हणण्याचे कारण हे आहे १६०.

एवं आत्मा देहाहूनि भिन्न । तें सांगितलें उपलक्षण ।
देहात्मवादाचें खंडन । प्रसंगी जाण दाखविलें ॥६१॥
अशा प्रकारें आत्मा हा देहाहून भिन्न आहे. त्याचे उपलक्षण सांगितले. आणि ओघानुसार देहात्मवादाचेही खंडण करून दाखविले ६१.

आत्मा देह सर्वथा न घडे । देहबुद्धी धरणें तें तंव कुडें ।
हें उद्धवासी फाडोवाडें । निजनिवाडें दावित ॥६२॥
आत्मा हा देह कधीच घडावयाचे नाही. देहबुद्धि धरणे हे तर फारच वाईट. हें उद्धवाला मोठ्या प्रेमाने व निश्चयाने दाखवून देत आहेत ६२.

देहबुद्धीचिया पोटी । जन्ममरणांचिया कोटी ।
स्वर्गनरकांची आटाटी । देहबुद्धि गांठी जीवशिवपणें ॥६३॥
देहबुद्धीच्या पोटामध्ये जन्ममरणांच्या कोटि भरलेल्या असतात. जीवशिवपणानें देहबुद्धीची गांठ पडल्यामुळेच स्वगांची आणि नरकाची यातायात ! ६३.

दोघेही चिद्‌रूपें सारखे । कधीं न होती आनासारिखे ।
अनादि हे दोघे सखे । अति नेटके जिवलग ॥६४॥
चित्स्वरूपाने दोघेही सारखेच आहेत. ते दुसऱ्यासारखे (जड देहासारखे) कधीच होत नाहीत. हे दोघे अनादि मित्र असून परस्परांचे जीवश्चकंठश्च स्नेही आहेत ६४.

काळें अकाळें सकाळें । नव्हती येरयेरांवेगळे ।
एकत्र वर्तती खेळेमेळें । निजप्रांजळें सख्यत्वें ॥६५॥
वेळ असो, अवेळ असो; ते एकमेकांपासून वेगळे होतच नाहीत. ते खेळीमेळीने, सख्यत्वाने व सरळपणाने एकत्र राहतात ६५.

प्रभा दीपु दवडिना वेगळा । दीपु प्रभेसी नव्हे निराळा ।
तेवीं जीवशिवांचा मेळा । एकत्र स्वलीळा नांदती स्वयें ॥६६॥
प्रकाश दिव्याला निराळा ठेवीत नाही किंवा दिवाही प्रकाशाला सोडून राहात नाही; त्याप्रमाणे जीवशिवांचा मेळा, आपल्याच लीलेने आपणच एकत्र नांदत असतो ६६.

जीवु इच्छी जें जें कांहीं । तें तें वासनेसरिसें पाहीं ।
ईश्वर पुरवी सर्वही । विमुख कांही हों नेणें ॥६७॥
पहा ! जीव ज्याची ज्याची म्हणून इच्छा करतो, ते ते त्याच्या वासनेनुसार सर्व काही ईश्वर पुरवितो. त्याला नाही असें कधींच म्हणत नाहीं ६७.

अंतकाळीं जें जीव मागे । तें अलोट ईश्वर देवों लागे ।
आणि ईश्वर‍आज्ञेचेनि योगें । जीवु सर्वांगें वर्तत ॥६८॥
अंतकाली जीव जे काय मागतो, तें ईश्वर हवे तितकें देऊं लागतो. आणि ईश्वराच्या आज्ञेप्रमाणेच जीव सर्वांगाने वागत असतो ६८.

ईश्वरआज्ञा त्रिशुद्धी । जीवें जीव सर्वस्वें वंदी ।
होय नव्हे न म्हणे कधीं । अभिनव सिद्धी सखेपणाची ॥६९॥
स्वरोखर ईश्वराची आज्ञा जीव सर्ववीं मनोभावाने मान्य करतो. कधीही नाहीं होय म्हणत नाही. ही त्यांच्या मित्रत्वाची गोष्ट मोठी अपूर्व आहे ६९.

नवल सख्यत्वाची परी । ईश्वरु जैसें जैसें प्रेरी ।
जीवु तैसें तैसें करी । निमेषभरी ढळेना ॥१७०॥
त्यांची मैत्री मोठी आश्चर्यकारक आहे. ईश्वर जशी जशी प्रेरणा करतो, तसे तसें जीव करीत असतो; त्यापासून क्षणभरही ढळत नाहीं १७०.

निमेष आरंभोनि जन्मवरी । जीवु ईश्वराची आज्ञा करी ।
ईश्वरु जीवाचा साहाकारी । परस्परीं निजसखे ॥७१॥
जन्मल्या क्षणापासून जीव हा ईश्वराची आज्ञा शिरसावंद्य करीत असतो. परस्परांत सख्य असल्यामुळे ईश्वर हा जीवाचा साहाय्यकारी असतो ७१.

जीवु अत्यंत अडलेपणें । ईश्वरासी धांव धांव म्हणे ।
तो तत्काळ पावे धांवणें । करी सोडवणें जीवाचें ॥७२॥
जीव अगदी अडल्यावेळी ईश्वराला धाव धाव म्हणतो; तेव्हां तो तत्काळ धावून जाऊन जीवाची सुटका करतो ७२.

एवं शिवाचे आज्ञे जीवु राहे । जीवपण गेलिया शिवीं समाये ।
जीवालागीं हा शिवपणा वाहे । येरवीं राहे सांडूनि ॥७३॥
अशा प्रकारे शिवाच्या आज्ञेत जीव राहात असतो. जीवपण नाहीसे झाले म्हणजे तो शिवांतच एकरूप होऊन जातो. तोही जीवाकरितांच शिवपणा पत्करतो, नाही तर तोही सोडूनच राहतो ७३.

ऐसें सखेपण यांचें । केवीं अनुवादवे वाचें ।
उद्धवा हें मीचि जाणें साचें । या सखेपणाचें सौजन्य ॥७४॥
असें ह्यांचे मित्रत्व आहे. ते वाणीला कसे वर्णन करता येणार ? ‘उद्धवा ! यांच्या मैत्रीचे सौजन्य खरोखर जाणतो असा एक मीच ७४.

जीव ईश्वराआधीन । हें दृढ केलें संस्थापन ।
अनीश्वरवादाचें खंडण । प्रसंगें जाण दाविलें ॥७५॥
ह्याप्रमाणे जीव हा ईश्वराच्या अधीन असल्याचे बरोबर सिद्ध करून दाखविले. आणि त्यांतच अनीश्वरवादाचे खंडणही दाखवून दिले ७५.

अनीश्वरवादु खंडितां । खंडिली कर्मपाखंडवार्ता ।
कर्मपाखंडाच्या मता । ईश्वरता न मानिती ॥७६॥
अनीश्वरवादाचे खंडण करतांना पाखंड कर्माच्या बंडाही खंडण केलें. कर्मपाखंडाच्या मतामध्ये ईश्वराचे अस्तित्व मानीत नाहींत ७६.

म्हणती चित्तधर्म ईश्वरासी । तंव चिद्‌रूपता स्थापूनि त्यासी ।
निराकरिलें चित्तधर्मासी । अनायासीं चिद्‌रूपें ॥७७॥
ते ईश्वराच्या ठिकाणी चित्तधर्म आहेत असे म्हणतात. ईश्वर सहज चित्स्वरूप आहे हे सांगून त्याच्या चित्तधर्माचे निराकरण केलें. ७७.

नाना परीचें अतिचिंतन । त्याचि नांव ‘चित्त’ जाण ।
चित्तेंवीण निश्चळपण । तेंचि ‘चैतन्य’ उद्धवा ॥७८॥
अनेक प्रकारचे जे चितन त्याचे नांव ‘चित्त;’ आणि उद्धवा ! चित्तावांचून जो निश्वळपणा असतो ते ‘चैतन्य’ म्ह. शुद्धचित्स्वरूप, ७८.

धर्माधर्म न विचारितां । म्हणती ईश्वरु मोक्षदाता ।
हे भक्तपाखंडी कथा । स्थापूनि चिद्‌रूपता निवारी ॥७९॥
कोणी धमाधर्माचा विचार न करतां ईश्वर मोक्षदाता आहे असे म्हणतात | ही पाखंडी भक्ताची गोष्ट होय. चिद्‌रूपाची (ज्ञानस्वरूपाची ) सिद्धता करून ती खोडून काढली ७९.

टिळे-माळा-मुद्राधारणें । लावूनि संतांसीं निंदिलें जेणें ।
पाप राहटे भक्तपणें । त्यासी नारायणें नुद्धरिजे ॥१८०॥
टिळे-माळा-मुद्रा धारण करून जो संतांची निंदा करतो भक्ताचे सोंग आणून तो पापाचरण करतो, त्याचा नारायण कधीच उद्धार करीत नाही १८०.

अंतरींचें सर्व जाणता मी । यालागीं नांवें ‘अंतर्यामी’ ।
तो शाब्दिकवचनधर्मी । चाळविला अधर्मी केवीं जाये ॥८१॥
अंत:करणांतील सर्व जाणणारा मी आहे, म्हणूनच मला ‘अंतर्यामी’ असे म्हणतात. तो मी केवळ शाब्दिक भाषणाच्या युक्तीने अधर्मात कसा चाळविला जाईन ? ८१.

मी ज्ञानस्वरूप तत्त्वतां । सर्वद्रष्टा सर्वज्ञाता ।
तो मी धर्माधर्म न विचारतां । मोक्षदाता हें न घडे ॥८२॥
मी खरोखर ज्ञानस्वरूप आहे; मी सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहे; तो मी धर्माधर्माचा विचार न करता मोक्ष देईन असे घडावयाचे नाही ८२.

धरोनियां भक्तभावो । पाप राहाटे जो स्वयमेवो ।
याचि नामीं ‘दांभिक’ पहा हो । त्यातें देवो नुद्धरी ॥८३॥
भक्ताचा आव आणून जो स्वत:च पातक करतो, त्याला ‘दांभिक’ म्हणतात. त्याचा उद्धार देव करीत नाही ८३.

‘सदृशौ’ आणि ‘सखायौ’ । धरोनि या पदांचा अन्वयो ।
पाखंडमात्रातें पहा हो । स्वयें देवो उच्छेदी ॥८४॥
‘सदृशौ’ म्ह. सारखे, आणि ‘सखायौ’ म्ह. मित्र, या दोन शब्दांच्या अर्थाने देवांनी पाखंड्यांचे खंडण करून सोडले ८४.

निरसोनि नाना मतांतरें । स्वमत करावया खरें ।
श्लोकींचीं पदें अतिगंभीरें । शारङ्गधरें वर्णिलीं ॥८५॥
निरनिराळ्या मतांचे खंडण करून आपले मत स्थापन करण्यासाठी श्रीकृष्णांनी श्लोकांतील दोन पदें फार विचाराने योजिली आहेत ८५.

ते दोनी मिळोनियां पक्षी । नीड केलें देहवृक्षीं ।
वृक्ष म्हणिजे कोणे पक्षीं । तीहीं लक्षीं लक्षणें ॥८६॥
ते दोन्ही पक्षी मिळून त्यांनी देहरूप वृक्षावर घर, केलें. आतां देहाला वृक्ष असे कोणत्या हेतूनें म्हटले त्याचेही कारण ऐक ८६.

जननीउदर तेंचि आळ । पित्याचें रेत बीज सकळ ।
गर्भाधान पेरणी केवळ । संकल्पजळ वृद्धीसी ॥८७॥
मातेचे उदर हेच आर्के; आणि पित्याचे रेत रेंच बीज; गर्भाधान ही पेरणी ; आणि ते वाढावयाला वासना हे जळ ८७.

सोहंभावाचा गुप्त अंकुरु । त्रिगुणभूमीं तिवणा डीरु ।
कोहंभावें वाढला थोरु । वृक्ष साकारु तेणें झाला ॥८८॥
‘सोह’ म्ह. ब्रह्म तेंच मी, या भावाचा जो गुप्त अंकुर, तोच त्रिगुणरूप भूमीमध्ये त्रिदलरूपाने वर येतो आणि ‘कोहं’ म्ह. मी कोण, या भावाने तो मोठा होऊन त्यामुळे वृक्ष साकार होतो ८८.

करचरणादि नाना शाखा । प्रबळबळें वाढल्या देखा ।
अधऊर्ध्व नखशिखा । वृक्षाचा निका विस्तारु ॥८९॥
त्याला हस्तपादादि अनेक शाखा फुटून त्या जोरावतात. त्यालाच स्वाली वर नखे, शेंडी इत्यादि फुटून वृक्षाचा मोठा घेर माजून राहातो ८९.

तया देहबुद्धीचीं दृढ मूळें । विकल्प-पारंब्या तेणें मेळें ।
भूमी रुतल्या प्रबळबळें । कामाचे कोंवळे फुटती कोंब ॥१९०॥
त्यालाच देहबुद्धीची बळकट मुळे फुटून त्यांच्याच बरोबर विकल्पांच्या पारंब्या लोवू लागतात. त्या आणखी जोराने जमिनीत रुतल्या म्हणजे त्यांना कामाचे कोंवळे कोवळे कोंभ फुटतात १९.

तेथ कर्मांचीं पानें । निबिड दाटलीं अतिगहनें ।
मोहममतेचे घोंस तेणें । सलोभपणें दाटले ॥९१॥
कर्माकर्मांची घनदाट पाने अगदी गजबजून जातात. त्यांच्यापुढे मोहममतेचे मोठमोठाले गोंडस घोंस ओथंबतात ९१.

ज्या उंचावल्या थोर शाखा । त्या फळीं फळोनि सुखदुःखां ।
उतरल्या जी अधोमुखा । अधःपतनें देखा लोळती ॥९२॥
मोठमोठाल्या शाखा ज्या उंच उंच गेलेल्या असतात, त्यांना सुखदुःखांची फळे लटकून त्यांच्या भाराने त्या खाली वाकून जमिनीवर लोळत पडतात ९२.

ऐशिया वृक्षामाजीं जाण । अतिगूढ गुप्त गहन ।
नीड केलें हृदयस्थान । जीवशिव आपण बैसावया ॥९३॥
अशा वृक्षामभ्य अत्यंत गुप्त व अवघड ठिकाणी हृदयामध्ये जीवशिवांनी आपणाला बसण्यासाठी घरटें केलेले असते ९३.

जेथ जीव परमात्मा वसती । तरी देहाची जाहली सत्य प्राप्ती ।
ऐसें कोणी कोणी म्हणती । तें मत श्रीपति निराकरी ॥९४॥
जेथे जीव आणि परमात्मा यांची वस्ती होते, त्या देहाची प्राप्ति खरीच झाली, असे कोणी म्हणतील तर त्यांचे मत श्रीकृष्ण खंडण करतात ९४.

पुरुषासवें लटकी छाया । तोडितां मोडितां नये घाया ।
तैशी अनिर्वचनीय माझी माया । तेणें यदृच्छया नीड केलें ॥९५॥
पुरुषाबरोबर छाया ही लटकी असते. ती घाय घालून तोडली किंवा मोडली जात नाहीं; त्याचप्रमाणे माझी माया ही अनिर्वचनीय आहे. तीच आपल्या इच्छेने तेथे घरटे तयार करते ९५.

जेवीं स्वप्नीं गृहाचारु निद्रिता । तेवीं जीवात्मा नीडीं वसता ।
हें मायामय सर्वथा । नव्हे वस्तुतां साचार ॥९६॥
स्वस्थ निजलेल्या मनुष्याच्या स्वप्नांतल्या गृहाचाराप्रमाणे जीवात्मा घरव्यामध्ये राहत असतो. बाकी हे सर्व मायामयच आहे. वस्तुत: खरे नव्हे ९६.

येणें निरूपणें गोविंदु । नैयायिक मताचा कंदु ।
समूळ केला त्याचा उच्छेदु । देहसंबंधु मिथ्यात्वें ॥९७॥
याप्रमाणे देहसंबंधाच्या मिथ्यात्वाच्या निरूपणाने श्रीकृष्णांनी नैयायिक-मताचा जो मुख्य सिद्धांत, त्याचाच अगदी धुव्वा उडविला ९७.

ऐशियाही या वृक्षासी । जन्मादि निमेषोन्मेषीं ।
काळु छेदीतसे अहर्निशीं । बाळादि वयसांसी छेदकु ॥९८॥
अशा ह्या वृक्षाला जन्मापासून क्षणोक्षणी रात्रंदिवस काळ तोडीत असतो आणि बालपणादि अवस्थाही हाणून पाडीत असतो ९८.

तया वृक्षाचीं फळें । तुरटें निखटें तोंडाळें ।
पक्वे अपक्वे सकळें । ज्यांसी ‘पिप्पलें’ म्हणताति ॥९९॥
त्या वृक्षांची फळें तुरट, तिखट, तोंड आलेली, कच्ची; पक्की झाडून सारी जी असतात त्यांना ‘पिप्पलें’ म्हणजे ‘पिंपरें’ म्हणतात ९९.

त्या दों पक्ष्यांमाजीं तत्त्वतां । जो जीवपणें बोलिजेता ।
तो या कर्मफळांचा भोक्ता । जीं नाना व्यथादायकें ॥२००॥
त्या दोन पक्ष्यांपैकी खरोखर ज्याला ‘जीव’ असें म्हणतात, तो अनेक प्रकारे दुःखदायक अशा ह्या कर्मफळांचा भोक्ता असतो २००.

जीं फळें खातां पोट न भरे । खादल्या दारुण दुर्जरें ।
जेणें भवचक्रीं पडोनि फिरे । तरी अत्यादरें सेवितु ॥१॥
ती फळे खाल्ली असतां पोट भरत नाही. खाल्ली तर मुळीच पचत नाहीत. त्यामुळे संसारचक्रांत पडून गिरक्या खाव्या लागतात; तरी तो मोठ्या आवडीने खातच असतो ! १.

दुजा फळें खातां खुणा वारी । जीवासी त्या फळाची गोडी भारी ।
अखंड जाहला फळाहारी । वारिलें न करी शिवाचें ॥२॥
एक फळे खाऊ लागला म्हणजे दुसरा त्याला खाऊं नको म्हणून खूण करतो; पण जीवाला त्या फळाची फार आवड असते, म्हणून तो ती फळे सारखी खातच असतो. शिवाने नको म्हटलेले ऐकत नाही २.

फळें सेविता अहर्निशीं । तिळभरी शक्ति नाहीं जीवासी ।
अशक्त देखोनियां त्यासी । काळ पाशीं बांधितु ॥३॥
तो रात्रंदिवस फळे खातो, तरी त्या जीवाला शक्ति नसते. असा त्याला अशक्त झालेला पाहून काळ आपल्या पाशांत बांधून टाकतो ३.

जो इयें सेवी कर्मफळें । तो तत्काळ बांधिजे काळें ।
दुजा कर्मफळा नातळे । त्यातें देखोनि पळे कळिकाळु ॥४॥
ही कर्मफळें जो सेवन करतो, त्याला तत्काळ काळ बांधून टाकतो. दुसरा कर्मफळाला शिवत नाही. त्याला पाहून कलिकाळही पळत सुटतो ४.

जो कर्मफळातें न सेवितु । तो ज्ञानशक्तीनें अधिक अनंतु ।
सदा परमानंदें तृप्तु । असे डुल्लतु स्वानंदें ॥५॥
जो कर्मफळाचे सेवन करीत नाहीं, तो आपल्या ज्ञानशक्तीने अधिकच प्रबळ होतो; तो सदासर्वदा परमानंदाने तृप्त असून स्वानंदाने डुलत असतो ५.

उद्धवासी होय निजबोधु । यालागीं जीवशिवाचा भेदु ।
अत्यादरें सांगें गोविंदु । निजात्मबोधु प्रांजळु ॥६॥उद्धवाला आत्मबोध व्हावा म्हणून श्रीकृष्णांनी जीवशिवांचा भेद आणि आत्मज्ञानाचा बोध प्रांजलपणाने व अत्यंत प्रेमाने सांगितला ६.

आत्मानमन्यं च स वेद विद्वान् अपिप्पलादो न तु पिप्पलादः ।
योऽविद्यया युक् स तु नित्यबद्धो विद्यामयो यः स तु नित्यमुक्तः ॥ ७ ॥[श्लोक ७] जो फळाचा उपभोग घेत नाही, तो स्वतःला व दुसर्‍या जीवालाही जाणतो; परंतु जो भोग भोगतो, तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसर्‍यालाही जाणत नाही अशा प्रकारे जो अविद्येने युक्त आहे, तो नेहमीच बद्ध असतो आणि जो विद्येने युक्त आहे, तो नित्यमुक्त आहे. (७)

जो कर्मफळातें न सेविता । जो स्वरूपाचा जाणता ।
द्रष्टा जीव-प्रपंचांचा तत्त्वतां । अलिप्तता निजज्ञानें ॥७॥
जो कर्मफळांचे सेवन करीत नाहीं, जो आत्मस्वरूपाचा जाणता असून खरोखर जीव व प्रपंच ह्यांचा द्रष्टा असतो, तोच आत्मज्ञानामुळे अलिप्त असतो ७.

जीवु प्रपंचाचा ज्ञाता । परी परमात्मा नेणे तत्त्वतां ।
यालागीं भोगी भवव्यथा । कर्मफळें खातां अतिबद्धु ॥८॥
जीव हा प्रपंचाषा ज्ञाता आहे, पण परमात्म्याला मात्र जाणत नाहीं. म्हणून कर्मफळे खातांना अतिशय बद्ध होऊन संसाराची व्यथा भोगीत बसतो ८.

जो कर्मफळें सेवी बापुडा । तो अंधपंगु झाला वेडा ।
मी कोण हें नेणे फुडा । पडिला खोडां देहाचे ॥९॥
जो बिचारा कर्मफळे सेवन करतो, तो आंधळा, पांगळा व वेडा बनून जातो. आपण कोण हे त्याला स्पष्ट कळत नाही. त्यामुळे तो देहाच्या खोड्यांत पडतो ९.

देहसंबंधाआंतु । प्रतिपदीं होय आत्मघातु ।
नाहीं जन्ममरणांसी अंतु । दुःखी होतु अतिदुःखें ॥२१०॥
देहसंबंधामध्ये पावलोपावली आत्मघात होत असतो आणि जन्मरणाचा तर अंतच नसल्यामुळे तो अतिशय दुःखाने तळमळत असतो २१०.

नश्वर विषयांचा छंदु । तेणें जीवु जाहला अतिबद्धु ।
हा अविद्येचा संबंधु । लागला सुबद्धु देहवंतां ॥११॥
नश्वर विषयाचा छंद लागल्यामुळे जीव अगदी बद्ध होऊन पडतो. हा अविद्येचा संबंध बुद्धिमान देहधाऱ्याला सुद्धा लागलेला असतो ११.

जितुकी विषयाची अवस्था । तितुकी जीवासी ‘नित्यबद्धता’ ।
जो विषयातीत सर्वथा । ‘नित्यमुक्तता’ ते ठायीं ॥१२॥
जीवाला विषयाची जितकी आवड. तितकी त्याला नित्यबद्धता, आणि विषयापासून जो अलिप्त राहतो, त्याच्या ठिकाणी नित्यमुक्तता वास करते १२.

जो विद्याप्राधान्यें नित्यमुक्तु । जो ज्ञानशक्तीनें शक्तिमंतु ।
सर्वव्यापकु सर्वीं अलिप्तु । तो ‘नित्यमुक्तु’ बोलिजे ॥१३॥
जो विधेच्या प्राधान्याने नित्यमुक्त असतो, जो ज्ञानशक्तीने शक्तिमान् असतो, जो सर्वव्यापक असून सर्वांत अलिप्त असतो, त्यालाच ‘नित्यमुक्त’ म्हणतात १३.

सांगितली जीवाची नित्यबद्धता । प्रगट केली शिवाची मुक्तता ।
जीवाची जे बद्धमुक्तता । तेही आतां सांगतु ॥१४॥
याप्रमाणे जीवाची नित्यबद्धता सांगितली, व शिवाची मुक्तताही व्यक्त केली. आतां जीवाची जी बद्ध-मुक्तता आहे तीही सांगतात १४.

उद्धवाप्रती श्रीकृष्ण । बद्धमुक्तांचें लक्षण ।
दोघांचीही ऊणखूण । विचित्र जाण सांगेल ॥१५॥ह्यानंतर श्रीकृष्ण उद्ध्वाला बद्धमुक्तांचे लक्षण आणि दोघांचीही ऊणखूण सांगतील १५.

देहस्थोऽपि न देहस्थो विद्वान् स्वप्नाद् यथोत्थितः ।
अदेहस्थोऽपि देहस्थः कुमतिः स्वप्नदृग् यथा ॥ ८ ॥[श्लोक ८] स्वप्नातून जागा झालेला स्वप्नातील घटनांशी संबंध ठेवत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी देहात राहून सुद्धा देहाच्या गुणधर्मांशी संबंध ठेवत नाही परंतु अज्ञानी मनुष्याला आपला म्हणजेच आत्म्याचा शरीराशी काही संबंध नाही, हे. (जाणकारांकडून) कळले, तरीसुद्धा तो स्वप्नातील जग खोटे आहे, हे कळल्यानंतरही त्यातील घटनांनी जसा सुखीदुःखी होतो, तसाच ‘देह म्हणजेच आपण‘ असे मानून सुखीदुःखी होत असतो. (८)

बद्धमुक्तांचें मिश्र लक्षण । तीं श्लोकीं सांगेल जाण ।
केवळ मुक्ताचें सुलक्षण । गोड निरूपण सात श्लोकीं ॥१६॥
आतां तीन श्लोकांनी बद्धमुक्तांचे मिश्र लक्षण सांगतील. आणि केवळ मुक्तांचंच उत्तम लक्षणाचे गोड निरूपण सात श्लोकांनी करतील १६.

देहीं असोनि देहबुद्धि नाहीं । हें मुक्ताचें ‘मुक्तलक्षण’ पाहीं ।
यालागीं देहीं असोनि ‘विदेही’ । म्हणिपे पाहीं या हेतू ॥१७॥
देहांत असूनही देहबुद्धि नसणे हेच मुक्ताचे लक्षण होय. त्याला त्याच हेतूनें देहांत असूनही ‘विदेह’ म्हणतात १७.

स्वप्नींचे राज्य आणि भीक । जागृतीं मिथ्या दोन्ही देख ।
तैसें देहादि जें सुखदुःख । तें मिथ्या देख मुक्तासी ॥१८॥
स्वप्नांतील राज्य आणि भिक्षा, जागे झाल्यावर दोन्ही मिथ्याच; त्याप्रमाणे देहादि जें सुखदुःख ते मुक्तांना मिथ्याच आहे १८.

जो स्वप्नी मरोनि जाळिला । तो जागृतीं नाहीं राख जाहला ।
तैसा प्रपंच मिथ्या जाणितला । ‘मुक्त’ बोलिला त्या नांव ॥१९॥
जो स्वप्नांत मरून जाळला गेला. तो काही जागा झाल्यावर राख होत नाही, त्याप्रमाणे प्रपंच हा मिथ्या आहे असे ज्याने जाणले, त्यालाच ‘मुक्त ‘ असे म्हणतात १९.

स्वप्नींचें साधकबाधक । जागृतीं आठवे सकळिक ।
त्याचें बाधीना सुखदुःख । तैसें संसारिक मुक्तासी ॥२२०॥
स्वप्नांतलें अनुकूल प्रतिकूल जे काय असेल ते सारे जागृतींत आठवते, पण त्याचे सुखदुःख काहीं बाधत नाहीं; त्याप्रमाणेच संसारासंबंधी जें काही असते, तेही मुक्ताला बाधत नाही २२०.

आतां ऐक बद्धाची स्थिती । तो वस्तुतां असे देहातीतीं ।
परी ‘मी देह’ हें मानी कुमती । दुःखप्राप्ती तेणें त्यासी ॥२१॥
आतां बद्धाची स्थितिही ऐक. तो वास्तविक देहातीतच असतो, पण दुर्बुद्धीच्या योगाने ‘मीच देह’ असें तो मानतो, आणि त्यामुळेच त्याला दुःख होते २१.

जळीं देखे प्रतिबिंबातें । मी बुडालों म्हणोनि कुंथे ।
कोणी काढा काढा मातें । पुण्य तुमतें लागेल ॥२२॥
पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहून ‘मी बुडालों’ म्हणून कुंथू लागतो, आणि ‘कोणी तरी मला काढा हो ! तुम्हांला मोठे पुण्य लागेल’ असे म्हणतो २२.

स्वप्नीं घाय लागले खड्गाचे । तेणें जागृतीं म्हणे मी न वांचें ।
ऐसें निबिड भरितें भ्रमाचें । तें बद्धतेचें लक्षण ॥२३॥
स्वप्नांत तरवारीचे वार लागले, त्यामुळे जागृतींत म्हणतो की, ‘मी काहीं यांतून आतां वांचावयाचा नाही,’ असें जें भ्रमाचे दाट पटल, तेंच बद्धाचे लक्षण होय २३.

स्वप्नींचें सुखदुःख नसतें । तें स्वप्नभ्रमें भोगितां कुंथे ।
तेवीं ‘देह मी’ म्हणोनि येथें । नाना दुःखांते भोगितु ॥२४॥
स्वमातले नसतें सुखदुःख भोगतांना भ्रमानें तळमळत असतो. त्याप्रमाणे येथे ‘देह हाच मी’ असें मानून अनेक प्रकारची दुःखें भोगतो २४.

स्वस्वरूपाचें विस्मरण । तेणें विषयासक्ति दृढ जाण ।
संकल्प विकल्प अतिगहन । तेंचि लक्षण बद्धाचें ॥२५॥
आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले म्हणजे विषयासक्ति बळावते; अत्यंत संकल्पविकल्प उद्‌भवतात; तेंच बद्धाचे लक्षण होय २५.

आणिकें लक्षणें त्याचीं आतां । सांगतु असें तत्त्वतां ।
भोग भोगोनि अभोक्ता । ते ‘मुक्तावस्था’ परियेसीं ॥२६॥आता आणखीही त्याची लक्षणे सांगतो. भोग भोगूनही अभोक्ता असतो, तीच मुक्तावस्था होय. त्याबद्दलही ऐक २६.

इन्द्रियैरिन्द्रियार्थेषु गुणैरपि गुणेषु च ।
गृह्यमाणेष्वहं कुर्यान् न विद्वान् यस्त्वविक्रियः ॥ ९ ॥[श्लोक ९] इंद्रिये हे तिन्ही गुणांचे विकार आहेत आणि विषयसुद्धा तिन्ही गुणांचेच विकार आहेत अर्थात इंद्रियांनी विषय घेणे, हा गुणांचाच आपापसातील व्यवहार चालू आहे, हे जाणून आत्मज्ञानी माणसाने निर्विकार राहून आपण काहीच करीत नाही, असे मानावे. (९)

अवशेष प्रारब्धस्थितीं । मुक्तांची देहीं दिसे वस्ती ।
परी जागृती स्वप्न-सुषुप्तीं । देहस्थिती नातळे ॥२७॥
उरलेल्या प्रारब्ध-स्थितीमुळे मुक्तांची देहामध्ये वस्ती असलेली दृष्टीस पडते. परंतु जागृतींत, स्वप्नांत किंवा सुषुप्तींत सुद्धा तो देहस्थितीला स्पर्श करीत नाही २७.

छाया पुरुषाचेनि चळे । ते छायेसी पुरुष नातळे ।
तेवीं मिथ्या देह मुक्ताजवळें । कल्पांतकाळें येवों न शके ॥२८॥
पुरुषाच्या योगानें छाया हालत चालत असते; पण त्या छायेला पुरुष शिवत नाही, त्याप्रमाणे मिथ्या देहबुद्धि कल्पांतीही मुक्ताजवळ येऊ शकत नाही २८.

आपुले छायेसी जाण । जेवीं बैसों न शके आपण ।
तेवीं मायादि तिन्ही गुण । जवळी असोन स्पर्शेना ॥२९॥
ज्याप्रमाणे आपल्याच छायेमध्ये आपल्याला बसता येत नाही, त्याप्रमाणे मायादि तीन गुण जवळ असूनही त्याला शिवत नाहीत २९.

इंद्रियद्वारा यथानिगुतीं । प्राप्त विषयांतें सेविती ।
परी सेविलें ऐसेंही नेणती । विषयस्फूर्ती स्फुरेना ॥२३०॥
यहच्छेने जे जे विषय प्राप्त होतात, ते ते इंद्रियांच्या द्वारे ते सेवन करतात; पण आपण सेवन केले ह्याचेही त्यांस भान असत नाही. कारण, त्यांस विषयाची भावनाच स्फुरत नसते २३०.

गुण पोखिती गुणावस्था । इंद्रियें घेतीं इंद्रियार्था ।
मी उभयसाक्षी अकर्ता । चिन्मात्रतां अलिप्त ॥३१॥
गुणच गुणांच्या अवस्थेला पोषीत असतात; इंद्रियें आपआपले विषय भोगीत असतात; मी दोहोंचा साक्षी असून अकर्ता आहे; मी चित्स्वरूप असल्यामुळे सर्वांपासून अलिप्तच असतों (अशी त्याची धारणा असते) ३१.

तो इंद्रियाचेनि खेळेमेळें । सुखें विषयामाजीं जरी लोळे ।
तरी विकाराचेनि विटाळें । कदाकाळें मैळेना ॥३२॥
तो इंद्रियांच्या संगतीने विषयामध्ये जरी खुशाल लोळत असला, तरी विषयाच्या विटाळाने तो कधींच मळत नाही. ३२.

जेथ कामाची अतिप्रीती । तेथ लोभाची दृढ वस्ती ।
अथवा कामाची जेथ अप्राप्ती । तेथ महाख्याती क्रोधाची ॥३३॥
जेथे कामाची अतिशय प्रीति, तेथे लोभाची कायमची वस्ती असते ; अथवा कामाची जेथें प्राप्ति होत नाही, तेथे क्रोधाचे मोठे बंड उठते ३३.

मुक्त जाहला नित्य निष्काम । क्रोधलोभेंसी निमाला काम ।
तो स्वयें जाहला ‘आत्माराम’ । विश्रामधाम जगाचें ॥३४॥
परंतु मुक्त हा नित्य निष्कामच असल्यामुळे क्रोधलोभांसह त्याचा कामच नाहीसा झालेला असतो. तो स्वत:च आत्माराम आणि साऱ्या जगाचे विश्रामधाम होऊन राहतो ३४.

एवं मुक्ताच्या ठायीं जाण । उपजों न शके पापपुण्य ।
कामक्रोधादिवृत्तिशून्य । जाहला परिपूर्ण चिद्‍ब्रह्म ॥३५॥
अशा प्रकारें मुक्ताच्या ठिकाणी पाप किंवा पुण्य उत्पन्नच होऊ शकत नाही. तो कामक्रोधादि वृत्तिशून्य होत्साता परिपूर्ण चिब्रह्म होऊन राहातो ३५.

मुक्ताची विषयस्थिती । विषयीं स्फुरे ब्रह्मस्फूर्ती ।
यालागीं पापपुण्यें नुपजती । नित्यमुक्ति तेणें त्यासी ॥३६॥
मुक्ताचे विषयसेवन असे असते की, विषयांत सुद्धा त्यांना ब्रह्मभावच स्फुरत असतो. म्हणून पापपुण्ये उद्‌भवतच नाहीत; आणि तेणेकरून त्यांना नित्यमुक्ति प्राप्त होते ३६.

ऐशी मुक्ताची हे कथा । ऐक बद्धाचीही वार्ता ।
अकर्ताचि म्हणे मी कर्ता । येणेंचि सर्वथा गुंतला ॥३७॥मुक्तांची गोष्ट ही अशी आहे. आतां बद्धाची गोष्टही ऐक. तो खरोखर अकर्ता असून मी कर्ता असे म्हणतो, आणि त्यामुळेच तो सर्वतोपरी गुंतला जातो ३७.

दैवाधीने शरीरेऽस्मिन् गुणभाव्येन कर्मणा ।
वर्तमानोऽबुधस्तत्र कर्तास्मीति निबध्यते ॥ १० ॥[श्लोक १०] प्रारब्धाच्या अधीन असणार्‍या शरीरात इंदियांकडून घडणारी कर्मे ‘मी करतो‘ असे समजणारा अज्ञानी माणूस संसारबंधनात अडकतो. (१०)

अदृष्टाअधीन जें शरीर । तेथ आलियाहि हरिहर ।
अन्यथा न करवे अणुमात्र । हें वेद शास्त्रसंमत ॥३८॥
शरीर हे प्रारब्धाधीन आहे. तेथे हरिहरही आले तरी त्यांना सुद्धा त्यांत अणुरेणूइतकाही बदल करितां येत नाही, हे तत्त्व वेदशास्त्रांना सुद्धा संमत आहे ३८.

देहीं ज्या गुणाचें प्राधान्य । तैसेंचि कर्म निपजे जाण ।
इंद्रियें तीं गुणाधीन । तदनुसारें जाण वर्ततीं ॥३९॥
देहामध्ये ज्या गुणाचे प्राधान्य असते, त्याप्रमाणेच कर्म घडत असते. आणि इंद्रियेही गुणांच्या आधीन असल्यामुळे, तीही तदनुसारच वागत असतात ३९.

एवं दैवगुणें देहवर्तन । तेथ मी कर्ता म्हणवी आपण ।
तेंचि त्यासी दृढ बंधन । आपणा आपण घातक ॥२४०॥
मिळून देहाचे वर्तन दैवाच्या गुणाप्रमाणे होत असते; असे असता तो मी कर्ता असे म्हणतो. तेच त्याच्या दृढतर बंधनास कारण होऊन तो आपणच आपला घातक होतो २४०.

नळीमाजिल्या चण्यांच्या आशां । वानरें मुठीं धरणें तोचि फांसा ।
तेवीं देहींच्या विषयविलासा । अभिमानें तैसा गुंतला ॥४१॥
नळीतल्या चण्यांच्या आशेनें वानर ते मुठीत धरतो तोच त्याला फांस होतो, त्याप्रमाणे जीव देहाच्या विषयविलासांत अभिमानाने अडकून पडतो ४१.

जी देहातीत वस्तुतां । जो गुणकर्माचा अकर्ता ।
तो म्हणे ‘मी देह’ ‘मी कर्मकर्ता’ । अहंममता भूलला ॥४२॥
जो खरोखर देहातीत व गुणकर्माचा अकर्ता, तोच म्हणतो की, ‘देह तो मी व कर्माचा कर्ताही मीच. ‘ अशा प्रकारें अहं-ममतेमुळे भुलून जातो ४२.

जो न करितांचि चोरी । मी चोरु म्हणे राजद्वारीं ।
तो मारिजे लहानथोरीं । तैशी परी जडजीवां ॥४३॥
जो चोरी न करतांच मी चोरी केली म्हणून राजरोस बोलतो, त्याला लहानथोरही मारीत सुटतात. तशीच गत जड जीवांची आहे ४३.

प्रकृतीचें कर्म आपुले माथां । घेऊनि नाचे अहंममता ।
तेणें अभिमानें दृढ बद्धता । आकल्पांता अनिवार ॥४४॥
खरोखर कर्म असतें प्रकृतीचें, ते आपल्या माथ्यावर घेऊन अहं-ममतेनें नाचतो, त्या अभिमानामुळे कल्पांतापर्यंत अनिवार्य बद्धता प्राप्त होते ! ४४.

तळीं मांडूनि काजळा । वरी ठेविला स्फटिकु सोज्ज्वळा ।
श्वेतता लोपूनि दिसे काळा । तेवीं आंधळा जीवु झाला ॥४५॥
खालीं काजळ पसरून वर पांढरा शुभ्र स्फटिक ठेवला, तर त्याचा पांढरेपणा लोपून तो काळाच दिसू लागतो. त्याप्रमाणे जीव हा आंधळा झालेला आहे ४५.

कां आंधळें मातलें हातिरूं । नेणे निजपतन निर्धारु ।
तैसा जीवु लागे कर्म करूं । पतनविचारु तो न देख ॥४६॥
किंवा आंधळा हत्ती माजला म्हणजे त्याला जसा आपण खड्यांत पडूं हा विचार राहात नाही, त्याप्रमाणे जीव हा कर्म करूं लागतो, अधोगतीला जाऊं हा विचारच त्याला राहात नाहीं ४६.

‘मी देह मी कर्मकर्ता । मी ज्ञाता मी विषयभोक्ता’ ।
ऐशी जे कां देहात्मता । ‘दृढबद्धता’ तिये नांव ॥४७॥
मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषयभोक्ता असा जो देहाचा मीपणा त्याचंच नांव ‘दृढबंधन’ ४७.

एवं बद्ध-मुक्त-वर्तन । विशद केलें निरूपण ।
आतां केवळमुक्ताचें लक्षण । आवडीं श्रीकृष्ण सांगतु ॥४८॥
अशा प्रकारे बद्धमुक्तांचे वर्तन निरूपणाने स्पष्ट करून दाखविले. आता फक्त मुक्तांचेच लक्षण श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने सांगतात ४८.

‘ज्ञानिया तो तंव आत्मा माझा’ । हे अतिप्रीती गरुडध्वजा ।
हें गुह्य सांगितलें कपिध्वजा । रणसमाजा रणरंगीं ॥४९॥
‘ज्ञानी हा माझा आत्मा आहे,’ असे भगवंतांनी रणभूमीवर सैन्याच्या गर्दीत अर्जुनाला आपले गुह्य (गीत) सांगितले आहे ४९.

तेंचि आतां उद्धवाप्रती । अत्यादरें सांगे श्रीपती ।
ज्ञानियांची मुक्तस्थिती । यथानिगुतीं निजगुह्य ॥२५०॥
तेच गुह्य परमप्रीतीने या वेळी श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत. ज्ञान्याची मुक्तस्थिति कशी असते, ती यथार्थ रीतीने सांगणे हेच त्यांचे आत्मगुह्य होय २५०.

ज्ञानलक्षणें सांगतां । धणी नुपरे श्रीकृष्णनाथा ।
निरूपणमिसें ज्ञानकथा । मागुतमागुतां सांगतु ॥५१॥
ज्ञानाची लक्षणे सांगतांना श्रीकृष्णाची तृप्ति होईना; म्हणून निरूपणाच्या निमित्ताने ज्ञानाचे लक्षण पुनः पुन्हा सांगत आहेत ५१.

यालागीं ज्ञानभक्तांची गोडी । श्रीकृष्णाचि जाणे फुडी ।
कृष्णभजनाची आवडी । भक्त ते गोडी जाणती ॥५२॥
ह्यावरून ज्ञानी भक्तांची गोडी एका श्रीकृष्णालाच काय ती ठाऊक. आणि कृष्णभजनाची गोडी तशा भक्तांनाच ठाऊक ५२.

आधींच तंव हे मुक्ताची कथा । वरी श्रीकृष्णासारिखा वक्ता ।
उद्धवाचें भाग्य वर्णितां । न वर्णवे सर्वथा शेषादिकां ॥५३॥
आधीच ही मुक्तांची कथा; त्यांत श्रीकृष्णासारखा वक्ता; तेव्हां उद्धबाच्या भाग्याचे वर्णन काय करावे ? ते शेषाला सुद्धा करता येणार नाही ५३.

उद्धव अर्जुनासमान । त्याहूनि हा दिसे गहन ।
ते परस्परें नरनारायण । गुह्य ज्ञान बोलिले ॥५४॥
उद्धव हा अर्जुनासारखाच किंबहुना त्याच्याहूनही थोर म्हटला पाहिजे. कारण ते दोघे परस्पर नरनारायणच होते, म्हणून त्याने त्याच्याजवळ गुह्य ज्ञान सांगितले ५४;

तेचि उलथूनि ज्ञानकथा । उद्धवासी होय सांगता ।
उद्धवा ऐसें भाग्य तत्त्वतां । न दिसे सर्वथा आनासी ॥५५॥
पण तीच ज्ञानाची कथा फिरून उद्धवाला सांगितली. ह्यावरून खरोखर उद्धवाइतके भाग्य दुसऱ्या कोणाचेच दिसत नाहीं ५५.

जाणें सांडूनि निजधामा । मागें ठेवूनि आपल्या कामा ।
उद्धव आवडला पुरुषोत्तमा । त्याचिया प्रेमा विगुंतला ॥५६॥
ज्याने निजधामाला जावयाचे सोडून व आपल्या इच्छा बाजूस सारून एवढे निरूपण केले, त्याअर्थी श्रीकृष्णाला उद्धव फारच आवडला होता, व तो त्याच्या प्रेमांत गुंतला होता ह्यांत शंका नाही ५६.

यालागीं उद्धवाचें शुद्ध पुण्य । जगीं उद्धवुचि धन्य धन्य ।
जयालागीं स्वयें नारायण । स्वानंदघन वोळला ॥५७॥
म्हणून उद्धवाचे पुण्य फारच निर्मळ. जगामध्ये धन्य धन्य त्या उद्धवाची ! ज्याच्यासाठी स्वानंदघन नारायण स्वतः दयाई झाला ५७.

जो नातुडे योगयागसंकटीं । तो उद्धवाच्या बोलासाठीं ।
जेवीं व्याली धेनु वत्सा चाटी । तेवीं गुह्य गोठी सांगतु ॥५८॥
योगयागादि संकटांनीही जो मिळावयाचा नाही, तो उद्धवाच्या शब्दावरून, व्यालेली गाय जसें वासरूं चाटते, त्याप्रमाणे गुह्य गोष्टी सांगू लागला ५८.

जो निजकुळासी काळु । तो उद्धवासी अतिस्नेहाळु ।
बापु भक्तकाजकृपाळु । ज्ञानकल्लोळु तुष्टला ॥५९॥
जो आपल्याच कुळाचा काळ बनला, तोच भक्तकाजकैवारी ज्ञानकलोळ आणि अतिशय प्रेमळ असा श्रीकृष्ण उद्धवावर प्रसन्न झाला ५९,

यालागीं उद्धवाचें नांव घेतां । श्रीकृष्ण निवारी भवव्यथा ।
ऐसी भक्तप्रीती भगवंता । भक्तातें स्मरतां हरि तारी ॥२६०॥
म्हणून उद्धवाचें नांव घेतले असतां श्रीकृष्ण हा संसारदुःखापासून मुक्त करतो, अशी भगवंताला भक्ताची प्रीति आहे. भक्ताचे स्मरण केलें तरी सुद्धा त्याला भगवान् तारतो २६०.

मुक्ताचीं लक्षणें निर्धारितां । लाभे आपुली निजमुक्तता ।
एका जनार्दनु विनवी संतां । मुक्तकथा हरि बोले ॥६१॥
एका (एकनाथ) जनार्दन संतांना विनंती करीत आहे की, मुक्तांची लक्षणे निश्चित केली म्हणजे आपली मुक्तता आपणास प्राप्त होते; याकरितांच श्रीकृष्ण मुक्तांची कथा सांगत आहेत ६१.

कृष्णु उद्धवासी म्हणे मी तुज । सांगेन आपुलें निजगुज ।
मुक्तलक्षणाचें भोज । नवल चोज परियेसीं ॥६२॥कृष्णा उद्धवाला म्हणाले. मी आपलें अत्यंत गुह्य जें मुक्तलक्षणांचे रहस्य ते तुला निवेदन करतो. तो चमत्कार ऐक ६२.

एवं विरक्तः शयने आसनाटनमज्जने ।
दर्शनस्पर्शनघ्राण भोजनश्रवणादिषु ॥ ११ ॥[श्लोक ११] परंतु जो ज्ञानी विरक्त असतो, तो, झोपणे, बसणे, हिंडणेफिरणे, स्नान करणे, पाहाणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणेपिणे, ऐकणे, इत्यादी सर्व क्रिया इंद्रिये परस्पर करीत आहेत, (११)

ऐकें मुक्ताचें लक्षण । आसन भोजन शयन ।
दर्शन स्पर्शन घ्राण । अटन मज्जन करी कैसें ॥६३॥
बसणे, जेवणे, निजणे, पहाणे, स्पर्श करणे, वास घेणे, फिरणे, स्नान करणे ही कृत्ये मुक्त असतात ते कशा रीतीने करतात ? त्याचे लक्षण ऐक ६३.

मागील श्लोकार्थु संपतां । प्रकृतिकर्म अभिमानता ।
तेणें लागली दृढबद्धता । तो अहंकारु ज्ञाता नातळे ॥६४॥
मागील श्लोकाच्या अखेरीस प्रकृतिकर्माचा अभिमान धरल्याने ढबंधन प्राप्त होते असे सांगितले; पण ज्ञाता त्या अहंकाराला शिवत नाहीं ६४.

सर्वकर्मीं स्वभावतां । ज्ञात्याची निरभिमानता ।
ते मी समूळ सांगेन कथा । सावधानता अवधारीं ॥६५॥
ज्ञात्याचा सर्व कर्मामध्ये स्वभावतांच निरभिमानपणा असतो. तीच साद्यंत हकीकत आतां सांगतों, नीट लक्ष देऊन ऐक ६५.

जेवीं छायेचा मानापमान । पुरुषा न बाधी अणुप्रमाण ।
तेवीं देहाचें कर्माचरण । निरभिमान मुक्तासी ॥६६॥
ज्याप्रमाणे छायेचा मान किंवा अपमान पुरुषाला अणुरेणूइतकाही बाधत नाही, त्याप्रमाणे देहाचे कर्माचरण निरभिमान मुक्ताला बाधत नाही ६६.

स्वाधिष्ठान तेंचि ‘आसन’ । अखंड त्यावरी आरोहण ।
तेथें येवोंचि नेणे अभिमान । बैसलें मन उठेना ॥६७॥
स्वाधिष्टान हीच त्यांची बैठक ; त्या आसनावरच ते निरंतर बसलेले असतात. तेथें अभिमान येऊच शकत नाही. त्या ठिकाणी बसलेलें मन उठतच नाहीं ६७.

नवल आसनाचें महिमान । हारपोनि गेलें विस्मरण ।
कदा एकांतु न मोडे जाण । हें ‘सहजासन’ मुक्ताचें ॥६८॥
त्या आसनाची थोखी काही विलक्षणच आहे. तेथें विस्मरण नाहीसेंच होते; एकांत म्हणून कधी मोडतच नाही. हेंच मुक्तांचे ‘सहजासन’ होय ६८.

जें आसनींचें समाधान । समाधि आणि व्युत्थान ।
करी दोंहीची बोळवण । हें चालतें ‘आसन’ मुक्ताचें ॥६९॥
या आसनाचे समाधान असें आहे की, समाधि लावणे आणि उतरणे या दोहींचीही तेथे बोळवण होते. हेच मुक्तांचें चालतें आसन होय ६९.

जें बैसल्या आसनीं समाधान । त्याचि स्थिति ‘गमनागमन’ ।
उठिलों बैसलों नाठवे जाण । चालतेंपण स्फुरेना ॥७०॥
आसनावर बसलें असतां जें समाधान असते, तेच हिंडता फिरतांनाही असते. उठलों किंवा बसलों ह्याचेही स्मरण राहात नाही, चालल्याचेही भान नसते २७०.

चालतांही चपळ पदीं । मी चालतो हे नाठवे बुद्धी ।
चालतां न मोडे समाधी । हे लक्षणसिद्धी मुक्ताची ॥७१॥
पायांनी भराभर चालत असले, तरी मी चालतों आहे असे त्याच्या बुद्धीला स्मरत नाही. चालतांना सुद्धा त्याची समाधि मोडत नाही. मुक्ताची सक्षणसिद्धि अशी असते ७१.

जरी त्रैलोक्य हिंडला । तरी ठायींहूनि नाहीं हालला ।
ऐसा न चलोनि मुक्तु चालला । जेवीं अभ्रें धांवला दिसे चंद्र ॥७२॥
अभ्रामुळे चंद्र धावलेला दिसतो, त्याप्रमाणे तो जरी त्रैलोक्यांत हिंडला तरी तो आपल्या ठिकाणावरून हालत नाही. असा न चालूनही मुक्त चालत असतो ७२.

कुलालचक्रीं बैसली माशी । ते न हालतां भंवे चक्रासरसीं ।
मुक्तांची गमनसिद्धी तैशी । देहगमनेंसीं आभासे ॥७३॥
कुंभाराच्या चाकावर बसलेली माशी जाग्यावरून न हालतांच त्या चाकाबरोबर फिरत असते. त्याप्रमाणेच मुक्ताचें गमन देहाच्या गमनाबरोबर भासत असते ७३.

देहो प्रारब्धास्तव हिंडे । बैसका स्वस्वरूपींची न संडे ।
जेवीं रथीं धांवतां सवेग घोडे । निद्रा न मोडे रथस्थाची ॥७४॥
देह हा प्रारब्धाप्रमाणेच हिंडत असतो; पण मुक्ताची आत्मस्वरूपांतील बैठक काही हालत नाही. स्थाचे घोडे भरधाव पळत असले तरी स्थांत निजणाराची झोप मोडत नाही त्याप्रमाणेच हें ७४.

ऐसें न चळतां जें चळण । तें जाण मुक्ताचें ‘गमन’ ।
आतां ऐक त्याचें ‘स्नान’ । निमज्जन निजरूपीं ॥७५॥
असें न हालतांच में हालणें तेंच मुक्ताचे ‘गमन’ होय. आता आत्मस्वरूपांत बुडी देऊन तो ‘स्नान ‘ कसे करतो ते ऐक ७५.

स्नान करी गंगाजळें । परी गंगादकातें नातळे ।
मन ‘चित्स्वरूपीं’ केलें सोवळें । तें वोवळें हों नेणे ॥७६॥
तो गंगेच्या उदकानें स्नान करतो; परंतु गंगोदकाला स्पर्शही करीत नाही. चित्स्वरूपाने मन जे एकदा सोवळे करून ठेवले त्याला ओवळे होतांच येत नाही ७६.

त्यासी निजस्वरूपीं नाहतां । जाहली परम पवित्रता ।
तीर्थे मागती चरणतीर्था । ऐशी सुस्नातता मुक्ताची ॥७७॥
आत्मस्वरूपामध्येच मजन झाल्यामुळे त्याला परमपवित्रता आलेली असते. त्यामुळे तीर्थेच त्याच्या चरणाचे तीर्थ मागत असतात, इतकें मुक्ताचे स्नान पवित्र असते ७७.

तो चिन्मात्रचि देखे जीवन । अखंड चिद्रुपीं अवगाहन ।
इतर म्हणती केलें स्नान । त्यासी निमज्जन निजरूपीं ॥७८॥
तो पाण्यालाही चित्स्वरूपच पहात असतो; त्याने चित्स्वरूपामध्येच अखंड बुडी दिलेली असते; इतर लोक त्याने स्नान केले असे म्हणतात; पण तो निजस्वरूपामध्येच वुडी देऊन बसलेला असतो ७८.

त्याचे चरणींचे रजःकण । लाहोनि धरा परम पावन ।
त्याचेनि प्राणसंगें जाण । पवित्रपण वायूसी ॥७९॥
त्याच्या चरणाचे रजःकण प्राप्त झाले असतां पृथ्वीसुद्धा परम पावन होऊन जाते. त्याच्या प्राणाच्या संगतीने वायूलाही पवित्रपण येते ७९.

त्याचेनि चरणस्पर्शे तत्त्वतां । पवित्र झाल्या गंगादि सरिता ।
त्याचेनि जठरसंगे सर्वथा । अतिपवित्रता अग्नीसी ॥२८०॥
त्याच्या चरणस्पर्शाने खरोखर गंगादि नद्याही पवित्र होऊन जातात. त्याच्या उदराच्या सहवासाने अग्नीलाही अत्यंत पवित्रता प्राप्त होते २८०.

त्याच्या हृदयावकाशीं आकाश । सगळें राहिलें सावकाश ।
तेणें पवित्र जाहलें आकाश । अलिप्त उदास सर्वत्र ॥८१॥
त्याच्या हृदयाच्या पोकळीमध्ये आकाश हे स्वस्थपणाने राहिलेले असते; त्यामुळे ते पवित्र होऊन सर्वत्र अलिप्त आणि उदास असते ८१.

जे चढोनि बैसले वैकुंठीं । ते सदा वांछिती त्याची भेटी ।
वेदु ऐकों धांवें गोठी । तो पहावया दिठीं देव येती ॥८२॥
जे वैकुंटांव चढून बसलेले असतात, ते सुद्धा निरंतर त्याच्या भेटीची इच्छा करीत असतात. त्याच्या गोष्टी ऐकायला वेद धावत येतात आणि त्याला डोळ्यांनी पहावयाला देव येतात ८२.

एवं चित्स्वरूपीं करूनि स्नान । जाहला सर्ववंद्य अतिपावन ।
हें मुक्ताचें स्नानलक्षण । आतां ‘निरीक्षण’ तें ऐक ॥८३॥
अशाप्रकारे चित्स्वरूपामध्ये स्नान करून तो सर्ववंद्य व अत्यंत पावन झालेला असतो. हे मुक्ताच्या स्नानाचे लक्षण झाले. आता त्याचे पहाणें’ कसें असतें तें ऐक ८३.

अवघें चराचर देखतां । तो देखोनीचि न देखता ।
दृष्टीसी दृश्यासी अलिप्तता । दृश्य देखतां हरि दिसे ॥८४॥
हे सारें चराचर पहात असतांते पाहुनही तो न पहाणारा असतो. कारण दृष्टीपाशी आणि दृश्यापाशी त्याची अलिप्तता असल्याने, दृश्य पदार्थ पाहात असतांही तेथे त्याला श्रीहरिच दिसतो ८५.

दृश्यें दुमदुमित दिसे सृष्टी । परी दृश्य न पडे त्याचे दृष्टीं ।
होतांही दृश्येंसीं भेटी । पडे मिठी अदृश्यीं ॥८५॥
सृष्टी सारी दृश्य पदार्थांनी दुमदुमलेली दिसते; पण त्याच्या दृष्टीला दृश्य पदार्थ म्हणून दिसतच नाही. रश्य पदार्थाची भेट झाली तरी सुद्धा मिठी पडते ती अदृश्याच्या ठिकाणीच पडते ८५.

दृष्टि प्रकाशे देखणेपणीं । तें देखणें देखे दृश्यस्थानीं ।
जेवीं डोळ्यां डोळा दर्पणीं । निज दर्शनीं देखतु ॥८६॥
आरशांत आपलेच तोंड पाहूं लागले असता आपल्या डोळ्यांनीच आपले डोळे दिसू लागतात; त्याप्रमाणे देखणेपणाने दृष्टि प्रकाशमान होऊन दृश्यस्थानी तें देखणेच दिसू लागते ८६.

डोळेनि दर्पणु प्रकाशे । त्यामाजीं डोळेनि डोळा दिसे ।
मुक्ताचें देखणें तैसें । आपणयाऐसें जग देखे ॥८७॥
डोळ्याने आरसा दिसू लागतो, त्यांत डोळ्यांनीच डोळा पहावयास मिळतो; मुक्ताचे पहाणेही तसेच असते. तो आपल्यासारखेच जग पहात असतो ८७.

दृश्य-द्रष्टा-दर्शनीं । त्रिपुटी गेली हारपोनी ।
देखणें देखे देखणेनी । देखणा हो‍उनी सर्वांगें ॥८८॥
पहावयाचा पदार्थ, पहाणारा, आणि पहाणे ( दृश्य-द्रष्टा-दर्शन) ही त्रिपुटीच नाहींशी होऊन जाते. तो सांगदेखणा होऊन देखणें देखण्यानेच पहात असतो ८८.

होतां नाना पदार्थेंसी भेटी । तें देखणेपणा दृश्य लोटी ।
दृश्यातीत निजदृष्टीं । सुखें सृष्टी देखतु ॥८९॥
निरनिराळ्या पदार्थांची भेट झाली तरी देखणेपण त्या दृश्याला बाजूस सारून दृश्यातीत असलेलें आत्मतत्त्वच सर्व सृष्टीत भरलेले त्याला दिसत असते ८९.

मुक्ताची हे देखती स्थिती । देखणेपणें यथानिगुतीं ।
उद्धवा ये दृष्टीची ज्यासी प्राप्ती । तोचि त्रिजगतीं पावन ॥२९०॥
उद्धवा ! ही जी मुक्तांची पहाण्याची पद्धति आहे, ती यथार्थ रीतीने ज्याच्या पहाण्यांत येते, ह्या दृष्टीची ज्याला प्राप्ति होते, तोच त्रिभुवनामध्ये पावन झाला म्हणून समजावें २९०.

या दृष्टीं जे नित्य वर्तत । ते जाण पां परम मुक्त ।
या दृष्टीं जे मज पाहत । परम भागवत प्रिय माझे ॥९१॥
अशा दृष्टीने जे नेहमी वागतात, ते परममुक्त होत, हे ध्यानात ठेव. आणि ह्याच दृष्टीने जे मला पहातात, ते श्रेष्ठ भगवद्‌भक्त असून मला फार प्रिय असतात ९१.

परादिवाचांमाजीं वचन । उपजे तेथ याचें ‘श्रवण’ ।
श्रोता वक्ता कथा कथन । अवघें आपण होऊनि ऐके ॥९२॥
परादि वाणींमध्ये ज्या स्थानी शब्द उत्पन्न होतो, त्या स्थानी त्याचे श्रवण असते. श्रोता, वक्ता, कथा आणि निरूपण ही सारी आपणच होऊन तो ऐकत असतो ९२.

शब्दजातेंसी कान । अखंड जडले सावधान ।
श्रवणामाजीं हारपे गगन । परम समाधान श्रवणाचें ॥९३॥
त्याचे कान शब्दसमुदायाला सावधानपणे अखंड जडलेले असतात. त्याच्या कानामध्ये आकाशच हरपून गेलेले असते. अशा प्रकारे त्याच्या श्रवणाचे अत्यंत समाधान असतें. ९३.

ऐकतां लौकिक शब्द । कां नारायण-उपनिषद ।
परिसतां नाम हरि-गोविंद । अर्थावबोध समत्वें ॥९४॥
लौकिकांतील शब्द कानावर आले, किंवा नारायणोपनिषद् श्रवण करावयास मिळाले; किंवा हरि, गोविंद ही नामें ऐकिली; तरी त्या सर्वांचा अर्थबोध त्याला सारखाच होतो ९४.

बोलातें जो बोलविता । तोचि श्रवणामाजीं श्रोता ।
येणें अन्वयें श्रवण करितां । शब्दीं निःशब्दता अतिगोड ॥९५॥
शब्दांना बोलविणारा असतो तोच श्रवणामध्ये श्रोता होऊन राहतो, त्यामुळे श्रवण करतांना शब्दांमध्ये अत्यंत गोड निःशब्दताच उभी राहते ९५.

जो जो श्रवणीं पडे शब्दु । तो तो होत जाय निःशब्दु ।
यापरी श्रवणीं परमानंदु । स्वानंदबोधु मुक्ताचा ॥९६॥
जो जो शब्द कानांत पडतो, तो तो निःशब्दच होत जातो. याप्रमाणे श्रवणामध्ये मुक्कांचा पस्मानंदस्वरूप स्वानंदबोधच भरलेला असतो ९६.

अकारादि वर्णत्रिपुटी । प्रणवु मूळशब्द सृष्टीं ।
तो ओंकार ब्रह्मरूपें उठी । हे श्रवणसंतुष्टी मुक्ताची ॥९७॥
अकार, उकार व मकार ह्या त्रिपुटीचा शब्दसृष्टीतील मूळ शब्द जो ‘प्रणव’ म्हणजे ओंकार तो सुद्धा ब्रह्मस्वरूपानेच त्याला दिसू लागतो. हीच मुक्तांची श्रवणसंतुष्टि होय ९७.

श्रवणीं पडतां शब्दज्ञान । सहजें शाब्दिक जाय उडोन ।
श्रवणीं ठसावे ब्रह्म पूर्ण । स्वानंदश्रवण मुक्ताचें ॥९८॥
शब्दज्ञान कानावर पडले तरी शाब्दिक सृष्टि सारी निघून जाते. आणि कानामध्ये पूर्ण बहाच भरून राहते, हेच मुक्तांचे स्वानंदश्रवण होय ९८.

परिसतां उपनिषद । कां लौकिकादि नाना शब्द ।
मुक्ताचा पालटेना बोध । श्रवणीं स्वानंद कोंदला ॥९९॥
उपनिषद् ऐकलें काय; किंवा लौकिकांतील निरनिराळे शब्द ऐकले काय, मुक्तांचे ज्ञान पालटत नाही. त्यांना श्रवणामध्ये स्वानंदच भर. लेला असतो ९९.

एक अद्वितीय ब्रह्म । हें वेदशास्त्राचें गुह्य वर्म ।
तें मुक्तांसी जाहलें सुगम । शब्दी परब्रह्म कोंदलें ॥३००॥
एक अद्वितीय परब्रह्म, हेच साऱ्या वेदशास्त्रांतील गुप्त मर्म आहे. तेच मुक्तांना सुगम झालेले असते. शब्दामध्ये परब्रह्मच दाटलेले त्यांना दिसते ३००.

लौकिक वैदिक शब्द जाण । शब्दमात्रीं ब्रह्म पूर्ण ।
ऐसें मुक्ताचें हें श्रवण । ‘घ्राणलक्षण’ । परियेसीं ॥१॥
लौकिक शब्द असोत, की वैदिक शब्द असोत; प्रत्येक शब्दांत ब्रह्मच भरलेलें असते. असे हे मुक्तांचे श्रवण आहे. आता त्यांच्या घ्राणाचे लक्षण ऐक १.

घ्राणासी येतां सुगंधु । मुक्तासी नोहे विषयबोधु ।
गंधमिसें स्वानंदकंदु । परमानंदु उल्लासे ॥२॥
नाकाला सुगंध आला तरी मुक्तांना गंधविषयाची भावनाच उत्पन्न होत नाही. त्या सुगंधाच्या स्वरूपाने स्वानंदकंद परमानंदच त्यांच्या अनुभवास येतो २.

घ्राण-सुमन-चंदन । अवघें तो होय आपण ।
यापरी गंध भोगी जाण । भोक्तेंपण सांडोनी ॥३॥
नाक, पुष्प आणि चंदन ही सारी तो आपणच झालेला असतो. याप्रमाणे भोक्तेपण सोडून देऊन तो त्या सुगंधाचा उपभोग घेतो ३.

घ्राणा येतांचि सुवासु । सुवासीं प्रकटे परेशु ।
तेव्हां सुवासु आणि दुर्वासु । हा विषयविलासु स्फुरेना ॥४॥
नाकाला सुगंध आला असतां लोच त्या सुगंधाबरोबर परेश प्रगट होतो. त्यामुळे हा सुगंध आहे का दुगंध आहे या विषयोपभोगाचे याला ज्ञान होत नाहीं ४.

मलयानिलसंगें जाण । जेथ जेथ गंधाचें गमन ।
तेथ तेथ मुक्ताचें घ्राण । अगम्यपण या भोगा ॥५॥
मलयपर्वतावरील वायूबरोबर सुगंध जेथे जेथे म्हणून जात असतो, तेथे तेथे मुक्तांचं घ्राण असते, असें ह्या सुखाचें उपभोगणे अगम्य आहे ५.

जितुका चळता वायु जाण । तितुकें मुक्ताचें घ्राण ।
यापरी गंधग्रहण । स्वभावें जाण होतसे ॥६॥
वायु जेवढा वाहतो, तेवढे मुक्तांचे वास घेणे असते. अशा प्रकारे सुगंधाचें सेवन त्याला सहजपणे घडते ६.

यापरी जाण तत्त्वतां । होय तो गंधाचा भोक्ता ।
हे घ्राणक्रिया जाण मुक्ता । ‘रसभोग्यता’ अवधारीं ॥७॥
खरोखर तो अशा रीतीनें गंधविषयाचा भोक्ता होत असतो. हेच मुक्ताचे वास घेणे होय. आतां ‘रस’ सेवन करण्याचा प्रकार ऐक ७.

रस-रसना-भोजन । तो स्वयेंचि आहे आपण ।
हातु न माखितां सर्वापोशन । रसनेविण सेवितु ॥८॥
रस, रसना आणि भोजन ही तिन्ही तो स्वत:च होतो. तो जिव्हेशिवाय, हात न भरतांच सर्व खात असतो ८.

षड्रसांचा स्वादु जाणे । परी एकीचि चवीं अवघें खाणें ।
भोक्तपणा आतळों नेणे । ऐसेनि भोजनें नित्यतृप्तु ॥९॥
साही रसांची चव त्याला कळत असते तथापि तो सारे एकाच चवीने खात असतो; पण भोक्तेपणाला स्पर्श करावयाचे त्यास माहीत नसते. अशा भोजनाने तो नित्यतृप्त असतो ९.

भूक उपजोंचि नेणे । जेवूं बैसल्या पुरे न म्हणे ।
सर्वभक्षी नखातेपणें । उच्छिष्ट होणें त्या नाहीं ॥३१०॥
त्याला भुकेची जाणीव नसते, पण जेवायला बसल्यावर पुरेही म्हणत नसतो. तो न खातांच सर्व काही खाऊन टाकतो. पण त्याला उष्टेपणा नसतो ३१०.

ताट अन्न आणि आपण । तो न देखे भिन्नपण ।
रसमिसें स्वानंदपूर्ण । सर्वांगें जाण सेवित ॥११॥
ताट, अन्न, आणि आपण ह्यांत त्याला भिन्नपणा वाटत नाही. रस-विषयाच्या निमित्ताने सर्वांगाने तो पूर्ण स्वानंदाचा उपभोग घेत असतो ११.

जंव रसना घेवों जाय रसस्वादु । तंव तेथें प्रकटे परमानंदु ।
करूनि रसरसने उच्छेदु । निजानंदु सेवितु ॥१२॥
जिव्हा रसाची गोडी घ्यावयाला जाते, तों तेथें परमानंदच प्रगट होतो. म्हणून तो रस आणि रसना दोहोंनाही सोडून देऊन निजानंदाचेंच ग्रहण करतो १२.

सकळ गोडियांची मूळ गोडी । तेथ बैसली निजआवडी ।
सेवितां नाना परवडी । तेचि गोडी गोडपणें ॥१३॥
साऱ्या गोडपणाला गोडी आणणारी जी मूळची गोडी, तेथेच त्याच्या अंत:करणाचे प्रेम जडलेले असते. म्हणून त्याने नाना प्रकारचे पदार्थ खाल्ले, तरी त्या गोडीचाच गोडपणा त्याला तेथे लागतो १३.

सकळ गोडियां जें गोड आहे । ते गोडीच तो झाला स्वयें ।
आतां जो जो रसविषयो खाये । तेथ तेथ आहे ते गोडी ॥१४॥
साऱ्या गोडींमध्ये जी गोडी असते, ती गोडीच तो स्वतः झालेला असतो. यामुळे तो ज्या ज्या रसाचा पदार्थ खातो, तेथे तेथे त्याला तीच गोडी अनुभवास येते १४.

कैसा मुक्ताचा निजबोधु । घेवों जातां रसस्वादु ।
रसत्व लोपूनि स्वानंदकंदु । परमानंदु वोसंडे ॥१५॥
मुक्ताचा निजबोध कसा असतो पहा ! ते रसास्वाद घ्यावयास गेले असता त्यांतील रसत्व लोपून तेथें स्वानंदद परमानंदच भरून वाहतो १५.

यालागीं जो जो रस सेवूं जाये । तो तो ब्रह्मरसुच होये ।
मुक्ताची रसना यापरी पाहें । घेत आहे रसातें ॥१६॥
म्हणून ते जो जो रस चाखावयास जातात, तो तो ब्रह्मरसच होऊन जातो. ह्याप्रमाणे मुक्तांची रसना. रसाचे ग्रहण करीत असते १६.

एवं मुक्ताचें जें भोजन । ते करिती क्रिया ऐशी जाण ।
आतां तयाचें जें ‘स्पर्शन’ । तेंही लक्षण परियेसीं ॥१७॥
तात्पर्य, मुक्तांची भोजन करण्याची क्रिया अशी असते हे लक्षात ठेव. आता त्यांचे ‘स्पर्श’ ग्रहण कसे असते त्याचेही लक्षण ऐक १७.

मुक्ता शीत लागतांचि जाण । शीत सांडी शीतळपण ।
स्पर्शे उष्णत्वा मुकलें उष्ण । स्पर्शलक्षण हें त्याचें ॥१८॥
मुक्तांना थंडी लागल्याबरोबर तिचा थंडपणाच नाहीसा होतो. किंवा उष्णाने त्यांना स्पर्श केला, तर उष्णाचे उष्णत्वच नाहीसे होते. हेच त्यांच्या स्पर्शाचे लक्षण होय १८.

जेवीं कां टेंकितां अग्नीशी । घुरें आणी चंदनाशी ।
जाळूनि त्यांच्या विकाराशी । आपणाऐशीं करी वन्ही ॥१९॥
ज्याप्रमाणे अग्नीशी संबंध येतांच चंदन आणि घुरै (एक दुर्गंध वृक्ष ) ह्यांच्या विकारांना जाळून त्यांना अग्नि जसा आपणासारखे करून टाकतो १९,

तेवीं मुक्तासी द्वंद्वें आदळतां । द्वंद्वांची बुडाली द्वंद्वता ।
तो सर्वी सर्वपणें असतां । सहजे द्वंद्वता निमाली ॥३२०॥
त्याप्रमाणे मुक्तांच्या अंगावर द्वंद्वे येऊन कोसळली असतां द्वंद्वांचा द्वंद्वपणाच मोढून जातो. तो सर्वपणाने सर्वांतच असल्यामुळे त्यांचा द्वंद्वपणा आपोआपच नाहीसा होतो ३२०.

तेथ कैंचे मृदु कैंचें कठिण । कैंचें शीत कैंचें उष्ण ।
सर्वीं सर्वात्मा तो जाण । द्वंद्वाचें भान स्पर्शेना ॥२१॥
तेथें मऊ कशाचे आणि कठिण कशाचें ? थंड कशाचे आणि उष्ण कशाचें ? तो सर्वांमध्ये सर्वांचा आल्माच होऊन राहिलेला असल्यामुळे त्याला द्वंद्वाचे भान शिवत सुद्धा नाही २१.

आगीसी पोळीना उन्हाळा । हींव पीडीना हिमाचळा ।
तैशी द्वंद्वांची हे माळा । मुक्ताचे गळां पडेना ॥२२॥
उन्हाळा कांहीं आगीला भाजीत नाही. थंडी काही हिमालयाला बाधत नाहीं; त्याप्रमाणे द्वंद्वांची ही माळ मुक्तांच्या गळ्यांत पडत नाही २२.

सुवर्णाचे अलंकार भले । सुवर्णपेटीमाजी झांकिले ।
झांकिले म्हणतां उघडे ठेले । तेवीं द्वंद्वें सकळ परब्रह्म ॥२३॥
सुवर्णाचे सुंदर अलंकार सुवर्णाच्याच पेटींत झांकून ठेवले तर झांकलेले आहेत म्हटले तरी ते उघडे ठेवल्याप्रमाणेच होत. त्याप्रमाणे सारी द्वंद्वेही स्याला परब्रह्मस्वरूपच असतात २३.

अंगीं जें जें आदळें । तें अंगचि होय तत्काळें ।
कांहीं नुरे त्यावेगळें । द्वंद्वे सकळें निमालीं ॥२४॥
त्याच्या अंगाला जें जें येऊन लागतें तें तें तत्काळ त्याचे अंगच होऊन जात असते, वेगळे काही उरतच नाही. अर्थात् सारी द्वंद्वे मोडून जातात २४.

त्यासी हातीं लीलाकमळ सांपडे । तंव कमळीं कमळत्वचि उडे ।
कमळजन्मा तोही बुडे । करी रोकडे निजरूप ॥२५॥
हातांत एखादें लीलाकमल सापडले तर त्या कमळांतला कमलपणाच नाहीसा होतो. त्यांत कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव सुद्धा बुडून जातो व परब्रह्मरूप होतो २५,

स्पर्श-स्पर्शतें-स्पर्शावें । हेही त्रिपुटी न संभवे ।
किंबहुना आपणचि आघवें । निजस्वभावें होऊनि ठेला ॥२६॥
स्पर्श, स्पर्श करणारे, आणि स्पर्शाचा विषय, अशी ही त्रिपुटीही राहात नाही. किंबहुना तो स्वभावतः सारे आपणच होऊन राहतो २६.

तो देवपूजा हातीं धरी । तरी मीचि ते देवपूजेभीतरीं ।
अथवा खेळों रिघाल्या पाथरीं । त्याहीमाझारीं मी त्यासी ॥२७॥
त्याने पूजेला देव हातात घेतला तरी त्या देवपूजेमध्ये मीच गाहें असें त्यास वाटते; किंवा तो दगडांनी खेळू लागला -तरी त्यांतही त्याला मीच आहे असे भासतें २७

भिंती नानावर्ण चित्राकृती । तेथें जें जें स्पर्शे तें तें भिंती ।
तेवीं मुक्ताची स्पर्शनस्थिती । पूर्ण अद्वैतीं निजबोधु ॥२८॥
भिंतीवर निरनिराळ्या रंगांची चित्रे काढलेली असतात. तरी त्याच्यावर जेथे जेथे हात लावावा तेथे तेथे भिंतच; त्याप्रमाणे मुक्तांचे स्पर्श करणे पूर्ण अद्वैतरूपी आत्मज्ञानात्मकच असते २८.

यापरीं गा तत्त्वतां । स्पर्शलक्षण वर्ते मुक्ता ।
त्याचें ‘बोलणें’ जें सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥
याप्रमाणे खरोखर मुक्तांचे स्पर्शलक्षण वर्तत असतें. आतां त्यांचे बोलणे कसे असते तेंही सांगतों ऐक २९.

सुरस कथा सांगे वाडेंकोडें । अथवा लौकिक बोलणें घडे ।
परी त्याची समाधिमुद्रा न खंडे । मौन न मोडे बोलतां ॥३३०॥
तो मोठ्या प्रेमाने एखादी सुरस कथा सांगू लागला, अथवा लौकिक काही बोलू लागला, तर त्याच्या समाधिमुद्रेमध्ये अंतर पडत नाही; तो बोलत असतांही त्याचे मौन मोडत नाही ३३०.

बोलतांही न मोडे मौन । हेचि अनुभवाची आंतुली खूण ।
शब्दामाजीं निःशब्दगुण । सज्ञान जाण जाणती ॥३१॥
बोलतांनासुद्धा मौन न मोडणे हीच अनुभवांतील अंतस्थ खूण आहे. शब्दामधील निःशब्दगुण ज्ञात्यालाच कळत असतो ३१.

स्त्रीपुरुषें अबोला चालती । तो अबोला कीं अतिप्रीती ।
तेवीं मुक्ताची बोलती स्थिति । शब्द शब्दार्थी निःशब्द ॥३२॥
नवरा बायको घरांत लोकांसमोर न बोलतांच वागत असतात. तो त्यांचा खरोखर अबोला असतो, की अत्यंत प्रेम असते ? त्याचप्रमाणे मुक्ताच्या बोलण्याची स्थिति असते. शब्दार्थामध्ये शब्द निःशब्द होतात ३२.

जयाचीं बोलतीं अक्षरें । अक्षररूपेंचि साचारें ।
त्याचीं ऐकतां उत्तरें । चमत्कारें मन निवे ॥३३॥
तो जी अक्षरें तोंडांतून काढतो, ती खरोखर अक्षररूपच असतात. त्याची वाणी ऐकतांच मन आश्चर्याने थक्क होऊन जातें ३३.

मी एकु चतुर बोलका । हाही नाहीं आवांका ।
अथवा रंजवावें लोका । हेंही देखा स्मरेना ॥३४॥
मी एक चतुर बोलका आहे, असा अभिमानही त्याला नसतो, किंवा आपण लोकांचे मनोरंजन करावें ह्याचीही त्याला आठवण नसते ३४.

निःशब्दीं उठती शब्द । शब्दामाजीं ते निःशब्द ।
यापरी करितांही अनुवाद । बोलोनि शुद्ध अबोलणा ॥३५॥
निःशब्दांतून शब्द निघत असतात ; त्या शब्दांमध्येही निःशब्दस्वरूपच असते. अशा प्रकारे त्याचे बोलणे होत असल्यामुळे तो बोलत असूनही खरोखर मौनी असतो ३५.

जळामाजीं उपजे तरंग । जळ तरंगाचें निजांग ।
तेवीं निःशब्दीं शब्द साङ्ग । शब्दाचें सर्वांग निःशब्द ॥३६॥
पाण्यामध्ये लाटा उत्पन्न झाल्या तरी पाणी हेच त्या लाटांचे अंग म्ह. स्वरूप असते. त्याप्रमाणे सारे शब्द निःशब्दांतूनच असल्यामुळे शब्दांचे सारे अंग निःशब्दच असते ३६.

वाच्य-वाचा-वाचकता त्रिपुटी । लोपूनि सांगे गोड गोठी ।
करितां सैराट चावटी । न सुटे मिठी मौनाची ॥३७॥
वाच्य, वाचा आणि वाचकता ही त्रिपुटी सोडून देऊनच तो गोड गोष्टी करीत असतो. किंवा त्याने अद्वातद्वा बडबड केली तरी सुद्धा त्याच्या मौनाची मिठी सुटत नाही ३७.

म्यां सत्यचि बोलावें । हेंही त्यासी जीवें नाठवे ।
मिथ्या बोलों लोभस्वभावें । हेंही न संभवे मुक्तासी ॥३८॥
अहो ! आपण खरेच बोलावें, ह्याचीसुद्धा त्याला आठवण नसते; किंवा लोभाविष्ट होउन खोटे बोलावें असेंही मुक्काला वाटत नाही ३८.

सत्य मिथ्या जीं बोलणीं । निःशेष प्राशूनि नेलीं दोनी ।
मूळींच्या मौनें जाहला मौनी । नाना वचनीं बोलतां ॥३९॥
सत्य किंवा मिथ्या बोलणी ही दोन्ही त्याने चटसारी पिउन टाकलेली असतात. म्हणून निरनिराळे भाषण केले तरी तो मूळच्या मौनामें मौनीच राहिलेला असतो ३९.

तेथ सैराट हाक देतां । कां सिंहनादें गर्जतां ।
शब्दीं ठसावली निःशब्दता । मौन सर्वथा मोडेना ॥३४०॥
त्याने जोराने हांक फोडली, किंवा सिंहासारखी गर्जना केली, तरी शब्दांमध्ये निःशब्दताच ठसलेली असल्यामुळे, त्याचे मौन म्हणून मोडतच नाही ३४०.

जरी तो माझें स्तवन करी । तरी मी त्याच्या स्तवना माझारीं ।
तो जरी सैरा बडबड करी । त्याही माझारीं मी त्यासी ॥४१॥
तो जर माझें स्तवन करूं लागला, तर त्याच्या त्या स्तवनामध्येही मीच असतो; किंवा तो अवाच्यासवा बडबड करूं लागला, तरी तिच्यामध्येही त्याला मीच दिसतों ३४१.

जरी त्यासी येऊनि भांडण पडे । तरी भांडणही करणें घडे ।
त्या कळहामाजीं मागेंपुढें । चहूंकडे मज देखे ॥४२॥
त्याच्यावर भांडण करण्याचा प्रसंग येऊन पडला, तर तो भांडणही करतो; पण त्या कलहामध्ये सुद्धा मार्गेपुढे चहूंकडे त्याला मीच दिसत असतो ४२.

त्याचे वांकुडे तिकुडे व्यंग बोल । ते जाण ब्रह्मचि केवळ ।
तया आम्हां अभिन्न मेळ । निजात्मसाल वस्तीसी ॥४३॥
त्याचे वेडेवांकडे किंवा व्यंग भाषणही शुद्ध परब्रह्मच असते. त्याच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदच नसल्यामुळे तो व. आम्ही नेहमी एकाच ठिकाणी वस्तीला असतो ४३.

अवचटें ये त्याच्या मुखाबाहेरीं । ज्यासी म्हणे ‘तुज देवो तारी’ ।
त्यासी मी वाउनियां शिरीं । ब्रह्मसाक्षात्कारीं पाववीं ॥४४॥
‘तुला देव तारील’ असे जर अकस्मात् त्याने एखाद्याला म्हटले, तर त्याला मी आपल्या मस्तकावरून वाहून ब्रह्मसाक्षात्कारांत पोचवितों ४४.

यालागीं त्याच्या वचनाऽधीन । मी सर्वथा असें जाण ।
त्याचें वचन तें प्रमाण । सर्वस्वें जाण मी मानीं ॥४५॥
सासाठी मी सदा सर्वदा त्याच्या अगदी वचनांत असतो असे समज. त्याचे वचन मी सर्वकाळ सर्वस्वी प्रमाण मानतों ४५.

आतां ‘तो’ ‘मी’ हे ऐशी बोली । बाहेरसवडी वाढिन्नली ।
‘मी तोचि तो’ हे किली । मागीं चोजवली मद्‍भक्तां ॥४६॥
आतां ‘तो’ आणि ‘मी’ जसे जे बोलणें आहे तें बाह्यदृष्टीने बोलण्याचा प्रघात पडला आहे इतकेंच. बाकी मी तोच तो, ही गुरुकिल्ली माझ्या भक्तांना पक्की कळलेली आहे ४६.

यालागीं तो माझा जीवप्राण । मी त्याचें निजजीवन ।
तयासीं मज भिन्नपण । कल्पांतीं जाण असेना ॥४७॥
ह्यासाठी तो माझा जीव की प्राण आहे. आणि मीही त्याचे आत्मजीवन आहे. त्याला आणि मला कल्पांती भिन्नपणा नाही हे लक्षात ठेव ४७.

एवं तो सगळा मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरीं ।
ऐसेनि अभिन्नपणेंकरीं । सुखें संसारीं नांदतु ॥४८॥
तात्पर्य, तो सारा माझ्यामध्ये असतो, आणि त्याच्या आंत व बाहेर मी असतो. अशा अभिन्नपणाने संसारांत तो सुखाने नांदत असतो ४८.

त्याचे मुखींचे जे जे बोल । ते मीचि बोलता सकळ ।
मुक्ताचें बोलणें केवळ । तुजप्रती विवळ म्यां केलें ॥४९॥
त्याच्या तोंडांतील जे शब्द असतात, ते मीच बोलत असतो. हे मुक्तांचे बोलणे तुला मी विशद करून सांगितले ४९.

‘हातीं’ कांही घेवों जाये । तंव घेणें देवोचि होये ।
देतां कांहीं देवो पाहे । तेंही होये तद्‌रूप ॥३५०॥
(आतां त्याच्या हाताची क्रिया सांगतों)-तो काही हातांत घ्यावयास गेला, तर ते घेणेच देव होतो. किंवा काही वस्तु देऊ लागला तर ती वस्तुही तद्‌रूप होते ३५०.

तेव्हां दान आणि देते-घेते । भिन्नपणें न देखे तेथें ।
यालागीं करोनियां अकर्ते । यापरी करांतें वर्तवी ॥५१॥
तेव्हां दान, आणि ते देणारा न घेणारा ही तिन्हीही तो भिन्नपणाने पहात नाही. अशा प्रकारे करूनही अकतेपणाने हातांना वागवितो ५१.

निजस्वभावें ते कर । जो कांहीं करिती व्यापार ।
तेथ नकेलेपणाचें सूत्र । सहजीं साचार ठसावे ॥५२॥
त्याचे हात आपल्या स्वभावानुसार जी जी काही क्रिया करतात, तेथें नकेलेपणाचे सूत्र सहजच ठसते ५२.

करीं पडलिया शस्त्र । करूं जाणे तो व्यापार ।
परी ‘मी कर्ता’ हा अहंकार । अणुमात्र असेना ॥५३॥
त्याच्या हातांत शस्त्र पडले, तरी त्याचा उपयोग करणे त्याला माहीत असते; पण ‘मी कर्ता’ असा अहंकार अणुमात्रही त्याच्या मनात वागत नाही ५३.

पुढें वोढवलें अवचितें । तरी खेळों जाणे द्यूतकर्मातें ।
हारी जैत नाठवे चित्तें । निजस्वभावें तें खेळतु ॥५४॥
किंवा अकस्मात् प्रसंग पडला तर त्याला द्यूतसुद्धा खेळतां येते; पण त्यांत हरणे किंवा जिंकणे हे त्याच्या मनाला स्मरतसुद्धा नाही. केवळ स्वभावानुसार खेळत असतो इतकेंच ५४.

वोडवल्या ब्राह्मणपूजा । करूं जाणे अतिवोजा ।
पूज्यपूजकत्वें भावो दुजा । न मनूनि द्विजां पूजितु ॥५५॥
किंवा ब्राह्मणाची पूजा करण्याचा प्रसंग आला, तर तीही भक्तिभावाने करावयाचे त्याला माहीत असते; परंतु पूज्य आणि पूज्यकत्व या भिन्न भावना मनांत न आणतांच तो ब्राह्मणाची पूजा करतो ५५.

धनुषीं काढूं जाणे वोढी । अनुसंधानें बाण सोडी ।
अलक्ष्य लक्षूनि भेदी निरवडी । परी न धरी गोडी श्लाघेची ॥५६॥
त्याला धनुष्याची दोरी ओढून बाणही सोडतां येतो; तो नेम धरून लक्ष्याचाही भेद करतो; परंतु त्यापासून आपली कीर्ति वाढावी अशी इच्छा करीत नाही ५६.

कैसें कर्म निपजे करीं । जैशा समुद्रामाजीं लहरी ।
तैसा निजस्वरूपामाझारीं । नाना व्यापारीं निश्चळु ॥५७॥
त्याच्या हातांतून कर्म कसें निपजतें ? तर समुद्रामध्ये जशा लाटा सहज उठतात, त्याप्रमाणे त्याच्या हातून अनेक प्रकारची कर्मे होतात. तथापि तो निजस्वरूपांत निश्चळच असतो ५७.

सूर्य मृगजळातें भरी । तैसा व्यापारु निजनिर्विकारीं ।
परी केलेंपण शरीरीं । तिळभरी असेना ॥५८॥
सूर्य जसा मृगजळ भरतो, त्याप्रमाणे तोही निर्विकारामध्येच व्यापार करीत असतो; पण ते केल्याचा तिळभरही अभिमान धरीत नाही ५८.

सूर्यकांतीं अग्नि खवळे । तें कर्म म्हणती सूर्यें केलें ।
तैसें हस्तव्यापारें जें जें जाहलें । नाहीं केलें तें त्याणें ॥५९॥
सूर्यकांतापासून अग्नि उत्पन्न होतो, तें कार्य सूर्याने केलें असें म्हणतात. त्याप्रमाणे त्याच्या हस्ताने जे जे व्यापार घडतात, ते ते त्याने केलेले नसतात ५९,

सूर्यकांतीं पाडावा अग्नी । हें नाहीं सूर्याचे मनीं ।
तेवीं मुक्त निरभिमानी । क्रियाकरणीं विचरतु ॥३६०॥
सूर्यकांतांतून अग्नि पाडावा, हे सूर्याच्या ध्यानीमनीही नसते; त्याप्रमाणे मुक्तही सर्व क्रिया करण्यामध्ये निरभिमानच असतो ३६०.

त्यासी चालवूं जातां ‘पायें’ । तळीं पृथ्वी नाहीं होये ।
आपण आपणियावरी पाहे । चालतु जाये स्वानंदें ॥६१॥
(आतां पायाची क्रिया सांगतात ) त्याला पाय चालवू लागले असतां पायाखाली जमीन (जमीनपणाने) नाहीशी होते. तो आपण आपल्यावरच स्वानंदाने चालत जात असतो ६१.

जळींचा जळावरी तरंग । अभिन्नपणें चाले चांग ।
तैसा तो निजरूपीं साङ्ग । चालवी अंग चिद्‌रूपें ॥६२॥
पाण्यातल्या लाटा पाण्यावर अभिन्नपणाने चालत असतात; त्याप्रमाणे तो आत्मस्वरूपामध्ये चित्स्वरूपानेच आपले अंग चालवीत असतो ६२.

तयासी असतांही चरण । आवडीं चाले चरणेंविण ।
करी सर्वांगें गमन । सर्वत्र जाण झालासे ॥६३॥
त्याला पाय असून तो आवडीने पायांशिवाय चालतो; तो सर्वांगाने चालत असतो, कारण तो सर्वव्यापकच झालेला असतो ६३;

जेवीं अखंडदंडायमान । पायेंवीण चाले जीवन ।
तेवीं चरणेंवीण गमन । नित्य सावधान मुक्ताचें ॥६४॥
ज्याप्रमाणे पाणी अखंडदंडायमान असून पायांवाचून चालत असते, त्याप्रमाणे नित्य सावधान असणाऱ्या मुक्ताचेही पायांशिवायच चालणे असते ६४.

सर्वथा पायेंविण । वायूचें सर्वत्र गमन ।
तैसेंच मुक्ताचें लक्षण । स्वरूपीं जाण सर्वत्र ॥६५॥
अगदी पायांशिवायच वायु जसा सर्वत्र गमन करतो, त्याप्रमाणेच आत्मस्वरूपांत संचार करणे हे मुक्ताचे लक्षण होय ६५.

यापरी न हालतां जाण । त्याचें सर्वत्र ‘गमन’ ।
नाठवे चालतेंपण । ऐसेंच लक्षण मुक्ताचें ॥६६॥
ह्याप्रमाणे न हालतांच त्याचे सर्वत्र ठिकाणी ‘गमन’ असते. चालतेपणाची आठवणच त्याला असत नाही. असेंच मुक्ताचे लक्षण असते ६६.

मूळीं आत्मा आत्मी नाहीं जाणा । यालागीं स्त्रीपुरुषभावना ।
त्यासी सर्वथा आठवेना । दैवें ‘अंगना’ तो भोगी ॥६७॥
आतां मुक्ताचा स्त्रीभोग सांगतात)मूळामध्ये ‘आत्मा’ आणि ‘ आत्मी’ अशी काही दोन नाहींत ह्याकरितां त्याला स्त्री-पुरुष भावना आठवतच नाही. प्रारब्धाच्या योगें तो स्त्रीचा उपभोग घेतो ६७.

नटु नाटकु अवगमला । पुरुष स्त्रीवेषें दिसों आला ।
स्त्रीपुरुषभावो संपादिला । तेवीं हा जाहला गृहस्थु ॥६८॥
नट नाटक शिकला म्हणजे तो पुरुष असूनही स्त्रीचा वेष घेऊन स्त्री दिसू लागतो. तेव्हां स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भाव त्याच्यापाशी असतात. त्याप्रमाणेच हा गृहस्थाश्रमी झालेला असतो ६८.

कां अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।
मुक्तासी जाण तैशापरी । स्त्रीपुरुषाकारीं निजबोधु ॥६९॥
किंवा अर्धनारी-नटेश्वरामध्ये जो पुरुष तोच स्त्री असतो. त्याचप्रमाणे मुक्तालाही स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या आकारांत आत्मभावनाच असते ६९.

जेवीं कां आपुली साउली । आवडीं आपण आलिंगिली ।
तेवीं मुक्तें स्त्री भोगिली । द्वैताची भुली सांडोनी ॥३७०॥
आपली सावली आपणच आलिंगावी, त्याप्रमाणे द्वैताची कल्पना सोडून तो स्त्रीचा उपभोग घेतो ३७०.

छाया कोठें असे कोठें वसे । सरशी असतां ज्याची तो न पुसे ।
मुक्तासी जाण तैसें । लोलुप्य नसे स्त्रियेचें ॥७१॥
छाया अगदी जवळ असतांही ती कोठे असते व राहते ह्याची चौकशी ज्याची तो करीत नाही. त्याप्रमाणेच मुक्तांनाही स्त्रियेची आसक्ति असत नाहीं ७१.

एवं स्त्रीपुरुषविकारप्राप्ती । त्याची न मोडे आत्मस्थिती ।
दैवें जाहलिया संतती । आत्मप्रतीति तेथेंही ॥७२॥
अशा प्रकारे स्त्रीपुरुषांचे विकार उत्पन्न झाले तरी त्याची आत्मस्थिति मोडत नाही; आणि दैवयोगाने त्याला संतति झाली तरी तिच्या ठिकाणीही त्याला आत्मप्रतीतिच असते ७२.

‘आत्मा वै पुत्रनामासि’ । सत्यत्व आलें ये श्रुतीसी ।
पुत्रत्वें देखे आपणासी । निजरूपेंसीं सर्वदा ॥७३॥
ह्यामुळे ‘आत्मा वै पुत्र नामासि’ ह्या श्रुतीला येथे सत्यत्व येते. कारण, तो सर्वकाळ पुत्रांनाही आत्मभावनेनेच पाहतो. ७३.

स्वयें जनकु जननी । स्वयें क्रिडे पुत्रपणीं ।
आपणावांचूनि जनींवनीं । आणिक कोणी देखेना ॥७४॥
तो आपणच माता असतो व आपणच पिता असतो. आणि पुत्ररूपाने आपणच क्रीडा करतो. त्याला जनांत किंवा वनांत आपल्यावांचून दुसरे कोणीच दिसत नाहीं ७४.

एवं स्त्रीपुत्रसंतती । जेवीं आकाशी मेघपंक्ती ।
काळें येती काळें जाती । तैशी स्थिती मुक्ताची ॥७५॥
मिळून स्त्री पुत्र संतति ही मुक्तांना आकाशांतील ढगांप्रमाणे वाटतात. ती यथाकाली येतात आणि जातात ७५.

स्त्रीसंभोगीं जें होय सुख । तें सुख मुक्तासी सदा देख ।
यालागी स्त्रीकाम‍अभिलाख । नाही विशेख मुक्तासी ॥७६॥
स्त्रीसंभोगापान जें सुख प्राप्त होते, ते सुख मुक्तांना सदासर्वकाल असते. त्यामुळे मुक्ताला स्त्रीकामाचा विशेषसा अभिलाष नसतो ७६.

जैसे राजहंसापाशीं शेण । तैसें मुक्तापाशीं जाण ‘धन’ ।
त्यावरी त्याचें नाहीं मन । उदासीन सर्वदा ॥७७॥
(आतां धनाच्या दृष्टीविषयी सांगतात )-राजहंसाला जसें शेण, तसे मुक्ताला धन वाटते. त्याचे मन त्यावर कधीच नसते. तो सदासर्वदा उदासीनच असतो ०७.

व्याघ्रासी वाढिलें मिष्टान्न । तें त्यासी जैसें नावडे जाण ।
तैसें मुक्तासी नावडे धन । धनलोभीपण त्या नाहीं ॥७८॥
वाघाला मिष्टान्न वाढले, तर ते जसें त्याला आवडत नाही, त्याप्रमाणे मुक्कालाही धन आवडत नाही. कारण त्याला धनाचा लोभच नसतो ७८.

पोतास कापुराचा डला । जेवीं नातळे काउळा ।
तेवीं अनर्घ्यरत्‍नमाळा । मुक्तें सांडिल्या थुंकोनि ॥७९॥
कावळा चरत असतां त्याला कापराचा डल्ला (ढीग) पडलेला दिसला, तरी त्याला तो जसा शिवत नाही, त्याप्रमाणे अमूल्य रत्नमालाही मुक्काने धुंकून टाकलेल्या असतात ७९.

ज्यासी धनलोभाची आस्था । त्यासी कल्पांतीं न घडे मुक्तता ।
तैसें स्त्रीकामिया सर्वथा । नव्हे परमार्थता निजबोधु ॥३८०॥
ज्याला धनलोभाची आस्था असते, त्याला कल्पांतीसुद्धा मुक्तता घडत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीची वासना असते त्यालाही कधी परमार्थांची किंवा आत्मज्ञानाची प्राप्ति होत नाही ३८०.

मुक्ताचिये निद्रेपाशीं । समाधि ये विश्रांतीसी ।
शिणली धांवे माहेरा जैशी । तैसी विसाव्यासी येतसे ॥८१॥
(आतां निंदेविषयी सांगतात) सासरी दगदगलेली मुलगी विसाव्याकरितां जशी माहेरास येते, त्याप्रमाणे मुक्ताच्या निदेपाशी समाधिही विश्रांतीला येत असते ८१.

जागृतिस्वप्नसुषुप्तीसी । नातळोनि तींही अवस्थांसी ।
निजीं निजे निजत्वेंसीं । अहर्निशीं निजरूपें ॥८२॥
जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थांना स्पर्श न करता तो रात्रंदिवस आत्मस्वरूपानें स्थित होऊन आत्म्यामध्येच निजलेला असतो ८२.

निजीं निजों जातां निर्धारा । तळीं हरपली धरा ।
वरी ठावो नाहीं अंबरा । ऐशिया सेजारामाजीं निजे ॥८३॥
अशा रीतीनें तो आत्मस्वरूपांत निजला असतां खाली जमीन नाही, आणि वर आकाश नाही, अशा शय्येवर तो शयन करतो ८३.

नवल निजती त्याची वोज । चालतां बोलतां न मोडे नीज ।
खातां जेवितां अखंड नीज । सहजीं सहज निजरूप ॥८४॥
त्याच्या निद्रेचा मोठा चमत्कार आहे. तो हा की, चालतांबोलतांनासुद्धा त्याच्या निजेचा मोड होत नाही ! खातांजेवतांनाही तो अखंड निर्जेत असतो. सारांश, तो सहजपणे निजरूपच होऊन राहातो ८४.

निजवितें कां उठवितें । दोनी तोचि आहे तेथें ।
कोण कोणा जागवितें । निजे सुचित्तें निजरूपें ॥८५॥
निजविणारा व उठविणारा दोन्ही तोच असतो. तेथे जागविणार तरी कोण कोणाला ? तो स्वस्थचित्ताने निजरूपांत निजलेला असतो ८५.

जागतां निजेशीं वागे । वागतांही नीज लागे ।
एवं नीजरूप जाहला अंगें । निद्रेचेनि पागें पांगेना ॥८६॥
तो जागा असला तरी निजेंत असतो; आणि निजेंत असला तरी जागा असतो. असा स्वयंभूच निजरूप बनून गेल्यामुळे तो निद्रेचा पांगला होऊन राहात नाही ८६.

शय्या-शयन सेजार । अवघे तोचि असे साचार ।
आपुल्या निजाचें आपण घर । नित्य निरंतर निजीं निजे ॥८७॥
शय्या, शयन आणि शयनमंदिर सारें वस्तुतः तोच असतो. तो आपल्या स्वरूपाचे स्वतःच घर असल्यामुळे निरंतर निजरूपांतच निजून राहातो ८७.

ऐसें जें जें करूं जाय कर्म । तेथ तेथ प्रकटे परब्रह्म ।
मुक्तासी एकुही नाहीं नेम । हें मुख्य वर्म मुक्ताचें ॥८८॥
अशा रीतीने तो जै जै कर्म करावयास जातो, तेथें तेथें परब्रह्मच प्रगट होतें. मुक्ताला नेम असा एकही नाही. मुक्ताचे मुख्य वर्म ते हेच ८८.

मुक्तासी नेमबंधन । तैं अंगीं लागलें साधन ।
साधन असतां मुक्तपण । न घडे जाण सर्वथा ॥८९॥
मुक्ताला जर नेमाचे बंधन लागेल, तर मग त्याच्या अंगाला साधनही चिकटेल आणि साधन आले की मग मुक्तपण कधीच घडणार नाही ८९.

मुक्तासी तंव आसक्ती । सर्वदा नाहीं सर्वार्थी ।
शेष प्रारब्धाचे स्थितीं । कर्में निफजतीं निरपेक्ष ॥३९०॥
मुक्ताला आसक्ति तर कशाचीच कधी असत नाही, त्याच्या हातून शेष प्रारब्धाप्रमाणे निरपेक्ष कमैं होत असतात ३९०.

ज्याचा निमाला अहंकारु । तो माझें स्वरूप साचारु ।
ये अर्थी न लगे विचारु । वेदशास्त्र-संमत ॥९१॥
ज्याचा अहंकार नाहीसा झाला, तो खरोखर माझेच स्वरूप आहे. ह्याबद्दल विचार करण्याचे कारणच नाही. कारण तें वेदशास्त्रांनाही संमत आहे ९१.

जो नित्यमुक्त निर्विकारी । तो वर्ततां वर्ते मजमाझारीं ।
मी तया आंतुबाहेरीं । जेवीं सागरीं कल्लोळ ॥९२॥
जो नित्यमुक्त आणि निर्विकार असतो, तो व्यवहारांत वागतांना माझ्यामध्येच वागत असतो. लाटांच्या आंत बाहेर जसा समुद्र असतो, तसा त्याच्या आंत बाहेर मीच असतों ९२.

यापरी झाला जो परब्रह्म । त्यासी स्वप्नप्राय धर्माधर्म ।
बाधूं न शके इंद्रियकर्म । हें त्याचें वर्म तो जाणे ॥९३॥याप्रमाणे जो परब्रह्मस्वरूप होऊन राहातो, त्याला धर्माधर्म हे स्वप्नप्राय होत. इंद्रियांचे कर्मही त्याला बाधक होऊ शकत नाही, वर्म त्याचे तोच जाणे ! ९३.

न तथा बध्यते विद्वान् तत्र तत्रादयन् गुणान् ।
प्रकृतिस्थोऽप्यसंसक्तो यथा खं सवितानिलः ॥ १२ ॥[श्लोक १२] असे समजून प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्यापासून एकदम अलिप्त असतो त्यामुळे त्या कर्मांनी बद्ध होत नाही जसे आकाश, सूर्य आणि वायू कोणाचेही गुणदोष ग्रहण करीत नाहीत की कोठे लिप्त होत नाहीत. (१२)

जिंहीं इंद्रियीं कर्म करितां । मूर्खासी झाली दृढबद्धता ।
तिंहीं इंद्रियीं वर्ततां ज्ञाता । नित्यमुक्तता अनिवार ॥९४॥
ज्या इंद्रियांनी कर्म केले असतां मूर्खाला दृढ बंधन प्राप्त होते, त्याच इंद्रियांनी ज्ञाता कर्म करीत असता त्याला नित्यमुक्तता निश्रित असते ९४.

मूर्खासी कर्मीं अभिमान । ज्ञाता सर्व कर्मीं निरभिमान ।
बंधमोक्षाचें कारण । अहंकारु जाण जीवांसी ॥९५॥
मूर्खाला कर्माचा अभिमान असतो; आणि ज्ञाता सर्व कर्मात निरभिमान असतो. जीवांना बंधमोक्षाला कारण अहंकार आहे हे लक्षांत टेव ९५.

‘अहं कर्ता’ ‘अहं भोक्ता’ । हेचि मूर्खाची दृढबद्धता ।
तें प्रकृतिकर्म आपुले माथां । नेघे ज्ञाता अभिमानें ॥९६॥
मी वर्ता, मी भोक्ता हेच मूर्खाचे दृढबंधन होय. परंतु तें प्रकृतिकर्म ज्ञाता अभिमानाने आपल्या माथ्यावर घेत नाहीं ९६.

तेचि ज्ञात्याची निरभिमानता । तुज म्यां सांगितली आतां ।
इंद्रियां विषयो भोगवितां । आपुली अभोक्तृता तो जाणे ॥९७॥
तोच ज्ञात्यांचा निरभिमानपणा तुला मी आतां सांगितला. इन्द्रियांना विषयभोग भोगावयास देतांना आपला अभोक्तेपणा तो पूर्णपणे जाणत असतो ९७.

आपुली छाया विष्ठेवरी पडे । अथवा पालखीमाजीं चढे ।
तो भोगु आपणियां न घडे । तैसेंचि देह रोकडें मुक्तासी ॥९८॥
आपली छाया विष्ठेवर पडली किंवा पालखीत चढली, तरी त्याचे सुखदुःख आपल्याला काही घडत नाही. त्याप्रमाणे देहाचे सुखदुःख किंवा मानापमान मुक्काला बाधत नाहीं ९८.

मज होआवी विषयप्राप्ती । हेंही ज्ञाते न वांछिती ।
विषय मिथ्यात्वें देखती । जेवीं कां संपत्ती चित्रींची ॥९९॥
मला विषयसुख मिळावे, अशीही ज्ञाते इच्छा करीत नाहीत. चित्रांतील संपत्तीप्रमाणे विषय हे मिथ्याच आहेत असे ते समजतात ९९.

यालागीं असोनियां देहीं । तो नित्यमुक्त विदेही ।
त्यासी प्रकृतिगुणांच्या ठायीं । अभिमानु नाहीं सर्वथा ॥४००॥
म्हणून ज्याला प्रकृतीच्या गुणांमध्ये मुळीच अभिमान नाहीं, तो देहांत असूनही विदेही आणि नित्यमुक्तच असतो ४००.

म्हणसी ‘असोनियां देहीं । कोण्या हेतु तो विदेही’ ।
उद्धवा ऐसें कल्पिशी कांहीं । तो दृष्टांतु पाहीं सांगेन ॥१॥
उद्धवा ! देहांत असताही तो विदेही कसा ? अशी कल्पना मनांत येऊन हूं विचारशील तर त्याच्याविषयीही एक दृष्टांत सांगतों पहा १.

आकाश सर्वांमाजीं असे । सर्व पदार्थीं लागलें दिसे ।
परी एकेंही पदार्थदोषें । मलिन कैसें हों नेणे ॥२॥
आकाश हे सर्वांमध्ये असते, सर्व पदार्थांना लागलेले दिसते; पण एकाही पदार्थाच्या दोषाने ते मळीण म्हणून होत नाही २.

त्या गगनाचेपरी पाहीं । ज्ञाता असोनियां देहीं ।
देहकर्माच्या ठायीं । अलिप्त पाहीं सर्वदा ॥३॥
त्या आकाशाप्रमाणे ज्ञाता हा देहांत असूनही सदासर्वदा देहकर्माच्या ठिकाणी अलिप्स जसतो ३.

प्रचंड आणोनि पाषाणीं । आकाश न चेंपे चेंपणीं ।
तेवीं क्षोभलियाही प्रकृतिगुणीं । ज्ञाता जडपणीं न बंधवे ॥४॥
मोठा थोरला दगड आणून त्याने आकाश दडपू म्हटले तर जसे दडपत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीचे गुण क्षुब्ध झाले तरी तो जडपणाने बंध पावत नाहीं ४.

आकाश असोनियां जनीं । कदा रुळेना जनघसणीं ।
तैसा प्रकृतिकर्मी वर्तोनी । प्रकृतिगुणीं अलिप्त ॥५॥
आकाश लोकांमध्ये असतांही लोकांच्या घर्षणाने त्याला जसा घडा पडत नाही, त्याप्रमाणे तो प्रकृतीच्या कर्माने वागूनही प्रकृतीच्या गुणांपासून अलिप्त असतो ५.

गगन जळीं बुडालें दिसे । परी तें जळामाजीं कोरडें असे ।
तेवीं पुत्रकलत्रीं ज्ञाता वसे । तेणें दोषें अलिप्त ॥६॥
आकाश पाण्यामध्ये बुडालेले दिसते, पण ते पाण्यामध्ये कोरडेच असते. त्याप्रमाणे ज्ञाता हा बायकामुलांत राहूनही त्यांच्या दोषानें लिप्त होत नाही ६.

आकाशा मसी लावूं जातां । मसीं माखे तो लाविता ।
तेवीं मुक्तासी दोषी म्हणतां । दोष सर्वथा म्हणत्यासी ॥७॥
आकाशाला काळे लावावयाला गेले, तर ते लावणाऱ्यालाच लागते. त्याप्रमाणे मुक्काला दोषी म्हणावयास गेलें तर म्हणणारालाच खरोखर दोष लागतो ७.

शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लागती अंबरा ।
तेवीं नाना द्वंद्वसंभारा । मुक्ताचा उभारा निर्द्वंद्व ॥८॥
थंडी, उन्ह किंवा पावसाच्या धारा जशा आकाशाच्या अंगाला लागत नाहीत, त्याप्रमाणे द्वद्वांच्या अनेक समुदायांतही मुक्त हा निवृत्तीनंच उभाच्या उभा असतो ८.

येऊनि नाना मेघपटळें । गडगर्जनें गगन झांकोळे ।
त्यामाजीं असोनियाँ वेगळें । गगन नातळे मेघातें ॥९॥
अनेक प्रकारची मेघपटले येऊन गडगर्जना करीत आकाशाला अगदी झांकून टाकतात; पण आकाश त्यामध्ये असूनही वेगळे असते. तें या मेघांना शिवतही नाही ९.

तेवीं मोहममतेच्या कडाडी । मुक्तासी करिती ताडातोडी ।
ते तंव त्यास न लगे वोढी । परापर थडी अलिप्तु ॥४१०॥
त्याप्रमाणे मोहममतेचे घाले येऊन मुक्ताला भंडावून सोडूं पाहातात; पण त्याला त्यांपैकी कशाचीच बाधा होत नाही. तो दोहीं थडीला अलिप्तच असतो ४१०.

गगनासी आगी लावूं जातां । अग्नि विझोनि जाय सर्वथा ।
तेवीं त्रिगुणीं मुक्तासी बांधतां । गुणीं सगुणता निमाली ॥११॥
आकाशाला आग लावायला गेले तर अग्नि मात्र विझून जातो; त्याप्रमाणे तीन गुण मुक्काला बांधावयाला गेले तर गुणांचा गुणपणाच मोडून जातो ११.

प्रळयवायूचेनि झडाडें । आकाश निजस्वभावें नुडे ।
सगळा वायु गगनीं बुडे । पाहतां नातुडे गगनींही ॥१२॥
प्रळयवायूच्या तडाक्याने आकाश कधी उडून जात नाहीं, सारा वायुच आकाशामध्ये बुडून जातो. पाहावयास गेले तर तो गगनांतही सांपडत नाही १२.

तेवीं अविद्या निजस्वभावतां । मुक्तासी न करवेचि बद्धता ।
‘अविद्या’ नांवें मिथ्या वार्ता । मुक्त तत्त्वतां देखेना ॥१३॥
त्याप्रमाणे अविद्येलाही आपल्या स्वभावधर्माप्रमाणे मुक्काला बद्ध करता येत नाही. ‘अविद्या’ या नावावरूनच ती मिथ्यास्वरूप असल्याचे स्पष्ट होते. मुक्ताला ती दिसतच नाही १३.

गगनाच्या ऐशी अलिप्तता । सर्व कर्मीं वर्ते ज्ञाता ।
जनीं अलिप्त वर्ते सविता । तेवीं मुक्तता अवधारीं । ।१४॥
आकाशाप्रमाणेच सर्व कमांत अलिप्तपणाने राहातो तोच खरा :ज्ञाता. लोकांमध्ये सूर्य जसा अलिप्तपणाने वागतो, त्याप्रमाणे मुक्ताची स्थिति असते हें लक्षात ठेव १४.

घृतमद्यजळां आंतौता । बिंबोनि अलिप्त सविता ।
तेवीं बाल्य-तारुण्य-वृद्धता । वयसा चाळितां अलिप्त ॥१५॥
तूप, मद्य व पाणी ह्यांच्या आंत प्रतिबिंबित होऊनही सूर्य त्यापासून अलिप्त असतो; त्याप्रमाणे बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या अवस्था चाळून पाहातां मुक्त त्यांच्यापासून अलिप्सच असतो १५.

नातरी सूर्याचेनि प्रकाशें । शुभाशुभ कर्म वाढलें असे ।
सविता अलिप्त तेणें दोषें । निजप्रकाशें प्रकाशकु ॥१६॥
किंवा सूर्याच्या प्रकाशाने शुभ किंवा अशुभ कर्म होत असते, पण सूर्य हा त्या दोषांपासून अलिप्त राहून तो आपल्या स्वयंप्रकाशाने प्रकाशितच असतो १६.

तेवीं आश्रमधर्मीं असतां । नित्यादि कर्में आचरितां ।
मुक्तासी नाहीं कर्मबद्धता । अकर्तात्मता निजबोधें ॥१७॥
त्याप्रमाणे आश्रमधर्मात असून नित्य नैमित्तिक कमैं आचरीत असतांही मुक्काला कर्मापासून बंधन घडत नाही आत्मज्ञानामुळे तो अकर्ताच असतो १७.

सूर्यकांतीं सविता । अग्नि उपजवूनि अकर्ता ।
तैसा निजतत्त्वाचा ज्ञाता । करोनि अकर्ता कर्मांचा ॥१८॥
सूर्यकांतामध्ये अग्नि उत्पन्न करून सूर्य हा अकर्ताच असतो, त्याचप्रमाणे आत्मतत्त्व जाणणारा कर्मे करून अकाच असतो १८.

जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो नाहीं वोला झाला ।
तैसा स्त्रीसंगें प्रजा व्याला । नाही मुकला ब्रह्मचर्या ॥१९॥
पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित होतो, पण तो काही त्यायोगें भिजत नाही. त्याप्रमाणे स्त्रीच्या संगतीने त्याला मुलेबाळे होतात, तरी त्याचे ग्रह्मचर्य भंग पावत नाही १९.

सवित्याचें अलिप्तपण । तें निरूपिलें निरूपण ।
आतां देहीं असोनि अलिप्तपण । तेंही लक्षण अवधारीं ॥४२०॥
एवढा वेळपर्यंत सूर्याचा अलिप्तपणा कसा असतो त्याचे निरूपण केले. आता देहांत राहून अलिप्तपणा कसा असतो त्याचेही लक्षण सांगतो ऐक ४२०.

जेवीं देहामाजीं असे प्राण । प्राणास्तव देहचलन ।
परी देहदोषा नातळे प्राण । अलिप्त जाण सुखदुःखां ॥२१॥
ज्याप्रमाणे देहांत प्राण असून त्या प्राणामुळेच देहाचे चलनवलन होत असते; पण देहाच्या दोषाला प्राण काही स्पर्श करीत नाही; तो सुखदुःखापासून अलिप्तच असतो २१.

तैसा मुक्त असोनि संसारी । संसारव्यवहार सर्व करी ।
परी संसारदोषु अंगावरी । तिळहीभरी लागेना ॥२२॥
त्याप्रमाणे मुक्त हा संसारांत राहून सर्व प्रपंचव्यवहार करतो, पण त्या संसाराचा दोष तिळभरसुद्धा त्याच्या अंगाला लागत नाही २२.

वायु सर्वांतें स्पर्शतु । परी स्पर्शदोषांसी अलिप्तु ।
तेवीं अहंममता नातळतु । मुक्त वर्ततु देहगेहीं ॥२३॥
वायु सर्वांना स्पर्श करतो, पण स्पर्शाचा दोष त्याला काही लागत नाही; त्याप्रमाणे मीपणाला न शिवता मुक हा देहगेहांमध्ये वागत असतो २३.

वायूसी जेवीं सर्वत्र गमन । परी कोठेंही आसक्त नव्हे जाण ।
तेवीं विषयी नहोनि आपण । विषयसेवन मुक्ताचें ॥२४॥
वायु सर्व ठिकाणी जात असतो, पण तो कोठेच आसक्त होत नाही ; त्याप्रमाणे आपण विषयी न होतां मुक्काचे विषयसेवन घडत असते २४.

वायूसी एके ठायीं नाहीं वस्ती । मुक्तासी देहगेहीं नाहीं आसक्ती ।
वायूसी नभामाजीं विश्रांती । मुक्तासी गुणातीतीं विश्राम ॥२५॥
वायूची एके ठिकाणी वस्ती नसते, त्याप्रमाणे मुक्तालाही देहगेहांमध्ये आसक्ति नसते. वायु हा आकाशांत विश्रांति घेतो, आणि मुक्त हा निर्गुणाच्या ठिकाणी विश्रांति घेतो २५.

एवढें जें अगाधपण । तें मुक्ताचें मुक्तिकारण ।
उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । प्रथम जाण विवेकु ॥२६॥श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, एवढा जो अगाधपणा असतो, तोच मुक्ताच्या मुक्तीस कारणभूत होतो. ह्यांतही विवेक हाच मुख्य होय हे लक्षात ठेव २६.

वैशारद्येक्षयासङ्ग शितया छिन्नसंशयः ।
प्रतिबुद्ध इव स्वप्नान् नानात्वाद् विनिवर्तते ॥ १३ ॥[श्लोक १३] अशा प्रकारे वैराग्यरूपी तेजाने तीक्ष्ण झालेल्या दृष्टीने ज्याचे सगळे संशय नाहीसे होतात, तो ज्ञानी मनुष्य स्वप्नातून जागा झालेल्या माणसाप्रमाणे अनेकत्वाच्या भ्रमापासून दूर होतो. (सर्वत्र एकच परब्रह्म पाहातो). (१३)

विवेकें बुद्धि अतिसंपन्न । तिसी उपजे नित्यानित्यज्ञान ।
परी तें खिरंगटलें असे जाण । वैराग्येंवीण वाढेना ॥२७॥
विवेकानें बुद्धि अतिशय प्रगल्भ होते, तिला नित्य व अनित्य ह्यांचे ज्ञान होते; पण ते ज्ञान खुरटलेलें असते, वैराग्याशिवाय ते वाढीला लागत नाही हे लक्षात ठेव. २७.

विवेकेंवीण वैराग्य गहन । तें केवळ आंधळें जाण ।
नेणें आपुलें निजात्मपतन । अंधकूपीं जाण तें पडे ॥२८॥
पण वैराग्य केवढेही मोठे असले तरी विवेकाशिवाय तें आंधळंच आहे असे समज. त्याला आपलें अधःपतन कळत नाही. त्यामुळे तो अंधेऱ्या विहिरीत पडतो २८.

मातलें हातिरूं अंध । सैरा धांवे सुबद्ध ।
नेणें निजात्मपतनबाध । तेवीं वैराग्य मंद विवेकेंवीण ॥२९॥
आंधळा हत्ती माजला तर इकडे तिकडे धावत सुटतो. खड्डयांत पडून संकटांत सांपडेन हे त्याला कळत नाही, त्याप्रमाणे विवेकांवाचून वैराग्य लंगडे आहे २९.

जेथ विवेकवैराग्यसंयोग । तेथ नित्यसंग्रहो अनित्यत्याग ।
तेंचि ‘सद्विद्यालक्षण’ खड्ग । झळकत चांग नैराश्यें ॥४३०॥
जेथें विवेक आणि वैराग्य ही एक होतात, तेथेच नित्याचा संग्रह आणि अनित्याचा त्याग घडत असतो; तेंच सद्विद्यालक्षणरूप खड़ग होय. तें नैराश्याच्या तेजाने लखलखत असते १३०.

तेंचि गुरु वचनसहाणेसी । लावूनि अतितीक्ष्ण केलें त्यासी ।
घायें छेदिलें संशयासी । संकल्पविकल्पेंसीं समूळ ॥३१॥
तें तो गुरुवाक्यरूपी सहाणेवर धांसून तीक्ष्ण करतो आणि त्याच्या तडाक्याने संकल्पविकल्पासहवर्तमान संशयाला समूळ छेदून टाकतो ३१.

असंभावना विपरीतभावना । निःशेष तुटलिया वासना ।
निजस्वरूपीं तेव्हां जाणा । जागेपणा तो आला ॥३२॥
‘असंभावना’ म्हणजे सत्य वस्तु असत्य वाटणे आणि ‘विपरीतभावना’ म्ह. देहच आत्मा वाटणे, या सर्व भावना व वासना निखालस तुटून जातात, तेव्हांच आत्मस्वरूपामध्ये पुरुष जागा झाला असे समजावें ३२.

जो अविद्यालक्षण दीर्घ स्वप्न । नानात्वें भोगिता आपण ।
तो अद्वैतीं जागा झाला जाण । कृपा थापटून गुरुवचनें ॥३३॥
अविद्यारूप दीर्घस्वप्नामध्ये जो नानात्व अनुभवीत होता, तो गुरुवाक्याच्या कृपा-थापटण्याने अद्वैतामध्ये जागा होतो ३३.

तेव्हां नानात्वासीं नाहीं ठावो । ‘मी माझें’ हें झालें वावो ।
फिटला अविद्याभेद संदेहो । आत्मानुभवो तो भोगी ॥३४॥
तेव्हां नात्वाला म्ह. द्वैताला ठावच राहात नाही. मी आणि माझें हें व्यर्थ होऊन जाते आणि अविद्याकृत भेदाचा संशय फिटल्यामुळे तो आत्मानुभव भोगू लागतो ३४.

जागा झाल्या स्वप्न भासे । परी तें मिथ्या झालें अनायासें ।
मुक्तासी जग तैसें दिसे । यालागीं तेणें दोषें अलिप्त ॥३५॥
जागा झाल्यावर स्वप्नाची आठवण होते, पण ते सहजच खोटे वाटते. मुक्तालाही जग तसेच दिसत असते. त्यामुळे तो त्या दोषापासून अलिप्त असतो ३५.

एवं मुक्ताचें जें जें वर्तन । तें अलिप्तपणें ऐसें जाण ।
‘कथं वर्तेत’ हा प्रश्न । प्रसंगें लक्षण सांगितलें ॥३६॥
अशा प्रकारे मुक्ताचें जें जें वर्तन असतें तें असें अलिप्स असते हे लक्षात ठेव. ‘कथं वर्तते’ म्ह. तो कसा वागतो ? असा प्रश्न केला होता म्हणून प्रसंगानुसार हे लक्षण सांगितले ३६.

‘कथं विहरेत्’ या प्रश्नाचें । उत्तर ऐकावया साचें ।
उदित मन उद्धवाचें । जाणोनि जीवींचें हरि बोले ॥३७॥आता ‘कथं विहरेत् ‘ म्ह. तो विहार कसा करतो ? या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी उद्धवाचें मन खरोखर उतावीळ झाले आहे हे लक्षात आणून श्रीकृष्णांनी भगदी आपल्या जीवींची गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला ३७.

यस्य स्युर्वीतसङ्कल्पाः प्राणेन्द्रियर्ननोधियाम् ।
वृत्तयः स विनिर्मुक्तो देहस्थोऽपि हि तद्‍गुणैः ॥ १४ ॥[ श्लोक १४] ज्याचे प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वृत्तींचे संकल्प पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, तो देहामध्ये राहात असूनसुद्धा त्याच्या गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो. (१४)

विद्यमान देहीं असतां । देहस्थ गुण नातळती मुक्ता ।
पापपुण्यादि हे कथा । सुखदुःखवार्ता तो नेणे ॥३८॥
असलेल्या देहांतसुद्धा देहांतील ग मुक्काला शिवत नाहीत. पापपुण्याची कथा किंवा सुखदुःखाची वार्ता त्याच्या कानावर जात नाही ३८.

सांडिल्या संकल्पविकल्पांसीं । कल्पांतींही नातळे त्यासीं ।
जेवीं कां ओकिल्या ओकासी । परतोनि कोणासी न घेववे ॥३९॥
ज्याप्रमाणे ओकलेली ओक पुन्हा कोणाच्याने घेववत नाही, त्याप्रमाणे एकदा सोडलेल्या संकल्पविकल्पांना कल्पांतीही तो स्पर्श करीत नाही ३९.

यालागीं मन बुद्धि इंद्रिय प्राण । मुक्ताचीं जाहलीं संकल्पशून्य ।
याचिलागीं पापपुण्य । न लगे जाण मुक्तासी ॥४४०॥
म्हणून मुक्काचे मन, बुद्धि, इंदिये आणि प्राण ही संकल्पशून्यच झालेली असतात. म्हणूनच मुक्ताला पापपुण्य लागत नाही ४४०.

इंद्रियीं विषयक्रीडन । करितां संकल्पशून्य ।
मुक्तासी मनपणें नाहीं मन । वृत्तिशून्य यालागीं ॥४१॥
इन्द्रियांनी विषयाशी क्रीडा करीत असता मुक्त संकल्पशून्य असतो. त्याच्या मनाला मनपणाच नसतो, म्हणून तो वृत्तिशून्य असतो ४१.

बाळक लेणया प्रमाण नेणे । तरी अंगीं शोभे लेइलेपणें ।
तेवीं कर्में विगुंतलीं करणें । मुक्त अकर्तेपणें अलिप्त ॥४२॥
मुलांना अलंकाराचे मोल कळत नाही, तरी ते घातल्याने ती शोभू लागतात; त्याप्रमाणे इन्द्रिय कर्मात गुंतली असली तरी मुक्त हा अकर्तेपणाने अलिसच असतो ४२.

संकल्पविरहित विहार । तोचि मुक्त जाण पां साचार ।
‘कथं विहरति’ हें उत्तर । थोडेनि फार सांगितलें ॥४३॥
संकल्पावांचून विहार करतो तोच खरोखर मुक्त होय. ‘कथं विहरति ?’ ह्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यांत सांगितले ४३.

म्यां सांगितलीं जीं जीं लक्षणें । तीं तीं मुक्ताचीं मुक्तचि जाणे ।
आणिकासी व्युत्पत्तिपणें । मुक्त जाणणें हें न घडे ॥४४॥
मी जी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्ताची मुक्तालाच कळतात. इतरांला विद्वत्तेच्या बळावर मुक्ताला ओळखणे शक्य नाही ४४.

सकळ देहशास्त्रसंपन्न । त्यासीही मुक्त न कळे जाण ।
देहीं असे ज्यासी देहाभिमान । त्यासी मुक्तलक्षण कळेना ॥४५॥
साऱ्या वेदशास्त्रांत निपुण असला, तरी त्यालाही मुक्त ओळखता येणार नाहीं; ज्याच्या देहामध्ये देहाभिमान आहे, त्याला मुक्ताची लक्षणे कळावयाची नाहींत ४५.

म्यां बोलिले लक्षणांची पोथी । साक्षेपें घेऊनि हातीं ।
जर्‍ही हिंडिन्नला त्रिजगतीं । तर्‍ही मुक्ताची स्थिति कळेना ॥४६॥
मी सांगितलेल्या लक्षणांची पोथी हातात घेऊन मोठ्या आतुरतेने त्रिभुवन जरी हिंडला, तरी त्याला मुक्ताची स्थिति कळावयाची नाही ४६.

जेणें साचार मुक्त जाणितला । तोही सत्य जाण मुक्त झाला ।
अनुमानयोग्यतेच्या बोला । मुक्त जाणवला हें मिथ्या ॥४७॥
कारण जो खरोखरच मुक्ताला ओळखतो, तोही खरोखर मुक्तच होतो. केवळ अनुमान धबक्याच्या बोलण्याने मुक्ताची ओळख होईल ही आशा व्यर्थ आहे ४७.

जेणें सूर्य देखिला यथार्थता । तो जग देखे तत्प्रकाशता ।
तेणें मुक्त जाणितला तत्त्वतां । तो नित्यमुक्तता जग देखे ॥४८॥
जो खरोखर सूर्याला पाहतो, तो त्याने प्रकाशित केलेलें जगही पाहतो. त्याप्रमाणे जो खरोखर मुक्काला ओळखतो, त्याला जगही नित्यमुक्तच असलेले दिसतें ४८.

तेथ हा मुक्त हा बद्ध । देखणें हें अतिअबद्ध ।
ऐसें देखती ते महामंद । अज्ञानांध अज्ञानी ॥४९॥
तेथे हा मुक्त आणि हा बद्ध असे समजणे हे अतिशय अयुक्त आहे. असें जे समजतात ते महामूर्ख अडाणी केवळ अज्ञानाने अंध झालेले म्हणून समजावे ४९.

मुक्त न कळे सर्वथा । ऐसें बोलणें ऐकतां ।
उद्धवासी हो लागली चिंता । तें कृष्णनाथा कळों सरलें ॥४५०॥
मुक्त हा मुळीच ओळखावयास येत नाही, हे ऐकून उद्धवाला चिंता पडली ही श्रीकृष्णांनी ताडले आणि म्हणाले ४५०,

मागां सांगितलीं मुक्तलक्षणें । तीं मुक्ताचीं मुक्तचि जाणे ।
लौकिकीं मुक्त कळे जेणें । तींही लक्षणें परियेसीं ॥५१॥
पूर्वी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्तच जाणतात. भातां लौकिकांत मुक्त ओळखता येईल अशीही लक्षणे ऐक ५१.

आश्वासावया उद्धवाचें मन । मुक्ताचें जाणतें लक्षण ।
सांगेन म्हणे श्रीकृष्ण । येरू सावधान सर्वस्वें ॥५२॥
उद्धृवाच्या मनाला धीर देण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाले, मुक्काचे जाणता येणारें लक्षण सांगतों श्रवण कर. तेव्हां उद्धवही एकाग्र चित्तानें ऐकू लागला ५२.

कळतीं मुक्ताचीं लक्षणें । उद्धवु ऐकावया उदित मनें ।
तें जाणोनियां श्रीकृष्णें । विचित्र निरूपणें निरूपी ॥५३॥आतां मुक्ताची कळून येणारी लक्षणे समजतील असे वाटून ती ऐकण्यासाठी उद्धवाचे मन उत्कंठित झाले. हे लक्षात आणून श्रीकृष्णांनीही निराळ्याच रीतीनें निरूपण करण्यास प्रारंभ केला ५३.

यस्यात्मा हिंस्यते हिंस्रैः येन किञ्चिद् यदृच्छया ।
अर्च्यते वा क्वचित्तत्र न व्यतिक्रियते बुधः ॥ १५ ॥[श्लोक १५] अशा मुक्त पुरूषाच्या शरीराला कोणी हिंसकांनी पीडा दिली किंवा दैवयोगाने त्याची कोणी पूजा केली, तरी त्याच्या मनात कोणताही बदल होत नाही. (१५)

ज्याचिया देहासी जाण । हिंसा करिती हिंसक जन ।
छेद भेद दंड मुंडण । गर्जन तर्जन जर्‍ही केलें ॥५४॥
(श्रीकृष्ण म्हणाले) मुक्ताच्या देहाची हिंसकजनांनी हिंसा केली, त्याला छिन्नभिन्न केले; त्याला मारले किंवा त्याचे पांच पाट काढले; त्याच्या अंगावर ओरडले; त्याची निर्भर्त्सना केली ; किंवा त्याला जरी शिव्या दिल्या ५४;

तर्‍ही ते देहाची व्यथा । मुक्तासी नाहीं सर्वथा ।
नाना उपचारीं पूजितां । नेघे श्लाघ्यता सन्मानें ॥५५॥
तरी ती देहाची पीडा मुक्तांना कधीच होत नाही, किंवा मोठ्या गौरवाने त्याची पूजा केली, तरी तो त्याचा मोठेपणा मानीत नाहीं ५५.

देहीं वर्तमान असतां । देहबुद्धी नाहीं सर्वथा ।
त्यासीच बोलिजे जीवन्मुक्तता । यालागीं देहव्यथा त्या नाहीं ॥५६॥
देहांत विद्यमान असता त्याला देहबुद्धि मुळीच नसते. त्यालाच जीवन्मुक्तता असे म्हणतात. यासाठीच त्याला देहाची व्यथा बाधत नसते ५६.

जैसी पुरुषांसवें छाया असे । पुरुषयोगें चळती दिसे ।
ते छायेची अहंममता नसे । निजमानसें पुरुषासी ॥५७॥
पुरुषाबरोबर जशी छाया असते, ती पुरुषामुळे चालत असलेली दिसते, पण त्या छायेची अहंममता काही त्या पुरुषाच्या मनांत नसते ५७.

तैसाचि मुक्ताचा देहो । मुक्तासवें वर्ते पहा हो ।
परी त्यासी नाहीं अहंभावो । हा नित्यस्वभावो मुक्ताचा ॥५८॥
त्याप्रमाणेच मुक्ताचा देहही त्याच्याबरोबर वागत असतो, पण स्याचा त्याला अभिमान नसतो. हा मुक्तीचा नित्यस्वभाव होय ५८.

त्यासी चोरु हेरु कातरु । म्हणौनि दंडु केला थोरु ।
कां पूजिला ईश्वरु । पुरुष श्रेष्ठतरु म्हणौनि ॥५९॥
त्याला ‘तूं चोर आहेस, हेर आहेस, खिसेकातरू आहेस’ म्हणून मोठा दंड केला ; किंवा ‘आपण मोठे श्रेष्ठ पुरुष आहांत’ म्हणून देवाप्रमाणे त्याची पूजा केली ५९.

परी पूजितां कां गांजितां । त्याची डंडळीना समता ।
जेवीं छायेची मानापमानता । न करी व्यथा पुरुषासी ॥४६०॥
तरी छायेच्या मानापमानाने पुरुषाला जशी पीडा होत नाही, तशी पूजेने किंवा छळाने त्याची ऐक्यबुद्धि मोडत नाही ४६०.

देहो व्याघ्रामुखीं सांपडला । कां दैवें पालखीमाजीं चढला ।
तो हरुषविषादा नाहीं आला । समत्वें झाला निर्द्वंद्व ॥६१॥
देह वाघाच्या तोंडांत सांपडला, किंवा दैवयोगाने तो पालखीत चढला, तरी त्याला हर्षविषाद वाटत नाहीत; कारण, तो समत्वामुळे निद्वंद्वच होऊन राहिलेला असतो ६१.

देहो द्यावया नेतां सुळीं । मी मरतों ऐसें न कळवळी ।
कां गजस्कंधीं पूजिला सकळीं । तेणें सुखावली वृत्ति नव्हे ॥६२॥
देह सुळावर देण्याकरिता नेऊ लागले, तर ‘मी आतां मरतों’ म्हणून त्याला दुःख होत नाहीं; किंवा हत्तीच्या पाठीवर बसवून साज्यांनी त्याची पूजा केली, तरी त्यामुळे त्या वी वृत्ति आनंदित होत नाही ६२.

सुखदुःखादि नाना व्यथा । आगमापायी आविद्यकता ।
देहाचें मिथ्यात्व जाणता । यालागीं व्यथा पावेना ॥६३॥
सुखदुःखादि नानाप्रकारच्या व्यथा आविद्यक असल्यामुळे आगमापायी म्हणजे येणाया जाणाऱ्या अर्थात् अनित्य आहेत. अशा प्रकारें देहाचें मिथ्यात्वच त्याने पक्कं ओळखले असल्यामुळे त्याला त्याची व्यथा होत नाही ६३.

अतिसन्मानु जेथ देखे । तेथ न राहे तेणें सुखें ।
अपमानचिये आडके । देखोनि न फडके भयभीतु ॥६४॥
अत्यंत सन्मान झालेला जेथे दृष्टीस पडतो, तेथें तो त्या सुखाला भाळून राहात नाही, किंवा अपमानाचे तडाके पाहून भयभीत होऊन पळून जात नाहीं ६४.

देहासी नाना विपत्ति होये । तोही त्या देहाचें कौतुक पाहे ।
देह माझें मज व्यथा आहे । हें ठावें नोहे मुक्तासी ॥६५॥
देहाला अनेक प्रकारच्या विपत्ति प्राप्त होतात, पण तो त्या देहाचे कौतुकच पाहात बसतो. देह माझा आणि मला व्यथा होत आहे अशी मुक्ताला जाणीवच नसते ६५.

येथवर देहातीतता । दृढ बाणली जीवन्मुक्ता ।
यालागीं देहदुःखाची व्यथा । त्यासी सर्वथा बाधीना ॥६६॥
इतकी विदेहस्थिति जीवन्मुक्ताला दृढ बाणलेली असते; त्यामुळे देहदुःखाची व्यथा त्याला मुळीच बाधत नाही ६६.

नाना जनपदवार्ता । अतिस्तवनें स्तुति करितां ।
कां पारुष्यवचनें निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना ॥६७॥लौकिकांतील नानाविध मुळ कोणाची निंदा करावी. तिदूपपणानेच पाहात अवार्तानी किंवा मोठ्या स्तुतिस्तोत्रांनी त्याची स्तुति केली, अथवा दुरुत्तरें बोलून त्याची निंदा केली, तरी त्यायोगें मुक्ताला दुःख होत नाही ६७.

न स्तुवीत न निन्देत कुर्वतः साध्वसाधु वा ।
वदतो गुणदोषाभ्यां वर्जितः समदृङ् मुनिः ॥ १६ ॥[श्लोक १६] कशातही गुणदोष न पाहाणार्‍या समदर्शी मुनीने बरे किंवा वाईट करणार्‍या वा बोलणार्‍या माणसाची स्तुती किंवा निंदा करू नये. (१६)

निंदेच्या तिखट बाणीं । दृढ विंधिल्या दुर्जनीं ।
हे असाधु हें नुपजे मनीं । न बोले वचनीं ते दोष ॥६८॥
दुष्टांनी निंदेच्या तीक्ष्ण बाणांनी काळजाला घरे पाडले तरी हे दुष्ट आहेत असे त्याच्या मनात येत नाही, किंवा त्यांच्या त्या दोषांचा दो उचारही करीत नाही ६८.

भाविक सात्त्विक साधु । मिळोनि करिती स्तुतिवादु ।
तूं ईश्वरी पुरुष शुद्धु । हा गुणानुवादु ऐकोनि ॥६९॥
किंवा भाविक, सात्त्विक, साधु मिळून त्यांनी ‘तू शुद्ध ईश्वरी पुरुष आहेस’ म्हणून स्तुति केली, तरी तो गुणानुवाद ऐकून ६९,

मी उत्तम हें नुपजे मनीं । उंच नीच न देखे जनीं ।
हे साधु लोक भले गुणी । हे मुक्ताची वाणी वदेना ॥४७०॥
मी मोठा उत्तम आहे असे त्याच्या मनात येत नाही. तो लोकांमध्ये एक उंच व एक नीच असे समजतच नाही. हे लोक मोठे सज्जन आहेत, चांगले आहेत, गुणज्ञ आहेत, असे मुक्ताच्या मुखातून कधी निघत नाही ४७०.

साधु असाधु पाहतां जनीं । तो ब्रह्मरूप देखे दोनी ।
देखतें देखे तद्‌रूपपणीं । निजात्मदर्शनीं निजबोधु ॥७१॥
लोकांमध्ये साधु किंवा दुष्ट त्याने पाहिले तरी त्या दोघांनाही तो ब्रह्मरूपच समजतो. त्याला निजात्मदर्शनाने निजबोध झाला असल्याने तो जिकडे तिकडे तद्‌रूपपणानेच पाहात असतो ७१.

तेथ कोणाची करावी निंदा । कोणाच्या करावें गुणानुवादा ।
मीचि विश्व हें आलें बोधा । स्तुतिनिंदा निमाली ॥७२॥
सारे विश्व मीच आहे असा अनुभव आल्यामुळे कोणाची निंदा करावी, किंवा कोणाचे गुणानुवाद करावेत, अशी इच्छाच त्याला होत नाही. स्तुति आणि निंदा ह्या जागच्या जागीच विरून गेलेल्या असतात ७२.

त्यासी आत्मसाक्षात्कारीं विश्राम । नित्य निजात्मपदीं आराम ।
साधु असाधु हा फिटला भ्रम । स्वयें आत्माराम तो जाहला ॥७३॥
त्याला आत्मसाक्षात्कारांतच विश्रांति असते; निजात्मपदामध्येच त्याला नित्य आराम असतो. साधु व असाधु हा भ्रम नाहीसा होऊन तो स्वत:च आत्माराम होऊन राहिलेला असतो ७३.

असाधुत्वें निंदावे ज्यासी । तंव आत्मस्वरूपें देखे त्यासी ।
साधु म्हणौनि वर्णितां गुणासी । देखे त्यासी निजरूपें ॥७४॥
दुष्ट म्हणून ज्याची निंदा करावयाची त्याला तो आत्मस्वरूपाने पाहूं लागतो. बरें साधु म्हणून त्याच्या गुणांचे वर्णन करावयाला जावें, तो तोही आत्मस्वरूपानेच त्याला दिसू लागतो ७४.

उजव्या वंद्यत्वें शुद्धभावो । डाव्या निंद्यत्वें निजनिर्वाहो ।
पुरुषासी दोंहीचा समभावो । वंद्य निंद्य पहा हो समत्वें तैसे ॥७५॥
उजवें अंग शुद्ध म्हणून वंद्य व डावें अशुद्ध म्हणून निंद्य अथवा त्याज्य असे कोणालाही वाटत नाही. दोन्ही ठिकाणी समानभावच असतो; त्याचप्रमाणे वंदन करणाऱ्याला किंवा निंदा करणाऱ्यालाही तो समानभावानेच पाहतो ७५.

तेथ साधु असाधु अनुवादा । वर्जिली स्तुति आणि निंदा ।
समत्वें पावला समपदा । सुखस्वानंदाचेनि बोधें ॥७६॥
म्हणून हा अमका साधु किंवा हा अमका असाधु असे म्हणणे अर्थात् स्तुति किंवा निंदा करणे त्याने वर्ण केलेले असते. स्वानंदसुखाच्या बोधाने आणि समानभावानें तो समपदालाच पोंचलेला असतो ७६.

मुक्ताची हे वोळखण । यापरी उद्धवा तूं जाण ।
आतां आणिकही लक्षण । तुज मी खूण सांगेन ॥७७॥
उद्धवा ! ह्याप्रमाणे मुक्ताची ओळख आहे हे तूं लक्षात ठेव. आता आणखीही काही लक्षणांची खूण तुला सांगतों ७७.

प्रकट मुक्ताचें लक्षण । म्यां तुज सांगितलें जाण ।
तें लौकिकीं मानी कोण । विकल्प गहन जनाचे ॥७८॥
मुक्ताचें प्रकट लक्षण मी तुला सांगितले. पण लोकांमध्ये ते मानतो कोण ? कारण लोकांचे तर्कवितर्क मोठे कठिण असतात ७८.

प्रारब्धवशास्तव जाण । एकादें अवचटे दिसे चिह्न ।
इतुक्यासाठीं मुक्तपण । मानी कोण जगामाजीं ॥७९॥
प्राधवशात् ह्यांपैकी एखादे लक्षण एखाद्यापाशी अकस्मात् दृष्टीस पडते; पण तेवढ्यावरूनच जगामध्ये मुक्तपणा कोण मान्य करणार ? ७९.

मुक्त मुक्तपणाची पदवी । सर्वथा जगामाजीं लपवी ।
जो आपुली मुक्तता मिरवी । तो लोभस्वभावी दांभिकु ॥४८०॥
कारण मुक्त असतो तो आपली मुक्तपणाची योग्यता जगापासून लपवून ठेवीत असतो. उलट आपली मुक्तता जगांत मिरविणारे असतात ते लोभी स्वभावाचे म्हणून समजावे ४८०.

शुक वामदेव मुक्त म्हणतां । सर्वांसी न म्हणवे सर्वथा ।
मा इतरांची काय कथा । माझीही मुक्तता न मानिती ॥८१॥
शुक आणि वामदेव ह्यांचाही मुक्तपणा सारेच काही मान्य करीत नाहीत. मग इतरांची कथा काय ? माझी मुक्ततासुद्धा कितीएक कबूल करीत नाहीत ८१.

म्यां गोवर्धनु उचलिला । दावाग्नि प्राशिला ।
अघ बक विदारिला । प्रत्यक्ष नाशिला काळिया ॥८२॥
मी गोवर्धन पर्वत उचलला; दावाग्नि गिळून टाकला; अघासुराचा आणि वक दैत्याचा विध्वंस केला; काळियाचा नाश केला ८२.

जों जों हा देहाडा । तों तों नीच नवा पवाडा ।
निजसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळु ॥८३॥
जोपर्यंत मी देहधारी आहे तोपर्यंत मी नित्य नवे पराक्रम करीत असतो. आत्मसुखाची तर लयलूटच करून सोडली आहे ८३.

त्या माझें मुक्तपण । न मानिती याज्ञिक ब्राह्मण ।
इतरांची कथा कोण । विकल्प दारुण लौकिकीं ॥८४॥
त्या माझेंसुद्धा मुक्तपण याज्ञिक ब्राह्मण मान्य करीत नाहीत ! मग इतरांची गोष्ट कशाला पाहिजे ? तात्पर्य लौकिकामध्ये मनस्वी कुतर्क भरलेले असतात ८४.

यालागीं मुक्ताचें मुक्तपण । मुक्तचि जाणे आपण ।
इतरांसी न कळे तें लक्षण । अतिविचक्षण जर्‍ही झाला ॥८५॥
म्हणून मुक्ताचे मुक्तपण स्वतः मुक्त असतात तेच जाणतात. दुसरा कितीही चतुर असला तरी त्याला ते लक्षण कळावयाचें नाहीं ८५.

मुक्त लौकिकीं वर्तत । जड-मूक-पिशाचवत ।
तींही चिन्हें समस्त । ऐक निश्चित सांगेन ॥८६॥मुक्त हा लौकिकामध्ये जड-मूक-पिशाचासारखाच वागत असतो. तीही सारी चिन्हें आतां यथार्थ रीतीने सांगतों ऐक ८६.

न कुर्यान्न वदेत् किञ्चिन् न ध्यायेत् साध्वसाधु वा ।
आत्मारामोऽनया वृत्त्या विचरेज्जडवन्मुनिः ॥ १७ ॥[श्लोक १७] मुनीने आत्मचिंतनात मग्न असावे त्याने कोणाचेही बरेवाईट करू नये किंवा चिंतू नये तसेच कोणाबद्दलही चांगले किंवा वाईट बोलू नये अशा रीतीने वेड्यासारखे वागावे. (१७)

कायिक-वाचिक-मानसिक । उद्देशें कर्म न करी एक ।
जें निफजे तें स्वाभाविक । ‘अहेतुक’ त्या नांव ॥८७॥
मुक्त कायिक, वाचिक किंवा मानसिक कोणतेही कर्म सहेतुक करीत नसतो. त्याच्याकडून जें कर्म होतें तें स्वाभाविक होत असते. त्याचंच नांव ‘अहेतुक’ कर्म ८७.

हेतु ठेवूनि गुणागुणीं । स्तुतिनिंदेचीं बोलणीं ।
सांडोनिया झाला मौनी । परी मौनाभिमानीं हेतु नाहीं ॥८८॥
गुणागुणांत दृष्टि ठेवून स्तुतीची किंवा निंदेची बोलणी करावयाची सोडून तो मौन धरून बसतो. पण मौनाचा अभिमान धरण्याचाही त्याचा हेतु नसतो ८८.

जरी तो झाला मौनाभिमानी । तरी मुक्त पडला बंधनीं ।
यालागीं बोलणें न बोलणेंं दोन्ही । सांडूनि मौनी तो झाला ॥८९॥
त्याने जर मौनाचा अभिमान बाळाला, तर तो मुक्त बंधनांत पडला असे होईल. म्हणून बोलणे आणि न बोलणे दोन्ही सोडून देऊन तो मौनी झालेला असतो ८९,

अतद्‍व्यावृत्तीनें जाण । करावें असंतनिरसन ।
मग सद्वस्तूचें ध्यान । अखंड जाण करावें ॥४९०॥
अतव्यावृत्तीने म्ह. अनात्मवस्तूच्या निषेधाने अशाश्वताचे निरसन करावे, आणि मग सद्वस्तु जी परब्रह्म तिचे अखंड चिंतन करीत बसावे म्हणून बसला ४९०,

तंव पावली सद्‍गुरूची खूण । उडालें ध्येय-ध्याता-ध्यान ।
बुडालें भेदाचें भेदभान । चैतन्यघन कोंदलें ॥९१॥
तोंच महत्पुण्याईने सद्‌गुरूची खूण मिळाली, त्यायोगें ध्येय, ध्याता, ध्यान हे सर्व उडून जाऊन भेदाचे भेदभानच नाहीसे होऊन गेले, आणि जिकडे तिकडे चैतन्यधनच भरून राहिले ९१.

मेळवूनि शास्त्रसंभारा । बांधला संतासंतबंधारा ।
तो चैतन्याच्या महापुरा- । माजी खरा विराला ॥९२॥
शास्त्राच्या राशी मिळवून शाश्वताचा आणि अशाश्वताचा जो बांध उभारलेला असतो, तो चैतन्याच्या महापुरामध्ये साफ विरून गेला ९२.

तेव्हां बुडालें संतासंतभान । निबिड दाटलें चैतन्यघन ।
मोडलें मनाचें मनपण । वृत्तिशून्य अवस्था ॥९३॥
तेव्हां संत आणि असंत ह्याचे भानच नाहीसे होउन जिकडे तिकडे चैतन्यच भरून राहिले. मनाचे मनपण मोडून वृत्तिशून्य अवस्था प्राप्त झाली ९३,

मनें ध्यावें चैतन्यघन । तंव चैतन्यचि जाहलें मन ।
सहजेंचि खुंटलें ध्यान । हें मुख्य लक्षण मुक्ताचें ॥९४॥
त्या चैतन्याचे मनाने ध्यान करावें तर ते मनच चैतन्य होऊन गेले. त्यामुळे ध्यान करणे सहजच खुंटले. हेच मुक्ताचे मुख्य लक्षण होय ९४.

चैतन्यीं हरपलें चित्त । जड-मूक-पिशाचवत ।
लौकिकीं वर्ततां दिसे मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥९५॥
उद्धवा ! चैतन्यामध्येच चित्त हरपून गेल्यामुळे खरोखर मुक्त हा लोकांमध्ये जड-मूक-पिशाचासारखा वागतांना दिसतो ! ९५.

मुक्त लौकिकीं वर्तत । जड-मूक-पिशाचवत ।
म्हणौनि कळे इत्थंभूत । तेंही चिन्ह यदर्थ सांगेन ॥९६॥
[मुक्त हा लोकांमध्ये जड-मूक-पिशाचासारखा वागतो म्हणूनच तो पूर्णपणे ओळखता येतो. ह्याकरितां तेंही चिन्ह सांगतों ९६.

नैष्कर्म्य ब्रह्म पावला दृढु । अंतरीं निजबोधें अतिगोडु ।
बाह्य लौकिकीं दिसे जडु । अचेतन दगडु होऊनि असे ॥९७॥
] नैष्कर्म्य ब्रह्माची त्याला दृढ प्राप्ति झालेली असते. अंतरांतील निजबोधानें तो अत्यंत गोड असतो. बाहेर लौकिकामध्ये मात्र दिसण्यांत जडसा दिसतो. जणों काय अचेतन असणारा दगडच ! ९७.

उठीबैसी करितें मन । तें स्वरूपीं झालें लीन ।
पडलें ठायींहूनि नुठी जाण । यालागीं ‘जडपण’ आभासे ॥९८॥
संकल्प विकल्प उभारणारे आणि मोडणारे मन ते आत्मस्वरूपांतच लीन झालेले असते, त्यामुळे ते पडलेल्या ठिकाणावरून उठतच नाही. म्हणून ‘जडपणा’ भासतो ९८.

शब्दब्रह्म गिळोनि वेगें । निःशब्द वस्तु झाला अंगें ।
निंदास्तुतीचें नांव नेघे । ‘मुका’ सर्वांगें सर्वदा ॥९९॥
तो शब्दब्रह्माला गिळून टाकून स्वतः निःशब्द ब्रह्मच झालेला असतो. म्हणून निंदेचे किंवा स्तुतीही नांव घेत नाही. सदासर्वदा सर्वांगाने ‘मुकाच’ असतो ९९.

ब्रह्म सर्वथा न बोलवे कोणा । जरीं सांगे तरी दावी खुणा ।
यालागीं मुका म्हणती जाणा । अबोलपणा स्तुतिनिंदा ॥५००॥
ब्रह्म हे कधीच कोणाला बोलून दाखविता येत नाही. म्हणून तो जर सांगावयास लागला तर खुणेने दाखवितो. आणि तो कोणाची स्तुति किंवा निंदाही करीत नाही. म्हणूनच त्याला ‘मुका’ असे म्हणतात ५००.

द्रव्यलोभ नाहीं चित्तीं । कदा द्रव्य नातळती ।
यालागीं लोक ‘पिशाच’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१॥
उद्धवा ! त्याच्या मनांत द्रव्याचा लोभ कधीच नसतो. म्हणून तो द्रव्याला कधी शिवत नाही. ह्याकरितांच लोक त्याला ‘पिशाच’ म्हणतात १.

नवल त्याचें पिसेपण । जगास न करवे जें प्राशन ।
ते वस्तूचें करी अपेयपान । अभक्ष्य जाण भक्षितु ॥२॥
त्याच्या पिसेपणाचा मोठा चमत्कार आहे. जगाला में प्राशन करवत नाही, त्या ब्रह्मरसाचें तो पान करतो. आणि जें भक्षण करितां येत नाही, त्या अभक्ष्याचें तो भक्षण करतो २.

जेथ जगासी गमन नव्हे जाण । तेथ हा करी अगम्यागमन ।
जगाचें जेथ न रिघे मन । तेथ सर्वांगें जाण हा वेंघे ॥३॥
जगाला जेथें जातां येत नाही, त्या अगम्य ठिकाणी हा गमन करतो. जगाचे जेथें मन शिरत नाही, तेथें सर्वांगासहवर्तमान हा घुसतो ३.

न धरी विधिनिषेधविभाग । न करी कर्माकर्मांचा पांग ।
स्वानंदें नाचवी सर्वांग । यालागीं जग ‘पिसे’ म्हणे ॥४॥
विधिनिषेधाचा भागच तो मनांत आणीत नाही. कर्माकर्माचा खटाटोप तो करीत नाही. सारे अंग स्वानंदानेच खेळवीत असतो. म्हणूनच जग त्याला पिसा म्हणते ४.

एवं जड-मूक-पिशाच । समूळ लक्षणीं तोचि साच ।
मिथ्या नव्हे अहाचवहाच । वृथा कचकच तो नेणे ॥५॥
अशा प्रकारे मुक्ताच्या अंगी जडाची, मुक्याची व पिशाचाची लक्षणे मिथ्या किंवा वरकरणी नसतात, तर खरोखरीच असतात. व्यर्थ कचकच करणे त्याला आवडत नाही ५.

जाण पां मुक्ताच्या ठायीं । कोणे विषयीं आग्रह नाहीं ।
जो अतिशयेंसीं आग्रही । तो बद्ध पाहीं निश्चित ॥६॥
तसेच ही एक गोष्ट लक्षात ठेव की, मुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह म्हणून नसतो. जो अतिशय आग्रही असतो तो खरोखर बद्ध होय ६.

जीं बोलिलीं मुक्ताचीं लक्षणें । तींचि साधकांची साधनें ।
सिद्धासी असती सहजगुणें । साधकें करणें दृढनिष्ठा ॥७॥
ही जी मुक्तांची लक्षणे सांगितली तीच साधकांची साधने असतात. सिद्धाला ती सहजगत्या प्राप्त असतात, आणि साधकाला ती दृढतर निष्टेनें साध्य करून घ्यावी लागतात ७.

बोलिलिया लक्षणां । सिद्धचि भोक्ता जाणा ।
साधकुहि येथ लाहाणा । जो या साधनां साधूं जाणे ॥८॥
ही जी लक्षणे सांगितली, त्यांचा भोक्ता एक सिद्धच असतो. तसेंच ही साधने ज्याला साध्य करावयाला येतात, तो साधकही ह्याचा लाम घेणारा असतो ८.

इतर जे पंडिताभिमानी । आम्ही शास्त्रज्ञ ज्ञाते म्हणौनी ।
ते वाळिले येथूनि । जेवीं सज्जनीं दुर्बुद्धी ॥९॥
ह्याशिवाय इतर जे, आम्ही शास्त्रज्ञ व पंडित म्हणून अभिमान मिरविणारे असतात त्यांना, सज्जन दुर्बुद्धीला दूर सारतात त्याप्रमाणे, मुक्तांच्या पंक्तीतून दूर लोटलेले असते ९.

जो न साधी येथींच्या साधना । कोरडा शास्त्राभिमानी जाणा ।
सदा वांच्छिता धनमाना । तो येथींच्या ज्ञाना अलिप्त ॥५१०॥
जो येथील साधन न साधतां कोरडाच शास्त्राचा अभिमान बाळगतो, आणि रात्रंदिवस धनाची व मानाची इच्छा करतो, तो आत्मज्ञानापासून अलिप्त राहतो ! ५१०.

आम्ही कर्मकुशळ याज्ञिक । शास्त्रसंपन्न वेदपाठक ।
सदा अर्थकामकामुक । त्यांसी हें सुख अप्राप्त ॥११॥
आम्ही मोठे कर्मकुशल याज्ञिक आहोत, शास्त्रसंपन्न व वेदपाठक आहोत असे म्हणतात, किंवा निरंतर जे द्रव्याच्या इच्छेने लोलुप झालेले असतात, त्यांनाही हे सुख प्राप्त होणे नाही ११.

तिहीं जे कष्ट केले सर्वथा । ते समस्त जाण झाले वृथा ।
उद्धवा तेहीविखीं तत्त्वतां । ऐक आतां सांगेन ॥१२॥उद्धवा ! त्यांनी जे कष्ट केले असतील, ते सर्व फुकट जातात. त्याबद्दलही खराखरा विचार आता सांगतों ऐक १२.

शब्दब्रह्मणि निष्णातो न निष्णायात्परे यदि ।
श्रमस्तस्य श्रमफलो ह्यधेनुमिव रक्षतः ॥ १८ ॥[श्लोक १८] शब्दज्ञानात पारंगत असलेल्या विद्वानाला जर परब्रह्माचा अनुभव आला नसेल, तर त्याचे परिश्रम हे दूध न देणारी गाय पाळण्यासारखेच निरर्थक होत. (१८)

शब्दब्रह्म वेदशास्त्रार्थ । पढोनि वाचोनि अति पंडित ।
चारी वेद मूर्तिमंत । सदा तिष्ठत वाचेसी ॥१३॥
वेद पठण करून वेदशास्त्रांचा अर्थ शिकून अति पंडित होतो, जिव्हेवर सदासर्वकाल चारही वेद मूर्तिमंत उभे असतात १३

संहिता पद क्रम स्वरयुक्त । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्त ।
जटावळी ध्वज रथ । पढों जाणत वर्णपूर्वक ॥१४॥
स्वरयुक्त संहिता, पदें, क्रम, अरण, ब्राह्मण, सूत्र, निरुक्त, जटापाठ, ध्वजस्थ इत्यादि सवर्णक म्हणावयास येतात १४,

आयुर्वेद धनुर्वेद । गांधर्ववेदींचा जाणे भेद ।
काव्यनाटकीं अतिशुद्ध । वेद उपवेद तो जाणे ॥१५॥
आयुर्वेद, धनुर्वेद, गायनशास्त्रांतील सारे भेद जाणणारा, काव्यनाटकातील उत्तम मर्मज्ञ, वेद व उपवेद जाणणारा १५;

व्याकरणीं अतिनेटक । सांख्य पातंजळ जाणे तर्क ।
शास्त्र जाणे वैशेषिक । कर्ममीमांसक यज्ञान्त ॥१६॥
व्याकरणामध्ये मोठा निष्णात ; सांख्यशास्त्र, योगशास्त्र, तर्कशास्त्र ह्यांत पारंगत, वैशेषिक शास्त्रही माहीत; यज्ञापर्यंत मोठा कर्ममीमांसा जाणणारा १६;

विवर्ण वाचस्पति वेदान्त । शास्त्र जाणे वार्तिकान्त ।
तिन्ही प्रस्थानें मूर्तिमंत । पुढां तिष्ठत योग्यत्वें ॥१७॥
वेदांताचे विवरण करण्यामध्ये बृहस्पति; वार्तिकापर्यंत शास्त्रांची माहिती; प्रस्थानत्रयी हात जोडून पुढे उभी १७.

शिल्पशास्त्रीं अतिनिपुण । सुपशास्त्रामाजीं प्रवीण ।
रत्‍नपरीक्षालक्षण । जाणे आपण वाजिवाह ॥१८॥
शिल्पशास्त्रांत अतिशय निष्णात; पाकशास्त्रांत पटाईत; रत्नपरीक्षा उत्तम ; अश्वपरीक्षाही तशीच १८;

आगमीं नेटका मंत्रतंत्री । शैवी वैष्णवी दीक्षेची परी ।
सौर शाक्त अभिचारी । नाना मंत्रीं प्रवीण ॥१९॥
आगमोक्त मंत्रतंत्रांत तयारी; शैवदीक्षेतील, वैष्णवदीक्षेतील सार जाणलेलें; सौर, शाक्त, जारण-मारण इत्यादि मंत्रतंत्रांत कोणी हात धरणारा नाही १९,

कोकशास्त्रींची अधिष्ठात्री । अतिप्रवीण संगीतशास्त्रीं ।
प्रबंध करूं जाणे कुसरी । राजमंत्रीं राजसु ॥५२०॥
कामशास्त्रांत निष्णात; संगीतशास्त्रांतही प्रवीण; कविता करण्यामध्ये अत्यंत कुशल ; राजकारणामध्येही पटु ५२०;

निघंटु वसे प्रज्ञेपुढां । चमत्कारु जाणे गारुडा ।
पंचाक्षरी अतिगाढा । वैद्य धडफुडा रसज्ञ ॥२१॥
निघंटु अगदी तोंडपाठ; गारुडी चमत्कार करावयाला येतातच; अत्यंत प्रसिद्ध पंचाक्षरी; नामांकित वैद्य आणि रसायनशास्त्रवेत्ता २१;

रसौषधी साधावी तेणें । भूत भविष्य ज्योतिष जाणे ।
अमरकोश अभिधानें । अठरा पुराणें मुखोद्‍गत ॥२२॥
औषधी तयार कराव्यात अशा त्यानेच; भूतभविष्यादि ज्योतिष जाणणारा ; अमरकोशादि शब्दकोश आणि अठरा पुराणें मुखोद्गत २२;

प्रश्नावली पाहों जाणे । स्वप्नाध्यावो सांगावा तेणें ।
इतिहासादि प्रकरणें । जाणे लक्षणें गर्भाचीं ॥२३॥
प्रश्नावलीही पहावयास येते; स्वमाध्याय तर सांगावा असा त्यानेच; इतिहासाची प्रकरणे सारी मुखोद्गत; गर्भाची लक्षणे तर बिनचूक २३;

शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । जाणे साधक-बाधक युक्ती ।
समयींची समयीं स्फुरे स्फूर्ती । अपर बृहस्पति बोलावया ॥२४॥
शब्दव्युत्पत्तीचे ज्ञान मोठे; साधकबाधक प्रमाणे सारी ठाऊक ; समयसूचकता तर पाठीशी उभी ; बोलण्याच्या कामांत तर काय, दुसरा बृहस्पतीचा अवतार २४,

जेवीं तळहातींचा आंवळा । तेवीं ब्रह्मज्ञान बोले प्रांजळा ।
परी अपरोक्षसाक्षात्कारीं आंधळा । नेणे जिव्हाळा तेथींचा ॥२५॥
ब्रह्मज्ञान म्हणजे अगदी तळहातांतील आवळ्याप्रमाणे प्रांजळ बोलणारा; पण आत्मानुभवामध्ये मात्र आंधळा ! त्यांतील जिव्हाळा त्याला माहीत नसतो २५.

मोराअंगीं अतिडोळसें । अंगभरी भरलीं पिसें ।
एके दृष्टीवीण आंधळे जैसें । जाहलें तैसें विद्वांसा ॥२६॥
ज्याप्रमाणे मोराच्या अंगभर अगदी डोळ्यासारखींच पिसें भरलेली असतात, पण त्यांना दृष्टि नसल्यामुळे ती जशी सारीच आंधळी, त्याप्रमाणेच विद्वानांचीही दशा होते २६.

जेथूनि क्षीर स्त्रवती सड । तेथेंचि लागोनि गोचिड ।
अशुद्ध सेविताति मूढ । तेवीं विद्वांस दृढ विषयांसी ॥२७॥
ज्या स्तनांतून दूध निघते, त्याच थानाला गोचिडही चिकटून बसलेले मूर्खपणाने रक्तच पिऊन राहातात ! त्याप्रमाणेच असले विद्वान् विषयालाच झोंबत असतात ! २७.

गोचिडाचे मुखीं क्षीर रिघे । तो अशुद्धावांचोनि तें नेघे ।
तेवीं ज्ञान विकूनि अंगें । विद्वांसु मागे विषयांतें ॥२८॥
गोचिडाच्या तोंडांत दूध शिरूं लागले तर ते सोडून देऊन तो रक्त तेवढेच ग्रहण करतो, त्याप्रमाणे विद्वानही ज्ञान विकून विषय मागतात २८.

सांडूनि सुगंधचंदनासी । आवडीं दुर्गंधा धांवे माशी ।
तेवीं सांडूनि निजात्मज्ञानासी । पंडित विषयांसी झोंबत ॥ २९ ॥
माशी ही सुगंधी चंदनाला सोडून देऊन मोठ्या आवडीने घाणीवर जाऊन बसते, त्याप्रमाणे पंडित लोकही आत्मज्ञानाला सोडून विषयाशीच झोंबत बसतात २९.

असोनि कमळ आमोदापाशीं । दर्दुर सेविती कर्दमासी ।
तेवीं सांडूनि निजात्मज्ञानासी । पंडित विषयांसी लोलुप ॥ ५३०॥
बेडूक हे कमलाच्या मकरंदाजवळ असून चिखलच खात बसतात, त्याप्रमाणे पंडितही आत्मज्ञानाला सोडून देऊन विषयालाच लुब्ध होतात ५३०;

करूनि अद्वैतव्युत्पत्ती । तें ज्ञान विकूं देशांतरा जाती ।
मूर्ख ज्ञात्यातें उपहासिती । तर्‍ही वांछिती सन्मानु ॥३१॥
अद्वैतमताची सिद्धता करून ते ज्ञान विकण्याकरितां देशांतराला जातात; मूर्ख लोक ज्ञात्यांचा उपहास करतात, तरी ते सन्मानाची इच्छा करतातच ! ३१.

सांगतां ब्रह्मनिरूपण । सात्त्विकाचें परमार्थीं मन ।
व्याख्याता तो वांछी धन । विपरीत ज्ञान विद्वांसा ॥३२॥
ज्ञाता ब्रह्मनिरूपण सांगू लागला म्हणजे सात्त्विक लोकांचे मन परमार्थाकडे वळते, पण वक्ता मात्र द्रव्याचीच इच्छा करतो. याप्रमाणे विद्वानांचे ज्ञान विपरीत झालेले असते ३२.

सांगे आन करी आन । तेथें कैंचें ब्रह्मज्ञान ।
जेथ वसे धनमान । तेथ आत्मज्ञान असेना ॥३३॥
सांगावयाचे निराळे आणि करावयाचे निराळे, तेथें ब्रह्मज्ञान कशाचें ? जेथें धन आणि मान वसतात तेथें आत्मज्ञान असावयाचे नाही ३३.

दृढ धनमान धरोनि पोटीं । सांगतां ब्रम्हज्ञानगोठी ।
त्यास आत्मसाक्षात्कारभेटी । नव्हे कल्पकोटी गेलिया ॥३४॥
धन आणि मान पोटाशी घट्ट धरून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसले तर त्याला कोटि कल्प गेले तरी आत्मसाक्षात्काराची भेट होणार नाही ३४.

नाना पदव्युत्तिविंदान । एके श्लोकीं दशधा व्याख्यान ।
पोटीं असतां मानाभिमान । ब्रह्मज्ञान त्या कैंचें ॥३५॥
एकएका पदाची अनेक तहांनी फोड केली, किंवा एकएका श्लोकाचे दहा दहा अर्थ सांगितले, तरी पोटामध्ये मानाभिमान असेपर्यंत त्याला ब्रह्मज्ञान कसचे होणार ? ३५.

मी पंडितु अतिज्ञाता । ऐशिया नागवले अहंता ।
जेवीं आंधळें नोळखे पिता । नित्य असतां एकत्र ॥३६॥
मी मोठा पंडित, मी मोटा ज्ञाता, अशा अहंतेनेच ते नागवले जातात. असें आंधळे पोर नित्य बापाजवळ असले तरी ते बापाला ओळखीत नाहीं ३६,

तैशी गति विद्वांसासी । नित्य असती आत्मसमरसीं ।
तेंचि वाखाणिती अहर्निशीं । परी त्या स्वरूपासी नेणती ॥३७॥
त्याप्रमाणेच विद्वानांची गत असते. ते निरंतर आत्म्याशी ऐक्यरूपानेंच असतात; रात्रंदिवस त्याचेच वर्णन करतात; पण त्या स्वरूपाला ओळखीत मात्र नाहींत ३७.

करावया विषयभरण । केलें शास्त्रव्युपत्तिव्याख्यान ।
ते वृथा कष्ट गेले जाण । जेवीं वंध्याधेनु पोशिली ॥३८॥
विषयभरण करण्याकरितां जे शास्त्रव्युत्पत्तीचे व्याख्यान करतात, त्यांचे ते श्रम वांझ गाय पोसल्याप्रमाणे व्यर्थ होतात ३८.

जे कधीं वोळे ना फळे । सुटली तरी सैरां पळे ।
नित्य वोढाळी राजमळे । तें दुःख आदळे स्वामीसी ॥३९॥
वांझ गाय कधी कळत नाही किंवा वीत नाहीं, सुटली तर तडक पळत सुटते, रोज ओढाळपणा करून सरकारी बागांत जाते, आणि त्याचे प्रायश्चित्त धन्याला भोगावे लागते ३९,

तैशी गति पंडितंमन्यासी । व्युत्पत्तीं पोशिलें वाचेंसी ।
ते वोढाळ झाली विषयांसी । ज्याची त्यासी नावरे ॥५४०॥
पंडितंमन्यांची दशाही तशीच होते. त्यांनीही विद्वत्तेनें वाणीला पोसलेले असते. ही वाणी ओढाळ होऊन विषयाला संवकते, आणि त्याची त्यालाच आवरत नाही ५४०.

जेवीं का निर्दैवाहातीं । कनक पडलें तें होय माती ।
तेवीं पंडितंमन्याची व्युत्पत्ती । विषयासक्तीं नाशिली ॥४१॥
ज्याप्रमाणे दुर्दैवी मनुष्याच्या हातांत सोने पडले तरी त्याची माती होते, त्याप्रमाणे पंडितंमन्यांची विद्वत्ताही विषयासक्तीमुळे नाश पावते ४१.

द्विजा दीधला भद्रजाती । त्यासी न पोसवे तो निश्चितीं ।
मग फुकासाठीं विकिती । तेवीं व्युपत्ती विद्वांसा ॥४२॥
ब्राह्मणाला हत्ती दान दिला असता तो त्याला पोसवत नाही, आणि मग तो कवडीच्या मोलाने विकून टाकतो, त्याप्रमाणेच विद्वानांची विद्वत्ता होते ४२.

अद्वैतशास्त्राची व्युत्पत्ती । हे त्यासी झाली अलभ्यप्राप्ती ।
जे विषयालागीं विकिती । ते मूर्ख निश्चितीं विद्वांस ॥४३॥
अद्वैतशास्त्रांतील सिद्धान्त त्यांना कळतात, हा त्यांना अलभ्य लाभ आहे; पण तो ते विषयसुखाकरितां विकून टाकतात ; असले विद्वान् खरोखर मूर्ख होत ४३.

मुखीं ऊंस घालिजे घाणा । तो रस पिळूनि भरे भाणा ।
फिका चोपटीं करकरी घाणा । ते गति जाणा विद्वांसा ॥४४॥
धाण्याच्या तोंडांत ऊस घातला तर तो त्यांतील रस पिळून मांदणांत भरतो, आणि स्वतः निरस चिपाडें चघळून करकर करीत फिरत असतो. तशीच दशा विद्वानांची होते ! ४४.

विद्वांस करिती ज्ञानकथन । सारांश सात्त्विकीं नेला जाण ।
शब्दसोपटी करकरी वदन । गोडपण तेथें कैंचें ॥४५॥
विद्वान् लोक ज्ञान सांगू लागले म्हणजे त्यांतील हृद्य असते तें सात्त्विक लोक घेऊन जातात, आणि निःसत्त्व शब्दरूपी सोपटाने विद्वानाचे तोंड करकरत असते. तेथे गोडी कशाची ? ४५.

जेवीं का नपुंसकाच्या करीं । वोपिली पद्मिणी सुंदरी ।
ते अखंड रडे जयापरी । तेवीं विद्वांसाघरीं व्युत्पत्ती ॥४६॥
ज्याप्रमाणे नपुंसकाच्या हाती सुंदर पद्मिणी दिली, तर ती जन्मभर रडत बसते; त्याप्रमाणे विद्वानांच्या घरांत विद्वत्ताही रडतच असते ४६.

पाहे पां ब्रह्मज्ञानेंवीण । शब्दज्ञानें संन्यासग्रहण ।
केलें तेंही वृथा जाण । जरी धारणाध्यान करीना ॥४७॥
अरे असें पहा ! ब्रह्मज्ञानाशिवाय केवळ शब्दज्ञानाने संन्यासग्रहण केले, आणि ध्यानधारणा जर केली नाही, तर तो मंन्यास व्यर्थच होय ४७.

जैसी जैसी शब्दज्ञानव्युत्पत्ती । तैशी तैशी न करितां स्थिती ।
वर्तणें जैं विषयासक्ती । तैं निज मुखीं माती घातली ॥४८॥
शब्दज्ञान जसे जसें सांगावयाचे तशा तशा स्थितीने जर राहिला नाही, आणि विषयासक्तीनेच वागू लागला, तर त्याने आपल्या तोंडांत मातीच घालून घेतली म्हणून समजावे १८.

वेदशास्त्रसंपन्न झाला । त्यावरी पोट भरूं लागला ।
तरी तो उदमी थोर झाला । परी थित्या मुकला मुदलासी ॥४९॥
वेदशास्त्रसंपन्न होऊन त्यावर पोट भरूं लागला, तर तो एक मोठा व्यापारी झाला खरा, पण असलेले मुद्दल मात्र गमावून बसला ४९.

रत्‍न देऊनि कोंडा घेतला । कां अमृत देऊनि कांजी प्याला ।
तैसा परिपाकु पंडितांचा झाला । थित्या नागवला निजज्ञाना ॥५५०॥
रत्न देऊन कोंडा घ्यावा, किंवा अमृत देऊन पेज प्यावी त्याप्रमाणेच पंडितांचा शेवट होतो. अर्थात् ते आत्मज्ञानाला मुकतात ५५०.

शब्दज्ञान जोडिलें कष्टे । तेणेंचि साधनें परब्रह्म भेटे ।
इटेसाठीं परीस पालटे । मूर्ख वोखटें मानिती ॥५१॥
मोठ्या कष्टानें शब्दज्ञान मिळविलेले असते, पण तेवढ्याच कष्टाच्या साधनाने परब्रह्माचीही भेट झाली असती. वीट देऊन परिस मोबदला मिळाला असतां मूर्ख लोकांस वाईट वाटते ५१.

पोट भरावयाचिया युक्ती । आपुली मिरवाया व्युत्पत्ती ।
पत्रावलंबनें करिती । द्वाराप्रती सधनाच्या ॥५२॥
पोट भरावयाची युक्ति म्हणून आणि आपल्या विद्वत्तेचीही मिरवणूक व्हावी म्हणून, शिफारसपत्रे घेऊन श्रीमंतांच्या दाराशी जातात ५२.

जेवीं पोट भरावया भांड । नानापरी वाजवी तोंड ।
तेवीं नाना व्युत्पत्ती वादवितंड । करिती अखंड उदरार्थ ॥५३॥
पोट भरण्यासाठी भांड ज्याप्रमाणे पाहिजे तशी तोंडाने बडबड करीत असतो, त्याप्रमाणे विद्वान् लोकही पोटाकरितां विद्वत्ताप्रचुर अनेक प्रकारचे वितंडवाद करीत असतात ५३.

करूनि व्युत्पत्ती शब्दब्रह्म । जरी न साधीचि परब्रह्म ।
तरी त्या श्रमाचें फळही श्रम । जेवीं रत्‍नें उत्तम घाणा गाळी ॥५४॥
वेदाचा अर्थ व्युत्पत्तिबळाने करून जर परब्रह्म साध्य करीत नाहीत, तर त्या श्रमाचे फळही श्रमच होय. ज्याप्रमाणे उत्तम रलें घाण्यांत घालून गाळू लागले ५४,

तेथें तेल न पेंडी । झाली रत्‍नांची राखोंडी ।
तैशीं विद्वांसें झाली वेडीं । श्रमें श्रमकोडी भोगिती ॥५५॥
तेथे तेलही नाही आणि पेंडही नाही; पण रत्नांचा मात्र चुराडा होऊन जातो ! त्याप्रमाणेच विद्वान् लोक वेढे झालेले असतात; ते श्रम करून श्रमाच्याच राशी भोगतात ! ५५.

श्रमें श्रमुचि पावती । दुःखें दुःखचि भोगिती ।
हेंचि कथन बहु दृष्टांतीं । उद्धवाप्रती हरि बोले ॥५६॥ते श्रम करून श्रमच मिळवितात; दुःखाने दुःखच भोमातात. हीच गोष्ट अनेक दृष्टांतांनी श्रीकृष्ण उद्ध्वाला सांगतात ५६.

गां दुग्धदोहामसतीं च भार्यां देहं पराधीनमसत्प्रजां च ।
वित्तं त्वतीर्थीकृतमङ्ग वाचं हीनां मया रक्षति दुःखदुःखी ॥ १९ ॥[श्लोक १९] हे उद्धवा ! दूध न देणारी गाय, कुलटा स्त्री, पराधीन देह, दुर्गुणी मुले, अपात्र माणसाला दिलेले धन आणि माझे वर्णन न करणारी वाणी सांभाळणारा मनुष्य दुःखामागून दुःखेच भोगतो. (१९)

दुग्धाचिया लोलुप्यता । ‘भाकड गाय ‘ दोहूं जातां ।
शिंपीभरी दूध न ये हाता । हाणे लाता तत्काळ ॥५७॥
दुधाच्या लालचीनें भाकड वांझोव्या गाईंची धार काढू लागले, तर शिंपलीभर सुद्धा दूध हाताला येत नाहींच, पण लगेच लाथा मात्र खाव्या लागतात ५७.

जे कुडी कुचर डीवरी । विषयमेळवणा अतिखाइरी ।
अधर्मशीळ लातरी । सर्वांपरी अनाड ॥५८॥
खळ्याळ, अंगचोर, मारकी, अतिशय खादाड, अधर्मशील लाथरी आणि ओढाळांतली ओढाळ ५८;

सुटली राजागारीं भरे । धर्मदंडें मागें न सरे ।
सद्‍बुद्धि धरितां न धरे । सैर चरे सुनाट ॥५९॥
सुटली तर राजवाड्यांत शिरावयाची, काठीनें मारिलें तरी मागे सरावयाची नाही, चांगली चाल जिला ठाऊकच नाही, स्वैर कुठेतरी चरत असावयाची ५९;

जिचें कधीं नव्हे दुभतें । जे धरूं नेणे गर्भातें ।
पोषितां ऐशा गायीतें । पावे दुःखातें पोषकु ॥५६०॥
जिच्यापासून दूध कधीच मिळावयाचें नाहीं; जी कधी गाभणी म्हणून व्हावयाचीच नाहीं; अशा गाईला पोसलें असता बाळगणाराला मात्र दुःख ! ५६०.

गृहिणी लागला गृहाचार । ते स्त्री अनुकूल नसतां नर ।
अतिदुःखें दुःखी थोर । सदा करकर कपाळीं ॥६१॥
असेंच गृहांतील व्यवस्था नीट ठेवावयाची हे गृहिणीचे काम असते; पण तीच स्त्री जर पुरुषाला अनुकूल नसली, तर तिच्यामुळे त्याला दुःख मात्र अतिशय होते आणि सदा सर्वदा कपाळाशी करकर मात्र असते ६९;

निंदा अवज्ञा हेळण । भ्रताराचें करी जाण ।
स्वयें भक्षी मिष्टान्न । हें ‘असंतलक्षण स्त्रियांचे’ ॥६२॥
निंदा करावयाची, अवज्ञा करावयाची, नवऱ्याला टाकून बोलावयाची, स्वतः गोडगोड खावयाचे, हे स्त्रियांचे वाईट लक्षण आहे ६२.

खातां जेवितां द्रव्य देतां । गोड गूळसी बोले सर्वथा ।
धर्म देखोनि फोडी माथा । तेही सर्वथा असतीचि ॥६३॥
खायाला जेवायाला यथास्थित घातले, पुष्कळसे द्रव्य दिले म्हणजे आदी गुळासारखी गोड बोलावयाची; पण धर्म करताना पाहिले की, डोकेंच फोडून घ्यावयाचे. ती स्त्री खरोखर ‘असाध्वी’ होय ६३.

जे न विचारी पापपुण्य । कामाचारी धर्मशून्य ।
हें असतीचें लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥६४॥
जी पापपुण्याला विचारीत नाही, कामाचरणांत धर्माला धाब्यावर बसविणारी, हे खरोखर दुराचारी स्त्रियेचे लक्षण आहे हे ध्यानात ठेव ६४.

असतीचिये संगतीं । कैंची होईल सुखप्राप्ती ।
अति दुःखें दुःखी होती । जाण निश्चितीं ते नर ॥६५॥
अशा ‘असाध्वी’ स्त्रियेच्या संगतीने सुखप्राप्ति कशी होणार ? ते पुरुष खरोखर अतिशय दुःखाने मात्र गांजून जातात ६५.

ज्याचें देह ‘पराधीन’ । तो जीवें जितां सदा दीन ।
पराधीना समाधान । नव्हे जाण कल्पांतीं ॥६६॥
ज्याचा देह ‘पराधीन’ असतो, तो जिवंतपणी अत्यंत केविलवाणा बनतो. पराधीनाला कल्पांती सुद्धा समाधान प्राप्त व्हावयाचें नाहीं ६६.

सांडोनि आपली निजसत्ता । ज्यासी लागली पराधीनता ।
तो स्वप्नींही सुखाची वार्ता । न देखे सर्वथा निश्चित ॥६७॥
आपली सत्ता जाऊन ज्याला पराधीनता प्राप्त झाली, तो खरोखर कधी स्वमांतसुद्धा सुखाची गोष्ट पहात नाही ६७.

‘पर’ म्हणिजे माया जाण । जो झाला तिचे आधीन ।
त्यासी सुखाचें न दिसे स्वप्न । दुःख संपूर्ण सर्वदा ॥६८॥
‘पर’ म्हणजे माया, तिच्या जो स्वाधीन झाला, त्याला सुखाचें स्वमसुद्धा कधी पडत नाही. तो सदासर्वकाल अत्यंत दुःखांतच असतो, हे लक्षात ठेव ६८.

पराधीनासी सुख । आहे म्हणे तो केवळ मूर्ख ।
सोलीव दुःखाचें दुःख । अवश्य देख पराधीना ॥६९॥
पराधीनाला सुख आहे असे म्हणतो तो शुद्ध मूर्ख होय. दुःखांतलें सोलींव दुःख पराधीनाला अवश्यमेव भोगावें लागते ६९.

ऐक ‘प्रजांचा विवेक’ । एक पुत्र एक लेंक ।
एक ते केवळ मूर्ख । दुःखदायक पितरांसी ॥५७०॥
आतां ‘संततीचा विचार’ ऐक. एखाद्याला सुपुत्र असतो, किंवा कुपुत्र असतो. काही तर इतकी मूर्ख असतात की, त्यांच्यापासून आईबापांना रात्रंदिवस दुःखच प्राप्त होते ५७०.

जो नरकापासोनि तारी । जो पूर्वजांतें उद्धरी ।
जो मातापित्यांची भक्ति करी । अव्यभिचारी हरिरूपें ॥७१॥
जो नरकापासून तास्तो, जो पूर्वजांचा उद्धार करतो, जो आईबाप हे केवळ परमेश्वरस्वरूप आहेत, असे समजून त्यांची अनन्य भक्ति करतो ७१;

जो सांडोनियां मातापिता । जाऊं नेणे आणिके तीर्था ।
त्याचेनि चरणतीर्थें पवित्रता । मानिती सर्वथा अनिवार ॥७२॥
जो आईबापाला सोडून दुसऱ्या तीर्थांना जाऊ इच्छीत नाही, त्यांच्या चरणाच्या तीर्थानं अनिवार पवित्रता प्राप्त होते असे समजतो ७२,

जैशीं रमा आणि नारायण । तैशीं मातापिता मानी जाण ।
चढत्या आवडीं करी भजन । नुबगे मन सेवेसी ॥७३॥
ज्याप्रमाणे लक्ष्मी आणि नारायण, त्याप्रमाणे आपली मातापितरें होत, असे समजून अधिकाधिक भक्तीनेच त्यांचे भजन करतो, त्यांच्या सेवेला मन कधीच कंटाळत नाहीं ७३,

जो अतिसत्त्वें सात्त्विकु । जो पितृवचनपाळकु ।
जाणे धर्माधर्मविवेकु । हा नैसर्गिकु स्वभावो ॥७४॥
जो सत्त्वाने अतिशय सात्त्विक, जो पितृवचन पाळणारा, धर्म कोणता व अधर्म कोणता ह्याचा विचार करणे हाच ज्याचा नैसर्गिक स्वभाव; ७४

जो मातापित्यांचे सेवेवरी । आपआपणियातें तारी ।
सकळ पूर्वजांतें उद्धरी । तो संसारीं सुपुत्र ॥७५॥
जो मातापित्यांच्या सेवेनेंच आपला उद्धार करून घेतो, आणि साऱ्या पूर्वजांनाही मुक्त करतो, तोच संसारामध्ये ‘सत्पुत्र’ होय ७५.

ऐशिया पुत्रासी प्रतिपाळितां । सुख पावे मातापिता ।
पूर्वजांतें उद्धरिता । स्वयें तरता पितृभक्तीं ॥७६॥
अशा पुत्राचे लालनपालन करतांना आईबापांना आनंद वाटतो. तो पितृभक्ति करून स्वतःही तरतो, आणि पूर्वजांचाही उद्धार करतो ७६.

झालिया सुपुत्रसंतति । एवढी होय सुखप्राप्ती ।
आतां असत्प्रजांची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७७॥
‘सत्पुत्र’ पोटी आला म्हणजे एवढी सुखप्राप्ति होते. आतां ‘ असाजांची’ स्थिति तुला सांगतों ऐक ७७.

मूळींचें पद ‘असत्प्रज’ । त्यांचे वर्तणुकेची वोज ।
सांगतां अत्यंत निर्लज्ज । तेही मी तुज सांगेन ॥७८॥
मुळांत ‘ असप्रज’ असा शब्द आहे. त्याच्या वर्तणुकीची तव्हा सांगणे म्हणजे अतिशय निर्लजपणा आहे. पण तीही तुला सांगतों ७८.

पोटीं उपजले जे लेंक । त्यांची वर्तणुक ऐशी देख ।
आवडे कांता आणि कनक । उपेक्षिती निःशेख माता-पिता ॥७९॥
असे जे मुलगे पोटी जन्माला येतात त्यांची वर्तणूक अशी असते की, त्यांची आवड काय ती बायकोवर आणि द्रव्यावर. आईबापांची अगदीच हेळसांड करणारे ७९.

जे कुडे कुचर कुलट । जे का अत्यंत शठ नष्ट ।
जे अनाचारी कर्मभ्रष्ट । अति दुष्ट दुर्जन ॥५८०॥
मोठे द्वाड, अंगचोर, व्यभिचारी, अत्यंत शठ, नष्ट, अनाचारी, कर्मभ्रष्ट, अत्यंत दुध, दुर्जन ५८०;

त्यांसी भांडवल लटिक । लटकी द्यावी आणभाक ।
माता पिता ठकावीं देख । सात्त्विक लोक नाडावे ॥८१॥
त्यांचे भांडवल म्हणजे खोटे बोउणे, खोटी शपथ वहाणे, आईबापांना ठकविणे, आणि सात्त्विक लोकांना नाडणे हाच त्यांचा धंदा ८१

आपण नरका जावें ते जाती । परी पूर्वज नेले अधोगती ।
ऐशियां प्रजांतें प्रतिपाळिती । ते दुःखी होती अतिदुःखें ॥८२॥
ते स्वतः नरकाला जावयाचे जातातच; परंतु पूर्वजांनासुद्धा तेथे घेऊन जातात ! अशा कुपुत्रांचा जे प्रतिपाळ करतात, ते अत्यंत दुःखाने दुःखी होतात हे काही सांगावयाला नको ८२.

पोटामाजीं उठिला फोडू । त्यासी करितां न ये फाडू ।
तैसा असत्प्रजीं संसार कडू । दुःख दुर्वाडु भोगवी ॥८३॥
पोटाच्या आंत करट झाले, तर ते जसें फोडता येत नाही, त्याप्रमाणे वाईट संततीचा संसार कडू असून तो असा दुःख भोगावयाला लावतो ८३.

ऐशिया पुत्रांचें जितां दुःख । मेल्यापाठीं देती नरक ।
असत्प्रजांचें कवतिक । दुखें दुःख अनिवार ॥८४॥
असे पुत्र जिवंतपणी दुःख भोगावयास लावतात आणि मेल्यावर नरकाला नेतात ! याप्रमाणे दुष्ट संततीचे कौतुक म्हणजे दुःखाने अनिवार ताप भोगणें हेंच ८१.

गांठीं असोनियां ‘धन’ । जो सत्पात्रीं न करी दान ।
तें सर्व दुःखाचें मूळ जाण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८५॥
याचप्रमाणे पदरीं ‘द्रव्य’ असून ते सत्पात्रीं दान न करणें हेंच सर्व दुःखाचे मूळ होय. म्हणून द्रव्यलोम्बाला भयंकर दुःख भोगावे लागते ८५.

धन अर्जावया अनेक । उपाय अपाय करिती लोक ।
नाना क्लेश भोगोनि दुःख । द्रव्य देख सांचिलें ॥८६॥
द्रव्य मिळविण्याकरितां अनेक प्रकारच्या युक्ति प्रयुक्ति व घातपात करावे लागतात, बरें इतकेंही करून अनेक प्रकारची संकरें व दुःखे सोसून द्रव्य मिळविलेंच ८६,

प्रथम दुःख द्रव्य सांचितां । दुसरें दुःख द्रव्य रक्षितां ।
स्त्रीपुत्र प्रवर्ते घाता । इतर कथा ते भिन्न ॥८७॥
तर पहिल्या प्रथम त्याचा साठा करावपाला तुम्म भोगावे लागते; नंतर ते द्रव्य संरक्षण करण्याकरिता दुःख भोगावे लागते, त्या दव्याकरिता प्रत्यक्ष बायकामुले सुद्धा घात करावयाला तयार होतात, मग इतरांची गोष्ट काय सांगावी ! ८७.

सत्पात्रीं न करितां दान । जेणें रक्षिलें यक्षधन ।
तेथें दुःखबाहुल्यें उठी विघ्न । धर्मरक्षण तेथ नाहीं ॥८८॥
सत्पात्री दान न करितां ज्याने कुबेराचे धन रक्षण करून ठेविलेले असते, त्याचे ठिकाणी अतिशय दुःखामुळे विघ्ने उत्पन्न होतात आणि त्यांत धर्माचे रक्षण होत नाहीं ८८.

ऐसेंही धन गेलियासाठीं । अतिदुःखें भडका उठी ।
धनवंता जन्मसाटी । दुःखकोटी भोगिती ॥८९॥
अशा रीतीने राखिलेलेही द्रव्य गेले तर मग त्यासाठी अत्यंत दुःखाने भडका उठतो. अशा रीतीने श्रीमंतांना शेंकडों जन्म घ्यावे लागतात व ते कोट्यवधि दुःखेंच भोगीत असतात ८९.

येवोनियां नरदेहासी । अविकळ वाचा असे ज्यासी ।
जो नुच्चारी हरिनामासी । पाप त्यापाशीं खतेलें ॥५९०॥
नरदेहाला येऊन ज्याला अव्यंग वाणी प्राप्त झालेली आहे, आणि तरीदेखील जो हरिनामाचा उच्चार करीत नाही, त्याच्यापाशीं पातक हें ठेवलेलेच आहे ५९०.

पुरिले लोहा माती खाये । तें उपेगा न ये वायां जाये ।
तैशी नामेंवीण वाचा पाहें । वृथा जाये सर्वथा ॥९१॥
पुरून ठेविलेसा लोखंडाला माती खाऊन टाकिते, म्हणून ते उपयोगाला न येतां फुकट जाते, त्याप्रमाणे नामोच्चाराशिवाय वाणी ही सर्वस्वी व्यर्थ जाते ९१.

आसनध्यानपरिश्रम । न करूनि म्हणे जो राम राम ।
तेणें कोटि जन्मांचा हरे श्रम । उत्तमोत्तम ते वाणी ॥९२॥
आसन, ध्यान, ह्यांच्या खटपटींत न पडतां जो राम राम म्हणतो, त्याच्या कोट्यवधि जन्मातील कष्टांचा परिहार त्यायोगाने होतो, तीच वाणी अति उत्तम होय ९२.

जो नित्य जपे रामनाम । तो जाणावा मजचिसम ।
तेणेंचि केले सकळही नेम । पुरुषीं पुरुषोत्तम तो जाण ॥९३॥
जो नित्य रामनामाचा जप करतो, तो माझ्यासारखाच (परमेश्वरासारखाच ) आहे असे समजावे. सर्व नियम त्यानेच पाळले असे होईल, आणि सर्व पुरुषांत तोच उत्तम पुरुष होय हें लक्षात ठेव ९३.

चतुर्वर्णांमाजीं जो कोणी । अविश्रम रामू जपे वाणीं ।
तोचि पढियंता मजलागुनी । आन त्रिभुवनीं नावडे ॥९४॥
चतुर्वर्णामध्ये जो कोणी वाणीने रामनामाचा जप अविश्रांत करील, तोच मला आवडता होतो. त्रिभुवनांतही मला त्यावांचून दुसरा कोणी आवडता नाहीं ९४.

ऐसें रामनाम नावडे ज्यासी । तैं पापमुखरोग आला मुखासी ।
तो स्वयें मुकला निजसुखासी । आप आपणासी घातकू ॥९५॥
असें रामनाम ज्याला आवडत नाही, त्याच्या तोंडाला पातकरूपी मुखरोग झाला म्हणून समजावें. तो आपणच आपल्या सुखाला मुकला व आपणच आपल्याला घातक झाला असें समजावें ९५.

रामनामेंवीण जें तोंड । तें जाणावें चर्मकुंड ।
भीतरी जिव्हा तें चामखंड । असत्यकांड काटली ॥९६॥
रामनामाशिवाय जें तोंड असेल ते केवळ चामड्याचे कुंडच समजावें, आणि त्यांत असलेली जीभ म्हणजे केवळ चामड्याचा तुकडा होय. असत्यमलाच्या पुटांनी ती जीभ भरलेली असते असे समजावे ९६.

हो कां हरिनामेंवीण जे वाणी । ते गलितकुष्ठे जाली कोढिणी ।
असत्यकुष्ठाचें गळे पाणी । उठी पोहणी निंदेची ॥९७॥
किंवा हरिनामाशिवाय जी वाणी असेल, ती गलितकुष्टानें कुष्टयुक्त झाली असे समजावे. तिच्यांतून असत्यरूप कोडाचें पाणी झिरपत असते आणि निंदेची घाण सुटते ९७.

ऐशिये वाचेसी रोकडे । पडती अधर्माचे किडे ।
सुळबुळीत चहूंकडे । मागेंपुढें वळवळित ॥९८॥
असल्या वाणींत खरोखर अधर्माचे किडे पडतात आणि ते चहूंकडे युचबुचून वळवळत असतात ९८.

ते वाचा होय ज्यासमोर । देखे तो पाठिमोरा ठाके नर ।
नाक झांकूनि म्हणे हरहर । लहान थोर थुंकिती ॥९९॥
ती वाणी ज्याच्यासमोर येते, तो पुरुष तिच्याकडे पाठमोरा वळतो व नाकाला पदर लावून ‘हरहर’ म्हणतो. लहानथोर सर्व माणसें त्या वाणीला ‘यू’ ‘थू’ करतात ९९.

ते वाचेची जे दुर्गंधी । मजही न साहवे त्रिशुद्धी ।
हे वाचा वाहे तो दुर्बुद्धी । अनर्थसिद्धि अतिदुःख ॥६००॥
त्या वाणीची जी दुर्गंधी असते, ती खरोखरच मला सुद्धा सहन होत नाही. अशी वाणी जो बाळगतो तो दुर्बुद्धि होय. त्याच्यावर अनर्थ ओढवतात व अत्यंत दुःखें प्राप्त होतात ६००.

सोलींव दुःखाचें अतिदुःख । त्या नराची वाचा देख ।
केवळ निरय तें त्याचें मुख । नामीं विन्मुख जे वाणी ॥१॥
त्या पुरुषाची वाणी म्हणजे गाळीव दु:खांतले मोठे दुःखच होय असे समज. जी वाणी नामाला विन्मुख होते, ती त्याची वाणी म्हणजे शुद्ध नरक होय १.

हो कां वेदशास्त्रसंपन्न वाणी । करूनि निंदकू नामकीर्तनीं ।
तो पापी महापाप्याहूनी । त्याचेनि अवनी अतिदुःखी ॥२॥
मग ती वाणी वेदशास्त्र पढलेली का असेना ? नामकीर्तनाची जो निंदा करतो, तो महापातक्याहूनही मोठा पातकी होय. त्याच्यामुळे पृथ्वीला सुद्धा अतिशय पीडा होते २.

नामकीर्तनें धन्य वाणी । येचि अर्थी सारंगपाणी ।
प्रवर्तला निरूपणीं । विशद करूनी सांगावया ॥३॥नामकीर्तनानेच वाणी धन्य होते, ह्याच अर्थाचे निरूपण स्पष्ट करून सांगण्याला श्रीकृष्ण तयार झाला ३.

यस्यां न मे पावनमङ्ग कर्म स्थित्युद्‍भवप्राणनिरोधमस्य ।
लीलावतारेप्सितजन्म वा स्याद् वन्ध्यां गिरं तां बिभृयान्न धीरः ॥ २० ॥[श्लोक २०] हे उद्धवा ! जी वाणी या जगाच्या उत्पतिस्थितीसंहारात्मक माझ्या पवित्र कर्मांचे किंवा अन्य लोकप्रिय लीलावतारांचे वर्णन करीत नाही, ती वाणी वांझ होय ज्ञानी पुरूषाची वाणी अशी असू नये. (२०)

जगातें पवित्र करिती । महादोषांतें हरिती ।
माझीं नामकर्में गुणकीर्ती । जड उद्धरती हरिनामें ॥४॥
माझी नामें, कर्मे आणि गुणांची कीर्ति ही जगाला पवित्र करतात, व महान् दोषांना नष्ट करतात. हरिनामस्मरणाने जड जीवांचा उद्धार होतो ४.

म्हणसी तूं बोलिलासी निजवर्म । मी विद्याविद्यातीत ब्रह्म ।
त्या तुज कैंचे गुण नाम कर्म । कीर्तनधर्म केवीं घडे ॥५॥
तूं म्हणशील की, “तूं आपलें वर्म सांगितले आहेस की, ‘मी विधेच्या व अविद्येच्या. अतीत असा ब्रह्मस्वरूप आहे. ‘ मग त्या तुला गुण, नाम आणि कर्म तरी कशाचे ? आणि कीर्तनधर्म तरी घडणार कसा ?” ५.

उद्धवा हें मनीं न धरीं । मी स्वलीला स्वमायें करीं ।
नाना अवतारांतें धरीं । न करूनि करीं स्थित्यंतू ॥६॥
पण उद्धवा ! असें तूं मनांत आणूं नकोस. मी आपल्याच मायेच्या आश्रयाने आपल्या लीला करतों, अनेक अवतार धारण करतों आणि काही न करतांच सर्वांचे पालन व संहार करतों ६.

त्रिगुणगुणी गुणावतार । ब्रह्मा आणि हरिहर ।
तिहीं रूपीं मीच साचार । चराचर करीं हरीं ॥७॥
ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर हे त्रिगुणात्मक तीन गुणावतार आहेत, पण त्या तिघांच्याही रूपांमध्ये खरोखर मीच असून मीच चराचरांना निर्माण करतो व त्यांचा संहारही करतों ७.

स्रष्टारूपें मी स्रजिता । विष्णुरूपें मी प्रतिपाळिता ।
रुद्ररूपें मी संहर्ता । जाण तत्त्वतां मी एकू ॥८॥
ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टीला उत्पन्न करणारा मीच; विष्णूच्या रूपाने तिचा प्रतिपाळ करणारा मीच; आणि रुद्ररूपाने तिचा संहार करणाराही खरोखर एक मीच आहे असे समज ८.

बाल्यतारुण्यवार्धक्यांसी । एक पुरुष तिहीं अवस्थांसी ।
तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । गुणकर्मांसी मी कर्ता ॥९॥
बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्थांचा कर्ता जसा एकच पुरुष असतो, त्याप्रमाणे उत्पत्ति, स्थिति व प्रळय ह्यांचा श्राणि गुणकर्माचा कर्ता मीच आहे ९.

मी कर्ताचि अकर्ता । अकर्तेपणे कर्ता ।
हें माझें मीचि जाणें तत्त्वतां । आणिकासी सर्वथा कळेना ॥६१०॥
मी कर्ता असूनच अकर्ता आहे, आणि अकर्तेपणाने कर्ता आहे. हे खरोखर माझें मीच जाणतों. दुसऱ्याला मुळीच कळत नाही ६१०.

हींचि माझीं नामकर्में गातां । माझी पदवी लाभे वक्ता ।
माझे लीलावतार कीर्तितां । कीर्तिमंतां निजलाभू ॥११॥
माझी नामें आणि हीच माझी कमैं वर्णन केली, तर त्या वक्त्याला माझीच पदवी प्राप्त होते, आणि माझ्या लीलावतारांचे कीर्तन केले तर कीर्तन करणारांना आत्मप्राप्ति होते ११.

अवतारांमाजीं उत्तमोत्तम । श्रीरामकृष्णादि जन्मकर्म ।
नाना चरित्रें संभ्रम । अविश्रम जे गाती ॥१२॥
सर्व अवतारांमध्येही उत्तमोत्तम अशी श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिकांची जन्मकर्म, त्यांची नाना प्रकारची चरित्रे व लीला जे अखंड गायन करतात त्यांना आत्मप्राप्ति होते १२.

सेतु बांधिला अवलीळा । सागरीं तारिल्या शिळा ।
गोवर्धनु उचलिला हेळा । दावानळा प्राशिलें ॥१३॥
श्रीरामाने सहज लीलेने सेतु बांधिला व समुद्रामध्ये दगड तरावयास लावले, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत खेळता खेळतां उचलला व दावाग्नि गिळून टाकला १३.

ताटिका वधिली एके बाणीं । पूतना शोखिली तानेपणीं ।
अहल्या तारिली चरणीं । यमलार्जुन दोन्ही उद्धरिले ॥१४॥
श्रीरामाने एका बाणानेंच ताटिका मारली, श्रीकृष्णाने तान्हेपणांतच पूतनेला शोधून मारिली. श्रीरामाने पायाने अहल्येचा उद्धार केला, श्रीकृष्णानें यमलार्जुन दोघेही उद्धरिले १४.

रावणू आदळला धनुष्य वाहतां । तें भंगोनि पर्णिली सीता ।
मथूनि चैद्यादि समस्तां । भीमकदुहिता आणिली ॥१५॥
जे धनुष्य उचलताना रावणही आदळून पडला, तेंच धनुष्य मोडून श्रीरामानें सीतेला वरिले, श्रीकृष्णाने शिशुपालादि सर्वांना जिंकून भीमकराजाची कन्या (रुक्मिणी) आणली १५.

मारिला सुबाहु खर दूषणू । अघ बक केशिया मारी श्रीकृष्णू ।
सुग्रीवू स्थापिला राज्य देऊनू । येरें उग्रसेनू स्थापिला ॥१६॥
श्रीरामाने सुबाहु, खर, दूषण यांना मारले, श्रीकृष्णाने अघासुर, बकासुर, केशी, यांना मारलें. श्रीरामाने सुग्रीवाला राज्य देऊन त्याची सिंहासनावर स्थापना केली, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने उपसेनाला सिंहासनावर बसविले १६.

मेळवूनि वानरांचा पाळा । वधू केला राक्षसकुळा ।
मेळवून बाळां गोपाळां । मल्लां सकळां मर्दिलें ॥१७॥
श्रीरामानें वानरांचा समुदाय जमवून राक्षसकुळाचा वध केला, श्रीकृष्णाने बाळगोपाळ जमवून सर्व मल्लांना मारून टाकले १७.

रावणकुंभकर्णां केला मारू । मारिला कंस चाणूरू ।
रामें ठकिला वाली वानरू । ठकिला महावीरू काळयवनू ॥१८॥
श्रीरामाने रावण व कुंभकर्ण मारले, श्रीकृष्णानें कंस व चाणूर यांचा वध केला. श्रीरामाने वाली वानराला फसविलें, श्रीकृष्णानें महाघोर अशा कालयवनाला फसविलें १८.

रामें बिभीषण स्थापिला । कृष्णें धर्म संस्थापिला ।
एक पितृवचनें वना गेला । एक घेऊनि आला गतपुत्र ॥१९॥
श्रीरामाने बिभीषणाची राज्यावर स्थापना केली, श्रीकृष्णाने धर्माची राज्यावर स्थापना केली. एक बापाच्या आज्ञेकरितां वनवासाला गोला, तर दुसरा मातेच्या मृतपुत्रांना घेऊन आला १९.

हीं अवतारचरित्रें वर्णितां । चोरटा वाल्मीकि झाला तत्त्वतां ।
व्यास जारपुत्र सर्वथा । केला सरता तिहीं लोकीं ॥६२०॥
ही अवतारचरित्रे वर्णन करूनच, खरोखर पूर्वी चोरटा असलेला कोळी थोर वाल्मीकि ऋषि झाला; आणि व्यास हा खरोखर जारिणीचा पुत्र, पण या अवतारचरित्रगायनानेच त्याला त्रिभुवनांत श्रेष्ठ करून सोडले ६२०.

या दोहीं अवतारांची पदवी । वर्णितां दोन्ही झाले महाकवी ।
व्यास वाल्मीकि वंदिजे देवीं । कीर्तिगौरवीं गौरविले ॥२१॥
या दोन्ही अवतारांची महती वर्णन करता करतांच दोघेही महाकवि झाले. व्यास-वाल्मीकांना देवांनीही वंदन करून स्तुतिस्तोत्रांनी त्यांना गौरविले आहे २१.

त्या महाकवींची कवित्वकथा । शेष नेत्रद्वारें श्रवण करितां ।
दोन सहस्र नयनीं आइकतां । धणी सर्वथा बाणेना ॥२२॥
त्या महाकवींची काव्यकथा शेष हा नेत्रद्वाराने श्रवण करता करतां व दोन सहस्र नेत्रांनी ऐकता ऐकतांसुद्धा त्याची तृप्ति होत नाही २२.

हेचि कथा स्वर्गाच्या ठायीं । श्रवण करावया पाहीं ।
इंद्र लागे बृहस्पतीचे पायीं । कीर्ति लोकत्रयीं वर्णिती ॥२३॥
हीच कथा स्वर्गामध्ये श्रवण करण्यासाठी इंद्र बृहस्पतीच्या चरणी लागला. अशी ही अवतारचरित्रांची कीर्ति त्रिभुवनांत वर्णन करीत असतात २३.

असो कथेचें महिमान । माझेनि नाममात्रें जाण ।
तारिला अजामिळ ब्राह्मण । गजेंद्र‍उद्धरण हरिनामें ॥२४॥
कथेचा महिमा वर्णन करणे एवढ्यावरच थांबवितों. पण माझ्या नांवाचे केवळ स्मरण करण्यानेही मी अजामिळ ब्राह्मणाचा उद्धार केला. हरिनामस्मरणानेंच गजेंदाचा उद्धार झाला २४.

पक्ष्याचे मिषेंकरूनी । रामु या दों अक्षरस्मरणीं ।
महादोषांची श्रेणी । तत्काळ कुंटिणी तारिली ॥२५॥
पक्ष्याच्या निमित्ताने राम ह्या दोन अक्षरांचे स्मरण केले, पण तेवढ्यावरून महापातकांची रांगच अशी जी कुंटीण तीही तत्काल उद्धरिली २५.

माझिया नामासमान । नव्हे वेदशास्त्रशब्दज्ञान ।
वेदशास्त्रांचा बोधु कठिण । तैसें जाण नाम नव्हे ॥२६॥
वेदशास्त्रांतील शब्दज्ञानसुद्धा माझ्या नामासमान व्हावयाचें नाही. कारण, वेदशास्त्रांचा अर्थ समजणे कठीण आहे, तसें माझें नाम कठीण नाही हे लक्षात ठेव २६.

पठणमात्रें वेदशास्त्रवक्ता । नव्हे मजमाजीं येणेंचि सरता ।
स्वभावें माझें नाम घेतां । अतिपढियंता मज होये ॥२७॥
पठण केलें तर वेदशास्त्र बोलता येते, तरी तेवढ्यानेच काही मजमध्ये प्रवेश होत नाही. पण सहजगत्या माझें नाम घेतले तरी तो माझा आवडता होतो २७.

वेदशास्त्रीं अधिकारी ब्राह्मण । नामासी अधिकारी चार्‍ही वर्ण ।
जग उद्धरावया कारण । नाम जाण पैं माझें ॥२८॥
वेदशास्त्रांमध्ये अधिकारी फक्त ब्राह्मणच आहेत. परंतु नामाचे अधिकारी चारही वर्ण आहेत; आणि जगाचा उद्धार करावयास कारण, माझें नामच आहे हे लक्षात ठेव २८.

जेथ नित्य नामाचा उच्चार । तेथ मी असें साचार ।
येथ करणें न लगे विचार । नाम सधर तारावया ॥२९॥
जेथे नित्य नामाचा उच्चार होत असतो, तेथे खरोखर मीच असतो. यांत विचार करण्याचे कारण नाही. नाम हे तारावयाला समर्थ आहे २९.

ते माझे जन्म नाम कीर्ति गुण । जे वाचेसी नाहीं पठण ।
ते वाचा पिशाचिका जाण । वृथालापन वटवटी ॥६३०॥
ते माझे जन्म, नाम, कीर्ति, किंवा गुणानुवाद ज्या वाणीला पठण होत नाहीत, ती वाणी व्यर्थ बडवर करणारी हडळ आहे म्हणून समजावें ६३०.

माझे कीर्तीवीण जें वदन । तें केवळ मद्याचें भाजन ।
त्या उन्मादविटाळाभेण । नाम जाण तेथ न ये ॥३१॥
माझी कीर्ति वर्णन केल्याशिवाय जे तोंड असेल, ते केवळ मच भरलेलें महापातकांची लाखांचा अर्थ समजणे कठीण आ होत नाही. पण सहजगत्या मा भांड होय. त्या मद्यामुळे येणाऱ्या नशेचा विटाळ होईल या भयाने नाम तेथे येतच नाही ३१.

जेथ उच्चारु नाहीं नामाचा । ते जाणावी वांझ वाचा ।
गर्भ न धरि हरिकथेचा । निष्फळ तिचा उद्योगू ॥३२॥
ज्या वाणीमधून नामाचा उच्चार होत नाहीं, ती वाणी वांझ समजावी. कारण ती हरिकथेचा गर्भ धारण करीत नाही. त्या वाणीचा इतर सर्व उद्योग निष्फळ होय ३२.

उद्धवासी म्हणे श्रीरंगू । आइकें बापा उपावो चांगू ।
माझा नाममार्ग सुगमू सांगू । न पडे पांगू आणिकांचा ॥३३॥
श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, बाबा ! एक चांगला उपाय ऐक. माझा नाममार्ग अत्यंत सुगम असून परिपूर्ण आहे. तेथे इतर मार्गाचे कारणच नाही ३३.

हरिनामेंवीण वाणी । कदा न राखावी सज्जनीं ।
हाचि अभिप्रावो चक्रपाणीं । प्रीतिकरोनि सांगीतला ॥३४॥
ह्याकरितां सजनांनी हरीच्या नामाशिवाय वाणी ठेवूच नये. हाच हेतु श्रीकृष्णांनी मोठ्या प्रेमानें प्रदर्शित केला ३४.

करूनियां शब्दज्ञान । अतियोग्यतां पंडितपण ।
तेणें माझी प्राप्ति नव्हे जाण । वैराग्येंवीण सर्वथा ॥३५॥
शब्दव्युत्पत्तीचे ज्ञान करून घेतले तर त्याची योग्यता मोठी होईल, त्याला पंडितपणा प्राप्त होईल, पण त्यामुळे वैराग्य प्राप्त होणार नाही व वैराग्याशिवाय माझी प्राप्ति मुळीच व्हावयाची नाही ३५.

अथवा वैराग्यही जालें । परी तें विवेकहीन उपजलें ।
जैसें धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आलें । नेत्रेंवीण गेलें स्वराज्य ॥३६॥
एखादे वेळी वैराग्यही उत्पन्न झाले, पण ते जर विवेकाशिवायच उत्पन्न झाले असेल, तर जसें धृतराष्ट्राला ज्येष्टपणा आला असूनही डोळ्यांवांचून त्याचे राज्य गेलें असें झाले ३६,

तैसें वैराग्य विवेकेंवीण । केवळ आंधळें अनधिकारी जाण ।
नाहीं सन्मार्गदेखणेपण । वृथा परिभ्रमण तयाचें ॥३७॥
त्याप्रमाणे विवेकाशिवाय वैराग्य हे केवळ आंधळे व अनधिकारी आहे हे लक्षात ठेव. त्याला सन्मार्ग दिसण्याचे सामर्थ्य नाही. त्याचे परिभ्रमण व्यर्थ होय ३७.

जो विवेकें पूर्ण भरित । त्यावरी वैराग्य वोसंडत ।
माझी जिज्ञासा अद्‍भुत । तेंचि निश्चित सांगतू ॥३८॥विवेकाने जो परिपूर्ण भरलेला असतो, त्याच्या ठिकाणी वैराग्य आपण होऊन उतूं येत असते. त्याला माझी जिज्ञासा काही विलक्षण असते. तेच खरोखर श्रीकृष्ण सांगतो ३८.

एवं जिज्ञासयापोह्य नानात्वभ्रममात्मनि ।
उपारमेत विरजं मनो मय्यर्प्य सर्वगे ॥ २१ ॥[श्लोक २१] अशा प्रकारे तत्त्वजिज्ञासेने आत्म्यामध्ये अनेकत्त्वाचा होणारा भास दूर करावा आणि अशा प्रकारे शुद्ध झालेले मन सर्वव्यापी असलेल्या माझ्या ठिकाणी लावावे आणि इतर सर्व गोष्टी सोडून शांत बसावे. (२१)

नित्यमुक्त अव्ययो । स्वरूप जाणावया पहा हो ।
ज्याचा लागला दृढ भावो । आन आठवो नाठवे ॥३९॥
अहो ! हे पहा ! नित्यमुक्त व नाशरहित असें माझें स्वरूप जाणण्याविषयी ज्याची अगदी उत्कट इच्छा लागून राहिलेली असते, त्याला तिच्यापुढे दुसरे कांहींच आठवत नाही ३९.

ऐशी मज जाणावयाची अवस्था । त्या नांव बोलिजे जिज्ञासता ।
माझे प्राप्तीलागीं सर्वथा । पांडित्य मान्यता ते नेघे ॥६४०॥
अशी मला जाणण्याची जी उत्कंठा तिलाच जिज्ञासा असें म्हणतात. माझ्या प्राप्तीसाठी तो विद्वत्ता व मानमरातब कधीच स्वीकारीत नाहीं ६४०.

देहादि अध्यासू आपुल्या ठायीं । श्रवणें मननें मिथ्या केला पाहीं ।
दृढ विश्वास गुरूच्या पायीं । पूर्णब्रह्माच्या ठायीं निर्धारू ॥४१॥
आपल्याच ठिकाणी विचार करून देहादिक संसारचिंतन मिथ्या आहे असेंच श्रवणाने आणि मननाने त्याने निश्चित केलेले असते. त्यामुळे गुरूच्या पायांवर त्याचा पूर्ण विश्वास असतो, आणि पूर्ण ब्रह्माच्या ठायीं दृढ निश्चय असतो ४१.

तेथ पुढारीं चालावया वाट । भगवद्‍भजनीं अतिउद्‍भट ।
कां सांडोनि कर्मकचाट । ध्याननिष्ठ तो होय ॥४२॥
तेव्हां पुढील मार्ग चालण्यासाठी तो भगवद्‌भजनामध्ये अत्यंत तत्पर होतो, किंवा कर्माचा खटाटोप सोडून देऊन तो ध्याननिष्ठ होतो ४२.

तेथ ध्येय ध्याता ध्यान । न दिसे त्रिपुटीचें भान ।
कोंदलें चैतन्यघन । वस्तु सनातन तो पावे ॥४३॥
तेव्हां ध्येय, ध्याता आणि ध्यान ह्या त्रिपुटीचे भान त्याला राहात नाहीं, जिकडे तिकडे सर्व चैतन्यच भरून राहिल्यामुळे तोही सनातन परब्रह्मच बनून राहातो ४३.

तेथ कैंचा कर्ता क्रिया कर्म । फिटला नानात्वाचा भ्रम ।
सबाह्य कोंदलें परब्रह्म । जाला उपरम गुरुकृपा ॥४४॥
तेथें कर्ता, कर्म आणि क्रिया कशाची ? भेदभावाचा सर्व भ्रम फिटून जातो, आंत-बाहेर परब्रह्मच भरून राहते, आणि गुरुकृपेनें मन निश्चळ होऊन राहतें ४४.

सर्वगत सर्वकाळ । सर्वदेशीं सर्वीं सकळ ।
वस्तु असे जें केवळ । तेथ निश्चळ निजबोधू ॥४५॥
सर्वत्र, सर्वकाळ, सर्वदेशी आणि सर्वांमध्ये केवळ जें परब्रह्म व्यापून असते, तेथेंच आत्मज्ञान स्थिर होते ४५.

ऐशिये वस्तूची धारणा । ज्याचेनि न करवे जाणा ।
तरी सुगम उपाया आना । एक विचक्षणा सांगेन ॥४६॥अशा परब्रह्माचें ध्यान ज्याच्याने करवत नाही, त्याच्याकरितांही हे चतुरा ! दुसरा एक सोपा उपाय सांगतो, ऐक ४६.

यद्यनीशो धारयितुं मनो ब्रह्मणि निश्चलम् ।
मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर ॥ २२ ॥[श्लोक २२ ] जर माझ्या ठिकाणी मन स्थिर करण्यास असमर्थ असशील, तर सर्व कर्मे निरपेक्षपणे माझ्यासाठीच कर. (२२)

स्वभावतां मन चंचळ । विषयवासना अतिचपळ ।
निर्गुण ब्रह्मीं केवळ । नाहीं बळ प्रवेशावया ॥४७॥
मन हे स्वभावत:च चंचळ आहे, आणि विषयवासना त्याहून अत्यंत चपल आहे. यामुळे निर्गुण अशा ब्रह्मामध्ये प्रवेश करावयाचे सामर्थ्य त्या मनाला येत नाही ४७.

तरी सांख्य योग संन्यासू । हा न करावया आयासू ।
माझिया भक्तीचा विलासू । अतिउल्हासू करावा ॥४८॥
ते सामर्थ्य आणण्याकरितां सांख्य, योग किंवा संन्यास यांचा जो मार्ग आहे, त्या मार्गातील परिश्रम चुकवावयाचे असल्यास अत्यंत उल्हासाने माझी भक्तीच वाढवावी म्हणजे झालें ४८.

मागें बद्धमुक्तांचें निरूपण । सांगीतलें मुक्तांचें लक्षण ।
वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंही व्याख्यान दाविलें ॥४९॥
मागें बदमुक्तांची लक्षणे सांगतांना मुक्ताचे लक्षणही सांगितले होते, आणि शब्दपांडित्य करणारांच्या पोकळ शब्दज्ञानाचेही विवेचन केले होतें ४९.

आतां आपुली निजभक्ती । सांगावया उद्धवाप्रती ।
अतिआदरें श्रीपती । भक्तीची स्थिति सांगतु ॥६५०॥
आता आपली आत्मभक्तीही उद्धवाला सांगावी म्हणून अत्यंत आदराने श्रीकृष्ण भक्तीचे स्वरूप सांगत आहेत ६५०.

उद्धवा चढत्या आवडीं मत्कर्म । जे भक्तीसी विकावा मनोधर्म ।
माझें स्मरावें गुणकीर्तिनाम । नाना संभ्रमविनोदें ॥५१॥
उद्धवा ! अत्यंत आवडीने माझे कार्य करणे असेल, तर भक्तीलाच मनोधर्म विकून टाकावा, आणि अनेक प्रकारच्या आनंददायक पद्धतींनी माझे गुण, कीर्ति व नाम यांचे स्मरण करावें ५.

माझेनि भजनें कृतकृत्यता । दृढ विश्वास धरोनि चित्ता ।
भजनीं प्रवर्तावें सर्वथा । अविश्रमता अहर्निशीं ॥५२॥
माझ्या भजनानेच कृतकृत्यता होते असा मनामध्ये खतर विश्वास बाळगून रात्रंदिवस न थकता भजनामध्येच सर्वस्वी प्रवृत्त व्हावें ५२.

माझ्या भजनाच्या आवडीं । नुरेचि आराणुकेसी वाडी ।
वायां जावो नेदी अर्धघडी । भजनपरवडी या नांव ॥५३॥
माझ्या भजनाच्या आवडीनें मनांत समाधानाला सुद्धा जागा रहात नाही, (म्हणजे भजन पूर्ण झाले असें समाधान मानून थांबावे असे वाटत नाही) एक अर्धघडी सुद्धा वायां जाऊ देत नाही, याचंच नांव भजनाचा सुकाळ ५३.

माझ्या भजनीं प्रेम अधिक । न सांडावें नित्यनैमित्तिक ।
वैदिक-लौकिक-दैहिक । भक्तांसी बाधक नव्हे कर्म ॥५४॥
माझ्या भजनामध्ये जरी विशेष प्रेम असले, तरी वैदिक, लौकिक किंवा दैहिक असे नित्य-नैमित्तिक कर्म सोडूं नये. कारण भक्तांना ते कर्म कहीं बाधक होत नाही ५४.

आचरतां सकळ कर्म । न कल्पावा फळसंभ्रम ।
हेंचि भक्तीचें गुह्य वर्म । उत्तमोत्तम अधिकारू ॥५५॥
मात्र सर्व कर्म आचरण करतांना फलाच्या आशेची कल्पना करूं नये, हेच भक्ताचे गुह्य वर्म असून ते जाणणे हाच अत्युत्तम अधिकार आहे ५५.

उबगू न मनूनि अंतरीं । माझ्या प्रीतीं सर्व कर्मांतें करी ।
जो फळाशेतें कंहीं न धरी । भक्तीचा अधिकारी तो जाणा ॥५६॥
जो अंत:करणांत कंटाळा न करितां माझ्यावर भक्ति ठेवून सर्व कम करतो, आणि जो फळाची आशा कधीही धरीत नाही, तोच भक्तीचा अधिकारी होतो हे लक्षात ठेव ५६.

पिंपुरें खावयाचे चाडें । न लाविती पिंपळाचीं झाडें ।
तेंवीं कर्में करितां वाडेंकोडें । फळाशा पुढें उठेना ॥५७॥
पिंपळाची झाडें ही काही पिंपुरें खाण्याच्या आशेने लावीत नाहीत. त्याप्रमाणे आवडीने कमै केली असतां पुढे फलाशाही उत्पन्न होत नाही ५७.

माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता ।
माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्‍भक्तां मद्‍भावें ॥५८॥
माझें भजन करूं लागले असतां ज्ञानाचीही काही कमतरता पडत नाही. माझ्या भक्तांना माझ्यावर भक्ति ठेवून माझे भजन केल्यानेच नित्यमुक्तता प्राप्त होते ५८.

ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें ।
भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥
ज्ञानाशिवाय भक्ति घडत नाही असें जें म्हणतात, ते केवळ शब्दज्ञान होय. भक्तीनेच प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ति होते असे समज ५९.

यालागीं माझें भजन करितां । ज्ञानाचा पांग न पडे भक्तां ।
देहगेहांमाजीं वर्ततां । बंधन मद्‍भक्तां लागेना ॥६६०॥
महणून माझे भजन करितांना भक्तांना ज्ञानाची उणीव पडत नाही. घरादारांत वागले तरी माझ्या भक्तांना बंधन घडत नाही ६६०.

ज्याच्या मुखीं माझें नाम । ज्यासी माझा भजनसंभ्रम ।
ज्याच्या मनीं मी आत्माराम । त्याचें दासीकाम मुक्ति करी ॥६१॥
ज्याच्या तोंडांत माझें नाम असते, ज्याला माझ्या भजनाचा नाद असतो, मी आत्माराम ज्याच्या मनामध्ये असतो, त्याच्या घरी मुक्तीच दासीचें काम करीत असते ६१.

मुक्तीमाजीं विशेष कायी । वृत्ति निर्विषय असे पाहीं ।
भक्तांसी सर्व कर्मांच्या ठायीं । स्फुरण नाहीं विषयांचें ॥६२॥
पण ज्याची वृत्तीच निर्विषय झालेली असते, त्याला मुक्तीमध्ये विशेष ते काय ? भक्तांना कोणत्याही कर्मामध्ये विषयाचे स्फुरण नसते ६२.

भक्तांचे विषयीं नाहीं चित्त । त्यांचा विषय तो मी भगवंत ।
ते सदा मजमाजीं लोलुप्त । नित्यमुक्त यालागीं ॥६३॥
भक्तांचे चित्त विषयामध्ये नसते. मी भगवंत हाच त्यांचा विषय. ते नेहमी माझ्यामध्येच लोलुप असतात, म्हणून ते नित्यमुक्तच असतात ६३.

भक्त विषयो सेविती । ते ग्रासोग्रासीं मज अर्पिती ।
तेणेंचि त्यांसी वंदी मुक्ती । सर्व भूतीं मद्‍भावो ॥६४॥
भक्तांनी विषयाचे सेवन केले, तरी ते तो विषय घांसाघांसाला मलाच अपीत असतात, आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये त्यांना माझीच:भावना भासते, म्हणूनच त्यांना मुक्ति वंदन करते ६४.

यालागीं कर्मबंधन । मद्‍भक्तांसी न लगे जाण ।
करितां माझें स्मरण कीर्तन । जगाचें बंधन छेदिती ॥६५॥
म्हणून माझ्या भक्तांना कर्मबंधन तर लागत नाहींच, पण माझें स्मरण आणि कीर्तन करीत असतांनाच साऱ्या जगाचेही बंधन तोडून टाकतात ६५.

माझ्या भक्तांचें वसतें घर । तें जाण माझें निजमंदिर ।
मुक्ति तेथें आठौ प्रहर । वोळगे द्वार तयांचे ॥६६॥
माझ्या भक्तांचे जें राहते घर असते, तेंच माझे स्वतःचे घर हें लक्षात ठेव, स्याच्या दाराशी अष्टौप्रहर मुक्ति हात जोडून उभी असते ६६.

माझें भजन करितां । कोण्या अर्थाची नाहीं दुर्लभता ।
चहूं पुरुषार्थांचे माथां । भक्ति सर्वथा मज पढियंती ॥६७॥
माझें भजन करूं लागले असतां कोणत्याच गोष्टीची दुर्लभता राहात नाही. चारही पुरुषार्थांपेक्षां भक्ति ही मला फार आवडती आहे ६७.

ज्ञान नित्यानित्यविवेक । भक्तीमाजीं माझें प्रेम अधिक ।
तैसें प्रेमळाचे मजलागीं सुख । चढतें देख अहर्निशीं ॥६८॥
ज्ञान, नित्यानित्यविवेक आणि भक्ति यांमध्ये माझें अत्यंत प्रेम असते. त्याचप्रमाणे प्रेमळ भक्तांचेही मला रात्रंदिवस अधिकाधिकच सुख वाटते ६८.

जेवीं एकुलतें बाळक । जननीसी आवडे अधिक ।
तैसें प्रेमळाचें कौतुक । चढतें सुख मजलागीं ॥६९॥
ज्याप्रमाणे एकुलते एकच मूल असले म्हणजे तें आईला अधिक आवडते, त्याप्रमाणे प्रेमळ भक्तांचे कौतुक करणे ह्यांतच मला अत्यंत सुख वाटते ६९.

यालागीं आपुलिये संवसाटीं । मी प्रेमळ घें उठाउठी ।
वरी निजसुख दें सदेंठीं । न घे तैं शेवटीं सेवकू होयें ॥६७०॥
ह्याकरितां प्रेमळ भक्त मी तत्काळ आपल्या आश्रयाखाली घेतों, आणखी वर त्याला आत्मसुख देतो. ते त्याने न घेतल्यास शेवटी मी त्याचा चाकर होतों ६७०.

प्रेमाचिया परम प्रीतीं । जेणें मज अर्पिली चित्तवृत्ती ।
तेव्हांचि त्याचे सेवेची सुती । जाण निश्चितीं म्यां घेतली ॥७१॥
प्रेमाच्या अतिशय आवडीने ज्याने आपली चित्तवृत्ति मला अर्पण केली, त्याची सेवा करण्याचा निश्चित विचार मी खरोखर त्याच वेळी केला म्हणून समज ७१.

प्रेमळाचें शेष खातां । मज लाज नाहीं घोडीं धुतां ।
शेखीं उच्छिष्ट काढितां । लाज सर्वथा मज नाहीं ॥७२॥
प्रेमळ भक्तांचे उच्छिष्ट खातांना किंवा त्यांची घोडी धुताना मला काही लाज वाटत नाही. फार काय सांगावें ? पण अखेरीस त्याच्या घरची उष्टी काढतांना सुद्धा मला मुळीच लजा वाटत नाहीं ७२.

मज सप्रेमाची आस्था । त्याचे मोचे मी वाहें माथां ।
ऐशी प्रेमळाची सांगतां कथा । प्रेम कृष्णनाथा चालिलें ॥७३॥
प्रेमळ भक्तांची मला इतकी आवड आहे की, त्यांचे जोडे सुद्धा मी मस्तकावर घेतों. अशी प्रेमळांची गोष्ट सांगतां सांगतां श्रीकृष्णालाही प्रेमाचे भरतें आले ७३.

कंठ जाला सद्‍गदित । अंग झालें रोमांचित ।
धांवोनि उद्धवासी खेंव देत । प्रेम अद्‍भुत हरीचें ॥७४॥
त्याचा कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने धावून उद्धवास आलिंगन दिले. श्रीकृष्णाचे प्रेमच कांहीं अद्‌भुत होते ! ७४.

सजल जाहले लोचन । वरुषताती स्वानंदजीवन ।
भक्तिसाम्राज्यपट्टाभिषिंचन । उद्धवासी जाण हरि करी ॥७५॥
डोळे अश्रृंनी भरून आले आणि ते स्वानंदजीवनाचा वर्षाव करूं लागले. जणू काय श्रीकृष्ण त्या अश्रृंनी उद्धवाला भक्तीच्या साम्राज्याचा पट्टाभिषेकच करीत होता ७५.

सहजें प्रेमळाची करितां गोठी । संमुख उद्धव देखिला दृष्टीं ।
धांवोनियां घातली मिठी । आवडी मोठी भक्तांची ॥७६॥
ओघानुसार प्रेमळ भक्ताची गोष्ट सांगतां सांगतां डोळ्यांसमोर उद्धव पाहिला, तेव्हां श्रीकृष्णाने एकदम धावून जाऊन त्याला मिठी घातली; श्रीकृष्णाला भक्तांची आवड फारच मोठी होती ७६.

आवडीं पडिलें आलिंगन । विसरला कार्यकारण ।
विसरला स्वधामगमन । मीतूंपण नाठवे ॥७७॥
आवडीने आलिंगन दिले तेव्हां श्रीकृष्ण कार्यकारणसुद्धा विसरला, निजधामाला जाण्याचे विस्मरण झाले. आणि मीतूंपणाही आठवला नाहीं ७७.

नाठवे देवभक्तपण । नाठवे कथानिरूपण ।
नाठवे उद्धवा उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥७८॥
आपण देव व उद्धव हा भक्त आहे अशी भेदभावाची आठवणच नाहींशी झाली. कथानिरूपण करावयाचीही आठवण राहिली नाही. उद्धवाला उद्धवपण आठवेनासे झाले आणि कृष्णाला कृष्णपणही आठवलें नाही अशी स्थिति झाली ७८.

प्रेमळाचे गोठीसाठीं । परात्पर परतटीं ।
दोघां ऐक्यें पडली मिठी । आवडी मोठी प्रेमाची ॥७९॥
प्रेमळाची गोष्ट सांगतांना परात्पराच्या पलीकडे दोघांची ऐक्यामुळे मिठी पडली. प्रेमाची आवड फार मोठी आहे ! ७९.

आजि भक्तीचें निजसुख । उद्धवासी फावलें देख ।
भक्तीचें प्रेम अलोलिक । उद्धवें सम्यक विस्तारिलें ॥६८०॥
भक्तीचें खरें खरे सुख काय तें उद्धवाला आज प्राप्त झाले. भक्तीचे जें अलौकिक प्रेम म्हणून असते, तेच उद्धवाने या वेळी व्यक्त करून दाखविले ६८०.

श्रीकृष्ण निजधामासी जातां । उद्धव जरी हें न पुसता ।
तरी ज्ञानवैराग्यभक्तिकथा । कां सांगता श्रीकृष्ण ॥८१॥
श्रीकृष्ण निजधामाला जातांना उद्धवाने जर हे विचारले नसते, तर श्रीकृष्णांनी ज्ञान, वैराग्य व भक्ति यांची कथा कशाला सांगितली असती ? ८१.

विशेष भक्तिप्रेम अचुंबित । उद्धवें काढिलें निश्चित ।
उद्धवप्रश्नें श्रीभागवत । झालें सनाथ तिहीं लोकीं ॥८२॥
उद्धवाने खरोखर भक्तिप्रेम विशेष असतें हें सहज उघड केले. उद्धवाच्या त्या प्रश्नानेच श्रीमद्‌भागवत त्रिभुवनांत पूज्य होऊन राहिले आहे ८२.

यालागीं तनुमनप्राणें । उद्धवू जीवें ओंवाळणें ।
याहून अधिक वानणें । तें बोलणें न साहे ॥८३॥
म्हणून खरोखर तनु, मन व प्राण यांनी उद्धवाला मोख्या जिव्हाळ्याने ओंवाळणी करावी. ह्याहून त्याची स्तुति करावयाला बोलणेच समर्थ नाहीं ८३.

जे बोला बुद्धी न ये सहज । तें भक्तिप्रेम निजगुज ।
उद्धवा द्यावया गरुडध्वज । केलें व्याज खेंवाचें ॥८४॥
जे शब्दालाही सहज सांगता येण्यासारखे नाही, बुद्धीलाही जे आकलन होण्यासारखे नाही, ते भक्तीच्या प्रेमांतील आत्मगुह्य उद्धवाला देण्याकरितां श्रीकृष्णांनी आलिंगनाचे केवळ निमित्त केले ८४.

भक्तीचें शोधित प्रेम । उद्धवासी अतिउत्तम ।
देता झाला पुरुषोत्तम । मेघश्याम तुष्टला ॥८५॥
तो पुरुषोत्तम भक्तीचे शुद्ध व अतिउत्तम प्रेम उद्धवाला देता झाला, व त्यामुळे तो मेघश्याम श्रीकृष्ण आनंदित झाला ८५.

प्रेमळाची गोठी सांगतां । विसरलों मी श्लोकार्था ।
कृष्णासी आवडली प्रेमकथा । ते आवरितां नावरे ॥८६॥
प्रेमळांची गोष्ट सांगता सांगतां, महाराज ! श्लोकाच्या अर्थाचाही मला विसर पडला. कृष्णालाही प्रेमाची कथा आवडली, म्हणून ती आवरतां आवरेना ८६.

प्रेमाची तंव जाती ऐशी । आठवू येऊं नेदी आठवणेशीं ।
हा भावो जाणवे सज्जनांसी । ते भक्तिप्रेमासी जाणते ॥८७॥
प्रेमाचा स्वभाव असाच आहे की, तो आठवणीची आठवण होऊ देत नाही. ही गोष्ट सज्जनांना माहीतच आहे. कारण ते भक्तिप्रेमाला जाणतात ८७.

हो कां ऐसेंही असतां । माझा अपराधू जी सर्वथा ।
चुकोनि फांकलों श्लोकार्था । क्षमा श्रोतां करावी ॥८८॥
पण असे असले तरीही माझा सर्वतोपरी अपराध हा आहेच. कारण श्लोकाच्या अर्थाला चुकून भलतीकडेच वहावत गेलों. याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी ८८.

तंव श्रोते म्हणती राहें । जेथें निरूपणीं सुख आहे ।
त्यावरी बोलणें हें न साहे । ऐसें रहस्य आहे अतिगोड ॥८९॥
तेव्हां श्रोते म्हणाले की, “थांब. ज्या निरूपणामध्ये आनंद होतो, त्याविषयी असें बोलणे सहन होत नाही. इतकें तें रहस्य अत्यंत गोड आहे ८९.

आधींच भागवत उत्तम । तेथें हें वाखाणिले भक्तिप्रेम ।
तेणें उल्हासलें परब्रह्म । आमुचे मनोधर्म निवाले ॥६९०॥
भागवत हेच आधी उत्तम, त्यांत आणखी भक्तिप्रेम वर्णन केलेले, त्यामुळे परब्रह्मच जणू काय प्रगट झाले व आमचे मनोरथ तृप्त झाले ६९०.

श्लोकसंगतीची भंगी । दूर ठेली कथेची मागी ।
हे प्रार्थना न लगे आम्हांलागीं । आम्ही हरिरंगीं रंगलों ॥९१॥
श्लोकांचा संबंध सुटला व कथेचा भाग दूर राहिला. अशी आमची प्रार्थना करावयाला नको. कारण आम्ही श्रीकृष्णगुणानुवादांत तन्मय होऊन गेलो आहोत ९१.

ऐकतां भक्तिप्रेमाचा जिव्हाळा । श्रवणसुखाचा पूरू आला ।
झाडा न सूची उगला । निरूपण वहिला चालवीं ॥९२॥
हें तुझे भक्तिप्रेमाच्या जिव्हाळ्याचे निरूपण ऐकत असतां श्रवणसुखाचा पूर आला आहे, तो ओसरेल असे वाटत नाही. तेव्हां मुकाट्याने आधीं निरूपण पुढे चालू कर” ९२.

सांगतां प्रेमळांची गोठी । कृष्ण‍उद्धवां एक गांठी ।
प्रेमें पडली होती मिठी । ते कृष्ण जगजेठी सोडवी ॥९३॥
प्रेमळ भक्तांची कथा सांगतांना कृष्ण आणि उद्धव यांची एकरूपता होऊन प्रेमाने परस्परांची मिठी पडली होती, ती जगजेठी श्रीकृष्णाने सोडविली ९३.

म्हणे हें अनुचित सर्वथा । आतांचि उद्धवू ऐक्या येता ।
तरी कथेचा निजभोक्ता । ऐसा श्रोता कैंचा मग ॥९४॥
आणि मनांत म्हणाले, हे अगदी अयोग्य आहे. कारण उद्धव जर आतांच ऐक्यरूपाला पोचला असता, तर मग माझ्या कथेचा भोक्ता ह्याच्यासारखा दुसरा कोण ? ९४.

माझिया भक्तिज्ञानविस्तारा । उद्धवूचि निजांचा सोयरा ।
यालागीं ब्रह्मशापाबाहिरा । काढितू खरा निजबोधें ॥९५॥
माझ्या भक्तिज्ञानाचा विस्तार करावयाला माझ्या भक्तांचा सखा असा एक उद्धवच आहे, म्हणूनच खरा आत्मज्ञानाचा बोध करून त्याला ब्रह्मशापापासून विभक्त काढले ९५.

जितुकी गुह्यज्ञानगोडी । भक्तिप्रेमाची आवडी ।
ते उद्धवाचिकडे रोकडी । दिसते गाढी कृष्णाची ॥९६॥
गुह्यज्ञानाची जितकी म्हणून सर्व गोडी, आणि भक्तिप्रेमाची आवड, तितकी श्रीकृष्णाची दृढ गोडी व आवड खरोखर उद्धवाकडेच होती ९६.

भक्तिप्रेमाचा कृष्णचि भोक्ता । कृष्णकृपा कळलीसे भक्तां ।
हे अनिर्वचनीय कथा । न ये बोलतां बोलासी ॥९७॥
भक्तिप्रेमाचा भोक्ता एक श्रीकृष्णच आणि कृष्णाची कृपा भक्तांनाच कळलेली असते. ही गोष्ट केवळ अनिर्वचनीय आहे. ती शब्दांनी सांगता येत नाहीं ९७.

कृष्ण उद्धवासी म्हणे आतां । सावधू होईं गा सर्वथा ।
पुढारीं परियेसीं कथा । जे भक्तिपथा उपयोगी ॥९८॥
कृष्ण उद्धवाला म्हणाले की, है ! आतां अगदीं सावध हो, आणि भक्तिमालाला उपयोगी अशी पुढची कथा ऐक ९८.

सर्व कर्में मदर्पण । फळत्यागें न करवे जाण ।
तरी अतिसोपें निरूपण । प्रेमलक्षण सांगेन ॥९९॥फलाचा त्याग करून सर्व कर्म मला अर्पण करवत नसेल तर, प्रेमलक्षणाचें अतिशय सोपें असें निरूपण सांगतो ते लक्षात घे ९९.

श्रद्धालुर्मे कथाः श्रृण्वन् सुभद्रा लोकपावनीः ।
गायन्ननुस्मरन् कर्म जन्म चाभिनयन् मुहुः ॥ २३ ॥[श्लोक २३] माणसाने श्रद्धापूर्वक लोकांना पवित्र करणार्‍या माझ्या कल्याणकारी कथा श्रवण कराव्यात, त्यांचे गायन करावे, वारंवार स्मरण करावे, तसेच माझ्या अवतारांचा व लीलांचा अभिनय करावा. (२३)

करितां माझी कथा श्रवण । काळासी रिगमू नाहीं जाण ।
इतरांचा पाडू कोण । कर्मबंधन तेथें कैंचें ॥७००॥
माझी कथा श्रवण करूं लागले असता तेथे काळाचा सुद्धा शिरकाव व्हावयाचा नाही. मग इतरांची कथा काय ? आणि कर्मबंधन तरी तेथे कशाचें ? ७००.

जो हरिकथेनें गेला क्षण । तो काळासी नव्हे प्राशन ।
काळसार्थकता त्या नांव जाण । जैं श्रद्धाश्रवण हरिकथा ॥१॥
हरिकथेत जो क्षण जातो, तो काळाला सुद्धा पासून टाकता येत नाही. ह्याकरितां हरिकथा जर श्रद्धेनें श्रवण केली, तर त्याचंच नांव ‘काळाची सार्थकता’ असे समजावें १.

परीस कथेचें महिमान । श्रद्धायुक्त करितां श्रवण ।
तिहीं लोकींच दोषदहन । अक्षरें जाण होतसे ॥२॥
आता कथेचे माहात्म्य ऐक. श्रद्धायुक्त बुद्धीने जर कथा श्रवण केली, तर तिच्यांतील प्रत्येक अक्षराने तिन्ही लोकांतील पातकांचे भस्म होऊन जाते २.

ऐक श्रद्धेचें लक्षण । करितां हरिकथाश्रवण ।
ज्याचें अर्थारूढ मन । श्रद्धाश्रवण त्या नांव ॥३॥
आतां श्रद्धा कशाला म्हणतात तेही ऐक. हरिकथेचे श्रवण करतांना ज्याचे अर्थाकडे मन वेधलेले असते, त्याचंच नांव श्रद्धा धरून श्रवण करणे होय ३.

श्रवण ऐकोनि नास्तिक । देवोचि नाहीं म्हणती देख ।
आहे म्हणती ते पोटवाईक । आम्हांसी निःशेख ठाकेना ॥४॥
कथेतील प्रतिपादन ऐकूनही नास्तिक असतात ते म्हणतात, ” देवच मुळी नाही ! देव आहे असे म्हणतात ते केवळ पोटभरू होत, आम्हांला त्याबद्दल मुळीच खात्री वाटत नाही” ४.

या नास्तिका देवोनि तिळोदक । ज्याचें वाढलें आस्तिक्य देख ।
श्रद्धा त्या नांव अलोलिक । अगाध सुख तीमाजीं ॥५॥
अशा नास्तिकांच्या बोलण्यावर पाणी सोडून ज्याची आस्तिक्यबुद्धि वाढत जाते, त्याचे नांव श्रेष्ठ श्रद्धा आणि तिच्यामध्येच अप्रतिम सुख असते ५.

श्रवणीं ध्यानीं अंतराय । लय विक्षेप कषाय ।
कां रसस्वादुही होय । हे चारी अपाय चुकवावे ॥६॥
श्रवणामध्ये किंवा ध्यानामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसस्वाद ह्यांनी विघ्न होत असते. ह्याकरितां हे चारही अपाय टाळावेत ६.

ऐकतांही हरिकथा । विषयचिंतनीं गोडी चित्ता ।
ते श्रद्धा नव्हे गा सर्वथा । मुख्य विक्षेपता ती नांव ॥७॥
हरिकथा ऐकतांना सुद्धा मनाला जर विषय चिंतनाचीच गोडी लागून राहिलेली असेल, तर ती मुळीच श्रद्धा नव्हे. मुख्य विक्षेप तो हाच ७.

हावभावकटाक्षगुण । सुरतकामनिरूपण ।
तेथ ज्याचें श्रद्धाश्रवण । रसस्वादन त्या नांव ॥८॥
स्त्रियांच्य हावभावाचे वर्णन. त्यांच्या नेत्रकटाक्षाचे वर्णन व शृंगारचेष्टांचे वर्णन ऐकले म्हणजे तें ऐकण्यामध्येच ज्याची श्रद्धा असते, त्याचे नांव ‘रसास्वादन’ ८.

हरिकथेपाशीं बैसला दिसे । परी कथेपाशीं मनही नसे ।
चित्त भंवे पिसें जैसें । तो मर्कटवेषें विक्षेपु ॥९॥
किंवा हरिकथेपाशी बसलेला दिसतो, पण त्या कथेत मुळींच मन नसते. चित्त वेड्यासारखें भलतीकडेच भ्रमण करीत असते. तो ‘मर्कटरूपी’ विक्षेप होय ९.

नातरी नाना उद्वेगें । ऐकतां कथा मनीं न लगे ।
कां कथेमाजीं झोंप लागे । तो जाणावा वेगें लयविक्षेपू ॥७१०॥
नाहीतर पाठीमागे अनेक प्रकारचे उद्वेग लागलेले असल्यामुळे, हरिकथा ऐकत असतांही तिच्याकडे मन लागत नाही, किंवा कथेत झोपच लागते, तो तत्काल ‘लयविक्षेप’ म्हणून समजावा ७१०.

श्रवणीं ध्यानीं बैसल्यापाठीं । सगुण निर्गुण कांहीं नुठी ।
निळें पिंवळें पडे दिठी । गुणक्षोभ त्रिपुटीं कषाय ॥११॥
ऐकावयाला किंवा ध्यान करावयाला बसलें असतां सगुण किंवा निर्गुण ह्यांपैकी एकही स्वरूप मनांत उभे न राहतां निळे-पिवळे रंगच डोळ्यांपुढे दिसू लागतात. हेच तीन गुणांच्या क्षोभाचे मिश्रण होय. ह्यालाच ‘कषाय’ असे म्हणतात ११.

श्रवणीं ध्यानीं हे अवगुण । तैसाचि त्रिविध प्रेमा जाण ।
तो वोळखती विचक्षण । ऐक लक्षण सांगेन ॥१२॥
श्रवणामध्ये आणि ध्यानामध्ये हे असे दोष आहेत, त्याचप्रमाणे प्रेम तीन प्रकारचे आहे. ते तिन्ही प्रकारचे प्रेम चतुर लोक ओळखतात. त्यांचे लक्षण सांगतो ऐक १२.

महावीरांचें शौर्यपण । ऐकोनि युद्ध दारुण ।
अत्यंत हरिखें उल्हासे मन । तो प्रेमा जाण राजस ॥१३॥
मोठमोठ्या वीरांचा समरांगणांतील शूरपणा किंवा भयंकर युद्ध यांचे वर्णन ऐकून मन अत्यंत आनंदाने उचंबळून येते, ते राजस प्रेम होय असे समज १३.

दुःखशोकांची अवस्था । कां गेल्यामेल्यांची वार्ता ।
अत्यंत विलापाची कथा । ज्यासी ऐकतां न संठे ॥१४॥
दुखःशोकांचा प्रसंग, किंवा गेल्यामेल्यांची वार्ता, किंवा अत्यंत शोककारक कथा ही ऐकणेही ज्याला सहन होत नाही १४,

नेत्रीं अश्रूंचिया धारा । स्फुंदनें कांपे थरथरां ।
प्रेमविलाप अवसरां । तो जाण खरा तामसू ॥१५॥
त्यांतील प्रत्येक प्रसंग ऐकत असतां डोळ्यांतून अश्रृंच्या धारा लागतात, हुंदके देऊन थरथर कापू लागतो, तो खरा तामस होय असे समज १५.

सगुणमूर्तीची संपदा । शंख चक्र पद्म गदा ।
पीतांबरधारी गोविंदा । ऐकोनि आनंदा जो भरे ॥१६॥
सगुणमूर्तीचे ऐश्वर्य, शंख, चक्र, कमळ, गदा, पीतांबर धारण केलेला गोविंद यांचे वर्णन श्रवण करून जो आनंदाने भरून जातो १६.

नेत्रीं आनंदजीवन । हृदयीं न संठें स्फुंदन ।
कृष्णमय जालें मन । तो प्रेमा जाण सात्त्विक ॥१७॥
नेत्रांतून आनंदाश्रु वाहतात, आलेला हुंदका हृदयांत आवरत नाही, मन कृष्णमय होऊन गेलेले असते, तो प्रेमा सात्त्विक होय असें समज १७.

यावरी जो प्रेमा चौथा । अतर्क्य तर्केना सर्वथा ।
उद्धवा तूं मजलागीं पढियंता । तोही आतां सांगेन ॥१८॥
ह्याहूनही आणखी एक चौथा प्रेमा आहे. तो केवळ अतयं आहे. त्याबद्दल मुळीच तर्क चालावयाचा नाही. उद्धवा ! तू मला अत्यंत आवडता झाला आहेस, म्हणून तोही आतां तुला सांगतों १८.

तुझ्या भावार्थाची अवस्था मोठी । ते बोलविते गुह्य गोठी ।
तुजवेगळा पाहतां दृष्टी । अधिकारी सृष्टी दिसेना ॥१९॥
तुझ्या भक्तीचे स्वरूप फार थोर आहे. ती तुझी भक्ती मला गुप्त गोष्टसुद्धा बोलावयास लावते. तुझ्याशिवाय इतरांकडे दृष्टीने पाहू लागले असतां दुसरा अधिकारी ह्या सृष्टीमध्ये दिसतच नाही १९.

श्रीकृष्ण म्हणे सावधान । ऐकोनि निर्गुणश्रवण ।
ज्याचें चिन्मात्रीं बुडे मन । उन्मज्जन होऊं नेणे ॥७२०॥
श्रीकृष्ण म्हणाले, नीट लक्ष दे. निर्गुण परब्रह्माचे स्वरूप ऐकून ज्याचें मन चित्स्वरूपामध्येच बुडून जाते, त्याला पुन्हा देहभानावर येण्याची जाणीवच राहान नाहीं ७२०.

जेवीं कां सैंधवाचा खडा । पडला सिंधूमाजिवडा ।
तो झाला सिंधूचियेवढा । तेवीं तो धडफुडा ब्रह्म होय ॥२१॥
ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात पडला म्हणजे तोही समुद्राएवढाच होऊन जातो, त्याप्रमाणे तोही प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच होऊन जातो २१.

चित्तचैतन्यां पडतां मिठी । सुटतां लिंगदेहाची गांठी ।
नेत्रीं अश्रूंचा पूर दाटी । रोमांच उठी सर्वांगीं ॥२२॥
चित्त व चैतन्य ह्यांची मिठी पडली असतां व लिंगदेहाची गांठ सुटली असतां नेत्रांमध्ये अर्धचा पूर येतो, सर्वांगावर रोमांच उभे राहतात २२,

जीवभावाची दशा आटे । अनिवार बाष्प कंठीं दाटे ।
कांहीं केल्या शब्द न फुटे । पूरु लोटे स्वेदाचा ॥२३॥
जीवभावनेची अवस्था खुंटते, आणि अनिवार गहिवर येऊन गळा अगदी दाटून जातो. काही केले तरी शब्द बाहेर उमटत नाही. घामाचे लोटच्या लोट वाहू लागतात २३.

नेत्र झाले उन्मीलित । पुंजाळले जेथींचे तेथ ।
विस्मयाचें भरतें येत । वोसंडत स्वानंदें ॥२४॥
नेत्र अर्धेन्मीलित होतात व जेथल्या तेथेच विकास पावतात. आश्चर्याचे भरते येते व स्वानंदानें तो भरून जातो २४.

हा जाण पां प्रेमा चौथा । उत्तम भागवत अवस्था ।
तुज म्यां सांगीतली तत्त्वतां । इचा जाणता मी एकू ॥२५॥
हा चौथा प्रेमा होय असे समज. उत्तम भागवताची स्थिति ती हीच. तीच मी तुला यथार्थ रीतीने सांगितली. ह्या स्थितीला जागणारा फक्त मीच आहे २५.

निर्गुणीं जो प्रेमा जाण । तें शोधितसत्त्वाचें लक्षण ।
हे मी जाणें उणखूण । कां ब्रह्मसंपन्न जाणती ॥२६॥
निर्गुणामध्ये प्रेमा उत्पन्न होणे हे शुद्ध सत्त्वाचे लक्षण आहे. याची खूण मी जाणतों, किंवा जे ब्रह्मस्वरूप असतात ते जाणतात २६.

उद्धवा श्रद्धायुक्त श्रवण । तेणें येवढी प्राप्ती आहे जाण ।
श्रद्धाश्रवणाचें महिमान । अतिगहन तिहीं लोकीं ॥२७॥
उद्धृवा ! श्रद्धायुक्त श्रवण केले की त्याच्या योगाने एवढा लाभ आहे हे लक्षात ठेव. श्रद्धनं श्रवण केल्याचे माहात्म्य त्रैलोक्यांतही फार मोठे आहे २७.

सविवेकनैराश्य वक्ता । जोडल्या श्रद्धेनें ऐकावी कथा ।
कां सज्ञान मीनालिया श्रोता । स्वयें कथा सांगावी ॥२८॥
विचारवंत आणि निरिच्छ वक्ता मिळाला, तर श्रद्धेनें कथा श्रवण करावी. किंवा ज्ञानसंपन्न श्रोता मिळाला तर स्वतःही कथा सांगावी २८.

जैं श्रोता वक्ता दोन्ही नाहीं । तैं रिघावें मनाच्या ठायीं ।
कां माझीं जन्मकर्में जें कांहीं । एकलाही विचारीं ॥२९॥
जेव्हां श्रोता आणि वक्ता हे दोन्ही नसतील, तेव्हा आपल्या मनाचाच आश्रय करावा, आणि माझे अवतार, अवतारकृत्ये वगैरे जे काही आहे, त्यांचा एकट्यानेच विचार करावा २९.

सांडूनि विषयांची आस । घांलोनि कळिकाळावरी कांस ।
माझ्या कीर्तनीं न होनि उदास । अतिउल्हास करावा ॥७३०॥
विषयांची आस्था सोडून व कळिकाळासही टक्कर देऊन, माझ्या कीर्तनामध्ये उदास न होतां अत्यंत उल्हास धारण करावा ७३०.

त्यजूनियां कामाचें बीज । सांडूनि लौकिकाची लाज ।
कीर्तनीं नाचावें भोज । गरुडध्वज स्मरोनि ॥३१॥
वासनेचा बीमोड करून व लौकिकाची लाज सोडून श्रीकृष्णाचे नामस्मरण करीत कीर्तनामध्ये आवडीने नाचावें ३१.

रामकृष्ण हरि गोविंद । ऐशिया नामांचे प्रबंध ।
गातां नाना पदें छंदबंध । करावा विनोद कीर्तनीं ॥३२॥
रामकृष्ण, हरि, गोविंद अशा नामांची काव्ये गात असतांना त्यांतील अनेक प्रकारचीं पदें, चित्रबंध ह्यांनी कीर्तनामध्ये आनंदीआनंद करून सोडावा ३२.

जेणें आत्मतत्त्व जोडे जोडी । ऐशिया पदांची घडीमोडी ।
कीर्तनीं गावी गा आवडी । संतपरवडी बैसवूनी ॥३३॥
ज्यांच्या योगाने आत्मज्ञानाचा लाभ घडेल, अशा प्रेमळ पदांचे निरनिराळे प्रकार कीर्तनामध्ये मोठ्या प्रेमाने गायन करावे व त्या वेळी समोर संतसमुदाय बसवावे ३३.

श्रुति मृदंग टाळ घोळ । मेळवूनि वैष्णवांचा मेळ ।
कीर्तनीं करावा गदारोळ । काळवेळ न म्हणावा ॥३४॥
मृदंग, टाळ, वीणा इत्यादि वायें घ्यावी, व वैष्णवांचा समुदाय मिळवून कीर्तनामध्ये मोठा गजर करून सोडावा. काळवेळ मुळींच मनांत आणू नये ३४.

दशमीं दिंडी जागरणें । आळस सांडूनि गावें वाणें ।
हावभावो दाखवणें । कर्मस्मरणें माझेनि ॥३५॥
दशमीला दिंडीचे जागरण करून आळस सोडून सुंदर गायन करावे, व माझ्या अवतारकृत्यांचे स्मरण करून तसे हावभाव करून दाखवावे ३५.

ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी ।
मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥३६॥
रामाने धनुष्याची दोरी ओढ़न शंकराचे धनुष्य कसें काडकन् मोडून टाकलें, ते दाखवून तोच राम मी अशी जो गर्जना करतो, कीर्तनामध्ये जयजयकाराची गुढी उभारतो; ३६

गोवर्धन उचलिला । दावाग्नि प्राशियेला ।
तो तो विन्यासू दाविला । सेतु बांधिला अनुकारू ॥३७॥
कृष्णाने गोवर्धन पर्वत कसा उचलला, दावाग्नि कसा प्राशन केला, तो तो प्रकार जो हावभावांनी करून दाखवतो; रामांनी सेतु कसा बांधिला, त्याचेही अनुकरण करून दाखवितो; ३७

आळस दवडूनि दूरी । अभिमान घालोनियां बाहेरी ।
अहर्निशीं कीर्तन करी । गर्व न धरी गाणिवेचा ॥३८॥
आळसाला दूर झुगारून व अभिमानाला बाहेर घालवून रात्रंदिवस कीर्तनाचा घोष चालवतो, त्यांत मी मोठा गाणारा आहे असा गर्व मुळींच धरीत नाही ३८;

गाणीव जाणीव शहाणीव । वोंवाळूनि सांडावें सर्व ।
सप्रेम साबडी कथागौरव । सुख अभिनव तेणें मज ॥३९॥
गाण्याची प्रौढी, ज्ञातेपणाचा अभिमान व शहाणपणाचा डौल ही सर्व ओवाळून टाकल्याप्रमाणे सोडून देतो आणि शुद्ध प्रेमाने व साधेपणाने कथेचा गौरव करतो; त्याच्या योगाने मला अप्रतिम आनंद वाटतो ३९.

गर्जत नामाच्या कल्लोळीं । नामासरसी वाजे टाळी ।
महापातकां जाली होळी । ते वैष्णवमेळीं मी उभा ॥७४०॥
नामसंकीर्तनाचा कल्लोळ उसळवून गर्जना करीत असतां नामोचाराबरोबर सर्वांची एकदम टाळी पडते, तेव्हा त्याच्या योगाने महान् पातकेंही भस्म होऊन जातात. त्या वैष्णवांच्या समुदायांत मी उभा असतो ७४०.

जें सुख क्षीरसागरीं नसे । पाहतां वैकुंठींही न दिसे ।
तें सुख मज कीर्तनीं असे । कीर्तनवशें डुल्लतु ॥४१॥
क्षीरसागरामध्ये सुद्धा जें सुख मला मिळत नाही, वैकुंठांतही जे सुख पाहावयास गेले तर दृष्टीस पडत नाही, तें सुख मला कीर्तनांत मिळत असते. कीर्तनाच्या नादानें वश होऊन मी डुळत असतो ४१.

मज सप्रेमाची आवडी भारी । भक्तभावाचिया कुसरी ।
मीही कीर्तनीं नृत्य करीं । छंदतालावरी विनोदें ॥४२॥
प्रेमळ भक्तांची मला अतिशय आवड आहे. भक्तांच्या भक्तीच्या कौशल्याने मीही कीर्तनामध्ये छंदाच्या तालावर आनंदाने नाचत असतों ४२.

ऐशिया कीर्तनपरिपाटीं । बुडाल्या प्रायश्चित्तांच्या कोटी ।
खुंटली यमदूतराहाटी । काढिली कांटी पापाची ॥४३॥
अशा प्रकारच्या कीर्तनामध्ये कोटीच्या कोटी प्रायश्चित्तें गडप झाली, यमदूतांची वाट खुंटली आणि पातकाचा कांटाच काढिला गेला असे समजावें ४३.

नामस्मरणाच्या आवडीं । लाजल्या मंत्रबीजांच्या कोडी ।
तपादि साधनें बापुडीं । जालीं वेडीं हरिनामें ॥४४॥
नामस्मरणाच्या आवडीपुढे कोट्यवधि मंत्रबीजें लजित झाली आणि बिचारी तपादिक साधनें तर हरिनामाने वेडी होऊन गेली ४४.

ऐकोनि हरिनामाचा घोख । योगयागीं लपविलें मुख ।
धाकें पळालें विषयसुख । विराले देख अधर्म ॥४५॥
हरिनामाचा घोष ऐकतांच योगयागांनी आपलें तोंडच लपविले. त्या हरिनामाच्या धाकाने विषयसुख तर पळूनच गेलें, आणि अधर्म होते ते जेथल्या तेथेच थिजून गेले ४५.

हरिनामाच्या कडकडाटीं । दोष रिघाले दिक्पटीं ।
तीर्थांची उतरली उटी । कीर्तनकसवटी हरिप्रिय ॥४६॥
हरिनामाचा कडकडाट ऐकतांच सर्व दोष दिगंतांमध्ये पळून गेले, व तीर्थांचाही अभिमान उतरला. असें है कीर्तनकौशल्य हरीला अत्यंत प्रिय असते ४६.

माझेनि प्रेमें उन्मत्त होऊनी । आवडीं कीर्तन अनुदिनीं ।
मनसा वाचा कर्में करूनी । मजवांचूनी नेणती ॥४७॥माझ्या प्रेमानें उन्मत्त होऊन जे आवडीने अहोरात्र कीर्तन करीत असतात, ते मनाने व वाणीने अनेक प्रकारची कमैं करून देखील ते माझ्याशिवाय दुसरे काही जाणतच नाहीत ४७.

मदर्थे धर्मकामार्थान् आचरन् मदपाश्रयः ।
लभते निश्चलां भक्तिं मय्युद्धव सनातने ॥ २४ ॥[श्लोक २४] हे उद्धवा ! अशा प्रकारे मला शरण येऊन माझ्यासाठीच धर्म, अर्थ, कामांचे आचरण करीत राहिले असता, भक्ताला सनातन अशा माझी निश्चल भक्ती प्राप्त होते. (२४)

माझे भक्त जे उत्तम । त्यांचा धर्म अर्थ मीचि काम ।
मजवेगळा मनोधर्म । अन्यथा कर्म करूं नेणे ॥४८॥
माझे जे उत्तम भक्त आहेत, त्यांचा धर्म, अर्थ व काम ही सर्व मीच. त्यांचा मनोधर्म माझ्याशिवाय दुसरें कर्म करणे हे जाणतच नाही ४८.

माझें भजन उत्तम कर्म । मज अर्पे तो शुद्ध धर्म ।
मज कामणें हा शुद्धकाम । ज्याचा आराम मजमाजीं ॥४९॥
माझें भजन तेच त्यांचे उत्तम कर्म, मला जो धर्म अर्पण होतो तोच त्यांचा पवित्र धर्म, माझी आवड धरणे हीच त्यांची शुद्ध इच्छा, आणि त्या इच्छेची विश्रांतीही माझ्यामध्येच ४९.

वेंचूनियां नाना अर्थ । संग्रहो करिती परमार्थ ।
नश्वर अर्थ जें वित्त । तें माझे भक्त न संचिती ॥७५०॥
ते अनेक प्रकारचे द्रव्य खर्चुन परमार्थाचाच संग्रह करून ठेवतात. अशाश्वतरूप संपत्ति हें जें द्रव्य, त्याचा संग्रह माझे भक्त करीत नाहींत ७५०.

ज्यांचें धनावरी चित्त । ते केवळ जाण अभक्त ।
ते जें जें कांही भजन करीत । तें द्रव्यार्थ नटनाट्य ॥५१॥
द्रव्यावरच ज्यांचे चित्त असते ते केवळ अभक्त होत, हे लक्षात ठेव. ते जें जें कांहीं भजन करतात, ते एखाद्या नटाने केवळ पैशासाठी केलेले नाटक होय ५१.

मनसा वाचा कर्में जाण । जेथ नाहीं मदर्पण ।
तें तें दांभिक भजन । केवळ जाण उदरार्थ ॥५२॥
मनाने आणि वाणीने घडलेली कमैं जेथे मला अर्पण होत नाहीत, तेथें तें सर्व दांभिक भजन समजावें. ते केवळ पोट भरण्यासाठीच केलेले असते ५२.

भक्तीमाजीं विरुद्धपण । विरुद्ध धर्माचें लक्षण ।
तेंही करीन निरूपण । सावधान अवधारीं ॥५३॥
भत्तीतसुद्धा विरुद्धपणा असतो. त्या विरुद्धधर्माचे जे लक्षण तेही आतां सांगेन. सावधानपणे ऐक ५३.

माझें भजन करूनि गौण । जो करूं रिघे धनार्जन ।
हें भजनविरुद्ध लक्षण । मुख्य जाण भक्ताचें ॥५४॥
माझ्या भजनाचा कमीपणा करून जो पैसा मिळवावयाला निघतो, त्या भक्ताचे हे लक्षण मुख्यतः भजनविरुद्ध होय ५४,

गांठींचें वेंचूं नेणे धन । कोरडें करी माझें भजन ।
मजसी जेणें केलें वंचन । विरुद्धलक्षण मुख्यत्वें ॥५५॥
पदरचे द्रव्य खर्च करावयाचे समजत नाही व कोरडेच माझे भजन करतो, अशा रीतीने ज्याने मला ठकविलें, ते त्याचे कृत्य मुख्यतः विरुद्धलक्षण होय ५५.

या नांव अर्थविरुद्धता । आतां दुष्टकामीं जो विचरता ।
मी भजतसें भगवंता । दोष सर्वथा मज न लगे ॥५६॥
ह्यालाच ‘अर्थविरुद्धता’ असे म्हणतात. आतां जो भक्त दुष्ट वासनेने कर्मे करणारा असतो, व मी भगवंताचे भजन करीत आहे, तेव्हा मला कोणताच दोष मुळीच लागणार नाही ५६.

ऐस‍ऐसिया भावना । जो दुष्ट कामीं विचरे जाणा ।
हे भजनीं विरुद्धलक्षणा । भक्ता अभक्तपणा आणीत ॥५७॥
अशा प्रकारच्या भावनेने जो दुष्ट वासनेंतच नेहमी गुंतून राहातो, त्याची ती वर्तणूक म्हणजे भजनाच्या विरुद्ध लक्षणच होय. तें भजन भक्तांना अभक्तपणा मात्र आणीत असते ५७.

मज नार्पितां जें जें श्राद्ध । ते त्याची कल्पना विरुद्ध ।
श्राद्धसंकल्प अविरुद्ध । मदर्पणें वेद गर्जती ॥५८॥
मला अर्पण न करता जे जे श्राद्ध करावयाचे, त्याची त्याची कल्पनाही श्राद्धाच्या विरुद्धच होय. श्राद्धाचा जो संकल्प आहे, तो मला अर्पण करण्यानेच खरोखर विरुद्ध होत नाही, असें वेदसुद्धा गर्जून सांगत आहेत ५८.

श्राद्धीं मुख्य संकल्प जाण । पितरस्वरूपी जनार्दन ।
ऐसें असोनियां जाण । नैवेद्य मदर्पण न करिती ॥५९॥
‘पितरस्वरूपी जनार्दन’ हाच श्राद्धांतील मुख्य संकल्प असतो, आणि असे असतां मला नैवेद्यच अर्पण करीत नाहीत ५९.

‘अन्न ब्रह्म अहं ब्रह्म’ । हें श्राद्धीचें गुह्य वर्म ।
ऐसें नेणोनि शुद्ध कर्म । वृथा भ्रम वाढविती ॥७६०॥
अन्न हे ब्रह्मच आहे, आणि मीही ब्रह्मच आहे, हेंच श्राद्धांतील गुह्य वर्म आहे. पण असे शुद्ध कर्म न समजून वृथा भ्रम मात्र वाढवितात ७६०.

मी सकळ जगाचा जनिता । मुख्य पितरांचाही मी पिता ।
त्या मज कर्म नार्पितां । विरुद्ध सर्वथा तें श्राद्ध ॥६१॥
सर्व जग उत्पन्न करणारा मी आहे, सर्व पितरांचाही मुख्य पिता मी आहे, त्या मला कर्म अर्पण न करितां श्राद्ध करणे हे सर्वतोपरी विरुद्ध होय ६१.

मज नार्पितां जें जें करणें । तें तें उपजे अभक्तपणें ।
विरुद्ध धर्माचीं लक्षणें । दुःख दारुणें अनिवार ॥६२॥
मला अर्पण न करता जे जे काही करावयाचें तें तें अभक्तपणानेच होते. अशी विरुद्धधर्माची लक्षणे जो आचरतो, त्याला अनिवार व भयंकर दुःख प्राप्त होते ६२.

उत्तम भक्तांचें लक्षण । संकल्पेंवीण जाण ।
अन्नपानादि मदर्पण । करिती खूण जाणती ॥६३॥
उत्तम भक्तांचे लक्षण हेच की, ते संकल्पाशिवायच अन्नपानादि मला अर्पण करतात व त्यांतील रहस्य जाणतात ६३.

ध्रुवाच्यापरी अढळ । ते माझ्या ठायीं भजनशीळ ।
ते माझी भक्ति अचंचळ । अतिनिश्चळ पावती ॥६४॥
जे माझ्या ठिकाणी ध्रुवाप्रमाणे अढळ भजनशीळ असतात, त्यांना माझी स्थिर व अत्यंत अढळ अशी भक्ति प्राप्त होते ६४.

आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या तिघांसी जी नव्हेचि प्राप्ती ।
ते माझी जे चौथी भक्ती । प्रेमें पावती उद्धवा ॥६५॥
आर्त, जिज्ञासु आणि अर्थार्थी या तिघांनाही जी प्राप्त होत नाही, उद्धवा ! ती माझी चौथी भक्ति त्यांना प्रेमामुळे प्राप्त होते ६५,

आर्त आर्तिहरणकाजें । जिज्ञासु जाणपणालागीं भजे ।
तिजेनि वांछिजे । अतिवोजें अर्थसिद्धी ॥६६॥
आर्त असतो तो आपली पीडा दूर व्हावी म्हणून मला भजत असतो, जिज्ञासु असतो तो आपल्याला ज्ञानप्राप्ति व्हावी म्हणून भजत असतो, आणि तिसरा अर्थार्थी असतो तो माझें भजन करून आपल्याला यथेच्छ पैसा मिळावा अशी इच्छा करतो ६६.

यावरी चौथियाचे ठायीं । या कल्पनांचा मागमोस नाहीं ।
यालागीं चौथी भक्ति पाहीं । त्याच्या ठायीं घर रिघे ॥६७॥
पण ह्याशिवाय ज्ञानी म्हणून चौथा असतो त्याच्या ठिकाणी अशा कल्पनांचा मागमूसच नसतो, म्हणून चौथी भक्ति असते ती त्याच्या ठिकाणीच आपलें घर आहे असे समजून राहते ६७.

जया भक्तीमाजीं वाडेंकोडें । मीच मी चहूंकडे ।
जेथींच्या तेथें सांपडें । हें भजनें जोडे तयासी ॥६८॥
ज्याला भक्तीमध्ये अत्यंत आवडीने चहूंकडे जेथें तेथें मीच मी सांपडत असतो, त्याला तशी स्थिति माझ्या भजनानेच प्राप्त होते ६८.

संकल्प केलियावीण । सहजें होतसे मदर्पण ।
हें चवथे भक्तीचें लक्षण । अतर्क्यभजन पैं माझे ॥६९॥
संकल्प केल्याशिवायच सर्व आपोआप मला अर्पण होणे, हे चवथ्या भक्तीचे लक्षण आहे. त्या भक्तीतील माझे भजन अतयं आहे ६९.

तेथ जें करणें तेचि पूजा । जें बोलणें तो जपू माझा ।
जें देखणें तें अधोक्षजा । दर्शन वोजा होतसे ॥७७०॥
तेथें जें जें कर्म करावें तीच माझी पूजा; तेथें जे बोलणे तोच माझा जप; तेथे ज पहावें तेथें अधोक्षजाचेंच पवित्र दर्शन होत असते ७७०.

तेथ चालणें ते यात्रा माझी । जें भक्षी तें मजचि यजी ।
त्याची निद्रा ते समाधि माझी । ऐसा मजमाजीं भजतसे ॥७१॥
तेथे चालणे तीच माझी यात्रा, तो जें भक्षण करतो तेच यज्ञांत मला अर्पिलेली आहुति होते. त्याची निद्रा तीच माझी समाधि. असा तो माझ्यामध्येच भजन करीत असतो ७१.

यापरी अनायासें जाण । सहजें होतसे मदर्पण ।
हे चौथी भक्ति सनातन । उद्धवा संपूर्ण तो लाभे ॥७२॥
याप्रमाणे त्याचे सर्व कर्म अनायासाने सहजच मला अर्पण होते. उद्धवा ! ही सनातन चौथी भक्ति त्याला पूर्णपणे लाभते ७२.

उद्धवा ऐसें मानिसी चित्तीं । जे मुळींहूनि चारी भक्ती ।
पहिली दुजी तिजी चौथी । मिथ्यावदंती कल्पना ॥७३॥
उद्धवा ! आता तुझ्या मनात कदाचित् असें येईल की पहिली, दुसरी, तिसरी व चौथी ह्या चारही भक्ति मुळापासूनच चालत आल्या आहेत असें जें म्हणतात, ते सर्व काल्पनिक आहे ७३.

सहज माझी जे प्रकाशस्थिती । ते भक्ति बोलिजे भागवती ।
संविती बोलिजे वेदांतीं । शैवीं शक्ती बोलिजे ॥७४॥
तर माझी जी सहजप्रकाशस्थिति तिलाच ‘भागवती भक्ति’ असे म्हटलेले आहे. वेदांतामध्ये हिलाच ‘संविती’ असे म्हणतात, आणि शैवांमध्ये हिलाच ‘शक्ति’ असें म्हणतात ७४.

बौद्ध जिनेश नेमिनाथ । जोगी म्हणती आदिनाथ ।
भैरव खंडेराव गाणपत्य । अव्यक्त म्हणत एक पै ॥७५॥
बौद्ध ‘जिनेश,’ ‘नेमिनाथ’ असे म्हणतात. जोगी ‘आदिनाथ’ म्हणतात, कोणी ‘भैरव’, कोणी ‘खडेराव’, कोणी ‘गाणपत्य’ असे म्हणतात, व कोणी ‘अव्यक्त’ असेही म्हणतात ७५.

एक म्हणती हे आदिमाता । सौर म्हणती तो हा सविता ।
असो नांवांची बहु कथा । उपासकता विभागें ॥७६॥
कोणी म्हणतात की, ही आदिमाता आहे. सौर म्हणतात की, हाच तो ‘सविता’ आहे. उपासनेच्या भेदाप्रमाणे नांवांत असे पुष्कळच भेद आहेत. ते असो ७६.

ऐशी जे कां प्रकाशस्थिती । त्या नांव बोलिजे भक्ती ।
जेणें प्रकाशें त्रिजगतीं । उत्पत्ति स्थिति लय भासे ॥७७॥
अशी जी प्रकाशाची स्थिति, तिलाच भक्ति असे म्हणतात. तिच्याच प्रकाशाने त्रिभुवनांत उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांचा भास होतो ७७.

माझ्या नाना अवतारमाळा । येणें प्रकाशें प्रकाशती सोज्ज्वळा ।
देवो देवी सकळा । येणें प्रकाशमेळां भासती ॥७८॥
माश्या अनेक प्रकारच्या ज्या अवतारमालिका आहेत, त्या ह्याच प्रकाशाने उज्ज्वल रीतीने प्रकाशत आहेत. देव, देवी वगैरे सर्व ह्याच प्रकाशाने भासमान होतात ७८.

माझ्या अवतारांची उत्पत्ती । तेणें प्रकाशें असे होती ।
नाना चरित्रें अंतीं । प्रवेशती ते प्रकाशीं ॥७९॥
माझ्या अवतारांची उत्पत्ति सुद्धा त्याच प्रकाशाने होत असते आणि माझी अनेक प्रकारची चरित्रे शेवटी त्याच प्रकाशात प्रवेश करतात ७९.

ऐशिया प्रकाशाची जे प्राप्ती । ते जाण सनातन माझी भक्ती ।
उद्धवा म्यां हे तुजप्रती । यथानिगुती सांगीतली ॥७८०॥
अशा प्रकाशाची जी प्राप्ति, तीच माझी सनातन भक्ति होय असे समज. उद्धवा ! ती मी तुला यथार्थ रीतीने सांगितली ७८०.

निश्चळभक्ती सनातन । हें मुळींचें पदव्याख्यान ।
यालागीं भक्ति सनातन । समूळ जाण बोलिलों ॥८१॥
निश्चळ भक्ति ही सनातन आहे हे मूळ श्लोकांतील शब्दांचे सांगणे आहे. म्हणूनच सनातन भक्ति मी सविस्तर सांगितली ८१.

सांडूनि पदपदार्था । नाहीं बोलिलों जी वृथा ।
सावधान व्हावें श्रोतां । पुढील कथा अनुपम ॥८२॥
मूळ श्लोकांतील पद व पदाचा अर्थ ह्यांना सोडून उगाच वायफळ काही बोललो नाही. आतां श्रोत्यांनी सावधान राहावें. कारण पुढील कथा फारच रम्य आहे. ८२.

उद्धवा हे ऐशी माझी भक्ती । कैसेनि म्हणसी होये प्राप्ती ।
भावें धरिलिया सत्संगती । माझी भक्ती उद्‍बोधे ॥८३॥पण उद्धवा ! ही अशी माझी भक्ति कशाने प्राप्त होईल असें म्हणशील, तर त्याचे उत्तर असें की, भक्तिभावाने सत्संगति धरली असतां माझी भक्ति प्राप्त होते ८३.

सत्सङ्गलब्धया भक्त्या मयि मां स उपासिता ।
स वै मे दर्शितं सद्‌भिः अञ्जसा विन्दते पदम् ॥ २५ ॥[श्लोक २५] सत्संगाने प्राप्त झालेल्या भक्तीने तो माझी उपासना करतो आणि संतांनी दाखविलेले माझे पद तो सहजपणे प्राप्त करून घेतो. (२५)

मुख्यत्वें संतांची सेवा । हेंचि साधन आवडे देवा ।
संतवचने निजभावा । देतुसे तेव्हां निजभक्ती ॥८४॥
मुख्यत्वेकरून संतांची सेवा हेच साधन देवाला आवडते. ते साधन घडेल तेव्हां संतवचनाप्रमाणेच तो आत्मभाव आणि आत्मभक्ति देत असतो ८४.

ज्यासी आवडे संतसंगाचा मेळू । जो साधुवचनीं अतिभुकाळू ।
जो पडिलें वचन नेणें उगळूं । तोचि पायाळू निजभक्ती ॥८५॥
ज्याला सत्संगतीच्या मेळांत राहाणे आवडतें, जो साधुवचनासाठी अत्यंत भुकेलेला असतो, साधूच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द अमान्य करणे हे ज्याला माहीत नाही, तोच आत्मभक्तीचा पायाळू (भाग्यवान् ) होय ८५.

साधुवचनीं श्रद्धा भारी । देखोनियां निजनिर्धारीं ।
त्यावरी सद्‍गुरु कृपा करी । साधु चराचरीं गुरुरावो ॥८६॥
साधुवचनावर अत्यंत श्रद्धा आहे असा त्याचा निश्चय पाहूनच मग त्यावर सद्गुरु कृपा करतो. साधु हा चराचरांमध्ये श्रेष्ठ गुरु आहे ८६.

गुरुवांचोनी तत्त्वतां । नाहीं संसारी तारिता ।
गुरुवचनें निजभक्तिदाता । मीचि सर्वथा भक्तांसी ॥८७॥
खरोखर गुरूवांचून संसारापासून तारणारा दुसरा कोणी नाही. गुरुवचनाने भक्तांना आत्मभक्ति देणारा सर्वस्वी मीच आहे ८७.

सद्‍गुरु जो संसारी । त्याची आज्ञा मी वाहें शिरीं ।
तो ज्यावरी कृपा करी । तो मी उद्धरीं तात्काळ ॥८८॥
संसारांत जो सद्गुरु असेल, त्याची आज्ञा मी शिरसावंद्य करतों. तो ज्याच्यावर कृपा करतो, त्याचा मी तत्काळ उद्धार करतों ८८.

त्या सद्‍गुरुचें भजन । जो मद्‌रूपें करी जाण ।
त्याचें मज पढियंतेपण । माझेनिही जाण न बोलवे ॥८९॥
त्या सद्गुरूच्या ठिकाणी माझें स्वरूप आहे असें जाणून जो भजन करतो, त्याचा मला किती आवडतेपणा आहे हे मलाही सांगता येत नाही ८९.

त्याचा इहलोक परलोक । दोन्ही चालविता मीचि देख ।
त्याचे मज अत्यंत सुख । हरिखें हरिख वोसंडे ॥७९०॥
त्याचा इहलोक आणि परलोक दोन्ही चालविणारा मीच. त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद होतो, आणि त्याच्या आनंदाने माझ्याही आनंदाला भरतें येते ७९०,

त्यासी गुरूनें जो दाविला मार्ग । चालतां न पडे प्रयासपांग ।
मी सामोरा धांवें श्रीरंग । आपुलें सर्वांग मी वोडवीं ॥९१॥
त्याला गुरूनें जो मार्ग दाखविलेला असतो, तो चालतांना त्याला मुळीच प्रयास व श्रम पडत नाहीत. जर काही संकटे आली, तर मीच श्रीकृष्ण त्याच्यासमोर धावत जातो, व आपले सर्वांग पुढे करतों ९१.

तेणें जावें ज्या पदासी । तें पदचि मी आणीं त्यापासीं ।
संतभजनीं प्रीति ऐशी । हृषीकेशी सांगतू ॥९२॥
तो ज्या पदाला जाणार तें पदच मी त्याच्यापाशी आणितो. संतांच्या सेवेमध्ये आपली अशी प्रीति असते, हे श्रीकृष्ण सांगत आहेत ९२.

ऐसें ऐकोनियां वचन । उद्धवाचें कळवळलें मन ।
कोण कोण ते साधुजन । त्यांचें निजचिन्ह पुसों पां ॥९३॥
असें भाषण ऐकून उद्‌भवाचें मन कळवळले, आणि त्याने मनात म्हटले की, असे साधु पुरुष कोण कोण ? त्यांचे स्वरूपही विचारावें ९३.

कोण ते भक्तींचें लक्षण । भजती खूण ते कोण कोण ।
तें समूळ जाणावया आपण । उद्धवें प्रश्न मांडिला ॥९४॥तेव्हा त्या भक्तीचे लक्षण तरी कोणते ? भजन करण्याची खूण तरी कोणती कोणती ? हे सविस्तर समजून घेण्यासाठी उद्धवाने आपण प्रश्न केला ९४.

श्रीउद्धव उवाच –
साधुस्तवोत्तमश्लोक मतः कीदृग्विधः प्रभो ।
भक्तिस्त्वय्युपयुज्येत कीदृशी सद्‌भिरादृता ॥ २६ ॥[श्लोक २६] उद्धव म्हणाला – हे पवित्रकीर्ती भगवन ! आपल्या दृष्टीने संतांची लक्षणे कोणती ? सत्पुरूषांनी आदराने वर्णन केलेली आपली भक्ती कशी करावी ? (२६)

ज्ञाते वक्ते आहेत बहुत । परी ते रजतमगुणयुक्त ।
गुणानुसारें निरूपीत । त्यांसी पुसों चित्त मानीना ॥९५॥
ज्ञाते आणि वक्ते पुष्कळ आहेत, पण ते रजतमगुणयुक्त आहेत. ते आपआपल्या गुणानुसार निरूपण करतात. म्हणून त्यांना विचारावें हें चित्ताला मान्य होत नाहीं ९५,

अथवा सात्त्विक केवळ । तो सत्त्वगुणें विव्हळ ।
बोलणें बोलतां जाये बरळ । नव्हे केवळ निजबोधू ॥९६॥
किंवा निखालस सात्विक पुरुष असला तर तो सत्वगुणानेच व्यापलेला असतो. त्यामुळे तो बोलू लागला असता त्याचे बोलणे भलतीकडेच वहावतें. त्यामुळे शुद्ध आत्मज्ञान होत नाही ९६.

तैसा तूं नव्हेसी कृष्णनाथा । तुजआधीन गुण तत्त्वतां ।
लीलाविग्रहें देहधरिता । निजज्ञानवक्ता तूंचि एक ॥९७॥
पण कृष्णनाथा ! तूं काही तसा नव्हेस. खरोखर गुण हे तुझ्याच आधीन आहेत. तूं फक्त लीलेने देह धारण करणारा आहेस, आणि आत्मज्ञान सांगणारा एक तूंच आहेस ९७.

यालागीं जी उत्तमश्लोक । तुज म्हणती तीनी लोक ।
तुजवेगळा आणिक । आम्हांसी देख मानेना ॥९८॥
म्हणूनच तुला त्रिभुवनांत ‘उत्तमश्लोक’ (ज्याचे यश पवित्र आहे असा) असे म्हणतात. म्हणून तुझ्याशिवाय दुसरा कोणीच आम्हांला मान्य होत नाहीं ९८.

माझिया प्रश्नाचा वक्ता । तूंचि एक कृष्णनाथा ।
तरी साधु कोण तत्त्वतां । तुज सर्वथा मानला ॥९९॥
हे कृष्णनाथा ! माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगणारा तूंच एक आहेस. तर तुला सर्वथैव मान्य झालेला खरोखर साधु कोण ? ९९.

तुज मानले जे साधुजन । त्यांचें संपूर्ण सांग लक्षण ।
तुज पढियंती भक्ति कोण । तेंही लक्षण सांगावें ॥८००॥
जे जे साधु पुरुष तुला मान्य झाले आहेत, त्यांचे सर्व लक्षण सांग. तुला आवडती भक्ति कोणती ? तिचेही लक्षण सांगावें ८००.

भक्तीमाजीं भक्ति सधर । जे कां तुझी प्राप्तिकर ।
अतिउत्तम परात्पर । संतीं निरंतर आदरिली ॥१॥
तुझी प्राप्ति करून देणारी, अत्युत्तम, श्रेष्टांतील श्रेष्ठ, व संतांनी निरंतर आदराने स्वीकारलेली अशी भक्तींतील श्रेष्ठ भक्ति कोणती ? १.

संतीं आदरिलें जे भक्तीसी । संतासी पुसूं जाय म्हणसी ।
मज विश्वास तुझिया वचनासी । पुसों आणिकांसी मानेना ॥२॥
संतांनी कोणत्या भक्तीचा आदराने स्वीकार केला आहे, तें संतांकडेच विचारावयास जा असें तूं मला म्हणशील, तर माझा सर्व विश्वास तुझ्या भाषणावर आहे. म्हणून दुसऱ्याला विचारावे हे मला मान्य नाही २.

जे ज्या देवतांतरा भजती । ते ती उत्तम भक्ति म्हणती ।
तुज मानली जे श्रीपती । ते मजप्रती सांगावी ॥३॥
जे निरनिराळ्या देवांना भजतात, ते त्या आपल्या देवाचीच भक्ति उत्तम असें म्हणतात. पण श्रीकृष्णा ! आपल्याला जी मान्य असेल तीच मला सांगावी ३.

समान कुळशीळसंवादु । तैसियासीच म्हणती साधु ।
तूं निजमुखें जो म्हणसी शुद्धु । ती मज वंद्यु सर्वथा ॥४॥
कुल, शील आणि भाषण ज्यांचे समान असते, तशा पुरुषालाच साधु असे म्हणतात. परंतु तूं आपल्या मुखाने जो शुद्ध असें म्हणशील, तोच मला सर्वथा वंद्य आहे ४.

तीं संबोधनीं सारंगधरू । उद्धव प्रार्थूनि करी सादरू ।
तीं विशेषणीं निजविचारू । श्रवणाधिकारू सांगतु ॥५॥(पुढील श्लोकांत) उद्ध्वाने शार्ङ्गधर कृष्णाची तीन संबोधनांनी प्रार्थना केली आहे, त्या तीन संबोधनांत योजिलेल्या तीन विशेषणांनी त्याने आपला विचार श्रीकृष्णाला सादर केला, व आपण श्रवण करण्यास अधिकारी आहोत असेंही त्यांतच सांगितले ५.

एतन्मे पुरुषाध्यक्ष लोकाध्यक्ष जगत्प्रभो ।
प्रणतायानुरक्ताय प्रपन्नाय च कथ्यताम् ॥ २७ ॥[श्लोक २७] भगवन ! आपणच ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव, सत्य इत्यादी लोक आणि चराचर जगाचे स्वामी आहात मी आपला विनम्र प्रेमी आणि शरणागत भक्त आहे आपण मला हे सांगा. (२७)

पुरुषीं पुरुषोत्तम तूंचि कीं । कर्मधर्मांचा विवेकी ।
यालागीं बोलिजे पुरुष्याध्यक्षी । सर्वसाक्षी गोविंदा ॥६॥
पुरुषांमध्ये उत्तम पुरुष असा दूंच, सर्व कर्माचा व धर्माचा विचार करणारा तूंच, म्हणूनच हे सर्वसाक्षी गोविंदा ! तुला ‘पुरुषाध्यक्ष’ असे म्हणतात ६.

जैसें कर्म तैसा फळदाता । यालागीं बोलिजे लोकाध्यक्षता ।
तूंचि ब्रह्मादिकांचा नियंता । प्रतिपाळिता जगाचा ॥७॥
जसें कर्म घडते तसेच त्याचे फल देणारा तूं आहेस, म्हणूनच तुझा लोकाध्यक्षपणा वर्णन करण्यात येतो. त्याचप्रमाणे ब्रह्मादिकांचा नियंता आणि जगाचे प्रतिपालन करणारा तूंच आहेस ७.

हो कां मी जगाचा प्रतिपाळिता । त्या जगामाजीं तूंही असतां ।
तुजचि सांगावी ज्ञानकथा । हे अधिकता कां म्हणसी ॥८॥
हे श्रीकृष्णा ! “जगाचा प्रतिपाळ करणारा जर मीच आहे, आणि त्या जगामध्ये जर तूंही आहेस, तर तुलाच मी ज्ञानकथा सांगावी इतका तुझ्यातच विशेषपणा काय आहे ?” असें तूं म्हणशील ८.

जरी तूं सर्वज्ञ सर्वेश्वरू । अंतर्यामी नियंता ईश्वरू ।
जरी देखसी माझा अधिकारू । तरी ज्ञाननिर्धारू सांगावा ॥९॥
पण असें जरी तुझें म्हणणे असले, तरी तूं सर्वज्ञ व सर्वेश्वर आहेस, तूं अंतरात्मा व सर्वांचे नियमन करणारा ईश्वर आहेस, तेव्हा जर माझा अधिकार तुला योग्य दिसत असेल तर मला ज्ञानाचा निश्चय सांगावा ९.

हो कां मज अधिकारू नाहीं । तरी शरण आलों तुज पाहीं ।
शरणागताची तुझ्या ठायीं । उपेक्षा नाहीं सर्वथा ॥८१०॥
मला अधिकार नाही असे जरी असले, तरी मी तुला शरण आलो आहे हे पहा. तुझ्याजवळ शरणागताची उपेक्षा तर कधीही मुळीच होत नाही ८१०.

विषयीं देखोनि थोर दुःख । झालों तुझिया चरणासंमुख ।
अतिदीन मी तुझे रंक । पां आवश्यक तुवां कीजे ॥११॥
विषयांमध्ये भयंकर दुःख आहे हे जाणूनच तुझ्या पायांसमोर आलो आहे. मी अत्यंत दीन असल्यामुळे तुझा भिकारी झालों आहे. ह्याकरितां माझ्यावर तूं अवश्य कृपा कर ११.

माझ्या दुर्जय वासना । अनिवार मज निवारतीना ।
त्या तूं निवारीं श्रीकृष्णा । शरण चरणा यालागीं ॥१२॥
माझ्या वासना अनिवार झालेल्या आहेत, त्या मला आवरत नसल्यामुळे मला त्यांचे निवारण करता येत नाही. श्रीकृष्णा ! त्या तूं निवारण कर. ह्यासाठी मी तुझ्या चरणाजवळ शरण आलो आहे १२.

मी एक भक्त अनुरक्तु । ऐसें बोलतां बहु गर्व दिसतु ।
तूं सर्वज्ञ श्रीअनंतु । कृपावंतु दीनाचा ॥१३॥
मी तुझा एक प्रेमळ भक्त आहे असे म्हटले तरीसुद्धा मोठा गर्वच दिसून येतो. पण श्रीअनंता ! तूं सर्वज्ञ आहेस व दीनाविषयी कृपावंत आहेस १३.

मी एकु श्रवणाधिकारी । हेंही न म्हणवे गा मुरारी ।
ऐसें बोलोनियां पाय धरी । कृपा करीं कृपानिधि ॥१४॥
श्रीकृष्णा ! मीच एक श्रवणाचा अधिकारी आहे असेंही माझ्याने म्हणवत नाही. याकरितां हे कृपानिधे ! माझ्यावर कृपा करावी. असें म्हणून त्याने पाय धरले १४.

आम्ही स्वगोत्र सखे सहज । पाय धरणें न घडें तुज ।
या म्हणणियाचें निजबीज । कळलें मज गोविंदा ॥१५॥”आम्ही एकाच कुळांत जन्मलेले नैसर्गिक मित्र आहोत, तेव्हा माझे पाय धरणें हें बरोबर नाही” असे म्हटलेंस, तर हे गोविंदा ! त्या म्हणण्यांतलें मर्मसुद्धा मला कळलें आहे १५.

त्वं ब्रह्म परमं व्योम पुरुषः प्रकृतेः परः ।
अवतीर्णोऽसि भगवन् स्वेच्छोपात्तपृथग्वपुः ॥ २८ ॥[श्लोक २८] भगवन ! आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरूष असून चिदाकाशस्वरूप ब्रह्म आहात तरीसुद्धा आपण स्वेच्छेनेच हा स्वतंत्र अवतार धारण केला आहे. (२८)

तूं निर्गुण निर्विशेष । चिन्मात्रैक चिदाकाश ।
पुरुषांमाजीं उत्तम पुरुष । वंद्य सर्वांस तूं एक ॥१६॥
तूं निर्गुण व सर्वत्र समान आहेस, तूं चित्स्वरूप व चिदाकाश आहेस, पुरुषांमध्ये उत्तम पुरुष आणि सर्वांना वंद्य असा एक तूंच आहेस १६.

तूं ब्रह्म गा निर्विकार । प्रकृतिपुरुषांहोनि पर ।
तुझा वेदशास्त्रां न कळे पार । अगोचर इंद्रियां ॥१७॥
प्रकृति-पुरुषांहूनही थोर असें में निर्विकार परब्रह्म ते दूं. वेदशास्त्रांना तुझा अंत लागत नाही. तूं इंद्रियांना अगोचर आहेस १७.

ऐक आमुचे भाग्याची कळा । त्या तुज प्रत्यक्ष देखतों डोळां ।
मुकुटकुंडलें वनमाळा । घनसांवळा शोभतु ॥१८॥
आतां आमच्या भाग्याचे स्वरूप ऐक. त्या तुला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहों. मुकुट, कुंडलें व वनमाला धारण केलेली तुझी मेघांप्रमाणे श्यामसुंदर मूर्ति कशी शोभते आहे ! १८.

सुंदर राजीवलोचन । पीतांबर परिधान ।
देखोनि निवताहे तनुमन । तूं जगज्जीवन जगाचा ॥१९॥
ते सुंदर कमलनेत्र, पीतांबर परिधान केलेला, असें तुझें स्वरूप पाहून तन-मन अगदी तृप्त होऊन जाते. तूं सर्व जगाचेंच जीवन आहेस १९.

त्या तुझें दर्शन अतिगोड । देखतां पुरे जगाचें कोड ।
त्याही देहाची तुज नाहीं चाड । ऐसा निचाड तूं देवा ॥८२०॥
त्या तुझें दर्शन अत्यंत गोड आहे. ते घेतांच जगाची इच्छा पूर्ण होते. पण अशा त्या देहाचीसुद्धा तुला इच्छा नाही. देवा ! इतका तूं निरिच्छ आहेस ८२०,

तरी भक्तकृपेचा कळवळा । धरिसी नानावतारमाळा ।
भक्त‍इच्छा तूं स्वलीळा । देहाचा सोहळा दाविसी ॥२१॥
तरी देखील भक्तांवर कृपा करावी असा तुला कळवळा येऊन हूं अनेक अवतार धारण करतोस. भक्तांच्या इच्छेकरितांच तूं आपल्या लीलेने देहाचा सोहळा दाखवितोस २१.

भक्तकृपेनें तत्त्वतां । तूं अवतरलासी कृष्णनाथा ।
तरी माझिया प्रश्नाचा वक्ता । न प्रार्थितां जालासी ॥२२॥
हे कृष्णनाथा ! खरोखर भक्तांवर कृपा करावी म्हणूनच तूं अवतार घेतला आहेस, म्हणून मी प्रार्थना न करितांही तूं माझ्या प्रश्नाची उत्तरे देणारा सहजच ठरलास २२.

जेवीं वत्सहुंकारें गाये । वोरसली धांवताहे ।
तेवीं उद्धवप्रश्नीं देव पाहें । वोळलाहे निजबोधें ॥२३॥
ज्याप्रमाणे वासराचा हुंकार ऐकतांच गाय पान्हावून धावून येत असते, त्याप्रमाणे उद्धवाच्या प्रश्नाने देवही आत्मज्ञानाने भरून आला पहा ! २३.

धन्यासी दुभतें दोनी सांजे । तेंही वत्सयोगें पाविजे ।
वत्सासी वोळली सदा सहजें । तेवीं अधोक्षजें उद्धवासी ॥२४॥
सकाळ संध्याकाळ धन्याला दूध मिळते, तेही वासराच्या योगाने मिळतें. वत्साला गाय जशी स्वभावत:च पान्हावते, त्याप्रमाणेच श्रीकृष्णही उद्धवाला वश झाले २४.

उद्धव आवडला आवडीं । त्याच्या प्रश्नाची अतिगोडी ।
बापु भाग्याची परवडी । जोडिल्या जोडी श्रीकृष्णू ॥२५॥
उद्धव हा श्रीकृष्णाला प्रेमानेच आवडलेला असल्यामुळे त्याच्या प्रश्नाची श्रीकृष्णाला अतिशय गोडी वाटत असे. श्रीकृष्ण जोडीला मिळाल्यामुळे उद्ध्वाच्या भाग्याची थोरवी केवढी मोठी आहे ! २५.

जें जें कांहीं उद्धव पुसतू । त्यासी अंजुळी वोडवीं श्रीकृष्णनाथू ।
आवडी त्यातें चाटूं पाहतू । भावार्था अनंतू भुलला ॥२६॥
उद्धव जे जे काही विचारी, तो तो प्रश्न आदराने स्वीकारण्याला श्रीकृष्णनाथ ओंजळ पुढे करून तयार असत. आवडीने ते त्याला चाटावयाच्याच बेतांत आले. श्रीकृष्ण त्याच्या भक्तीला इतके भुलले होते २६.

जैशी अजातपक्ष पिलीं । त्यांसी पक्षिणी मुखीं चारा घाली ।
तैसी निजज्ञानगुह्यबोली । कृष्ण हृदयीं घाली उद्धवाचे ॥२७॥
पंख न फुटलेल्या पिलांना पक्षीण जशी चोंचीने चारा घालते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाची गुप्त गोष्ट श्रीकृष्णही उद्धवाच्या हृदयांत घालू लागले २७.

उद्धवप्रश्नाचें उत्तर । पांच श्लोकीं शारङ्गधर ।
साधुलक्षणें विचित्र । अतिपवित्र सांगेल ॥२८॥
आतां उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण पांच श्लोकांनी देईल, व त्यांत साधूंची अद्‌भुत आणि अत्यंत पवित्र लक्षणे सांगेल २८.

साधुलक्षणें अपार जाण । त्यांत उत्तमोत्तम तीस गुण ।
निवडोनियां श्रीकृष्ण । उद्धवासी आपण सांगतु ॥२९॥साधूंची लक्षणे अपार आहेत, तरी त्यांतील उत्तमोत्तम तीस गुल निवडुन श्रीकृष्ण आपण होऊन उद्धवाला सांगत आहे २९.

श्रीभगवानुवाच ।
कृपालुरकृतद्रोहस्तितिक्षुः सर्वदेहिनाम् ।
सत्यसारोऽनवद्यात्मा समः सर्वोपकारकः ॥ २९ ॥[श्लोक २९] श्रीकृष्ण म्हणाले – माझा भक्त म्हणजे कृपेची जणू मूर्तीच ! तो कोणत्याही प्राण्यांविषयी वैरभाव बाळगत नाही तो सर्व काही प्रसन्न चित्ताने सहन करतो सत्य हे त्याच्या जीवनाचे सारच होय आणि त्याच्या मनात पापवासना निर्माण होत नाही तो समदर्शी आणि सर्वांवर उपकार करणारा असतो. (२९)

कृपेसी स्वतंत्र जन्म नाहीं । जेथ उपजे तो साधु पाहीं ।
कृपा वसे संतांच्या देही । त्यांचेनि ते पाहीं दाटुगी जगीं ॥८३०॥
कृपेला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. ती ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते तोच साधु होय. कृपा ही संतांच्याच देहामध्ये राहात असते. त्यांच्यामुळेच ती साऱ्या जगांत मोठेपणा पावली आहे ८३०.

कृपा त्यांचेनि महिमे आली । दया त्यांचेनि जीवें ज्याली ।
कठिणत्वाची कांटी काढिली । समूळीं उपटिली निष्ठुरता ॥३१॥
कृपा त्यांच्यामुळेच महत्वाला आली, त्यांच्याच जिवावर दया जगली, त्यांनीच कठीणपणाचा काटा काढून टाकला आणि त्यांनीच निष्ठुरता समूळ उपटून टाकली ३१.

कृपा भूतमात्राच्या ठायीं । सारिखीच सर्व देहीं ।
येथतेथ हें त्या नाहीं । अवकृपा ठायीं निमाली ॥३२॥
साधूची कृपा ही प्राणिमात्रांच्या ठिकाणी सर्वावर सारखीच असते. येथे आणि तेथे असा निरनिराळ्या स्थळी निरनिराळा फरक त्यांच्याजवळ नसतो. त्यांच्या ठिकाणी अवकृपा नष्ट झालेली असते. ३२.

नवल कृपाळुत्वाचें चित्त । जीवाचा जीव जीवीं स्यूत ।
दुःख हरोनि सुख देत । कृपा अद्‍भुत यापरी ॥३३॥
दयाळू मनुष्याचे चित्त मोठे विलक्षण असते. प्राणिमात्रांचे जीव तो आपल्या जिवांत घालतो, आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. ह्याप्रमाणे त्याची कृपा अद्‌भुत असते ३३.

जेणें आपणासी होय दुःख । तें परासी न करी निःशेख ।
जेणें आपणिया होय सुख । तें करी आवश्यक प्राणिमात्रां ॥३४॥
ज्यामुळे आपल्याला दुःख होते, तें तो दुसऱ्याला मुळीच करीत नाही आणि ज्यामुळे आपल्याला सुख होते, तें तो प्राणिमात्रांना अवश्य करतो ३४.

या नांव कृपाळुता । हे पहिलें लक्षण संतां ।
दुसरें तें अद्रोहता । ऐक आतां सांगेन ॥३५॥
ह्याचें नांव कृपाळूपणा. हे संतांचे पहिले लक्षण. दुसरे लक्षण अद्रोहता. तेही आतां सांगतों ऐक ३५,

लोकीं हिंडतां अद्रोहता । ठावो न लभेचि सर्वथा ।
मग शरण आली साधुसंतां । सावकाशता वस्तीसी ॥३६॥
अदोहता ही लोकांमध्ये भटकत फिरत असतां तिला कोठे थारा मिळेचना. मग ती साधुसंतांना शरण आली. तेव्हां तेथें मात्र तिला वसति करून राहण्यास भरपूर जागा मिळाली ३६.

ते दयाळु शरणागता । तिंहीं प्रतिपाळिली अद्रोहता ।
भूतीं भगवंतू देखतां । द्रोहाची वार्ता निमाली ॥३७॥
साधु हे शरणागतावर दया करणारे असल्यामुळे त्यांनी अद्रोहतेचे प्रतिपालन केले. ते प्राणिमात्रांमध्ये भगवंतालाच पहात असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी द्रोहाची वार्ताच नाहींशी मालेली असते ३७.

व्याघ्रसर्पादि देहांसी । कदा द्वेष नुपजे त्यासी ।
जरी देऊं आलें उपद्रवासी । तरी द्वेषासी करीना ॥३८॥
व्याघ्रसादिकांच्या देहांचा द्वेषसुद्धा त्या साधूच्या मनांत उत्पन्न होत नाही. ते व्याघ्र-सर्प जरी उपद्रव चावयास आले, तरी साधु त्यांचा द्वेष करीत नाही ३८.

देहास आलिया आपदा । तेणें झाडिकरी प्रारब्धा ।
द्वेष येऊं नेदी कदा । नातळे क्रोधा निजबोधें ॥३९॥
देहावर कांहीं आपत्ति आली, तरी तिच्यामुळे प्रारब्ध कर्माचाच नाश होतो असें मानून तो साधु आपत्तीविषयीं कधीही द्वेष येऊ देत नाही, आणि आत्मज्ञानामुळे क्रोधाला कधी शिवतही नाही ३९,

हे जाण पां अद्रोहता । दुसरें लक्षण तत्त्वतां ।
तितिक्षा ते ऐक आतां । सहनशीलता साधूंची ॥८४०॥
हीच अद्रोहता असे समज. हे दुसरें लक्षण होय. आता ‘तितिक्षा’ सांगतों ऐक. तितिक्षा म्हणजे साधूंच्या आंगी असणारी सहनशीलता होय ८४०.

शांति परदेशी झाली होती । जेथें जाये तो दवडी परती ।
मग अतिदीन येतां काकुळती । निजधामा संतीं आणिली ॥४१॥
शांति परदेशी झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला परत घालवून देत असे. तेव्हा ती अत्यंत दीन होऊन काकुळतीस येतांच संतांनी तिला आपल्या घरी आणली ४१.

संतीं वाढविली अतिप्रीतीं । ते भगवंताची झाली पढियंती ।
तेणें आपुली निजसंपत्ती । शांतीच्या हातीं दिधली ॥४२॥
संतांनी अत्यंत प्रेमाने तिचे प्रतिपालन केले, म्हणून ती भगवंताचीही प्रिय झाली आणि त्याने आपल सर्व वैभव शांतीच्या हातांत दिले ४२.

शांती सकळ वैभवेंसीं । अखंड असे संतांपाशीं ।
यालागी सहनशीलता तयांसी । अहर्निशीं अनिवार ॥४३॥
तें सारें वैभव घेऊन शांति ही संतांपाशीच निरंतर राहात असते. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी रात्रंदिवस अनिवार सहनशीलता असते ४३.

लागतां सकळ भूतांचा झटा । न म्हणे हा भला वोखटा ।
नाचतू निजशांतीचे चोहटा । संत गोमटा त्या नांव ॥४४॥
सर्व प्राणिमात्रांचा उपद्रव जरी साधूंना होउं लागला, तरी तो कोणालाच ‘हा भला ‘ किंवा ‘हा वाईट’ असें म्हणत नाही. तो आत्मशांतीच्या चव्हाट्यावर नाचत असतो. त्याचे नांव उत्तम संत होय ४४.

ऐशी जे सहनशीलता । ते तितिक्षा जाण तत्त्वतां ।
हे तिसरी लक्षणता । सत्याची सत्यता अवधारीं ॥४५॥
अशी जी सहनशीलता, तिचंच नाव ‘तितिक्षा’ हें नीट लक्षात टेव. हें संतांचे तिसरे लक्षण होय. आता सत्याची सत्यता ऐक ४५.

सत्य अल्पायुषी झालें येथें । मरे उपजे जेथींच्या तेथें ।
कोठेंही नव्हे वाढतें । तेणें संतांतें ठाकिलें ॥४६॥
सत्य हे या जगांत अल्पायुषीच झाले होते, ते जेथल्या तेथेच जन्मावयचे आणि जेथल्या तेथेच मरावयाचे, अशी त्याची अवस्था झाली होती. ते कोठेच वाढीला लागत नसे. म्हणून ते संतांपुढे जाऊन उभे राहिले ४६.

सत्यासी संतांसी होतां भेटी । तंव सत्यस्वरूपीं पडली गांठी ।
सत्य संतत्वे उठी । झालें सृष्टीं चिरायु ॥४७॥
सत्याची आणि संतांची भेट होत असतां सत्यस्वरूपांतच दोघांचीही गांठ पडली, तेव्हां सत्य हे संतस्वरूप बनून गेलें व सृष्टीमध्ये चिरंजीव होऊन राहिले ४७.

यापरी सत्य संतदृष्टीं । सत्य सारें आलें पुष्टी ।
संतबळें वाढलें सृष्टीं । सत्यें भेटी परब्रह्मीं ॥४८॥
ह्याप्रमाणे सत्य हे संतांच्या कृपादृष्टीनेच सत्यत्वाने पुष्ट झाले. तें संतांच्या बळानेच जगांत सर्वत्र फैलावले. म्हणूनच सत्याच्या योगाने परब्रह्माची भेट होते ४८.

संतांसी होआवया उतरायी । सत्य लागलें त्यांचे पायीं ।
संतचरणावेगळा पाहीं । थारा नाहीं सत्यासी ॥४९॥
ह्या संतांच्या उपकाराबद्दल उतराई होण्यासाठी सत्य हे त्यांच्या चरणी लागले, म्हणून सत्याला संतांच्या चरणावांचून दुसरा थारा नाहीं ४९,

ऐसे सत्यास आधारभूत । ज्यांचे पाखोवा सत्य जीत ।
ज्यांचेनि बळें सत्य समर्थ । ते शुद्ध संत जाणावे ॥८५०॥
असे जे सत्याला आधारभूत असतात, ज्यांच्या पंखाखाली सत्य हें जीव धरून राहाते, ज्यांच्या बळानेच सत्य हें समर्थ होते, तेच शुद्ध संत म्हणून समजावे ८५०.

ज्यांसी सबाह्य सत्यत्वें तुष्टी । जे सत्यस्वरूपें आले पुष्टी ।
सत्ये धाली दे ढेकर दृष्टी । ज्यांची वाचा उठी सत्यत्वें ॥५१॥
ज्यांना सत्याच्या योगानेच अंतर्बाह्य संतोष होतो, जे सत्यस्वरूपानेच सामर्थ्यवान् झालेले असतात, ज्यांची दृष्टि सत्याने तृप्त होऊन ढेकर देते आणि सत्य भाषणानेच ज्यांच्या वाचेची हालचाल होऊ शकते ५१,

या नांव जाण सत्याचें सार । हें संतांचें वसते घर ।
हे मज मान्य संत साचार । मी निरंतर त्यांपाशीं ॥५२॥
ह्याचंच नांव सत्याचे श्रेष्ठत्व, तेंच संतांचे राहातें घर होय. असेच संत खरोखर मला मान्य होतात. मी निरंतर त्यांच्याचपाशी असतो ५२.

जिंहीं असत्याची वाहूनि आण । ज्यांमाजी सत्य सप्रमाण ।
जे सदा सत्यत्वें संपन्न । हें मुख्य लक्षण साधूंचें ॥५३॥
ज्यांनी असत्य वर्तन होऊ न देण्याचा निश्चय केलेला असतो, ज्यांच्या ठिकाणी सत्य हे सप्रमाण राहात असते, जे निरंतर सत्यानेच संपन्न असतात, त्यांचे वर्तन हे साधूचे मुख्य लक्षण होय ५३.

या नांव सत्यसार । संतलक्षण साचार ।
हा चौथा गुण सधर । अनवद्य अपार तें ऐका ॥५४॥
ह्याचंच नांव ‘सत्यसार’, हेच संतांचे खरे लक्षण, हा संतांचा महत्त्वाचा चौथा गुण होय. आतां शुद्ध आणि अपार असा गुण सांगतों तो ऐक ५४.

निंदा असूयादि दोष समस्त । निजात्मबोधें प्रक्षाळीत ।
अत्यंत पवित्र केलें चित्त । अनिंदित निजबोधें ॥५५॥
ज्यानें निंदा, मत्सर, इत्यादि सारे दोष आत्मज्ञानाने धुऊन टाकले, आणि अनिंदित अशा आत्मज्ञानाने चित्त अत्यंत पवित्र केलें ५५;

गुरुआज्ञातीर्थीं न्हाला । न्हावोनि सर्वांगीं निवाला ।
त्रिविधतापें सांडवला । पवित्र झाला मद्‌रूपें ॥५६॥
जो गुरुआज्ञारूप तीर्थांत स्नान केला आणि तें स्नान केल्यामुळे सर्वांगांनी शांत झाला; तसेंच जो त्रिविध तापांपासून मुक्त झाला व मत्स्वरूपाने पवित्र झाला ५६,

काय सांगूं त्याची पवित्रता । तीर्थें मागती चरणतीर्था ।
मीही पदरज वांछिता । इतरांची कथा कायसी ॥५७॥
त्याची पवित्रता किती सांगावी ? त्याच्या चरणांचें तीर्थ तीर्थंच मागत असतात. मी सुद्धा त्याच्या पदरजाची इच्छा करणारा आहे, मग इतरांची कथा काय ? ५७.

कृष्ण म्हणे उद्धवा । हा अनवद्य गुण पांचवा ।
ऐक आतां सहावा । सम सर्वां समभावें ॥५८॥
श्रीकृष्ण म्हणाले, “उद्धवा ! हा ‘ अनवद्य’ नावाचा पांचवा गुण होय. आता सर्वांना समदृष्टीने समान पहाणे हा सहावा गुण ऐक ५८.

निजरूपें सर्वसमता । समचि देखे सर्वां भूतां ।
निःशेष निमाली विषमता । जेवीं सैंधवता सागरीं ॥५९॥
आत्मस्वरूपामुळे साधूला सर्व समताच प्राप्त झालेली असते, म्हणून तो सर्व प्राणिमात्रांना समान दृष्टीनेच पहात असतो. समुद्रात मिठाचा खडा टाकला म्हणजे तो जसा नाहीसा होऊन जातो, त्याप्रमाणे त्या साधूच्या अंतःकरणांत विषमवा पूर्णपणे नष्ट झालेली असते ५९.

नाना अलंकार पदार्था । सोनेंपणें विकत घेतां ।
ते ते पदार्थ न मोडितां । स्वभावतां सम सोनें ॥८६०॥
अनेक प्रकारचे अलंकार व वस्तु सोन्याच्या म्हणून विकत घेतल्या आणि ते ते पदार्थ मोडले नाहीत, तरी स्वभावत: ते सर्व सोनेच असते ८६.

तैसे नाना आकार नाना नाम । अवघें जग दिसे विषम ।
साधूचि चिद्‌रूपें सर्व सम । न देखे विषम निजबोधे ॥६१॥
त्याप्रमाणे नानाप्रकारचे आकार व नानाप्रकारची नांवे ह्यामुळे सर्व जग विषमच दिसत असते, परंतु साधु हाच चित्स्वरूपामुळे ते सर्व जग समान स्वरूपात पाहात असतो. आत्मज्ञानामुळे तो विषमता पाहात नाही ६१.

ऐशिया समसाम्यावस्थेसी । दैवें आलिया सुखदुःखांसी ।
तेहीं मुकली द्वंद्वभावासी । सहजें समरसीं निजसाम्यें ॥६२॥
अशा समसमान स्थितीमध्ये, दैवयोगाने सुखें दुःखं प्राप्त झाली असतांही ती साम्यावस्था स्वभावतःच तद्‌रूपतेच्या ऐक्यभावाने त्या द्वंद्वभावनेला मुकलेली असते ६२.

सव्यें मिनल्या महानदीसी । अपसव्यें आल्या गांवरसासी ।
गंगा दोहींतेंही समरसी । गुणदोषांसीं उडवूनी ॥६३॥
उजव्या बाजूने येऊन मिळालेल्या महानदीला आणि डाव्या बाजूने येऊन मिळालेल्या गांवच्या ओहोळाला अशा दोघांनाही त्यांच्यातील सर्व गुणदोष नाहीसे करून गंगा आपल्याशी एकरूप करिते ६३.

तेथ पवित्र‍अपवित्रता । बोलूंचि न ये सर्वथा ।
गोडकडूपणांची वार्ता । निजांगें समता करी गंगा ॥६४॥
मग तेथे अमुक पवित्र आणि अमुक अपवित्र असें मुळींच म्हणता येत नाही. गोडपणा आणि मचूळपणा अशा निरनिराळ्या भेदांना गंगा आपल्या स्वरूपाने समरूपता आणिते ६४.

तैसें सुखदुःखांचें भान । साधूंसी समत्वें समान ।
सदा निजबोधें संपन्न । हे अगाध लक्षण संतांचें ॥६५॥
त्याप्रमाणे सुखदुःखांची भावना साधूंना समदृष्टीच्या योगाने एकसारखीच असते. सदासर्वदा आत्मज्ञानाने परिपूर्ण असावयाचे, हेच संतांचे थोर लक्षण आहे ६५.

नटिया एकचि एकला । गायव्याघ्रांचें सोंग अवगला ।
भीतरील खेळ्या जैं वोळखिला । तैं फिटला भवभ्रमू ॥६६॥
सोंगाड्या एकटा एकच असून तो गाय, वाघ, अशी निरनिराळी सोंगे घेतो. पण त्या सोंगामधला सोंगाड्या ओळखला, की त्या खेळांतल्या सोंगांचा भ्रम नाहीसा झालाच असे समजावें ६६.

तैशी भयाभयवार्ता । द्वैतभावें उठी सर्वथा ।
साधु उभयसाम्यें पुरता । भयनिर्भयता तो नेणे ॥६७॥
त्याप्रमाणे भय किंवा अभय ही भाषा केवळ द्वैताच्या भावनेनेच उठत असते. साधु हा द्वैताच्या ठिकाणी एकरूपतेने परिपूर्ण असल्यामुळे, भय आणि निर्भय हा भेद तो जाणत नाहीं ६७.

द्वंद्वसाम्यें परिपूर्ण । साधूचा हा सहावा गुण ।
ऐक सातवें लक्षण । परोपकारीपण तयाचें ॥६८॥
द्वंद्वाच्या ठिकाणी ‘सम’वाने परिपूर्ण असणे हा साधूचा सहावा गुण होय. आतां त्याचे परोपकार हे सातवें लक्षण ऐक ६८.

पत्र पुष्प छाया फळ । त्वचा काष्ठ समूळ ।
वृक्ष सर्वांगें सफळ । सर्वांसी केवळ उपकारी ॥६९॥
वृक्ष हा पाने, फुलें, छाया, फळ, साल, लाकूड, मुळे इत्यादि प्रत्येक आंगाने लोकांना फलदायक होतो व सर्वावर नेहमीं परोपकारच करीत असतो ६९.

जो वृक्षा प्रतिपाळी । कां जो घावो घाली मूळीं ।
दोनींतें वृक्ष पुष्पीं फळीं । समानमेळीं संतुष्ट ॥८७०॥
वृक्षाचे जो पालन करतो, किंवा त्याला तोडण्यासाठी त्याच्या मुळांत जो घाव घालतो, त्या दोघांनाही वृक्ष, पुष्पं व फळे ह्यांनी सारखेच संतुष्ट करतो ८७०.

मोडूनि फळें आलिया वृक्षें । वृक्षु एकही स्वयें न चाखे ।
तेवीं कर्मफळा जो न टेकें । तो यथासुखें परब्रह्म ॥७१॥
वृक्षावर फळे भरून आली, तरी त्यांपैकी एकही फळ तो वृक्ष स्वतः चाखून पाहात नाही. त्याप्रमाणे कर्मफळाला जो शिवत नाहीं, तो अनायासेंच परब्रह्मस्वरूप होतो ७१.

तैसा कायावाचामनें प्राणें । साधु वाढला उपकाराकारणें ।
आपुलें परावें म्हणों नेणे । उपकारू करणें सर्वांसी ॥७२॥
त्याप्रमाणेच कायावाचामनेकरून साधूही उपकाराकरितांच वाढलेला असतो. हें आपलें किंवा हें दुसरे असे म्हणणे तो जाणतच नाही. सर्वांवर उपकार करणे एवढेच तो जाणतो ७२.

हो कां चंद्र उगवोनि अंबरीं । जेवीं जगाचें आंधारें निवारी ।
विश्वाचा ताप दूर करी । निववी निजकरीं सर्वांतें ॥७३॥
चंद्र हा आकाशामध्ये उदय पावून ज्याप्रमाणे सर्व जगाचा अंधार नाहींसा करतो, विश्वाचा ताप दूर करतो व आपल्या किरणांनी सर्वांना शांत करून सोडतो ७३.

तेथ चंद्रामृत चकोरीं सेवावें । येरांसी चंद्र न म्हणे न द्यावें ।
जो जो भजे जेणें भावें । तो तो पावे तें सुख ॥७४॥
त्या चंद्रापासून निघणारे अमृत चकोरांनीच प्राशन करावे आणि इतरांना ते देऊ नये असे काही चंद्र म्हणत नाहीं, जो जो ज्या ज्या भावनेने भजन करतो, तसे तसें त्याला सुख प्राप्त होते ७४;

तैसेंचि जाण साधूपाशीं । जो जो श्रद्धा करी जैशी ।
त्या त्या देतसे सुखासी । होत जगासी उपकारी ॥७५॥
त्याप्रमाणेच साधूपाशी जो जो जशी जशी श्रद्धा धरतो, त्याला त्याला तो तसे तसेंच सुख देतो. ह्याप्रमाणे साधु सर्व जगावर उपकार करणारा होतो ७५,

काउळे चंद्रासी हेळसिती । चकोर चंद्रामृत सेविती ।
तेवीं दुष्ट साधूतें धिक्कारिती । भावार्थी पावती निजलाभू ॥७६॥
कावळे चंद्राचा धिक्कार करतात व चकोर चंद्रामृत प्राशन करतात. त्याप्रमाणे दुष्ट असतात ते साधूचा विकार करतात आणि भक्तिवान् असतात ते साधुसमागमाने आत्मलाभ पावतात ७६.

सातव्या लक्षणाचा उभारा । सांगितलें परोपकारा ।
पुढील श्लोकीं लक्षणें अकरा । साधुनिर्धारा सांगत ॥७७॥सातव्या गुणाचा विस्तार सांगतांना परोपकाराचे वर्णन केले. आता पुढच्या श्लोकांत साधूच्या लक्षणांतील आणखी अकरा गुण श्रीकृष्ण सांगत आहे ७७.

कामैरहतधीर्दान्तो मृदुः शुचिरकिञ्चनः ।
अनीहो मितभुक् शान्तः स्थिरो मच्छरणो मुनिः ॥ ३० ॥[ श्लोक ३० ] कामनांमुळे त्याची बुद्धी कलुषित होत नाही तो संयमी, गोड स्वभावाचा आणि पवित्र असतो तो संग्रहापासून दूर राहातो काही मिळविण्यासाठी प्रयत्‍न करीत नाही जरूरीपुरतेच खातोपितो आणि शांत असतो स्वधर्माचरणात त्याची बुद्धी स्थिर असते तो मलाच शरण असतो आणि आत्मतत्त्वाच्या चिंतनामध्ये मग्न असतो. (३०)

उर्वशी आलिया सेजेसी । कामक्षोभ नुपजे ज्यासी ।
स्वानंद भोगितां अहर्निशीं । विषयकामासी विसरला ॥७८॥
शय्येवर आपल्याजवळ जरी उर्वशी आली, तरीसुद्धा ज्याचा कामविकार क्षुब्ध होत नाही, तोच रात्रंदिवस स्वानंदांत रममाण होता होतां विषयवासनेला विसरला असे समजावें ७८.

रंकू पालखिये बैसला । तो पूर्वील वाहना विसरला ।
तेवीं हा निजानंदें तृप्त झाला । काम विसरला तुच्छत्वें ॥७९॥
भिकारी पालखीत बसला म्हणजे त्याला पूर्वीच्या वाहनाचे विस्मरण होते, त्याप्रमाणे हाही आत्मानंदाने तृप्त झालेला असल्यामुळे विषयवासना त्याला क्षुद्र वाटते आणि तिचा त्याला विसर पडतो ७९.

कांहीं अप्राप्त पावावया कामावें । साधूसी अप्राप्तता न संभवे ।
प्राप्तपदीं यथागौरवें । निजानुभवें विराजतू ॥८८०॥
एकादी वस्तु प्राप्त होणे अशक्य असेल तर तिची इच्छा करावयाची. पण साधूंना कोणती वस्तु प्राप्त होत नाही असे संभवतच नाही. तो प्राप्त झालेल्या स्थितीतच मोठ्या आनंदानें आत्मानुभवाने शोभत असतो ८८०.

खद्योता सूर्य भेटों जातां । खद्योता न देखे सविता ।
सूर्यासी न भेटवे खद्योता । तेवीं अप्राप्तता साधूसी ॥८१॥
सूर्य काजव्याला भेटावयाला गेला असता तो सूर्य काजव्याला पाहू शकत नाही व काजव्यालाही सूर्याची भेट घेतां घेत नाही, त्याप्रमाणे साधूंनाही दुर्लभता भेटावयाची नाही ८१.

एवं उभय परी पाहतां । कामू निमाला सर्वथा ।
हें आठवें लक्षण तत्त्वतां । अकामता साधूची ॥८२॥
अशा प्रकारे दोन्ही प्रकारांनी पाहिले असता त्याची विषयवासना सर्वस्वी नष्ट झालेली असते. ही जी साधूची निरिच्छता, तोच खरोखर आठवा गुण होय ८२.

सावधानें अंतर नेमितां । तेचि बाह्येंद्रियां नियामकता ।
जेवीं कां लेंकीसी शिकवण देतां । सून सर्वथा चळीं कांपे ॥८३॥
दक्षतेने मनाचे नियमन केले असतां बाडेंद्रियांना तेंच नियमन आपोआप घडते. ज्याप्रमाणे लेकीला शिकवीत असतां सून अगदी थर थर कापू लागते ८३.

मुख्य धूर रणीं लागल्या हाता । येर कटक जिंतिलें न जुंझतां ।
कां मूळ छेदिलें असतां । शाखा समस्त छेदिल्या ॥८४॥
मुख्य सेनापति हातांत सांपडला की बाकीचे सैन्य युद्ध न करतांच पराभव पावतें, किंवा वृक्षाचे मूळच तोडले असतां सर्व फांद्या तोडल्याप्रमाणे गतप्राण होतात ८४,

एवं अंतरवृत्तीचा जो नेम । तोचि बाह्येंद्रियां उपरम ।
ऐसेनिही जें निपजे कर्म । तें निर्भ्रम अहेतुक ॥८५॥
त्याप्रमाणे मनोवृत्तीचे जे नियमन, तेच बाहादियांचेही नियमन होय. अशा स्थितींत जें कर्म घडते, तें निःसंशय निष्कान असेंच असते ८५.

अंतर जडलें आत्मस्थितीं । बाह्य रंगलें मद्‍भक्तीं ।
तेथें जीं जीं कर्मे निपजती । तीं तीं होती ब्रह्मरूप ॥८६॥
मन आत्मस्वरूपांत जडले आणि बाहोंद्रिये माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झाली, म्हणजे जी जी कमैं घडतात, ती ती ब्रह्मस्वरूपच होतात ८६.

बाह्येंद्रियें करितां नेम । अंतरीचें कर्मीं प्रकटे ब्रह्म ।
हा बाह्येंद्रियांचा नेम । आत्माराम जाणती ॥८७॥
किंवा बाहयेद्रियांचे संयमन केले असतां मनोमय कर्मामध्येही परब्रह्म प्रगट होते. हे बायेद्रियांचे नियमन आत्म्याच्या ठायीं रममाण होणारे पुरुषच जाणतात ८७.

ऐशी बाह्येंद्रिय नियामकता । हे जाणावी साधूची दांतता ।
हा नववा गुण तत्त्वतां । ऐक आतां दशमातें ॥८८॥
अशा प्रकारें बाहोंद्रियांचे नियमन करण्याचा गुण हीच साधूची ‘दांतता’ म्हणजे निग्रहशक्ति समजावी. हाच खरोखर नववा गुण. आतां वहावा ऐक ८८.

आकाश सर्वांसीही लागे । परी कठिण नव्हे कोणेही भागें ।
तेवीं साधु जाण सर्वांगें । मृदु लागे सर्वांसी ॥८९॥
आकाश हे सर्वांनाच लागलेले असते, पण कोणत्याही भागानें तें कोणाला कठीण लागते असें होत नाही. ज्याप्रमाणेच साधूही सर्वांगांनी सर्वांना मूदुच लागतो ८९.

पिंजल्या कापुसाचा गोळा । फोडूं नेणे कोणाच्या कपाळा ।
तैसाचि साधूचा जिव्हाळा । अतिकोंवळा सर्वांसी ॥८९०॥
पिंजलेल्या कापसाचा गोळा कोणाचेच कपाळ फोडूं शकत नाही, त्याप्रमाणेच साधूचें अंत:करण सर्वांनाच अत्यंत कोमल वाटते ८९०.

पाहें पां जैसें गंगाजळ । गायीव्याघ्रांसी करी शीतळ ।
तैसाचि साधुही केवळ । मृदु मंजुळ सर्वांसी ॥९१॥
हे पहा ! ज्याप्रमाणे गंगेचे पाणी गाय आणि वाघ दोघांनाही सारखेच शांत करते, त्याप्रमाणेच साधूही सर्वाना केवळ मृदु आणि गोड असाच असतो ९१.

साधूची अतिमृदुता । या नांव जाण सर्वथा ।
हे दशमलक्षणयोग्यता । ऐक आतां अकरावें ॥ ९२ ॥
ह्यालाच साधूची अत्यंत मृदुलता असें नांव आहे, हे नीट लक्षात ठेव. ही दहाच्या गुणाची योग्यता आहे. आतां अकरावें लक्षण ऐक ९२.

साधूंची जे शुचिष्मंतता । ते भगवद्‍भजनेंचि तत्त्वतां ।
व्रततपदानादितीर्था । शुचिष्मंतता त्यांचेनी ॥९३॥
साधूंना जी पवित्रता प्राप्त होते, ती खरोखर भगवनजनामुळेच प्राप्त होते. प्रत, तप, ज्ञान, तीर्थ, इत्यादिकांना जी पवित्रता आली आहे, ती साधूंपासून त्यांना प्राप्त झालेली आहे ९३,

परदारा आणि परधन । सर्वथा नातळे ज्याचें मन ।
गंगादि तीर्थे त्यांचे जाण । चरणस्पर्शन वांछिती ॥९४॥
परस्त्री आणि परधन ह्यांना ज्यांचे मन मुळींच शिवत नाही, त्यांच्याच चरणस्पर्शाची इच्छा गंगादिक तीर्थे करतात ९४,

स्वदारास्वधन सलोभता । अवश्य जाणें अधःपाता ।
द्रव्यदारानिरपेक्षता । शुचिष्मंतता साधूची ॥९५॥
आपली स्त्री, आपलें धन, ह्यांचा लोभ धरणे म्हणजेच अधोगतीला अवश्य जाणे होय. म्हणून स्त्रीची व धनाची इच्छा न धरणे हीच साधूंची पवित्रता होय ९५,

ऐशी असोनि शुचिष्मंतता । तो निंदीना व्रततपादितीर्था ।
ते ते विधीतें आचरितां । सदाचारता अतिश्रोत्री ॥९६॥
अशी पवित्रता असूनही तो व्रते, तप, तीर्थे इत्यादिकांची निंदा करीत नाही. त्या त्या व्रतादिकांचे यथाविधि आचरण करतांना अत्यंत श्रेष्ठ वैदिक ब्राह्मणाप्रमाणे सदाचरण ठेवतो ९६.

पडलिया मगरमिठी । ते न सोडी प्राणसंकटी ।
सांपडे तें सगळेंचि घोटी । तैशी पडली मिठी जीवब्रह्मा ॥९७॥
मगराची मिठी पडली असतां तो प्राणसंकट आले तरी ती सोडीत नाहीं, सांपडेल ते सर्वच गिळून टाकतो, त्याप्रमाणेच त्याची जीवब्रह्माशी मिठी पडलेली असते ९७.

हें पुढेंसूनि परब्रह्म । आश्रमधर्मादि स्वकर्म ।
आचरोनि दावी उत्तमोत्तम । कर्मी ब्रह्मप्रतीती ॥९८॥
त्या ब्रह्मालाच पुढे करून तो आश्रमधर्मादि आपले कर्म उत्तमोत्तम रीतीने आचरून दाखवितो आणि त्या कर्मामध्ये त्याला सारा ब्रह्माचाच अनुभव येतो ९८.

कर्म करितो लोक म्हणती । तो वर्तताहे ब्रह्मस्थितीं ।
हें ज्याचें तो जाणे निश्चितीं । लोकां प्रतीती कळेना ॥९९॥
तो कर्म करतो असे लोक म्हणतात, पण वस्तुतः तो ब्रह्मस्वरूपामध्येच वागत असतो. हे खरोखर ज्याचें तोच जाणतो. त्याचा अनुभव लोकांना येत नाही ९९.

कुलाल भांडें करूनि उतरी । चक्र भोंवे पूर्विला भंवरी ।
तैसा साधू पूर्वसंस्कारी । स्वकर्मे करी वृत्तिशून्य ॥९००॥
कुंभार मडके करून ते चाकावरून उतरून घेतो, तरी त्याचे चाक पूर्वीच्या गतीने फिरतच असते. त्याप्रमाणे साधु पूर्वसंस्काराप्रमाणे आपली कमै करतो, पण तो वृत्तिशून्य असतो ९००.

हें साधुलक्षण अत्यंत थोर । ऐकतां सुगम करितां दुर्धर ।
हे अकरावें अतिपवित्र । ऐक विचित्र तें बारावें ॥१॥
हें साधूचे लक्षण फार थोर आहे. ते ऐकायला सोपे परंतु आचरावयाला कठीण आहे. हे अकरावें अति पवित्र लक्षण होय. आतां बारावें विचित्र लक्षण ऐक १.

साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता ।
देहगेहें निःसंगता । अकिंचनता त्यासी नांव ॥२॥
कोणत्याही वस्तूचा संग्रह किंवा स्वीकार करण्याचा विचार मनाला शिवतही नाही, अशी वृत्ति म्हणजेच साधूची ‘अपरिग्रहता’ होय. देहाची किंवा घरादाराचीसुद्धा संगति न धरणे याचेच नांव ‘अकिंचनता’ २.

स्फटिकु काजळीं दिसे काळा । आरक्तीं आरक्तकीळा ।
नीळवणीं भासे । निळा । तरी तो वेगळा शुद्धत्वें ॥३॥
स्फटिक काजळावर ठेवला तर तो काळा दिसतो, तांबड्या रंगावर जर ठेवला तर उत्तम लाल रंगाचा दिसतो, निळ्या रंगावर जर ठेवला तर तो निळ्या वर्णाचाच असल्याचा भास होतो, पण तो शुद्धस्वरूपाने निराळाच असतो ३.

स्फटिक जपाकुसुमीं ठेविला । पाहतां दिसे तांबडा झाला ।
परी तो अलिप्तपणें संचला । नाहीं माखला तेणें रंगें ॥४॥
तोच स्फटिक जासवंदीच्या फुलावर ठेवून पाहिला असता तो तांबडा झालेला दिसतो, पण तो त्या फुलापासून अगदी अलिस राहिलेला असतो. त्या फुलाच्या रंगाने . . ‘माखला असे होत नाही ४.

तैसा साधु परिग्रहामाजी वसे । परिग्रही झालाही दिसे ।
परी जागृतिस्वप्नसुषुप्तिवषें । परिग्रहो न स्पर्शे निजबोधें ॥५॥
त्याप्रमाणे साधूही वस्तूंचा संग्रह करणाऱ्यांमध्ये राहतो, तो संग्रहकर्ता आहे असेंही वाटर. परंतु जागृति, स्वम, सुषुति, सांतील कोणत्याही अवस्थेत तो संग्रहीपणाला स्पर्शही करीत नाही ५.

परीस सर्व धातूंसी खेंव देतां । मिळणीं सोनें करी तत्त्वतां ।
तो सुवर्णावांचूनि सर्वथा । आणिका पदार्था नातळे ॥६॥
परीस सर्व धातूंना मिठी घालूं लागला असतां तो ज्या धातूला स्पर्श करतो, त्या धातूचे खरोखर सोनेच करतो. तो सोन्यावांचून दुसऱ्या पदार्थाला मुळींच शिवत नाही ६.

तैसा साधू म्हणे जें जें माझें । तें तें त्यासी नाठवे दुजें ।
ऐक्यभावाचीं नाचवी भोजें । अधोक्षजें अंकितु ॥७॥
त्याप्रमाणे साधु जें जें माझें असें म्हणतो, तें तें त्याला दुसरे असे वाटतच नाही. त्याला श्रीकृष्णानेच अंकित केल्यामुळे तो ऐक्यभावाचेंच महत्व वाढवीत असतो ७.

चिन्मात्री जडलें मन । विश्व जाहलें चैतन्यघन ।
बुडालें परिग्रहाचें भान । अकिंचनपण या नांव ॥८॥
चैतन्यस्वरूपामध्येच मन जडले, सर्व विश्व चैतन्यानेच भरलेले आहे असे वाटू लागले, परिग्रहाची आठवण नाहींशी झाली, की अशा त्या स्थितीलाच आकिंचनपण असें नांव आहे ८.

सकळ सांडूनि वना गेला । वनीं वनिता चिंतू लागला ।
तो त्यागचि बाधकत्वा आला । उलथोन पडिला परिग्रहीं ॥९॥
घरांतील प्रपंच सोडून अरण्यात गेला आणि अरण्यांतही स्त्रीचे चिंतन करूं लागला, तेव्हां तो त्यागच त्याला बाधक झाला व तो फिरून परिग्रहांत पडला ९.

उंडणी भिंती चढों लाहे । चढते कष्ट व्यर्थ पाहे ।
ते पूर्विल्यापरीस तळीं जाये । उलंडूनि ठाये अतिदुःखी ॥९१०॥
आळी भिंतीवर चढत असते पण ते तिचे चढावयाचे कष्ट व्यर्थ होत. कारण ती पूर्वीपेक्षाही अधिक खोल पडून उताणी होते आणि अत्यंत दुःख भोगते ९१०,

तैशी मुंगी नव्हे पाहें । उंडणी घेऊनि वृक्षावरी जाये ।
सत्संगती मूर्ख उद्धरों लाहे । परी ते उपाये न करिती ॥११॥
पण मुंगीचे मात्र तसे नाही. ती आळीला घेऊन वृक्षावर जाते. त्याप्रमाणे सत्संगतीने मूर्ख उद्धरूं शकतो, पण ते मूर्ख उपायच करीत नाहीत “. ११

मुंगी लहान उंडणी थोर । ते तिचा करूं शके उद्धार ।
तैसे अकिंचन जे नर । ते करिती उद्धार सकळांचा ॥१२॥
पाहावयास गेले तर मुंगी लहान व आळी थोर असते. तरी पण मुंगी आळीचा उद्धार करूं शकते. त्याप्रमाणे जे अकिंचन पुरुष असतात तेही सर्वांचा उद्धार करतात १२.

असो मूर्खांची जे त्यागिती गती । ते अत्यंतबाधें बाधका होती ।
जंव धरिली नाहीं सत्संगती । तंव त्यागस्थिती कळेना ॥१३॥
असो. मूर्खाची त्याग करण्याची जी पद्धति ती अत्यंत बाधकपणाने त्रासदायक मात्र होते. कारण, जोपर्यंत सत्संगति धरलेली नाही, तोपर्यंत त्यागाची स्थिति कळतच नाही १३.

प्रपंच सांडूनी वना गेला । तो देहप्रपंचें दृढ अडकला ।
देही देहो जेणें मिथ्या केला । तो सत्य झाला अकिंचन ॥१४॥
मूर्ख हा प्रपंच सोडून वनाला गेला, तरी तेथेही तो देहाच्या प्रपंचानेंच पक्का अडकून राहतो. पण देहांत असून ज्याने देह मिथ्या करून सोडला, तोच खरोखर अकिंचन झाला म्हणून समजावें १४.

मूर्खासी त्याग तो झाला बाधू । परिग्रहीं असोनि मुक्त साधू ।
सबाह्य त्यागें अतिशुद्धु । शुकनारदू तिहीं लोकीं ॥१५॥
मूर्खाला त्याग करूनही तो बाधक झाला, आणि साधु हा परिग्रहांत असूनही मुक्त असतो. अंतर्बाह्य त्याग करूनच शुक आणि नारद हे तिन्ही लोकांत अत्यंत पवित्र झाले १५,

ते दोघेही लागती जनकाच्या पायीं । तो राज्य करितांही विदेही ।
त्यासी मीही मानीतसें पाहीं । अभिनव नवाई साधूची ॥१६॥
पण ते दोघेही येऊन जनक राजाच्या पायीं लागले. कारण, जनक हा राज्य करीत असतांही विदेही होता. प्रत्यक्ष मीसुद्धा त्याला मान देतो. साधूची महती आश्चर्यकारक आहे पहा ! १६.

या नांव मुख्य अकिंचनता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां ।
हे बारावी लक्षणता । ऐक आतां अनीहा ॥१७॥
ह्याचेच नांव मुख्यतः अकिंचनता हें होय. ती खरोखर मी तुला सांगितली. हें बारावे लक्षण. आता ‘अनीहा’ ऐक १७.

अनीहा झाली बापुडी । जेथ जाय तो दूर दवडी ।
कोणी राहों नेदी अर्धघडी । अति चरफडी निराश्रयें ॥१८॥
अनीहा (म्हणजे निरिच्छता) दीन झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला दूर घालवून देत असे. तिला कोणी अर्धी घटकासुद्धा थारा देत नसे. अशा प्रकारे ती निराश्रित झाल्यामुळे चरफडत होती १८.

अनीहा हिंडता लोकीं तिहीं । तिळभरी ठावो बसावया नाहीं ।
ईहा वैरिणी लागली पाहीं । ठायींच्या ठायीं दंडवी ॥१९॥
निरिच्छता ही तिन्ही लोकांत हिंडतां हिंडतां तिला बसावयाला तिळभरसुद्धा जागा तर मिळाली नाहींच, पण उलट ‘ईहा’ (म्हणजे इच्छा) ही वैरीण तिच्या पाठीस लागून ती जेथे तेथें तिला मार देववीत असे १९.

कोणी येवों नेदी दाराकडे । अतिदीन जाली बापुडें ।
धाया मोकलोनि रडे । गार्‍हाणें संतांपुढें देवों आली ॥९२०॥
त्या अनीहेला कोणी दारांतसुद्धा पाय ठेवू देत नसे. त्यामुळे ती बापढी अतिशयच दीनवाणी होऊन घाय मोकलून रडू लागली आणि आपल्या परिस्थितीचे गाहाणे सांगावयाला संतांपुढे आली ९२.

ते कृपाळू दयामेळें । निजकरें पुसोनि डोळे ।
प्रतिपाळिली स्वहितकाळें । संतबळें वाढली ॥२१॥
ते मूळचेच कृपाळू असल्यामुळे त्यांना तिची दया येऊन त्यांनी आपल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि आपल्या हिताकरितां तिचा प्रतिपाळ केला. अशा रीतीने ती संतांच्या बळावर वाढली २१,

त्यापूर्वील वैर स्मरोनियां । ईहा वैरिणी साधावया ।
संतांसी पुसोनि उपाया । तिच्या अपाया प्रवर्तली ॥२२॥
आणि पूर्वीचे वैर मनांत आणून त्या ईंहेचा (म्हणजे इच्छेचा) सूड उगविण्यासाठी संतांना त्याबद्दल उपाय विचारून ती तिला छळावयाला प्रवृत्त झाली २२.

ईहेसी नाना चेष्टीं चेष्टवितां । अहं आणि जाण ममता ।
कामें अंगीं घातली तत्त्वतां । कामकांता ते झाली ॥२३॥
अहं आणि ममता ह्या ईहेच्या (म्हणजे इच्छेच्या) मैत्रिणी. त्यांनी ईहेला अनेक प्रकारच्या खेळांनी खेळवतां खेळवतां तिला कामाने आपल्या स्वाधीन करून घेतली व ती कामाची स्त्री झाली २३.

ईहा कामबळें वाढली थोर । व्यापूनि राहिली घरोघर ।
तिसीं साधावया वैर । अनीहा सत्वर चालिली ॥२४॥
कामाचा पाठिंबा मिळतांच इस्छा ही फारच प्रबळ झाली आणि ती घरोघर व्यापून राहिली. तेव्हा तिचा सूड उगविण्यासाठी निरिच्छा सपाक्याने निघाली २४.

असंगशस्त्र मागोनि संतां । ईहेच्या करावया घाता ।
आधीं मारूं धांवे अहंममता । दोघें धाकता निमालीं ॥२५॥
तिनें संतांपासून असंगपणाचे शस्त्र मागून घेतले आणि इच्छेचा घात करण्यासाठी ती आधी ‘अहं” आणि ‘ममता’ ह्या दोघांना मारावयास धावून गेली. तेव्हां ती दोघे भयानेच जेथल्या तेथेच ठार झाली २५,

अनीहा पाठीं लागल्या जाण । अहंममतेसी म्हातारपण ।
थरथरां कांपोनि प्राण । घायेंवीण सांडिला ॥२६॥
कारण निरिच्छा पाठीस लागतांच अहं-ममतेला म्हातारपण म्हणजे अंतकाळच प्राप्त झाला. ती दोघे लटलटयं कां’ लागली आणि घाव न लागताही, त्यांनी तेथल्या तेथेंच प्राण टाकला २६.

अनीहा देखोनि दिठीं । काम पळे बारा वाटीं ।
संकल्पाचे शेवटिले गोटीं । उठाउठी पाडिला ॥२७॥
अनीहेला (म्हणजे निरिच्छेला) डोळ्यांनी पाहतांच काम हा बारा वाटांनी पळत सुटला. त्याला संकल्पाच्या शेवटच्या गोटामध्ये हां हां म्हणता ठार केला २७.

कामू पडतां रणांगणीं । क्रोधादि शूर पडिले रणीं ।
ईहेचा कैवारी नुरेच कोणी । एकेक शोधूनी मारिले ॥२८॥
‘अशा प्रकारे काम हा रणांगणामध्ये पडतांच क्रोधादिक शूर वीर होते तेही धारातीर्थी पतन पावले. अखेर इच्छेचा पाठीराखा कोणीच उरला नाही. कारण, एकेकाला शोधशोधून मारून टाकले २८.

एवं अनीहेसमोर । राही ऐसा नाहीं वीर ।
मारूनि अवघ्यांचा केला चूर । क्रिया करणार कोणी नाहीं ॥२९॥
मिळून निरिच्छेच्या समोर उभा राहील असा वीर कोणीच शिल्लक राहिला नाही, तिने सर्वांना मारून अगदी चक्काचूर करून सोडला. त्यांची क्रिया करावयालाही कोणी उरला नाही २९.

काम निमाल्या सर्वथा । ईहा रांडवली वस्तुतां ।
मुख न दावीच संतां । अधोगमनता पळाली ॥९३०॥
कामाचा निःपात होतांच इच्छा ही खरोखर विधवा झाली. ती संतांना तोंट, दाखवितांच खाली तोंड करून पळून गेली ९३०.

यालागीं ईहेसवें जो लागला । तो जाणावा अधोगती गेला ।
अनीहेचा जो अंकित झाला । तो आवडला गोविंदा ॥३१॥
म्हणून इच्छेच्या संगतीला जो लागला, तो अधोगतीला गेला म्हणून समजावे आणि जो निरिच्छेचा अंकित झाला, तो गोविंदालाही प्रिय झाला म्हणून समजावें ३१.

म्हणसी अनीहा ते कोण । काय ते ईहेचें लक्षण ।
ऐक सांगेन संपूर्ण । जेणें बाणे खूण जिव्हारीं ॥३२॥
आता तूं म्हणशील की, ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) ती कोण ? आणि ‘ ईहे ‘ चे (म्हणजे इच्छेचे) लक्षण कोणते ? तर ज्याच्या योगाने त्यांचीही खूण अंत:करणास पटेल, असे सर्व सांगेन ३२.

काम्यकर्मादि क्रियाजाळ । तेचि ईहा जाणावी अतिचपळ ।
अंतरीं जे सुनिश्चळ । तेचि केवळ अनीहा ॥३३॥
काम्यकर्मादिकांच्या क्रियेचे जे जाळे, तीच अत्यंत चपळ ‘ईहा’ (म्हणजे इच्छा) म्हणून समजावी आणि अंत:करणांत अढळ असणारी जी, तीच ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) होय ३३.

अंतरीं कामाची वार्ता । नुपजे कर्माची कर्मावस्था ।
अणुभरी न रिघे उद्वेगता । अनीहा तत्त्वतां ते जाण ॥३४॥
अंतःकरणांत इच्छेचा गंधही उद्‌भवत नाही, किंवा कर्माची कर्मावस्थाही उत्पन्न होत नाही, अणुमात्र देखील उद्विग्नता प्राप्त होत नाही, तीच खरोखर ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) होय ३४.

ऐशी अनीहा असे ज्यासी । देवो आज्ञाधारकू त्यापाशीं ।
ते अनीहा संतांची दासी । अहर्निशीं जीवेंभावें ॥३५॥
अशी निरिच्छता ज्याला प्राप्त होते, त्याच्याजवळ देवही आज्ञाधारक होऊन राहतो. तीच निरिच्छता रात्रंदिवस जिवाभावाने संतांची दासो होऊन राहते ३५.

हे अनीहा अतिगौरवें । साधुलक्षण तेरावें ।
मितभोजन तें चौदावें । लक्षण वैभवें अवधारीं ॥३६॥
ही ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) अत्यंत गौरवाने साधूंचें तेरावें लक्षण होऊन राहिली आहे. आतां चौदावें लक्षण ‘मितभोजन’, तेही त्याच्या थोरवीसहवर्तमान श्रवण कर ३६.

न कोंडे रसनेचिया चाडा । न पडे क्षुधेच्या पांगडा ।
आवडीनावडीचा उपाडा । करूनि निधडा भोजनीं ॥३७॥
जो जिव्हेच्या इच्छेला बांधला जात नाही, क्षुधेच्या तावडीत कधीं सांपडत नाही आणि आवडीनिवडीच्या भरीस न पडतां जो भोजनाला तयार असतो ३७;

प्राणु आकांक्षी अन्नातें । जठराग्नि भक्षी त्यातें ।
उभयसाक्षी मी येथें । जाणोनि निरुते रस सेवी ॥३८॥
अन्नाची इच्छा प्राण करतो, जठराग्नि अन्नाला भक्षण करतो, त्या दोघांना मी येथे फक्त साक्षीदार मात्र आहे हे जाणून साऱ्या रसांचे सेवन करतो ३८;

जें जें आलें भोजनासी । दृष्टीनें त्याचे दोष निरसी ।
अतिपवित्र करूनि त्यासी । निजसमरसीं सेवितू ॥३९॥
जे जे काय भोजनाला येईल, त्याचे दोष दृष्टीनेच नाहीसे करतो आणि त्याला अत्यंत पवित्र करून आत्मैक्यानेच त्याचे सेवन करतो ३९,

न देखे भोग्य पदार्था । नाठवे मी एक भोक्ता ।
ग्रासीं समरसीं अच्युता । भोगूनि अभोक्ता मितभोजी ॥९४०॥
खाण्याजोगे पदार्थ कोणते हें जो पहातच नाही, किंवा मी एक खाणारा आहे ह्याचीही ज्याला आठवण नसते; तो मितभोजी साधु प्रत्येक घास श्रीकृष्णाशी समरस झाला आहे असे मानून सारे जेवूनही न जेवलेला असा असतो ९४०.

अग्नि आधीं आपणयाऐसें करी । मग त्या आहारातें अंगीकारी ।
साधु आधीं द्वैतातें निवारी । मग स्वीकारी आहारातें ॥४१॥
आहाराला अग्नि हा आधी आपल्यासारखा करतो आणि मग त्याचा अंगीकार करतो, त्याप्रमाणे साधु आधी द्वैताचे निवारण करून मग आहाराचा स्वीकार करतो ४१.

याचि नांव मितभोजन । साधूचे आहाराचें लक्षण ।
युक्तीवीण अल्प भोजन । तें पथ्य जाण रोगियाचें ॥४२॥
ह्याचंच नांव ‘मितभोजन’ आणि हेच साधूच्या आहाराचे लक्षण होय. युक्तीशिवाय थोडे जेवावयाचें तें रोग्याचे पथ्य म्हणून समजावे ४२.

ग्रासोग्रासीं ब्रह्मार्पण । त्या नांव परिमित भोजन ।
हें चौदावें लक्षण । साधूचें जाण उद्धवा ॥४३॥
घासाघासाला जे अन्न ब्रह्मार्पण होत असेल, त्याचंच नांव ‘परिमित भोजन’. उद्धवा ! हे साधूचे चौदावें लक्षण आहे हे ध्यानात ठेव ४३.

समळजळसंभारी । सरितामेळू मिळे सागरीं ।
तो डहुळेना तिळभरी । निर्विकारी निर्मळू ॥४४॥
मलिन पाण्याचे लोंढे आपल्यामध्ये मिळवून घेऊन अनेक नद्या समुद्राला मिळतात, पण तो तिळभरही गढूळ होत नाही, तो निर्मळ आणि निर्विकारच असतो ४४,

तैशा आलिया नाना ऊर्मी । ज्यांसी गजबजु नाहीं मनोधर्मी ।
शांति संतांचि पराक्रमी । उपक्रमी निजशक्ती ॥४५॥
त्याप्रमाणे कितीही ऊर्मि आल्या तरी ज्यांच्या मनोधर्मात चलबिचल होत नाही, अशा संतांची पराक्रमी शांति त्यांच्या आत्मशक्तीला प्रेरित करीत असते ४५.

जेवीं कां नागवेलीची वेली । आधारवीण न वचे वेंगली ।
तैसी संतबळें शांती वाढली । मंडपा चढली चिन्मात्र ॥४६॥
ज्याप्रमाणे नागवेलीची वेल आधाराशिवाय वृक्षावर चढत नाही, त्याप्रमाणे संतबळाच्या आधारानेच शांति वाढली आणि चित्स्वरूपाच्या मंडपावर चढली ४६.

झांकळोनि दश दिशांसी । आभाळ दाटल्या आकाशीं ।
गगन अविकारी त्या दोषासी । आभाळासी नातळे ॥४७॥
दशदिशांना झांकून आकाशामध्ये अने भरून आली, तरी आकाश हे त्या दोषाने विकृत होत नाही. ते त्या अभ्राला शिवतही नाही ४७.

शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लगती अंबरा ।
तेवीं साधूचा उभारा । द्वंद्वसंभारा निर्द्वंद्व ॥४८॥
थंड, ऊन किंवा पावसाच्या धारा काही आकाशाच्या आंगाला लागत नाहीत त्याप्रमाणे साधूचें स्थैर्य अनेक द्वंद्वांचा संभार प्राप्त झाला असतांही निद्वच असते ४८.

तैशा उंच नीच नाना अवस्था । निबिड दाटल्या मोहममता ।
क्षोभु नुपजे ज्याच्या चित्ता । त्या नांव तत्त्वतां निजशांती ॥४९॥
त्याचप्रमाणे उच्च-नीच अशा नानाप्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या किंवा मोहममता कितीही दाटून राहिल्या, तरी ज्याच्या चित्ताला क्षोभ म्हणून उत्पन्नच होत नाही, त्याचंच नांव खरोखर आत्मशांति ४९.

संतांचेनि शांति गहन । शांतीचेनि संत पावन ।
हें अनन्य निजलक्षण । पंधरावा गुण संतांचा ॥९५०॥
संतांमुळेच शांति थोर झाली आहे आणि शांतीमुळेच संत पावन होतात. हे परस्परलक्षण हाच संतांचा पंधरावा गुण होय ९५०.

जैं मीपणें नव्हतें जन्मनाम । तैंच पूर्वजांचें निजधाम ।
आपुली मिरासी जे उत्तम । तेथ मनोधर्म स्थिरु ज्याचा ॥५१॥
जेथें मीपणाने आपल्या जन्माचे नांवच नसते, तेथेच आपल्या पूर्वजांचें मूळ घर होय. आपली अतिउत्तम मिरासही तीच. तेथेच ज्याचा मनोधर्म स्थिर होतो ५१;

मज जन्मचि नाहीं झालें । मरण म्यां नाहीं देखिलें ।
ऐसें मन मूळीं स्थिरावलें । स्थिरता बोलिलें या नांव ॥५२॥
आणि माझा जन्मच झालेला नाही, मी मरण पाहिलेलेच नाही, असे मुळांतच मन स्थिरावलेले असते; त्या स्थितीला ‘स्थिरता’ असें नांव दिले आहे ५२.

चहूं आश्रमांहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम ।
तेथें स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥५३॥
आपला जो आश्रम असेल तोच चारही आश्रमांहून उत्तम होय असे समजून तेथेंच मनोधर्म स्थिर करून वर्णाश्रम चालवितो ५३,

चहूं वर्णांमाजीं पवित्रता । जेणें ब्राह्मणांची ब्राह्मणता ।
तेथें स्थिराविलें जेणें चित्ता । जाण स्थिरता ती नांव ॥५४॥
आणि चारही वर्णामध्ये ज्याला पवित्रता आली आहे, ज्याच्यामुळे ब्राह्मणांना ब्राह्मणपणा आला आहे अशा ब्रह्माच्या ठिकाणींच ज्याचे मन स्थिरावले, त्याच त्याच्या स्थितीला स्थिरता हे नांव देता येईल ५४.

तिहीं लोकीं स्थिरता । मरों टेंकली सर्वथा ।
कोणी नाहीं प्रतिपाळिता । हातीं धरिता न देखे ॥५५॥
त्रिभुवनांत स्थिरता ही अगदी मरावयास टेकली होती. तिला हातीं धरणारा (स्वीकारणारा) व तिचा प्रतिपाळ करणारा कोणीच दिसत नव्हता ५५.

दारीं राहों नेदी कोणी । कोण देईल पथ्यपाणी ।
अवघी टाकिली निरंजनीं । ते सज्जनीं प्रतिपाळिली ॥५६॥
तिला कोणी दाराशीं उभी राहू देईना,मग पथ्यपाणी देणार कोण ? सर्वांनी तिला उघड्यावर टाकून दिली, तेव्हां सजनांनी तिचा प्रतिपाळ केला ५६.

स्थिरता वाढली संतबळें । जिणोंनि वर्णाश्रमादि टवाळें ।
भेदोनि अकारादिवर्णपटळें । एके वेळे वाढली ॥५७॥
अशा रीतीने स्थिरता ही संतांच्या बळावर चांगली पुष्ट झाली, वर्णाश्रमादि नसतेच भेद नष्ट करून व अकारादि सर्व मातृकांचा भेद करून एकदम मोठी झाली ५७,

स्वस्वरूपीं सायुज्यता । पावोनि स्थिरावली स्थिरता ।
तेथ वाट मोकळी संतां । स्वभावतां त्यां केली ॥५८॥
आणि स्वस्वरूपामध्ये सायुज्यता मिळवून ती स्थिरता तेथें स्थिर होऊन बसली. तेव्हा तिने सहजच त्या संतांना तेथे वाट मोकळी करून दिली ५८.

तेथ स्वस्वरूपें स्वकर्म । स्वस्वरूपें वर्णाश्रम ।
स्वस्वरूपें स्वधर्म । स्थिरतासंभ्रम या नांव ॥५९॥
तेव्हां स्वस्वरूपानेच स्वकर्म करणे, स्वस्वरूपानेच वर्णाश्रम चालविणे व स्वस्वरूपानेच स्वधर्म पाळणे, याचेच नांव स्थिरतेचे स्वरूप ५९.

ऐसी स्वधर्मकर्मीं अवस्था । ती नांव उत्तम स्थिरता ।
हे सोळावी लक्षणता । मच्छरणता ते ऐक ॥९६०॥
अशी जी आपल्या धर्मकर्मातील वागणूक, तिचंच नांव उत्तम स्थिरता होय. आतां ‘मला शरण येणे’ ह ज सोळावें लक्षण ते ऐक ९६०.

सरिता सागरा शरण आली । ते समरसोनि सिंधू झाली ।
तैसी शरण जे वृत्ति मज आली । ते पावली दशा माझी ॥६१॥
नदी समुद्राला शरण आली तर ती त्याच्याशी एकरूप होऊन समुद्रस्वरूपच झाली असे होते. त्याप्रमाणे जी वृत्ति मला शरण आली, ती मत्स्वरूपच झाली असे समजावें ६१.

लवण जीवना आलें शरण । तें तत्काळ जाहलें जीवन ।
तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाके ॥६२॥
मीठ पाण्याला शरण आले की तत्काल त्याचे पाणीच झालें असे होते, त्याप्रमाणे मला जो अनन्यभावाने शरण येतो तो मीच होऊन राहतो हे लक्षात ठेव ६२.

मज रिघोनियां शरण । जो वांछी महिमा सन्मान ।
तो गुळांतील पाषाण । केवळ जाण गुळदगडू ॥६३॥
मला शरण येऊन जो मानसन्मानाची किंवा कीर्तीची इच्छा करतो, तो गुळांतला खडा, केवळ गूळदगडच म्हणून समजावा ६३.

जो कां गुळें माखिला दगडू । तो पाहतां दिसे वरिवरी गोडू ।
शेखीं परिपाकीं निवाडू । अतिजडू कठिणत्वें ॥६४॥
गुळानें जो दगड माखलेला असतो, तो पाहिला असतां वरून वरून गोड दिसतो. पण शेवटी शिजवितांना त्याचे खरे स्वरूप असे कळते की, तो कठीण असल्यामुळे अत्यंत जड आहे ६४.

तैसें वरिवरी दावी माझें भजन । हृदयीं विषय‍अभिलाष ।
तो नव्हे माझा अनन्यशरण । अतिदूषण लोभाचें ॥६५॥
त्याप्रमाणे जो वरवर माझें भजन दाखवितो आणि मनांत विषयाचा अभिलाष धरतो, तो काही मला अनन्यभावाने शरण आलेला नव्हे. त्याला लोभाचा मोठा कलंक लागलेला असतो ६५.

सर्वांगीं सुंदर सुरेख । जिच्या नाकावरी पांढरें टीक ।
तिसी वरीना साधु लोक । तैसा विषयलोभु देख मद्‍भजनीं ॥६६॥
एखादी कन्या सर्व अंगांनी सुंदर व सुरेख आहे, परंतु तिच्या नाकावर मात्र पांढरा कोडाचा डाग असेल, तर तिला जसा कोणी सुज्ञ मनुष्य वरणार नाही, त्याप्रमाणेच माझ्या भजनांत विषयलोभ हा दोष आहे हे लक्षात ठेव ६६.

रांडवा केलें काजळकुंकूं । देखोनि जग लागे थुंकूं ।
तैसा विषयांचा अभिलाखू । जेवीं वोकिला वोकू अतिनिंद्य ॥६७॥
किंवा विधवेनें काजकुकू लावले तर जग जसें तिला पहातांच थुंकू लागते (तिचा तिरस्कार करतें), किंवा ज्याप्रमाणे ओकलेली ओक अतिनिंद्य समजतात, त्याप्रमाणेच विषयांचा अभिलाषही अत्यंत निंद्य आहे ६७.

त्रैलोक्यसाम्राज्यवैभव जाण । जो थुंकोनि रिघाला मज शरण ।
तो समरसें मीचि जाण । मानापमान त्या कैंचा ॥६८॥
त्रैलोक्याच्या साम्राज्यवैभवाचा तिरस्कार करून जो मला शरण येतो, तो ऐक्यत्वाने मीच होतो असे समज. मग त्याला मानापमान कशाचा ? ६८.

या नांव मच्छरण । हें सतरावें लक्षण ।
उद्धवा जाण संपूर्ण । मननगुण तो ऐक ॥६९॥
ह्याचें नांव मला शरण येणे. उद्धवा ! हे सर्व सतरावें लक्षण होय हे लक्षात ठेव. आतां जो ‘मनन’ गुण आहे तो ऐक ६९.

श्रुतिगुरुवाक्यनिरूपण । ऐकतां अद्वैतश्रवण ।
युक्तिप्रयुक्तीं पर्यालोचन । मनन गुण त्या नांव ॥९७०॥
वेदशास्त्रांचे निरूपण व गुरुवाक्याचे निरूपण ऐकलें असतां, किंवा अद्वैताचे श्रवण केले असता, त्या सर्वांचा युक्तीने साधकबाधक प्रमाणांनी आपल्याच मनाशी वारंवार विचार करणे त्याचे नांव ‘मनन’ गुण ९७०.

अग्निकापुरां भेटी होतां । तो अग्नीचि होय वस्तुतां ।
तेवीं माझे स्वरूपीं मन ठेवितां । मन चित्स्वरूपता पावलें ॥७१॥
अग्नि आणि कापूर ह्यांची भेट झाली असतां तो कापूर खरोखर अग्निरूपच होतो, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपांत मन ठेवले असतां तें मनच चित्स्वरूप होऊन जाते ७१.

मन चिदंशें असे जाण । तें चिन्मात्र जाहलें करितां मनन ।
जेवीं जीवनीं जन्मलें लवण । तें होय जीवन निजमिळणीं ॥७२॥
ज्याप्रमाणे पाण्यात उत्पन्न झालेले मीठ पाण्याशी मिळाले असतां तें पाणीरूपच होऊन जाते, त्याप्रमाणे मन हे चित्स्वरूपाचेच अंशभूत असते, तें मननाच्या योगाने चित्स्वरूपच होऊन गेलें असें होते ७२.

असो मननाचेनि लवलाहें । मन जेथवरी जावों पाहे ।
तेथवरी तया मीचि आहें । न वचतां राहें तेथही मी ॥७३॥
असो. मननाच्याच सामर्थ्याने मन जेथपर्यंत जाऊं पहाते, तेथपर्यंत त्याच्याबरोबर मीच असतो, किंवा ते न जातां स्थिर राहिले तरी तेथेही मी असतोच ७३.

दीप जेउता जाऊं बैसे । तेउता प्रकाशचि तया असे ।
कोठेंही न वचोनि ठायीं वसे । तेथेंही वसे प्रकाशू ॥७४॥
दिवा जिकडे जाऊन बसेल तिकडे त्याला प्रकाश असतोच, किंवा तो कोठेही न जातां जागच्या जागी बसला तरी तेथेही प्रकाश असतोच ७४.

तैसें माझें करितां मनन । मद्‌रूपचि जाहलें मन ।
मग करितां गमनागमन । मद्‌रूपता जाण मोडेना ॥७५॥
त्याप्रमाणे माझें मनन करतांना मन मपच झाले, म्हणजे मग ते कोठेही गेले किंवा गेले नाहीं तरी त्याची मद्रुपता मोडत नाही ७५.

एवं माझें स्वरूप जें केवळ । तेथें मद्‌रूपें मन निश्चळ ।
ध्रुवाचे परी अचंचळ । मननशीळ त्या नांव ॥७६॥
अशा प्रकारे माझें जें केवळ शुद्ध स्वरूप आहे, तेथें ज्याचे मन मत्स्वरूपाने स्थिर होऊन ध्रुवाप्रमाणे अढळ, राहिले, त्याला ‘मननशील’ असे म्हणतात ७६.

मुनि या पदाचें व्याख्यान । मननशीलता जाण ।
हें अठारावें लक्षण । तें हें निरूपण सांगितलें ॥७७॥
‘मुनि’ या शब्दाचा अर्थ मननशीलता असाच आहे हे लक्षात ठेव. हेच अठरावें लक्षण. त्याचे हे निरूपण तुला सांगितले ७७.

अत्यंत गोड निरूपण । पुढिले श्लोकीं दशलक्षण ।
तें ऐकावया उद्धव सावधान । सर्वांगीं कान होऊनि ठेला ॥७८॥पुढच्या श्लोकांत दहा लक्षणांचे अत्यंत गोड निरूपण आहे, तें ऐकण्याकरितां उद्धव हा सावधानतेने सर्वांगाचे कान करूनच बसला ७८.

अप्रमत्तो गभीरात्मा धृतिमाञ्जितषड्‍गुणः ।
अमानी मानदः कल्पो मैत्रः कारुणिकः कविः ॥ ३१ ॥[श्लोक ३१] तो सावध, निर्विकार आणि धैर्यवान असतो तहानभूक, शोकमोह आणि जरामृत्यू हे सहा विकार त्याने जिंकलेले असतात तो स्वतः मानाची इच्छा ठेवीत नाही, परंतु इतरांचा सन्मान करतो माझ्या भक्तीची महती पटवून देण्यात निष्णात असतो तो सर्वांचा मित्र असतो त्याच्या हृदयात करूणा असते माझ्या तत्त्वाचे त्याला यथार्थ ज्ञान झालेले असते. (३१)

जंववरी वृत्तिशून्य नव्हे मन । तंववरी विश्वासेना विचक्षण ।
वृत्तिरूपें सिंतरील मन । यालागीं सावधान निजबोधें ॥७९॥
जोपर्यंत मन वृत्तिशून्य होत नाही, तोपयत चाणाक्ष मनुष्य त्यावर विश्वास ठेवीत नाही. वृत्तीच्या रूपाने मन आपल्याला ठकवील म्हणून तो आत्मज्ञानाने सावध असतो ७९.

हां हो दुर्वासाऐसा सज्ञान । त्यासी क्षणक्षणा क्षोभवी मन ।
न विचारितां गुणागुण । शाप दारुण देवों धांवे ॥९८०॥
अहो ! दुर्वासासारखा ज्ञानी असूनही त्याला मन क्षणोक्षणी राग आणिते. त्या रागाच्या भरांत गुणावगुणांचा विचार न करितां तोही भयंकर शाप द्यावयाला धावला ! ९८०.

दुर्गंधा जन्मली मत्स्याचे पोटीं । पराशर नाडला तीसाठीं ।
नारद कौतुक पाहतां दिठी । केला गंगातटीं नारदी ॥८१॥
दुर्गधा ही मत्स्याच्या पोटी जन्माला आली, पण तिच्यासाठीसुद्धा पराशर फसला. नारदाने डोळ्यांनी नुसती मौज पाहिली, पण तेवढ्याकरितां गंगातीरी त्याला ‘नारदी, करून सोडले ! ८१.

आपुली कन्या देखोनि गोमटी । मनक्षोभें भोगावया उठी ।
ब्रह्मा धांवे सरस्वतीपाठीं । जो कां सृष्टिपितामहो ॥८२॥
सर्व सृष्टीचा जो आजोबा ब्रह्मदेव, तोही आपली सुंदर कन्या पाहून मन विकृत झाल्यामुळे तिचा उपभोग घेण्यास तयार झाला, आणि सरस्वतीच्या मागोमाग धावत सुटला ! ८२.

या मनाऐसें नाडक । जगामाजीं नाहीं आणिक ।
छळछद्में नाडी ज्ञाते लोक । साधु घातक मनाचे ॥८३॥
ह्या मनासारखें लबाड ह्या जगांत आणखी कोणी नाही. ते नानाप्रकारचा छळ करून वमैं काढून ज्ञाते लोकांनासुद्धा नाडते. साधु मात्र त्या मनाचे मारक (दमन करणारे) असतात ८३.

म्हणाल मनेंवीण भोग घडे । तरी वृत्तीसी क्षोभु कां पां चढे ।
हे बोल बोलती ते सज्ञान वेडे । साधूसी नावडे हे गोष्टी ॥८४॥
आतां कदाचित् असें म्हणाल की, ‘मनाशिवायच जर भोग घडतो, तर मग वृत्तीला तरी क्षोभ कां चढतो ?’ पण असे भाषण करतात ते ज्ञानी असले तरी मूर्ख होत. साधूंना असे म्हणणे आवडत नाही ८४.

अधिष्ठूनि सत्त्वगुण । सूक्ष्मरूपें वृत्ति जाण ।
ते क्षोभवूनियां मन । मी मुक्त म्हणोन विषयी करी ॥८५॥
वृत्ति ही सत्त्वगुणाचा आश्रय करून सूक्ष्मरूपाने असते. ती मनाला क्षुब्ध करून ‘मी मुक्त’ अशी समजूत करून देऊन विषयी करून सोडते ८५.

मुक्ताभिमानें विषयासक्ती । हेचि मनक्षोभाची प्राप्ती ।
वृत्ति असोनियां मुक्ती । साधु न मानिती सर्वथा ॥८६॥
‘मुक्त झालों’ असा अभिमान बाळगावयाचा आणि विषयांत आसक्ति ठेवावयाची, हेच मनःक्षोभाने प्राप्त होते. म्हणून वृत्ति असेपर्यंत साधूंना मुक्ति ही मुळींच मान्य नाही ८६.

अतिनाटकी नाटक मन । मुक्तत्वें धरी अभिमान ।
त्याचें करावया निर्दळण । साधु सावधान निजबोधें ॥८७॥
मन हे मोठे नाटकी असून नाटक बनविणारे आहे. तेंच ‘मुक्त झालों’ अशा कल्पनेने अभिमान बाळगते. म्हणून त्याचा नाश करण्याकरितां साधु है आत्मज्ञानाने सावध असतात ८७.

मुखीं धरिल्या कृष्णसर्पासी । ढिलें करितां तो तत्काळ ग्रासी ।
मरे तंववरी आंवळावें त्यासी । तेवीं मनासी निर्दाळिती ॥८८॥
कृष्णसर्पाचे तोंड हातांत धरले असतां हात जर ढिला सोडला, तर तो तात्काळ खाऊनच टाकतो. याकरितां तो मरेपर्यंत त्याचे तोंड आंवळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे साधु मनाचे निर्दाळण करतात ८८,

मन निर्दाळावे सावधानता । बोलिली ते हे साधुलक्षणता ।
हा एकुणिसावा गुण सर्वथा । ऐक आतां विसावा ॥८९॥
मनाचे निर्दाळण करावें अशाकरितां जी सावधानता सांगितली आहे, तेच हे साधूचे लक्षण होय. हा खरोखर एकुणिसावा गुण. आतां विसावा गुण ऐक ८९.

वर्षाकाळीं जळबळें सरिता । आल्या समुद्र नुचंबळे श्लाघ्यता ।
उष्णकाळीं त्या न येतां । क्षोभोनि सर्वथा आटेना ॥९९०॥
पर्जन्यकालांत पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या समुद्रात शिरल्या तरी समुद्र आब्यतेने फुगत नाही. किंवा उन्हाळ्यात त्या नद्या तशा तुडुंब भरून आल्या नाहीत तरी त्या रागाने समुद्र आटून जात नाहीं ९९०.

तैसें जाहलिया समृद्धिधन । साधूचें उल्हासेना मन ।
सकळ जाऊनि जाल्या निर्धन । दीनवदन हों नेणें ॥९१॥
त्याप्रमाणे द्रव्याची रेलचेल झाली तरी साधूचे मन उल्हास पावत नाही, किंवा सर्वस्व जाऊन जो निर्धन झाला तरी दीनवाणे व्हावे हे जाणत नाही ९१.

दिवसराती येतांजातां । प्रकाशें पालटेना सविता ।
तेवीं आल्यागेल्या नाना अवस्था । गंभीरता अक्षोभ्य ॥९२॥
रात्र आणि दिवस ही आली किंवा गेली, तरी सूर्याच्या प्रकाशांत कांहीं पालट होत नाही. त्याप्रमाणे निरनिराळ्या स्थिति आल्या किंवा गेल्या तरी साधूचा गंभीरपणा क्षुब्ध होत नाही ९२.

कडकडीत विजेचे कल्लोळ । तेणें गगनासी नव्हे खळबळ ।
तैसा नाना ऊर्मींमाजीं निश्चळ । गांभीर्य केवळ त्या नांव ॥९३॥
विजेचे लोळ कडकडून उठले तरी आकाश कांहीं डगमगत नाही. त्याप्रमाणे कितीही विकारांच्या उसळ्या आल्या तरी त्यांमध्ये अढळ असणे याचंच नांव गांभीर्य ९३.

हे संताची गंभीरता । विसांवा जीवशिवांसी तत्त्वतां ।
हे विसावी संताची अवस्था । धृतीची व्यवस्था अवधारीं ॥९४॥
संताची गंभीरता म्हणतात ती ही. तीच खरोखर जीवाला आणि शिवाला विश्रांति आहे. ही संताची विसावी अवस्था होय. आतां धैर्याचे स्वरूप ऐक ९४.

मनबुद्ध्‍यादि इंद्रियें प्राण । निजधैर्यें धरोनि आपण ।
नित्य केलिया आत्मप्रवण । परतोनि जाण येवों नेदी ॥९५॥
जो आपल्या धैर्याने मन-बुद्धयादि इंद्रिये व प्राण ह्यांना आपणच आवरून धरून नित्य आत्मसन्मुख करतो, आणि त्यांना तेथून परत जाऊ देत नाहीं ९५,

स्वयंवरीं जिणोनि अरिरायासी । बळें आणिलें नोवरीसी ।
तो जाऊं नेदी आणिकापाशीं । तेवीं वृत्तीसी निजधैर्य ॥९६॥
किंवा स्वयंवरामध्ये प्रबळ शत्रूला जिंकून पराक्रमाने नवरीला आणल्यानंतर तो तिला दुसऱ्याकडे जाऊं देत नाही, त्याप्रमाणे साधूही आपल्या वृत्तीपासून धैर्य सुटू देत नाही ९६.

वागुरें बांधिल्या मृगासी । पारधी जाऊं नेदी त्या वनासी ।
तेवीं धैर्यें आकळूनि मनासी । देहापाशीं येऊं नेदी ॥९७॥
जाळ्यांत धरलेल्या मृगाला पारधी जसा पुन्हा त्या बनाकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही धैर्याने मनाला आवरून धरून त्याला देहाकडे येऊ देत नाहीं ९७.

देहासी नाना भोगसमृद्धी । वावूनियां गजस्कंधीं ।
ऐसें सुख होतां त्रिशुद्धी । मनासी देहबुद्धी धरूं नेदी ॥९८॥
देहाला अनेक प्रकारची सुखें प्राप्त झाली, किंवा त्याला हत्तीच्या मस्तकावर बसविलें, इतके जरी खरोखर सुख मिळाले, तरी तो मनाला देहाभिमान धरूं देत नाही ९८.

प्रळयकाळाच्या कडकडाटीं । महाभूतां होतां आटाटी ।
तरी मनासी देहाची भेटी । धैर्यें जगजेठी होंचि नेदी ॥९९॥
किंवा प्रळयकाळच्या कडकडाटाने पंचमहाभूतांची गडबड उडाली असताही तो जगजेठी धैर्याने मनाला देहाची भेट होऊंच देत नाही ९९.

तेथ काळाचेनि हटतटें । वृत्ति परब्रह्माचिये वाटे ।
लावूनियां नेटेंपाटें । चिन्मात्रपेठे विकिली ॥१०००॥
तर त्या काळाच्या जबरदस्त तडाक्यांत त्याने वृत्ति परब्रह्माच्या वाटेकडे निश्चयाने लावून चित्स्वरूपाच्या पेठेत तिला विकलेले असते १०००.

तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु ।
त्यासी जीवेंसहित विवेकु । घालूनि आंखू संवसाटी केली ॥१॥
तेथें त्याला लागलाच स्वानंदरूपी उत्तम ग्राहक भेटला, तेव्हां त्याने जीवासह मन, बुद्धि, प्राण, इत्यादि विवेक त्याच्या पदरांत घालून त्याच्या मोबदल्यांत स्वानंद घेतला १.

या नांव धृतीचें लक्षण । हा एकविसावा साधूचा गुण ।
आतां जिंतले जे षड्गुण । तेंही लक्षण अवधारीं ॥२॥
ह्याचंच नांव धैर्य. हा साधूचा एकविसावा गुण होय. आतां षड्विकार कसे जिंकले जातात तेंही लक्षण ऐक २.

स्वानंदें तृप्त जाला । यालागीं क्षुधेसी मुकला ।
जगाचे जीवनीं निवाला । तृषा विसरला निःशेष ॥३॥
तो साधु स्वानंदाने तृप्त झालेला असतो, म्हणून त्याला भूक लागत नाही. जगाच्या जीवनाने तो संतुष्ट झालेला असतो, म्हणून तो तहानही निखालस विसरून गेला असें होतें ३.

भोगितां निजात्मसुख । विसरला शोकदुःख ।
चिन्मात्रज्ञानें निष्टंक । त्यासंमुख मोहो न ये ॥४॥
आत्मसुखाचा उपभोग घेतां घेतां शोक आणि दुःख विसरूनच गेला, चित्स्वरूपाच्या ज्ञानाने संशयरहित झालेला असल्यामुळे मोहही त्याच्यासमोर येत नाही ४.

तिहीं अवस्थांबाहिरा । वसिन्नला निजबोधवोंवरा ।
तेथें जरा जाली अतिजर्जरा । कांपत थरथरां पळाली ॥५॥
तो जागृति, स्वप्न आणि सुपुप्ति ह्या तिन्ही अवस्थांच्या बाहेर आत्मज्ञानाच्या ओंवरीत राहात असतो. तेथे जरी म्हातारी जख्खड झालेली जरा आली, तरी तीच थरथरां कांपत पळून जाते ५.

मिथ्या जाहलें कार्यकारण । देहाचें देहपणें न देखे भान ।
तंव मरणासीचि आलें मरण । काळाचें प्राशन तेणें केलें ॥६॥
त्याचे कार्य व कारण ही दोन्ही मिथ्या झालेली असतात. देहपणाने देहाचे भानही त्याला राहात नाही. त्यामुळे मरणालाच मरण येते. कारण त्याने काळालाही गिळून टाकलेले असते ६.

यापरी गा हे षड्गुण । अनायासें जिंतोन ।
सुखें वर्तती साधुजन । हें लक्षण बाविसावें ॥७॥
अरे ! ह्याप्रमाणे हे षड्विकार अनायासेंच जिंकून टाकून साधु लोक खुशाल ह्या जगांत राहातात. हे त्याचे बाविसावें लक्षण होय ७.

आपुला स्वामी देखे सर्वां भूतीं । तेथें मान इच्छावा कवणाप्रती ।
मानाभिमान सांडिले निश्चितीं । अतिनम्र वृत्तीं वर्तणें ॥८॥
आपला स्वामी (ब्रह्मस्वरूप) त्याला सर्व प्राणिमात्रांमध्ये दिसत असतो. तेव्हा मानाची इच्छा कोणापासून करावयाची ? म्हणून खरोखर मानाभिमान सोडून अतिशय नम्रवृत्तीने वागणे चालू असते ८.

आधीं देहीं धरावा अभिमान । मग इच्छावा अतिसन्मान ।
तंव देहाचें खुंटलें भान । मानाभिमान बुडाले ॥९॥
आधी देहामध्ये अभिमान धरावा, तेव्हां मग मोठ्या सन्मानाची इच्छा करता येते असा नियम आहे. पण येथे देहाचे भानच मुळी खुंटलेले असते. तेव्हां अर्थातच मानाभिमानही रसातळालाच जातात ९.

या नांव गा अमानिता । हे तेविसावी लक्षंणता ।
साधु सन्मानाचा दाता । तेही कथा अवधारीं ॥१०१०॥
ह्याचेच नांव ‘अमानिता’ (म्हणजे निरभिमानपणा). हे साधूचे तेविसावें लक्षण. आता साधु हा सन्मान देणारा कसा असतो तेंही ऐक १०.

ब्रह्मादि मशकवरी । सर्वांतें वंदी शिरीं ।
एकनिष्ठता चराचरीं । बुद्धी दुसरी जाणेना ॥११॥
तो ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांना शिरसावंद्य मानितो. त्याची चराचरामध्ये सर्वत्र एकनिष्ठता असते. ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरी बुद्धीच तो जाणत नाही ११.

सर्व भूतीं स्वामी देखे । लोटांगणें घाली हरिखें ।
सुर नर खर हे नोळखे । अतिसंतोखें वंदित ॥१२॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये तो ब्रह्मरूप पाहातो, आणि म्हणून सर्वांपुढेच तो आनंदानें लोटांगण घालतो. देव, मनुष्य किंवा गाढव हा भेदाभेद मनांत आणीतच नाही. सर्वांनाच तो मोठ्या संतोषाने वंदन करतो १२.

नाना अलंकार घडिले गुणें । सोनें सोनेपणा नव्हेच उणें ।
तेवीं नामरूपांचे विंदाणें । पालटु मनें घेऊं नेणे ॥१३॥
मोठ्या कौशल्याने निरनिराळे अलंकार घडविलेले असले, तरी सोन्याच्या सोनेपणांत काही कमतरता येत नाही. त्याप्रमाणे नावाच्या किंवा रूपाच्या निरनिराळ्या प्रकाराने आपल्या मनात बदल करावा हें तो जाणतच नाही १३.

साकरेची निंबोळी केली । परी ते कडूपणा नाहीं आली ।
तेवीं सूकरादि योनी जरी जाली । तरी नाहीं भंगली चित्सत्ता ॥१४॥
साखरेची निंबोणी (कडूफळ ) केली, तर तींत काही कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे जरी डुकरासारखी कनिष्ठ जात असली, तरी तिच्यांतील ब्रह्मस्वरूप कांहीं नाहींसें होत नाही १४.

सागरीं नाना परींचे विक्राळ । जरी उठिले अनंत कल्लोळ ।
ते जेवीं गा केवळ जळ । तेवीं वस्तु सकळ भूतमात्रीं ॥१५॥
समुद्रामध्ये जरी नानाप्रकारचे अक्राळविक्राळ अनंत कल्लोळ उसळले तरी त्यांच्यामध्ये शुद्ध पाणीच असते, त्याप्रमाणेच कोणताही प्राणी घेतला तरी त्यांत ब्रह्मस्वरूपच भरलेले आहे १५,

यापरी सकळ भूतां । साधु सन्मानातें देता ।
हे चोविसावी लक्षणता । परबोधकता ते ऐक ॥१६॥
अशा समजुतीने साधु हा सर्व प्राणिमात्रांना सन्मानच देणारा असतो. हेच त्याचे चोविसावें लक्षण होय. आता त्यांची ‘परबोधकता’ म्हणजे दुसऱ्याला बोध करण्याचे सामर्थ्य कसे असतें तें ऐक १६.

जैसा भावो जैशी श्रद्धा । तैसतैशा करूं जाणे बोधा ।
ज्ञान पावोनि नव्हे मेधा । स्वरूपश्रद्धा प्रबोधी ॥१७॥
ज्याचा जसा भाव आणि जशी श्रद्धा असते, त्याला तसाच उपदेश करण्याचे साधूला माहीत असते. ज्ञानप्राप्ति होऊनही ज्याची बुद्धि तिकडे वळणार नाही, त्याला तो स्वरूपावरील श्रद्धेचा उपदेश करतो १७.

एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा ।
नोळखेचि सच्छिष्याची दशा । योग्य उपदेशा तो नव्हे ॥१८॥
कोणी ज्ञान प्राप्त झाल्यावर वेडाच बनला, आणि त्याच्या अंत:करणांत त्या ज्ञानाचा अव्यवस्थित ठसा उमटला, तर सच्छिष्याची वास्तविक स्थिति त्याला समजत नाहीशी होते. अर्थातच असा गुरु उपदेश करण्याला पात्र नसतो १८.

एक ज्ञानआश्चर्यें कोंदला । विस्मयें तटस्थ होऊनि ठेला ।
काष्ठलोष्टांचेपरी पडला । नाहीं उरला उपदेश ॥१९॥
कोणी ज्ञानाच्या आश्चर्यानेच अंतःकरण भरून गेल्यामुळे विस्मयाने तटस्थ होऊन राहिला आणि लाकडासारखा किंवा ढेकळासारखा पडून राहिला, तर अशा गुरुला उपदेशाचे कामच राहात नाहीं १९.

एक ज्ञान पावोनि अतिकृपण । जीव गेलिया न बोले जाण ।
भेणेंभेणें धरोनि मौन । न बोले वचन सर्वथा ॥१०२०॥
कोणाला ज्ञानप्राप्ति झाल्यावर अतिशय कृपणच होतो. तो जीव गेला तरी बोलतच नाही. भीतीभीतीने मौनच धरतो. एकही शब्द कधीं बोलत नाही १०२०.

ज्यासी धनकोडी जोडी जाहली । ते पुरूनि वरी दगड घाली ।
दान न देतां वृथा गेली । संपत्ति केली भूमिसवती ॥२१॥
एकादा मनुष्य लाखों रुपये द्रव्य मिळाले असतां ते जमिनीत पुरून त्याच्यावर दगड ठेवतो, दान दिले तर संपत्ति फुकट जाईल असे समजून तो त्या संपत्तीला जमिनीचीच सोबतीण करून ठेवतो २१.

तैसें कष्टीं जोडूनि निजज्ञान । सत्पात्रीं न करीच दान ।
हें ज्ञात्याचें कृपणलक्षण । वंचकपण स्वभावें ॥२२॥
त्याप्रमाणे मोठ्या कष्टाने आत्मज्ञान संपादन वरून ते सत्पात्री दानच करीत नाहीं; हेंच ज्ञात्याच्या कृपणपणाचे लक्षण आहे. अर्थात् फसवेगिरी ती हीच २२.

एक ज्ञान पावोनि सांगों जाये । उपदेशीं शिष्या बोधू नोहे ।
तें ज्ञान अबीज जाहलें पाहें । अंकुरां न लाहे सत्क्षेत्रीं ॥२३॥
कोणी ज्ञान प्राप्त करून ते सांगावयालाही जातो, पण त्या उपदेशाने शिष्याला काहीच समजत नाही. तर ते त्या गुरूचे ज्ञान निःसत्व झाले असें समजावे. चांगल्य शेतांतसुद्धा त्याला मोड यावयाचे नाहीत २३.

सधन शिष्य करावया जाण । स्वयें प्रयत्‍न करी पूर्ण ।
आमुची दीक्षा अनुभव गहन । यापरी ज्ञान विकरां घाली ॥२४॥
कोणी कोणी आमची दीक्षा व अनुभव फार गहन आहेत असें म्हणून मोठमोठे श्रीमान् लोकच शिष्य करण्याची स्वतः परिपूर्ण खटपट करीत असतात. अशा रीतीने ते ज्ञानाचा विक्राच मांडतात २४.

जैसेनि प्रलोभे त्याचें मन । तैसें निरूपी निरूपण ।
अर्थस्वार्थें उपदेश पूर्ण । धनलोभें ज्ञान निर्वीर्य होये ॥२५॥
शिष्याचे मन जिकडून आपल्याकडे ओढेल तसेंच त्याला निरूपण सांगावयाचे, अशा द्रव्यलोभानेच सर्व उपदेश केला, म्हणजे त्या धनलोभानेच ज्ञान निःसत्त्व होऊन जातें २५.

पेंवीं रिघालिया पाणी । त्या धान्याची नव्हे पेरणी ।
तेवीं धनलोभ रिघालिया ज्ञानीं । उपदेशें कोणी सुखी नव्हे ॥२६॥
धान्याने भरलेल्या पंवांत पाणी शिरले, म्हणजे मग त्यांतील धान्य काही पेरावयाला उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणे ज्ञानांत धनलोभ शिरला, की त्या उपदेशानें कोणालाच सुख होत नाही २६.

शिष्य बोधेंवीण झुरे अंतरीं । गुरु गुरुपणें गुरगुरी ।
ते बोधकता नव्हे खरी । घरच्या घरीं चुकामुकी ॥२७॥
ज्ञान न मिळाल्यामुळे शिष्य मनांत झुरत असतो, आणि गुरु गुरुपणाने गुरगुरत असतो ! तो काही खरा उपदेशकपणा नव्हे. घरांतल्या घरांतलीच ती चुकामूक होय २७.

शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत ।
शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥२८॥
जो शब्दज्ञानांत पारंगत असून ब्रह्मानंदांत निरंतर डुलत असतो, आणि शिष्याला उपदेश करण्याला समर्थ असतो, तोच माझे मूर्तिमंत स्वरूप होय २८.

हो कां मी जैसा अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी ।
चिद्रत्‍नाच्या अलंकारी । अलंकारी कुसरीं सच्छिष्यां ॥२९॥
मी जसा अवतार धारण केला आहे, तसाच तोही अवतारी असतो. म्हणूनच तो चित्स्वरूपाच्या अलंकाराने सच्छिष्याला मोठ्या चातुर्याने अलंकृत करतो २९.

तो मी या शब्दकुसरीं । नांवाचीं अंतरें बाहेरीं ।
आंतुवटें निजनिर्धारीं । एके घरीं नांदत ॥१०३०॥
‘तो’ आणि ‘मी’ असे निरनिराळे शब्द चातुर्याने उच्चारीत असता त्यांत केवळ बाह्यदृष्टीने फरक दिसतो, पण त्या दोन्ही शब्दांचा अंतर्गत विचार केला असतां दोघेही एकाच घरांत नांदत असतात १०३०.

एकचि बहुतांतें उपदेशी । एकाची प्राप्ती सुटंक कैशी ।
एकें अज्ञानें जैशीं तैशीं । हा बोलू कोणासी म्हणाल ॥३१॥
एकच असून तो अनेकांना उपदेश करतो. एकाची ज्ञानप्राप्ति किती सुलक्षण असते ? पण कोणी कोणी जशाचे तसेच अज्ञानांत राहातात, तेव्हा हा दोष कोणावर ठेवावा ? ३१.

कृषीवल पेरणी करी । भूमिपाडें पिकती घुमरी ।
अंकुरेना क्षितितळीं उखरीं । तें बीज निर्धारीं अतिशुद्ध ॥३२॥
शेतकरी पेरणी करतो, तेव्हां भूमि उत्तम असल्यास त्याचे पीक अगदी गजबजून येतें व निखालस माळ जमीन असली तर तेथे एक मोडसुद्धा फुटत नाही. पण बीं खरोखर उत्तमच असते ३२.

भूमिचि सखर-निखर । बीज पावन गा साचार ।
भाविकीं उपदेशा विस्तर । विकल्पी नर सुनाट ॥३३॥
ह्या उदाहरणांत भूमीच सरसनिरस असते, बीज खरोखर पवित्रच असते. त्याप्रमाणे भाविक लोकांच्याच ठिकाणी उपदेशाचा विस्तार चांगला होतो. तर्कटी लोक हे शुद्ध माळरान ! ३३.

जो जैसा देखे अर्थ । तोचि बोधूनि करी परमार्थ ।
ऐसा परबोधनीं समर्थ । गुण विख्यात पंचविसावा ॥३४॥
जो शिष्य ज्या प्रकारे अर्थ समजू शकेल, त्याच रीतीनें उपदेश करून त्याला परमार्थाकडे लावावयाचे, असा दुसज्याला उपदेश करण्यामध्ये जो प्रभावी गुण असतो, तोच ‘परबोधकता’ नांवाचा पंचविसावा प्रख्यात गुण होय ३४.

साधुची मैत्री चोखट । वोळखी सर्वांसी जुनाट ।
सर्वांचा सखा श्रेष्ठ । सर्वांसी सकट सारिखा ॥३५॥
साधूची मैत्री ही तशीच उत्तम असते. सर्वांशी त्याची ओळख जुनीच. तो सर्वांचाच थोर मित्र असल्यामुळे सर्वांना सरसकट सारखाच असतो ३५.

सुहृद सर्वांचा सोयरा । सर्वांचा जिवलगु खरा ।
होऊनि सर्वांहीबाहिरा । मित्राचारा चालवी ॥३६॥
तोच सर्वांचा आत व सोयरा; तोच सर्वांचा खरा खरा जिवलग होय. तो सर्वांहून निराळा राहून मित्रत्व चालवितो ३६.

सांगतां आपुली गुह्य गोष्टी । अळोंचावया वेगळा नुठी ।
आप्तभावें देखे सृष्टी । अवंचक पोटीं सर्वांसी ॥३७॥
आपली अगदी गुप्त गोष्ट असली तरी ती हळूच कानांत सांगावयाला तो काही परकेपणा मानीत नाही. सर्व जगाकडे तो आप्तभावनेने पाहतो. तो अंत:करणात सर्वाविषयीं निष्कपटच असतो ३७.

क्षीरनीरांची मैत्री जैशी । भेद नाहीं मिळणीपाशीं ।
साधू सर्व जीव समरसी । अभेदभावेंसीं मित्रत्वें ॥३८॥
दुधाचा आणि पाण्याचा जसा एकजीव होतो, ती एकत्र झाली असता त्या दोहोंत जसा भेद दिसत नाही; त्याप्रमाणे साधूही सर्वांशी ऐक्यभावाने व मित्रत्वाने वागून सर्व जीव आपल्या ठिकाणी समरस करून घेतो ३८.

परम मैत्रीचा भावो देख । दुःख हिरोनि द्यावें सुख ।
साधू जीवांचें निरसोनि दुःख । परम सुख देतसे ॥३९॥
अत्यंत मैत्रीचे लक्षण हे की, दुसऱ्याचे दुःख हरण करून त्याला सुख द्यावयाचे. त्याप्रमाणे साधूही जीवांचे दुःख निवारण करून त्यांना अत्यंत सुखच देत असतो ३९.

नवल मैत्रींचें महिमान । सखा सर्वांचा पुरातन ।
सर्वांसी नीच नवें सौजन्य । अवंचकपण सर्वदा ॥१०४०॥
साधूच्या मैत्रीचा महिमा फार अगाध आहे. तो सर्वांचा जुनाच मित्र आहे. यामुळे सगळ्यांशी त्याचे सौजन्य नित्य नवेच असते. तो सदासर्वदा निष्कपट असतो १०४०.

बंधूहूनि मित्र अधिकु । पुत्राहूनि विश्वासिकु ।
तो मित्र जैं जाहला वंचकु । तैं केवळ ठकु तो जाणावां ॥४१॥
बंधूहूनही मित्र हा अधिक आहे. पुत्रांहूनही मित्र अधिक विश्वासू आहे. त्याच मित्राने जर विश्वासघात केला, तर तो ठक आहे असें समजावें ४१.

मनें धनें कर्तव्यता । ज्याची अनन्य अवंचकता ।
त्या नांव परम मित्रता । हे खूण तत्त्वतां जाणावी ॥४२॥
मनाने, धनानें व कर्तव्यकर्माने ज्याची निष्कपट वृत्ति असते, त्या वृत्तीचंच नांव खरी मैत्री. हीच खूण खरोखर ध्यानात ठेवावी ४२.

समूळ मैत्रीचें निरूपण । विशद सांगितलें जाण ।
हें सव्विसावें साधुलक्षण । कारुण्यपण तें ऐका ॥४३॥
अशा प्रकारे मैत्रीचे सारे लक्षण विचारपूर्वक सांगितले. हें साधूचे सविसावे लक्षण. आतां कारुण्यपण ऐक ४३.

प्रत्युपकार न वांछितां । मी कारुणिक हे नाहीं अहंता ।
ऐसेनि दीनदुःख निवारितां । कारुण्य सर्वथा त्या नांव ॥४४॥
प्रत्युपकाराची इच्छा न ठेवतां व मी मोठा दया करणारा आहे ही अहंता देखील मनांत न बाळगतां दीनजनांचे दुःख निवारण करणे ह्याचंच नांव खरोखर कारुण्य ४४.

रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य वोखदांच्या सोडी गांठी ।
कां संभावना सूनि दिठी । सांगे गोठी पुराणिक ॥४५॥
मनामध्ये द्रव्याची आशा ठेवून त्याप्रमाणे वैद्य औषधाच्या गांठी सोडूं लागतो, किंवा संभावनेवर दृष्टि ठेवून पुराणिक जशा गोष्टी सांगू लागतो ४५,

ऐसी वर्तणूक सर्वथा । ते लागली विषयस्वार्था ।
साधूची नव्हे तैशी कथा । नैराश्यता दयाळू ॥४६॥
त्या प्रकारची वागणूक केवळ विषयाच्या स्वार्थासाठींच चाललेली असते. पण साधूची गोष्ट तशी नाही. तो निरिच्छ असून दयाळू असतो ४६.

दयार्णवें द्रवली दृष्टी । तनु मन धन वेंचूनि गांठी ।
अनाथावरी करुणा मोठी । उद्धरी संकटीं दीनातें ॥४७॥
दयेच्या समुद्रानेच त्याची दृष्टि भरून गेल्यामुळे तो आपलें तनु-मन-धन खर्च करूनही अनाथावर अत्यंत दया करतो आणि दीनदुबळ्यांना संकटांतून मुक्त करतो ४७.

जैसा कळवळा निजस्वार्था । त्याहून अधिक अनाथभूतां ।
तिये नांव परम कारुणिकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४८॥
त्याला आपल्या स्वार्थाचा जितका कळवळा असतो, त्याहूनही अधिक कळवळा त्याला अनाथ प्राण्यांच्या ठायी असतो. उद्धवा ! खरोखर त्याचंच नांव पूर्ण दया ४८.

हें सत्ताविसावें लक्षण । साधूचें जाण संपूर्ण ।
कविपदाचें व्याख्यान । सावधान अवधारीं ॥४९॥
हे साधूचें सत्ताविसावें संपूर्ण लक्षण होय हें लक्षात ठेव. आतां ‘कवि’ ह्या शब्दाचे प्रतिपादन नीट लक्ष देऊन ऐक ४९.

वेदशास्त्रांचा मथितार्थ । जाला करतळामळकवत ।
तैसाच ब्रह्मानंदें डुल्लत । कवि निश्चित या नांव ॥१०५०॥
वेदांतील आणि शास्त्रांतील रहस्य ज्याला केवळ करतलामलकवत् झालेले, आणि तसाच जो ब्रह्मानंदांत डुलत राहणारा, त्याचेच नांव खरोखर ‘कवि’ १०५०.

उपनिषदांचा मथितार्थ । ज्याच्या मुखाची वास पहात ।
परोक्षापरोक्ष ज्याचेनि सत्य । कवि विख्यात त्या नांव ॥५१॥
उपनिषदांतील मथितार्थ ज्याच्या मुखाची वाट पहात राहतो, शब्दज्ञान व अनुभवज्ञान हे ज्यामुळे सत्य होते, त्याचंच प्रसिद्ध नांव ‘कवि’ होय ५१.

कवि या पदाचे व्याख्यानें । झालीं अठ्ठावीस लक्षणें ।
उरलीं दोनी अतिगहनें । तें दों श्लोकीं श्रीकृष्णें आदरिलें सांगों ॥५२॥कवि या शब्दाच्या वर्णनाने अठ्ठावीस लक्षणे पूर्ण झाली. आतां अत्यंत गहन अशी दोन लक्षणे राहिली आहेत, ती पुढील दोन श्लोकांत सांगावी असा श्रीकृष्णांनी विचार केला ५२.

आज्ञायैवं गुणान् दोषान् मयादिष्टानपि स्वकान् ।
धर्मान् सन्त्यज्य यः सर्वान् मां भजेत स तु सत्तमः ॥ ३२ ॥[श्लोक ३२] मी शास्त्रांत सांगितलेल्या धर्मांच्या आचरणातील गुण व उल्लंघनातील दोष जाणूनही भक्तीमध्ये जर ते बाधक असतील, तर त्या सर्व धर्माधर्मांचा त्याग करून जो नेहमी माझ्या भक्तीतच मग्न असतो, तो भक्त श्रेष्ठ होय. (३२)

प्रपंचनगरासभोंवतीं । कर्मनदीची महाख्याती ।
तिचेनि जळें जीव वर्तती । उत्पत्तिस्थिति अरतीरीं ॥५३॥
प्रपंचनगराच्या सभोंवार कर्माची दुस्तर नदी असल्याचे प्रसिद्धच आहे. तिच्याच पाण्यावर जीव वागत असतात. उत्पत्ति आणि स्थिति ही तिच्या अलीकडच्या तीरावरच होतात ५३.

ते नदीचेनि जीवनमेळें । कर्मासी येती कर्मफळें ।
स्वर्गनरकादि सोहळे । तेणें जळबळें भोगिती ॥५४॥
त्या नदीच्या पाण्यानेच कर्माला कर्मफळे येतात आणि त्या पाण्याच्या जोरानेच स्वर्गनरकादि सोहळे भोगावे लागतात ५४.

प्रपंचनगरींहूनि निघतां । वेगें परमार्थासी येतां ।
जो तो कर्मनदीआंतौता । बुडे सर्वथा निर्बुजला ॥५५॥
प्रपंचाच्या नगरीतून निघून परमार्थाकडे धावत धावत जो जो येऊ लागतो, तो तो कर्मनदीमध्येच गटकळ्या खाऊन बुडून जातो ५५.

एक तरलों ऐसें ज्ञाते म्हणती । तेही कर्मीं कर्मगुचकिया खाती ।
स्वयें बुडोनि आणिकां बुडविती । तरलों म्हणती तोंडाळ ॥५६॥
कोणी ज्ञाते आपण तरलों असें म्हणतात, पण तेच कर्मामध्ये गटकळ्या खाऊन स्वतः बुडतात, आणि दुसन्यांनाही त्यांत बुडवितात. ते ‘तरलों तरलों’ अशी रिकामी बडबड मात्र करतात ५६.

ऐसे बुडाले नेणों किती । बुडतां शिकवण तेचि देती ।
कर्मचि उपावो तरणोपायप्राप्ती । म्हणोनि बुडविती सर्वांतें ॥५७॥
असे किती बुडाले त्यांचा पत्ता नाही. पण तेच बुडतांना लोकांना शिकवतात की, तरण्याला उपाय एक कर्मच आहे. असे सांगून सर्वानाच बुडवितात ५७.

‘न कर्मणा’ हें वेदवचन । कर्मे नव्हे ब्रह्मज्ञान ।
तें न मानिती कर्मठ जन । त्यांसी कर्माभिमान कर्माचा ॥५८॥
‘न कर्मणा’ हें वेदांतील वचन आहे. ह्याचा अर्थ ‘कर्माने कांहीं ब्रह्मज्ञान होत नाही’ असा आहे. पण कर्मठ लोक ते मान्य करीत नाहीत. कारण, त्यांना कर्माचा अभिमान असतो ५८.

कर्म देहाचे माथां पूर्ण । तो न सांडितां देहाभिमान ।
कर्माचा त्याग नव्हे जाण । कर्मबंधन देहबुद्धी ॥५९॥
कर्म हे पूर्णपणे देहाच्याच माथ्यावर आहे. तो देहाभिमानच जर सोडला नाही, तर कर्माचा त्याग असा कधीच होणार नाही. पण उलट देहबुद्धीनें कर्मबंधन मात्र प्राप्त होईल ! ५९.

एक अरतीरीं असती नष्ट । तरलों म्हणती अकर्मनिष्ठ ।
स्वकर्मत्यागी कर्मभ्रष्ट । जाण पापिष्ठ पाषांडी ॥१०६०॥
कित्येक असे नष्ट असतात की, ते कर्मच करीत नाहीत, आणि कर्मनदीच्या अलीकडच्याच तीरावर उभे राहून आपण तरलों असें म्हणतात. असे जे वर्णाश्रमकर्म टाकणारे आहेत, ते कर्मभ्रष्ट होत. ते अत्यंत पाखांडी व पातकी म्हणून समजावें १०६०.

ये कर्मनदीतें तरला । ऐसा न देखों दादुला ।
बुडाल्या धुराचि मुदला । पाडु केतुला इतरांचा ॥६१॥
ह्या कर्मनदीतून तरून गेला असा बहाद्दर एकही कोणी दिसत नाही. मोठे मोठे मी मी म्हणविणारे पुढारीसुद्धा हीत बुडून ठार झाले, मग इतरांचा पाड काय ? ६१.

ये कर्मनदीची उत्पत्ती । मजचिपासोनि निश्चितीं ।
तेही सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजबोधें ॥६२॥
ह्या कर्मनदीची उत्पत्ति खरोखर माझ्यापासूनच आहे. तीही आत्मज्ञानाने तुला यथार्थ सांगून देतों ६२.

‘आज्ञायैवं’ हें मूळींचें मूळ । श्लोकींचें प्रथम पद केवळ ।
येणेंचि कर्मनदी झाली स्थूळ । करूनि विवळ सांगत ॥६३॥
‘आज्ञायैवं’ हें मूळ श्लोकांतील मूळचे केवळ पहिले पद आहे. त्यामुळेच ही कर्मनदी फोफावली आहे, ते स्पष्ट करून सांगतों ६३.

मदाज्ञा मेघगंभीरा । निःश्वसितपवनद्वारा ।
चतुर्वेदविधीच्या धारा । अतिअनिवारा वर्षले ॥६४॥
माझ्या आज्ञारूपी गंभीर मेघांनी माझ्या श्वासोच्छासाच्या वायूच्या योगानें चतुर्वेदविधीच्या धारांचा अत्यंत अनिवार वर्षाव केला ६४.

तेणें कर्मनदीआंतौतें । अनिवार उलथलें भरतें ।
पूर दाटला जेथींचा तेथें । उतार कोणातें कळेना ॥६५॥
त्यामुळे कर्मनदीच्या आंत अनिवार भरती उसळली आणि जेथल्या तेथे पूर दाटून राहिला. उतार कोठून आहे हे कोणासच कळेना ६५.

तेथ गुणदोषांचा वळसा । विधिनिषेधांचा धारसा ।
कर्माकर्मांचा आवर्तं कैसा । सबाह्य सरिसा भंवतसे ॥६६॥
तेथें गुणदोषांचा वेढा पडून विधिनिषेधांच्या धारेमध्ये कर्माकर्माचा भोंवरा आंत बाहेर सारखा कसा फिरत राहिला आहे पहा ! ६६.

संकल्पविकल्पांचे हुडे । नदी दाटली चहूंकडे ।
तरों जाय तो गुंतोनि बुडे । पाऊल पुढें न घालवे ॥६७॥
संकल्पविकल्पांचे बुरुज मध्ये आड आल्यामुळे ती नदी चहूंकडे अफाट पसरली आहे. तिला जो तरून जावयास पहातो, तो त्या बुरुजांना अडकून बुडून जातो. एक पाऊलही पुढे घालवत नाहीं ६७.

प्रत्यवायाची मगरमिठी । पडल्या सगळेंचि घाली पोटीं ।
उगळोनि न सोडी संकटी । ने उठाउठीं अधोगती ॥६८॥
प्रत्यवायाची मगरमिठी पडली म्हणजे मग तर बोलावयासच नको. तो सगळेच गिळून पोटांत घालतो. संकटांतसुद्धा बाहेर सोडीत नाही. हां हां म्हणतां अधोगतीला नेतो ६८.

अंगविकळतेचे मासे । तळपताती घ्यावया आविसें ।
कर्मठतेचे कमठ कैसे । खडक तैसे निबर ॥६९॥
अंगविकळतेचे मासे मांस घेण्याकरितां फिरत असतात. कर्मठपणाचे कासव तर दगडासारखे कठीण ! ६९.

काळविक्षेपसर्पासी । एक सांपडले विलासआळशीं ।
विकल उच्चार चोंढियेसी । एक व्यग्रतेसीं बुडाले ॥१०७०॥
कोणी विलास भोगून आळशी बनलेले असतात, ते काळविक्षेपसांच्या सपाट्यांत सांपडतात. त्यांच्या नाकातोंडांत पाणी गेल्यामुळे तोंडांतून शब्दसुद्धा काढवत नाही. कोणी व्यग्रतेनेच बुडून गेले १०७०.

एक तरावयाच्या आशा । पडिले कर्माच्या धारसां ।
ते विधिनिषेधवळसां । पडिले सहसा नुगंडती ॥७१॥
कोणी तरून जाण्याच्या आशेनें कर्माच्या धारेतच सांपडतात. ते विधिनिषेधाच्या वळणांत गुंतून बहुधा बाहेरच पडत नाहीत ७१.

एक स्वकर्मधारीं । पडोनि वाहावले दूरी ।
ते सत्यलोकमगरीं । आपुल्या विवरीं सूदले ॥७२॥
कोणी स्वकर्माच्या प्रवाहांत सांपडून लांब वहावत जातात. त्यांना सत्यलोकमगरांनी नेऊन आपल्या खबदाडांत टाकले ७२. मगरांनी नेऊन आपल्या खबदाडांत टाकले ७२.

एकां न वचवेचि परतटीं । माझारींचि फळें गोमटीं ।
देखोनि धांविन्नले अव्हाटीं । ते स्वर्गसंकटीं गुंतले ॥७३॥
कोणाला तर पलीकडे जाववतच नाही. ते मध्येच सुंदर फळं पाहून आडमार्गाला धावतात आणि स्वर्गाच्या संकटांत अडकून पडतात ७३.

आम्ही तरों युक्तीबळें । म्हणोनि रिघाले एके वेळे ।
ते अहंकारखळाळें । महातिमिंगिळें गिळिले ॥७४॥
आपण युक्तीच्या बळाने तरून जाणार असें म्हणून जे एकदम निघतात, ते अहंकाररूप खळाळांत पडले म्हणजे देवमासे त्यांना गिळून टाकतात ७४.

एकीं वेदत्रयाची पेटी । दीक्षेची दोरी बांधली पोटीं ।
ते स्वर्गांगनाकुचकपाटीं । गुंतोनि शेवटीं बुडाले ॥७५॥
कोणी तिन्ही वेदांची पेटी दीक्षारूप दोरीने बांधून पोटाखाली घेतात, ते अप्सरांच्या कुचरूपी गुहेमध्ये गुंतून पडून शेवटी बुडतात ७५.

मंत्रतंत्रादिदीक्षितें । गुंतोनि बुडालीं जेथींच्या तेथें ।
कर्मनदीच्या परपारातें । कोणी पावतें दिसेना ॥७६॥
मंत्रतंत्रांचा खटाटोप करणारे बिचारे दीक्षित तर गुंतून जाऊन जेथल्या तेथेच बुढाले. तात्पर्य कर्मनदीच्या पलीकडच्या तीराला पोचणारे कोणीच दिसत नाहीत ७६.

विरळा कोणीएक सभाग्य येथें । हे सकळ उपाय सांडूनि परते ।
जो अनन्य प्रीतीं भजे मातें । कर्मनदी त्यातें कोरडी ॥७७॥
येथे असा भाग्यशाली विरळाच. जो कोणी एकादा हे सर्व उपाय एका बाजूस ठेवून अनन्य भक्तीने माझें भजन करतो, त्याला मात्र ही कर्मनदी कोरडी ठणठणीतच होते ७७.

माझे भक्तीचें तारूं नातुडे । जंव सप्रेमाचें शीड न चढे ।
तंव तरणोपाय बापुडे । वृथा कां वेडे शिणताती ॥७८॥
जोपर्यंत माझे भक्तिरूप तारूं सांपडत नाही, व जोपर्यंत प्रेमाचे शीड चढत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारचे तरणोपाय दुर्बळ होत. मग वेडे लोक व्यर्थ यातायात का करतात ? ७८.

धरूनि अनन्यभक्तीचा मार्गु । करूनि सर्वधर्मकर्मत्यागु ।
हा तरणोपाय चांगु । येरु तो व्यंगु अधःपाती ॥७९॥
अनन्य भक्तीचा मार्ग धरून सर्व धर्मकर्माचा त्याग करणे हाच उत्तम तरणोपाय आहे. इतर कोणताही उपाय दुर्बळ व अधःपातास नेणारा होय ७९.

नेणोनि स्वधर्मकर्मांतें । कां नास्तिक्य मानूनि चित्तें ।
किंवा धरोनियां आळसातें । त्यागी कर्मातें तैसा नव्हे ॥१०८०॥
आपला धर्म कोणता व कर्म कोणते हे जाणून न घेऊन, किंवा मनानेच नास्तिकपणाचा स्वीकार करून, किंवा आळसाला बळी पडून, कर्मच सोडून देतात, तसा मात्र हा प्रकार नव्हे १०८०.

अथवा शरीरक्लेशाभेण । किंवा सर्वथा उबगोन ।
कां धरोनि ज्ञानाभिमान । स्वकर्म जाण सांडीना ॥८१॥
किंवा शरीराला कैश होतील ह्या भयाने, किंवा केवळ कंटाळाच करून, किंवा ज्ञानाचा अभिमान धरून तो कर्म सोडीत नाही, हे लक्षात ठेव ८१.

माझी वेदरूप आज्ञा शुद्ध । ते वेदविवंचना विशद ।
स्वधर्मकर्मांचे कर्मवाद । अतिअविरुद्ध जाणता ॥८२॥
माझी वेदरूप आज्ञा अत्यंत पवित्र आहे. त्या वेदांचा सविस्तर विचार करून स्वधर्मकर्माचे जे अत्यंत अविरुद्ध कर्मवाद आहेत, ते जाणणारा ८२,

स्वधर्माचा उत्तम गुण । प्रत्यवायें अधःपतन ।
या दोहींतें जाणोन । मद्‍भक्तीसी प्राण विकिला ॥८३॥
आणि स्वधर्माचा गुण अत्यंत उत्तम आहे व याच्यांत बिघाड झाल्याने अधःपतन घडते ही दोन्ही लक्षात आणून माझ्या भक्तीला प्राण विकलेला ८३;

विसरोनि आन आठवण । अखंडता हरिस्मरण ।
त्या नांव भक्तीसी विकिला प्राण । इतर भजन आनुमानिक ॥८४॥
असा भक्त दुसरी कोणतीच आठवण न ठेवता अखंड हरीचेंच स्मरण करतो. त्याचेच नांव भक्तीला प्राण विकणे होय. इतर जे भजन ते केवळ आनुमानिक ८४.

माझेनि भजनप्रेमेंजाण । विसरला कर्माची आठवण ।
कर्म बापुडें रंक कोण । बाधक जाण नव्हे भक्तां ॥८५॥
माझ्या भजनाच्या प्रेमापुढे कर्माची आठवणसुद्धा तो विसरून जातो. दरिद्री कर्म तें विचारें कोण ? ते भक्तांना बाधक होत नाही ८५.

सप्रेम करितां भजनविधी । सर्व कर्मांतें विसरली बुद्धी ।
ते जाणावी भजनसमाधी । तेथ कर्म त्रिशुद्धी बाधेना ॥८६॥
माझ्या प्रेमळ भजनामध्ये रंगून गेले असतां तो सान्या कर्माना विसरून जातो. तीच भजनाची समाधि आहे असे समजावे. तेथें खरोखर कर्म बाधत नाही ८६.

ज्याची श्रद्धा कर्मावरी । तोचि कर्माचा अधिकारी ।
ज्याची श्रद्धा श्रीधरीं । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥८७॥
ज्याची कर्मावर श्रद्धा असते, तोच कर्माचा अधिकारी असतो. आणि ज्याची श्रद्धा श्रीकृष्णावरच असते, तो कर्माचा अधिकारी होत नाही ८७.

जो जीवेंप्राणें भक्तीसी विकिला । तो तेव्हांचि कर्मावेगळा जाला ।
त्याच्या भावार्था मी विकिला । तो कर्मीं बांधला केवीं जाये ॥८८॥
जो जिवाभावाने भक्तीलाच विकलेला असतो, तो त्याच वेळी कर्मापासून वेगळा झाला असे समजावे. त्याच्या भावार्थाला मी विकला जातों, मग तो कर्माने कसा बद्ध होणार ? ८८.

गुणदोषांची जननी । ते निःशेष अविद्या निरसूनी ।
जो प्रवर्तला माझे भजनीं । तो साधु मी मानीं मस्तकीं ॥८९॥
गुणदोषांची केवळ माताच अशी जी अविद्या, तीच ज्याने निखालस निरसून टाकली, आणि जो माझ्या भजनांतच निमग्न झाला, तो साधु मी शिरसावंद्य करतों ८९.

निजकल्पना जे देहीं । तेचि मुख्यत्वें अविद्या पाहीं ।
ते कल्पना निमालिया ठायीं । जगीं अविद्या नाहीं निश्चित ॥१०९०॥
देहामध्ये आत्मभावनेची जी कल्पना, तीच मुख्यत्वेकरून अविद्या म्हणून समजावें. ती कल्पनाच जागच्या जागी जिरून गेली, की मग खरोखर जगामध्ये अविद्या नाहींशीच होते १०९०.

अविद्येच्या त्यागासवें । धर्माधर्मादि आघवें ।
न त्यजितांचि स्वभावें । त्याग फावे अनायासें ॥९१॥
अविद्येचा त्याग झाला, की त्याच्याबरोबर धर्म-अधर्मादिक सर्व जरी टाकली नाहीत, तरी त्यांचाही आपोआपच त्याग होत असतो ९१.

शिर तुटलियापाठीं । शरीर निजकर्मासी नुठी ।
तेवीं अविद्या त्यागितां शेवटीं । त्यजिले उठाउठीं सर्व धर्म ॥९२॥
मस्तक तुटून गेले म्हणजे मग शरीर कांहीं आपलें कर्म करावयाला उठत नाही. त्याप्रमाणे अविद्येचा त्याग केला म्हणजे शेवटी हां हां म्हणतां सर्व धर्माचा त्याग झालाच ९२.

दिवसा चंद्र‍उदयो पाहे । तो झाला तैसा नाहीं होये ।
तेवीं अविद्येचेनि विलयें । सर्व धर्म लाहे ते दशा ॥९३॥
हे पहा ! दिवसा चंद्रोदय झालेला पाहिला, तरी तो प्रत्यक्ष झालेला असून न झाल्यासारखाच असतो. त्याप्रमाणे अविद्या लयास गेली म्हणजे धर्माच्या सर्व प्रकारांना तीच दशा प्राप्त होते ९३.

खद्योत सूर्योदयापाठीं । शोधूनि पाहतां न ये दिठीं ।
तेवीं अविद्येच्या शेवटीं । धर्माधर्मकोटी मावळल्या ॥९४॥
सूर्योदय झाल्यानंतर काजव्याला शोधून पाहिले तरी तो दृष्टीस पडत नाही. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाल्यावर धर्माधर्माच्या झुंडीही मावळून जातात ९४.

ग्रहगण नक्षत्रमाळा । खद्योततेज‍उमाळा ।
रात्रीसकट बोळवण सकळां । तेवीं धर्माधर्मकळा अविद्येसवें ॥९५॥
नवग्रहांचा समुदाय, नक्षत्रांच्या पंक्ति, काजव्याच्या तेजाची चमक, या सर्वांची रात्रीबरोबरच बोळवण होते. त्याप्रमाणे अविद्येबरोबरच धर्माधर्मांच्या कळाही नाहीशा होतात ९५.

सर्व धर्मत्यागाची खूण । उद्धवा मुख्यत्वें हेचि जाण ।
याहीवरी माझें भजन । मुख्य भागवतपण या नांव ॥९६॥
उद्धवा ! सर्व धर्मत्यागाची मुख्य खूण हीच आहे हे लक्षात ठेव. ह्याशिवाय आणखी वर माझे भजन. ह्याचंच नांव मुख्य भागवतपणा ९६.

म्हणसी अविद्याचि केवीं नासे । मा अधर्म नासती तीसरिसे ।
ते अविद्या नाशे अनायासें । भक्तिउल्हासें माझेनि ॥९७॥
परंतु तूं म्हणशील की, अविद्याच कशी नाश पावणार ? मग तिच्याबरोबर अधर्म नाश पावतील. पण बाबा ! ती अविद्या माझ्या भक्तीच्या वृद्धीने अनायासेंच नाश पावते ९७.

सूर्योदय देखतां दृष्टीं । सचंद्र नक्षत्रांची मावळे सृष्टी ।
तेवीं माझ्या भक्तिउल्हासापाठीं । अविद्या उठाउठीं निमाली ॥९८॥
सूर्योदय झालेला दृष्टीस पडला, की चंद्रासहवर्तमान नक्षत्रांची सर्व शोभा लुप्त होऊन जाते, त्याप्रमाणे माझ्या भक्तीचा विकास झाला की अविद्या हां हां म्हणतां नाहीशी होऊन जाते ९८.

अविद्येच्या नाशासवें । नासती धर्माधर्म आघवे ।
जेवीं गरोदर मारितां जीवें । गर्भही तीसवें निमाला ॥९९॥
अविद्येचा नाश झाला की सर्व धर्माधर्माचाही नाश होतो. ज्याप्रमाणे गर्भिणीला ठार मारली असता तिच्याबरोबर तो गर्भही ठार होतो ९९.

जेव्हां माझे भक्तीचा उल्हासू । तेव्हांचि अविद्येचा निरासू ।
अविद्ये सवें होय नाशू । अनायासू सर्व धर्मां ॥११००॥
माझ्या भक्तीचा विकास झाला की तत्काल अविद्येचा नाश झाला म्हणून समजावें. अविद्येचा नाश झाला की सर्व धर्माचाही अनायासेंच नाश होतो ११००.

ते तूं भक्ति म्हणसी कोण । जिचें मागां केलें निरूपण ।
ते माझी चौथी भक्ति जाण । अविद्यानिरसन तिचेनि ॥१॥
आतां तूं म्हणशील की, अशी भक्ति कोणती ? तर जिचे मी पूर्वी निरूपण केले आहे, तीच. ती माझी चौथी भक्ति आहे हे लक्षात ठेव. तिच्याच योगाने अविद्येचें निरसन होतें १.

येर आर्त जिज्ञासु अर्थार्थी । जे जे भक्तींतें आदरिती ।
ते अविद्यायुक्त निश्चितीं । चौथी भक्ति मुख्यत्वें माझी ॥२॥
इतर आर्त (रोगपीडित); जिज्ञासु (मोक्षाची इच्छा करणारे) व अर्थार्थी (द्रव्येच्छु) जी जी भक्ति करतात, ती खरोखर अविद्यात्मक असते, म्हणून मुख्यत्वेकरून चौथी भक्ति ती माझी होय २.

जे भक्तीमाजीं कंहीं । अविद्येचा विटाळू नाहीं ।
भजन तरी ठायींच्या ठायीं । अनायासें पाहीं होतसे ॥३॥
त्या भक्तीमध्ये अवियेचा मुळींच विटाळ नसतो, आणि भजन तर जागच्या जागी अनायासानेच होत असते ३.

ते माझी आवडती भक्ती । उद्धवा जाण निश्चितीं ।
जिसी अविद्या असे धाकती । सर्व धर्म कांपती सर्वदा ॥४॥
उद्धवा ! तीच खरोखर माझी आवडती भक्ति होय. जिला अविद्या भीत असते, आणि सर्व धर्म सदोदित चळचळां कांपत असतात . ४

ते भक्तीची देखोनि गुढी । अविद्या धाकेंचि प्राण सांडी ।
सर्व धर्मांची आवडी । घायेंवीण बापुडी निमाली ॥५॥
त्या भक्तीने झंडा उभारलेला पाहिला, की तिच्या धाकानेंच अविद्या प्राण सोडते आणि सर्व धर्माची आवड तर बिचारी जखमी झाल्याशिवायच ठार होते ५.

हा मद्‍भक्तीचा पर्यावो । आवडीच्या गोडिया सांगे देवो ।
ऐक भक्ताचा भजनभावो । जेणें निर्वाहो भक्तीचा ॥६॥
हा आपल्या भक्तीचा प्रकार देवांनी मोठ्या प्रेमाच्या गोडीने सांगितला. आतां जेणेकरून भक्ति साजरी होते, तो भक्तांचा भजनभावही ऐक ६.

माझेनि अनुसंधानेंवीण । स्नान संध्या जप होम दान ।
ते अवघेचि अधर्म जाण । मद्‍भजन तें नव्हे ॥७॥
माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच आहेत. तें माझें भजन नव्हे ७.

गोडी आवडी ते परपुरुषीं । मिथ्या लुडबुडी निजपतीपाशीं ।
ते पतिव्रता नव्हे जैशी । जाण भक्ति तैशी व्यभिचारी ॥८॥
खरी गोडी आणि खरी आवड काय ती परपुरुषाच्या ठिकाणी, आणि आपल्या नवऱ्यापुढे खोटीच लुडबुड करावयाची, ती जशी पतिव्रता नव्हे, त्याप्रमाणे तसली भक्तीही व्यभिचारीच होय ८.

नाना विषयीं ठेवूनि मन । जो करी ध्यान अनुष्ठान ।
ते जारस्त्रियेच्या ऐसें जाण । नव्हे पावन ते भक्ती ॥९॥
नानातहेच्या विषयांवर मन ठेवून जो ध्यान आणि अनुष्ठान करतो, त्याची ती कृति जारिणी स्त्रियेसारखीच होते. ती काही पवित्र भक्ति नव्हे ९.

काया वाचा मनसा । माझे भक्तीचा पडला ठसा ।
भजतां नाठवे दिवसनिशा । भक्तीची दशा या नांव ॥१११०॥
कायावाचामनेंकरून माझ्या भक्तींत मन्न असणे, भजन करतांना दिवस किंवा रात्र ह्याचेही भान न राहणे, ह्याचंच नांव भक्तीची खरी स्थिति १११०.

जपेंवीण नाम वदनीं । धारणेवीण ध्यान मनीं ।
संकल्पेंवीण मदर्पणीं । सर्व कर्में करूनी सर्वदा ॥११॥
जपाशिवायच ज्याच्या मुखांत नाम, धारणेशिवायच ज्याच्या मनांत ध्यान, आणि सदासर्वदा सारी कर्मे करून संकल्पाशिवायच ती मला अर्पण ११,

निरोधेंवीण वायुरोधू । मर्यादेवीण स्वरूपबोधू ।
विषयेंवीण सदा स्वानंदू । मद्‍भक्त शुद्धू या नांव ॥१२॥
प्राणायामाशिवायच वायूचा निरोध, मर्यादेशिवायच स्वरूपज्ञान, विषयाशिवायच सदोदित स्वानंद, असें ज्याचेपाशी असते, त्याचंच नांव माझा शुद्ध भक्त १२.

भक्त म्हणवितां गोड वाटे । परी भजनमार्गीं हृदय फुटे ।
अकृत्रिम भक्ति जैं उमजे । तैं मी भेटें उद्धवा ॥१३॥
भक्त म्हणवून घेतांना मोठे गोड वाटते. पण भजनमार्गामध्ये हृदय पिळवटून निघते. अकृत्रिम भक्ति जेव्हां प्रगट होते, त्या वेळेसच उद्धवा ! माझी भेट होते १३.

ऐसेनि भजनें जो भजत । तो मजमाजीं मी त्याआंत ।
भक्तांमाजीं जो उत्तम भक्त । साधु निश्चित या नांव ॥१४॥
अशा रीतीने जो माझे भजन करतो, तो माझ्यामध्ये व मी त्याच्यामध्ये राहातो. सर्व भक्तांमध्ये तोच उत्तम भक्त होय, आणि खरोखर साधु असें नांव त्यालाच शोभते १४.

तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । साधूमाजीं अतिउत्तम ।
तो माझें विश्रामधाम । अकृत्रिम उद्धवा ॥१५॥
पुरुषांमध्ये उत्तम पुरुष तोच. साधूंमध्ये अत्युत्तम साधु तोच. उद्धवा ! माझें विश्रांतीचे अकृत्रिम स्थान तोच १५.

तयालागीं मी आपण । करीं सर्वांगाचें आंथरुण ।
जीवें सर्वस्वें निंबलोण । प्रतिपदीं जाण मी करीं ॥१६॥
त्याच्यासाठी मी स्वतः सर्वांगाचें आंथरूण करतों, आणि पावलोपावली मी त्याच्यावरून आपल्या जीवाचें निंबलोण उतरतों, लक्षात ठेव १६.

तो मज आवडे म्हणशी कैसा । जीवासी पढिये प्राण जैसा ।
सांगतां उत्तमभक्तदशा । प्रेमपिसा देवो जाला ॥१७॥
तो मला कसा आवडतो म्हणशील तर, जीवाला जसा प्राण आवडतो त्याप्रमाणे. हे उत्तम भक्ताचे लक्षण सांगतांना देवही प्रेमाने वेडा झाला १७.

मग न धरतु न सांवरतु । उद्धवासी कडिये घेतु ।
भुलला स्वानंदें नाचतु । विस्मयें स्फुंदतु उद्धवू ॥१८॥
त्याला धीर निघेना. त्याचे अंत:करण त्याला आवरेनासे झाले. त्याने उद्धचास कोवर घेतले, आणि तो आनंदाने नाचूं लागला. तेव्हां विस्मयाने उद्धवाचाही गळा भरून आला १८.

मी एकु देवो हा एकु भक्तु । हेंही विसरला श्रीकृष्णनाथु ।
हा देवो मी एकु भक्तु । तें उद्धवाआंतु नुरेचि ॥१९॥
मी एक देव आणि हा एक भक्त हेही श्रीकृष्णनाथ विसरून गेले, आणि हा देव आणि मी भक्त हा भाव उद्धांतही उरलाच नाही १९.

ऐशा भक्तिसाम्राज्यपटीं । दोघां पडली ऐक्यगांठी ।
तंव देवोचि कळवळला पोटीं । निजभक्तगोठी सांगावया ॥११२०॥
अशा भक्तीच्या साम्राज्यपटांत दोघांची एकरूपता झाली, तेव्हा आपल्या भक्ताची गोष्ट सांगण्याचा देवाच्याच पोटांत कळवळा आला ११२०.

ऐशी उत्तम भक्तांची कथा । अतिशयें आवडे कृष्णनाथा ।
रुचलेपणें तत्त्वतां । मागुतां मागुतां सांगतू ॥२१॥
अशी उत्तम भक्तांची कथा कृष्णनाथाला अतिशयच आवडत असे. ती त्याला आवडत असल्यामुळेच तो फिरून फिरून सांगत होता २१.

श्लोकीं प्रमेयें दिसतां अनेगें । तें श्रीकृष्णें सांडूनि मागें ।
हा ग्रंथार्थु श्रीरंगे । साक्षेपें स्वांगें लिहविला ॥२२॥
श्लोकामध्ये अनेक विचार दिसत असतां ते मागे टाकून श्रीकृष्णाने मोठ्या आवडीने आपण होऊन हाच ग्रंथार्थ लिहविला २२.

हे माझे युक्तीची कथा । नव्हे नव्हे जी सर्वथा ।
सत्य मानावें श्रोतां । ये अर्थींचा वक्ता श्रीकृष्ण ॥२३॥
महाराज ! ही खरोखर केवळ माझ्याच पदरची कथा नव्हे बरें ! ह्या अर्थाला बोलविणारा श्रीकृष्णच आहे, हे श्रोत्यांनी सत्य माना २३.

श्रोतां व्हावें सावधान । मागील कथा अनुसंधान ।
दोघां पडिलें होतें आलिंगन । विस्मयें पूर्ण उद्धवू ॥२४॥
आता श्रोत्यांनी सावध व्हावे. मागील कथेचा संदर्भ असा आहे की, दोघांनी परस्परांस आलिंगन दिले होते, आणि उद्धवाला अत्यंत विस्मय झाला होता. २४.

चढत प्रेमाचें भरतें । तें आवरोनि कृष्णनाथें ।
थापटूनि उद्धवातें । सावध त्यातें करी हरी ॥२५॥
कृष्णनाथाला जे प्रेमाचे भरते आले होते ते त्याने आवरले, आणि उद्धवाला हाताने थोपटून श्रीकृष्णाने त्याला सावध केलें २५.

उद्धवातें म्हणे तत्त्वतां । तुज आवडली भक्तिकथा ।
तेचि मी सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥२६॥
तो उद्धवाला म्हणाला, “खरोखर तुला भक्तीची कथा आवडली, ह्याकरितां आतां तीच मी तुला सांगतो. नीट लक्ष लावून श्रवण कर २६.

एक जाणोनि भजती मातें । एक ते केवळ भावार्थें ।
मी दोहींच्या भुललों भावातें । दोघे मातें पढियंते ॥२७॥कोणी मला जाणून माझें भजन करतात, आणि कोणी केवळ भावार्थानंच मला भजतात. पण मी त्या दोघांच्याही भक्तीला भुलतों, आणि ते दोघेही माझे आवडते असतात २७.

ज्ञात्वाज्ञात्वाथ ये वै मां यावान् यश्चास्मि यादृशः ।
भजन्ति अनन्यभावेन ते मे भक्ततमा मताः ॥ ३३ ॥[श्लोक ३३] मी कोण आहे, किती मोठा आहे, कसा आहे, हे जाणून किंवा न जाणता जे अनन्यभावाने माझे भजन करतात, ते माझे भक्त आहेत. (३३)

मी स्वस्वरूपी सच्चिदानंद । जगदांदि आनंदकंद ।
नित्य सिद्ध परम शुद्ध । माझें स्वरूप विशद जाणती ॥२८॥
मी आत्मस्वरूपांत राहणारा, सच्चिदानंद, जगताचा आदि, आनंदाचा मूळ उत्पादक, नित्य सिद्ध, परमपवित्र, असें जें माझें स्वरूप तें ते स्पष्टपणे जाणतात २८.

देश काळ वर्तमान । सर्वीं सर्वदा अनवच्छिन्न ।
सर्वात्मा सच्चिदानंदघन । भेदशून्य मी एक ॥२९॥
देश, काल व वर्तमान ह्या सर्वात सर्वदा परिपूर्ण, सर्वात्मा, सच्चिदानंदधन आणि भेदरहित असा एक मीच २९.

सत्य ज्ञान अनंत । परब्रह्म मी निश्चित ।
ऐसें जाणूनि मज भजत । उत्तम भागवत ते जाण ॥११३०॥
सत्य, ज्ञान व अनंतस्वरूप परब्रह्म ते खरोखर मी. असें जाणून जे मला भजतात, तेच उत्तम भागवत होत हे लक्षात ठेव ११३०.

शुद्ध झालिया स्वरूपप्राप्ती । म्हणशी भजन कैशा रीतीं ।
देवभक्त तेचि ते होती । मी होऊन भजती मजमाजीं ॥३१॥
आतां तूं म्हणशील की, शुद्ध स्वरूपाची प्राप्ति झाल्यानंतर भजन कसे करावयाचें ? तर त्याचे उत्तर असे की, देव आणि भक्त दोन्ही तेच होऊन सत्स्वरूप होत्साते माझ्यामध्येच ते माझें भजन करतात ३१.

वाम सव्य दोनी भाग । दों नांवीं एकचि अंग ।
तेवीं देवभक्तविभाग । मद्‌रूपीं सांग भासती ॥३२॥
डावे आणि उजवें हे भाग जरी दोन आहेत, तरी दोन्ही नांवांनी आंग एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि भक्त हे विभाग माझ्या स्वरूपांतच पूर्णपणे दिसून येतात ३२.

पाहें पां लोखंडाचा आरिसा । लोखंडेंचि घडिजे जैसा ।
लोखंडेंचि उजळे कैसा । स्वप्रकाशा निजतेजें ॥३३॥
हे पहा ! लोखंडाचा आरसा करावयाचा असला तर तो जसा लोखंडानेच घडावा लागतो, आणि तो आपल्या प्रकाशाने प्रकाशमान होईल असा उजळाही त्याला लोखंडानेच चावा लागतो ३३.

दर्पण उजळलिया पाही । शशी सूर्य गगन मही ।
बिंबलीं धरी आपुल्या ठायीं । अप्रयासें पाहीं स्वलीला ॥३४॥
आरसा साफ केला म्हणजे तो चंद्र, सूर्य आकाश, पृथ्वी यांची प्रतिबिंब आपल्यामध्ये धारण करतो. त्याच्याकडून सहजच अनायासाने घडते ३४.

तैसें मी होऊनि माझे भक्त । अनन्यभावें मजचि भजत ।
तैं माझें ऐश्वर्य समस्त । प्रतिबिंबत तयांमाजीं ॥३५॥
त्याप्रमाणे माझे भक्तही मीच होऊन अनन्यभावाने माझेच भजन करतात, तेव्हा माझे सारें वैभव त्यांच्यामध्येच प्रतिबिंबित होते ३५.

हो कां तरंगु जैसा सागरीं । त्यासी जळचि तळींवरी ।
तैसा माझा भक्त मजमाझारीं । सबाह्याभ्यंतरीं मद्‌रूप ॥३६॥
किंवा समुद्रात लाटा असतात त्यांना जसें खाली व वर पाणीच असते, त्याप्रमाणे माझा भक्त माझ्यामध्येच असल्यामुळे अंतर्बाह्य मद्रूपच असतो ३६.

जैसा सुवर्णाचा नरहरी । सुवर्णहिरण्यकशिपूतें विदारी ।
सुवर्णप्रह्लाद पोटींसी धरी । तैशी परी मद्‍भजना ॥३७॥
ज्याप्रमाणे नृसिंहाची मूर्ति सोन्याची केली म्हणजे ती सुवर्णाच्याच हिरण्यकशिपूचे विदारण करीत असते, आणि सोन्याचाच प्रल्हाद पोटाशी धरते, त्याप्रमाणेच माझ्या भजनाची स्थिति आहे ३७.

तेथें सगुण आणि निर्गुण । उभय रूपें मीचि जाण ।
जैसें सुवर्ण आणि कंकण । तैसें अभिन्न जाण मद्‌रूप ॥३८॥
तेथे सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपें मीच असतो. ज्याप्रमाणे सोने आणि कंकण ही अभिन, त्याप्रमाणेच मद्रूप झाल्याने तो व मीही अभिन्नच असतो ३८.

तेथ जें जें दृश्य देखे दृष्टीं । तेथ मद्‌रूपें पडे मिठी ।
दृश्य द्रष्टा लोपूनि त्रिपुटी । उठाउठी मज मिळे ॥३९॥
तेव्हा डोळ्यांनी जें जें पहा तेथे तेथे माझेच स्वरूप त्याला दिसू लागते, आणि दृश्य, द्रष्टा यांची त्रिपुटी नाहीशी होऊन तो तत्काळ मत्स्वरूपालाच मिळतो ३९.

ऐसें जाणोनियां मज भजत । ते जाण पां उत्तम भक्त ।
ऐसें नेणोनियां मज भजत । भोळे भक्त ते माझे ॥११४०॥
असें जाणून जे माझें भजन करतात, तेच भक्त उत्तम होत, हे लक्षात ठेव. अशाच प्रकारे मला न जाणतां जे माझें भजन करतात, ते माझे भोळे भक्त होत १९४०.

नाहीं श्रुतीचें पठण । नाहीं वेदांतशास्त्रश्रवण ।
नाहीं विकल्पलक्षण । अनन्य जाण भावार्थीं ॥४१॥
तशा भोळ्या भक्ताने वेदाचे पठण केलेले नसते, वेदांतशास्त्र ऐकलेले नसते, त्याला विकल्पाचे लक्षण नसते, तर तो केवळ अनन्य भावार्थी असतो ११

सगुण निर्गुण नेणे काहीं । परी देवो आहे म्हणे हृदयीं ।
जडत्व असे देहाच्या ठायीं । तें देवो पाहीं वागवीत ॥४२॥
त्याला सगुण निर्गुण हें काही कळत नाही, पण हृदयामध्ये देव आहे असे म्हणतो. देहाच्या ठायीं जडत्व आहे. म्हणूनच पहा ! देव त्याला वागवितो ४२.

यालागीं देहाचें जें चळण । तें हृदयस्थ करवी नारायण ।
दृष्टीचें जें देखणेपण । त्याचेनि जाण होतसे ॥४३॥
म्हणून देहाचे जे चलन होते, तें हृदयस्य नारायण करवितो. तसेंच डोळ्यांचे जे पहाणे तेही त्याच्यामुळेच होते असे समज ४३.

काढूनि आपुला डोळा । दूरी ठेविला वेगळा ।
तो हृदयस्थेंवीण आंधळा । देखणी कळा देवाची ॥४४॥
आपला डोळा काढून तो दूर अगदी वेगळा ठेवला, तर हृदयस्थ नारायण तेथे नसल्यामुळे तो आंधळाच होतो. म्हणून पहाणारी कलाही देवाची होय ४४.

रसना केवळ चामडी । ते काय जाणे रसगोडी ।
कापूनि टाकिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४५॥
जीभ केवळ चामड्याची आहे. तिला रसाची चव काय कळणार ? तिला कापून टाकले तर ती बिचारी गोडी-अगोदी कांहींच जाणत नाहीं ४५.

रसनाद्वारें रसस्वादू । घेता हृदयस्थ परमानंदू ।
बुद्धीसी करिता उद्‍बोधू । सत्य गोविंदू हृदयींचा ॥४६॥
म्हणून जिव्हेच्या द्वारे रसस्वाद घेणाराही हृदयस्थ परमात्माच होय. किंवा बुद्धीला ज्ञान देणाराही खरोखर हृदयांतील नारायणच होय ४६.

मनाचें गमनागमन। दिसे हृदयस्थाआधीन ।
यालागीं दूरी जावोनि परते मन । हृदयासी जाण येतसे ॥४७॥
मनाचे जाणेयेणेसुद्धा त्या हृदयस्थाच्याच आधीन असल्याचे दिसते. म्हणूनच मन दूर गेले तरी ते परत फिरते आणि पुन्हा हृदयांतच येते ४७.

इंद्रियें प्रेरिता वारिता । हे सत्ता आधीन हृदयस्था ।
यालागीं नांवें हृषीकेशता । त्यासचि तत्त्वतां म्हणताती ॥४८॥
इंद्रियांना प्रेरणा करणारा किंवा आवरून धरणाय ही सत्तासुद्धा हृदयस्थाच्याच आधीन आहे. म्हणूनच खरोखर त्यालाच ‘हृषीकेश’ (म्हणजे इंद्रियांचा स्वामी) असे म्हणतात ४८.

एवं विचाराचा निर्वाहो । करितां निजहृदयीं असे देवो ।
तो पहावया बाहेरी धांवो । तैं मूर्ख पहा हो मी झालों ॥४९॥
अशा विचाराने पाहिले म्हणजे आपल्या हृदयांतच देव असल्याचे दिसून येते. तो पहावयास मी बाहेर धावतो, तेव्हां मी केवढा हो मूर्ख सालों पहा ! ४९.

तीर्थीं क्षेत्रीं भेटेल देवो । हा आपुले हृदयींचा भावो ।
निजभावेंवीण पहा वो । तीर्थीही देवो असेना ॥११५०॥
तीर्थामध्ये किंवा क्षेत्रामध्ये देव भेटेक असा आपल्या मनांत भाव असतो. परंतु अहो ! आत्मभावाशिवाय तीर्थातसुद्धा देव असावयाचा नाही ११५०.

एवं देवो तो मजमाजीं आहे । त्याचेनि टवटवती इंद्रियें ।
क्रियाकर्म जें जें होये । तें त्याचेनि पाहें तत्त्वतां ॥५१॥
तात्पर्य, देव आहे तो माझ्यामध्येच आहे, त्याच्यामुळेच इंद्रिये टवटवीत होतात, व क्रिया-कर्म म्हणून जें जें होतें तें तें खरोखर त्याच्यामुळेच होतें ५१.

देह तंव बापुडें । केवळ अचेतन मडें ।
त्याचेनि कर्म नुपजे फुडें । हें तंव कुडें सर्वथा ॥५२॥
देह तर बिचारा केवळ अचेतन प्रेत आहे. त्याच्याने खरोखर कर्म होत नाही हे उघडच आहे. हा देह अगदीच व्यर्थ होय ५२.

इंद्रियांचेनि चेतविता । कर्म क्रिया कर्तव्यता ।
देहाचेनि नोहे तत्त्वतां । मुख्यत्वें कर्ता हृदयस्थु ॥५३॥
इंद्रियांना चेतविणारा ; कर्म, क्रिया किंवा कर्तव्य करणारा; हे कार्य तर खरोखर देहाच्याने होतच नाही. म्हणून मुख्य कर्ता तो हृदयस्थ परमात्माच होय ५३.

यापरी जे कांहीं कर्तव्यता । ते भोळेपणें नेघे माथां ।
सर्व कर्मांचा आत्मा कर्ता । विश्वासें सर्वथा दृढ मानी ॥५४॥
अशा प्रकारे कर्तव्य म्हणून जे काही आहे, तें भोळेपणाने आपल्या माथीं घेतच नाही. सर्व कर्माचा कर्ता आत्मा आहे, हीच समजूत विश्वासाने दृढतर धरून बसतो ५४.

मग अन्नपानादि सेवितां । मानी आत्मारामु भोक्ता ।
सर्वकर्मकर्तव्यता । अहं कर्ता हें म्हणों नेणे ॥५५॥
आणि मग अन्नपानादि सेवन करतांना आत्मारामच सर्वाचा भोक्ता आहे असे मानतो. सर्व कर्म किंवा कर्तव्य करतांना मी कर्ता म्हणावयाचे त्याला समजतच नाहीं ५५.

ऐसे भोळिवेचेनि समजें । माझें भजन निपजे वोजें ।
तें म्या आवडीं सेविजे । जाण तें माझें खाजुकें ॥५६॥
अशा भोळ्या भावाच्या समजाने में माझें भजन होते ते उत्तम होते. मी तें भजन मोठ्या आवडीने ग्रहण करतो. कारण ते माझें खाद्य आहे हे लक्षात ठेव ५६.

सर्वभावें सर्वथा । बाळकांसी जेवीं माता ।
तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मी सर्वथा सर्वस्वें ॥५७॥
सर्व भावाने सर्वतोपरी मुलाला जशी आई, त्याप्रमाणे माझ्या भोळ्या भक्तांना सर्वस्व सारें मीच आहे ५७.

धांवोनि मिठी घालावयासी । हितगुज आलोचासी ।
खाणें जेवणें विश्रांतीसी । जेवीं बाळकासी निजजननी ॥५८॥
धावून जाऊन मिठी घालावयाला; कानांत हिताची गुह्य गोष्ट सांगावयाला; आणि खाणे, जेवणे व विश्रांति या कृत्यांना मुलाला जशी आई असते ५८,

तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मीचि जाण जिवलग माता ।
अर्थ स्वार्थ परमार्थता । जाण तत्त्वतां मी त्यांसी ॥५९॥
त्याप्रमाणे माझ्या भोळ्या भक्तांना जिवलग माता असा मीच आहे. त्यांना अर्थ, स्वार्थ, परमार्थ, खरोखर सारे काय ते मीच ५९.

तोंडींचें पोटींचें गांठींचें । माता बाळकालागीं वेंचे ।
तेवीं भाविकांलागीं आमुचें । सर्वस्व साचें मी वेंची ॥११६०॥
आई मुलासाठी ज्याप्रमाणे तोंडांतले, पोटचे व गांठींचें सारे खर्च करते, त्याप्रमाणे भाविकांसाठी खरोखर आमचेही सर्वस्व मी वर्च करतों ,१६०.

बाळक न मागतां धांवोनी । कळवळोनि माता लावी स्तनीं ।
तेवी भोळ्या भक्तांलागुनी । मी अनुसंधानी लाविता ॥६१॥
मुलाने मागितलें नाहीं तरी आई कळवळ्याने धावत जाऊन त्याला स्तनाला लावते, त्याप्रमाणे मीही भोळ्या भक्तांना माझ्या अनुसंधानाला लावतों ६१.

ज्येष्ठ कनिष्ठ पुत्रातें पिता । एकचि जाण प्रतिपाळता ।
ज्येष्ठातें निग्रहो करिता । लळे पुरविता बाळकांचे ॥६२॥
ज्येष्ठ पुत्राला आणि कनिष्ठ पुत्राला प्रतिपालन करणारा पिता एकच असतो. पण तो मोठ्या मुलाला दटावणारा व लहानाचे लाड पुरविणारा असतो ६२.

ज्येष्ठ वांकुडें बोलतां । तोंडावरी हाणे पिता ।
बाळक बोबडें बोलतां । संतोषे सर्वथा सर्वस्वें ॥६३॥
थोरला मुलगा काही वांकडे बोलला तर बाप स्याच्या तोंडात मारतो, आणि लहान मूल बोबडे बोलले तरी त्याला मोठा संतोष होतो ६३.

सज्ञानासी अबद्ध पडतां । दोष वाजती त्याचे माथां ।
भोळ्या भक्तांची अबद्ध कथा । तेणें देवो तत्त्वतां संतोषे ॥६४॥
सज्ञानाच्या तोंडांतून कांहीं वांकडे निघाले तर त्याच्या दोषाचे खापर त्याच्या मस्तकावर फुटते. पण भोळ्या भाविक लोकांची कथा असंबद्ध असली तरी देवाला तिच्यापासून खरोखर संतोष होतो ६४.

कर्माकर्मप्रत्यवायता । हे सज्ञानासीच सर्वथा ।
भोळ्या भक्तांसी कर्मबाधकता । मी सर्वथा येऊं नेदीं ॥६५॥
कर्माकर्माची प्रायश्चित्तें सर्वस्वी सज्ञान्यांनाच, भोळ्या भक्तांकडे कर्माचे बंधन मी कधीच येऊ देत नाही ६५.

भोजनीं बैसतां बापासी । दूरी बैसवी ज्येष्ठ पुत्रासी ।
अंकी वाऊनि बाळकासी । तृप्ति निजग्रासीं देतुसे ॥६६॥
बाप जेवावयास बसला म्हणजे थोरल्या मुलाला लांब बसवितो, आणि लहान मूल असेल त्याला मांडीवर घेऊन आपल्या घांसांतील घांस भखून त्याचे समाधान करतो ६६.

तेथें जें जें गोड आपणासी । तें तें दे बाळकासी ।
न घेतां प्रार्थूनि त्यासी । तृप्तीच्या ग्रासीं जेववी ॥६७॥
त्या वेळी आपल्याला जें जें गोड लागेल तें तें त्या मुलाला देतो. त्याने घेतलें नाही तर त्याच्या विनवण्या करून मोठ्या आनंदाने त्याला भरवितो ६७.

तेवीं साधनीं शिणतां सज्ञानासी । प्राप्ती होय अतिप्रयासीं ।
माझिया भोळ्या भक्तांसी । मीच अनायासीं उद्धरीं ॥६८॥
त्याप्रमाणे सज्ञान्यांना साधनें करून करून दमल्यानंतर महत्प्रयासाने माझी प्राप्ति होते, पण माझ्या भोळ्या भक्तांना मीच अनायासाने उद्धरितों ६८.

वाट चुकल्या भुयाळासी । फेरा पडे चालों जाणत्यासी ।
बाळक बापाचे कडियेसी । श्रमू तयासी येवों न शके ॥६९॥
भोयांना चालतां येत असूनही वाट चुकल्यामुळे त्यांना फेरा पडतो, पण मूल असतें तें बापाच्या कडेवरच बसलेले असते. त्याला कशाचेच श्रम पडत नाहीत ६९.

तेवीं ‘साधनी’ अंगविकळता । ते वाजे सज्ञानाचे माथां ।
भोळ्या भक्तातें मी उद्धरिता । प्रयास सर्वथा त्या नाहीं ॥११७०॥
त्याप्रमाणे साधनाने अंगाला झीज लागावयाची तेवढी मात्र सज्ञान्याच्या डोक्यावर बसते. भोळ्या भक्ताचा उद्धार करणारा मीच असल्यामुळे, त्याला मुळीच प्रयास पडत नाहींत ११७०.

त्यासी वाऊनि आपुल्या खांदीं । मी पाववीं सायुज्यसिद्धी ।
नवल त्याची भोळी बुद्धि । तेथही भजनविधी न सांडी ॥७१॥
मी त्याला आपल्या खांद्यावरून वाहून नेऊन सायुज्यसिद्धीला पोचवितों. पण त्याची ती भोळी बुद्धि किती विलक्षण असते पहा ! की तो तेथेही भजनविधि सोडीत नाहीं ७१.

हृदयीं कपटाचा थारा । तोचि भजनासी आडवारा ।
करितां युक्तिप्रयुक्ती विचारा । विचाराबाहिरा मी त्यासी ॥७२॥
अंत:करणांत कपटाला थारा देणे, तीच भजनामध्ये आडकाठी असते. त्याने युक्तिप्रयुक्तीने कितीही विचार केला तरी मी त्याच्या विचारांच्या बाहेरच असतों ७२.

नेणे आचारा विचारा । केवळ भावार्थी भोळा खरा ।
न धरत न सांवरत एकसरां । मजभीतरां तो पावे ॥७३॥
केवळ जो खरोखर भोळा भावार्थी असतो, त्याला आचारविचार कळत नाही. तो इकडे तिकडे न वळतां थेट माझ्यामध्येच येऊन मिळतो ७३.

देखोन भोळिवेच्या भक्तासी । मीचि सामोरा धांवें त्यासी ।
त्यापाशीं मी अहर्निशीं । भुललों भावासी सर्वथा ॥७४॥
भोळ्या भक्ताला पाहून मीच त्याला सामोरा धावत जातो. मी त्याच्या भक्तीला सर्वतोपरी भाळलों असल्यामुळे रात्रंदिवस त्याच्यापाशीच असतों ७४.

केवळ जे भोळे भक्त । ते भगवंतासी आवडत ।
सांगतां कृष्ण मिटकिया देत । लाळ घोटीत उद्धवू ॥७५॥
निखालस जे भोळे भक्त असतात, ते भगवंताला आवडतात. हे कृष्णांनी सांगतांच उद्धव लाळ घोंटून मिटक्याच देऊ लागला ७५.

मज भोळ्या भक्तांची आवडी । काय सांगों त्यांची गोडी ।
त्यावेगळी अर्धघडी । कोडी परवडी नावडती ॥७६॥
मला भोळे भक्त फार आवडतात. त्यांची गोडी काय सांगावी ? त्यांच्याशिवाय अर्धघटका राहण्यासाठी आवडत्या वस्तूंचे ढीगच्या ढीग दिले तरी ते मला नकोत ७६.

यापरीचे जे भोळे भक्त । ते मी मानीं उत्तम भागवत ।
त्यांच्या पायां मी लागें भगवंत । उत्तम निश्चित ते जाण ॥७७॥
अशा प्रकारचे जे भोळे भक्त असतात, ते मी उत्तम भागवत असें मानतो. मी प्रत्यक्ष भगवान् असून त्यांच्या चरणी लागतो. कारण ते खरोखरच उत्तम असतात ७७.

त्यांलागीं मी आर्तभूत । त्यांलागीं सदा सावचित्त ।
त्यांलागीं मी दशदिशा धांवत । भोळा भक्त दुर्लभ ॥७८॥
त्यांच्यासाठी मी भुकेलेला असतो. त्यांच्यासाठी मी सदासर्वदा सावध असतो. त्यांच्यासाठी मी दशदिशांना धावत सुटतो. कारण, भोळा भक्त परम दुर्लभ आहे ७८.

उद्धवा काय सांगों गोठी । भोळा भक्त देखोनि दिठीं ।
मीही आपुलिये सवसाटी । उठाउठी घेतुसें ॥७९॥
उद्धवा ! दुसरी गोष्ट काय सांगावी ? भोळा भक्त डोळ्यांनी पहातांच मीही त्याला हां हां म्हणतां विकून घेऊन माझे पद त्याला देतों ७९.

येर्‍हवीं मोल करितां जाण । मजहूनि माझे भक्त गहन ।
यालागीं मी त्यांअधीन । भक्तवचन नुल्लंघीं ॥११८०॥
बाकी मोलच करावयास गेले तर माझे भक्त हे माझ्यापेक्षा थोरच आहेत. म्हणूनच मी त्यांच्या अंकित राहून भक्तांचे वचन कधी उहंधन करीत नाही ११८०.

भोळ्या भक्तांचें वचन । माझेनि नुल्लंघवे जाण ।
देवकीवसुदेवाचीं आण । भावो प्रमाण भजनासी ॥८१॥
भोळ्या भक्काचे वचन मला उल्लंघन करवतच नाही. वसुदेव-देवकींची शपथ घेऊन सांगतों की, भजनाला भक्ति हीच मुख्य आहे ८१.

वृथा घृतेंवीण भोजन । वृथा वंध्येचें मैथुन ।
वृथा भावेंवीण भजन । सत्य जाण उद्धवा ॥८२॥
उद्धवा ! तुपाशिवाय भोजन व्यर्थ, वंध्येचें मैथुन व्यर्थ, त्याप्रमाणे भक्तीशिवाय भजनही खरोखर व्यर्थ होय ८२.

भावो तेथ भाग्य पहा हो । भावो तेथ मी निःसंदेहो ।
भावो तेथें प्रकटे देवो । निजस्वभावो स्वानंदें ॥८३॥
अहो ! भाव असतो तेथे भाग्य असतें पहा ! भाव असतो तेथे निःसंशय मी असतो. भाव असतो तेथे आनंदाने आपल्या स्वभावाप्रमाणेच देव प्रकट होतो ८३.

भावो तेथ विरक्ती । भावो तेथ प्रकटे शांती ।
भावो तेथ माझी भक्ती । उल्हासती निजबोधें ॥८४॥
भाव असतो तेथें विरक्ति असते. भाव असतो तेथे शांति प्रकट होते. भाव असतो तेथे आत्मबोधेकरून भक्ति विकास पावते ८४.

एवं भाविकांमाजीं माझी भक्ति । मजसहित स्वानंदें नाचती ।
यालागीं भोळे जे भावार्थी । ते उत्तम होती भागवत ॥८५॥
अशा प्रकारे भाविकांमध्ये माझी भक्ति माझ्यासहवर्तमान स्वानंदाने नाचत असते. म्हणून भोळे आणि भावार्थी असतात तेच उत्तम भागवत होतात ८५.

नेणते भक्त जे मातें भजती । ते मज पावले या रीतीं ।
सांगीतली ते म्यां व्युत्पत्ती । आतां उत्तम भक्ती अवधारीं ॥८६॥नेणते भक्त असतात ते अशा रीतीने माझें भजन करून मला पावतात. त्याचा प्रकार तुला सांगितला. आतां उत्तम भक्ति कशी असते ते ऐक ८६.

मल्लिङ्ग मद्‍भक्तजन दर्शनस्पर्शनार्चनम् ।
परिचर्या स्तुतिः प्रह्व गुणकर्मानुकीर्तनम् ॥ ३४ ॥[श्लोक ३४] माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शन, स्पर्श, पूजा, सेवा, स्तुती, वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि कर्मे यांचे सतत कीर्तन करावे. (३४)

नाना अवतार‍अनुक्रमा । शैवी वैष्णवी अतिउत्तमा ।
शास्त्रोक्त माझ्या प्रतिमा । तीर्थक्षेत्रीं महिमा विशेष ज्यांचा ॥ ८७॥
अनेक प्रकारच्या अवतारांप्रमाणे शैवांनी किंवा वैष्णवांनी शास्त्रोक्त रीतीप्रमाणे अत्युत्तम केलेल्या अनेक मूर्ति; तीर्थक्षेत्रांमध्ये ज्यांचे माहात्म्य विशेष अशा ८७;

ज्या प्रतिमा देवीं प्रतिष्ठिलिया । ज्या नरकिन्नरीं संस्थापिलिया ।
ज्या स्वयें स्वयंभ प्रकटलिया । शास्त्रीं बोलिलिया गंडकी ॥८८॥
किंवा ज्या मूर्ति देवांनीच उत्पन्न केलेल्या असतात, किंवा मनुष्यांनी किंवा किन्नरांनी स्थापना केलेल्या असतात, किंवा ज्या स्वयंभूच उत्पन्न झालेल्या असतात, शास्त्रामध्ये ज्यांना ‘गंडकी मूर्ति’ असे म्हणतात ८८;

एकी भक्त‍अनुग्रहें आल्या । आसुरी निशाचरीं ज्या केल्या ।
आपुलाल्या घरीं पूजिल्या । भक्तीं करविल्या त्रैवर्णिकीं ॥८९॥
त्यांपैकी कित्येक भक्तांवर अनुग्रह करण्याकरितां आलेल्या असतात. कित्येक दैत्यांनी व राक्षसांनी केलेल्या असतात. कित्येक तीन वर्षातील लोकांनी आपआपल्या घरी पूजण्याकरिता तयार करविलेल्या असतात ८९.

ऐशा माझ्या प्रतिमांची भेटी । पाहों धांवे उठाउठी ।
पूजा करावया पोटीं । आवडी मोठी उल्हासे ॥११९०॥
अशा माझ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी त्वरेने धावत जातात आणि त्यांची पूजा करण्यासाठी पोटांत मोठी आवड उत्पन्न होते १९९०.

माझें स्वरूप ते माझे भक्त । मी तेचि ते माझे संत ।
त्यांचे भेटीलागी आर्तभूत । जैसें कृपणाचें चित्त धनालागीं ॥९१॥
माझे भक्त ते माझेंच स्वरूप होत. माझे संत तो मीच. कृपणाचें चित्त जसे धनासाठी उत्कंठित होते, त्याप्रमाणे माझें चित्त त्यांच्या भेटीसाठी अगदी उत्कंठित होऊन राहते ९१.

माझ्या प्रतिमांहूनि अधिक । संतभजनीं अत्यंत हरिख ।
साधुसंगतीचें अतिसुख । सांडूनि देख घरदारां ॥९२॥
त्यांना माझ्या मूर्तीपेक्षाही संतांच्या भजनांत अत्यंत संतोष असतो. घरदार सोडून साधूंची संगत करण्यांतच त्यांना अतिशय सुख वाटते ९२.

चिंतामणीसी कीजे जतन । तैसी मर्यादा राखे सज्जन ।
नीच नवें अधिक भजन । न धाये मन पूजितां ॥९३॥
चिंतामणीला जसे जतन करून ठेवतात, त्याप्रमाणे ते सजनांची मर्यादा राखण्याविषयी जपत असतात. आणि नित्यनवें अधिक अधिकच भजन करतात त्यांच्या पूजा करतांना तर त्यांचे मन तृप्तच होत नाहीं ९३.

सिद्ध करूनि पूजासंभार । माझे पूजेचा अत्यादर ।
पूजा करितां एकाग्र । जैं साधु नर घरा येती ॥९४॥
पूजेचे साहित्य करून मोठ्या साक्षेपाने माझी पूजा करतात. पण एकांतांत अशा पूजा करीत असतां जर कोणी साधुपुरुष घरी आले ९४,

त्या साधूंची पूजा न करितां । जो माझी पूजा करी सर्वथा ।
तेणें मज हाणितल्या लाता । कीं तो माझ्या घाता प्रवर्तला ॥९५॥
तर त्या साधूंची पूजा न करता जो माशीच पुजा करील, त्याने मला लाथा मारल्या किंवा तो माझा धात करण्याला त्याचें और संपत्ति पाल अशा रीतीने उद्युक्त झाला म्हणून समजावें ९५.

बाळक एक एकुलता । त्यासी माथां हणितल्या लाता ।
मग पाटोळाही नेसवितां । क्षोभली माता समजेना ॥९६॥
एकाद्या बाईला एकुलता एक मुलगा असला, आणि त्या मुलाच्या मस्तकावर कोणी एकाद्याने लाथा मारल्या, तर त्याच्या आईला सहजच राग येतो. मग त्या रागावलेल्या आईला राग जाण्यासाठी जरी रेशमी वस्त्र नेसण्यासाठी बक्षिस दिले, तरी ती रागावलेली आई शांत होत नाहीं ९६.

तेवीं अवगणुनी माझिया संतां । मीचि क्षोभें मज पूजितां ।
ते सेवा नव्हे सर्वथा । अतिक्षोभकता मज केली ॥९७॥
त्याप्रमाणे माझ्या संतांचा अवमान करून माझी पूजा केली असतां मीच क्षुब्ध होतो. त्याने ती माझी खरोखर सेवा केली असें मुळीच होत नाही, तर त्याने त्या कृतीने मला क्षोभ मात्र आणला म्हणून समजावे ९७.

संत माझे लळेवाड । त्यांची पूजा मज लागे गोड ।
संतसेवकांचें मी पुरवीं कोड । मज निचाडा चाड संतांची ॥९८॥
संत हे माझे आवडते आहेत. त्यांची पूजा मला गोड वाटते. संतांचे जे सेवक असतात त्यांचे मनोरथ मी पूर्ण करतों. मला निरिच्छाला सुद्धा संतांची इच्छा आहेच ९८.

सांडूनि माझें पूजाध्यान । जो संतांसी घाली लोटांगण ।
कोटि यज्ञांचें फळ जाण । मदर्पण तेणें केलें ॥९९॥
माझें पूजाध्यान सोडून जो संतांना लोटांगण घालतो, त्याने कोटियज्ञांचें फळ मला अर्पण केले म्हणून समजावें ९९.

सकळ तीर्थी तोचि न्हाला । जपतपादिफळें तोचि लाहिला ।
सर्व पूजांचें सार तो पावला । जेणें साधू वंदिला सन्मानें ॥१२००॥
त्यानेच सर्व तीर्थात स्नान केले व त्यानेच जपतपांची फळे मिळविली असे समजावें. ज्याने सन्मानपूर्वक साधूला नमस्कार घातला. त्याच्या हाती सर्व पूजांचे सार आले १२००.

प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । संत सचेतन माझ्या मूर्ती ।
दृढ भावें केल्या त्यांची भक्ती । ते मज निश्चितीं पावली ॥१॥
माझ्या प्रतिमा असतात त्या अचेतन मूर्ति असतात, पण संत ह्या माझ्या सचेतन (चालत्या बोलत्या) मूर्ति आहेत. पूर्ण श्रद्धा धरून त्यांची भक्ति केली असता, ती निश्चयेंकरून मला पावते १.

प्रतिमा निजकल्पना उत्तम । संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम ।
चालतें बोलतें परब्रह्म । अतिउत्तम साधुसेवा ॥२॥
प्रतिमा ह्या आपल्या कल्पनेप्रमाणे उत्तम केलेल्या असतात, परंतु संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तमच आहेत. ते चालतेंबोलतें परब्रह्मच होत. ह्याकरितांच साधुसेवा अतिउत्तम होय २.

माझ्या प्रतिमा आणि साधुनर । तेथें या रीतीं भजती तत्पर ।
हा तंव सांगीतला निर्धार । भजनप्रकार तो ऐक ॥३॥
माझ्या मूर्ति आणि सत्पुरुष ह्यांचे अशा रीतीने तत्परतेने भजन करतात, हा निश्चय तर तुला सांगितला. आता भजनाचा प्रकार ऐक ३.

प्रतिमा आणि साधु सोज्ज्वळे । आवडीं न पाहती ज्यांचे डोळे ।
दृष्टि असोनि ते आंधळे । जाण केवळें मोरपिसें ॥४॥
माझी प्रतिमा आणि सोज्ज्वळ साधु यांना ज्यांचे डोळे आवडीने पहात नाहीत, त्यांना दृष्टि असूनही त्यांचे ते डोळे केवळ मोरांच्या पिसांप्रमाणे आंधळे होत १.

जेवीं कां प्रिया पुत्र धन । देखोनियां सुखावती नयन ।
तैसें संतप्रतिमांचें दर्शन । आवडीं जाण जो करी ॥५॥
ज्याप्रमाणे स्त्रिया, पुत्र व संपत्ति पाहुन डोळ्यांना सुख वाटते, त्याप्रमाणेच जो आवडीने संतप्रतिमांचे दर्शन घेतो ५,

अतिउल्हासें जें दर्शन । या नांव गा देखणेपण ।
तेणें सार्थक नयन जाण । दृष्टीचें भजन या रीतीं ॥६॥
त्याचे अतिउत्कंठेने में दर्शन घेणे त्याचंच नांव देखणेपणा. त्यानेच नेत्रांचे सार्थक होते असे समज. अशा रीतीने नेत्रांकडून भजन घडते ६.

देखोनि संत माझीं रूपडीं । जो धांवोनियां लवडसवडी ।
खेंव देऊनियां आवडीं । मिठी न सोडी विस्मयें ॥७॥
संत हे माझ्याच मूर्ति आहेत अशा कल्पनेने त्यांच्याकडे पाहून जो मोठ्या उत्कंठेने धावत जाऊन आवडीने त्यांना आलिंगन देतो, आणि आनंदाच्या भराने घातलेली मिठी सोडीत नाही ७.

ऐसें संतांचें आलिंगन । तेणें सर्वांग होय पावन ।
कां मूर्तिस्पर्शें जाण । शरीर पावन होतसे ॥८॥
असें संतांचे आलिंगन घेतले असता त्याच्या योगाने सर्व आंगच पावन होते. किंवा मूर्तीच्या स्पर्शानेही आंग पावन होते असे समज ८.

तीर्थयात्रे न चालतां । संतांसमीप न वचतां ।
हरिरंगणीं न नाचतां । चरण सर्वथा निरर्थक ॥९॥
तीर्थयात्रेला न जाती, संतांच्या जवळ न राहाता, किंवा श्रीहरीच्या सभामंडपांत न. नाचतां जे पाय राहातात, ते पाय सर्वथैव निरर्थक होत ९.

जो कां नाना विषयस्वार्था । न लाजे नीचापुढें पिलंगतां ।
तो हरिरंगणीं नाच म्हणतां । आला सर्वथा उठवण्या ॥१२१०॥
जो अनेक प्रकारच्या विषयसुखांसाठी नीचापुढे लाळ घोंटावयाला लाजत नाही, त्याला श्रीहरीच्या सभामंडपांत नाच म्हटले की तो सर्वस्वी उठवणीला आलाच ! १२१०.

तीर्थयात्रा क्षेत्रगमनता । हरिकीर्तना जागरणा जातां ।
संतसमागमें चालतां । कां नृत्य करितां हरिरंगीं ॥११॥
तीर्थयात्रेला जातांना, पुण्यक्षेत्राला गमन करितांना, हरिकीर्तनाच्या जागरणाला जातांना, संतांच्या बरोबर चालतांना, किंवा श्रीहरीच्या रंगमंडपांत नृत्य करीत असतांना ११,

या नांव गा सार्थक चरण । इतर संचार अधोगमन ।
चरणाचें पावनपण । या नांव जाण उद्धवा ॥१२॥
पायांना जे श्रम होतात, त्याचंच नांव ‘पायांचे सार्थक’ होय. इतर ठिकाणी जाणे म्हणजे अधःपाताकडे जाणे होय. उद्धवा ! ह्याचंच नाव चरणांची पवित्रता होय असे समज १२.

सर्वभावें अवंचन । कवडी धरूनि कोटी धन ।
जेणें केलें मदर्पण । माझें अर्चन या नांव ॥१३॥
सर्वतोपरी निष्कपटपणा ठेवून कवडीपासून कोट्यवधीपर्यंत असलेले संपूर्ण द्रव्य ज्याने मला अर्पण केले, त्याच्या त्या अर्पणकार्यालाच माझे ‘अर्चन’ असे म्हणतात १३.

धनधान्य वंचूनि गांठीं । माझी पूजा आहाच दृष्टीं ।
ते नव्हे अर्चनहातवटी । तो जाण कपटी मजसी पैं ॥१४॥
धनधान्य गुप्तपणे संग्रहाला ठेवून केवळ वर वर माझी पूजा करावयाची, तो काही अर्चनाचा प्रकार नव्हे. तो माझ्याशी कपटाने वागणारा होय हे लक्षात ठेव १४.

लोभें खावया आपण । ठेवी प्रतिमेपुढें पक्कान्न ।
अतीत आलिया न घाली अन्न । मदर्चन तें नव्हे ॥१५॥
आपल्याला खावयाला मिळावे ह्या आशेनें जो देवमूर्तीपुढे पक्वान्ने ठेवतो आणि अतिथि आल्यास त्याला अन्नसुद्धा घालीत नाही, ते कांहीं माझें अर्चन नव्हे १५.

कर पवित्र करितां पूजा । ते आवडती अधोक्षजा ।
जे न पूजिती गरुडध्वजा । त्या जाण भुजा प्रेताच्या ॥१६॥
पूजा केली असता हात पवित्र होतात, व तेच हात भगवंताला आवडतात. जे भगवंताची पूजा करीत नाहीत, ते हात प्रेताचेच होत असे समज. १६.

न करितां हरिपूजनें । न देतां सत्पात्रीं दानें ।
जडित मुद्रा बाहुभूषणें । तें प्रेतासी लेणें लेवविलें ॥१७॥
हातांनी ईश्वरमूर्तीची पूजनें न करता व सत्पात्री दाने न देता, त्या हातांमध्ये रत्नजडित आंगठ्या व पोंचा घातल्या, तर हे प्रेताला दागिने घालण्याप्रमाणेच आहे १७.

वाचा सार्थक हरिकीर्तनें । कां अनिवार नामस्मरणें ।
जयजयकाराचेनि गर्जनें । केलीं त्रिभुवनें पावन ॥१८॥
हरिकीर्तन केल्यानेच किंवा अखंड नामस्मरणानेच वाणीचे सार्थक होतें. ‘जयजयकारा ‘च्या गर्जनेनेंच त्रिभुवनें पावन केली आहेत १८.

रामनामाच्या गजरीं । सदा गर्जे ज्याची वैखरी ।
तेथ कळिकाळाची नुरे उरी । दुरितें दूरी पळाली ॥१९॥
ज्याची वाणी रामनामाच्या गर्जनेने सदासर्वदा गरजत असते, तेथे कळीकाळालासुद्धा थारा उरत नाही. पातकें तर लांब पळून जातात १९.

हरिनाम सांडूनि करंटीं । मिथ्या करिताती चावटी ।
जेवीं हागवणी पिटपिटी । तैशा गोठी जल्पती ॥१२२०॥
करंटी माणसें हरीचें नाम सोडून देऊन वायफळ चकाट्या पिटतात. ज्याप्रमाणे हगवणीची पिरपिर असते, तशाच गोष्टी ते बडबडतात असे समजावें १२२०.

हरिनामाचा सुखसुरवाड । ज्याचे मुखीं लागला गोड ।
त्याचें मजपाशीं सरतें तोंड । मी अखंड त्याजवळी ॥२१॥
हरिनामाच्या उच्चाराने होणारा सुखाचा आनंद ज्याच्या मुखाला गोड लागला, त्याचे तोंड नेहमी माझ्याकडेच वळलेले असते, आणि मी नेहमी त्याच्यापाशी असतो. २१.

गद्यपद्यें स्तवनमाळा । नाना पदबंधाची कळा ।
छंदें कुसरीं विचित्र लीळा । स्तुति गोपाळा अर्पावी ॥२२॥
नाना प्रकारची गद्यपद्यात्मक स्तवनें, अनेक प्रकारच्या कौशल्याने रचलेली प्रेमळ पदें, निरनिराळ्या वृत्तांत रचलेली चित्रविचित्र लीलात्मक चरित्रं, अशा प्रकारची स्तुति भगवंताला अर्पण करावी २२.

धैर्य स्थैर्य औदार्य । घनश्याम अतिसौंदर्य ।
शौर्य वीर्य अतिमाधुर्य । गुणगांभीर्य गोविंदू ॥२३॥
धैर्यशीलता, स्थैर्य, उदारपणा, मेघाप्रमाणे श्यामलकांतीचें अत्यंत सौंदर्य, शौर्य, वीर्य, अत्यंत मधुरता व सद्गुणांचे गांभीर्य इत्यादि गुणच गोविंदरूपाने एकत्र अवतरले २३.

त्रिविक्रम उभा बळीच्या द्वारीं । द्वार न सांडूनि द्वारकरी ।
तेणें द्वारें द्वारकेभीतरीं । येऊनि उद्धरी कुशातें ॥२४॥
भगवान् त्रिविक्रमरूपाने बळीच्या द्वारामध्ये द्वार न सोडतां द्वारपाळ होऊन उभा राहिला. आणि त्याच द्वारानें द्वारकेंत येऊन त्याने कुशाचा उद्धार केला २४.

तो अद्यपि श्रीहरि । स्वयें उभा समुद्रतीरीं ।
शोभा विराजमान साजिरी । असुरसुरनरीं वंदिजे ॥२५॥
तोच श्रीहरी जातीनिशी अद्यापि समुद्रकाठी उभा आहे. ती श्रीहरिरूपानें विराजमान झालेली गोजिरवाणी शोभा पाहून राक्षस, देव व मानवही न्याला वंदन करतात २५.

मत्स्य झाला तो सागरीं । वराह झाला नासिकद्वारीं ।
उपजला खांबा माझारीं । यशोदेघरीं पोसणा ॥२६॥
तोच समुद्रामध्ये मत्स्य झाला, नासिकाच्या द्वारे तोच वराह झाला, तोच नृसिंहरूपाने खांबामध्ये उत्पन्न झाला, आणि यशोदेच्या मंदिरांच वाढलेलाही तोच २६.

जरठपाठी झाला कमठू । बळिच्छळणीं तो खुजटू ।
वेदवादें अतिवाजटू । फुरफुराटू निःश्वासें ॥२७॥
तोच निबर पाठीचा कासव झाला बळीचा छळ करण्यासाठी तोच वामनमूर्ति झाला, त्याच्या निःश्वासाने होणारा फुरफुराट वेदवादाच्या आवाजानें मोठ्याने वाजत असतो २७.

बाईल चोरीं नेली परदेशीं । तीलागीं रडे पडे वनवासीं ।
एकही गुण नाहीं त्यापाशीं । शेखीं दासी कुब्जेसीं रातला ॥२८॥
बायको चोराने परदेशांत नेली म्हणून तिच्यासाठी तो रानोरान फिरतो व रडतो, त्याच्यापाशी एकही गुण नाही. शेवटी कुब्जादासीपाशी सुद्धा रममाण झाला ! २८,

‘स्तुतिगुणकर्मानुकीर्तन’ । तें या नांव गा तूं जाण ।
‘प्रह्व’ म्हणिजे तें नमन । तेंही व्याख्यान अवधारीं ॥२९॥
स्तुति करितांना गुणकर्माप्रमाणे कीर्तन करणे ते ह्याचंच नांव असें तूं समज. आतां ‘प्रह’ म्हणजे नमन, त्याचेही निरूपण ऐक २९.

माझे प्रतिमांचें दर्शन । कां देखोनि संतजन ।
जो भावें घाली लोटांगण । देहाभिमान सांडूनि ॥१२३०॥
माझ्या प्रतिमेचे दर्शन घेऊन किंवा संतजनांना पाहून देहाभिमान सोडून जो भक्तिभावानें लोटांगण घालतो १२३०,

साधुजनांसी वंदितां । धणी न मनी जो चित्ता ।
पुनःपुन्हा चरणीं माथा । विनीततां अतिनम्र ॥३१॥
साधुजनांना नमस्कार करतांना मनाला तृप्ति झाली असें मानीतच नाहीं, विनयाने अत्यंत नम्र होऊन पुनःपुन्हा चरणांवर मस्तकच ठेवतो, त्याचें तें वर्तन हेच ‘नमन’ होय ३१.

भागवताचें रजःकण । जो मस्तकीं वंदीना आपण ।
तो जीवें जीतां प्रेत जाण । अपवित्रपण तैसें तया ॥३२॥
भगवद्‌भक्तांच्या पायांची धूळ जो आपण होऊन शिरसावंद्य करीत नाहीं, तो जिवंत असला तरी प्रेतासमानच समजावा. प्रेताप्रमाणेच अमंगळपणा त्याच्या ठिकाणी असतो ३२.

सांडूनि लौकिकाच्या लाजा । जो वैष्णवांच्या चरणरजा ।
गडबडां लोळे वोजा । हा भक्तीचा माझा उल्हास ॥३३॥
लौकिकाच्या लज्जा सोडून देऊन जो आवडीने वैष्णवांच्या चरणधूलींत गडबडा लोळतो, त्याचे ते वर्तन हाच माझ्या भक्तीचा विकास होय ३३.

या आवडीं करितां नमन । सहजें जाती मानाभिमान ।
हें मुख्य भक्तीचें लक्षण । जे मानाभिमान सांडावे ॥३४॥
अशा आवडीनें नमन केले असतां मानाभिमान सहज निघून जातात. भक्तीचे हेच मुख्य लक्षण आहे की, मानाभिमान सोडून द्यावे ३४.

त्यजावया मानाभिमान । करावें मत्कीर्तनश्रवण ।
श्रवणादि भक्तीचें लक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥३५॥हा मानाभिमान सोडण्याकरितां माझें कीर्तन-श्रवण करावे. ह्याकरितां उद्धवा ! श्रवणादि भक्तीचे सर्व लक्षण ऐक ३५.

मत्कथाश्रवणे श्रद्धा मदनुध्यानमुद्धव ।
सर्वलाभोपहरणं दास्येनात्मनिवेदनम् ॥ ३५ ॥[श्लोक ३५] उद्धवा ! माझ्या कथा श्रद्धेने ऐकाव्यात आणि नेहमी माझ्ये ध्यान करावे जे काही मिळेल ते मला अर्पण करावे आणि स्वतःला माझा दास समजून सर्वभावे मला अर्पण व्हावे. (३५)

दृढ आस्तिक्यें समाधान । शुद्ध श्रद्धा त्या नांव जाण ।
भावार्थें न डंडळी मन । कथाश्रवण सादरें ॥३६॥
दृढतर आस्तिक्यबुद्धीनें अंतःकरणाचे समाधान असणे याचे नांव शुद्ध श्रद्धा होय असे समज. आणि आदरपूर्वक कथा श्रवण केली म्हणजे त्यांतील भावार्थांच्या योगाने मनाची चलबिचल होत नाही ३६.

वक्त्याच्या वचनापाशीं । जडूनि घाली कानामनासी ।
श्रवणार्थ वाढवी बुद्धीसी । विकिला कथेसी भावार्थें ॥३७॥
असा श्रोता आपले कान आणि मन ह्यांना वक्त्याच्या भाषणापाशी अगदी जखडून ठेवितो. त्याने ऐकलेला अर्थ त्याच्या बुद्धीला वाढवितो, आणि तो भावार्थाने कथेला विकला जातो ३७.

जेवीं दुधालागीं मांजर । संधी पहावया सादर ।
तेवीं सेवावया कथासार । निरंतर उल्हासु ॥३८॥
दूध पिण्याची संधि पहाण्याकरितां आदरपूर्वक मांजर जसें टपून बसते, त्याप्रमाणे कथेतील सार ग्रहण करण्यास निरंतर उल्हास असावा ३८.

जडित कुंडलेंमंडित कान । तें श्रवणासी नोहे मंडण ।
श्रवणासी श्रवण भूषण । श्रवणें श्रवण सार्थक ॥३९॥
जडित कुंडलें घालून कान श्रृंगारले, तर त्यामुळे काही कानांना भूषण नाही. तर ऐकणे हेच कानाचे भूषण आहे. कथाश्रवणानेच कानांचे सार्थक होते ३९.

जरी स्वयें झाला व्याख्याता । पुराणपठणें पुरता ।
तरी साधुमुखें हरिकथा । ऐके सादरता अतिप्रीतीं ॥१२४०॥
जरी भक्त स्वतः वक्ता झाला असला, पुराणपठणाने जरी निष्णात झालेला असला, तरी अत्यंत प्रीतीने आदरपूर्वक तो साधूच्या तोंडाने हरिकथा श्रवण करतो १२४०.

श्रवणें श्रवणार्थीं सावधान । तोचि अर्थ करी मनन ।
संपल्या कथाव्याख्यान । मनीं मनन संपेना ॥४१॥
जो हरिकथा ऐकण्याकरिता कानाने नीट सावध होऊन राहतो, तोच अर्थाचे मनन करू शकतो. कथेचे निरूपण संपले असताही त्याच्या मनांतील मनन संपत नाहीं . ४१.

ऐसें ठसावल्या मनन । सहजेंचि लागे माझें ध्यान ।
सगुण अथवा निर्गुण । आवडी प्रमाण ध्यानासी ॥४२॥
असें मनन उसले म्हणजे सहजच माझे ध्यान लागते. मग ते सगुण असो अथवा निर्गुण असो. ध्यानाला आवड हीच प्रमाण आहे ४२.

तेथ ध्येय ध्यान ध्याता । तिहींसी एकी गांठी नसतां ।
तंवचिवरी ध्यानावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४३॥
पण उद्धवा ! ध्येय, ध्यान आणि ध्याता या तिहींची एकत्र गांठ पडली नाही तोपर्यंतच खरोखर ध्यानावस्था असते असे समज ४३.

ज्याच्या जीवीं ध्यानाची आवडी । ज्याच्या मनासी माझी गोडी ।
उद्धवा हे तैंचि जोडे जोडी । जैं जन्मकोडी निजभाग्यें ॥४४॥
ज्याच्या अंत:करणांत ध्यानाची आवड असते, ज्याच्या मनाला माझी गोडी असते, आणि उद्धवा ! कोट्यवधि जन्मांचे भाग्य असते, तेव्हांच एवढा लाभ प्राप्त होतो ४४.

निष्काम करोनियां मन । जन्मजन्मांतरीं साधन ।
केलें असेल तैं माझे ध्यान । विश्वासें जाण दृढ लागे ॥४५॥
मन निष्काम करून जन्मजन्मांतरी साधन केले असेल तेव्हांच दृढ विश्वासाने माझे ध्यान लागते असे समज ४५.

दृढ लागल्या माझें ध्यान । अनन्यभावें माझें भजन ।
सर्व पदार्थेंसीं जाण । आत्मसमर्पण मज करी ॥४६॥
माझें ध्यान दृढ लागून राहिले, अनन्यभावाने माझे भजन घडू लागले, म्हणजे तो सर्व पदार्थासहवर्तमान मला आत्मसमर्पणच करतो ४६.

वैदिक लौकिक दैहिक । या क्रियांचे लाभ देख ।
जरी झाल्या अलोकिक । भक्त भाविक तैं नेघे ॥४७॥
वेदांत सांगितलेल्या क्रियांचे किंवा लोकरूढीने मानलेल्या क्रियांचे, किंवा देहसंबंधी क्रियांचे अलौकिक लाभ जरी झाले, तरी सुद्धा भाविक भक्त त्यांचा स्वीकार करीत नाही ४७.

वैदिक लाभ दिव्य सामग्री । स्वर्गादि सत्यलोकवरी ।
भक्त तेंही हातीं न धरी । भजन सुखें करी संतुष्ट ॥४८॥
वैदिक लाभामध्ये तर स्वर्गापासून तों सत्यलोकापर्यंत असलेले दिव्य भोगच मिळतात. पण ते भोगसुद्धा भक्त हातात धरीत नाही. तो आनंदाने भजन करतो व त्यांतच तृप्त असतो ४८.

लौकिक लाभाची श्रेणी । कल्पतरु कामधेनु चिंतामणी ।
भक्त अर्पीं कृष्णार्पणीं । हरिभजनीं संतुष्ट ॥४९॥
लौकिकांतील अनेक लाभांचा समुदाय म्हणजेच कल्पतरु, कामधेनु आणि चिंतामणी होत. पण भक्त त्यांनाही कृष्णाला अर्पण करून आनंदानें हरिभजन करतो व त्यांतच संतुष्ट असतो ४९.

दैहिक लाभाची थोरी । गजान्तलक्ष्मी आल्या घरीं ।
भक्त कृष्णार्पण करी । भजन सुखें करी संतुष्ट ॥१२५०॥
गजान्तलक्ष्मी घरांत आली म्हणजे दैहिक लाभाची परमावधि झाली. पण भक्त असतो तो तिलाही कृष्णार्पण करतो आणि नित्यतृप्तीनें खुशाल भजन करीत संतुष्ट राहतो १२५०.

आविरिंच्यादि लाभ जाण । सर्वही मानोनियां गौण ।
माझे भक्तीसी विकिला प्राण । सर्व समर्पण मज करी ॥५१॥
ब्रह्मपदापर्यंत होणारे सर्व लाभ गौणच आहेत असे समजून माझ्या भक्ताला ज्याने प्राण विकून टाकला व सारें मलाच अर्पण केले ५१,

जेणें सेवेसी विकिला प्राण । तो वृथा जावों नेदी अर्ध क्षण ।
माझी कथा माझें ध्यान । महोत्साहो जाण माझाचि ॥५२॥ज्याने सेवेसाठीच प्राण विकलेला असतो; तो अधी क्षणसुद्धा फुकट घालवीत नाही. तो माझीच कथा, माझेच ध्यान आणि माझाच महोत्सव करीत असतो ५२.

मज्जन्मकर्मकथनं मम पर्वानुमोदनम् ।
गीतताण्डववादित्र गोष्ठीभिर्मद्‍गृहोत्सवः ॥ ३६ ॥[श्लोक ३६] माझा दिव्यजन्म आणि कर्मे इतरांना सांगावीत जन्माष्टमी, रामनवमी इत्यादी माझ्या उत्सवांच्या वेळी लोकसमुदायात संगीत, नृत्य, वाद्य इत्यादी कार्यक्रम करून माझ्या मंदिरात आनंदोत्सव करावेत आणि करवावेत. (३६)

ध्यानावस्थें करी ध्यान । नातरी कथानिरूपण ।
अनुसंधानीं सावधान । रितें मन राहूं नेदी ॥५३॥
ध्यानाच्या स्थितीत ध्यान करतो, नाहीतर कथानिरूपण करतो. निरंतर माझ्याकडेच लक्ष ठेवण्याविषयीं दक्ष असतो. मनाला रिकामें असें राहूंच देत नाही ५३.

माझीं जन्मकर्में निरूपितां । आवडी उल्हास थोर चित्ता ।
स्वेद रोमांच द्रवतां । सप्रेम कथा उल्हासे ॥५४॥
माझे जन्म व लीला ह्यांचे निरूपण करतांना त्याच्या चित्ताला आवडीनें परम आल्हाद वाटतो, आणि त्याच्या अंगाला घाम फुटून रोमांच उभे राहिले असता प्रेमभराने कथाही उल्हसित होते ५४.

ऐकूनि रहस्य हरिकथा । द्रव नुपजे ज्याचिया चित्ता ।
तो पाषाण जाण सर्वथा । जळीं असतां कोरडा ॥ ५५ ॥
हरिकथेतील रहस्य ऐकूनही ज्याच्या चित्ताला द्रव येत नाही, तो जळांत असूनही खरोखर कोरडा पाषाण होय असे समज ५५.

ऐक माझे भक्तीचें चिन्ह । माझ्या पर्वाचें अनुमोदन ।
करी करवी आपण । दीनोद्धरण‍उपावो ॥५६॥
माझ्या भक्तीचे लक्षण ऐक. जो पुण्यदिवसांची व्रतें करतो आणि दीनांचा उद्धार होण्याचे उपाय आपण स्वतः करतो व दुसऱ्यांकडूनही करवितो ५६.

पर्वविशेष भागवतधर्मीं । नृसिंहजयंती रामनवमी ।
वामनजयंती जन्माष्टमी । उत्तमोत्तमीं शिवरात्र ॥५७॥
भागवतधर्मातील विशेष पर्वणीचे दिवस म्हणजे नृसिंहजयंती, रामजयंती, वामनजयंती, कृष्णजन्माष्टमी आणि शिवरात्र तर उत्तमांतील उत्तम होत ५७.

वैष्णवांसी शिवरात्री विरुद्ध । हें बोलणें अतिअबद्ध ।
सकळ पुराणीं अविरुद्ध । व्यास विशुद्ध बोलिला ॥५८॥
वैष्णवांना शिवरात्र विरुद्ध आहे असे म्हणणे हे अत्यंत असंबद्ध होय. त्याला कोणतेही पुराण विरुद्ध नाही, असे व्यासांनी स्पष्ट सांगितले आहे ५८.

शिव श्याम तमोगुणी । तो शुद्ध झाला विष्णूच्या ध्यानीं ।
विष्णु श्याम शिवचिंतनीं । विनटले गुणीं येरयेरां ॥५९॥
शंकर हा तमोगुणाने मूळचा काळाच होता, तो विष्णूचें ध्यान करून शुद्ध झाला. आणि विष्णु हा शिवाच्या ध्यानाने काळा झाला. असे हे एकमेकांच्या गुणांनी शोभत आहेत ५९.

शिव धवळधाम गोक्षीरू । विष्णु घनश्याम अतिसुंदरु ।
बाप ध्यानाचा बडिवारू । येरें येरू व्यापिला ॥१२६०॥
म्हणून शंकर हा गाईच्या दुधासारखा पांढरा शुभ्र आहे, आणि विष्णु हा अत्यंत सुंदर असा घनश्याम आहे. ध्यानाचे महत्त्व एवढे मोठे आहे की, त्यांतील प्रत्येकजण अशा प्रकारे दुसन्याचें ध्यान करून त्याच्या गुणांनी व्याप्त झाला १२६०.

मुदला दोहींसी ऐक्य शुद्ध । मा उपासकांसी का विरुद्ध ।
शिवरात्री वैष्णवांसी अविरुद्ध । व्रत विशुद्ध सर्वांसी ॥६१॥
मुळामध्येच दोघांत अत्यंत ऐक्य आहे, मग उपासकांनाच विरुद्ध कां वाटावें ? ह्याकरितां शिवरात्र ही काही वैष्णवांना विरुद्ध नाही. हे व्रत सर्वांना पवित्रच आहे ६१.

जे पर्वणी प्रिय चक्रपाणी । जे सकळ कल्याणाची श्रेणी ।
उभय पक्षां तारिणी । वैष्णवजननी एकादशी ॥६२॥
जी पर्वणी भगवंताला प्रिय, जी सर्व कल्याणांची खाण, जी उभय पक्षांनाही तारक, आणि जी वैष्णवांची तर केवळ जननी अशी ही एकादशी आहे ६२.

जे शुक्लकृष्णपक्षविधी भक्त वाऊनियां खांदी ।
नेऊनियां सायुज्यसिद्धी । मोक्षपदीं बैसवी ॥६३॥
जी शुक्ल व कृष्णपक्षाच्या विधीने भक्तांना खांद्यावरून वाहून नेऊन सायुज्यसिद्धि देऊन मोक्षपदावर बसविते ६३.

करावी शुक्ल एकादशी । त्यजावें कृष्णपक्षासी ।
उपडलिया एका पक्षासी । सायुज्यासी केवीं पावे ॥६४॥
शुद्ध एकादशी करावी आणि कृष्णपक्षांतील एकादशी सोडून द्यावी, असें करून तिचा एक पक्षच उपटल्यास तो सायुज्याला कसा पोचेल ? ६४.

दों पांखीं उड्डाण पक्ष्यासी । एकु उपडिल्या नुडवे त्यासी ।
तेवीं पां त्यजितां कृष्णपक्षासी । सायुज्यासी न पविजे ॥६५॥
दोन पक्ष असले म्हणजे पक्ष्याला उड्डाण करता येते. त्यातला एक उपटून काढला तर त्याला उडवत नाही. त्याप्रमाणे कृष्णाला टाकले तर सायुज्यालाही पोचत नाही ६५.

तेवीं एकादशी पाहीं । जो जो उत्सवो जे जे समयीं ।
तो तो उपतिष्ठे माझ्या ठायीं । संदेहो नाहीं सर्वथा ॥६६॥
त्याचप्रमाणे एकादशीचा प्रकार आहे. त्या एकादशीला ज्या ज्या वेळी जो जो उत्सव करावा, तो तो माझ्यामध्येच येऊन पोचतो, ह्यांत मुळीच संशय नाही ६६.

जो एकादशीचा व्रतधारी । मी नित्य नांदें त्याच्या घरीं ।
सर्व पर्वकाळांच्या शिरीं । एकादशी खरी पैं माझी ॥६७॥
जो एकादशीचे व्रत करणारा आहे, त्याच्या घरांत मी सदा सर्वदा नांदत असतो. कारण, सर्व पर्वकाळांमध्ये श्रेष्ठस्थानी राहणारी खरोखर माझी एकादशीच आहे ६७.

जो एकादशीचा व्रती माझा । तो व्रततपतीर्थांचा राजा ।
मज आवडे तो गरुडध्वजा । परिग्रहो माझा तो एकु ॥६८॥
जो एकादशीचे व्रत करणारा माझा भक्त आहे, तो व्रते, त आणि तीर्थे ह्यांचा राजा आहे. मला गरुडध्वजाला तो आवडतो. तो एक माझ्या कुटुंबांतलाच आहे ६८.

जैं माझे भक्त आले घरा । तैं सर्व पर्वकाळ येती दारा ।
वैष्णवां तो दिवाळी दसरा । तीर्थें घरा तैं येती ॥६९॥
माझे भक्त जेव्हां घरी येतात तेव्हा सर्व पर्वकाळ त्याच्या दराशी येऊन उभे राहतात. वैष्णवांना तर तो वेळ दिवाळी-दसऱ्याप्रमाणे आनंददायक होतो. त्या समयीं सर्व तीर्थेच घरी आल्याप्रमाणे होते ६९.

चंद्रसूर्यग्रहणांसी । वोवाळूनि सांडी ते दिवसीं ।
कपिलाषष्ठी ते याची दासी । मा अर्धोदयासी कोण पुसे ॥१२७०॥
त्या दिवसावरून चंद्रसूर्याची ग्रहणपर्वेसुद्धा ओवाळून टाकतात. कपिलाषष्टी तर त्या दिवसाची दासी होऊन राहते, मग अर्धोदयपर्वाला विचारतो कोण ? १२७०.

ऐसें मद्‍भक्तांचें आगमन । तेणें उल्हासें न संटे मन ।
सर्वस्व वेंचितां धनधान्य । हरिखें जाण नाचतु ॥७१॥
माझ्या भक्तांचे आगमन असें आहे. त्याचा उल्हास मनामध्ये मावत नाही. त्याच्याकरिता सर्व धनधान्य खर्च झाले तरी ते आनंदाने नाचतच असतात ७१.

ऐशीं माझ्या भक्तांची आवडी । त्यांचे संगतीची अतिगोडी ।
त्या नांव भक्तीची कुळवाडी । पर्वकोडी ते दिवसीं ॥७२॥
अशी माझ्या भक्तांची जी आवड, व त्यांच्या संगतीची जी अतिशय गोडी, तिचंच नांव भक्तीचे पीक. संत घरी येतील त्या दिवशी कोट्यवधि पर्वच जणूं काय प्राप्त होतात ७२.

पर्वविशेष आदरें । संत आलेनि अवसरें ।
श्रृंगारी हरिमंदिरें । गुढिया मखरें महोत्साह ॥७३॥
संत घरी आल्यावेळी वैष्णव आदराने ती मोठीच पर्वणी समजतो, श्रीहरीची मंदिरे श्रृंगारतो, व गुढ्या तोरणे उभारून मखरे बांधून मोठा उत्सव करतो ७३.

संत बैसवूनि परवडीं । कीर्तन मांडिती निरवडी ।
हरिखें नाचती आवडी । धरिती बागडी विन्यासें ॥७४॥
संतांना मोठ्या आदराने बसवून घेऊन वैष्णव मोठ्या चातुर्यानें कीर्तनाचा आरंभ करतात, आनंदाने व आवडीनें नाचतात, आणि मोठ्या उत्कंठेनें अंगविक्षेपादि हावभाव करून दाखवितात ७४.

टाळ घोळ मृदंग कुसरीं । नाना चरित्रें गाती गजरीं ।
गर्जती स्वानंद अवसरी । जयजयकारी हरिनामें ॥७५॥टाळ, वीणा, मृदंग मोठ्या कौशल्याने वाजवीत व अनेक प्रकारची चरित्रे गायन करीत मोठा गजर करतात, आणि वेळोवेळी आनंदाने गर्जना करून हरिनामाचा जयघोष करून सोडतात ७५.

यात्रा बलिविधानं च सर्ववार्षिकपर्वसु ।
वैदिकी तांत्रिकी दीक्षा मदीयव्रतधारणम् ॥ ३७ ॥[श्लोक ३७] सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी माझ्या क्षेत्रांच्या वार्‍या कराव्यात, मिरवणुका काढाव्यात तसेच विविध सामग्रीने माझी पूजा करावी वैदिक किंवा तांत्रिक पद्धतीने दीक्षा ग्रहण करावी माझ्या एकादशी इत्यादी व्रतांचे पालन करावे. (३७)

ऐक दीक्षेचें लक्षण । वैदिकी तांत्रिकी दोन्ही जाण ।
वैदिकी वेदोक्तग्रहण । तांत्रिकी जाण । आगमोक्त ॥७६॥
आतां दीक्षेचे लक्षण ऐक. वैदिक आणि तांत्रिक अशा दोन प्रकारच्या दीक्षा आहेत. वेदोक्त ग्रहण करणे ती वैदिक दीक्षा होय, आणि पुराणोक्त ग्रहण करणे ती तांत्रिक दीक्षा होय ७६.

वैष्णवी दीक्षा व्रतग्रहण । पांचरात्रिक मंत्रानुष्ठान ।
हें आगमोक्त शुद्ध लक्षण । व्रतधारण तें माझें ॥७७॥
वैष्णवव्रताचे ग्रहण करणे ती वैष्णव दीक्षा होय. त्यांत पांच रात्री मंत्रानुष्ठान करावे लागते. हेच माझे वैष्णवव्रत धारण करण्याचे पुराणोक्त शुद्ध लक्षण आहे ७७.

वैष्णवव्रतधर्मासी । पर्वें करावीं वार्षिकेंसी ।
जे बोलिलीं चातुर्मासीं । एकादश्यादि जयंत्या ॥७८॥
वैष्णवव्रताचा धर्म पाळण्यासाठी प्रतिवार्षिक येणारी पर्वे यथासांग चालवावी. चातुर्मास्यांत सांगितलेली एकादशी इत्यादि व्रतें व जयंत्या पाळाव्यात ७८.

शयनी कटिनी प्रबोधिनी । पवित्रारोपणी नीराजनी ।
वसंतदमनकारोपणी । जन्मदिनीं जयंत्या ॥७९॥
शयनी, कटिनी, प्रबोधिनी, पवित्रारोपणी, नीराजनी, वसंतदमनकारोपणी इत्यादि जन्मदिवसांच्या जयंत्या ७९,

इत्यादि नाना पर्वकाळीं । महामहोत्साहो पूजावळी ।
नीराजनें दीपावळी । मृदंगटाळीं गर्जत ॥१२८०॥
अशा अनेक प्रकारच्या पर्वकाळांत मोठा महोत्सव करून नानाप्रकारच्या पूजा, नीरांजनें व दीपमाळा पाजळणे, मृदंग-टाळादि वाद्यांचा गजर करणे ही कार्य करावी १२८०;

उचंबळोनि अतिसुखें । यात्रे निघावें येणें हरिखें ।
दिंडी पताका गरुडटके । नामघोषें गर्जत ॥८१॥
आणि मोठ्या आनंदाने उचंबळून यात्रेला निघावें. दिंड्या, पताका व ध्वज बरोबर घेऊन नामघोषाने गजरच गजर करून सोडावा ८१.

यात्रे जावें ज्या देवासी । तो देवो आणी निजगृहासी ।
आपली आवडी जे मूर्तीसी । ते प्रतिमेसी प्रतिष्ठी ॥८२॥ज्या देवाच्या यात्रेला जावयाचें, तो देवच आपल्या घराला आणावा. ज्या मूर्तीवर आपली भक्ति बसली असेल, त्याच मूर्तीची स्थापना करावी ८२.

ममार्चास्थापने श्रद्धा स्वतः संहत्य चोद्यमः ।
उद्यानोपवनाक्रीड पुरमंदिरकर्मणि ॥ ३८ ॥[श्लोक ३८] मंदिरामध्ये माझ्या मूर्तींची श्रद्धेने स्थापना करावी हे काम एकट्याने होत नसेल, तर इतरांना बरोबर घेऊन ते काम पूर्ण करावे माझ्यासाठी फुलांची उद्याने, बगीचे, क्रीडास्थाने, नगरे, मंदिरे बनवावीत. (३८)

मूर्ति निपजवावी वरिष्ठ । नेटुगी देटुगी चोखट ।
साधुमुखें अतिनिर्दुष्ट । घवघवीत साजिरी ॥८३॥
मूर्ति घडवावयाची ती अति उत्तम प्रकारची घडवावी. ती नीटनेटकी, बांधेसूद आणि मनोहर असावी. ती अत्यंत निर्दोष असून भव्य व गोंडस आहे असे उद्गार साधूंच्या मुखांतून निघावेत ८३.

मूर्ति करावी अतिसुरेख । कृष न करावी अधोमुख ।
स्थूल न करावी ऊर्ध्वमुख । रडकी दुर्मुख न करावी ॥८४॥
मूर्ति अतिशय सुरेख असावी. ती कृश स्वरूपाची नसावी. तसेच अधोमुख करूं नये, ती बोजड व वर तोंड केलेलीही असू नये. किंवा रडकी व दुर्मुखलेलीही असू नये ८४.

अंग स्थूल वदन हीन । मूर्ति न करावी अतिदीन ।
खेचरी भूचरी जिचे नयन । विक्राळ वदन न करावी ॥८५॥
आंग जाडे आणि तोंड विद्रुप, किंवा अत्यंत केविलवाणी अशीही मूर्ति करूं नये. तिचे डोळे ऊर्ध्वदृष्टि किंवा अधोदृष्टि नसावेत. अक्राळविक्राळ तोंडाची मूर्ति करूं नये ८५.

अंग साजिरें नाक हीन । वरदळ चांग चरण क्षीण ।
मोदळी बुदगुली ठेंगणें ठाण । अतिदीर्घ जाण न करावी ॥८६॥
अंग चांगले पण नाक मात्र वाईट, किंवा वरचा भाग चांगला पण पाय किरकोळ, लठ्ठ, बोदगुल आणि ठेंगणी, अशा आकाराची नसावी; किंवा अत्यंत मोठ्या आकाराचीही नसावी ८६.

मूर्ति साजिरी सुनयन । सम सपोष सुप्रसन्न ।
अंगीं प्रत्यंगीं नव्हे न्यून । सुचिन्ह सुलक्षण सायुध ॥८७॥
मूर्ति गोंडस असून तिचे डोळे सुंदर असावे. सर्व अवयव पुष्ट असून ती सुप्रसन्न असावी. आंगांत व उपांगांत कोठेही उणीव असू नये. ती उत्तम चिन्हांनी उक्त व सुलक्षणी अशी असून हातांत आयुधे असावीं ८७.

पाहतां निवे तनमन । देखतां जाय भूकतहान ।
घवघवीत प्रसन्नवदन । कृपालक्षण सुकुमार ॥८८॥
जी पाहतांच तन-मन तृप्त व्हावें, जिचे दर्शन होतांच तहान-भूक हरावी, अशा प्रकारे त्या मूर्तीचे गोंडस प्रसन्नमुख असावे. तसेच ती नाजुक असून तिच्या मुद्रेवर कृपेची छटा दिसावी ८८.

जे देखतांचि जीवीं जडे । अतिशयें सर्वांसी आवडे ।
पाहों जातां निजनिवाडें । पूरु चढे प्रेमाचा ॥८९॥
जी मूर्ति पाहतांच मनांत भरते, सर्वांना अतिशय आवडते, आणि आपल्या आवडीने तिच्याकडे पाहिले असतां अंतःकरणाला प्रेमाचा पूरच चढतो, अशी असावी ८९.

ईषत् दिसे हास्यवदन । अतिशयेंसी सुप्रसन्न ।
जिचेनि घवघवाटें निवे मन । प्रतिमा संपूर्ण ती नांव ॥१२९०॥
किंचित् हास्यमुख असावी. अतिशय प्रसन्न मुद्रा असावी. जिच्या लावण्याच्या तेजाने मन प्रसन्न होऊन जाते, तिचंच नांव सर्वांगसुंदर मूर्ति १२९०.

तेथें मेळवूनि साधुश्रेष्ठां । अग्न्युत्तारण करावें निष्ठा ।
चक्षून्मीलन प्राणप्रतिष्ठा । करावी वरिष्ठाचेनि हातें ॥९१॥
तेथे थोर थोर साधूंना जमवून एकनिष्टेनें अग्न्युत्तारणादि विधि करावा, आणि तिच्या डोळ्यांवरचे आच्छादन काढून एकाद्या थोर पुरुषाच्या हातून तिची प्राणप्रतिष्ठा करवावी ९१.

देवालय करावें गहन । वन उद्यान उपवन ।
खेंडकुलिया विश्रामस्थान । आराम जाण करावे ॥९२॥
विस्तीर्ण देवालय बांधावे. त्याच्या सभोंवार वन, उद्यान व उपवन करावें. मळे, बागा, तलाव, विहिरी बांधून सारे स्थळ विश्रांति घेण्याजोगे रमणीय करून सोडावें ९२.

नाना जातींचे वृक्ष तें वन । फळभक्षी वृक्ष तें उपवन ।
पुष्पवाटिका तें उद्यान । कृष्णार्पण पूजेसी ॥९३॥
अनेक प्रकारचे वृक्ष लावणे त्याला ‘वन’ असे म्हणतात, भक्ष्य फळांचीच झाडे लावणे त्याला ‘उपवन’ असे म्हणतात. आणि फक्त फुलझाडेंच लावणे त्याला ‘उद्यान’ असे म्हणतात. ही सर्व तयार करून पूजेसाठी कृष्णार्पण करावी ९३.

हाट हाटवटिया चौपासी । नगर वसवावें देवापाशीं ।
वेदाध्ययन शास्त्रश्रवणेंसी । अहर्निशीं कीर्तनें ॥९४॥
चहूंकडून व्यापारी लोक येऊन बाजार भरावा म्हणून देवापाशी नगर बसवावे. रात्रंदिवस वेदाध्ययन, शास्त्रश्रवण व कीर्तन होत असावे ९४.

इतुकें करावया असमर्थ । श्रद्धा आहे परी नसे वित्त ।
तरी साह्य मेळवूनि समर्थ । मद्‍भावयुक्त करावें ॥९५॥
इतकें करावयास सामर्थ्य नसेल, आणि करावे असा हेतु असून दव्य नसेल तर श्रीमान् लोकांचे साहाय्य घेऊन माझ्या भक्तियुक्ततेने सर्व पार पाडावें ९५.

कां मेळवूनि भगवद्‍भक्त । त्यांत श्रद्धाळू जे वित्तवंत ।
भावपूर्वक दिधल्या वित्त । तेणें हें समस्त करावें ॥९६॥
किंवा भगवद्‌भक्तांना एकत्र बोलावून, त्यांत जे कोणी भक्तिमान् असून श्रीमंत असतील, त्यांनी भक्तिपूर्वक द्रव्यसाहाय्य केल्यास त्या द्रव्याने हे सर्व करावें ९६.

देउळीं करूनि मूर्तिप्रतिष्ठा । परतोनि न वचे जो त्या वाटा ।
तो आळशी जाण पां करंटा । नव्हेचि चोखटा भावाचा ॥९७॥
देवळांत देवाची एकदा प्रतिष्टा केली, की पुन्हा त्या देवळाच्या वाटेला जो कधीही येत नाही, तो आळशी व हतभागी होय हे लक्षात ठेव. तो खरा भक्त नव्हे ९७.

जो करूं जाणे मूर्तिप्रतिष्ठा । धन वेंचून भावार्थी मोठा ।
नीचसेवा तो माझा वांटा । झाडितां खरांटा न संडी ॥९८॥जो मूर्तीची प्रतिष्टा करण्याचे कर्तव्य जाणतो, द्रव्य खचून मोठी भक्ति ठेवतो, तो अगदी हलके काम करणे सुद्धा माझाच बांटा आहे असे समजून झाडावयासाठी हातांत खराटा घेण्यालाही मागे सरत नाहीं ९८.

सम्मार्जनोपलेपाभ्यां सेकमण्डलवर्तनैः ।
गृहशुश्रूषणं मह्यं दासवद् यदमायया ॥ ३९ ॥[श्लोक ३९] सेवकाप्रमाणे निष्कपट भावनेने माझ्या मंदिरामध्ये सेवा करावी झाडूनपुसून घ्यावे, लिंपावेसारवावे आणि सडा घालून रंगीबेरंगी रागोळ्या काढाव्यात. (३९)

असतां शिष्य सेवकजन । ते प्रतिष्ठा सांडूनि सन्मान ।
स्वयें करी सडासंमार्जन । देवालयीं जाण निर्दंभ ॥९९॥
शिष्य व सेवकजन असले तरीसुद्धा प्रतिष्ठा व सन्मान वगैरे सर्व सोडून जो स्वतः दंभरहितपणाने देवालयामध्ये सडासंमार्जन करतो ९९,

रंगमाळा घाली कुसरीं । नाना यंत्रेम् नानाकारीं ।
नाना परीचे रंग भरी । आवडी भारी मद्‍भजनीं ॥१३००॥
मोठ्या कौशल्याने रांगोळ्या घालतो, त्यांत नानाप्रकारच्या आकृत्या काढून त्या आकृत्यांमध्ये अनेक प्रकारचे शोभिवंत रंग भरतो, त्याला माझ्या भजनामध्ये मोठी आवड असते १३००.

जैसे कां नीच रंक । तैसी सेवा करी देख ।
नीच सेवेचें अतिसुख । निर्मायिक मद्‍भजनीं ॥१॥ज्याप्रमाणे एखादा गरीब भिकारी असावा, त्याप्रमाणे वागून तो सेवा करतो. हलकी सेवा करण्यामध्ये त्याला मोग आनंद. माझ्या भजनामध्ये त्याला कृत्रिमपणा नाहीं १.

अमानित्वं अदम्भित्वं कृतस्यापरिकीर्तनम् ।
अपि दीपावलोकं मे नोपयुञ्ज्यान्निवेदितम् ॥ ४० ॥[श्लोक ४०] अभिमान धरू नये ढोंग करून नये त्याचबरोबर आपण केलेल्या कामांचा डांगोरा पिटू नये आपण अर्पण केलेल्या दिव्याच्या प्रकाशाचाही स्वतःसाठी उपयोग करू नये तसेच दुसर्‍या देवतेला अर्पण केलेली वस्तूही मला अर्पण करू नये. (४०)

अपार वेंचूनि नाना अर्थ । प्रासादप्रतिष्ठा म्यां केली येथ ।
मी एक देवाचा मोठा भक्त । न धरी पोटांत अभिमान ॥२॥
नानाप्रकारच्या पुष्कळ संपत्ति खर्चुन मी येथें हें देवालय बांधून देवाची प्रतिष्ठा केली, मी एक मोठा भक्त आहे, असा पोटांत अभिमान धरीत नाही २.

शुद्ध भावो नाहीं चित्तीं । खटाटोपें अहाच भक्ती ।
ऐशी जे दांभिक स्थिती । भक्त नातळती भाविक ॥३॥
मनांत खरी भक्ति नाही, आणि वरकरणींच खटाटोप करून भक्तीचा पसारा मांडावयाचा, अशी जी ढोंगाची कृति असते, तिला भाविक भक्त शिवतसुद्धा नाहींत ३.

भक्तें न धरावा अभिमान । नापेक्षावा मानसन्मान ।
न करावें दांभिक भजन । अभिलाष जाण न धरावा ॥४॥
भक्ताने अभिमान धरूं नये, मानाची किंवा सन्मानाची इच्छा धरूं नये, दांभिक भजन कधीही करूं नये, आणि कोणत्याही विषयाचा अभिलाष बाळगू नये ४.

अनुभव जाला तो आपण । कां देवालयीं वेंचिलें धन ।
अथवा जें दिधलें दान । तें वाच्य जाण न करावें ॥५॥
आपल्याला जो अनुभव आला असेल, किंवा देवालयाकडे जें द्रव्य खर्च झाले असेल, अथवा जे काय दान दिले असेल, त्याची कधीही वाच्यता करूं नये ५.

यजमान जैं केलें बोले । तैं जें केलें तें निर्वीर्य जालें ।
प्राणेंवीण प्रेत उरलें । तैसे झाले ते धर्म ॥६॥
यजमान आपण केलेलें जेव्हां आपल्याच तोंडाने सांगू लागतो, तेव्हा ते केलेले सर्व निष्फळ होऊन गेले असे समजावे. प्राणाशिवाय प्रेत शिल्लक राहिलेले असते त्याप्रमाणेच ते सर्व धर्म होत ६.

कृषीवळू पेरूनियां धान्य । सवेंचि आच्छादी आपण ।
तैं पीक लगडूनि ये जाण । तैसें सफळ दान न बोलतां ॥७॥
शेतकरी धान्य पेरून लागलेच ते झाकून टाकतो, तेव्हांच ते पीक जोराने येते. त्याप्रमाणे दान हे न बोलले तरच फलदायक होते ७.

देवासी समर्पिलें आपण । कां आणिकीं केलें निवेदन ।
तें घेऊं नये आपण । देवलकपण तो दोषु ॥८॥
आपण देवाला काही अर्पण केलें, किंवा दुसऱ्याने देवाला काही दिले तर ते आपण घेऊ नये. तो पुजारीपणाचा दोष होतो ८.

देवाचा प्रसाद घेतां । लोभें न घ्यावा सर्वथा ।
आधीं वांटावा समस्ता । अल्पमात्रतां स्वयें घ्यावा ॥९॥
देवाचा प्रसाद घेतांनासुद्धा लोभाने सर्वच आपण घेऊ नये. तो आधी सर्वांना वाटावा, आणि मग थोडासा आपण घ्यावा ९.

दीपु समर्पिला श्रीहरि । तेणें न वर्तावें गृहव्यापारीं ।
हें बोलिलें आगमशास्त्री । स्मृतिकारीं सज्ञानीं ॥१३१०॥
श्रीहरीला दिवा समर्पण केला, तर त्या दिव्याच्या उजेडाने मग आपल्या घरांतील कामें करूं नयेत. पुराणांतरी आणि ज्ञानसंपन्न स्मृतिकारांनीही असेंच सांगितले आहे १३१०.

हे तंव अवघी साधारण बाह्य पूजा । परी दृढविश्वासें भावो माझा ।
ते भक्ति आवडे अधोक्षजा । भाविकांची पूजा भावार्थें ॥११॥
ही सारी साधारण बाह्य पूजा झाली. पण अंत:करणांत मजवर दृढतर विश्वास व भक्ति पाहिजे. ती भक्तीच भगवंताला आवडते. भाविकांची पूजा भक्तीनेच होत असते ११.

ऐक पां भक्तीचा इत्यर्थु । जेणें भजनें म्हणिजे भक्तु ।
तरी जें जें उत्तम या लोकांतु । आवडता पदार्थु मज अर्पी ॥१२॥आतां भक्तीचे रहस्य ऐक. ज्या भजनाच्या योगाने ‘भक्त’ असे म्हणतात, तें भजन असे की, या लोकांत जी जी काही उत्तम व आवडती वस्तु असेल, ती ती ते मलाच अर्पण करतात १२.

यद्यदिष्टतमं लोके यच्चातिप्रियमात्मनः ।
तत्तन्निवेदयेन्मह्यं तदानन्त्याय कल्पते ॥ ४१ ॥[श्लोक ४१] जगामध्ये जी जी वस्तू आपल्याला सर्वाधिक प्रिय, सर्वात चांगली वाटत असेल, ती मला अर्पण करावी असे केल्याने ती वस्तू अनंत पटींनी फळ देणारी ठरते. (४१)

हो कां चंद्रामृत तत्त्वतां । अवचटें आलें भक्ताचे हातां ।
तें अवघेंचि अर्पी भगवंता । देहलोभता न सेवी ॥१३॥
फार काय सांगावें ? पण खरोखर भक्ताच्या हाती जर अकस्मात् चंद्रामृत प्राप्त झाले, तरी तो तें सारेच भगवंताला अर्पण करतो. देहाच्या लोभाने आपण सेवन करीत नाही १३.

देहासी यावया अमरता । तेणें लोभें सेवावें अमृता ।
अमर अमृतपान करितां । मरती सर्वथा सकाळें ॥१४॥
देहाला अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून त्या लोभाने आपणच अमृताचे सेवन करावे, तर देवही अमृतपान करीत असून तेही सर्व यथाकाली मरतातच १४.

नश्वर देहाचिया ममता । भक्त सेवीना अमृता ।
तेंचि भगवंतासी अर्पितां । अक्षयता अनश्वर ॥१५॥
म्हणून नश्वर देहाच्या ममतेने भक्त अमृताचे सेवन करीत नाही. तेंच भगवंताला अर्पण केले असतां अक्षयच अमरत्व प्राप्त होते १५.

परिस चिंतामणि न प्रार्थितां । दैवें आलिया भक्ताच्या हातां ।
तो लोभें न ठेवी सर्वथा । अर्पी भगवंता तत्काळ ॥१६॥
याचना न करितांच केवळ दैवयोगाने परीस किंवा चिंतामणि भक्ताच्या हाती आला असतां तो लोभाने त्याला मुळीच आपल्याजवळ बाळगीत नाही. तत्काळ भगवंताला अर्पण करतो १६.

लोभें कल्पतरु राखतां । कल्पना वाढे अकल्पिता ।
तोचि भगवंती अर्पितां । निर्विकल्पता स्वयें लाभे ॥१७॥
लोभाने कल्पतरु जतन केला असतां अकल्पितपणे इच्छा वाढते, पण तोच कल्पतरु भगवंताला अर्पण केला तर आपोआप निरिच्छता प्राप्त होते १७.

स्वार्थें चिंतामणि राखितां । अत्यंत हृदयीं वाढवी चिंता ।
तोचि भगवंती अर्पितां । निश्चिंतता चित्तासी ॥१८॥
स्वार्थाने चिंतामणि जवळ बाळगला असता तो अंत:करणामध्ये अतिशय चिंताच वाढवितो. तोच भगवंताला अर्पण केला की, अंत:करणाला निश्चिंतता प्राप्त होते १८.

कामधेनु राखतां आपण । अनिवार कामना वाढवी जाण ।
तेचि करितां कृष्णार्पण । निरपेक्षता पूर्ण अंगीं बाणे ॥१९॥
आपण कामधेनूचा प्रतिपाळ केला असतां ती अनिवार इच्छा मात्र वाढविते, पण तीच कामधेनु कृष्णार्पण केली असतां आंगामध्ये परिपूर्ण निरपेक्षता ठसते १९.

लोभें स्पर्शमणि राखतां । तो वाढवी धनलोभता ।
तोचि भगवंतीं अर्पितां । अर्थस्वार्थतानिर्मुक्त ॥१३२०॥
आशेला गुंतून परीस जवळ केला असतां तो धनलोभाला वाढवितो, पण तोच परीस भगवंताला अर्पण केला असतां मनुष्य अर्थाच्या स्वार्थापासून मुक्त होतो १३२०.

हो कां देशकाळ‍ऋतुमेळें । उत्तम पदार्थ अथवा फळें ।
नवधान्यादिकें सकळें । अर्पी भावबळें मजलागीं ॥२१॥
किंवा देशकालऋतूप्रमाणे जे जे उत्तम पदार्थ किंवा फळे उत्पन्न होतात, किंवा नवीं धान्ये पिकतात, ती सर्व भक्तिभावाने भक्त मलाच अर्पण करतात. २१.

पोटांतूनि आवडता । प्राप्त झालिया पदार्था ।
मजचि अर्पिती सर्वथा । लोलिंगता सांडूनी ॥२२॥
मनापासून आवडणारा पदार्थ प्राप्त झाला असता त्याचा लोभ सोडून तो सर्व मलाच अर्पण करतात २२.

आपुले हृदयींची आवडी । हरिचरणीं फुडी ।
आतां नाना पदार्थांची जे गोडी । ते मजचि रोकडी अर्पिती ॥२३॥
आपल्या मनांतली सर्व आवड त्यांनी सर्वस्वी हरिचरणांकडेच लावलेली असते. आतां त्याचप्रमाणे भिन्न भिन्न पदार्थाची जी गोडी असते, तीही ते प्रत्यक्ष मलाच अर्पण करतात २३.

मज अनंताच्या हातीं । आवडीं अर्पिलें मद्‍भक्ती ।
त्याचीं फळें सांगतां श्रुती । मुक्या होती सर्वथा ॥२४॥
मज अनंताच्या हातांत माझ्या भक्तांनी आवडीने जे दिलेले असते, त्यांची फलें वर्णन करतांना वेदसुद्धा अगदी मुके होऊन जातात २४.

मी वेदांचा वेदवक्ता । मजही न बोलवे सर्वथा ।
त्याचें फळ तें मीचि आतां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२५॥
मी तर वेद बोलणारा, पण मलासुद्धा ते फल खरोखर सांगता यावयाचे नाही. उद्धवा ! आता खरोखर असे समज की, त्याचे फळ म्हणजे मी स्वतःच होय २५.

जीवाहिहोनि वरौती । माझ्या ठायीं अत्यंत प्रीती ।
तिये नांव गा माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥
उद्धवा ! जिवापेक्षाही ज्यास्त अशी माझ्यावर जी अत्यंत प्रीति, तिचें नांव खरोखर भक्ति, हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव २६.

तत्काळ मज पाविजे जेणें । ते माझे पूजेचीं स्थाने ।
अतिपवित्र जें कल्याणें । तुजकारणें सांगेन ॥२७॥आता जेणेकरून तत्काळ मला पावतां येते, अशी त्या माझ्या पूजेची अतिशय पवित्र आणि कल्याणकारक काही स्थाने तुला सांगेन २७.

सूर्योऽग्निर्ब्राह्मणो गावो वैष्णवः खं मरुज्जलम् ।
भूरात्मा सर्वभूतानि भद्र पूजापदानि मे ॥ ४२ ॥[श्लोक ४२] हे उद्ववा ! सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गायी, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा आणि सर्व प्राणी, ही सर्व माझ्या पूजेची ठिकाणे होत. (४२)

एकादशीं एकादशाध्यायीं । एकादश पूजास्थानें पाहीं ।
एका जनार्दनु तेंही । एकरूप सर्वही वर्णील ॥२८॥
एकादश स्कंधाच्या अकराव्या अध्यायांत अकरा पूजास्थाने सांगितलेली आहेत, तीही सर्व एका जनार्दन आतां ऐक्यरूपाने वर्णन करील २८.

सूर्य अग्नि आणि ब्राह्मण । गायी वैष्णव आणि गगन ।
अनिळ जळ मही जाण । पूज्य आपण आपणासी ॥२९॥
सूर्य, अग्नि, आणि ब्राह्मण, गाई, वैष्णव आणि आकाश, वायु, जल आणि पृथ्वी; ही नऊ स्थाने व आपण स्वतः हे दहावें स्थान ही आपणाला पूज्य आहेत २९.

अकरावें पूजा स्थान । सर्व भूतें पूज्य जाण ।
ऐक पूजेचें विधान । यथायोग्य लक्षण अवधारीं ॥१३३०॥सर्व पंचमहाभूतें हें अकरावें पूज्य पूजास्थान होय असे समज. आता त्यांच्या पूजेचें यथायोग्य विधान व लक्षण ही ऐक १३३०.

सूर्ये तु विद्यया त्रय्या हविषाग्नौ यजेत माम् ।
आतिथ्येन तु विप्राग्र्ये गोष्वङ्ग यवसादिना ॥ ४३ ॥श्लोक ४३] प्रिय उद्ववा ! वेदमंत्रांनी सूर्याच्या ठिकाणी माझी पूजा करावी हवनाने अग्नीमध्ये, आतिथ्याने श्रेष्ठ ब्राम्हणांमध्ये आणि चारा वगैरे घालून गाईच्या ठिकाणी माझी पूजा करावी. (४३)

सविता माझें अधिष्ठान । माझेनि तेजें विराजमान ।
जेणें तेजें जगाचे नयन । देखणे जाण होताती ॥३१॥
सूर्य हे माझे अधिष्ठान आहे. ज्या तेजाच्या योगाने सर्व जगाचे डोळे पाहाण्यास समर्थ होतात, अशा माझ्याच तेजाने तो प्रकाशमान होतो ३१.

दीपु लाविल्या गृहाभीतरीं । तो प्रकाशु दिसे गवाक्षद्वारीं ।
तैसें माझें निजतेज अंतरीं । तें सूर्यद्वारीं प्रकाशे ॥३२॥
घरांत दिवा लावला असता त्याचा प्रकाश खिडकीतून बाहेर दिसतो. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपांत जें माझें आत्मतेज असते, तेच सूर्याच्या रूपाने बाहेर प्रकाशमान होतें ३२.

तो सविता मण्डळमध्यवर्ती । जाण नारायण मी निश्चितीं ।
त्या मज सूर्याची उपास्ती । सौर सूक्ति त्रैविद्या ॥३३॥
तो आकाशामध्ये असणारा सूर्य म्हणजे खरोखर मी नारायणच होय असें समज. त्याच माझ्या सूर्याचे सौरसूक्त व विद्या हे उपासनामंत्र होत ३३.

ऋग्वेदादि वेद तीनी । साङ्ग सौरमंत्र जाणोनी ।
सूर्यसूक्तें संमुख पठणीं । पूजा सज्ञानीं करावी ॥३४॥
ऋग्वेदादि तिन्ही वेद, सर्व सौरमंत्र व सूर्यसूक्ते ही जाणून सूर्याच्या समोर पठण – करीत असता सूर्याची ज्ञानपूर्वक पूजा करावी ३४.

हे वैदिकी उपासकता । वेदज्ञांसीचि तत्त्वतां ।
नेणत्या योग्य नव्हे सविता । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥३५॥
पण ही वैदिकांची उपासना आहे, जे वेदांचे पठण करतात त्यांनाच ती खरोखर योग्य होय, अज्ञान्यांना सूर्याची उपासना योग्य नव्हे, असे मात्र कधीही म्हणू नये ३५.

तत्काळ प्रसन्न होय सविता । ऐसी सुगम उपासकता ।
तुज सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥३६॥
आता तत्काल सूर्य प्रसन्न होईल अशी एक सुलभ उपासना तुला सांगेन, तीही सावधानपणे श्रवण कर ३६.

सकळ वेदांची जननी । सकळ मंत्रांचा मुकुटमणी ।
ते गायत्री उत्तमवर्णी । सकळ ब्राह्मणीं जाणिजे ॥३७॥
सर्व वेदांची माता, सर्व मंत्रांचा मुकुटमणि, अशी जी गायत्री, ती श्रेष्ठ वर्णाच्या ब्राह्मणांनी समजून घ्यावी ३७.

तिचा अर्थ विचारितां । तीअधीन असे सविता ।
त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्य देतां । त्रैविद्या तत्त्वतां त्या नांव ॥३८॥
तिच्या अर्थाचा विचार केला, तर सूर्य तिच्या आधीन असतो. त्या तीन चरणांच्या गायत्रीमंत्राने तीन वेळ अर्घ्य देणे ह्यालाच खरोखर ‘विद्या’ असें नांव आहे ३८.

अर्धमात्रा अर्धबिंबध्यान । त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्यदान ।
तेणें संतोषे चिद्घन । आपणासमान भक्त करी ॥३९॥
अर्धमात्रा अर्धबिंबध्यान व त्रिपदा गायत्रीने त्रिकाल अर्ध्यप्रदान केल्याने चिद्धन परमात्म्याला संतोष होतो, आणि तो भक्ताला आपल्यासमान करतो ३९.

हें प्रथम माझें अधिष्ठान । सूर्यपूजा याचि नांव जाण ।
आतां अग्निपूजेचें लक्षण । साङ्ग संपूर्ण तें ऐक ॥१३४०॥
हे माझे पहिले अधिष्ठान होय. ह्याचेच नांव सूर्यपूजा. आता अग्निपूजेचें जें लक्षण आहे, ते सविस्तर आणि संपूर्ण ऐकून घे १३४०.

सर्वांगां मुख प्रधान । तें माझें मुख अग्नि जाण ।
ये अर्थी वेदशास्त्रपुराण । साक्षी संपूर्ण गर्जती ॥४१॥
सर्व अंगांमध्ये मुख हे श्रेष्ठ आहे. तें माझें मुख अग्नि आहे हे लक्षात ठेव. ह्याच अर्थाची साक्ष सर्व वेदशा व पुराणें गर्जून सांगत आहेत ४१.

ब्राह्मण माझे आवडते । माझे मुखीं होआवया सरते ।
म्यां लाविले अग्निसेवेतें । तेही तेथें चूकले ॥४२॥
ब्राह्मण हे माझे आवडते, ते माझ्या मुखाने श्रेष्ठत्वाला चढावे, म्हणून मी ते अग्नीच्या सेवेला लावले, पण तेही तेथें चुकलेच ४२.

घालूनि मजमुखीं अवदान । ‘इंद्राय स्वाहा’ म्हणती जाण ।
कर्मकांडें ठकिले ब्राह्मण । शुद्ध मदर्पण चूकले ॥४३॥
माझ्या मुखांत अवदान घालून ‘इंद्राय स्वाहा’ म्हणतात ! ब्राह्मण हे अशा प्रकारे कर्ममार्गाने फसले गेले, आणि मला अर्पण करण्याचा शुद्ध मार्ग ते चुकले ४३.

केवळ मजमुखीं अर्पितां । आड आली त्यांची योग्यता ।
इंद्र यम वरुण सविता । नाना विकल्पता अवदानीं ॥४४॥
केवळ माझ्याच मुखांत अर्पण करीत असता त्यांची योग्यताच त्यांच्या आड आली, म्हणूनच इंद, यम, वरुण, सूर्य असे अनेक प्रकारचे विकल्प अवदानांमध्ये उत्पन्न झाले ४४.

देवो देवी मीचि आहें । हेंही सत्य न मानिती पाहें ।
मजवेगळा विनियोग होये । नवल काये सांगावें ॥४५॥
देव आणि देवीही मीच आहे, हेही ते खरें मानीत नाहीत. मला सोडूनच त्यांचा सर्व विनियोग चाललेला असतो, हे आश्चर्य किती सांगावें ? ४५,

जें जें सेविजे तिहीं लोकीं । तें तें अर्पे माझ्या मुखीं ।
हें न मनिजे याज्ञिकीं । कर्माविखीं । विकल्पू ॥४६॥
त्रिभुवनांतील लोकांमध्ये जे जे काही सेवन केले जाते, तें तें सारे माझ्या मुखांतच अर्पण होते, पण हे याज्ञिक लोकांनी मान्य केलेले नाही. कारण कर्माविषयी त्यांचा विकल्प असतो ४६.

विकल्पबुद्धि ब्राह्मण । अद्यापि संशयीं पडिले जाण ।
करूनि वेदशास्त्रपठण । शुद्ध मदर्पण न बोलती ॥४७॥
असे ब्राह्मण हे विकल्पबुद्धि होऊन अद्यापही संशयांतच पडलेले आहेत, हे लक्षात ठेव. वेदशास्त्र पठण करूनही योग्य रीतीने मला कसें अर्पण करावे ते सांगत नाहींत ४७.

माझें मुख वैश्वानर । येणें भावें विनटले नर ।
सांडूनि भेद देवतांतर । मजचि साचार अर्पिती ॥४८॥
माझें मुख तोच अग्नि, अशा भावनेने युक्त झालेले जे पुरुष नाना प्रकारच्या देवतांतरांचा भेद सोडून खरोखर मलाच अर्पण करतात ४८,

त्याचें समिधेनीं मन तृप्त झालें । तेथही जरी हविर्द्रव्य आलें ।
तरी माझें निजमुख सुखावलें । सर्वस्व आपुलें त्यांसी मी दें ॥४९॥
त्यांच्या एका समिधेनेंही माझें मन तृप्त झालें असें होते, असें असतां आणखी जर दुसरे एकादें होमव्य अर्पण केले, तर मग माझ्या मुखाला अत्यंत सुख होतें. स्यांना मी आपले सर्वस्व अर्पण करतो ४९.

मज नैराश्यतेची आस । त्यांच्या हाताची मी पाहें वास ।
त्यांलागीं सदा सावकाश । अल्पही ग्रास जैं देती ॥१३५०॥
मला निरिच्छेची आवड आहे, म्हणून त्या निरिच्छ लोकांच्या हाताची मी अगदी वाट पहात असतो. ते मला लहानसाही ग्रास जेव्हां देतील तेथपर्यंत त्यांच्यासाठी मी निरंतर तिष्ठत असतों १३५०.

त्यांचेनि हातें निर्विकल्पें । मद्‍भावें जें अग्नीस अर्पे ।
तृण काष्ठ तिळ तुपें । तें म्यां चिद्‌रूपें सेविजे ॥५१॥
त्यांच्या निर्विकल्प हाताने माझ्या भावनेने जे अकीला अर्पण होते, तें तृण असो, काष्ठ असो, तीळ असोत की तूप असो, ते चित्स्वरूप अशा माझ्याकडून सेवन केले जाते ५१.

यापरी अग्नीची उपास्ती । जे दुजे स्थानींची पूजास्थिती ।
सांगीतली म्यां तुजप्रती । ब्राह्मणभक्ती अवधारीं ॥५२॥
झाप्रमाणे अग्नीची उपासना करणे हाच जो दुसऱ्या स्थानाचा पूजाविधि आहे, तो मी तुला सांगितला. आतां ब्राह्मणभक्ति कशी करावी तें ऐक ५२.

पूजेमाजीं अतिश्रेष्ठ जाण । शीघ्र मत्प्राप्तीचें कारण ।
ब्राह्मण माझें पूजास्थान । अतिगहन उद्धवा ॥५३॥
उद्धवा ! पूजेमध्ये अत्यंत श्रेष्ठ पूजा व माझ्या शीघ्र प्राप्तीचा मार्ग म्हणशील तर ब्राह्मण हें माझ्या पूजेचे अत्यंत थोर स्थान आहे ५३.

त्यांचिया भजनाची नवलपरी । आड पडावें देखोनि दूरी ।
मस्तक ठेवावा चरणावरी । चरणरज शिरीं वंदावे ॥५४॥
त्यांच्या भजनाचे एक मोठे आश्चर्य आहे, ते हे की, त्यांत जे काय विघ्न म्हणून येते, ते त्यांना पाहातांच दूर पळते. म्हणून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवावे आणि त्यांची पायधूळ शिरसावंद्य करावी ५४.

आवाहनविसर्जनेंवीण । शालिग्रामीं माझें अधिष्ठान ।
परी तें केवळ अचेतन । ब्राह्मण सचेतन मद्‌रूपें ॥५५॥
आवाहन व विसर्जन ह्यांशिवाय शालिग्रामामध्ये माझे अधिष्ठान असते; पण ते शालिग्राम केवळ अचेतन असतात, आणि ब्राह्मण हे मद्रूप असून सचेतन असतात ५५.

मी अव्यक्तरूप जनार्दन । तो मी व्यक्त ब्राह्मणरूपें जाण ।
धरातळीं असें मी नारायण । धरामर ब्राह्मण यालागीं ॥५६॥
मी जनार्दन वस्तुतः अव्यक्तस्वरूप आहे, पण तोच मी नारायण ह्या पृथ्वीवर ब्राह्मणरूपाने व्यक्त झालो आहे असे समज. म्हणून ब्राह्मणांना भूदेव असे म्हणतात ५६.

ब्राह्मणमुखें वेदांसी महिमा । ब्राह्मणें यज्ञदानतपतीर्थगरिमा ।
ब्राह्मणें देवासी परम प्रेमा । ब्रह्मत्व ब्रह्मा ब्राह्मणमुखें ॥५७॥
ब्राह्मणांच्या मुखानेच वेदांचा महिमा वाढला आहे, ब्राह्मणांच्या योगानेंच यज्ञ, दान, तप, तीर्थ यांना श्रेष्ठत्व आले आहे, ब्राह्मणांच्या योगानेच देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम उत्पन्न होत असते आणि ब्राह्मणांच्या मुखानेच ब्रह्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले आहे ५७.

त्या ब्राह्मणांसी अपमानितां । अपमानिल्या यज्ञदेवता ।
वेदादि तपदानतीर्था । परब्रह्म तत्त्वतां अपमानिलें ॥५८॥
त्या ब्राह्मणांचा अपमान केला असतां यज्ञदेवतांचा अपमान केल्याप्रमाणे होते. तसेच वेद, तप, दान, तीर्थ इत्यादिकांचाही अपमान केल्यासारखे होते. फार काय, खरोखर परब्रह्माचाही अपमान होतो म्हणून समजावें ५८.

मज त्रिलोकीं नाहीं सांठवण । मजहूनि अधिक माझे ब्राह्मण ।
त्यामाजीं मी वेदरूप नारायण । सगळा जाण सांठवलों ॥५९॥
त्रैलोक्यांतही माझे अंग मावत नाही असा त्रैलोक्याहून मी मोठा आहे, परंतु ब्राह्मण हे माझ्याहून मोठे आहेत. कारण त्यांच्यामध्ये मी वेदरूप नारायण सर्वच सांठवून राहिलों आहे ! ५९.

ब्राह्मणपद हृदयीं धरितां । मज आली परम पवित्रता ।
लक्ष्मी पायां लागे उपेक्षितां । चरणतीर्थ माथां शिवू धरी ॥१३६०॥
ब्राह्मणाचा पाय हृदयावर धरल्यामुळेच मला मोठी पवित्रता आली आहे. लक्ष्मीची उपेक्षा केली असतांही ती माझ्या पायांजवळ बसते, आणि माझ्या चरणाचे तीर्थ शंकरही मस्तकावर धारण करतो १३६०.

यालागीं ब्राह्मण पूज्य जाण । अंगें मी करीं चरणक्षालन ।
त्यांचें उच्छिष्ट मी काढीं आपण । पाडू कोण इतरांचा ॥६१॥
म्हणून ब्राह्मण हे पूज्य आहेत हे लक्षात ठेव. त्यांचे पाय धुण्याचे काम मी स्वतः करतो. मी आपण होऊन त्यांची उष्टं काढतो. मग इतरांचा पाड काय ? ६१.

मुख्य माझें अधिष्ठान । सर्वोपचारपूजास्थान ।
दान मान मिष्ठान्न । विधिपूजन विप्रांचें ॥६२॥
माझे मुख्य राहण्याचे ठिकाण आणि माझी सर्व उपचारांनी पूजा करण्याचे स्थान, किंवा दान, मान, मिष्टान्न हे सर्व एका ब्राह्मणाच्या विधियुक्त पूजनांत आहे ६२.

एका नेमू शालिग्रामाचा । एका स्थावर लिंगाचा ।
एका नेमू गणेषाचा । एका सूर्याचा दर्शननेमू ॥६३॥
कोणाला शालिग्रामाचा नेम असतो; कोणाला स्थापन केलेल्या लिंगाचा नेम असतो, कोणाला गणपतीचा नेम असतो, व कोणाला सूर्याचे दर्शन घेण्याचा नेम असतो ६३.

एका नेमू तुळाषीचा । एका बांधिल्या अनंताचा ।
नित्य नेम ब्राह्मणाचा । सभाग्य तो भाग्याचा दुर्लभ ॥६४॥
कोणाला तुळशीचा नेम असतो, कोणाला बांधलेल्या अनंताचा नेम असतो, परंतु नित्य ब्राह्मणाचा नेम ज्याला आहे, तो भाग्याचा भाग्यवान् परम दुर्मिळ होय ६४.

नित्य नेमस्त द्विजपूजा । षोडशोपचार करी वोजा ।
माझे भक्तीचा तो राजा । आत्मा माझा तो एकू ॥६५॥
जो नित्यनियमाने ब्राह्मणांची पूजा मोठ्या आवडीनें षोडशोपचारांनी करतो, तो भक्तीचा राजा, आणि तोच एक माझा आत्मा होय ६५.

जो देवतांतरा नुपासित । जीवेंभावें ब्राह्मणभक्त ।
त्याचा चुकवूनियां अनर्थ । निजस्वार्थ मी कर्ता ॥६६॥
जो निरनिराळ्या देवतांची उपासना करीत नाहीं, व जीवाभावार्ने ब्राह्मणाचाच भक्त होतो. त्याचा अनर्थ चुकवून मी त्याचा स्वार्थ यशस्वी करून देतों ६६.

ऐसे जे ब्राह्मणभक्त । त्यांच्या पायीं पृथ्वी पुनीत ।
गंगा चरणतीर्थ वांछित । शिरीं वंदीत मी त्यांसी ॥६७॥
असे जे ब्राह्मणांचे भक्त असतात, त्यांच्या चरणाने पृथ्वीही पुनीत होते. गंगाही त्यांच्या पायाच्या तीर्थाची इच्छा करते. मी तर त्यांना शिरसावंद्य करतों ६७.

त्यांचे सेवेचा सेवक । मोलेंवीण मी झालों देख ।
ब्राह्मणसेवेचें मज सुख । अलोकिक अनिवार ॥६८॥
मी मोलाशिवायच त्यांच्या सेवेचा सेवक झालो आहे पहा ! ब्राह्मणसेवेमध्ये मला कांही अलौकिक व अनिवार सुख वाटते ६८.

नित्यनेम द्विजपूजा । करी तो आवडे अधोक्षजा ।
त्यालागीं पसरूनि चारी भुजा । आलिंगनीं माझा जीवू निवे ॥६९॥
नित्यनियमानें जो ब्राह्मणांची पूजा करतो, तो भगवंताला प्रिय होतो. म्हणूनच चारही हात पसरून त्याला आलिंगन देण्यानेच माझा जीव शांत होतो ६९.

ब्राह्मणांच्या स्नानप्रवाहतळीं । जेणें भावार्थें केली आंघोळी ।
कोटि अवभृथें पायांतळीं । तेणें तत्काळीं घातलीं ॥१३७०॥
ब्राह्मणांनी स्नान केलेल्या पाण्यामध्ये ज्याने भक्तिभावाने आंघोळ केली, त्याने त्या काळीच कोट्यवधि अवभृथस्नानेंही पायाखाली घातली म्हणून समजावें १३७०.

ब्राह्मणचरणतीर्थ देखतां । पळ सुटे दोषदुरिता ।
तें भावार्थें तीर्थ घेतां । दोष सर्वथा निमाले ॥७१॥
ब्राह्मणाच्या पायांचे तीर्थ पाहतांच दोष आणि पातकें ह्यांना पळ सुटतो. ह्याकरितां तेंच तीर्थ भक्तिभावाने सेवन केले असतां सर्व दोष नाहीसे होतात ७१.

जो कोणी नित्य नेमस्त । सेवी ब्राह्मणाचें चरणतीर्थ ।
तो स्वयें झाला तीर्थभूत । त्याचेनि पुनीत जड जीव ॥७२॥
जो कोणी नित्य नेमाने ब्राह्मणाच्या चरणांचे तीर्थ सेवन करतो, तो स्वतः तीर्थस्वरूपच होतो, आणि त्याच्या योगानेच जड जीव पुनीत होतात ७२.

त्या ब्राह्मणाचे ठायीं जाण । अभ्यंगादि सुमन चंदन ।
आसन भोजन धन धान्य । शक्तिप्रमाण पूजेसी ॥७३॥
त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी पूजा करतांना तैलाभ्यंग इत्यादिकांचे स्नान, पुष्पें, चंदन, आसन, भोजन व धनधान्य यथाशक्ति द्यावें ७३.

ब्राह्मणासी प्रिय भोजन । दानीं श्रेष्ठ अन्नदान ।
निपजवूनियां मिष्टान्न । द्यावें भोजन मद्‍भावें ॥७४॥
ब्राह्मणाला भोजन हे प्रिय आहे, आणि सर्व दानांमध्ये अन्नदान श्रेष्ठ आहेः ह्याकरितां उत्तम उत्तम पकाने तयार करून ब्राह्मण हे माझेंच स्वरूप आहेत अशा भावनेने त्यांना भोजन द्यावे ७४.

एक हेळसूनि देती अन्न । एक उबगल्यासाठीं जाण ।
एक देती निर्भर्त्सून । एक वसवसोन घालिती ॥७५॥
कोणी ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना अन्न देतात, कोणी दगदगीला कंटाळले म्हणून देतात, कोणी निर्भर्त्सना करून भोजन घालतात, आणि कोणी तर वसावसा अंगावर येऊन जेवावयास घालतात ७५.

तैसें न करावें आपण । ब्राह्मण माझें स्वरूप जाण ।
त्यांसी देऊनियां सन्मान । द्यावें भोजन यथाशक्ति ॥७६॥
तसे आपण करूं नये. कारण ब्राह्मण हें माझें स्वरूप आहे हें लक्षात ठेव. त्यांचा आदरसत्कार करून त्यांना यथाशक्ति भोजन घालावें ७६.

अज्ञान अतिथि आल्या समयीं । खोडी काढूं नये त्याच्या ठायीं ।
तोही माझें स्वरूप पाहीं । अन्न ते समयीं अर्पावें ॥७७॥
वेळेला एकादा अज्ञानी अतिथि आला, तर त्याच्या ठिकाणची खोडी काढू नये. तोही माझें स्वरूपच असतो, याकरितां त्याला त्या वेळी अन्न घालावें ७७.

अतिथि जातां पराङ्मुख । त्यासवें जाय पुण्य निःशेख ।
अन्न द्यावें समयीं आवश्यक । नातरी उदक तरी द्यावें ॥७८॥
अतिथि विन्मुख गेला असता त्याच्याबरोबर आपले सर्व पुण्यही जाते, याकरितां त्याला वेळीच अवश्य अन्न द्यावे. निदान पाणी तरी प्यावयाला द्यावें ७८.

ब्राह्मण बैसवूनि पंक्ती । जे कोणी पंक्तिभेद करिती ।
ते मोलें पाप विकत घेती । त्यांसी अधोगती निश्चितीं ॥७९॥
ब्राह्मण पंक्तीला बसवून अन्न वाढण्यामध्ये जे कोणी पंक्तिप्रपंच करतात, ते मोलाने पातकच विकत घेतात. त्यांना अधोगति निश्चितपणे प्राप्त होते ७९.

ब्राह्मणसेवेलागीं जाण । काया वाचा मन धन ।
यथासामर्थ्यें अवंचन । अतिथिपूजन त्या नांव ॥१३८०॥
ब्राह्मणसेवेला शरीर, वाचा, मन, धन लावणे, व यथाशक्ति निष्कपटभाव धरणे ह्याचेच नांव अतिथिपूजन १३८०.

त्रिपदाजपें पवित्र पूर्ण । यालागीं वेदांचें निवासस्थान ।
ब्राह्मण माझें स्वरूप जाण । श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचें ॥८१॥
ब्राह्मण हे त्रिपदा गायत्रीमंत्राचा जप करून पूर्ण पवित्र झालेले असतात, म्हणून वेदांचेही वसतिस्थान त्यांच्या ठिकाणी असते. ब्राह्मण हे माझेच स्वरूप होत असे समज, म्हणूनच माझ्या पूजेचे श्रेष्ठ अधिष्ठानही तेच ८१.

ब्राह्मणआज्ञेलागीं जाण । अतिसादर ज्याचें मन ।
देणें देववणें दान । श्रद्धा संपूर्ण या नांव ॥८२॥
ब्राह्मणांच्या आज्ञेला ज्याचे मन अत्यंत तत्पर असते, आणि जो त्यांना दान देतो व देववितो, त्याच्या त्या वृत्तीचेच नांव पूर्ण श्रद्धा ८२.

ब्राह्मणसेवा धनेंवीण । सर्वथा न घडे ऐसें न म्हण ।
सेवेसी श्रद्धा प्रमाण । उल्हास पूर्ण भजनाचा ॥८३॥
ब्राह्मणाची सेवा द्रव्याशिवाय मुळीच घडावयाची नाही असे मात्र म्हणूं नये. सेवेला श्रद्धा आणि भजन करण्याचा पूर्ण उल्हास हीच मुख्य प्रमाणभूत साधने होत ८३.

एकाची शरीरसेवा जाण । एकाचे वाचिक पूजन ।
एकाचें मानसिक भजन । दया पूर्ण द्विजाची ॥८४॥
कोणाची शरीरानें सेवा करावी, कोणाचे वाणीने पूजन करावे, कोणाचें मनानेच भजन करावे, कसेंही भजन केले तरी ब्राह्मणांची दया परिपूर्णच लाभते ८४.

ब्राह्मणभक्तिलागीं जाण । हर्षनिर्भर अंतःकरण ।
श्रद्धायुक्त उल्हासपूर्ण । आतिथ्य जाण या नांव ॥८५॥
ब्राह्मणाच्या भक्तीसाठी अंत:करण आनंदाने भरून जाणे आणि परमश्रद्धेनें व उल्हासाने परिपूर्ण असणे ह्याचें नांव ‘आतिथ्य’ ८५.

यापरी ब्राह्मणभजन । तिसरे पूजेचें अधिष्ठान ।
हें सांगितलें जाण । गोशुश्रूषण तें ऐक ॥८६॥
याप्रमाणे ब्राह्मणाचे भजन हे पूजेचे तिसरे अधिष्ठान आहे, ते तुला सांगितले. आतां गायत्रीसेवा ऐक ८६.

जे गायीच्या कैवारा । घायें सहस्रबाहो केला पुरा ।
तीन सप्तकें वसुंधरा । मुख्य धुरा म्यां मारिल्या ॥८७॥
ज्या गाईच्या कैवाराने मी सहस्रार्जुनाला मारून ठार केले, आणि एकवीस वेळा पृथ्वीवरील मुख्य लढवय्ये असे क्षत्रिय मी मारिले ८७,

रामावतारीं अतिमहिमान । तैं न घडेचि गोषुश्रूषण ।
यालागीं गोकुळीं जाण । गायींचें सेवन म्यां केलें ॥८८॥
रामावतारांत माझे माहात्म्य फार मोठे होते, पण त्यात गाईची सेवा घडली नाही म्हणून मी गोकुळांत अवतार घेऊन गाईची सेवा केली ८८;

गायीचे सेवें झाली पुष्टी । बाळपणीं मारिले जेठी ।
कंस चाणूर मारिले हटी । बैसविला राज्यपटीं उग्रसेन ॥८९॥
गाईच्या सेवेनेंच मला पुष्टता प्राप्त झाली म्हणूनच लहानपणांतच मोठमोठे मल्ल मी मारून टाकले; कंस, चाणूर, ह्यांसारखे अदम्य मल्ल मारिले व उग्रसेन राज्यावर बसविला ८९;

गायीचे सेवेची अतिगोडी । तेणें माझी कीर्ति झाली चोखडी ।
फोडली कंसाची बांदवडी । तोडिली बेडी पितरांची ॥१३९०॥
त्या गाईच्या सेवेची आवड मला फार आहे. त्यामुळे माझी एवढी पवित्र कीर्ति पसरली. मी कसाच्या राज्यांतले बंदिखाने फोडले आणि पितरांची बेडी काढून त्यांना मुक्त केले १३९०.

यालागीं गायीं आणि ब्राह्मण । माझा जाण जीवप्राण ।
माझे पूजेचें अधिष्ठान । सुलभ जाण इयें दोन्ही ॥९१॥
म्हणून गाई आणि ब्राह्मण ही माझी जीवप्राण आहेत. ह्य दोहोंमुळेच माझ्या पूजेचे अधिष्टान सुलभ झाले आहे ९१.

आपत्काळीं गोरक्षण । करी तो पढियंता मज जाण ।
त्यासवें मी आपण । गोरक्षण करीतसें ॥९२॥
जो आपत्कालांत गाईचे संरक्षण करतो, तो मला फार आवडतो. त्याच्याबरोबर मीही स्वतः गोरक्षण करूं लागतों ९२.

गायीचे सेवेचें विधान । गोग्रास द्यावा जे तृण ।
करावें अंगकुरवाळण । इतुकेनि प्रसन्न मी होयें ॥९३॥
गाईच्या सेवेचे विधान असें आहे की, तिला दररोज गोग्रास द्यावा व गवत घालावें, आणि तिच्या आंगावरून हात फिरवून तिचे आंग कुरवाळावे, म्हणजे तेवव्यानेच मी प्रसन्न होतों ९३.

निर्लोभ गायीची सेवा । करितां माझी प्राप्ति उद्धवा ।
ऐक वैष्णवाची सेवा । पूजा सद्‍भावा विभागू ॥९४॥उद्धवा ! निलोभपणे गाईची सेवा केली असतां माझी प्राप्ति होते. आतां सद्‌भक्तीने वैष्णवाची पूजा कशी करावी तेही ऐक ९४.

वैष्णवे बंधुसत्कृत्या हृदि खे ध्याननिष्ठया ।
वायौ मुख्यधिया तोये द्रव्यैस्तोयपुरःस्कृतैः ॥ ४४ ॥श्लोक ४४] विष्णुभक्ताला आपला भाऊ समजून त्याचा आदर करावा ध्यान लावून हृदयाकाशात माझी पूजा करावी मुख्य प्राण समजून वायूमध्ये आणि फुले इत्यादी वाहून पाण्यामध्ये माझी आराधना करावी. (४४)

वैष्णवसेवा अत्यंत कठिण । तेथें जाती नाहीं गा प्रमाण ।
न म्हणावा शूद्र ब्राह्मण । भक्तिप्राधान्यभावार्थे ॥९५॥
वैष्णवाची सेवा करणे मोठे कठीण काम आहे. तेथें जात ही प्रमाण नाही. भक्तिप्रधान भावार्थाने हा शुद्ध आहे किंवा हा ब्राह्मण आहे असा भेद मनांतच आणूं नये ९५.

विदुर दासीपुत्र प्रसिद्धु । त्यासी आवडला गोविंदु ।
झाला वैष्णवांमाजीं अतिशुद्धु । कैसेनि निंद्यु म्हणावा ॥९६॥
विदुर हा दासीपुत्र असल्याचे प्रसिद्धच आहे. पण त्याला श्रीकृष्ण आवडला. तो वैष्णवांमध्ये अत्यंत भेष्ठ झाला. त्याला निंद्य कसा म्हणावा ? ९६.

योनि जन्मला मर्कट । तो वैष्णवांमाजीं अतिश्रेष्ठ ।
हनुमंत म्हणावया कनिष्ठ । ऐसा पापिष्ठ कोण आहे ॥९७॥
माकडाच्या जातीत जन्माला आलेला जो मारुति, तो वैष्णवांमध्ये अत्यंत श्रेष्ठ होता. तो कनिष्ठ आहे असे म्हणण्याइतका पातकी कोण आहे ? ९७.

राक्षसांमाजीं बिभीषण । दैत्यांमाजीं प्रह्लाद जाण ।
भगवंतासी अनन्यशरण । वैष्णवपण तेणें त्यांसी ॥९८॥
राक्षसांमध्ये विभीषण व दैत्यांमध्ये प्रल्हाद, हेही भगवंताला अनन्यभावाने शरण गेले, म्हणून त्या योगाने त्यांना वैष्णवपण प्राप्त झाले ९८.

जाती उत्तम भक्तिहीन । तो वैष्णव नव्हे जाण ।
अथवा करी दांभिक भजन । वैष्णवपण त्या नाहीं ॥९९॥
जातीने श्रेष्ठ असून जर भक्तिरहित असेल तर तो वैष्णव नव्हे हे लक्षात ठेव. किंवा वरकरणी भजन करील तर त्यालाही वैष्णवपणा प्राप्त झाला नाही असे समजावें ९९.

वैष्णवीं मानी जातिप्रमाण । शालिग्राम मानी पाषाण ।
गुरूसी मानी माणुसपण । तो पापिष्ठ जाण सर्वथा ॥१४००॥
जो वैष्णवांमध्ये जाति प्रमाण मानतो, शालिग्रामाला पाषाण समजतो, आणि गुरूला सामान्य मनुष्य समजतो, तो सर्वस्वी पातकी होय १४००.

जाणीव शाहणीव ज्ञातेपण । सांडूनि जातीचा अभिमान ।
जो मज होय अनन्यशरण । वैष्णव जाण तो माझा ॥१॥
जाणतेपणा, शहाणपणा, ज्ञातेपणा आणि जातीचा अभिमान हे सोडून जो मला अनन्यभावाने शरण येईल, तोच खरोखर माझा वैष्णव होय असें समज १.

त्या वैष्णवाचें पूजन । बाह्य उपचारें नव्हें जाण ।
बंधुस्नेहें कळवळी मन । साचार पूजन त्या नांव ॥२॥
त्या वैष्णवाचे पूजन करावे पण ते बाह्य उपचारांनी मात्र नव्हे, तर बंधुस्नेहानें. मन खरे खरे कळवळले पाहिजे. त्याचेच नांव खरें पूजन २.

ऐक सख्या बंधूचा स्नेहो । बंधूसी रणीं लागतां घावो ।
घायाआड स्वयें रिघोनि पहा हो । शत्रुसमुदावो विभांडी ॥३॥
सख्ख्या बंधूंचा स्नेह कसा असतो ते ऐक. बंधूला जर रणांगणांत घाव लागला, तर शत्रूकडून होणाऱ्या घावाच्या आड राहण्यासाठी स्वतः पुढे येऊन शत्रुसमुदायाचा निःपात करतो ३.

तैसा पोटाआंतुला कळवळा । तोचि वैष्णवपूजेचा सोहळा ।
स्नेहेंवीण टिळे माळा । सुख गोपाळा तेणें नव्हे ॥४॥
त्याप्रमाणे अंत:करणांतील कळवळा असतो तोच खरोखर वैष्णवांच्या पूजेचा विधि होय. स्नेहाशिवाय नुसत्या टिळेमाळा असतात, त्यांच्या योगाने भगवंताला आनंद होत नाही ४.

एका पितयाचे पुत्र साधू । अकृत्रिम होती बंधू ।
माजीं सापत्‍नविरोधू । स्नेह शुद्धू तो नव्हे ॥५॥
साधु हे एकाच पित्याचे पुत्र असल्यामुळे अकृत्रिम बंधूच आहेत. त्यांमध्ये सावत्रपणासारखा फरक बाळगणे हा काही खरा नेह नव्हे ५.

भक्ताअभक्तांची उत्पत्ती । मजपासूनि गा निश्चिती ।
भावाभावसापत्‍नप्राप्ती । विरुद्ध स्थिती परस्परें ॥६॥
खरे पहावयास गेलें तर भक्तांची आणि अभक्तांची उत्पत्ति खरोखर माझ्यापासूनच आहे. पण माझ्या ठिकाणी भाव ठेवणे व भाव न ठेवणे असा सावत्रपणा उपस्थित झाला, की परस्परांत विरुद्ध स्थिति निर्माण होते ६.

वैष्णव विष्णूचे उदरीं जाण । ते उदरीं उदरस्थ व्हावें आपण ।
तैं सहजें झाले सखेपण । अकृत्रिम जाण कळवळा ॥७॥
वैष्णव हे विष्णूच्याच उदरामध्ये असतात. त्याच उदरामध्ये आपणही जाऊन रहावे, म्हणजे सहजच सख्खेपणा येऊन अकृत्रिम कळवळा उत्पन्न होतो ७.

ऐसा बंधुस्नेहें जो कळवळा । तेचि पूजा वैष्णवकुळा ।
वैष्णवपूजकाजवळा । भावें भुलला मी तिष्ठें ॥८॥
असा बंधुभावाने जो कळवळा उत्पन्न होतो, तीच वैष्णवकुळाची पूजा होय, अशी वैष्णवांची पूजा करणाऱ्याजवळ भक्तीला भुललेला असा मी तिष्ठत उभा रहातों ८.

वैष्णवपूजेचें लक्षण । तें पांचवें माझें पूजास्थान ।
ऐक आकाशाचें पूजन । केवळ माझें ध्यान ते ठायीं ॥९॥
वैष्णवपूजेचें में लक्षण, तेच माझें पांचवें पूजास्थान होय. आतां आकाशाचे पूजन ऐक. कारण, त्यांत केवळ माझें ध्यान असते ९.

आकाश निर्लेप निर्विकार । अतिसूक्ष्म निराकार ।
तैसें माझें ध्यान निरंतर । हृदयीं साचार करावें ॥१४१०॥
आकाश हे निप आणि निर्विकार आहे. तसेंच ते अत्यंत सूक्ष्म असून निराकार आहे. त्याचप्रमाणे निरंतर हृदयामध्ये खरोखर माझे ध्यान करावें १४१०,

ध्यानीं बैसोनि सावकाश । सगळें सर्व महदाकाश ।
जो आपुलें करी हृदयाकाश । तेणें मी परेश पूजिला ॥११॥
स्वस्थपणाने ध्यानस्थ बसून सगळेंच्या सगळे महदाकाश जो आपले हृदयाकाश करून सोडतो, त्याने माझी परमेश्वराची पूजा केली म्हणून समजावें ११.

अतिसूक्ष्म निर्विकार । हृदयीं माझें ध्यान सधर ।
तेचि पूजा गा साचार । अपरंपार मी पूजिलों ॥१२॥
अत्यंत सूक्ष्म व निर्विकार असें माझें ध्यान हृदयामध्ये दृढ असणे तीच माझी खरोखर पूजा होय. अंत न लागणारा असा मी त्याच्याच योगानें पूजिला गेलो असे समजावें १२.

आकाशा लेप लावूं जातां । लावितां न लागे सर्वथा ।
तेवीं सर्व कर्मीं वर्तता । आपुली मुक्तता जो देखे ॥१३॥
आकाशाला डाग लावावयाला गेले असतां व तो लावला असतां आकाशाला कधीच लागत नाही, त्याप्रमाणे साऱ्या कर्मात वागत असतांना आपण मुक्तच आहों असें जो पाहतो १३;

आकाश सर्व पदार्थीं व्याप्त । व्याप्त असोनि अतिअलिप्त ।
तेवी सर्व कर्मीं वर्तत । कर्मातीत नभनिष्ठा ॥१४॥
आकाश सर्व पदार्थात व्याप्त आहे, पण ते तसें व्याप्त असूनही अत्यंत अलिप्सच असते, त्याप्रमाणे जो आकाशावर निष्ठा ठेवून सर्व कर्मात वागत असूनही कर्मातीतच असतो १४

आकाश माझें पूजास्थान । तेथील पूजेचें हें विधान ।
हें सहावें पूजाअधिष्ठान । वायूचें अर्चन तें ऐक ॥१५॥
तोच आकाशाचा पूजक होय. आकाश हे माझे पूजास्थान असून त्याच्या पूजेचे विधान असे आहे. हें सहावें पूजास्थान होय. आतां वायूचे अर्चन ऐक १५.

वायूच्या ठायीं भगवद्‍बुद्धी । ज्याची ढळों नेणें कधीं ।
वायूचेनि भूतां चेतनसिद्धी । जगातें त्रिशुद्धी धरिता तो ॥१६॥
ज्याची वायूच्या ठिकाणी भगवदुद्धि असून ती कधीं ढळत नाही, कारण, वायूच्याच योगाने प्राणिमात्रांना सजीवपणा आलेला आहे आणि खरोखर जगाला धारण करणाराही तोच१६.

वायुरूपें मीचि जाण । जालों सर्व भूतांचा प्राण ।
प्राणाचा मी मुख्य प्राण । मद्‌रूपें पवन या हेतु ॥१७॥
वायूच्या रूपाने सर्व प्राणिमात्रांचा प्राण मीच झालो आहे. हे लक्षात ठेव. प्राणाचा मुख्य प्राण तो मी. म्हणूनच वायु हा मत्स्वरूप आहे १७.

वायू व्योमीं जन्म पावें । जन्मोनि व्योमावेगळा नव्हे ।
सर्व कर्मीं तेथेंचि संभवे । अंती स्थिरावे निजव्योमीं ॥१८॥
वायु हा आकाशामध्येच उत्पन्न होतो, आणि उत्पन्न झाला तरी त्यापासून वेगळा होत नाही. तो सर्व प्रकारच्या हालचालींमध्ये आकाशांतच असतो, आणि अखेर आकाशामध्येच स्थिर होतो १८.

तेवीं जन्मकर्मनिदान । पावोनि न सांडी अधिष्ठान ।
प्राणाचा जो होय प्राण । हेंचि पूजन वायूचें ॥१९॥
त्याप्रमाणेच जन्मकर्माचा निर्णय समजूनही आपलें अधिष्ठान न सोडणे, व प्राणाचाही प्राण होऊन राहणे हेच वायूचे पूजन होय १९.

प्राणाचें गमनागमन । तेथ सोहंहंसाचें नित्य ध्यान ।
तेंचि करितां नित्य सावधान । हेंचि पूजन वायूचें ॥१४२०॥
प्राणाचे जाणेयेणे चालू असले, तरी ‘ब्रह्मरूप ते मीच’ हेच नित्य ध्यान करणे व ते करतांना निरंतर जागृति राखणे, हेंच वायूचे पूजन होय:४२०.

मद्‌रूपें दृढभावन । वायूचें जो करी आपण ।
तें पवनाचें पूजन । पूजास्थान सातवें ॥२१॥
जो माझ्या स्वरूपानेंच रद्ध ध्यान करतो, ते त्याच्याकडून होणारे वायूचे पूजन हुँच सातवें पूजास्थान समजावें २१.

जीवनें जीवनाची पूजा । जीवनेंचि निपजे वोजा ।
ते पूजा पावे अधोक्षजा । तो भक्त माझा पढियंता ॥२२॥
जलानेच जलाची पूजा करावी, म्हणजे जलाच्या योगेंकरूनच ईश्वराविषयीं आवड उत्पन्न होते आणि ती पूजा भगवंताला पोंचते. तो भक्त माझा फार आवडता होय २२.

‘आपो नारायणः साक्षात्’ । या मंत्राचा जो मंत्रार्थ ।
देवें देवोचि पूजिजेत । जाण निश्चित उद्धवा ॥२३॥
उद्धवा ! ‘आपो नारायणः साक्षात् ‘ ह्या मंत्राचा जो भर्थ आहे, त्यावरून देवानेच देव पूजिला जातो असें निश्चित समज २३.

क्षीरें पूजिला क्षीरसागरू । तेवीं द्रव्यें द्रव्योपचारू ।
हा जीवनपूजाप्रकारू । जाण निर्धारू उद्धवा ॥२४॥
उद्धवा ! दुधानें क्षीरसागराची पूजा करावी, त्याप्रमाणे द्रव्यानेच द्रव्याची पूजा करणे असा हा खरोखर जलानें जलाची पूजा करण्याचा प्रकार आहे २४.

जीवा जीववी जीवन । त्या जीवना मी निजजीवन ।
जीवनें पूजिजे जीवन । जेवीं समुद्रपूजन तरंगीं ॥२५॥
जीवाला जीवनच वाचविते. त्या जीवनाचेही जीवन ते मी. म्हणून लाटांनी समुद्राचे पूजन करावे, त्याप्रमाणे जीवनानेच जीवनाची पूजा करावी २५.

‘नद्यस्तृप्यंतु समुद्रास्तृप्यंतु’ । हें जळेंचि जळ पूजिजेतू ।
पूज्यपूजकां एकत्व येथू । हेचि वेदोक्तू विधिपूजा ॥२६॥
‘नद्यस्तृप्यतु’ ‘समुद्रास्तृप्यतु ‘ ह्या मंत्रानें जें उदक देतात तीही जलानेच जलाची पूजा करतात. ह्यांत पूजा आणि पूजक ह्यांचे ऐक्य होते. हीच वेदोक्त विधीची पूजा होय २६.

जीवनें पूजिजे जीवन । हें आठवें पूजास्थान ।
ऐक पृथ्वीचें पूजन । श्लोकार्धे संपूर्ण सांगेन ॥२७॥जीवनानेच जीवनाची पूजा करणे हेच आठवें पूजास्थान होय. आतां पृथ्वीचे पूजन ऐक. श्लोकार्धाच्या अनुरोधाने तेही सर्व सांगेन २७.

स्थण्डिले मंत्रहृदयैर्भोगैरात्मानमात्मनि ।
क्षेत्रज्ञं सर्वभूतेषु समत्वेन यजेत माम् ॥ ४५ ॥[श्लोक ४५] रहस्यमय मंत्रांनी वेदीवर पूजा करावी आपण घेत असलेले भोग आपल्यामधील सर्वात्मा प्रभूच घेतात, अशी भावना करून विषयसेवन करावे सर्व प्राण्यांमध्ये मीच एक क्षेत्रज्ञ आत्मा समानभावाने व्यापून आहे अशी भावना करणे ही माझीच पूजा होय. (४५)

जळामाजीं धरा अधर । विरोनि हों पाहे तें नीर ।
तीमाजीं मी प्रवेशलों धराधर । अधर ते सधर तेणें झाली ॥२८॥
-पाण्यामध्ये पृथ्वी ही निराधार असते, म्हणून ती विरून जाऊन तिचे पाणी होऊ पाहातें, आणि ह्यामुळेच तिला धारण करणारा (धराधर) मी तिच्यामध्ये शिरून राहातों, म्हणून ती मूळची निराधार असूनही साधार झाली २८.

यालागीं पृथ्वी माझें पूजास्थान । ऐक पूजेचें विधान ।
गोसदृश स्थंडिलीं जाण । आवाहन पैं माझें ॥२९॥
म्हणून पृथ्वी हें माझें पूजास्थान आहे. तिच्या पूजेचे विधान आता ऐक. गाईसारखें स्थंडिल करून त्यावर माझे आवाहन करावे २९.

गोसदृश स्थंडिलीं कां म्हणसी । पृथ्वी आहे गायीच्या ऐशी ।
जैं पूजा करावी पडे तिसी । तैं तदाकारेंसी स्थंडिल ॥१४३०॥
गाईसारख्याच स्थंडिलाच्या आकारावर हे पूजन कां ? असे म्हणशील, तर पृथ्वी ही गाईसारखी आहे. ह्याकरितां तिची पूजा करावयाचा प्रसंग येईल, तेव्हा तिच्याच आकाराचें स्थंडिल करावें १४३०.

ते स्थंडिलीं पूजावया धरा । आवाहन करावें धराधरा ।
तल्लिंग हृदयमंत्रा । मंत्रद्वारा पूजावी ॥३१॥
त्या स्थंडिलावर पृथ्वीची पूजा करण्यासाठी धराधराचे आवाहन करावे. नंतर तिच्या लिंगाची व हृदयमंत्राची मंत्रोक्त पूजा करावी ३१.

हृदय कवच शिखा नेत्र । शक्तिबीज मंत्रास्त्र ।
स्थंडिलीं रेखूनियां यंत्र । धराधरमहापूजा ॥३२॥
हृदय, कवच, शिखा, नेत्र, शक्ति, बीज अशा लक्षणांनी युक्त असे यंत्र स्थंडिलावर काढून धराधराची महापूजा करावी ३२.

यापरी पृथ्वीपूजन । साङ्ग सांगीतलें जाण ।
आपुलें आपण पूजास्थान । दहावें लक्षण तें ऐक ॥३३॥
ह्याप्रमाणे पृथ्वीचे सर्व पूजन सांगितले. आतां आपली आपण पूजा करणे हे दहावें पूजास्थान आहे. त्याचेही लक्षण ऐक. ३३.

आधीं एक पुढें पूर्ण । त्या नांव दहावें लक्षण ।
आपलें आपण पूजास्थान । विचित्र विंदान पूजेचें ॥३४॥
आधी एक आणि पुढे पूर्ण म्हणजे पूज्य, त्याचे नांव दहावें लक्षण, आपले पूजास्थान आपण असणें हें पूजेचें आश्चर्यकारक साधन आहे ३४.

पूज्यापुढें पूज्यकोटी । केल्या गणितासी पडे तुटी ।
पहिल्या पूज्यासी जैं फांटा उठी । तैं गणितसृष्टि असंख्य ॥३५॥
पूज्यापुढे आणखी कोट्यवधि पूज्ये दिली, तरी गणिताचे काही कारणच नाही. पण पहिल्या पूज्याला जर का एक खाली फांटा फुटला, तर मात्र गणित करता करतां मनुष्य बेजार होऊन जाईल ३५.

पूर्णासी फांटा काढिजे । त्या नांव एक म्हणिजे ।
एकपणेंही पूर्ण असिजे । सहज निजें परिपूर्ण ॥३६॥
पूज्याला फांटा फुटला म्हणजे त्याला एक म्हणतात. एकपणाने पूर्ण असले म्हणजे तो सहजच परिपूर्ण असतो ३६.

पूर्णापुढें पूर्ण पडे । तैं गणित काय आतुडे ।
जैं निचाडा चाड वाढे । तैं निजनिवाडें निजपूजा ॥३७॥
पूज्यापुढे पूज्यच पडले तर तेथें गणित काय होणार ? निरिच्छाला जेव्हां इच्छा उत्पन्न होते, तेव्हाच तो आपली आपण पूजा करू लागतो ३७.

एकासी एक मेळविजे । तैं दोनीपणें होय दुजें ।
जैं एकें एक भोगिजे । तैं देखिजे निजपूज्यत्व ॥३८॥
एकांत एक मिळविला तर दोनपणाने दुसरे उत्पन्न होते. आणि जेव्हां एकांतून एक वजा करावा, तेव्हा आपलें पूज्यत्व पाहावे लागते. ३८.

आपणचि आपला देवो । आपुला पूजक आपण पहा हो ।
आपुला आपणचि भावो । नवल नवलावो पूजेचा ॥३९॥
आपला देव आपणच असतो. अहो पहा ! आपला पुजारीही आपणच. आपली भक्तीही आपणच. तेव्हा हा पूजेचा चमत्कार किती आश्चर्यकारक आहे ! ३९.

हृदयीं भावूनि चैतन्यघन । स्वयें तद्‌रूप होऊनि जाण ।
मग जे जे भोग भोगी आपण । ब्राह्मार्पण सहजेंचि ॥१४४०॥
हृदयामध्येच चैतन्यघन आत्माराम आहे अशी भावना धरून स्वतःही तद्‌रूप होऊन मग स्वतः जे जे भोग भोगतो, ते ते सहजच ब्रह्मार्पण होतात १४४०.

तो ग्रास घाली स्वमुखीं । तेणें मुखें मी होय सुखी ।
तृप्ति उपजे परमपुरुखीं । पूजा नेटकी हे माझी ॥४१॥
त्याने आपल्या तोंडात घास घातला तर त्याच्या मुखानेच मी सुखी होतो, आणि परमपुरुषालाही तृप्ति होते. हीच माझी योग्य पूजा होय ४१.

तो जे जे कांहीं भोग भोगी । ते अर्पती मजचिलागीं ।
मी रंगलों त्याचे रंगीं । पावे श्रीरंगीं ते पूजा ॥४२॥
तो जे जे काही भोग भोगतो, ते ते मलाच अर्पण होतात. त्याच्या आनंदामध्ये मीच तन्मय झालेला असल्यामुळे ती पूजा भगवंतालाच पोंचते ४२.

मुख्य पूजेमाजीं हे माझी पूजा । तेणेंचि पूजिलें मज अतिवोजा ।
पूजामिसें गरुडध्वजा । वश अधोक्षजा तेणें केलें ॥४३॥
माझ्या पूजेमध्ये हीच मुख्य पूजा आहे. ही पूजा करणारानेच मला अत्यंत आवडीनें पूजिलें असें होतें. पूजेच्या निमित्ताने गरुडध्वजालाअधोक्षजाला-त्याने वश करून घेतले म्हणून समजावें ४३,

हे आवडती माझी पूजा । अत्यंत प्रिय अधोक्षजा ।
हे भक्ति पढिये गरुडध्वजा । जाण तो माझा प्रिय भक्त ॥४४॥
ही माझी आवडती पूजा आहे. ही गरुडध्वजाला अत्यंत प्रिय आहे. अशी भक्ति अधोक्षजाला आवडते. तोच माझा प्रिय भक्त होय ४४.

हो कां सगुण अथवा निर्गुण । दोहीं रूपें मीचि जाण ।
तेथ जो करी निजभोग अर्पण । शुद्ध पूजन तें माझें ॥४५॥
सगुण असो किंवा निर्गुण असो, दोन्ही स्वरूपें माझीच आहेत. त्यांच्या ठिकाणी जो आपले भोग अर्पण करतो तेच माझें खेर पूजन होय ४५.

निजात्मभोगीं अधोक्षजा । पूजिजे ते हे जाण पूजा ।
सर्व भूतांतें पूजिजे वोजा । समसाम्य समजा समभावें ॥४६॥
आत्मभोगानेंच भगवंताची जी करावयाची पूजा ती हीच पूजा होय. किंवा सर्व प्राणिमात्र आपल्याशी समान आहेत असे समजून समान भावनेने सर्व प्राणिमात्रांची आवडीने पूजा करावयाची, तीही भगवंताचीच पूजा होय ४६.

अकरावे पूजेचा विवेक । मागां पुढां एकएक ।
अकरा इंद्रियां पडे आंख । तोचि पूजक सर्व भूतां ॥४७॥
अकराव्या पूजेचा विचार केला तर त्या संख्येत मागे आणि पुढे एकएकच; कारण अकराही इंद्रियांना आंकडा पडेल तोच सर्व प्राणिमात्रांचा पुजारी होईल ४७.

मागां पुढां एकएक कीजे । त्या नांव एकादश म्हणिजे ।
हाचि विवेक जेणें जाणिजे । तेणें पूजिजे सर्व भूतां ॥४८॥
मागे पुढे एकएक करावा, तेव्हां त्याला अकरावा असे म्हणतात. हा विचार ज्याने जाणला, त्यानेच सर्व प्राणिमात्रांची पूजा केली असें होतें ४८.

आत्मभोगसमर्पणें पाहीं । वस्तू जाणितली स्वदेहीं ।
तेचि सर्व भूतांच्या ठायीं । देहींविदेहीं समसाम्यें ॥४९॥
आत्मभोग अर्पण केल्याने आपल्या देहांतच परब्रह्म आहे याचे ज्ञान झाले असें होतें. तेंच परब्रह्म सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी, देहांत, विदेहांत, समानतेने असते ४९.

सर्व क्षेत्रांतें वागविता । मी क्षेत्रज्ञु जाण तत्त्वतां ।
देखतांही विषम भूतां । ज्यासी माझी ममता मोडेना ॥१४५०॥
सर्व देहांना वागविणारा आत्मा खरोखर मीच आहे. त्यामुळे भिन्नभिन्न प्राण्यांना पाहिले असता ज्याची माझ्यावरची प्रीति मोडत नाही १४५०,

उंच नीच विषमता भूतां । वस्तूसी न देखे विषमता ।
समसाम्यें समान समता । सर्व भूतां समत्वें ॥५१॥
प्राणिमात्रांमध्ये उंचनीच हा भेद असला तरी जो परब्रह्मांत कांहीं भेद पहात नाही, त्याला असे दिसते की, समसमानतेने सर्व ठिकाणी सारखीच समभावना असून ती सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सारखेपणानेच आहे ५१.

माझिया साम्यें सर्वसमता । तेचि पूजा सर्व भूतां ।
तोचि पूजक तत्त्वतां । ज्यासी विषमता बाधीना ॥५२॥
तो माझ्याशी साम्य पावल्यामुळे त्याला सर्व प्राणिमात्रांमध्ये समानता वाटत असते. तीच सर्व प्राणिमात्रांची पूजा होय. ज्याला निरनिराळ्या वस्तूंतील विषमभाव बाधक होत नाही, तोच खरोखर पूजा करणारा होय ५२.

जो भावार्थें मजमाजीं आला । तैं सर्व भूतें तोचि झाला ।
सहजे समत्व पावला । पूजूं लागला आत्मत्वें ॥५३॥
जो भक्तिभावानें मजमध्येच एकरूप झाला, तेथे तोच स्वतः सर्व प्राणिमात्र होऊन गेला. अर्थातच तो आपोआप सवाशी एकरूप झाला व सर्वांची आत्मभावनेनेंच पूजा करूं लागला असे समजावें ५३.

पूजूं जावो रंक रावो । परी पालटेना समभावो ।
न खंडितां समतेचा ठावो । यथायोग्य पहा हो पूजित ॥५४॥
तो रंक आणि राजा यांचीही पूजा करतो, पण त्या रंक-राजांमधील परब्रह्माची समान भावना त्याच्या मनात बदलली जात नाही. तो त्यांतील एकरूपता व समानभाव ह्यांचा भंग न होऊ देतां त्यांची यथायोग्य पूजा करतो पहा ५४.

ऐक यदुवंषध्वजा । सर्व भूतीं माझी पूजा ।
माझेनि समत्वें निपजे वोजा । या अकराही पूजा समत्वें ॥५५॥
हे उद्धवा ! ऐक. सर्व भूतांच्या ठिकाणी माझी पूजा करावयाची असेल तर ती माझ्याशी तादात्म्य झाल्यानेच खरोखर होते. या अकराही पूजा एकरूपानेच आहेत ५५.

इयें अकराही अधिष्ठानें । मत्प्राप्तिकरें अतिपावनें ।
म्यां सांगीतलेनि अनुसंधानें । पूजा करणें यथाविधि ॥५६॥
ही अकराही पूजास्थाने माझी प्राप्ति करून देणारी व अत्यंत पवित्र अशी आहेत. मी तुला सांगितलेल्या वर्णनाच्या अनुरोधाने त्यांची यथाविधि पूजा करावी ५६.

म्यां सांगीतलें ज्या निगुतीं । पूजा करावी त्याचि स्थिती ।
न कळे तरी माझी मूर्ती । सर्वांहीप्रती चिंतावी ॥५७॥मी ज्या पद्धतीने पूजा करावयास सांगितली, त्याच रीतीनें पूजा करीत जावी. जर ती रीति नीट कळली नाही, तर त्या अकराही पूजास्थानांच्या ठिकाणी माझ्याच मूर्तीचे चिंतन करावें ५७.

धिष्ण्येष्वेष्विति मद्‌रूपं शङ्खचक्रगदाम्बुजैः ।
युक्तं चतुर्भुजं शान्तं ध्यायन्नर्चेत् समाहितः ॥ ४६ ॥श्लोक ४६] या सर्व ठिकाणी शंख, चक्र गदा, पद्म धारण केलेले माझेच शांत चतुर्भुज रूप दृष्टीसमोर आणून एकाग्र होऊन माझी पूजा करावी. (४६)

निर्गुणाहूनि सगुण न्यून । म्हणे तो केवळ मूर्ख जाण ।
सगुण निर्गुण दोनी समान । न्यून पूर्ण असेना ॥५८॥
निर्गुणापेक्षा सगुण हें कमी योग्यतेचे आहे असें जो म्हणेल, तो निखालस मूर्ख होय असे समज. कारण सगुण व निर्गुण ही दोन्ही सारखीच आहेत. त्यांत एक कमी व एक अधिक असें मुळीच नाही ५८.

विघुरलें तें तूप होये । थिजलें त्यापरीस गोड आहे ।
निर्गुणापरिस सगुणीं पाहें । अतिलवलाहें स्वानंदू ॥५९॥
तूप पातळ असले तरी ते तूपच होय, पण जर ते थिजले तर त्या पातळ तुपापेक्षा अधिक गोड होते. त्याप्रमाणेच पहा, निर्गुणापेक्षाही सगुण स्वरूपानेच मनाला त्वरित आनंद होतो ५९.

निर्गुणाचा बोध कठिण । मनबुद्धिवाचे अगम्य जाण ।
शास्त्रांसी न कळे उणखूण । वेदीं मौन धरियेलें ॥१४६०॥
निर्गुणाचा बोध होणेच मुळी कठीण असते. कारण तें मन, बुद्धि व वाणी यांना अगम्य असते. शास्त्रांनासुद्धा त्याचे रहस्य कळत नाही. वेदांनीही त्याबद्दल मौनच धारण केलें आहे १४६०.

वारा उमाणावा वावें । आकाश आकळावें खेंवें ।
भावना भांबावली धांवे । काय करावें स्फुरेना ॥६१॥
वांवेनें वारा मोजावयाचा प्रयत्न करावा, किंवा आकाश मिठी मारून आंवळावयाचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे भावना भांबावून पळत सुटते. कोठे स्थिर व्हावें तेच कळत नाहींसें होतें ६१.

तैशी सगुण मूर्ति नव्हे जाण । सुलभ आणि सुलक्षण ।
देखतां जाय भूकतहान । निवताहे मन सप्रेमें ॥६२॥
पण तशी काही सगुण मूर्सि नव्हे, हे लक्षात ठेव, ती सुलभ आणि सुस्वरूप असल्यामुळे तिला पाहतांच तहान आणि भूक नाहींशी होते, आणि प्रेमाने मन शांत होऊन जाते ६२.

जो नित्यसिद्ध सच्चिदानंदू । प्रकृतिपरू परमानंदू ।
सगुण जाला जी गोविंदू । स्वानंदकंदू स्वलीळा ॥६३॥
जो नित्यसिद्ध, सच्चिदानंद, प्रकृतीहून भिन्न व परमानंदस्वरूप, तोच स्वानंदाचा मूळकंद असा गोविंद आपल्याच लीलेने सगुण झाला ६३.

साखरेची गोडी वाखाणिली । तिची नाबदेची भेली केली ।
गोडिये अधिक शोभा आली । तैशी मूर्ति झाली साकार ॥६४॥
साखरेची गोडी सर्वत्र वाखाणली जाते, पण त्यांतही जर खडीसाखरेची ढेप बनविली, तर तिच्या गोडीला ज्यास्त चव येते. त्याप्रमाणेच साकार मूर्तीचा प्रकार आहे. ६५.

लावूनियां कसवटी । उत्तम सुवर्णाची खोटी ।
बांधल्या नववधूच्या कंठीं । तेणें ते गोमटी दिसे काय ॥६५॥
कसोटीला लावून उत्तम ठरलेल्या सोन्याची लगडच्या लगडच घेऊन ती जर नव्या नवरीच्या गळ्यांत बांधकी, तर त्यामुळे ती नवरी सुंदर दिसेल काय ? ६५.

त्याचींच करूनियां भूषणें । अंगीं प्रत्यंगीं लेवितां लेणें ।
नववधू अत्यंत शोभली तेणें । निंबलोणें उतरिती ॥६६॥
पण त्याच सोन्याचे दागिने करून जर मस्तक, कं, हात, इत्यादि निरनिराळ्या अवयवांवर घातले, तर तीच नवरी त्यामुळे अत्यंत शोभू लागलेली दिसते. आणि लोक तिच्यावरून निंबलोण उतरतात ६६.

तैसें जें निर्गुण निर्विकार । त्याची सगुणमूर्ति सुकुमार ।
चिन्मात्रैक अतिसुंदर । मनोहर स्वलीला ॥६७॥
त्याप्रमाणेच जें निर्गुण व निर्विकार असते, त्याचीच आपल्या आवडीप्रमाणे सुकुमार, केवळ ज्ञानस्वरूप, अत्यंत सुंदर व मनोहर अशी सगुण मूर्ति होते ६७.

घवघवित घनसांवळा । मुकुट कुंडलें मेखळा ।
कंठीं कौस्तुभ वनमाळा । सोनसळा झळकत ॥६८॥
देदीप्यमान असा श्यामवर्ण; मुकुट, कुंडलें व मेखला यांनी विराजमान; गळ्यांत कौस्तुभमणि व वनमाला; आणि भरजरीचा झळकत असणारा पीतांबर ! ६८.

आधींच तो अतिसांवळा । वरी टिळक रेखिला पिंवळा ।
आरक्तप्रांत दोहीं डोळां । कमळदळां लाजवी ॥६९॥
आधीच तो पूर्ण श्यामवर्णी; त्यांत आणखी कपाळावर लावलेला पिवळा टिळा; दोन्ही नेत्रांमध्ये कमळाच्या पाकळ्यांसही लाजविणारी आरक्त झांक ! ६९.

चिन्मात्रींचें देखणेपण । त्या डोळ्यां आलें शरण ।
सैराट हिंडतां शिणला पवन । हरीचें घ्राण ठाकिलें ॥१४७०॥
ज्ञानाचे देखणेपण त्या मूर्तीच्या डोळ्यांना जणू काय शरण आलें ! सैरावैरां भटकतांना वारा थकला, तेव्हा त्यानेच श्रीहरीच्या नाकांत श्वासोच्छ्रासरूपाने जणू काय ठाण मांडलें ! १४७०

जैशा ओंकारामाजीं श्रुती । तैशा मुखामाजीं दंतपंक्ती ।
चौकीचे चारी झळकती । सच्चिद्दीप्तीं सोलींव ॥७१॥
ओंकारामध्ये जशा श्रति असाव्यात, त्याप्रमाणे मुखामध्ये दंतपंक्ति शोभतात, आणि त्यांतील चारही कोपऱ्यांवरचे चार सुळे दांत तर सोलींव सच्चित्प्रकाशाप्रमाणे झळकतात ७१.

जेवीं जीव शिव भिन्नपणीं । तेवीं अध ऊर्ध्व अधर दोन्ही ।
हरिअंगीं मिनले मिळणीं । समानपणीं समत्वें ॥७२॥
ज्याप्रमाणे जीव व शिव भिन्नपणाने एकत्र असावेत, त्याप्रमाणे खालचा व वरचा असे दोन्ही ओठ श्रीहरीच्या आंगामध्ये सारखेपणाने व सारख्याच गुणांनी जुळून राहिले ७२.

देखोनियां कृष्णवदन । चंद्रमा कृष्णपक्षीं क्षीण ।
तो तंव पूर्णिमेसी पूर्ण । हा सदा संपूर्ण वदनेंदू ॥७३॥
कृष्णाचे मुख पाहून, म्हणजेच कृष्णपक्षामध्ये चंद्र क्षीण होऊ लागतो. तो फक्त पौर्णिमेलाच काय तो परिपूर्ण असतो. पण हा कृष्णाचा मुखचंद्र सदासर्वकाळ परिपूर्णच असतो ७३.

दिवसा चंद्राची क्षीण प्रभा । वदनेंदूची नवलशोभा ।
लोपोनि चंद्रसूर्यप्रभा । स्वयें स्वयंभा प्रकाश ॥७४॥
चंद्राचें तेज दिवसां क्षीण होते, पण ह्या मुखचंदाची शोभा काही अप्रतिमच आहे. त्याच्यामुळे चंद्रसूर्याचे तेजही फिर्के पडते, पण हरीचे मुख सदासर्वदा स्वयंप्रकाशच असते ७४.

तो आर्तचकोरा अमृतपान । मुमुक्षुचातका स्वानंदघन ।
सगुणपणें नारायण । भूषणां भूषण तो झाला ॥७५॥
सगुणस्वरूपामध्ये तो नारायण आर्तरूपी चकोरांना अमृतपान, मुमुक्षुरूपी चातकांना स्वानंदघन, आणि सर्व भूषणांना भूषण होऊन राहिला आहे ७५.

चहूं खाणींच्या क्रिया विविधा । तैशा चहूभुजिंच्या चारी आयुधां ।
सगुण देखोनि गोविंदा । वेद निजबोधा आयुधें झाले ॥७६॥
चार खाणीतील प्राण्यांच्या क्रियाही चार प्रकारच्या असतात. त्याप्रमाणे चारही हातांतील चार आयुधांची कार्ये निरनिराळी आहेत. श्रीकृष्ण हे सगुणस्वरूप झालेले पाहून जणू काय चार वेद आत्मज्ञानासाठी त्या चार हातांतील आयुधे झाले ७६.

देवो न कळे श्रुतींसी । लाज आली होती वेदांसी ।
जगीं मिरवावया प्रतापासी । आयुधें हरीपासीं ते झाले ॥७७॥
वेदांना देव कळला नाही म्हणून त्या वेदांना लज्जा उत्पन्न झाली होती, तेव्हा आपला प्रताप जगामध्ये गाजवून दाखविण्यासाठी ते हरीच्या हातांतील आयुधे झाले ७७.

सामवेद झाला शंख । यजुर्वेद चक्र देख ।
अथर्वण गदा तिख । कमळ साजुक ऋग्वेदू ॥७८॥
सामवेद शंख झाला, यजुर्वेद चक्र झाला, अथर्ववेद तीक्ष्ण धारेची गदा झाला, आणि ऋग्वेद नाजुकरों कमळ झाला ७८.

साकारपणें सच्चिदानंदा । शंख चक्र पद्म गदा ।
चहूं करीं चहूं वेदां । निववी सदा निजांगें ॥७९॥
ह्याप्रमाणे सच्चिदानंद परमेश्वराचे ठिकाणी चार वेद साकारस्वरूपाने अनुक्रमें शंख चक्र, पद्म व गदा झाले. अशा प्रकारे चार हातांत चार वेदांना परमेश्वराने संतुष्ट करून सोडले ७९.

जगीं मिरवावया उपनिषदें । झालीं बाहुभूषणें अंगदें ।
करीं कंकणें अतिशुद्धें । सोहं शब्दें रुणझुणती ॥१४८०॥
तेव्हां उपनिषदेही आपण जगांत मिरवावें म्हणून देवाची बाहुभूषणे व बाजुबंद झाली, आणि हातांतील लखलखीत कंकणे ‘ब्रह्म तें मीच’ या शब्दध्वनींचा रुणझुण रुणझुण असा आवाज करू लागली १४८०.

नख केश अंगुलिका । कराग्रीं जडित मुद्रिका ।
त्रिकोण षट्कोणिया देखा । उपासकां विधिपीठ ॥८१॥
तसेंच त्याची नखें, केश, बोटें व हाताच्या बोटांत असलेल्या त्या त्रिकोणी षट्कोणी इत्यादि आकारांच्या रत्नजडित आंगठ्या, ही उपासकांना उपासना करण्याला मोठे साधन झाली आहेत ८१.

अगम्य तेज हृदयींच्या पदका । गुणत्रिवळी उदरीं देखा ।
मध्यें कळसू नेटका । क्षुद्रघंटिका मेखळे ॥८२॥
हृदयावरील पदकाला तर काही अपूर्वच तेज आहे. पोटावर त्रिगुणाच्या तीन वळ्या शोभतात पहा. आणि कंबरेतल्या मेखलेला लावलेल्या घागऱ्यांमध्ये कळस किती उत्तम शोभतो ! ८२.

कांतीव मरकतस्तंभ जाण । तैसे शोभताती दोन्ही चरण ।
ते केवळ अचेतन । हे सचेतन हरिअंगीं ॥८३॥
पाचेचे कातीव खांब असावेत, त्याप्रमाणे दोन्ही पाय शोभतात. पाचेचे खांब केवळ निर्जीव असतात, पण हे पाय हरीच्या अंगाचे अवयव असल्यामुळे सचेतन आहेत ८३.

ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्वरेखा । दोन्ही पायीं पद्में देखा ।
यवांकित सामुद्रिका । अतिनेटका पदबंधू ॥८४॥
दोन्ही पायांवर ध्वज, वज्र, अंकुश, ऊर्ध्वरेषा आणि पने इत्यादि चिन्हें आणि यवाच्या चिन्हाचे सामुद्रिक लक्षण असून प्रत्येक पावलाची आकृति अत्यंत सुंदर आहे ८४.

आरक्त रंग चरणतळां । वरील घनसांवळी कळा ।
नभीं इंद्रधनुष्यमेळा । तैसी लीळा हरिचरणीं ॥८५॥
पायांच्या तळव्यांना तांबडा रंग, आणि त्यावर घनश्याम वर्णाची छटा ! त्यामुळे आकाशांत अनेक इंद्रधनुष्यांचा समुदाय दिसावा त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या पायाची शोभा दिसत होती ८५.

सगुण देखोनियां जगन्नायका । दशदिशांसी चरणीं आवांका ।
पावावया निजसुखा । दशांगुलिका होऊनि ठेल्या ॥८६॥
जगन्नायकाला अशा रीतीने सगुण झालेला पाहून दशदिशांनीही त्याच्या चरणांजवळ येण्याचे धैर्य केले, आणि आपले आत्मसुख साधून घ्यावे म्हणून त्या दशदिशा हरीच्या पायांची दहा बोटे होऊन राहिल्या ८६.

चंद्र कृष्णपक्षीं क्षीण । तेणें ठाकिले हरिचरण ।
नखीं चंद्र जडोनियां जाण । परम पावन तो झाला ॥८७॥
चंद्रही कृष्णपक्षामध्ये क्षीण होत होता, म्हणून त्यानेही जाऊन हरीचे चरण धरले, आणि तो त्याच्या पायांची नखे होऊन स्वतः अत्यंत पवित्र झाला ८७.

हें जाणोनि त्रिनयनें । चंद्रमा मस्तकीं धरणें ।
पायवणी माथां वाहणें । जग उद्धरणें तेणें जळें ॥८८॥
हे समजताच शंकराने त्या चंद्रालाच मस्तकावर धारण केले, तेव्हां सहजच देवाच्या पायांचे तीर्थ त्या डोक्यावरून वाहू लागले, व त्याच जळाने जगाचा उद्धार झाला ८८.

सगुण देवो देखोनि पाहीं । चारी मुक्ति लागल्या पायीं ।
यालागीं संत चरणांच्या ठायीं । तत्पर पाहीं सर्वदा ॥८९॥
असा देव सगुण झालेला पाहून चारही मुक्ति त्याच्या पायांजवळ येऊन नम्र झाल्या, म्हणूनच संत देवमूर्तीच्या चरणांपुढे नेहमी तत्पर असतात ८९.

सलोकता समीपता । दोहीं पायीं वांकी गर्जतां ।
अंदू झाली स्वरूपता । सायुज्यता तोडरू ॥१४९०॥
त्या चार मुक्तीपैकी सलोकता आणि समीपता या दोघी दोन पायांमध्ये वाक्यांच्या रूपाने वाजू लागताच सरूपता होती ती पायांतील सांखळ्या झाली, आणि सायुज्यता पैंजण बनली १४९०.

ज्या तोडराचा धाक पाहीं । अहंगर्वित असुर वाहती देहीं ।
सर्व सुख तें हरीच्या ठायीं । त्यांच्या पायीं समाधी ॥९१॥
पहा ! ज्या पैंजणांचा धाक मी मी म्हणविणारे राक्षससुद्धा हृदयांत वाहतात. सर्व सुख म्हणून जें कांही आहे, ते श्रीहरीच्याच ठिकाणी आहे, आणि त्याच्याच चरणांच्या ठिकाणी समाधि आहे ९१.

धैर्य वीर्य उदारकीर्ती । गुणगांभीर्य शौर्य ख्याती ।
यांसी कारण माझी सगुण मूर्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९२॥
हे उद्ध्वा ! धैर्य, वीर्य, उदार कीर्ति, गुणगांभीर्य, शौर्य, प्रख्याति, ह्यांना कारण माझी सगुण मूर्तीच आहे, हे नीट लक्षात ठेव ९२.

माझे ये मुर्तीचेनि दर्शनें । होत डोळ्यां पारणें ।
जन्ममरणांचें उठवी धरणें । खत फाडणें विषयांचे ॥९३॥
ह्या माझ्या मूर्तीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणेच फिटते, हे दर्शन जन्ममरणाचे धरणें उठविते, आणि विषयाचे खतपत्र फाडून टाकितें ९३.

माझी मूर्ति देखिल्यापाठीं । न लगे योगयाग आटाआटी ।
न लगे रिघावें । गिरिकपाटीं । नाना संकटीं न पडावें ॥९४॥
माझी मूर्ति पाहिल्यानंतर योगयागाची खटपट करावी लागत नाही, गिरिगव्हरांत जावे लागत नाही, किंवा अनेक प्रकारच्या संकटांतही पडावे लागत नाहीं ९४.

न लगे आसन भोजन । न लगे समाधिसाधन ।
माझिये प्राप्तीसी कारण । माझी भक्ति जाण उद्धवा ॥९५॥
आसन, पात्र, ह्यांची जरूरी लागत नाही, किंवा समाधीचे साधनही लागत नाही. उद्धवा ! माझ्या प्राप्तीला मुख्य कारण माझी भक्तीच आहे हे लक्षात ठेव ९५.

एकादश पूजाअधिष्ठान । तेथें माझें करोनि आव्हान ।
म्यां सांगीतलें मूर्तीचें ध्यान । सावधान करावें ॥९६॥
माझी पूजेची स्थाने अकरा आहेत, त्या ठिकाणी याप्रमाणे माझे आवाहन करून मी सांगितलेल्या मूर्तीचे लक्षपूर्वक ध्यान करावें ९६.

माझें अर्चन माझें ध्यान । माझें करावें कीर्तन ।
माझ्या नामाचे स्मरण । माझे गुण वर्णावे ॥९७॥
माझी पूजा करावी, माझे ध्यान करावे, माझें कीर्तन करावे, माझ्या नामाचे स्मरण करावें, द माझे गुण वर्णन करावे ९७.

अहर्निशीं माझी कथा । अहर्निशीं माझी वार्ता ।
अहर्निशीं मातें ध्यातां भक्ति तत्त्वतां ती नांव ॥९८॥
रात्रंदिवस माझी कथा करावी, रात्रंदिवस माझ्या चरित्रांतील गोष्टी सांगाव्यात, असें रात्रंदिवस माझें ध्यान केले असता त्यालाच खरोखर भक्ति असे म्हणावें ९८.

दीपकळिका हातीं चढे । तैं घरभरी प्रकाशू सांपडे ।
माझी मूर्ती जैं ध्यानी जडे । तैं चैतन्य आतुडे अवघेंचि ॥९९॥
दिव्याची ज्योत हातांत आली की साऱ्या घरभर प्रकाश पडलेला आढळतो, त्याप्रमाणे जेव्हा माझ्या मूर्तीकडे लक्ष वेधून राहाते, तेव्हांच सर्व ज्ञान हाती येते ९९.

या उपपत्ति उद्धवा देख । सगुण निर्गुण दोन्ही एक ।
जाण पां निश्चयो निष्टंक । सच्चिदानंदसुख समत्वें ॥१५००॥
उद्ध्वा ! ह्या वर्णनावरून असे लक्षात आण की, सगुण आणि निर्गुण ही दोन्ही एकच आहेत. सच्चिदानंदाचें सुखही दोहोंपासून सारखेच प्राप्त होते असा पूर्ण निश्चय ध्यानात ठेव १५००.

जो कसू सुवर्णाचिये खोटीं । तोचि वाला एका कसवटीं ।
सगुणनिर्गुणपरिपाटीं । नाहीं तुटी चित्सुखा ॥१॥
सोन्याच्या लगडीला जो कस लागतो, तोच त्याच्यांतील एका वालभर सोन्यालाही लागतो. त्याप्रमाणे सगुण किंवा निगुण ह्यांच्या उपासनेने आत्मानंदांत कांहीं अंतर पडत नाहीं १.

तेवीं सगुण निर्गुण निःशेष । जाण निश्चयें दोन्ही एक ।
सगळें साखरेचें टेंक । ना नवटांक सम गोडी ॥२॥
म्हणून सगुण आणि निर्गुण ही दोन्ही पूर्णपणे निश्चयपूर्वक एकच आहेत. साखरेचा सगळा ढीग किंवा त्यांतील नवटांकभर साखर ह्या दोहींत गोडी सारखीच असते २.

हें अंतरंग माझें ध्यान । तेथें मन करोनि सावधान ।
अतिहर्षें मदर्चन । मद्‍भक्तीं जाण करावें ॥३॥
हे माझे अंतकरणांतील ध्यान आहे. तेथें मन निरंतर जागृत ठेवून माझ्या भक्तांनी अत्यंत हर्षाने माझी पूजा करावी ३.

उद्धवा ऐसें म्हणसी मनीं । हे भक्ति पाविजे कैसेनि ।
हें साध्य होय जिंहीं साधनीं । तें तुजलागोनी सांगेन ॥४॥उद्धवा ! पण तूं आपल्या मनात असें म्हणशील की, ही भक्ति कोणत्या उपायाने साध्य होणार ? तर ही ज्या साधनांनी साध्य होते, ते सर्व तुला सांगेन ४.

इष्टापूर्तेन मामेवं यो यजेत समाहितः ।
लभते मयि सद्‍भक्तिं मत्स्मृतिः साधुसेवया ॥ ४७ ॥[श्लोक ४७] अशा प्रकारे जो मनुष्य एकाग्र चित्ताने यज्ञयाग इत्यादी इष्ट आणि समाजाच्या उपयोगी धर्मशाळा, विहिरी इत्यादी आपूर्त कर्मे, ही माझीच पूजा मानून करतो, त्याला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते त्याचप्रमाणे संतांची सेवा केल्याने माझ्या स्वरूपाचे ज्ञानसुद्धा होते. (४७)

करितां नाना योगयाग । वापी कूप वन तडाग ।
श्रौतस्मार्त कर्में चांग । मदर्पणें साङ्ग जिंहीं केलीं ॥५॥
नाना प्रकारचे योगयाग, वापी, कूप, बनें, सरोवरें, उत्तमोत्तम श्रौतस्मार्त कमैं ही करीत असतां ज्यांनी ती मला अर्पण केली, तींच यथासांग झाली म्हणून समजावें ५,

श्रौत अग्निहोत्र सोमयाग । स्मार्त वापी कूप तडाग ।
मज नार्पितां दोन्ही व्यंग सत्कर्म साङ्ग मदर्पणें ॥६॥
आणि मला अर्पण न करतां श्रौत, अग्निहोत्र, सोमयाग, स्मात इत्यादि सत्कमैं जरी केली, किंवा तलाव, विहिरी वगैरे बांधल्या, तरी ती दोन्ही व्यर्थच होत. सत्कर्म झाले तरी ते मला अर्पण केल्यानेच यथासांग होते ६.

कर्म करितां मदर्पण । अवचटें फळ वांच्छी मन ।
इतुकियासाठी भक्तासी विघ्न । सर्वथा मी जाण येवों नेदीं ॥७॥
कमें मला अर्पण करीत असतांसद्धा एकादे वेळी स्या भक्ताचें मन काही तरी विघ्ननिवारक फळाची इच्छा करते, यासाठी भक्ताला मी कधीही विघ्न येऊ देत नाही लक्षात ठेव ७.

सकाम कर्मकर्त्यासी । जे प्राप्ति नव्हे अतिप्रयासीं ।
त्या उत्तमलोकगतिभोगांसी । मद्‍भक्तांसी मी देता ॥८॥
सकाम कर्मकर्त्याला अत्यंत प्रयासानेसुद्धा जी प्राप्त होत नाही, ती उत्तम लोकांतील गतिशील सर्व भोग मी माझ्या भक्तांना देत असतों ८.

पोटांतूनि माझा भक्तू । दिव्य भोगांसी विरक्तू ।
ते भोग भोगितां मातें स्मरतू । भोगासक्तू तो नव्हे ॥९॥
अंतःकरणपूर्वक जो माझा भक्त असून दिव्य भोगाविषयी विरक्त असतो, तो ते भोग भोगीत असतांही माझे स्मरण करीत असतो, म्हणून तो त्या भोगांना आसक्त होत नाही ९.

साधु देवालया जातां । पर्जन्यें पीडिला धारावर्तां ।
वेश्यागृहासी नेणतां । आला अवचितां वोसरिया ॥१५१०॥
एकादा साधु देवालयांत जात असतां मुसळधार पडणाच्या पावसाने त्याला फार त्रास दिला म्हणून तो आडोशासाठी जर अकस्मात् नकळत वेश्येच्या घरांत शिरला १५१०,

तो बसोनि वेश्येसी नातळे । तेवीं भक्त दिव्य भोगांसी कांटाळे ।
ठकलों म्हणे अनुतापबळें । पिटूनि कपाळें हरि स्मरे ॥११॥
तर तो तेथें राहुनही त्या वेश्येला शिवत नाही. त्याप्रमाणे दिव्य भोगाला भक्त कंटाळतो, आणि अनिवार पश्चात्तापाने मी केवळ फसलों गेलों असें म्हणून कपाळ बढवून घेऊन हरीचे स्मरण करतो ११.

ऐशिया अनुतापस्थितीं । तत्काळ भोग क्षया जाती ।
तो जन्म पावे महामती । माझी भक्ती जिये गृहीं ॥१२॥
अशा अनुतापाच्या स्थितीमध्ये तत्काळ ते सर्व भोग नष्ट होतात आणि ज्या घरांत माझी भक्ति वास करीत असते त्या घरी तो महान् ज्ञानी जन्मास येतो १२.

त्यासी पूर्वसंस्कारस्थितीं । सकळ विषयांची विरक्ती ।
उपजतचि लागे भक्तिपंथीं । भक्त आवडती जीवेंप्राणें ॥१३॥
त्याला पूर्वसंस्कारांच्या साहचर्याने सर्व विषयांची विरक्तीच प्राप्त होते, तो जन्मतःच भक्तिमार्गाला लागतो, आणि त्याला भक्त असतील ते जीव की प्राण असे आवडतात १३.

तो मुक्तीतें हाणोनि लातें । निजसर्वस्वें भजे मातें ।
यापरी मी निजभक्तातें । नेदीं विघ्नातें आतळूं ॥१४॥
तो मुक्तीला लाथेनें झुगारून देऊन स्वतांच्या सर्वस्वाने मलाच भजत असतो. अशा प्रकारे मी आपल्या भक्तांना विघ्नाचा स्पर्शसुद्धा होऊ देत नाही १४.

यापरी ज्यांस विषयविरक्ती । तेही इष्टापूर्त जैं करिती ।
योग याग त्याग जैं साधिती । माझी भक्ती तैं उपजे ॥१५॥
याप्रमाणे ज्यांना विषयांची विरक्ति उत्पन्न होते, तेही जेव्हां तलाव, विहिरी इत्यादि परोपकारांची कमैं करतात, किंवा जेव्हां योग-याग व त्यागीपणा ह्यांचे साधन करतात, तेव्हांच त्यांना माझी भक्ति उत्पन्न होते १५.

समाहित करोनि मन । श्रौतस्मार्तकर्मानुष्ठान ।
योग याग त्याग साधन । निष्ठेनें जाण जैं करिती ॥१६॥
मनाची समदृष्टि करून श्रौतस्मातकर्माचे अनुष्ठान किंवा योग, याग, त्यागवृत्ति यांचे साधन ते जेव्हां एकनिष्ठेने करतात १६,

तेणें शोधित होय चितवृत्ती । झालिया चित्तशुद्धीची प्राप्ती ।
तैं उपजे माझी सद्‍भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१७॥
तेव्हांच त्यायोगाने त्यांची चित्तवृत्ति शुद्ध होते, आणि उद्धृवा ! चित्तवृत्तीची शुद्धि प्राप्त झाली की मग खरोखर त्यांना माझी उत्तम भक्ति प्राप्त होते असे समज १७.

इतुकी न करितां आटाटी । माझे सद्‍भक्तीची होय भेटी ।
हें अतिगुह्य आहे माझे पोटीं । ते तुज मी गोठी सांगेन ॥१८॥
पण इतकी खटपट न करतांच माझी सद्‌भक्ति प्राप्त होईल अशी एक अत्यंत गुप्त युक्ति मला माहीत आहे, तीही गोष्ट मी तुला सांगेन १८.

सांडोनि सकळ साधन । जो करी साधुभजन ।
तेव्हांचि त्याचे शुद्ध मन । सत्य जाण उद्धवा ॥१९॥
उद्धवा ! सर्व साधन सोडून देऊन जो साधूचे भजन करील, तेव्हांच त्याचे मन खरोखर शुद्ध होईल हे लक्षात ठेव १९.

म्हणसी साधु तो कैसा कोण । मागां सांगीतलें लक्षण ।
बहु बोलावया नाहीं कारण । साधु तो जाण सद्‍गुरु ॥१५२२॥
आता हूं म्हणशील की, साधु तो कसा असतो ? आणि असा साधु कोण ? तर त्याचे लक्षण पूर्वी सांगितलंच आहे. तेव्हां अधिक सांगावयाचे काही कारणच नाही. साधु तोच सद्गुरु हें लक्षात ठेव म्हणजे झाले १५२०.

त्या सद्‍गुरूचें भजन । जो भावार्थें करी आपण ।
सर्व शुद्धीचें कारण । सद्‍गुरु जाण सर्वांषीं ॥२१॥
त्या सद्गुरूचे भजन जो आपण भावार्थाने करतो, त्याच्या सर्व शुद्धीचे कारण सर्वस्वीं सद्रूच आहे असे समज २१.

ज्याचे मुखींचें वचन । ब्रह्मसाक्षात्कारा पाववी जाण ।
त्याचे सेवितां श्रीचरण । शुद्ध कोण होईना ॥२०॥
त्याच्या मुखांतील शब्दच ब्रह्मसाक्षात्काराला नेऊन पोचवितो. त्या सद्गुरूच्या भाग्यवान् चरणाची सेवा केली असता कोणती शुद्धि होणार नाही ? २२.

गुरुनाम घेतां मुखें । कळिकाळ पाहूं न शके ।
त्याची सेवा करितां हरिखें । पायां मोक्षसुखें लागती ॥२३॥
तोंडाने गुरूचे नाम घेतले असता त्याच्याकडे कलिकालही पाई शकत नाही. त्याची सेवा आनंदाने केली असतां मोक्षसुखेही येऊन पायांना लागतात २३.

ज्यासी सद्‍गुरूची आवडी चित्तीं । ज्याची सद्‍गुरुभजनीं अतिप्रीती ।
त्यासी भाळली माझी सद्‍भक्ती । पाठीं लागे निश्चितीं वरावया ॥२४॥
ज्याच्या मनांत सद्रूची. आवड आहे, ज्याची सद्गुरूच्या भजनामध्ये अत्यंत प्रीति आहे, त्याच्यावर माझी सद्‌भक्ति भाळली म्हणून समजावें. ती खरोखर त्या भक्ताने आपणास वरावे म्हणून त्याच्या पाठीसच लागते २४.

जो गुरुभजनीं भावार्थी । जगामाजीं तोचि स्वार्थी ।
त्यापाशीं माझी सद्‍भक्ती । असे तिष्ठती आंखिली ॥२५॥
गुरुभजनाच्या ठिकाणी जो भावार्थान युक्त होतो, त्यानेच जगामध्ये आपला स्वार्थ साधला खरा. त्याच्यापाशी माझी उत्तम भक्ति अगदी नेमकी विष्ठत बसलेली असते २५.

सद्‍भक्ति बापुडी कायसी । अंगें मीही अहर्निशीं ।
तिष्ठतसें स्वानंदेंसीं । गुरुप्रेमासी भूललों ॥२६॥
सद्‌भक्तीच बिचारी काय ? पण मीसुद्धा स्वतः रात्रंदिवस आनंदाने त्याच्याजवळ उभा असतों इतका गुरुप्रेमाने मी भुललो आहे २६.

मज माझ्या भक्तांची थोडी गोडी । परी गुरु भक्तांची अतिआवडी ।
सत्संगेंवीण रोकडी । सद्‍भक्ति चोखडी न पविजे ॥२७॥मला माझ्या भक्तांची गोडी इतकी नाही; पण गुरुभक्तांची मला फारच आवड असते. मात्र सत्संगतीशिवाय प्रत्यक्ष उत्तम सद्‌भक्ति कधीही प्राप्त व्हावयाची नाही २७.

प्रायेण भक्तियोगेन सत्सङ्गेन विनोद्धव ।
नोपायो विद्यते सम्यक् प्रायणं हि सतामहम् ॥ ४८ ॥[श्लोक ४८] प्रिय उद्धवा ! सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांव्यतिरिक्त, संसारसागरातून पार होण्यासाठी बहुधा दुसरा कोणताच उपाय नाही कारण संतांचे श्रेष्ठ आश्रयस्थान मीच आहे. (४८)

माझिये प्राप्तीलागुनी । भक्ति-ज्ञानमार्ग दोन्ही ।
ज्ञान अत्यंत कठिणपणीं । भक्ति निर्विघ्नीं पाववी मज ॥२८॥
माझी प्राप्ति होण्याला भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे दोन्ही मार्ग आहेत. त्यांत ज्ञानमार्ग फार बिकट आहे, पण भक्तिमार्ग हा निर्विघ्नपणाने भक्काला माझ्याकडे पोचवितो २८.

संसार तरावयालागीं । अनेक साधनें अनेगीं ।
बोलिलीं तीं जाण वाउगीं । उत्तम प्रयोगीं मद्‍भक्ती ॥२९॥
हा संसार तरून जाण्याला अनेकांनी अनेक साधनें सांगितलेली आहेत, पण ती सर्व व्यर्थ आहेत असें समज. अनुभवाअंती माझा भक्तिमार्गच उत्तम असे दिसून येते २९.

उपायांमाजीं अतिप्रांजळ । निर्विघ्न आणि नित्य निर्मळ ।
माझा भक्तिमार्ग केवळ । ज्ञान तें विकळ मध्यपाती ॥१५३०॥
सर्व उपायांमध्ये अत्यंत सरळ, निर्वित, नित्य आणि पवित्र असा हा माझा केवळ भक्तिमार्ग आहे. ज्ञानमार्ग आहे तो भक्काला मध्येच व्याकुळ करून पाडगारा आहे १५३०.

मळा शिंपावयालागुनी । मोट पाट उपाय दोन्ही ।
मोटां काढिजे विहीरवणी । बहुत कष्टोनी अतिअल्प ॥३१॥
मळा शिंपावयाला मोट आणि पाट असे पाणी मिळविण्याचे दोन उपाय असतात. मोटेनें विहिरींतलें सांचों पाणी काढावयाचे; आणि ते देखील फार कष्ट करून थोडेच सांपडतें ३१.

मोट नाडा बैलजोडीं । अखंड झोडितां आसुडीं ।
येतां जातां वोढावोढी । भोय भिजे थोडी भाग एक ॥३२॥
आधी मोट, नाडा आणि बैलांची जोडी इतकी तयारी पाहिजे, मग त्या बैलांना आसुडाखाली सारखे झोडीत बसावे, आणि त्यांना मार्गेपुढे येताजातांना ओढाओढ करून हाल हाल करावेत, तेव्हां कोठे एका लहानशा भागाएवढी जमीन भिजते ३२.

तेथही मोट फुटे कां नाडा तुटे । वोडव पडे बैल अवचटे ।
तरी हातां येतां पीक आटे । वोल तुटे तत्काळ ॥३३॥
त्यांतही एकाद्या वेळी मोटच फुटते, किंवा नाडाच तुटून जातो, किंवा एकाएकी एकादा बैल आजारी पडतो किंवा मरतो, आणि असे झाले की, तत्काळ जमिनीची ओल जाते, व हातातोंडाला आलेले पीक करपून जातें ! ३३.

तैसा नव्हे सरितेचा पाट । एक वेळ केल्या वाट ।
अहर्निशीं घडघडाट । चालती लोट जीवनाचे ॥३४॥
पण नदीच्या पाटाचा प्रकार मात्र तसा नाही. त्या पाटाला एक वेळ वाट करून दिली, की रात्रंदिवस धो धो धो धो पाण्याचे लोट वहातच असतात ३४.

मोटेचें पाणी तैसें ज्ञान । करूनि वेदशास्त्रपठण ।
नित्यानित्य विवेकासी जाण । पंडित विचक्षण बैसती ॥३५॥
ज्ञान हे मोटेच्या पाण्यासारखे आहे. वेदशास्त्रांचे पठण करून नित्य कोणते व अनित्य कोणते याचा विचार करण्यासाठी मार्मिक पंडित बसतात ३५.

एक कर्माकडे वोढी । एक संन्यासाकडे बोडी ।
एक म्हणती हे गोष्टी कुडी । देहो वोढावोढीं न घालावा ॥३६॥
त्यांत एकजण कर्माकडे ओढ घेतो, एकजण संन्यासाकडे मन वळवून मुंडन करावयास लावतो, आणि कोणी म्हणतात की, हे म्हणणे बरोबर नाही, देह हा अशा रीतीने कधी संकटांत घालू नये. ३६.

एक म्हणती प्रारब्ध प्रमाण । एक म्हणती सत्य शब्दज्ञान ।
एक म्हणती धरावें मौन । अतिजल्पन न करावें ॥३७॥
कोणी म्हणतात की, प्रारब्ध म्हणून जे आहे तेच खरे आहे. कोणी म्हणतात की, शब्दज्ञान हेच खरे. कोणी म्हणतात की, ह्याविषयी मौन धरावें, फार बडबड करूं नये ३७.

एक म्हणती सांडावी व्युत्पत्ती । ज्याची चढे अधिक युक्ती ।
तोचि ज्ञाता निश्चितीं । सांगों किती मूर्खांसी ॥३८॥
कोणी म्हणतात की, विद्वत्ता सोडून द्यावी. ज्याची कल्पना अधिक चालते, तोच शहाणा खरा. मूर्थ्यांना किती सांगावें ? ३८.

एक म्हणती तप प्रमाण । एक म्हणती पुरश्चरण ।
एक म्हणती वेदाध्ययन । द्यावें दान एक म्हणती ॥३९॥
कोणी म्हणतात की, तप हेच मुख्य आहे. कोणी म्हणतात की, मंत्रांचे पुरश्चरण हेंच सर्वात श्रेष्ठ आहे. कोणी म्हणतात की, वेदाध्ययन हेच श्रेष्ठ आहे. कोणी म्हणतात की, दान करावे हेच योग्य होय ३९.

एक तो हें अवघेंचि मोडी । घाली योगाचिये कडाडीं ।
लावी आसनमुद्रेची वोढी । बैसवी रोकडी वारयावरी ॥१५४०॥
कोणी तर हे सारेच खोडून काढतो, आणि माणसाला योगाच्या झटापटीत अडकवितो. तो साधकाला आसनांची आणि मुद्रांची चटक लावतो व वाऱ्यावर बसवितो १५४०.

ऐसे नाना वाद करितां । एक निश्चयो नव्हे सर्वथा ।
ज्ञानाभिमान अतिपंडितां । ज्ञान तत्त्वतां कळेना ॥४१॥
असे अनेक प्रकारचे वाद करता करतां सर्वस्वी एक निश्चय होत नाही. मोठ्या पंडितांना ज्ञानाचा अभिमान असल्यामुळे खरे ज्ञान मुळीच कळत नाही ४१.

ऐसी ज्ञानमार्गींची गती । नाना परींचीं विघ्नें येती ।
विकल्पें नासल्या व्युत्पत्ती । माझी निजप्राप्ती तेथें नाहीं ॥४२॥
ज्ञानमार्गातली ही अशी दशा आहे. त्यांत अनेक प्रकारची विने येतात. विकल्पानेच विद्वत्ता नाहीशी होते, म्हणून विद्वत्तेच्या ठिकाणी माझी प्राप्ति होत नाही ४२.

तैसी नव्हे माझी भक्ती । नाममात्रें मज पावती ।
नामें उद्धरले नेणों किती । हेंचि भागवतीं बोलिलें ॥४३॥
माझी भक्ति काही तशी नव्हे. भक्तिसंपन्न लोक माझें नाम घेतल्यानेच मला पावतात. नामाने किती प्राणी उद्धरले, हे मोजता येणार नाही. भागवतामध्ये हेच सांगितले आहे ४३.

माझें करितां गुणवर्णन । कां हरिकथा नामसंकीर्तन ।
तेथें रिघों न शके विघ्न । गडगर्जन हरिनामें ॥४४॥
माझ्या गुणांचे वर्णन करतांना किंवा हरिकथा-नामसंकीर्तन करतांना तेथें विघ्नाचा शिरकाव होऊ शकत नाही. हरिनामाची गर्जना केवळ किल्लयासारखी (संरक्षक) आहे ४४.

जेथें हरिनामाचे पवाडे । तेथें विघ्न कैंचें बापुडे ।
विघ्न पळे मद्‍भक्तांपुढें । उघडती कवाडें मोक्षाचीं ॥४५॥
हरिनामाचा जेथे घोष चालतो, तेथे बिचारें विघ्न कुठून येणार ? माझ्या भक्तांपुढे ते पळत सुटते, आणि मोक्षाची द्वारें खुली होतात ४५.

माझे भक्त अतिनिराश । न धरिती मोक्षाची आस ।
यालागीं मी हृषीकेश । त्यांच्या भावार्थास भूललों ॥४६॥
माझे भक्त असतात ते पूर्ण निरिच्छ असतात. ते मोक्षाची आशा धरीत नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांच्या भावार्थावर भुललेला असतो ४६.

एवं निर्विघ्न मजमाजीं सरता । मार्ग नाहीं भक्तिपरता ।
त्रिसत्य सत्य गा सर्वथा । भक्ति तत्त्वतां मज पढिये ॥४७॥
तात्पर्य, निर्विघ्नपणे माझ्याजवळ यावयाला भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्रिवार खरें-सर्वस्वी खरे आहे. खरोखर भक्ति हीच मला आवडती आहे ४७.

ऐशी निजभक्ति सुलभ फुडी । देवो सांगे अतिआवडीं ।
उद्धवासी हरिभक्तीची गोडी । हर्षाची गुढी उभारिली तेणें ॥४८॥
अशी सुलभ असलेली आपली भक्ति देव स्पष्टपणे अत्यंत आवडीने सांगता झाला. उद्धवाला हरिभक्तीची गोडी होतीच, म्हणून हे ऐकताच त्याने आनंदाची गुढीच उभारली १८.

जें उद्धवाच्या जीवीं होतें । तेंचि निरूपिलें श्रीअनंतें ।
हरिखें नाचों लागला तेथें । जीवें श्रीकृष्णातें वोवाळी ॥४९॥
जे उद्धवाच्या मनांत होते तेंच कृष्णांनी सांगितले, म्हणून उद्धव त्या ठिकाणी हर्षातिशयाने नाचूंच लागला. त्याने जीवाभावाने श्रीकृष्णाला ओंवाळले ४९,

ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति कां न करिती ।
देवो म्हणे भाग्येंवीण माझी भक्ति । न घडे निश्चितीं उद्धवा ॥१५५०॥
आणि म्हणाला,-” इतकी तुझी भक्ति जर सुलभ आहे, तर सारेच लोक तुझी भक्ति का करीत नाहीत ?” तेव्हां देव म्हणाले,-उद्धवा ! भाग्याशिवाय ही माझी भक्ति खरोखर कोणालाच घडावयाची नाही १५५०.

कोटि जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गांठीं असेल आइती ।
तैं जोडे माझ्या संतांची संगती । सत्संगें भक्ती उल्हासे ॥५१॥
कोट्यवधि जन्मांत पुण्याची संपत्ति मिळविलेली जर पदरीं आयती तयार असेल, तरच माझ्या संतांची संगति घडते, आणि सत्संगतीने माझी भक्ति उत्पन्न होते ५१.

सत्संगें भक्तीची प्राप्ती । उद्धवा जाण तू निश्चितीं ।
संतांपाशीं माझी भक्ती । वास पाहती उभी असे ॥५२॥
उद्धवा ! सत्संगानेच भक्तीची प्राप्ति होते, हे तूं पक्कं समज. माझी भक्ति संतांपाशी वाट पहात उभी असते ५२.

हो कां तूं संत माझे म्हणसी । येर लोक सांडिले कोणापाशीं ।
तुझी भक्ति अहर्निशीं । संतांपाशीं कां असे ॥५३॥
“संताला जर तूं ‘माझे’ असे म्हणतोस तर बाकीचे लोक कोणाच्या हवाली केलेस ? तसेंच तुझी भक्ति रात्रंदिवस संतांपाशीच कां असते ?” ५३.

उद्धवा ऐसा विकल्पभावो । येथें धरावया नाहीं ठावो ।
संतभजनीं माझा सद्‍भावो । केवा कोण पाहावो भक्तीचा ॥५४॥
उद्धवा ! असा विकल्प मनांत आणावयाला येथे जागाच नाही. संतांच्या भजनावर माझी अतिशय श्रद्धा आहे, मग भक्तीचा पाड तो काय ? ५४.

संतसेवा करावयासी । कोण कारण तूं मज म्हणसी ।
अनावरा मज अनंतासी । तिंहीं निजभावेंसी आकळिलें ॥५५॥
पण “संतांची सेवा करायला मला कारण काय ?” असें तूं म्हणशील, तर जो मी अनंत कोणालाही आवरला जाणारा नव्हे, त्या मलाही त्यांनी आपल्या भक्तीने बांधून टाकले आहे ५५

मज आकळिलें ज्या हेतू । तेही सांगेन तुज मातू ।
मजवांचूनि जगाआंतू । दुसरा अर्थू नेणती ॥५६॥
आता त्यांनी ज्या हेतूने मला बांधले आहे, ते कारणही तुला सांगतों. ते जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ जाणतच नाहीत ५६.

आपुलें जें स्वकर्म । मज अर्पिले सर्व धर्म ।
देह गेह रूप नाम । आश्रमधर्म मदर्पण ॥५७॥
त्यांनी आपलें जें स्वकर्म असते ते मलाच अर्पण केलेले असते. त्यांनी आपले सर्व धर्म, देह, घर, रूप, नाम आश्रमधर्म, मलाच अर्पिलेले असतात ५७.

कल्पांतींचेनि कडकडाटें । जैं धाके धाके विराट आटे ।
ऐसीं वोढवल्या अचाटें । मजवेगळे नेटें न ढळ्ती ॥५८॥
कल्पान्तसमयीं होणाऱ्या कडकडाटाच्या धाकानें सर्व विश्व भिते व लयास जाते, अशा प्रकारची अरिष्टं ओढवली असतांही ते धैर्याने माझ्यापासून ढळत नाहींत ५८.

तुटोनि पडतां आकाश । आणिकाची ते न पाहती वास ।
यालागीं मी हृषीकेश । त्यांचा दास झालों असें ॥५९॥
आकाश तुटून पडले असतांही आश्रयासाठी ते माझ्यावांचून दुसऱ्याची वाट पहात नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांचा दास होऊन राहिलों आहे ५९.

नवल भावार्थाचा महिमा । मज विश्वात्म्याचे झाले ते आत्मा ।
ऐसें लाहाणें तयां आम्हां । मज पुरुषोत्तमा वश केलें ॥१५६०॥
भावार्थाचा महिमा मोठा आश्चर्यकारक आहे. माझा विश्वात्म्याचाही ते आत्मा झालेले आहेत. असा त्यांना आणि आम्हांला एकोपा आहे, म्हणूनच मला पुरुषोत्तमाला त्यांनी वश केले आहे १५६०.

संतांसीं मज भिन्नपण । कल्पांतींही नाहीं जाण ।
तुज जिव्हारींची उणखूण । तुज संपूर्ण सांगीतली ॥६१॥
संतांना आणि मला कल्पांतांतसुद्धा मिनभाव नाही, हे लक्षात ठेव, ही माझ्या जिवाची सर्व गुह्य गोष्ट मी तुला सांगितली ६१.

संत माझे झाले माझ्या भक्तीं । येर लोक मज न भजती ।
ते म्यां दिधले काळाच्या हातीं । अदृष्टगतीं बांधोनी ॥६२॥
माझ्या भक्तीनेच संत माझे झाले आहेत. इतर लोक मला भजत नाहीत, म्हणून मी त्यांना अदृष्टपाशांत बांधून काळाच्या स्वाधीन केले ६२.

माझिया संतांपाशीं । यावया प्राप्ती नाहीं काळासी ।
मी सदा संरक्षिता त्यांसी । ते कळिकाळासी नागवती ॥६३॥
काळाला माझ्या संतांजवळ येण्याचे सामर्थ्य नाही. कारण सर्वकाल मी त्यांचे रक्षण करणारा आहे. म्हणून ते कलिकाळाच्याही तडाख्यांत सांपडत नाहीत ६३.

यापरी संतांचें सर्व काज । करितां मज नाहीं लाज ।
उद्धवा माझें अत्यंत निजगुज । तें मी तुज सांगेन ॥६४॥याप्रमाणे संतांचे सर्व काम करतांना मला संकोच वाटत नाही. उद्धवा ! आता माझे एक अत्यंत गुह्य मनोगत आहे, तें मी तुला सांगेन ६४.

अथैतत् परमं गुह्यं श्रृण्वतो यदुनन्दन ।
सुगोप्यमपि वक्ष्यामि त्वं मे भृत्यः सुहृत् सखा ॥ ४९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥[श्लोक ४९] हे उद्धवा ! तू माझा प्रिय सेवक, हितेच्छू आणि सखा आहेस त्याचबरोबर ऐकण्यासाठी इच्छुकपण आहेस म्हणून आता मी तुला एक अत्यंत गोपनीय परम रहस्य सांगणार आहे. (४९)

ऐकें यदुवंशकुळटिळका । तूं स्वगोत्र भृत्य सुहृद सखा ।
तुज न सांगिजे हा आवांका । सर्वथा देखा न धरवे ॥६५॥
-यदुवंशकुलभूषणा उद्धवा ! ऐक. तूं स्वकीय आहेस, सेवक आहेस, सुहृद आहेस, आणि प्रिय मित्र आहेस; म्हणून तुला माझें गुह्य सांगू नये इतका धीर मला मुळीच धरवत नाहीं ६५.

मज गुप्ताचें गुप्त सार । साराचें गुप्त भांडार ।
ते भांडारींचें निज सार । तुज मी साचार सांगेन ॥६६॥
याकरिता माझ्या गुह्यांतील गुह्य असें सार,- नव्हे, त्या साराचेंही गुप्त भांडार, आणि त्या भांडारांतीलही गुप्त तत्त्व आता खरोखर तुला सांगेन ६६.

ऐसें गुह्याचें गुह्य निश्चितीं । नाहीं सांगीतलें कोणाप्रती ।
तूं सखा जिवलग सांगाती । अनन्य प्रीती मजलागीं ॥६७॥
खरोखरीच असलें हें गुह्यांतलें गुह्य मी कोणालाच सांगितले नाही. पण तूं माझा जिवलग मित्र व सोबती आहेस, आणि माझ्यावर तुझे अप्रतिम प्रेम आहे ६७.

केवळ कोरडी नव्हे प्रीती । तैसीच माझी अनन्यभक्ती ।
भक्तीसारिखी विरक्ती । अवंचक स्थिती तुजपाशीं ॥६८॥
आणखी ते प्रेम सुद्धा केवळ कोरडे नव्हे, तर तशीच तुझ्या ठिकाणी माझी अनन्य भक्ति आहे, आणि त्या भक्तीप्रमाणे तुझ्या अंत:करणांत विरक्तीही आहे. तुझ्यापाशी पूर्ण निष्कपट वृत्ति आहे ६८.

यादववंषीं पाहतां देख । मजसमान तूंचि एक ।
समान सगोत्र आणि सेवक । हें अलोकिक उद्धवा ॥६९॥
हें पहा ! हा यादवकुलांत पहावयास गेले असतां माझ्यासारखा एक तूंच आहेस. उद्धवा ! तूं माझ्याशी समान योग्यतेचा व माझा गोत्रज असून माझा सेवक आहेस, हेच अपूर्व होय ६९.

नव्हेसी कार्यार्थी सेवक । सर्वभावें विश्वासुक ।
किती वाणूं गुण एकएक । परम हरिख मज झाला ॥१५७०॥
आणि तोसुद्धा कामापुरता सेवक नव्हेस, तर सर्वस्वी विश्वासुक आहेस. तुझे एक एक गुण किती म्हणून वर्णन करूं ? खरोखर हे सांगतांना मला अत्यंत हर्ष झाला आहे १५७०,

यालागीं गुह्य तेंही तुझ्या ठायीं । वंचावया मज धीरु नाहीं ।
हृदय आलिंगलें हृदयीं । चिदानंदू पाहीं तुष्टला ॥७१॥
म्हणूनच ते गुह्य आहे तरी तुझ्यापासून चोरून ठेवावयाला मला धीर होत नाही. असें म्हणून भगवंताने उद्धवाला हृदयाशी हृदय भिडवून आलिंगन दिले, तेव्हांच चिदानंदरूप श्रीकृष्ण संतुष्ट झाला ७१.

मग म्हणे सावधान । सादर आइक माझें वचन ।
तुज फावल्या माझें गुह्य ज्ञान । वंश‍उद्धरण तुझेनि ॥७२॥
मग कृष्ण म्हणाला, सावधपणाने नीट लक्ष लावून माझे भाषण आदरपूर्वक ऐक. हे माझें गुह्मज्ञान तुला मिळाले असतां तुझ्यामुळे सर्व वंशाचा उद्धार होईल ७२.

जे वंशी होय ब्रह्मज्ञानी । तो वंष पवित्र त्याचेनी ।
हे सत्य जाण माझी वाणी । विकल्प मनीं न धरावा ॥७३॥
कारण, ज्या वंशांत ब्रह्मज्ञानी उत्पन्न होतो, तो वंश त्याच्यामुळे पावन होतो. हे माझें भाषण अगदी सत्य आहे असे समज. ह्याविषयी मनांत विकल्प आणूं नये ७३.

म्हणसी स्वयें तूं ब्रह्म पूर्ण । वंशीं अवतरलासी नारायण ।
तेणें वंश उद्धरला जाण । माझें ज्ञान तें किती ॥७४॥
पण तूं म्हणशील की, “तूं स्वतःच पूर्णब्रह्म नारायण ह्या वंशामध्ये अवतरला आहेस, तेव्हा त्यामुळेच हा वंश उद्धरला. तुझ्यापुढे माझें ज्ञान ते किती ?” ७४.

तरी नाम रूप जाति गोत । या अवघ्यांसी मी अलिप्त ।
सकळ कुळेंसी मी कुळवंत । गोत समस्त जग माझें ॥७५॥
तर नाम, रूप, जात, गोत, या सर्वांहून मी अलिसच आहे. जगातील सर्वच कुलांनी मी कुलवंत झालो आहे. कारण, सारे जग हेंच माझें गोत आहे ७५.

ऐसें म्हणोनि निजगुह्यसार । तुज मी सांगेन साचार ।
तेणें होईल जगाचा उद्धार । ऐसें शारङ्गधर बोलिला ॥७६॥
हे लक्षात ठेवूनच खरोखर मी आपलें गुह्यांतील सार तुला सांगेन. त्याच्यायोगाने सर्व जगाचा उद्धार होईल. असें श्रीकृष्णाने सांगितले ७६.

तें ऐकावया गुह्य ज्ञान । उद्धवें मनाचे उघडिले कान ।
सावध पाहतां हरीचें वदन । नयनीं नयन विगुंतले ॥७७॥
तें गुप्त ज्ञान ऐकण्यासाठी उद्धवाने मनाचेच कान उघडले, आणि लक्ष लावून श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहतांच त्याच्या नेत्राकडेच उद्धवाचे नेत्र गुंतून राहिले ७७.

यापरी उद्धव सावधान । त्यासी कृष्ण सांगेल गुह्य ज्ञान ।
पुढीले अध्यायीं अतिगहन । रसाळ निरूपण हरीचें ॥७८॥
याप्रमाणे उद्ध्वाने लक्ष दिल्यानंतर त्याला श्रीकृष्ण जै गुह्मज्ञान सांगेल, ते श्रीकृष्णाचे अत्यंत गहन व रसाळ निरूपण पुढच्या अध्यायांत आहे ७८.

एका विनवी जनार्दन । संतीं मज द्यावें अवधान ।
श्रोतीं व्हावें सावधान । मस्तकीं चरण वंदिले ॥७९॥
म्हणून एका जनार्दन विनति करतो की, संतांनी माझ्याकडे लक्ष द्यावें, आणि श्रोत्यांनी सावध व्हावे. तुमचे चरण मी शिरसावंद्य केले आहेत ७९.

तुमचेनि पदप्रसादें । श्रीभागवतींचीं श्लोकपदें ।
वाखाणीन अर्थावबोधें । संत स्वानंदें तुष्टलिया ॥१५८०॥
तुमच्या चरणप्रसादाने श्रीभागवतांतील श्लोकांची पदें सुबोध अर्थानं वर्णन करीन, म्हणजे संत आनंदाने संतुष्ट होतील १५८०.

यालागीं एका शरण जनार्दनीं । तंव जनार्दनचि एकपणीं ।
जेवीं कां सागरींचें पाणी । तरंगपणीं विराजे ॥१५८१॥
म्हणून एका जनार्दनाचे ठिकाणी शरण गेला, तेव्हां ज्याप्रमाणे समुद्रातील पाणीच लाटांच्या रूपाने शोभते, त्याप्रमाणे तो शोभू लागला १५८१.

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां
श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादशपूजाविधानयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥११॥
अकरावा अध्याय समाप्त. ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४९॥ ओव्या १५८१॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref:satsangdhara