एकनाथी भागवत

एकनाथी भागवत अध्याय 19

एकनाथी भागवत अध्याय 19

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो द्‍गुरुत्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका ।
त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥ १ ॥
हे ओंकाररूप सद्गुरो ! हे त्र्यंबका ! हे ब्रह्मगिरिपर्वतावर वास करणाऱ्या ! हे त्रिगुणरूप त्रिपुराचा भेद करणाऱ्या ! हे कामांतका गिरिजेशा ! तुला नमस्कार असो १.

तुझा अनाहताचा डमरु । सर्व शब्दें करी गजरु ।
वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडीं थोरु गर्जत ॥ २ ॥
तुझा अनुहतशब्दरूप डमरु आहे तो सर्वत्र गजर करून सोडतो आणि निरंतर वेदानुवादाने कर्म, ज्ञान व भक्ति ह्या तीन कांडांच्या रूपानें गर्जत असतो २.

तुझें हातींचें खट्वांग । करी जीवाचा जीवभंग ।
अनंगेंसीं जाळूनि अंग । अंगसंग तैं देशी ॥ ३ ॥
तुझ्या हातांतील खटांग आयुध जीवपणाचाच नाश करून सोडते आणि अनंगासहित अंग जाळून टाकलेंस म्हणजे मगच स्वस्वरूपप्राप्ति करून देतोस ३.

त्रिनयना त्र्यंबकलिंगा । तुजपासोनि प्रवाहे चिद्‍गंगा ।
ते पवित्रपणें उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शंकरा ॥ ४ ॥
हे त्रिनयना त्र्यंबकलिंगा ! (हें त्रिंबकेश्वराचे रूपक आहे) चित्प्रकाशगर्भा शंकरा ! तुझ्यापासूनच (गोदावरीरूप) चिदगंगेचा प्रवाह वाहात असतो आणि तो पवित्रपणाने साऱ्या जगाला पावन करून सोडतो ४.

प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन ।
यालागीं तूं त्रिलोचन । नयनेंवीण दीसशी ॥ ५ ॥
दोन डोळे तर प्रत्यक्षच दिसतात आणि तिसरा ज्ञाननेत्र गुप्त आहे. म्हणून नेत्राशिवायच दिसणारा तूं त्रिलोचन आहेस ५.

निजांगें वाहसी बोधचंद्र । यालागीं तूं चंद्रशेखर ।
चंद्रसूर्यादि चराचर । तुझेनि साचार प्रकाशे ॥ ६ ॥
तूं आपल्या अंगावर बोधरुपी चंद्र धारण करतोस, म्हणून तूं ‘चंद्रशेखर’ आहेस; आणि खरोखर चंद्रसूर्यादि सर्व चराचरही तुझ्यामुळेच प्रकाशतें ६.
‘ भव ‘ या नांवाची ख्याती । भवप्रकाशक तुझी चिच्छ्क्ती ।
तूंचि विष्णु प्रजापती । रुद्र तूं अंतीं संहर्ता ॥ ७ ॥
‘भव’ या नांवाची ख्याति आहे; परंतु तुझी चिच्छक्ति भवानी हीच त्या भवाला प्रकाशित करिते. विष्णु तूंच ; ब्रह्मदेव तूंच; व शेवटी संहार करणारा रुद्रही तूंच ७.

मोडूनियां नामरूपमुद्रा । जीव आणिशी एकाकारा ।
अत्यंत प्रळयींच्या प्रळयरुद्रा । चित्समुद्रा शिवरूपा ॥ ८ ॥
हे अत्यंत प्रळयींच्या प्रळयरुद्रा! हे चित्समुद्रा शिवरूपा सद्गुरो! नामरूपाचा आकार मोहन तूं सर्व जीवांना एकरूप करून सोडतोस ८.

शिव शिव जी गुरुराया । निजभावें लागतां पायां ।
तंव गुरुशिष्यत्व गेलें लया । दावूनियां निजरूप ॥ ९ ॥
हे गुरुराया! शिव शिव म्हणून निजभावाने तुझ्या पायीं लागतांच तूं निजरूप दाखविल्याने गुरुशिष्यपण लयास जाते ९.

तें निजरूप देखतां दृष्टीं । कैंचा जीव कैंची सृष्टी ।
निमाली त्रिगुणेंसीं त्रिपुटी । पडली मिठी स्वानंदीं ॥ १० ॥
तें निजस्वरूप एकदा दृष्टीस पडले की मग जीव कशाचा ? आणि सृष्टि तरी कशाची? तीन गुणांसह त्रिपुटीच नाहीशी होऊन स्वानंदाशी मिठी पडते १०.

त्या स्वानंदाचे उद्‍गार । सांवरतां नावरती थोर ।
त्या स्वानंदाचें निजसार । सत्य साचार एकादश ॥ ११ ॥
त्या स्वानंदाचे उद्गार आवरतां आवरत नाहीत. त्या स्वानंदाचें सार म्हणजेच खरोखर अकरावा स्कंध ११.

त्याहीमाजीं अतिगहन । सुखस्वानंदनिरूपण ।
तो हा एकुणिसावा अध्याय जाण । परमकारण शास्त्रार्थीं ॥ १२ ॥
त्यामध्येही अत्यंत गहन असें जें स्वानंदसुखाचे निरूपण तो हा एकोणिसावा अध्याय होय. तो शास्त्रप्रमाणांनीही सिद्ध आहे १२.
जें ऐकतां निरूपण । परमानंद उथळे जाण ।
एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ १३ ॥
तें निरूपण ऐकतांच परमानंद केवळ उचंबळून राहातो. ह्याकरिता एकाजनार्दन विनंति करतो की, श्रोत्यांनी आता माझ्याकडे लक्ष द्यावें १३.
सत्रावे अठरावे अध्यायांप्रती । स्वधर्मकर्में ब्रह्मप्राप्ती ।
वर्णाश्रमस्थितिगती । उद्धवाप्रती सांगीतली ॥ १४ ॥
सतराव्या आणि अठराव्या अध्यायांत स्वधर्मकर्मानेच ब्रह्मप्राप्ति होते, म्हणून वर्णाश्रमाचे सर्व प्रकार उद्धवाला सांगितले १४.
एकुणिसावे अध्यायीं जाण । जेणें ज्ञानें साधिलें निजज्ञान ।
त्या ज्ञानाचें त्यागलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १५ ॥
आतां एकोणिसाव्या अध्यायात ज्या ज्ञानाने आत्मज्ञान साध्य केले असेल, त्या ज्ञानाचे त्यागलक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत १५.
कर्म-कर्तव्यता-कारण । जीवन्मुक्तासी नाहीं जाण ।
उद्धवाचे यमादि प्रश्न । हेही श्रीकृष्ण सांगेल ॥ १६ ॥
जीवन्मुक्ताला कर्मकर्तव्यतेचे कारण नाही, म्हणून उद्धवाच्या ‘यम’ इत्यादि प्रश्नाचे उत्तरही श्रीकृष्ण ह्यातच सांगतील १६.
शास्त्रयुक्त पांडित्यज्ञान । प्रपंचाचें मिथ्या निरूपण ।
तें ‘आनुमानिक’ पुस्तकज्ञान । सत्यपण त्या नाहीं ॥ १७ ॥
शास्त्रयुक्त पांडित्याचे ज्ञान, किंवा त्याने केलेले प्रपंचाचे मिथ्यात्वनिरूपण हे सर्व आनुमानिक व पुस्तकी ज्ञान होय. त्यांत मुळीच तथ्य नाही १७.
पूर्वे आहे माझें गमन । हें पूर्वील शुद्ध स्मरण ।
परी दिग्भ्रम पडिल्या जाण । पश्चिमे आपण पूर्व मानी ॥ १८ ॥
आपल्यास पूर्वेकडे जावयाचे आहे हे शुद्ध स्मरण आहे, पण दिशाभूल झाली म्हणजे पश्चिमेलाच तो पूर्व मानू लागतो १८;
तैसें शाब्दिक शास्त्रज्ञान । बोले आन करी आन ।
तेणें नव्हे समाधान । सर्वथा जाण साधकां ॥ १९ ॥
त्याप्रमाणे शाब्दिक शास्त्रज्ञान आहे. बोलतात एक व करतात एक; त्यामुळे साधकाचे कधींच समाधान होत नाही १९.
जेवीं कां दिग्भ्रम मोडे । तैं पूर्वेचा चाले पूर्वेकडे ।
तेवीं अपरोक्षज्ञान जैं जोडे । तैं साधक पडे स्वानंदीं ॥ २० ॥
तीच दिशाभूल नाहींशी झाली म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वेचा पूर्वेकडेच जाऊं लागतो, त्याप्रमाणे अनुभवज्ञान प्राप्त झाले म्हणजे साधकाला परमानंदाचा लाभ होतो २०.
जें जें ऐके वेदांतश्रवण । तें अंगें होत जाण आपण ।
हें अपरोक्षाचें लक्षण । सत्यत्वें जाण अतिशुद्ध ॥ २१ ॥
तो जें जें वेदान्तश्रवण करितो, तें तें तो स्वतःच होत जातो. असें होणे हेच आनुभविक ज्ञानाचे खरे व शुद्ध लक्षण होय हे ध्यानात ठेव २१.
ऐसें नव्हतां अपरोक्षज्ञान । सांडूं नये श्रवणमनन ।
अवश्य करावें साधन । प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरें ॥ २२ ॥
असें आनुभविक ज्ञान प्राप्त होईपर्यंत श्रवण व मनन सोडूं नये. इतकेच नव्हे तर, ‘प्रत्यगावृत्तीच’ साधन म्ह. आत्मानुसंधानाचा अभ्यास अवश्यमेव करीत असावा २२.
झालिया अपरोक्षज्ञान । प्रपंचाचें मिथ्या भान ।
विषयांसी पडलें शून्य । कल्पना जाण निमाली ॥ २३ ॥
अपरोक्षज्ञान झाले की प्रपंचाचे भान मिथ्या भासू लागते. विषयांवर पाणी पडते आणि कल्पना विरून जाते २३.
तेणेंचि पुरुषें आपण । त्यागावें गा ज्ञानसाधन ।
हेंचि निरूपणीं निरूपण । देव संपूर्ण सांगत ॥ २४ ॥
इतकें होईल त्या पुरुषानेच ज्ञानसाधनाचा त्याग करावा. हेच सारे निरूपण देव सांगतात २४.
श्रीभगवानुवाच-
यो विद्याश्रुतसंपन्न आत्मवान्नानुमानिकः ।
मायामात्रमिदं ज्ञात्वा ज्ञानं च मयि संन्यसेत् ॥ १ ॥
[श्लोक १] श्रीभगवान म्हणतात फक्त तर्कावर अवलंबून न राहता ज्याने उपनिषदादी शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, त्याने हे विश्व ही केवळ माझ्यावर भासणारी माया आहे हे जाणून नंतर ते ज्ञानसुद्धा माझ्यातच सोडून द्यावे. (१)
वेदशास्त्रार्थीं परिनिष्ठित । श्रवणमननाभ्यासयुक्त ।
ज्यासी ब्रह्मविद्या प्राप्तः । सुनिश्चित स्वानुभवें ॥ २५॥
(भगवान् म्हणतात) वेदशास्त्रार्थामध्ये जे निष्णात श्रवणमननाच्या अभ्यासाने युक्तः व ब्रह्मविद्या ज्यांना सुनिश्चित अशा स्वानुभवाने साध्य झालेली २५,
तोचि अनुभव ऐसा । दोराअंगी सर्पु जैसा ।
न मारितां नाशे आपैसा । भवभ्रम तैसा त्या नाहीं ॥ २६ ॥
पण तो अनुभव असा की, दोराच्या अंगी असलेला सर्प जसा न मारता आपोआपच नाश पावतो, त्याप्रमाणे भवभ्रम ज्याचा दूर झालेला २६,
जेवीं कां नटाची रावो राणी । दोघें खेळती लटिकेपणीं ।
तेवीं प्रकृतिपुरुष‍उभवणी । मिथ्यापणीं जो जाणे ॥ २७ ॥
सोंग घेतलेली राजाराणी ज्याप्रमाणे दोघेही लटक्या रीतीनेच क्रीडा करतात, त्याप्रमाणे प्रकृति पुरुष ही दोन्ही मिथ्याच उभारलेली आहेत असें जो जाणतो २७;
जैशीं भिंतीमाजीं नानाकार । चित्रें लिहिलीं विचित्र ।
ते भिंतीचि एक साचार । तेंवी ऐक्यें चराचर जो देखे ॥ २८ ॥
भिंतीवर नानाप्रकारची चित्रविचित्र चित्र काढलेली असतात, पण ती जशी खरोखर एक भिंतच असते; त्याप्रमाणे सर्व चराचर जो एकरूपच आहे असे मानतो २८,
स्वप्नींचीं नाना कर्में जाण । त्याचें जागृतीं नव्हे बंधन ।
तेवीं मिथ्या निजकर्माचरण । जीवीत्वेंसीं प्राण जो देखे ॥ २९ ॥
किंवा स्वप्नांतील अनेक प्रकारची कमैं असली तरी त्यांचे जागृतीमध्ये जसें कांहीं बंधन असत नाही, त्याप्रमाणे मी हा जीव व प्राण, व मी हे अमुक कर्म करीत आहे हे सर्वच खोटें असें जो समजतो २९,
ऐशी साचार ज्याची स्थिती । त्या नांव शुद्ध ‘आत्मप्राप्ती’ ।
‘निजानुभव’ त्यातें म्हणती । हें जाण निश्चितीं उद्धवा ॥ ३० ॥
अशी ज्याची खरोखर स्थिति झाली असेल, तिचंच नांव शुद्ध ‘आत्मप्राप्ति.’ उद्धवा ! त्यालाच खरोखर ‘निजानुभव’ असें म्हणतात, असें तूं निश्चित लक्षात ठेव ३०.
आणिक एक तेथींची खूण । ‘विषयावीण स्वानंद पूर्ण’ ।
हें अनुभवाचें मुख्य लक्षण । सत्य जाण सात्वता ॥ ३१ ॥
हे सात्वतकुलांतील भक्तशिरोमणे ! त्याची आणखीही एक खूण आहे. ती हीच की, तेथें विषयोपभोगाशिवायच स्वानंद असतो. हेच खरोखर अनुभवाचे लक्षण आहे ३१.
ऐसा अनुभव नसतां देख । केवळ ज्ञान जें शाब्दिक ।
त्यातें म्हणिजे ‘आनुमानिक’ । जाण निष्टंक निजभक्ता ॥ ३२ ॥
अशा प्रकारचा अनुभव नसतांना जें केवळ शाब्दिक ज्ञान असते, ते, हे माझ्या भक्तोत्तमा उद्धवा! खरोखर ‘ आनुमानिक’ ज्ञान असें समज ३२.
ज्याच्या अनुभवाभीतरीं । नाहीं अनुमानासी उरी ।
जो अपरोक्षसाक्षात्कारीं । निरंतरी नांदत ॥ ३३ ॥
ज्याच्या अनुभवांत अनुमानाचा प्रवेश नाहीं, जो निरंतर अपरोक्ष साक्षात्कारांतच नांदत असतो ३३ ;
ऐसा जो पुरुष जाण । तेणें ज्ञानाचें साधन ।
आणि वृत्तिरूप जें ज्ञान । तेंही आपण त्यागावें ॥ ३४ ॥
असा जो पुरुष असेल त्यानेच ज्ञानाचे साधन व वृत्तिरूप ज्ञान, तेंही टाकून द्यावे ३४.
तें न त्यागितां लवलाहें । सहजचि त्याचा त्याग होये ।
जेवीं सूर्योदयीं पाहें । सचंद्र तेज जाये तारागणाचें ॥ ३५ ॥
तें ह्याने टाकलें नाहीं तरी त्याचा आपोआपच त्याग घडतो. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे चंद्रासहवर्तमान नक्षत्रांचे तेजही नाहीसे होते ३५.
जेवीं हनुमंत देखोनि येतां । नवचंडी पळे तत्त्वतां ।
मा राहावया येरां भूतां । उरी सर्वथा उरेना ॥ ३६ ॥
मारुति येतांना पाहिला म्हणजे खरोखर नवचंडी (अहिरावणाची देवी ) पळत सुटते. मग इतर भुतांची काय कथा ? त्यांची पुढे उभे राहण्याची सुद्धा छाती होत नाही ३६.
तेवीं माझे साक्षात्कारीं । त्यासी बद्धता नाहीं खरी ।
मा ज्ञान तियेचे निवृत्तीवरी । कैशापरी राहेल ॥ ३७ ॥
त्याप्रमाणे माझ्या साक्षात्काराने त्याला खरोखर बद्धताच राहात नाही. मग तिच्या निवृत्तीनंतर ज्ञान कसें राहणार? ३७.
माझिया अनुभवाच्या ठायीं । बंधमोक्ष मिथ्या पाहीं ।
तेथ साधनज्ञानाचा कांहीं । उपेगु नाहीं उद्धवा ॥ ३८ ॥
माझ्या अनुभवाच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष दोन्ही मिथ्याच आहेत हे तू लक्षात ठेव. उद्धवा! तेथे साधनज्ञानाचा कांहींएक उपयोग नाही ३८.
परमात्मस्वरूपाच्या ठायीं । बंधमोक्ष मायिक पाहीं ।
तेथें ज्ञानध्यान जें कांहीं । न त्यागितां पाहीं त्यागिलें ॥ ३९ ॥
परमात्मस्वरूपामध्ये बंध आणि मोक्ष हे मायिकच आहेत. म्हणून तेथे ज्ञान किंवा ध्यान यांचा त्याग न केला तरी त्याग होतोच ३९.
त्यागोनियां ज्ञानध्यान । ज्ञानियांसी माझी प्रीति गहन ।
तेंचि प्रीतीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४० ॥
पण ज्ञानाचा व ध्यानाचा त्याग झाल्यानंतरही ज्ञान्याला माझी प्रीति अतिशय असते. तेंच प्रीतीचे लक्षण स्वत: श्रीकृष्ण सांगताहेत ४०.
ज्ञानिनस्त्वहमेवेष्टः स्वार्थो हेतुश्च संमतः ।
स्वर्गश्चैवापवर्गश्च नान्योऽर्थो मदृते प्रियः ॥ २ ॥
[श्लोक २] ज्ञानी पुरूषाचे ध्येय, फळ, त्याच्या प्राप्तीचे साधन, स्वर्ग आणि मोक्षसुद्धा मीच आहे माझ्याशिवाय दुसर्‍या कोणत्याही पदार्थावर तो प्रेम करीत नाही. (२)
जो मी अद्वयानंदस्थिती । त्या माझी ज्ञानियांसी प्रीती ।
ते प्रीतीची उपपत्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ४१ ॥
अद्वयानंदस्थितिरूप जो मी, त्या माझी ज्ञानीजनांना फारच प्रीति असते. उद्धवा ! त्या प्रीतीचे लक्षण ऐक ४१.
ज्ञानियांसी अतिवल्लभ । जो मी परमात्मा स्वयंभ ।
ज्ञानियांचा परम लाभ । मी पद्मनाभ निजधन ॥ ४२ ॥
ज्ञानीजनांना अत्यंत प्रिय असा जो मी स्वयंभु परमात्मा, तो ज्ञान्यांचा परम लाभ, केवळ जीवश्च कंठश्च ठेवा, असा मी पद्मनाभ होय ४२.
ज्ञानियांसी जो स्वर्ग चांग । तो मज वेगळा नाहीं मार्ग ।
ज्ञानियांचा जो मोक्षभाग । तो मी श्रीरंग निजात्मा ॥ ४३ ॥
ज्ञान्यांचा उत्तम स्वर्ग म्हणजे माझ्याशिवाय दुसरा नाहींच, त्याचप्रमाणे ज्ञान्यांचा जो मोक्षभाग तोही मीच निजात्मा श्रीरंग होय ४३.
ज्ञानियांचें स्वधर्मसाधन । तें मी परमात्मा नारायण ।
मजवेगळें कांहीं आन । ज्ञात्यांसी जाण असेना ॥ ४४ ॥
मी परमात्मा नारायण तेंच ज्ञात्यांचे स्वधर्मसाधन होय. म्हणजे ज्ञात्यांना माझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही ४४.
ज्ञात्यांसी स्वर्गमोक्षसुख । मजवेगळें उरलें नाहीं देख ।
मी चिदात्मा निजव्यापक । भावें निष्टंक पावले ॥ ४५ ॥
ज्ञात्यांना स्वर्गसुख किंवा मोक्षसुख माझ्याशिवाय दुसरें कांही राहिलेलेच नसते. ते आपल्या शुद्ध भक्तिभावाने माझ्या सर्वव्यापी चिदात्म-स्वरूपालाच निश्चयेंकरून पोंचलेले असतात ४५.
ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ । मी पुरुषोत्तम गा समस्त ।
आद्य अव्यय अनंत । माझें निजसुख प्राप्त त्यां जाहलें ॥ ४६ ॥
ज्ञात्यांचा अर्थ, स्वार्थ, परमार्थ सारा मीच काय तो एक पुरुषोत्तम. म्हणून आद्य, अव्यय व अनंत असें माझें निजसुख त्यांना प्राप्त होत असते ४६.
ऐशी ज्ञानियांसी माझी प्रीती । तेही तैसेच मज प्रिय होती ।
तेंचि स्वयें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥ ४७ ॥
अशी ज्ञात्यांना माझी प्रीति असते, म्हणून तेही मला तसेच प्रिय होतात. तेंच श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला सांगत आहेत ४७.
ज्ञानविज्ञानसंसिद्धाः पदं श्रेष्ठं विदुर्मम ।
ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ बिभर्ति माम् ॥ ३ ॥
[श्लोक ३] ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न असलेले सिद्धपुरूषचा माझ्या खर्‍या स्वरूपाला जाणतात, म्हणून ज्ञानी मला सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे ज्ञानी पुरूष ज्ञानाने मला आपल्या अंतःकरणात धारण करतो. (३)
ज्ञानविज्ञाननिजसंपत्ती । जाहलियावीण माझी प्राप्ती ।
कोणासी नव्हे स्वरूपस्थिती । मत्पदीं गती ज्ञानविज्ञानें ॥ ४८ ॥
ज्ञान व विज्ञानाचे वैभव हस्तगत झाल्याशिवाय माझी प्राप्ति म्हणजे स्वरूपस्थिति ही कधीच कोणास प्राप्त व्हावयाची नाही. ज्ञान-विज्ञानानेच माझ्या पदाची प्राप्ति होते ४८.
करितां गुरुमुखें शास्त्रशुद्धश्रवण । तेणें जाहलें तें म्हणिजे ‘ज्ञान’ ।
त्याचा अनुभव तेंचि ‘विज्ञान’ । ऐक लक्षण त्याचेंही ॥ ४९ ॥
गुरुमुखाने शास्त्रशुद्ध श्रवण केल्याने जें प्राप्त होते, त्याला ‘ज्ञान’ म्हणतात ; आणि त्याचा जो प्रत्यक्षानुभव त्याला ‘विज्ञान’ म्हणतात. त्याचेही लक्षण ऐक ४९.
स्वयें स्वयंपाक केला जाण । न जाणे कटु मधुर लवण ।
जंव चाखिला नाहीं आपण । ते दशा सज्ञान ‘ज्ञान’ म्हणती ॥ ५० ॥
स्वत: केलेला स्वयंपाक जोपर्यंत चाखून पाहिला नाही, तोपर्यंत तो कडू, गोड, खारट कसा झाला आहे ते बरोबर कळत नसते. ही जी स्थिति तिला ज्ञाते लोक ‘ज्ञान’ असे म्हणतात ५०.
केलिया रसाचें रसास्वादन । स्वयें गोडी सेवी आपण ।
ऐशी जे दशा तें ‘विज्ञान’ । उद्धवा जाण निश्चितीं ॥ ५१ ॥
आणि त्यांतील रसाची गोडी स्वतः चाखून पाहिली म्हणजे जी स्थिति प्राप्त होते, तेच उद्धवा ! खरोखर ‘विज्ञान’ होय ५१.
एवं विज्ञानज्ञाननिजसंपत्तीं । माझ्या उत्तमपदाची पदप्राप्ती ।
माझें वास्तवस्वरूप जे जाणती । त्यांची मज प्रीती अनन्यत्वें ॥ ५२ ॥
मिळून माझ्या सर्वोत्तमपदाची प्राप्ति होण्याला ज्ञानविज्ञान हीच संपत्ति कारणीभूत आहे. ह्यायोगे जे माझें वास्तविक स्वरूप जाणतात, त्यांची मला अनन्य प्रीति वाटते ५२.
वेद-शास्त्र-युक्तिबळें । माझें स्वरूप काइसेनि न कळे ।
तें ज्यासी वस्तुतां आकळे । मज त्यावेगळें प्रिय नाहीं ॥ ५३ ॥
वेदाच्या, शास्त्राच्या किंवा युक्तीच्या बळाने माझं स्वरूप कळत नसते. ते खरोखर ज्याला आकलन होते त्याच्याशिवाय मला दुसरे कोणीच प्रिय नाही ५३.
तेंचि अतिप्रीतीचें लक्षण । त्याच्या पा‍उलापाउलीं जाण ।
सर्वांग वोडवीं मी आपण । करीं निंबलोण । सर्वस्वें ॥ ५४ ॥
तें अतिप्रीतीचे लक्षण म्हणजे हेंच की, त्याच्या प्रत्येक पावलापावलाला मी सारे अंग पुढें करतो. इतकेच नव्हे, तर मी त्याच्यावरून आपल्या सर्वस्वाचें निंबलोण उतरतों ५४.
त्यासी जे वेळे जें लागे । तें मी न मागतां पुरवीं वेगें ।
त्यासी विरुद्ध ये जेणें मार्गें । तें मी निजांगें निवारीं ॥ ५५ ॥
त्याला ज्या वेळेस जें लागेल, तें मी त्याने न मागतां तत्काल पुरवीत असतो आणि त्याला काही विरुद्ध म्हणजे प्रतिकूल येत असेल तें मी स्वतः दूर करतों ५५.
त्यासी झणीं संसारवारा लागे । यालागीं मीच मी पुढेंमागें ।
सभंवतां राहें सर्वांगें । अतिप्रीतिपांगें पांगलों ॥ ५६ ॥
त्याला कदाचित् संसाराचा वारा झोंबेल म्हणून त्याच्या मागे पुढे व सभोंवतीं सांगानें मीच उभा राहातो. असा मी त्यांच्या प्रेमाला भाळून गेलेला असतो ५६.
जेणें ज्ञानें ज्ञानी प्रिय होती । त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती ।
देवो सांगे उद्धवाप्रती । यथार्थस्थिती निजबोधें ॥ ५७ ॥
ज्ञानी हे ज्या ज्ञानाने मला प्रिय होतात, त्या ज्ञानाची पवित्र कीर्ति यथार्थ रीतीनें मात्मज्ञानपूर्वक उद्ध्वाला देव सांगत आहेत ५७.
तपस्तीर्थं जपो दानं पवित्राणीतरणि च ।
नालंकुर्वन्ति तां सिद्धिं या ज्ञानकल्या कृता ॥ ४ ॥
[श्लोक ४] ज्ञानाच्या एका अंशानेसुद्धा जी सिद्धी मिळू शकते, ती तपश्चर्या, तीर्थयात्रा, जपजाप्य, दान किंवा अन्य कोणत्याही पवित्र क्रियांनी पूर्णपणे मिळत नाही. (४)
सकळ साधनां नव्हे जे शुद्धी । ते ज्ञानलेशें होय त्रिशुद्धी ।
ऐक उद्धवा सुबुद्धी । ते ज्ञानशुद्धीचा महिमा ॥ ५८ ॥
सगळ्या साधनांनी जी शुद्धि होत नाही, ती निश्चयेंकरून ज्ञानाच्या एका अंशाने होते. हे बुद्धिमता उद्धवा! अशा त्या ज्ञानशुद्धीचा महिमा ऐक ५८.
‘तप’ जें परार्क पंचाग्नी । ‘तीर्थ’ गंगादि सरिता त्रिवेणी ।
‘जपु’ जे नाना मंत्रश्रेणी । गो-भू-तिल ‘दानीं’ सुवर्णादि ॥ ५९ ॥
पंचाग्नि साधून ‘तप’ केलें; किंवा गंगात्रिवेणी आदिकरून ‘तीर्थे’ केली; अनेक मंत्रांचा ‘जप’ केला; किंवा गो, भूमि, तिल, सुवर्ण इत्यादि ‘दानें’ दिली ५९;
आणिकही इतर ‘पवित्रें’ । जें ‘स्वधर्मकर्मादि’ स्वाचारें ।
नाना ‘याग’ अग्निहोत्रें । पवित्रकरें अतिशुद्ध ॥ ६० ॥
किंवा आणखीही इतर जे पवित्र पवित्र ‘स्वधर्मकर्मादि’ आचार ते केले ; किंवा ‘योग’, ‘अग्निहोत्रे’, नानाप्रकारचे ‘यज्ञ’ वगैरे अत्यंत शुद्ध व पावन करणारी कृत्ये केली ६०;
एवं तपादिक जें साधन । या सकळांची शुद्धी गहन ।
ते ज्ञानलेशासमान । पवित्रपण तुळेना ॥ ६१ ॥
तर ही जी तपादिक साधने आहेत, त्या सर्वांची शुद्धि मोठी आहे हे खरे; पण त्यांचा पवित्रपणा ज्ञानाच्या एका लवांशालाही तुळणार नाही ६१.
ज्ञाननिष्ठा अर्धक्षणें । जे पवित्रता स्वयें लाहणें ।
तें तपादि नाना साधनें । नाहीं पावणें कल्पांतीं ॥ ६२ ॥
अर्धक्षणाच्या ज्ञाननिष्ठेनें जी पवित्रता प्राप्त होते, ती तपादि नानासाधनांनी कल्पांतीसुद्धा प्राप्त व्हावयाची नाहीं ६२.
ऐसें जें ‘पवित्रज्ञान’ । तें मुख्यत्वें धरोनि जाण ।
माझे करावें भजन । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ६३ ॥
असें जें पवित्र ज्ञान, तेंच मुख्यत्वे धारण करून माझे भजन करावे. हेच निरूपण श्रीकृष्ण सांगतात ६३.
तस्माञ्ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मानमुद्धव ।
ज्ञानविज्ञानसंपन्नो भज मां भक्तिभावितः ॥ ५ ॥
[श्लोक ५] म्हणून उद्धवा ! तू ज्ञानसहित आत्मस्वरूपाला जाणून घे आणि नंतर ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने माझे भजन कर. (५)
याकारणें गा उद्धवा । ऐसा पवित्र ज्ञानाचा यावा ।
तेथ प्रक्षाळूनि निजभावा । जीवु तो वोळखावा परमात्मत्वें ॥ ६४ ॥
ह्याकरितां उद्धवा ! असा जो ज्ञानाचा पवित्र प्रवाह, त्यांत जीवाभावाला पुनीत करून, जीव हा परमात्मस्वरूपच आहे असे ओळखावें ६४.
जीवु परमात्मा दोनि एक । ऐसें जाणणें तें ‘ज्ञान’ देख ।
ऐक्यें भोगणें परमात्मसुख । ‘विज्ञान’ सम्यक त्या नांव ॥ ६५ ॥
जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहेत असें जाणणे हे ‘ज्ञान’ होय आणि ऐक्यभावनेने परमात्मसुख भोगणे ह्याचे नाव ‘विज्ञान’ होय ६५.
ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । हो‍ऊन करावें माझें भजन ।
त्या निजभजनाची खूण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६६ ॥
अशा रीतीने ज्ञानविज्ञानसंपन्न होऊन माझें भजन करावें. उद्धवा ! त्या माझ्या भजनाची सारी लक्षणे ऐक ६६.
तेव्हां जेथें देखे जें कांहीं । तें मीवांचूनि आन नाहीं ।
मग अनन्यभावें तिये ठायीं । भजे पाहीं भावार्थें ॥ ६७ ॥
तो जेथे जेथें जें जें कांहीं पाहातो, तेथे तेथे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही. मग तो त्या त्या ठिकाणी अनन्य भावानेच भजू लागतो ६७.
ऐशिया माझ्या भजनाहातीं । उसंत नाहीं अहोरातीं ।
जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । माझी निजभक्ती न मोडे ॥ ६८ ॥
अशा माझ्या भजनामध्ये अहोरात्रात खंड म्हणून पडतच नाही. जागृतींत, स्वप्नांत किंवा सुषुप्तीतसुद्धा माझ्या भजनांत खळ म्हणून नाहींच ६८.
विसरोनि जावें जेथें । तेथेंचि देखे मातें ।
मरण आलें विस्मरणातें । स्मरणही तेथें हारपलें ॥ ६९ ॥
मला विसरून जेथें तो जातो, तेथेंही तो मलाच पाहातो. ह्याप्रमाणे विस्मरणालाच मरण येते ; नव्हे, स्मरणसुद्धा नाहीसे होऊन जाते ६९.
यापरी ज्ञानविज्ञानसंपन्न । मजवेगळें न देखती आन ।
तैसेंचि माझें अनन्य भजन । ‘शुद्धभक्ति’ जाण या नांव ॥ ७० ॥
अशा प्रकारे ज्ञानविज्ञानसंपन्न लोक असतात त्यांना माझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही. त्याचप्रमाणे अनन्य भजन करणे ह्याचेच नांव ‘शुद्धभक्ति’ हे लक्षात ठेव ७०.
मागां मुनीश्वरीं याचि गतीं । माझी करोनि अनन्य भक्ती ।
मज पावले जैशा रीतीं । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥
पूर्वी मोठमोठाले मुनिवर्य ह्याच रीतीने माझी एकनिष्ठ भक्ति करून मला पावले. ते कसे ते मी तुला सांगतों ऐक ७१.
ज्ञानविज्ञानयज्ञेन मामिष्ट्वाऽऽत्मानमात्मनि ।
सर्वयज्ञपतिं मां वै संसिद्धिं मुनयोऽगमन् ॥ ६ ॥
[श्लोक ६] मुनींनी ज्ञानविज्ञानरूप यज्ञाने आपल्याच अंतःकरणात असलेल्या सर्व यज्ञांचा अधिपती अशा मला उद्देशून यज्ञ करून परम सिद्धी मिळविली आहे. (६)
जे ज्ञानधनें अतिसंपन्न । परम पवित्र विज्ञानें जाण ।
ऐसे ब्रह्मभूत जे ब्राह्मण । यज्ञद्वारा यजन करिती माझें ॥ ७२ ॥
ज्ञानधनाने अत्यंत संपन्न आणि विज्ञानाने परम पवित्र, असे ब्रह्मस्वरूप झालेले जे ब्राह्मण, ते यज्ञाच्या द्वारें माझें यजन करतात ७२.
हृदयाच्या निजभुवनीं । विकल्पाची भूमि खाणोनी ।
शम-दम-विरक्ती कुंडें तिन्ही । केलीं आवो साधुनी श्रद्धेचा ॥ ७३ ॥
ते आपल्या हृदयरूप मंदिरांत (अथवा यज्ञमंडपांत) विकल्परूपी जमीन खणून श्रद्धेचा आकार साधून शम, दम आणि विरक्ति ही तीन कुंडे तयार करतात ७३.
तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्रें दृढ मंथूनी ।
काढिला सूक्ष्म निर्धूमाग्नी । कुंडीं स्थापूनी पेटविला ॥ ७४ ॥
तेथे क्षर व अक्षर (जीव व शिव) या दोन अरणी (अग्नि उत्पन्न करण्याची लाकडे) घेऊन त्यांचे गुरुमंत्राने नीट मंथन करून काढलेला निर्धूम असा सूक्ष्म अग्नि त्या कुंडामध्ये घालून पेटवितात ७४,
शुद्धसत्त्वाचें घृत तेथ । रजतमद्रव्येंसीं मिश्रित ।
वैराग्यस्रुवेनें आहुती देत । मंत्र तेथ युक्तीचे ॥ ७५ ॥
शुद्धसत्त्वरूप घृतांत, रजतमादि होमद्रव्ये मिश्रित करून, युक्तीच्या मंत्रांनी, वैराग्यरूप स्त्रुवेने (लाकडी पळीनें ) त्यांत आहुति देतात ७५.
घेऊनि विद्याशस्त्र लखलखित । संकल्पपशूचा करूनि घात ।
तेणें यज्ञपति श्रीअनंत । केला तृप्त निजबोधें ॥ ७६ ॥
नंतर विद्यारूप लखलखीत शस्त्र हातांत घेऊन, संकल्परूप पशु ठार मारून, यज्ञाचा स्वामी जो श्रीअनंत त्याला निजबोधाने संतुष्ट करतात ७६.
तेथ पूर्णाहुतीस कारण । घालितां जीवभावाचें अवदान ।
यज्ञभोक्ता मी श्रीनारायण । परमात्मा जाण सुखी झालों ॥ ७७ ॥
त्यांत पूर्णाहुतीसाठी जीवभावाची आहुति दिली म्हणजे यज्ञभोक्ता जो मी श्रीनारायण परमात्मा तो संतुष्ट होतो ७७.
यापरी माझें यजन । करूनियां मुनिगण ।
निवारूनि जन्ममरण । माझी सिद्धि जाण पावले ॥ ७८ ॥
ह्याप्रमाणे माझें यजन करून अनेक मुनीश्वर जन्ममरणांतून सुटून ते माझ्या स्वरूपाला पोंचले ७८.
मुनीश्वरीं साधिली सिद्धी । तेचि उद्धवालागीं त्रिशुद्धी ।
व्हावया कृष्ण कृपानिधी । प्रपंचनिषेधीं वस्तु सांगे ॥ ७९ ॥
मोठमोठ्या ऋषींनी जी सिद्धि साध्य करून घेतली, तीच उद्धवालाही खरोखर प्राप्त व्हावी, म्हणून कृपासागर श्रीकृष्ण त्याला, प्रपंचाचा निषेध करून वस्तुतत्त्व सांगत आहेत ७९.
त्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो
विकारो मायान्तराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् ।
जन्मादयोऽस्य यदमी तव तस्य
किं स्युराद्यन्तयोर्यदसतोऽस्ति तदेव मध्ये ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] हे उद्धवा ! देह, इंद्रिये व देवता यांचा समुदाय असलेले शरीर ही केवळ माया आहे याचाच तू आश्रय घेतला आहेस हे आधी व शेवटी नसून मध्येच असते जन्म इत्यादी सहा विकारसुद्धा याचेच असतात जे आधी असत नाही, शेवटी असत नाही, ते मध्येही असत नाही अशा या शरीराशी तुझा काय संबंध आहे ? (७)
‘मी उद्धव’ ऐसें म्हणतां । तूं कोण आहेसी तत्त्वतां ।
ऐक त्या स्वरूपाची कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ८० ॥
‘मी उद्धव आहे’ असे म्हणतांना खरोखर तूं कोण आहेस? तर त्या तुझ्या स्वरूपाची आतां कथा सांगतों ऐक ८०.
जन्म स्थिति आणि निधन । त्रिविधविकारेंसीं त्रिगुण ।
त्यांची अधिष्ठात्री माया जाण । तिसी चळण तुझेनी ॥ ८१ ॥
जन्म, स्थिति आणि मरण ह्या तीन विकारांना कारण त्रिगुण आहेत; आणि त्यांची अधिष्ठात्री माया आहे; पण तिला तुझ्यापासूनच चलन मिळतें ८१.
मायादि गुणकार्यां समस्तां । तूं आश्रयो पैं सबाह्यतां ।
तुझेनि अंगें यासी चपळता । तूं यापरता चिदात्मा ॥ ८२ ॥
माया आदिकरून सर्व गुणांच्या सर्व कार्यांना अंतर्बाह्य तुझाच आश्रय आहे. तुझ्यामुळेच त्यांना चपलता म्ह. चलनवलन प्राप्त झाले आहे. तूं त्यांच्याहून भिन्न असा चिदात्मा आहेस ८२.
‘माझेनि गुणकर्मा चळणता । तैं प्रपंचासी आली सत्यता’ ।
हें मायामय गा तत्त्वतां । मृगजळता आभासु ॥ ८३ ॥
‘माझ्यामुळे गुणकर्माना चलनता आली आहे असे म्हटले, तर प्रपंचाला सत्यता आली’ (असें वाटेल, पण तसे नव्हे. कारण) खरोखर हे सर्व जग मायामय असून शुद्ध मृगजळासारखा भास आहे ८३.
सकळ प्रपंचाचें जें भान । तें तंव मृगजळासमान ।
दिसे तेंही मिथ्या दर्शन । वस्तुत्वें जाण सत्य नव्हे ॥ ८४ ॥
प्रपंचाचें सारें भान हे तर मृगजळासारखे आहे. जें जें काय दिसतें तें सर्व मिथ्या होय. खरोखर सत्य नव्हे ८४.
तूं जन्ममरणापरता । त्रिगुणांतें नातळता ।
प्रपंचासी अलिप्तता । तुझी तत्त्वतां तूं ऐक ॥ ८५ ॥
तूं जन्ममरणाहून निराळा ; त्रिगुणांना न शिवणारा आणि खरोखर प्रपंचापासून अलिप्त आहेस. कसा ? ते ऐक ८५.
तेचि प्रपंचाची अलिप्त युक्ती । ऐशी आहे परम प्रतीती ।
उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । प्रपंचाची वस्ती सत्यत्वें नाहीं ॥ ८६ ॥
प्रपंचापासून अलिप्त राहाण्याची युक्ति हीच आहे. त्या युक्तीची परम प्रतीति अशी आहे की, उत्पत्ति, स्थिति व लय यांच्यामध्येही प्रपंचाचे खरे अस्तित्वच नाही ८६.
उत्पत्ति आदीं प्रपंच नसे । अंतीं कांहीं उरला न दिसे ।
मध्यें जो कांहीं आभासे । तो मायावशें मिथ्याभूत ॥ ८७ ॥
उत्पत्तीच्या आधी प्रपंच नसतो; आणि अंतीही काही राहिलेला दिसत नाही. मध्यंतरी जो त्याचा भास होतो तोही मायामय असल्यामुळे मिथ्या होय ८७.
प्रपंचाआदीं परब्रह्म । अंतीं तेंचि उरे निरुपम ।
मध्यें स्थितिकाळीं तेंचि ब्रह्म । मिथ्या भवभ्रम भ्रांतासी ॥ ८८ ॥
प्रपंचाच्या म्ह० सृष्टीच्या आधीं परब्रह्मच असते, अंतकालींही निरुपम असें तेंच शिल्लक राहातें ; आणि सृष्टीच्या स्थितिकालींसुद्धा ते ब्रह्मच असते, भ्रांतिष्ठ लोकांना मात्र संसाराचा मिथ्या भ्रम होतो ८८,
सूर्याआदीं मृगजळ नसे । अस्तमानीं उरलें न दिसे ।
मध्यें जें काहीं आभासे । तेथही नसे जळलेश ॥ ८९ ॥
सूर्याच्या आधीही मृगजळ असत नाही; अस्तमान झाल्यानंतरही उरलेले दिसत नाहीं; मध्यंतरी जो काही भास होतो, त्यांतही पाण्याचा लेशसुद्धा नसतो ८९.
सर्पाआदीं दोरत्वें दोरु । अंतीं दोर उरे साचारु ।
मध्यें भ्रमें भासे सर्पाकारु । तोही दोरु दोररूपें ॥ ९० ॥
रज्जुसर्पाच्या आधीही दोरपणाने दोर असतो, आणि शेवटींही खरा दोरच शिल्लक राहातो. मध्यंतरी भ्रमाने सर्पाचा आकार भासतो, तोही दोररूपाने दोरच असतो ९०.
यापरी आद्यंतीं विचारिता । वस्तु सत्य प्रपंच मिथ्या ।
हें उद्धवा जाण तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां संमत ॥ ९१ ॥
हे उद्धवा ! याप्रमाणे आदी आणि अंती विचार केला असतां ब्रह्म हेच सत्य असून, प्रपंच (जग) खरोखरच मिथ्या आहे आणि वेदशास्त्रार्थालाही हेच संमत आहे ९१.
ऐशी या प्रपंचाची घडामोडी । होतां जन्ममरणकोडी ।
उद्धवा तुज न लागे वोढी । तूं परापरथडीं नित्यमुक्त ॥ ९२ ॥
अशी या प्रपंचाची कितीही घडामोड झाली व कितीही जन्ममरणाच्या कोटि गेल्या, तरी उद्धवा! त्यांचा तुला संपर्कही लागावयाचा नाही. कारण, तूं प्रवृत्ति व निवृत्ति ह्या दोन्ही तीरांपासून नित्यमुक्तच आहेस ९२.
निर्गुण निःसंग निर्विकार । अज अव्यय अक्षर ।
ब्रह्म अनंत अपरंपार । तें तूं साचार उद्धवा ॥ ९३ ॥
उद्धवा! निर्गुण, निःसंग, निर्विकार, अज, अव्यय, अक्षर, अनंत आणि अपरंपार असें जें ब्रह्म, तेच खरोखर तूं आहेस ९३.
हे ऐकोनि देवाची गोष्टी । उद्धवें बांधिली शकुनगाठीं ।
हरिखें आनंदु न जिरे पोटीं । एकला सृष्टीं न समाये ॥ ९४ ॥
हे देवाचे भाषण श्रवण करून उध्दवाने आपल्या मनांत खूणगांठ बांधून ठेवली. हर्षाने त्याच्या पोटांत आनंद मावेनासा झाला. त्याला राहावयाला ही सृष्टि पुरेनाशी झाली ९४.
‘तूं ब्रह्म’ म्हणतां यदुराजें । तेणें हरिखाचेनि फुंजें ।
उद्धव नाचे स्वानंदभोजें । वैकुंठराजे तुष्टले ॥ ९५ ॥
‘तूं ब्रह्म आहेस,’ असें श्रीकृष्णांनी म्हणतांच त्या आनंदाच्या भरांत उद्धव हर्षानें नाचूंच लागला. ते पाहुन श्रीकृष्णाला संतोष वाटला ९५.
स्वमुखें तुष्टोनि श्रीकृष्ण । मज म्हणे ‘तूं ब्रह्म पूर्ण’ ।
आजि मी सभाग्य धन्य धन्य । धांवोनि श्रीचरण वंदिले ॥ ९६ ॥
श्रीकृष्ण संतुष्ट होऊन आपल्या मुखानेंच ‘तूं पूर्ण ब्रह्म’ आहेस असें मला म्हणतो, तेव्हां आज मी धन्य धन्य होय. माझ्यासारखा भाग्यवान् कोण आहे? असें मनांत आणून उद्धवानें श्रीकृष्णाच्या चरणाला वंदन केले ९६.
‘तूंचि अंगें परब्रह्म’ । ऐसें बोलिला मेघश्याम ।
तेचि अर्थींचें निजवर्म । उद्धव सप्रेम पूसत ॥ ९७ ॥
‘तू स्वतःच परब्रह्म आहेस’ असें जें श्रीकृष्ण बोलले, त्यांतलेच हृद्य उद्धव प्रेमानें त्यांस विचारूं लागला ९७.
उद्धव उवाच-
ज्ञानं विशुद्धं विपुलं यथैतद्वैराग्यविज्ञानयुतं पुराणम् ।
आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते त्वद्‍भक्तियोगं च महद्विमृग्यम् ॥ ८ ॥
[श्लोक ८] उद्धव म्हणाला ! हे विश्वेश्वरा ! हे विश्वमूर्ते ! आपण विशुद्ध, विपुल आणि सनातन तसेच वैराग्य आणि विज्ञानाने युक्त अशा ज्ञानाचे वर्णन केले आता महापुरूष जे समजून घेण्याचा प्रयत्‍न करतात, त्या भक्तियोगाविषयी मला सांगावे. (८)
विष्वक्सेना विश्वेश्वरा । विश्वमूर्ती विश्वंभरा ।
जेणें पाविजे ब्रह्मसाक्षात्कारा । त्या ज्ञाननिर्धारा मज सांग ॥ ९८ ॥
(उद्धव म्हणाला) हे विष्वक्सेना! विश्वेश्वरा ! विश्वमूर्ते! विश्वंभरा श्रीकृष्णा ! ज्याच्या योगाने ब्रह्मसाक्षात्कार घडेल असें निश्चित ज्ञान मला सांगावें ९८.
नुसधें सांगती ज्ञान । ते केवळ मूढ जाण ।
सांग तूं वैराग्ययुक्ति तीक्ष्ण । जें छेदी बंधन जीवांचें ॥ ९९ ॥
नुसते ज्ञान सांगत बसतात, ते केवळ मूर्ख होत असें मी समजतों. ह्याकरिता जीवाचे बंधन ज्याच्या योगाने तुटून जाईल अशी तीक्ष्ण वैराग्ययुक्ति मला सांगावी ९९.
ज्ञानेंवीण वैराग्य आंधळें । तें अरडीदरडी आदळे ।
वैराग्येंवीण ज्ञान पांगळें । युक्ति देखे परी न चले पुरुषार्थ ॥ १०० ॥
कारण ज्ञानाशिवाय वैराग्य हे आंधळे असते. ते खडकाबिडकावर जाऊन आदळते आणि वैराग्याशिवाय ज्ञान हे लंगडे असते. त्याला युक्ति कळते, पण त्याचा पुरुषार्थ मात्र काही चालत नाही १००.

विवेक वैराग्य दोनी । प्रवेशल्या हृदयभुवनीं ।
तों विषयावस्था निरसूनी । सोहंपणीं जीव वर्तें ॥ १ ॥
ह्याकरितां विवेक आणि वैराग्य ही दोन्ही हृदयमंदिरांत शिरतील, तरच विषयावस्था सोडून देऊन जीव हा ‘ब्रह्म तें मीच’ असे समजून वागू लागतो १.
जंव ज्ञानासी न भेटे विज्ञान । तंव न निरसे जीवपण ।
यालागीं सांगावें विज्ञान । जें जीवशिवपण निवारी ॥ २ ॥
ज्ञानाला जोपर्यंत विज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत जीवपणाचा निरास होत नाही. याकरितां जीवपण आणि शिवपण या दोहोंचंही निवारण करील, असें विज्ञान मला सांगावें २.
असंभावनादोषशून्य । तें बोलिजे ‘शुद्ध ज्ञान’ ।
जें विपरीतभावनेवीण । त्यातें सज्ञान ‘विपुल’ म्हणती ॥ ३ ॥
‘असंभावना’ दोष तिळमात्रही राहात नाही, त्यालाच ‘शुद्ध ज्ञान’ असें म्हणतात. आणि ज्यांत ‘विपरीत भावना’ मुळीच नसते, त्यालाच ज्ञाते लोक ‘विपुल’ असे म्हणतात ३.
ऐसें विशुद्ध-विपुल-ज्ञान । तद्युक्त वैराग्य-विज्ञान ।
त्यांमाजींही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥ ४ ॥
असें जें अत्यंत शुद्ध व विपुल ज्ञान, त्याने युक्त असें वैराग्य आणि विज्ञान, त्यांतही श्रेष्ठ असें तुझें भजन, मला कृपा करून सांगावें ४.
ज्ञान-विज्ञान-वैराग्यस्थितीं । जुनाट तुझी भगवद्‍भक्ती ।
मज सांगावी सुनिश्चितीं । कृपामूर्ती श्रीकृष्णा ॥ ५ ॥
हे कृपामूर्ति श्रीकृष्णा! ज्ञान-विज्ञान-वैराग्यसहित तुझी जुनाट अशी भक्तिही निश्चयेंकरून मला सांगावी ५.
तुझे उत्तमभक्तिकारणें । साधु पडले गवेषणें ।
धरणें बैसले जीवेंप्राणें । ते भक्ती सांगणें मजलागीं ॥ ६ ॥
तुझ्या श्रेष्ठ भक्तीसाठी मोठेमोठे साधुही शोधांत पडले आहेत आणि जीवाभावाने धरणे धरून बसले आहेत. ती भक्ति मला सांगावी ६.
तुझी करितां उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती ।
आपुली लाभे निजमुक्ती । उद्धव ते अर्थीं विनवीत ॥ ७ ॥
तुझी उत्तम भक्ति केली असतां त्रिविध तापही क्षयाला जातात आणि आपली मुक्ति आपल्या हाती लागते. म्हणून त्यासाठी उद्धव विनंती करीत आहे ७.
तापत्रयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवाध्वनीश ।
पश्यामि नान्यच्छरणं तवाङ्‍घ्रि द्वन्द्वातपत्रादमृताभिवर्षात् ॥ ९ ॥
[श्लोक ९] हे प्रभो ! या घोर संसारमार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालो आहे अशावेळी आपल्या छत्रासारख्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत. (९)
जे त्रिविध तापें तापले । जे कामक्रोधीं जर्जर केले ।
आशातृष्णा विसंचिले । जे निर्बुजले जन्ममरणें ॥ ८ ॥
त्रिविध तापाने जे तापलेले असतात; कामक्रोधांनी ज्यांना जर्जर करून टाकलेले असते; आशेने आणि तृष्णेने जे डबडबलेले असतात; आणि जन्ममरणाने गुरफटलेले असतात ८.
संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर ।
ऐसे श्रमले जे नर । त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥ ९ ॥
संसाराचा अत्यंत बिकट मार्ग दुःखानेही ज्यांना आक्रमण करवत नाही; असे जे यातना भोगीत असलेले पुरुष त्यांना हरीचे पदकमल हेच एक छत्र आहे ९.
तुझ्या चरणारविंदापरतें । शरण्य न देखों आणिकांतें ।
यालागीं कायावाचाचित्तें । शरण भावार्थें तुज आलों ॥ ११० ॥
तुझ्या चरणकमलावांचून शरण जाण्याला दुसरें स्थळच दिसत नाही. म्हणून कायावाचामनें करून भक्तिभावाने तुलाच मी शरण आलो आहे ११०.
छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचें भिन्न रूप ।
त्रिविध तापेंसीं संताप । निरसोनि निष्पाप करी जन ॥ ११ ॥
छत्र केवळ एक तापच दूर करते, पण तुझ्या चरणाचे छत्र काही निराळंच आहे. ते त्रिविध तापांसह सर्व संताप दूर करून जनाला निष्पाप करून सोडते ११.
एक शरण निजचित्तें । एक वैरें मिसळले तूतें ।
एक ते भजनभावार्थें । एक ते भयार्तें स्मरले तूतें ॥ १२ ॥
कोणी आपल्या मनानेच तुला शरण आले, कोणी वैर करूनच तुझ्यामध्ये मिळून गेले. कोणी भावार्थानंच तुझे भजन केलें, आणि कोणी भयभीत होऊनच तुझे स्मरण केले १२,
एक ते सुहृदत्वें सगोत्र । एकाचें केवळ स्नेहसूत्र ।
एका अंगसंग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥ १३ ॥
कोणी तुझ्या कुळांतील असल्यामुळे सुहृद बनले, कोणी स्नेहामुळेच तुला प्रेमबद्ध झाले, कोणी कामतंत्राने अंगसंगच करून उद्धरून गेले, तर कोणी निरंतर आज्ञाधारक सेवकच बनून राहिले १३.
एवं नानापरी विचित्र । जिंहीं ठाकिलें चरणच्छत्र ।
भवभय जें महाघोर । तें त्यांसमोर हों न शके ॥ १४ ॥
तात्पर्य, अनेक प्रकारांनी विचित्र रीतीने ज्यांनी तुझ्या चरणछत्राचा आश्रय केला, त्यांच्यासमोर संसाराचे भय उभे राहू शकत नाही १४.
भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्यां देणें निज ऐक्यपद ।
बाप उदारता अगाध । तूं स्वानंदबोध सर्वांचा ॥ १५ ॥
भक्त असो, वैरी असो, की आप्त असो, त्या साऱ्यांनाच तूं आपलें निजपद देतोस. अशी तुझी उदारता फार मोठी आहे. तूं सर्वांचा स्वानंदबोध आहेस १५.
होमें जें दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसें करी ।
मा अवचटें पडिल्यावरी । तेंही करी तैसेंचि ॥ १६ ॥
होमहवन करून अग्नीला जे अर्पण केले जाते, तें तो अग्नि आपल्यासारखेच करून टाकतो; तसेंच चुकूनही जरी त्यावर कांहीं पडले, तरीही त्याची गति तशीच होते १६.
एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया संबंधा ।
त्यांची निरसोनि संसारबाधा । समत्वें निजपदा तूं नेसी ॥ १७ ॥
ह्याप्रमाणे श्रीकृष्णा! कोणत्याही प्रकारांनी जे तुझ्यासंबंधांत येतात, त्यांच्या संसाराची पीडा दूर करून समत्वाने तूं त्यांना आपल्या पदाला नेतोस १७.
त्या तुझें चरणछत्र येथें । निवारी त्रिविध तापांतें ।
सदा वर्षे परमामृतें । शरण चरणांतें यालागीं ॥ १८ ॥
ते तुझें चरणरूप छत्र येथे त्रिविधतापांचें निवारण करून सदासर्वदा परमामृताचा वर्षाव करीत आहे. म्हणूनच त्या चरणांना मी शरण आहे १८.
ज्या संसारभयाभेण । तुझ्या चरणा आलों शरण ।
त्या भवभयाचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥ १९ ॥
ज्या संसाराच्या भयाने तुझ्या चरणाला मी शरण आलो आहे, त्या भवभयाचे स्वरूप उद्धव आपणच सांगत आहे १९.
दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् ।
समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैर्वचोभिरासिञ्च महानुभाव ॥ १० ॥
[श्लोक १०] हे महानुभाव ! मी या संसाररूप विहिरीत क्षुद्र विषयरूप पाण्याने सुखोपभोगरूप तहान भागवण्यासाठी आलो व तीत पडलो तेथेच कालरूपी सर्पाने मला दंश केला आता आपणच कृपा करून याला वर काढा आणि याला मुक्त करणार्‍या आपल्या अमृतवाणीने ओलाचिंब करून टाका. (१०)
संसारकुहरामाजीं जन । गृहदाराकूपीं पडले जाण ।
त्याहीमाजीं दुःख गहन । काळसर्पें दारुण डंखिलें ॥ १२० ॥
लोक हे संसाररूप गुहेमध्ये सांपडून गृहदारारूप विहिरीमध्ये पडले आहेत. त्यातही काळरूप सर्पाने कडकडून चावा घेतला आहे. त्या वेदना तर फारच भयंकर आहेत! १२०.
त्या काळसर्पाचें विख । क्षणक्षणां चढे देख ।
अभिमानें भुलले लोक । विषयसुख वांछिती ॥ २१ ॥
त्या काळरूपसर्पाचे विष क्षणोक्षणी चढत आहे; तरीही लोक अभिमानाला भुलून विषयसुखाची इच्छा करतातच! २१.
नवल काळसर्पाचा पडिपाडु । विषप्राय विषय केले गोडु ।
गोडांचा गोड परमार्थ दृढु । तो केला कडू जीवेंभावें ॥ २२ ॥
काळसर्पाचा प्रताप काही विलक्षण आहे. त्याने विषासारखे कडू असलेले विषयही गोड करून सोडले आहेत. आणि गोडांतला गोड असा जो परमार्थ तो जीवाभावापासून कडू करून सोडला आहे! २२.
विखाहूनि विषय अधिक । विख एक वेळां मारक ।
विषयो पुनः पुनः घातक । काळसर्पें लोक भुलविले ॥ २३ ॥
विषापेक्षाही विषय भयंकर आहेत. कारण, विष हे एक वेळच मारक असते; परंतु विषय हे पुनःपुन्हा घात करीत असतात. इतकी काळसर्पाने लोकांना भुरळ घातली आहे २३.
विषय तो केवळ विख । त्यालागीं भुलले मूर्ख ।
विषयांची तृष्णा देख । अधिकाधिक वाढविती ॥ २४ ॥
विषय हे शुद्ध विष आहे. त्याला मूर्ख लोकच भुलतात आणि विषयांची तृष्णा अधिकाधिक वाढवितात २४,
ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचें करावें जी उद्धरण ।
म्हणशील ‘हे करितील साधन । तैं उद्धरण करीन मी’ ॥ २५ ॥
असे जे दुःखांत बुडून गेलेले लोक आहेत त्यांचा उद्धार करावा. ह्यावर आपण कदाचित् म्हणाल की, ते लोक साधन करतील, तेव्हा त्यांचा मी उद्धार करीन २५,
स्वामी तुझी कृपा न होतां । कोट्यानुकोटी साधन तें वृथा ।
तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शेना ॥ २६ ॥
परंतु स्वामिन् ! आपली कृपा झाली नाही, तोपर्यंत कोट्यवधि साधनंही व्यर्थ होऊन जातात. श्रीकृष्णा! तुझी कृपा झाली की, संसाराची व्यथा स्पर्शसुद्धा करावयाची नाहीं २६.
ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा ।
तेणें अमृतें शिंपोनि कृष्णनाथा । जनां समस्तां उद्धरीं ॥ २७ ॥
हे कृपानिधे ! श्रीअनंता ! कृष्णनाथा ! माझी विनंती ऐकावी. तुझ्या ज्या मोक्षफळरूप कथा आहेत, त्या कथामृताने सिंचन करून सर्वाचा उद्धार करावा २७.
तुझे मुखींचें कथापीयूख । बिंदुमात्र लाभतां देख ।
भवसर्पाचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥ २८ ॥
तुझ्या मुखांतील कथामृताचा एक बिंदु जरी प्राप्त झाला, तरी तो संसारसर्पाचे विष उतरून स्वानंद-सुख उत्पन्न करितो २८.
‘सकळ जनांच्या विषयीं’ । म्हणसी आग्रह कां तुझ्या ठायीं ।
जन मातें प्रार्थीत नाहीं । देवा ऐसें कांहीं कल्पिसी ॥ २९ ॥
आता ‘साऱ्याच लोकांचा उद्धार करण्याविषयीं तुझा आग्रह का ? लोक काही माझी तशी विनवणी करीत नाहीत’ अशी जर देवा! तुमच्या मनात कल्पना येईल २९,
अंधळें अंधकूपीं पडतां । देखणेनीं लावावें सत्पथा ।
तेवीं ज्ञानांध दुःखी बुडतां । उद्धरावया तत्त्वतां मी प्रार्थितसें ॥ १३० ॥
तर मी म्हणतों, एखादा आंधळा अंधेच्या विहिरीत पडलेला दिसला, तर पाहणाऱ्याने त्याला वर काढून चांगल्या वाटेला लावावें ; त्याप्रमाणे ज्ञानांध लोक दुःखांत बुडत असतात, त्यांचा उद्धार करावा, म्हणून मी आपली प्रार्थना करीत आहे ३०.
जन अंध कां जाहले म्हणसी । संसारसर्पें ग्रासिलें त्यांसी ।
यालागीं विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥ ३१ ॥
आतां लोक तरी आंधळे कशाने झाले म्हणशील, तर त्यांना संसाररूप सर्पाने ग्रासलेले आहे, म्हणून ते आत्मसुखाला विसरून विषयसुखाला भुलले आहेत ३१.
ऐशिया दीनांतें श्रीअनंता । कृपेनें उद्धरावें तत्त्वतां ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिलें ॥ ३२ ॥
खरोखर श्रीकृष्णा ! अशा दीन जनांचा आपण कृपा करून उद्धार करावा. असें म्हणून त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेविलें आणि त्याची प्रार्थना केली ३२.
ऐकोनि भक्ताची विनंती । संतोषला भक्तपती ।
उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सांगेल ॥ ३३ ॥
ही भक्ताची विनंति ऐकून भक्तांचा प्रभु श्रीकृष्ण प्रसन्न झाला. तोच आतां त्याला एका उत्तम सभेतील ज्ञान सांगेल ३३.
जे सभेसी मुख्यत्वें हृषीकेशी । देवर्षी आणि ब्रह्मर्षी ।
तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥ ३४ ॥
ज्या सभेला मुख्यत्वेकरून श्रीकृष्ण, देवर्षि व ब्रह्मर्षि आणि तपोराशि व ज्ञाननिधि असे राजर्षिही जमले होते ३४,
ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ ।
श्रोतीं अवधान द्यावें तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥ ३५ ॥
त्या सभेत निघालेला ज्ञानाचा विषय उद्धवाला आतां श्रीकृष्णनाथ सांगतील, तर तिकडे श्रोत्यांनी अवधान द्यावे, अशी एकाजनार्दन विनंती करितो ३५.
ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगवंत आपण ।
श्रोता उद्धव सावधान । काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ३६ ॥
ज्ञान आणि तेही पुरातन. त्याचा वक्ता कोण? तर स्वतः भगवान् ! यामुळे श्रोता जो उद्धव तोही श्रीकृष्ण काय बोलतात ते लक्ष देऊन श्रवण करूं लागला ३६.
श्रीभगवानुवाच-
इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् ।
अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नोऽनुश्रृण्वताम् ॥ ११ ॥
[श्लोक ११] श्रीकृष्ण म्हणाले – असेच हे पूर्वी अजातशत्रू युधिष्ठिराने धार्मिकशिरोमणी भीष्मांना विचारले होते. त्यावेळी आम्ही सर्वजण तेथे उपस्थित होतो. (११)
तुवां पुशिलें जैशा रीतीं । तैसियाचि गा उपपत्तीं ।
धर्में पुशिले भीष्माप्रती । देहांतीं शरपंजरीं ॥ ३७ ॥
(भगवान् म्हणाले)-तूं जशा रीतीने मला ज्ञान विचारलेंस, तशाच रीतीनें भीष्माचार्य शरपंजरी पडून त्यांचा अंतसमय प्राप्त झाला असता त्यांनाही धर्माने हेंच विचारले होते ३७.
ऐक त्या धर्माची थोरी । ज्यासी शत्रु नाहीं संसारीं ।
सत्यवादी निजनिर्धारीं । जो ऋषिमंत्रीं जन्मला ॥ ३८ ॥
आतां धर्माची थोरवी सांगतो ऐक. स्याला संसारामध्ये शत्रु म्हणून नव्हताच. तो निश्चयात्मक व सत्य बोलणारा होता. ऋषीच्या मंत्राने त्याचा जन्म झालेला होता ३८.
करावया पांडवनिर्दळण । वज्रदेही व्हावया आपण ।
वर्म पुसतां दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ॥ ३९ ॥
पांडवांचा संहार करण्याकरितां आपण वज्रदेही व्हावे, या हेतूनें दुर्योधनानें धर्मराजाला उपाय विचारला असतांही धर्मराज खोटें बोलला नाही ३९.
ऐसा राजा युधिष्ठिर । निर्मत्सर परम पवित्र ।
तेणें करूनि अत्यादर । भीष्म महावीर विनविला ॥ १४० ॥
असा निर्मत्सर आणि परमपवित्र राजा युधिष्ठिर, त्याने अत्यादराने महाशूरवीर भीष्माचार्य यांना विनंति केली १४०.
जो परम धार्मिक निजनिर्धारीं । जो स्वधर्मनियमें व्रतधारी ।
जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशूरीं वंदिजे ॥ ४१ ॥
जो दृढनिश्चयाचा असून मोठा धार्मिक; जो स्वधर्माच्या नियमाने व्रतस्थ राहणारा; जो यावज्जन्म ब्रह्मचर्याने राहिलेला आणि मोठमोठ्या योध्यांनाही जो वंद्य १४१
न मोडतां गुरुत्वाची पायरी । जो परशुरामेंसीं युद्ध करी ।
परी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्मचर्यें ॥ ४२ ॥
गुरुत्वाची मर्यादा भंग न करिता ज्याने परशुरामाशी युद्ध केलें; पण ब्रह्मचर्यव्रतपालन करण्यासाठी काशीराजाच्या मुलीचा त्याने अंगीकार केला नाही ४२
धनुर्विद्येसी गुरु परशुराम । तो रणीं जिंतिला करूनि नेम ।
तेणें संतोषोनि परम । आपुलें नाम आंकणां घातलें ॥ ४३ ॥
धनुर्विद्येमध्ये परशुराम हा त्याचा गुरु होता; त्याला पण करून रणांगणामध्ये जिंकलें; तेव्हा त्याने अत्यंत संतुष्ट होऊन आपल्या नांवाचे बिरुद त्या भीष्माच्या पायांत घातले ४३.
अधिक संतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम ।
भीष्मा तुज कदा बाधिना काम । वर परम दीधला ॥ ४४ ॥
इतकेच नव्हे, तर परशुराम ह्याहीपेक्षा अधिक प्रसन्न झाले व म्हणाले की, माझ्या ब्रह्मचर्यव्रताचा असा नेमच आहे की, भीष्मा ! तुला कामाची बाधा कधीच व्हावयाची नाही. असा त्यांनी त्याला उत्तम वर दिला ४४,
जनकसंतोषाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें ।
वार्धक्य घेऊनि आपणें । सुखी करणें शंतनु ॥ ४५ ॥
ज्याने आपल्या बापाचा संतोष व्हावा, म्हणून त्याला आपलें तारुण्य दिले, आणि आपण वार्धक्य घेऊन शंतनूला सुखी केले ४५;
पित्यानें दीधलें आशीर्वादा । ‘ऐक भीष्मा अतिप्रबुद्धा ।
वार्धकीं क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा बाधेना’ ॥ ४६ ॥
तेव्हां पित्यानेही त्याला आशीर्वाद दिला की, “हे बुद्धिमान् भीष्मा ! ऐक. वार्धक्यामध्ये शक्ति क्षीण होऊन येणारी आपत्ति तुला कधीही बाधावयाची नाहीं” ४६.
यालागीं जंव जंव म्हातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन ।
काळाची शक्ति खुंटली जाण । न करवे क्षीण भीष्मासी ॥ ४७ ॥
ह्यामुळे जो जो अधिक अधिक म्हातारपण येऊ लागळें, तो तो त्याचा प्रताप वाढतच गेला. काळाची शक्तीच खुंटली. त्याच्याने भीष्माला क्षीण करवेना ४७.
यालागीं तोडरीं काळ काम । आंकणा रिघाला परशुराम ।
हाचि धर्मिष्ठीं ‘वरिष्ठधर्म’ । हें साजे नाम भीष्मासी ॥ ४८ ॥
म्हणून त्याने आपल्या पायामध्ये काळ, काम आणि परशुराम या तिघांचीही बिरुद बांधली होती. ‘धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ’ असा तो होता. म्हणून भीष्माला हेंच नांव (धर्मभृतांवर’) शोभत होतें ४८.
ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारीं । देवासी लावूनियां हारी ।
निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिज्ञेची ॥ ४९ ॥
ज्याच्या प्रतिज्ञेच्या निर्धाराने कृष्णालाही हार खायला लावून निःशस्त्राला शस्त्रधारी केलें. एवढी ज्याच्या प्रतिज्ञेची योग्यता ! ४९.
न मोडतां भजनमर्यादा । युद्धीं मिसळोनि गोविंदा ।
हारी लावूनियां मुकुंदा । चरणारविंदा लागला ॥ १५० ॥
भजनमर्यादा न मोडतां श्रीकृष्णाला युद्धांत हारीस आणून तो त्याच्या पायीं लागला १५०.
आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रें सांडिलीं दूरीं ।
पुढती बाण भेदितां जिव्हारीं । शस्त्र करीं न धरीच ॥ ५१ ॥
नंतर निर्वाणींची शपथ वाहून त्याने शस्त्रास्त्रे दूर टाकून दिली व मर्माच्या ठिकाणी शत्रूचे बाण लागले तरी हातात शस्त्र म्हणून धरलेच नाही ५१.
बाणीं खडतरलें जिव्हार । विकळता देखोनि थोर ।
भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥ ५२ ॥
बाणांनी मर्मस्थान फोडल्यामुळे अत्यंत व्याकुळता आली असें पाहून भीष्माने निश्चय केला आणि देहत्यागाला तो सिद्ध झाला ५२.
हें दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकतां उत्तर ।
काळासी करूनियां दूर । स्वशरीर राखिलें ॥ ५३ ॥
परंतु हें अति घोर दक्षिणायन आहे असें ऐकून, काळाला दूर सारून आपल्या शरीराचे रक्षण केले ५३;
मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरीं ।
त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋषीश्वरीं परिवारिला ॥ ५४ ॥
आणि मग आपल्या दृढ निश्चयाप्रमाणे त्याने शरपंजरावर शयन केलें असतां मोठमोठ्या ऋषिसमुदायाच्या परिवारांत धर्मराजाने त्यास प्रश्न केला ५४.
आम्हां सकळां देखतां । जाहला युधिष्ठिर पुसता ।
तेचि पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ५५ ॥
आमच्या सर्वांच्या समक्ष युधिष्ठिराने विचारली, तीच पुरातन कथा मी तुला सांगतों ५५.
निवृत्ते भारते युद्धे सुहृन्निधनविह्वलः ।
श्रुत्वा धर्मान् बहून्पश्चान्मोक्षधर्मानपृच्छत ॥ १२ ॥
[श्लोक १२] भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविह्वळ झाला होता तेव्हा त्याने भीष्मांकडून पुष्कळ धर्मांचे विवरण ऐकल्यानंतर, मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. (१२)
मी संधि करितां श्रीकृष्ण । तें न मानीच दुर्योधन ।
व्यासें वर्जितां आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥ ५६ ॥
मी श्रीकृष्ण उभयतांचा संधि करण्यासाठी गेलो होतो, पण दुर्योधनानें तें मानले नाही. व्यासांनीही त्याचा निषेध केला असता तो गर्वाने युद्धालाच तयार झाला ५६.
एवं दैवबळें कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारीं ।
सापत्‍न दुर्योधनादि वैरी । सपरिवारीं मारिले ॥ ५७ ॥
तात्पर्य, दैवयोगानें कुरुक्षेत्रामध्ये कौरवपांडवांच्या युद्धांत दुर्योधनादि सापत्न वैरी सहपरिवार मारले गेले ५७.
युद्ध निवर्तल्यापाठीं । धर्म बैसल्या राज्यपटीं ।
तेणें अभिमान घेतला पोटीं । महादोषी सृष्टीं मी एक ॥ ५८ ॥
युद्ध समाप्त झाल्यानंतर धर्मराज राज्यपदारूढ झाला, तेव्हा त्याच्या अंतःकरणांत देहाभिमान उत्पन्न झाला की, ‘पृथ्वीमध्ये महापातकी असा काय तो मीच एक होय’ ५८.
मी राज्यीं बैसवितां आपण । म्हणें म्यां मारिला गुरु ब्राह्मण ।
म्यां मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्यां मारिला ॥ ५९ ॥
मी त्याला राज्यावर बसविल्यानंतर तो म्हणाला, मी माझ्या ब्राह्मणगुरूला मारलें ; कर्णदुःशासनाला मी मारलें ; व राजा दुर्योधनही मीच मारला ५९.
उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरु जाण तत्त्वतां ।
तें सांडोनियां सर्वथा । ‘अहं कर्ता’ म्हणे धर्म ॥ १६० ॥
येथे खरोखर उत्पत्ति, स्थिति व प्रलयकर्ता एक ईश्वरच असतां तें सारे सोडून देऊन धर्मराज ह्या साऱ्याचा ‘कर्ता काय तो मीच’ असे म्हणू लागला १६०.
देहाभिमानाचे खटाटोपीं । थोर हो‍ऊनियां अनुतापी ।
गोत्रहंता मी महापापी । ऐसें आरोपी निजमाथां ॥ ६१ ॥
देहाभिमानाच्या यातायातीत गुंतून मोठ्या पश्चात्तापानें, आपल्याच कुलगोतांचा घात करणारा असा आपण महापातकी आहे, असा आरोप त्याने आपल्या माथ्यावर घेतला ६१.
त्यासी द्यावया समाधान । समयो भीष्माचें निर्याण ।
तेथें म्यां नेउनियां जाण । धर्में केले प्रश्न ते ऐका ॥ ६२ ॥
तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी भीष्मनिर्याणाची संधि साधून मी त्याला त्यांच्याकडे नेऊन त्यांनाच प्रश्न करविले. ते धर्माने केलेले प्रश्न आता ऐक ६२.
राजधर्म दानधर्म । पुशिला तेणें आपद्धर्म ।
मुख्यत्वें पुशिला ‘मोक्षधर्म’ । उत्तमोत्तम परियेसीं ॥ ६३ ॥
त्यानें ‘राजधर्म’ विचारला; ‘दानधर्म’ विचारला; ‘आपद्धर्म’ विचारला व मुख्यत्वेकरून उत्तमोत्तम असा ‘मोक्षधर्म’ही विचारला. तोच आतां ऐक ६३.
तानहं तेऽभिधास्यामि देवव्रतमुखाच्छ्रुतान् ।
ज्ञानवैराग्यविज्ञान श्रद्धाभक्त्युपबृंहितान् ॥ १३ ॥
[श्लोक १३] त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. (१३)
ते भीष्ममुखींचे मोक्षधर्म । म्यां परिशिले अतिउत्तम ।
जे निरसिती भवभ्रम । सकळ कर्मदाहक ॥ ६४ ॥
ते भीष्माच्या मुखातून निघालेले अतिउत्तम असे मोक्षधर्म मी श्रवण केले. त्यांच्या योगाने संसाराचा भ्रम दूर होतो व सर्व कर्म दग्ध होऊन जातें ६४.
ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती ।
भीष्में सांगितली धर्माप्रती । ते मी निश्चितीं सांगेन ॥ ६५ ॥
ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, भक्ति, अनित्याचा नाशवंतपणा व वैराग्यस्थिति इत्यादींविषयीं भीष्मांनी धर्माला सांगितले. तेच मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों ६५.
म्हणणें भीष्मासी ‘देवव्रत’ । तेणें देवावरी ठेवूनि चित्त ।
शरपंजरीं सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥ ६६ ॥
भीष्माला ‘देवव्रत’ असें म्हणतात. याचे कारण देवावरच चित्त ठेवून, निश्चयपूर्वक आत्मानुसंधान धरून, स्वस्थांत:करणाने शरपंजरावर तो पहुडला होता ६६.
तेणें सांगितला मोक्षधर्म । त्यांत मुख्यत्वें ‘ज्ञान’ प्रथम ।
तें ज्ञान सांगे पुरुषोत्तम । अतिउत्तम अवधारीं ॥ ६७ ॥
त्याने मोक्षधर्म सांगितला. त्यांत मुख्यत्वेकरून प्रथम ‘ज्ञान’ सांगितले. तेच अत्युत्तम ज्ञान पुरुषोत्तम सांगत आहेत ते ऐकावें ६७.
नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै ।
ईक्षेताथैकमप्येषु तञ्ज्ञानं मम निश्चितम् ॥ १४ ॥
[श्लोक १४] उद्धवा ! ज्या ज्ञानाने, प्रकृती, पुरूष, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही नऊ, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कम]द्रिये आणि एक मन ही अकरा, पाच महाभूते आणि तीन गुण ही आठ, अशी ही एकूण अठ्ठावीस तत्त्वेच सर्व कार्यांमध्ये आहेत, तसेच या सर्वांमध्ये एकच परमात्मतत्त्व व्यापून आहे, असे पाहिले जाते, तेच परोक्ष ज्ञान होय, हे माझे निश्चित मत आहे. (१४)
प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्षमस्वभाव ।
अहंकारासकट ‘नव’ । तत्त्ववैभव हे संख्या ॥ ६८ ॥
प्रकृति, पुरुष, महत्तत्त्व, पंचतन्मात्रा म्हणजे पांच सूक्ष्म भूते, आणि अहंकार ही सारी मिळून ‘नऊ ‘ तत्वांची संख्या आहे ६८.
‘एकादश’ बोलिजेतें । तें अकराही इंद्रियें येथें ।
‘पंच’ ते पंचमहाभूतें । ‘तिनी’ ते निश्चित तीन गुण ॥ ६९ ॥
‘अकरा’ असें जें म्हणतात, ती तेथें पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रियें व एक मन; आणि ‘पांच’ म्हणजे पंचमहाभूतें होत; आणि ‘तीन’ म्हणजे सत्व, रज व तम हे तीन गुण होत ६९.
हे तत्त्वसंख्या उणखूण । गणितां अठ्ठावीस जाण ।
इयें सर्व भूतीं समसमान । तत्त्वें जाण वर्तती ॥ १७० ॥
ही सर्व तत्त्वांची संख्या एकत्र केली म्हणजे ‘अठ्ठावीस’ होते. ही सर्व तत्त्वे सर्व प्राणिमात्रांमध्ये समसमान भावाने वागत असतात १७०.
हिरण्यगर्भादि स्थावरान्त । तत्त्वें समान गा समस्त ।
अधिक उणें नाहीं येथ । जाण निश्चित उद्धवा ॥ ७१ ॥
ब्रह्मदेवापासून तों स्थावरापर्यंत ही सर्व तत्त्वें सर्वामध्ये सारखी भरलेली आहेत. उद्धवा ! यांत खरोखर एकही अधिक किंवा उणे होत नाही, हें लक्षात ठेव ७१
तैसेंचि गा जीवचैतन्य । प्रतिबिंबलेंसे समसमान ।
जें नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥ ७२ ॥
त्याचप्रमाणे ‘जीवचैतन्य’ हेही समसमानच प्रतिबिंबित झालेले आहे. आणि तेच सर्वाचे नाम, रूप व अमिमान ह्यांस प्रकाशित करते ७२.
थिल्लरीं विहिरीं सागरीं । चंद्रमा प्रतिबिंब समचि धरी ।
तेवीं ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरीं समसाम्यें ॥ ७३ ॥
डबक्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा समुद्रामध्ये चंद्राचे प्रतिबिंब सारखेच असते; त्याप्रमाणे महादेवापासून तो माशीपर्यंत सर्वांच्या शरीरांत जीवपणा हाही सारखाच असतो ७३.
भूतें समसमान चैतन्य । एकात्मता देखणें जाण ।
या नांव गा ‘शुद्धज्ञान’ । माझाही जाण हा निश्चय ॥ ७४ ॥
प्राणिमात्रामध्ये चैतन्य हें समसमानच असल्यामुळे सर्वांचा आत्मा एकच आहे, असे समजणे याचेच नांव ‘शुद्ध ज्ञान’ आणि माझेही ठाम मत तेंच आहे ७४.
आतां विज्ञानाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
ते श्लोकार्धें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ७५ ॥
आता विज्ञानाचेही सारे लक्षण तुला सांगतों. तेंच अर्ध्या श्लोकांत श्रीकृष्ण सांगत आहेत ७५.
एतदेव हि विज्ञानं न तथैकेन येन यत् ॥
पूर्वीं देखतेनी स्वभावें । व्यापक वस्तूनियें सर्वें ।
पूर्वी पाहात असल्याप्रमाणे व्यापक अशा परब्रह्मानें देहादिक सारी तत्त्वे व्यापलेली आहेत, असें तो अगदी जीवाभावाने निश्चितपणे पाहातो ७६.
व्यापिलीं असती देहादि तत्त्वें । हें मानी जीवेंभावें निश्चित ॥ ७६ ॥
जेवीं कां घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश ।
ज्याप्रमाणे घटादिकांला अंतर्बाह्य आकाशच व्यापलेले असते, त्याप्रमाणे साऱ्या प्रपंचाला चिदाभासच व्यापून राहिलेला आहे ७७.
तेवीं सकळ प्रपंचास । चिदाभास व्यापक ॥ ७७ ॥
ऐसें जें कां शुद्ध ज्ञान । तें ज्ञेयप्राप्तीचें कारण ।
असें जें शुद्ध ज्ञान, तेच ज्ञेयप्राप्तीला कारण असते आणि ज्ञेय प्राप्त झाले की, ते ज्ञान वृत्तीसह लोपून जातें (हेंच विज्ञान होय) ७८.
ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तींसीं ॥ ७८ ॥
ज्ञानैकगम्य वस्तु जे । यालागीं त्या ‘ज्ञेय’ म्हणिजे ।
ते केवळ ज्ञानानेच जाणले जाते, म्हणून त्याला ‘ज्ञेय’ असे म्हणतात. आणखी ज्ञेय प्राप्त झाले की, सूर्याच्या तेजानें काजवा लाजून जातो, त्याप्रमाणे ते ज्ञानही लज्जायमान होते ७९.
ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं कां सूर्यतेजें खद्योत ॥ ७९ ॥
जळीं रिघाल्या लवण । लवणपणा मुके जाण ।
मीठ पाण्यात शिरलें असतां मिठाचा मीठपणाच नाहीसा होतो. त्याप्रमाणे ज्ञेय प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचा ज्ञातेपणाच नाहीसा होतो १८०.
तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपण हारवी ॥ १८० ॥
ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपीं चिन्मात्रैक एक ।
ज्ञेयाची यथार्थ प्राप्ति झाली की, स्वरूपांत केवळ चिन्मात्रताच राहाते तेव्हां व्याप्य-व्यापक व साधकबाधक असें कांहीं राहातच नाही ८१.
तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ॥ ८१ ॥
जेवीं उदेलिया गभस्ती । सतारा लोपे रोहिणीपती ।
सूर्योदय झाला म्हणजे नक्षत्रांसहवर्तमान चंद्र जसा लोपून जातो, त्याप्रमाणे ज्ञेयाच्या प्राप्तीपुढे साऱ्या जगासहवर्तमान ज्ञानसंपत्तीचाही लोप होऊन जातो ८२.
तेवीं जगेंसीं ज्ञानसंपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥ ८२ ॥
ऐसें अपरोक्ष नव्हतां साङ्ग् । देहादि प्रपंचाचें लिंग ।
अशा प्रकारचें सांख्य अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत झालेले नसते, तोपर्यंत देहादिक जें प्रपंचाचे स्वरूप आहे तें व जग हें आत्म्याहून भित्र असें तो मानतो, आणि कोरड्या शब्दांनी ब्रह्मज्ञानाची वटवट करतो ८३.
आत्म्यवेगळें देखे जग । शब्दें लगबग ब्रह्मज्ञाना ॥ ८३ ॥
शुद्ध शाब्दिक जें ब्रह्मज्ञान । तेहीं गुणात्मक जाण ।
असें जें शुद्ध शाब्दिक महाज्ञान, तेही त्रिगुणात्मकच असते, आणि परब्रह्म वस्तु तर निराकार व निर्गुण आहे; तिला जन्मही नाही आणि मरणही नाही असें समज ८४.
वस्तु निराकार निर्गुण । जन्ममरण तिशी नाहीं ॥ ८४ ॥
त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीं प्रस्तुत ।
त्रिगुणात्मक म्हणून जेवढे आहे, तेवढे सारें नाशवंतच आहे. याविषयींच येथें नाशवंत व साकार यांचे निरूपण आतां श्रीकृष्ण सांगत आहेत ८५.
सांगताहे श्रीकृष्णनाथ । अंतवंत साकार ॥ ८५ ॥
*(उत्तरार्ध) स्थित्युत्पत्त्यप्ययान्पश्येद्‍भावानां त्रिगुणात्मनाम् ॥ १५ ॥
[श्लोक १५] ही अठ्ठावीस तत्त्वे न पाहाता त्यांत व्यापून असलेले एक परमात्मतत्त्वच अनुभवणे याला विज्ञान. (साक्षात्कार) म्हणतात तसेच त्याच तत्त्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती, स्थिती व लय होतात, हे जाणावे. (१५)
जरी नसतें नाशवंत । तरी सगुण मानूं येतें सत्य ।
उत्पत्तिस्थितिनिदानवंत । जाण येथ त्रिगुणाचि ॥ ८६ ॥
जर नाशवंत नसते, तर सगुण सत्यच आहे असे मानले असते. येथे तीन गुण आहेत त्यांनाच उत्पत्ति, स्थिति व लय आहे ८६.
रजोगुणें होय उत्पत्ति । सत्वगुणें कीजे स्थिती ।
तमोगुण नाशी अंतीं । हा गुणप्रवृत्ती-स्वभावो ॥ ८७ ॥
रजोगुणाने उत्पत्ति, सत्त्वगुणाने स्थिति आणि तमोगुणाने शेवटीं नाश होतो. हा गुणांच्या वृत्तीचा स्वभावच आहे ८७.
या गुणांमाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकर्म प्रकाशे ।
परी जन्ममरणादि दोषें । अलिप्त वसे अविनाशी ॥ ८८ ॥
या गुणांमध्ये परब्रह्म असतेच; त्याच्याच योगाने गुणांचे कार्य प्रकाशित होते; परंतु ती वस्तु जन्ममरणादि दोषांना अलिप्त असते व अविनाशीच राहाते ८८.
जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकर्में वर्तत ।
ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥ ८९ ॥
जी वस्तु तिन्ही गुणांना आश्रयभूत असते, जिच्या योगानेच गुणांची कर्में चालतात, ती तीन गुणांहून अगदी निराळी आहे. तेंच श्रीकृष्ण सांगतात ८९.
आदावन्ते च मध्ये च सृज्यात्सृज्यं यदन्वियात् ।
पुनस्तत्प्रतिसंक्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥ १६ ॥
[श्लोक १६] अशा प्रकारे जे परमात्मतत्त्व सुरूवातीला आणि शेवटी असते, तेच एका कार्यातून दुसर्‍या कार्यात अनुस्यूत होत राहाते आणि प्रलयकाळी उत्पन्न झालेले सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहाते, तेच ‘सत्‌’ तत्त्व होय. (१६)
गुणां आदि-मध्य-अवसानीं । सृष्टिउत्पत्ति-स्थिति-निदानीं ।
जें असे अविनाशपणीं । तें मी मानीं संतत्वें ॥ १९० ॥
गुणांच्या आधीं, मध्ये व अंतीं, तसेंच सृष्टीच्या उत्पत्ति, स्थिति व लयाच्या वेळी जें अविनाशरूपाने राहाते, तेच ‘संत’ म्ह. शाश्वत तत्त्व आहे असें मी समजतों १९०.
तेंचि संतत्व गा ऐसें । ज्याचेनि आधारें जग वसे ।
जें जगा सबाह्य भरलें असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥ ९१ ॥
ते ‘संतत्व’ असे की, ज्याच्या आधाराने जग राहात आहे, आणि जें जगाच्या अंतर्बाह्य भरलेलें आहे आणि ज्याच्या योगेंकरून जग प्रकाशित होते ९१.
हें जगचि होय जाये । परीं तें संचलेंचि राहे ।
ऐशी जे निजवस्तु आहे । ते तूं पाहे संतत्वें ॥ ९२ ॥
हे जगच उत्पन्न होते आणि लयास जातें ; पण तें तत्त्व कायमच असते. अशी जी आत्मवस्तु आहे, तीच सत्य आहे असें तूं समज ९२.
जैसे घटमठ होती जाती । आकाश राहे सहजगती ।
तेवीं ब्रह्मांडा लयोत्पत्ती । वस्तूची स्थिती संचली ॥ ९३ ॥
ज्याप्रमाणे घट आणि मठ होतात आणि जातात, पण आकाश असते तसेंच असते; त्याचप्रमाणे ब्रह्मांडाची उत्पत्ति व लय झाला तरी, परब्रह्म असते तसेच साठलेलें असतें ९३.
जेवीं अलंकारपूर्वीं सोनें । अलंकारीं सोनें सोनेंपणें ।
अलंकारनाशीं नासों नेणे । जेवीं कां सोनें निजस्थिती ॥ ९४ ॥
अलंकार करण्यापूर्वी असलेले सोनें, अलंकार केले तरी त्यांत सोनेपणानेंच असते; किंवा अलंकार मोडले तरी सोने असते त्याप्रमाणेच असते. त्याचा काही त्या अलंकाराबरोबर जसा नाश होत नाही ९४.
तेवीं आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार ।
होतां जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ॥ ९५ ॥
त्याप्रमाणे चराचराला व्यापून परब्रह्म हें अखंडाकारच असते. कोणताही आकार किंवा विकार उत्पन्न झाला किंवा मोडला तरी त्या परब्रह्माला अणुमात्र विकार होत नाहीं ९५.
ऐशी जे वस्तु अखंडपणें । तिच्या ठायीं चार प्रमाणें ।
इहीं प्रमाणीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वें ॥ ९६ ॥
अशा प्रकारची अखंडपणाने राहाणारी जी परब्रह्मरूप वस्तु आहे. तिला चार प्रमाणे आहेत. त्या प्रमाणांवरून ती वस्तु जाणावी आणि प्रपंच हा मिथ्या आहे असे समजावें ९६.
श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं चतुष्टयम् ।
प्रमाणेष्वनवस्थानाद्विकल्पात्स विरज्यते ॥ १७ ॥
[श्लोक १७] वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणून विवेकी पुरूष भेदबुद्धीचा त्याग करतो. (१७)
एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दुसरें आणिक कांहीं नाहीं ।
प्रपंच मिथ्या वस्तूचे ठायीं । हें प्रमाण पाहीं ‘वेदवाक्य’ ॥ ९७ ॥
जिकडे तिकडे सारें एक अद्वैत परब्रह्मच आहे. दुसरें आणखी काही एक नाही. त्या परब्रह्मामध्ये हा प्रपंच मिथ्या भासाचा आहे. याला वेदवाक्य प्रमाण’ आहे ९७.
‘प्रत्यक्ष’ देखिजे आपण । देहादिकांचें नश्वरपण ।
हें दुसरें परम प्रमाण । जें क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥ ९८ ॥
देहादिकांची क्षणभंगुरता आपण प्रत्यक्ष पाहातोच. प्रपंचाच्या क्षणिकत्वाचे दुसरें ‘प्रत्यक्ष प्रमाण’ होय ९८.
मार्कंडेयो आणि भुशुंडी । इंहीं प्रपंचाची राखोंडी ।
देखिली गा रोकडी । वेळां कोडी कल्पांतीं ॥ ९९ ॥
मार्कंडेय आणि भृशुंडी यांनी कोट्यवधि कल्पातांच्या वेळी प्रपंचाची राखरांगोळी झालेली डोळ्यांनी पाहिली आहे ९९.
महाजनप्रसिद्ध हें श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण ।
हें तिसरें गा प्रमाण । उद्धवा जाण ‘ऐतिह्य’ ॥ २०० ॥
असे मोठमोठ्यांच्या मुखातून आपण अनेक वेळा ऐकलेलें आहे हें प्रपंचाच्या नश्वरपणाचे तिसरें ‘ऐतिहासिक प्रमाण’ होय २००.

शास्त्रप्रसिद्धी अनुमान । मिथ्या प्रपंचाचें भान ।
दिसे मृगजळासमान । वस्तुतां जाण असेना ॥ १ ॥
शास्त्रप्रसिद्धीवरून आणि अनुमानानेही प्रपंचाचा भास मिथ्याच आहे. तो मृगजळासारखा दिसतो. त्यांत खरेपणा नाहीं १ .
दोर दोरपणें साचार । भ्रमें भासे नानाकार ।
काष्ठ सर्प कीं मोत्यांचा हार । ना हे जळधार जळाची ॥ २ ॥
दोर खरोखर दोराच्याच रूपाने असतो; परंतु भ्रमानें तो अनेक आकाराचा दिसतो. हे काय लाकूड का साप? की मोत्यांचा सर? की ही पाण्याची धार पडलेली आहे कांहींच समजत नाही २.
तेवीं वस्तु एक चिद्‍घन । तेथ भ्रमें मतवाद गहन ।
हें शून्य किंवा सगुण । कर्मधर्माचरण तें मिथ्या ॥ ३ ॥
तद्वत् परब्रह्म हे एक असून चैतन्यधन आहे. त्याबद्दल भ्रमानें अनेक प्रकारच्या मतांचे वाद माजून राहातात. कोणी शून्य म्हणतात, कोणी सगुण म्हणतात. कर्मधर्माचरणही मिथ्या आहे म्हणतात ३.
यापरी करितां ‘अनुमान’ । मिथ्या प्रवृत्तिप्रपंचज्ञान ।
हें वेदान्तमत प्रमाण । सत्य जाण उद्धवा ॥ ४ ॥
याप्रमाणे ‘ अनुमानप्रमाणाने पाहिले असताही प्रवृत्ति किंवा प्रपंचभास हा मिथ्याच ठरतो ४.
तंतूवेगळा पट कांहीं । योजेना आणीकिये ठायीं ।
तेंवी ब्रह्मावेगळा पाहीं । प्रपंचु नाहीं सत्यत्वें ॥ ५ ॥
उद्धवा ! वेदांताचे खरे आणि प्रमाणसिद्ध मत हेंच होय. तंतूवांचून वस्त्र काही निराळे ठिकाणी असत नाही, त्याप्रमाणे प्रपंचही काही ब्रह्माहून वेगळेपणाने सत्यरूपांत नाही ५.
चहूं प्रमाणीं प्रपंचस्थिती । मिथ्या साधिली निश्चितीं ।
ते प्रपंचीं विषयासक्ती । सांडूनि विरक्ती धरावी ॥ ६ ॥
प्रपंचाचे मिथ्याच श्रुति, प्रत्यक्ष, ऐतिह्य व अनुमान ह्या चारी प्रमाणांनी सिद्ध होते, याकरिता त्या प्रपंचांतील विषयांची आसक्ति सोडून देऊन वैराग्य धारण करावें ६.
येचिविखींचें निरूपण । स्वयें सांगताहे नारायण ।
उभय लोकीं विषयध्यान । तें मिथ्या जाण अमंगळ ॥ ७ ॥
ह्याविषयींच श्रीकृष्ण स्वतः निरूपण सांगत आहेत. विषयांचे चिंतन हें मिथ्या असून तें इहलोकीं व परलोकी अमंगळच आहे ७.
कर्मणां परिणामित्वादाविरिञ्चादमङ्गलम् ।
विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥ १८ ॥
[श्लोक १८] जसे या लोकातील भोग नाशवान आहेत, त्याप्रमाणे यज्ञादी कर्मांच्या फलस्वरूप मिळणारी स्वर्गादी ब्रह्मलोकापर्यंतची सर्व सुखे अमंगल, दुःखदायी आणि नाशवान आहेत, असे विवेकी माणसाने जाणावे. (१८)
करूनि कर्मांचें साधन । पाविजे लोक तो नश्वर जाण ।
आदिकरूनि ब्रह्मसदन । नश्वरत्वें जाण अमंगळ ॥ ८ ॥
यज्ञयागादि कर्मसाधन करून जो लोक प्राप्त होतो, तो नश्वर असतो हें लक्षात ठेव. ब्रह्मलोक आदिकरून जे जे लोक आहेत ते सारे नश्वरच असल्यामुळे अमंगलच होत ८.
जें ते लोकींचें सुख गहन । तें विखें रांधिलें जैसें अन्न ।
खातां गोड परिपाकें मरण । तेवीं अधःपतन स्वर्गस्था ॥ ९ ॥
त्या लोकांत जे मोठे सुख म्हणून सांगितले आहे. विष घालून शिजविलेल्या अनाप्रमाणे असते. विषयुक्त अन्न खातांना गोड वाटते. पण शेवटी मृत्यु येतो: त्याप्रमाणे स्वर्गात राहाणाऱ्यालाही अखेरीस अधःपतनच घडते ९.
जैसा देखिला हा लोक येथ । तैसाचि स्वर्गभोग तेथ ।
जे दोन्ही जाण अंतवंत । नाश प्राप्त दोंहीसी ॥ २१० ॥
हा लोक जसा येथे दिसतो. तसाच स्वर्गभोगही तेथे दिसतो. दोन्ही नाशवंतच. दोहींनाही नाश हा आहेच २१०.
काळें पांढरें दोनी सुणीं । जेवीं सम अपवित्रपणीं ।
तेवीं इहपरलोक दोन्ही । नश्वरपणीं समान ॥ ११ ॥
काळे कुत्रे काय आणि पांढरे कुत्रे काय, अमंगळपणांत दोन्ही सारखीच. त्याप्रमाणे नश्वरपणाने इहलोक आणि परलोक दोन्ही सारखेच आहेत ११.
इहामुत्र भोगासक्ती । यांवरी धरावी विरक्ती ।
या नांव ‘वैराग्यस्थिती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥
ह्याकरिता उद्धवा ! इहलोकांतील किंवा परलोकांतील सुखोपभोगाविषयीं नेहमी विरक्तिच धारण करावी. ह्याचेंच नांव वैराग्य होय १२.
मागील तुझी प्रश्नस्थिती । पुशिली होती माझी भक्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं निजबोधें ॥ १३ ॥
आता तू पूर्वींच्या आपल्या प्रश्नांत माझी भक्ति विचारली होतीस, तीच आतां तुला मी माझ्या मताप्रमाणे यथार्थपणे सांगतों १३.
भक्तियोगः पुरैवोक्तः प्रीयमाणाय तेऽनघ ।
पुनश्च कथयिष्यामि मद्‍भक्तेः कारणं परम् ॥ १९ ॥
[श्लोक १९] हे पुण्यशील उद्धवा ! भक्तियोगाचे स्वरूप मी तुला यापूर्वीच सांगितले आहे; परंतु तो ऐकण्याची तुला अतिशय आवड आहे म्हणून मी तुला माझी भक्ती प्राप्त होण्याचे श्रेष्ठ साधन सांगतो. (१९)
पूर्वीं भक्तीची महत्ख्याती । तुज सांगितली निजस्थिती ।
ते भक्तीची तुज अति प्रीती । तरी मी मागुतीं सांगेन ॥ १४ ॥
भक्तीचे माहात्म्य केवढे मोठे आहे तें मी तुला पूर्वी सांगितलेच आहे. त्या भक्तीवरच तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळे पुन्हाही ती मी तुला सांगतों १४.
ऐक उद्धवा पुण्यमूर्ती । ज्यासी आवडे माझी भक्ती ।
तो मज पढिया त्रिजगतीं । भजनें परम प्राप्ती मद्‍भक्तां ॥ १५ ॥
हे पुण्यमूर्ति उद्धवा ! ऐक. ज्याला माझ्या भक्तीची आवड असते, तो साऱ्या त्रिभुवनांत मला प्रिय होतो. कारण माझ्या भजनानेच माझ्या भक्तांना परमपदाची प्राप्ति होते १५.
ते भक्तीचें निजलक्षण । प्रथम भूमिका आरंभून ।
देवो सांगताहे आपण । येथें सावधान व्हावें श्रोतां ॥ १६ ॥
त्या भक्तीचे लक्षण पहिल्या भूमिकेपासून देव आपण होऊन सांगत आहेत. ह्याकरितां श्रोत्यांनी आतां सावध व्हावें १६.
श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम् ।
परिनिष्ठा च पूजायां स्तुतुभिःस्तवनं मम ॥ २० ॥
[श्लोक २०] माझ्या अमृतमय कथांविषयी श्रद्धा ठेवावी नेहमी माझ्या गुणांचे आणि नामांचे संकीर्तन करावे माझी पूजा करण्यात अत्यंत निष्ठा ठेवावी आणि स्तोत्रांच्याद्वारे माझी स्तुती करावी. (२०)
अमृतरूपा ज्या माझ्या कथा । श्रद्धायुक्त श्रवण करितां ।
फिकें करूनियां अमृता । गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे ॥ १७ ॥
अमृतासारख्या ज्या माझ्या कथा आहेत, त्या भक्तिपूर्वक श्रवण केल्या असता, त्यांच्यापुढे प्रत्यक्ष अमृतही फिके पडून तत्काळ भक्तिमार्गाची गोडी लागते १७.
अमर अमृतपान करिती । तेही शेखीं मरोनि जाती ।
माझें कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥ १८ ॥
देव हे अमृतपान करतात, पण तेसुद्धा शेवटीं मरण पावतात : परंतु जे माझें कथामृत सेवन करतात, ते कळिकाळालासुद्धा नागवतात १८.
सेवितां कथासारामृत । अतिशयें जाहले उन्मत्त ।
मातले मरणातें मारित । धाकें पळे समस्त संसारु ॥ १९ ॥
कथासारामृत सेवन केलें म्हणजे ते अतिशय उन्मत्त होतात, आणि त्या धुंदींत मरणालाच मारीत सुटतात. त्यामुळे त्यांच्या धाकानेंच सारा संसार पळत सुटतो १९.
सेवितां कथामृतसार । मद्‍भावीं रंगलें अंतर ।
तैं माझे गुण माझें चरित्र । गाती सादर उल्हासें ॥ २२० ॥
माझें कथामृतसार प्राशन केले असतां माझ्या भक्तीमध्ये त्यांचे अंतःकरण रंगून जाते. त्यामुळे ते माझे गुण व चरित्र अत्यादराने उल्हासपूर्वक गातात २२०.
माझे नाम माझीं पदें । नाना छंदें अद्वैतबोधें ।
कीर्तनीं गाती स्वानंदें । परमानंदें डुल्लत ॥ २१ ॥
माझे नांव, माझी पदें, अद्वैतबोधाने नानाप्रकारच्या छंदांनी कीर्तनामध्ये मोठ्या आनंदाने गातात आणि परमानंदाने डुलत राहतात २१.
सप्रेम संभ्रमाचे मेळीं । गर्जती नामाच्या कल्लोळीं ।
नामासरिसी वाजे टाळी । जाहली होळी महापापां ॥ २२ ॥
मोठ्या समारंभाच्या वेळी अत्यंत प्रेमानें नामसंकीर्तनाचा गजर करीत असतात व नामघोषाबरोबर टाळ्यांवर टाळ्या वाजवितात, त्यायोगें महापापांचीही होळी होऊन जाते २२.
ऐशिया कीर्तनाचे आवडीं । जाहलीं प्रायश्चित्तें देशधडी ।
तीर्थें हो‍ऊनि ठेलीं बापुडीं । फिटलीं सांकडीं जपतपांचीं ॥ २३ ॥
अशी कीर्तनाची आवड उत्पन्न झाली, म्हणजे शास्त्रोक्त प्रायश्चित्तें देशोधडीला लागतात, तीर्थे बापुडवाणी होऊन बसतात आणि जपतपांची संकटें नाहींशी होतात २३.
ऐकोनि कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार ।
रिकामें यमकिंकर । यमें पाशभार लपविला ॥ २४ ॥
कीर्तनाचा गजर ऐकून यमलोकींचा व्यापार खुंटून जातो. यमदूतांना काही काम न राहिल्यामुळे ते रिकामे हिंडू लागतात. आणि यमधर्म आपल्या पाशांचा भारा लपवून ठेवतो २४.
देखोनि कीर्तनाची गोडी । देव धांवे लवडसवडीं ।
वैकुंठींहूनि घालीं उडी । अतितांतडीं स्वानंदें ॥ २५ ॥
कीर्तनाची गोडी पाहून देव लवकर लवकर धावत येतो. वैकुंठाहून तो अत्यंत आनंदाने झपाट्याने उडी घालतो २५.
ऐसा कीर्तनाचा गजर । करितां नित्य निरंतर ।
त्या अधीन मी श्रीधर । भुललों साचार कीर्तनें ॥ २६ ॥
असा कीर्तनाचा नित्यनिरंतर जो गजर करितो, त्याच्या आधीन मी श्रीकृष्ण होतो. कीर्तनाने खरोखरच मला इतकी भूल पडते २६.
जैसें कीर्तन तैशीच पूजा । आदरें पूजी गरुडध्वजा ।
पुष्पादिसंभारसमाजा । अतिवोजा घमघवीत ॥ २७ ॥
कीर्तनाप्रमाणेच तो माझें गरुडध्वजाचे पूजनही मोठ्या आदरानें करितो. सुगंधित पुष्पादिकांच्या सामग्रीने घवघवीत पूजा बांधतो २७.
अतिनिष्ठा सावधान । यापरी करी माझें पूजन ।
माझी स्तुति माझें स्तवन । रिकामा अर्ध क्षण जावों नेदी ॥ २८ ॥
ह्याप्रमाणे अत्यंत निष्ठेने व सावधानतेने माझे पूजन करून माझे स्तुतिस्तोत्रही गात राहातो. अर्धा क्षणही फुकट जाऊ देत नाही २८.
आदरः परिचर्यायां सर्वाङ्गैरभिवन्दनम् ।
मद्‍भक्तपूजाऽभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः ॥ २१ ॥
[श्लोक २१] माझ्या सेवेमध्ये आदर ठेवावा मला साष्टांग नमस्कार करावा माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने करावी आणि सर्व प्राण्यांमध्ये मला पाहावे. (२१)
‘इंद्रिये’ वेंचिलीं पूजाविधानें । ‘वाचा’ वेंचली हरिकीर्तनें ।
‘हृदय’ वेंचलें माझेनि ध्यानें । ‘अष्टांग’ नमनें वेंचले ॥ २९ ॥
तो आपली ‘इंद्रिये’ पूजाविधानाकडे योजतो; ‘वाणी’ हरिकीर्तनाकडे अर्पण करतो; ‘ह्रदय ‘ माझ्या ध्यानात मग्न करितो; आणि ‘अष्टांगें’ नमस्काराकडे लावतो २९.
ऐसा अत्यादरे वाडेंकोडें । सबाह्य वेंचला मजकडे ।
माझे भक्त देखिल्या पुढें । हरिखें मजकडे येवोंचि विसरे ॥ २३० ॥
अशा प्रकारे अत्यंत आवडीने तो अंतर्बाह्य मलाच विकलेला असतो; पण माझे भक्त पाहताक्षणीच त्या आनंदाच्या भरांत तो माझ्याकडे यायलाच विसरतो २३०.
माझे भक्त भाग्यें येती घरा । तैं पर्वकाळ दिवाळी दसरा ।
तेथें तीर्थें धांवती माहेरा । जेवीं सासराहूनि कुमारी ॥ ३१ ॥
माझे भक्त मोठ्या भाग्यानेच घरी येत असतात. त्या वेळी तोच दिवाळी दसऱ्याचा सण म्हणून समजावें. मुलगी जशी सासराहून माहेराला यावी, त्याप्रमाणे त्या ठिकाणी सारी तीर्थे धावत येतात ३१.
पहावया भक्तपूजेची आवडी । सनकादिकांची पडे उडी ।
नारदप्रल्हादादि भक्तकोडी । चढोवढी धांवती ॥ ३२ ॥
भक्तपूजेची आवडी पाहण्याकरितां सनकादिकांच्यासुद्धा उड्या पडतात. नारद, प्रल्हादादिक भक्तांच्या झुंडीच्या झुडी धावत येतात ३२.
तेथ सिद्ध येती गा अलोटें । सुरवरांचे टेक फुटे ।
महानुभवांचा ढीग दाटे । पितर नेटेंपाटें धांवती ॥ ३३ ॥
त्या ठिकाणी सिद्ध असंख्य गोळा होतात; मोठमोठ्या देवांचे तर पेंवच फुटते. महात्म्यांचे थवेच्या घवे दाटतात, व पितर धापा टाकीत धावत येतात ३३.
वेदांसी रिघावा न घडे । विधि निर्बुजला मागें मुरडे ।
माझ्या भक्तपूजेचेनि कोडें । दारापुढें थाट दाटे ॥ ३४ ॥
वेदांचा तर तेथे रिघावच होत नाहीं; विधिविधाने लाजून मागेंच फिरतात. ह्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या पूजेच्या कौतुकाने दारापुढे गर्दीच गर्दी उसळते ३४.
मद्‍भक्तपूजेचिया उल्हासा । मज टक पडे हृषीकेशा ।
इतरांचा पाड काइसा । भक्तपूजनीं ऐसा महिमा आहे ॥ ३५ ॥
मोठ्या उत्कर्षानं माझ्या भक्ताची केलेली पूजा पाहून मला कृष्णालासुद्धा भुरळ पडते. मग इतरांची कथा काय ? भक्तपूजेचे माहात्म्य इतके आहे ३५.
मागां सांडूनि माझी पूजा । जेणें मद्‍भक्त पूजिले वोजा ।
तेणें मज पूजिलें अधोक्षजा । परिवारसमाजासमवेत ॥ ३६ ॥
माझी पूजाही मागे टाकून जो माझ्या भक्ताची प्रेमानें पूजा करितो, त्याने माझी श्रीकृष्णाची सकललोकांसहवर्तमान सहपरिवार पूजा केली म्हणून समजावें ३६.
प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । भक्त माझ्या सचेतन मूर्ति ।
त्यांसी पूजिल्या मीं श्रीपती । यथानिगुतीं संतोषें ॥ ३७ ॥
कारण माझ्या प्रतिमा या अचेतन व्यक्ति व भक्त म्हणजे माझ्या बोलत्या चालत्या मूर्ति होत. तेव्हां त्यांची यथासांग पूजा केली असता मला भगवंताला संतोष होतो ३७.
जैसा मद्‍भाव मद्‍भक्तीं । तोचि भावो सर्वांभूतीं ।
नानाकार भूताकृती । परी आत्मस्थिती अविकार ॥ ३८ ॥
जसा मद्भाव माझ्या भक्तांच्या ठिकाणी ठेवावयाचा, तसाच भाव सर्व भूतांमध्येही धरावयाचा; कारण भूताकृति जरी निरनिराळी असली, तरी त्या सर्वांमध्ये आत्मस्थिति अविकारच असते ३८.
दिसे देहाकृती मुंडली । तीतें म्हणती हे रांडली ।
परी आत्म्याची रांड नाहीं जाहली । असे संचली आत्मस्थिति ॥ ३९ ॥
देहाचे केशवपन केले म्हणजे ती रंडकी झाली असे म्हणतात, परंतु आल्याची काही रांड होत नाही. आत्मस्थिति जशाची तशीच असते ३९.
दीर्घ वक्र आणि वर्तुळ । दिसती भिन्न भिन्न इंगळ ।
परी अग्नि एकचि केवळ । तेवीं भूतें सकळ मद्‌रूपें ॥ २४० ॥
निखारे पाहिले असतां एक लाबट, एक वांकडा, एक वाटोळा, असे निरनिराळ्या आकाराचे दिसतात; पण अग्नि मात्र एकच असतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र मत्स्वरूपच आहेत २४०.
चित्रांमाजीं नानाकृती । पाहतां अवघी एकचि भिंती ।
तेवीं मी चिदात्मा सर्वभूतीं । निजभावें निश्चितीं जाणावा ॥ ४१ ॥
भिंतीवरच्या चित्रांमध्ये पाहू गेले तर निरनिराळ्या आकृति दिसतात, पण त्यांमध्ये भिंत जशी एकच असते, त्याप्रमाणे मी चिदात्मा सर्व प्राणिमात्रांत भरलेला आहे हेंच निजभावाने निश्चित समजावें ४१.
सांडूनि अहंकार दुजा । सर्व भूतीं भावो माझा ।
हे उत्तमोत्तम माझी पूजा । मज अधोक्षजा पढियंती ॥ ४२ ॥
दुसरी गोष्ट ही की, दुजेपणाचा अहंकार सोडून देऊन सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना धरणे ही माझी सर्वात श्रेष्ठ पूजा होय. आणि मला श्रीकृष्णाला तीच अत्यंत प्रिय आहे ४२.
ऐशी जो माझी पूजा करी । तो मज पढियंता गा भारी ।
मी सर्वांगे राबें त्याच्या घरीं । तो मजवरी मिराशी ॥ ४३ ॥
अशा रीतीनें जो माझी पूजा करतो, तो मला अत्यंत आवडता होतो; मी सर्वांगाने त्याच्या घरी राबतों. कारण त्याचे माझ्यावर स्वामित्व असते ४३.
त्याच्या चेष्टांची जे गती । तेचि माझी भजनस्थिती ।
हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती सांगता ॥ ४४ ॥
त्याची जी जी कांहीं कृति असते, तें तें माझें भजनच होते. हेंच श्रीकृष्ण आपल्या मुखानें उद्धवाला सांगतात ४४.
मदर्थेष्वङ्गचेष्टा च वचसा मद्‍गुणेरणम् ।
मय्यर्पणं च मनसः सर्वकामविवर्जनम् ॥ २२ ॥
[श्लोक २२] आपले सर्व व्यवहार फक्त माझ्यासाठीच करावेत वाणीने माझ्याच गुणांचे वर्णन करावे आणि आपले मन मलाच अर्पण करून सर्व कामना सोडून द्याव्यात. (२२)
लौकिक शरीर कर्मगती । तद्वारा निपजे माझी भक्ती ।
अभिनव माझी भजनस्थिती । सांगों किती उद्धवा ॥ ४५ ॥
लौकिक कर्म असो अथवा इतर कोणतेही शारीर कर्म असो, त्या कर्मद्वारा माझी भक्ति उत्पन्न होते. उद्धवा! माझ्या भजनाचे स्वरूप मोठे नवलाईचे आहे ! तें तुला किती म्हणून सांगावें ? ४५.
बैसोनियां हाटवटीं । सांगतां लौकिकीही गोष्टी ।
त्यांमाजीं माझे कीर्तन उठी । मद्‍गुणें गोमटी गर्जे वाचा ॥ ४६ ॥
तो भक्त चव्हाट्यावर बसून चकाट्या पिटीत राहिला, तरीसुद्धा त्यांत माझें कीर्तन उत्पन्न होते. त्याची रसाळ वाणी मद्गुणगायनानें गर्जना करते ४६.
स्वधर्मकर्मक्रिया करणें । तेही अर्पी मजकारणें ।
मजवेगळें कांहीं करणें । करूं नेणे अणुमात्र ॥ ४७ ॥
तो स्वधर्मकर्मक्रिया करतो, तीही मलाच अर्पण करतो. मला सोडून अणुमात्रही दुसरें कांहीं करावयाचे त्याला कळत नाही ४७.
सर्वेंद्रियांचिये स्थितीं । सहजें निपजे माझी भक्ती ।
माझें नाम माझी कीर्ती । वाचा रिती राहो नेणे ॥ ४८ ॥
त्याच्या साऱ्या इंद्रियांच्या कर्मात माझी भक्ति आपोआप उत्पन्न होते. माझ्या नामाशिवाय किंवा गुणानुवादाशिवाय त्याच्या वाणीला रिकामें राहावयाचे ठाऊकच नसते ४८.
मनासी आवडे जें जें कांहीं । ते तें अर्पी मजचि पाहीं ।
शेखीं आपुलें मन तेंही । माझ्या ठायीं समर्पीं ॥ ४९ ॥
त्याच्या मनाला जें जें कांही आवडते, तें तें तो मलाच अर्पण करतो. आणि शेवटी आपले मन असतें तें सुद्धा तो मलाच वाहून टाकतो ४९.
माझे स्वरूपाचे ठायीं जाण । केवीं घडे मनाचें अर्पण ।
तेचिविषयींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २५० ॥
आतां, मन माझ्या स्वरूपामध्ये कसे अर्पण होते, त्याविषयींच श्रीकृष्ण स्वतः निरूपण करून सांगतात २५०.
मदर्थेऽर्थपरित्यागो भोगस्य च सुखस्य च ।
इष्टं दत्तं हुतं जप्तं मदर्थं यद्व्रतं तपः ॥ २३ ॥
[श्लोक २३] धन, भोग आणि सुखाचा माझ्यासाठी त्याग करावा आणि यज्ञ, दान, हवन, जप, व्रत आणि तप असे सर्व काही माझ्यासाठीच करावे. (२३)
मी परमात्मा परम स्वार्थ । ऐसा करूनि निश्चितार्थ ।
वेंचिती धन धान्य सर्वार्थ । निजपरमार्थ साधावया ॥ ५१ ॥
मी जो परमात्मा तोच आपला खरा स्वार्थ आहे, असा निश्चय ठेवून, निजपरमार्थ साधण्याकरिता धनधान्यादि सर्वस्व खर्च करितात ५१.
परमार्थ साधावया अव्यंग । साचार पोटींचा विराग ।
मी भेटावया श्रीरंग । सकळ भोग सांडिती ॥ ५२ ॥
परमार्थ पूर्णपणे साध्य करण्याकरितां पोटामध्ये खरें खरें वैराग्य पाहिजे असते. म्हणून मला श्रीकृष्णाला भेटण्यासाठी साऱ्या सुखोपभोगाचा त्याग करतात ५२.
छत्र चामर हस्ती घोडे । त्यागून होती गा उघडे ।
ऐसें वैराग्य धडपुडें । मज रोकडें पावावया ॥ ५३ ॥
छत्र, चामरें, हत्ती, घोडे इल्यादि सारे वैभव सोडून देऊन खक बनतात, माझ्यापर्यंत येऊन पोचावयाचे असेल, तर असेंच कडकडीत वैराग्य पाहिजे ५३.
माझें पावावया निजसुख । द्रव्यदारापुत्रादिक ।
त्यागूनि सांडिती निःशेख । यापरी देख अनुतापी ॥ ५४ ॥
माझे निजसुख प्राप्त करून घेण्यासाठी बायकामुले व धनधान्य इत्यादि चट सारे टाकून देतात. इतका त्यांना अनुताप होतो ५४.
आवडीं करितां माझें भजन । विसरे भोगाची आठवण ।
माझे प्राप्तीलागीं जाण । रिता क्षण जावों नेदी ॥ ५५ ॥
आवडीने माझे भजन करू लागले म्हणजे भोगाची आठवणच विसरतात. खरा भक्त माझ्या प्राप्तीसाठी क्षणही वायां जाऊ देत नाहीं ५५.
माझेनि उद्देशें परम । करी श्रौतस्मार्त स्वकर्म ।
अग्निहोत्रादि याग परम । व्रत नेम मजलागीं ॥ ५६ ॥
माझ्या प्राप्तीच्याच उद्देशाने श्रौत स्मार्त कर्में करतो. अग्निहोत्र, यज्ञयाग, मोठमोठाली व्रतें व नेम सारे माझ्याचसाठी तो करीत असतो ५६.
माझें ठाकावया चिद्‌रूप । गायत्र्यादि मंत्रजप ।
माझें पावावया निजस्वरूप । दुष्कर तप आचरती ॥ ५७ ॥
माझें चिद्रूप प्राप्त होण्याकरितांच गायत्री आदिकरून मंत्रांचा जप करितो. दुर्धर तप आचरण करतात तेही मत्स्वरूपाची प्राप्ति होण्याकरितांच ५७.
मी विश्वात्मा विश्वतोमुखी । विश्वंभर होतसें सुखी ।
यालागीं तो दीनमुखीं । करी आवश्यकीं अन्नदान ॥ ५८ ॥
मी विश्वंभर सर्वव्यापी व सर्वतोमुखी असल्यामुळे तो गोरगरिबांच्या मुखीं अन्नदान करितो, तेणेकरून मी सुखी होत असतों ५८.
हृदयीं मी स्वतःसिद्ध जाण । त्या माझें करूनि आवाहन ।
आपण करी जें भोजन । तेंही मदर्पण तो करी ॥ ५९ ॥
हृदयांत मी स्वतःसिद्धच असतो, त्या माझे आवाहन करून तो भोजन करतो, व तेही मलाच अर्पण करितो ५९.
कवळकवळीं हरिस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण ।
यापरी माझे भक्त जाण । कर्म मदर्पण स्वयें करिती ॥ २६० ॥
प्रत्येक घासाघासाला हरीचे स्मरण केलें म्हणजे ते अन्नच पूर्ण ब्रह्म होतें. अशा रीतीने माझे भक्त आपण होऊनच आपलें सारें कर्म मला अर्पण करतात २६०.
ऐशीं सर्व कर्में कृष्णार्पण । सर्वदा जो करी जाण ।
त्यांचे मन होय मदर्पण । तेंचि निरूपण देवो सांगे ॥ ६१ ॥
अशा रीतीने सदासर्वदा आपली सर्व कर्में जो कृष्णार्पण करतो, त्याचे मनही मलाच अर्पण होते. तेच निरूपण देव सांगतात ६१.
एवं धर्मैर्मनुष्याणामुद्धवात्मनिवेदिनाम् ।
मयि सञ्जायते भक्तिः कोऽन्योऽर्थोऽस्यावशिष्यते ॥ २४ ॥
[श्लोक २४] उद्धवा ! जे लोक या धर्मांचे पालन करून मला समर्पित होतात, त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो मग त्याला आणखी काय मिळायचे शिल्लक राहणार ? (२४)
सर्व कर्में मदर्पण । करितां शुद्ध होय मन ।
जेवीं लोह कमावितां जाण । होय दर्पण सोज्ज्वळ ॥ ६२ ॥
लोखंड कमावून त्यावर उत्तम झिलई आणली, तर त्याचा आरसा होतो. त्याचप्रमाणे सारी कर्में मलाच अर्पण केली म्हणजे मनही शुद्ध होते ६२.
पुटीं घालितां सुवर्ण । अधिक तेज चढे जाण ।
करितां वस्त्राचें क्षाळण । स्वच्छपण धोवटी ॥ ६३ ॥
सोन्याला जो जो पुटांत घालावें, तो तो त्याला अधिकाअधिकच तेज चढते ; किंवा वस्त्र धूत गेले असता तेंही अधिक स्वच्छ होते ६३.
तैसीं सर्व कर्में मदर्पण । करितां निर्मळ होय मन ।
ते काळीं मनाचें अर्पण । मद्‌रूपीं जाण हों लागे ॥ ६४ ॥
त्याप्रमाणे सारी कर्में मला अर्पण केली , म्हणजे मनही निर्मळ होते, आणि मन शुद्ध झाले की लगेच ते माझ्या स्वरूपांतच अर्पण होऊ लागते ६४.
पूर दाटलिया सरितांसी । सवेग ठाकती सिंधूसी ।
तेवीं निर्मळत्वें मनासी । माझ्या स्वरूपासी पावणें ॥ ६५ ॥
नद्यांमध्ये पुराचें पाणी येऊन भरलें, म्हणजे त्या फोफावत जाऊन समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे मन निर्मळ झाले की. तेही मत्स्वरूपालाच येऊन मिळते ६५.
माझे स्वरूपीं मनाचे स्थिती । तैं आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।
हे तीनही ते काळीं हारपती । माझी भक्ती चौथी उल्हासे ॥ ६६ ॥
माझ्या स्वरूपांत मन स्थिर होते, त्या वेळी आर्त, जिज्ञासु अर्थार्थी हे तिन्ही प्रकार नाहीसे होऊन चौथी भक्तिच तेथे प्रकट होते ६६.
माझें भांडवल मज एक भक्ती । तेथ दुजी तिजी आणि चौथी ।
हे साधकांची साधनभ्रांती । बहुता भक्ती मज नाहीं ॥ ६७ ॥
भक्ति हेंच एक माझे भांडवल आहे. त्यांत दुसरी, तिसरी, चौथी, असे समजणे ही साधकांची निवळ भ्रांति आहे. मला काही अनेक भक्ति नाहीत ६७.
तेचि माझी मुख्य भक्ती । येणें साधनें होय प्राप्ती ।
जे भक्तीस्तव भक्त म्हणविती । ब्रह्मा उमापती सनकादिक ॥ ६८ ॥
तीच एक असलेली माझी श्रेष्ठ भक्ति या साधनाने प्राप्त होते; ब्रह्मदेव, शंकर, सनकादिक याच भक्तीवरून माझे भक्त म्हणवीत असतात ६८.
निःशेष मावळल्या अहंकृती । भूतें निजात्मरूप दिसती ।
माझ्या स्वरूपाची ‘सहजस्थिती’ । ते माझी मुख्य भक्ती उद्धवा ॥ ६९ ॥
अहंकार निखालस नाहींसा झाला , म्हणजे सारे प्राणिमात्र आत्मस्वरूपच दिसू लागतात. उद्धवा! माझ्या स्वरूपाची जी ‘सहजस्थिति’ तीच माझी श्रेष्ठ भक्ति होय ६९.
ये भक्तीच्या लेशस्थितीं । आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।
प्रकाशले गा वर्तती । निजस्वार्थी साधक ॥ २७० ॥
या श्रेष्ठ भक्तीचा एक अंश प्राप्त झाला तरी आर्त जिज्ञासू व अर्थार्थी हे सज्ञान होऊन वागत असतात. ते खरे साधक होऊन निजस्वार्थ साधतात २७०.
हेचि आर्ताच्या विषयीं । आर्तीतें प्रकाशी पाहीं ।
मग ‘आर्त’ ऐसे त्याच्या ठायीं । नांवाची नवायी उपतिष्ठे ॥ ७१ ॥
हीच भक्ति आर्ताच्या ठिकाणी परमार्थाविषयीं आर्ति उत्पन्न करते. मग ‘आर्त’ ह्या नांवाला नवाच अर्थ लागतो ७१.
रोगिया नांव आर्तता । हें व्याख्यान नव्हे परमार्था ।
भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा । ते आर्तता परमार्थी ॥ ७२ ॥
रोग्यालाही ‘आर्त’ असें नांव आहे. पण परमार्थाविषयांत तसा अर्थ घेणे योग्य नाही. मनामध्ये भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा उत्पन्न होणे याचेच नांव परमार्थातील ‘आर्तता’ होय ७२.
जो भगवंताचे प्राप्तीलागीं । कडां घालूं धांवे वेगीं ।
कां रिघों पाहे जळते आगीं । तो ‘आर्ता’ सावेगीं बोलिजे ॥ ७३ ॥
जो भगवंताच्या प्राप्तीसाठी कड्यावरून उडी घालावयाला सुद्धा धावतो, किंवा जळत्या आगीतसुद्धा शिरूं पाहतो, त्यालाच खरोखर ‘आर्त’ असे म्हणतात ७३.
आर्ताची स्थिति ऐसी । जिज्ञासु निवारी त्यासी ।
मनुष्यदेह ब्रह्मप्राप्तीसी । तो आत्महत्येसी नको योजूं ॥ ७४ ॥
आर्ताची स्थिति अशी असते; परंतु जिज्ञासु तशा साहसाचे निवारण करतो. तो म्हणतो, मनुष्यदेह हा ब्रह्मप्राप्तीला कारण आहे. त्याचा आत्महत्येनें नाश करूं नको ७४.
मागील भक्त कोणें रीतीं । जाणोनि पावले भगवद्‍भक्ती ।
जीवेंभावें त्या विवरी युक्ती । ‘जिज्ञासु’ निश्चितीं या नांव ॥ ७५ ॥
पूर्वीच्या भक्तांनी कोणत्या रीतीने भगवद्भक्ति संपादन केली, ती रीत जाणून घेऊन जीवाभावाने त्या युक्तीचे विवरण करितो व त्याप्रमाणे वागतो, त्याचेच नांव ‘जिज्ञासु’ ७५.
मज जाणावयाची ऐशी जे आशा । तीतें म्हणती शुद्ध ‘जिज्ञासा’ ।
तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणें जाणें ॥ ७६ ॥
मला जाणण्याची अशी जी आशा, तिलाच खरी ‘जिज्ञासा’ म्हणतात. तीच माझ्या स्वरूपाला प्रकाशित करते म्ह. दाखविते. त्यामुळेच त्यांना ‘जिज्ञासु’ असें मी समजतों ७६.
ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा । या नांव ‘शुद्ध-जिज्ञासा’ ।
वेदशास्त्रजाणीववळसा । ‘लौकिक-जिज्ञासा’ त्या नांव ॥ ७७ ॥
परब्रह्मास पोंचावयाच्या युक्तीचा जो ठसा, त्याचेंच नांव ‘शुद्ध-जिज्ञासा’ होय. वेदशास्त्राच्या अर्थ ज्ञानासंबंधाने जी खटपट, तिला ‘लौकिक जिज्ञासा’ असें नांव आहे ७७.
सर्वां अर्थीं मीचि अर्थना । शुद्ध ‘अर्थार्थी’ या नांव जाणा ।
म्हणती अर्थार्थीं द्रव्यकामना । ते मंद व्याख्याना प्रवर्तती ॥ ७८ ॥
तसेच प्रत्येक अर्थामध्ये माझेच मागणे अथवा मला शोधणे याचे नांव ‘शुद्ध अर्थार्थी’ हे लक्षात ठेव. अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा असे जे म्हणतात, ते चुकीचा अर्थ करतात म्हणून समजावे ७८.
दृष्टी पडे नाना अर्थीं । जो विवंचोनि लावी परमार्थीं ।
त्या नांव बोलिजे ‘अर्थार्थीं’ । त्यातेंही निजभक्ती प्रकाशे माझी ॥ ७९ ॥
जगामध्ये अनेक अर्थ किंवा वस्तु दृष्टीस पडतात, त्यांचा विचार करून जो परमार्थाकडेच दृष्टी लावतो, त्यालाच ‘अर्थार्थी’ म्हणतात. त्यालाही माझी भक्ति प्रकाशित होते ७९.
एवं आर्त-जिज्ञासु-अर्थार्थी । त्यांतें प्रकाशे माझी ‘सहजभक्ती’ ।
तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागें ॥ २८० ॥
अशा प्रकारें आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी यांना माझी ‘सहजभक्ति’ प्रकाशित होते. त्या भक्तीलाच भक्त आपल्या अधिकाराच्या स्थितीप्रमाणे चार प्रकारची मानतात ८०’
भक्त कल्पनेचिया भ्रांती । माझी भक्ति चतुर्धा मानिती ।
ते मिथ्या गा वदंती । माझी निजभक्ती एकली ॥ ८१ ॥
भक्त हे आपल्या कल्पनाभ्रांतीनें माझी भक्ति चार प्रकारची मानतात. पण ती गोष्ट खोटी. माझी निजभक्ति म्हणून जी आहे, ती एकी एक आहे ८१.
ऐशिये निजभक्तीची प्राप्ती । आत्मनिवेदनाची स्थिती ।
उद्धवा म्यां तुजप्रती । यथानिगुतीं निरूपिली ॥ ८२ ॥
अशी माझी निजभक्ति कशी प्राप्त करून घ्यावयाची, आत्मनिवेदनाची स्थिति कशी असते, हे मी उद्धवा! तुला स्पष्ट करून सांगितलें ८२.
माझिये निजभक्तीचें सार । भक्त पावले जे साचार ।
त्यांचे सर्वही व्यापार । मदाकार हो‍ऊनि ठाकती ॥ ८३ ॥
ज्या भक्तांच्या हातांत ह्या माझ्या भक्तीचे सार खरोखरी आले , त्यांचे सारे व्यापार मद्रूपच होऊन राहतात ८३.
तो जेउती वास पाहे । ते दिशाचि मी हो‍ऊनि ठायें ।
तो जेउतें चालवी पाये । ते धरा मी होयें धराधर ॥ ८४ ॥
तो जिकडे लक्ष लावून बघतो, ती दिशाच मी होऊन राहतो. तो आपले पाय जिकडे चालवितो, तिकडील जमीनही मीच होतो ८४.
तो करूं बैसल्या भोजन । षड्रस होय मी आपण ।
त्यासी करावया प्राशन । निजजीवन मी होयें ॥ ८५ ॥
तो भोजन करावयास बसला, तर मीच षडस होतो. आणि प्राशन करण्याकरितां उदकही मीच होतो ८५.
त्यासी चालतां निजपदीं । बोधें दृष्याची निवारीं मांदी ।
शांति पायघड्या घाली आधीं । करी पदोपदीं निंबलोण ॥ ८६ ॥
तो निजपदांनी चालू लागला म्हणजे मी निजबोधाने पुढील दृश्य समुदाय नाहींसा करून टाकतों. आणि शांति अगोदरच पायघड्या घालून पावलागणिक लिंबलोण उतरते ८६.
शम दम आज्ञाधारी । हात जोडूनि उभे द्वारीं ।
ऋद्धिसिद्धी दासी घरीं । विवेक कामारी घरींचा सदा ॥ ८७ ॥
शम दम हे आज्ञाधारक होऊन दारामध्ये हात जोडून उभे असतात. ऋद्धिसिद्धि या घरामध्ये बटकीसारख्या राबत असतात, व विवेक तर घरचा नेहमींचा चाकरच होऊन राहिलेला असतो ८७.
त्याचा बैसता अवकाश । अंगें मी होय हृषीकेश ।
तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आंथुरीं ॥ ८८ ॥
त्याची बसावयाची जागा मीच होऊन राहतो. तो स्वस्थपणे झोपावा म्हणून मीच त्याला समाधीचें अंथरूण घालून देतों ८८.
तो जे कांहीं बोल बोले । ते निःशब्द ब्रह्म-शब्दा आलें ।
यालागीं श्रोत्यांसी वहिलें । होय भलें समाधान ॥ ८९ ॥
तो जे काही शब्द बोलतो, त्यांत निःशब्द ब्रह्मच शब्दरूपाने प्रगट होत असते, म्हणून ऐकणारांनाही चांगले समाधान वाटते ८९.
तो अवलीला बोले वोठीं । शब्दासवें माझी गोठी उठी ।
श्रोत्यांची तेथ पडे मिठी । स्वभावें गोठी ऐकतां ॥ २९० ॥
तो तोंडाने सहज जरी बोलू लागला, तरी त्या बोलाबरोबर माझेच गुणानुवाद बाहेर पडतात. यामुळे त्याच्या गोष्टी ऐकतांना स्वभावत:च श्रोत्यांची मिठी पडते २९०.
चढतां परेचे उपरी । वैकुंठ कैलास पायरी ।
उन्मनी घालोनि बाहेरी । सुखशेजारीं तो पहुडे ॥ ९१ ॥
तो परावाणीच्या वर जातांना वैकुंठ व कैलास ह्यांच्या पायऱ्या करितो व उन्मनी अवस्थेला बाहेर घालवून सुखशय्येवर निजत असतो ९१.
मिळोनियां मुक्ती चारी । पाणी वाहती त्याच्या घरीं ।
श्रीसहित राबें मी श्रीहरी । येरांची थोरी कोण पुसे ॥ ९२ ॥
चारही मुक्ति एकत्र होऊन त्याच्या घरी पाणी वाहातात. मी प्रत्यक्ष श्रीहरिसुद्धा लक्ष्मीसहवर्तमान त्याच्या घरांत राबतों. मग इतरांच्या मोठेपणाला विचारतो कोण? ९२.
अवचटें ये त्याच्या मुखासी । म्हणे ज्यासी ‘तूं उद्धरिलासी’ ।
तो माथां वाहें मी हृषीकेशी । शब्दें निजधामासी पाववीं वेगीं ॥ ९३ ॥
अकस्मात त्याच्या तोंडांतून ‘तूं उद्धरलास’ असें ज्याच्या संबंधाने आले, त्याला मी हृषीकेश माथ्यावर धरितों व त्याच्या वचनामुळे त्याला निजधामाला पोचवितों ९३.
जे पावले माझी ‘सहजभक्ती’ । त्यांचे लळे पाळीं मी या रीतीं ।
त्यांची मज अनन्य प्रीती । सांगों किती उद्धवा ॥ ९४ ॥
ज्यांना माझी ‘सहजभक्ति’ प्राप्त झाली, त्यांचे सारे लळे मी अशा रीतीने पुरवितों. उद्धवा! आणखी किती सांगावे? त्यांची मला अनन्य प्रीति असते ही मी तुला किती सांगू ? ९४.
बहुत बोलीं काय कारण । मी देहो तो आत्मा जाण ।
तो माझा जीवप्राण । हे जाणती खूण निजभक्त ॥ ९५ ॥
अधिक बोलण्यात अर्थ काय? मी देह आणि तो आत्मा आहे असें तूं समज म्हणजे झाले. तो माझा जीवप्राण असतो. ही खूण निजभक्तांनाच माहीत असते ९५.
नांदतां ‘सहजभक्ती’ आंत । मी देवो तो माझा भक्त ।
येरवीं मी सगळा त्याआंत । तो समस्त मजमाजीं ॥ ९६ ॥
सहजभक्तीमध्ये नांदत असला म्हणजे मी देव आणि तो माझा भक्त असतो. एरवी मी साराच त्याच्या आंत, आणि तो सारा माझ्या आंत ९६.
निजभक्त मजभीतरीं । मी तया आंतबाहेरी ।
ऐसे सामरस्यें नांदों भारी । वेगळे बाहेरीं नाममात्र ॥ ९७ ॥
माझ्या भक्त माझ्यामध्ये आणि मी त्याच्या आंत बाहेर, असे एकरूपानेच निरंतर राहात असतो. नांवाने मात्र बाहेर वेगळे ९७.
माझिया सायुज्या जे आले । ते मीचि हो‍ऊनियां ठेले ।
परी मी हो‍ऊनि मज भजलें । ते ‘भक्त’ मानिले म्यां ऐसे ॥ ९८ ॥
जे माझ्या सायुज्याला आले ते मीच होऊन राहिले; परंतु मी होऊन जे मला भजतात त्यांना मी ‘भक्त’ असे समजतों ९८.
सायुज्यापरीस भक्ति गोड । याचि निरूपणांचे कोड ।
उद्धवा तुझी जाणोनि चाड । विशद निवाड सांगितला ॥ ९९ ॥
उद्धवा ! सायुज्यमुक्तीपेक्षाही भक्ति गोड आहे; ह्याच निरूपणाची तुला आवड. ३ जाणूनच मी तुला निवाडा करून सांगितला ९९.
ऐशिया माझ्या निजभक्तांसी । अवशेष अर्थ नुरेचि त्यांसी ।
मी तुष्टलों गा हृषीकेशी । निज भावासी सर्वस्वें ॥ ३०० ॥
अशा माझ्या निजभक्तांना दुसरा लाभ म्हणून काही बाकीच राहात नाही. मी श्रीहरि त्यांच्या निजभावानेच सर्वस्वी संतुष्ट होतो ३००.

‘भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र’ । तें निजभक्तीचें निजसार ।
तुज मी सांगितले साचार । अत्यादरपूर्वक ॥ १ ॥
भागवतशास्त्र हें भक्तिप्रधान आहे. त्यांतील निजमक्तीचे सार मी तुला अत्यादरपूर्वक यथार्थ रीतीने कथन केलें १.
उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजें । मज गुह्यांचें निजगुह्य हें जें ।
तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥ २ ॥
उद्धवा ! तुझ्या आवडीच्या निमित्ताने हे माझे गुह्यांतील गुह्य अशी जी भक्ति, त्या भक्तीचा मेवा करून मोठ्या आवडीनें तुला मी दिला आहे २.
म्यां सांगितलें जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती ।
ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥ ३ ॥
मी ज्या रीतीने आतां सांगितले, त्याच रीतीने माझी श्रेष्ठ भक्ति आचरण करावी. असें म्हणता म्हणतां श्रीकृष्णांनी उद्धवाला प्रेमाने उचलले ३.
मागां टाकूनि पीतांबरें । सांडोनियां शंखचक्रें ।
उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥ ४ ॥
पीतांबर मागें सारला : शंख चक्र टाकून दिले; आणि श्रीहरीनें उद्धवाला उचलून घेतले. तरीसुद्धा देवाचे प्रेम आवरेना ४.
हांव न बाणेचि दों करीं । मग चारी भुजा पसरी ।
उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥ ५ ॥
दोहों हातांनी काही पुरेसे होईना, म्हणून मग चारही हात पसरले. आणि प्रेमाने उद्धवाला हृदयाशी कवटाळून धरले ५.
हृदयीं हृदय एक जाहलें । ये हृदयींचें ते हृदयीं घातिलें ।
कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥ ६ ॥
हृदयामध्ये हृदय एक होऊन गेले. या हृदयांत होतें तें त्या हृदयांत घातले. याप्रमाणे कृष्णांनी आपले सर्वस्व उद्धवाच्या हृदयांत घालून सोडले ६.
देव आवाप्तकाम निचाड । त्यासीही भक्तीची ऐसी चाड ।
अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥ ७ ॥
श्रीहरि अवाप्तकाम व निरिच्छ; पण त्यालासुद्धा भक्तीची एवढी आवड. म्हणून उद्धव त्याला इतका गोड लागला व त्याचे स्वानंदाने सर्व कोड पुरविलें ७.
उद्धव प्रेमाचा लवलाहो । आलिंगन सोडूं विसरे देवो ।
कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥ ८ ॥
उद्धवाच्या प्रेमाची देवाला इतकी आवड की, देव मिठी सोडावयाचीही विसरून गेले. आणि पाहा! कृष्णाच्या हृदयाला हृदय जडल्यामुळे उद्धवही उद्धवपणाला विसरला ८.
ऐसे स्वानंदीं वाडाकोडा । दोघेहि मिसळले निचाडचाडा ।
भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥ ९ ॥
अशा प्रकारें आनंदाने व आवडीनें दोघेही निष्काम प्रेमामध्ये बुडून गेले. उद्धव तर भक्तिसुखाच्या समृद्धीमध्ये बुडूनच गेला ९.
कृष्णें सर्वस्व आपुलें । उद्धवाचे हृदयीं सूदलें ।
हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥ ३१० ॥
कृष्णानी आपले सर्वस्व उद्धवाच्या हृदयांत घातलें . परंतु ते उद्धवाला कळू मात्र दिले नाही. श्रीहरीने एक मोठा चमत्कार केला हा ३१०.
हा अर्थ कळल्या उद्धवासी । हा ये‍ईल मजसी ऐक्यासी ।
पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥ ११ ॥
कारण ( देव म्हणतात) उद्धवाला हें हृद्गत कळलें तर हा माझ्याशी ऐक्याला येईल; मग पुढची सुरस कथा कोणापाशी सांगावी?” ११.
उद्धवा मज वाडेंकोडें । अखंड हेंचि बोलों आवडे ।
परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥ १२ ॥
उद्धवाकडे प्रेमाने निरंतर असेंच बोलावयाला आवडते. याचे कारण तसा श्रोता दुसरा मिळत नाही. मला हेच मोठे संकट वाटते १२.
भक्तिसुखाचा सुरवाड । सांगतां माझें पुरे कोड ।
ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥ १३ ॥
भक्तिसुखाची थोरवी सांगतांना माझी हैास पूर्ण होईल असा गोड श्रोता आणावा कोठून ? म्हणून उद्धवाच्या आड प्रेम ठेवून दिलें १३.
सूर्यापासूनि फांकती किरण । तैसें सुटलें आलिंगन ।
कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥ १४ ॥
सूर्यापासून किरण फांकतात (सुटतात) त्याप्रमाणे त्याची मिठी सुटली, आणि कृष्ण व उद्धव हे मिन भिन्न झाले. तरी पण त्यांची अभिन्नता कांहीं मोडली नाही १४.
पुढील कथेची संगती । दूर ठेली श्लोकसंगती ।
श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥ १५ ॥
असो.(टीकाकार श्रीएकनाथ म्हणतात) पुढील कथेचा संदर्भ व श्लोकाचा संबंध दूर राहिला, असा श्रोत्यांनी मनांत विकल्प आणू नये. मुळांतील अर्थाचा नीट विचार करावा १५.
मूळींचें पद संकोचित । तेथ उत्तम भक्तिभावार्थ ।
स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तारिला ॥ १६ ॥
मुळांतील पद संक्षिप्त आहे. त्यांत श्रीकृष्णांनी स्वतः भक्तिभावार्थ उत्तम रीतीने सांगितला आहे. त्यांतील अर्थाचा मी विस्तार केला इतकेंच १६.
नारळांतल्या वस्त्राची घडी । उकलितां थोर वाढे वाढी ।
तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥ १७ ॥
नारळांत घालून आणलेल्या वस्त्राची घडी उलगडली म्हणजे ती लांबच्या लांब होते ; त्याप्रमाणे मूळ पदाचा ऊहापोह करतांना एवढा विस्तार झाला १७.
मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकीं पहावा सावचित्त ।
श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥ १८ ॥
मुळांतील पदपदांचा अर्थ श्लोकामध्ये नीट विचार करून पाहावा. म्हणजे त्या श्लोकाच्या उत्तरार्धात भगवान् ध्वनितार्थ बोलून गेल्याचे लक्षात येईल १८.
त्याचि ध्वनिताचे पोटीं । होती भक्तिरहस्याची पेटी ।
ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥ १९ ॥
त्या ध्वनितार्थाच्या पोटांतच भक्तिरहस्याची पेटी होती; तीच उघडी करून मी दाखविली. ह्याकरितां ही व्यर्थ बडबड आहे असे म्हणू नये १९.
तंव श्रोते म्हणती नवल येथ । मूळींचें पद होतें गुप्त ।
तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥ ३२० ॥
तेव्हां श्रोते म्हणाले, केवढे हे आश्चर्य ! मुळामध्ये पद अत्यंत गूढ होते, त्यांतून श्रीहरीच्या मनातील भक्तिसारामृत तूं काढलेंस ३२०.
तुझे हृदयीं श्रीकृष्णनाथ । प्रकटोनि आपुलें हृद्‍गत ।
ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥ २१ ॥
तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णनाथ प्रगट होऊन आपले हृद्गतच ग्रंथामध्ये तुझ्याकडून बोलवीत आहे, हे आम्हांला पक्कं कळून चुकले २१.
आम्हा ऐकतां भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उथळत ।
होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥ २२ ॥
हें भक्तिसासारामृत श्रवण करतांच चित्तामध्ये चैतन्य उसळू लागले. तूं खरा विचारशील आहेस म्हणूनच ग्रंथाचा अर्थ यथार्थ रीतीने करीत आहेस २२.
हें ऐकोनि संतांचे वचन । हरिखला एकाजनार्दन ।
मस्तकीं वंदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥ २३ ॥
हें संतांचे भाषण ऐकून एकाजनार्दनाला हर्ष वाटला व त्याने त्यांचे श्रीचरण मस्तकी धरले. आता पुढील निरूपण ऐका २३.
निजभक्तीचे दृढीकरण । आदरें करिताहे श्रीकृष्ण ।
सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥ २४ ॥
श्रीकृष्ण आपल्या भक्तीचे आदरपूर्वक दृढीकरण करण्याकरितांच सांगितलेले निरूपण पुढे पुन्हा सांगत आहेत २४.
यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् ।
धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चाभिपद्यते ॥ २५ ॥
[श्लोक २५] धर्माचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि ते शांत होऊन आत्मचिंतन करू लागते त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होते. (२५)
आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण ।
माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥ २५ ॥
आपलें जें अंत:करण ते मला अर्पण केलें आतां माझी भक्ति उल्हासाने वाढते, याविषयी मी पूर्वी सांगितलेच आहे २५.
मद्‌रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण ।
माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥ २६ ॥
आतां मन माझ्या स्वरूपांत अर्पण करण्याची एक सोपी युक्ति सांगतो ती लक्षात ठेव. माझे नामस्मरण केले असता त्याच्या योगाने पातकांचा नाश होतो २६.
सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम ।
निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥ २७ ॥
मनांत काही कामना धरून नामस्मरण केले असता तें नामच सर्व कामना पूर्ण करते. आणि निरिच्छपणाने नामस्मरण केले असतां सर्व पातकांचे भस्म करिते २७.
होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण ।
सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥ २८ ॥
आणि पापांचे भस्म झाले म्हणजे रज आणि तम यांना जिंकून आपोआप धर्मपरायण व धार्मिक असा जो सत्त्वगुण तो वाढतो २८.
स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें ।
वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥ २९ ॥
सत्वगुणाच्यायोगें वैराग्याचे कायमचे ठाणे बसतें. वैराग्याच्यायोगाने विषयनिर्दळण होते आणि तेणेकरून आत्मज्ञान प्रगट होतें २९.
वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान ।
चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥ ३३० ॥
विवेकासह वर्तमान ज्ञान वाढलें म्हणजे स्वरूपाचे अनुसंधान लागते आणि शांतीचे समाधान वाढत जातें त्या वेळी मन मदर्पण होते ३३०.
मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण ।
जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ३१ ॥
मन माझ्या ठिकाणी अर्पण झाले म्हणजे निजभक्ति प्रगट होते. तिचे सारें निरूपण मी मागच्या श्लोकांत सांगितलेच आहे ३१.
निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण ।
अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥ ३२ ॥
निजभक्ति पूर्णपणे प्राप्त झाली की भक्ताने न मागतांच अष्टमहासिद्धि आपण होऊन त्याच्या आंगणांत येऊन उभ्या राहतात ३२.
जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे ।
माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्‍भक्तां ॥ ३३ ॥
त्या सिद्धींकडे जो कधी ढुंकूनसुद्धा पाहात नाही, त्याला अप्राप्य अशी वस्तु कोणती राहते ? माझ्या भक्तांचे माझ्याशी ऐक्य झाल्यामुळे त्यांना माझी सारी सत्ता प्राप्त होते ३३.
ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती ।
वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥ ३४ ॥
अशी माझी भक्ति न जोडतां व आत्मस्थिति न लाभतां विषयासक्तीनें वागू लागल्यास मोठा अनर्थ कोसळतो ३४.
यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति ।
रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥ २६ ॥
[श्लोक २६] तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडेतिकडे भरकटू लागते, तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापून नश्वर विषयांत गुंतते तेव्हा त्याची स्थिती वरील स्थितीच्या उलट होते. (२६)
जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न म्हणे तो परमार्थ ।
जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥ ३५ ॥
वेदशास्त्रार्थ जो खरा मानीत नाही; परमार्थाला जो सत्य समजत नाहीं; जो घर, दार, बायकामुलें व संपत्ति यांना आसक्त होऊन विषयांनाच लुब्ध झालेला असतो ३५,
तेणें अत्यंत समळमेळें । दारुण रजोगुण खवळे ।
तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥ ३६ ॥
त्याच्यात विषयाच्या अत्यंत संघटनाने रजोगुण अतिशय क्षुब्ध होतो. आणि तेणेकरून त्याचे चित्त ज्ञानाविषयीं आंधळे होऊन राहते. त्याला ज्ञानाचा अर्थ सारा विरुद्धच दिसू लागतो ३६.
ज्यासी विषयांच्या युक्ती गहन । त्यासी म्हणती अतिसज्ञान ।
जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥ ३७ ॥
असे लोक विषयोभोगाचे ज्याला नानाविध उपाय सुचतात, त्याला मोठा ‘ज्ञानी’ असे म्हणतात ! आणि जो छलवादाच्या युक्तीने तोंड बंद करतो, त्याला ‘पंडित’ म्हणतात! ३७.
ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास म्हणती भाग्य थोर ।
जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥ ३८ ॥
ज्याचे मागे प्रपंचाचे मोठे लटांबर असते, त्याला ‘भाग्यवान् ‘ समजतात; आणि जो नानाप्रकारच्या उपभोगांनी आपल्या शरीराचे पोषण करतो, त्याला मोठा ‘पुण्यवान् ‘ पुरुष म्हणतात ३८.
जो अनुतापी परमार्थविखीं । त्यासी म्हणती परम दुःखी ।
जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥ ३९ ॥
परमार्थविषयांत जी अनुतापी असतो, त्याला मोठा ‘दुःखी’ म्हणतात; जो अनेक प्रकारच्या विषयांना पोसतो तो मोठा ‘सुखी’ समजतात ३९.
ज्याचेनि बोलें मनुष्य मरे । त्याचें सिद्धत्व मानिती खरें ।
जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥ ३४० ॥
ज्याच्या शब्दाबरोबर (शापाने) मनुष्य मरते, त्याचे ‘सिद्धत्व ‘ खरें मानतात. आणि अनाचाराने जो स्वच्छंद वागणूक ठेवतो त्यास ‘मुक्त’ असे म्हणतात! ३४०.
ज्याचा दांभिक आचार । त्यातें म्हणती पवित्र नर ।
जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥ ४१ ॥
ज्याचा आचार दांभिक असतो, तो पुरुष मोठा ‘पवित्र’ समजतात. आणखी जे स्त्रियांशूद्रादिकांना मंत्र देतात, ते मोठे ‘ज्ञाते’ मानतात! ४१.
जो कां अनुतापी वैरागी । त्यातें म्हणती अतिअभागी ।
जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥ ४२ ॥
जो अनुतापी व वैराग्यशील असतो त्याला ‘कपाळकरंटा’ असे म्हणतात! आणि जो राजरोस विषयांचा उपभोग घेतो, त्याला ‘राजयोगी’ असें मानतात! ४२.
स्वयें द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेंची त्यातें मूर्ख लेखी ।
न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥ ४३ ॥
जो स्वतः द्रव्याचा अभिलाषी असतो, तो द्रव्य खर्च करणाऱ्याला ‘मूर्ख’ लेखतो; आणि खर्च न करणाऱ्याला मोठा ‘विचारी’ व जगामधील एक मोठा ‘धर्मज्ञ’ असे म्हणतात ४३.
ज्याचे गांठी बहुसाल धन । तो सर्वांसी अवश्य मान्य ।
तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥ ४४ ॥
ज्याच्या गांठीला पुष्कळसे द्रव्य असते, तो सर्वांना मोठा ‘पूज्य’, ‘पवित्र’ आणि ‘ज्ञानी’ वाटतो. असें विपरीत ज्ञान त्यांना होऊ लागते ४४.
आपण सर्वात्मा सर्वेश । हें विसरोनियां निःशेष ।
अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥ ४५ ॥
आपण सर्वात्मा आणि सर्वेश आहोत, हे मुळीच विसरून जाऊन आपण अधर्मी, अकर्मी, दीनदुबळा व अज्ञानी असें मानू लागतो ४५.
तेथ कैं उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती ।
ऐसे भ्रमले नेणों किती । संसार‍आवर्ती वर्ततां ॥ ४६ ॥
अशा ठिकाणी माझी भक्ति कशी उत्पन्न होणार? आणि माझी प्राप्ति तरी कशाने होणार ! अशा प्रकारे संसाराच्या भोवऱ्यांत सांपडून किती लोक गिरक्या खात आहेत ह्याची गणती नाही ४६.
परमात्मप्राप्तीचीं कारणें । अतिगुह्य चारी लक्षणें ।
पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥ ४७ ॥
परमात्म्याच्या प्राप्तीला कारण अशी चार लक्षणे आहेत आणि ती अत्यंत गुह्य आहेत. ती अंत:करणांतील वात्सल्यामुळे श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात ४७.
धर्माची भजन भोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥ ४८ ॥
धर्माची मुख्य भूमिका म्हणजे भजन, त्यामुळे उत्पन्न होणारे ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य चार उपाय माझ्या प्राप्तीला अवश्य आहेत. ते चारी आतां सांगतों ऐक ४८.
धर्मो मद्‍भक्तिकृत्प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् ।
गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥ २७ ॥
[श्लोक २७] उद्धवा ! ज्याच्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते, तोच धर्म होय ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो, तेच ज्ञान होय विषयांपासून अलिप्त राहाणे हे वैराग्य होय आणि अणिमादी सिद्धी हेच ऐश्वर्य होय. (२७)
ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सांगेन मी परम ।
माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम ‘धर्म’ तो जाण ॥ ४९ ॥
उद्धवा ! आतां मुख्य वर्म आणि गुह्यांतील अयंत गुह्य असें मी तुला सांगतों तें ऐक. माझी प्रेमयुक्त जी भक्ति, तोच सर्वोत्कृष्ट ‘धर्म’ होय हें निश्चित समज ४९.
ऐक्यें एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद ।
या नांव गा ‘ज्ञान’ शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥ ३५० ॥
आणि ऐक्याने एकात्मतेचा जो साक्षात् बोध होतो, आणि पुन्हा कधीं भेद म्हणून उत्पन्न होत नाही, त्याचंच नांव ‘शुद्धज्ञान’ असें परमानंदरूप श्रीकृष्ण म्हणाले ३५०.
धनधान्य रत्नांच्या राशी । उर्वशी आल्या शेजारासी ।
तें अवघें तृणप्राय ज्यासी । ‘वैराग्य’ त्यासी आम्ही म्हणों ॥ ५१ ॥
आणि धनधान्याच्या किंवा रत्नाच्या राशीच्या राशी पुढे येऊन पडल्या, किंवा उर्वशी जरी शेजेवर आली, तरी तें सारें ज्याला तृणप्राय वाटते, त्यालाच आम्ही ‘वैराग्य’ असे म्हणतों ५१.
ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अष्ट महासिद्धी ।
त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥ ५२ ॥
हे बुद्धिमंता उद्धवा ! ऐक. माझ्या अष्ट महासिद्धि आहेत, त्या खरोखर माझ्यापासून कधीही दूर होत नाहीत, किंवा ढळतही नाहीत हे लक्षात ठेव ५२.
माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्येंकरीं ।
माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥ ५३ ॥
माझ्या या श्रेष्ठ भक्तीच्या निश्चयाने जो एकात्मता करतलामलकवत् करून माझी पदवी प्राप्त करून घेतो, त्याच्या घरामध्ये या माझ्या सिद्धि दासी व बटकी होऊन राहतात ५३.
सिद्धी सेवा करिती । हेंचि नवल सांगों किती ।
श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥ ५४ ॥
सिद्धि त्याची सेवा करतात यांत आश्चर्य तें काय सांगावयाचें? मी लक्ष्मीसहवर्तमान लक्ष्मीपतिच भक्तांची सर्वस्वे भक्ति करतों ५४.
‘ऐश्वर्याचें मुख्य लक्षण’ । अतिशयेंसी संपूर्ण ।
भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥ ५५ ॥
‘ऐश्वर्याचे मुख्य लक्षण ‘ हें की, आपण स्वतः भगवंताची योग्यता संपादन करून भगवद्-ऐश्वर्याने अत्यंत संपन्न होणे ५५.
म्यां हे सांगितली जे बोली । ते निजगुह्यभांडाराची किल्ली ।
येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥ ५६ ॥
ही जी गोष्ट मी तुला सांगितली, ती माझ्या गुप्त भांडाराची किल्लीच आहे. ही घेऊन आत्मानंदाची खोली उघड, आणि आपल्या सुखसिद्धीचा उपभोग घे ५६.
चहूं पदांचीं उत्तरें । वाखाणिलीं अतिगंभीरें ।
ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥ ५७ ॥
श्लोकांतील चार शब्दांच्या अर्थाचे अशा प्रकारें अत्यंत खोल प्रतिपादन केलेले ऐकून उद्धवालाही मोठा चमत्कार वाटला व तो फारच चकित झाला ५७.
धर्मादि चहूं पदांचा अर्थ । अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ ।
तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥ ५८ ॥
‘धर्म’ आदिकरून चार शब्दांचा अर्थ श्रीकृष्णनाथांनी फारच विलक्षण सांगितला; तसाच आतां यमादिकांचा अर्थही देवालाच प्रत्यक्ष विचारावा ५८,
गुह्यार्थ सांगेल श्रीकृष्ण । यालागीं यमादिकांचे प्रश्न ।
उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥ ५९ ॥
म्हणजे तो श्रीकृष्णच त्याचा गुप्तार्थ सांगेल; हें मनांत आणूनच परमार्थ पूर्णपणे ध्यानात येण्यासाठी उद्धव आपण होऊनच यमादिकांचे प्रश्न विचारीत आहे ५९.
पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्धवें केलें ज्ञानगहन ।
ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥ ३६० ॥
पांच श्लोकांमध्ये उद्धवानें गहन ज्ञानाचे पसतीस प्रश्न विचारले आहेत. त्यांची प्रत्युत्तरें ऐकली असतां जीवाचे आणि शिवाचेंही समाधान होईल ३६०.
पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसर्‍यामाजीं नव जाण ।
तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥ ६१ ॥
पहिल्या श्लोकांत सहा प्रश्न आहेत; दुसऱ्यामध्ये नऊ आहेत; तिसऱ्यांत आणि चौथ्यांत आठ आठ आहेत. आणि पांचच्यांत चार प्रश्न आहेत ६१.
उद्धव उवाच-
यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन ।
कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा धृतिः प्रभो ॥ २८ ॥
[लोक २८] उद्धवाने विचारले – हे रिपुसूदना ! यम आणि नियम किती प्रकारचे आहेत ? हे श्रीकृष्णा ! शम म्हणजे काय ? दम म्हणजे काय ? हे प्रभो ! तितिक्षा आणि धैर्य, हे काय आहे ? (२८)
अहंरिपुनिर्दळणा श्रीपती । ‘यम’ ‘नियम’ प्रकार किती ।
‘शम’ ‘दम’ ‘कोण म्हणीजेती तितिक्षा’ ‘धृती’ ते कैशी ॥ ६२ ॥
अहंकाररूपी शत्रूचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा ! ‘यम’ व ‘नियम’ ह्यांचे किती किती प्रकार आहेत? ‘शम’ आणि ‘दम’ कशाला म्हणतात ? तसेंच ‘तितिक्षा’ व ‘धृति’ ती कशी असते ? ६२.
किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यमृतमुच्यते ।
कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥ २९ ॥
[ श्लोक २९] दान, तपश्चर्या, शौर्य, सत्य, ऋत त्याग, कल्याणकारी धन, यज्ञ आणि दक्षिणा यांचे स्वरूप काय आहे ? (२९)
कोण ‘दान’ कोण ‘तप’ येथ । ‘शौर्य’ कोण कैसें तें ‘सत्य’ ।
‘ऋत’ जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥ ६३ ॥
येथे ‘दान’ कोणते व ‘तप’ ‘कोणते ?’शौर्य ‘ ते काय ? ‘सत्य’ ते कसे असते ! तसेंच ‘ऋत’ म्हणून ज्याला म्हणतात तेंही यथार्थ रीतीने सांगावें ६३.
कोणता जी ‘त्याग’ येथें । इष्ट ‘धन’ कोण पुरुषातें ।
‘यज्ञ’ कशातें म्हणिजेतें । ‘दक्षिणा’ तेथें ते कायी ॥ ६४ ॥
ह्याचप्रमाणे ‘त्याग’ तो कोणता? पुरुषाला इष्ट ‘धन’ तें कोणते ? ‘यज्ञ’ कशाला म्हणतात ? त्यांत ‘दक्षिणा’ ते काय ? ६४.
पुंस किंस्विद्‍बलं श्रीमन् दया लाभश्च केशव ।
का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥ ३० ॥
[श्लोक ३०] श्रीमान केशवा ! पुरूषांचे खरे बळ कोणते ? भग आणि लाभ म्हणजे काय ? विद्या, लज्जा, श्रेष्ठ श्री, तसेच सुख व दुःख हे काय आहे ? (३०)
पुरुषासी ‘बळाची’ कोण शक्ती । ‘दया’ बोलिजे कोणे स्थितीं ।
‘लाभ’ तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥ ६५ ॥
पुरुषाला ‘बळाची’ शक्ति कोणती? कोणत्या स्थितीला ‘दया’ म्हणतात ? तसेंच हे कृपामूर्ति श्रीकृष्णा ! ‘लाभ’ कोणता तोही सांगावा ६५.
‘विद्या’ म्हणावें कशातें । ‘लज्जा’ कोणे ठायीं वर्ते ।
उत्कृष्ट ‘लक्ष्मी’ कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥ ६६ ॥
‘विद्या’ कशाला म्हणावें ? ‘लज्जा’ कोठे राहाते ? त्याप्रमाणेच येथे उत्कृष्ट ‘लक्ष्मी’ कोणती! तीही देवांनी सांगावी ६६.
येथील कोण पां कैसें ‘सुख’ । मज सांगावें कृपापूर्वक ।
सुखाचे सांगाती जें ‘दुःख’ । त्याचेंही रूपक सांगावें ॥ ६७ ॥
येथील ‘सुख’ ते कोणते व कसे? हेही कृपापूर्वक मला सांगावे. तसेंच सुखाच्या बरोबर असणारे जें ‘दुःख’ त्याचे स्वरूपही कथन करावे ६७.
कः पण्डितः कश्च मूर्खः कः पन्था उत्पथश्च कः ।
कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] पंडित आणि मूर्ख यांची लक्षणे कोणती ? सन्मार्ग आणि कुमार्ग म्हणजे काय ? स्वर्ग आणि नरक हे काय आहेत ? बंधू कोणाला मानावे ? घर म्हणजे काय ? (३१)
‘पण्डिताचें’ काय लक्षण । ‘मूर्ख’ म्हणावया कोण गुण ।
‘सुमार्ग’ म्हणावया तो कोण । सांगे निरूपण ‘उन्मार्गाचें’ ॥ ६८ ॥
‘पंडिताचे लक्षण काय? कोणत्या गुणानें ‘मूख’ म्हणतात ? ‘सुमार्ग’ म्हणतात तो कोणता ? तसेंच ‘दुर्मार्गाचे’ ही निरूपण सांगावें ६८.
‘स्वर्ग’ कशातें बोलिजे । ‘नरक’ कैसा वोळखिजे ।
सखा ‘बंधु’ कोण म्हणिजे । ‘गृह’ माझें तें कोण ॥ ६९ ॥
‘स्वर्ग’ कशाला म्हणतात ? ‘ नरक’ कसा ओळखावा ? सखा ‘बंधु’ कोणास म्हणावें ? आणि माझे ‘घर’ ते कोणते? ६९.
क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः ।
एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] धनवान कोण आणि निर्धन कोण ? कंजूष कोण आहे ? ईश्वर कोणाला म्हणतात ? हे भक्तवत्सल प्रभो ! आपण माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या त्याचबरोबर यांच्या विरोधी जे पदार्थ आहेत, त्यांच्याविषयीही सांगा. (३२)
‘आढ्य’ कैसेनि म्हणिजे । ‘दरिद्री’ कैसेनि जाणिजे ।
‘कृपण’ कोणातें बोलिजे । ‘ईश्वर’ वोळखिजे तो कैसा ॥ ३७० ॥
आढ्य’ म्ह. संपन्न कोणाला म्हणावें? ‘दरिद्री’ कशावरून ओळखावा ? ‘कृपण’ कोणाला महणावें ? ‘ईश्वर’ कसा ओळखावा ? ३७०.
हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सांगावा विशदार्थ ।
जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्था ॥ ७१ ॥
असे हे माझे प्रश्न आहेत. जो लौकिक अर्थाहून भिन्न आणि परमार्थाला साधनीभूत होईल असा अर्थ स्पष्ट करून सांगावा ७१.
लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा ‘विपरीत’ ।
या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥ ७२ ॥
लौकिकाला जो विरुद्ध अर्थ असतो, त्यालाच ‘विपरीत’ असे म्हणतात. याकरितां त्या साऱ्यांचा मथितार्थ असा ह्या प्रश्नांचा परमार्थपर अर्थ सांगावा ७२.
ज्ञानें सज्ञान संतमूर्ती ॥ त्यांचा स्वामी तूं निश्चितीं ।
यालागीं तूतें गा ‘सत्पत्ती’ । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥ ७३ ॥
संतमूर्ति ज्ञानाने ज्ञानसंपन्न असतात, पण त्यांचाही खरोखर तूं स्वामी आहेस. म्हणूनच तुला शास्त्रार्थाने ज्ञानसंपन्न लोक ‘सत्पत्ति’ असे म्हणतात ७३.
माझ्या प्रश्नांची प्रश्नोक्ती । परमार्थप्राप्तीलागीं श्रीपती ।
मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥ ७४ ॥
हे श्रीपते ! परमार्थप्राप्तीसाठी मला माझ्या प्रश्नांचे यथार्थरीतीने अर्थ सांगावे. अशी विनंती उद्धवाने श्रीकृष्णाला केली ७४.
ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण ।
परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ७५ ॥
ही भक्ताची विनवणी श्रवण करून नारायणाला कृपा उत्पन्न झाली. यास्तव त्याच्या त्या परमार्थपर प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्ण स्वतः सांगतील ७५.
प्रथम तीं श्लोकीं यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम ।
इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥ ७६ ॥
प्रथम तीन श्लोकांमध्ये श्रीकृष्ण ‘यम’ आणि ‘नियम’हे विशद करतील आणि बाकीचे जे अत्युत्तम प्रश्न आहेत ते श्रीकृष्ण अध्यायाच्या अखेरपर्यंत सांगतील ७६.
श्रीभगवानुवाच-
अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः ।
आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] श्रीकृष्ण म्हणाले – अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे ‘यम’ होत. (३३)
प्रथम श्लोकींचा उभारा । यमाचीं लक्षणें बारा ।
पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥ ७७ ॥
पहिल्या श्लोकामध्ये यमाची बारा लक्षणे हा विषय आहे. विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून श्रीकृष्ण त्याचे उत्तर देत आहेत ७७.
पुढां प्रश्न आहेत फार । यालागीं यमनियमांचें उत्तर ।
आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥ ७८ ॥
पुढे प्रश्न पुष्कळ आहेत. म्हणून यमनियमांचे उत्तर स्वतः श्रीकृष्ण संक्षेपानें आंवरून सांगतात ७८.
‘अहिंसा’ कायावाचामनें । परपीडात्याग करणें ।
‘सत्य’ तें यथार्थ बोलणें । ‘अचौर्य’ लक्षणें तीं ऐक ॥ ७९ ॥
कायावाचामनेंकरून परपीडा न करणे ह्याचे नांव ‘अहिंसा’. आणि खरे असेल तसेंच बोलणे याचें नांव ‘सत्य’. आतां अचौर्याची लक्षणेही ऐक ७९.
हातें चोरी नाहीं करणें । परी परद्रव्याकारणें ।
मनीं अभिलाष नाहीं धरणें । ‘अस्तेय’ लक्षण त्या नांव ॥ ३८० ॥
हातानें चोरी करावयाची नाही इतकेच नव्हे, तर दुसऱ्याच्या द्रव्याचा मनातसुद्धा अभिलाष न धरणे हेच अस्तेय म्ह. चोरी न करण्याचे लक्षण होय ३८०.
असतां देहगेहसंगती । ज्याचे पोटीं नाहीं आसक्ती ।
जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥ ८१ ॥
लोक यात्रेला जातात तेव्हा तेथे जमलेल्या लोकांची संगासक्ति जशी असत नाही, त्याप्रमाणे घरदार असूनही ज्याच्या मनांत त्यांची आसक्ति नसते ८१.
स्फटिक ठेविला ज्या रंगावरी । त्यासारिखा दिसे बाहेरी ।
आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं ‘असंगता’ ते ॥ ८२ ॥
स्फटिक ज्या रंगावर ठेवावा, त्यासारखाच तोही बाहेरून दिसू लागतो; पण अंतरांतून तो निर्विकारच असतो. त्याप्रमाणेच जो शरीरांत राहातो, त्याला ‘असंगता’ म्हणतात ८२.
निंद्य कर्माकारणें । पोटांतूनि कंटाळणें ।
लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । ‘ह्रीं’ म्हणणें या नांव ॥ ८३ ॥
निंद्यकर्माचा मनापासून कंटाळा असणे, आणि लौकिकामध्ये निंद्यकर्माला लाजणे, यालाच ‘ ऱ्ही ‘ म्ह. लज्जा म्हणतात ८३.
इहलोकीं संग्रहो करूं नेणें । जाणे दैवाधीन देहाचे जिणें ।
स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥ ८४ ॥
इहलोकांत संग्रह म्हणून करावयाचा ज्याला माहीतच नसते, कारण अनाच्छादन हे केवळ प्रारब्धाधीन आहे असें तो जाणतो, तसेंच स्वर्गातील सुखोपभोगाकरितां जो पुण्याचाही संग्रह करीत नाही ८४ ;
पुण्यें स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्षयें होय पुनरावृत्ती ।
जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥ ८५ ॥
कारण पुण्याने स्वर्गभोग प्राप्त होतात; पण त्याच पुण्याचा क्षय झाला की, पुन्हा जन्म घ्यावा लागतो; म्हणून जेणेकरून पुण्यसंपत्तीचा क्षय होईल अशा कोणत्याही वस्तूचा माझे भक्त संग्रह करीत नाहीत ८५.
या नांव गा ‘असंचयो’ । ऐक ‘आस्तिक्याचा’ निर्वाहो ।
सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥ ८६ ॥
याचेच नांव ‘असंचय’ म्ह. संग्रह न करणे होय. आतां ‘आस्तिक्याचे’ लक्षण म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी माझें ब्रह्मस्वरूपच व्यापलेले आहे असे पाहाणें ; ब्रह्माचा अभाव तो कुठेच पाहात नसतो ८६.
‘ब्रह्मचर्य’ ऐसें येथ । जैसे आश्रमप्रयुक्त ।
बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥ ८७ ॥
आतां येथे ‘ब्रह्मचर्य’ तें असें की, आश्रमानुसार शास्त्रांत जो आचार सांगितलेला आहे, तोच निश्चयाने आचरावा ८७.
‘मौनिं’ न बोलावें इतुकें जाण । मिथ्यालाप असंभाषण ।
नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥ ८८ ॥
खोटें आणि अनुचित भाषण न करणे हेंच ‘मौन’ होय. नित्य वेदपठन, गायत्रीस्मरण किंवा भगवंताचे नामस्मरण करीत असावें (हेही मौनच होय) ८८.
स्थिरवृत्ति आत्मारामीं । कां असावी निजधर्मीं ।
भावार्थें संतसमागमीं । ‘स्थिरता’ उपक्रमीं या नांव ॥ ८९ ॥
वृत्ति आत्मस्वरूपामध्ये, स्वधर्मामध्ये किंवा साधूच्या संगतीत स्थिर असणे ह्याचेच नांव ‘स्थिरता’ होय ८९.
स्वदेह दंडिलें कां वंदिलें । परी क्षमा सम दोंही काळें ।
देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥ ३९० ॥
आपल्या देहाला कोणी वंदन करो किंवा मारो, तरी दोन्ही वेळां क्षमा सारखीच. देहाचा भोग हा दैवावर अवलंबून आहे. असा विचार करून तो नेहमीं क्षमाशीलच असतो ३९०.
या नांव ‘क्षमा’ म्हणिजे । अभय तें ऐसें जाणिजे ।
जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥ ९१ ॥
ह्याचंच नांव ‘क्षमा’. आतां अभय तें असें ओळखावें कीं, पर म्हणून जें जें दिसतें तें तें आपणच होऊन राहावें ९१.
आत्मा एक पंचभूतें एक । दुजें पाहतां नाहीं देख ।
निमालें भयाचें महादुःख । ‘अभय’ निःशेख या नांव ॥ ९२ ॥
आत्मा एक, आणि पंचमहाभूतेही एक. पाहावयास गेले तर दुसरे काहीच नाही. हें प्रत्ययाला आले की भयाचे महादुःख संपलें. ह्याचेच नांव निखालस ‘अभय ‘ ९२.
निमाल्या दुजयाच्या गोठी । वोखदासी भय न मिळे सृष्टीं ।
अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥ ९३ ॥
दुजेपणाच्या गोष्टीच नाहीशा झाल्या, म्हणजे जगामध्ये औषधालासुद्धा भय मिळावयाचे नाही. ह्याप्रमाणे अभयाच्या आनंदाची पुष्टि आत्मदृष्टीने ठसून जाते ९३.
या नांव गा बाराही ‘यम’ । उद्धवा सांगितले सवर्म ।
आतां जयाचें नाम ‘नेम’ । तेंही सुगम अवधारीं ॥ ९४ ॥
बारा ‘यम’ तें याचंच नांव. उद्धवा ! त्यांतील रहस्य तुला सांगितलें. आतां ‘ नेम’ असें ज्याला म्हणतात त्याचेही लक्षण सुलभ रीतीने सांगतों ऐक ९४.
शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् ।
तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] अंतःशुद्धी बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथिसेवा, माझे पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरूसेवा, हे ‘नियम’ (३४)
शौचाची ऐशी परी । अंतरीं शुचि विवेकेंकरीं ।
बाह्य तें वेदाज्ञेवरी । ‘शौच’ करीं मृज्जलें ॥ ९५ ॥
‘शौचाचा’ म्ह. स्वच्छतेचा प्रकार असा आहे. विचाराने अंत:करणाची शुद्धि करावी आणि बाह्य ‘शौच’ म्ह. शुद्धि वेदाज्ञेप्रमाणे मृत्तिका व जल यांनी करावी ९५.
परिसें ‘जपाचा’ विचार । ज्यासी जैसा अधिकार ।
तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥ ९६ ॥
आतां ‘जपाचा’ विचार ऐक, ज्याला जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याने मंत्राचा जप करावा, किंवा स्वतंत्र गुरूचे नाम किंवा गुरूने दिलेला नाममंत्र जपावा ९६.
ब्राह्मणाचा जप वेदोच्चार । संन्यासी जपे ओंकार ।
द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥ ९७ ॥
‘वेदघोष’ करणे हा ब्राह्मणाचा जप होय व ‘ओंकार’ हा संन्याशाचा जप होय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या तीन जातींना ‘द्विजन्मे’ म्हणतात. त्यांनी आगमोक्त मंत्राचा जप करावा. नाममंत्र हा तर सर्वांनाच लागू आहे ९७.
तपाचा जो मुख्य प्रकार । जेणें शुद्ध होय अभ्यंतर ।
तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥ ९८ ॥
आतां ज्याच्या योगाने अंत:करणाची शुद्धि होते, तो ‘तपाचा’ मुख्य प्रकार होय. ज्याने त्याने आपआपल्या धर्माचे प्रेमादराने आचरण करावें ९८.
शरीरशोषणा नांव तप । हा मूर्खाचा खटाटोप ।
हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्‌रूप । परम ‘तप’ या नांव ॥ ९९ ॥
शरीरशोषणाला ‘तप’ म्हणणे हा मूर्खाचा खटाटोप होय. हृदयामध्ये सत्स्वरूप श्रीहरीचें चिंतन करणे च सर्वात ‘श्रेष्ठ तप’ होय ९९.
ऐक होमाचा विचार । देवाचे मुख वैश्वानर ।
पंचमहायज्ञ अग्निहोत्र । ‘होम’ साचार या नांव ॥ ४०० ॥
आतां होमाचा विचार ऐक. अग्नि हे देवाचे मुख आहे. यासाठी पंचमहायज्ञ, अग्निहोत्र इत्यादि करणे यास ‘होम’ असे म्हणतात ४००.

भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी ।
या नांव ‘श्रद्धा’ रोकडी । जाण धडफुडी उद्धवा ॥ १ ॥
उद्धवा ! माझ्या भजनाची अत्यंत आवड असणे किंवा धर्माची अतिशय गोडी असणें , याचेंच नांव मूर्तिमंत ‘श्रद्धा’ होय १.
नसतांही अन्नधनें । आतिथ्यें दे समाधानें ।
मस्तकीं वंदूनियां दीनें । निववी वचनें सुखरूपें ॥ २ ॥
वेळेला अन्न किंवा धन नसले तरी सत्काराने समाधान करतो, दीनदुबळ्यांचे चरण शिरसावंद्य करून मधुर भाषणाने त्यांना तृप्त करून सोडतो २.
दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम्र विनीतता ।
यथाशक्ति अर्पणें अर्था । ‘आतिथ्य’ तत्त्वतां या नांव ॥ ३ ॥
खरोखर दीन पाहिला म्हणजे त्याला अत्यंत लीन व नम्र होऊन यथाशक्ति द्रव्य अर्पण करणे, ह्याचंच नांव खरें ‘आतिथ्य’ होय ३.
पोटींच्या कळवळेंनि वोजा । अत्यादरें गरुडध्वजा ।
सांङ्ग साजिरी करणें पूजा । श्रद्धा समाजासंभारीं ॥ ४ ॥
अंत:करणाच्या खऱ्या कळवळ्याने, आवड धरून लोकसमाज मिळवून मोठ्या समारंभाने मज भगवंताची यथासांग पूजा करणे किंवा ब्राह्मणांचा समुदाय मिळवून ४,
मेळवूनि ब्राह्मणसंभार । श्रद्धायुक्त षोडशोपचार ।
पूजितां संतोषें मी श्रीधर । ‘पूजा’ पवित्र ब्राह्मणांची ॥ ५ ॥
त्यांची श्रद्धेने षोडशोपचार पूजा करणे, यांच्या योगाने मला श्रीहरीला संतोष होतो. कारण, ब्राह्मणांची ‘पूजा’ ही फार पवित्र आहे ५.
शुद्ध व्हावया अंतःकरण । करावें गा तीर्थगमन ।
तीर्थयात्रीं श्रद्धा गहन । ‘तीर्थाटन’ या नांव ॥ ६ ॥
तसेंच अंतःकरण शुद्ध होण्याकरितां तीर्थाला जात असावें. तीर्थयात्रेच्या ठिकाणी श्रद्धा धरणे याचंच नांव ‘ तीर्थाटन’ होय ६.
पदोपदीं माझें नाम । गर्जतां स्मरती माझें कर्म ।
यात्रा करणें निजनिष्काम । ‘तीर्थयात्रा’ परम या नांव ॥ ७ ॥
पावलोपावली माझ्या नामाची गर्जना करून माझे गुणलीलानुवाद करीत निरिच्छपणाने यात्रा करणे ह्याचेच नांव श्रेष्ठ ‘तीर्थयात्रा’ होय ७.
परोपकारार्थ पर्वत । जेंवी कां सामग्री वाहत ।
तेवीं क्रियामात्रें उपकारार्थ । सदा वर्तत उपकारीं ॥ ८ ॥
पर्वत ज्याप्रमाणे केवळ परोपकाराकरितांच खनिज पदार्थ व वनस्पतींचा भार वाहतात, त्याप्रमाणे केवळ परोपकारार्थ निरंतर कर्मे करून सर्वकाळ उपकारच करीत राहावयाचे ८.
जेवीं का चंद्राचे किरण । लागतांचि निवविती जाण ।
तेवीं जयाचें आचरण । ‘उपकारें’ जन सुखी करी ॥ ९ ॥
चंद्राचे किरण लागतांच ज्याप्रमाणे शांत करून सोडतात ; त्याप्रमाणे ज्याचे आचरण उपकारानेच जनाला सुखी करून सोडते ९.
जें प्राप्त जाहलें अदृष्टीं । तेणें काळ यथासुखें लोटी ।
कदा समासम नाहीं पोटीं । ‘यथालाभसंतुष्टी’ या नांव ॥ ४१० ॥
दैवाने जें काय प्राप्त होईल, तेवढ्यावरच मोठ्या संतोषाने काळ कंठतो. पोटामध्ये समविषमभावच उठत नाही. याचंच नांव ‘यदृच्छालाभ संतुष्ट’ म्हणजे मिळेळ त्यांत संतुष्ट राहाणे ४१०.
कायावाचामनें धनें । जो विनटला गुरूकारणें ।
त्याचें उठे संसारधरणें । ‘गुरुसेवा’ म्हणणें या नांव ॥ ११ ॥
काया, वाचा, मन व धन गुरुला अर्पण करून गुरुला जो शरण जातो, त्याच्या संसाराचे धरणे उठतें. याचंच नाव ‘गुरुसेवा’ ११.
उभय शौचाचे दोनी गुण । जपादि येर दशलक्षण ।
हे बारा ‘नेम’ जाण । देवो आपण बोलिला ॥ १२ ॥
शौचाचे दोन गुण आणि जप आदिकरून दुसरी दशलक्षणे मिळून हे बारा ‘ नेम’ होत. ह्याप्रमाणे स्वतः श्रीकृष्णांनी सांगितले १२.
एते यमाः सनियमा उभयोर्द्वादश स्मृताः ।
पुंसामुपासितास्तात यथाकामं दुहन्ति हि ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] अशा प्रकारे यम आणि नियम या दोन्हींची संख्या प्रत्येकी बारा आहे हे उद्धवा ! जे लोक यांचे पालन करतात, त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळे देतात. (३५)
दोंही श्लोकीं यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम ।
बारा बारा यांचें वर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥ १३ ॥
ह्याप्रमाणे दोन श्लोकांमध्ये यमनियमांचे उत्तोमोत्तम निरूपण केले. प्रत्येकाची बारा बारा लक्षणे सांगितली. ह्यालाच शास्त्रार्थात ‘परमगुह्य’ असे म्हणतात १३.
पुरुष यांचें उपासन । जरी करी सकामन ।
तैं कामधेनूच्या ऐसें जाण । करिती पूर्ण सकळ काम ॥ १४ ॥
ह्यांची उपासना कोणी पुरुष कामना धरून करील, तर हेच(यम व नियम) कामधेनूप्रमाणे त्याच्या सर्व कामना पूर्ण करतील १४.
हेचि पैं गा यम नेम । पुरुष उपासी निष्काम ।
तैं त्यासी माझें निजधाम । अतिसुगम निजप्राप्ती ॥ १५ ॥
किंवा ह्याच यम-नियमांची निष्कामपणे उपासना केली, तर त्या पुरुषाला माझ्या निजधामाची म्ह. स्वरूपाची सहज प्राप्ति होईल १५.
आतां शमदमादिक तुझे प्रश्न । जेणें हाता पावे ब्रह्मज्ञान ।
तें सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥ १६ ॥
आतां उद्धवा ! शमदमादिक तुझे जे प्रश्न आहेत, ज्यांच्यायोगानें ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते, तें गुह्य निरूपणही तुला सांगतो त्याकडे लक्ष दे १६.
प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारितां सावधान ।
तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥ १७ ॥
त्या प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्ण सांगतील, ते लक्षपूर्वक श्रवण केले असतां तात्काळ ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते. हेच त्यांतील अत्यंत गुह्य व श्रेष्ठ प्रमाण आहे १७.
तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी ।
तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मज्ञानासी देतसे ॥ १८ ॥
बालकाची भूक भागविण्याकरितां त्याला आई आपल्या हाताने घास देत असते, त्याप्रमाणेच श्रीकृष्णही उद्धवाला ब्रह्मज्ञान देत आहेत १८.
जो रसु गोड लागे पित्यासी । तो बळेंचि पाजी बालकासी ।
तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥ १९ ॥
जो रस बापाला गोड लागतो, तो तो बळेच आपल्या मुलालाही पाजतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण उद्धवाला ब्रह्मरस देत आहेत १९.
आधींचि तानयाचें प्रेम मोठें । वरी लागतां त्याचें मुखवटें ।
मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥ ४२० ॥
आधीच आईला तान्ह्या मुलाचे प्रेम मोठे असते; त्यावर त्याचे तोंडच स्तनाला लागले, तर मग काय विचारावें? त्या आनंदाच्या भरानें जो पान्हा फुटतो, तो अनिवारच असतो ४२०.
तेवीं स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान ।
तेथें उद्धवें पुशिलें प्रश्न । तेणें अधिक जाण तुष्टला ॥ २१ ॥
त्याप्रमाणे स्वतः श्रीकृष्ण आपण होऊन बळेच ब्रह्माज्ञान देण्यास तयार. त्यांत उद्धवाने प्रश्न विचारले, त्यामुळे तर त्यांना अधिकच संतोष झाला २१.
आधींच पर्जन्य खरा । वरी मीनलासे वीजवारा ।
मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥ २२ ॥
आधींच पर्जन्य खरोखर पडू लागावा, त्यांत त्याला वारा आणि वीज ही मिळाली तर मग काय विचारावें ? त्याची वृष्टि अनिवार होऊन तो पाण्याचा पूर पृथ्वी अगदी खणून काढून वाहात असतो २२.
तेवीं द्यावया ब्रह्मज्ञान । मिष उद्धवाचे प्रश्न ।
स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रह्म पूर्ण देतसे ॥ २३ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान देण्याला उद्धृवाच्या प्रश्नाचे निमित्त झाले, त्यामुळे श्रीकृष्ण स्वानंदाने प्रसन्न झाले व ते आतां पूर्ण ब्रह्मच त्याच्या स्वाधीन करीत आहेत २३.
निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हातीं चढे ।
कां विटेसाठीं परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥ २४ ॥
फुकट मिळणारे मिठाचे खडे देऊन जर चिंतामणि हाती येऊ लागला, किंवा वीट देऊन जर परिस मिळाला, तर त्याचा जो स्वीकार करणार नाही. तो आपल्याच लाभाला मुकेल २४.
तेवीं उद्धवाचे थोडे प्रश्न । तेणें आतुडे ब्रह्म पूर्ण ।
एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ २५ ॥
तद्वत उद्धवाच्या थोड्या प्रश्नांनी पूर्ण ब्रह्म हातास चढत आहे. याकरितां एकाजनार्दन विनंती करितो की, श्रोत्यांनी आता माझ्याकडे लक्ष द्यावें २५.
उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण ।
उरले बत्तीस गुण । तेंही विवंचन अवधारा ॥ २६ ॥
उद्धवाचे चौतीस प्रश्न होते. त्यांत यम व नियम हे सांगितले. बाकी बत्तीस गुण उरले, त्यांचाही विचार ऐकावा २६.
प्रश्नीं दयेचें प्रतिउत्तर । न सांगेचि शारंगधर ।
त्या अर्थीं भावगर्भ सार । षड्‍गुणैश्वर्य बोलिलें ॥ २७ ॥
प्रश्नांमध्ये दयेसंबंधाचे उत्तर श्रीकृष्णांनी सांगितले नाही. पण त्याच्या अर्थाकरितां भगवंतांनी षड्गुणैश्वर्य ध्वनितार्थाने सूचित केलें आहे २७.
एही विखींचें व्याख्यान । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
दयेच्या ठायीं भाग्य संपूर्ण । कोण कारण सांगावया ॥ २८ ॥
दयेच्या ठिकाणी संपूर्ण भाग्य सांगण्याचे कारण काय, ह्याविषयीही श्रीकृष्ण पुढे सांगतील २८.
एवं उरले एकतीस प्रश्न । अधिक एक सांगेल श्रीकृष्ण ।
‘कर्मस्वसंगम शौच’ जाण । कार्यकारणसंबंधा ॥ २९ ॥
तात्पर्य, आतां एकतीस प्रश्नच उरले. त्यांत श्रीकृष्ण एक अधिक सांगतील तो ‘कर्मस्वसंगम’ म्ह. शौच हा होय (“कर्मसु असंगमः शौचं” श्लोक ३८). कार्यकारणसंबंध आल्यामुळेच ते सांगावे लागले २९.
ऐसे हे तेहतीस प्रश्न । व्याख्यान सांगेल श्रीकृष्ण ।
तें करतळीं ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥ ४३० ॥
असे हे सारे तेहतीस प्रश्न, त्यांचे व्याख्यान श्रीकृष्ण सांगतील. त्यायोगें उद्धवाला अगदी तळहातावरच ब्रह्मज्ञान देतील ४३०.
शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयमः ।
तितिक्षा दुःखसंमर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] बुद्धी माझ्या ठायी स्थिर करणे म्हणजेच ‘शम’ होय इंद्रियांच्या संयमाचे नाव ‘दम’ आहे दुःख सहन करण्याला ‘तितिक्षा’ म्हणतात जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे हेच ‘धैर्य’ होय. (३६)
बुद्धि जे कां विवेकवंती । असार सांडूनि सार धरिती ।
तिणें मनाच्या सकळ वृत्ती । विवेकस्थिती आवरोनि ॥ ३१ ॥
विवेकशील अशी जी बुद्धि असते ती असार सोडून सारच ग्रहण करते. अशी बुद्धि मनाच्या निरनिराळ्या वृत्ति विवेकस्थितीने आवरून ३१,
त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मीं मिळे जाण ।
जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थें ॥ ३२ ॥
मीठ ज्याप्रमाणे समुद्राला आलिंगन देते, त्याप्रमाणे ती बुद्धिही साऱ्या वृत्तींसहवर्तमान परमात्म्याशी मिळून जाते ३२.
समुद्रीं मिळतां लवण । समुद्रचि होय आपण ।
तेवीं आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यघन स्वयें होय ॥ ३३ ॥
समुद्रात मीठ जाऊन मिळाले की ते समुद्रस्वरूपच होऊन राहते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या निश्चयाने बुद्धिही स्वतः चैतन्यघन होऊन जाते ३३.
ऐसा बुद्धीचा उपरम । त्यातें म्हणिजे गा ‘शम’ ।
यापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारीं ॥ ३४ ॥
अशा प्रकारे बुद्धीला शांतस्वरूप प्राप्त होणे यालाच ‘शम’ म्हणावे. पण ह्यापूर्वीच दम करावा लागतो. त्याचाही प्रकार ऐक ३४.
शत्रूचें जें दुर्दमन । तो दमु येथें नव्हे जाण ।
करावें इंद्रियदमन । तेंही लक्षण अवधारीं ॥ ३५ ॥
शत्रूचे दमन करणे हा येथे दम नव्हे; तर इंद्रियांचेंच दमन करणे अवश्य आहे. त्याचेही लक्षण सांगतो ऐक ३५.
जेणें सहाय होती शमासी । त्या युक्तीं राखणें इंद्रियांसी ।
विधीवेगळें नेदी भोगासी । आवरी अहर्निशीं वैराग्यें ॥ ३६ ॥
शमाला साहाय्यकारक होतील अशा युक्तीने इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे, शास्त्रोक्तविधीशिवाय कोणताही भोग त्यांना द्यावयाचा नाही. रात्रंदिवस वैराग्याने त्यांना आवरून धरावयाचे ३६.
ऐसें इंद्रियांचें निग्रहण । त्या नांव गा ‘दम’ गुण ।
आतां तितिक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ३७ ॥
अशा प्रकारे इंद्रियांचा निग्रह करणे ह्याचंच नांव ‘दम’ गुण होय. आतां तितिक्षेचेही संपूर्ण लक्षण सांगतों ऐक ३७.
महासुख आलें होये । तें जेणें उल्हासें अंगीं वाहे ।
तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगीं ॥ ३८ ॥
मोठे सुख प्राप्त झाले असता ते ज्या उल्हासाने उपभोगितो, त्या उल्हासानेच दुःखही सहन करतो ३८.
तेज आणि महा आंधारी । नभ समत्वें अंगीं धरी ।
तेवीं जो अविकारी । सुखदुःखपरी साहता ॥ ३९ ॥
प्रकाश येवो, किंवा मोठा अंधार येवो, त्यांना आकाश जसे समसमानभावानें आंगावर धरतें त्याप्रमाणे सुखदुःखाचे प्रकारही जो अविकृतपणानें सहन करतो ३९.
गोफणेचा सुवर्णपाषाण । लागे तो दुःखी होय पूर्ण ।
तेचि वोळखिलिया सुवर्ण । दुःख जाऊन सुख वाटे ॥ ४४० ॥
गोफणीतून बसलेला सोन्याचा गुंडा लागला असतां दुःख होते, पण तोच गुंडा सोन्याचा म्हणून ओळखले म्हणजे दुःख विसरून जाऊन सुख वाटू लागते ४४०.
तैसें द्वंद्वांचें निजस्वरूप । वोळखिलिया सद्‌रूप ।
तेव्हा द्वंद्वें होती चिद्‌रूप । हें मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥ ४१ ॥
त्याप्रमाणे द्वंद्वांचे खरे स्वरूप सदृप आहे असे ओळखले म्हणजे द्वंद्वे असतात ती चिद्रूप होऊन जातात. हेच तितिक्षेचे मुख्य स्वरूप होय ४१.
सांडूनियां देह‍अहंते । सुखदुःखांहीपरतें ।
देखणें जें आपणातें । तेचि येथें ‘तितिक्षा’ ॥ ४२ ॥
देहाची अहंता सोडून सुखदुःखाच्या पलीकडे आपणाला पाहाणे, हीच येथे ‘ तितिक्षा’ होय ४२.
स्वप्नींचे दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या ।
तेवीं सुखदुःखापरता । देखणें तत्त्वतां ते ‘तितिक्षा’ ॥ ४३ ॥
स्वप्नांतील दारिद्र्य आणि वैभव ही दोन्ही जागृतीमध्ये मिथ्या वाटतात, त्याप्रमाणे सुखदुःखाहून आपण निराळे आहोत असे पाहाणे याचंच नांव खरी तितिक्षा’ होय ४३.
जिव्हा आणि दुसरें शिश्न । यांचा जयो करावा आपण ।
या नांव ‘धृति’ संपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥ ४४ ॥
जिव्हा आणि दुसरे जननेंद्रिय ह्यांनाच संपूर्णपणे ताब्यात ठेवावीत, हीच खरी ‘धृति’ होय. विद्येची धारणा ही धृति नव्हे ४४.
जेवीं कृष्णसर्प धरिजे हातीं । हे दोनी धरिजे तैशिया रीतीं ।
अळुमाळ ढिलावतां धृती । परतोनि खाती धरित्यासी ॥ ४५ ॥
कृष्णसर्प जसा हातांत धरावा, तशी ही दोन्ही इंद्रिये नेहमी ताब्यांत ठेवावीत. यत्किंचित ढिलीं सोडली तर ती उलटून धरणाऱ्यालाच खाऊन टाकतात ४५.
ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती ।
द्रव्यदाराअनासक्ती । त्याचे घरीं धृती पोषणी सदा ॥ ४६ ॥
जे कनककांतेवर आसक्त असतात, त्यांच्यापाशी ही धृति कधी रिघावयाची नाही. परंतु द्रव्य व दारा म्ह. स्त्रियांच्या ठिकाणी जो अनासक्त असतो त्याच्या घरी ही धृति पोसणी होऊन पडलेली असते ४६.
दण्डन्यासः परं दानं कामत्यागस्तपः स्मृतम् ।
स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] सर्वांना अभय देणे हेच परम ‘दान’ आहे कामनांचा त्याग म्हणजेच ‘तप’ आपल्या वासनांवर विजय मिळवणे म्हणजेच ‘शूरता’ समदर्शन हे ‘सत्य’ होय. (३७)
सर्व भूतांसी न द्यावें दुःख । याचे पोटीं आलें सुख ।
‘महादान’ तें हेंचि देख । द्यावें सुख सर्वांसी ॥ ४७ ॥
कोणत्याही प्राण्याला दुःख देऊ नये, म्हटले म्हणजे त्यांना सुख द्यावें हे सहजच आले. सर्वाना सुख देणे हेच ‘महादान’ होय ४७.
दुःख निरसूनि भूतांसी । सुख देणें गा सर्वांसी ।
हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । आन यासी तुकेना ॥ ४८ ॥
प्राणिमात्रांचे दुःख निवारण करून सर्वांना सुख देणे हेच उत्तमांतील उत्तम दान होय. ह्याच्याशी पृथ्वीत दुसरें दान तुकणार नाही ४८.
जन्ममरणाचें दुःख । निरसूनि द्यावें निजसुख ।
याचि नांवें ‘दान’ देख । अलौकिक उद्धवा ॥ ४९ ॥
उद्धवा ! जन्ममरणाचे दुःख निवारण करून आत्मसुखाचा लाभ करून देणे ह्याचेच नांव ‘अलौकिक दान’ होय, हे लक्षात ठेव ४९.
या नांव गा ‘परमदान’ । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।
ऐक तपाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ४५० ॥
उद्धवा ! ह्याचेच नाव खरोखर ‘परम दान’ असें तूं निश्चित समज. आता तपाचे लक्षण ऐक, तेही तुला सारे सांगतो ४५०.
करूनियां कामाचा त्याग । तप करणें तें अतिचांग ।
हृदयीं असतां कामदाघ । तपाचें लिंग शोभेना ॥ ५१ ॥
सर्व कामनांचा त्याग करून जें तप करणे, तेंच अत्युत्कृष्ट तप होय. अंत:करणांत कामरूप अग्नि असला तर ते तपाचे लक्षण शोभत नाही ५१.
सकाम वना जाय तपासी । तो वनींही चिंती वनितेसी ।
तें तपचि बाधक होय त्यासी । काम आंगेंसीं वर्ततां ॥ ५२ ॥
पोटीं वासना ठेवून जो अरण्यांत तपाला जातो, तो तेथेही स्त्रीचंच ध्यान करूं लागतो. मनांत कामवासना असल्यामुळे ते तपच त्याला बाधक होतें ५२.
त्यागोनि कामाची कामस्थिती । तैं तपाची उत्तम गती ।
अखंड लागे माझी स्मृती । ‘शुद्धतप’ प्राप्ती या नांव ॥ ५३ ॥
कामाची वासना निखालस टाकून दिली, तरच उत्तम तप हातून घडते. अखंड माझेच स्मरण लागून राहाते. ह्याचेच नांव शुद्ध तपस्सिद्धि ५३.
माझ्या ठायीं अनुताप । त्या नांव गा ‘शुद्ध’ तप ।
कां हृदयीं चिंतितां चित्स्वरूप । हें ‘परमतप’ तपांमाजीं ॥ ५४ ॥
अनुतापपूर्वक मत्स्वरूपी चित्त लागणे ह्याचंच नाव ‘शुद्धतप’ होय. किंवा माझें चित्स्वरूप हृदयामध्ये चिंतन करणे हेच सर्व तपांमध्ये ‘ श्रेष्ठतप’ होय ५४.
ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर ।
जिंतिला शत्रूंचा संभार । तो एथ शूर मानेना ॥ ५५ ॥
आतां शौर्याचा विचार ऐक, समरांगणामध्ये बलाढ्य शत्रूला मारून शत्रूची सेना जिंकून टाकतो, तसला शूर येथे उपयोगाचा नाहीं ५५,
प्रवाहरूपें अनिवार । जीवभाव लागला थोर ।
त्यातें जिंके जो महावीर । तो ‘परम शूर’ बोलिजे ॥ ५६ ॥
तर प्रवाहरूपाने जो जीवभाव आपल्यामागे अनिवारपणे लागलेला आहे, त्याला जो महावीर जिंकून टाकतो, त्यालाच खरा ‘शूर’ असें म्हणावयाचे ५६.
”माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान निःसंदेहो ।
माझा पवित्र ब्राह्मणदेहो” । हा ‘जीवभावो’ जीवाचा ॥ ५७ ॥
” मी नेहमी सदाचरणानेच चालत असतो, मी निःसंदेह ज्ञानी आहे, माझा पवित्र ब्राह्मणदेह आहे” हाच जीवाचा ‘जीवभाव’ होय ५७.
देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
तो कर्माभिमान ज्यां परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ॥ ५८ ॥
देहाच्या माथ्यावर वर्णाश्रम, आश्रमाच्या माथ्यावर कर्म, त्या कर्माचा ज्याला अतिशय अभिमान, त्याला अनिवार देहभ्रम असतो ५८.
जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची राणीव ।
भोगिजे स्वराज्यवैभव । हें परम गौरव शौर्याचें ॥ ५९ ॥
ह्याकरितां जीवस्वभावाला जिंकून चिदानंदाच्या राज्यावर बसून, आपल्या आत्मरूप स्वराज्यवैभवाचे सुख भोगणे, हेंच शौर्याचे गौरव म्ह. मोठेपण होय ५९.
ज्या नांव बोलिजे निजसत्य । तें मी सांगेन निश्चित ।
सम ब्रह्म देखणें संतत । तें ‘परम सत्य’ उद्धवा ॥ ४६० ॥
आता ज्याला ‘सत्य’ म्हणून म्हणतात, तेही निश्चयेंकरून मी तुला सांगतो. उद्धवा ! सदासर्वदा सर्वत्र समब्रह्म पाहाणे तेच ‘परम सत्य ‘ होय ४६०.
वस्तु न देखतां सर्वसम । जें जें देखणें गा विषम ।
तेंचि असत्य अतिदुर्गम । ‘सत्य’ तें ब्रह्म समसाम्य ॥ ६१ ॥
परब्रह्म सर्वत्र समान भरलेलें न पाहातां जिकडे तिकडे विषम म्हणजे भिन्न भिन्न पाहाणें तेंच अत्यंत दुर्गम असें ‘असत्य ‘ होय. आणि ब्रह्म हें सर्वव्यापक असून सर्वत्र सम आहे असे समजणे हेच ‘सत्य’ होय ६१.
केवळ जें सत्य भाषण । तें निजसत्य नव्हे जाण ।
तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६२ ॥
सारांश, नुसते सत्यभाषण हे काहीं निज सत्य नव्हे. याविषयींचेच आणखी निरूपण श्रीकृष्ण सांगताहेत ६२.
ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता ।
कर्मस्वसङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] मधुर भाषणाला महात्म्यांनी ‘ऋत’ म्हटले आहे कर्मांमध्ये आसक्त न होणे म्हणजेच ‘पावित्र्य’ कामनांचा त्याग हाच ‘संन्यास’. (३८)
इतर कवींची वदंती । ‘ऋत’ या नांव सत्य म्हणती ।
हें सत्य मानावें प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजीं सत्य ॥ ६३ ॥
कित्येक ज्ञाते लोक ‘ऋत’ ह्यालाच सत्य असें म्हणतात. ते प्रवृत्तीच्या दृष्टीने पाहातां खरें आहे. परंतु निवृत्तीच्या दृष्टीने पाहतां सम ब्रह्मालाच ‘सत्य’ म्हणणे योग्य आहे ६३.
ऋत म्हणिजे तें ऐसें येथ । सत्य वाचा जें श्रोत्यांचें हित ।
तेंही दुःखसंबंधरहित । ‘ऋत’ निश्चित या नांव ॥ ६४ ॥
येथें ‘ऋत’ म्हणजे असें की, श्रोत्याचे दुःखसंबंधरहित हित करणारी अशी जी सत्यवाणी तिलाच खरोखर ‘ऋत’ असे म्हणावें ६४.
चित्रीं पाहतां दिसे विषम । त्यामाजीं भिंती सदा सम ।
तेवीं जग देखतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधें ॥ ६५ ॥
चित्रांत पाहू गेले असता विषम म्ह० भिन्नता दिसते, पण त्यामध्ये असणारी जी भिंत, ती सदासर्वदा समच असते; त्याप्रमाणे जग हे भिन्न भिन्न म्ह. विषम दिसत असतांही ज्ञात्यांना निजबोधामुळे सर्वत्र समब्रह्मच दिसत असते ६५.
या नांव गा ‘सत्य’ जाण । उद्धवें केला नाहीं जो प्रश्न ।
त्या शौचाचें निरूपण । देवो आपण सांगत ॥ ६६ ॥
ह्याचेच नांव ‘सत्य’ हे लक्षात ठेव. आता उद्धवाने जे प्रश्न केले, त्यांत शौचाबद्दल प्रश्न केलेला नसतां भगवान् त्या शौचाचे निरूपण आपण होऊन सांगत आहेत ६६.
नव्हतां शुद्ध अंतःकरण । त्याग संन्यास न घडे जाण ।
अंतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥ ६७ ॥
अंत:करणाची शुद्धि न होईल तर त्याग किंवा संन्यास घडत नाही. याकरितां अंत:करणशुद्धीसाठी पूर्ण शौच म्ह. अत्यंत निर्मळ स्वरूप जें स्वधर्माचरण तेच श्रीकृष्ण सांगतात ६७.
अंतरीं कर्ममळाचें बंधन । त्याचें स्वधर्में करावें क्षालन ।
कर्मे कर्माचें निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावें ॥ ६८ ॥
अंत:करणामध्ये कर्ममळाचे बंधन असते, त्याचे स्वधर्मान क्षालन करून टाकले पाहिजे. कर्मानेंच कर्माचे निर्दलन करून आपण निष्कर्म व्हावें ६८.
ते स्वधर्मीं फळाशा सुटता । कर्मबंधनें तुटती सर्वथा ।
यालागीं फळनिराशता । अंतरशौचता अतिशीघ्र ॥ ६९ ॥
स्वधर्मातील फलाशा सुटली असतां कर्मबंधनें तुटून जातात. याकरितां फलाची निराशता धरून अंत:करणशुद्धि लौकर साधावी ६९.
नैराश्यें स्वधर्माचरण । तेणें अंतरमळाचें क्षालन ।
या नांव गा शौच जाण । ‘शौच’ संपूर्ण नैराश्यें ॥ ७० ॥
नैराश्यवृत्तीने स्वधर्माचरण केले म्हणजे अंत:करणांतील मलांचे क्षालन होऊन जाते. ह्याचेच नांव ‘शौच’; सर्व आशा सोडून देण्यानेच खरें शौच साधतें ४७०.
ऐसे ‘शौच’ शुद्ध‍अंतःकरणीं । ते भूमिका संन्यासग्रहणीं ।
यालागीं शौच अप्रश्नीं । सारंगपाणी बोलिला ॥ ७१ ॥
अंतःकरणांतील अशी जी शुद्धता तीच संन्यासग्रहणाची भूमिका म्हणजे पाया होय. म्हणूनच शौचाविषयी प्रश्न न करिताही श्रीकृष्णांनी त्याचा उलगडा केला ७१.
सकळ संकल्पांचा त्याग । हाचि पैं ‘संन्यास’ चांग ।
ऐसें बोलिला तो श्रीरंग । ‘त्याग’ तो चांग या नांव ॥ ७२ ॥
सर्व संकल्पांचा त्याग करणे, हाच उत्तम ‘संन्यास ‘होय. असेंच त्या श्रीकृष्णांनी सांगितले. आणि उत्कृष्ट ‘त्याग’ तोही हाच असे ते म्हणतात ७२.
मी देह हे दृढता जीवीं । संकल्पें तगमग नित्य नवी ।
बाह्य दंड कमंडलु भगवीं । हें संन्यासपदवी लौकिक ॥ ७३ ॥
देह तो मी, ही मनामध्ये दृढ कल्पना, त्यामुळे संकल्पविकल्पाने जीवाला नित्य नवी तगमग लागलेली असते. आणि बाहेरून मात्र दंड, कमंडलु, भगवीं वस्त्रें यांचा थाट, असली संन्यासदीक्षा केवळ लौकिकी होय! ७३.
धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः ।
दक्षीणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] धर्म हेच माणसांचे कल्याणकारी ‘धन’ आहे मी परमेश्वर ‘यज्ञ’ आहे ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजेच ‘दक्षिणा’ होय प्राणायाम हेच श्रेष्ठ ‘बळ’ होय. (३९)
धन धान्य पशु रत्न । हें प्राण्यासी नव्हे इष्ट धन ।
मोक्षामार्गीं सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥ ७४ ॥
धनधान्य, गाईम्हशी, रत्ने इत्यादि हे काही प्राण्यांचे ‘ इष्ट’ म्ह. हितकर धन नव्हे, तर मोक्षमार्गामध्ये सबळ असा धर्मच इष्ट धन होय ७४.
घरीं जें पुरिलें धन । तें घरींच राहे जाण ।
धर्म तो सवें चालतें धन । अंगा बंधन येवो नेदी ॥ ७५ ॥
घरांत जे पुरलेले द्रव्य असतें तें घरच्या घरीच राहते. परंतु धर्म हा आपल्याबरोबर येणारे धन आहे. ते आपल्या अंगी बंधन लागू देत नाही ७५.
धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी आणिक जाण ।
मरतांही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेंचि धन सवें ने ॥ ७६ ॥
धार्मिक मनुष्याएवढा कृपण मी दुसरा कोणी पाहिलाच नाही. कारण, तो मेला तरीसुद्धा स्त्रीपुत्रांना ठकवून सारें धन आपणच बरोबर घेऊन जातो ७६.
धार्मिकीं धर्मार्थ वेंचूनि धन । मी भांडारी केला नारायण ।
जे समयीं जें जें लागे जाण । तें मी आपण स्वयें पुरवीं ॥ ७७ ॥
धार्मिक ‘लोकांनी आपलें धन धर्मार्थ खर्च करून मला नारायणाला त्यांनी भांडारी करून ठेविले आहे. म्हणून त्यांना ज्यावेळी जें काय लागेल, तें मी स्वत:च पुरवीत राहातों ७७.
यालागीं धर्म तो इष्ट धन । हें सत्य सत्य माझें वचन ।
ऐक यज्ञाचें व्याख्यान । यथार्थ जाण सांगतों ॥ ७८ ॥
म्हणून धर्म हेच ‘इष्टधन’ होय, हेच माझें खरेखुरे वचन आहे. आता यज्ञाचा अर्थ ऐक. तोही स्पष्ट करून तुला सांगतों ७८.
अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण ।
अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण । परम प्रमाण वेदोक्त ॥ ७९ ॥
अग्नि हे माझे मुख आहे, आणि यज्ञाचा भोक्ता मी नारायण आहे असें जाण. फार काय सांगावें, सारा यज्ञच मी श्रीकृष्ण आहे. ह्याला वेदाचेही उत्तम प्रमाण आहे ७९.
तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । मद्दीक्षादीक्षित जाण ।
सद्‍भावें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥ ४८० ॥
त्यांत ब्राह्मण म्हणजे माझे स्वरूप होय. यज्ञदीक्षा घेतलेले असे ते दीक्षित ब्राह्मण, त्यांनी भक्तिभावाने माझे यजन करून माझे पूर्ण सुख प्राप्त करून घेतले आहे ४८०.
तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडें । अविधी दांभिक याग घडे ।
तोही मज मुखींच पडे । परी ते कोरडे खडखडीत ॥ ८१ ॥
पण त्यांत जे अधर्माने द्रव्यसंपादन करून अविधीनें केवळ ढोंगासाठी यज्ञ करितात ते लोक, तो याग माझ्याच मुखांत पडत असतांही खडखडीत कोरेच्या कोरेच राहातात ८१.
अविधी जाहले पशुघातकी । तेणें अवदानें मी नव्हें सुखी ।
दंभे पडले कुंभिपाकीं । महानरकीं रौरवीं ॥ ८२ ॥
विधीने ते पशूचा घात मात्र करतात; त्या अवदानाने मी संतुष्ट होत नाहीं; दंभामुळे ते कुंभीपाक-महारौरव नरकांत मात्र पडतात ! ८२.
सर्व भूतांच्या भूतमुखीं । अर्पी तें पावे यज्ञपुरुखीं ।
हे दीक्षा नेणोनि याज्ञिकीं । जाहले नारकी हिंसादोषें ॥ ८३ ॥
सर्व प्राणिमात्रांच्या मुखामध्ये जें जें कांहीं अर्पण करावें, तें तें मज यज्ञपुरुषालाच पोंचतें; पण हे दीक्षारहस्य यज्ञकर्त्यांना माहीत नसल्यामुळे हिंसादोष करून नरकांत मात्र पडतात !८३
जो मद्‍भावें दीक्षित जाण । विश्वतोमुखीं ज्यांचे यजन ।
तयांचा ‘यज्ञ’ तो मी नारायण । दक्षीणा कोण ते ऐका ॥ ८४ ॥
जे माझ्या भक्तिभावाची दीक्षा घेऊन, सारे विश्व हेंच माझें मुख असे समजून प्राणिमात्रांच्या मुखांत अवदान देतात, त्यांचा यज्ञ म्ह. मी नारायणच आहे. आता ‘दक्षिणा’ कोणती ती ऐकावी ८४.
यज्ञासी मोल नाहीं देख । त्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक ।
हातां येतांचि याज्ञिक । महासुख पावले ॥ ८५ ॥
यज्ञाला कांहीं मोल नाही. त्यांत ज्ञान हीच अमोलिक दक्षिणा होय. ती हाती आली की, याज्ञिकाला ‘महासुख’ प्राप्त होते ८५.
दक्षिणा आल्या ज्ञानघन । याज्ञिक होती अतिसंपन्न ।
कल्पांतीं वेंचेना तें धन । निजीं समाधान जीवशिवां ॥ ८६ ॥
ज्ञानधनरूप दक्षिणा मिळाली की, याज्ञिक लोक अत्यंत संपन्न होऊन राहतात. तें धन कल्पांतीसुद्धा खर्च होत नाही. त्यामुळे जीवाला व शिवाला दोघांनाही समाधान होते ८६.
सर्वांमाजीं प्राण सबळ । प्राणबळें बळी सकळ ।
प्राणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदे ॥ ८७ ॥
सर्वांमध्ये प्राण हा फार प्रबळ आहे. प्राणाच्या योगानेच सर्वांना बल प्राप्त होते. प्राणाच्याच योगाने मन चपल बनते. प्राणस्पंदनानेंच ते अत्यंत चंचळ झाले आहे८७.
यापरी गा बळिष्ठ प्राण । प्राणाअधीन सदा मन ।
तो प्राण जिंकावा आपण । ‘बळवंतपण’ या नांव ॥ ८८ ॥
इतका प्राण हा बलाढ्य आहे. आणि मन हे सतत प्राणाच्याच अधीन असते. अशा प्राणालाच जिंकणे, यालाच ‘बळवंतपणा’ म्हणतात ८८.
गज उपडिजे पायीं धरून । घायीं चूर कीजे पंचानन ।
प्राण न जिंकतां जाण । शूरांचें प्रमाण नव्हे बळ ॥ ८९ ॥
प्राणाला न जिंकतां, पायाला धरून हत्ती फेंफून देणे किंवा एका घावासरशी सिंहाचा चक्काचूर करणे. हे काही शूराच्या बळाचे प्रमाण नव्हे ८९.
प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचें करूनि दमन ।
तो स्वयें कीजे गा स्वाधीन । ‘अतिबळ’ जाण या नांव ॥ ४९० ॥
कारण जीव आणि मन ही प्राणाच्याच अधीन असतात. त्या प्राणाचे दमन करून तो स्वत: आपल्या स्वाधीन करून घ्यावा याचेच नांव ‘अतिबळ ‘ म्ह• अगाध सामर्थ्य होय ४९०.
दृढ प्राणायाम साधिल्यापाठीं । थोरला देवो धांवे भेटी ।
भेटलिया न सुटे मिठी । ऐसा ‘बळी’ सृष्टीं प्राणायामी ॥ ९१ ॥
प्राणायाम नीटपणे साधला, म्हणजे थोरला देव धावतच भेट घ्यावयाला येतो. आणि तो एकदा भेटला म्हणजे त्याची मिठी सुटतच नाही. प्राणायाम करणारा जगांत इतका बलिष्ठ होतो ९१.
भगो म ऐश्वरो भावो लाभो मद्‍भक्तिरुत्तमः ।
विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीरकर्मसु ॥ ४० ॥
[श्लोक ४०] माझे ऐश्वर्यच ‘भग’ आहे माझी भक्ती हाच उत्तम ‘लाभ’ आहे, जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांमधील भेद नाहीसा होतो, तीच खरी ‘विद्या’ समजावी पाप करण्याची घृणा वाटणे, याचेच नाव ‘लज्जा’ असे आहे. (४०)
उद्धवें पुशिला दयेचा प्रश्न । तें न सांगोनि श्रीकृष्ण ।
परम भाग्याचें निरूपण । स्वयें आपण सांगत ॥ ९२ ॥
उद्धवाने ‘दया’ कशाला म्हणतात असा प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर न सांगतां श्रीकृष्ण महद्भाग्याचंच निरूपण सांगू लागले ९२.
केवळ भाग्येंवीण । दया तितुकी वांझ जाण ।
यालागीं भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९३ ॥
ह्याचे कारण, केवळ भाग्याशिवाय दया कितीही असली तरी ती वांझ म्ह. फोल आहे. ह्याकरितां स्वत: श्रीकृष्ण भाग्याचंच लक्षण सांगतात ९३.
म्हणसी कृपणाचें भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य ।
परम भाग्य त्याचें चांग । जो दयेतें साङ्ग प्रतिपाळी ॥ ९४ ॥
तूं म्हणशील की, एखादा कृपणही भाग्यवंत असतो; पण तो भाग्य असून अभागीच होय. याकरितां जो दयेचाच यथासांग प्रतिपाळ करतो, त्याचेच भाग्य उत्तम होय ९४.
त्या परम भाग्याचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
ऐक तेथींची उणखूण । उदारपण भाग्याचें ॥ ९५ ॥
त्या उत्तम भाग्याचे संपूर्ण लक्षण तुला सांगतो. त्या भाग्याचे उदारत्व म्ह• उत्कृष्टत्व रहस्यपूर्वक सांगतों ऐक ९५.
‘ज्ञान’ आणि ‘वैराग्य’ पूर्ण । ‘लक्ष्मी’ आणि ‘औदार्य’ गुण ।
‘ऐश्वर्य’ आणि ‘यश’ गहन । हे षड्‍गुण जाण महाभाग्य ॥ ९६ ॥
‘ज्ञान’ आणि पूर्ण ‘वैराग्य’, ‘लक्ष्मी’ आणि ‘औदार्य’, ‘ऐश्वर्य’ आणि ‘यश’ हे सहा गुण म्हणजेच ‘महाभाग्य’ होय ९६.
हे षड्‍गुण माझें भाग्य । भाग्यें पावे जो सभाग्य ।
तोचि दयेतें पाळी साङ्ग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥ ९७ ॥
हे षड्गुणच माझं भाग्य आहे. असें भाग्य सुदैवाने ज्याला लाभते, तोच यथासांग दयेचा प्रतिपाळ करूं शकतो ९७.
जो षड्‍गुणेंशीं संपन्न । तोचि दीनदयाळू जाण ।
देऊं जाणे दान सन्मान । दरिद्रविच्छिन्न करूं शके ॥ ९८ ॥
या सहा गुणांनी जो परिपूर्ण असतो, तोच ‘दीनदयाळू’ होय. तोच दानसन्मान देऊं जाणतो, व दारिद्रही दूर करूं शकतो ९८.
ऐशिया सभाग्याची भेटी । होय तें भाग्य पाहिजे ललाटीं ।
माझ्या भाग्यास सृष्टीं । आणिक दृष्टीं दिसेना ॥ ९९ ॥
अशा भाग्यवंताची भेट होण्याला आपल्यालाही तसेंच भाग्य लागते. सारांश, माझ्या भाग्यासारखे भाग्य जगांत दुसरें पहावयास मिळणार नाही ९९.
ऐसेनि ऐश्वर्यें संपन्न । तो दयेचें माहेर जाण ।
तिसी सोहळे करिती आपण । दया संपन्न त्याचेनि ॥ ५०० ॥
अशा ऐश्वर्याने जो संपन्न असतो, तोच दयेचे माहेरघर होय. तोच तिचे लाड पुरवितो. आणि त्याच्यामुळेच दया ही समर्थ होऊन राहते ५००.
यालागीं दयेचे पोटीं । म्यां सांगितली भाग्याची गोठी ।
भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टीं कदा नोहे ॥ १ ॥
म्हणूनच दयेच्या पोटीं मी तुला भाग्याची गोष्ट सांगितली. ज्याच्या अंतःकरणांत भूतदया असते, तो जगांत अभागी कधीच राहावयाचा नाहीं १.
तुवां पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण ।
माझी उत्तम भक्ति जाण । ‘लाभ’ संपूर्ण त्या नांव ॥ २ ॥
आतां ‘लाभ’ तो कोणता ? असाही प्रश्न तूं विचारला आहेस. त्याचेही लक्षण ऐक. माझी जी उत्तम भक्ति तोच संपूर्ण लाभ होय २.
माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पायां लागती ।
सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥ ३ ॥
कारण माझी उत्तम भक्ति केली असतां, चारीही मुक्ति पायाला लागतात. आणि मोठमोठे देवही लोटांगणी येतात. भक्तीनें मुख्यतः मज लक्ष्मीपतीचा लाभ होतो ३.
हा लाभ न येतां हातीं । धनादिकांची जे प्राप्ती ।
तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥ ४ ॥
हा लाभ हाती न येतां द्रव्यादिकांचा होणारा लाभ, हा नरकगति देणारा नुकसानरूपच होय ४.
यालागीं परम लाभ माझी भक्ती । जेणें मी लाभें श्रीपती ।
ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥ ५ ॥
ह्याकरिता सर्वात श्रेष्ठ लाभ म्हणजे माझी भक्तिच होय. कारण तिच्या योगाने माझा श्रीपतीचा लाभ होतो. आतां विद्येचें स्पष्टीकरण ऐक. तें मी यथार्थ रीतीने सांगतों ५.
दृढ वासनेचिया संबंधा । शुद्धास आणी जीवपदा ।
अभेदीं उपजवी भेदा । ‘अविद्याबाधा’ या नांव ॥ ६ ॥
वासनेचा दृढ संबंध जोडून शुद्ध अशा आत्म्याला जी जीवरूपाला आणते व अभेदामध्ये भेद उत्पन्न करते, तिलाच ‘अविद्याबाधा’ असें नांव आहे ६.
देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
त्या कर्माचा अभिमान परम । तो ‘जीवधर्म’ देहबुद्धी ॥ ७ ॥
देहाच्या माथ्यावर वर्णाश्रम, आणि आश्रमाच्या माथ्यावर कर्म, आणि त्या कर्माचा प्रबळ अभिमान चढल्यामुळे ‘देह हाच मी’ अशी बुद्धि उत्पन्न होते. हाच ‘जीवधर्म’ होय ७.
ते छेदोनि जीवाची बाधा । तो मेळविजे चिदानंदा ।
ती नांव शुद्ध ‘आत्मविद्या’ । येर ते अविद्या सर्वही ॥ ८ ॥
ती जीवाची बाधा नाहींशी करून त्याला चिदानंदस्वरूपाला मिळविते, तिचेच नांव शुद्ध ‘आत्मविद्या’ होय. बाकीच्या झाडून साऱ्या अविद्याच होत ८.
जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या ।
येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥ ९ ॥
अविद्येचा जी निरास करते, तिलाच ‘शुद्धविद्या’ असे म्हणतात. इतर शास्त्रादिक ज्या चौदा विद्या आहेत, ती पल्लव फुटलेली अविद्याच होय असे समजावें ९.
जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या ।
आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥ ५१० ॥
जीवाची बाधा जिच्या योगानें नाहींशी होते, तिलाच शुद्ध ‘आत्मविद्या’ म्हणतात; आतां ‘ह्री ‘ म्ह० लज्जा तिचे स्वरूप ऐक. निंद्यकर्माविषयीं लज्जा वाटणे याचंच नांव खरी लज्जा होय १०.
केवळ अवयव झांकणें । ते लज्जा येथ कोण म्हणे ।
गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते ‘लज्जा’ ॥ ११ ॥
केवळ अवयव झांकणे हीच लज्जा असे येथे कोण म्हणणार ? तर जीवप्राण गेला तरी अकर्म म्हणून करावयाचे नाही, तीच खरी ‘लज्जा’ होय ११.
श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः ।
दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] निरपेक्षता इत्यादी गुणच ‘श्री’ होय सुखदुःखाच्या पलीकडे जाणे म्हणजेच ‘सुख’ विषयांची कामना हेच ‘दुःख’ समजावे आणि बंधन व मोक्षाचे तत्त्व जाणणे हेच ‘पांडित्य’ होय. (४१)
सकळ साम्राज्यवैभवेंसीं । चतुर्दशभुवनविलासेंसीं ।
अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥ १२ ॥
चौदा भुवनांच्या साऱ्या साम्राज्यवैभवासहित लक्ष्मी प्राप्त झाली तरी जो धुंकूनसुद्धा तिच्याकडे पाहात नाही १२;
ऐशी ज्याची निरपेक्षता । ते उत्कृष्ट ‘श्री’ तत्त्वतां ।
त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥ १३ ॥
इतकी ज्याची निरपेक्षता तीच खरोखर उत्कृष्ट ‘श्री’ होय. तशा श्री-मंताला मी प्रत्यक्ष श्रीकृष्णसुद्धा शिरसावंद्य करतो, मग इतरांची कथा काय? १३.
ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां ।
त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥ १४ ॥
ज्याला लक्ष्मीचीसुद्धा इच्छा नाहीं, तो निरंतर माझ्या मस्तकावरच राहात असतो. त्याच्यापेक्षा आवडता मला दुसरा कोणीच नाही १४.
सुख आणि महादुःख । दोनींतें ग्रासोनियां देख ।
प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव ‘सुख’ उद्धवा ॥ १५ ॥
उद्धवा! सुख किंवा महादुःख दोन्ही ग्रासून टाकून ‘स्वाभाविक’ जो आनंद प्रगट होतो त्याचे नांव ‘सुख’ १५.
जेथ दुजयाची चाड नाहीं । इंद्रियांचा पांग न पडे कांहीं ।
विषयावीण आनंद हृदयीं । ‘निजसुख’ पाहीं या नांव ॥ १६ ॥
जिकडे दुसऱ्याची गरज लागत नाही, इंद्रियांचा पांग पडत नाही, आणि विषयांचीही आवश्यकता असत नाहीं; अशा स्थितीत हृदयांत जो आनंद उत्पन्न होतो, त्याचे नाव ‘निजात्मसुख’ १६.
विसरोनि हें निजसुख । कामापेक्षा करणें देख ।
याचि नांव गा परम ‘दुःख’ । केवळ ते मूर्ख सेविती ॥ १७ ॥
हें आत्मसुख विसरून विषयाची इच्छा करणे ह्याचंच नांव ‘महादुःख ‘; शुद्ध मूर्ख लोकच त्याचे सेवन करतात १७.
नित्य होतां कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती ।
कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥ १८ ॥
रोज रोज जरी विषय प्राप्त झाले, तरी इच्छेची तृप्ति म्हणून होतच नाही. विषयाची इच्छा हीच दुःखाच्या भोवऱ्यांत पाडते. विषयाची इच्छा हेच दुःख होय १८.
हा बंध हा मोक्ष चोख । जाणणें जें अलौकिक ।
कदा नव्हे आनुमानिक । ‘पंडित’ देख या नांव ॥ १९ ॥
हा बंध आणि हा मोक्ष हें ‘स्पष्ट रीतीने जाणतो, अनुमान’ करीत नाही, त्याचेच नांव ‘पंडित’ १९.
ऐशी न जोडतां अवस्था । आम्ही सज्ञान वेदशास्त्रतां ।
ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥ ५२० ॥
अशी अवस्था न मिळविता, आम्ही वेदशास्त्र शिकून सज्ञान झालों अशा अभिमानाचा पंडितपणा येथे काही उपयोगी पडत नाही ५२०.
ज्यासी शांति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचें ज्ञान ।
तो ‘महापंडित’ जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ २१ ॥
तर ज्याला खरी शांति आणि खरे समाधान प्राप्त झाले आहे , बंध कोणता व मोक्ष कोणता याचे ज्ञान आहे, तोच ‘महापंडित’ होय, असें श्रीकृष्ण म्हणतात २१.
मूर्खो देहाद्यहंबुद्धीः पन्था मन्निगमः स्मृतः ।
उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] शरीर इत्यादींना ‘मी’ मानणारा तो ‘मूर्ख’ होय माझी प्राप्ती करून देतो, तोच खरा ‘मार्ग’ होय चित्ताची बहिर्मुखता हाच ‘कुमार्ग’ होय सत्त्वगुणाची वृद्धी म्हणजेच ‘स्वर्ग’ (४२)
वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख म्हणती लोक ।
ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥ २२ ॥
एखादा वेदशास्त्र जाणणारा नसला म्हणजे त्याला लोक ‘मूर्ख’ म्हणतात ; पण तो मूर्खपणा येथे मान्य नाही. तर केवळ देहाभिमानी असतो तोच येथे ‘मूर्ख’ समजला जातो २२.
केवळ नश्वर देह देख । तो मी म्हणोनि मानी हरीख ।
देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥ २३ ॥
केवळ नाशवंत देह तोच मी असें समजून हर्ष मानतो, आणि त्या देहाच्या अभिमानाने नरक भोगतो, ह्यापेक्षा मूर्ख दुसरा कोण आहे ? २३.
विटाळें देहाचा संभवो । विटाळें देहाचा उद्‍भवो ।
विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥ २४ ॥
विटाळापासूनच देहाची उत्पत्ति ; विटाळापासूनच देहाची वाढ ; आणि विटाळांतच देहाचे निधन ! अशी देहापाशींच विटाळाची वस्ती! २४.
देहाचें निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र ।
तो मी म्हणवूनि जो श्लाघत । ‘मूर्ख’ निश्चित तो जाण ॥ २५ ॥
अशा ह्या देहाचे स्वरूप पहावयास गेले, तर अस्थि, चर्म, विष्ठा आणि मूत्र, असा देहच ‘मी’ म्हणून आढ्यता मिरवितो, तो खराखुरा ‘मूर्ख’ होय २५.
ऐशी जे कां देह‍अहंता । ती नांव परममूर्खता ।
चालणें माझ्या वेदपंथा । ‘सन्मार्गता’ ती नांव ॥ २६ ॥
अशी जी देहाची अहंता तिचंच नांव खास ‘मूर्खता’ होय. माझ्या वेदमार्गाने चालणें तोच ‘सन्मार्ग’ होय २६.
ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निंदी गुरुदेवता ।
जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥ २७ ॥
ज्याला चित्तभ्रंश झाला असेल तोच गुरूची व देवाची निंदा करतो. जो वेदशास्त्रार्थ मानीत नाही, तोच आडमार्गात जाऊन पडतो २७.
जो गुरुदोषदर्शी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां ।
जो धिक्कारी मातापिता । ‘चित्तविक्षेपता’ त्या नांव ॥ २८ ॥
जो मत्सरपूर्वक गुरुदोषदर्शी असतो, जो सुहृदआप्तांशी रागाने वागतो, जो मातापित्यांचा धिक्कार करतो त्याचे नांव ‘चित्तविक्षेप’ होय २८.
जो सन्मानालागीं पाही । साधुसज्जनांतें करी द्रोही ।
जो दोष देखे ठायीं ठायीं । ‘चित्तविक्षेप’ पाहीं या नांव ॥ २९ ॥
जो आपल्या सन्मानासाठी साधुसंतांचा द्रोह करतो, जो जागोजागी दोष मात्र पाहातो, त्यालाच ‘चित्तविक्षेप’ असे म्हणतात २९.
जो वदे परापवादा । जो करूं रिघे परनिंदा ।
जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । ‘चित्तविक्षेपबाधा’ । ती नांव ॥ ५३० ॥
जो दुसऱ्याचे दोष उच्चारतो, जो दुसऱ्याची निंदा करितो, जो स्त्रीच्या शब्दावर विश्वास ठेवतो, त्याला चित्तभ्रंश विकार झाला म्हणून समजावें ५३०.
जो सन्मार्गापासूनि चेवता । पडे अधर्मअकर्मउत्पथा ।
तेही ‘चित्तविक्षेपता’ । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥
जो सन्मार्गापासून निघून अधर्मात किंवा अकर्मात पडतो; तोही उद्ध्वा! खरोखर चित्तभ्रंशच होय ३१.
आपण तत्त्वतां परब्रह्म । जाणणें हा ‘वेदमार्ग’ उत्तम ।
हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम ‘उन्मार्ग’ ॥ ३२ ॥
आपण खरोखरीच परब्रह्म आहों, असें जाणणे हाच उत्तम ‘वेदमार्ग’ होय. हे न जाणतां लोभ धरून वागणे तोच मोठा असन्मार्ग’ होय ३२.
स्वर्गशब्दाची व्युत्‍पत्ती । ते सत्त्वगुणाची उत्पत्ती ।
जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥ ३३ ॥
आतां स्वर्ग शब्दाचा अर्थ असा की, ज्याच्या योगाने आत्मसुखाची प्राप्ति होते असा जो ‘सत्त्वगुण तो स्वर्ग’ इंद्रलोकाला जाणे हा स्वर्ग नव्हे ३३.
अमरभुवना जे जे गेले । ते परतोनि पतना आले ।
शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥ ३४ ॥
कारण इंद्रलोकाला जे जातात ते पुन्हा माधारे येतात; पण शुद्धसत्त्वामध्ये जे मिसळतात, ते निजसुखाला पोचतात ३४.
ऐसा जो कां सत्त्वगुण । तोचि येथें ‘स्वर्ग’ जाण ।
आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ३५ ॥
असा जो का सत्वगुण तोच येथे ‘स्वर्ग’ असे समजावें. आतां नरकाचेही सारे लक्षण तुला सांगतों ३५.
नरकस्तम‍उन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे ।
गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] तमोगुणाची वृद्धीच ‘नरक’ होय गुरूच खरा ‘बंधू’ होय आणि तो गुरू मी आहे हे मनुष्यशरीर हेच खरे ‘घर’ आहे तसेच जो गुणांनी संपन्न आहे तोच ‘धनवान’ समजावा. (४३)
कामक्रोधलोभ‍उद्रेक । तेणें खवळे महामोह देख ।
तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥ ३६ ॥
काम, क्रोध आणि लोभ यांच्या ज्या उसळ्या येतात, त्यामुळे महामोह खवळून उठतो; तो ज्ञानासहवर्तमान विवेकाला बुडवून टाकतो; तेव्हां एकटा तमोगुणच वाढत असतो ३६.
अरुणोदयीं दाट कुहर । निबिड पडे अंधकार ।
न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥ ३७ ॥
अरुणोदयाच्या वेळी धुकेच धुके माजून राहते, गर्द अंधार होतो, त्या वेळी सूर्यचंद्रही दिसत नसल्यामुळे आता दिवस आहे की रात्र आहे ही स्थिति कळत नाहीं ३७.
यापरी गा निजचित्तीं । अंधतमे वाढे वृत्ती ।
कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥ ३८ ॥
ह्याप्रमाणे आपल्या चित्तांत अंधतम वृत्ति वाढून राहते. आणि कर्तव्य कोणतें व अकर्तव्य कोणते, यांपैकी एकही स्फूर्ति स्फुरत नाही! ३८,
ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नांव जाण ‘महानरक’ ।
परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥ ३९ ॥
असा जो तमोगुणाचा ‘उन्नाह’ म्ह० उद्रेक होतो. त्याचेच नांव ‘महानरक’ होय. यमयातनेचे जें दुःख त्याला नरक म्हणूं नये ३९.
यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे ।
याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥ ५४० ॥
कारण यमयातनेने पाप झडून जाते, पण महामोहाने पाप वाढत असते. यमलोकांतले नरक ‘यापुढे ‘ म्हणजे तुच्छ होत; महामोहांतले नरक हेच मोठे नरक समजावे ५४०.
काम क्रोध लोभ देख । हेचि तीनी निरयदायक ।
तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥ ४१ ॥
काम, क्रोध आणि लोभ हे तिघे नरक देणारे आहेतच, त्यांत महामोह एक मिळाला म्हणजे ‘अंधतम’ बनतो ४१.
इतुका मिळे जेथ समुदावो । त्यांते बोलिजे ‘तम‍उन्नाहो’ ।
ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥ ४२ ॥
इतका समुदाय जेव्हां एकत्र जमतो, तेव्हां त्याला ‘तमउन्नाह ‘ असे म्हणतात. इतकी ज्याची स्थिति घडून येईल तो पुरुष ‘नरकरूपच’ समजावा ४२.
जो घोरनरकाप्रती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये ।
‘तम‍उन्नाह’ ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥ ४३ ॥
जो घोर नरकाला जातो त्याचा येथून उद्धार तरी होतो; पण ज्याला ‘तमउन्नाह ‘ प्राप्त होतो, त्याचा महाकल्पांतींही उद्धार होत नाही ४३.
ऐशी तम‍उन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कंटाळे चित्तीं ।
ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥ ४४ ॥
अशी ‘तम उन्नाहा’ ची ख्याति श्रवण करून उद्धवाच्या मनाला कंटाळा आला आणि तो मनांत म्हणाला की, अशा तमोवृत्तीत बुडणाऱ्या जीवांचा उद्धार तरी कोण करणार? ४४.
ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो ।
बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥ ४५ ॥
हा उद्धवाच्या मनात आलेला अभिप्राय जाणून देवाधिदेव म्हणाले, अहो अशा बुडणाज्या लोकांचा निज सखा जो गुरु तो उद्धार करतो ४५.
ऐसा गुरु तो तूं कोण म्हणशी । मी नित्य लागें ज्याच्या पायांशीं ।
जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । ‘गुरु’ नाम तयासी बोलिजे ॥ ४६ ॥
आतां असा गुरु कोण? असे म्हणशील, तर मी नित्य ज्याच्या पायाला लागतों, जो चिन्मात्र ब्रह्मरूप प्राप्त करून देतो, त्यालाच ‘गुरु’ असे म्हणतात ४६.
त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलिसे तत्त्वतां ।
ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्‍हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥ ४७ ॥
खरोखर त्या गुरूची योग्यता ब्रह्मापेक्षाही अधिक आहे. कारण ब्रह्माला ‘हे ब्रह्म’ म्हणून प्रतिपादन करणारा अथवा दाखवून देणारा तो असतो. एरव्ही ब्रह्माची वार्ता विचारलीच असती कोणी? ४७.
अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित ।
हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्‍गुरूंनीं येथ विस्तारिली ॥ ४८ ॥
ते अज आहे; अव्यय आहे; तसेंच अनंत, अच्छेद्य, अभेद्य व अपरिमित आहे, अशा प्रकारचा ब्रह्माचा महिमा सारा सद्गुरूंनीच जगांत प्रसृत केला आहे ४८.
ऐशी ऐकतां सद्‍गुरुकीर्ती । जडजीव उद्धरती ।
‘गुरु’ नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥ ४९ ॥
अशी सद्गुरूची कीर्ति श्रवण केल्याने जडजीवांचा उद्धार होतो. ‘गुरु’ नामाची ख्याति फार मोठी आहे. ती ऐकून यम व काळसुद्धा कापू लागतात ४९.
त्या सद्‍गुरूचें महिमान । करी बुडत्याचें उद्धरण ।
निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥ ५५० ॥
त्या सद्गुरूचा महिमाच बुडत्याचा उद्धार करतो, आणि जन्ममरणाचे निवारण करून शिष्याला समाधान देतो ५५०.
सुहृद आप्त सखा बंधु । शिष्याचे सद्‍गुरु प्रसिद्धु ।
निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥ ५१ ॥
शिष्याचा आप्त, सखा, बंधु सर्व सद्गुरुच असल्याचे प्रसिद्ध आहे. तोच नरकाचा संबंध चुकवून परमानंद सुख देणारा आहे ५१.
आतां गृहाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥ ५२ ॥
आतां गृहाचे लक्षण तुला मी सांगतो. माड्या, गच्च्या, बंगले हें कांहीं खरोखर घर नव्हे ५२.
मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसें मी पुरुषोत्तम ।
तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥ ५३ ॥
तर मनुष्यदेह हाच गृहाश्रम होय. त्यांतच मी पुरुषोत्तम विशेषत्वाने राहात असतो. त्या गृहातील स्वधर्मकर्म केले असतां आत्मारामाला संतोष होतो ५३.
ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती ।
वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥ ५४ ॥
ज्या नरदेहाच्या प्राप्तीची इंद्रादिक देवही इच्छा करतात, आणि वेदही ज्या देहाची कीर्ति वर्णन करतो, त्या नरदेहामध्येच मोक्षप्राप्ति होते ५४.
निज ‘गृह’ जें साचार । तें जाणावें नरशरीर ।
आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥
ह्याकरिता आपलें ‘घर’ म्हणून जें म्हणतात तें नरशरीर म्हणून समजावें. आता ‘ आढ्यतेचा जो विचार तोही ऐक ५५.
जो ज्ञानगुणीं अतिसंपन्न । जें कल्पांतींही न वेंचे धन ।
तोचि ‘आढ्यतम’ जाण । येर तें धन नश्वर ॥ ५६ ॥
जो ज्ञानगुणाने अत्यंत संपन्न असतो, जे धन कल्पांतीही संपत नाहीं; त्यालाच मोठा ‘आढ्य ‘ म्हणजे श्रीमान् म्हणावें. कारण इतर सारें धन नश्वर आहे ५६.
नश्वर धनाची आढ्यता । अवश्य नेत अधःपाता ।
ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥ ५७ ॥
नश्वर धनाची जी आढ्यता म्ह• श्रीमंती आहे, ती हटकून अधःपाताला मात्र नेते, परंतु ज्ञानधनाची जी श्रीमंती तिनें परब्रह्म हाती लागतें ५७.
दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः ।
गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] जो असंतुष्ट असतो तो ‘दरिद्री’ होय इंद्रिये ताब्यात नसलेला तो ‘कृपण’ होय ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही, तोच ‘ईश्वर’ याच्या उलट जो विषयांमध्ये आसक्त आहे, तोच ‘असमर्थ’. (४४)
ऐक दरिद्राचें लक्षण । गांठीं असतां कोटी धन ।
ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम ‘दरिद्री’ जाण या नांव ॥ ५८ ॥
आतां ‘दरिद्रा’चे लक्षण ऐक. कोट्यवधी द्रव्य गांठीला असूनही ज्याचे मन संतुष्ट नाही, त्याचेच नांव खरा ‘ दरिद्री’ ५८.
ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं ।
तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥ ५९ ॥
परंतु ज्याच्या गांठीला एक कपर्दिकही नाही, पण मनांत जर नित्य संतोष असेल, तर उद्धवा ! तोच सर्व जगामध्ये ‘संपन्न’ ही गोष्ट खरी समज ५९.
गांठीं असोनियां धन । जो पोटा न खाय आपण ।
सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥ ५६० ॥
पदरीं द्रव्य असून जो पोटालाही खात नाहीं, सदासर्वदा मन लोभावलेले, ह्याचंच नाव ‘दरिद्रलक्षण’ ५६०.
यापरी जें कृपणपण । ऐक त्याचेंही लक्षण ।
जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥ ६१ ॥
ह्यानंतर ‘कृपण’ कोणाला म्हणतात, त्याचेही लक्षण ऐक. राजाला ज्याप्रमाणे त्याच्या सेवकांनी बांधून ठेवावे, त्याप्रमाणे तो इंद्रियांच्या अधीन असतो ६१.
निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण ।
तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन हो‍ऊनि ठाके ॥ ६२ ॥
आपल्या स्वरूपाचा विचार केला, तर सर्वांचा राजा तो आपण होय. हे विसरून दीन होऊन इंद्रियांच्या अधीन होऊन बसतो ६२.
मन तयाचें आज्ञाधार । मनाचीं इंद्रियें किंकर ।
त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर ‘कृपणत्व’ ऐसें ॥ ६३ ॥
वास्तविक मन आत्म्याचे आज्ञाधारक म्हणजे चाकर, आणि इंद्रिये ही त्या मनाचे चाकर; परंतु त्यांचाही हा दासानुदास बनतो. याप्रमाणे इंद्रियाधीनतेमुळे हें थोर ‘कृपणत्व’ म्ह. दीनत्व येते ६३.
निज किंकराचीं किंकरें । त्या इंद्रियांचीं हा वोळंगे द्वारें ।
अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥ ६४ ॥
आपल्या चाकरांचे चाकर जी इंद्रिये, त्यांचे हा उंबरठे पूजीत बसतो. अशा प्रकारें इंद्रिये शिरजोर होऊ दिल्यामुळे आपल्या अंगांत खरोखरीचे ‘कृपणत्व’ येते ६४.
या नांव गा ‘कृपणपण’ । तुज म्यां सांगितले जाण ।
आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥
याचेच नाव ‘कृपणपणा ‘ म्ह. दीनदुबळेपणा. तो तुला सांगितला. आता उद्धवा ! ईश्वरपणाचे खरे लक्षण सांगतों तें ऐक ६५.
कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।
तोचि ‘ईश्वर’ त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥ ६६ ॥
उद्धवा ! कनक आणि कामिनी ज्याला मनापासून आवडत नाहीत, तोच खरोखर त्रिभुवनांतील ‘ईश्वर’ होय. ही माझी वाणी अगदी त्रिवार सत्य आहे ६६.
तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी वोळंगती गुण ।
त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥ ६७ ॥
तू जितके प्रश्न केले होतेस तितकेही गुण ज्याच्याकडे असतात, पण जो त्या गुणांपासून अलिप्त असतो, त्यालाच परिपूर्ण ‘ईश्वर’ असें नांव शोभते ६७.
कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनींहूनी ।
तोचि ‘अनीश्वरु’ जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥ ६८ ॥
पण उद्धवा! कनक आणि कामिनी ह्यांची मनापासून ज्याला आसक्ति असते, तो जगांतील ‘अनीश्वर’ होय हे पक्के लक्षात ठेव ६८.
शमादि सांगितले प्रश्न । त्यांचें जें विपरित लक्षण ।
तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥ ६९ ॥
ह्याप्रमाणे शमादि प्रश्नांचे उत्तर मी सांगितले. त्यांच्याविरुद्ध जे लक्षण म्ह. अशमादिक गुण अंगांत असणे, हेच ‘अनीश्वरत्व’ असें तूं समज ६९.
एत उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः ।
किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] उद्धवा ! तू जितके प्रश्न विचारले होतेस, त्या सर्वांची मी उत्तरे दिली गुण आणि दोषांची वेगवेगळी लक्षणे मी तुला किती म्हणून सांगू ? (४५)
उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्यां निरूपिले सुलक्षण ।
जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥ ५७० ॥
उद्धवा! तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरें मी विशद करून सांगितली. जेणेकरून ब्रह्मस्वरूप होता येईल. असेंच व्याख्यान करून सांगितले ५७०.
संसारीं गुणदोषलक्षण । सांगता अपरिमित जाण ।
यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥ ७१ ॥
संसारांतील गुणदोषांची लक्षणे सांगू लागले तर ती असंख्य आहेत. सांगून संपणार नाहीत. गुणदोषांचे विवेचन करणे फार कठीण आहे. ह्याकरितां मौन धरणेच बरें ७१.
गुणदोष नायकावे कानीं । गुणदोष न देखावे नयनीं ।
गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥ ७२ ॥
कारण, गुणदोष हे कानांनी ऐकू नयेत; गुणदोष डोळ्यांनी पाहूं नयेत; गुणदोष तोंडाने बोलू नयेत; फार काय सांगावें? गुणदोष मनांतही वागवू नयेत ७२.
ब्रह्मज्ञानाचें मुख्य लक्षण । तेंही बहुत नाहीं निरूपण ।
श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ ७३ ॥
आतां ब्रह्मज्ञानाचे मुख्य लक्षण म्हणशील, तर त्याचे निरूपण फारसें नाही. ते अर्ध्याच श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगून देत आहेत ७३.
गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तूभयवर्जितः ॥ ४६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
[श्लोक ४६] सगळ्यांचा सारांश एवढाच की, गुण आणि दोष पाहात राहाणे हाच सर्वात मोठा दोष आहे आणि गुणदोषांकडे दृष्टी न देणे हाच सर्वात मोठा गुण होय. (४५)
ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें कैंचे दोष कैंचे गुण ।
अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥ ७४ ॥
सर्वत्र एक परिपूर्ण ब्रह्मच आहे. त्यांत दोष कोणचे व गुण कोणचे ? अविद्या क्षुब्ध होते, तीच गुणदोषांचे लक्षण वाढविते ७४.
जो देखों लागे दोषगुण । त्याची अविद्या क्षोभली जाण ।
जो न देखे गुणदोषभान । तो ‘ब्रह्मसंपन्न’ उद्धवा ॥ ७५ ॥
ह्याकरितां जो गुणदोष पाहू लागतो, त्याची अविद्या क्षुब्ध झाली म्हणून समजावें. आणि उद्धवा! जो गुणदोषभान मुळीच पाहात नाही, तो ब्रह्मसंपन्न झाला म्हणून समजावें ७५.
पराचा देखावा दोषगुण । हाचि दोषांमाजीं महादोष जाण ।
गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥ ७६ ॥
दुसऱ्याचे गुणदोष पाहाणे हाच सर्व दोषांमध्ये मोठा दोष आहे आणि गुणदोष न पाहाणे हाच सर्वांमध्ये उत्तम गुण आहे ७६.
ब्रह्मीं नाहींत दोषगुण । हें सर्वार्थीं सत्य जाण ।
जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥ ७७ ॥
ब्रह्मामध्ये कांहीं गुणदोष नाहीत, हे सर्वथैव सत्य आहे. यास्तव जो गुणदोष पाहातो, त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व नाही हे सहज सिद्ध होते ७७.
जे गुणदोष देखों लागले । त्यांचें ब्रह्मत्व कैसेनि गेलें ।
त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥ ७८ ॥
जे गुणदोष पाहू लागतात त्यांचे ब्रह्मत्व कसें लोपते ? त्यांच्यापाशीं तें वोस पडते किंवा त्यांना सोडून तें जातें? ७८.
जेवीं रविबिंबा राहु ग्रासी । तैं दिवसा देखिजे नक्षत्रांसी ।
तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥ ७९ ॥
(असें म्हणशील तर सांगतों ऐक) रविबिंबाचा जेव्हां राहु ग्रास करतो, तेव्हां दिवसांही नक्षत्रे दृष्टीस पडतात. त्याप्रमाणे अविद्या ब्रह्मत्वाला जेव्हां प्राशून टाकते, तेव्हांच गुणदोष दृष्टीस पडू लागतात ७९.
आदरें सांगे श्रीकृष्ण । उद्धवा न देखावे दोषगुण ।
हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥ ५८० ॥
श्रीकृष्ण आदराने सांगतात की, उद्धवा ! कोणाचेही गुणदोष पाहूं नयेत हीच माझ्या जीवींची खूण आहे. ती सगळी मी तुला सांगितली ५८०.
जनीं चौर्‍यांशीं लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानीं ।
न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥ ८१ ॥
जगामध्ये चौऱ्यायशी लक्ष योनी आहेत; त्यांपैकी एका मनुष्ययोनीतील गुणदोष जरी न पाहिले, तरी तेवढ्यानेही तूं नित्यमुक्तच होशील ८१.
म्हणसी स्वाचारपरिपाठीं । गुणदोष देखावे दृष्टीं ।
उद्धवा हे गोष्टी खोटी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥ ८२ ॥
आता कदाचित् तू असें म्हणशील की, स्वधर्माचरण करीत असतां गुणदोष हे पाहिलेच पाहिजेत. पण उद्धवा ! हे म्हणणें निखालस खोटें आहे. कारण स्वधर्माची राहाटी ही याहून अगदी भिन्न आहे ८२.
निजदोष निरसावयाकारणें । स्वधर्मकर्म आचरणें ।
तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥ ८३ ॥
आपले दोष नाहीसे करण्याकरितांच मुळी स्वधर्मकर्माचे आचरण करावयाचे असते आणि तोच जर गुणदोष पाहूं लागला, तर मग मदतीस आलेल्यानेच नागविल्यासारखे झाले! ८३.
साळी पिकावया शेतीं । तृण जाळूनि दाढ करिती ।
तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८४ ॥
शेतांत भात पिकविण्यासाठी पालापाचोळा जाळून जमीन भाजून तयार करतात. त्याच्याऐवजी पिकाला आलेले भातच जर जाळून टाकलें, तर शेतकऱ्याच्या तोंडांत मातीच नाहीं का पडली १८४.
व्हावया दोषनिवृत्ती । वेदें द्योतिली धर्मप्रवृत्ती ।
तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥ ८५ ॥
दोषाचे क्षालन होण्याकरितांच वेदाने धर्माची प्रवृत्ति दाखवून दिली आहे ; त्या स्वधर्माने जर दोषच पाहू लागतील, तर ते आपल्या हिताला मुकलेच म्हणून समजावें ८५.
जेवीं कां सोंगें नटनटी । दाविती हावभाव नाना गोठी ।
परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥ ८६ ॥
जशी स्त्रीपुरुषांची सोंगे अनेक प्रकारचे हावभाव दाखवितात, अनेक प्रकारच्या श्रृंगाराच्या गोष्टी बोलतात, पण तो भाव कांही त्यांच्या पोटात असत नाही. तशाच दृष्टीने स्वधर्माचे आचरण करावें ८६.
न देखोनि दोषगुण । स्वधर्म-मर्यादा नोसंडून ।
करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लक्षण कर्मांचें ॥ ८७ ॥
गुणदोष न पाहाता, स्वधर्ममर्यादा न सोडता, स्वधर्माचरण करावे, हेच स्वधर्मकर्माचे मुख्य लक्षण आहे ८७.
ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ निःशेष जाती ।
साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥ ८८ ॥
अशा स्वधर्माचरणाने कर्माचे मळ निखालस धुऊन जातात. गुणदोषाची गोष्ट सोडून दिली, तरच साधकांना निजात्मपदाची प्राप्ति होते ८८.
गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही ।
गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥ ८९ ॥
गुणदोष हे देहाच्या ठिकाणी असतात; आत्मा तर नित्य विदेहीच असतो. अर्थात् त्याच्या ठिकाणी गुणदोष कधीच नसतात ८९.
साधकें न देखावे दोषगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण ।
जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥ ५९० ॥
याकरितां साधकांनीं गुणदोष पाहूंच नयेत. सिद्धाला तर ते दिसतच नसतात. इतक्या उप्पर गुणदोष जर दिसू लागतील, तर दोघांचीही नागवणच झाली म्हणून समजावें ९०’
साधकाची प्राप्ती बुडे । सिद्धाची सिद्धी तत्काल उडे ।
एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥ ९१ ॥
साधकाच्या लाभावर त्यायोगें पाणी पडते आणि सिद्धाची झालेली सिद्धि तत्काळ नाहीशी होते. याप्रमाणे उद्धवा ! हें गुणदोषांचे संकट उभयपक्षीही सारखेंच आहे ९१.
गुणदोषीं भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निज-दृष्टी ।
हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥ ९२ ॥
सारे जग हे गुणदोषांनी भरलेलेच आहे, पण आपण त्यावर दृष्टिच देतां कामा नये. हीच गोष्ट अंत:करणाच्या कळवळ्याने श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितली ९२.
गुणदोष विविधभेद । ऐसे आहेत निषिद्ध ।
तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥ ९३ ॥
गुणदोषांचे प्रकार पाहाणे जर इतकें निषिद्ध आहे, तर श्रीकृष्णाने वेदमुखाने तसे स्पष्ट कां बरें सांगितले आहे ? ९३.
येचि अर्थींचा प्रश्न । पुढें उद्धव करील जाण ।
तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥ ९४ ॥
अशा अर्थाचा प्रश्न पुढे उद्धव करणार आहे. त्याच्यावरील व्यासाचे निरूपण ऐकून जीवाला व शिवालाही विश्रांति मिळेल ९४.
तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त ।
स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्‍भुत ते आहे ॥ ९५ ॥
त्यांत सकाम भक्त आणि निष्काम भक्त ह्यांचे अधिकार श्रीकृष्ण स्वतः स्पष्ट करून सांगतील. ती कथा अति अद्भुत आहे ९५.
संतीं द्यावें अवधान । श्रोतां व्हावें सावधान ।
एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ५९६ ॥
ह्याकरितां संतांनी लक्ष द्यावें व श्रोत्यांनी सावध व्हावे, अशी एकाजनार्दन विनंति करतो. कारण पुढचे निरूपण फारच रसभरित आहे ५९६.
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्‌उद्धवसंवादे
एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥श्लोक ॥४६॥ ओव्या ॥५९६॥

ह्याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांतील एकादशस्कंधामधील, श्रीकृष्णोद्धवसंवादांतील एकनाथकृत टीकेचा एकुणिसावा अध्याय संपूर्ण झाला. (श्लोक ४६; ओंव्या ५९६, मिळून संथसंख्या ६४२)

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref:satsangdhara