sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 14

एकनाथी भागवत अध्याय 14

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो स्वामी द्‍गुरू । तूं निजांगें क्षीर सागरू ।
तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आल्हादकरू जीवासी ॥१॥
श्रीकृष्णाय नमः
हे स्वामी ! हे सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तू स्वत:च क्षीरसागर आहेस. तुझ्या ज्ञानरूप चंद्राचा उदय झाला असतां तो प्रत्येक जीवाला आल्हादकारक होतो १.

ज्या चंद्राचे चंद्रकरीं । निबिड अज्ञान अंधारीं ।
त्रिविध ताप दूर करी । हृदयचिदंबरीं उगवोनी ॥२॥
ज्या चंद्राच्या चांदण्याने हृदयाकाशांत प्रकाश पाडून घनदाट अज्ञानरूपी अंधारांतील त्रिविध ताप दूर केले २;

ज्या चंद्राचे चंद्रकिरण । आर्तचकोरांलागीं जाण ।
स्वानंदचंद्रामृतें स्रवोन । स्वभावें पूर्ण करिताती ॥३॥
ज्या चंद्राचे चंद्रकिरण तृषाक्रांत झालेल्या चकोरांसाठी स्वानंदचंद्रामृताने स्रवून त्यांना सहज तृप्त करतात ३;

अविद्याअंधारीं अंधबंधे । संकोचलीं जीवदेहकुमुदें ।
तीं ज्याचेनि किरणप्रबोधें । अतिस्वानंदें विकासलीं ॥४॥
अविद्यारूप अंधारांत अंधकाररूप बंधनांनी जीवाची देहरूप कमळे मुकुलित होऊन बसलेली असतात, ती ज्याच्या किरणरूप ज्ञानाने अत्यंत आनंदाने प्रफुलित होतात ४;

जो चंद्र देखतांचि दिठीं । सुख होय जीवाच्या पोटीं ।
अहंसोमकांतखोटी । उठाउठी विरवितू ॥५॥
जो चंद्र दृष्टीने पाहतांच जीवाच्या अंत:करणांत आनंद होतो, आणि जो अहंकाररूपी चंद्रकांत मण्याचा गोळा तत्काळ विरवून टाकतो ५.

पूर्णिमा पूर्णत्वें पूर्ण वाढे । देखोनि क्षीराब्धी भरतें चढे ।
गुरुआज्ञामर्यादा न मोडे । स्वानंद चढे अद्वयें ॥६॥
आपला पुत्र (शिष्य) पूर्णिमेच्या काळी पूर्णत्वाने पूर्ण वृद्धि पावला असे पाहून क्षीरसमुद्राला मोठी भरती येते, तरी त्याची गुरुगौरवाची मर्यादा मोडत नाही. अद्वयानुभवानें अंत:करणामध्ये आत्मानंद वाढतच असतो ६.

सद्‍गुरु क्षीराब्धी अतिगहन । सादरें करितां निरीक्षण ।
वेदांतलहरीमाजीं जाण । शब्दचिद्रत्‍नें भासती ॥७॥
सद्गुरुरूप क्षीरसमुद्र फार खोल आहे. त्याच्याकडे आदरपूर्वक पाहू लागले असतां त्यावर हेलावणाऱ्या वेदांतरूपी लहरीमध्ये शब्दरूपी ज्ञानरत्ने आढळून येतात ७.

तेथ विश्वासाचा गिरिवर । वैराग्यवासुकी रविदोर ।
निजधैर्याचे सुरासुर । मंथनतत्पर समसाम्यें ॥८॥
त्यांत विश्वास हाच मंदराचल पर्वत, व वैराग्यरूपी वासुकी हाच रवीला बांधावयाचा दोर; त्याच्या साहाय्याने निजधैर्यरूप देव-दानव समसमानपणे त्या क्षीरसमुद्राचे मंथन करण्यांत तत्पर असतात ८.

मथनीं प्रथम खळखळाटीं । लयविक्षेप हाळाहळ उठी ।
तें विवेकनीळकंठें कंठीं । निजात्मदृष्टीं गिळिलें ॥९॥
त्या मंथनाच्या पहिल्याच खळखळाटांत लय, विक्षेप, इत्यादि काळकूट उत्पन्न झाले, तें विवेकरूपी महादेवाने आत्मदृष्टीने आपल्याच गळ्यामध्ये गिळून टाकले ९.

मग अभ्यास प्रत्यगावृत्ती । क्रियेसी झाली विश्रांती ।
प्रकटली रमा निजशांती । जीस श्रीपती वश्य झाला ॥१०॥
मग अभ्यासाच्या पुनरावृत्तीने सर्व कर्मांना विश्रांति मिळाली, तेव्हां जिला श्रीकृष्ण वश झाला, ती आत्मशांतिरूपी लक्ष्मी प्रगट झाली १०.

तेथ ब्रह्मरस आणि भ्रमरस । इंहीं युक्त अमृतकलश ।
मथनीं निघाला सावकाश । ज्याचा अभिलाष सुरासुरां ॥११॥
त्या ठिकाणी ब्रह्मरस आणि भ्रमरस ह्या दोहोंनी भरलेला अमृताचा कलश, ज्याची देव-दानवांना अत्यंत आवड असते, तो त्या मंथनापासून हळूहळू बाहेर निघाला ११.

ते विभागावयालागुनी । माधवचि झाला मोहिनी ।
अहंराहूचें शिर छेदूनी । अमृतपानी निवविले ॥१२॥
तोच वाटून देण्यासाठी श्रीहरि मोहिनी झाला, आणि अहंकाररूप राहूचा शिरच्छेद करून देवांना तृप्त केलें १२.

ते वृत्तिरूप मोहिनी । पालटली तत्क्षणीं ।
ठेली नारायण हो‍उनी । पहिलेपणीं उठेना ॥१३॥
ती वृत्तिरूप मोहिनी तत्काल आपले स्वरूप बदलून नारायणस्वरूप होऊन राहिली. पूर्वीची देहबुद्धि तिला राहिली नाहीं १३.

ते क्षीरसागरीं नारायण । समाधि शेषशयनीं आपण ।
सुखें सुखावला जाण । अद्यापि शयन केलें असे ॥१४॥
त्या क्षीरसागरांतील जो नारायण, तो स्वतः समाधिरूप शेषशयनावर सुखाने अत्यंत संतुष्ट होऊन अद्यापपर्यंत निजलेलाच आहे १४.

ऐसा सद्‍गुरु चित्सागरु । ज्याचा वेदांसी न कळे पारू ।
नारायणादि नानावतारू । ज्याचेन साचारू उपजती ॥१५॥
अशा प्रकारे सद्‌गुरू हा ज्ञानरूपी समुद्र आहे. नारायण आदिकरून अनेक अवतार खरोखर ज्याच्यामुळे उत्पन्न होतात, अशा त्या सद्‌गुरूचा अंत वेदांनासुद्धा लागत नाही १५.

ज्याचीं चिद्रत्‍नें गोमटीं । हरिहरांचें कंठीं मुकुटीं ।
बाणलीं शोभती वेदपाठीं । कविवरिष्ठीं वानिलीं ॥१६॥
ज्याची सुंदर ज्ञानरूप रत्ने शंकर आणि विष्णु यांच्या गळ्यांत व मुकुटावर राहून शोभत असतात, आणि त्यांचे वेदपाठांनी व थोर कवींनी वर्णन केले आहे १६,

ऐशिया जी अतिगंभीरा । जनार्दना सुखसागरा ।
अनंतरूपा अपारा । तुझ्या परपारा कोण जाणे ॥१७॥
अशा अत्यंत गंभीर सुखसागरा ! जनार्दना ! अनंत रूपें धारण करणाऱ्या व ज्याचा अंत लागत नाही अशा देवा ! तुझ्या पलीकडील वस्तूला कोण जाणतो ? १७.

विवेकें न देखवे दिठीं । वेदां न बोलवे गोठी ।
तेथ हे माझी मराठी । कोणे परिपाटी सरेल ॥१८॥
विचाराच्या दृष्टीनेसुद्धा ते दिसत नाहीं; वेदांनाही त्या स्वरूपाचे वर्णन सांगता येत नाही. तेव्हा ही माझी मराठी भाषा ते सांगावयास कोणत्या रीतीने समर्थ होईल ? १८.

हो कां राजचक्रवर्तीचे माथां । कोणासी न बैसवे सर्वथा ।
तेथ माशी जाऊनि बैसतां । दुर्गमता तंव नाहीं ॥१९॥
हे पहा ! सार्वभौम राजाच्या मस्तकावर कोणालाही मुळींच बसतां येत नाही. पण माशी तेथे जाऊन बसू लागली असता तिला त्यांत कांही कठीण नाही १९.

कां राजपत्‍नीचे स्तन । देखावया शके कोण ।
परी निजपुत्र तेथें जाण । बळें स्तनपान करीतसे ॥२०॥
किंवा राणीचे स्तन पहाण्याला कोण समर्थ आहे ? पण तिचा मुलगा तेथें जोरजोराने स्तनपान करीत असतो ! २०.

तेवीं माझी हे मराठी । जनार्दनकृपापरिपाटीं ।
निःशब्दाच्या सांगे गोठी । चिन्मात्रीं मिठी घालूनी ॥२१॥
त्याप्रमाणे माझी ही मराठीच भाषा जनार्दनकृपेच्या सामर्थ्यानं आत्मज्ञानाला मिठी मारून अनिर्वाच्य असलेल्या ब्रह्माच्याही गोष्टी सांगते २१.

असो आकाश घटा सबाह्य आंतू । तेवीं शब्दामाजीं निःशब्दवस्तू ।
रिता बोल रिघावया प्रांतू । उरला प्रस्तुतू दिसेना ॥२२॥
असो. आकाश हे घटाच्या आंतून व बाहेरून व्यापलेले असते. त्याप्रमाणे शब्दातीत परब्रह्म हें शब्दामध्येही असतेच. यामुळे वायफळ शब्द आत शिरावयाला प्रस्तुत प्रसंगी जागाच उरलेली दिसत नाही २२.

बाळक बोलों नेणे तत्त्वतां । त्यासी बोलिकें बोलवी पिता ।
तैसीच हेही जाणावी कथा । वाचेचा वक्ता जनार्दन ॥२३॥
मुलाला बोलावयाचे समजत नाही, म्हणून त्याचा पिताच आपल्या बोलण्याने त्याला बोलवीत असतो. त्याप्रमाणेच हीही गोष्ट आहे असे समजावें. कारण माझ्या वाणीला बोलविणारा जनार्दन आहे २३.

त्या जनार्दनाचे कृपादृष्टीं । भागवत सांगों मराठिये गोष्टी ।
जें कां आलोडितां ग्रंथकोटी । अर्थी दृष्टी पडेना ॥२४॥
त्या जनार्दनाच्या कृपादृष्टीने भागवत मराठी भाषेमध्ये सांगू. कोट्यवधि ग्रंथ अवलोकन केले असताही त्या ग्रंथांतील अर्थात भागवताचें ज्ञान दृष्टीला पडत नाही २४.

तेंचि श्रीमहाभागवत । जनार्दनकृपें येथ ।
देशभाषा हंसगीत । ज्ञान सुनिश्चित सांगीतलें ॥२५॥
तेंच हें श्रीमद्‌भागवत होय. त्यांतील ‘हंसगीत’ नांवाचे जे ज्ञान, ते जनार्दनाच्या कृपेने येथे मराठी भाषेमध्ये यथार्थ रीतीने सांगितले २५,

सद्‍भावें करितां माझी भक्ती । तेणें ज्ञानखड्गाची होय प्राप्ती ।
छेदोनि संसारआसक्ती । सायुज्यमुक्ती मद्‍भक्तां ॥२६॥
एकनिष्ठेने माझी भक्ति केली असता तिच्या योगाने ज्ञानरूप खड्गाची प्राप्ति होते, आणि त्याच शस्त्राने संसाराची आसक्ति छेदून माझ्या भक्तांना सायुज्यमुक्ति प्राप्त होते २६.

माझेनि भजनें मोक्ष पावे । ऐसें बोलिलें जें देवें ।
तें आइकोनियां उद्धवें । विचारू जीवें आदरिला ॥२७॥
माझ्या भजनानेच मोक्ष मिळतो असें जें देवाने पूर्वी सांगितले, तें उद्धवाने ऐकून त्याने मनांत असा विचार केला की २७,

देवो सांगे भजनेंचि मुक्ती । आणि ज्ञात्यांची व्युत्पत्ती ।
आणिकें साधनें मोक्षाप्रती । सांगताती आनआनें ॥२८॥
भजनानेच मुक्ति मिळते असें देव सांगतात, पण याबद्दल ज्ञात्यांची मते पाहिली तर ते मोक्षप्राप्तीला आणखी भिन्न भिन्न साधनें सांगतात २८.

एवं या दोहीं पक्षीं जाण । मोक्षीं श्रेष्ठ साधन कोण ।
तेचि आशंकेचा प्रश्न । उद्धवें आपण मांडिला ॥२९॥
तेव्हां या दोन्ही प्रकारांत मोक्षप्राप्तीचे श्रेष्ठ साधन कोणते ? तोच शंकेचा प्रश्न उद्धवाने आपण होऊन श्रीकृष्णासमोर मांडिला २९.

श्रीउद्धव उवाच –
वदंति कृष्ण श्रेयांसि बहूनि ब्रह्मवादिनः ।
तेषां विकल्पप्राधान्यमुताहो एकमुख्यता ॥ १ ॥
[श्लोक १] उद्धवाने विचारले ! श्रीकृष्णा ! ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान, इत्यादी अनेक साधने सांगितली आहेत हे सर्वच मुख्य आहेत की, यांपैकी कोणते तरी एक मुख्य आहे ? (१)

उद्धव म्हणे गा श्रीपती । मोक्षमार्गीं साधनें किती ।
वेदवादियांची व्युत्पत्ती । बहुत सांगती साधनें ॥३०॥
उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा ! मोक्षमार्गाला साधन किती आहेत ? वेदवाद्यांच्या मताप्रमाणे पाहिले तर ते अनेक साधनें सांगतात ३०.

तीं अवघींच समान । कीं एक गौण एक प्रधान ।
देवें सांगीतलें आपण । भक्तीचि कारण मुक्तीसी ॥३१॥
ती सर्व साधनें सारख्याच योग्यतेची आहेत काय ? की एक गौण व एक श्रेष्ठ असा प्रकार आहे ? देवाने तर स्वत: मुक्तीला कारण भक्तीच होय असे सांगितले ३१.

भवतोदाहृतः स्वामिन् भक्तियोगोऽनपेक्षितः ।
निरस्य सर्वतः सङ्गं येन त्वय्याविशेन्मनः ॥ २ ॥
[श्लोक २] स्वामी ! आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे, असे सांगितले या भक्तीने सर्व तर्‍हेची आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठायीच लागून राहाते. (२)

आणिकां साधनां नापेक्षिती । सर्व संगांतें निरसिती ।
मोक्षमार्गीं मुख्य भक्ती । जिणें स्वरूपप्राप्ती तत्काळ ॥३२॥
भक्त इतर साधनांची आशाच करीत नाहीत. सर्व संगांचा त्याग करतात. कारण, जिच्या योगाने तत्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ति होते, अशी भक्तीच मोक्षमार्गामध्ये मुख्य आहे ३२.

माझ्या स्वरूपीं ठेवूनि मन । फळाशेवीण माझें भजन ।
हेंचि मोक्षाचें मुख्य साधन । देवें आपण बोलिलें ॥३३॥
माझ्या स्वरूपावर मन ठेवून फलाची आशा सोडून माझे भजन करणे, हेच मोक्षाचे मुख्य साधन आहे, असें देवाने स्वतः सांगितले ३३.

स्वामी बोलिले मुख्य भक्ती । इतर जे साधनें सांगती ।
त्यांसी प्राप्तीची अस्तिनास्ति । देवें मजप्रती सांगावी ॥३४॥
देव तर “भक्ति हीच मुख्य” असे म्हणाले, तेव्हां इतर जी साधने सांगतात, त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ति होते किंवा नाही, हे देवाने मला सांगावे ३४.

याचि प्रश्नाची प्रश्नस्थिती । विवंचीतसे श्रीपती ।
त्रिगुण ज्ञात्याची प्रकृती । साधनें मानिती यथारुचि ॥३५॥
ह्याच प्रश्नाचा विचार श्रीकृष्ण विवरण करून सांगू लागले. ते म्हणाले, ज्ञात्याचा स्वभाव त्रिगुणात्मक असल्यामुळे ते आपआपल्या आवडीप्रमाणे साधनें स्वीकारीत असतात ३५.

ज्याची आसक्ती जिये गुणीं । तो तेंचि साधन सत्य मानी ।
यापरी ज्ञानाभिमानी । नाना साधनीं जल्पती ॥३६॥
ज्या गुणामध्ये ज्याची आवड असते, तो तेच साधन खरे मानितो. ज्ञानाचा अभिमान बाळगणारे असतात ते अशा प्रकारे अनेक साधनांची बडबड करीत असतात ३६.

परंपरा बहुकाळें । ज्ञात्याचें ज्ञान झालें मैळें ।
तें सत्य मानिती तुच्छ फळें । ऐक प्रांजळें उद्धवा ॥३७॥
उद्धवा ! हीच परंपरा पुष्कळ दिवस चालत असल्यामुळे ज्ञात्याचे ज्ञान मलिन झाले आहे. त्याला क्षुद्र फळे येतात तरी तेच ज्ञान खरे असे मानतात. ते स्पष्टपणाने श्रवण कर ३७.

चौदाव्यामाजीं निरूपणस्थिती । इतुकें सांगेल श्रीपती ।
साधनांमाजीं मुख्य भक्ती । ध्यानयोगस्थिती समाधियुक्त ॥३८॥
चौदाव्या अध्यायांतील प्रतिपादनामध्ये श्रीकृष्ण इतका विषय सांगेल की, ध्यानयोगस्थिति व समाधि ह्यांनी युक्त अशी जी भक्ति, तीच सर्व साधनांत मुख्य आहे ३८.

इतर साधनांचें निराकरण । तुच्छफलत्वें तेंही जाण ।
सात श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगतू ॥३९॥
इतर साधनें फलाची इच्छा धरणारी असल्यामुळे तुच्छ आहेत. तेही श्रीकृष्ण स्वत: सात श्लोकांमध्ये आपल्या मुखाने सांगत आहे ३९.

श्रीभगवानुवाच –
कालेन नष्टा प्रलये वाणीयं वेदसंज्ञिता ।
मयाऽऽदौ ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्यां मदात्मकः ॥ ३ ॥
[श्लोक ३] श्रीभगवान म्हणाले – प्रलयाच्या वेळी काळाच्या प्रभावाने ही वेदवाणी लुप्त झाली होती नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा मी ती ब्रह्मदेवांना दिली तिच्यामध्ये माझ्या भागवतधर्माचे निरूपण आहे. (३)

माझी वेदवाणी प्रांजळी । ज्ञानप्रकाशें अतिसोज्ज्वळी ।
ते नाशिली प्रळयकाळीं । सत्यलोकहोळी जेव्हां झाली ॥४०॥
माझी वेदवाणी स्पष्ट आहे. ती ज्ञानरूपी प्रकाशाने अत्यंत उज्वल झालेली आहे. प्रलयकालामध्ये सत्यलोक जेव्हां जळून खाक झाला, तेव्हा ती नाश पावली ४०.

ब्रह्मयाचा प्रळयो होतां । वेदवाणीचा वक्ता ।
कोणी नुरेचि तत्त्वतां । यालागीं सर्वथा बुडाली ॥४१॥
त्या प्रळयांत ब्रह्मदेवाचा नाश झाला असतां खरोखर वेदवाणी सांगणारा कोणीच शिल्लक राहिला नाही, म्हणून ती सर्वस्वी बुडून गेली ४१.

तेचि वेदवाणी कल्पादीसी । म्यांचि प्रकाशिली ब्रह्मयासी ।
जिच्याठायीं मद्‍भक्तीसी । यथार्थेंसी बोलिलों ॥४२॥
कल्पाच्या आरंभाला तीच वेदवाणी मी ब्रह्मदेवाजवळ प्रगट केली, -जिच्यामध्ये मी माझ्या भक्तीचे वर्णन यथार्थ रीतीने केलें आहे ४२.

जे वाचेचें अनुसंधान । माझे स्वरूपीं समाधान ।
ऐसें माझें निजज्ञान । ब्रह्मयासी म्यां जाण सांगीतलें ॥४३॥
जें वाणीचें अनुसंधान असून माझ्या स्वरूपांतच समाधान पावणारे असें माझें आत्मज्ञान, ते मी ब्रह्मदेवाला सांगितले ४३.

तेन प्रोक्ता च पुत्राय मनवे पूर्वजाय सा ।
ततो भृग्वादयोऽगृह्णन् सप्त ब्रह्ममहर्षयः ॥ ४ ॥
[श्लोक ४] ब्रह्मदेवाने ती आपला ज्येष्ठ पुत्र स्वायंभुव मनू याला सांगितली नंतर त्याच्याकडून भृगू इत्यादी सात ब्राह्मर्षींनीं तिचे ग्रहण केले. (४)

तो सकळ वेद विवंचूनू । ब्रह्मेनि उपदेशिला मनू ।
सप्त ब्रह्मर्षी त्यापासूनू । वेद संपूर्णू पावले ॥४४॥
त्या सर्व वेदाचा विचार करून ब्रह्मदेवाने प्रथम मनूला उपदेश केला, आणि त्या मनपासूनच सात ब्रह्मर्षींना संपूर्ण वेद प्राप्त झाले ४४.

ब्रह्मेनि दक्षादि प्रजापती । उपदेशिले त्याचि स्थिती ।
यापासून नेणों किती । ज्ञानसंपत्ती पावले ॥४५॥
ब्रह्मदेवाने दक्षादि प्रजापतींनाही त्याच रीतीने उपदेश केला. मग त्यांच्यापासून कितीजणांना ती ज्ञानसंपत्ति प्राप्त झाली, त्यांची संख्याच सांगता येणे शक्य नाही ४५.

सप्तऋषींची जे मातू । भृगु मरीचि अत्रि विख्यातू ।
अंगिरा पुलस्त्य पुलह ऋतू । जाण निश्चितू ऋषिभागू ॥४६॥
सप्तऋषि कोणते म्हणून विचाराल तर, भृगु, मरीचि, प्रसिद्ध अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह आणि ऋतु हे खरोखर ऋषि होत ४६.

तेभ्यः पितृभ्यस्तत्पुत्रा देवदानवगुह्यकाः ।
मनुष्याः सिद्धगंधर्वाः सविद्याधरचारणाः ॥ ५ ॥
किन्देवाः किन्नरा नागा रक्षःकिम्पुरुषादयः ।
बह्व्यस्तेषां प्रकृतयो रजःसत्त्वतमोभुवः ॥ ६ ॥
[श्लोक ५/६] त्या सात महषर्कींडून त्यांचे पुत्र देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किंपुरूष इत्यादी अनेकजणांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले यांपैकी काही सात्त्विक, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. (५-६)

तिंहीं ऋषीश्वरीं पुत्रपौत्र । उपदेशिले नर किन्नर ।
देव दानव अपार सिद्ध । विद्याधर चारण ॥४७॥
त्या महान् महान् ऋषीश्वरांनी पुत्र, पौत्र, नर, किंनर, देव, दानव, सिद्ध, विद्याधर, चारण ४७.

गुह्यक गंधर्व राक्षस । किंदेव आणि किंपुरुष ।
नागसर्पादि तामस । परंपरा उपदेश पावले ॥४८॥
गुह्यक, गंधर्व, राक्षस, किंदेव आणि किंपुरुष इत्यादि अनेकांना उपदेश केला, इतकेच नव्हे, तर नाग-सर्पादी तामस योनींनाही परंपरेनें तो उपदेश मिळाला ४८.

मुखाकृती दिसती नर । शरीरें केवळा वनचर ।
ऐसे जे कां रीस थोर । त्यांसी किन्नर बोलिजे ॥४९॥
तोंडाच्या आकाराने मनुष्यासारखे दिसतात, परंतु इतर शरीराने पशु दिसतात असे जे मोठमोगले अस्वल असतात, त्यांना किंनर असें म्हणतात ४९.

मुखाभासें दिसती पुरुष । शरीर पाहतां श्वापदवेष ।
ऐसे जे वानर रामदास । त्यांसी किंपुरुष बोलिजे ॥५०॥
आणखी, तोंडाकडून पाहिले तर पुरुषासारखे, पण शरीर मात्र श्वापदाचे, असे जे रामाचे सेवक झालेले वानर, त्यांना किंपुरुष असे म्हणतात ५०.

स्वेददुर्गंधिकल्मषरहित । शरीरें अतिभव्य भासत ।
मनुष्यदेवांऐसे दिसत । ते बोलिजेत किंदेव ॥५१॥
घाम, दुर्गंध आणि मळ यांनी रहित अशी ज्यांची मोठी भव्य शरीरें दिसतात, आणि पाहतांना जे मनुष्य व देव यांच्यासारखे दिसतात, त्यांना ‘किंदेव’ असे म्हणतात ५१.

यापरींच्या बहुधा व्यक्ती । रजतमादि सत्त्वप्रकृती ।
उपदेशपरंपरा प्राप्ति । ज्ञान बोलती यथारुचि ॥५२॥
अशा नाना प्रकारच्या व्यक्ति रज, तम किंवा सत्त्वप्रकृतीप्रमाणे परंपरेनें उपदेश प्राप्त झाल्यामुळे आपापल्या समजुतीप्रमाणे ज्ञान सांगत असतात ५२.

याभिर्भूतानि भिद्यन्ते भूतानां मतयस्तथा ।
यथाप्रकृति सर्वेषां चित्रा वाचः स्रवन्ति हि ॥ ७ ॥
[श्लोक ७] या स्वभाववैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या त्या बुद्धीप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले. (७)

जैशी प्रकृति तैशी भावना । जैसा गुण तशी वासना ।
जे वासनेस्तव जाणा । भूतीं विषमपणा आणी भेदु ॥५३॥
ज्या गुणाची प्रकृति असते, त्याच गुणाचा स्वभाव असतो. जसा गुण असतो, तीच वासना असते. प्राणिमात्रामध्ये जो कमीजास्तीपणा व भेद उत्पन्न झाला आहे, तो त्या वासनेमुळेच झाला आहे ५३.

देवमनुष्यतिर्यगता । हे वासनेची विषमता ।
येवढा भेद करी भूतां । अनेकता यथारुचि ॥५४॥
देवपणा, मनुष्यपणा किंवा कीटकयोनी हे सर्व वासनेचेच लहानमोठे प्रकार आहेत. ती वासनाच आपल्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारे प्राणिमात्रामध्ये एवढा भेद उत्पन्न करिते ५४.

ज्यांची जैशी प्रकृती । ते तैसा वेदार्थू मानिती ।
तेंचि शिष्यांसी सांगती । परंपरास्थिती उपदेशू ॥५५॥
ज्यांची जशी प्रकृति असते, ते वेदाचा तसाच अर्थ ग्रहण करतात. आणि शिष्यांना परंपरेनें तोच उपदेश सांगत असतात ५५.

विचित्र वेदार्थ मानणे । विचित्र संगती साधनें ।
विचित्र उपदेश करणें । प्रकृतिगुणें मतवाद ॥५६॥
वेदाचा काही विचित्र अर्थ करणे व तोच खरा धरून बसणे, भलतीच संगति धरणे, भलतीच साधनें जवळ बाळगणे, आणि विचित्र उपदेश करणे, हा सर्व प्रकृतीच्या गुणांचा मतभेद आहे ५६.

एवं प्रकृतिवैचित्र्याद् भिद्यन्ते मतयो नृणाम् ।
पारम्पर्येण केषाञ्चित् पाखण्डमतयोऽपरे ॥ ८ ॥
[श्लोक ८] अशा रीतीने स्वभाववैचित्र्यामुळे आणि परंपरेमुळे माणसांच्या विचारांत फरक पडतो तर काही माणसे वेदविरोधी मते मांडणारी असतात. (८)

यापरी गा निजप्रकृती । वाढली जाण नाना मतीं ।
तो मतवाद ठसावला चित्तीं । यथानिगुतीं सत्यत्वें ॥५७॥
अरे ! याप्रमाणे आपलीच प्रकृति अनेक प्रकारच्या मतांनी वाढलेली आहे हे लक्षात ठेव. तो एकदेशीय मताचा वादच पूर्णपणे खरा आहे असें मनांत भरलें म्हणजे तोच चित्तामध्ये बिंबून जातो ५७.

मिथ्या स्वप्न जेवीं निद्रिता । सत्य मानलेंसे सर्वथा ।
तेवीं नानामतवादकथा । सत्य तत्त्वतां मानिती ॥५८॥
स्वप्नं हें खोटे असते, तरी ते निजलेल्या मनुष्याला सर्वस्वी खरेच असल्याप्रमाणे भासते, त्याप्रमाणे भिन्न भिन्न मतांच्या गोष्टी ते सर्वस्वी खऱ्याच आहेत असे मानतात ५८.

हे वेदपढियंत्यांची कथा । ज्यांसी वेदीं नाहीं अधिकारता ।
त्यांसी उपदेशपरंपरता । नानामतता सत्य माने ॥५९॥
ही वेदवेत्यांची गोष्ट झाली. परंतु ज्यांना वेदांचा अधिकार नाही, त्यांना उपदेशपरंपरेने चालत आलेली भिन्नभिन्न मतेच खरी वाटतात ५९.

एकाची वेदबाह्य व्युत्पत्ती । ते आपुलालिये स्वमतीं ।
पाषंडाते प्रतिष्ठिती । तेंच उपदेशिती शिष्यातें ॥६०॥
एखाद्याची विचारसरणी वेदाच्या विरुद्धच असते. ते आपल्या मताप्रमाणे पाखांडमतच स्थापन करतात, आणि तेच शिष्याच्या मनात भरवून देतात ६०.

मन्मायामोहितधियः पुरुषाः पुरुषर्षभ ।
श्रेयो वदन्त्यनेकान्तं यथाकर्म यथारुचि ॥ ९ ॥
[लोक ९] हे पुरूषश्रेष्ठा ! लोकांची बुद्धी माझ्या मायेने अविवेकी बनलेली असते त्यामुळे त्यांना ज्या कर्मात जशी गोडी वाटते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे, असे ते सांगतात त्यामुळे साधनांत वेगळेपणा येतो. (९)

नाना वासनागुणानुवृत्ती । नाना परींच्या पुरुषप्रकृती ।
यांसी माझी माया मूळकर्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६१॥
उद्धवा ! निरनिराळ्या प्रकारच्या वासना गुणांच्या अनुरोधाने बनलेल्या असतात. त्यामुळे पुरुषांच्या प्रकृतीही भिन्न भिन्न होतात. पण या सर्वांना माझी मायाच मूळ उत्पन्न करणारी आहे असें निश्चित समज ६१.

माझिया मायें मोहिले वरिष्ठ । जन केले विवेकनष्ट ।
भुलवूनियां मोक्षाची वाट । विषयनिष्ठ विवेकू ॥६२॥
माझ्याच मायेनें श्रेष्ठ लोकही मोहित केले आहेत, सर्व लोक विवेकनष्ट केले आहेत, आणि त्यांना मोक्षमार्गाचा विसर पाडून विषयलंपटपणाचाच विचार करावयास लाविले आहे ६२.

ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । यापरी भ्रंशली जनांची निष्ठा ।
चुकोनि मोक्षाचा दारवंटा । साधनकचाटा जल्पती ॥६३॥
हे पुरुषश्रेष्ठा उद्धवा ! ऐक. याप्रमाणे लोकांची निष्ठा भ्रष्ट झाल्यामुळे मोक्षाचे द्वार चुकून ते भलत्याच साधनांच्या खटपटीची बडबड करतात ६३.

त्या नाना साधनांच्या युक्ती । ज्या मतवादें प्रतिपादिती ।
त्याही दीड श्लोकीं श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥६४॥
त्या अनेक प्रकारच्या साधनांच्या युक्ति, ज्या आपापल्या मतवादाने प्रतिपादन करतात, त्याही श्रीकृष्ण दीड श्लोकामध्ये उद्धवाला सांगतात ६४.

धर्ममेके यशश्चान्ये कामं सत्यं दमं शमम् ।
अन्ये वदन्ति स्वार्थं वा ऐश्वर्यं त्यागभोजनम् ।
केचिद् यज्ञतपो दानं व्रतानि नियमान्यमान् ॥ १० ॥
[श्लोक १०] त्यांपैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. (१०)

मीमांसकाचे मत येथ । काम्य निषिद्धरहित ।
कर्मचि साधन मानित । मोक्ष येणें प्राप्त म्हणताती ॥६५॥
आतां याविषयी मीमांसकांचे मत पाहिले तर ते म्हणतात की, काम्यकर्म हे मात्र निषिद्ध – तेवढे खेरीजकरून बाकीचे कर्म हेच मुख्य साधन होय व तेणेकरूनच मोक्ष प्राप्त होतो ६५.

काव्य नाटक अळंकार करिती । ते कवित्वचि साधन मानिती ।
कविताप्रबंधव्युत्पत्ती । मोक्ष मानिती तेणें यशें ॥६६॥
काव्य, नाटक व अलंकारशास्त्र करणारे असतात ते कवित्व हेच मुख्य साधन मानतात. निरनिराळ्या कविता, पद्यें आणि त्यांची रचनापद्धति ह्यांत मिळविलेल्या कीर्तीनेंच मोक्ष मिळतो असे ते मानतात ६६.

कवीश्वरांचें मत ऐसें । आपुले कवित्वाचेनि यशें ।
मोक्ष लाहों अनायासें । हें कवितापिसें कवीश्वरां ॥६७॥
मोठमोठ्या कवींचे मत असे की, आपल्या काव्यकीर्तीच्या योगानेच आपल्याला सहज मोक्ष प्राप्त होईल. कविश्रेष्ठांना असें वेड लागलेले असते ६७.

वात्स्यायनकोकशास्त्रमत । त्यांचा अभिप्रायो विपरीत ।
कामसुखें मोक्ष मानित । काम सतत सेवावा ॥६८॥
वात्स्यायन इत्यादिकांच्या कामशास्त्राचे मत पाहिले तर त्यांचा अभिप्राय विपरीत दिसतो. कामाच्या सुखोपभोगाने मोक्ष मिळेल असे ते मानतात, म्हणून ते सदोदित कामसेवन करावें असें म्हणतात ६८.

सांख्य-योगांची वदंती । सत्य-शम-दमादि संपत्ती ।
हेंचि साधन मोक्षाप्रती । नेम निश्चितीं तिंहीं केला ॥६९॥
सांख्य-योगमतवाद्यांचे म्हणणे असे की, सत्य, शम, दम, इत्यादि जी संपत्ति आहे, तेच मोक्षाला साधन आहे. त्यांनी असा निश्चयच केला आहे ६९.

नीतिशास्त्रकारांचें मत । सार्वभौम राज्य प्राप्त ।
त्यातेंचि मोक्ष मानित । सामदानादि तेथ साधन ॥७०॥
नीतिशास्त्रकारांच्या मते पाहिले असता, सार्वभौम राज्य प्राप्त झाले की त्यालाच ते मोक्ष असें समजतात. त्यांत साम, दान, इत्यादि साधने आहेत ७०.

एकांचा मतविभाग । शिखासूत्रमात्रत्याग ।
त्याचें नांव मोक्षमार्ग । परम श्लाघ्य मानिती ॥७१॥
कोणाचे मत असे असते की, शेंडी व यज्ञोपवीत यांचा मात्र त्याग केला की त्याचंच नांव मोक्षाचा मार्ग. ते तोच मार्ग अत्यंत उत्तम असे समजतात ७१

देहात्मवाद्यांचा योग । स्वेच्छा भोगावे यथेष्ट भोग ।
कैंचा नरक कैंचा स्वर्ग । मेल्या मग कोण जन्मे ॥७२॥
देहात्मवादी (देह हाच आत्मा मानणारे, नास्तिक) असतात, त्यांचा योगमार्ग हाच की, इच्छेप्रमाणे मिळतील ते सर्व भोग खुशाल भोगून घ्यावे. स्वर्ग कसला आणि नरक कसला ! मेल्यानंतर पुन्हा कोण जन्माला येते ? ७२.

अश्वमेध राजसूययाग । हाचि एकांचा मोक्षमार्ग ।
एकां मूर्तिउपासना सांग । पूजाविभाग तें साधन ॥७३॥
अश्वमेध, राजसूय यज्ञ हाच कोणाचा मोक्षमार्ग असतो. मूर्तीची यथासांग उपासना करणे, तिची यथास्थित पूजा करणे, हेच काही जणांना मोक्षमार्गाचे साधन वाटते ७३.

एकाचें मत साक्षेप । कडकडाटेंसी खटाटोप ।
शरीरशोषणादि जें तप । तो मार्ग समीप मोक्षाचा ॥७४॥
कोणाचे मत असे असते की, खडतर कष्ट सोसून व अनेक प्रकारच्या यातना सोसून देह झिजवून जें तप करावें, तोच मोक्षाचा अगदी जवळचा मार्ग होय ७४.

एक म्हणती श्रेष्ठ साधन । मोक्षमार्गीं केवळ दान ।
दीक्षित म्हणती व्रतग्रहण । हेंचि साधन मोक्षाचें ॥७५॥
कोणी म्हणतात की, दान करणे हेच काय ते मोक्षमार्गातील श्रेष्ठ साधन आहे. याज्ञिक म्हणतात की, व्रतस्थपणाने राहणे हेच मोक्षाचे साधन होय ७५.

एकांच्या मताचा अनुक्रम । अवश्य करावे व्रत नियम ।
एवं मतानुसारें उपक्रम । नानासाधनसंभ्रम बोलती ॥७६॥
काही जणांच्या मतांची पद्धति अशी दिसते की, व्रत, नियम, हे अवश्य पाळावेत. अशा प्रकारे आपआपल्या मताप्रमाणे उपक्रम करून अनेक प्रकाच्या साधनांची थोरवी लोक सांगत असतात ७६.

या साधनांची पाहतां स्थिती । आद्यंतवंत निश्चितीं ।
तेंचि पैं उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥७७॥
पण ह्या सर्व साधनांच्या स्थितीचा विचार केला, तर ती अथपासून इतिपर्यंत खरोखर नाशवंतच आहेत. कृपामूर्ति श्रीकृष्ण उद्धवाला तेच सांगत आहेत ७७.

आद्यन्तवन्त एवैषां लोकाः कर्मविनिर्मिताः ।
दुःखोदर्कास्तमोनिष्ठाः क्षुद्रानन्दाः शुचार्पिताः ॥ ११ ॥
[श्लोक ११] त्यांपैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. (१०)

सांडूनि फळाशा देहाभिमान । मज नार्पिती जे साधन ।
त्यांचें फळ दुःखरूप जाण । जन्ममरणदायक ॥७८॥
फलाची आशा व देहाचा अभिमान सोडून जे आपलें साधन मला अर्पण करीत नाहीत, त्यांच्या साधनांचें फळ दुःखस्वरूप असते असे समज. ते पुनःपुन्हा जन्ममरण देते ७८.

तिंहीं साधनीं साधिले लोक । ते अंतवंत नश्वर देख ।
ते लोकींचें जें सुख । साखरेंसीं विख रांधिलें ॥७९॥
त्या साधनांनी जे लोक प्राप्त होतात, ते सारे नाशवंत आणि क्षणिक असेच असतात. त्या लोकांतील जें सुख असतें तें साखरेत पक्व केलेले विषच होय ७९.

त्याचे जिव्हाग्रीं गोडपण । परिपाकीं अचूक मरण ।
तैसा तो क्षुद्रानंद जाण । शोकासी कारण समूळ ॥८०॥
त्याच्या जिभेवर गोडपणा असतो. पण शेवटी अचूक मरण हें ठेवलेलेच. त्याप्रमाणे त्या लोकांतील आनंदही क्षुद्र असून तो सर्वस्वीं शोकालाच कारण होतो असे समज ८०.

निजकर्में मलिन लोक । त्यांच्या ठायीं कैंचें सुख ।
उत्तरोत्तर वाढते दुःख । अंधतमदायक परिपाकू ॥८१॥
आपल्या कर्मानेच जे लोक मलिन झाले, त्यांच्या ठिकाणी सुख ते कशाचे असणार ? त्यांत उत्तरोत्तर वाढत जाणारे दुःखच असते, आणि अंधतम नांवाचा नरक प्राप्त करून देणे हाच त्याचा परिणाम असतो ८१.

भोगासक्त जें झालें मन । त्यासी अखंड विषयांचें ध्यान ।
विषयाध्यासें तमोगुण । अधःपतनदायक ॥८२॥
जे मन भोगांना आसक्त झाले, त्याला विषयांचाच अखंड ध्यास लागलेला असतो. त्या विषयाच्या ध्यासानेच तमोगुण वृद्धि पावून तो अध:पतनांत नेऊन घालतो ८२.

इंहींच साधनीं माझी भक्ती । जो कोणी करील परमप्रीतीं ।
ते भक्तीची मुख्यत्वें स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥८३॥
पण ह्याच साधनांनी जो कोणी अत्यंत प्रेमाने माझी भक्ति करील, त्याच भक्तीचे स्वरूप मुख्यत्वेकरून श्रीकृष्ण स्वतः सांगतात ८३.

मय्यर्पितात्मनः सभ्य निरपेक्षस्य सर्वतः ।
मयाऽऽत्मना सुखं यत्तत् कुतः स्याद् विषयात्मनाम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] हे साधो ! ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केले आहे आणि त्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाची इच्छा नाही, त्याला आत्मस्वरूप माझ्यामुळे जे सुख मिळते, ते विषयलोभी जीवांना कसे मिळेल ? (१२)

भक्ती निजसुखाची मातू । सांगावया उद्धवासी संबोधितू ।
भक्तिसुखालागीं भाग्यवंतू । तूंचि निश्चितू उद्धवा ॥८४॥
भक्तीने प्राप्त होणाऱ्या आत्मसुखाची महती सांगण्यासाठींच देवांनी उद्धवाला उद्देशून म्हटले, ‘उद्धवा ! भक्तिसुखाला पात्र होणारा भाग्यवान् खरोखर एक तूंच आहेस’ ८४.

भक्तिसुखाचें भाग्य यासी । म्हणोनि सभ्य म्हणणें त्यासी ।
ऐसें पुरस्कारोनि उद्धवासी । भक्तिसुखासी देवो सांगे ॥८५॥
ह्याला भक्तिसुखाचेंच भाग्य प्राप्त झाले आहे म्हणून त्याला ‘सभ्य’ असेंच म्हणणे योग्य आहे, असें श्रीकृष्णाने मनांत आणिलें आणि ‘हे सभ्या !’ (मूळ श्लोकांत ‘सभ्य’ हे संबोधन आहे) असें सन्मानदायक संबोधून देव त्याला भक्तीचे सुख सांगू लागला ८५.

पावावया माझी स्वरूपप्राप्ती । इहलोकींची भोगासक्ती ।
निःशेष नातळे चित्तवृत्ती । जेवीं निजपती रजस्वला ॥८६॥
माझ्या स्वरूपाची प्राप्ति लाभण्यासाठी, रजस्वला ज्याप्रमाणे आपल्या पतीला स्पर्शही करीत नाही, त्याप्रमाणे इहलोकची भोगासक्ति चित्तवृत्तीला मुळीच शिवणार नाही असे झाले पाहिजे ८६.

साधूनि माझिया अनुसंधाना । परलोक नातळे वासना ।
धिक्कारी पैं ब्रह्मसदना । इतर गणना कोण पुसे ॥८७॥
माझंच अनुसंधान साध्य करून घेतले म्हणजे त्याची वासना परलोकाला शिवतही नाही. ती ब्रह्मलोकाचासुद्धा धिक्कार करिते. मग इतरांना विचारतो कोण ? ८७.

ऐशिया गा निरपेक्षता । माझेनि भजनें सप्रेमता ।
तेथ मी जाण स्वभावतां । प्रकटें तत्त्वतां निजरूपें ॥८८॥
अशा निरपेक्षतेने माझें भजन करता करतां अंत:करणांत प्रेम उत्पन्न होऊ लागले की त्यांच्या ठिकाणी खरोखरच मी आपोआपच आत्मस्वरूपाने प्रगट होतों ८८.

मी प्रकटलों हें ऐसें । बोलणें तें आहाच दिसे ।
सदा मी हृदयींचि वसें । प्रकटलों दिसें निर्विकल्पें ॥८९॥
येथे वास्तविक ‘मी प्रगट होतो’ असे म्हणणेसुद्धा व्यर्थच आहे. कारण, सदासर्वदा मी हृदयांतच राहत असतो. चित्तवृत्ति निर्विकल्प झाली म्हणजे मी दिसू लागतों, म्हणून मी प्रगट झालों असे वाटते इतकेच ८९.

आभाळ गेलिया सविता । सहजेंचि दिसे आंतौता ।
तेवीं गेलिया विषयावस्था । मी स्वभावतां प्रकटचि ॥९०॥
आलेलें अभ्र दूर झाले म्हणजे त्याच्या आड असलेला सूर्य आपोआपच दिसू लागतो. त्याप्रमाणे विषयावस्था गेली की, मीही आपोआपच प्रगट होतों ९०.

एवं भक्ताचिया भावार्था । भावबळें मज प्रकटतां ।
तेव्हां भक्ताचिया चित्ता । विषयवार्ता स्फुरेना ॥९१॥
अशा प्रकारें भक्तांच्या भावार्थाने व भक्तिसामर्थ्याने मला प्रगट केले, म्हणजे त्या काळी भक्ताच्या चित्ताला विषयाची गोष्टच सुचत नाहीशी होते ९१.

सांडूनि विषयावस्था । मद्‌रूपीं लागल्या चित्ता ।
भक्तासी होय मद्‌रूपता । स्वभावतां निजबोधें ॥९२॥
विषयावस्थेला सोडून चित्त मत्स्वरूपाकडेच लागून राहिलें असता आत्मज्ञानाने भक्तांना आपोआपच मत्स्वरूप होते ९२.

लोह एकांगें स्पर्शमणी । लागतां सर्वांग होय सुवर्णी ।
तेवीं मद्‍भक्त माझ्या ध्यानीं । चिद्‌रूपपणीं सर्वांग ॥९३॥
लोखंड एका बाजूने जरी परिसाला लागले, तरी ते सर्वांगानेच सुवर्ण होते. त्याप्रमाणे माझे भक्त माझ्याच ध्यानांत निमग्न झाले म्हणजे त्यांचे सर्वांग ज्ञानमयच होते ९३.

ते काळीं सहजसुख । भक्तांसी जें होय देख ।
त्यासी तुकावया तुक । कैंचें आणिक कांटाळें ॥९४॥
त्या वेळी पहा ! भक्तांना जे सहज सुख प्राप्त होते, त्याच्याशी तुलना करावयाला योग्य असें दुसरे माप कोठचे ? ९४.

ज्या निजसुखाकारणें । सदाशिवू सेवी श्मशानें ।
ब्रह्मा तें सुख काय जाणे । त्याकारणें म्यां उपदेशिलें ॥९५॥
ज्या आत्मसुखाकरितां शंकरांनीही स्मशानांत राहणे पतकरलें, ते सुख ब्रह्मदेव कसे जाणणार ? म्हणूनच त्याला तें मी सांगितले ९५.

भक्तीं भोगितां माझें सुख । विसरले देहादि जन्मदुःख ।
विसरले ते तहानभूक । निजात्मसुख कोंदलें ॥९६॥
भक्तांनी माझ्या सुखाचा उपभोग घेतला असता ते देहादि जन्मदुःख विसरून जातात. ते तहान-भूकही विसरतात. इतकें आत्मसुख त्यांच्या ठिकाणी भरून राहातें ९६.

ऐशिया निजसुखाची गोडी । विषयी काय जाणती बापुडीं ।
वेंचितां लक्षालक्षकोडीं । त्या सुखाचा कवडी लाभेना ॥९७॥
अशा आत्मसुखाची गोडी बिचारी विषयलंपट झालेली माणसे कशी जाणणार ? त्यांनी लाखों रुपये खर्ची घातले तरीसुद्धा त्या सुखाची एक कवडीही प्राप्त होणार नाही ९७.

धन धान्य पुत्र स्वजन । सर्वस्व वेंचितांही जाण ।
त्या सुखाचा रजःकण । विषयी जन न लभती ॥९८॥
धन, धान्य, पुत्र, आप्तइष्ट, इत्यादि सर्वस्व खर्ची घातले तरी देखील त्या सुखाचा एक रजःकणही विषयी लोकांना प्राप्त होत नाही ९८.

हो कां सत्यलोकनिवासी । तेही न पावती त्या सुखासी ।
इतरांची कथा कायसी । मुख्य प्रजापतीसी हें सुख कैंचें ॥९९॥
हे तर काय, पण जे सत्यलोकांत राहणारे आहेत, त्यांनाही तें सुख मिळत नाही. इतरांची कथा काय ? मुख्य ब्रह्मदेवालाही ते सुख कुठून मिळणार ? ९९.

मज निजात्म्याचे सुखप्राप्ती । सकळ इंद्रियें सुखरूप होती ।
त्या सुखाची सुखस्थिती । लोकांतरप्राप्ती कोट्यंशें न तुके ॥१००॥
मज आत्म्याला सुखप्राप्ति झाली म्हणजे त्यामुळे सर्वच इंद्रिये सुखस्वरूप होतात. त्या सुखकारक सुखस्थितीच्या एक कोट्यंशाशीही स्वर्गादि लोकांतरप्राप्ति बरोबर करू शकणार नाहीं १००.

निष्काम निर्लोभ निर्दंभ भजन । निर्मत्सर निरभिमान ।
ऐशिया मद्‍भक्तांसी जाण । माझें सुख संपूर्ण मी देतों ॥१॥
निष्काम, निर्लोभ व निर्दभ भजन करणाऱ्या निर्मत्सरी आणि निरभिमानी अशा माझ्या भक्तांना माझे सुख मी पूर्णपणे देतो, हे लक्षात ठेव १.

जे कां देशतः कालता । अनवच्छिन्न गा वस्तुतां ।
ऐशिया निजसुखाचे माथां । माझिया निजभक्तां रहिवासू ॥२॥
खरोखर जे देशाने व कालानेही मर्यादित नाही, अशा अगाध आत्मसुखाच्या माथ्यावर माझ्या भक्तांचे राहाणे असते २.

अकिञ्चनस्य दान्तस्य शान्तस्य समचेतसः ।
मया सन्तुष्टमनसः सर्वाः सुखमया दिशः ॥ १३ ॥
[श्लोक १३ ] जो अपरिग्रही आहे, इंद्रियांवर ज्याने विजय मिळविला आहे, जो शांत आणि समचित्त आहे, माझ्या ठायी जो संतुष्ट आहे, अशा माझ्या भक्ताला सर्व दिशा आनंदाने भरलेल्या वाटतात. (१३)

ऐक अकिंचनाची गोठी । नाहीं मठ मठिका पर्णकुटी ।
पांचापालवीं मोकळ्या गांठी । त्यांसी ये भेटी निजसुख माझें ॥३॥
आता दारिद्र्याची गोष्ट पहा ! त्याला नाही मठ, नाहीं मठी, नाहीं पर्णकुटी (झोपडी), पांचही पदरांच्या गांठी मोकळ्या सुटलेल्या; पण त्यांनाच माझे आत्मसौख्य भेटावयास येते ३.

जो दमनशीळ जगजेठी । अकरांचीही नळी निमटी ।
तो निजसुखाचे साम्राज्यपटीं । बैसे उठाउठीं तत्काळ ॥४॥
जो अत्यंत थोर दमनशील; पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेदियें व एक मन मिळून अकरा जणांचें जो निर्दाळण करतो; तो तत्काळ हां हां म्हणतां आत्मसुखाच्या साम्राज्यसिंहासनावर बसतो ४.

देखतां नानाभूत विषमता । ज्यासी साचार दिसे समता ।
तो माझिया निजसुखाचे माथां । क्रीडे सर्वार्थता समसाम्यें ॥५॥
भिन्न भिन्न प्राण्यांतील भेदभाव पाहात असताही ज्याला त्यांच्यांत खरोखर एकरूपताच दिसते, तो सर्वस्वेकरून आत्मसुखाच्या माथ्यावर समभावनेनें खेळत असतो ५.

सर्पत्वचा जेवीं पांपरीं । माथां हालविल्या फडा न करी ।
तेवीं धनदारागृहपुत्रीं । छळितां ज्या भीतरीं क्रोध नुमसे ॥६॥
ज्याप्रमाणे सापाच्या कांतेला लाथ मारून तिचे मस्तक हालविले असतां ती फडा करीत नाही, त्याप्रमाणे धन, स्त्री, घर, पुत्र, यांनी छळले असतांही ज्याच्या अंत:करणात क्रोध उसळत नाही ६.

कामक्रोध मावळले देहीं । साचार शांति ज्याच्याठायीं ।
माझें निजसुख त्याच्या पायीं । लोळत पाहीं सर्वदा ॥७॥
काम, क्रोध, हे ज्याच्या देहांत पूर्ण मावळले आहेत, आणि ज्याच्या ठिकाणी खरी शांति राहत असते, त्याच्या पायांशी माझे आत्मसुख सदोदित लोळत राहते ७.

तो जरी तें सुख नेघे । तरी तें सुख तयापुढेंमागें ।
जडोनि ठेलें जी सर्वांगें । सांडितां वेगें सांडेना ॥८॥
तो जरी ते सुख घेणार नाही तरीसुद्धा तें सुख त्याच्या पुढे-मागे आणि सर्वांगाला अगदी जखडून राहिलेले असते. ते जोराने दूर करूं लागले असतांही दूर होत नाही . ८.

तो जेउती वास पाहे । तें दिग्मंडळ सुखाचें होये ।
तो जेथ कां उभा राहे । तेथ मुसावलें राहे महासुख ॥९॥
तो ज्या दिशेकडे पाहतो, तें दिग्मंडळ सुखानेच भरून जाते. तो जेथे उभा राहतो, तेथे महासुखच परिपूर्ण भरून राहते ९.

त्याचें पाऊल जेथे पडे । तेथें निजसुखाची खाणी उघडे ।
तो प्रसंगें पाहे जयाकडे । तेथें स्वानंदें वाढे परमानंद ॥११०॥
त्याचे पाऊल ज्या ठिकाणी पडते, तेथें आत्मसुखाची खाणच उघडते. तो प्रसंगविशेषीं ज्याच्याकडे पाहतो, तेथे आत्मानंदरूपानें परमानंदच वाढू लागतो ११०.

तो ज्यासी भेटे अदृष्टें । त्यास सुखाची पहांट फुटे ।
त्याचा पावो लागलिया अवचटें । सुखाचें गोमटें निजसुख लाभे ॥११॥
तो दैवयोगाने ज्याला भेटतो, त्याला सुखाचाच दिवस सुरू होतो. त्याचा अकस्मात पाय लागला तरी, सुखाने सुरम्य बनलेलें आत्मसुखच लाभतें “. १११.

ज्याचे श्वासोच्छ्वासांचा परिचार । कीं निमेषोन्मेषांचे व्यापार ।
माझेनि निजसुखें साचार । तेथेंचि घर बांधलें ॥१२॥
ज्याच्या श्वासोच्छवासाचें जाणे येणे, किंवा डोळ्यांची उघडझाप करणारी क्रिया, यांच्या ठिकाणींच खरोखर माझ्या आत्मसुखाने घर बांधलेले असते (माझे आत्मसुख तेथे निरंतर राहात असते) १२.

तो सकळ सुखांचा मंडपू । कीं निजसुखाचा कंदर्पू ।
तो सर्वांगें सुखस्वरूपू । सबाह्य सुखरूपू समसुखत्वें ॥१३॥
तो सर्व सुखांचा मंडप होय. किंवा तो आत्मसुखाचा कंद होय. तो सर्वांगाने सुखस्वरूपच असतो. समभावनेच्या सुखानें तो अंतर्वास सुखरूपच असतो १३.

त्याचे सुखाची परिपूर्णता । पुढिले श्लोकें तत्त्वतां ।
स्वयें देवोचि झाला सांगता । सुखसंपन्नता भक्ताची ॥१४॥
त्याच्या सुखाची परिपूर्णता म्हणजेच भक्ताची सुखसंपन्नता पुढल्या श्लोकाने यथार्थ रीतीने देवच स्वत: सांगता झाला १४.

न पारमेष्ठ्यं न महेन्द्रधिष्ण्यं ।
न सार्वभौमं न रसाधिपत्यम् ।
न योगसिद्धीरपुनर्भवं वा ।
मय्यर्पितात्मेच्छति मद् विनान्यत् ॥ १४ ॥
[श्लोक १४ ] माझ्या ठिकाणी ज्याने स्वतःला समर्पित केले अशा भक्ताला, माझ्याशिवाय ब्रह्मदेवाचा सत्यलोक, इंद्राचा स्वर्ग, साम्राज्य, रसातळाचे राज्य, योगसिद्धी किंवा मोक्ष यांपैकी काहीही नको असते. (१४)

माझे ठायीं अर्पितचित्त । ऐसे माझे निजभक्त ।
माझेनि सुखें सुखी सतत । ते अनासक्त सर्वार्थीं ॥१५॥
माझ्याच ठिकाणी चित्त अर्पण केलेले असे जे माझे भक्त असतात, ते माझ्या सुखानंच नेहमी सुखी असतात. ते सर्व प्रकारच्या अर्थाविषयीं आसक्तिरहित असतात १५,

माझ्याठायीं नित्यभक्ती । आणि लोकलोकांतरआसक्ती ।
ते भक्ति नव्हे कामासक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६॥
माझ्या ठिकाणी नेहमी भक्ति ठेवावयाची, आणि इहलोक-परलोकांचा लोभ मनांत ठेवावयाचा, असें असेल तर उद्ध्वा ! ती भक्ति नव्हे, ती केवळ कामासक्ति होय असें निश्चित समज १६.

सकळ द्वीपांसमवेत । सार्वभौम वलयांकित ।
येऊनियां होतां प्राप्त । माझे निजभक्त थुंकिती ॥१७॥
सप्तद्वीपांसहवर्तमान सर्व समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य आपोआप पुढे येऊन प्राप्त झाले असतां माझे खरे भक्त त्याच्यावर थुंकतात १७.

विष्ठेमाजील सगळे चणे । ते सूकरासी गोडपणें ।
त्यांतें कांटाळती शहाणे । तेवीं मद्‍भक्तीं सांडणें सार्वभौमता ॥१८॥
नरकांत पडलेले जे चणे असतात, ते डुकराला गोड लागतात, पण शहाण्यांना त्यांची किळस येते. त्याप्रमाणे माझ्या भक्तांनी सार्वभौमराज्यही सोडलेले असते १८.

रसातळादि समस्त । पाताळीं भोग अमृतयुक्त ।
ते प्राप्त होतां माझे भक्त । लाता हाणत अनिच्छा ॥१९॥
रसातळ इत्यादि सर्व पाताळांत अमृतादिक सौख्यभोग असतात ते प्राप्त झाले असताही माझें भक्त निःस्पृहपणानें त्यांवर लाथाच हाणतात १९.

खात्या सांडूनि अमृतफळा । शाहाणा न घे पेंडीचा गोळा ।
तेवीं सांडूनि सुखसोहळा । भक्त रसातळा न वचती ॥१२०॥
तोंडांत खात असलेल्या अमृतफळाला टाकून देऊन शहाणा मनुष्य पेंडीचा खडा घेणार नाही. त्याप्रमाणे माझा सौख्यलाभ सोडून माझे भक्त रसातळादिकांतील सुखभोगांकडे जात नाहीत १२०.

सुर नर पन्नग वंदिती । येणें महत्त्वें आलिया अमरावती ।
जेवीं कां कस्तूरीपुढें माती । तेवीं उपेक्षिती मद्‍भक्त ॥२१॥
जेथें देव, थोर पुरुष व नागही वंदन करीत असतात, इतक्या श्रेष्ठ महत्त्वाची अमरावती प्राप्त झाली असतां, ज्याप्रमाणे कस्तूरीपुढे माती फेंकून देतात त्याप्रमाणे माझे भक्त तिचा त्याग करतात २१.

जें इंद्रादिकां वंद्य स्थान । उत्तमोत्तम ब्रह्मसदन ।
तें तुच्छ करिती भक्तजन । जे सुखसंपन्न मद्‍भावें ॥२२॥
किंवा जें इंद्रादिकांना वंद्य असें स्थान म्हणजेच उत्तमोत्तम ब्रह्मलोक, तें स्थानही, जे माझ्या भक्तीनें सुखसंपन्न झाले, असे माझे भक्तजन तुच्छ मानतात २२.

ताक दूध पाहतां दिठीं । सारिखेंपणें होतसे भेटी ।
सज्ञान दूध लाविती ओंठीं । त्यागिती वाटी ताकाची ॥२३॥
ताक आणि दूध डोळ्यांनी पाहिले तर सारखेच पांढरे दिसते. परंतु ज्ञाते असतात ते दूधच ओंठाजवळ नेतात आणि ताकाची वाटी टाकून देतात २३.

तेवीं सत्यलोक आणि भक्तिसुख । समान मानिती केवळ मूर्ख ।
मद्‍भावें माझे भक्त जे चोख । ते सत्यलोक धिक्कारिती ॥२४॥
त्याप्रमाणे जे केवळ मूर्ख असतील, ते सत्यलोक आणि भक्तीचे सुख सारखेच असें म्हणतील. परंतु जे माझे भक्त माझ्या भक्तीने शुद्ध असतात, ते सत्यलोकाचा धिक्कारच करतात २४.

इंद्रपद ब्रह्मसदन । पाताळभोग अमृतपान ।
एके काळें द्यावया जाण । सर्वसिद्धी आपण आलिया ॥२५॥
किंवा इंद्राचे पद, ब्रह्मलोक, पाताळांतील ऐषआराम, अमृतपान, ही सर्वच एकदम देण्यासाठी सर्व सिद्धि जरी आपण होऊन प्राप्त झाल्या २५;

ज्या साधावया महासिद्धी । योगी शिणताती नाना विधी ।
त्या प्रकटल्या त्रिशुद्धी । भक्त सद्‍बुद्धी नातळती ॥२६॥
किंवा ज्या महासिद्धि प्राप्त व्हाव्या म्हणून योगी नानाप्रकारच्या विधीनें थकून जातात, त्या जरी खरोखर पुढे येऊन उभ्या राहिल्या , तरी सदबुद्धीयुक्त भक्त त्यांना शिवत नाहींत २६.

त्या अणिमादि सिद्धींच्या माथां । मद्‍भक्तीं हाणोनि लाता ।
लागले माझ्या भक्तिपंथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२७॥
उद्धवा ! माझ्या भक्तांनी खरोखर त्या अणिमादिक सिद्धीच्या मस्तकांवर लाथा मारून ते माझ्या भक्तिमार्गाला लागलेले असतात २७.

या सिद्धींची कायसी कथा । सलोकता समीपता ।
माझी देतां स्वरूपता । भक्त सर्वथा न घेती ॥२८॥
ह्या सिद्धींची कथा काय ? परंतु सलोकता, समीपता, किंवा माझें सारूप्य देणारी अशी सायुज्यता जरी त्यांना दिली, तरी माझे भक्त त्या सलोकतादि मुक्ति कधीही घेत नाहीत २८.

जेथ न रिघेचि काळसत्ता । नाहीं जन्ममरणवार्ता ।
ऐशी देतां माझी सायुज्यता । भक्त सर्वथा न घेती ॥२९॥
जिच्या ठिकाणी काळाचीही सत्ता चालत नाहीं, जिच्यामध्ये जन्ममरणाची वार्ताही नाही, अशी माझी सायुज्यता मुक्ति भक्तांना देऊं लागले असतां भक्त ती मुळीच घेत नाहीत २९.

आधीं असावें वेगळेपणें । मग सायुज्यें एक होणें ।
हें मूळचें अबद्ध बोलणें । सायुज्य न घेणें मद्‍भक्तीं ॥१३०॥
आधी निराळेपणाने असावे आणि मग सायुज्यतामुक्तीने एक व्हावे, हे बोलणेच मुळी असंबद्ध आहे. म्हणून माझे भक्त आहेत ते सायुज्य मुक्तीही घेत नाहीत १३०.

भक्तिसुखें सुखावली स्थिती । यालागीं आवडे माझी भक्ती ।
पायां लागती चारी मुक्ती । भक्त न घेती मजवीण ॥३१॥
भक्तीच्या सुखानेच त्यांची वृत्ति आनंदित झालेली असते, म्हणून त्यांना माझी भक्तीच आवडते. चारही मुक्ति येऊन पायांना लागल्या, तरी ते भक्त माझ्याशिवाय काहीच घेत नाहींत ३१.

एक मजवांचूनि कांहीं । भक्तांसी आणिक प्रिय नाहीं ।
माझेनि भजनसुखें पाहीं । लोकीं तिहीं न समाती ॥३२॥
एका माझ्याशिवाय, भक्तांना आणखी काहीच आवडत नाही. हे पहा ! माझ्या भजनसुखानेच ते तिन्ही लोकांत सामावत नाहीत एवढे मोठे होतात ३२.

आदिकरूनि चारी मुक्ती । मजवेगळी जे सुखप्राप्ती ।
भक्त सर्वथा न घेती । माझ्या अभेदभक्ती लोधले ॥३३॥
चारी मुक्ति आदिकरून माझ्याशिवाय जें सुख प्राप्त होते, ते भक्त कधीच घेत नाहीत. कारण ते माझ्या अभेदभक्तीने तुडुंब भरलेले असतात ३३.

मजवेगळें जें जें सुख । तुच्छ करूनि सांडिती देख ।
माझ्या भजनाचा परम हरिख । अलोलिक मद्‍भक्तां ॥३४॥
माझ्याशिवाय जें जें म्हणून काही सुख असते, ते तुच्छ मानून सोडून देतात. माझ्या भक्तांना माझ्या भजनाचाच अत्यंत अलौकिक आनंद वाटतो ३४.

म्हणाल भक्त केवळ वेडीं । तुझ्या भजनीं धरिती गोडी ।
परी तुज तयांची आवडी । नसेल गाढी अतिप्रीती ॥३५॥
आता तुम्ही कदाचित असें म्हणाल की, भक्त हे निखालस वेडे आहेत, ते तुझ्या भजनाच्या ठिकाणी आवड धरितात. परंतु तुला त्यांची आवड किंवा अतिशय गाढ प्रीति नसेल ३५.

जेवीं गोचिडां आवडे म्हशी । परी गोचीड नावडे तिसी ।
तेवीं भक्तांची प्रीती तुजसरिसी । तुज त्यांची प्रीति नसेल ॥३६॥
ज्याप्रमाणे गोचडांना म्हैस आवडते पण म्हशीला काही गोचडी आवडत नाही, त्याप्रमाणे भक्तांची प्रीति तुझ्यावर असेल, पण तुला त्यांची प्रीति नसेल ३६.

भज्य भजन भजता । हे त्रिपुटी आविद्यकता ।
अविद्यायुक्त भजनपंथा । नसेल सर्वथा तुज प्रीती ॥३७॥
भज्य, भजन आणि भजणारा ही त्रिपुटीच मुळी अविधेपासून झालेली, अर्थात् मिथ्या आहे. तेव्हां अशा अविद्यायुक्त भजनमार्गामध्ये तुला मुळींच प्रीति नसेल ३७.

जेवीं कां स्वप्नींचे आंवतणें । जागत्यासी नाहीं जेवूं जाणें ।
तेवीं अविद्यायुक्त मिथ्याभजनें । त्वां प्रीती करणें हें घडेना ॥३८॥
ज्याप्रमाणे स्वप्नांत आलेल्या आमंत्रणावरून जागे झाल्यावर जेवावयास जाणे घडत नाही, त्याप्रमाणे अविद्यायुक्त मिथ्या भजनाने तूं प्रेम करशील हें घडणार नाही ३८.

ऐसा आशंकेचा अभिप्रावो । तेचि अर्थीं सांगताहे देवो ।
भजनीं भक्तांचा शुद्ध भावो । तेथ मजही पहा हो अतिप्रीती ॥३९॥
असा शंकेचा तात्पर्यार्थ लक्षात आणून त्याच अर्थाने देव सांगत आहे की, भजनामध्ये भक्तांची भक्ति शुद्ध असली, म्हणजे तेथे मला सुद्धा अत्यंत प्रेम असते ३९.

जो जैसा मजकारणें । मी तैसाचि त्याकारणें ।
भक्त अनन्य मजकारणें । मीही त्यांकारणें अनन्य ॥१४०॥
जो जसा माझ्याशी वागतो, तसाच मी त्याच्याशी वागतो. भक्त माझ्या ठिकाणी अनन्य भक्ति ठेवतो, म्हणून मीही त्याच्यावर अनन्य भक्ति ठेवतों ४०.

न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शङ्करः ।
न च सङ्कर्षणो न श्रीर्नैवात्मा च यथा भवान् ॥ १५ ॥
[श्लोक १५ ] हे उद्धवा ! मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त जितके प्रिय असतात, तितका ब्रह्मदेव, शंकर, बलराम, लक्ष्मी किंबहूना माझा आत्माही मला प्रिय नाही. (१५)

माझ्या भक्तांची मज प्रीती । ते मीचि जाणें श्रीपती ।
ते उपमेलागीं त्रिजगतीं । नाही निश्चिती कांटाळें ॥४१॥
-माझ्या भक्तांची माझ्या ठिकाणी प्रीति किती आहे, हे मी श्रीकृष्णच जाणतों. त्या प्रीतीच्या उपमेला त्रिभुवनांतही खरोखर दुसरे काही नाही ४१.

जो अनन्य झाला माझे भक्ती । तेव्हांचि त्याची अविद्यानिवृत्ती ।
ऐशिया भक्तांची जे मज प्रीती । ते सांगूं मी किती उद्धवा ॥४२॥
माझ्या भक्तीनें जो माझ्याशी अनन्य झाला, तेव्हांच त्याचे अज्ञान नाहीसे झाले असे समजावें. उद्धवा ! अशा भक्तांची मला जी प्रीति असते, ती मी तुला किती सांगू ? ४२.

ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । त्याचे लळे मी पुरवीं सकळ ।
परी भक्तांच्या ऐसा प्रबळ । प्रीतिकल्लोळ तेथ नाहीं ॥४३॥
ब्रह्मदेव हा तर माझ्याच पोटचे पोर आहे. त्याचे सर्व लाड मी पुरवितो. पण भक्तांच्यासारखा फार मोठा प्रीतिकल्लोळ त्याच्या ठिकाणी नाही ४३.

म्यां ब्रह्मा लाविला कर्मपंथा । भक्तांसी दिधली निष्कर्मता ।
यालागीं न वचें मी ब्रह्मा प्रार्थितां । होय भात खाता गोवळ्यांचा ॥४४॥
मी ब्रह्मदेव कर्ममार्गाला लावला आणि भक्तांना निष्कर्मता दिली. म्हणूनच ब्रह्मदेवाने प्रार्थना केली तरी मी त्याच्याकडे गेलों नाही, आणि गवळ्यांच्याच घरचा भात खात बसलों ४४.

उणें आणूनि ब्रह्मयासी । मी तों झालों वत्सें वत्सपांसी ।
एवं निजभक्तांच्या ऐसी । प्रीती ब्रह्मयासी मज नाहीं ॥४५॥
ब्रह्मदेवाला कमीपणा आणून मी तर वासरे व गोपाळ झालो. तात्पर्य, माझ्या भक्तांसारखी प्रीति मला ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सुद्धा नाही ४५.

असो ब्रह्मयाची ऐशी कथा । संकर्षण माझा ज्येष्ठ भ्राता ।
परी भक्तांच्या ऐशी सर्वथा । नसे प्रीती तत्त्वतां तयासी ॥४६॥
ब्रह्मदेवाची ही गोष्ट तर असोच; बळराम तर माझा ज्येष्ठ बंधु, पण भक्तांप्रमाणे सर्वस्वी प्रीति खरोखर त्याच्यावरसुद्धा नाही ४६.

कौरवांच्या पक्षपातासी । उणें आणोनि बळिभद्रासी ।
म्यां वांचविलें निजभक्तांसीं । पांडवांसी निजांगें ॥४७॥
कौरवांच्या पक्षाला मिळालेल्या बळरामाला कमीपणा आणून माझे भक्त जे पांडव, त्यांचे मी स्वतः संरक्षण केले ४७.

तुजदेखतां भीष्माच्या पणीं । म्यां हारी घेऊनि रणांगणीं ।
वांचविला कोदंडपाणी । भक्तचूडामणी अर्जुन ॥४८॥
भीष्मांनी प्रतिज्ञा केली तेव्हां समरांगणांत मीच माघार घेऊन भक्तशिरोमणि धनुर्धारी अर्जुनाला तुझ्यादेखत वांचविले ४८.

रमा माझ्या पट्टाची राणी । ते म्यां सेवेसी लाविली चरणीं ।
खांदीं वाहिल्या गौळणी । भक्तशिरोमणी गोपिका ॥४९॥
लक्ष्मी माझी पट्टराणी, तिला मी माझ्या पायांशी सेवा करावयाला लावली आणि भक्तांमध्ये अग्रगण्य ज्या गोपिका आणि गौळणी त्यांना खांद्यावर घेतले ४९.

जे लक्ष्मी निःशेष उपेक्षिती । ते मज पूज्य परम प्रीतीं ।
जे मज लक्ष्मी मागती । त्यांसी श्री ना श्रीपती ऐसें होय ॥१५०॥
जे लक्ष्मीचा पूर्णपणे तिरस्कार करतात, तेच मला अत्यंत प्रीतीनें पूज्य वाटतात. जे माझ्यापाशीं लक्ष्मी मागतात, त्यांना लक्ष्मीही नाही आणि लक्ष्मीपतीही नाही असे होते १५०.

लक्ष्मी उपेक्षूनि निश्चितीं । मज निजभक्त आवडती ।
मज पढियंता उमापती । त्याहून अतिप्रीती भक्तांची ॥५१॥
खरोखर लक्ष्मीची उपेक्षा करणारे माझे भक्तच मला अत्यंत आवडतात. मला शंकर फार आवडता आहे, पण त्याच्यापेक्षाही मला अशा भक्तांची फार प्रीति असते ५१.

ज्या महादेवाचेनि गुणें । म्यांही श्यामवर्ण धरणें ।
ज्या महादेवाचेनि वचनें । म्यां मोहिनी होणें दुसरेनी ॥५२॥
ज्या महादेवाच्या गुणामुळे मलाही शरीरावर सांवळा वर्ण धारण करावा लागला, आणि ज्या महादेवाच्या बोलण्यावरूनच मला दुसऱ्यांदा मोहिनीचे स्वरूप घ्यावे लागले ५२,

ते मोहिनीच्या दर्शनीं । म्यां शिव भुलविला तत्क्षणीं ।
रुक्मांगद मोहिनीपासूनी । अर्धक्षणीं तारिला ॥५३॥
त्या मोहिनीच्या दर्शनांतच मी शंकराला तत्काळ भुलविलें, आणि रुक्मांगदाला अर्धक्षणांत त्याच मोहिनीपासून तारले ५३.

यापरी माझ्या भक्तांहुनी । मज प्रिय नव्हे शूलपाणी ।
मज पढियंता त्रिभुवनीं । भक्तावांचुनी आन नाहीं ॥५४॥
ह्याप्रमाणे माझ्या भक्तापेक्षा मला शंकरसुद्धा अधिक प्रिय नाही. भक्तांशिवाय त्रिभुवनांत मला प्रिय असा दुसरा कोणी नाही ५४.

आगमनिगमीं प्रतिपाद्य । माझी चतुर्भुजमूर्ति शुद्ध ।
ते निजहृदयीं मी परमानंद । भक्तनिजपद वाहतसें ॥५५॥
वेदशास्त्रांमध्ये माझी अत्यंत पवित्र चतुर्भुज मूर्ति वर्णिलेली आहे. पण तोच मी आपल्या हृदयावर अत्यंत आनंदाने माझ्या भक्ताच्या पायांची खूण (भृगुपदचिन्ह) धारण करतों ५५.

मज निजदेहाची नाहीं गोडी । गोवळ झालों अतिआवडीं ।
गायी राखें अरडीदरडी । कीं थापटीं घोडीं भक्तांचीं ॥५६॥
मला आपल्या स्वतःच्या देहाचीसुद्धा प्रीति नाही, म्हणूनच मी मोठ्या आनंदाने गवळी झालों, आणि दऱ्याखोऱ्यांतून गाई राखीत राहिलो. इतकेच नव्हे, तर भक्तांची घोडीसुद्धा खाजविली ! ५६.

मी अवाप्तसकळकाम । परी प्रेमळांलागीं सदा सकाम ।
देखतां प्रेमळांचा भाव परम । मी आत्माराम उडी घालीं ॥५७॥
मी सर्वेच्छापरिपूर्ण आहे, तरी पण प्रेमळ भक्तांसाठी मात्र सदोदित सकाम झालेला असतो. प्रेमळ भक्तांची परम भक्ति पाहिली असता तेथें मी आत्माराम उडीच घालतों ५७.

प्रेमळ देखतांचि दिठीं । मी घे आपुलिये संवसाटीं ।
नव्हतां वरीव दें सुखकोटी । न ये तरी उठाउठी सेवक होय ॥५८॥
प्रेमळ भक्त माझ्या दृष्टीला दिसला असता मी त्याला आपल्या बरोबरीला आणितों. किंवा तसें न घडेल तर मी त्याला परमोच्च सुख अर्पण करतों. आणि तो भक्त जर माझ्याजवळ न येईल, तर मी तत्काळ त्याचा चाकर होऊन राहतों ५८.

सांडूनि महत्त्वपरवडी । मी निजभक्तांचीं उच्छिष्टें काढीं ।
भक्तकाजाचे सांकडीं । करीं कुरंवडी देहाची ॥५९॥
मोठेपणाचा मानमरातब सोडून मी आपल्या भक्तांची उष्टींसुदा काढतों. भक्तकार्यासाठी त्याच्या संकटांत मी आपला देहसुद्धा ओंवाळून टाकतों ५९.

उपेक्षूनि निजदेहासी । उद्धवा तुजसारिखिया भक्तांसी ।
मज आवडती ते अहर्निशीं । जीवें सर्वस्वेंसी पढियंते ॥१६०॥
उद्धवा ! मुझ्यासारख्या भक्तांकरितां मी आपल्या देहाचीसुद्धा उपेक्षा करतों. ते भक्त मला रात्रंदिवस आवडतात. ते जीवाभावाने सर्वस्वी मला लाडके आहेत १६०.

आवडी करितां माझें भजन । मज पूज्य झाले भक्तजन ।
त्या भक्तांचें निजलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६१॥
आवडीनेच माझें भजन केल्यामुळे माझे भक्त मला पूज्य झाले आहेत. त्या भक्तांचे लक्षण श्रीकृष्ण स्वतःच सांगतात ६१.

निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम् ।
अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यङ्‌घ्रिरेणुभिः ॥ १६ ॥
[श्लोक १६] ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो शान्त व वैरभावरहित असतो, सर्वांबद्दल समान दृष्टी ठेवतो, त्या महात्म्याच्या चरणांच्या धुळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र व्हावेत, म्हणून मी नेहमी त्यांच्या मागून जात असतो. (१६)

अनन्य करितां माझें भजन । माझ्या स्वरूपीं झगडलें मन ।
सकळ वासना गेल्या विरोन । वृत्तिशून्य अवस्था ॥६२॥
एकनिष्ठेने भजन केले असतां मन माझ्याच स्वरूपावर जडून राहते, आणि सर्व वासना नष्ट होऊन वृत्ति शून्य झाल्याप्रमाणे स्थिति होते ६२.

आटाटीवीण न प्रार्थितां । अयाचित अर्थ प्राप्त होतां ।
तोही हातीं घेवों जातां । निरपेक्षता बुडाली ॥६३॥
परिश्रम केल्याशिवाय, कोणाजवळही याचना केल्याशिवाय, आपोआप द्रव्य मिळाले असता जरी ते हाताने घेऊ लागले, तरीही त्यांत निरपेक्षता नाहीशी होते ६३.

अर्थ देखोनि जो लविन्नला । तो जाण लोभें वोणवा केला ।
तोही उपेक्षूनि जो निघाला । तो म्यां वंदिला सर्वस्वें ॥६४॥
मग द्रव्य पाहतांच त्याच्यासमोर जो वांकला, त्याला लोभाने ओणवाच केला म्हणून समजावे. ह्याकरिता अशा द्रव्याचीही उपेक्षा करून जो तेथून निघून गेला, तोच सर्वस्वी मला वंदनीय होतो ६४.

मार्गीं अर्थ पडतां । कोणी नाहीं माझा म्हणतां ।
तोही स्वयें हातीं घेतां । निरपेक्षता बुडाली ॥६५॥
मार्गात पैसा पडलेला असता आणि तो माझा असें कोणीही म्हणत नसतां तो जरी स्वतः हाताने उचलून घेतला, तरी निरिच्छता नष्ट झाली ६५.

वृत्तिशून्य जे अवस्था । ती नांव जाण निरपेक्षता ।
ते काळींची जे मननता । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥
इच्छाशून्य जी स्थिति, तिचेच नांव निरपेक्षता. आता त्या वेळी जी मननशीलता प्राप्त होते, ती यथार्थ रीतीने सांगतों ऐक ६६.

वेदशास्त्रार्थें परम प्रमाण । ते माझें सत्य स्वरूप जाण ।
ते स्वरूपीं निजनिर्धारण । त्या नांव मनन बोलिजे ॥६७॥
वेदशास्त्रार्थानं जें माझे स्वरूप अत्यंत प्रमाण मानले, तेच माझें अत्यंत शुद्ध स्वरूप होय असे समज. त्या स्वरूपाच्या ठायीं आपली धारणा ठेवणे, त्याला मनन असे म्हणतात ६७.

करितां स्वरूपविवेचन । स्वरूपरूप झालें मन ।
तेथें धारणेवीण मनन । न करितां स्मरण होतसे ॥६८॥
त्या स्वरूपाचा विचार करता करतां मनच स्वस्वरूपाकार होऊन जाते. तेव्हां धारणेशिवाय मनन होते, आणि न करितांच स्मरण घडते ६८.

या नांव मननावस्था । सत्य जाण पां सर्वथा ।
याहीवरी शांतीची जे कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६९॥
ह्याचंच नांव खरोखर मननशील स्थिति. हे सर्वस्वी खरे असे समज. आतां ह्यापुढे शांतीचे जे स्वरूप, तें खरोखर सांगतो. ऐक ६९.

काम क्रोध सलोभता । समूळ मूळेंसी न वचतां ।
देहीं आली जे निश्चळता । ते न सरे सर्वथा येथ शांती ॥१७०॥
काम, क्रोध, आणि लोभीपणा हे समूळ गेल्याशिवायच देहामध्ये जी स्थिरता प्राप्त होते, ती स्थिरता येथे सर्वस्वी शांति होऊ शकणार नाही १७०.

मत्स्य धरूनियां मनीं । बक निश्चळ राहिला ध्यानीं ।
ते शांति कोण मानी । अंतःकरणीं सकाम ॥७१॥
मनामध्ये मत्स्यावर लक्ष्य ठेवून बगळा स्थिरपणाने ध्यान धरून बसतो, पण त्याच्या अंत:करणांत लोभ असल्यामुळे त्याला शांति असे कोण म्हणणार ? ७१.

देहीं स्फुरेना देह‍अहंता । विराली कामक्रोधसलोभता ।
हे शांति बाणे भाग्यवंता । मुख्य शांतता या नांव ॥७२॥
देहाला देहाचे सुद्धा भान न राहणे; काम, क्रोध व लोभीपणा हे जिरून जाणे; असली शांति भाग्यवंतालाच प्राप्त होते. तिचेंच नांव मुख्य शांति ७२.

उद्धवा जाण पां निश्चितीं । मजही मानली हेचि शांति ।
याहीवरी जे समतेची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७३॥
उद्धवा ! खरोखर मलाही हीच शांति मान्य झाली आहे असे समज. आता ह्यापुढे समतेचे स्वरूप तुला सांगतों ऐक ७३.

विचित्र भूतें विचित्र नाम । विचित्राकारें जग विषम ।
तेथें देखे सर्वीं सर्व सम । परब्रह्म समत्वें ॥७४॥
प्राणिमात्र हे नानाप्रकारचे असून त्यांची नावेही निरनिराळी आहेत. हे सर्व जगच विचित्र आकारांनी विषम बनले आहे. तरी त्या सर्वांमध्ये परब्रह्म हे सर्वत्र सारखेच भरलेलें आहे असे पाहतो ७४.

फाडाफाडीं न शिणतां । तडातोडी न करितां ।
माझेनि भजनें मद्‍भक्तां । सर्वसमता मद्‍भावें ॥७५॥
फाडाफाडी करण्याच्या यातायातीत न पडतां, ताडातोडही न करता, माझ्या भक्तीच्या योगानंच माझ्या भक्तांना माझ्या भावनेने सर्वत्र समानता दिसते ७५.

मद्‍भावें समता आल्या हाता । खुंटली भूतभेदाची वार्ता ।
भेदशून्य स्वभावतां । निर्वैरता सहजेंचि ॥७६॥
माझ्या भक्तीनें समानता हाती आली, म्हणजे प्राणिमात्रांतील भेदबुद्धीच खुंटून जाते. तो सहजच भेदभावरहित होतो. आणि त्याला आपोआप निर्वैरपणा प्राप्त होतो ७६.

जंववरी द्वैताचें भान । तंववरी विरोधाचें कारण ।
अवघा एकचि आपण । तेथ वैरी कोण कोणाचा ॥७७॥
जेथपर्यंत द्वैताचे भान असते, तेथपर्यंतच विरोधाला कारण असते. सर्व आपण एकच भरलेला आहे अशी भावना उत्पन्न झाली, म्हणजे तेथे कोणाचा कोण वैरी होणार ? ७७.

गगन गगनासी कैं भांडे । कीं चंद्रा चंद्रेंसीं झुंझ मांडे ।
कीं वायूचेनि वायु कोंडे । कीं जिव्हेचीं दुखंडें जिव्हा करी ॥७८॥
आकाश आकाशाबरोबरच कधी भांडेल काय ? किंवा चंद्राशी चंद्राची कधी झुंज लागेल काय ? किंवा वायूनेंच वायु कोंडेल काय ? किंवा जीभच जिभेचे दोन तुकडे करील काय ? ७८.

जें भेदाचें निराकरण । तेंचि निर्वैरतेचें लक्षण ।
उद्धवा सत्य जाण । निर्वैरपण या नांव ॥७९॥
भेद नाहीसा होणे हेच निर्वैरपणाचे लक्षण आहे. उद्धवा ! ह्याचेच नांव खरोखर निर्वैरपणा, हे लक्षात ठेव ७९.

निरपेक्षता आणि माझें मनन । शांति आणि समदर्शन ।
पांचवें तें निर्वैर जाण । पंचलक्षण हें मुख्यत्वें ॥१८०॥
निरपेक्षपणा आणि माझे मनन; शांति आणि समदृष्टिः आणि पांचवें निर्वैरपण, ही पांच लक्षणे मुख्य होत १८०.

असो पंचलक्षणकथा । एक निरपेक्षता आल्या हाता ।
पायां लागे सायुज्यता । पूर्णब्रह्मता ठसावे ॥८१॥
ह्या पांच लक्षणांची गोष्ट तर असोच; पण ह्यांपैकी एक निरपेक्षता हाती आली असतांही सायुज्यता मुक्ति पायां पडते, आणि पूर्ण ब्रह्मस्वरूप मनांत ठसते ८१.

निरपेक्षाचें निश्चळ मन । निरपेक्ष तो निर्वैर जाण ।
निरपेक्ष तो शांत संपूर्ण । निरपेक्षाची जाण सेवा मी करीं ॥८२॥
निरपेक्ष माणसाचे मन स्थिर असतें. जो निरपेक्ष असतो, तो निर्वैर होय असें समज. निरपेक्ष असतो तोच परिपूर्ण शांत असतो. म्हणून मीही निरपेक्षाचीच सेवा करतों ८२.

कडेकपाटीं न रिघतां जाण । न सोशितां अतिसाधन ।
हें हाता आल्या पंचलक्षण । विश्व‍उद्धरण त्याचेनी ॥८३॥
गिरिकंदरांत न जातां, बिकट साधन सहन करावें न लागतां, ही पांच लक्षणे हाती आली, तर त्यांच्यामुळेच विश्वाचा उद्धार होईल ८३.

ऐशिया भक्तांचें दर्शन । झाल्या तरतीं हें नवल कोण ।
त्यांचें करितां नामस्मरण । उद्धरण जडजीवां ॥८४॥
अशा भक्तांचे दर्शन झाले असतां लोक तरतील यांत नवल काय ? त्यांचे नुसते नामस्मरण केले असतांही जड जीवांचा उद्धार होईल ८४.

हें पंचलक्षण आल्या हाता । मजहोनि अधिक पवित्रता ।
जोडली माझ्या निजभक्तां । मीही वंदीं माथां चरणरेणु ॥८५॥
ही पांच लक्षणे हाती आली असतां माझ्या भक्तांना माझ्यापेक्षाही अधिक पवित्रता प्राप्त होते. मीसुद्धा त्यांची पायधूळ शिरसावंद्य करतों ८५.

समुद्रोदक मेघीं चढे । त्यासी मधुरता अधिक वाढे ।
जग निववी वाडेंकोडें । फेडी सांकडें दुकाळाचें ॥८६॥
समुद्राचेच पाणी मेघांत चढते, तेव्हां त्याला अधिक गोडी येते. आणि तें सर्व जगाला सहज गारीगार करून सोडते, व दुष्काळाचे संकट नाहींसें करिते ८६.

तेंचि उदक समुद्रीं असतां । उपयोगा न ये गा सर्वथा ।
तेवीं माझेनि भजनें मद्‍भक्तां । झाली पवित्रता मजहुनी ॥८७॥
तेच उदक समुद्रातच असले तर तें कांहींच उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणेच माझ्या भक्तांना माझ्या भजनाने माझ्यापेक्षाही अधिक पवित्रता येते ८७.

केळी चाखतां चवी नातुडे । तिचींच केळें अतिगोडें ।
तेवीं मजहूनि माझ्या भक्तांकडे । पवित्रता वाढे अनिवार ॥८८॥
केळीचे झाडच खाऊं लागले तर त्याला काहींच चव लागत नाही. पण तिचीच जी केळी ती अत्यंत मधुर असतात. त्याप्रमाणे माझ्यापेक्षाही माझ्या भक्तांकडे अनिवार पवित्रता वाढलेली असते ८८.

माझ्या ठायीं जें पवित्रपण । तें भक्तांचेनि मज जाण ।
यालागीं भक्तांमागें मी आपण । धांवें चरणरेणू वंदावया ॥८९॥
माझ्या ठिकाणी जो पवित्रपणा आलेला आहे, तो माझ्या भक्तांमुळेच मला आलेला आहे. म्हणूनच भक्तांच्या मागे त्यांच्या पायांची धूळ वंदन करण्यासाठी मी धावत असतों ८९.

भक्तचरणरेणु वंदितां । मज केवढी आली पवित्रता ।
माझें पायवणी वाहे माथां । जाण तत्त्वतां सदाशिवू ॥१९०॥
भक्तांची पायधूळ वंदन केल्यामुळेच मला केवढी पवित्रता आली आहे ! माझ्या पायांचे तीर्थ खरोखर प्रत्यक्ष शंकरसुद्धा मस्तकावर घेतो १९०.

एवं माझ्या भक्तांचें जें सुख । सुखपणें अलोलिक ।
तें सुख नेणती आणिक । तें बोलावया मुख सरेना ॥९१॥
तात्पर्य, माझ्या भक्तांचें जें सुख आहे, तें सुखपणाने काही अलौकिक आहे. ते सुख इतर कोणी जाणत नाही, किंवा ते सांगावयाला तोंडही समर्थ होणार नाही ९१.

निष्किञ्चना मय्यनुरक्तचेतसः ।
शान्ता महान्तोऽखिलजीववत्सलाः ।
कामैरनालब्धधियो जुषन्ति ते यन् ।
नैरपेक्ष्यं न विदुः सुखं मम ॥ १७ ॥
[श्लोक १७] जे अपरिग्रही असतात, ज्यांचे चित्त माझ्या ठायीच रममाण झालेले असते, जे महापुरूष अतिशय शांत प्रकृतीचे असतात, सर्व जीवांबद्दलच ज्यांना प्रेम वाटते, कामनांमुळे ज्यांची बुद्धी दूषित होत नाही, अशा भक्तांना निरपेक्षपणामुळे माझ्या ज्या परमानंदाचा अनुभव येतो, त्याची इतरांना कल्पना येणार नाही. (१७)

मीवांचूनि ज्यांचे गांठी । नाहीं फुटकी कांचवटी ।
मजवांचोनि सगळे सृष्टीं । आणिकांतें दृष्टीं न देखती ॥९२॥
ज्यांच्या गांठीला माझ्याशिवाय एक फुटका कांचेचा तुकडा सुद्धा नाही, या सर्व सृष्टीमध्ये माझ्याशिवाय आणखी कोणालाही ते डोळ्यांनी पहात नाहीत ९२.

ऐसें करितां माझें भजन । जाति कुळ देहाभिमान ।
सहजें जाय निरसोन । अकिंचन या नांव ॥९३॥
असें माझें भजन केले असतां जाति, कुळ आणि देह यांचा अभिमान सहज नष्ट होऊन जातो. याचंच नांव ‘अकिंचन’ ९३.

याहीवरी प्रेमयुक्त । माझ्या स्वरूपीं रंगलें चित्त ।
अतएव निजशांती तेथ । असे नांदत निजरूपें ॥९४॥
आणखी माझ्या स्वरूपामध्ये चित्त प्रेमाने अगदी रंगून गेलेलें असते, म्हणून आत्मशांतीही तेथें मूर्तिमंत नांदत असते ९४.

ऐशिया गा निजशांती । परिपाकातें पावली भक्ती ।
तें मीवांचूनि सर्वभूतीं । दुजी स्थिती जाणेना ॥९५॥
अशा आत्मशांतीमध्ये भक्ति परिणत झाली म्हणजे सर्व प्राणिमात्रांमध्ये माझ्याशिवाय दुसरें स्वरूप तिला दिसतच नाहीं ९५.

जो जो जीवू जेथें देखे । तो तो मद्‌रूपें वोळखे ।
ते वोळखीचेनि हरिखें । प्रीति यथासुखें अनन्य करी ॥९६॥
जेथे जो जो जीव पाहील, तेथे तो तो मद्रूप आहे असें ओळखते. त्या ओळखीच्या आनंदानें तो स्वाभाविकपणे अनन्य प्रीति करु लागतो ९६.

ऐशिया मद्‌रूपस्थिती । जीवमात्रीं अनन्य प्रीती ।
एवं मद्‍भावें माझी भक्ती । महंतस्थिती या नांव ॥९७॥
अशा मद्रूपस्थितीने जीवमात्रावर अनन्य प्रीति जडते. अशा प्रकारे माझ्या भावनेनेच माझी भक्ति करणे ह्याचेंच नांव ‘महंतस्थिति’ होय ९७.

ऐसा मद्‍भावनायुक्त । सर्वीं सर्वत्र माझा भक्त ।
तेथ कामादिदोष समस्त । अस्तमाना जात ते काळीं ॥९८॥
अशा प्रकारे सर्वीं सर्वत्र माझी भावना ठेवणारा माझा भक्त झाला, की त्या वेळी त्याचे ठिकाणी असणारे कामादिक सर्व दोष मावळून जातात ९८.

सविता येतां प्राचीजवळी । मावळे नक्षत्रमंडळी ।
तेवीं भक्तीच्या प्रबोधकाळीं । झाली होळी कामादिकां ॥९९॥
सूर्य पूर्वदिशेजवळ आला असतां सर्व नक्षत्रसमुदाय लुप्त होतो, त्याप्रमाणे भक्तीच्या उदयकाळी कामादिकांचीही होळी होते ९९.

झालिया कामाची निवृत्ती । सहजेंचि निर्विषयस्थिती ।
तेथें माझ्या सुखाची सुखप्राप्ती । सुखें सुख भोगिती सुखरूप ॥२००॥
कामाची निवृत्ति झाली असता सहजच निर्विषयस्थिति प्राप्त होते. आणि त्या वेळी माझ्या सुखाचा सुखलाभ होऊन ते खुशाल त्या सुखांत मग्न होऊन राहतात २००.

देशें काळें वेदानुवादा । ज्या सुखाची न करवे मर्यादा ।
त्या सुखाची सुखसंपदा । मद्‍भक्त सदा भोगिती ॥१॥
देश, काल किंवा वेदप्रतिपादन यांनासुद्धा ज्या सुखाचा अंत लागत नाही, त्या सुखाचे सुखदायक वैभव माझे भक्त सदोदित उपभोगीत असतात १.

ज्या सुखाचे सुखप्राप्ती । विरोनि जाय चित्तवृत्ती ।
सुखें सुखरूप सर्वांगें होती । एवढी सुखप्राप्ती मद्‍भक्तां ॥२॥
ज्या सुखाचा लाभ झाला असतां चित्तवृत्ति जेथल्या तेथे विरून जाते, त्या सुखाने सर्व अवयव आनंदमय होतात. एवढी माझ्या भक्तांना सुखाची प्राप्ति होते २.

इतर मी सांगों कायी । मोक्षसुखाच्याही ठायीं ।
या सुखाची गोडी नाहीं । धन्य पाहीं हरिभक्त ॥३॥
मी आणखी काय सांगू ? मोक्षसुखाच्या ठिकाणीसुद्धा या सुखाची गोडी नाही. हरिभक्त हे केवढे धन्य आहेत पहा ! ३.

ऐशिया सुखाकारणें । साधक शिणती जीवें प्राणें ।
तपादि शरीरशोषणें । व्रत धरणें विषयांचें ॥४॥
अशा सुखाकरितां साधक लोक जीव प्राण तोडून यातायात करीत असतात. तपादि साधने करून शरीर झिजवितात. विषयांचे नियमन करतात ४.

एक करिती योगयाग । एक करिती शास्त्रसंग ।
एक करिती सर्वस्वत्याग । एकीं सांडिला संग गृहदारा ॥५॥
कोणी योगयाग करीत बसतात, कोणी शास्त्राभ्यास करतात, कोणी सर्वस्वाचा त्याग करतात, कोणी घर व बायको यांचाच संग सोडून देतात ५.

एक फळाहारी निराहारी । एक ते नग्न ब्रह्मचारी ।
एक कडेकपाटीं शिखरीं । गिरिकंदरीं रिघाले ॥६॥
कोणी फलाहारावर राहतात, कोणी निराहारच राहतात, कोणी नग्न स्थितीत राहतात, कोणी ब्रह्मचर्यव्रत पाळतात, कोणी दऱ्याखोऱ्यांत राहतात, कोणी पर्वताच्या माथ्यावर जाऊन बसतात, कोणी पर्वतांच्या गुहेंत शिरतात ! ६.

एक ते जटाळ गांठ्याळ । एक नखधारी ढिसाळ ।
एक महाहटी विशाळ । एक पिसाळ मत्तमुद्रा ॥७॥
कोणी लांब जटा सोडतात, तर कोणी जटांना भरपूर गांठीच मारून त्यांचें झुंबड करून ठेवतात. कोणी कोणी आपली नखेच मोठी वाढवून ठेवतात, कोणी मोठा हठयोग साधन करतात, कोणी उन्मत्त पिशाचवत् स्वैर वर्तन करीत असतात ७.

एक तांबडे बोडके । एक ते केवळ सुडके ।
एक तीर्थाटणें रोडके । एक ते मुके मौननिष्ठ ॥८॥
कोणी तांबडी वस्त्रें धारण करून बोडकेच वागतात. कोणी चिंध्याच अंगावर घालतात. कोणी तीर्थयात्रा करुन शरीर कृश करतात. कोणी मौन धरून मुकेच बसतात ८.

एक राख्ये एक शंख्ये । एक ते अत्यंत बोलके ।
एक पाणीपिशीं झालीं उदकें । कुशमृत्तिके विगुंतलीं ॥९॥
कोणी आंगाला राख फांसतात, कोणी शंखच फुकीत राहतात. कोणी सारखी बडबडच करीत असतात. कोणाला पाण्याचेच वेड असते. कोणी दर्भात आणि मृत्तिकेंतच गळून गेलेले असतात ९.

ऐशा नाना परींच्या व्युत्पत्ती । साधक शिणती नेणों किती ।
माझ्या भजनसुखाची प्राप्ती । नव्हे निश्चितीं कोणासी ॥२१०॥
अशा अनेक प्रकारच्या पद्धति आहेत. त्यांत साधक लोक किती जजर होतात त्यांची गणतीच नाही ! पण खरोखर माझ्या भजनाचा लाभ त्यांपैकी कोणालाच होत नाही १०.

जें माझ्या भक्तांचें निजसुख । तें कोणासी न पवेचि देख ।
स्वप्नींही त्या सुखाचें मुख । अनोळख पैं झालें ॥११॥
माझ्या भक्तांचे जें आत्मसुख असते, ते कोणालाच प्राप्त होत नाही. त्या सुखाचे तोंड त्यांना स्वप्नांत सुद्धा दिसत नाही, इतकें तें सुख त्यांना पारखे झालेले असते ११.

चंद्रकिरणींचें अमृत । जेवीं वायसां अप्राप्त ।
तेवीं माझें निजसुख निश्चित । नव्हेचि प्राप्त अभक्तां ॥१२॥
चंद्राच्या किरणापासून निघणारे अमृत ज्याप्रमाणे कावळ्यांना दुर्लभ असते, त्याप्रमाणे माझे खरे आत्मसुख अभक्तांना खरोखर प्राप्त होत नाही १२.

थानीं लागल्या गोचिडा । अशुद्धचि आवडे मूढा ।
जवळिल्या क्षीरा वरपडा । नव्हेचि रोकडा अभागी ॥१३॥
आंचळाला चिकटलेल्या मूर्ख गोचडीला रक्तच आवडते. बिचारा दुर्दैवी गोचीड जवळच असलेल्या दुधाचे सेवन करूं शकत नाही १३.

तेवीं सांडोनि माझी भक्ती । नाना साधनीं व्यर्थ शिणती ।
त्यांसी माझ्या निजसुखाची सुखप्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥१४॥
त्याप्रमाणे माझी भक्ति सोडून नानाप्रकारच्या इतर साधनांनी जे व्यर्थ कष्ट करतात, त्यांना खरोखरच, उद्धवा ! माझ्या आत्मसुखाची प्राप्ति होत नाही १४.

जिंहीं माझ्या भजनपरवडी । केली भक्तीची कुळवाडी ।
ते माझ्या निजसुखाची गोडी । पावले रोकडी आत्यंतिक ॥१५॥
ज्यांनी माझ्या भजनाच्या आवडीनें भक्तीची लागवड केली, त्यांनाच खरोखर माझ्या अत्यंत आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली १५.

ज्या निजसुखाच्या ठायीं । शिळेपणाची भाषाचि नाहीं ।
विटों नेणे कल्पांतींही । इंद्रियांचा कांहीं न पडे पांगू ॥१६॥
त्या माझ्या आत्मसुखामध्ये शिळेपणाची गोष्टच नाही. कल्पांतीसुद्धा त्यांचा वीट यावयाचा नाही आणि इंद्रियांची अडचणही तेथे येत नाही १६.

जें जें विषयांचें सुख । तें तें इंद्रियांपंगिस्त देख ।
अपंगिस्त भक्तिसुख चोख । सभाग्य लोक पावती ॥१७॥
हे पहा ! जे जे विषयांचे सुख असते, तें तें इंद्रियांच्या आधीन असते. परंतु पवित्र भक्तिसुख हे कोणाच्याही आधीन नसते, आणि भाग्यवंत लोक असतात, त्यांनाच तें प्राप्त होते १७.

जें सुख भोगितां पाहीं । देही तोचि होय विदेही ।
तें सुख माझ्या भक्तांच्या ठायीं । प्रकटलें कंहीं लोपेना ॥१८॥
हे पहा ! ज्या सुखाचा उपभोग घेतांना देही असतो तोच विदेही होतो, तें सुख माझ्या भक्तांच्या ठिकाणी प्रगट झाले की, मग ते कधीही लयास जात नाही १८.

हे उत्तमोत्तम भक्त पाहीं । सुख पावले नवल कायी ।
परी केवळ जे विषयी । भजनें त्यांही सुखप्राप्ती ॥१९॥
अशा प्रकारचे हे उत्तमोत्तम भक्त सुखी झाले, तर त्यांत नवल कसलें ! पण जे केवळ विषयी होते, त्यांनासुद्धा माझ्या भजनाने सुखाची प्राप्ति झाली १९.

भाग्यवशें सत्संगती । आस्तिक्यभावें अनन्यस्थिती ।
अल्पही माझी घडल्या भक्ती । विषयनिवृत्ती तेणें होय ॥२२०॥
सुदैवाने सत्संगति प्राप्त झाली, आणि आस्तिक्यबुद्धि उत्पन्न होऊन माझ्या ठिकाणी अनन्यभाव उत्पन्न झाला, तर माझी थोडी भक्ति घडली असताही विषयांची निवृत्ति होते २२०.

बाध्यमानोऽपि मद्‍भक्तो विषयैरजितेन्द्रियः ।
प्रायः प्रगल्भया भक्त्या विषयैर्नाभिभूयते ॥ १८ ॥
[श्लोक १८] इंद्रियांवर विजय मिळवू न शकलेल्या माझ्या भक्ताला विषय स्वतःकडे ओढत असले तरी माझ्या ठिकाणी वाढणार्‍या त्यांच्या भक्तीच्या प्रभावामुळे विषय त्याच्यावर आक्रमण करू शकत नाहीत. (१८)

माझ्या ठायीं अनन्य प्रीती । प्रेमयुक्त भजनस्थिती ।
ऐशियां भक्तां विषय बाधिती । हे व्याख्यानस्थिती केवीं घडे ॥२१॥
माझ्या ठिकाणी एकनिष्ठ प्रेम आणि प्रेमयुक्त भजन करणे अशा गुणांनी युक्त असलेल्या माझ्या भक्तांना विषयाची बाधा होईल अशी विलक्षण गोष्ट कशी घडेल ? २१.

आवडी करितां माझी भक्ती । विषयवासना जळून जाती ।
तेथ उपजे विषयासक्ती । हे कोणें युक्ती मानावी ॥२२॥
आवडीने माझी भक्ती केली असतां विषयवासना जळून जातात. तेथें विषयाची आवड उत्पन्न होईल ही गोष्ट कोण मान्य करील २२.

आरिसा उटितां उजळे । तेवीं भक्तीनें विषयो क्षाळे ।
तेथ विषयासक्ती खवळे । हें निरूपण कोंवळें साधारण ॥२३॥
आरसा स्वच्छ करावयाच्या चूर्णाने घासला म्हणजे तो निर्मळ होतो. त्याप्रमाणे भक्तीच्या योगाने विषय धुवून जातात. तेव्हा अशा ठिकाणी विषयाची आसक्ति खवळेल हे म्हणणेच पोरकट व क्षुद्र होय २३.

केवळ जो विषयासक्त । संसारीं प्रपंचयुक्त ।
तोही प्रसंगे झालिया भक्त । होय विरक्त तें ऐक ॥२४॥
जो निखालस विषयासक्त असतो, प्रपंचयुक्त होऊन संसारांत अगदी गढलेला असतो, तोसुद्धा काही प्रसंगाने भक्त झाला, तर विरक्त होतो. तेंही ऐक २४.

जीवीं भक्ति लागली गोड । नाहीं मावळली विषयचाड ।
ऐसें उभय अवघड । अतिसांकड जयासी ॥२५॥
जिवाला भक्ति गोड वाटली, आणि विषयाची इच्छा तर नष्ट झालेली नाही, असें दोहोंकडून ज्याला अत्यंत मोठे संकट येऊन पडेल २५,

तेणें मुख्यत्वें घ्यावी भक्ती । गौण धरावी विषयासक्ती ।
तिचीही होय विरक्ती । ऐक ते युक्ती सांगेन ॥२६॥
त्याने मुख्यत्वेकरून माझ्या भक्तीचाच आश्रय करावा. विषयासक्ति ही गौण समजावी. त्या विषयासक्तीचीही विरक्ति होऊ शकते. ती युक्ति सांगतो ऐक २६.

लवणासी मिळतां जळ । विरवूनि सांडी तत्काळ ।
तेवीं भक्ति वाढविल्या प्रबळ । विषयमंडळ विभांडी ॥२७॥
मिठाला पाणी मिळाले की ते तत्काळ त्याला विरवून नाहींसें करिते, त्याप्रमाणे भक्ति ही अत्यंत वाढविली असतां तीही विषयाचे जाळे तोडून टाकते २७.

यापरी भजनपरिपाटीं । विषयांसी पडे तुटी ।
निजसुखाची लाभे भेटी । पडे मिठी स्वानंदें ॥२८॥
अशा प्रकारें भजनाच्या अभ्यासाने विषयांची ताटातूट होते व आत्मसुखाचा लाभ होऊन आत्मानंदाने मिठी पडते २८.

मज पाहिजे विषयनिवृत्ती । या हेतू केली नाहीं भक्ती ।
म्हणाल विषयांची विरक्ती । कोणे युक्ती घडे त्या ॥२९॥
मला विषयाची निवृत्ति व्हावयास पाहिजे, पण त्याकरितां मी भक्ति केली नाही, तर त्या मला विषयांची विरक्ति कोणत्या युक्तीने घडेल असे म्हणाल २९,

येचिविषयीं उत्तर । सांगताहे शारङ्गधर ।
दीपाचा पेटल्या वैश्वानर । तो जाळील घर नगर तैसें हें ॥२३०॥
तर त्याचेच उत्तर श्रीकृष्ण सांगत आहेत. दिव्यापासूनच अग्नीचा भडका झाला असता तो घर आणि शहरसुद्धा जाळून टाकील. तसेंच हे आहे २३०.

यथाग्निः सुसमृद्धार्चिः करोत्येधांसि भस्मसात् ।
तथा मद्विषया भक्तिरुद्धवैनांसि कृत्स्नशः ॥ १९ ॥
[श्लोक १९] धगधगता अग्नी जसा सर्व जळणाची राख करून टाकतो, त्याचप्रमाणे उद्ववा ! माझी भक्तीसुद्धा पापाच्या सगळ्या राशी जाळून टाकते. (१९)

दीप लावावयालागुनी । सोज्ज्वळ केला जो वन्ही ।
तो अवचटें पडला वनीं । तिडिकी उडोनी तृणांकुरीं ॥३१॥
दिवा लावण्याकरितां जो विस्तव पेटविला, त्याची जर अकस्मात् एक ठिणगी उडून रानांतल्या गवतावर पडली ३१,

तो अनिच्छितचि एकसरें । कोपटें आणि धवळारें ।
नगरें पुरें मंदिरें । गिरिकंदरें भस्म करी ॥३२॥
तर तो विस्तव पेटविणाराचा खरोखर हेतु नसतांही एकामागून एक खोपटें, घरे, गांव, शहरे, देवळे आणि दरीखोरी सरसकट भस्म करून टाकतो ३२.

तैशी अल्पही माझी भक्ती । श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्तीं ।
संचित क्रियमाण पापपंक्ती । होय जाळिती निःशेष ॥३३॥
त्याप्रमाणे माझी यत्किंचित् भक्तीही जर श्रद्धायुक्त रीतीनें मनांत शिरली, तर संचित आणि क्रियमाण पातकांच्या राशी पूर्णपणे जाळून खाक करते ३३.

पूर्वपापाचे समूळ मळ । चित्तीं जडले होते प्रबळ ।
तें चित्त अतिचंचळ । विषयीं व्याकुळ सर्वदा ॥३४॥
पूर्वीच्या पातकाचे सर्व मळ चित्ताला अत्यंत बळकट रीतीने जडून राहिलेले असतात, त्यामुळे तें चित्त अत्यंत चंचल होऊन विषयाने सदासर्वदा व्याकुळ होत असते ३४.

त्यासी माझिया भक्तिलेशें । पूर्वपापाचा समूह नासे ।
जेवीं कां कर्पूर दीपस्पर्शें । निःशेष नासे तत्काळ ॥३५॥
त्याला माझ्या भक्तीचा यत्किंचित् अंश लाभला तरी तेवढ्यानेही पूर्वपातकांचा संग्रह नाहीसा होतो. ज्याप्रमाणे दिव्याच्या स्पर्शाने कापूर तत्काळ पूर्णपणे जळून नाहींसा होतो, त्याप्रमाणे भस्म होऊन जातो ३५.

ऐसें निर्मळ झालिया चित्त । ब्रह्म प्रकाशे सदोदित ।
मग तें नव्हे विषयासक्त । होय विरक्त अनिच्छितां ॥३६॥
असें चित्त निर्मळ झाले असतां तेथें सदोदित ब्रह्म प्रगट होऊन राहतें. मग तें चित्त विषयासक्त होत नाही. तें विरक्त होण्याची इच्छा केली नाही तरी आपोआप ते विरक्तच होते ३६.

भक्तिलेशाची एवढी गरिमा । तो संपूर्ण भक्तीचा महिमा ।
कोण जाणे भक्तोत्तमा । आगमनिगमां अतर्क्य ॥३७॥
भक्तीच्या एका अंशाची थोरवी एवढी आहे. तर हे भक्तोत्तमा उद्ध्वा ! माझ्या संपूर्ण भक्तीचा तो महिमा कोण जाणणार ? तो वेदशास्त्रांनासुद्धा अतर्क्य आहे ! ३७.

अलक्ष्य लक्षेना माझी भक्ती । अतर्क्य तर्केना शास्त्रयुक्तीं ।
अगाध नाकळे निश्चितीं । साधनव्युत्पत्ती शिणतांही ॥३८॥
माझी भक्ति अलक्ष्य असल्यामुळे ती पाहता येत नाही. अतर्क्य असल्यामुळे शास्त्रमीमांसेनेही तिच्याविषयीं तर्क होत नाही. ती अगाध असल्यामुळे, कितीही साधने करून थकलें तरीही ती खरोखर आकलन होत नाही ३८.

पूर्ण माझे भक्तीचा पार । मजही न कळे साचार ।
यालागीं मी भक्तांचा आज्ञाधार । नुल्लंघीं उत्तर सर्वथा ॥३९॥
माझ्या भक्तीचा अंत खरोखर मलाही पूर्णपणे लागत नाही. म्हणूनच मी भक्तांचा आज्ञाधारक होतो. त्यांचा शब्द मुळीच उल्लंघन करीत नाही ३९.

अगाध भक्तांची थोरी । यालागीं मीही सेवा करीं ।
भक्तपद धरिंले उरीं । वंदी शिरीं अंघ्रिरेणू ॥२४०॥
भक्तांची थोरवी अगाध आहे, म्हणून मीसुद्धा त्यांची सेवा करतो. भक्ताने मारलेली लाथ मी आपल्या हृदयावर धारण केली. भक्तांच्या पायांचे धुलिकण मी शिरसावंद्य करतो २४०.

भक्त म्हणवितां वाटे गोड । भजनमुद्रा अतिअवघड ।
भक्तीचें अंतर अतिगूढ । न कळे उघड तिशास्त्रां ॥४१॥
भक्त म्हणवून घेतांना मोठे गोड वाटते, परंतु भजनाचे स्वरूप फार बिकट आहे. भक्तीचे रहस्य अत्यंत गूढ आहे. ते श्रुतिशास्त्रांनासुद्धा स्पष्ट कळत नाही ४१.

ज्ञान सांगतां अतिसुगम । भक्तिरहस्य गुह्य परम ।
अकृत्रिम उपजे प्रेम । ऐसें हें वर्म लाविल्या न लगे ॥४२॥
ज्ञान सांगू लागलें तर ते अत्यंत सोपे आहे. परंतु भक्तीचे रहस्य अत्यंत गहन आहे. त्या भक्तीने अकृत्रिम प्रेम उत्पन्न होते. भक्तीचे हें वर्म समजून घेऊ म्हटले तर समजत नाही ४२.

कृपण जरी दूरी जाये । तो घरींचें ठेवणें जीवीं वाहे ।
तैसें माझें प्रेम पाहें । जो हृदयीं वाहे सर्वदा ॥४३॥
कृपण मनुष्य कितीही लांब गेला, तरी घरांत ठेवलेली ठेव तो मनांत ठेवून राहतो, त्याप्रमाणेच जो सर्वदा माझंच प्रेम अंत:करणांत वागवितो ४३;

कां वंध्या गर्भ संभवल्यापाठीं । उल्हासे, वाढवी गोरटी ।
तैशी माझ्या प्रेमाची पोटीं । आवडी मोटी जैं होय ॥४४॥
किंवा बरेच दिवस मूल होत नसलेल्या स्त्रीला गर्भ राहिला की ती सुंदरी त्याला मोठ्या आनंदाने वाढवीत असते, त्याप्रमाणे हृदयामध्ये माझ्या प्रेमाची जेव्हा अत्यंत आवड उत्पन्न होते ४४;

जैसे वंध्यागर्भाचे डोहळे । तैसे माझ्या प्रेमाचे सोहाळे ।
पोटांतलेनि कळवळें । उल्हास बळें चढोवढी ॥४५॥
किंवा वंध्या असलेल्या स्त्रीला डोहळे लागावे, तसे ज्याला माझ्या प्रेमाचे सोहळे करण्याची अत्यंत आवड उत्पन्न होते, आणि अन्त:करणापासून कळवळा उत्पन्न होऊन अधिकाधिक उत्कर्षाने उल्हास वाढत जातो ४५;

सदैव जांवयी आल्या घरा । जेवीं सर्वस्व वेंची सुंदरा ।
तेवीं माझा कळवळा पुरा । ज्याच्या जिव्हारा वोसंडे ॥४६॥
किंवा भाग्यवान् जावई घरी आला असतां ज्याप्रमाणे सासू आपले सर्वस्व त्याच्याकरितां खर्ची घालते, त्याप्रमाणे माझा कळवळा पूर्णपणे ज्याच्या अंत:करणांत भरून जातो ४६

बीज अधिकाधिक पेरितां । उल्हास कृषीवळाचे चित्ता ।
तेवीं सर्वस्व मज अर्पितां । तैशी उल्हासता जैं होये ॥४७॥
किंवा बीं अधिक अधिक पेरले जाईल तितका तितका शेतकऱ्याच्या मनाला उल्हासच वाटत असतो, त्याप्रमाणे मला सर्वस्व अर्पण करतांना ज्याच्या मनाला तसाच उल्हास वाटतो ४७,

सगुण सुरूप समर्थ भर्ता । निघोन गेलिया तत्त्वतां ।
त्यालागीं तळमळी जैशी कांता । तैशी कळवळता जैं उठी ॥४८॥
किंवा गुणवान् , सुस्वरूप आणि श्रीमान् पति घरांतून निघून दूर गेला असता खरोखर त्याची स्री त्याच्याकरितां जशी तळमळते, त्याप्रमाणेच माझ्याकरितां ज्याच्या अंत:करणांत कळवळा उत्पन्न होतो ४८;

त्या नांव गा माझी भक्ती । उद्धवा जाण निश्चितीं ।
जे भक्तीसी भुलोनि श्रीपती । भक्तांहातीं आतुडलों ॥४९॥
उद्धवा ! त्याचेंच नांव खरोखर माझी भक्ति हें निश्चित समज. ज्या भक्तीला भुलून मी लक्ष्मीकांत भक्तांच्या हातांत सांपडलों आहे ४९.

चढत्या आवडीं माझी प्रीती । तेचि जाण पां माझी भक्ती ।
ऐसा भक्तीचा महिमा श्रीपती । स्वयें उद्धवाप्रती सांगत ॥२५०॥
अधिकाधिक आवडीने माझी प्रीति उत्पन्न होते, तीच भक्ति होय असे समज. अशा प्रकारे भक्तीचा महिमा श्रीकृष्णांनी स्वत: उद्धवाला सांगितला २५०.

आवडी धरोनि पोटेंसी । देवो सांगे उद्धवासी ।
माझी भक्ति ते जाण ऐसी । अखंड जीपाशीं मी असें ॥५१॥
प्रेमाने उद्धवाला पोटाशी धरून देव त्याला सांगू लागला की, जिच्यापाशी मी सर्वदा राहतों, ती माझी भक्ति अशी असते हे लक्षात ठेव ५१.

संसारतरणोपायीं । हेचि एक मुख्य पाहीं ।
मोक्ष लागे इच्या पायीं । इतर साधनें कायी बापुडीं ॥५२॥
संसार तरून जाण्याच्या उपायांमध्ये भक्ति हीच काय ती एक मुख्य होय. मोक्षसुद्धा हिच्या चरणी लागतो. मग बिचारी इतर साधने ती काय ५२.

मी तंव अजित लोकीं तिहीं । त्या मज भक्तिप्रतापें पाहीं ।
जिंतोनियां ठायींच्याठायीं । भावबळें पाहीं स्ववश केलों ॥५३॥
हें पहा ! मी त्रैलोक्यांत अजिंक्य आहे. त्या मला भक्तांच्या सामर्थ्याने जिंकून जागच्या जागीच भक्तीच्या बळाने मला आपला ताबेदार बनविले ५३.

यालागीं सर्व विजयांचे माथां । माझी भक्तीचि गा सर्वथा ।
ऐक पां तेही कथा । तुज मी तत्त्वतां सांगेन ॥५४॥
म्हणून सर्व विजयाहुन श्रेष्ठ अशी सर्वस्वी माझी भक्तीच होय. तीही हकीकत ऐक. तुला मी सविस्तर सांगतों ५४.

न साधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म उद्धव ।
न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ॥ २० ॥
[ श्लोक २०] हे उद्धवा ! माझ्या अनन्य भक्तीने जसा मी प्राप्त होतो, तसा योग, ज्ञान, धर्माचरण, स्वाध्याय, तप किंवा त्याग यांनी प्राप्त होत नाही. (२०)

सांख्य जें कां नित्यानित्य । कर्म जें कां नित्यनैमित्य ।
अष्टांगयोग समस्त । नव्हती समर्थ मत्प्राप्तीं ॥५५॥
नित्य कोणतें व अनित्य कोणतें हें ज्ञान देणारे जे सांख्यशास्त्र, अथवा जे नित्य-नैमित्तिक कर्म, किंवा सर्व अष्टांगादि योग, हे देखील माझी प्राप्ति करून द्यावयास समर्थ होत नाहींत ५५.

स्वाध्याय जें वेदाध्ययन । तप जें वातांबुपर्णाशन ।
त्याग जो संन्यासग्रहण । माझे भक्तीविण बापुडीं ॥५६॥
किंवा ज्याला ‘स्वाध्याय’ असे म्हणतात तें वेदाध्ययन; किंवा वायु, उदक व पिकलेली पानें भक्षण करून होणारें जें तप; किंवा संन्यासग्रहण इत्यादि जो त्याग, ही सर्व माझ्या भक्तीशिवाय दुर्बळ होत ५६.

जैशी नाकेंवीण बरव । कां शिरेंवीण अवयव ।
भर्तारेंवीण अहेव । जाण पां तो सर्व विटंबू ॥५७॥
ज्याप्रमाणे नाकाशिवाय सौंदर्य, किंवा मस्तकाशिवाय सर्व अवयव, किंवा पतीशिवाय सौभाग्यवती स्त्री, ही सर्व विटंबना होय असे समज ५७.

तैसें माझे भक्तीविण । सकळ साधनें बापुडीं जाण ।
मज पावावया समर्थपण । नाहीं आंगवण समस्तां ॥५८॥
त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय सर्व साधनें दुर्बळ होत. त्या सर्वांना मला पोचण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल असें बळ नाही ५८.

तैशी नव्हे माझी भक्ती । चढती वाढवून माझी प्रीती ।
तत्काळ करी माझी प्राप्ती । नव्हे पंगिस्ती आणिकाची ॥५९॥
माझी भक्ति मात्र तशी नव्हे. ती माझे प्रेम अधिकाधिक वाढवून तत्काळ माझी प्राप्ति करून देते. आणखी कोणाच्या आधीन होत नाही ५९.

जेव्हां उपजली माझी भक्ती । तेव्हांच झाली माझी प्राप्ती ।
हें पुनःपुन्हां उद्धवाप्रती । हरिखें श्रीपती सांगत ॥२६०॥
जेव्हा माझी भक्ति उत्पन्न होते, तेव्हांच माझी प्राप्ति होते. हें श्रीकृष्ण उद्धवाला पुनःपुन्हा आनंदाने सांगू लागले २६०.

रत्‍नासवें जैशी दीप्ती । अरुणासवें जेवीं गभस्ती ।
तेवीं भक्तीपाशीं मी श्रीपती । असें निश्चितीं उद्धवा ॥६१॥
उद्धवा, रत्नाबरोबर जसे त्याचे तेज असते, अरुणाबरोबर जसा सूर्य असतो, त्याप्रमाणे खरोखर भक्तीपाशी मी लक्ष्मीपति राहिलेला असतो ६१.

ते भक्ति लागे ज्याच्या चित्तीं । तैं मी सांपडलों त्याच्या हातीं ।
आणिकां साधनांचे प्राप्ती । विनाभक्ती मी नातुडें ॥६२॥
ती भक्ति ज्याच्या मनाला लागून राहिली, त्याच वेळी मी त्याच्या हाती सांपडलों म्हणून समजावे. इतर कोणतीही साधनें प्राप्त करून घेतली तरी भक्तीशिवाय मी प्राप्त व्हावयाचा नाही ६२.

भक्त्याहमेकया ग्राह्यः श्रद्धयाऽऽत्मा प्रियः सताम् ।
भक्तिः पुनाति मन्निष्ठा श्वपाकानपि संभवात् ॥ २१ ॥
[श्लोक २१] संतांना प्रिय असणारा त्यांचा आत्मा असा मी केवळ श्रद्धाभक्तीनेच प्राप्त होतो जन्माने चांडाळ असलेल्यांनाही माझी भक्ती पवित्र करते. (२१)

इतर साधनें व्युत्पत्ती । दूरी सांडूनि परतीं ।
श्रद्धायुक्त माझी भक्ती । धरिल्या हातीं मी लाभें ॥६३॥
इतर साधनें व युक्त्या ही सर्व दूर एका बाजूला टाकून माझी श्रद्धायुक्त भक्तीच हाती धरल्यास माझा लाभ घडतो ६३.

निर्विकल्प निःसंदेहो । सर्व भूतीं भगवद्‍भावो ।
हा भक्तीचा निजनिर्वाहो । भजनभावो या नांव ॥६४॥
मनांत कोणताही विकल्प न येऊ देता, कोणताही संशय न ठेवता, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवत्स्वरूपाची भावना धरणे, हेंच माझ्या भक्तीचे मुख्य लक्षण होय, याचंच नांव भजनभाव ६४.

होऊनि सर्वार्थी उदासू । माझ्या भजनाचा उल्हासू ।
न धरी मोक्षाचा अभिलाषू । एवढा विश्वासू मद्‍भजनीं ॥६५॥
सर्व प्रकारच्या संपत्तीविषयीं उदास होऊन माझ्याच भजनामध्ये आनंद वाटू लागला, मोक्षाचासुद्धा अभिलाष धरिला नाही इतका माझ्या भजनावर विश्वास ठेवला ६५,

तेथें तरें कीं न तरें । हा विकल्पू कोठें उरे ।
माझेनि भजनें निर्धारे । कै पाठिमोरे विधिवाद ॥६६॥
म्हणजे त्या ठिकाणी मी तरेन किंवा तरणार नाही हा विकल्प उरतो कोठे ? माझ्या भजनाने विधिनिषेधाचे सर्व वाद खात्रीने पळवून लावले ६६.

एवढा विश्वासीं ज्याचा भावो । न धरी भक्तीवेगळा उपावो ।
आम्हां त्याचेनि जीवें जीवो । तो आत्मा पहा हो पैं माझा ॥६७॥
एवढ्या विश्वासाने ज्यांची भावना भक्तीशिवाय अन्य उपाय स्वीकारीत नाही, त्याच्याच जीवनाने आमचे जीवन होत असते. अहो ! तो माझा आत्माच होय ६७.

जो मी ज्ञानियांचा आत्मा । भक्तांचा प्रिय परमात्मा ।
शास्त्रीं प्रतिपादिती पुरुषोत्तमा । तो मी साउमा त्या धांवें ॥६८॥
जो मी ज्ञान्यांचा आत्मा, जो मी भक्तांचा प्रिय परमात्मा, शास्त्रामध्ये ज्या पुरुषोत्तमाचे वर्णन करतात, तो मी त्यांना सामोरा धावत जातो ६८.

मज आवडे अनन्य भक्ती । मी त्यांचा अंकित निश्चितीं ।
त्यांचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महंती त्यांचेनि ॥६९॥
मला अनन्य भक्ति आवडते, म्हणून मी खरोखर त्यांचा ताबेदार झालेला असतो. त्यांच्यामुळेच सर्व त्रैलोक्यांत माझी ख्याति झाली आहे. आणि त्यांच्यामुळेच मला महत्त्व आले आहे ६९.

त्यांचेनि मज खाणें जेवणें । त्यांचेनि मज लेणें नेसणें ।
त्यांचेनि जीवेंप्राणें । म्यां वर्तणें सर्वत्र ॥२७०॥
त्यांच्यामुळेच मला खावयाला व जेवावयाला मिळते, त्यांच्यामुळेच मला अलंकार घालावयास व वस्त्रे नेसावयास मिळतात. त्यांच्या जीवाप्राणाच्या बळावरच मी सर्वत्र वागत असतों २७०.

माझे गांठीं कांहीं नाहीं । भक्तीं सर्वस्वें वेंचूनि पाहीं ।
नाना उपचार‍उपायीं । महत्त्व तिंहीं मज दिधलें ॥७१॥
माझ्याजवळ गांठीला कांहींच नाही. भक्तांनी आपली सर्वस्वे खर्ची घालून, नानाप्रकारच्या उपचारांनी त्यांनी मला मोठेपणा दिला आहे ७१

मज अचक्षूसी दिधले डोळे । अश्रोत्रा श्रवण दिधले ।
मज अमुखा तिंहीं मुख केलें । त्यांचेनि बोलें मी बोलका ॥७२॥
मला डोळे नसतांना त्यांनी मला डोळे दिले, मला कान नसतांना त्यांनी मला कान दिले, मला तोंड नसतांना त्यांनी मला तोंड दिले, त्यांच्याच वाणीने मी बोलका झालों आहे ७२.

मज त्यांचेनि गमनागमन । त्यांचेनि अवयव अळंकरण ।
त्यांचेनि मज नेमस्त स्थान । मज समर्थपण त्यांचेनि ॥७३॥
त्यांच्यामुळेच माझे जाणे आणि येणे घडते. त्यांच्यामुळे हातपायादि अवयवांवर मी अलंकार घालतों. त्यांच्यामुळेच मला नियमित स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्यामुळेच मला सामर्थ्य प्राप्त झाले आहे ७३.

मज नामरूप तिंहीं करणें । मज पवित्रता त्यांचेनि गुणें ।
मज वैकुंठींचें ठाणें । भक्तीं अचळपणें दीधलें ॥७४॥
माझें नाम आणि रूप त्यांनीच बनविलें, मला त्यांच्या गुणांनीच पवित्रता आली आहे. मला वैकुंठांतील स्थान भक्तांनीच अढळ करून दिले आहे ७४.

येथवरी निजभक्तांसी । मी वश्य झालों भक्तीपाशीं ।
यालागीं अहर्निशीं । मी भक्तांपाशीं तिष्ठतू ॥७५॥
ह्याप्रमाणे माझ्या भक्तांना मी भक्तीमुळेच वश झालो आहे; म्हणून रात्रंदिवस मी भक्तांपाशीं सारखा उभा असतो ७५.

मी अजन्मा त्यांचेनि जन्म धरीं । मी अकर्मा त्यांचेनि कर्म करीं ।
त्यांचेनि बोलें उद्धरीं । नाममात्रें महापापियां ॥७६॥
मी जन्मरहित असतां त्यांच्याकरितांच जन्म घेतों; मी कर्मशून्य असतां त्यांच्याकरितांच कर्म करतो. त्यांच्या शब्दासाठींच मी महान् पातक्यांचा नाममात्राने उद्धार करतों ७६.

नारदवचनासाठीं । वाल्मीकि परम पापी सृष्टीं ।
म्यां वंद्य केला वैकुंठीं । नामपरिपाटीं पवित्रत्वें ॥७७॥
वाल्मीकि हा ह्या जगांत महान् पातकी होता, तरी नारदांच्या सांगण्यावरून मी त्याला नामजपाच्या पवित्रपणामुळे वैकुंठांतही वंद्य करून सोडलें ! ७७.

येथवरी भक्तीची सत्ता । मजवरी चाले तत्त्वतां ।
भक्तीवेगळा सर्वथा । मीं न यें हाता कोणाचे ॥७८॥
इतकी खरोखर भक्तीची सत्ता माझ्यावर चालते. भक्तीशिवाय मी कोणाच्याही हातीं मुळींच लागत नाही ७८.

भक्तांच्या उपकारता । मी थोर दाटलों तत्त्वतां ।
नव्हेचि प्रत्युपकारता । आधीन सर्वथा यालागीं ॥७९॥
भक्तांच्या उपकाराने मी खरोखरच अगदी वांकून गेलों आहे. कारण, त्यांच्या उपकारांची फेड होतच नाही. म्हणून मी सर्वस्वी त्यांच्या आधीन असतो ७९.

त्यालागीं व्हावया उतरायी । माझे गांठीं कांहींच नाहीं ।
लटकुफटकु दीधलें कांहीं । तें हळूचि पाहीं सांगेन ॥२८०॥
त्यामुळे त्यांचे उतराई व्हावयास माझ्याजवळ गांठीला काहीच नसते. आता काहीतरी सटरफटर त्यांना दिले आहे, तेही तुला हळूच सांगून ठेवतों २८०.

भक्त माझेनि सनाथ । माझेनि झाले ते कृतकृत्य ।
माझेनि आनंदें तें सदा तृप्त । वोसंडत निजबोधें ॥८१॥
भक्त हे माझ्यामुळेच सनाथ झाले आहेत. माझ्यामुळेच ते कृतकृत्य झाले आहेत. माझ्याच आनंदाने ते सर्वदा तृप्त झाले आहेत आणि आत्मज्ञानाने उचंबळून गेले आहेत ८१.

माझेनि बळें जगजेठी । घायेंवीण छेदिती सृष्टी ।
माझेनि बळें त्यांचे दृष्टी । संमुख नुठी कळिकाळ ॥८२॥
माझ्याच बळावर ते सर्व जगाला भारी झाले आहेत. ते घाव घातल्याशिवायच सृष्टि छेदून टाकतात. माझ्या सामर्थ्यामुळेच त्यांच्या दृष्टीसमोर कळिकाळ येऊ शकत नाही ८२.

माझेनि न माती लोकीं तिहीं । माझेनि ते देहीं विदेही ।
माझेनि बळें पाहीं । प्रळयकाळ तिंही प्राशिला ॥८३॥
माझ्यामुळेच ते त्रैलोक्यांत कोणाचीही परवा करीत नाहीत. माझ्यामुळेच ते देहामध्ये विदेहत्वाने राहतात. माझ्याच बळाने त्यांनी प्रळयकाळही पिऊन टाकला पहा ! ८३.

माझेनि बळें जाण । विभांडिलें जन्ममरण ।
माझें करोनियां भजन । ब्रह्म सनातन ते झाले ॥८४॥
माझ्याच बळाने त्यांनी जन्ममरण नष्ट केले. माझे भजन करून ते सनातन ब्रह्मस्वरूप झाले ८४.

हेंही नाहीं म्यां दीधलें । भजनबळें तिंहीं नेलें ।
त्यांसीं माझें कांहीं न चले । सर्वस्व लुटिलें निजभक्तीं ॥८५॥
पण हेसुद्धा त्यांना मी दिलेले नाही. तर भजनाच्या सामर्थ्यानंच त्यांनी ते नेलें आहे. त्यांच्यापुढे माझे काही चालत नाही. माझे सर्वस्व माझ्या भक्तांनी लुटून नेलें आहे ८५.

भक्तीं भजनभावबळें । अजिता मातें तिंहीं जिंकिलें ।
जिकोनि आपण्या वश्य केलें । माझें निजपद नेलें निजभक्तीं ॥८६॥
त्या भक्तांनी भजनाच्या भक्तिसामर्थ्याने मला अजिंक्यालाही जिंकिलं आहे. आणि जिंकून मला अगदी वश करून ठेवले आहे. माझे आत्मपद होते ते माझ्या भक्तांनीच नेलें ! ८६.

एवं माझ्या निजपदाची सत्ता । जरी आली भक्तांच्या हाता ।
तरी स्वामित्व ठेवूनि माझे माथां । माझे भक्तिपंथा विनटले ॥८७॥
अशा प्रकारे माझ्या आत्मपदाची सत्ता जरी माझ्या भक्तांच्या हातांत आली, तरी ते धनीपणा माझ्याकडेच ठेवून माझ्या भक्तिमार्गाला बिलगून राहिले आहेत ८७.

ते माझे भक्तीची पवित्रता । आश्चर्य वाटेल तुज ऐकतां ।
संदेहो नाहीं मज सांगतां । ऐक तत्त्वतां तो महिमा ॥८८॥
त्या माझ्या भक्तीची पवित्रता ऐकतांना तुला आश्चर्य वाटेल, पण मला सांगतांना कोणताच संशय नाही. तो भक्तीचा खरा महिमा ऐक ८८.

सांडोनि दांभिक लौकिक । माझ्या भजनीं भावार्थें चोख ।
तो ज्ञाती जरी झाला श्वपाक । तरी आवश्यक मज पूज्य ॥८९॥
लोकव्यवहारांतील दांभिक प्रतिष्ठा सोडून शुद्ध भावार्थाने जो माझ्या भजनीं लागला, तो जातीने जरी चांडाळ असला, तरी तो मला अत्यंत पूज्य आहे ८९.

केवळ जीं अपवित्रें । रिसें आणि वानरें ।
म्यां पूजिलीं गौळ्यांची पोरें । ताकपिरें रानटें ॥२९०॥
केंवळ अमंगळ अशी अस्वले आणि माकडे, किंवा ताक पिणारी व रानांत भटकणारी गवळ्यांची पोरें, तीसुद्धा मी पूज्य मानिली २९०.

जो जातीनें नीचत्वा नेला । परी भक्तिभावें उंचावला ।
तो मद्‌रूपता पावला । पूज्य झाला तिहीं लोकीं ॥९१॥
जो जातीने हलकेपणाला आला, आणि भक्तिभावाने महत्त्वाला चढला, तो मत्स्वरूपाला पोंचला व त्रैलोक्यांत पूज्य झाला असे समजावे ९१.

‘विप्रात् द्विषड्गुणयुता’ । ये श्लोकींची हेचि कथा ।
जळो त्या द्विजाची पवित्रता । जो माझ्या भजनपथा विन्मुख ॥९२॥
‘विप्रात द्विषड्गुणयुता’ (भाग ७-९-१०) या श्लोकांतील तात्पर्य हेच. जो ब्राह्मण माझ्या भजनमार्गाला विन्मुख झाला, त्या ब्राह्मणाची पवित्रता जळो ९२.

त्याहूनि श्वपच गा वरिष्ठ । जो माझ्या भजनीं भजननिष्ठ ।
त्यातें वंदिती पुराणश्रेष्ठ । कविवरिष्ठ महाकवी ॥९३॥
त्याच्यापेक्षा, माझ्या भजनामध्ये भजननिष्ठ झालेला चांडाळही श्रेष्ठ होय. त्याला मोठमोठे प्राचीन सन्मान्य कविश्रेष्ठ व थोर ज्ञातेही वंदन करतात ९३.

विदुर दासीपुत्र तत्त्वतां । भावें पढिया भगवंता ।
भावो प्रमाण परमार्था । जात्यभिमानता सरेना ॥९४॥
विदुर हा खरोखर दासीपुत्र होता. पण तो भक्तीमुळेच भगवंताला आवडता झाला. म्हणून परमार्थसाधनाला भाव हाच मुख्य आहे. जातीचा अभिमान काही उपयोगी पडत नाहीं ९४.

मज पावावया साचोकारें । भावो सरे जाती सरे ।
यालागीं अवघ्यांचे धुरे । म्यां वनचरें उद्धरलीं ॥९५॥
खरोखर माझी प्राप्ति व्हावयाला भक्ति हीच श्रेष्ठ माहे. जाति कांहीं श्रेष्ठ नाही. म्हणूनच सर्वाच्या आधी मी वनचरांचा (माकडे, अस्वले वगैरेंचा) उद्धार केला ९५,

पक्ष्यांमाजीं केवळ निंद्यू । जटायु उद्धरिला म्यां गीधू ।
अंत्यज उद्धरिला धर्मव्याधू । भाव शुद्धू मदर्थी ॥९६॥
पक्ष्यांमध्ये अत्यंत निंद्य असा गिधाड जटायु मी उद्धरिला. मी धर्मव्याध नांवाचा अंत्यज उद्धरिला. कारण माझ्या ठिकाणी त्याची शुद्ध भक्ति होती ९६.

भलता हो भलते जाती । ज्यासी माझी भावार्थें भक्ती ।
तोचि जाण पां पवित्रमूर्ती । माझी प्राप्ती मद्‍भजनें ॥९७॥
कोणी कोणत्याही जातीत जन्मलेला असो. ज्याला माझी भावार्थपूर्वक भक्ति घडते, तोच पवित्रतेची मूर्ति होय असे समज. माझ्या भजनानेच माझी प्राप्ति होते ९७.

सांडोनियां माझी भक्ती । नाना साधनें व्युत्पत्ती ।
करितां नव्हे माझी प्राप्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥९८॥
माझी भक्ति सोडून अनेक साधने किंवा वादविवाद केले असतां माझी प्राप्ति होत नाही. तेच श्रीकृष्ण सांगतो ९८.

धर्मः सत्यदयोपेतो विद्या वा तपसान्विता ।
मद्‍भक्त्यापेतमात्मानं न सम्यक् प्रपुनाति हि ॥ २२ ॥
[श्लोक २२] याउलट सत्य आणि दयेने युक्त असा धर्म किंवा तपश्चर्येसह ज्ञान, माझी भक्ती नसेल तर, त्या व्यक्तीला पवित्र करू शकत नाही. (२२)

माझे भक्तीवीण कर्मधर्म । जाण पां तो केवळ भ्रम ।
चुकलें मत्प्राप्तीचें वर्म । तो धर्म अधर्म परिणमे ॥९९॥
माझ्या भक्तीशिवाय कोणतेही कर्म किंवा आचरण करणे तो केवळ भ्रम होय असे समज. त्यांत माझ्या प्राप्तीचा मार्ग चुकतो व त्या धर्माचा परिणाम अधर्मात होतो ९९.

माझे भक्तीवीण सत्यवादू । तो जाण पां जैसा गर्भांधू ।
प्रतिपदीं घडे प्रमादू । अधःपतनबाधू देखेना ॥३००॥
किंवा माझ्या भक्तीशिवाय सत्य भाषण करणे तेही जन्मांधाप्रमाणेच समजावें, कारण त्यांत पदोपदी प्रमादच होत असतात, आणि आपण अधःपतनाला जात आहों ही बाधकता तो पाहात नाही ३००.

भक्तीवीण दयेची थोरी । जेवीं पुरुषेंवीण सुंदरी ।
ते विधवा सर्व धर्माबाहेरी । तैसी परी दयेची ॥१॥
भक्तीशिवाय दयेची थोरवी वर्णन करणे म्हणजे ज्याप्रमाणे पुरुषाशिवाय त्याची सुंदर स्त्री असते व ती विधवा असल्यामुळे सर्व धर्मकृत्यांना वर्ज्य असते, त्याप्रमाणेच त्या दयेची अवस्था होय १.

माझे भक्तीवीण जे विद्या । ते केवळ जाण पां अविद्या ।
जेवीं वायस नेणती चांदा । तेवीं माझ्या निजबोधा नोळखती ॥२॥
माझ्या भक्तीशिवाय जी विद्या, ती केवळ अविद्या होय असे समज. ज्याप्रमाणे कावळा चंद्राला ओळखीत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या आत्मबोधाला ओळखीत नाहींत २.

चंदनभार वाहे खर । परी तो नेणे सुवासाचें सार ।
माझेनि भक्तीवीण विद्याशास्त्र । केवळ भारवाहक ॥३॥
गाढव चंदनाचे ओझ वाहतो, पण त्या चंदनाच्या सुवासांतील रहस्य कांहीं तो जाणत नाही. त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र पढणे म्हणजे केवळ भारवाहक होणेच होय ३.

माझे भक्तीवीण जें तप । शरीरशोषणादि अमूप ।
तें पूर्वादृष्टें भोगी पाप । नव्हे सद्‌रूप तपःक्रिया ॥४॥
माझ्या भक्तीशिवाय शरीरशोषणादिक जे मोठे तप मनुष्य करतो, तो जणू काय पूर्वसंचितानुसार ते पापच भोगतो असे समजावें. कारण, ती तपाची क्रिया सत्स्वरूप होत नाही. ४.

माझे भक्तीवीण जें साधन । तें कोशकीटाच्या ऐसें जाण ।
आपण्या आपण बंधन । भक्तिहीन क्रिया ते ॥५॥
माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे, ते ते स्वतांच आपल्यासभोवती कोश करून त्यांत राहाणाऱ्या किल्याप्रमाणे समजावे. कारण भक्तीशिवाय जी क्रिया करावी, ती आपली आपणासच बंधनकारक होते ५.

एवं माझे भक्तीवीण । जें केलें तें अप्रमाण ।
तें भक्तीचें शुद्ध लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६॥
तात्पर्य, माझ्या भक्तीशिवाय जे काय केले असेल ते सर्व अप्रमाण होय. आता त्याच भक्तीचे शुद्ध स्वरूप श्रीकृष्ण स्वतः सांगतात ६.

कथं विना रोमहर्षं द्रवता चेतसा विना ।
विनानन्दाश्रुकलया शुध्येद् भक्त्या विनाऽऽशयः ॥ २३ ॥
[श्लोक २३] भक्तीने जोपर्यंत शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू वाहात नाहीत, तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध कसे होईल ? (२३)

आवडीं हरिकथा ऐकतां । नाना चरित्रें श्रवण करितां ।
माझी आत्मचर्चा हृदयीं धरितां । पालटू चित्ता तेणें होये ॥७॥
-आवडीनें हरीची कथा श्रवण केली असतां, किंवा नानाप्रकारची चरित्रे ऐकली असतां, किंवा माझ्या स्वरूपाचाच ऊहापोह निरंतर हृदयांत ठेविला असता, त्यामुळे चित्तांत पालट होतो ७.

तेणेंचि उपजे माझी भक्ती । माझ्या भजनाच्या अतिप्रीतीं ।
आवडीं माझीं नामें गाती । रंगीं नाचती सद्‍भावें ॥८॥
त्यामुळेच माझी भक्ति उत्पन्न होते. माझ्या भजनाच्या अत्यंत प्रेमाने मोठ्या आवडीने माझी नामें गातात, मोठ्या भक्तिभावाने रंगून जाऊन नाचतात ८.

पोटांतूनियां उल्हासतां । रंगीं गातां पैं नाचतां ।
अंतरीं द्रवो झाला चित्ता । ते अवस्था बाह्य दिसे ॥९॥
अंत:करणांतून प्रेमाची उसळी आल्यामुळे भर सभेत रंगांत येऊन गातात आणि नाचतात, त्यामुळे मनांत जो भक्तिप्रेमाचा पाझर फुटतो, तो बाहेर व्यक्त होणाऱ्या स्थितीवरून स्पष्ट दिसतो ९.

अंतरीं सुखाची झाली जोडी । बाह्य रोमांची उभिली गुढी ।
त्या स्वानुभवसुखाची गोडी । नयनीं रोकडी प्रवाहे ॥३१०॥
अंत:करणांत सुख उत्पन्न झाले की, बाहेर रोमांच उभे राहातात. त्या आत्मानुभवसुखाची गोडी डोळ्यांतून प्रेमाश्रुच्या रूपाने प्रत्यक्ष वाहूं लागते ३१०.

माझे भक्तीचिया आवडीं । अहं सोहं दोनी कुडीं ।
तुटली अभिमानाची बेडी । विषयगोडी निमाली ॥११॥
माझ्या भक्तीच्या आवडीने ‘अहं’ आणि ‘सोहं ‘ ह्या दोन्ही दुव्यांनी अभिमानाची बेडी सुटते, आणि विषयाची गोडी नाहीशी होते ११.

ते काळींचें हेंचि चिन्ह । पुलकांकित देहो जाण ।
नयनीं आनंदजीवन । हृदयीं परिपूर्ण स्वानंदू ॥१२॥
त्या वेळचे चिन्ह हेच की, शरीर रोमांचित होते, नेत्रांत आनंदाश्रु वाहूं लागतात, आणि हृदयांत परिपूर्ण आत्मानंद भरून राहातो १२.

पुंजाळले दोनी नयन । सदा सर्वदा सुप्रसन्न ।
स्फुरेना देहाचे भान । भगवंतीं मन रंगलें ॥१३॥
त्या वेळी दोन्ही नेत्र विस्तृत होऊन त्यांतील तेज चमकू लागते, आणि ते सदासर्वदा सुप्रसन्न दिसतात. देहाचे भान स्फुरेनासे होते, आणि मन भगवंताच्या ठिकाणी रंगून जातें १३.

ऐसी नुपजतां माझी भक्ती । कैंची होय विषयविरक्ती ।
विरक्तीवीण माझी प्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥१४॥
अशी जर माझी भक्ति उत्पन्न न होईल, तर विषयाची विरक्ति कशी होणार ? आणि विरक्ति उत्पन्न झाल्याशिवाय तर उद्धवा ! खरोखर माझी प्राप्ति होत नाही १४.

माझी शुद्धभक्ती तत्त्वतां । साचार आली जयाचे हाता ।
ऐक त्याच्या चिन्हांची कथा । आणि पवित्रता तयाची ॥१५॥
माझी शुद्ध भक्ति खरोखरच पूर्णपणे ज्याच्या हाती आली, त्याच्या लक्षणांचे वर्णन आणि त्याची पवित्रता ऐक १५.

माझे भक्तीसी जो लागला । तो तत्काळ पवित्र झाला ।
त्यानें त्रिलोक पुनीत केला । हें गर्जोनि बोलिला श्रीकृष्णू ॥१६॥
जो माझ्या भक्तीला लागतो, तो तत्काळ पवित्र होतो. इतकेच नव्हे, तर त्यानें त्रैलोक्यही पावन केलें; असें श्रीकृष्ण गर्जना करून म्हणाला १६.

वाग् गद्गदा द्रवते यस्य चित्तं ।
रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च ।
विलज्ज उद्गायति नृत्यते च ।
मद्‍भक्तियुक्तो भुवनं पुनाति ॥ २४ ॥
[श्लोक २४] ज्याची वाणी भक्तीने सद्‌गदित होते, चित्त द्रवते, जो वियोगाने कधी रडतो तर कधी भेटीने हसतो, लाज सोडून कधी उच्चस्वरात गातो तर कधी नाचतो, असा माझा भक्त सर्व जगाला पवित्र करतो. (२४)

अंगीं रोमांच रवरवित । स्वेदबिंदू डळमळित ।
चित्त चैतन्यें द्रवत । तेणें सद्‍गदित पैं वाचा ॥१७॥
अंगावर रोमांच ताठ उभे राहातात, धर्मबिंदु चमकू लागतात, चैतन्याने चित्ताला पाझर फुटतो, आणि त्यामुळे वाणीही सद्गदित होते १७.

हर्ष वोसंडतां पोटीं । अर्धोन्मीलित होय दृष्टी ।
जीवशिवां पडली मिठी । ध्यानत्रिपुटी मावळली ॥१८॥
पोटांत आनंद भरून आला म्हणजे दृष्टि अर्धोन्मीलित होते; जीव-शिवांची घट्ट मिठी पडते; ध्येय, ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी नष्ट होते १८.

नयनीं अश्रूंचा पूर लोटी । उभंडू न संटेचि पोटीं ।
होत जीवभावाची तुटी । पडे सृष्टीं मूर्च्छित ॥१९॥
डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो; गहिवर आलेला पोटात मावेनासा होतो, देहभान सुटून जातें व तो मूर्छा येऊन भूमीवर पडतो १९.

आक्रंदे थोर आक्रोशें । वारंवार रडतां दिसे ।
रडण्यामाजीं गदगदां हांसे । जेवीं लागलें पिसें ब्रह्मग्रहो ॥३२०॥
तो मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागतो. पुन्हा पुन्हा हुंदके येत असलेले दिसतात. रडता रडतांच गदगदा हासू लागतो. ज्याप्रमाणे ब्रह्मसमंध अंगांत येऊन वेड लागावे, त्याप्रमाणे त्याची अवस्था होते ३२०.

रडणें हांसणें न सांडी । त्याहीमाजीं नवल आवडी ।
अर्थावबोधें गाणें मांडी । निजात्मगोडीचेनि योगें ॥२१॥
रडणे आणि हासणे सोडीत नाही आणि त्यांतच अशी आश्चर्यकारक आवड उत्पन्न होते की, आत्मस्वरूपाची गोडी लागल्यामुळे त्याच अर्थाला धरून तो मोठ्या आवडीने गाऊं लागतो २१.

विसरोनि माझें तुझें । सांडोनियां लोकलाजे ।
हरिखें प्रेमाचेनि भोजें । तेणें नाचिजे निःशंक ॥२२॥
माझे आणि तुझे हें विसरून जाऊन, लोकलज्जा सोडून, अत्यंत हर्षांने व प्रेमाच्या आवडीने निःशंकपणे नाचूं लागतो २२.

गाणे नाचणें हांसणें । तो रडे कासयाकारणें ।
ऐक तींही लक्षणें । तुजकारणें सांगेन ॥२३॥
अशा प्रकारे त्याचे गाणे, नाचणे व हासणे चाललेले असते. पण तो रडतो कशाकरितां ? त्याचीही लक्षणे ऐक, तुला सांगतों २३.

माउलीवेगळें बाळक पडे । जननीं पाहतां कोठें नातुडे ।
भेटता ओरडूनि रडे । मिठी पडे सप्रेम ॥२४॥
एखादें मूल आईपासून चुकून भलतीकडेच गेलेले असते, तें आईला हुडकू लागते, पण ती त्याला कोठे सापडत नाही. आणि मग तिची अकस्मात् भेट झाली की ते हंबरडा फोडून रडू लागते व प्रेमाने आईला त्याची घट्ट मिठी पडते २४.

जीव परमात्मा दोनी । चुकामुकी झाली भ्रमपट्टनीं ।
त्यांसी एकाकीं होतां मिळणी । रडे दीर्घस्वरें स्फुंदत ॥२५॥
त्याप्रमाणे जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोघांची भ्रांतिरूप नगरांत चुकामुक झालेली असते, त्यांची एकदम गांठ पडली असतां जीवही हुंदके देऊन मोठ्याने रडूं लागतो २५.

बहुकाळें झाली भेटी । ऐक्यभावें पडली मिठी ।
तेणें उभंडू न संटे पोटीं । रुदन उठी सप्रेम ॥२६॥
फार दिवसांनी भेट झाल्यामुळे ऐक्यभावाने परस्परांस मिठी बसते, त्या आनंदाने आलेला प्रेमाचा उमाळा पोटांत मावत नाही, व त्यामुळे प्रेमभावाने रडे कोसळते २६.

देवो लाघवी नानापरी । मायावी नातुडें निर्धारीं ।
तो सांपडला घरींच्या घरीं । तेणें विस्मय करी टवकारें ॥२७॥
देव अनेक प्रकारे मोठा नाटकी आहे. तो मायावी असल्यामुळे खरोखर कोणास सापडत नाही. पण तोच मला घरांतल्या घरांतच सापडला, अशा आश्चर्याने तटस्थ होऊन तो पाहात राहातो २७.

देव सदा जवळीच असे । त्यालागीं जन कैसे पिसे ।
पाहों जाती देशोदेशें । तें देखोनि हांसे गदगदां ॥२८॥
देव हा सदोदित जवळच असतो. त्याच्याकरितां लोक कसे वेड्यासारखे होऊन देशोदेशीं त्याला पाहावयाला भटकत असतात ! हे पाहून त्याला खदखदा हसावयास येते २८.

देव सर्वांसी अजितू । तो म्यां जिंकिला भगवंतू ।
धरोनि राखिला हृदयांतू । यालागीं नाचतू उल्हासें ॥२९॥
देव हा सर्वाना अजिंक्य असा असता त्या भगवंताला मी जिंकलें आणि धरून हृदयांत ठेवलें, असें म्हणून तो आनंदाने नाचू लागतो २९.

निवटूनि दुजयाची मातू । अंगें जीतिला भगवंतू ।
जगीं झाला यशवंतू । यालागीं गातनाचतू उल्हासें ॥३३०॥
दुजेपणाची गोष्टच नाहीशी करून स्वतः भगवंताला जिंकले आणि जगामध्ये यशस्वी झाला, म्हणून तो मोठ्या आनंदाने गात व नाचत असतो ३३०.

पाहतां दुसरें न दिसे मज । यालागीं धरूं विसरला लाज ।
जगीं झाला तो निर्लज्ज । निर्लज्जतेची वोज हे त्याची ॥३१॥
पाहावयास गेले असता मला दुसरे कोणी दिसतच नाही अशी स्थिति होते, म्हणून लाज धरावयासही विसरतो. अशा रीतीने तो जगामध्ये निर्लज्ज होतो. त्याच्या निर्लज्जतेचे हे कारण होय ३१.

यापरी भक्तियुक्त । होऊनियां माझे भक्त ।
निजानंदें गातनाचत । तेणें केलें पुनीत लोकत्रय ॥३२॥
ह्याप्रमाणे माझे भक्त भक्तियुक्त होऊन आत्मानंदाने गात असतात आणि नाचत असतात. त्यांच्या त्या आनंदानें त्रैलोक्य पवित्र होतें ३२,

जयाचे देखतां चरण । जडजीवां उद्धरण ।
ज्याचे लागतां चरणरेण । पशु पाषाण उद्धरती ॥३३॥
ज्यांच्या चरणांचे दर्शन होतांच जडजीवांचा उद्धार होतो, ज्यांच्या पायांची पायधूळ लागली तरीसुद्धा पशु व पाषाण उद्धरतात ! ३३.

कीर्तनाचेनि महाघोकें । नाशिलीं जगाचीं सर्व दुःखें ।
अवघें विश्वचि हरिखें । भरिलें महासुखें उचंबळत ॥३४॥
कीर्तनाच्या मोठ्या गजराने जगाची सर्व दुःखें नाहींशी केली की, सर्व ब्रह्मांडच आनंदाने भरल्यामुळे तें अत्यंत सुखाने उचंबळत असते ३४.

दर्शनें स्पर्शनें वचनें । एक तारिले कीर्तनें ।
एक तारिले नामस्मरणें । यापरी जग उद्धरणें उद्धवा ॥३५॥
कोणी दर्शनाने लोक तारले. कोणी स्पर्शाने तारले, कोणी उपदेशाने तारले. कोणी कीर्तनानें तारले, आणि कोणी नामस्मरणाने तारले. उद्धवा ! अशा प्रकारे त्यांनी जगाचा उद्धार केला ३५.

अविद्यायुक्त जीव मलिन । त्यासी शुद्ध व्हावया जाण ।
माझी भक्तीचि प्रमाण । हेंचि श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥३६॥
जीव हा अविद्येने युक्त असल्यामुळे मलिन होतो. त्याला शुद्ध होण्याला माझी भक्ति हीच मुख्य साधन आहे, हे लक्षात ठेव. हेंच श्रीकृष्ण स्वतः सांगतो ३६.

डांकमिळणी सुवर्ण । हीनकसें झालें मलिन ।
उदकें धुतांही जाण । निर्मळपण न ये त्या ॥३७॥
[श्लोक २५] सोने ज्याप्रमाणे अग्नीने आपल्यातील मळ टाकून देऊन शुद्ध होते आणि आपल्या खर्‍या रूपाने चमकू लागते, त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा माझी भक्ती करतो, तेव्हा त्या भक्तियोगाने आपल्या कर्मवासनांचा नाश करून आपले निजस्वरूप असलेल्या मला परमात्म्याला प्राप्त होतो. (२५)

यथाग्निना हेम मलं जहाति ।
ध्मातं पुनः स्वं भजते च रूपम् ।
आत्मा च कर्मानुशयं विधूय ।
मद्‍भक्तियोगेन भजत्यथो माम् ॥ २५ ॥
-डांक लावलेले सोने कमी कस झाल्यामुळे मलिन होते. ते पाण्याने कितीही धुतले तरी त्याला शुद्धपणा येत नाही ३७.

त्याच सुवर्णाचें तगट । अग्निमुखें देतां पुट ।
मळत्यागें होय चोखट । दिसे प्रकट पूर्वरूपें ॥३८॥
पण त्याच सोन्याचा पत्रा करून तो अग्नीत घालून तापविला, म्हणजे त्यांतील हीण जळून जाऊन तें शुद्ध होते व पहिल्याप्रमाणे चकचकीत दिसू लागते ३८.

तेवीं अविद्याकामकर्मीं मलिन । त्याचे चित्तशुद्धीलागीं जाण ।
माझी भक्तीचि परम प्रमाण । मळक्षालन जीवाचें ॥३९॥
त्याप्रमाणे अविद्या आणि सकाम कर्म ह्यांच्या योगानें जो मलिन झालेला असतो, त्याच्या चित्ताची शुद्धि होण्याला माझी भक्ति हीच मुख्य साधन आहे. तिच्याच योगाने जीवाच्या मलाचे क्षालन होते ३९.

जंव जंव भक्तीचें पुट चढे । तंव तंव अविद्याबंध विघडे ।
मायेचें मूळचि खुडे । जीवू चढे निजपदा ॥३४०॥
अंतःकरणावर जों जो भक्तीचे पुट चढते, तों तो अविद्येचे बंध ढिले होत जातात, मायेचें मूळच खुंटले जाते, आणि जीव आत्मपदावर चढतो. ३४०.

तुटोनियां अविद्याबंधू । चिन्मात्रैक अतिविशुद्धू ।
जीव पावे अगाध बोधू । परमानंदू निजबोधें ॥४१॥
अविद्येचा बंध तुटून गेला म्हणजे केवळ ज्ञानस्वरूप व अत्यंत शुद्ध अशा जीवाला परिपूर्ण बोध होतो आणि त्या आत्मबोधाच्या योगाने त्याला अत्यंत आनंद होतो ४१.

जीवासी अविद्येची प्राप्ती । ते ज्ञानास्तव होय निवृत्ती ।
तेथ कां पां लागली भक्ती । ऐशी आशंका चित्तीं जरी धरिसी ॥४२॥
जीवाला जी अविधा प्राप्त झालेली असते, तिची निवृत्ति ज्ञानाने होईल. मग तेथे भक्ति कशाला लागते ! अशी शंका तूं मनांत घेशील ४२,

तरी माझे भक्तीवीण ज्ञान । सर्वथा नुपजे जाण ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४३॥
तर माझ्या भक्तीशिवाय ज्ञान हे मुळीच उत्पन्न होत नाही, याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वत: सांगतो ४३.

यथा यथाऽऽत्मा परिमृज्यतेऽसौ ।
मत्पुण्यगाथाश्रवणाभिधानैः ।
तथा तथा पश्यति वस्तु सूक्ष्मं ।
चक्षुर्यथैवाञ्जनसम्प्रयुक्तम् ॥ २६ ॥
[श्लोक २६] उद्धवा ! माझ्या परमपावन लीलाकथांच्या श्रवणकीर्तनाने जसजसा चित्तातील मळ धुतला जातो, तसतसा माझा भक्त, डोळ्यात अंजन घातल्याने जसा डोळा बारीक वस्तूही पाहू शकतो, तसा सूक्ष्म अशा मला पाहू शकतो. (२६)

माझी प्रतिपाद्य स्वरूपता । नाना चरित्रें पवित्र कथा ।
तेथें श्रवणमननें चित्ता । प्रक्षाळितां कीर्तनें ॥४४॥
माझे वेदशास्त्रांनी वर्णन केलेले स्वरूप ; माझी नानाप्रकारची चरित्रे; आणि माझ्या पवित्र कथा यांचे श्रवण, मनन किंवा कीर्तन ; यांनी चित्ताचे क्षालन करून ४४,

जंव जंव करी माझी भक्ती । तंव तंव अविद्यानिवृत्ती ।
तेणें माझे स्वरूपाची प्राप्ती । जे श्रुतिवेदांतीं अतर्क्य ॥४५॥
तो जो जो माझी भक्ति करतो, तो तो अविद्येची निवृत्ति होते आणि श्रुतीला आणि वेदांतालाही अतर्क्य अशी माझ्या स्वरूपाची प्राप्ति त्याला होते ४५.

जें कां अतिसूक्ष्म निर्गुण । अलक्ष्य लक्षेना गहन ।
तेणें स्वरूपें होय संपन्न । जीव समाधान मद्‍भजनें ॥४६॥
जें अत्यंत सूक्ष्म असून निर्गुण असते, जें अलक्ष्य असल्यामुळे दृष्टिगोचर होत नाही इतकें गहन असते, तेंच स्वरूप जीवाला प्राप्त होते, भाणि माझ्या भजनाने त्याचे समाधान होतें ४६.

नयनीं सूदल्या अंजन । देखे पृथ्वीगर्भींचें निधान ।
तेवीं मद्‍भजनें लाहोनि ज्ञान । चैतन्यघन जीव होय ॥४७॥
ज्याच्या डोळ्यांत अंजन घातलेले असते, तो पृथ्वीच्या पोटांतला ठेवा पाहूं शकतो, त्याप्रमाणे माझ्या भजनाने ज्ञान प्राप्त करून घेऊन जीव ज्ञानस्वरूप होतो ४७.

उद्धवा ऐक पां निश्चितीं । बहुत न लगे व्युत्पत्ती ।
जैसा भावो ज्याचे चित्तीं । तैशी प्राप्ती तो पावे ॥४८॥
उद्धवा ! हें एक पूर्णपणे लक्षात ठेव की, येथें अधिक यातायातीचे काही कारणच नाही. ज्याच्या चित्तांत जसा भाव असतो, तसेच फल तो पावतो ४८.

विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते ।
मामनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते ॥ २७ ॥
[श्लोक २७] जो विषयांचे चिंतन करतो, त्याचे चित्त विषयात गुंतते आणि जो नेहमी माझे स्मरण करतो, त्याचे चित्त माझ्या ठायी तल्लीन होऊन जाते. (२७)

जो करी विषयांचें ध्यान । तो होय विषयीं निमग्न ।
जो करी सदा माझें चिंतन । तो चैतन्यघन मीचि होय ॥४९॥
जो विषयाचाच ध्यास करीत बसतो, तो विषयामध्येच मग्न होतो. जो सदासर्वदा माझेच चिंतन करतो, तो ज्ञानस्वरूप असा मीच होऊन राहतो ४९.

स्त्री गेली असतां माहेरीं । ध्यातांचि प्रकटे जिव्हारीं ।
हावभावकटाक्षेंवरी । सकाम करी पुरुषातें ॥३५०॥
पत्नी माहेरी गेली असता तिचे ध्यान केल्याबरोबर ती मनामध्ये मूर्तिमंत येऊन उभी राहते. इतकेच नव्हे तर हावभाव व नेत्रकटाक्ष ह्यांनी ती त्या पुरुषाला सकाम करून सोडते ३५०.

नसते स्त्रियेचें ध्यान करितां । प्रकट दिसे यथार्थता ।
मी स्वतः सिद्ध हृदयीं असतां । सहजें मद्‌रूपता चिंतितां मज ॥५१॥
जवळ नसलेल्या स्त्रीचे ध्यान केले असता ती जशाची तशी पुढे प्रगट झालेली दिसते, आणि मी तर स्वतःसिद्ध हृदयांत राहिलो आहे, तेव्हा माझें चिंतन केले असतां सहज मद्रूपता प्राप्त होईल ५१.

आवडीं माझें जें चिंतन । चित्त चिंता चिंतितेपण ।
विरोनि होय चैतन्यघन । मद्‌रूपपण या नांव ॥५२॥
आवडीने जें माझें घडणारें चिंतन, चित्त, चिंता आणि चिंतितेपणा, ती नाहीशी होऊन तो पुरुष स्वतःच ज्ञानरूप होतो. ह्याचेच नांव मद्रूपता ५२.

माझे प्राप्तीलागीं जाण । हेंचि गा मुख्य लक्षण ।
माझें ध्यान माझें भजन । मद्‌रूपपण तेणें होय ॥५३॥
अरे ! माझ्या प्राप्तीला मुख्य साधन हेच आहे. माझे ध्यान आणि माझे भजन केले असता त्याच्या योगाने मत्स्वरूपता प्राप्त होते ५३.

मजवेगळें जें जें ध्यान । तेंचि जीवासी दृढबंधन ।
यालागीं सांडूनि विषयांचें ध्यान । माझें चिंतन करावें ॥५४॥
माझ्याशिवाय इतर जें जें ध्यान करावें, तेच जीवाला दृढ बंधन होते. याकरितां विषयाचे ध्यान सोडून माझेच चिंतन करीत असावें ५४.

तस्मादसदभिध्यानं यथा स्वप्नमनोरथम् ।
हित्वा मयि समाधत्स्व मनो मद्‍भावभावितम् ॥ २८ ॥
[श्लोक २८] नाशवंत विषयांचे चिंतन, स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथांप्रमाणे खोटे आहे म्हणून त्यांचे चिंतन करण्याचे सोडून, माझ्या भक्तीत रंगलेले मन माझ्या ठिकाणी लावावे. (२८)

साचाच्यापरी दिसत । परिणामीं नाशवंत ।
त्यासीच बोलिजे असत । जें मिथ्याभूत आभासू ॥५५॥
जें दिसण्यांत अगदी खऱ्यासारखे दिसते, परंतु परिणामी नाश पावणारे असते, त्याला ‘असत्’ असे म्हणतात. जें भ्रमरूप असून केवळ भासमात्र असते ५५,

तेवीं इहामुत्र कमनीये । जें अविचारितरमणीये ।
त्यालागीं प्राणी पाहें । नाना उपायें शिणताती ॥५६॥
त्याप्रमाणेच जे इहपरलोकी सौंदर्याने मनास लोभांत गुंतवितें आणि अविचाराच्या बळाने मनास भुरळ घालतें ; त्याकरितांच हे प्राणी पाहा ! अनेक प्रकारे यातायात करून कष्टी होत आहेत ! ५६.

कष्टीं सेवूनि साधन । साधिलें स्वर्गभोगस्थान ।
तेंही नश्वर गा जाण । जेवीं कां स्वप्नमनोरथ ॥५७॥
मोठ्या कष्टाने साधन करून स्वर्गभोगाचे स्थान मिळविले, तरी ज्याप्रमाणे स्वप्नातील मनोरथ, त्याप्रमाणे तेंही नश्वरच असते ५७.

यालागीं विषयाचें ध्यान । सांडूनि करावें माझें भजन ।
माझिया भावना मन । सावधान राखावें ॥५८॥
ह्याकरितां विषयांचे ध्यान करावयाचे सोडून माझेच भजन करावे आणि माझीच भावना ठेवण्याविषयी मनाला जागृत ठेवावें ५८.

सावधान करितां भजन । एकाग्र धरितां माझें ध्यान ।
तेथ अत्यंत जें बाधकपण । तें त्यागलक्षण हरि बोले ॥५९॥
सावधानचित्ताने माझें भजन करीत असतां व एकाग्र चित्ताने माझे ध्यान करीत असता, त्यांत जो अत्यंत बाधकपणा येतो, त्याचा त्याग कसा करावा हें श्रीकृष्ण सांगतो ५९.

स्त्रीणां स्त्रीसङ्‌गिनां सङ्गं त्यक्त्वा दूरत आत्मवान् ।
क्षेमे विविक्त आसीनश्चिन्तयेन्मामतन्द्रितः ॥ २९ ॥
[श्लोक २९] स्त्रियांच्या किंवा स्त्रीलंपटांच्या संगतीमुळे जितके दुःख किंवा संसारबंधन उत्पन्न होते, तसे आणखी कोणाच्याही संगतीने उत्पन्न होत नाही (२९)

जो मजलागीं आर्तभूत । तेणें सांडावी स्त्रीसंगाची मात ।
मी चिंतावा भगवंत । तेणें एकांत सेवावा ॥३६०॥
जो माझ्या प्राप्तीकरितां अत्यंत आर्त झाला असेल, त्याने स्त्रीसंगाची गोष्टच सोडून द्यावी. त्याने माझे भगवंताचे चिंतन करावें व एकांतांत राहावे ३६०.

स्त्रियेच्याही परीस वोखटी । संगति स्त्रैणांची अतिखोटी ।
त्यांसी न व्हावी भेटीगोठी । न पहावे दिठीं दुरोनी ॥६१॥
स्त्रीच्या संगतीपेक्षाही घातक अशी स्त्रीलंपट पुरुषांची संगति अत्यंत हानिकारक होय. त्यांची भेट घेऊं नये, त्यांच्याशी भाषण करूं नये, किंवा लांबूनसुद्धा त्यांना डोळ्यांनी पाहूं नये ६१.

साधकें कायवाचाचित्तीं । सांडूनि दोहींची संगती ।
परतोनि स्फुरेना स्फूर्ती । ऐशी दृढ स्थिती करावी ॥६२॥
जो साधक असेल त्याने कायावाचामनेकरून स्त्री व स्त्रैण ह्या दोघांची संगत सोडून द्यावी आणि पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहावयाची इच्छा उत्पन होऊ नये इतकी अंत:करणाची दृढ स्थिरता करावी ६२.

केवळ एकांत जें विजन । प्रशस्त आणि पवित्रस्थान ।
तेथें घालोनियां आसन । माझें चिंतन करावें ॥६३॥
नतर अगदी निवांत, जेथे कोणीही मनुष्य नाही, असे प्रशस्त आणि पवित्र ठिकाण असेल तेथे आपलें आसन घालून माझे चिंतन करावें ६३.

करोनि आळसाची बोळवण । धरूनि निजवृत्ति सावधान ।
त्यावरी करावें माझें ध्यान । एकाग्र मन राखूनी ॥६४॥
आळस सोडून देऊन आपली वृत्ति सावध ठेवावी, आणि नंतर एकाग्र मन ठेवून माझे ध्यान करावें ६४.

माझें विध्वंसोनि ध्यान । माझे प्राप्तीआड विघ्न ।
साधकांसी अतिबंधन । स्त्री आणि स्त्रैणसंगती ॥६५॥
परंतु माझ्या साधकांना स्त्री आणि स्त्रीलंपट पुरुष ही दोन मोठी बंधने आहेत; तीच माझे ध्यान विध्वंसून विघ्नरूपाने माझ्या प्राप्तीच्या आड येतात ६५.

न तथास्य भवेत् क्लेशो बन्धश्चान्यप्रसङ्गतः ।
योषित्सङ्गाद् यथा पुंसो यथा तत्सङ्गिसङ्गतः ॥ ३० ॥
[श्लोक ३०] म्हणून साधकाने इंद्रिये ताब्यात ठेवून स्त्रिया आणि स्त्रीलंपट यांची संगत पूर्णपणे सोडून एकांत, पवित्र ठिकाणी बसून, आळस सोडून माझे चिंतन करावे. (३०)

अविद्येच्या अनंतकोटी । जाण पां स्त्रीसंगाचे पोटीं ।
अधर्माचा भडका उठी । योषिता दृष्टीं देखतां ॥६६॥
अविद्येचे अनंत कोटि समुदाय स्त्रीसंगामध्ये भरलेले असतात. स्त्री नुसत्या डोळ्यांनी पाहिली तरीसुद्धा अधर्माचा भडका उठतो ६६.

जें महामोहाचें मेळवण । जें खवळल्या कामाचे इंधन ।
जें जीवाचें परम मोहन । अधःपतन ते योषिता ॥६७॥
जी महामोहांची रास, जें पेटलेल्या कामाग्नीचें सर्पण, जी जीवाला पडलेली मोठी भुरळ, आणि जें अधःपतन, तीच स्त्री होय ६७.

जे मदनाचे तिखट बाण । जें मायेचें चक्र जाण ।
जें अंधतमाचें पूर्ण । भरितें तें जाण योषिता ॥६८॥
मदनाचे जे तीक्ष्ण बाण, मायेचें जें यंत्र आणि जें अंधतम नरकाचे पूर्ण भरलेले कुंड, तेच स्त्री होय, हे लक्षात ठेव ६८.

हो कां जीचिये संगतीं । आंधळी होय ज्ञानशक्ती ।
जे वाढवी नाना आसक्ती । जिचेनि विस्मृती निजस्वार्था ॥६९॥
अहो ! जिच्या संगतीने ज्ञानशक्तीसुद्धा आंधळी होऊन जाते, जी अनेक प्रकारच्या आसक्ति वाढविते, आणि जिच्या योगाने स्वतांच्या स्वार्थाचीही विस्मृति पडते ६९;

जिचेनि संसार बहुवस । जिचेनि असोस गर्भवास ।
जिचेनि विषयविलास । जे वज्रपाश जीवाचा ॥३७०॥
जिच्यासाठी नानाप्रकारचा संसार करावा लागतो, जिच्यासाठी असह्य गर्भवास सोसावा लागतो, जीवाचा केवळ वज्रपाश असे जे विषयविलास ते जिच्यासाठी भोगावे लागतात ३७०.

जे अखंड सोशी दुःखशोक । जे सदा सोशी नरकवोक ।
ते माता अनाप्त करूनि देख । स्त्री आवश्यक आप्त होय ॥७१॥
जी निरंतर दुःख व शोक सहन करून सदोदित नरकओक सहन करते अशी आपली प्रत्यक्ष आई शत्रूप्रमाणे लेखून ती बायको मात्र लाडकी आप्त होऊन बसते ! ७१.

जे मातृस्नेहातें तोडवी । जे बंधुस्नेहातें बिघडवी ।
जे सदा गोंवी हावभावीं । अधर्म‍अटवीं जे पाडी ॥७२॥
जी मातृप्रेमांत बिघाड आणते, जी बंधुप्रेमाला बिघडविते, जी निरंतर आपल्या नखांत गुंतवून ठेवते, जी अधर्मरूप अरण्यांत नेऊन सोडते ७२.

जिचे कटाक्ष अतितिख । जिव्हारीं रुतले देख ।
जे जीवाची व्यामोहक । जिचें चढलें विख उतरेना ॥७३॥
जिचे नेत्रकटाक्ष तर अत्यंत तीक्ष्ण; पुरुषाच्या अंतःकरणांत रुतले की जे जिवाला भुरळच घालतात, आणि त्यांच्या द्वारे जिचे चढलेले विष कधी उतरत म्हणून नाही ७३;

एवढी बाधा जाण स्त्रीसंगती । जो वांछूं पाहे माझी प्राप्ती ।
तेणें सांडावी स्त्रियेची आसक्ती । हृदयीं प्रीती न राखावी ॥७४॥
एवढा त्रास स्त्रीच्या संगतीने होतो. ह्याकरितां जो माझी प्राप्ति इच्छीत असेल, त्याने स्त्रीची आसक्ति सोडून द्यावी. हृदयामध्ये तिचा लोभ ठेवूंच नये ७४.

स्त्री आठवतांचि चित्ता । उच्छेदी ज्ञानध्यान अवस्था ।
एवढी स्त्रीसंगबाधकता । त्याहूनि अधिकता स्त्रैणसंगें ॥७५॥
मनामध्यें स्त्री आठवतांच ती ज्ञान-ध्यानाच्या स्थितीचा विध्वंस करते. एवढी स्त्रियांच्या संगतीची बाधा आहे, आणि स्त्रीलंपट पुरुषाच्या संगतीची तर त्याहूनही अधिक होते ७५.

स्त्रीसंगाच्या मोहमदा । सुटका आहे यदाकदा ।
परी स्त्रैणसंगतीची बाधा । ते आपदा अनिवार ॥७६॥
स्त्रीच्या संगतीने प्राप्त होणाऱ्या मोहमदापासून कदाचित पुरुषाची सुटका होईल. परंतु स्त्रीलंपट पुरुषाच्या संगतीची जी बाधा असते, ती केवळ अनिवारच होय ७६.

चूडाला स्त्रियेचें संगतीं । तरला शिखिध्वज भूपती ।
नातरी मदालसेचे संगतीं । तरला नृपती कुवलयाश्वु ॥७७॥
चूडाला स्त्रीच्या संगतीने शिखिध्वज राजा तरून गेला; किंवा मदालसेच्या संगतीने कुवलयाश्व राजा तरून गेला. ७७.

हो कां लीलेनें करोनि भक्ती । प्रसन्न केली सरस्वती ।
तिचा उद्धरिला निजपती । हें बोलिलें ग्रंथीं वसिष्ठें ॥७८॥
लीला नामक स्त्रीनें भक्ति करून सरस्वतीला प्रसन्न केले, आणि त्यामुळे तिच्या पतीचा उद्धार झाला, हें वसिष्ठांनी आपल्या ग्रंथांत सांगितलेच आहे ७८.

यापरी स्त्रीसंगतीं । उद्धरले ऐकिजेती ।
परी स्त्रैणाचे संगतीं । उद्धारा गती असेना ॥७९॥
अशा प्रकारे स्त्रियांच्या संगतीने पुरुष उद्धरल्याचे ऐकतो. परंतु स्त्रीलंपट पुरुषाच्या संगतींत उद्धार होण्याला मार्गच नाही ७९.

जो कां स्त्रियेचा अंकिला । जो स्त्रियेसी जीवें विकिला ।
जो स्त्रियेचा पोसणा झाला । तिचे बोलामाजीं वर्ते ॥३८०॥
जो स्त्रीचा अंकित होऊन राहतो, जो स्त्रियेला प्राणासह विकला जातो, जो स्त्रीचा गुलाम बनतो आणि तिच्याच बोलण्याप्रमाणे वागतो ८०.

जैशी कुलदेवता खेचरी । तैसें स्त्रियेसी पूज्य करी ।
मग तिचेचि सेवेवरी । नाना उपचारीं नाचत ॥८१॥
ज्याप्रमाणे आकाशांत संचार करणारी एखादी कुलदेवता असते त्याप्रमाणेच जो स्त्रीला पूज्य मानतो, आणि जो तिच्याच सेवेसाठी नाना प्रकारचे उपचार करण्याकरितां नाचत असतो ८१;

पाळिल्या श्वानाचे परिपाटीं । लाविल्या लागे सुहृदापाठीं ।
त्या हडकिलिया शेवटीं । कामथाळोरां पुसाटी घालूनि पडे ॥८२॥
तिने एखाद्या आप्ताचा छळ करण्याची प्रेरणा केली असतां जो बाळगलेल्या कुत्र्याप्रमाणे त्याच्यावर भुंकत सुटतो; आणि तिने हांकून लावलें म्हणजे जो वृषणावर (मागील पायांत) शेपूट घालून पडतो ! ८२.

धड गोड उत्तम पदार्था । आपण भोगीना सर्वथा ।
तें देऊन स्त्रियेच्या हाता । आपुली सत्ता निवर्तवी ॥८३॥
चांगले मिष्ट व उत्तम पदार्थ आपण मुळीच खात नाही, तर ते स्त्रियेच्या हातांत देऊन तो आपली सत्ता नाहीशी करतो ८३.

इसी जैं विरुद्ध वाटेल । तैं हें ब्रह्मांड पालथेल ।
इचा उल्लंघितां बोल । क्षीराब्धि सुकेल सुखाचा ॥८४॥
जर आपले एखादें कृत्य हिला मनाविरुद्ध वाटेल, तर जणू काय ब्रह्मांडच उलथून पडेल ! हिचा शब्द व्यर्थ घालविला तर जणू काय सुखाचा क्षीरसागरच सुकून जाईल ! ८४.

नाहीं देवोकुळदेवां पूजणें । मायबापांतें वंचणें ।
शेखीं गुरूतेंही ठकणें । परी सर्वस्व देणें स्त्रियेसी ॥८५॥
देवीची व कुलदेवतेची पूजा करावयाची नाही, आईबापांना फसवावयाचे, शेवटीं गुरूलासुद्धा ठकवावयाचे, पण आपले सर्वस्व स्त्रीला मात्र द्यावयाचे ८५;

एवं माकड जैसें गारुड्याचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचे ।
ऐशिया स्त्रैणाचे संगतीचें । तेथें सुख कैंचें साधका ॥८६॥
तात्पर्य, ज्याप्रमाणे गारोब्याचे माकड असते, त्याप्रमाणे बायकोच्या नादाने नाचत असतो, अशा स्त्रीलंपट पुरुषाची संगत लागली, तर साधकाला सुख तें कशाचे होणार ? ८६.

ज्याच्या ऐकतां स्त्रियेच्या गोठी । सज्ञानासही काम उठी ।
जो लावी योषितापाठीं । उठाउठी सकामत्वें ॥८७॥
ज्याच्या तोंडून स्त्रीच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या असतांही ज्ञात्याच्या मनांत कामवासना उत्पन्न होते, आणि जो तत्काळ कामवासना उत्पन्न करून स्त्रियांच्या पाठीस लावतो ८७,

ऐशिया स्त्रैणाचे संगतीं । कैंची साधकां सुखप्राप्ती ।
तो घालील अधोगतीं । अंधतमाप्रती नेईल ॥८८॥
अशा स्त्रैणाच्या संगतीने साधकाला सुखाची प्राप्ति ती कसली होणार ? तो अधोगतीला नेऊन नरकांत मात्र टाकील ! ८८.

यालागीं स्त्रैणाची कथा । कानीं नायकावी वार्ता ।
त्याचा वाराही लागतां । तेथूनि सर्वथा पळावें ॥८९॥
म्हणून स्त्रीलंपट पुरुषाची कथा किंवा वार्तासुद्धा कानांनी ऐकू नये. त्याचा वारा लागला तरी तेथून सर्वस्वी पळून जावे ८९.

त्याची न घ्यावी भेटी । त्यासी न करावी गोठी ।
तो न पहावा दिठीं । न लागावें पाठीं स्त्रैणाचिये ॥३९०॥
त्याची भेट घेऊ नये, त्याच्याबरोबर भाषण करूं नये, डोळ्यांनी त्याला पाहूं नये, किंवा त्या स्त्रैण मनुष्याच्या पाठीसही लागू नये ३९०.

स्त्रैण पुढें वाटे जाय । त्याच्या मार्गीं मागू उरला राहे ।
तेही आपण चुकवावी भोये । येथवरी पाहें त्यागावा ॥९१॥
स्त्रैण मनुष्य पुढे वाटेने जात असेल, आणि त्याच्या त्या मार्गावर त्याच्या पावलाच्या खुणा उमटलेल्या असतील, तर ती वाटही आपण सोडून द्यावी. इतका त्याचा त्याग करावा ९१.

स्त्री आणि स्त्रैणाचे संगतीं । जैसी होय दुःख प्राप्ती ।
तैसे दुःख त्रिजगती-। माजीं निश्चितीं असेना ॥९२॥
स्त्री आणि स्त्रैण ह्यांच्या संगतीने जितकें दुःख प्राप्त होते, तितकें दुःख खरोखर त्रिभुवनांतसुद्धा दिसत नाहीं ९२.

अत्यंत स्त्रीकामी वशता । ती नांव मुख्य स्त्रैणता ।
केवळ स्त्रियेची अधीनता । तो बाधू परमार्था अतिनिंद्यत्वें ॥९३॥
स्त्रीच्या इच्छेमध्ये अत्यंत वश होऊन राहाणे त्याचंच नांव मुख्य श्रीलंपटपणा. केवळ स्त्रियेच्या आधीन असणे हे अत्यंत निंद्य असल्यामुळे परमार्थाला फारच बाधक होते ९३.

आपुले हृदयींची कामासक्ती । तेचि स्त्रीसंगाची दृढ प्राप्ती ।
तेथ उपजलिया विरक्ती । मग स्त्रियेची प्राप्ती कोण पुसे ॥९४॥
आपल्या हृदयांतील जी कामासक्ति, तीच स्त्रीसंगाच्या प्राप्तीला मुख्य कारणीभूत आहे. त्यांतच विरक्ति उत्पन्न झाली म्हणजे मग स्त्रीच्या प्राप्तीला कोण विचारतो ? ९४.

ऐसें हृदयींचे कणवे । उद्धवासी सांगीतले देवें ।
हें ऐकोनियां उद्धवें । विचारु जीवें आदरिला ॥९५॥
असें अंत:करणांतील कळकळीने देवांनी उद्ध्वाला सांगितले. ते ऐकून उद्धृवानेही अंत:करणांत विचार केला ९५.

अनिवार उपजे विरक्ती । जेणें बाधीना विषयासक्ती ।
ऐशी जे ध्यानस्थिती । तेचि देवाप्रती पुसत ॥९६॥
जेणेकरून अत्यंत विरक्ति उत्पन्न होते, विषयासक्तीची बाधा होत नाही, असें जें ध्यान, तेंच त्याने देवाला विचारले ९६.

जें लागलिया ध्यान । न दिसे स्त्रीपुरुषभान ।
जीवीं उपजे चित्समाधान । तैसें विधान पुसत ॥९७॥
जें ध्यान लागले असता स्त्रीपुरुष हे भानच दिसेनासे होते, आणि जीवामध्ये ज्ञानजन्य संतोष उत्पन्न होतो, त्याचा प्रकार त्याने विचारला ९७.

श्रीउद्धव उवाच –
यथा त्वामरविन्दाक्ष यादृशं वा यदात्मकम् ।
ध्यायेन्मुमुक्षुरेतन्मे ध्यानं त्वं वक्तुमर्हसि ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] उद्धवाने विचारले – हे कमलनयना ! मुमुक्षूने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे, हे आपण मला सांगावे. (३१)

उद्धव म्हणे कमळनयना । मुमुक्षु करिती तुझिया ध्याना ।
त्या ध्यानाची ध्यानलक्षणा । जगज्जीवना मज सांगें ॥९८॥
उद्धव म्हणाला, ” हे कमलनयना ! हे जगज्जीवना ! मुमुक्षु जें तुझें ध्यान करतात, त्या ध्यानाचे लक्षण मला सांग ९८.

तें सगुण कीं निर्गुण । कोण रूप कैसा वर्ण ।
तें अवघेंही संपूर्ण । कृपा करून मज सांगा ॥९९॥
तें ध्यान सगुण असते की निर्गुण असते ? त्याचें स्वरूप कसे असते ? वर्ण कोणता असतो ? सारेंच यथासांग रीतीने कृपा करून मला सांगा ९९.

जेथ रिघतां नुबगे मन । ज्याचें अत्यंत गोडपण ।
जें तुजही आवडतें जाण । तें मज ध्यान सांगावें ॥४००॥
ज्या ठिकाणी निमग्न झाले असतां मन तेथून निघतच नाही, त्याचे गोडपण इतके असते की ते तुलाही आवडते, असें ध्यान मला सांगावें” ४००.

ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । सांगावया उत्तम ध्यान ।
पूर्वपीठिका आसन । प्राणायामलक्षण सांगत ॥१॥
हा उद्धवाचा प्रश्न ऐकून उत्तम ध्यान सांगण्याकरिता प्रथम आसन व प्राणायाम ह्यांचेच लक्षण श्रीकृष्ण सांगतात. ४०१.

श्रीभगवानुवाच –
सम आसन आसीनः समकायो यथासुखम् ।
हस्तावुत्सङ्ग आधाय स्वनासाग्रकृतेक्षणः ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी. (३२)

ऐक आसनाचें लक्षण । पाषाणीं व्याधि संभवे जाण ।
केवळ धरणीचें आसन । तें अति कठिण दुःखरूप ॥२॥
आता आसनाचे लक्षण ऐक. पाषाणाचे आसन केल्यास व्याधि उत्पन्न होण्याचा संभव असतो हे लक्षात ठेव. केवळ जमिनीवरच बसलें तर ती अतिशय कठीण असल्यामुळे दुःखदायक होते २.

दारुकासनें निर्दय मन । कोरड्या काष्ठाऐसें होय जाण ।
तृणासनीं विकल्प गहन । जैसें कां तृण विचित्रांकुरें ॥३॥
लाकडाचे आसन केले तर मनही कोरड्या लाकडासारखें निर्दय बनते. गवताचे आसन केले तर, गवताला जसे चित्रविचित्र हजारों अंकुर फुटलेले असतात त्याप्रमाणेच मनालाही नानाप्रकारचे विकल्प उत्पन्न होतात ३.

वृक्षपल्लवांवरी आसन । तेणें चित्त सदा दोलायमान ।
जारण मारण स्तंभन । तेथ काळें आसन साधकां ॥४॥
झाडांच्या पानांचे आसन केलें तर चित्त नेहमीं झोंकेच खात राहाते. जारण, मारण किंवा स्तंभन करणे असेल तर साधकाने का आसन घालावें ४.

ज्ञानोपलब्धि मृगाजिनीं । मोक्षसिद्धि व्याघ्रजिनीं ।
मोक्षादि सर्व सिद्धींची श्रेणी । श्वेतकंबलासनीं साधकां ॥५॥
कृष्णाजिनाचे ठिकाणी ज्ञानाची प्राप्ति होते. व्याघ्रचर्माचे आसन केले असतां मोक्षसिद्धि प्राप्त होते. पांढऱ्या कांबळीचे आसन केले असतां मोक्ष आदिकरून नानाप्रकारच्या अनेक सिद्धि साधकांना प्राप्त होतात ५.

भूमिका शुद्ध आणि समान । पाहोनि निरुपद्रव स्थान ।
तेथ रचावें आसन । सुलक्षण अनुक्रमें ॥६॥
जमीन निर्मळ आणि सपाट असून कोणाचा उपद्रव नाहीं असें स्थान पाहावे, आणि तेथे पुढे सांगितलेल्या अनुक्रमाने उत्तम लक्षणांनी युक्त असें आसन तयार करावें ६.

कुश वस्त्र कंबलाजिन । इंहीं युक्त घालावें आसन ।
उंच नीच न व्हावें जाण । समसमान समभागें ॥७॥
दर्भ, वस्त्र, कांबळी, कातडे, ह्यांनी तयार केलेलें आसन घालावें. ते उंच किंवा सखल होऊ नये. चहूंकडून सारखे असावें ७.

उंच झालिया आसन डोले । नीचीं भूमिदोष आदळे ।
यालागीं समत्वें प्रांजळें । रचावें कोवळें मृदु आसन ॥८॥
आसन उंच झाले तर ते डुलू लागते, आणि सखल झाले तर भूमिदोष लागतात. याकरितां आसन घालावयाचें तें सपाट व सारखे असावे. ते कोमल आणि मऊ असावें ८.

तेथ शुद्ध मुद्रा वज्रासन । कां अंबुजासनही जाण ।
अथवा घालावें सहजासन । जे आसनीं मन सुखावे ॥९॥
तेथे शुद्ध मुद्रा लावून वज्रासन किंवा कमलासन घालावें. किंवा ज्या आसनामध्ये मनाला आनंद वाटेल असें सहजासन घालावें ९.

तेणें मेरुदंड अवक्र शुद्ध । समकाया राखोनि प्रसिद्ध ।
मूळाधारादि तीनी बंध । अतिसुबद्ध पैं द्यावे ॥४१०॥
आणि मग पाठीचा कणा बांक येऊ न देतां चांगला ताठ ठेवावा, शरीर अगदी सारखे ठेवावे आणि मूलाधारादि सुप्रसिद्ध जे तीन बंध ते नीट रीतीने साधावेत ४१०.

ऐसें आसन लागतां । आसनावरी स्वभावतां ।
करांबुजाची विकासता । उत्संगता शोभती ॥११॥
असें आसन लावले असता त्या आसनावर आपोआप करकमलाचे दोन्ही पसरलेले पंजे दोन्ही मांड्यांवर उताणे ठेवले म्हणजे शोभिवंत दिसतात ११.

नाकाचें अग्न सांडूनि दूरी । दृष्टि ठेवावी नासिकाग्रीं ।
ते ठायी बैसे अग्निचक्रीं । योगगंभीरीं योग्यता ॥१२॥
नंतर नाकाचा शेंडा दूर सोडून नाकाच्या फक्त अग्रभागावरच दृष्टि धरावी. तेथेच अग्निचक्र असून त्यांत योगाचे श्रेष्ठ साधन असते १२.

ते अभ्यासीं निजनिश्चळें । योगाभ्यासे योगबळें ।
अर्धोन्मीलित होती डोळे । धारणामेळें ते काळीं ॥१३॥
अशा रीतीने संथपणाने अभ्यास चालविला म्हणजे योगाभ्यासाने आणि योगसामर्थ्याने त्या वेळी ध्यानानंतर होणाऱ्या चित्तस्थैर्याच्या योगाने डोळे अर्धोन्मीलित होतात १३.

भेदापासाव उठाउठी । उपरमतां अभेदीं दृष्टी ।
तिची नासाग्रीं दिसे मिठी । इतर दृष्टी न लक्षितां ॥१४॥
भेदामधून तत्काळ अभेदामध्ये दृष्टि स्थिर झाली असतां इतर पदार्थ न पाहाता ती नासाग्री जाऊन दृढ बसते १४.

आसनजयो त्रिबंधप्राप्ती । दृष्टीची उपरमस्थिती ।
हे अकस्मात कोणे रीतीं । साधकाहातीं आतुडेल ॥१५॥
परंतु आसनाचा जय, तिन्ही बंधांची प्राप्ति आणि दृष्टीचे स्थैर्य ही साधकाला कोणत्या रीतीनें प्राप्त होतील ? १५.

ऐसी आशंका धरिसी चित्तीं । त्याही अभ्यासाची स्थिती ।
उद्धवा मी तुजप्रती । यथानिगुती सांगेन ॥१६॥
उद्धवा ! अशी शंका हूं आपल्या मनांत आणशील, तर त्या अभ्यासाचा प्रकारही तुला मी यथार्थ रीतीनें सांगतों १६.

प्राणस्य शोधयेन्मार्गं पूरकुम्भकरेचकैः ।
विपर्ययेणापि शनैरभ्यसेन्निर्जितेन्द्रियः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] यानंतर पूरक, कुंभक आणि रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडीशोधन करावे हे एकदा डाव्या नाकपुडीने व एकदा उजव्या नाकपुडीनेही करता येईल हा अभ्यास हळूहळू वाढवावा त्याचबरोबर इंद्रियांवर ताबा ठेवावा. (३३)

अभ्यासाचें लक्षण । प्रथम प्राणामार्गशोधन ।
पूरक कुंभक रेचक जाण । प्राणापानशोधक ॥१७॥
अभ्यासाचे लक्षण म्हटले म्हणजे प्रथम प्राणाचा मार्ग शुद्ध करावयाचा. पूरक, कुंभक आणि रेचक हेच प्राण आणि अपान वायु शुद्ध करणारे आहेत १७.

जिव्हा उपस्थ उपमर्दवे । ऐसा इंद्रियनेम जैं संभवे ।
त्यासीच हा प्राणजयो फावे । येरां नव्हे श्रमतांही ॥१८॥
जिव्हा आणि लिंग यांच्या स्वैरपणाला आपण पूर्णपणे आळा घाल शकू इतका इंद्रियनिग्रह ज्याच्याकडून होईल, त्यालाच हा प्राणायाम साधेल. भलत्याने कितीही कष्ट केले असताही तो साधावयाचा नाही १८.

प्राणशोधन तें तूं ऐक । पूरक कुंभक रेचक ।
सवेंचि रेचक पूरक कुंभक । हा उभय देख अभ्यासू ॥१९॥
प्राणाचे शुद्धीकरण (प्राणायाम) कसे करतात तें तूं ऐक. पूरक, कुंभक व रेचक करून लगेच रेचक, पूरक व कुंभक करणे अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे १९.

इडेनें करावा प्राण पूर्ण । तो कुंभिनीनें राखावा जाण ।
मग तिनेंचि करावा रेचन । हें एक लक्षण अभ्यासीं ॥४२०॥
इडेनें (डाव्या नाकपुडीनें ) प्रथमतः वायु आंत ओढून घ्यावा व तो तसाच राखून ठेवून नंतर तो तिनेच पुन्हा परत सोडावा असेंही एक अभ्यासांतील लक्षण आहे २०.

कां पिंगलेनें करावा पूर्ण । तो तिनेंचि करावा रेचन ।
हें एक अपरलक्षण । विचक्षण बोलती ॥२१॥
किंवा उजव्या नाकपुडीने वायु आंत घ्यावा, आणि तिनेच तो परत सोडावा, असें दुसरेही एक प्राणायामाच्या अभ्यासाचे लक्षण ज्ञाते लोक सांगतात २१.

सर्वसंमत योगलक्षण । इडेनें प्राण करावा पूर्ण ।
तो कुंभकें राखावा स्तंभून । करावें रेचन पिंगलया ॥२२॥
परंतु सर्वांस मान्य असें योगाचे लक्षण म्हटले म्हणजे डाव्या नाकपुडीनें वायु आंत ओढून घ्यावा, तो कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो उजव्या नाकपुडीने सोडावा २२.

हो कां पिंगलेनें पुरावा प्राण । तोही कुंभकें राखावा कुंभून ।
मग इडेनें सांडावा रेचून । हें विपरीत लक्षण अभ्यासीं ॥२३॥
किंवा उजव्या नाकपुडीनें वायु आंत घ्यावा, तोही कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो डाव्या नाकपुडीतून सोडावा. पण हे योगाभ्यासाला अगदी विरुद्ध आहे २३.

तेथ न करावी फाडाफोडी । न मांडावी ताडातोडी ।
सांडोनियां लवडसवडी । अभ्यासपरवडी शनैःशनैः ॥२४॥
ह्याकरिता त्यामध्ये बदलाबदल करूं नये, आणि क्रमांत बिघडाबिघड करू नये. कोणताही उतावळेपणा न करितां स्वस्थचित्ताने हळूहळू अभ्यास करावा २४.

येथ मांडलिया तांतडी । तैं प्राण पडेल अनाडीं ।
मग हे थडी ना ते थडी । ऐशी परवडी साधकां ॥२५॥
ह्यांत जर उतावळेपणा केला, तर प्राण मोठ्या संकटांत पडेल, मग हीही तड नाही, आणि तीही तड नाही, अशी साधकांची अवस्था होईल २५.

जेवीं मुंगी वळंघे पर्वता । ते चढे परी पडेना सर्वथा ।
तेथ जात्यश्व चालों जातां । न चढे तत्त्वतां अतिकष्टी ॥२६॥
ज्याप्रमाणे मुंगी पर्वत चढू लागली, तर ती चढत जाते, खाली पडत नाही आणि तोच जर जातिवंत घोडा चालू लागला, तर खरोखर मोठ्या कष्टानेही तो चढू शकत नाही २६,

तैसें ये योगाभ्यासीं जाण । न चले जाणीव शहाणपण ।
जाणिवा येथ होय पतन । सर्वथा गमन घडेना ॥२७॥
त्याप्रमाणे ह्या योगाभ्यासांत ज्ञान व शहाणपण कांहीं चालत नाही. शहाणपणाची घमेंड बाळगणाराचा अधःपातच होतो. त्याला त्या मार्गात पुढे जाणे कधीच साधत नाही २७.

ते मुंगीच्या परी योगपंथा । जो शनैःशनैः अभ्यासतां ।
प्रणवाच्या चढे माथां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२८॥
उद्धवा ! त्या मुंगीसारखाच जो हळूहळू योगमार्गाने जाण्याचा अभ्यास करतो, तोच खरोखर ओंकाराच्या मस्तकावर चढतो, हे लक्षात ठेव २८.

दृढ अभ्यास आल्या हाता । जैशी साधकाची मनोगतता ।
तैसा पवन चाले तत्त्वतां । जेवीं रणाआंतौता महाशूर ॥२९॥
अभ्यास पक्का झाला असता, समरांगणांत जस मोठा शूर पुरुष अनिर्बंधपणे चालतो, त्याप्रमाणे साधकाच्या मनोरथाप्रमाणे प्राणवायु चाल असतो २९.

अभ्यासाच्या गडाडीं । प्राण खवळल्या कडाडी ।
तो प्राणापानाचे भेद मोडी । पदर फोडी चक्राचे ॥४३०॥
अभ्यासाच्या धडाक्याने प्राण भयंकर खवळून गेला असता तो प्राण आणि अपान ह्यांचे भेदच मोडून टाकतो, आणि चक्रांतील पदर दूर करतो ४३०.

येथ द्विविध माझें भजन । एक तें योगयुक्त निर्गुण ।
एक तें प्रणवाभ्यासें भक्त सगुण । तेंही लक्षण अवधारीं ॥३१॥
यांत माझें भजन दोन प्रकारचे असते. एक असतें तें योगयुक्त असून निर्गुणाचे असते आणि दुसरें असतें तें ओंकाराच्या अभ्यासाने सगुण भक्त करीत असतात. त्याचेही लक्षण ऐक ३१.

ऐक प्राणायामाचे भेद । सगर्भ अगर्भ द्विविध ।
सगर्म आगमोक्तें शुद्ध । सगुण संबंध ध्यानादि ॥३२॥
आतां प्राणायामाचे भेद ऐक. ह्यांत सगर्भ प्राणायाम आणि अगर्भ प्राणायाम असे दोन प्रकार आहेत. सगर्भ प्राणायाम शास्त्रोक्त मार्गाने शुद्ध आहे आणि सगुणध्यानादिकांचा जो संबंध तो दुसरा अगर्भ प्राणायाम होय ३२.

हृद्यविच्छिन्नमोङ्कारं घण्टानादं बिसोर्णवत् ।
प्राणेनोदीर्य तत्राथ पुनः संवेशयेत् स्वरम् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] मूलाधारात उत्पन्न झालेला ॐकार प्राणवायूच्या साह्याने मस्तकापर्यंत न्यावा कमळातील बिसतंतूप्रमाणे तो अखंड असून त्याचा नाद घंटानादाप्रमाणे आहे, असे मनात चिंतन करावे (३४)

वाचेसी नव्हतां गोचरू । दीर्घ प्रणवाचा उच्चारू ।
हृदयीं अनवच्छिन्न ओंकारू । अखंडाकारू उल्हासे ॥३३॥
ॐकाराचा दीर्घ उच्चार वाणीला करता येत नसला, तरी तोच ओंकार हृदयामध्ये सतत एकसारखा चाललेलाच असतो ३३,

घंटानादसदृश स्थितू । जैसा कमळमृणालसूक्ष्मतंतू ।
तैसा मूळादारभ्य ब्रह्मरंध्रांतू । प्राणायामयुक्तू प्रणवू भासे ॥३४॥
तो घटानादाप्रमाणे सारखाच चाललेला असतो. ज्याप्रमाणे कमलाच्या देवंतील सूक्ष्म तंतु असावेत, त्याप्रमाणे मूळापासून तो ब्रह्मरंधाच्या शेवटापर्यंत प्राणायामाने युक्त असा प्रणव (कार) भासतो ३४.

तेथ दीर्घ स्वरें उच्चारू । तेणें प्रणवू भासे अतिसपुरू ।
तो प्राणायामें करावा स्थिरू । अखंडाकारू स्वरयुक्त ॥३५॥
तेथे अतिशय दीर्च स्वराने नाद होत असतो, त्यामुळे. अत्यंत सूक्ष्म रीतीनें प्रणवाचा भास होतो. तोच प्राणायामाने स्थिर, अखंडस्वरूप व नादयुक्त असा करावा ३५.

एवं प्रणवसंयुक्तं प्राणमेव समभ्यसेत् ।
दशकृत्वस्त्रिषवणं मासादर्वाग् जितानिलः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] अशा रीतीने दररोज तीन वेळा, प्रत्येक वेळी दहा वेळा, ॐकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो. (३५)

स्वरवर्णमात्रातीत पर । प्रणव जो कां अगोचर ।
तो अभ्यासबळें नर । वृत्तिगोचर स्वयें करिती ॥३६॥
अशा प्रकारे स्वर, वर्ण आणि मात्रा यांच्याहूनही निराळा, अत्यंत श्रेष्ठ व अदृश्य असा जो प्रणव (कार), तो कित्येक पुरुष अभ्यासाच्या सामर्थ्याने स्वतः इंद्रियांना समजेसा करून घेतात ३६.

नवल उच्चाराचा चमत्कार । ऊर्ध्वमुख अखंडाकार ।
अभ्यासें प्रणवू करिती स्थिर । झणत्कार स्वरयुक्त ॥३७॥
त्या उच्चाराचा आश्चर्यकारक चमत्कार आहे. तो ऊर्ध्वमुख असून अखंड अस्तित्वात असतो. तोच झणत्कारयुक्त व नादमय प्रणव अभ्यासाच्या योगाने स्थिर करतात ३७.

ऐसा प्राणायामयुक्त प्रणवाभ्यास । त्रिकाळ करितां सांडूनि आळस ।
काळीं आवर्तनें दशदश । सावकाश करितां पैं ॥३८॥
अशा प्रकारें आळस सोडून प्राणायामासह प्रणवाचा त्रिकाळ अभ्यास करितांना प्रत्येक वेळी सावकाश सावकाश दहा दहा आवृत्ति केल्या असतां ३८;

तरी एक मास न लागतां । हा प्राणजयो आतुडे हाता ।
जेवीं कां सती पतिव्रता । नुल्लंघी सर्वथा पतिवचन ॥३९॥
ज्याप्रमाणे एखादी महासाध्वी पतिव्रता आपल्या पतीचे वचन मुळीच उलंघन करीत नाही, त्याप्रमाणे एक महिनाही पूर्ण होण्याच्या आंतच हा प्राणजय साध्य होतो ३९.

ये अभ्यासीं अतितत्पर । झालिया गा निरंतर ।
योगाभ्यासाचें सार । सहजेंचि नर पावती ॥४४०॥
या अभ्यासामध्ये नेहमी अत्यंत दक्ष राहिले असतां योगाभ्यासाचे रहस्य तो पुरुष सहजच मिळवितो ४४०.

ऐसा प्राणजयो आलिया हाता । दों प्रकारीं भजनावस्था ।
एकी सगुण आगमोक्ता । दुजी योगाभ्यासता निर्गुणत्वें ॥४१॥
अशा प्रकारे प्राणनिरोध साध्य झाला म्हणजे भजनाची स्थितीही दोन प्रकारची होते. एक शास्त्रोक्त विधीप्रमाणे सगुणोपासना आणि दुसरी योगाभ्यासाने निर्गुणोपासना ४१.

परी दोहींचें समाधान । निर्गुणींच पावे जाण ।
त्या दोहींचें उपलक्षण । संक्षेपें श्रीकृष्ण सांगत ॥४२॥
परंतु दोहींतील समाधान निर्गुणांतच मिळते हे लक्षात ठेव. त्या दोहींचें, उपलक्षण श्रीकृष्ण संक्षेपाने सांगतात ४२.

अगा ओं हें स्मरों सरे । स्मरतां स्वरेंसीं प्राणू प्रणवीं भरे ।
मग प्रणवूचि तेव्हां स्फुरे । अखंडाकारें उल्हासतू ॥४३॥
अरे ! ॐकाराचे स्मरणही जेथें नष्ट होते, आणि स्मरण केलेच तर त्या स्वरासहवर्तमान प्राण असतो तोच प्रणवामध्ये भरून जातो, तेव्हा मग अखंड आकाराने उल्हास पावलेला प्रणवच स्फुरत असतो ४३.

जेथूनि अक्षरें उपजती । शब्द वदोनि जेथ सामावती ।
मग जे उरे जाण ती स्फूर्ती । प्रणवू निश्चितीं त्या नांव ॥४४॥
जेथून अक्षरे उत्पन्न होतात, शब्द बोलून गेल्यानंतर ज्यांत समाविष्ट होतात, आणि मग जी स्फूर्ति शिल्लक राहाते, तिलाच खरोखर प्रणव असें नांव आहे ४४.

त्या प्रणवाचेनि आधारें । जिणोनियां साही चक्रें ।
तो प्रणवू सूनि धुरे । निजनिर्धारे चालिजे ॥४५॥
त्या प्रणवाच्याच आधाराने सहाही चक्र जिंकून झाली म्हणजे तोच प्रणव पुढे होऊन निश्चयाने पुढे चाल करतो ४५.

तेथ उल्हाट शक्तीचा लोट । वैराग्याचा नेटपाट ।
जिणोनि काकीमुखाची वाट । सवेगें त्रिकूट घेतलें ॥४६॥
तेव्हां कुंडलिनीशक्तीचा जोर व वैराग्याचा अतिशय भर ह्यांच्या योगाने सुषुम्ना नाडीच्या (इडा व पिंगला ह्यांच्यामध्ये सुषुम्ना नाडी आहे ) द्वाराची वाट झपाट्याने ओलांडून पश्चिममार्गातील पहिले स्थान सर करतो ४६.

तेव्हां अनुहताच्या घायीं । निशाण लागलें पाहीं ।
तंव पुढील जे योगभुयी । ते आपैती पाहीं हों सरली ॥४७॥
त्या वेळी दशनादांच्या घोषाने विजयाचे निशाण फडकू लागते. तेव्हां पुढे चालावयाचा जो योगमार्ग असतो, तो आपोआपच पुढे येतो ४७.

तेथें हरिखें अतिउद्‌भट । औटपीठ आणि गोल्हाट ।
तेही जिणोनियां वाट । घडघडाट चालिला ॥४८॥
तेथ अत्यंत आनंदाने व उत्साहाने औटपीठ आणि गोल्हाट या दोन चक्रांचा मार्गही आक्रमण करून झपाट्याने पुढे जाऊं लागतो ४८.

मागील ठेली आठवण । झाली विकल्पाची बोळवण ।
सत्रावी वोळली जाण । स्वानंदजीवन जीवाचें ॥४९॥
मागची आठवण नाहीशी होते; विकल्पाचाही नाश होतो आणि जीवाचें स्वानंदजीवन अशी जी सत्रावी कला (जीवनकळा), तिची गांठ पडते ४९.

ते सहस्रदळाचे पाट । वरूनि उतरले घडघडाट ।
स्वानंदजीवनानिकट । नीट वाट पैं आले ॥४५०॥
तेथें सहस्रदळ कमळांतून सुटलेले पाझर वरून खळखळां वाहत खाली येत असतात आणि ते अगदी थेट सरळ स्वानंदजीवनाजवळ (जीवनकळेजवळ) येतात ४५०.

तें सेवितां संतोषें पाणी । निवली संतप्त अवनी ।
इंद्रियांची पुरली धणी । गुणांची त्रिवेणी बुडाली ॥५१॥
ते तेथचे पाणी मोठ्या आनंदाने सेवन केले असतां संतप्त झालेली सर्व जमीन गारीगार होऊन जाते, इंद्रियांची वखवख संपते आणि गुणांची त्रिवेणी पार बुडून जाते ५१.

तंव भ्रमरगुंफेआंत । जीवशिवांचा एकांत ।
तेणें जीवपणाचा प्रांत । वृत्तीसी घात हों सरसा ॥५२॥
तेव्हां भ्रमरगुंफेच्या आंत जीव आणि शिव ह्यांची एकांतांत गांठ पडते. तेणेकरून जीवपणाचा प्रदेश आणि वृत्ति या दोहोंचा नाश होतो ५२.

तेथ शिवशक्तिसंयोग । निज‍ऐक्यें झाला चांग ।
परमानंदें कोंदलें अंग । सुखाचा सुखभोग सुखरूप झाला ॥५३॥
तेथे आत्मस्वरूपाचे ऐक्य झाल्यामुळे शिव आणि शक्ति ह्यांचे उत्कृष्ट तादात्म्य होऊन जाते आणि परमानंदाने आंग भरून जाऊन सुखाचा सुखभोगच काय तो शिल्लक राहातो ५३.

तेव्हां हेतु मातु दृष्टांतू । खुंटली वेदवादाची मातू ।
झाला मीतूंपणाचा प्रांतू । एकला एकांतू एकपणें ॥५४॥
त्या वेळी हेतु, बोलणे, दृष्टांत, किंवा वेदवादाची गोष्ट सर्व समाप्त होते. मीतूंपणाचा शेवट होतो, आणि एकटा एकान्तच एकटेपणाने शिल्लक राहातो ५४.

ते एकलेपणाचें एक । म्हणावया म्हणतें नाहीं देख ।
ऐसे योगबळें जे नेटक । माझें निजसुख पावले ॥५५॥
पण तो एकटा एक राहिला असें म्हणावयाला म्हणणारेंच कोणी नसते, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे योगसामर्थ्याने जे बलवान् झालें, तेच माझे आत्मसुख पावले ५५.

हे योगमार्गींची वाट । अतिअवघड परम कष्ट ।
थोर विघ्नाचा कडकडाट । प्राप्ति अवचट एकाद्या ॥५६॥
पण हा योगमार्गाचा रस्ता अत्यंत कठीण असून त्यांत कष्टही फार आहेत. यांत मोठमोठ्या विघ्नांचा भयंकर त्रास आहे. म्हणून या योगाची प्राप्ति क्वचित् एखाद्यालाच होते ५६.

तैसा नव्हे माझा भक्तिपंथू । तेथ नाहीं विघ्नाची मातू ।
भक्तांसीही हाचि ठावो प्राप्तू । ऐक तेही मातू मी सांगेन ॥५७॥
माझा भक्तिमार्ग मात्र तसा नव्हे त्यांत विघ्नांची मुळी गोष्टच नाही, आणि भक्तांनाही हेच स्थान प्राप्त होते, त्याचाही प्रकार ऐक. मी तुला सांगतों ५७.

मूळीं योग हा नाहीं स्पष्ट । म्हणाल कैंचें काढिलें कचाट ।
पदबंधाची चुकली वाट । वृथा वटवट न म्हणावी ॥५८॥
आता कदाचित तुम्ही असेही म्हणाल की, ‘योगाचा स्पष्ट उल्लेख मुळांत नाही, मग हें कचाट कोठून काढले ? मूळ पदाचा अर्थ सुटला आहे, व ही व्यर्थ वटवट आहे’ तर असें मात्र म्हणू नये ५८.

येच श्लोकीं देवो बोलिला । मासादर्वाक् प्राणजयो जाहला ।
यांतू ध्वनितें योग बोलिला । तो म्यां केला प्रकटार्थ ॥५९॥
कारण, याच श्लोकामध्ये देव म्हणाले आहेत की, “मासादर्वाक्” ( एक महिन्याच्या आंतच ) प्राणायाम साध्य होतो. यामध्ये ध्वनितार्थाने योगाभ्यासच सांगितला आहे. म्हणून तो मी स्पष्ट केला ५९.

जेथ प्राणापानजयो झाला । तेथ महायोगू हा भागा आला ।
हा योगू शास्त्रार्थ बोलिला । विशद केला आकुलागमीं ॥४६०॥
जेथे प्राणापानांवर विजय प्राप्त होतो, तेथेंच हा महायोग साध्य होतो. हा योग शास्त्रांतच सांगितलेला आहे. म्हणूनच शास्त्रीय रीतीने मी तो स्पष्ट केला ४६०.

प्राणापानजयो झाला पहा हो । जैसा साधकाचा भावो ।
सगुणनिर्गुण उपावो । प्राप्ती ठावो सहजेंचि ॥६१॥
अहो ! हें पाहा की, प्राणापानाचा निग्रह झाला, म्हणजे साधकाचा जसा भाव असेल त्याप्रमाणे सगुण किंवा निर्गुण उपासनेच्या योगाने त्या त्या पदाची सहज प्राप्ति होते ६१.

प्राणापानजयप्राप्ती । सगुण उपासनास्थिती ।
तद्द्वारा निर्गुणप्राप्ती । उद्धवाप्रती हरि बोले ॥६२॥
प्राणापानांवर विजय प्राप्त झाला, आणि सगुणोपासना घडली, म्हणजे त्या योगाने निर्गुणाचीही प्राप्ति कशी होते, तें श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो ६२.

कशासारिखें तुझें ध्यान । ऐसा उद्धवें केला प्रश्न ।
यालागीं सांगोनियां सगुण । सवेंचि निर्गुण संस्थापी ॥६३॥
तुझें ध्यान कशासारखे आहे ? असा उद्धवानें प्रश्न केला. म्हणून सगुण ध्यानाचे निरूपण करून लगेच निर्गुण स्वरूपाची सिद्धता करून दाखविली ६३.

मत्स्य साधावया बडिश जाण । चित्त साधावया मूर्ति सगुण ।
तेचि मूर्तीचें सगुण ध्यान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६४॥
मासा धरण्याकरिता जसे आमिष असते, त्याप्रमाणे चित्ताला धरून ठेवण्यासाठी सगुण मूर्ति असते. तेंच मूर्तीचे सगुण स्वरूप श्रीकृष्ण स्वतः सांगतो ६४.

हृत्पुण्डरीकमन्तःस्थम् ऊर्ध्वनालमधोमुखम् ।
ध्यात्वोर्ध्वमुखमुन्निद्रमष्टपत्रं सकर्णिकम् ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] त्यानंतर शरीराच्या आत वर देठ आणि खाली मुख असलेले हे हृदयकमळ त्याचे मुख वरच्या बाजूला होऊन ते उमलेले आहे, त्याला आठ पाकळ्या आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळा गड्डा. (कर्णिका) आहे, असे चिंतन करावे. (३६)

जैसें केळीचें कमळ । तैसें हृदयीं अष्टदळ ।
अधोमुख ऊर्ध्वनाळ । अतिकोमळ लसलसित ॥६५॥
-ज्याप्रमाणे केळीचें फूल (कोका) असते, त्याप्रमाणेच हृदयामध्ये अष्टदलात्मक कमळ असते. त्याचे तोंड खाली व देंठ वर असून ते अगदी कोवळे लुसलुशीत असते ६५.

धरोनि प्राणायामाचें बळ । ऊर्ध्वमुख हृदयकमळ ।
विकसित करावें अष्टदळ । ध्यानें प्रबळ ध्यातां पैं ॥६६॥
ह्याकरितां प्राणायामाच्या सामर्थ्याने हृदयकमळ ऊर्ध्वमुख करून पूर्ण एकाग्र ध्यानाने ध्यान करितां करितां तें अष्टदळ कमळ विकसित करावें ६६.

तेथ ऊर्ध्वमुख अधोनाळ । ध्याना आलिया हृदयकमळ ।
अतिउन्निद्र अष्टदळ । ध्यानीं अचंचळ स्थिरावल्या ॥६७॥
तेथे वरच्या भागी मुख आणि खाली दांडा, ह्याप्रमाणे हृदयकमळ असल्याचे ध्यान केल्यानंतर त्याच्या

कर्णिकायां न्यसेत् सूर्य सोमाग्नीनुत्तरोत्तरम् ।
वह्निमध्ये स्मरेद् रूपं ममैतद् ध्यानमङ्गलम् ॥ ३७ ॥
आठही पाकळ्या अत्यंत प्रफुल्लित झाल्या आहेत असें ध्यान मनामध्ये स्थिर करावें. ते किमपीही ढळू नये ६७.

कर्णिकेमाजीं चंद्रमंडळ । ध्यावें सोळा कळीं अविकळ ।
त्याहीमाजीं सूर्यमंडळ । अतिसोज्जळ बारा कळीं ॥६८॥
[श्लोक ३७] कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि अग्नी यांची स्थापना करावी त्यानंतर अग्नीमध्ये माझ्या या रूपाचे स्मरण करावे माझे हे स्वरूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय आहे. (३७)

त्याहीमाजीं वन्हिमंडळ । दाही कळीं अतिजाज्वल्य ।
ते अग्निमंडळीं सुमंगल । ध्यावी सोज्ज्वळ मूर्ति माझी ॥६९॥
नंतर त्याच्या गाभ्यामध्ये सोळा कलांनी युक्त असें चंद्रमंडळ आहे अशी कल्पना करून त्याचे ध्यान करावे आणि त्याच्या आंत बारा कलांनी युक्त असें देदीप्यमान सूर्यमंडळ आहे अशी कल्पना करावी ६८.

समं प्रशान्तं सुमुखं दीर्घचारुचतुर्भुजम् ।
सुचारुसुन्दरग्रीवं सुकपोलं शुचिस्मितम् ॥ ३८ ॥
त्याच्याही आंत दहा कलांनी युक्त व अत्यंत धगधगीत अग्निमंडळ आहे अशी कल्पना करून त्या अग्निमंडळांत माझी अत्यंत मंगलप्रद व दिव्य मूर्ति आहे असें ध्यान करावें ६९.

समानकर्णविन्यस्त स्फुरन् मकरकुण्डलम् ।
हेमाम्बरं घनश्यामं श्रीवत्सश्रीनिकेतनम् ॥ ३९ ॥
[लोक ३८/३९] माझ्या भगवंतांचे सर्व अवयव सुडौल आहेत मुखकमल अत्यंत शान्त आणि सुंदर आहे चार मनोहर आजानु बाहू आहेत अतिशय सुंदर व मनोहर गळा आहे स्मितहास्याने शोभणारे गाल आहेत दोन्ही समान कानामध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत पावसाळ्यातील ढगाप्रमाणे श्यामवर्णाच्या शरीरावर पीतांबर शोभत आहे वक्षःस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचे चिन्ह आणि दुसर्‍या बाजूला लक्ष्मी विराजमान झाली आहे (३८-३९)

तेंचि माझें मूर्तीचें ध्यान । उद्धवा ऐक सावधान ।
आपुले मूर्तीचें आपण । ध्यान श्रीकृष्ण सांगत ॥४७०॥
उद्धवा ! आता त्याच माझ्या मूर्तीचे ध्यान कसे असावे ते नीट लक्ष देऊन ऐक. असे म्हणून श्रीकृष्ण आपल्या मूर्तींचं ध्यान आपणच सांगू लागले ४७०.

अतिदीर्घ ना ठेंगणेपण । सम अवयव समान ठाण ।
सम सपोष अतिसंपूर्ण । मूर्ति सुलक्षण चिंतावी ॥७१॥
फार उच नव्हे व फार ठेंगणीही नव्हे, सर्व अवयव सारख्या प्रमाणांत; बैठकही सपाट, आंगाला साजेशी बाळसेदार आंगलट, अशा उत्तम लक्षणांनी युक्त अशा मूर्तीचे चिंतन करावें ७१.

मूर्ति चिंतावी संमुख । प्रसन्नवदन अतिसुरेख ।
जिचें देखतांचि मुख । हृदयीं हरिख कोंदाटे ॥७२॥
मूर्ति आपल्या समोरासमोर तोंड करून उभी आहे असें मनांत आणावे. त्या मूर्तीचे मुखकमल प्रसन्न असून अत्यंत रमणीय असावे. ते असे की, ज्या मूर्तीचं मुख पाहातांच हृदयामध्ये आनंदीआनंदच भरून जातो ७२.

जैशीं विशाळ कमळदळें । तैसे आकर्णान्त दोनी डोळे ।
भंवया रेखिल्या काजळें । तैशी रेखा उजळे धनुष्याकृती ॥७३॥
ज्याप्रमाणे कमळाच्या मोठमोठाल्या पाकळ्या असाव्यात, त्याप्रमाणे कानापर्यंत पोचणारे विशाल नेत्र असावे. काजळाने रेखाटल्याप्रमाणे काळ्या भोर भिवया असून त्या धनुष्याकृति असाव्या ७३.

कपाळ मिरवत सांवळें । त्याहीवरी चंदन पिंवळें ।
माजीं कस्तूरीचीं दोनी अंगुळें । कुंकुममेळें अक्षता ॥७४॥
काळे सांवळे कपाळ शोभत असून त्यावर पिवळे चंदन चर्चिलेलें असावे आणि त्याच्यामध्ये कस्तूरीचे दोन टिळे असून कुंकुमांकित अक्षता लावलेल्या असाव्यात ७४.

दीर्घ नासिक आणि कपाळें । लखलखित गंडस्थळें ।
मुख सुकुमार कोवळें । अधरप्रवाळें आरक्त ॥७५॥
नाक आणि कपाळ ही भव्य असावी. कपाळाच्या दोहों बाजूंचे दोन उंचवटे तेजःपुंज असावे. तोंड नाजूक असून कोवळे असावे आणि ओठ पोंवळ्याप्रमाणे लालसर असावेत ७५.

श्यामचंद्राची सपोष कोर । तैशी चुबुका अतिसुंदर ।
मुख निमासुरें मनोहर । भक्तचकोरचंद्रमा ॥७६॥
द्वितीयेच्या चंद्राची घवघवीत कोर असावी, त्याप्रमाणे अत्यंत सुंदर हनुवटी असावी. भक्तरूपी चकोरास केवळ चंदच असें जें तोंड ते सुकुमार व मनोहर असावे ७६.

जैसा हिरियाच्या ज्योती । कीं दाळिंबबीजांची दीप्ती ।
तैशी मुखामाजीं दंतपंक्ती । दशन झळकती बोलतां ॥७७॥
ज्याप्रमाणे हिऱ्याचे तेज किंवा डाळिंबाच्या दाण्यांचे तेज, त्याप्रमाणे मुखांत सतेज दंतपंक्ति असून बोलतांना दांत झळकत असावेत ७७.

समानकर्ण दोनी सधर । स्फुरत कुंडलें मकराकार ।
ईषत् हास्य मनोहर । ग्रीवा सुंदर कंबु जैशी ॥७८॥
दोहींकडे दोन समान व सुंदर कान असून मत्स्याकृति कुंडलें हालत असावी. गालांतल्या गालांत मनोहर हास्य असून, कंठाची आकृति शंखासारखी असावी ७८.

कंठींची त्रिवळी उभवणी । माजीं मिरवे कौस्तुभमणी ।
ते प्रकाशली दीप्ती कवण गुणीं । तेजें दिनमणी लोपला ॥७९॥
गळ्याला तीन वळ्या स्पष्ट असून त्याच्यामध्ये कौस्तुभमणी शोभत असावा. त्याच्या प्रकाशाच्या तेजाचे वर्णन करणार कोण ? त्याच्या तेजापुढे सूर्यसुद्धा फिका पडेल ! ७९.

भुजंगाकार स्वभावो । चतुर्भुज आजानुबाहो ।
विशाळ वक्षःस्थळनिर्वाहो । श्रीवत्स पहा हो चिन्हित ॥४८०॥
स्वभावतःच भुजंगाप्रमाणे दिसणारे आजानुबाहु असे चार हातांचे चार दंड ; वक्षःस्थळ विशाल असून त्यावर श्रीवत्साचे चिन्ह ! ४८०

श्रीवत्स श्रीनिकेतन । हृदयीं दोहीं भागीं जाण ।
त्रिवळीयुक्त उदर गहन । दामोदरचिन्ह त्या आलें ॥८१॥
हृदयावर दोहों बाजूंना श्रीवत्स व श्रीनिकेतन ; उदर खोल असून त्यावर तीन वळ्या, आणि यशोदेनें दाव्याने बांधून ठेवल्यामुळे त्या बंधनाचे ज्यावर चिन्ह आहे ! ८१.

विजू तळपे तैसा पिंवळा । लखलखित दिसे डोळां ।
तेवीं कसिला सोनसळा । तेणें घनसांवळा शोभत ॥८२॥
वीज चमकावी त्याप्रमाणे डोळ्यांना लखलखीत पिवळा सोन्यासारख्या रंगाचा दिसणारा पीतांबर नेसल्यामुळे शोभणारी घनश्याम मूर्ति ! ८२.

जैसें चांदिणें गगनामाझारीं । शुभ्रता बैसे श्यामतेवरी ।
तेवीं श्यामांगीं चंदनाची भुरी । तेणें श्रीहरी शोभत ॥८३॥
ज्याप्रमाणे आकाशांत चांदणे पडले असले म्हणजे खाली नीलवर्ण असून त्यावर शुभ्रवर्णांची झांक मारते,

शङ्खचक्रगदापद्म वनमालाविभूषितम् ।
नूपुरैर्विलसत्पादं कौस्तुभप्रभया युतम् ॥ ४० ॥
त्याप्रमाणे श्यामवर्ण आंगावर चंदनाची पांढुरकी उटी असल्याने त्या श्रीहरीची शोमा कांही अप्रतिम दिसते ८३.

द्युमत्किरीटकटक कटिसूत्राङ्गदायुतम् ।
सर्वाङ्गसुन्दरं हृद्यं प्रसादसुमुखेक्षणम् ॥ ४१ ॥
[लोक ४०/ ४१] हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहे गळ्यात वनमाला शोभून दिसत आहे पायांमध्ये नूपुरे शोभत आहेत गळ्यात कौस्तुभमणी झगमगत आहे आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट, कडी कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसत आहेत सर्वांगसुंदर असे हे रूप भक्तांचे हृदय हरण करणारे आहे त्यांची प्रेम पूर्ण नजर कृपाप्रसादाचा वर्षाव करीत आहे सर्व अवयवांवर मन स्थिर करीत माझ्या या सुकुमार रूपाचे ध्यान करावे. (४०-४१)

कौस्तुभासीं संलग्न गळा । आपाद रुळे वनमाळा ।
कटीं बाणली रत्‍नमेखळा । किंकिणी जाळमाळासंयुक्त ॥८४॥
कौस्तुभमण्याने युक्त असा कंठ, पायांपर्यंत रुळणारी वनमाला, कमरेला घातलेला रत्नखचित कमरपट्टा , आणि त्याला लावलेले रुणझुण वाजणारे घागऱ्यांचे घोंस ८४.

करकंकण बाहुअंगदें । शंखचक्रपद्मगदादि आयुधें ।
जडित मुद्रिका नाना छंदें । कराग्रीं विनोदें बाणल्या ॥८५॥
हातांतील सलकड़ी व दंडांतील पोंच्या, शंख, चक्र, पद्म, गदा इत्यादि आयुधे, आणि बोटांत अत्यंत शोभत असणाऱ्या नानाप्रकारच्या रत्नजडित मुद्रिका ८५.

नाभि सखोल निर्मळ । जेथ ब्रह्मा झाला पोटींचें बाळ ।
जें लोकपद्माचें समूळ मूळ । तें नाभिकमळ हरीचें ॥८६॥
नाभी खोल असून निर्मळ, जिच्यामधून प्रत्यक्ष पोटचे बाळ ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि जें त्रैलोक्यरूप कमळाचेही मुख्य मूळ, ते श्रीहरीचे नाभिकमल होय ८६.

जैसे सचेतन मर्गजस्तंभ । तैसे घोंटींव साजिरे स्वयंभ ।
उभ्य चरणांची अभिनवशोभ । हरिअंगीं स्वयंभ शोभती ॥८७॥
ज्याप्रमाणे मरकतरत्नांचे सजीव खांबच असावे, त्याप्रमाणे घोंटीव, सुंदर आणि स्वयंभू अशी ज्याच्या दोन चरणांची अपूर्व शोभा ! असे ते चरण श्रीहरीला अत्यंत शोभतात ८७.

ध्वज वज्र अंकुश देखा । यवांकित ऊर्ध्वरेखा ।
पद्मचक्रादि सामुद्रिका । चरण नेटका हरीचा ॥८८॥
आणि त्या श्रीहरीच्या, पायांवर ध्वज, वज्र, अंकुश, यवांकित असणाऱ्या ऊर्ध्व रेषा, पद्म, चक्र, इत्यादि सामुद्रिक चिन्हें असल्यामुळे तो फारच सुंदर दिसावा ८८.

त्रिकोण कांतीव इंद्रनीळीं । तैशीं साजिरीं घोटींव सांवळीं ।
पाउलें सुकुमारें कोंवळीं । आरक्त तळीं पदप्रभा ॥८९॥
इंद्रनीलमणी कांतून त्याचा त्रिकोण करावा, त्याचप्रमाणे मनोहर, नितळ, श्यामवर्ण, नाजुक व कोवळी लुसलुशीत पावले, आणि त्यांच्यासाठी बाल रंगाची पडलेडी प्रभा ! ८९.

पाउलावरी सांवळी प्रभा । तळवातळीं आरक्त शोभा ।
जेवीं संध्याराग मीनला नभा । तैशी शोभा हरिचरणीं ॥४९०॥
पावलांच्या वरच्या बाजूला निळी झांक, आणि खाली तळव्याच्या आरक्त रंगाची लाल झांक; त्यामुळे सायंकाळच्या वेळी नील आकाशावर लाल रंगाची प्रभा पडावी, त्याप्रमाणे त्या श्रीहरीच्या पायांवर विलक्षण प्रकारची शोभा दिसते ४९०.

नभमंडळीं चंद्ररेखा । तैशी पादाग्रीं मांडणी नखा ।
पोटर्‍या सुकुमार नेटका । जंघा सुरेखा जानुद्वय ॥९१॥
नभोमंडळांत चंद्राची कोर असावी, त्याप्रमाणे प्रत्येक बोटाच्या शेवटाला नखाची शोभा दिसते. पोटऱ्याही तशाच कोमल असून मनोरम, तशाच दोन्ही मांड्या व खुबेही अतिशय सुरेख ९१.

अतिशयें माजु साना । होता अभिमान पंचाननां ।
मध्य देखोनि जगज्जीवना । लाजोनि राना ते गेले ॥९२॥
सिंहांना असा अभिमान झाला होता की, सर्वांत कंबर काय ती आमचीच बारीक ! परंतु त्या जगजीवन श्रीहरीची कंबर पाहातांच ते लाजून रानांतच पळून गेले ! ९२.

अद्यापि ते झाले अरण्यवासी । लाजा मुख न दाविती कोणासी ।
पहावया हरिमध्यासी । लेप मेखलेसी ते झाले ॥९३॥
ते अद्याप अरण्यांतच राहिले आहेत. लज्जेमुळे ते कोणाला तोंडसुद्धा दाखवीत नाहीत. आणखी श्रीहरीची कंबर आपणांस पाहावयास तरी मिळावी म्हणून ते मेखलेवरची चित्रे झाले आहेत ९३.

चरणीं नूपुरांचा गजर । वांकीअंदुवांचा झणत्कार ।
मस्तकीं कुटिलालकभार । सुमनीं कबर शोभती ॥९४॥
पायांत पैंजणांचा गजर, वांकींचा आणि तोरड्यांचा झणत्कार, मस्तकावर कुरळ केसांची दाटी, आणि फुलें गुंफल्यामुळे शोभणारे ते केस ! ९४.

नानारत्‍नीं अतिगहन । मस्तकीं मुकुट देदीप्यमान ।
सर्वांगीं सुलक्षण । मूर्ति संपूर्ण हरीची ॥९५॥
मोठमोठी दिव्यरत्ने जडलेला देदीप्यमान मुकुट मस्तकावर; अशा प्रकारें संपूर्ण उत्तम लक्षणांनी युक्त श्रीहरीची मूर्ति सर्वांगसुंदर असावी. ९५.

जे मूर्तीची धरिल्या सोये । तहान भूक विसरोनि जाये ।
ध्यानीं आतुडल्या पाहें । सुखाचा होये सुदिन ॥९६॥
ज्या मूर्तीकडे लक्ष लागले असता, तहान-भूकसुद्धा विसरून जावी, आणि जी ध्यानात ठसली असतां सुखाचा दिवस उगवावा ९६.

सर्वांगसुंदर श्यामवर्ण । ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन ।
सुमुख आणि सुप्रसन्न । मूर्तीचें ध्यान करावें ॥९७॥
सर्वांगीं सुंदर असा श्यामवर्ण असावा; मुद्रा अत्यंत श्रेष्ठ, उदार व गंभीर अशी असावी. मुखकमल सुंदर आणि सुप्रसन्न असावे, अशा मूर्तीचे ध्यान करावे ९७.

सुकुमारमभिध्यायेत् सर्वाङ्गेषु मनो दधत् ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यो मनसाऽऽकृष्य तन्मनः ।
बुद्ध्या सारथिना धीरः प्रणयेन्मयि सर्वतः ॥ ४२ ॥
तत्सर्वव्यापकं चित्तमाकृष्यैकत्र धारयेत् ।
नान्यानि चिन्तयेद् भूयः सुस्मितं भावयेन्मुखम् ॥ ४३ ॥
[श्लोक ४२ / ४३] बुद्धिमान माणसाने मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून बाजूला करून त्या मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या साहाय्याने सर्वतोपरी माझ्या ठिकाणी लावावे. (४२) संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावे आणि शेवटी अन्य अवयवांचे चिंतन न करता केवळ मंद हास्ययुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी. (४३)

झणीं दृष्टीचा रुपेल न्याहारू । लागतां खुपेल चंद्रकरू ।
तैशी मूर्ति ध्यावी सुकुमारू । अतिअरुवारू ध्याननिष्ठा ॥९८॥
कदाचित् डोळ्यांचे कटाक्षसुद्धा खुपतील, चंद्रकिरणसुद्धा लागले तर खुपतील, इतक्या सुकुमार मूर्तीचे ध्यान करावे. ध्यानावर भक्ति बसण्याला मूर्ति कोमल असेल तितकी उत्तम ९८.

इंद्रियार्थीं अतिलोलुप । तें वैराग्यें आवरोनि चित्त ।
माझे ध्यानीं सुनिश्चित । बुद्धिमंत लाविती ॥९९॥
इंद्रियजन्य विषयांत अत्यंत लुब्ध असणारे जें मन, तें वैराग्याने आवरून बुद्धिमंत असतात ते एकनिष्ठेने माझ्याच ध्यानाकडे लावतात ९९.

विषयीं आवरोनि मन । अखंड करितां माझें ध्यान ।
मद्‌रूपचि होय जाण । ऐसें चिंतन करावें ॥५००॥
अशा प्रकारे विषयांना आवरून अखंड माझेच ध्यान केले, म्हणजे आपण स्वतः मत्स्वरूपच होऊन जाऊं असाच ध्यानाकडे लय लावावा ५००.

चिंतनीं बिचकतां मन । सविवेक बुद्धिबळें जाण ।
निःशंक करितां माझें स्मरण । धारणेवीण ध्यान ठसावे ॥१॥
चिंतन करतांना मन विचकू लागले तर विचाराने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने निःशंकपणे माझे स्मरण करूं लागले असतां धारणेशिवायच ध्यान मनामध्ये ठसते १.

धारणा जरी तुटोनि जाये । ध्यासठसा न तुटत राहे ।
मन मूर्तीच्या ठायीं पाहें । जडलें ठाये सर्वांगीं ॥२॥
धारणा जरी तुटून गेली, तरी ध्यानाचा उमटलेला ठसा काही तुटत नाही. मन हे मूर्तीमध्येच राहून तेच सर्वांगामध्ये जडून राहाते २.

अंगप्रत्यंगीं ध्यानयुक्त । जडोनि ठेलें जें चित्त ।
तें आवरूनि समस्त । चिंतावें निश्चित हास्यवदन ॥३॥
प्रत्येक आंगावर व उपांगावर ध्यानाच्या मिषाने जे चित्त जडून राहिलेले असते, ते सर्व आवरून एकाग्र हास्यवदन असेल तेवढ्यावरच निश्चित व्हावें ३.

सर्वही सांडोनियां जाण । सांगोपांग मूर्तिध्यान ।
चिंतावें गा हास्यवदन । स्वानंदघन हरीचें ॥४॥
मूर्तीचे सांगोपांग ध्यान सर्व सोडून श्रीहरीचे स्वानंदधन हास्यवदन असेल तेवढ्याचेच चिंतन करावें. ४.

अंग प्रत्यंग मूर्तिध्यान । पुढतीं न करावेंचि गा जाण ।
ध्यातां माझें हास्यवदन । तल्लीन मन करावें ॥५॥
मूर्तीच्या आंगाचे किंवा उपांगाचे मुळींच ध्यान करूं नये. फक्त माझ्या हास्यवदनाचेंच ध्यान करीत असतां त्यांतच मन तल्लीन करून सोडावे ५.

उद्धवें केला होता प्रश्न । कशासारिखें तुझें ध्यान ।
तें सांगोनियां जाण । यदात्मलक्षण हरि बोले ॥६॥
‘तुझें ध्यान कशासारखे असावें ?’ असा उद्धवाने प्रश्न केला होता. ते ह्याप्रमाणे सांगून त्यांतील आत्मस्वरूपाचे लक्षणही श्रीकृष्ण सांगतात ६.

ध्याना आलें जें हास्यवदन । त्यांतूनही सांडोनि वदन ।
केवळ हास्याचें करावें ध्यान । हास्यामाजीं मन घालूनी ॥७॥
ध्यानामध्ये जें हास्यमुख येईल, त्यांतील मुख सोडून केवळ हास्यावरच मन ठेवावे व हास्याचें ध्यान करीत राहावें ७.

त्याही हास्याचें सांडूनि ध्यान । हास्यामाजीं जो आनंदघन ।
तेथ प्रवेशवावें मन । अतिसावधान निजनिष्ठा ॥८॥
नंतर त्या हास्याचेही ध्यान सोडून देऊन त्या हास्यामध्ये जो घनदाट आनंद भरलेला असतो, त्यामध्ये आपले मन घालावे आणि त्यांतच सावधपणानें निष्ठा ठेवावी. ८.

ते आनंदीं आनंदयुक्त । जाहलिया आपुलें चित्त ।
आनंदाची उपलब्धि तेथ । होय सुनिश्चित साधकां ॥९॥
त्या आनंदाने आपले मन आनंदयुक्त झाले, म्हणजे साधकांना निश्चयेंकरून त्यांतच आत्मानंदाची प्राप्ति होईल ९.

तत्र लब्धपदं चित्तमाकृष्य व्योम्नि धारयेत् ।
तच्च त्यक्त्वा मदारोहो न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] जेव्हा चित्त मुखारविंदावर स्थिर होईल, तेव्हा ते तेथून काढून घेऊन आकाशात स्थिर करावे त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावे आणि माझ्याखेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. (४४)

जाहलिया आनंदपद प्राप्त । चिदाकाशचि दिसे समस्त ।
चिदाकाशीं चित्त । अतिसावचित्त ठेवावें ॥५१०॥
त्या आनंदपदाची प्राप्ति झाली असतां जिकडे तिकडे सर्व चिदाकाशच दिसू लागते. त्या चिदाकाशांत सावधपणानें आपलें चित्त ठेवावें ५१०.

तेव्हां चिदाकाश चित्त चिंतन । हेंही सांडूनि त्रिविध भेदध्यान ।
जो मी परमानंद परिपूर्ण । भेदशून्य चिदात्मा ॥११॥
नंतर चिदाकाश, चित्त आणि चिंतन हे ध्यानांतील तिन्ही भेद सोडून देऊन परमानंदाने परिपूर्ण, आणि भेदशून्य असा चित्स्वरूपच आत्मा जो मी ११,

तेथें वृत्ति करूनि निमग्न । सांडावें चिदाकाशाचेंही ज्ञान ।
तेव्हां ज्ञेय ज्ञाता ज्ञान । हेंही स्फुरण स्फुरेना ॥१२॥
त्या माझ्यामध्येच आपली वृत्ति निमग्न करून सोडावी. तेव्हां चिदाकाशाचे ज्ञान; किंवा ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान; यांपैकी कशाचेच स्फुरण शिल्लक राहात नाही १२.

एवं समाहितमतिर्मामेवात्मानमात्मनि ।
विचष्टे मयि सर्वात्मन् ज्योतिर्ज्योतिषि संयुतम् ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते, तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसर्‍या ज्योतीत मिळून एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यात स्वतःला पाहू लागतो. (४५)

यापरी साधकांची निजवृत्ती । माझ्या स्वरूपीं मीनल्या स्वरूपस्थिती ।
तेव्हां मीपणाची स्फुरे जे स्फूर्ती । तेही अद्वैतीं विराली ॥१३॥
-याप्रमाणे साधकांची आत्मवृत्ति माझ्या स्वरूपांत एकरूप झाली असता ते मत्स्वरूप होऊन राहिले, म्हणजे मीपणाची जी स्फूर्ति स्फुरत असते तीही अद्वैतामध्ये विरून जाते १३.

तेथें मीतूंपणाचा भास । यापरी निमाला निःशेष ।
माझें परमानंद निजसुख । अद्वैतें देख कोंदलें ॥१४॥
ह्याप्रमाणे त्या वेळी मी-तूंपणाचा भासही निखालस लयास जातो आणि परमानंदात्मक जें माझें आत्मसौख्य तेच अद्वैत स्वरूपाने भरून राहातें १४.

जेवीं ज्योतीसी मीनल्या ज्योती । दोहींची होय एकचि दीप्ति ।
तेवीं जीवचैतन्याची स्फूर्ती । अद्वैतसुखप्राप्ती समरसें ॥१५॥
ज्याप्रमाणे एका ज्योतीला दुसरी ज्योत मिळाली म्हणजे दोहींचे मिळून एकच तेज होते, त्याप्रमाणे जीव आणि चैतन्य ह्यांची स्फूर्ति, अद्वैतसुखाचा लाभ झाल्याने एकरूपच होऊन जाते १५,

कोटि स्नेहसूत्रें मांडिती । तेणें कोटि दीप नामाभिव्यक्ती ।
ते कोटि दीपीं एक दीप्ती । तेवीं जीव अद्वैतीं चिन्मात्र ॥१६॥
कोट्यवधि दिव्यांत तेल वात घालून ते दिवे लावले म्हणजे निरनिराळे कोटि दिवे असे म्हणतात, पण त्या कोटि दिव्यांमध्ये तेज असतें तें एकच असते; त्याप्रमाणे अद्वैतामध्ये जीव हा ज्ञानरूपच आहे १६.

देहेंद्रिय‍उपाधिवशें । जीवासी भिन्नत्व आभासे ।
अद्वैतबोध समरसें । जीवू प्रवेशे स्वरूपीं ॥१७॥
देह आणि इंद्रिये यांच्या उपाधीमुळे जीवाला निराळेपणा भासतो, पण तोच अद्वैताचा बोध झाला म्हणजे ऐक्यभावाने जीव हा आत्मस्वरूपामध्येच लीन होतो १७.

तेव्हां एक परमसुख । हेंही म्हणतें नाहीं देख ।
एकाकी एकलें एक । सुखेंसीं निजसुख कोंदलें ॥१८॥
तेव्हां एक परमसुखच काय ते शिल्लक राहाते असे म्हणणारेही कोणी नाही. एकटें एकच एक आत्मसुख सुखमय भरून राहिले १८.

जेवीं साखरे साखर चाखित । कीं उदकीं उदक स्नान करित ।
हो कां घृत रिघालें घृताआंत । सुनिश्चित सुवासा ॥१९॥
ज्याप्रमाणे साखरेनेच साखर खाऊन पहावी, किंवा ज्याप्रमाणे उदकानेंच उदकांत स्नान करावे, किंवा ज्याप्रमाणे निश्रितपणे सुगंध येण्याकरितां तुपानेंच तुपात शिरावें १९,

यापरी माझी ध्यानस्थिती । साधकां जाहली परमप्राप्ती ।
तेचि उपसंहारें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥५२०॥
त्याप्रमाणे माझी ध्यानाची स्थिति म्हणजे साधकांना मोठा लाभच होय. हेच सरतेशेवटीं श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो ५२०.

ध्यानेनेत्थं सुतीव्रेण युञ्जतो योगिनो मनः ।
संयास्यत्याशु निर्वाणं द्रव्य ज्ञानक्रियाभ्रमः ॥ ४६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कंधे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
[श्लोक ४६] अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्याद्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो, त्याचा द्रव्य, ज्ञान, क्रियांविषयीचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि त्याला सगळीकडे परमात्म्याचेच स्वरूप दिसू लागते त्यामुळे त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. (४६)

यापरी तीव्र ध्यानस्थिती । समाधिपर्यंत माझी प्राप्ती ।
साधकासी होय शीघ्रगती । यथानिगुती ध्यान करितां ॥२१॥
ह्याप्रमाणे तीव्र ध्यानस्थितीने समाधीपर्यंत यथासांग ध्यान केले असतां, साधकाला तत्काळ माझी प्राप्ति होते २१.

हें माझें ध्यान उत्तमोत्तम । सर्वदा ठसावलें जैं निःसीम ।
तैं अधिभूत अधिदैव अध्यात्म । हा त्रिविध भ्रम उरों नेदी ॥२२॥
हे माझें ध्यान अत्यंत उत्तम आहे. ते जर सदोदित निःसीम रीतीनें मनामध्ये ठसले, तर अधिभूत, अधिदैव व अध्यात्म असा तीन प्रकारचा भ्रम तें राहूंच देत नाही २२.

विषयी विषयो विषयसंभ्रम । ज्ञेय ज्ञाता ज्ञानोपक्रम ।
कर्म कर्ता क्रियाभ्रम । यांचें रूपनाम उरों नेदी ॥२३॥
विषयसेवन करणारा, विषय, आणि विषयाचा संभ्रम ; ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञानोपक्रम ; कर्म, कर्ता आणि क्रियेचा भ्रम; ह्यांचे नामरूप सुद्धा शिल्लक राहू देत नाही २३.

तेथ ध्येय ध्याता ध्यान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।
मन मंता आणि मनन । यांचें समूळ भान उच्छेदी ॥२४॥
तसेंच ध्येय, ध्याता आणि ध्यान ; दृश्य, द्रष्टा आणि दर्शन; मन, मननकर्ता आणि मनन; यांचे भान मुळासकट छेदून टाकतो २४.

देवो देवी देवता । भज्य भजन भजता ।
लक्ष्य लक्षण लक्षिता । हेही कथा नुरेचि ॥२५॥
देव, देवी आणि देवता; भज्य, भजन आणि भजन करणारा; लक्ष्य, लक्षण आणि लक्ष देणारा; ह्यांची वार्ताही उरत नाही २५.

तेथ योग्यतेशीं महायोगू । समाधिसुखाचा सुखभोगू ।
जीवशिवांचा निजसंयोगू । हाही उपयोगू उडाला ॥२६॥
त्यामुळे योग्यतेसहवर्तमान महायोग, किंवा समाधिसुखाचा सुखोपभोग, किंवा जीव आणि शिव ह्यांचे आत्मैक्य, ही गोष्टही शिल्लक राहत नाही २६.

तेथें बोध कैंचा कैंची बोधकता । कैंची बद्धता आणि मुक्तता ।
ब्रह्मनाम हेही वार्ता । जाण सर्वथा बुडाली ॥२७॥
तेथे बोध कशाचा ? बोधकता कशाची ? बद्धता कशाची ! आणि मुक्तता तरी कशाची ? ब्रह्माचें नांव ही गोष्ट सुद्धा पूर्णपणे लयास जाते २७.

सत् चित् आणि आनंद । या नांवाचा जो प्रवाद ।
तो मज मायावी संबंध । ऐक तोही विषद विभाग ॥२८॥
सत्, चित् आणि आनंद ह्या नांवांचा जो उच्चार तो संबंध सुद्धा मला मायेनेंच लाविला आहे. तोही प्रकार स्पष्ट रीतीने सांगतों ऐक २८.

असंताचे व्यावृत्तीं । ‘संत’ मातें म्हणती श्रुती ।
करितां जडाची समाप्ती । ‘चिन्मात्र’ म्हणती मजलागीं ॥२९॥
असंत (मिथ्या) पणा काढून टाकण्यासाठी श्रुति मला संत असे म्हणतात. जडाचे मिथ्यात्व दाखविण्याकरितां मला ज्ञानस्वरूप म्हणतात २९.

तोडितां दुःखाचा संबंधू । मातें म्हणती ‘परमानंदू’ ।
एवं सच्चिदानंदप्रवादू । हा विपरीत बोधू विद्येचा ॥५३०॥
तसेंच दुःखाचा संबंध माझ्या ठिकाणी येऊ नये म्हणून मला ‘परमानंद’ असे म्हणतात. ह्याप्रमाणे ‘सच्चिदानंद’ असे मला म्हणणे, हाही विद्येच्या दृष्टीने विपरीत बोधच होय ५३०.

जेथ असंतचि नाहीं । तेथ संत म्हणणें घडे कायी ।
समूळ अज्ञानचि जेव्हां नाहीं । तेव्हां चिन्मात्र हेंही म्हणे कोण ॥३१॥
जेथें असंतपणा मुळीच नाही, तेथे ‘संत’ म्हणणे कसें संभवेल ? अज्ञानच मुळी जेथें नाहीं, तेथे ‘ज्ञानमय’ असें तरी म्हणणार कोण ? ३१.

जेव्हां दुःखाचा लेशू नाहीं । तेव्हां सुख म्हणावें कोणे ठायीं ।
यालागीं नामरूप मज पाहीं । ठेवितां ठायीं तुकेना ॥३२॥
दुःखाचा जेव्हां लेशही उरत नाही, तेव्हां सुख असें म्हणावयाचे तरी कोणत्या ठिकाणी ! म्हणून मला नाम आणि रूप हें लावावयाला गेले असतां माझ्या ठिकाणी तें लागत नाही ३२.

समूळ उडे त्रिपुटीचें भान । या नांव गा तीव्र ध्यान ।
माझें करूनियां भजन । निजसमाधान पावले ॥३३॥
त्रिपुटीचे भान निखालस नाहीसे होणे, यालाच ‘तीन ध्यान’ असे म्हणतात. त्यांतच माझें भजन करून साधक आत्मानंदाला पात्र होतात ३३.

एवं माझेनि ध्यानप्रकारें । संसार उडे चमत्कारें ।
माझें केवळ स्वरूपचि उरे । निजनिर्धारें उद्धवा ॥३४॥
अशा प्रकारे ह्या माझ्या ध्यानपद्धतीने मोठ्या चमत्काराने संसार विलयास जातो. आणि उद्धवा ! आत्मस्वरूपाच्या निश्चयाने माझें शुद्धस्वरूपच शिल्लक राहते ३४.

ते स्वरूपीं सुख ना दुःख । नाहीं संतासंताचे लेख ।
ज्ञानाज्ञानाची अटक । ते ठायीं देख असेना ॥३५॥
त्या स्वरूपामध्ये सुख नाहीं आणि दुःख नाही. सत् आणि असत् ह्यांचा उल्लेखच नाही. किंवा त्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान अशा कल्पनांचा काही अडथळाही नाही ३५.

तेथ नाम रूप गुण । नाहीं मीतूंपणाची खूण ।
विद्याअविद्याभान । आनंदघन निजरूप ॥३६॥
त्यांत नाम, रूप, गुण, मीतूंपणाची खूण, विद्या-अविद्येचे भान, यांपैकी काहीएक नाही. सर्वत्र आनंदघन असें आत्मस्वरूपच राहिलेले असते ३६.

भक्तिसुखाचे हेलावे । नानाउपायगौरवें ।
उद्धवालागीं देवें । निजानुभवें दीधले ॥३७॥
अशा रीतीने अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्तीने देवांनी उद्धवाला आत्मानुभवानें भक्तिसुखाचे झोंके दिले ३७.

ठसावल्या माझी भक्ती । सकळ सिद्धींची होय प्राप्ती ।
संदेह नाहीं ये अर्थीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥३८॥
आणि म्हणाले, उद्धवा ! ही माझी भक्ति अंत:करणांत बिंबली असतां सर्व सिद्धींचा लाभ होतो ह्यांत मुळींच संशय नाहीं हें पक्के लक्षात ठेव ३८.

भजनपंथें निरंतर । दोहोनि भक्तिसुखक्षीर ।
त्याचेंही मंथोनिया सार । उद्धवासी श्रीवर देता झाला ॥३९॥
भक्तीपासून सुख स्वरूपी दूध भजनमार्गानें काढून घेऊन व त्याचे मंथन करून जें सार निघाले, ते श्रीकृष्णाने उद्धवाला दिले ३९.

तो हा चौदावा अध्यावो । स्वमुखें बोलिला देवो ।
भक्तीसी मी वश्य पहा हो । येर उपावो तो गौण ॥५४०॥
तो हा चवदावा अध्याय आहे. ह्यांत देव स्वमुखाने असे म्हणाला की, ” अहो ! मी केवळ भक्तीलाच वश आहे. इतर सर्व उपाय गौण होत ” ५४०.

सकळ योगांचें योगगव्हर । वेदान्त निजभांडार ।
सकळ सिद्धींचें परम सार । भक्ति साचार हरीची ॥४१॥
सर्व योगांचे योगसंग्रहस्थान, वेदांताचें मुख्य भांडार आणि सर्व सिद्धींतील परम रहस्य म्हणजेच खरोखर हरीची भक्ति होय ४१.

निजभाग्याची परम जोडी । महासुखाची आवडी गाढी ।
सकळ गोडियांची गोडी । भक्ति रोकडी हरीची ॥४२॥
आत्मभाग्याचा खराखरा लाभ ; महत्सुखाची खरीखरी आवड, आणि सर्व गोष्टींतील गोडी; तीच श्रीहरीची एकनिष्ठ भक्ति होय ४२.

भावें करितां भगवद्‍भजन । श्वपच जाहले पावन ।
जेणें भक्तीशीं विकलें मन । त्याआधीन सदा देवो ॥४३॥
भक्तिपूर्वक भगवद्‌भजन केल्यामुळे चांडाळही पावन झाले. ज्याने आपले मन भक्तीला विकले, त्याच्या आधीन देव सदासर्वकाळ असतो ४३.

उपेक्षूनियां निजमुक्ती । एका जनार्दनीं पढिये भक्ती ।
त्याचेनि प्रसादें भगवत्प्राप्ती । जाहली अहोराती खेळणें ॥४४॥
एकनाथाने मुक्तीची देखील उपेक्षा करून जनार्दनांच्या ठिकाणींच एकनिष्ठ भक्ति धरली आहे, तेव्हां त्यांच्याच प्रसादानें भगवत्प्राप्ती ही रात्रंदिवस खेळण्याप्रमाणे वश होऊन राहिली आहे ४४.

तो जरी भगवत्प्राप्ती नेघे । तरी ते दाटूनि घर रिघे ।
ऐसे गुरुभक्तीचेनि योगें । देवो सर्वांगें भूलला ॥४५॥
तो जरी त्या भगवत्प्राप्तीचा स्वीकार करीत नाहीं, तरी ती आपण होऊनच घरात घुसते. अशा गुरुभक्तीच्या योगाने देव सर्वोपरी भुलून गेला आहे ४५.

भगवत्प्राप्ती पाहिजे ज्यासी । तेणें न विसंबावें मद्‍भक्तीसीं ।
अखंड स्मरे जो हरिनामासी । देवो त्यापाशीं तिष्ठत ॥४६॥
ज्याला भगवत्प्राप्ति पाहिजे असेल, त्याने माझ्या भक्तीची उपेक्षा करूं नये. जो श्रीहरीचे अखंड नामस्मरण करतो, त्याच्यापाशी देव निरंतर तिष्ठत असतो ४६.

सकळ भजनाचे शिरीं । रामनाम दों अक्षरीं ।
सदा गर्जे ज्याची वैखरी । धन्य चराचरीं तो एक ॥४७॥
सर्व भजनांत मुख्य भजन म्हटले म्हणजे ज्याची वाणी ‘राम’ या दोन अक्षरी नांवाने नेहमी गर्जना करीत असते, तो एक चराचरामध्ये धन्य होय ४७.

एका जनार्दना शरण । इतुकें करितां नामस्मरण ।
पाठिमोरें होय जन्ममरण । महासिद्धी आंगण वोळंगती ॥५४८॥
एकनाथ जनार्दनाला शरण जाऊन एवढें नामस्मरण करतांच जन्ममरण पाठमोरे पळून जाऊन महासिद्धि दारांत खपू लागल्या ! ५४८.

इति श्रीभागावते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां
श्रीकृष्णोद्धवसंवादे भक्तिरहस्यावधारणयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४६॥ ओव्या ॥५४८॥
चवदावा अध्याय समाप्त.

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *