संत एकनाथ

संत एकनाथ गीत

संत एकनाथ गीत

संत एकनाथ गीत – संत एकनाथ 

।।अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।

आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्‍तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

।।असा कसा देवाचा देव।।

असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।
देव एका पायाने लंगडा ॥१॥शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो ।
करी दही-दुधाचा रबडा ॥२॥

वाळवंटी जातो कीर्तन करितो ।
घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥

एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई ।
देव एकनाथाचा बछडा ॥४॥

।।आह्मां नादी विठ्ठलु।।

आह्मां नादी विठ्ठलु आह्मां छंदी विठ्ठलु
हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥आह्मां धातु विठ्ठल मातु विठ्ठलु
गातु विठ्ठलु आनंदे ॥२॥

आह्मां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु
संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥

आह्मां ताल विठ्ठलु मेल विठ्ठलु
कल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥

आह्मां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु
मत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥

आह्मां मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु
एका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥

_____________________________________________________________________________

।।आवडीनें भावें हरिनाम।।

आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥

सकळ जीवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥

जैसी स्थिति आहे तैशापरी राहें ।
कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥

_____________________________________________________________________________

।।कशि जांवू मी वृंदावना।।

कशि जांवू मी वृंदावना ।
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥पैलतिरीं हरि वाजवी मुरली ।
नदी भरलीं यमुना ॥२॥

कांसे पीतांबर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥

काय करू बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥

नंदाच्या हरिनें कौतुक केलें ।
जाणे अंतरिच्या खुणा ॥५॥

एका जनार्दनी मनी ह्मणा ।
देवमाहात्म्य कळे ना कोणा ॥६॥

_____________________________________________________________________________

।।कसा मला टाकुनी गेला।।

कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥

रामाविण जीव व्याकुळ होतो ।
सुचत नाहीं काम ॥२॥

रामाविण मज चैन पडेना ।
नाहीं जिवासी आराम ॥३॥

एका जनार्दनीं पाहुनी डोळा ।
स्वरूप तुझें घनश्याम ॥४॥

_____________________________________________________________________________

।।कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल।।

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल ।
कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥कानडा विठ्ठल नामें बरवा ।
कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥

कानडा विठ्ठल रूपे सावळां ।
कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥

कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी ।
कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥

कानडा विठ्ठल कानडा बोले ।
कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥

वेधियेलें मन कानड्यानें माझें ।
एका जनार्दनीं दुजें नाठवे चि ॥६॥

_____________________________________________________________________________

।।काया ही पंढरी आत्मा।।

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥

_____________________________________________________________________________

।।कुणीतरी सांगा गे।।

कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥

हाती घेउनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल ।
होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥

माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण ।
त्याला ह्मणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥

एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय ।
कृष्णा जाणावें तें काय । कोणी तरी सांगा गे ॥४॥

_____________________________________________________________________________

।।खांद्यावरी घोंगडी हातामध्ये।।

खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । घेउनिया चारीतसे धेनु सावळां ॥१॥

राधे तुझा मुकुंद मुरारी । वाजवि वेणू नानापरि ॥२॥

सकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती ।
तो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥

एका जनार्दनी रचिले रासमंडळ । जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदले ॥४॥

_____________________________________________________________________________

।।गुरु परमात्मा परेशु।।

गुरु परमात्मा परेशु ।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥देव तयाचा अंकिला ।
स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥

एका जनार्दनी गुरु देव ।
येथें नाहीं बा संशय ॥३॥

_____________________________________________________________________________

।।जया म्हणती नीचवर्ण।।

जया म्हणती नीचवर्ण । स्‍त्री शुद्रादि हीनजन ॥१॥

सर्वाभूतीं देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥

नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥

तया नाहीं का जनन । सवेंचि होत पतन ॥४॥

नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥

_____________________________________________________________________________

।।दादला नको ग बाई।।

बया बया बया !
काय झालं बया ?दादला नको ग बाई
मला नवरा नको ग बाई !

मोडकंच घर, तुटकंच छप्पर
पन र्‍हायाला जागा नाही
मला दादला नको ग बाई !

फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी
पन शिवायला दोरा न्हाई
मला दादला नको ग बाई !

कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
वर तेलाची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !

एका जनार्दनी समरस झाले
पण तो रस येथे नाही
मला दादला नको ग बाई !

_____________________________________________________________________________

।।देवासी तो पुरे एक।।

देवासी तो पुरे एक प्रेमभाव ।
पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥मनापासूनियां करितां कीर्तन ।
आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥

रामकृष्णहरी उच्चार सर्वदा ।
कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥

एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास ।
सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥

_____________________________________________________________________________

।।देह शुद्ध करुनी।।

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥साधनें समाधी नको पां उपाधी ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

ह्मणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

_____________________________________________________________________________

।।नको वाजवू श्रीहरी।।

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रेखुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ
जल स्थिरावली

घागर घेऊन पाणियासी जाता
डोईवर घागर पाझरली
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गौळण घाबरली

_____________________________________________________________________________

।।भाव तोंचि देव।।

भाव तोंचि देव भाव तोंचि देव ।
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥भाव भक्ति फळे भावें देव मिळे ।
निजभावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥

भावचि कारण भावचि कारण ।
यापरतें साधन नाहीं नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।
मनोरथ कोडी पुरती तेथें ॥४॥

_____________________________________________________________________________

।।माझे माहेर पंढरी।।

माझे माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरी ॥१॥बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलीक राहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगू ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करितसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनी शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

_____________________________________________________________________________

माझ्या मना लागो छंद

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणो देह ब्रह्मरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥

गोविंद हा जनी-वनी ।
ह्मणे एका जनार्दनी ॥४॥

_____________________________________________________________________________

।।या पंढरीचे सुख।।

या पंढरीचे सुख पाहतां डोळां ।
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ह्मणोनियां मन वेधलें चरणीं ।
आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।
करी वोवाळणी शरीराची ॥३॥

_____________________________________________________________________________

।।येथोनी आनंदू रे।।

येथोनी आनंदू रे आनंदू ।
कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥महाराजाचे राऊळी ।
वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज झाली ।
प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनी नाम ।
पाहता मिळे आत्माराम ॥४॥

_____________________________________________________________________________

।।राम नाम ज्याचें मुखी।।

राम नाम ज्याचें मुखी ।
तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥राम नाम वदता वाचें ।
ब्रह्म सुख तेथें नाचे ॥२॥

राम नामें वाजे टाळी ।
महादोषां होय होळी ॥३॥

राम नाम सदा गर्जे ।
कळी-काळ-भय पाविजें ॥४॥

ऐसा राम नामी भाव ।
तया संसाराची वाव ॥५॥

आवडीने नाम गाय ।
एका जनार्दनी वंदी पाय ॥६॥

_____________________________________________________________________________

।।रूपे सुंदर सावळा।।

रूपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥

गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥

एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

_____________________________________________________________________________

।।वारियाने कुंडल हाले।।

वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥१॥

राधा पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी ॥२॥

फणस जंबीर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ॥३॥

हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥

ऐसी आवडी मिनली दोघां । एकरूप झाले अंगा ॥५॥

मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥६॥

_____________________________________________________________________________

।।विठ्ठलावांचुनीं आणिकाचे।।

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान ।
नाहीं आह्मां चिंतन दुजियांचे ॥१॥आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत ।
कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म ।
विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला ।
भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

_____________________________________________________________________________

।।विंचू चावला।।

सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कारअग, ग.. विंचू चावला
देवा रे देवा.. विंचू चावला
आता काय मी करू.. विंचू चावला

अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?

काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला

मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं
सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची

या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.

सत्त्वगुण लावा अंगारा, अन्‌ विंचू इंगळी उतरे झरझरा

सत्य उतारा येऊन
अवघा सारिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने

_____________________________________________________________________________

।।सत्वर पाव ग मला।।

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥

सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥

सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥

जाऊ माझी फडाफडा बोलति । बोडकी कर गं तिला ॥४॥

नणंदेचं पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥

दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥६॥

एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥७॥

_____________________________________________________________________________

।।ॐकार स्वरूपा सद्गुरू।।

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥

सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥

एका जनार्दनी गुरू परब्रह्म ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥

_____________________________________________________________________________

कृषी क्रांती 

संत एकनाथ गीत १

ref:bookstruck 

संत एकनाथ गीत संत एकनाथ गीत  संत एकनाथ गीत 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *