संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा

कुंभकर्णाला जागृत करतात

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दुःखित मनःस्थितीमध्ये रावणाचे आगमन :

श्रीरामासीं करितां रण । रणीं भंगला रावण ।
लज्जायमान अति उद्विग्न । आला आपण लंकेसीं ॥ १ ॥

स प्रविश्य पुरीं लंका रामबाणभयार्दितः ।
भग्नदर्पस्तदा राजा बभूव व्यथितेंद्रियः ॥१॥
मातंग इव सिंहेन गरुडेनेव पन्नगः ।
अमिभूतोऽभवद्राजा राघवेण महात्मना ॥२॥
ब्रह्मदंडप्रतीकानां विद्युत्सदृशवर्चसाम ।
स्मरन्‍राघवबाणानां विव्यथे राक्षसेश्वरः ॥३॥

हीन दीन लज्जायमान । राजा प्रवेशे लंकाभुवन ।
आठवितां श्रीरामबाण । धाकेंचि प्राण निघों पाहे ॥ २ ॥
जैसा विजेचा लखलखाट । तैसा बाणांचा कडकडाट ।
श्रीरामबाणें दशकंठ । धाकें यथेष्ट धाकत ॥ ३ ॥
ब्रह्मदंडा न चले निवारण । तैसे अनिवार श्रीरामबाण ।
तिहीं बाणीं त्रासिला रावण । आक्रंदे पूर्ण अति धाकें ॥ ४ ॥
सिंह मदगजा रवदळी । गरुड सर्पा करी चिरफळी ।
तेंवी श्रीरामबाणजाळीं । त्रासें तळमळी लंकेश ॥ ५ ॥
वीर्य शौर्य रणसाटोप । रावणाअंगी खटाटोप ।
देखोनि श्रीरामप्रताप । भग्नदर्प लंकेश ॥ ६ ॥
रणीं भेदरला रावण । रातीं वोसणाये आपण ।
आले आले श्रीरामबाण । माझा प्राण घ्यावया ॥ ७ ॥
जागृत स्वप्न सुषुप्ति अवस्थां । श्रीरामभय लंकानाथा ।
आणीक कांहीं नाठवे चित्ता । भयार्तत संत्रस्त ॥ ८ ॥
सुख नाहीं सुमनसेजेसीं । सुख नाहीं स्त्रीभोगापासीं ।
श्रीरामभय रावणासीं । अहर्निशीं संतप्त ॥ ९ ॥

स कांचनमयं दिव्यमाश्रित्य परमासनम् ।
अवेक्षमाणःसचिवान्‍रावणो वाक्यमब्रवीत् ॥४॥
सर्वं तत्खलु मोघं मे यत्तप्तं परमं तपः ।
इंद्रेण यः समानोऽहं मानुषेण पराजितः ॥५॥
देवदानवगंधवैर्यक्षराक्षसपन्नगैः ।
अवध्यत्वं मया प्राप्तं परिभूतास्तु मानुषाः ॥६॥
सत्यं बिभीषणेनोत्कं यत्तद्वाक्यं महात्मना ।
मया दर्पबलोत्सेकादन्यथा चिंतितं तदा ॥७॥
तदिदं मामनुप्राप्तं बिभीषणवचः शुभम् ।
तस्य प्रत्युतवाक्यस्य नान्यथा जातु सांप्रतम् ॥८॥

रावणाची लज्जास्पद स्थिती :

रावण लज्जान्वित मनीं । बैसला हेमसिंहासनीं ।
ज्या सिंहसनाच्या महिमानीं । येती लोटांगणीं सुरवर ॥ १० ॥
ते आसनमहिमा समस्त । रामें केली हताहत ।
ते आसनीं लंकानाथ । अति सचिंत अनुतापी ॥ ११ ॥
इंद्रादिक सुरगण । नित्य माझे बंदीजन ।
श्रीरामें त्या मज करितां रण । तृणासमान मज केलें ॥ १२ ॥
माझी पाहतां आंगवण । चळीं कांपती सुरगण ।
त्या मज मनुष्यासीं करितां रण । तृणासमान मज केलें ॥ १३ ॥
इंद्रादिक सुरगण । निवातकवच दैत्य गण ।
दानव मानव करितां रण । अवध्य रावण मी सर्वथा ॥ १४ ॥
यक्ष गंधर्व विद्याधर । किंपुरुषादि पन्नग विखार ।
त्यांसी युद्ध करितां घोरांदर । दशशिर अवध्य ॥ १५ ॥
ऐसा अवध्य मी रावण । श्रीरामेंसीं करितां रण ।
मज केले फल्गुसमान । घेईल प्राण बाणें एकें ॥ १६ ॥
मज देवोनि जीवदान । रामें सोडिलें आपण ।
तो मज जरी विधिता बाण । जाता प्राण निमेषार्धे ॥ १७ ॥
सत्य बोलिला बिभीषण । राम बाणें घेईल प्राण ।
ते मज प्रतीति आली पूर्ण । करितां रण रामासीं ॥ १८ ॥
बिभीषणहितवाक्यार्थ । तें मी न मानींच गर्वोन्मत्त ।
तें मज आतां जालें प्राप्त । रण प्राणांत श्रीरामें ॥ १९ ॥
माझा बिभीषण येथें असता । तरी तो चुकविता आघाता ।
काय म्यां करावें आतां । परम चिंता मज वाटे ॥ २० ॥
चिंतेनें होतां अति उद्विग्न । आठवला कुंभकर्ण ।
त्यासी उठवावया रावण । धाडी आपण प्रधानसैन्या ॥ २१ ॥

स चाप्रतिमगांभीर्यो देवदानदर्पहा ।
ब्रह्मशापाभिभूतस्तु कुम्भकर्णो विबोध्यताम् ॥९॥
समरे जितमात्मानं प्रहस्तं च हतं रणे ।
ज्ञात्वा रक्षोबलं भीममादिदेश महाबलः ॥१०॥
निद्रावेशसमाविष्टः कुंभकार्णो विबोध्यताम् ।
स हि संख्ये महाबाहुः ककुदं सर्वरक्षसाम् ॥११॥
वानरान्‍राजपुत्रौ च क्षिप्रमेव हनिष्यति ।
नवसप्तदशाष्टौ च मासान्स्वीपीत राक्षसः ॥१२॥
विबोधयित्वा तं क्षिप्रं कुंभकर्ण महाबलम् ।
भविष्यति न मे शोकः कुंभकर्णे विबोधिते ॥१३॥

रावणास कुंभकर्णाची आठवण होते :

कुंभकर्ण आर्तुबळी । शिघ्र उठवा रे ये काळी ।
राक्षस मारिले महाबळी । रणकल्लोळीं वानरीं ॥ २२ ॥
वानरीं करुन कंदन । विरुपाक्ष अकंपन ।
प्रहस्त मारिला प्रधान । जो जीवप्राण लंकेशा ॥ २३ ॥
श्रीरामासीं रावण । संमुख साटोपें करितां रण ।
घायें केला तृणासमान । हीन दीन मशकत्वें ॥ २४ ॥
ऐसें सांगोनि निर्वाण । शीघ्र उठवा कुंभकर्ण ।
तो मारुन राम लक्ष्मण । आमचे प्राण राखील ॥ २५ ॥
कुंभकर्ण बळिया बळी । भिडतभिडतां रण कल्लोळीं ।
राम सौ‍मित्र सगळे गिळी । करील होळी वानरां ॥ २६ ॥
कुंभकर्णाची रण्व्युत्पत्ती । आम्हां आहे परम विश्रांती ।
तो उठवावा शिघ्रगती । लंकापति सांगत ॥ २७ ॥
निवारावया वानरविघ्न । प्रबोधावया कुंभकर्ण ।
सैन्य सेनानी प्रधान । शीघ्र रावण पाठवी ॥ २८ ॥
ब्रह्मशापाची संपूर्ण । कुंभकर्णा निद्रा दारुण ।
त्यासी प्रबोधावया रावण । धाडी आपण प्रधानसेना ॥ २९ ॥
प्रथमप्रबोध सात मास । कदाचित लागती आठ मास ।
तेव्हां केव्हां नवमास । एक वेळ दशमास लोटले ॥ ३० ॥
उरीं आदळलें मरण । अद्यापि सुखनिद्रा कोण ।
शीग्र उठवा कुंभकर्ण । स्वयें रावण गर्जत ॥ ३१ ॥
शक्रशिवतुल्य बळ यासीं । उपयोगा न ये गा या समयासीं ।
व्यर्थ पोषिलें मांसराशीं । रावण आवेशीं गर्जत ॥ ३२ ॥

तेऽपि तद्वचनं श्रुत्वा राक्षसेद्रस्य राक्षसाः ।
जग्मुः परमसंभ्रांताः कुंभकर्णनिवेशनम् ॥१४॥
तस्य निःश्वासवातेन कुंभकर्णस्य राक्षसाः ।
बलबंतोऽपि पुरतः स्थातुं नाशन्कुवंस्तदा ॥१५॥
कुंभकर्णस्य निःश्वासैरवधूता महाबलाः ।
अतिप्रमाणाः कृच्छ्रेण यत्‍नाप्रविविशुर्गृहान् ॥१६॥
ऊर्ध्वरोमांचिततनुं श्वसंतामिव पन्नगम् ।
ददृशुनैर्‍ऋतव्याघ्राः शयानं भीमविक्रमम् ॥१७॥
भीमप्राणबलं भीमं पातालविपुलाननम् ॥१८॥

कुंभकर्णाला निद्रेमधून उठविण्याची आज्ञा :

ऐकोनि रावणांचे उत्तर । प्रधान सेनानी निशाचर ।
प्रबोधावया कुंभकर्ण । अवघे सत्वर निघाले ॥ ३३ ॥
अश्वसंभार गजघट । रथ चालिले घडघडाट ।
प्रबोधावया कुंभकर्ण स्पष्ट । वीर वरिष्ठ चालिले ॥ ३४ ॥
कुंभकर्णगृहाआंत । रिघता राक्षस समस्त ।
अवघे चळचळां कांपत । जीवीं धुकधुक धाकती ॥ ३५ ॥
पाताळतळविवरदरा । तैसें वदन निशाचरा ।
काळें करुं शके अंधारा । तैसी शरीरा काळिमा ॥ ३६ ॥

कुंभकर्णाची निद्रितावस्था :

काळें करुं शके काजळा । ऐसा सबाह्य निखळ काळा ।
ना तो कोळशियाचा घडला पुतळा । किंवा ओतिला मोढ्याचा ॥ ३७ ॥
राक्षस येतां द्वारप्रती । शतानुशत श्वासानुवर्ती ।
आवर्ती पडले हस्ती । येती जाती निःश्वासीं ॥ ३८ ॥
नासिकरंध्रामाझारीं । अडकलीं आरडती कर्‍हीं ।
म्हैसे गुंतले त्यामाझारी । निर्गम बाहेरी पुरेना ॥ ३९ ॥
निःश्वासाचा तीव्र वारा । अश्वपदातिरथकुंजरां ।
वेगें उडविले अंबरा । भोंवती गरगरां आकाशीं ॥ ४० ॥
राहतां त्याच्या मुखासंमुख । जो तो पावे असुख ।
अवघे जाले पराङ्मुख । प्रबोधीं दुःख राक्षसां ॥ ४१ ॥
राक्षसीं करोनि अति यत्‍न । चुकवोनि त्याचें श्वासावर्तन ।
प्रयासें प्रवेशले भवन । प्रबोधन करावया ॥ ४२ ॥
तिखट शस्त्रें तेजाळीं । तैशा ऊर्ध्व रोमावळी ।
हात लावितां सर्वांगफळीं । कोणी जवळीं येऊं न शके ॥ ४३ ॥
भयानक प्राणपरिचार । भयानक शरीरभार ।
भयानक मुख अत्युग्र । भासे क्रूर सर्वांसी ॥ ४४ ॥
कुंभकर्णाची क्षुधा दारुण । सिद्ध भक्ष्य नसतां जाण ।
भक्षील अवघे लंकाभुवन । यालागीं भक्षण रावण धाडी ॥ ४५ ॥

तत्रोपजहृः क्षिप्रं ते कुंभकर्णाग्रतस्तदा ।
भूतानां मेरुसंकाशं राशिं परमतर्पणम् ॥१९॥
मृगाणां महिषाणां च वराहाणां च संचयान् ।
चक्रुर्नैऋतशार्दूला राशिमन्नस्य चाद्‍भुतम् ॥२०॥
ततः शोणितकुंभांश्च मांसानि विविधानि च ।
परस्तात्कुंभकर्णस्य चक्रुस्त्रिदशशत्रवः ॥२१॥

गंधं माल्यं तथा पानं भक्ष्यं चादाय सत्वरम्।
आसाद्य भवनं तस्य विविशुस्ते नृपाज्ञया॥२२॥

कुंभकर्णाला जागृत करण्यासाठी रावणाची योजना :

पक्वान्नांचे डोंगर । अन्नांचे गिरिवर ।
स्वयं रिचवी दशशिर । क्षुधा दुर्धर कुंभकर्णा ॥ ४६ ॥
अन्नें तृप्ति नव्हे कुंभकर्णांसीं । मृग वराह मेंढे महिषांसी ।
बहु कळपांसी असंख्य ॥ ४७ ॥
मद्याचे कोटिकोटि घट । तैसेचि अशुद्धाचे लोट ।
शीघ्र धाडी दशकंठ । कुंभकर्णाचे तृप्तिलागीं ॥ ४८ ॥
कुंभकर्णासी समाधान । द्यावयालागीं दशानन ।
तांबूलादि सुमनचंदन । धाडी आपण सुखार्थ ॥ ४९ ॥
भक्ष्य भोज्य अन्नपान । घेवोनियां प्रधान ।
प्रवेशले कुंभकर्ण भवन । कंपायमान अति धाकें ॥ ५० ॥

कुंभकर्ण महानिद्रं बोधनाय प्रचक्रिरे ।
जलदा इव उन्नेदुर्यातुधानास्ततस्ततः ॥२३॥
बिभीदुश्चास्य गात्राणि घ्नंतोऽतिव्यनदंस्तथा ।
कुंभकर्णविबोधार्थ चक्रुस्ते विपुलं स्वनम् ॥२४॥
उष्ट्रान्खरान्हयान्नागान्जघ्नुर्दडकशांकुशैः ।
भेरीशंखमृदंगांश्च सर्वप्राणैरवादयन् ॥२५॥
निजघ्नुश्चास्य गात्राणि महाकाष्ठकटंकरैः ।
मुद्ररैर्मुशलैश्चैव सर्वप्राणसमुद्यतैः ॥२६॥

कुंभकर्णाला उठविण्याचा प्रयत्‍न :

कुंभकर्णनिद्रा घोरांदर । त्यासी बोधावया निशाचर ।
मेघ गडगडे ऐसा गिरागजर । करिती समग्र महानदीं ॥ ५१ ॥
टाळ घोळ मृदंग भेरी । गिडबीडीं वाजती अति गजरीं ।
शंख वाहिले निशाचरीं । दिधल्या असुरीं आरोळ्या ॥ ५२ ॥
अंकुशें गज किरकिरती । दंडें उष्ट्र आरडती ।
दीर्घ स्वरें खर भुंकती । अश्व हिंसती समकाळें ॥ ५३ ॥
अश्व गज खर उष्ट्र । हाक देतां निशाचर ।
कुंभकर्णनिद्रा आसुर । प्रबोधपर तो नव्हे ॥ ५४ ॥
असुर खळबळले अत्यंत । काष्ठ तरटें टोणपेघात ।
एक मुसळ वरी घालित । एक हाणित गदाप्रहारें ॥ ५५ ॥
एक हाणिती गुडघे कोंपर । एक लाताविती त्याचें शरीर ।
एक ते हाणिती मुद्‌गर । एक ते दुर्धर देती बुक्या ॥ ५६ ॥
एक त्यावरी अति तांतडीं । सर्वशक्तीं घालिती उडी ।
एक काष्ठें घालोनियां बुडीं । आपल्या प्रौढीं उचलिती ॥ ५७ ॥

ततः सहस्त्रं भेरीणां युगपत्समहन्यत ।
तद्रक्षो बोधयिष्यंतश्चक्रुरन्ये पराक्रमान् ॥२७॥
केशान्प्रलुलुपुश्चान्ये कर्णानन्ये दशंति च ।
अन्ये च बलिनस्तस्य कूटमुद्ररपाणयः ॥२८॥
मुर्घ्नि वक्षसि गात्रेषु निर्दयं समपातयन् ।
दशराक्षससाहस्रं जघ्नर्भीमपराक्रमाः ॥२९॥
राक्षसानां सहस्रं तु शरीरेऽस्य प्रधावति ।
कुंभकर्णस्तदा सुप्तो नैव संप्रत्यबुध्यत ॥३०॥
ततो गजसहस्रं तु शरीरे संप्रधावति ।
स हन्यमानोऽपि तदा न चाबुध्यत राक्षसः ॥३१॥

कुंभकर्णाला जागृत करण्याचा राक्षसांचा प्रयत्‍न :

सहस्रभेरीनादकल्लोळ । त्राहाटिल्या समकाळ ।
ब्रह्यशापें निद्रा प्रबळ । नव्हे अळुमाळ प्रबोध ॥ ५८ ॥
प्रबोध न पवे कुंभकर्ण । तेणें क्षोभोनि राक्षसगण ।
दीर्घ मुद्‌गर घेवोनि जाण । घाय दारुण हाणिती ॥ ५९ ॥
उरी शिरीं सर्व गात्रीं । घाय हाणिजेती निशाचरीं ।
कुंभकर्णा निद्रा भारी । प्रबोध न धरी आघातें ॥ ६० ॥
पिसा वळवळती अंथरुणीं । तैसीं राक्षसांचीं मारणीं ।
कुंभकर्ण तें कांहीं न मानी । सुखशयनीं सुषुप्ती ॥ ६१ ॥
एक झोंटी धरोनि आंसुडिती । एक केशांतें ओढिती ।
एक रागें कानीं डसती । तरी सुषुप्ती भंगेना ॥ ६२ ॥
दहा सहस्र वीर विख्यात । विक्रमें शरीर लोटित ।
तेणें कुंभकर्णा ऐसें होत । पोटकुल्या होत सुखनिद्रा ॥ ६३ ॥
रावणा सांगती निशाचर । प्रयत्‍न करितां घोरांदर ।
जागा न होय कुंभकर्ण वीर । तेणें दशशिर क्षोभला ॥ ६४ ॥
शरीर दडपितां संभार । जागा होईल कुंभकर्ण वीर ।
गज दिधले सहस्रें सहस्र । शरीरभारें दडपावया ॥ ६५ ॥
निद्राप्रबोधनीं अति चतुर । भरंवसियाचे सहस्र वीर ।
रावणें धाडिले प्रबोधकर । देहीं निरंतर धांवावया ॥ ६६ ॥
देहीं निरंतर धांवतां । प्रबो न होय कुंभकेता ।
या काकुलती लंकानाथा । होय धाडिता गजांसी ॥ ६७ ॥
कुंजर आणि निशाचर । धांवतां कुंभकर्णशरीर ।
तेथें जालें चरित्र । अति विचित्र तें ऐका ॥ ६८ ॥
कुंभकर्णरोमावळीआंत । गज हरपले महावतांसहित ।
उदय अस्त न कळे तेथ । परिभ्रमत घोर वनीं ॥ ६९ ॥
पुढिलां मागील न देखती । मागिलां पुढील न दिसती ।
रोमांमाजी अति भ्रांतीं । परिभ्रमती अवासवा ॥ ७० ॥
पुढें मार्ग न दिसे स्पष्ट । मार्ग परतावया न कळे वाट ।
महावतेंसीं गजघट । पावती कष्ट चालतां ॥ ७१ ॥
गज निर्बुजले किरकिरती । महावतें हाका देती ।
धांवण्या कोणी तेथें न पवती । परिभ्रमती अति दुःखी ॥ ७२ ॥
न धरत न सांवरत । बुडाले नाभीं महागर्त ।
गज पडिले असंख्यात । त्यांसी प्राणांत तेथेंचि ॥ ७३ ॥
गज चालतां अंगावरी । म्हणती मर्दन अति चतुरी ।
निदसुरिया हाणितां तोंडावरी । महामारी असंख्य ॥ ७४ ॥
गजसैन्य देतां हाक । परतावया न सरे मुख ।
निर्बुजोनि एकाएक । गज निःशेख निमाले ॥ ७५ ॥
कुंभकर्णाच्या अंगावरी । असंख्य गजां जाली बोहरी ।
तरी जागा नव्हे विवरीं । निशाचरीं आकांत ॥ ७६ ॥
सहस्र वीर बळेंघले त्याच्या अंगावरी । अवघे येतां उरावरी ।
लोमांमाझारी अडकले ॥ ७७ ॥
पूर्व पश्चिम ते कोण । न कळे उत्तर दक्षिण ।
पुढारां केउतें गमन । पुनरागमन लक्षेना ॥ ७८ ॥
सैरा धांवती निशाचरी । पडिले दोहीं काखेमाझारी ।
कांखवळा पैं भीतरीं । राक्षसहारी निमाल्या ॥ ७९ ॥
एक संमुख हृदयावरी । पडिले श्वासोच्छ्वासयंत्री ।
येत जात नासांरध्रीं । वायुचक्रीं विगुंतले ॥ ८० ॥
ऐसे शिणतां राक्षसगण । जागा नव्हे कुंभकर्ण ।
मग उपाव मांडिला कोण । सुक्ष्म सान तो ऐका ॥ ८१ ॥
कुंभकर्णप्रबोधार्थ । मांडिलें स्त्रियांचे अनुगीत ।
त्याही गीताचा वृत्तांत । सावचित्त अवधारा ॥ ८२ ॥

प्रमदाश्चागतास्तत्र संमृष्टमणिकुंडलाः ।
नागराक्षसकन्याश्च तथा गंधर्वकन्यकाः ॥३२॥
मनुजानां दुहितरः किन्नराणां तथैव च ।
प्रविष्टा भवनं रम्यं तप्तकांचनकुट्टिमम् ॥३३॥
ता स्त्रियो गीतवादित्रैः कुंभकर्णाग्रतः स्थिताः ।
दिव्यादिव्यैरलंकारैदिंव्यधूपेन धूपिताः ॥३४॥

कुंभकर्णाच्या जागृतीसाठी नागकन्या व गंधर्व कन्यांची योजना :

कुंभकर्णप्रबोधना । करावया संगीतगायना ।
नागकन्या गंधर्वकन्या । राजकन्या आणविल्या ॥ ८३ ॥
गावों जाणती नाना कुसरीं । किन्नरी आणि खेचरी ।
कुंभकर्णमंदिरामाझारी । त्वरेंकरीं आणविल्या ॥ ८४ ॥
कन्या आणिल्या सालंकार । हेमभूमिका हेममंदिर ।
तेथें पहुडला निशाचर । घोर अंबर गर्जत ॥ ८५ ॥
त्याच्या घोरापुढें स्त्रीगायन । होवोनि गेलें तृणासमान ।
तें देखोनि दशानन । उपाव आन आरंभी ॥ ८६ ॥

रंभा, मेनका व उर्वशी यांचा प्रयत्‍न :

घृताची रंभा मेनका । नारायणदत्त उर्वशी देखा ।
तिसीं मुख्यत्व देवोनि देखा । अष्टनायिका आणिल्या ॥ ८७ ॥
त्यांसी सांगे दशानन । तुम्हीं प्रबोधावा कुंभकर्ण ।
नाहीं तरी नाक कान छेदिन । त्यावरी दंडीन खरारोहीं ॥ ८८ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । अप्सरा जाल्या कंपायमान ।
कुंभकर्णाचें भवन । गेल्या ठाकोन प्रबोधा ॥ ८९ ॥
सज्जोनि वीणा श्रुतिसन्नद्ध । रागानुरागीं साधिला नाद ।
गातां विविध बोधप्रबंध । नव्हे प्रबोध कुंभकर्णा ॥ ९० ॥
कुंभकर्ण घोरे दारुण । त्यापुढें कळाविचित्र गायक ।
अवघें गेलें हारपोन । जेंवी भानूपुढें खद्योत ॥ ९१ ॥
सकळ कळा जाली क्षीण । प्रबोध न पवे कुंभकर्ण ।
तेणें घृताची रंभा मेनका जाण । अति उद्विग्न भयभीत ॥ ९२ ॥
नुठवितां कुंभकर्ण । स्त्रीदेहासीं विटंबन ।
रावण छेदील नाक कान । खरारोहण अपमान ॥ ९३ ॥
ऐसें देखोनियां विघ्न । उर्वशी जाली सावधान ।
निजात्ममूळ जो नारायण । त्याचे स्तवन आदरिलें ॥ ९४ ॥
उर्वशी नारायणनिजशक्ती । कृपेनें धाडिली स्वर्गाप्रती ।
तीच नारायणाची स्तुती । अनुतापवृत्तीं अनुवादे ॥ ९५ ॥
भूतीं भूतात्मा परात्पर । तुझिये सत्ता प्राणप्रचार ।
निमेषोन्मेषांचा व्यापार । तुझेनि साचार चालतो ॥ ९६ ॥
भूतीं भूतात्मा तो वेदोक्त । भूतां सबाह्य तूं भगवंत ।
तुझेनि भूतें विधियुक्त । सदा वर्तत निजकर्मी ॥ ९७ ॥
तूं मनाचें उन्मन । तूं बुद्धीचें समाधिधन।
तूं अभिमानीं निरभिमान । चित्तास चिंतन तुझेनि ॥ ९८ ॥
तूं प्राणाचा निज प्राण । तूं जीवाचा जीव आपण ।
प्रबोधावया कुंभकर्ण । कृपा संपूर्ण करावी ॥ ९९ ॥
प्रबोधोनि कुंभकर्ण । निवारावे माझें विघ्न ।
ऐसें ऐकतां विज्ञापन । श्रीनारायण तुष्टला ॥ १०० ॥
अंतर्यामीं श्रीनारायण । ऐकतां उर्वशीगायन ।
चेतवी असुराचा प्राण । चेतना संपूर्ण चेतविली ॥ १ ॥
घोर गर्जत धांवे प्राण । तो अंतर्यामीं आंवरुन ।
हृदयीं आणोनि आपण । दशधा संपूर्ण स्थापिला ॥ २ ॥
प्राणपरिचारप्रयुक्ती । चेतना जे चिच्छत्की ।
तेणें चेतविल्या इंद्रियवृत्ती । देहस्फूर्ती आठवली ॥ ३ ॥

गीरवादिवशब्देन खरेण मधुरेण च ।
दिव्येन चैव गांधर्वस्वरेण विविधेन च ॥३५॥
विबुद्धः कुंभकर्णोऽसौ भीमो भीमपराक्रमः ।
तस्य जाजृंभमाणस्य वक्त्रंपातालसन्निभम् ॥३६॥
ददृशे मेरुशृंगाग्रे दिवाकर इवोदितः ।
राक्षसारत्वरितं जग्मुर्दशग्रीवनिवेशनम् ॥३७॥
तेऽभिगम्य दशग्रीवमासीनं परमासने ।
ऊचुर्बद्धांजलिपुटाः सर्व एव निशाचराः ॥३८॥
प्रबुद्धः कुंभकर्णौ वै भ्राता ते राक्षसेश्वरः ॥३९॥

कुंभकर्णाला जागृती :

देहस्फुर्तीचेनि कैवाडें । उघडी नेत्रांची कवाडें ।
श्रवणाचें टाळें उघडे । वाचा निवाडें वदे स्पष्ट ॥ ४ ॥
प्राण परिचारितां घ्राणीं । सावधानता सकळ करणीं ।
बुद्धी बोद्धव्य बोधुनी । संकल्प मनीं चेतविले ॥ ५ ॥
एक निःशंक सुंदरा । चंदन चर्चिती निशाचरा ।
एक घालिती विंझणवारा । एकी राक्षसेंद्रा थापटिती ॥ ६ ॥
गीरवाद्यस्वर सुस्वर । प्रमदागायन अति मधुर ।
ऐकोनि उठिला निशाचर । अदि दुर्धर भयानक ॥ ७ ॥
उग्र क्रूर भयानकदृष्टी । चळीं कांपे पोटीं ।
प्रमदा पळाल्या उठाउठीं । सैन्य बारा वाटीं पळालें ॥ ८ ॥
जांभया देतां निशाचर । जैसें उघडलें पाताळविवर ।
तैसें मुख पसरिलें दुर्धर । अति उग्र भयानक ॥ ९ ॥
विजुतेंजें अति कडाडीं । जिव्हा लखलखित तांबडी ।
कराळ विक्राळ दाढांची जोडी । प्रळयाग्रिपाडीं सतेज दृष्टी ॥ ११० ॥
भयानक रुप भयानक दृष्टी । भयानक सर्वांगाची पुष्टी ।
परम भयानक उठिला सृष्टीं । कापतीं पोटीं सुर सिद्ध ॥ ११ ॥
प्रबोध झाला कुंभकर्णा । राक्षस सांगो येती रावणा ।
प्रवेशोनि लंकाभवना । सभास्थाना ते आले ॥ १२ ॥
सिंहासनीं दशानन । दूत घालिती लोटांगण ।
प्रबोध पावला कुंभकर्ण । कर जोडून सांगती ॥ १३ ॥
उर्वशीचा चमत्कार । वीणा सज्जोनि सुस्वर ।
प्रबोधिला निशाचर । महावीर कुंभकर्ण ॥ १४ ॥

कुंभकर्णाला दूतांकरवी रावणाची आज्ञा :

रावण सांगें दूतांसी । परम क्षुधा कुंभकर्णासी ।
तृप्तिभोजन देवोनि त्यासी । मजपासीं मग आणावा ॥ १५ ॥
शिघ्र न पवे अन्नाअहार । पुढें पाठविला फलाहार ।
मेष वराह जंबूक उष्ट्र । कळप अपार गीळित ॥ १६ ॥
मेंढरें घालितां मुखांत । कानावाटे निघती मेमत ।
एक तीं गेलीं उशींत । तेणें शिंकत सटसटां ॥ १७ ॥
शेंबुडाच्या बेडक्यांत । राक्षस दडपती असंख्यात ।
रावणाचे सभेआंत । शेंबूडपर्वत वीरांवरी ॥ १८ ॥
कुंभकर्णाच्या शेंबुडात । सभा जाहली सचैल स्नान ।
तरी तो नव्हे तृप्त । मृगे भक्षित चितळेंसीं ॥ १९ ॥
कर्‍हीं घशांत आरडत जात । वराह गिळी ओरडत ।
रानम्हैसे घशांत जुंझत । थडके देत कळप गिळी ॥ १२० ॥
हस्ती सांपडल्या हातातळीं । ध्वजा पताका महावतेंसीं गिळी ।
रावण शंकला ते काळी । करील होळी लंकेची ॥ २१ ॥

द्रष्टुमिच्छति ते राजा सर्वराक्षसपुंगवः ।
कुंभकर्णः सुदुर्धर्षो भ्रातुराज्ञाय शासनम् ॥४०॥
तथेत्युक्त्वा महावीर्यः शयनादुत्पपात सः ।
प्रक्षात्य वदनं हृष्टः स्रातः परमभूषणः ॥४१॥

कुंभकर्णाला दूतांचा संदेश :

दूरोनि सांगती दूत । लंकेश भेटीसीं वाट पहात ।
ज्येष्ठाज्ञा मानोनि समर्थ । उठिला त्वरित कुंभकर्ण ॥ २२ ॥
कुंभकर्ण सभे अत्युग्र । सर्वार्थी गमे क्रूर ।
भ्रातृआज्ञेचा किंकर । मानी उक्त सर्वस्वें ॥ २३ ॥
मुख प्रक्षाळितां तेथ । गरळीसवें शतानुशत ।
राक्षस वाहों वाहून जात । चाळीं कांपत सेवक ॥ २४ ॥
गरळीच्या पुराआंत । तारुं घालोनि वीर काढित ।
अमित बुडाले जेथीचे तेथ । आणिले असंख्यात लावोनि कांसे ॥ २५ ॥

पिपासुरत्वरयामास पानं मद्यसमान्वितम् ।
ततस्तु त्वरितास्तस्य राक्षसा रावणाज्ञाया ॥४२॥
मद्यं भक्ष्यांश्च विविधान्क्षिप्रमेवानयंस्तदा ॥४३॥

कुंभकर्णाची क्षुधाशांती :

पशु भक्षितां असंख्यात । कुंभकर्ण जाला तृषित ।
मद्याचे घट अमित । मुखीं रिचवित अति त्वरा ॥ २६ ॥
मुखीं रिचवितां सहस्र घट । त्यांचा होय एक घोंट ।
कुंठ वाजे घडघडाट । हृदयस्फोट राक्षसां ॥ २७ ॥
ते संधी अति तांतडीं । असंख्य पक्वान्नपरवडी ।
लागवेगें रावण धाडी । राक्षसकोडी धांवत ॥ २८ ॥
ओदनाचे गिरिवर । शिड्या लावोनि निशाचर ।
स्वयें रिचविती पर्वताकार । तैसेच डोंगर पक्वान्नांचे ॥ २९ ॥
बाप कुंभकर्णाची थोरी । एकचि घांसे गटका करी ।
तृप्ति दिसेना पुढारीं । निशाचरीं आकांत ॥ १३० ॥
तृप्ति न पुरे कुंभकर्णा । धाक राक्षसां आणि रावणा ।
बुद्धि आठवली दशानना । मांसभोजना उपपादी ॥ ३१ ॥

प्रहर्षणार्थं मनसो दीप्तास्यो रक्तलोचनः ।
आददे क्षुधितो मांसं शोणितं तृषितोपिबत् ॥४४॥
मेदः कुंभाश्च मद्यं च पपौ शक्ररिपुस्तदा ।
ततस्तृप्त इति ज्ञात्वा समुत्पेतुर्निशाचराः ॥४५॥
शिरोमिश्च प्रणम्यैनं सर्वतः पर्यवारयन् ।
किमर्थमहमादृत्य भवद्‌भिः प्रतिबोधितः ॥४६॥
कच्चित्सुकुशलं राज्ञो भयं वा नेह किंचन॥४७॥

क्षुधेनें मुख अति विस्तीर्ण। आरक्त जिव्हा आरक्त नयन ।
तृप्ति न पवे कुंभकर्ण । धाडी रावण मांस आहार ॥ ३२ ॥
मांसपाक अति चोखट । मैरेयक मद्य श्रेष्ठ ।
मद्याचे कोटिकोटि घट । धाडी दशकंठ आहारार्थ ॥ ३३ ॥
सुखी व्हावा कुंभकर्ण । उत्तम पदार्थ रावण ।
स्वयें धाडी साक्षेपून । हर्ष संपूर्ण व्हावया ॥ ३४ ॥
मांसमद्याचे पैं घट । कुंभकर्णे केले गट ।
तरी क्षुधेचा लवलवाट । चाटी घोट मटमटां ॥ ३५ ॥
त्यासी सांगे स्वयें रावण । रणीं ठेसले वानरगण ।
भक्षूनि श्रीरामलक्ष्मण । तृप्ति संपूर्ण पावसी ॥ ३६ ॥
मैरेयकमद्यपान । साक्षेपें करावी रावण ।
तृप्ति पावोनियां पूर्ण । कुंभकर्ण डुल्लत ॥ ३७ ॥
मैरेयकमद्यपानपरिपाठीं । कुंभकर्णा तुष्टिपुष्टी ।
हर्षे उचंबळला पोटीं । आनंद सृष्टी न समाये ॥ ३८ ॥
तृप्ति पावोनि संपूर्ण । स्वस्थ बैसला कुंभकर्ण ।
तेव्हां सेवक प्रधान । करिती नमन साष्टांगें ॥ ३९ ॥
पूर्वीं येतां क्षुक्षितापासीं । जें देखे त्यातें ग्रासी ।
स्वस्थ बैसल्या सावकाशीं । आला त्यापासीं परिवार ॥ १४० ॥
सेवक देखोनि प्रधान । त्यांसी पुसें कुंभकर्ण ।
मज उठवावया काय कारण । स्वस्थ रावण आहे कीं ॥ ४१ ॥
स्वस्थ लंकाराज्यानुबंध । स्वस्थ माझे ज्येष्ठ बंधु ।
तरी कां केला मज प्रबोधु । कार्यानुवादु मज सांगा ॥ ४२ ॥

न ह्यल्पकारणे सुप्तं प्रबोधयति माह्शम् ।
तत्कथ्यतां यथार्थेन मम बोधनकारणम् ॥४८॥
अथवा ध्रुवमन्येभ्यो भयं परमुपस्थितम् ।
यदर्थमव त्वरितैर्भवद्‌भिः प्रतिबोधितः ॥४९॥
अद्य राक्षसराजस्य भयमुत्सादयाम्यहम् ।
पोथयिष्ये महेंद्र वा भक्षयिष्यामि वाऽनलम् ॥५०॥

क्षुल्लक कारणासाठी उठविल्याने कुंभकर्णाचा कोप :

अल्पकार्याकारणें । मज नुठविजे रावणें ।
मज साक्षेपें उठवणें । तो सांगणें कार्यार्थ ॥ ४३ ॥
अतिशयेंसीं अति निर्वाण । तुम्हांसीं आलें विघ्न दारुण ।
यालागीं माझें प्रबोधन । करवी रावण साक्षेपें ॥ ४४ ॥
रावणाचें अरि वीर । इंद्र चंद्र वरुण कुबेर ।
त्यांचा करीन मी संहार । दशशिरसुखार्थ ॥ ४५ ॥
रावणशत्रूची होळी । क्षणें करीन रणकल्लोळीं ।
तरीच मी आर्तुबळी । धुरेजवळी सुबंधु ॥ ४६ ॥
रावणहिताच्या समेंळीं । प्रळयानळ सगळा गिळीं ।
मर्दीन शत्रूची समफळी । तरीच मी सुबंधु ॥ ४७ ॥

एवं ब्रुवाणं संरब्धं कुंभकर्णमरिंदमम् ।
यूपाक्षः सचिवो राज्ञः कृतांजलिरुवाच ह ॥५१॥
न नो देवकृतं किंचिद्‌भयमस्ति कदाचन ।
गंधर्वदानवेभ्यो वा भयमस्ति न नः क्वचित् ॥५२॥
यादृशं मानुषाद्राज्ञो भयं घोरमुपस्थितम् ।
वानरैः पर्वताकारैर्लंकेय परिवारिता ॥५३॥
सीताहरणदुःखार्ताद्रामान्नः परमं भयम्॥५४॥

यूपाक्ष प्रधान कुंभकर्णाला परिस्थिती सांगतो :

कोपला देखोनि कुंभकर्ण । यूपाक्ष तयाचा प्रधान ।
त्यासी विनवी कर जोडून । विघ्नचिन्ह सांगावया ॥ ४८ ॥
देव दानव गंधर्व । गरुडादि पक्षी पन्नग सर्व ।
यक्षरक्षादि स्वयमेव । त्यांपासाव भय आम्हां नाहीं ॥ ४९ ॥
घेवोनि वानराचे भार । मनुष्यावतारी श्रीरामचंद्र ।
तेणें क्षीण केला दशशिर । युद्धी दुर्धर गांजोनी ॥ १५० ॥
राघवें विंधितांचि बाण । लंकेशाचा जावा प्राण ।
रामें देवोनि जीवदान । रणीं रावण सोडिला ॥ ५१ ॥
रावणें केले सीताहरण । तेणें रागें रघुनंदन ।
दुर्धर सज्जूनियां बाण । त्याचा प्राण घेऊं पाहे ॥ ५२ ॥
तरी कृपाळु रघुनाथ । रावण सोडिला जीवें जीत ।
रणीं सांपडल्या लंकानाथ । न करीच घात श्रीराम ॥ ५३ ॥
श्रीरामापरतें सर्वथा । भय नाहीं लंकानाथा ।
ऐसें कुंभकर्ण ऐकतां । सक्रोधता गर्जिन्नला ॥ ५४ ॥

स यूपाक्षवचः श्रुत्वा भ्रातुश्च भयामागतम् ।
कुंभकर्णो विवृत्ताक्षो यूपाक्षमिदमब्रवीत् ॥५५॥
सर्वमद्यैव यूपाक्ष हरिसैन्यं सलक्ष्मणम् ।
राघवं च रणे हत्वा पाश्र्जद्‌रक्ष्यामि रावणम् ॥५६॥
तस्याथ वाक्यं वदतो निशम्य सगर्वितं रोषविवृद्धघोरम् ।
महोदरो राक्षसयोधमुख्यः कृतांजलिर्वाक्यमिदं बभाषे ॥५७॥
पश्चादपि महाबहो शत्रून्युधि विजेष्यासि ।
त्वदृर्शनपरं तावत् भ्रातरं द्रष्टुमर्हसि ॥५८॥
महोदरवचः श्रुत्वा राक्षसैः परिवारितः ।
कुंभकर्णो महातेजाः संप्रतस्थे महाबलः ॥५९॥

यूपाक्षाचे बोलणे ऐकून कुंभकर्णाचा क्रोध :

ऐकोनि यूपाक्षवचन । श्रीरामयुद्धीं दुःखी रावण ।
ऐसें ऐकता कुंभकर्ण । करावया रण खवळला ॥ ५५ ॥
मारोनियां राम लक्ष्मण । निर्दाळूनियां वानरगण ।
मग मी येईन आपण । स्वयें रावण वंदावया ॥ ५६ ॥
वानरांचें मांस शोणित । तेणें राक्षस करोन तृप्त ।
रामलक्ष्मणांचें मांस रक्त । तें मी समस्त भक्षीन ॥ ५७ ॥
रावणशत्रूसी मर्दून । रणीं करोनि दृढ बंधन ।
सुखी करोनि दशानन । मग मी येईन नमस्कारा ॥ ५८ ॥
ऐकोनि कुंभकर्णगर्जन । महोदर मुख्य प्रधान ।
स्वयें बोलिला सुलक्षण । कर जोडून तें ऐका ॥ ५९ ॥
भेटीसीं उदित दशानन । त्यांसीं भेटोनि आपण ।
त्याचे घेवोनि अज्ञापन । रणकंदन करीं सुखें॥ १६० ॥
महोदराचें युक्त वचन । ऐकतां सुखी कुंभकर्ण ।
भेटावया दशानन । निघे आपण आल्हादें ॥ ६१ ॥

उदाराणां समद्यानां तदा राक्षसपुंगवः ।
पीत्वा घटसहस्त्रे द्वे तथा भुंक्त्वा च भोजनम् ॥६०॥
सज्जकर्णान्सजठरान्महिषान्शुलपैष्टकान् ।
अष्टो पशुशतान्येव पुरुषांश्चैकविंशतिः ॥६१॥
सुंभुज्य सुमहाकायो दावग्निरिव कत्तृणम् ।
कुंभकर्णो महाबहुर्गमनायोपचक्रमे ॥६२॥
सरोषश्चोत्कटोमत्तस्तेजोबलसमन्वितः ।
सोऽगच्छद्‌भवनं राज्ञो रक्षोगणमसन्वितः ॥६३॥

भेटी जालिया रावण । अवश्य करणें पडेल रण ।
ऐसें जाणोनि कुंभकर्ण । प्राशी आपण महामद्य ॥ ६२ ॥
सहस्रें सहस्र घटांच्या हारी । रिचविती त्याच्या मुखामाझारीं ।
तैसींच लोणचीं कोशिंबिरी । भोजनोपचारीं महामद्य ॥ ६३ ॥
सांडिया कुरवंडिया पापड । लाडू तिळव्याचे जोड ।
कुंभकर्णा भोजन गोड । पुरत कोड मद्येंसीं ॥ ६४ ॥
आठ शत म्हैशियांच्या हारी । गिळिल्या कोशिंबिरीवारी ।
एकवीस सहस्त्र पशु सोपचारीं । लोणच्यावारी भक्षिले ॥ ६५ ॥
दावाग्नीमाजी पडे तृण । तें जेंवी जळे न लागतां क्षण ।
तेंवी जें जें भक्षी कुंभकर्ण । तें तें संपूर्ण करी भस्म ॥ ६६ ॥
महाबाहु कुंभकर्ण । तृप्ति होवोनि संपूर्ण ।
भेटावया स्वयें रावण । निघे आपण अति गर्वे ॥ ६७ ॥
मदोन्मत्त बळोन्मत्त । गर्वोन्मत्त अति उन्मत्त ।
ऐसा राजगृहाआंत । प्रवेशत कुंभकर्ण ॥ ६८ ॥
एका जनार्दना शरण । संमुख देखोनि रावण ।
स्वयें कुंभकर्णे आपण । लोटांगण घातलें ॥ ६९ ॥
बंधुबंधूची भेटी । दोघे सांगती गृह्य गोष्टी ।
ते ते कथेची कसवटी । सावध दृष्टीं अवधारा ॥ १७० ॥
स्वस्ति श्रीभावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
कुंभकर्णप्रबोधनं नाम विंशतितमोऽध्यायः ॥ २० ॥
ओंव्या ॥ १७० ॥ श्लोक ॥ ६३ ॥ एवं ॥ २३३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय विसावा