संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा

लक्ष्मणाकडून रावणशक्तीचा भेद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाने क्रोधाने बिभीषणावर शक्ती सोडली :

लक्ष्मणें रणाआंत । ध्वज सारथी छेदून रथ ।
रावण केला हताहत । संग्रामांत साटोपें ॥ १ ॥
रणीं लक्ष्मणें केला विरथ । तो राग न मानी लंकानाथ ।
बिभीषणें केला अश्वघात । त्यासी टपत मारावया ॥ २ ॥
लक्ष्मण झालिया परता । करीन बिभीषणाच्या घाता ।
तो सोडीना शरणागता । क्षणार्धता न विंसबे ॥ ३ ॥
धीर न धरीच रावण । परता नव्हेचि लक्ष्मण ।
बिभीषणावरी आपण । अति निर्वाण मांडिलें ॥ ४ ॥
घोडे मारितां । वेगीं रथ सांडूनि जाण ।
मारावया बिभीषण । करुनि उड्डाण धांविन्नला ॥ ५ ॥
बिभीषण देखोनियां दृष्टीं । दांत खाय सकट ओंठीं ।
त्याचे नळीचें रक्त घोटीं । ऐसा दशकंठी क्षोभला ॥ ६ ॥
एके घायें होय शांती । ऐसी अभिमंत्रून शक्ती ।
सोडिली बिभीषणाप्रती । लंकापतीं साटोपें ॥ ७ ॥
रावणें सोडितां शक्ती । लक्ष्मणें बाणावर्तीं ।
त्रिधा छेदून पाडिली क्षितीं । निजशरणार्थीं रक्षिला ॥ ८ ॥
राखावया बिभीषण । पाठीराखा लक्ष्मण ।
पाहों न शके रावण । शक्ति छेदून सांडिली ॥ ९ ॥
शक्ति छेदिली लक्ष्मणें । ऐसें देखोनि रावणें ।
दुसरी शक्ति सज्जिली तेणें । बिभीषण प्राणें घ्यावया ॥ १० ॥
बिभीषणाचा घ्यावया प्राण । दुजी शक्ति सज्जी रावण ।
निवारुं जातां लक्ष्मण । दोघे जण मरतील ॥ ११ ॥
शक्ति अनिवार्य दारुण । स्वयें तोलोनि रावण ।
अनुलक्षोनि बिभीषण । सोडी आपण अति कोपें ॥ १२ ॥
करावया बंधूची समाप्ती । घाव हाणी विसां हातीं ।
प्रळयविजुतुल्य दिप्ती । गगनी शक्ती कडाडी ॥ १३ ॥
शक्ति अनिवार्य दारुण । जाणोनियां बिभीषण ।
म्हणे माझे न वांचती प्राण । अचुक मरण मज आलें ॥ १४ ॥
बिभीषण चिंताक्रांत । तंव सौ‍मित्र पावला तेथ ।
पाठीसीं घालोनि शरणागत । अभयान्वित स्थापिला ॥ १५ ॥
बिभीषणा शरणागता । स्वयें स्मरें रघुनाथा ।
नामीं नाहीं मरणावस्था । निर्भयता श्रीरामें ॥ १६ ॥
रामनामाच्या अनुवृत्ती । दोघे स्वानंदे नाचती ।
तें देखोनि लंकापती । विस्मित चित्तीं पैं झाला ॥ १७ ॥
मी सोडिली दुर्धर शक्ती । ते मरणभय नाहीं चित्तीं ।
दोघे स्वानंदें नाचती । निर्भयास्थिती सौ‍मित्र ॥ १८ ॥
नर वानर नामांकित । मरणभया नाहीं भीत ।
तें देखोनि लंकानाथ । अति विस्मित पैं झाला ॥ १९ ॥

दोन वेळा रावणाने सोडलेल्या शक्ती लक्ष्मणाने निवारिल्या :

अगाध नामाचें महिमान । पुढील कथानुसंधान ।
श्रोतीं द्यावें अवधान । शक्तिनिवारण सौ‍मित्रें ॥ २० ॥
बिभीषणाच्या निजघातीं । रावणें सोडिली जे शक्ति ।
सौ‍मित्रें नेली भस्मांतीं । तेही युक्ती अवधारा ॥ २१ ॥
यक्षिणीवटींची मुख्य शक्ती । ते लक्ष्मणा वशवर्ती ।
शक्तीनें निवारिली शक्ती । पाडिली क्षितीं दुखंडें ॥ २२ ॥
राखावया शरणागत । सौ‍मित्र सदा सावचित्त ।
तेणें क्षोभला लंकानाथ । येणें भ्रातृघात चुकविला ॥ २३ ॥
येणें शक्तिपातें जाण । निःशेष मरावा बीभीण ।
आडवा येवोनि लक्ष्मण । शक्तिच्छेदन तेणें केलें ॥ २४ ॥
आधीं मारीन लक्ष्मण । मग मारीन बिभीषण ।
ऐसें आक्रोशे रावण । शक्ति निर्वाण काढिली ॥ २५ ॥
जिचें नांव ब्रह्म्शक्ती । जे निवारेना रघुपती ।
सौ‍मित्राच्या निजघातीं । निर्वाणार्थीं सोडित ॥ २६ ॥
विमुख करोनि माझी ख्याती । भस्म केल्या दोन्ही शक्ती ।
तेणें क्षोभला लंकापती । ब्रह्मशक्ती सोडित ॥ २७ ॥
नानापरींच्या दुर्धरा युक्तीं । मयें केली मायिक शक्ती ।
ते न चले श्रेष्ठ सुरवरांप्रती । लंकापति सचिंत ॥ २८ ॥
तेणें प्रार्थिला प्रजापती । मागितली ब्रह्मशक्ती ।
अनिवार्य त्रिजगतीं । ब्रह्मवरदोक्ती दुर्धर ॥ २९ ॥

रावणाने ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर सोडिली :

ब्रह्मा म्हणे रावणा । शक्ति सर्वांच्या घेईल प्राणा ।
अवतारपुरुषीं जाणा । बाधकपणा चालेना ॥ ३० ॥
अवतारपुरुषाप्रती । माझी बाधेना ब्रह्मशक्ती ।
प्राण न घेववे तिचेनि निश्चितीं । त्याचेनि शक्ति संपेल ॥ ३१ ॥
ज्यावरी शक्ति प्रेरणें । तेणें जीवें नाहीं वांचणें ।
ऐसी ब्रह्मशक्ती रावणें । लक्ष्मणाकारणें सज्जिली ॥ ३२ ॥
शक्तीनें मारावा बिभीषण । तो सौ‍मित्रें वांचविला आपण ।
संमुख लक्षोनि लक्ष्मण । काय रावण बोलत ॥ ३३ ॥
शक्ति निवारुन जाण । त्वां वांचविला बिभीषण ।
आतां तुझा घेईन प्राण । शक्ति दारुण सोडूनी ॥ ३४ ॥
शक्ति सोडीन दारुण । तिसीं न चले निवारण ।
हृदय भेडुन संपूर्ण । घेवोनि प्राण येईल ॥ ३५ ॥
माझे शक्तीचा आघात । चुकविल्या कळेल पुरुषार्थ ।
ऐसें बोलोनि लंकानाथ । शक्ति सोडित साटोपें ॥ ३६ ॥
शक्तितेजाच्या कडाडीं । उभय सैन्या पडे झांपडी ।
प्रळयविजूच्या पडिपांडीं । गगन गडाडी गडगर्जें ॥ ३७ ॥
सौ‍मित्र आणि रघुनाथ । तिसरा वीर हनुमम्त ।
यांचीचि नेत्रें सावचित्त । येर मूर्च्छित शक्तितेजें ॥ ३८ ॥
शक्ति देखोनि दुर्धर । लक्ष्मणयोद्धा वीर धीर ।
डंडळीना अणुमात्र । सज्जोनि शर छेदित ॥ ३९ ॥
शक्ति कडाडितां गगनीं । लक्ष्मणें विधोंनि बाणीं ।
शतधा सांडिली छेदूनी । घातली पिटोनि निरालंबी ॥ ४० ॥
ब्रह्मशक्ती अति निर्वाणीं । गगनीं येतां कडाडूनी ।
लक्ष्मणाच्या संरक्षणीं । कृपावचनी वदे राम ॥ ४१ ॥

श्रीरामांनी ब्रह्मशक्ती क्षीण करुन परतवून लाविली :

श्रीरामदृष्टी अवलोकन । शक्तीची शक्ति केली क्षीण ।
ब्रह्मशक्तीसी देवोनी मान । राखिली निर्वीर्यत्वें ॥ ४२ ॥
श्रीरामें शक्ति केली क्षीण । त्यावरी लक्ष्मणें विंधितां बाण ।
शक्ति पडत पडतां जाण । झेली रावण साटोपें ॥ ४३ ॥
तूं ब्रह्मयाचीं ब्रह्मशक्ती । निष्फळ केंवी पालसी क्षितीं ।
रावणें घेवोनि हातीं । हाणी पुढती सौ‍मित्रा ॥ ४४ ॥
जवळून शक्ति हाणितां जाण । लक्ष्मण विंधील तीव्र बाण ।
येणें भेणें रावण । हाणी आपण दुरोनी ॥ ४५ ॥
रावणें शक्ति घेवोनि हातीं । आपुलिया सर्वशक्ती ।
सोडिली सौ‍मित्राप्रती । सकोपवृत्ती साटोपे ॥ ४६ ॥
अंगबळें जांघबळें । बाहुबळें प्रतापशीळें ।
शक्ति सोडितां रणकल्लोळें । गगना उसळे कडकडित ॥ ४७ ॥
लक्ष्मण वीर अति निधडा । कदा न सरे मागांपुढां ।
शक्ति छेदिली तडपडां । निजकुर्‍हाडा विंधोनी ॥ ४८ ॥
मयासुरें निर्मिली होती । जे ते छेदिली बाणावर्तीं ।
उरली केवळ ब्रह्मशक्ती । ब्रह्मवरदोक्ती अनिवार्य ॥ ४९ ॥
शक्ति येतांच संपूर्ण । लक्ष्मणें विंधोनि बाण ।
सत्यलोकावरती जाण । उडवी आपण साटोपें ॥ ५० ॥
शक्ति निजबळें येऊं पाहे । लक्ष्मण बाणीं पिटीत जाये ।
शक्ति उसणें घेवों न लाहे । दुर्धर घाये हाणित ॥ ५१ ॥
शक्ति तळपोनि गुप्तगीं । अंगी आदळावया पैं टपती ।
लक्ष्मणें खड्ग घेवोनि हातीं । उडविली मागुती सत्यलोका ॥ ५२ ॥
खड्गघायाच्या खणाणीं । शक्ति छेदितां रणांगणीं ।
ठिणग्या उसळल्या गगनीं । जेंवी तारागणीं नभशोभा ॥ ५३ ॥
लक्ष्मण असतां सावचित्त । होऊं न शके शक्तिपात ।
हें जाणोनि लंकानाथ । करी छळणार्थ तें ऐका ॥ ५४ ॥
लक्ष्मणवीर अति गाढा । अचुकसंधानीं नित्य निधडा ।
शक्ति येऊं नेदी अंगाकडा लाविलें वेडा लंकेशा ॥ ५५ ॥

श्रीरामवधाची खोटी बातमी रावण उठवितो :

लक्ष्मण पडावया दुश्चित । छळण करी लंकानाथ ।
रणीं मारिला रघुनाथ । राक्षस गर्जत अति गजरें ॥ ५६ ॥
रावणाच्या निजबाणीं । राम पडिला रणांगणीं ।
लक्ष्मणें ऐकतां हे वाणी । काया वाचा मनीं विकळ गेला ॥ ५७ ॥
मन झालें सचिंत । धनुष्यीं विकळ गेला हात ।
रामविरहें अति दुश्चित । तंव शक्तिपात आदळला ॥ ५८ ॥

दुश्चित लक्ष्मणावर शक्तीचा प्रहार :

शक्ति भेदतां हृदयासी । रामस्मरण सौ‍मित्रासी ।
शक्तिभेद झाला हृदयासी । वरकांतीसी लागली ॥ ५९ ॥
जेथे श्रीरामाचें स्मरण । तेथे सर्वदा न रिघे मरण ।
शक्ति बापुडी ते कोण । वरकांती जाण लागली ॥ ६० ॥
हृदयी लागतांचि शकी । लक्ष्मण विकळ पडला क्षितीं ।
तें देखोनि रघुपती । कृपानुवर्तीं गहिंवरला ॥ ६१ ॥

क्रोधाविष्ट श्रीरामांचा रावणावर बाणांचा वर्षाव :

आसवें स्रवती लोचन । राम झाला विषण्ण्वदन ।
लक्ष्मणाचा गेला प्राण । काय आपण करावें ॥ ६३ ॥
लक्ष्मण रणीं पडल्या जाण । श्रीरामासी दुःख दारुण ।
अश्रुधारा स्रवती नयन । सबाष्प वचन बोलत ॥ ६३ ॥
तेंचि काळीं रघुना । क्षण राहोनियां ध्यानस्थ ।
लक्ष्मणा नाहीं जीवघात । जाणोनि युद्धार्थ आरंभी ॥ ६४ ॥
रणीं मारावया रावण । काळकृतांत प्रळयाग्नि पूर्ण ।
तैसा खवळला रघुनंदन । धनुष्यी बाण सज्जूनी ॥ ६५ ॥
येतां श्रीरामाचे बाण । त्यांसी न चले निवारण ।
तेणें गजबजिला रावण । पळे आपण अति धाकें ॥ ६६ ॥
लक्ष्मणाचें क्षोंभे जाण । रामें मांडिलें निर्वाण ।
विंधितां बाण घेईन प्राण । धाकें रावण पळे दुरी ॥ ६७ ॥

रावणाचे पलायन :

पळोनियां उठाउठीं । गुप्त राहतां सैन्यगोठीं ।
तरी रावण धाके पोटीं । रामशरवृष्टी साहवेना ॥ ६८ ॥
जैसा कां चंडवात । मेघां करीत हताहत ।
तैसा रावण सैन्याआंत । स्वयें पळत अति धाकें ॥ ६९ ॥
श्रीरामवीर जगजेठी । न लागे पळतयापाठीं ।
रावण निजसैन्याचे गोठीं । अति संकटी राहिला ॥ ७० ॥
श्रीरामें नेम केला आपण । रणी मारावा रावण ।
रावण सैन्यीं राहिला लपोन । आपणा आपण वांचविलें ॥ ७१ ॥
रणीं असतां लंकानाथ । विषादकाळ नव्हे येथ ।
सौ‍मित्र करावा सावचित्त । हाचि पुरुषार्थ पैं आम्हां ॥ ७२ ॥

तं ददर्श तदा रामः शक्त्या निर्भिन्नमाहवे ।
लक्ष्मणं रुधिरादिग्धं सपन्नगमिवाचलम् ॥१॥
सौ‍मित्रिं चैव सा भित्वा विवेश धरणीतले ।
तां कराभ्यां परामृश्य रामः शक्तिं भयावहाम् ॥२॥
बभंज समरे क्रुद्धो बलेनापचकर्ष च ।
तस्य चाकर्षतः शक्तिं नाराचान्दीप्ततेजसः ॥३॥
निवखान दशग्रीवः सर्वगात्रेषु वीर्यवान् ।
अचिंतयित्वा तान्बाणान्समुत्थास स लक्ष्मणम् ॥४॥
अब्रवीच्च हनूमन्तं सुग्रीवं चैव वानरम् ।
लक्ष्मणं संपरिष्वज्य नीत्वा चैव स्वमालयम् ॥५॥
अस्मिन्मुहूर्ते न चिरात्सत्यं प्रतिशृणोमि वः ।
अरावणमरामं वा जगद्द्रक्ष्यथ वानराः ॥६॥

लक्ष्मणाच्या देहातील शक्ती उपटून लक्ष्मणाची शिबिरात पाठवणी :

रावण लपोनि रणमेळीं । राम येवोनि सौ‍मित्राजवळी ।
शक्ती भेदूनि हृदयकमळीं । धरातळीं प्रवेशली ॥ ७३ ॥
जैसा सर्पप्रवेशे वारुळीं । तैसी शक्ति भेदली हृदयकमळीं ।
तें देखोनि तये वेळीं । राम कळवळी बंधुस्नेहें ॥ ७४ ॥
राम कृपाळु संपूर्ण । शक्ति उपडावया जाण ।
वांचवावया लक्ष्मण । करी स्पर्शन अमृतहस्तें ॥ ७५ ॥
शक्ति भेदली हृदयांत । तिसी श्रीरामें लावोनि हात ।
स्वयें उपडूं पाहत । बहुत वर्जित नाना युक्ती ॥ ७६ ॥
शक्ति उपडितांचि जाण । लक्ष्मणाचा जाईल प्राण ।
एक म्हणती ऐसें आपण । सर्वथा जाण न करावें ॥ ७७ ॥
बाप कृपाळु रघुपती । त्यांच्या उपेक्षोनि नाना युक्ती ।
शक्ति उपडी निजहस्तीं । कृपामूर्ति कृपाळु ॥ ७८ ॥
श्रीरामें लावितांचि हात । शक्ति झाली वीर्यहत ।
लक्ष्मण मारावयाचें सामर्थ्य । हताहत होवोनि गेलें ॥ ७९ ॥
ब्रह्मवरदोक्ती पुरती । हृदयीं रुतली ब्रह्मशक्ती ।
ते श्रीरामें धरोनि हातीं । स्वलीला युक्तीं छेदिली ॥ ८० ॥
शक्ति उपडितां रघुनंदन । तें संधि साधोनि रावण ।
श्रीरामावरी वर्षे बाण । अति दारुण साटोपें ॥ ८१ ॥
रावणाचे येतां बाण । राम मानी तृणासमान ।
स्वहस्तें उठवोनि लक्ष्मण । दे आलिंगन अति प्रीतीं ॥ ८२ ॥
हनुमान सुग्रीवादि जाण । पाचारोनि वानरगण ।
श्रीराम सांगे आपण । न्यावा लक्ष्मण स्वस्थाना ॥ ८३ ॥
ग्रीष्मांतीं चातकासी । मेघ निववी जीवनेंसीं ।
तेंवी निववावें लक्ष्मणासी । तंव रावणासी मी वधीन ॥ ८४ ॥

राम-रावण युद्ध :

आजी प्रतिज्ञेचें माझें रण । पृथ्वी देखाल अरावण ।
कीं अराममय जाण । जग संपूर्ण देखाल ॥ ८५ ॥
रामनामीं न ये मरण । तो राम केंवी मरे आपण ।
रणीं निमाला रावण । अवघे जण देखाल ॥ ८६ ॥
राम जगाचा आत्माराम । जेथें न रिघे जन्ममरण ।
रावणासीं मरणधर्म । अलोट मरण पैं आलें ॥ ८७ ॥
राम चैतन्यविग्रही । राम देहीच विदेही ।
राम द्वंद्वातीत पाहीं । राम ठायींच्या ठायीं परब्रह्म ॥ ८८ ॥
रामेंवीण सर्वथा । तिळभरी ठाव नाहीं रिता ।
मिथ्या जन्ममरणवार्ता । पुढील कथा अवधारा ॥ ८९ ॥
शिबिरा धाडो लक्ष्मण । बानें विंधितां रावण ।
त्यावरी श्रीराम आपण । क्षोभला दारुण शरवृष्टीं ॥ ९० ॥
ज्यालागीं सुग्रीवा राज्यदान । ज्यालागीं आणिले वानरगण ।
तो मारीन आजि रावण । निर्वाणबाण विंधोनी ॥ ९१ ॥
ज्या लागीं आणोनि पाषाण । समुद्रीं केलें सेतुबंधन ।
तो मारीन रावण । निर्वाणबाण विंधोनी ॥ ९२ ॥
माझिया युद्धाचा चमत्कार । देखोत सुर नर किन्नर ।
सिद्ध चारण विद्याधर । देखोत समग्र सुर सिद्ध ॥ ९३ ॥
रामें करोनि दुर्धर रण । मारिला अति गवीं रावण ।
पुढें पृथ्वीवरी जाण । हें पढती पुराण सुरसिद्ध ॥ ९४ ॥
ऐसें बोलोनी रघुपती । सुवर्णपुंखी भल्ल हातीं ।
सतेज घेवोनि धगधगती । लंकापती विंधिला ॥ ९५ ॥
रावणें सज्जोनि बाण । रणीं विंधिला रघुनंदन ।
समूळ नाराच शर दारुण । विंधी आपण लघुवेगें ॥ ९६ ॥
सुटलें दोहींचें शरजाळ । भूतळा आणि अंतराळ ।
बाणीं कोंदलें दिग्मंडळ । कुळाचळ कोंदले ॥ ९७ ॥
दोघे वीर अति उद्‌भट । वारया वाहों न देती वाट ।
शस्त्रें हाणितां खणखणाट । हव्यवाट ऊठिला ॥ ९८ ॥
शस्त्रें हाणितां बळोन्मेंळीं । ठिणग्या उठती अग्निकल्लोळीं ।
बाण जळती अंतराळीं । आतुर्बळी रणयोद्धे ॥ ९९ ॥
श्रीरामाचें दुर्धर बाण । निवारुं न शके रावण ।
भेदोनियां अंगत्राण । अंगी संपूर्ण आदळती ॥ १०० ॥

श्रीरामांनी रावणाचे धनुष्य, कवच, रथ, व अश्व यांचा छेद केला :

धनुष्य छेदिलें हातींचे हातीं । रथींचा मारिला सारथी ।
रथीचें वारु पाडिले क्षितीं । केला विरथी लंकेश ॥ १ ॥
छत्रपात मुकुटपात । ध्वजपात रथपात ।
पांचवा झाला कळापात । रणीं रघुनाथ खवळला ॥ २ ॥
छेदावया दशकंठी । रामें शर सज्जिले नेटीं ।
तंव रावणें देवोनि पाठी । उठाउठीं पळाला ॥ ३ ॥
रणीं मारावा लंकानाथ । निर्वाण नेमें आला रघुनाथ ।
रावण पळोनि बुद्धिवंत । जीवघात चुकविला ॥ ४ ॥

संकीर्यमाणः शरजालवृष्टिभिर्महात्मना दीप्तधनुष्मता रणे ।
भयात्प्रदुद्राव समेत्य रावणोयथानिलेनाभिहतो बलाहकः ॥७॥

रावणाचे लंकेमध्ये पलायन :

रामें मारावें रावणासी । रावणाची बुद्धि कैसी ।
पळोनियां रणभूमींसीं । आपअपणासी वांचविलें ॥ ५ ॥
राम न मारी पळत्यासी । हें कळलें आहे रावणासी ।
पळोनियां लागवेगेंसीं । आपआपणासी वांचवी ॥ ६ ॥
रामबाणीं जर्जरीभूत । रावण झाला हताहत ।
काहीं न चले पुरुषार्थ । मागें पळत अति धाकें ॥ ७ ॥
लंकेचा जो लंकानाथ । अपमानला रणाआंत ।
मोकळ्या केशीं पायीं पळत । घायीं कुंथत अति दुःखी ॥ ८ ॥
मेघ उडती चंडवातें । गज पळती सिंहाभिघातें ।
गरुड पळवी सर्पांतें । तेंवी रावणातें श्रीराम ॥ ९ ॥
यापरी स्वयें रावण । सांडून गेला रणांगण ।
पुढील कथानुसंधान । सावधान अवधारा ॥ १० ॥
एका जनार्दना शरण । रणीं पळवोन रावण ।
उठवावया लक्ष्मण । कृपाळु पूर्ण परतला ॥ ११ ॥
राम स्वानंद कृपाळु । राम सप्रेम स्नेहाळु ।
राम स्वयें दीनदयाळु । प्रणतपाळु श्रीराम ॥ ११२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणशक्तिभेदो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३ ॥
ओंव्या ॥ ११२ ॥ श्लोक ॥ ७ ॥ एवं ॥ ११९ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा