भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेविसावा
रावण – मंदोदरी संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कुंभकर्णाची गर्जना युद्धाला जाण्याची सिद्धता :
सन्नद्ध बद्ध सायुध पूर्ण । युद्धा निघतां कुंभकर्ण ।
काय बोलिला गर्जोन । एकला मारीन अवघ्यातें ॥ १ ॥
रामलक्ष्मणां करीन घात । वानर भक्षीन समस्त ।
अंगद सुग्रीव हनुमंत । फळशाखार्थ गिळीन ॥ २ ॥
ऐकोनि कुंभकर्णगर्जन । रावणा आलें अति स्फुरण ।
नगरीं त्राहटिलें निशाण । युद्धा आपण निघावया ॥ ३ ॥
कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो लोकरावणः ।
गंतुमैच्छतिक्रोधः सर्वसैन्येत संवृतः ॥१॥
संग्राममभिकांक्षंतं रावणं श्रुत्य भामिनी ।
तत्रोत्थाय ततो देवी नाम्ना मंदोदरी तथा ॥२॥
माल्यवंतं करे गृह्य यूपाक्षसहिता तथा ।
मंत्रिभिर्मंत्रतत्वज्ञैस्तथान्यैर्मंत्रिसत्तमैः ॥३॥
छत्रेणाध्रियमाणेन अतिकायपुरःसरा ।
चामरैर्वीज्यमानैश्च वीज्यमाना स्वलंकृता ॥४॥
सेवार्थं मार्गविपुलं ध्वजमाल्योपशोभितम् ।
उत्सारणं प्रकुर्वद्भिर्वेत्रझर्झरपाणिभिः ॥५॥
रावण युद्धावर जाणार हें ऐकून मंदोदरीचे आगमन :
रणीं त्राहाटूनि निशाण । युद्धा निघतो दशानन ।
मंदोदरीनें ऐकोन । आली आपण अति शिघ्र ॥ ४ ॥
सालंकृत मनोहर । मस्तकी शोभे शशांकच्छत्र ।
ढळताहे युग्मचामर । चाले सुंदर गडगर्जें ॥ ५ ॥
माल्यवंत आणि यूपाक्ष । आणिक मंत्री मंत्रदक्ष ।
विवेकवंत जाणिजे मुख्य । ते ते सकळिक सांगावें ॥ ६ ॥
सवें सखियांचा समाज । मार्गशोभा पुष्पध्वज ।
राजपत्नीची गमनवोज । दावीत सहज स्वयें चाले ॥ ७ ॥
मार्ग संकुळितां निवार । करावया वेत्रपाणी वीर ।
वेत्रनादांचा झणत्कार । तेणें समग्र दूर पळती ॥ ८ ॥
अतिकाय जो रावणपुत्र । तेणें येवानि धरिले छत्र ।
देवांतक नरांतक कुंमर । युग्माचामर ढाळिती ॥ ९ ॥
जे सतीत्वाचें निजभूषण । जें रावणराजाचें मंडण ।
ते मंदोदरी आपण । सभास्थान पावली ॥ १० ॥
प्रविवेश सभां दिव्यां प्रभया द्योतमानया ।
प्राप्तां देवीं ततो राजा प्रियां मंदोदरीं तदा ॥६॥
दृष्ट्वा ससंभ्रमस्तूर्णं परिष्वज्य दशाननः ।
किमागमनकृत्यं ते देवि शिघ्रं तदुच्यताम् ॥७॥
तूर्णं मम समीपन्तु किमर्थं त्वमिहागता ।
मन्त्रिभिः सहिता किंतु ब्रूहि साध्वि यथातथम् ॥८॥
रावण मंदोदरीला येण्याचे कारण विचारितो :
मंदोदरी शोभायमान । प्रवेशली सभास्थान ।
तिसी देखोनि दशानन । दे अलिंगन अति प्रीती ॥ ११ ॥
रत्नपर्यंकीं आपणापासीं । बैसवोनि निजप्रियेसी ।
कोण कार्या तूं आलीसी । तें मजपासीं शीघ्र सांगें ॥ १२ ॥
प्रधानांसहित सुपुत्र । येथे आलीस अति सत्वर ।
यथातथ्य जो विचार । तो सांग समग्र मजपासीं ॥ १३ ॥
कोण कार्योद्देशासाठीं । तू आलीस माझिया भेटी ।
ते सांगावी गुह्य गोष्टीं । प्रीती मोठी मज तुझी ॥ १४ ॥
एवमुक्ता तु राजानं प्रिया वचनमब्रवीत् ।
विश्वस्य शृणु राजेंद्र याचे त्वाहं कृतांजलिः ॥९॥
श्रुता मे नगरी रुद्धा श्रुता मे राक्षसा हताः ।
धूम्राक्षसहिता वीराः प्रहस्तेन सहैव तु ॥१०॥
भवान्वै युद्धकामश्च निर्गंतुं कृतनिश्चयः ।
इति संचिंत्य राजेंद्र ममागमनकारणम् ॥११॥
रावणाला मंदोदरीची विनंती :
सत्य सांग वा सुंदरी । आलीस कोण कार्यावरी ।
रावणें पुसतां अत्यादरीं । स्वयें मंदोदरी अनुवादे ॥ १५ ॥
कर जोडून तुम्हांप्रती । बहुतां दिवसां करितें विनंती ।
अवधारोनियां भूपती माझी वचनोक्ती करावी ॥ १६ ॥
स्त्रियेचें वचन केवळ ममता । तैसें नव्हें गा लंकानाथा ।
जें उपयोगी अर्थस्वार्था । जें परमार्था पावेन ॥ १७ ॥
समुद्रीं तारोनि पाषाण । लंकेसी आले राम लक्ष्मण ।
वानरी रोधिलें लंकाभवन । हें अपूर्व देखोन मी आलें ॥ १८ ॥
वानरीं व्याप्त लंकाभवन । रणीं मारिले राक्षस गहन ।
धूम्राक्ष आणि अकंपन । मुख्य प्रधान प्रहस्त ॥ १९ ॥
त्यांचे संगतीं थोर थोर । रणीं पडले निशाचर ।
एकही न मरेचि वानर । युद्ध दुर्धर करितांही ॥ २० ॥
प्रहस्तादि वीर दारुण । कडकडाटें करितां रण ।
नाहीं उठले राम लक्ष्मण । वानरी भिडोन मारिले ॥ २१ ॥
प्रहस्त एवढा वीर गहन । नीळें मारिला न लागतां क्षण ।
येरा राक्षसांसी जाण । केलें कंदन वानरीं ॥ २२ ॥
राक्षसां करावाया घात । मूळीं लागला हनुमंत ।
जो जो येतो युद्धाआंत । त्याचा निःपात करीतसे ॥ २३ ॥
ऐसें जाणोनि संपूर्ण । श्रीरामासी करावया रण ।
केंवी निघतां आपण । मुख्यत्वें प्राण द्यावया ॥ २४ ॥
काल श्रीरामें रणांगणी । सोडिलासी जीवदानीं ।
तें नाठवे तुझ्या मनीं । पुढें मरावया रणीं धावसीं ॥ २५ ॥
न त्वं युक्तं प्रमुखतः स्थातुं तस्य महात्मनः ।
राघवस्य सौमित्रेर्यस्य नास्ति समो युधि ॥१२॥
न च मानुषमात्रोऽस्ति रामो दशरथात्मजः ।
एकेन येन वै पूर्वं बहवो राक्षसा हताः ॥१३॥
मंदोदरीचे श्रीरामांच्या पराक्रमाविषयी विवेचन :
श्रीरामासीं संमुख । राहूं न शके दशमुख ।
रामप्रताप अलोलिक । राक्षसांतक श्रीराम ॥ २६ ॥
ताटिका मारिली बाळपणीं । मारीच उडविला बाण पिसारेनीं ।
सुबाहु मारिला यज्ञस्थानीं । राक्षसश्रेणीं समवेत ॥ २७ ॥
रामें हरचाप भंगून । सभेमाजी दशानन ।
यथेष्ट पावला अपमान । श्रीरामेंसीं रण तुम्हां न टिके ॥ २८ ॥
येच सीतेच्या अभिलाषमेळीं । विराध मारिला आतुर्बळी ।
एक बाणें केली होळी । वनसमेळीं श्रीरामें ॥ २९ ॥
शूर्पणखा करितां छळण । तिचे घेतले नाक कान ।
तिच्या कैवारालागीं जाण । केलें कंदन राक्षसां ॥ ३० ॥
एकला पदाति श्रीरामचंद्र । मारिले त्रिशिरा दूषण खर ।
चवदा सहस्र निशाचर । रामें समग्र मारिले ॥ ३१ ॥
मारीच लागला मृगसमेळीं । कबंध छेदिला बाहुमेळीं ।
बाणे एकें छेदिला वाळी । जो आतुर्बळी तिहीं लोकीं ॥ ३२ ॥
तुम्ही उद्विग्न वाळिभेण । त्याचा श्रीरामें घेतला प्राण ।
त्या श्रीरामासीं करावया रण । आंगवण तुम्हां कैची ॥ ३३ ॥
समुद्री तारोनि पाषाण । लंके आणिले वानरगण ।
श्रीराम मनुष्य नव्हे जाण । अवतार पूर्ण परब्रह्म ॥ ३४ ॥
सीता देवोनि त्रिशुद्धी । रामासीं करावा संधी ।
श्रीरामेंसी रणसमृद्धी । विजयसिद्धी तुम्हां नाहीं ॥ ३५ ॥
प्रहस्तेन कृतं किंचिद्युभ्यता राक्षसे बले ।
धूम्राक्षेण च राजेंद्र नित्यं समरगाहिना ॥१४॥
महाकायेन च तथा महामायेन राक्षस ।
अकंपनेन वीरेण युध्यता राक्षसेश्वर ॥१५॥
तथा तैर्युध्यमोनश्च किं कृतं वानरे बले ।
न हतो यूथपः कश्चिद्वलादद्वेषेण रावण ॥१६॥
येषां नास्ति समो वीर्ये ते हता वानरैर्युधि ।
न चापि वानराः शक्या हंतुं पादपयोधिनः ॥१७॥
रावणबळेंसी समान । नावनिगें वीरसैन्य ।
युद्धा जावोनि प्रहस्त प्रधान । काय आंगवण तेणें केली ॥ ३६ ॥
रणीं एकही वानरगण । प्रहस्तें न मारितांचि जाण ।
वानारीं त्याचा घेतला प्राण । सैन्य संपूर्ण मारुनी ॥ ३७ ॥
प्रहस्ताची ऐसी गती । धूम्राक्ष रणगर्वार्थी ।
नित्य कुंथे रणोन्मत्तीं । तोही कपिहस्तीं निमाला ॥ ३८ ॥
महाकाय महामाये । रणप्रवीण उभवोनि वाहे ।
लागतां वानरघायें । आक्रंदें पाहें निमाले ॥ ३९ ॥
ज्याचेनि बळें दशानन । कळिकाळा न गणी आपण ।
वीर दुर्धर अकंपन । रिपुभंजन रणमर्दी ॥ ४० ॥
तोही वानरीं युद्ध करितां । मारिला पाणी न मागतां ।
विजय घेवोनि लंकानाथा । कोणी मागुता न येचि ॥ ४१ ॥
हे तंव वीर अति दारुण । युद्ध करितां अतिसत्राण ।
नुठतां राम लक्ष्मण । वानरींच जाण मारिले ॥ ४२ ॥
वानरीं मारिले वीर सप्राण । अवघे राक्षस करितां रण ।
एकही न मरेचि वानरगण । राम लक्ष्मण वानरां ॥ ४३ ॥
रणीं राक्षस निःशेष मरती । एकही न मरे कपिपती ।
श्रीराम पूर्ण अवतारमूर्ती । वानरार्थी रक्षिता ॥ ४४ ॥
रक्ष्यमाणास्तु रामेण सुग्रीवेण च पालिताः ।
तत्र ते रोचतां संधिः सह रामेण रावण॥१८॥
तस्य देवर्षयः सर्वे गन्धर्वाश्च जयैषिणः ।
विरोधं मा गमस्तेन संधिस्ते तेन रोचताम् ॥१९॥
रामभार्या सती ह्येषा रामाय प्रतिदयिताम् ।
बिभीषणेन चैवोक्तं पूर्वमेव महात्मना ॥२०॥
गतस्तत्रैव रामश्च तद्वचोयं करिष्यति ॥२१॥
वानरांसीं करावया सळ । राक्षसांमाजी नाहीं बळ ।
कपि मारिती राक्षसदळ । संग्रामी प्रबळ भिडोनी ॥ ४५ ॥
रणीं निमतां निशाचर । एकही न मरेचि वानर ।
कपिरक्षिता रामचंद्र । पूर्ण अवतार परब्रह्म ॥ ४६ ॥
सुग्रीव पाळी वानरभार । सुग्रीव पाळी श्रीरामचंद्र ।
श्रीरामबळें वानर । अजरामर निजविजयी ॥ ४७ ॥
ज्याचेनि विजयी वानर । त्यासीं करावें नित्य मित्र ।
सखा करावा श्रीरामचंद्र । सीता सुंदर अर्पूनी ॥ ४८ ॥
तेथें आहे बिभीषण । तो संधि करील संपूर्ण ।
सीता देवोनि आपण । रिघावें शरण श्रीरामा ॥ ४९ ॥
श्रीरामा रिघाल्या शरण । सकळ कुळासी कल्याण ।
तुमचें चुकले मरण । कुंभकर्ण वांचेल ॥ ५० ॥
तस्यास्तु वचनं श्रुत्वा प्रियाया राक्षसेश्वरः ।
उष्णं दीर्घ च निःश्वस्य च निरीक्ष्य समासदान् ॥२२॥
त्वया हि हितकांक्षिण्या वचो यद्वहुभाषितम् ।
न तन्मनसि मे देवि यत्प्रयोक्तं वै प्रियं प्रिये ॥२३॥
देवज्चित्वा रणे पूर्वं ससुरासुरमानवान ।
प्रणमे मानुषं कस्माद्वानरान्यःसमाश्रितः ॥२४॥
हस्ते मन्दोदरीं गृह्य वाचमेतदुवाचह ।
न तु संधिं करिष्यामि राघवेण सहैव ॥ २५ ॥
वैदेहीं नार्पयिष्यामि नकरिष्यामि न संनतिम् ॥ २६ ॥
मंदोदरीला रावणाचे निर्वाणीचे उत्तर :
ऐकोनि मंदोदरीचें वचन । रावणासी पडिले मौन ।
उगाचि राहिला आपण । अति उद्विग्न अनुतापी ॥ ५१ ॥
जिंतले सुरासुर दानव । पादाक्रांत केले विश्व ।
राम जाणे रणलाघव । तरी राघव वंदींना ॥ ५२ ॥
निधडा नव्हे श्रीरघुनाथ । केवळ वानरांचा आश्राइत ।
त्यासी मी वंदी लंकानाथ । तरी जगांत जघन्य ॥ ५३ ॥
रणीं जातांही माझा प्राण । सीता देवोनि आपण ।
श्रीरामासी न रिघें शरण । सत्य भाषण हें माझें ॥ ५४ ॥
मंदोदरी धरोनि हातीं । रावणें नेली एकांतीं ।
जीवींची जे निजगृह्योक्ती । स्वयें तीप्रति सांगत ॥ ५५ ॥
शरण रिघा म्हणे बिभीषण । तैसेंचि सांगत कुंभकर्ण ।
आणीकही बहुसाल जन । रिघावें शरण तूं म्हणसी ॥ ५६ ॥
मी कां नायकें आपण । तेही अर्थीचें कारण ।
तें तूं ऐक सावधान । माझें ज्ञान हृदयस्थ ॥ ५७ ॥
म्यां अभिलाषिली सीता सती । अन्यत्र मरण नरकप्राप्ती ।
श्रीरामहस्तें अंतगती । सायुज्यमुक्ति सहजचि ॥ ५८ ॥
लागोनि श्रीरामाचा बाण । रणीं माझा गेलिया प्राण ।
तेव्हांच मी ब्रह्म पूर्ण । जन्म मरण मग कैचें ॥ ५९ ॥
पंचवटी रामासंमुख जातां । मीच पावतों सहुज्यता ।
सकळकुळउद्धारणार्था । आणिली सीता चोरोनी ॥ ६० ॥
अंती राम राम स्मरता । रंक पावे सायुज्यता ।
श्रीरामहस्तें स्वयें मरतं । ब्रह्मपूर्णता पावेन ॥ ६१ ॥
लागोनि श्रीरामाचा बाण । जों माझा जाय प्राण ।
तों सीता न सोडीं आपण । सत्य भाषण हें माझें ॥ ६२ ॥
लागतां श्रीरामाचा बाण । माझ्या जन्ममरणासी ये मरण ।
मी होईन ब्रह्म परिपूर्ण । हे मज ज्ञान नारदोक्तें ॥ ६३ ॥
यालागीं श्रीरामा न रिघें शरण । न वंदी श्रीरामाचे चरण ।
यालागीं संदेह न मानीं जाण । नारदवचनविश्वासें ॥ ६४ ॥
जरीं तूं पतिव्रिता लाठी । तरी हे माझी गुह्य गोष्टीं ।
कोठें न वदावी वाक्पुटीं । राखावी पोटीं अति गृह्य ॥ ६५ ॥
एका जनार्दना शरण । मंदोदरी सुखसंपन्न ।
वंदोनि रावणाचे चरण । निघे आपण निजधामा ॥ ६६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणमंदोदरीसंवादो नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥ २३ ॥
ओव्यां ॥ ६६ ॥ श्लोक ॥ २६ ॥ एवं ॥ ९२ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेविसावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय तेविसावा