संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा

प्रहस्ताचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वील प्रसंगीं हनुमंतें । रणीं मारिलें अकंपनातें ।
ऐकोनियां लंकानाथें । क्रोधान्वित उद्वेगी ॥ १ ॥

ततस्तु रावणः क्रुद्ध :

श्रुत्वा हतमकंपनम् पूरीं परिययौ लंकां सर्वगुल्मानवेक्षितुम् ॥१॥
रुद्धां तु नगरीं दृष्ट्वा रावणो राक्षसेश्वरः ।
उवाचात्महितं काले प्रहस्तं युद्धकोविदम् ॥२॥
पुरस्योपनिरुद्धस्य सहसा पीडितस्य च ।
नान्यं समर्थं पश्यामि युद्धे युद्धविशारद ॥३॥
अहं वा कुंभकर्णो वा त्वं वा सैन्यपतिर्मम ।
इंद्रजिद्वा निकुंभो वा वहेयुर्भारमीदृशम् ॥४॥
सर्वं बलमिदं शीघ्रं मायया परिगृह्य च ।
विजयायाशु निर्याहि यत्र सर्वे वनौकसः ॥५॥

रावण लंकादुर्गाचा बंदोबस्त करतो :

एके हनुमंतें रणागणीं । अकंपन पाडोनियां रणीं ।
मारिल्या राक्षसांच्या श्रेणी । त्यापुढें कोणी उरेना ॥ २ ॥
अकंपनाचा भरवसा होता । मारील सौ‍मित्र रघुनाथा ।
अंगदादि हनुंमंता । मारील समस्तां वानरां ॥ ३ ॥
तंव जाला विपरीतार्थ । अकंपना मारी हनुमंत ।
दुःखें तळपले लंकानाथ । आला आकांत राक्षसां ॥ ४ ॥
अकंपनाऐसा देखा । आणीक न मीळे युद्धसखा ।
परम धाक दशमुखा । सन्नद्ध लंका तो करवी ॥ ५ ॥
लंकादुर्गसंरक्षण । गुल्मोगुल्मीं हिंडे रावण ।
दृढ कपाटें बंधन । करवी आपण साक्षेपें ॥ ६ ॥
दुर्गपरिधी सखोल आगड । यंत्रमारें मारक दगड ।
रावणें दुर्ग केलें गूढ । अति अवघड पारखिया ॥ ७ ॥
आगड गुल्में यंत्रसंभार । दुर्घट दुर्ग कायसे थोर ।
शिखरें उडोनि आले वानर । निशाचर निर्दळिती ॥ ८ ॥
वानरीं रोधिलें लंकाभुवन। धाकिन्नला दशानन ।
प्रहस्त पाचारोनि प्रधान । युद्धविधान आलोची ॥ ९ ॥

रावण प्रहस्तला पाठवितो :

ध्वज पताका विध्वंसून । करित राक्षसां कंदन ।
वानरीं व्यापिलें लंकाभुवन । अति दारुण युद्धार्थीं ॥ १० ॥
रणीं पडिल्या अकंपन । वानरांसीं करावया रण ।
आम्ही मुख्यत्वें पांच जण । युद्धाविधानरणवेत्ते ॥ ११ ॥
रावण आणि कुंभकर्ण । प्रह्स्त सेनानी प्रान ।
इंद्रजितासी आंगवण । पांचवा जाण निकुंभ ॥ १२ ॥
जैसाच मी राजा रावण । तैसाच तूं प्रहस्त प्रधान ।
दोहींची समान आंगवण । विचक्षण रणवेत्तें ॥ १३ ॥
पदाती सेनानी महावीर । पालाणूनी अश्व कुंजर ।
संजोगोनि रहंवर । युद्धा सत्वर निघावें ॥ १४ ॥
राम लक्ष्मण पाडोनि रणीं । वानर उरों नेदीं कोणी ।
वेरी निर्दळूनी रणीं । मजलागोनी सुख द्यावें ॥ १५ ॥
तुवां जावोनि संग्रामांत । इतुका करावा पुरुषार्थ ।
कंठमाळा दे लंकानाथ । साधीं विजयार्थ प्रहस्ता॥ १६ ॥
इंद्रजिताचें काळें वदन । वृथा गेलें शरबंधन ।
तैसें न करावें आपण । राम लक्ष्मण मारावे ॥ १७ ॥
प्रहस्त म्हणे लंकापती । बिभीषणें केली विनंती ।
श्रीरामा अर्पिल्या सीता सती । सुखप्राप्ती सर्वांसी ॥ १८ ॥

प्रहस्ताची दर्पोक्ती :

त्याचें नायकतां वचन । युद्ध मांडिलें निर्वाण ।
सत्य बोलिला बिभीषण । तें हें रण ओढवलें ॥ १९ ॥
समग्र माझे लळे पाळून । तुवां केलें प्रतिपाळण ।
तुझें कार्या वेंचितां प्राण रणांगण पाहें माझें ॥ २० ॥

मद्वाणानां तु वेगेन हतानां तु रणजिरे ।
अद्य तृप्यंतु मांसादाः पक्षिणः काननौकसः ॥६॥
न हि मे जीवितं रक्ष्यं पुत्रदारधनानि च ।
संपश्य मां जुव्हयंतं त्वदर्थं जीवितं रणे ॥७॥
हुताशनं तर्पयित्वा ब्राह्मणाश्चं प्रणम्य च ।
स्त्रजश्च विविधाकारा जगृहुस्त्वाभिमंत्रिताः ॥८॥
रावणं प्रेक्ष्य राजानं प्रहस्तः पर्यवारयत् ।
अथामंत्र्य तु राजानं भेरीमाहत्य भैरवाम् ॥९॥
आरुरोह रथं दिव्यं प्रहस्तः सज्जकार्मुकः ।
ब्राह्मणाः स्वस्तिवचनाः संग्रामाय जयशिषः ॥१०॥

संमुख ऐकतां रावण । प्रहस्त बोलें आंगवण ।
प्रथम विंधितांचि बाण । राम लक्ष्मण मारीन ॥ २१ ॥
अंगद सुग्रीव हनुमंत । मारीन नळ नीळ जांबवंत ।
वानर मारीन समस्त । रणाआंत निसनिसूं ॥ २२ ॥
वाहवीन अशुद्धाचे पूर । वृक जंबुक श्येन घार ।
मांस भक्षिती वनचर । ऐसा रणमार करीन ॥ २३ ॥
सांडोनि जीविताची आस । रणांगणीं घातली कांस ।
त्यजून स्त्रीपुत्रविलास । स्वामिकार्यास साधीन ॥ २४ ॥

प्रहस्ताची स्वामिकार्यार्थ प्रयाणाची तयारी :

समुहूर्ती करितां प्रयाण । घृतप्लुतादि अवदान ।
प्रथम पूजिला हुताशन । पूजिले ब्राह्मण विधियुक्त ॥ २५ ॥
मुख्य ब्राह्मणांचें पूजन । अन्न धन आणि सन्मान ।
प्रहस्त घाली लोटांगण । आशीर्वचन रणविजयी ॥ २६ ॥
मुकुट कुंडलें रणकंकण । कवच शोभे रत्‍नभूषण ।
सज्जोनियां धनुष्यबाण । करी प्रयाण प्रहस्त ॥ २७ ॥
बाहुंअंगदें पदक गळां । हिरे रत्‍न कंठीं मुक्तामाळा ।
अंगीं बाणोनि रणसोहळा । रावणाजवळी पूसत ॥ २८ ॥
जो जो गेला संग्रामासीं । परतोनी न ये रायापासीं ।
हेचि भेटी तुम्हा आम्हांसी । लागे पायासीं प्रहस्त ॥ २९ ॥

रावणाचा गहिवर व प्रहस्ताला निरोप :

ऐकोनि प्रहस्तवचन । रावणासी आलें रुदन ।
घांवोनि दिधलें आलिंगन । दोघे जण गहिंवरती ॥ ३० ॥
बोलती सभेचें सज्ञान । दोघोचेंही अशुभ चिन्ह ।
युद्धप्रयाणीं रुदन । अपशकुन मुख्यत्वें ॥ ३१ ॥
जैसाचि स्वयें रावण । तैसाचि प्रहस्त प्रधान ।
ध्वज पताका शोभायमान । सेना सज्जून आणिली ॥ ३२ ॥
ज्वाळमाळारत्‍नांकित । रथ अतिशयें शोभिवंत ।
वरी ध्वज लखलखीत । घोंस लोंबत मुक्तामाळां ॥ ३३ ॥
नमस्कारोनि रावण । प्रहस्तें करितां रथारोहण ।
सज्जोनियां धनुष्यबाण । भेरी निशाण त्राहाटिलें ॥ ३४ ॥

लंकायां निर्ययौ शिघ्रं बलेन महता वृतः ।
निनदंतः स्वरान्घोरान्‍राक्षसा जग्मुग्रतः ॥११॥
तस्य निर्याणघोषेण राक्षसानां च गर्जताम् ।
ववर्षू रुधिरं देवाः प्रहस्तस्य रथोपरि ॥१२॥
ध्वजमूर्धनि गृध्रश्च विलीनो दक्षिणामुखः ।
प्रयातस्य च संग्रामे हयश्च विकृतोऽभवत् ॥१३॥
अश्रुपूर्णमुखश्चास्य दक्षिणः स्खलितो हयः ।
सारथेर्बहुधा चास्य पृतनामेव गाहतः ॥१४॥
प्रतोदो न्यपतद्धस्ताद्धरण्यां हयशासिनः ।
निर्याणश्रीश्च तस्यासीद्‌भास्वरा च सुदुर्लभा ॥१५॥
सा ननाश मुहूर्तेन समे च स्खकिता हयाः॥१६॥

प्रहस्ताचे रणभूमीकडे प्रयाण :

वाजंत्र्यांचा निजगजर । निधडे वीर निशाचर ।
उघडोनी लंकाद्वार । राक्षसभार चालिले ॥ ३५ ॥
प्रहस्तरथासमोर । राक्षस गर्जती घरघर ।
सिंहनाद करिती घोर । भार दुर्धर चालिले ॥ ३६ ॥

प्रहस्तास अपशकून :

तेचि समयीं निरभ्रीं । प्रहस्ताच्या रथावरी ।
रुधिरवृष्टि आरक्तधारीं । उल्का चौफेरीं स्वयें पडतीं ॥ ३७ ॥
अश्रुमुख रथींचे घोडे । दक्षिणवारु अडखळोनि पडे ।
सारथियें उठवितां निवाडें । चाबुक पडे रथचक्रीं ॥ ३८ ॥
जेणें करावें अश्वशासन । तो प्रतोद झाला भग्न ।
सारथ्याचें सचिंत मन । अपशकुन धुरेसीं ॥ ३९ ॥
वारु सज्जोनि वाडेंकोडें । रथ सज्जोनि चालतां पुढें ।
एक वेळे चारी घोडे । अडखळतां पडे सारथी ॥ ४० ॥
एवं सैन्याच्या संभारीं । पडिले घोडे सांडोनि दरी ।
रथ सज्जिला वारुवांतरीं । सारथि वरी बैसला ॥ ४१ ॥
त्याच काळीं ध्वजीं देख । गीध बैसे दक्षिणाभिमुख ।
भालू भुंकती अग्निमुख । परत दुःख प्रहस्ता ॥ ४२ ॥
प्रहस्त जंव पाहे पुढें । तंव अशिर छाया भूमी पडे ।
मरण आलें मज रोकडें । जीवीं धडफुडें कळो सरलें ॥ ४३ ॥
मागें सरतांचि आपण । अपमानें दंडील रावण ।
श्रीरामापुढें देतां प्राण । ब्रह्म परिपूर्ण मी होईन ॥ ४४ ॥
ऐसिया करोनि निश्चयासी । अवश्य जावें युद्धासीं ।
परम उल्लास प्रहस्तासीं । निजसैन्यासी अवलोकी ॥ ४५ ॥
दारुण देखोनि अपशकुन । सैन्य सेनानी उद्विग्न ।
अवघे जाले मनोरथभग्न । तंव कळलें चिन्ह प्रहस्ता ॥ ४६ ॥
आपली दावोनि आंगवण । सैन्यासी उल्लास द्यावा पुर्ण ।
ऐसें साधोनि विंदाण । केलें गर्जन प्रहस्तें ॥ ४७ ॥

कालो भवेयं कालस्य दहेयमपि पावकम् ।
मृत्युं मरणधर्मेण संयोजयितुमुत्सहे ॥१७॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा प्रहस्तस्य रणाजिरे ।
सुसंरब्धाश्च ते नेदू राक्षसा युद्धकांक्षिणः ॥१८॥
ततः प्रहस्तं निर्यातं भीमं भीमपराक्रमम् ।
गर्जंतं सुमहाकायं राक्षसैरभिसंवृतम् ॥१९॥
ददर्श महतीं सेनां वानाराणां बलीयसाम् ।
अतिसंजातहर्षाणां प्रहस्तमभिगर्जताम् ॥२०॥

प्रहस्ताचे गर्वयुक्त आव्हान :

म्यां साधिलें रणांगण । आजी काळातें निर्दळीन ।
अंतकाळातें आकळीन । अग्नीतें जाळीन प्रतापें ॥ ४८ ॥
राम लक्ष्मण मानवी दोन्ही । वानरांतें कोण गणीं ।
मृत्यु मारोनियां रणीं । वाधावणी विजयाची ॥ ४९ ॥
ऐकोनि प्रहस्ताचें वचन । वीरीं केलें सिंहगर्जन ।
उल्लासलें त्याचें सैन्य । रणकंदन करावया ॥ ५० ॥
प्रहस्त देखोनि ससैन्य । वानरांसी उल्लास पूर्ण।
राक्षसांचें करावया कंदन । वीर गर्जोन चालिले ॥ ५१ ॥
राक्षसांचे गिरागजर । सिंहनाद करिती थोर ।
वानर करिती भुभुःकार । रामनामें वीर गर्जती ॥ ५२ ॥

तेषामन्योन्यमासाद्य संग्रामः समुहानभूत् ।
बहूनामश्मवृष्टिं च शरवृष्टिं च वर्षताम् ॥२१॥
बहवो राक्षसा युद्धे बहुन्वानरययूथपान् ।
वानराश्चापि रक्षांसि विजग्मुर्बहवो बहून् ॥२२॥
ते शूलैः प्रथिताः केचिद्वानराः परमायुधैः ।
परिघैराहताः केचित्केचिच्छिन्नाः परश्वघैः ॥२३॥
वानरैराक्षसाश्चेव पार्श्वतश्च विदारिताः ।
पादपैर्गिरिशृंगैश्च संपिष्टा धरणीतले ॥२४॥

वानर राक्षससैन्याचा संग्राम :

वानर आणि निशाचर । युद्धा मिसळले दुर्धर ।
घाय हाणिती निष्ठुर । येरयेरां नोकोनी ॥ ५३ ॥
धीर वीर राहें साहें । मागें न ठेविती पाये ।
माथां वाजती घाये । रुधिर वाहे भडभडां ॥ ५४ ॥
राक्षस खेंचिती शूळाग्रें । वानर टाकिती शिळाशिखरें ।
राक्षस हाणिती तोमरें । कपि वृक्षाग्रें ढिलविती ॥ ५५ ॥
वीरीं विंधितां दृढ बाण । वानर वर्षती पाषाण ।
सक्तिहाणिती रक्षोगण । पर्वतीं प्राण वानर घेती ॥ ५६ ॥
घायीं वानर पडतां धरणीं । रामनामाच्या स्मरणीं ।
व्यथा जावोनि तत्क्षणीं । भिडती रणीं रणमारें ॥ ५७ ॥
वानरवीरां प्रताप श्रेष्ठ । शिळाशिखरें कडकडाट ।
रणीं राक्षसां करोनि पीठ । पाडिलें स्पष्ट क्षितितळीं ॥ ५८ ॥
कपि मर्दितां निशाचर । रणीं उठिला हाहाकार ।
प्रहस्त प्रधान चौघे वीर वानरां मार मारुं आलें ॥ ५९ ॥

करंधमः कुंभहनुर्महानादः समुन्नतः ।
एते प्रहस्तसचिवाः सर्वे जघ्नुर्वनौकसः ॥२५॥
जांबवांस्तु सुसंरब्धः प्रगृह्य विपुलां शिलाम् ।
पातयामास तेजस्वी महानादस्य वक्षसि ॥२६॥
द्विविदो गिरिशृंगेण जघानैकं करंधमम् ।
दुर्मुखः पुनरुत्थाय कपिः सविपुलं द्रुमम् ॥२७॥
राक्षसं क्षिप्रहस्तं तु समुन्नतमपोथयत् ।
अथ कुंभहनुस्तत्र तारेणासाद्य वीर्यवान् ॥२८॥
वृक्षेण महता प्राणान्कपिस्तस्य समाददे ।
अमृष्यमाणस्तत्कर्म प्रहस्तो रथमास्थितः ॥२९॥
चकार कदनं घोरं धनुष्पाणिर्वनौकसाम् ॥३०॥

प्रहस्ताच्या चार अमात्यांचे आगमन :

प्रहस्त प्रधान चौघे वीर । रणप्रवीण महाझुंझार ।
मारावया वानरभार । अति दुर्धर चालिले ॥ ६० ॥
करंधम आणि महानाद । कुंभहनु आणि समुन्नद्ध ।
चौघे वीर रण‍उन्नद्ध । करावया युद्ध लोटले ॥ ६१ ॥
वर्षोनियां बाणजाळा । वृक्ष पर्वत छेदोनि शिळा ।
रणीं मर्दिती वानरदळा । वक्षःस्थळा विंधोनी ॥ ६२ ॥
चौघे जण चहूंकडोनी । वानर शरजाळें वेढोनी ।
मारुं आदरिलें रणीं । दुर्धर बाणीं भेदोनी ॥ ६३ ॥
वानर उडतां आकाशीं । बाण भेदोनि सपिच्छी ।
सवेंचि पाडिती भूमीसीं । कासाविसी कपिसेना ॥ ६४ ॥
वानरीं करितां उड्डण । उरीं शिरीं विंधिती बाण ।
हाणितां पर्वत पाषाण । कर छेदून पाडिती ॥ ६५ ॥
ऐसे प्रधान चौघे जाण । करितां वानरां कंदन ।
कपि धाविन्नले चौघे जण । प्रधानप्राण घ्यावया ॥ ६६ ॥
द्विविद दुर्मख क्रोधान्वित । तार आणि जांबवंत ।
करावया प्रधानांचा घात । युद्धाआंत मिसळले ॥ ६७ ॥
द्विविद येवोनि गर्जोन । करंधमातें पाचारोन ।
पुच्छें छेदोनि धनुष्यबाण । गिरिशृंगें पूर्ण ठोकिला ॥ ६८ ॥
गिरिशिखरें हाणिअतां पुर्ण । रणीं अशुद्ध वमून ।
करंधमें सांडिला प्राण । अर्ध क्षण न लगतां ॥ ६९ ॥
दुर्मुखासी आला क्रोध । पाचारोनि समुन्नद्ध ।
दोघीं केलें मल्लयुद्ध । विविध बंध रणमारें ॥ ७० ॥
आणोनि प्रहस्तासंमुख । उपटोनियां तमाल रुख ।
समुन्नद्धा हाणितां देख । न घेतां उदक निमाला ॥ ७१ ॥
रणीं खवळला जांबवंत । महानादाते पाचारित ।
शिघ्र करोनि शिळाघात । युद्धाआंत पाडिला ॥ ७२ ॥
कुंभहनु निशाचर । त्यासी तगटला तार वीर ।
करितां चपेटघातमार । पायीं वानर धरियेला ॥ ७३ ॥
रागें उपटितां त्यासी । पुच्छें निमटिलें घाठीसी ।
कुंभहनुअ पाहे कासाविसी । बळ कपीसीं चालेना ॥ ७४ ॥
कुभहनु मूर्च्छापन । तार गेला पैं निसटून ।
सवेंचि शालवृक्ष हाणोन । घेतला प्राण कुंभहनूचा ॥ ७५ ॥
चारी प्रधान योद्धे पूर्ण । रणमारे विचक्षण ।
त्यांचा वानरीं घेतला प्राण । शंखस्फुरण राक्षसां ॥ ७६ ॥
चहूं प्रधानां झाला घात । बोंब उठली राक्षसांत ।
येरयेरांपुढें पळत । अति आकांत राक्षसां ॥ ७७ ॥
चौघे मारुन प्रधान । राक्षसांचे केले कंदन ।
प्रहस्त चालिला आपण । दुर्धर बाण सज्जूनी ॥ ७८ ॥
निर्दळावया वानरभार । दांत खातसे करकरां ।
ज्वाळा निघती नेत्रद्वारा । रहंवरा पेळिलें ॥ ७९ ॥
करितां वानरसेना पीठ । रथ लोटिला घडघडाट ।
बाण विंधोनि तिखट । वीर विकट खोंचिलें ॥ ८० ॥
वानरांचे निजघात । पर्वत शिळाद्रुमाअघात ।
बाणाग्रें छेदोनि समस्त । रणीं खोचित वानरां ॥ ८१ ॥
मधुमाधव मासांआंत । पळस फुलती आरक्त ।
तैसे वानर रुधिरोक्षित । प्रवाहे रक्त रणरंगीं ॥ ८२ ॥
प्रहस्त धनुर्वाडा दुर्धर । रणयोद्धा अति चतुर ।
बाणीं विंधित वानर । प्रवाहे पूर अशुद्धाचा ॥ ८३ ॥

सा मही रुधिरौघेण प्रच्छन्ना संप्रकाशते ।
संच्छन्ना माणवे मासि पंलाशैरिव पुष्पितैः ॥३१॥
शोणितौघां महातोयां नदीं सागरवहिनीम् ।
गृध्रहंसवराकीर्णां कंकसारसनादिताम् ॥३२॥
मेदःफेनसमाकीर्णामावर्तस्वननिःस्वनाम् ॥३३॥

वानर आणि निशाचर । रणीं भिडले घोरांदर ।
वाहती अशुद्धाचे पूर । नदी दुस्तर उलथली ॥ ८४ ॥
प्रहस्तें करितां रणख्याती । अशुद्धें पूर्ण जाली क्षिती ।
चारी बोटें न दिसे रिती । पूर वाहती रुधिराचे ॥ ८५ ॥
गीध कंक बक घार । वृक जंबूक रानसूकर ।
मांस भक्षिती अपार । प्राशिती रुधिर यथेष्ट ॥ ८६ ॥
रणनदी सम सागर । प्रवाहें प्राप्त यमद्वार ।
रणीं असतां श्रीरामचंद्र । प्रवाहें पूर परब्रह्मीं ॥ ८७ ॥
धन्य राक्षसांची ख्याती । रणीं पडतां ब्रह्मप्राप्ती ।
बाप कृपाळु रघुपती । सायुज्यमुक्ती शत्रूसीं ॥ ८८ ॥
ऐसा रणनदीविनोद । रणप्रवाहें सुखस्वाद ।
हंस सारस करिती शब्द । अति अगाध अक्षोभ्य ॥ ८९ ॥
ऐसी दुस्तर रणनदी । भेडा नुतखे त्रिशुद्धी ।
प्रहस्त मर्दितां वानरमांदी । नीळ सक्रोध क्षोभला ॥ ९० ॥

ततः सृजंतं बाणौघान्प्रहस्तं स्यंदने स्थितम् ।
ददर्श तरसा नीलो निघ्नन्तं वै प्लवंगमान्॥३४॥
स तं परमदुर्धर्षमायांतं तं महाकपिः ।
प्रहस्तं ताडयामास वृक्षमुत्पाट्य वीर्यवान् ॥३५॥
स तेनाभिहतः क्रुद्धो नर्दन्‍राक्षसपुंगवः ।
ववर्ष शरवर्षाणि प्लवंगानां चमूपतौ ॥३६॥
रोषितः शरवर्षेण शालेन महता महान् ।
निजघान हयान्नीलः प्रहस्तस्य महाजवान् ॥३७॥

रथारुढ प्रहस्त कुशल । व्युत्पत्ती वर्षतां बाणजाळ ।
तेणें त्रासितां वानरदळ । नीळ तत्काळ क्षोभला ॥ ९१ ॥
वृक्ष उपडोनि सबळ । प्रहस्तासी हाणितां नीळ ।
तेणें वर्षोनि बाणजाळ । वृक्ष समूळ छेदिला ॥ ९२ ॥
वृक्ष छोदोनियां जाण । नीळावरी अति तीक्ष्ण ।
प्रहस्त वर्षला बाण । हस्तविंदान लाघवी ॥ ९३ ॥
येतां प्रहस्तबाण कडाडीं । पडत डोळियां झांपडी ।
वानरें कायसी बापुडीं । नीळा समपाडीं विंधिलें ॥ ९४ ॥
प्रहस्ताच्या बाणश्रेणी । नीळ विवारी पुच्छपाषाणीं ।
रागें शालवृक्ष उपटोनी । घावो निवाणीं ओपिला ॥ ९५ ॥
प्रहस्त गेला हातोहातीं । अश्व ध्वज रथ सारथी ।
घायें नेले पैं भस्मांतीं । विस्तीर्ण क्षितीं पाडिले ॥ ९६ ॥
येतां शालवृक्ष‍आघात । धाकें गजबजिला प्रहस्त ।
रथ सांडोनि सवेग पळत । नीळ कृतांत क्षोभला ॥ ९७ ॥
नीळ सेनापति महाबळी । सरथ अश्व सारथ्या करोनि होळी ।
पुढें चालिला रणसमेळीं । रणकल्लोळीं गर्जत ॥ ९८ ॥

विधनुः स कृतस्तेन प्रहस्तो वाहिनीपतिः ।
प्रगृह्य मुसलं घोरं स्यंदनादवपुप्लुवे ॥३८॥
ततस्तौ वाहिनीमुख्यौ जातक्रोधौ तरस्विनौ ।
सिंहशार्दूलसदृशौ सिंहशार्दूलविक्रमौ ॥३९॥
आजघान तदा नीलं ललाटे मुसलेन सः ।
प्रहस्तः परमायत्तस्ततः सुस्राव शोणितम् ॥४०॥
ततः शोणितसंसिक्तः संगृहीत्वा महातरुम् ।
प्रहस्तस्योरसि क्रुद्धो विससर्ज महाकपिः ॥४१॥
तमचिंत्य प्रहारं स प्रगृह्य मुसलं महत् ।
अभिदुद्राव बलिनं बलान्नीलं प्लवंगमम् ॥४२॥

देखोनि शालवृक्षआघात । मुसळ घेवोनि हातांत ।
रथावरुनि उडे प्रहस्त । सांडून तेथ चापशर ॥ ९९ ॥
नीळ कपिसेनाधिपति । प्रहस्त रावणसेनापती ।
सेनापतीसी सेनापती । दोघें भिडती रणरंगीं ॥ १०० ॥
जैसे शरत्काळींचे पोळ । दोघे जैसे सिंहशार्दूळ ।
दोघांअंगीं प्रबळ बळ । दोघे चपळ रणमारा ॥ १ ॥
एक विंधीं दृढ बाणीं । दुजा पिष्ट करी पाषाणीं ।
एक हाणी गदा विंदानीं । दुजा द्रुमपाणी रणमारें ॥ २ ॥
रथ भंगिला सहसारथी। प्रहस्त जाला पदाती ।
मुसळ घेवोनियां हातीं । लघु व्युत्पत्ती तळपत ॥ ३ ॥
मुसळयुद्धीं अति कुशळ । लघुलाघवें हाणोनि मुसळ ।
भेदिलें नीळाचे कपाळ । केला बंबाळ अशुद्धें ॥ ४ ॥
अशुद्धें डंवरला वानर । शोभे जैसा नृसिंहवीर ।
करावया प्रहस्तासीं मार । उडे सत्वर आकाशीं ॥ ५ ॥
उडी घालोनियां गजरीं । निघातें हाणी उरावरी ।
प्रहस्त चालिला चांचरीं । स्वयें सावरी मूर्च्छेतें ॥ ६ ॥
वीर प्रबळ प्रहस्त । कपीचा न मानूनि घात ।
मुसळ घेवोनि धांवत । करावया घात नीळाचा ॥ ७ ॥

तस्य युद्धाभिकामस्य मृघे मुखलयोधिनः ।
प्रहस्तस्य शिलां नीलो मूर्घ्नि तूर्णमपातयत् ॥४३॥
नीलेन कपिमुख्येन विमुक्ता महती शिला ।
बिभेद बहुधा घोरा प्रहस्तस्य शिरो महत् ॥४४॥
स गतासुर्गतश्रीको गतसत्त्वो गतेंद्रियः ।
पपात सहसा भूमौ छिन्नमूल इव द्रुमः ॥४५॥

लघुलाघवी मुसळहस्त । येतां देखोनि प्रहस्त ।
नीळ आनंदें नाचत । करावया घात पडिपाडें ॥ ८ ॥
प्रह्स्त झेलितां मुसळ । सवेग मारुं आला नीळ ।
नीळें घेवोनि शीघ्र शिळ । त्याचे कपाळीं ओपिली ॥ ९ ॥
सबळ बळें हाणितां शिळा । शतधा भेदिलें कपाळा ।
अशुद्ध वाहत भळभळां । क्षितितळा उलंडला ॥ ११० ॥
आयुष्य गेले हातोहातीं । प्राण सांडिला इंद्रियवृत्ती ।
देहींची पैं गेली मतीं । पाडिला क्षितीं भणभणित ॥ ११ ॥
गेले यश गेली कीर्तीं । गेली त्याची शौर्यशक्ती ।
गेली गेली सन्मानमहती । पाडिला क्षितीं भणभणित ॥ १२ ॥
पुष्पित सपल्लव सफळ । वृक्ष उलंडे छेदितां मूळ ।
तेंवीं प्रहस्त वीर प्रबळ । पडे तत्काळ क्षितितळीं ॥ १३ ॥

हस्ते प्रहस्ते नीलेन तदकंप्यं महाबलम् ।
न शेकुः समवस्थातुं निहते वाहिनीपतौ ॥४६॥
सेतुबंधं समासाद्य विशीर्णं सलिलं यथा ।
रक्षःपतिगृहं गत्वा ध्यानमूकत्वमागता ॥४७॥
ततस्तु नीलो विजयी महाबलः प्रशस्यमानः स्वकृतेन कर्माणा ।
समेत्य रामेण सलक्ष्मणेन प्रहृष्टरुपोऽथ बभूव यूथपः ॥४७॥

नीळें मारिला प्रहस्त । बोंब उठली राक्षसांत ।
मुख्य धुरेचा जाला घात । अति आकांत लंकेसीं ॥ १४ ॥
संमुख रहावया जाण । कोणी न धरती आंगवण ।
पळतां राक्षस कंपायमान । लंकाभुवन ठाकेना ॥ १५ ॥
पळतां पायीं वेंगडी वळत । धाकें धाकें मागें पाहत ।
रणीं पडल्या प्रहस्त । अति आकांत राक्षसां ॥ १६ ॥
देखोनि प्रहस्ताचें मरण । एकां पडिलें महामौन ।
भये मूर्च्छित जालें मन । कार्यकारण विसरले ॥ १७ ॥
कुंभ भंगलिया जाण । सैरा पसरे जीवन ।
प्रहस्त निमाल्या प्रधान । पळे सैन्य सैरावैरां ॥ १८ ॥
नीळ सुग्रीव सेनापती । प्रहस्त मारोनि रणव्युत्पत्ती ।
स्वयें पावला विजयवृत्ती । वानर स्तविती स्वानंदें ॥ १९ ॥
नीळाची विजयख्याती । स्वयें जुत्पत्ती वानिती ।
स्वमुखें वानी रघुपती । वानी कीर्तीं सौ‍मित्र ॥ १२० ॥
नीळ येवोनि आपण । श्रीरामा घाली लोटांगण ।
रामें दिधले आलिंगन । समाधान स्वानंदें ॥ २१ ॥
लक्ष्मणाचें वंदी चरण । तेणेंही दिधलें आलिंगन ।
नीळाचें भाग्य गहन । करिती स्ववन सुरवर्य ॥ २२ ॥
अंगद सुग्रीव जांबुवंत । साक्षपें वंदिला हनुमंत ।
नळकुमुदादि जुत्पती समस्त । नीळ वंदित स्वानंदें ॥ २३ ॥
सुग्रीवे थापटिली पाठी । अंगद स्वानंदें लावी कंठीं ।
वानर सांगती विजयगोष्टी । नीळ जगजेठी रणयोद्धा ॥ २४ ॥
श्रीराम असतां पाठिराखा । रणीं वानरां नाहीं शंका ।
जिणावया दशमुखा । करिती आवांका अवघेही ॥ २५ ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामदृष्टीपुढें रण ।
रण नव्हे तें ब्रह्म पूर्ण । घाय ते जाण महाबोध ॥ २६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
प्रहस्तवधो नाम षोडषोऽध्यायः ॥ १६ ॥
ओंव्या ॥ १२६ ॥ श्लोक ॥ ४८ ॥ एवं ॥ १७४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सोळावा