संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय शहात्तरावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय शहात्तरावा

श्रीरामेश्वरमहिमावर्णन –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मारुतीस परतण्यास वेळ लागल्याने श्रीराम सचिंत :

विश्वेश्वरदत्त लिंग । हनुमान घेवोनि सवेग ।
उड्डान केलें अति चांग । गगन सांग आक्रमिलें ॥ १ ॥
येरीकडे रघुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।
कां पां नयेचि वायुनंदन । काय विघ्न पडिलेंसे ॥ २ ॥
उपवासी वानरवीर । खेद क्षीण क्षुधातुर ।
आम्हांसीं न घेतां फळाहार । वानर आहार न सेविती ॥ ३ ॥
बापुडे हे गोळांगूळ । आहारेवीण झाले विकळ ।
गात्रें जाहली बेंबळ’ । भ्रमती डोळे गरगरां ॥ ४ ॥
यांसी आहार न देतां । सकळां होईल प्राणांत व्यथा ।
रामाचा नेम आम्हां भोंवता । वानरां समस्तां मारिलें क्षुधा ॥ ५ ॥
ऐसी विस्तरेल ख्याती । जगीं होईल अपकीर्ती ।
श्रीरामसेवा सुखार्थी । दुःखप्राप्री तेथें झालीं ॥ ६ ॥
सकळ निरसावया विरून । सेवावा श्रीरघुनंदन ।
तेणेंचि मांडिलें निर्वाण । सुखेचे प्राण जावूं पाहे ॥ ७ ॥
भजनाभिमान वाढवितां देख । दुरपवाद बोलती लोक ।
सेवितां श्रीरघुकुळटिळक । जीवें निःशेख मारिले ॥ ८ ॥
जो आग्रहे गुंतला स्वयें । तो अन्यातें सोडील काये ।
लहान थोर लोक पाहें । अपवाद स्वयें बोलती ॥ ९ ॥
आणीक सिद्धांत नव्हे ऐसा । एकदेशीं विश्वेशा ।
भावूं नये गा सहसा । भजनठसा हा नव्हे ॥ १० ॥
जो सर्वगत सनातन । ज्यासी विश्वात्मा हें अभिधान ।
तो प्रतिमेच्या ठायीं पूर्ण । भावितां जाण क्षोभेल ॥ ११ ॥
शिवपूजेचें महिमान । सद्‌गुरुवसिष्ठमुखें जाण ।
म्यां ऐकिलें आपण । विश्वमूर्ति पूर्णशंकर ॥ १२ ॥
त्याचें पूजेचें आयतन । प्राणिमात्रां सुख जाण ।
म्यांचि ऐकिलें आपण । स्वशक्तिकरोन सर्वथा ॥ १३ ॥
ऐसा असतां निर्धार । क्षुधा पीडतां वानर ।
स्वयें क्षोभेल शंकर । भजन साचार हें नव्हे ॥ १४ ॥

वेज केजाप्युपायेन यस्य कस्यापि देहिनः ।
सन्तोषं जजयेत्प्राज्ञस्तदेवेश्वरपूजनम् ॥ १ ॥

सर्व भूतमृष्टीला संतोष देणें हीच ईश्वरपूजा :

ज्ञानाचें मुख्य लक्षण । सर्वां भूतीं श्रीभगवान ।
स्वयें सेवावा अनवच्छिन्न । श्रुतिवचन गर्जत ॥ १५ ॥
यथासामर्ध्ये यथावित्ते । चित्तें भावार्थे जीवितें ।
सुख द्यावें प्राणिमात्रातें । हेंचि निश्चितें निजभजन ॥ १६ ॥
भलते याती भलते योनी । भलतेनी प्रकारेंकरोनि ।
सुख प्राणिमात्रालागूनी । द्यावे अनुदिनीं हेंचि भजन ॥ १७ ॥
मेळवोनि षोडशोपचार । प्रतिमा पूजितां साचार ।
स्वयें सुखावेना शंकर । जेंवी चराचर पूजिलिया ॥ १८ ॥
विश्मूर्ति विष्वक्सेन । गर्जताहे श्रुति पुराण ।
तेथे प्रतिमेचें पूजन । तें गौण जाण श्रुतिवाक्यें ॥ १९ ॥
यालागीं विश्वमूर्ती । शंकर पूजावा सर्वां भूतीं ।
तेथें वानरांची उपेक्षाचित्तीं । करितां निश्चितीं अधर्म ॥ २० ॥
मजलागीं आर्तभूतें । चित्तें वित्तें जीवितें ।
तीं सांडोनि तळमळितें । आमचीं व्रतें तीं किती ॥ २१ ॥
मुख्य पूजेचें आयतन । प्राणिमात्रा सुखदान ।
बाह्य विधीचें प्रतिपालन । प्रतिमा जाण लौकिकी ॥ २२ ॥

वानरांना तृप्र करण्यासाठी राम वाळूचे लिंग करतात :

ऐसा करोनि निर्धार । तृप्त करावया वानर ।
सरसावला रघुवीर । विधी साचार लक्षोनी ॥ २३ ॥
लिंगपूजेवांचून जाण । करितां न ये फळभोजन ।
लौकिक वाढला संपूर्ण । लिंग निर्माण करूं येथें ॥ २४ ॥
समुद्रतीरीं वाळुवेचे । लिंग निर्माण करोनि साचें ।
पूजन करोनि तयाचें । करूं वानरांचें क्षुधाहरण ॥ २५ ॥
म्हणोनियां श्रीरामचंद्र । वाळुकालिंगसत्वर ।
करोनिया पूजोपचार । तेथें रघुवीर प्रतिष्ठी ॥ २६ ॥
प्रतिमेसी आवाहन । स्वयें करितां रघुनंदन ।
तंव आश्चर्य वर्तलें गहन । सावधान अवधारा ॥ २७ ॥
जाणवलें शंकरासी । तो खळबळिला मानसीं ।
क्षोभ वाटेल राघवासी । आतां जिण्यासीं ठाव कैंचा ॥ २८ ॥
मारुतीसीं बोलतां । विलंब लागला सर्वथा ।
तंव इकडे श्रीरघुनाथा । दर्शनार्था वंचलों ॥ २९ ॥
सांडोनियां निजानुसंधान । वाग्व्यापार करितां पूर्ण ।
निजात्माजो अंतरज्ञ । तो सर्वथा जाण दुरावे ॥ ३० ॥
वृक्षा करितां तोंडपिटी । कायसी साधनांची गोष्टी ।
तैं साध्यासी कैंची भेटी । वृथा वटवटी नागवण ॥ ३१ ॥
साध्य आकळे संपूर्ण । तंव सजनासी करावा प्रश्न ।
पावलिया निजखूण । वाग्व्यापार जाण न करावा ॥ ३२ ॥
आणिकाची कथा कोण । माझी बुद्धि ठकली पूर्ण ।
भेटतांचि वायुनंदन । घ्यावे दर्शन उठाउठीं ॥ ३३ ॥
कायसी पर्वताची कथा । सांगावया गुंतलो मारुता ।
तंव क्षोभ आला रघुनाथा । उपेक्षा तत्वतां केली माझी ॥ ३४ ॥

श्रीशंकरांचा त्या वाळूच्या लिंगांत प्रवेश:

प्रसन्न व्हावया रघुवीर । काय करणें विचार ।
वालुकालिंग व्यवहारमात्र । केलें सत्वर श्रीरामें ॥ ३५ ॥
तेथें प्रवेशोनि आपण । घ्यावे श्रीरामदर्शन ।
इतुकेन विकोपाचें विसर्जन । सहजचि जाण होईल ॥ ३६ ॥
झालिया साक्षात्कार । मग कोपासी कैंचा थार ।
आणि श्रीरामाचें चरित्र । तें वैद्य साचार आम्हांसी ॥ ३७ ॥
लीलेनें अंगीकारी श्रीरघुनाथ । तें आम्हां वंद्य यथार्थ ।
म्हणोनि वाळुकालिंगा आंत । स्वयें तेथ आपण प्रवेशे ॥ ३८ ॥
ऐसा करोनि निर्धार । मागें सांडूनि हनुमानवीर ।
स्वयें येवोनि शंकर । प्रवेश सत्वर लिंगामाजी ॥ ३९ ॥
श्रीरामे करोनि प्रतिष्ठापन । स्वयें केलें फळभोजन ।
तृप्त केले वानरगण । क्षुधा संपूर्ण निरसली ॥ ४० ॥
तृप्त झाले वानर । करीत रामनामें भुभुःकार ।
बाप कृपाळु रघुवीर । क्षुधा सत्वर निरसिली ॥ ४१ ॥
निजतेजें श्रीशंकर । पुढें आला वेगवत्तर ।
मागें उरली प्रतिमामात्र । आला कपींद्र तेणेंसी ॥ ४२ ॥
तंव आश्चर्य देखिले तेथें । लिंग प्रतिष्ठोनि रघुनाथें ।
संपादिले फळाहारातें । तृप्र समस्तें वानर ॥ ४३ ॥

नंतर मारुती येऊन पोचला. सगरतीरावर
वालुकालिंग पाहून मारुती उद्विग्र व त्याचा क्षोभ :

मज पाठवोनि काशीतें । लिंग आणविलें रघुनाथें ।
शेखीं वाळूचे प्रतिष्ठिलें येथें । निजकार्यातें संपादिलें ॥ ४४ ॥
आम्हीं कष्टे कार्य साधित । श्रीराम करी वाताहत ।
तरी आमचें काय जीवित । वृथा निंदित लौकिकीं ४५ ॥
आतां मी ऐसें करीन । श्रीरामें केलें लिंगस्थापन ।
तें उपडोनियां सांडीन । प्रतिष्ठीत निजलिंग ॥ ४६ ॥
म्हणोनि अभिमानला मारुती । पुच्छें कवळोनि लिंगाप्रती ।
लिंग उपडावया निश्चिती । साटोप मारुती मांडिला ॥ ४७ ॥

वाळूचे लिंग उखडण्यात मारुतीला अपयश :

व्यर्थ करोनि श्रीरामाज्ञेसी । निजाभिमानें लिंगासी ।
उत्थापूं पाहे आवेशीं । तें श्रीरामासीं केंवी साहे ॥ ४८ ॥
लिंग उपडितां वायुनंदन । उगाचि पहातरधुनंदन ।
हनुमान क्षोभला आपण । त्यासी प्रतिवचन काय बोलो ॥ ४९ ॥
म्हणोनि उगाचि रघुवीर । परी कोणाहि न कळे विचार ।
मौनाचे काय अंतर । न कळेसाचार सुरसिद्धां ॥ ५० ॥

अभिमानामुळे मारुतीला दृष्टीला अंधत्व:

अभिमानाचें निजबळ । दृष्टी आच्छादिली सकळ ।
अवघें ब्रह्मांड शून्यमंडळ । राम केवळ भासेना ॥ ५१ ॥
जो क्षणही न विसंबे जाण । तो जवळी असतां रघुनंदन ।
स्वयें न देखे वायुनंदन । देखणेपण बुडाले ॥ ५२ ॥
राम नाहीं जंव तेथें । तंव उपडूनि सांडू लिंगातें ।
प्रतिष्ठूनि म्यां आणिलें तें । मग श्रीरामातें पै भेटों ॥ ५३ ॥
नवल अभिमानाची गती । जवळी असतां श्रीरघुपती ।
सिद्ध संमुख न देखे मारुती । निजाभिमानें करूनी ॥ ५४ ॥

मारुतीची शेपटी तुटून तो मूर्च्छित होऊन कोसळला :

वेंटाळूनि पुच्छेंकरी । लिंग उपडितां कपिकेसरी ।
लांगूल तुटलें झडकरी । पडिला धरेवरी मूर्च्छित ॥ ५५ ॥
प्रळयकाळींचेनि सत्राणें । बळ केलें हनुमंतानें ।
तितुकें वृथा गेलें अभिमानें । धिक् जिणें अभिमानिया ॥ ५६ ॥
वजदेही मारुती । ऐसें पुराणें गर्जती ।
त्याची झाली सकळ शांती । नवल करिती सुरसिद्ध ॥ ५७ ॥

गर्वोन्मत्त इंद्र व दुर्वास यांची दुर्दशा :

ज्ञानाभिमानें निश्चितीं । सर्वांगीं भगें अमरपती ।
स्वयें झाली निमेषगती । सांगों किती नवलावो ॥ ५८ ॥
ज्ञानाभिमानें दुर्वासऋषी । छळू गेला अंबरीषासी ।
कोलितें ख्याति लाविली त्यासीं । त्रैलोक्यासीं हिंडविलें ॥ ५९ ॥
मग सांडोनि अभिमानस्थिती । शरण आला अंबरीषाप्रती ।
तेणें वांचविला निमेषगती । निरामिभानस्थिती अगाध ॥ ६० ॥
परोक्ष जे अभिमानस्थिती । तिची ऐसी कठिण गती ।
अपरोक्ष असतां श्रीरघुपती । न चले निश्चिती अभिमान ॥ ६१ ॥
न विचारितां राममहिमान । स्वयें केला अभिमान ।
तेणें पडिला उलथोन । लज्जायमान अतिदुःखी ॥ ६२ ॥
सुटले रुधिराचे पाझर । मूर्च्छा आली अति दुर्धर ।
भयभीत वानर वीर । हाहाकार वर्तला ॥ ६३ ॥
खुंटल्या सकळांच्या वृत्ती । न चले कोणाची विनंती ।
कठिण भारी रघुपती । कांही युक्ती चालेना ॥ ६४ ॥

मारुतीसाठी शंकरांची रामाला प्रार्थना व रामस्तुती :

तेणें काळें विश्वनाथ । प्रत्यक्ष होवोनि त्वरित ।
विनविता झाला रघुनाथ । अति विनीत होवोनियां ॥ ६५ ॥
त्राहें’ त्राहें जी श्रीराम । भक्तकामकल्पद्रुमा ।
विश्वाचा तूं विश्वात्मा । मेघश्यामा कृपा करीं ॥ ६६ ॥
जन्मजन्मांतरीं अनवच्छिन्न । आम्हीं केलें आराधन ।
श्रीरामा तेणें समाधान । तुझें दर्शन आजी झालें ॥ ६७ ॥
अनवच्छिन्न अखंडता । सर्वां भूतीं तूतें पाहतां ।
तुझी भेटी झाली आतां । ऐक तत्वतां सांगेन ॥ ६८ ॥
सनकादिकांचें ध्येय पूर्ण । ते तुझे ध्येय श्रीचरण ।
मनीं करितां नित्य चिंतन । प्रत्यक्ष जाण भेटलासी ॥ ६९ ॥
नारदादिक भक्तवृंद । तुझी चरणकीर्ति अगाध ।
आवडीगातो पदबंध । झाले निर्द्वंद्व सर्वभावें ॥ ७० ॥
तेणें संप्रदायें कीर्ति गातो । संसारभया हाणोनि लाता ।
तुजसी भेटी श्रीरघुनाथा । झाली तत्वतां निश्चये ॥ ७१ ॥
सर्वां भूतीं तुझे श्रीचरण । सांडोनियां मानाभिमान ।
हर्षे नमन करितां जाण । स्वयें आपण भेटलासी ॥ ७२ ॥
सर्वेद्रियें सर्वभावेंसीं । तुज भजिन्नलों अति प्रीतीसीं ।
तें आजि आलें अति फळासी । श्रीचरणासी पावलों ॥ ७३ ॥
आजिचेंनि सफळ कुळ । येणें देहें रघुकुळपाळ ।
स्वयें अविकळ । देखिलासी ॥ ७४ ॥
शास्त्रव्युत्पत्ति व्याख्यान । चिरकाळ साधिलें जाण ।
तें फळा आलें संपूर्ण । तुझे श्रीचरण देखिले ॥ ७५ ॥
ज्ञानाचें फळ विज्ञान । तेथें त्रिपुटीचें निर्दळण ।
तेणें तुझें रूप संपूर्ण । सच्चिद्धन श्रीरामा ॥ ७६ ॥
जें नामरूपगुणातीत । निगम परतले नेति म्हणत ।
तें रूपा आलें मूर्तिमंत । भक्तकार्यार्थ श्रीराम ॥ ७७ ॥
भक्तकाजकैवारी । ऐसें गर्जत श्रुतिशास्त्रीं ।
तो तूं कोपसी आम्हांवरी । तैं कैसेनि उरी उरे स्वामिया ॥ ७८ ॥

मीच मारुतीला तशी प्रेरणा दिली असे रामांना शंकर सांगतात :

हनुमान नव्हे अभक्त । अथवानाहीं केलें उद्धत ।
प्रकाशावया तुझें चरित । करणी निश्चित हे माझी ॥ ७९ ॥
दक्षिणे येवोनि रघुनंदन । पाषाणीं करोनि सेतुबंधन ।
श्रीरामें केलें लागतां क्षण । चरित्र पावन जगद्वंद्य ॥ ८० ॥
श्रीरामाचा प्रताप । प्रकाशावया तीर्थरूप ।
हनुमंतहातीं साटोप । करावया अल्प बुद्धिमाझी ॥ ८१ ॥
तंव झालें विपरीत । झाला अभिमानाचा घात ।
नेणोनि श्रीरामाचें सामर्थ्य । मूर्ख मिरवित अभिमान ॥ ८२ ॥
तथापि कृपाळु रघुनाथ । उत्संखळ होवों नेदी भक्त ।
लांगूल छेदोनियां त्वरित । पडिला हनुमंत धरेवरी ॥ ८३ ॥
तेणें माझा अंतराभिमान । हनुमंताचा बळाभिमान ।
करोनि दोहींचें उपमर्दन । केलें शिक्षण इतरांसी ॥ ८४ ॥
आमुचा प्रताप किती । जे विस्तारूं श्रीरामकींर्ती ।
आपुली आपण निजख्याती । स्वयें रघुपति विस्तारी ॥ ८५ ॥
ते कीर्तीचे महिमान । श्रीरामा ऐक सावधान ।
साकल्यें सांगावया पूर्ण । सर्वथा ज्ञान मज नाहीं ॥ ८६ ॥

क्षेत्रं राममिदं विद्धि द्वितीयमविमुक्तकम् ।
विश्वेश्वरो वयं साक्षाद्धनूमांश्च वयं तथा ॥ २ ॥
मा कुरुष्वात्र संदेह त्वमहं विद्धि सर्वशः ।
शिवशिवेति वचो ब्रुयाद्‌रामः शिवपदं रात: ॥ ३ ॥

मारुतीला क्षमा करून उठविण्याची विनंती :

हें रामक्षेत्र विख्यात । दुसरें जाण अविमुक्त ।
दर्शनें मुक्ति पतिता होत । ख्याति अद्‌भुत तिहीं लोकीं ॥ ८७ ॥
तुझे अंशावतार रघुपति । ब्रह्मा विष्णु रुद्रमूर्ति ।
ते थे आमची कवण गति । तरी अंश निश्चिती तुझे आम्ही ॥ ८८ ॥
पूर्वपरंपरा स्थिती । तुझे वचन रघुपती ।
माझे एके अंशे निश्चितीं । अवघें जग चिन्मूर्ती पैमाझी ॥ ८९ ॥
त्यांत आम्हींही साचार । हनुमान आणि मी विश्वेश्वर ।
केवळ तुझे अंशावतार । जाण साचार श्रीरामा ॥ ९० ॥
ये अर्थी संदेहस्थिती । सर्वथा नाहीं रघुपती ।
उपरत करोनियांवृत्ती । पाहें निश्चितीं सावध ॥ ९१ ॥
सावध व्हावें श्रीरघुनाथा । ऐसें आम्ही तुज सांगतां ।
लागताहे उद्धतता । क्षमा त्या अर्था करीं स्वामी ॥ ९२ ॥
कृपा करोनि रघुनाथा । आतां उठवावे कपिनाथा ।
ऐकतां शिववचनार्था । पावली तत्वतां निजखूण ॥ ९३ ॥

‘शिव शिव’ म्हणताच रामांना समाधी लागल्यामुळे सर्वजण सचिंत :

शिव शिव म्हणतां जाण । झाला शिवपदीं लीन ।
जेथें नाहीं मीतूंपण । ध्येय ध्यान जेथें नाहीं ॥ ९४ ॥
केवळ जें सच्चिद्धन । सुखमय सनातन ।
स्वयें तेथें झाला निमग्र । जेंवी लवाग सागरीं ॥ ९५ ॥
शिवशिव म्हणतांच रघुनाथ । झाला शिवपर्दी लयंगत ।
तेणें सकळ झाले विस्मित । विश्वनाथ आदिकरोनी ॥ ९६ ॥
खुंटली सकळांची युक्ती । ध्यानस्थ झाला रघुपती ।
हडबडिल्या वानरपंक्ती । कार्यस्थिती नासली ॥ ९७ ॥
समाधि लागली रघुपती । कोण वधील लंकापती ।
केंवी सुटे सीता सती । आली ग्रहगती सकळांची ॥ ९८ ॥
मेलो आणितां पाषाण । कष्टें केलें सेतुबंधन ।
तें वृक्षा गेलें संपूर्ण । दुस्तर विरून ओढवलें ॥ ९९ ॥
कैंचे मांडलें फळभोजन । कैंचें ओढवलें शिवदर्शन ।
कोठे पाठविला वायुनंदन । दुस्तर विघ्न ओढवले ॥ १०० ॥
परमात्मा श्रीरघुनंदन । त्यासीं कां लागलें शिवदर्शन ।
लोकसंग्रहार्थ विधिपाळण । करितां विध्न केवढें ॥ १०१ ॥
जो वजदेही मारुती । तो मूर्च्छित पडिला क्षितीं ।
पुच्छ तुटले निमेषगती । कार्यस्थिती नासली ॥ १०२ ॥
समाधि लागली श्रीरामासी । कोण सावध करी त्यासी ।
कोण सोडवील जानकीसी । वधील रावणासी पै कोण ॥ १०३ ॥
जवळी बैसला विश्वनाथ । तेणेंचि नाशिला कार्यार्थ ।
श्रीराम केला समाधिस्थ । पडिला हनुमंत मूर्च्छित ॥ १०४ ॥
मूर्च्छित करोनि कपींद्रा । भुलविलें श्रीरामचंद्रा ।
आपण होवोनि घाबिरा । निवांत म्हातारा बैसलासे ॥ १०५ ॥
म्हणोनि करिती कोल्हाळ । कासावीस गोळांगूळ ।
सुटली सकळां तळमळ । कार्य सकळ नासलें ॥ १०६ ॥
देखोनि सकळांचें चेष्टित । शंकर झाला अति सचिंत ।
होवोनि ठेलें विपरीत । झाला समाधिस्थ श्रीराम ॥ १०७ ॥
सावध न करितां रामासी । आकांत होईल सर्वांसीं ।
कोण उठवील हनुमंतासी । वधील रावणासी पै कोण ॥ १०८ ॥
सावध न होतो रघुनाथ । केंवी सुटे जनक दुहिता ।
सकळ वनवास होईल वृक्षा । बोल अनागता लागेल ॥ १०९ ॥
आमुचीही न उरे उरी । उपहास होईल चराचरीं ।
म्हणोनि साटोप धरी त्रिपुरारी । समाधि निर्धारीं उतरावया ॥ ११० ॥
श्रीराम सुखाच्या अंतरीं । प्रवेशोनि झडकरीं ।
लोकरक्षणाच्या उत्तरी । झाला कामारी विनविता ॥ १११ ॥

राम राम महाबाहो महापुरुष चिन्मय ।
नावं विश्रांतिकालो हि लोकानंदमयो भव ॥ ४ ॥

शंकरांनी रामांना सावध करून अकाली समाधी घेऊ नये असे सुचविले :

चैतन्याचेनि प्रभावे वहिली । जीवकळा सावध केली ।
प्राणशक्ति परिचारिली । इंद्रियां आली टवटवी ॥ ११२ ॥
श्रीरामाच्या निजशरीरीं । जीवित्व नाहींच निर्धारीं ।
मिथ्याच लोकोपकारीं । जीवित धरी श्रीराम ॥ ११३ ॥
सावध होतांचि रघुनाथ । विनविता झाला विश्वनाथ ।
अकाळीं होतां समाधिस्थ । होईल आकांत सकळांसी ॥ ११४ ॥
तुज होतां समाधिस्थ । मृषा भाष्य अनागत ।
तुझे वियोगें अत्यंत । अति दुःखित जानकी ॥ ११५ ॥
तिसीं द्यावया समाधान । वेगीं सोडूनियां बाण ।
निवटोनियां दशानन । बंदिमोचन करीं सुरगणांचें ॥ ११६ ॥
सोडवीं देवांचिया कोडी । तोडीं नवग्रहाची बेडी ।
सीता सोडवून तांतडीं । उभवीं गुढी रामराज्याची ॥ ११७ ॥
निवटोनि दुष्ट राक्षसगण । स्थापीं धर्मात्मा बिभीषण ।
चित्तें विसे जीवितेकरोन । अनन्य शरण तुजलागीं ॥ ११८ ॥
अवध्या त्रैलोकीं तुजवीण । झाली मृतप्राय पूर्ण ।
त्यांसीं न देतां समाधान । समाधि जाण अति निंद्य ॥ ११९ ॥
समाधिउत्थानापरता पूर्ण । परमात्मा तूं रघुनंदन ।
तेणें समाधिस्थ होऊन । काय अधिकपण साधावें ॥ १२० ॥
सावध ऐकें कृपानिधी । श्रीराम समाधिते उपाधी ।
सांडी परती आहाच बुद्धी । होईं त्रिशुद्धी सावध ॥ १२१ ॥
तूं प्रकृतिपुरुषाहूनि भिन्न । चिन्मात्रैक चैतन्यघन ।
महापुरुष हें अभिधान । यालागीं जाण तुज म्हणती ॥ १२२ ॥
अवतारनाट्य रघुपती । जैसें घेतलें तैशा रीतीं ।
संपादावें यथानिगुतीं । सांडीं परती समाधि ॥ १२३ ॥
करोनि कृपावलोकन । सकळ अपराध क्षमा करून ।
उठवावा वायुनंदन । दशानन निवटावा ॥ १२४ ॥

श्रीरामांनी सावध होऊन शंकरांना वंदन केलें :

ऐसी शंकराची विनवण । ऐकतांचि रघुनंदन ।
आनंद उथळला पूर्ण । करोनि लोटांगण शिव विनविला ॥ १२५ ॥
सांडोनियां समाधिअवस्था । विनविता झाला विथनाथा ।
तुझी आज्ञा यथार्थता । वंद्य तत्वतां मजलागीं ॥ १२६ ॥
नव्हे अपराधी हनुमंत । नाहीं केलें उद्धत ।
क्षेत्रमहिमा अत्यद्‌भुत । हनुमंतें साद्यंत प्रकाशिला ॥ १२७ ॥
व्हावी सेतुबंधख्याती । पतित उद्धरावे निश्चितीं ।
अल्प नव्हे तपःस्थिती । मोक्ष सर्वांसी द्यावया ॥ १२८ ॥

शिवरामाभिधं लिंगं स्थापित विधिवच्छुभमू ।
सेतौ रामेश्वरं लिंगं केवलं ब्रह्म उच्यते ॥ ५ ॥

रामेश्वरक्षेत्राचा महिमा वर्णन :

ऐके स्वामी विश्वनाथ । सेतुबंधमाहात्म्यकथा ।
तुज सांगेन साधारणता । साकल्यता कोण वर्णी ॥ १२९ ॥
या सेतुबंधाचे तीरीं । दोन्हीं लिंगांची अभिनव परी ।
जें आणिलें कपिकेसरी । तो निर्धारीं विश्वनाथ ॥ १३० ॥
स्वामी शंकर आपण । ज्योतिर्मय प्रकाशोन ।
जेथें प्रत्यक्ष झालासी जाण । ज्योतिर्लिंग पूर्ण हें स्वामी ॥ १३१ ॥
कल्पाचिये आदीं निश्चित । शिव सनातन सर्वगत ।
तो तूं आजि प्रगटलासी येथ । कृपायुक्तपै स्वामी ॥ १३२ ॥
याकारणें अनादी । ज्योतिर्लिंग पै त्रिशुद्धी ।
विश्वोद्धाराचिये विधी । कृपानिधी आलासी ॥ १३३ ॥
माझें निजध्येय संपूर्ण । तें हें ज्योतिर्लिंग जाण ।
म्हणोनि माझें अधिष्ठान । निरंतर जाण पै येथें ॥ १३४ ॥
शिव रामात्मक सत्य । जो राम तो ईश्वर नित्य ।
सुखें अभेदत्वें नांदत । रामेश्वर निश्चित म्हणोनि ॥ १३५ ॥
ख्याति अद्‌भुत करून । हनुमंतें आणिलें प्रार्थून ।
विश्वेश्वर तो सत्य जाण । नामनिर्वचन उभयतां ॥ १३६ ॥
शिवरामात्मक क्षेत्र । सेतुबंधरामेश्वर ।
अनायासें प्राणिमात्र । उद्धरी साचार तें ऐका ॥ १३७ ॥
भलतेन प्रकारें पाहीं । रथ्यांतरीं पडतां देही ।
अथवा मूत्रपुरीषाचे ठायीं । श्मशानभूमीमाझारीं ॥ १३८ ॥
योनीमाजी नीच पाही । सेव्यासेव्य विभाग नाहीं ।
देह सांडितां चांडाळगेहीं । अवसान जिंहीं साधिलें ॥ १३९ ॥
भलते योनी भलता प्राणी । कृमिकटिपतंगादि योनी ।
रामक्षेत्रीं प्रयत्‍नेंकरोनी । अथवा काशीमाजी सहजगती ॥ १४० ॥
निश्चयेंसीं देहांतीं । प्राणिमात्र लाभे मुकी ।
संदेह नाही यदर्थी । वेदशाखार्थी सिद्धांत ॥ १४१ ॥
ज्यासीं नव्हे योगयाग । तपश्चर्या व्रत सांग ।
तीर्थाटन दानप्रसंग । साधनभाग कांहीं नेणे ॥ १४२ ॥
न करितां कष्ट प्रयास । देह त्यागिल्या सेतुबंधास ।
कात देवोनि संसारास । मोक्षपदास पावती ॥ ४३ ॥
असो देहावसनगोष्टी । रामेश्वरदेखतां दृष्टी ।
उद्धरती कोट्यनुकोटी । ज्यांचीं खोटीं आचरणे ॥ १४४ ॥
ज्यांतें देखतां निर्धारीं । सदाचार पळे दूरी ।
ऐसे पापी दुराचारी । दर्शनमात्रे उद्धरती ॥ १४५ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य त्रिविध । सकळांमाजी वर्ण शुद्ध ।
त्याहीहोनि जे विविध । वर्णसंकर सुबद्ध झाले ॥ १४६ ॥
ते ब्राह्मणादि सकळ लोक । लिंगदर्शनें एकाएक ।
चतुर्देह निरसोनि देख । राम सम्यकपावती ॥ ४७ ॥
परमामृत परब्रह्म । गुणातीत श्रीराम ।
तेथें पावती आराम । रूप नाम हारपोनी ॥ १४८ ॥
संकरयोनि नीच जन । ते उद्धरती नवल कोण ।
महापापी पतित दुर्जन । तेही दर्शनेंकरोन उद्धरती ॥ १४९ ॥

पंचमहापातकी व त्यांची लक्षणे :

महापातकियाचें लक्षण । ब्रह्महत्या मद्यपान ।
सुवर्णस्तेयी गुरुदारगमन । तत्संसगीं पाचवा ॥ १५० ॥
हे पंचमहापातकी पूर्ण । त्यांचे वेगळालें चिन्ह ।
तुज मी साकल्यें सांगेन । सावधान अवधारीं ॥ १५१ ॥
ब्राह्मणातें जिंती वादीं । को निर्भत्सी सभेमधीं ।
अथवा करी परसूत्रबुद्धी । घात त्रिशुद्धी जेणे होय ॥ १५२ ॥
शस्त्रघाताहूनि दारूण । हे घात अधिक जाण ।
शस्त्रघातें एकासी मरण । छळणे जाण कुटुंबघात ॥ १५३ ॥
ऐसी ब्रह्महत्येची गती । ऐक मद्यपानाची स्थिती ।
सांगेन मी संकळिती । क्षमा श्रोतीं करावी ॥ १५४ ॥
लौकिकीं प्रसिद्ध पानमद । त्याहूनि कठिण अगाध ।
विषयाचा विषयमद । आणि धनमद पैं जाण ॥ १५५ ॥
मद्यपान केलिया पाहीं । क्षणें उतरे लवलाहीं ।
विषयमद्याची नवायी । कल्पांतींही उतरेना ॥ १५६ ॥
कोटिजन्म फेरे खातां । विषय खवळे अधिकता ।
उतार नव्हे सर्वथा । स्वहितवार्ता नाठवे ॥ १५७ ॥
पूर्वी खवळे हुताशन । तेंवी करितां विषयसेवन ।
अधिकाधिक खवळे मन । उतार जाण असेना ॥ १५८ ॥

धनमदाची स्थिती :

त्याहूनियां अनंत अधिक । धनाचा मद आत्यंतिक ।
अंध होवोनि ठाके विवेक । हिताहित नाठवे ॥ १५९ ॥
धनमदाची जाती पाहीं । माता पिता दृष्टी नाहीं ।
आदिकरोनि गुरु तोही । दृष्टी नाहीं सर्वथा ॥ १६० ॥
तेथें अतीतासी पुसे कोण । व्रत तप तीर्थ जाण ।
त्यांची कैंची आठवण । मद दारुण द्रव्याचा ॥ १६१ ॥
सुवर्णस्तेयी जे कां जन । ऐक सांगों त्यांचें चिन्ह ।
स्वहस्तें चोरिल्या सुवर्ण । स्तेयी जाण नवल नव्हे ॥ १६२ ॥
मार्गी द्रव्य पडिलें असतां । कोणी माझें न म्हणता ।
म्हणोनि स्वयें घेवो जाता । चोरी सर्वथा अंगी लागे ॥ १६३ ॥
जरी चोरी नव्हे सर्वथा । तरी भय कां उपजे घेवो जातां ।
झांकोनि घेवोनि तत्वतां । कोणा न देखतां पुढें पळे ॥ १६४ ॥
द्रव्यालोभाची वस्ती अंतरीं । तो लोभचि जाण यथार्थ चोरी ।
करवी अनर्थाच्या हारी । नरकद्वारीं बांधोनि घाली ॥ १६५ ॥

गुरुदारगमनी कोण :

लोभ तो तस्कर पूर्ण । बळें नरका ने बांधोन ।
आतां गुरुतल्पगाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ १६६ ॥
केवळ जें गुरूदारगमन । तें प्रत्यक्ष वज्रपाप दारुण ।
त्याहूनि आणिक गहन । त्याचें चिन्ह अवधारीं ॥ १६७ ॥
पुढिलाचें चोरितां धन । सुवर्णस्तेयी पाप दारुण ।
न्याये मेळविलें आपण । त्याचेंही चिन्ह अवधारीं ॥ १६८ ॥
न्यायोपार्जित संपत्ती । त्याचा व्यय धर्मस्थितीं ।
अणुमात्र लोभ धरितां चित्तीं । पाप निश्चितीं गुरुतल्पग ॥ १६९ ॥

लक्ष्मीर्विश्वगुरोर्भार्या स्वयमालिंग्य तिष्ठति ।
न देयं नोपभोग्यं च स एव गुरुतल्पगः ॥ ६ ॥

वेदवक्ता स्वयें नारायण । वर्णविभागें करी शासन ।
वेदरूप स्वयें आपण । विश्वगुरू जाण या हेतू ॥ १७० ॥
त्या विश्वगुरूची भार्या निश्चिती । लक्ष्मीरूपें जे संपत्ती ।
स्वेच्छा पोटेंसी धरिती । स्वयें नार्पिती ज्याची त्यासी ॥ १७१ ॥
लक्ष्मी देखोनियां जाण । जो तो करी अभिलाषण ।
विचार न करिती संपूर्ण । मी कैंचा कोण हे कैंची ॥ १७२ ॥
मी जैं आलों जन्मातें । तैं लक्ष्मी नव्हती सांगातें ।
देहावसानें निश्चितें । मज सांगातें पै नये ॥ १७३ ॥
भगवंत कृपान्वित । मज देखोनि अनाथ ।
प्रसन्न होवोनि त्वरित । लक्ष्मी अद्‌भुत मज दिधली ॥ १७४ ॥
विश्वात्मा विश्वमूर्ती । त्याची त्यासी अर्पावी संपत्ती ।
हें न करोनि निश्चितीं । स्वयें अभिलाषिती ॥ १७५ ॥
विश्रगुरूची निजपत्‍नी । त्याची त्यासी पै नार्पूनी ।
अभिलाषी जो लोभेंकरोनी । गुरुतल्पग कोणी याहूनि नाहीं ॥ १७६ ॥
एकेकाची जाती ऐसी । स्वयें नेती अधःपतासी ।
तेथोनि निर्गम नाहीं त्यासी । जेंवी अथावीं पाथर ॥ १७७ ॥
सर्वथा निर्गती नव्हे त्यासी । नवल नाहीं या अर्थासी ।
त्याची संगती घडेल ज्यासी । दशा तैसी त्याचीही ॥ १७८ ॥

दुर्जन संगतीचे दुष्परिणाम :

ऐक संगाचें महिमान । ज्यासी संगती घडे पूर्ण ।
तरी त्याचेंहि घेऊनि उठे चिन्ह । आपुला निजगुण आच्छादी ॥ १७९ ॥
संगतीचे योगें जाण । शेळियांमाजी असतां श्वान ।
लोभ वाढे संपूर्ण । भासे जाण तद्‌रूप ॥ १८० ॥
सबाह्य भासे तद्‌रूपता । नवल नाहीं या अर्था ।
अंतर भेदोनि तत्वतां । संग सर्वथा अंगीं वाजे ॥ १८१ ॥
आळें करोनि कस्तुरीचे । रोप लाविलें पलांडूचें ।
सुवास आच्छादोनि साचें । दुर्गंधीचे बळ वाढे ॥ १८२ ॥
श्वान खापरीमाजी देख । गोधूम पेरितां सुरेख ।
शुद्धत्व हरपे एकाएक । अशेख होत लसूणचि ॥ १८३ ॥
तेंवी दुर्जनाच्या संगे जाण । बुडोनि आपला सद्‌गुण ।
त्याचा लागे असद्‌गुण । तदाचारीं जाण प्रवर्त ॥ १८४ ॥

सज्जन संगतीचे सुपरिणाम :

तैसीच सत्संगाची स्थिती । नीच पावती महंती ।
घुरे ते चंदन होती । जाण संगतीं चंदनाचे ॥ १८५ ॥
उंडणी चढो नेणे भिंती । तिसी भयें होतां भृंगीत्वप्राप्ती ।
पालटोनि देहस्थिती । गगनीं उडती देहेंसीं ॥ १८६ ॥
तैसे अकिंचन’ भावार्थी । भावे धरितां सत्संगती ।
साधुत्वासी स्वयें येती । ऐक तदर्थी सांगेन ॥ १८७ ॥
निंद्य आचरण वाल्मीकाचे । दर्शन होतां नारदाचें ।
जगद्वंद्य अनागत ज्याचें । चरित्र रामाचें प्रसिद्ध ॥ १८८ ॥
आणिक किती सांगों नर । खग द्रुम मृग निशाचर ।
नामें सांगतां सविस्तर । कथा अपार वाढेल ॥ १८९ ॥
म्हणोनि मनसा वाचा कर्मणा । सत्संगती सांडोनि जाणा ।
असत्संगति करितां पूर्णा । नरकदारुण अंगीं वाजे ॥ १९० ॥
महापातकियाचे संगतीं । महापातकी स्वयें होती ।
त्यांसी नाहीं ऊर्ध्वगती । उभयतां निश्चितीं पतित होती ॥ १९१ ॥
ज्यासी नाहीं ऊर्ध्वगती । ऐसे दुराचारी निश्चितीं ।
तेही रामेश्वरा जरी येती । दर्शनें मुक्ती तयांसी ॥ १९२ ॥
दर्शनें होय पापमोचन । ये अर्थी नवल कोण ।
रामेश्वर स्मरणेंकरोन । देहपतन जरी होय ॥ १९३ ॥
तरी महापातका देवोनि लात । स्वयें होती नित्यमुक्त ।
सर्वथा संदेह नाहीं येथ । त्रिसत्य सत्य ते वाणी ॥ १९४ ॥
आणिक ऐक पशुपती । तुज मणिकर्णिकेची अति प्रीती ।
वास करितां सेतुप्रती । अवस्था चित्तीं लागेल ॥ १९५ ॥
यालागीं मी आपण । नित्य मणिकर्णिकेचें जीवन ।
तुज स्नानासी पुरवीन । स्वयें जाण विश्वनाथ ॥ १९६ ॥
हेंचि माझें नित्यव्रत । मणिकर्णिकेचें नीर नित्य ।
पुरविती तेही नित्यमुक्त । अंश निश्चित पै माझे ॥ १९७ ॥
भलता प्राणी भलते याती । स्वयें जावोनि वाराणसीप्रती ।
मणिकर्णिका तीर्थ आणिती । अभिषेकिती रामेश्वरा ॥ १९८ ॥
ते सकळ कुळेंसहित । स्वयें होती नित्यमुक्त ।
ऐसें ऐकतां विश्वनाथ । हर्षितचित्त स्वयें झाला ॥ १९९ ॥
घालोनियां लोटांगण । विनविला रघुनंदन ।
मनोरथ झाले संपूर्ण । क्षेत्रमहिमान वाढविले ॥ २०० ॥
आतां उठवावे हनुमंता । पुच्छ सांधावे स्वामिनाथा ।
कृपाळू बा रघुनाथा । निजभक्ता कृपा करीं ॥ २०१ ॥
म्हणोनि धरिले दोन्ही चरण । वेगें उठवी वायुनंदन ।
तेणें संतोषला रघुनंदन । तुझी आला कोण उल्लंघी ॥ २०२ ॥

श्रीरामांनी हनुमंताला सावध केले, तुटलेले पुच्छ जोडले :

जवळी येवोनी रघुनाथ । उचलोनिपोटीं धरित ।
अमृतहस्त तेथें फिरवित । झाला सावचित्त हनुमंत ॥ २०३ ॥
लांगूल लावितां जेथीचे तेथ । स्वयें सांदलें यथास्थित ।
बाप कृपाळू रघुनाथ । अति विख्यात पवाडा ॥ २०४ ॥
हनुमान झाला सावचित्त । तंव श्रीरामाचे वोसंगीं देखत ।
तेणें झाला लज्जान्वित । अति विख्यात पवाडा ॥ २०५ ॥

मारुतीचा अनुताप व श्रीरामांची क्षमायाचना :

माझी करणी मजचि फळली । शीक नेटकी लाविली ।
श्रीरामाची अवज्ञा केली । तेणें धुळी मेळविलें ॥ २०६ ॥
मी एक भक्त अनुरक्त । वरी वज्रदेही विख्यात ।
ऐसा फुगारा पोटांत । होता नांदत निजबळें ॥ २०७ ॥
त्याची करोनि भंगाणी । संस्थापिलें श्रीरामचरणीं ।
कृपेची ख्याती त्रिभुवनीं । पावन करणी जगद्वंद्य ॥ २०८ ॥
जरी दंड मज न होता । तरी निजकर्मे रघुनाथा ।
स्वयें जातों अधःपाता । कोण सोडविता मज तेव्हां ॥ २०९ ॥
निजकृपेची महिमा ऐसी । चुकविलें अधःपातासी ।
श्रीरामें ख्याति केली ऐसी । उणें भक्तासी येवों नेदी ॥ २१० ॥
जरी झालीं उद्धतें । तरी दंडोनियां स्वहस्तें ।
स्वचरणी स्थापावें निश्चितें । पाहों आणिकांतें नाहीं देणें ॥ २११ ॥
ऐसें विनवोनि आपण । हनुमान घाली लोटांगण ।
तेणें संतोषला रघुनंदन । काय वचन बोलत ॥ २१२ ॥

मारुतीला आश्वासन :

चिंता न करीं हनुमंता । तुजपासोनि न घडे अन्यथा ।
क्षेत्रमहिमेलागीं तत्वतां । केलें सर्वथा विश्वेशें ॥ २१३ ॥
तुज होतां हे अवस्था । स्वयें झाला विनविता ।
स्वामींचें वैभव नेणतां । केली उद्धतता मर्कटपणे ॥ २१४ ॥
तुज न होतां हे अवस्था । क्षेत्रमहिमा कोण सांगता ।
संवाद करितां विश्वनाथा । महिमा तत्वतां प्रकाशला ॥ २१५ ॥

ज्योतिर्मे स्थापितं चात्र ज्योतिर्लिंग भविष्यति ।
शतकल्पाधिकं ज्योती गम इत्यक्षरद्वयम् ॥ ७ ॥

ज्योतिर्लिंग का म्हणतात ? :

चैतन्यज्योति विश्वनाथें । प्रतिष्ठिली माझेनि हातें ।
म्हणोनि ज्योतिर्लिंग ऐसें त्यातें । निजनिश्चितें अभिधान ॥ २१६ ॥
सनातन आत्मज्योती । त्यावरी कल्पकोटी होती जाती ।
म्हणोनि कल्पादि यातें म्हणती । निजनिश्रिती ज्योतिर्लिंग ॥ २१७ ॥

रामेश्वरं तु मल्लिंगं सेतुबंधे विराजते ।
सेतुबंधादिकाख्यानं भक्त्या यः श्रुणुते नर: ॥ ८ ॥
यात्राफलं स प्राप्नोति गत्वा च परमां गतिम् ॥ ९ ॥

ज्योतिर्मय निजनित्य । ज्योतिर्लिंग शिवरामयुक्त ।
रामेश्वर म्हणोनि म्हणत । जाण निश्चित हनुमंता ॥ २१८ ॥
तें हें रामेश्वरलिंग जाण । सेतुबंधीं विराजमान ।
तेथींची यात्रा दर्शन । उद्धरी पूर्ण नवल नव्हे ॥ २१९ ॥
तुम्ही आम्ही आणि शिवेश्वर । संवाद केला जो साचार ।
तें हें सेतुमाहात्म्यचरित्र । परिसें एकाग्र निजचित्तें ॥ २२० ॥
सबाह्माम्यंतर सावधानता । तल्लीन होवोनियां श्रोता ।
सेतुमाहात्म्य श्रवण करितां । निजमुक्तता पाविजे ॥ २२१ ॥
कावडी भरानि मणिकर्णिकेसी । प्रीतीं आणोनि सेतुबंधासीं ।
अभिषेकितां रामेथरासीं । रामरूपासीं स्वयें होय ॥ २२२ ॥
तेंचि फळ निजनिर्धारीं । सुचित्तचित्ते श्रवण करी ।
यात्राकर्त्याचे निजशिरी । निजगजरीं मोक्ष पावे ॥ २२३ ॥
ऐसें ऐकतां विश्वनाथ । पुढे होवोनि त्वरित ।
उठिला देखोनि हनुमंत । स्वयं वर्णित साटोपे ॥ २२४ ॥

रामतीर्थ नर: स्नात्वा दृष्ट्वा रामेश्वरं शिवम् ।
कैवल्यं पुरुषः साक्षादवाप्नोति ज संशय: ॥ १० ॥
काश्यामपि मृतस्यान्तस्तारकं ब्रह्म कथ्यते ।
तदैव परमं साक्षाद्‌राम इत्यक्षरद्वयम् ॥ ११ ॥

श्रीहनुमंतकृत रमेश्वर महिमा :

श्रीरामे बांधिला पाही । त्या सेतुसमुद्राचे ठायीं ।
स्नान करोनि लवलाहीं । रामेश्वर जिहीं देखिला ॥ २२५ ॥
काय सांगो त्यांचें महिमान । ते स्वशरीरें कैवल्यघन ।
अणुमात्र संदेह नाहीं जाण । निश्चये वचन हें माझें ॥ २२६ ॥
आनंदवनीं काशीपुरीं । देहांती जो उपदेश करी ।
दोंचि अक्षरीं जग उद्धरी । तो मूर्त निर्धारीं रामेश्वर ॥ २२७ ॥
श्रीरामनाम युग्माक्षर । क्षराक्षरातीत पर ।
वचनें करितां उच्चार । ब्रह्म परात्पर स्वयें पावे ॥ २२८ ॥
‘त्याचेनि दर्शनें त्वरित । कोण नुद्धरे यथार्थ ।
परब्रह्म मूर्तिमंत । लोकोपकारार्थ अवतरले ॥ २२९ ॥
ऐसें वर्णिता विश्वनाथा । ऐकोनि आनंद समस्तां ।
श्रीरामनामें तत्वतां । होय गर्जता दळभार ॥ २३० ॥
अगाध श्रीरामाचें महिमान । अगाध सेतुबंधाख्यान ।
अगाध विश्वेश्वराचे ध्यान । भक्ति गहन हनुमंताची ॥ २३१ ॥

विश्वेश्वरकृत सेतुबंध रामेश्वराचे माहात्म्य व रामस्तुती :

ऐसें सकळ वानरगण । श्रीरामाचे करिती स्तवन ।
तंव विश्वेश्वर मागुतेन । पुढें होवोन बोलत ॥ २३२ ॥
सेतुबंधा आला रघुपती । त्या सेतुबंधसागराप्रती ।
स्नान करिती रामतीर्थी । दर्शन घेती रामेश्वर ॥ २३३ ॥
ते पुरुषांमाजीं पंचानन । कैवल्यपुरुष पुरातन ।
माझें स्वरूप जें चिद्धन । तेंचि ते जाण स्वयें होती ॥ २३४ ॥
निष्कर्म माझें स्वरूप परम । तें हें प्रत्यक्ष श्रीराम ।
त्याचा ज्यासी दर्शननेम । ते परब्रह्ममूर्तिमंत ॥ २३५ ॥
ये अर्थी संदेहता । सर्वथा न मानावी चित्ता ।
त्रिसत्य सत्य माझी वार्ता । मनसा वाचा कर्मणा ॥ २३६ ॥
हनुमानादि वानरगण । सौमित्रेंसहित बिभीषण ।
सकळ ऐका माझें वचन । सावधान मानसें ॥ २३७ ॥
म्हणाल बोललों पुनरुक्त । तरी तें जाणा यथार्थ ।
श्रीराममहिमा वर्णितां चित्त । नव्हे तृप्त सर्वथा ॥ २३८ ॥
श्रीरामनामेंवीण तोंड । तें प्रत्यक्ष चर्मकुंड ।
माझी जिव्हा चामखंड । दुरुपवादें काटली ॥ २३९ ॥
आनंदवन काशीच्या ठायी । प्रकृतित्याग करितां देही ।
श्रवणीं उपदेशी लवलाही । तारकमंत्र पाहीं परब्रह्म ॥ २४० ॥
तें हें साक्षात् निज नित्य । राम ऐसें युग्माक्षर सत्य ।
जिव्हा जपमाळ निश्चित । करोनि जपन सर्वदा ॥ २४१ ॥
त्यासी काशी कां ककिटाच्या ठायीं । अथवा कां चांडाळगेही ।
देह सांडितां लवलाहीं । गति पाहीं समान ॥ २४२ ॥

योगी पततु वा काश्यां चांडालस्य गृहेपि वा ।
ज्ञानप्राप्ति: समस्तस्य गतोऽसौ विगताशय: ॥ १२ ॥

‘विश्वोद्धारासाठीच रामांनी वनवास स्वीकारला’ सीता :

तुझेनि योगें येवढी ख्याती । स्वयें प्रकाशिली रघुपती ।
ऐसें ऐकतांच सीता सती । घाली अति प्रीतीं लोटांगण ॥ २४३ ॥
मी सर्वांसीं सोडवण । परी जग सोडवणे संपूर्ण ।
यालागीं श्रीरघुनंदन । वना आपण स्वयें आला ॥ २४४ ॥
जड मूढ प्राणी दीन जन । जे व्रततपदानहीन ।
ज्यांसी नाही तीर्थदर्शन । त्यांचे उद्धरण केवी होय ॥ २४५ ॥
ऐसीकृपा श्रीरघुनाथा । दाटली अत्यंत चित्ता ।
म्हणोनि उद्धरावया अनाथां । वना तत्वतां श्रीराम आला ॥ २४६ ॥
योगी पडतां काशीच्या ठायीं । अथवा चांडाळाच्या गृही ।
अथवा पडतो ककिटींही । रामस्मरणें पाहीं निजमोक्ष ॥ २४७ ॥
ऐसें बोलतां गोरटी । अंगी स्वेद बाष्प कंठीं ।
प्रेमाश्रूं झांकली दृष्टी । न निघे वाक्पुटीं पै शब्द ॥ २४८ ॥
एका जनार्दन शरण । अति रम्य रामायण ।
उठवोनियां जनकनंदिन । रामेश्वरदर्शन घेईल राम ॥ २४९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रामेश्वरमहिमाकथनंनाम षट्‌सप्ततितमोऽध्याय ॥ ७६ ॥
॥ ओंव्या २४९ ॥ श्लोक १२ ॥ एवं २६१ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara