संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा

राक्षसांच्या आवरणाचा भेद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मण व बिभीषणाच्या भाषणाने श्रीरामांना
क्रोध व बिभीषणाला रावणाच्या शोधाची आज्ञा :

बहुतांपरी लक्ष्मण । विनविता झाला रघुनंदन ।
तैसेचि बिभीषणही जाण । करी विनवण बहुतांपरी ॥ १ ॥
विनविला वानरीं । महावीर कपिकेरी ।
ऐकतां तिखट उत्तरीं । कोप रघुवीरीं पैं आला ॥ २ ॥
त्रिपुरवधालागीं झडकरीं । क्रोध आला त्रिपुरारी ।
त्याहूनि क्रोध रघुविरीं । दशशिरा वधावया ॥ ३ ॥
मुरु दैत्य दुर्धर भारी । त्यालागीं खवळे मुरारी ।
त्याहूनियां कोप रघुवीरीं । दशशिरा मारावया ॥ ४ ॥
सृष्टिप्रळयाचे वेळे । संहारकाळ अति खवळे ।
तेंवी छेदावया रावणशिसाळें । क्रोध खवळें श्रीरामीं ॥ ५ ॥
ज्याची विक्षेपभृकुटी । क्षणें विध्वंसी ब्रह्मांडकोटी ।
तो निवटावया दशकंठी । राम जगजेठी खवळला ॥ ६ ॥
अत्यंत कोपें कोपायमान । बोले बिभीषणासी वचन ।
कोठें आहे तो दशानन । वेगें शोधून मज सांगा ॥ ७ ॥
धर्मयुद्धा ॥ ८ ॥ आतां तुवां करावें एक । चार पाठवून आवश्य्क ।
कोठें आहे दशमुख । वृत्त सकळिक आणावें ॥ ९ ॥

क्वासौ लंकेश्वरः क्षुद्रो रावणो दुर्मदः खलः ।
रणभूमिं परित्यज्य कुत्रास्ते किंच चेष्टितम् ॥१॥
बोद्धव्यः स त्वया वीर शिघ्‍रमेव ममज्ञया ।
राघवस्य वचः श्रुत्वा चारैरन्विष्य सर्वतः ॥२॥

बिभीषण सर्वज्ञ । शिष्ट चार पाठवून ।
कोठें आहे तो रावण । काय आचरन करिताहे ॥ १० ॥
कपटी दुरात्मा रावण । अहंमते मातला पूर्ण ।
शेखीं रणभूमी सांडून । जीव घेऊन पळाला ॥ ११ ॥
त्याचें समूळ ताळतंत्र । क्रियाविधानसमाचार ।
मानसीं आणून समग्र । सविस्तर मज सांगा ॥ १२ ॥

बिभीषणाने चार दूतांमार्फत रावणाचा शोध करुन वृत्तांत सांगितला :

बिभीषणा अति त्वरेंसीं । वेगीं आणीव वृत्तांतासी ।
ऐसें सांगतां श्रीरामासीं । येरु मानसीं तोषला ॥ १३ ॥
तंव श्रीरामाज्ञेपूर्वी जाण । चार वेगीं पाठवून ।
लंकेमाजी झाडा घेऊन । वृत्तात पूर्ण आणविला ॥ १४ ॥
तें रावणाचें चेष्टित । श्रीरामापुढें सांगत ।
विनविता झाला यथातथ्य । अति विनीत बिभीषण ॥ १५ ॥

उवाच वचनं धीमान्‍राममेतदबिभीषणः ।
शक्त्या निर्भिद्य सौ‍मित्रिं क्रूरकर्मा स रावणः ॥३॥
स विवेश पुरीं तूर्णं लंकामेव सहानुगः ।
सोऽवतीर्य रथत्तूर्णं वधमिच्छति तेऽनघ ॥४॥
चिंतयामास काकुत्स्थो वरदानं महात्मनः ।
दत्तं स्वयंभुवा पूर्व सर्वशत्रुविनाशनम् ॥५॥
अजेयं सप्तभिर्लोकैः ससुरासुरमानवैः ।
रथं सर्वायुधोपेतं दिव्यमद्‍भुतदर्शनम् ॥६॥
युक्तमस्त्रैर्महावेगैः कामगैः कामरुपिभिः ।
अभेद्यकवचं चापि सर्वास्त्रेरभिसंगतैः ॥७॥

घालोनियां लोटांगण । विनविता झाला बिभीषण ।
रावणचेष्टा संपूर्ण । श्रीरघुनंदन परिसत ॥ १६ ॥
कपटी क्रूरकर्मा रावण । सौ‍मित्रासीं शक्ति भेदून ।
युद्ध न करितां आपण । गेला पळोन लंकेमाजी ॥ १७ ॥
उतरोनि रथाखालता । तुझ्या ध्यानीं लंकानाथा ।
अति आकांत वर्तला चित्ता । श्रीरघुनाथा तें ऐक ॥ १८ ॥
करुं जातां भोजन । गोड न लागे तया अन्न ।
त्यासी दिसे रघुनंदन । अति दारुण शस्त्रपाणी ॥ १९ ॥
करुं जातां उदकपान । राम जीवना जीवन ।
देखोनियां दशानन । चळकांपें जाण कांपत ॥ २० ॥
तांबूल घेतां लंकानाथा । सेवकांमाजीं देखे रघुनाथा ।
हातीं धनुष्य पाठीसीं भाता । झाला देखता रावण ॥ २१ ॥
स्त्रीगृहामाजी पाहीं । राम देखे सर्वां ठायीं ।
शयनशेजेतेंही । दिसे लवलाहीं श्रीराम ॥ २२ ॥
स्नान मार्जन सकळ भोग । गमनागमनवेग ।
कर्माकर्माचें अंग । भासे सवेग श्रीराम ॥ २३ ॥
भयेंकरोनि लंकानाथा । प्राण जावा सर्वथा ।
भाग्य फळासी आलें तत्वतां । शंकर चित्ता आठवला ॥ २४ ॥
रामभय अति खडतर । रावणा लागलें अति दुर्धर ।
तेणें आठवला शंकर । चित्तचमत्कार वचन ज्याचें ॥ २५ ॥
पूर्वीं उग्र तप करुन । रावणें हर केला प्रसन्न ।
मागितलें वरदान । शत्रुहनन करावया ॥ २६ ॥
तेंचि ये काळीं आतां । सांगितले लंकानाथा ।
तेणें पावोनि उल्लासता । होम करिता पैं आला ॥ २७ ॥
त्या होमामाजी रथ । साश्वशस्त्रास्त्रीं संयुत ।
अभेद्य कवच अद्‍भुत । समवेत दिव्यायुधें ॥ २८ ॥
विचित्र कामग अस्त्रें । सकळलोकसंहारकरें ।
प्रेरिलिया वैरिसंहारें । येती उपसंहारें हातासीं ॥ २९ ॥
ऐसें शिवाचें वरदान । अनुस्मरोनि रावण ।
करिता झाला हवन । तुझें हनन करावया ॥ ३० ॥
परी त्याहीमाजी अतर्क्य चिन्ह । शिव सर्वात्मा सर्वज्ञ ।
प्रकट सांगितली खूण । मूर्ख रावण जाणेना ॥ ३१ ॥
अविकळ सिद्धि पावे होम । तैं वैरियाचें होय भस्म ।
अल्प विकळ होतां परम । अति दुर्गम कर्त्यासीं ॥ ३२ ॥
विकळ होतां यागासी । समूळ घात अर्त्यासी ।
ऐसें सांगोनि रावणासी । गेला निजधामासी शंकर ॥ ३३ ॥
मूर्खा रावणा अहंबुद्धी । म्हणे अविकळ पाववीन सिद्धी ।
राम सौ‍मित्र माझे द्वंद्वी । बाणवेधीं निवटीन ॥ ३४ ॥
ऐसा करोनि निर्धार । करितसे कमतंत्र ।
अति सावध एकाग्र । यज्ञोपचार घेवोनी ॥ ३५ ॥
अति उग्रें सप्तावरणें । रावणें रचिलीं दारुणें ।
कोणा न करवती गमनें । अति दारुणें परीस पां ॥ ३६ ॥
अहंबुद्धि रावण । आपणासीं अति गूढ रक्षण ।
पंचकोश पंचावरण । रचिलें जाण श्रीरामा ॥ ३७ ॥
आणिकही महादारुण । मंत्रावरण शस्त्रावरण ।
भूतप्रेत पिशाच जाण । अति दारुण किळकिळित ॥ ३८ ॥
शाकिनी डाकिनी महाशक्ती । अहर्निशीं सावचित्तीं ।
रावणाचा याग राखिती । महासर्प देती धुधुःकार ॥ ३९ ॥

रावणाच्या होमामध्ये विघ्न आणण्याचा बिभीषणाचा श्रीरामांना सल्ला :

ऐसा अति बळे बळवंत । रावण यास असे करित ।
वधावया रघुना । अति उद्यत साक्षेपें ॥ ४० ॥
अविकळ सिद्धी गेलें हवन । तरी कोणासी नागवे रावण ।
वैरी निर्दळोनियांजाण । विजयी पूर्ण होईल ॥ ४१ ॥
ऐकें स्वामी रघुनाथ । होम करितां लंकानाथा ।
विघ्न करावें जाऊनि आतां । विलंब सर्वाथा नये करुं ॥ ४२ ॥

तस्य होमस्य कालोऽयं देवायतनमास्थितः ।
जुहोत्यग्निं समाधिस्थो रौदैंर्मत्रैर्महायशाः ॥८॥
तस्य पापस्य तत्कर्म न सिध्यति दुरात्मनः ।
तस्य तावत्वया वीर विघ्नं कार्यं बलीयसा ॥९॥
अवध्यः स भवेत्तस्मिन्कृते कर्मणि राक्षस ॥१०॥

आजि होमाचा होमकाल । रावण साधितसे अविकळ ।
आपण होवोनि निश्चळ । विघ्न तत्काळ करावें ॥ ४३॥
केवळ रुद्र क्रोधान्वित । ऐसें उग्र कर्म आचरत ।
रुद्रमंत्रें होम करीत । सावचित्त रावण ॥ ४४ ॥
होमाचा समीप काळ । आणि फळप्राप्तिवेळ ।
रावणा साधों आली सकळ । साश्वरथसंयुक्त ॥ ४५ ॥
येचि काळीं आपण । रावणासी करोनि विघ्न ।
विध्वंसिलिया हवन । निजकार्य जाण साधेल ॥ ४६ ॥
ऐसें न करितां आपण । जरी सिद्धी गेलें हवन ।
तरी सर्वथा अवध्य रावण । सत्य जाण रघुनाथा ॥ ४७ ॥
ऐकतां बिभीषणवचन । सर्वांगीं दाटले स्फुरण ।
एकला आक्रमी त्रिभुवन । ऐसा रघुनंदन भासत ॥ ४८ ॥

बिभीषणस्य तद्वाक्यं घोरं श्रुत्वा भयावहम् ।
ततो रामो महाअतेजाः सबलं चापि विक्ष्य च ॥११॥
माल्यवंतं सुषेणं च गवाक्षं गवयं तथा ।
आज्ञापयामास तदा विघ्नार्थं दश यूथपान् ॥१२॥
अंगदं च हनूमंतं शरभं गंधमादनम् ।
ऋक्षं सेनापतिं चैव नीलं चापि महाबलम् ॥१३॥
लब्धसंज्ञा महावीर्या यूथपाः कृतनिश्चयाः ॥१४॥

श्रीरामांनी वानरसेनापतीला लंकेमध्ये पाठविले :

सकळलोकभयकारक । रावणाचें कर्म देख ।
येतांचि रघुकुळटिळक । निजबाहुकौतुक पाहूं इच्छी ॥ ४९ ॥
उसण्या घायीं रावणासीं । भिडावया निजमानसीं ।
अति उल्लास राघवासीं । बाहेर त्यासी काढूं पाहे ॥ ५० ॥
बाहेर काढावया रावण । सेनापति दहा जण ।
अति बळियाढे वानरगण । श्रीरघुनंदन धाडित ॥ ५१ ॥
ज्यांचा ऐकतां प्रताप । काळासीं सुटे चळकांप ।
रावण बापुडें तें अल्प । त्याचा प्रताप तो किती ॥ ५२ ॥
जयांचा अंतका भेदारा । काम जयांचा तोडरा ।
यम कांपे थरथरां । ते दशशिरावरी चालले ॥ ५३ ॥
जे राक्षसांतें करिती अंत । जे दृष्टी दानवांतें नाणित ।
भूतगण चळीं कांपत । शक्ति येत लोटांगणीं ॥ ५४ ॥
महावीरां दृष्टी नाणित । तो निघाला माल्यवंत ।
ज्याचा लागतां घात । होय भस्मांत राक्षसां ॥ ५५ ॥
देखोनियां महारण । रणमदें डुले आपण ।
युद्धीं सुखावें संपूर्ण । तो सुषेण निघाला ॥ ५६ ॥
दृष्टीं पडतांचि अल्प । पळती गाईंचे कळप ।
ते केवीं साहती झडप । तो सिंहप्रताप गवाक्ष ॥ ५७ ॥
गवयही तैसाचि जाण । गायींचे परी वैरिगण ।
वाळितां न लगे अर्ध क्षण । तोही आपण निघाला ॥ ५८ ॥
वानरसैन्याचें मंडण । तो युवराज आपण ।
जेणें अपमानिला रावण । तो अंगद जाण निघाला ॥ ५९ ॥
वणवा लागल्या डोंगरीं । जळती टोळांचिया हारी ।
तेंवी निवटिता राक्षसवैरी शरभ निर्धारीं चालिला ॥ ६० ॥
ऋक्षसेना आणि वानर । उभयसेनेचे सेनाधर ।
नीळा आणि जांबवंत वीर । ज्यांचा धाक थोर रावणा ॥ ६१ ॥
सकळ वीरांमाजी मुखरणी । जो रणयोद्ध्यांचा अग्रगणी ।
जो राक्षसां करितसे भंगाणी । मुख्य रावणीं धाक ज्याचा ॥ ६२ ॥
जो श्रीरामाचा लाडका । अत्यंत प्रिय रघुनायका ।
ज्याचा भेदरा दशमुखा । जो तिहीं लोकां निजपूज्य ॥ ६३ ॥
जो श्रीरामाचें अंगत्राण । जो जानकीशोकविध्वंसन ।
जो वानरांचा निजप्राण । तो हनुमान जाण चालिला ॥ ६४ ॥
जो सौ‍मित्रप्राणरक्षिता । जो बिभीषणा अभयदाता ।
जेणें घोळसिलें लंकानाथा । तो हनुमान तत्वतां चालिला ॥ ६५ ॥
जेंवी साधनचतुष्टयसंपत्ती । अधिष्ठात्रीं वश्य होती ।
तेंवी बिभीषणसाह्यार्थी । दहाही सेनापती निघाले ॥ ६६ ॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिरीं । यूथपसेना वानरहारीं ।
करावया रावणबोहरी । कपिकेसरी चालिले ॥ ६७ ॥
श्रीरामकाजीं निश्चय पूर्ण । धरुनियां वानरगण ।
निघते झाले आपण । गेलियाही प्राण न सरती ॥ ६८ ॥
जयजयकारें गर्जत । शिळा पर्वत झेलित ।
रामनामें किराण देत । वीर उपरमत द्रुमपाणी ॥ ६९ ॥
जेंवी अक्षोभ्य सागर । तेंवी अक्षोभ्य वानरभार ।
करीत रामानामाचा गजर । वानरभार चालिला ॥ ७० ॥
मर्यादें नेमिला सागर । अमर्याद वानरभार ।
सागरीं लहरीं अपार । तेंवी उठावले थोर वानर ॥ ७१ ॥
सागरीं कांसवांचे भार । तेंवी वानरीं गिरिवर ।
सागरीं तळपती महानक्र । शिळाशिखरें वानरीं ॥ ७२ ॥
सागरीं तळपती महामीन । सैन्यसागरीं द्रुम जाण ।
वानरें देवोनि किराण । तळपती पूर्ण सैन्यांत ॥ ७३ ॥
ऐसा उद्‌भट सैन्यसमुद्र । गर्जत चालिले वानरभार ।
करीत नामाचा गजर । वानरवीर चालिले ॥ ७४ ॥
रामनामाचा कल्लोळ । तेणें व्यापिला भूगोळ।
नादें कोंदलें अंतराळ । दिग्मंडळ गर्जत ॥ ७५ ॥
नाम भरतांचि गगनीं । गेलें शून्यत्व उडोनी ।
चैतन्यघन हो‍उनी । आलें पिकोनी रामनाम ॥ ७६ ॥
स्वर्गपाताळांच्या ठायीं । नाम कोंदलें लवलाहीं ।
गेलें बुडोनि लोकत्रयीं । नाम पाहीं रामाचें ॥ ७७ ॥
श्रीरामाची निजशक्ती । वानरांअंतरी रामनामकीर्ती ।
तेणे कळिकाळा न गणिती । करीत ख्याती निगाले ॥ ७८ ॥

क्षणात्संप्राप्य नगरीं लंकां रावणपालिताम् ।
प्राकारदथ चोत्पत्य विविशुस्ते प्लवंगमाः ॥१५॥

वानरसेनापतींचा लंकेमध्ये प्रवेश व धुमाकूळ :

श्रीरामबळें बळवंत । कळिकाळा दृष्टी नाणित ।
निघाले नामें गर्जत । रावणा अंत करावया ॥ ७९ ॥
क्षणामाजी वानरगण । पावते झाले लंकाभवन।
अतिशयें शोभयमान । देखतां मन विस्मित ॥ ८० ॥
जियेसीं न तुके अमरावती । कुबेराची अलकावती ।
तेथें उपमा सांगो कोणती । विस्मित चित्तीं सुर सिद्ध ॥ ८१ ॥
इतकें कृति नाहीं केली । स्वयें विश्वकर्म्यानें रचिली ।
शंकरकृपें रुपा आली । ते केंवी बोलीं बोलवेल ॥ ८२ ॥
पताका पल्लव छत्रें । मुक्तघोसें परिकरें ।
रत्‍नखचित गोपुरें । अति विचित्रें भासती ॥ ८३ ॥
चौबारे हाटवटिया । पाचू पेरोजे मोहटिया ।
हिरेनिबद्ध उथाळिया । खांब तयां गोमेदाचे ॥ ८४ ॥
माणिक पाचू हिरकणें । कांचननिबद्ध अंगणें ।
दोहीं बाहीं गुढिया तोरणें । तेणें दुकानें शोभती ॥ ८५ ॥
वर्णितां तेथींची महिमा । मन विसरे मनोधर्मा ।
स्वयें कर्ता विश्वकर्मा । तेथें उपमा काय द्यावी ॥ ८६ ॥
वरी कृपा शंकराची । अनुपम उपमा तेथींची ।
आणि वस्ती रावणाची । सीमा भाग्याची कोण जाणे ॥ ८७ ॥
एवढा भाग्याचा बडिवार । जेणें धिक्कारुन कुबेर ।
वसविलें लंकापुर । प्रसन्न शंकर करोनी ॥ ८८ ॥
वरदमदें पूर्ण मातला । सेव्यासेव्यातें विसरला ।
निजमूळातें चुकला । तेणें तयातें क्षोभला शंकर ॥ ८९ ॥
माझा स्वामी श्रीरघुनाथ । त्याची कांता चोरोनि नेत ।
समूळ याचा करीन घात । म्हणोनि प्रेरित वानर ॥ ९० ॥
जेथें परिघ सागराचा । गुढ पर्वत त्रिकूटाचा ।
वरी कोट लंकेचा । तेथें वानरांचा प्रवेश ॥ ९१ ॥
रिघोनि लंकेभीतरीं । पताका फाडिल्या वानरीं ।
ध्वजा पाडिल्या झडकरीं । अपांपरी तोरणां ॥ ९२ ॥
सांदींबिदीं मुक्ताघोस । तत्‍नें विखुरलीं असमसाहस ।
वानर न पाहती त्यांस । विरक्त रत्‍नांस रामनामें ॥ ९३ ॥
श्रीरामभजनीं जे विमुख । त्यांसी द्रव्यदारेचें अति सुख ।
जिहीं सेविला रघुकुळटिळक । त्यांसी नित्य सुख श्रीरामें ॥ ९४ ॥
राजहंसापुढे शेण । तेंवी रामभक्तां द्रव्य जाण ।
त्यापुढें न पाहती ढुंकोन । तेथें अभिलाषण तें कैचे ॥ ९५ ॥
जेंवी श्वान भक्षी वमन । देखतां कंटाळे मन ।
तेंवी न पाहीत ढुकोन धन । भक्तजन रामाचे ॥ ९६ ॥
त्याचपरी निश्चितीं । स्त्रीलोभाचीही गती ।
भक्त दृष्टी नाणिती । जडली वृत्ती श्रीरामीं ॥ ९७ ॥
यापरी भक्त जाण । महावीर वानरगण ।
दृष्टीं न पाहती ढुंकोन । करीत कंदन निघाले ॥ ९८ ॥
तोरणें तोडिताती एक । एक फाडिती पताक ।
ध्वजा उपडोनियां देख । मारीत लोक निघाले ॥ ९९ ॥
एक हाणोनियां लाताडें । फोडून सांडिती कवाडें ।
केले दारवंटे उघडे । आलीं माकडें मारीत ॥ १०० ॥
एक उपरमाया उडती । दुर्गीचे धोंडे उचटिती ।
पाडोनि सांडिल्या भिंती । अद्‍भुत शक्ती वानरां ॥ १ ॥
करीत आले महामारी । रोधोनि राहिले पाणबारी ।
आकांत होत नरनारी । दसशिरी निमाला ॥ २ ॥
मारीत आलें वानरसैन्य । केलें नगरासीं कंदन ।
बाहेर् निघेना रावण । अद्यापि हवन तें कायी ॥ ३ ॥
बोंब सुतली घरोघरीं । स्त्रियां बाळा अपांपरी ।
देखोनियां निशाचरीं । वानरभारीं मिसळलें ॥ ४ ॥
तंव अति बळी कपिकुंजर । पुढें करोनि पवनपुत्र ।
युद्धा मिसळले सत्वर । केला संहार राक्षसां ॥ ५ ॥

हनूमंतं पुरुस्कृत्य सर्वे युद्धाय तस्थिरे ।
राक्षसाश्च महावीर्यः प्रासासिपरिघशयुधाः ॥१६॥
दंशितास्तस्थिरे सर्वे युद्धायामितविक्रमाः ।
बलेनान्योन्यमासाद्य युयुधुस्ते परस्परम् ॥१७॥
परिघपट्टिशगदापाणी । लहुडिमुद्‌गलधनुर्बाणी ।

खड्ग त्रिशूळ तोमर घेउनी । राक्षसश्रेणी निघाल्या ॥ ६ ॥
परिघ हाणिती निशाचर । वृक्ष झेलिती वानरवीर ।
हात लचकोनि सत्वर । भूमीवर आदळले ॥ ७ ॥
वानर वृक्ष हाणिती । राक्षस मारिती परिघाप्रती ।
करोनि परिघाची उपहती । हात मोडिती राक्षसांचे ॥ ८ ॥
श्रीरामनामें उपरमती । राक्षसां संहार करिती ।
राक्षस गदा हणिती । वानर झेलिती शिळाशिखरें ॥ ९ ॥
शिळाघातें गदा पाहें । पीठ होवोनियां जाये ।
वानर वांकुल्या दाविती स्वयें । न धरिती भय राक्षसांचें ॥ १० ॥
एक चालिला शूळ घेउनी । वानर देखोनि शिळापाणी ।
हाणितांचि वानरगणीं । घेती हिंसडोनी शूळातें ॥ ११ ॥
शिळा हाणितां अवचितीं । राक्षस अंगेसहित अस्थी ।
मिळोनि जाती अव्यक्तीं । जाती व्यक्ती उरेना ॥ १२ ॥
एक घेवोनि येती भाले । खड्गतोमरेंसी एक आले ।
कुठारहस्तीं एक चालिले । एकीं मांडिलें द्वंद्वयुद्ध ॥ १३ ॥
एक हाणिती मुसळें । वानर हाणिती शालताळें ।
तेथें घोरांदर मांडलें । कंदन झालें तुंबळ ॥ १४ ॥
भाले ओपिती निशाचर । अंगें भिडती वानर ।
घाय न मानोनि समग्र । करिती संहार राक्षसां ॥ १५ ॥
खड्ग हाणिती निशाचर । दुधडे होती वानर ।
प्रबाहे रुधिरधार । तें कपिकुंजर न गणिती ॥ १६ ॥
श्रीरामनामते जे करीं । अतिप्रताप कपिकेसरी ।
दुधड झाले शरीरीं । ते पुच्छेंकरीं गुंडिती ॥ १७ ॥
सवेंचि मिसळती युद्धासीं । हिरोनि घेती खड्गांसी ।
तेणेंचि मारिती राक्षसांसी । वानरीं ऐसी ख्याती केली ॥ १८ ॥
मारोनियां निशाचर । नामे देती भुभुःकार ।
तेणें गर्जत अंबर । आकांत थोर राक्षसां ॥ १९ ॥
हाणितां भिंडिमाळा पांगोरे । गुंडे झेलिती वानरें ।
फिरवोनि तेणेंचि करें । निशाचर मारिती ॥ २० ॥
नानापरींचीं आयुधें । आणिक शस्त्रास्तें विविधें ।
मंत्रतंत्रादि सन्नद्धें । अति सुबद्धें वर्षती ॥ २१ ॥
वानरांच्या निजचित्तीं । श्रीरामतेजें दुर्धर शक्ती ।
तेणें कळिकाळा नागवती । केली शांती सकळांची ॥ २२ ॥
युद्धीं खवळले वानर । करीत उठिले संहार ।
निवटिले राक्षसभार । वाहे रुधिर भडभडां ॥ २३ ॥
एकांचे करचरण तुटले । एकांचे कटी भंगले ।
एकांचे ऊर फुटले । उघडे पडिले कोथळे ॥ २४ ॥
मल्लयुद्ध परस्परीं । झोंटधरणी महावीरीं ।
गुडघे कोंपर टोले शिरीं । महामारी राक्षसां ॥ २५ ॥
मुद्रिकांसाठीं बोटें मोडिती । अंगदांसाठीं बाहु तोडिती ।
कुंडलांसाठीं कान उपडिती । माथे तोडिती मुकुटांसाठीं ॥ २६ ॥
करोनियां घोरांदर । खवळले वानरेश्वर ।
मारिले निशाचर । रक्तनदी दुस्तर लोटली ॥ २७ ॥

निपेतुर्भतले भिन्नाः केचिदुधिरकर्दमे ।
रक्षांसि च तथा पेतुर्वानरैर्भीमविक्रमैः ॥१८॥
चूर्णिता विविधैः शैलैः पादपैर्मुष्टिभिस्तदा ।
दारिताश्च नखैस्तीक्ष्णैर्दंतैरपि सुदारुणैः ॥१९॥
तत्र वृत्तं महायुद्धं कबंधीभूतसंकुलम् ।
शूराणां हर्षजननं भीरुणां च भयावहम् ॥२०॥
तर्षणं सुरनारीणां सर्वदुःखविमोक्षणम् ।
तस्मिन्युद्धे महाघोरे रक्षोवानरसंक्षये ॥२१॥
प्रावर्तत नदी घोरा शोणितोदकवाहिनी ॥२२॥

वानरीं केलें महारण । कबंधी दाटलें नभस्थान ।
नखीं केलें विदारण । मांसे रणांगण कोंदलें ॥ २८ ॥
दांती डसून गोळांगुळें । काढोनि घेती अन्त्रमांळे ।
तेणें ओविती शिसाळें । पाळिती लळे भूतांचें ॥ २९ ॥
वर्षातां शिळापाषाण । द्रुमांचे घाय दारुण ।
केलें राक्षसांचे चूर्ण । कर्दम पूर्ण रणांगणीं ॥ १३० ॥
गजांचिया करवडी । त्याचि रणनदीसीं दरडी ।
कर्दम दाटला बुडीं । मांसरक्तपरवडीमिश्रित ॥ ३१ ॥
रुधिर वाहे भडभडां । तो नदीस पूर गाढा ।
वोसणें दाटलीं दोहीं कडां । विचित्र युद्ध बहुवस ॥ ३२ ॥
सचक्र वाहती रथ । तेंचि तारुं नदीआंत ।
सपल्लव ध्वज शोभत । शीड तेथें तेंचि देखा ॥ ३३ ॥
गजकरवडी पडिल्या तळीं । त्याचि सुसरी विक्राळी ।
भयानक मुखें पसरिलीं । दिसती अवाळीं चाटित ॥ ३४ ॥
सलंब भाले वाहती । ते महानक्र नदीप्रती ।
सपिच्छ बाण तळपती । तेचि निश्चितीं महामीन ॥ ३५ ॥
महावीरांची वोढणें । तींच कांसवें पैं दारुणें ।
अंबारें वाहती वितानें । तेणें फेणें दाटली नदी ॥ ३६ ॥
विकासलीं मुखकमळें । वाहती नरशिसाळें ।
तींच नदीमाजी उत्पळें । केश उभारले केशरप्राय ॥ ३७ ॥
जे पळोनि जाती रणीं । त्यांसी जैसी वैतरणी ।
भासतसे क्षणक्षणीं । भयवाहिनी दारुण ॥ ३८ ॥
श्रीरामभक्तांचें हातीं । जे समरांगणीं निमती ।
त्यांसी सुरांगना वानिती । ओंवाळिती आरत्या ॥ ३९ ॥
महापाप्यातें दुस्तर । निजकर्मे उतरावया पार ।
तेथें तारूं श्रीरामचंद्र । नामें परपार पाववी ॥ १४० ॥
श्रीरामनामें निजनेटीं । वानरीं मारिल्या कोट्यनुकोटी ।
कोणी संमुख न राहती नेटीं । उठाउठीं पळालें ॥ ४१ ॥
निवटून राक्षसगण । विजयी झालें वानरसैन्य ।
भेदिलें विरांचें आवरण । रणनदी पूर्ण वाहवोनी ॥ ४२ ॥
रण देखोनि घारी गीध । करिते झाले आल्हाद ।
भोजन मिळालें अगाध । मांस विविध भक्षिती ॥ ४३ ॥
ऐसें करोनियां रण । भेदोनि असुरांचे आवरण ।
पुढें चालिले वानरगण । तंव महादारुण ओढवलें ॥ ४४ ॥
नभीं गुप्त शस्त्रावरण । भूत प्रेत पिशाच जाण ।
भेदितील वानरगण । रघुनंदननिजकृपा ॥ ४५ ॥
एका जनार्दना शरण । दुर्धरक्रिया रावाण ।
रची जितकी दारुण । तितकी श्रीरामगण भेदिती ॥ १४६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने युद्धकांडे एकाकारटीकायां
राक्षसावरणभेदो नाम सप्तपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५७ ॥
ओंव्या ॥ १४६ ॥ श्लोक ॥ २२ ॥ एवं ॥ १६८ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तावन्नावा