संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा

सुग्रीव मूर्च्छित पडतो

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रहस्त वधाची वार्ता ऐकून रावण स्वतः जाण्याचे ठरवितो :

पूर्व प्रसंगीं रणाआंत । नीळे मारिला प्रहस्त ।
ऐकोनियां लंकानाथ । अति आकांत पावला ॥ १ ॥
रावणाचा अति आप्त । प्रधान सेनानी प्रहस्त ।
त्याचा नीळें केला घात । लंकेआंत आकांत ॥ २ ॥

प्रहस्तस्य वधं श्रुत्वा रावणो भ्रांतमानसः ।
राक्षसानादिदेशाथ राक्षसेद्रो महाबलः ॥१॥
कार्या शत्रुषु नावज्ञा यैरिंद्रबलसूदनः ।
सूदितः सैन्यपालो मे सानुयात्रः सकुंजरः ॥२॥
सोऽहं रिपुविनाशाय विजयाया विचारयत् ।
स्वयमेव गमिष्यामि रणशीर्ष तदद्‍भुतम् ॥३॥
अथ तद्वानरानीकं रामं च सहलक्ष्मणम् ।
निर्दहिष्यामि बाणौघैः शुष्कं वनमिवानलः ॥४॥

नीळें मारिला प्रहस्त । बोंब उठली लंकेआंत ।
तें ऐकोनि लंकानाथ । जाला भ्रांत सक्रोधी ॥ ३ ॥
इंद्रबळेंसीं समसमान । तो प्रहस्त मारिला प्रधान ।
शत्रु वाढलें संपूर्ण । त्याचें मर्दन मी करीन ॥ ४ ॥
लक्ष्मणासहित श्रीरघुनाथ । मी मारीन म्हणे लंकानाथ ।
करावया वानरांचा अंत । रावण निघत संग्रामा ॥ ५ ॥
युद्धा जातां लंकानाथ । धेंडें पडिलीं नगरांत ।
वीरीं निघावें त्वरित । अश्वगजरथभारेंसीं ॥ ६ ॥
स्वयें वानरीं आपण । विरुपाक्ष अकंपन ।
मारिला प्रहस्त प्रधान । शत्रु सामान्य म्हणों नये ॥ ७ ॥
शत्रु म्हणों नये सामान्य । त्याचें करुं नये हेळण ।
यालागीं स्वयें रावण । निघे आपण संग्रामा ॥ ८ ॥
शुष्क जाळी अनळ । तैसें मारीन वानरदळ ।
राम लक्ष्मण वीर प्रबळ । मारीन तत्काळ रणमारें ॥ ९ ॥
एक धनुष्य श्रीरामशक्ती । दहा धनुष्यें माझें हातीं ।
त्यासीं पाडून बाणावर्ती । पाडीन क्षितीं बंधु दोनी ॥ १० ॥

एवमुक्त्वा महातेजा रावणो राक्षसेश्वरः ।
अगच्छत्सहसा क्रूरो महासैन्येन संवृतः ॥५॥
स एवमुक्ता तु विमानरुपं रथं तुरंगैर्बहुभिः सुयुक्तम् ।
प्रकाशमानं वपुषा ज्वलंतं समारुरोहामरराजशत्रुः ॥६॥
सशंखभेरीपणवप्रणादैराक्ष्वेडितास्फोटितसिंहनादैः ।
पुण्ये स्तवैश्चापि सुपूज्यमानस्तदाययौ राक्षसराजमुख्यः ॥७॥
सशैलजीमूतनिकाशरुपैर्महाबलैः पावकदिप्त नेत्रैः ।
बभौ वृतो राक्षसराजमुख्यो भूतैर्वृतो रुद्र इवामरशः ॥८॥
ततो नगर्याः सहसा महौजा निष्क्रम्य तद्वानरसैन्यमुग्रम् ।
महार्णवाभ्रस्तनितं ददर्श समुद्यतं पादपशैलहस्तम् ॥९॥

रावणाचा राक्षससैन्यसंभार :

मारावया रामसौ‍मित्र । निर्दाळावया वानरभार ।
युद्धा निघाला दशशिर । सैन्यसंभार सज्जूनी ॥ ११ ॥
अतिरथी महारथी । अश्वती गजपती ।
युद्धा आले नरपती । सैन्यसंपत्ती सज्जूनी ॥ १२ ॥
कंगल टोप राघावळी । पाखरा लखलखित तेजाळी ।
झळकती अश्वाची मोहळी । दाटली फळी असिवारांची ॥ १३ ॥
हो हो मा मा जी जी करीं । नाचविती तीं पायांवरी ।
एक वारु उडविती अंबरीं । एक धरेवरी थरकती ॥ १४ ॥
चढोनियां असिवारीं । सिंहनादें गर्जती गजरीं ।
यावा दावियला स्वारीं । शस्त्रसंभारीं लखलखित ॥ १५ ॥
वारु जुंपोनियां श्रेष्ठ । रथीं बैसलें सुभट ।
ध्वजपताका लखळखाट । घडघडाट रथांचा ॥ १६ ॥
आढाऊ चव्हाण अलंगाइत । सेली सांबळी बाणाइत ।
शूळ कट्यार फरशहस्त । अपरिमित पायांचें ॥ १७ ॥
तुळवे तळपाती थैकारीं । जेठी पिलगती हुंकारीं ।
भिंडिमाळा घेवोनि करीं । केला वीरीं गडगर्ज ॥ १८ ॥
एका हतियेर मुसळ । एका खट्वांग प्रबळ ।
एका यष्टिका सबळ । मिनलें दळ पायांचें ॥ १९ ॥
असंख्य दोहीं वाहीं कुंजर । मदोन्मत्त सालंकार ।
वरी वळंघले वीर । परम शूर गजयोद्धे ॥ २० ॥
जैसें चालतें विमान । तैसा रथ शोभायमान ।
ध्वजीं शोभे रथचिन्ह । पताका संपूर्ण झळकती ॥ २१ ॥
ज्वाळामाळाखचित रत्‍न । मणिमुक्तामाळापरिलंबन ।
रथीं बैसला दशानन । शोभायमान अति शोभा ॥ २२ ॥
रथीं बैसला रावण । वीर करुं येती वंदन ।
सेवक सांगती गर्जोन । पहावें नमन धुरेचें ॥ २३ ॥
पर्वतप्राय निशाचर । मेघसदृश महावीर ।
एकाचे धगधगीत नेत्र । वैश्वानरसमप्रभ ॥ २४ ॥
कराळ विकराळ दांताळी । ऐशा वीरांच्या समेळीं ।
रावण निघे आतुर्बळी । रणकल्लोळीं भिडावया ॥ २५ ॥
घेवोनि गण साठी सहस्र । जेंवी कां निघे महारुद्र ।
तेंवी निघाला दशशिर । सैन्यसं भारसमवेत ॥ २६ ॥
छत्रशशांक त्याचे शिरीं । सुक्ष्म शलाका मणिमंजरी ।
मुक्ताफळांच्या झालरी । शोभती हारी पाचूंच्या ॥ २७ ॥
घावो घातला निशाणीं । शंखभेरीमृदंगध्वनी ।
ढोल टमकी किंकिणीं । राणविराणीं गाजती ॥ २८ ॥
गिडबिडी थापडी गजरीं । शृंग वेणु गर्जती गंहिवरीं ।
खाखाइलीं रणमोहरीं । भाट कैवारीं गर्जती ॥ २९ ॥
काहळा वाजती चिनकाहळा । बुरुंगांच्या ध्वनि आगळा ।
रणीं त्राहाटिला भोंगळा । राक्षसदळा आल्हाद ॥ ३० ॥
ऐसें सैन्य सहपरिवारीं । वाजंत्र्यांच्या निजगजरीं ।
रावण निघाला बाहेरी । नरवानरीं युद्धार्थ ॥ ३१ ॥
सैन्यपताका असंख्यात । श्वेत आरक्त सुनीळ पीत ।
दाडिंबसुमनीं शोभत । सिंदूरान्वित अनेका ॥ ३२ ॥
देखोनि राक्षससंभार । वानरीं आल्हाद अपार् ।
घेवोनि वृक्ष शिळा शिखर । युद्धा सत्वर निघाले ॥ ३३ ॥
जैसा अक्षोभ्य सागर । तैसा वानरांचा भार ।
तें देखोनियां दशशिर । निशाचर सकंप ॥ ३४ ॥

तद्राक्षसानीकमतिप्रचंड मालोक्य रामो भुजगेंद्रबाहुः ।
बिभीषणं शस्त्रभृतां वरिष्ठमुचाच सेनानुगतः पृथुश्रीः ॥१०॥
नानापताकध्वजछत्रजुष्टं प्रासासिशुलायुधशस्त्रजुष्ठम् ।
कस्येदमक्षोभ्यमभीरुजुष्टं सैन्यं महेंद्रोपमनागजुष्टम् ॥११॥
ततस्तु रामस्य वचो निशभ्य बिभीषणः शुक्रसमानबुद्धिः।
शशंस रामस्य बलप्रवेकं महात्मनां राक्षसपुंगवानाम् ॥१२॥

राक्षससैन्य पाहून श्रीराम बिभीषणाकडे चौकशी करतात :

सुवेळाग्रीं श्रीरामचंद्र । देखोनि राक्षससेनाभार ।
सैन्य अतिशयें अपार । वीर दुर्धर रणयोद्धे ॥ ३५ ॥
बिभीषणा पुसे श्रीरामचंद्र । नानापताका ध्वज विचित्र ।
कोणाचा हा सैन्यसमुद्र । अति दुरुस्त अक्षोभ्य ॥ ३६ ॥
रावण सदा भयभीत । निःशंक कैसेनि पैं येत ।
अति गर्जत उल्लासें ॥ ३७ ॥
शुळ शक्ति खड्गधार । गदा मुद्‌गल लहुडी चक्र ।
घेवोनियां शस्त्रसंभार । वीर दुर्धर भद्रजाती ॥ ३८ ॥
ऐसें बोलतां बोलतां । येतां देखोनि लंकानाथा ।
रणश्री चढली रघुनाथा । करावया घाता निजशत्रूच्या ॥ ३९ ॥
आजानुबाहु भुजगेंद्रसमता । स्फुरण आलें श्रीरघुनाथा ।
धनुष्य सज्जोनियां हाता । होय पुसतां बिभीषणा ॥ ४० ॥
सैन्यामाजी रणप्रवीण । निधडे निःशंक कोण कोण ।
त्यांचें सांग पां सुचिन्ह । रणीं शोधून मारावया ॥ ४१ ॥

बिभीषणाचे श्रीरामांना कथन :

ऐकोनि श्रीरामवचन । बिभीषण शुक्रबुद्धिसमान ।
राक्षससैन्यीं वीर दारुण । त्यांचे सुचिन्ह सांगत ॥ ४२ ॥
सावध ऐकें श्रीरामचंद्रा । मुख्य करोनि दशशिरा ।
रणप्रवीण वारा धुरा । अति दुर्धरा तें ऐक ॥ ४३ ॥
बालार्कतेजेसीं समान । गजस्कंधीं आरोहण ।
गज डुल्लतां डुले आपण । अकंपन तो जाण ॥ ४४ ॥
मागें मारिला अकंपन । त्याच्या बळासीं समान ।
अतिशयेंसीं रणप्रवीण । निधडा पूर्ण रणयोद्धा ॥ ४५ ॥
ज्याच्या ध्वजीं सिंहकेत । बळें गजबळें उन्मत्त ।
इंद्र धरोनि आणिला तित । इंद्रजित तो जाला ॥ ४६ ॥
धनुष्यीं करोनि टणत्कार । रथीं रणयोद्धा विचित्र ।
अतिकाय महावीर । अति दुर्धर सुरवर्यां ॥ ४७ ॥
घंटा सनाद सालंकार । खरारुढ महोदर ।
गर्जताहे खरस्वर । आरक्तनेत्र रणयोद्धा ॥ ४८ ॥
सुवर्णपाखरांचा विचित्र वारु । त्यावरी बैसला रावणकुमरु ।
नरांतक महावीरु । खड्गे दुर्धरु रणमारा ॥ ४९ ॥
किंकिणीज्वाळाविभूषित । गजारुढ शूळहस्त ।
त्रिशिरा गजयोद्धा विख्यात । विबुधांतक रणमर्दीं ॥ ५० ॥
ज्याच्या रथीं पन्नगकेत । तथानुगतीं अति विख्यात ।
धनुर्बाणीं रणभिवृत्त । कुंभ उन्मत्त रिपुघाती ॥ ५१ ॥
सुवर्णखचित रत्‍नकंठ । अष्टौ घंटा परिघ उद्‌भट ।
रणाभिमर्दनीं कुंभ श्रेष्ठ । शत्रुसंकट रणविजयी ॥ ५२ ॥
ध्वजपताका शोभित । धनुर्धारी अतिपुरुषार्थ ।
देवांतक रावणसुत । रणोन्मत्त रणमारा ॥ ५३ ॥
आरुढोनि शुभ्र गज । किरीटकुंडलीं कवचीं सज्ज ।
धनुर्धारी विकटझुंज । खरात्मज मकराक्ष ॥ ५४ ॥
व्याघ्रमुख उष्ट्रमुख । तरसतगरसिंहमुख ।
ऐसें सैन्य ज्याचें विटंक । सैराट देख विकृतास्य ॥ ५५ ॥
पैल राजा दशशिर । शशिप्रभ श्वेतच्छत्र ।
कनकदंडी युग्मचामर । धुरा थोर थोर दोन्हीं बाहीं ॥ ५६ ॥
ऐसा देखोनि सैन्यसमुद्र । स्वयें बोले श्रीरामचंद्र ।
रावण उग्र अत्युग्र । सुरासुर कांपती ॥ ५७ ॥
रावण आला दृष्टीतळीं । त्यासीं विंधोनिं बाणजाळीं ।
त्याची करीन मी रांगोळी । गर्वामुमेळीं कुंथत ॥ ५८ ॥
रावणाचें उग्र स्वरुप । रावणाचा उग्र प्रताप ।
तोडावया रावणदर्प । दृढ साटोप श्रीरामा ॥ ५९ ॥

एवमुक्ता ततो रामो धनुरादाय वीर्यवान् ।
लक्ष्मणानुचरस्तस्थौ समुद्‍धृत्य शरोत्तमम् ॥१३॥

रावणाकडून बाणांचा वर्षावः

ऐसें बोलोनि आपण । रणीं लक्षोनि रावण ।
श्रीराम आणि लक्ष्मण । धनुष्यीं बाण सज्जिलें ॥ ६० ॥
येरीकडे दशशिर । देखोनि वानरसैन्य समुद्र ।
जैसा मथिजे क्षीरसागर । तेंवी वानरवीर विमर्दीं ॥ ६१ ॥
जेंवी मकरें सागरीं खळाळ । तेंवी वानरांचें दळ ।
रावणें केला हलकल्लोळ । रणजाळ वर्षोनी ॥ ६२ ॥
रावणाचे उग्र शर । तेणें भेदले वानर ।
घायें तळमळित वीर । कपिसंभार खळबळिला ॥ ६३ ॥

सुग्रीवाचे उड्डाण व रावणावर शिळाप्रहार :

येतां देखोनि रावण । सुग्रीवासीं आलें स्फुरण ।
त्यासीं करावया रण । केलें उड्डाण अति वेगें ॥ ६४ ॥
रे रावणा म्हणे राहें साहें । माझा यावा आला पाहें ।
तुज राखेल कोण मांये । एकें घायें मारीन ॥ ६५ ॥
चोरोनि श्रीरामाची अंतुरी । जावोनि लपसी लंकापुरीं ।
आजी आलासी बाहेरी । मारीन महामारीं रणमारें ॥ ६६ ॥
ज्यावरी शिखरें असंख्यात । प्रचंड उपटोनी पर्वत ।
रणीं ठोकिला लंकानाथ । क्रोधान्वित सुग्रीवें ॥ ६७ ॥
बाणीं विंधिलें अमित । परी तो भंगेना पर्वत ।
गजबजिला लंकानाथ । रणीं प्राणांत ओढवला ॥ ६८ ॥
येतां देखोनि गिरिवर । राक्षसदळी हाहाकार ।
पर्वत आला अनिवार । दशशिर वांचेना ॥ ६९ ॥

रावण ब्रह्मवरददत्त बाणाने पर्वताचे विंधन करतो :

रावण होवोनि सावचित्त । बाण ब्रह्मवरद दत्त ।
तेणें विंधोनि पर्वत । शतधा छेदिला ॥ ७० ॥

सुग्रीवाच्या लत्ताप्रहाराने साश्वरथाचे भ्रमण :

वृथा जातांचि पर्वत । सुग्रीवें रथीं दिधली लात ।
रथसारथि अश्वयुक्त । परिभ्रमत रणभूमीं ॥ ७१ ॥
रथ भोंवतां चक्रान्वित । रावण जाला अति विस्मित ।
सुग्रीव बळिवंत । परम पुरुषार्थीं कपिकुळीं ॥ ७२ ॥
सुग्रीव उसळोनी गगना । पर्वत हाणितां रावणा ।
कोप आला दशानना । वरदबाणें विंधिलें ॥ ७३ ॥

स सायकार्तो विपरीतचेतः कूजन्पृथिव्यां निपपात वीरः।
तं प्रेक्ष्य भूमौ पतितं विसंज्ञं नेदुः प्रहृष्टा युधि यातुधानाः॥१४॥
ततो गवाक्षो गवयः सुषेणौ मैंदो गजो ज्योतिमुखो नलश्च ।
शिलाः समुद्यम्य विवृद्धकायाः प्रदुद्रुवुस्तं प्रति राक्षसेंद्रम्॥१५॥
तेषां प्रहारान्स चकार मोघान्‍रक्षोऽधिपो बाणशतैः शिताग्रैः।
ते वानरेंद्रास्त्रिदशारिबाणैर्भिन्ना निपेतुर्भुवि भीमकायाः॥१६॥
ते वध्यमानाः पतिताश्च शूराः संताड्यमाना भयशल्यविद्धाः।
ते वानरा रावणसायकार्ता जग्मुः शरण्यं शरणं स्म रामम्॥१७॥

रावणाच्या वरदबाणाने सुग्रीवास मूर्च्छा :

वरदबाण आतुर्बळी । भेदतांच हृदयकमळीं ।
रामनामें देवोनियां आरोळी । पडिला भूतळीं सुग्रीव ॥ ७४ ॥
सुग्रीवराजा पडतां क्षितीं । राक्षस जयजयकारें गर्जती ।
आमचा विजयी लंकापती । गुढियां उभारिती स्वानंदें ॥ ७५ ॥
धूर पडताचि रणीं । रावण नेईल काढोनी ।
यालागीं वानरवीर श्रेणी । चहूंकडोनि पावत ॥ ७६ ॥

रावणाला वानरसैन्याचा वेढा :

शिळा शिखर वृक्ष पर्वत । वानर निजबळें हाणित ।
जाजावला लंकानाथ । वानरीं रथ वेढिला ॥ ७७ ॥
गुळासीं लागतीं माकोडे । तैसीं रावणासीं माकडें ।
झोंबिन्नली चहूंकडे । मागें पुढें कवळोनि ॥ ७८ ॥
चुकवी पुढिलांचें आघात । मागून वानर करिती घात ।
जंव मागिलां निवारित । तंव हाणित वामसव्य ॥ ७९ ॥
रावणाच्या अंगावरी । चालती वानरांच्या हारी ।
जाजाविला वनचारीं । न चले थोरी बळाची ॥ ८० ॥
अंगप्रत्यंगीं चौपासीं । मुंग्या झोंबती सर्पासी ।
त्यावरी बळ न चले त्यासी । तेंवी रावणासी कपिभारीं ॥ ८१ ॥
रावण जंव बाण सोडी । एक वानर शित तोडी ।
एक बाणाते आसुडी । एक तो ओढी धनुष्यातें ॥ ८२ ॥
सुग्रीव पडतां अचेतन । तयालागीं वानरगण ।
स्वयें वेंचूं पाहती प्राण । रणीं रावआण वेढूनी ॥ ८३ ॥
सुग्रीव न्यावया लंकेप्रतीं । उचलोनी घालूं पाहे रथीं ।
वानरीं वेंढिला लंकापती । विस्मित चीत्ती रावण ॥ ८४ ॥
पसरोनि विंशतिभुजाभारू । कवळोनि मारितां वानरु ।
गगनीं उसळोनी सत्वरु । लहान थोरु निष्टले ॥ ८५ ॥
मूर्च्छित पडतां मुख्य धूर । वेगीं पावले कपिकुंजर ।
करीत नामाचा भुभुःकार । वानरवीर तें एका ॥ ८६ ॥
गज गवाक्ष गवय तिन्ही । सवेग आले पैं ठाकोनी ।
मैंद द्विविद वीर दोन्ही । रणनिर्वाणीं खवळले ॥ ८७ ॥
सुदंष्ट्र वीर प्रबळ । नळ वीर प्रबळ ।
नळ नीळ तार तरळ । वानर पावले सकळ ।
वृक्ष शिळा प्रबल पर्वल पर्वत हस्तीं ॥ ८८ ॥
मुख्य लक्षोनि रावण । वानरवीरीं मांडिलें रण ।
शिळा शिखरें द्रुम पाषाण । रणकंदन लंकेशा ॥ ८९ ॥
रणीं कोपोनि दशानन । सज्जोनियां धनुष्यबाण ।
तोडोनि द्रुम शिळा पाषाण । कपिकंदन मांडिलें ॥ ९० ॥
वानर आले अति वेगेंसीं । तोडोनि त्यांच्या आयुधांसी ।
बाण भेदूनि सपिच्छी । रणभूमींसीं पाडिले ॥ ९१ ॥
विंधोनियां निर्वाणबाणीं । मुख्य धुरा पाडिल्या धरणीं ।
वानरवीरांचियां श्रेणी । रणकंदनीं त्रासिल्या ॥ ९२ ॥
अनिवार्य रावणबाण । वानरवीर रणीं त्रासून ।
सांडोनियां रणांगण । आले शरण श्रीरामा ॥ ९३ ॥
सुवर्णपत्री भाळीं सुधारा । रणीं त्रासितां वानरां ।
शरण आले श्रीरामचंद्रा । जीव वानरां श्रीराम ॥ ९४ ॥

ततो महात्मा स धनुर्धनुष्मानादाय रामः सहसा जागम ।
तं लक्ष्मणः प्रांगलिरभ्युपेत्य प्रोवाच वाक्यं परमार्थयुक्तम् ॥१८॥
अहमार्य सुपर्याप्तो वधायास्य दुरात्मनः ।
वधिष्याम्यहमद्यैवमनुजानीहि मां विभो ॥१९॥
तमब्रवीन्महातेजा रामः सत्यपाराक्रमः ।
गच्छ त्वं वचनं चेदं निबोध मम लक्ष्मण ॥२०॥
तस्य च्छिद्राणि मार्गस्व स्वच्छिद्राण्यपि लक्षय।
चक्षुषा धनुषा चैव रक्षात्मानं समाहितः॥२१॥
राघवस्य वचः श्रुत्वा संपरिष्वज्य पूज्य च ।
अभिवाद्य ततो रामं ययौ सौ‍मित्रिराहवे ॥२२॥

श्रीरामचंद्राच्या अनुज्ञेने लक्ष्मण निघतात :

रावणाचे दुर्धर बाण । वानर त्रासिले देखून ।
श्रीरामे घेवोनि धनुष्यबाण । युद्धा आपण निघाला ॥ ९५ ॥
युद्धी निघतां रघुनंदन । लक्ष्मणें धांवोनि धरिले चरण ।
आजिंचे मज द्यावे रण । कृपा करुन श्रीरामा ॥ ९६ ॥
रावण बापुडें ते किती । तुवां न रिघावें युद्धार्थी ।
त्यासीं मी रणीं लावीन ख्याती । रणव्युत्पत्ती पाहें माझी ॥ ९७ ॥
ऐकोंनी लक्ष्मणाचे वचन । संतोषला रघुनंदन ।
रावणांसी करावयां रण । बुद्धी संपूर्ण सांगत ॥ ९८ ॥

लक्ष्मणास रामाचा उपदेश :

रावणाची बुद्धि खोटी । रावण अतिशयें कपटी ।
त्यापासीं मायाकोटी । रणसंकटी सिंतरावया ॥ ९९ ॥
त्यासीं करावया रण । स्वयें व्हावें सावधान ।
दृढ राखोन अनुसंधान । विंधावे बाण अलक्ष्यलक्ष्यी ॥ १०० ॥
देहीं न फुटता घावो । शत्रु जीवें मारावा पहा हो ।
हाचि धरोनियां आवो । रणनिर्वाहो करावा ॥ १ ॥
ब्रह्मरुप अनुसंधान । ब्रह्मरुपी विंधितां बाण ।
ब्रह्मरुप आपणाआपण । हें रणांगण साधावें ॥ २ ॥
ऐसिया साधोनी रणरंगास । सांडोनी शरीराची आस ।
कळिकाळावरी घालोनी कांस । रणीं उदास विचरावें ॥ ३ ॥
मरणभय ज्याचे पोटीं । तो तंव शूर नव्हे सृष्टी ।
त्याची आशंका लागे त्यापाठीं । मरे शेवटीं निजभयें ॥ ४ ॥
चैतन्यतेजें लखलखाट । देहीं विदेहत्वाचा नेट ।
ऐसेनि धैर्ये अति सुभट । ते वीर श्रेष्ठ संग्रामी ॥ ५ ॥
तेथें न चले शठकपट । तेथें न चले मायेचें कचाट ।
निर्देळे शत्रुपक्षसंकट । करी सपाट पापपुण्या ॥ ६ ॥
ऐकोनी श्रीरामवचन । लक्ष्मणा आनंद गहन ।
एका जनार्दना शरण । युद्ध दारुण अवधारा ॥ १०७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवमूर्च्छापतनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
ओव्या ॥ १०७ ॥ श्लोक ॥ २२ ॥ एवं ॥ १२९ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सतरावा