भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा
रावणाने रामांचा ध्वज तोडला
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मातलीचे रथासह आगमन व श्रीरामांना वंदन :
मातलि सारथि विचक्षण । घातलें इंद्रा लोटांगण ।
येरें देतां आज्ञापन । करी संयोजन रथाचें ॥ १ ॥
रावण दुरात्मा चांडाळ । बंदी घातले सुर सकळ ।
तेणें अत्यंत तळमळ । लागली प्रबळ मातलीसीं ॥ २ ॥
आपुला स्वामी सुरपती । सेवा घेतो त्याचे हातीं ।
तेथें येराची कवण गती । लंकापति भला नव्हे ॥ ३ ॥
तेणें क्रोधें करोनि जाण । केलें रथसंयोजन ।
शस्त्रास्त्रें सकळ भरुन । सामग्री दारुण घातली ॥ ४ ॥
कवचें खड्गें अत्य्द्भुत । मंत्र तंत्र क्रियायुक्त ।
रणसामग्री समस्त । रथ त्वरित सिद्ध केला ॥ ५ ॥
आज्ञा पुसोनि इंद्रासी । मातली निघाला वेगेंसीं ।
ठाकून आला शीघ्रतेसीं । मृत्युलोकासीं रणभूमी ॥ ६ ॥
हातीं घेवोनि धनुष्यबाण । रणीं उभा रघुनंदन ।
तंव इंद्राचा रथ घेऊन । मातलि आपण तेथें आला ॥ ७ ॥
देखोनि श्रीरामासी । सुख झालें मातलीसीं ।
आनंद भरला सर्वांसी । निजोल्लासीं डुल्लत ॥ ८ ॥
पाहतां श्रीरामाकडे । यम काळ तें बापुडें ।
रावण दहा तोंडांचें किडें । बाणझडाडें मरेल ॥ ९ ॥
हें निश्चित माजें वचन । तथापि स्वामीचें आज्ञापन ।
श्रीरामासी रथनिवेदन । करोनि रावण मारावा ॥ १० ॥
श्यामकर्ण अति शोभत । श्वेत वारुवीं जुंपिला रथ ।
विचित्राभरणीं अति मंडित । वारु गर्जत शत्रुनिधनें ॥ १९ ॥
चाकें नीळाचीं अति कठिण । सुवर्णबंदी शोभायमान ।
आंख वज्राचा सुलक्षण । रथचक्रीं पूर्ण बोलिला ॥ १२ ॥
धुरा वैडूर्याच्या सुरखा । सांटा पाचुबंदी नेटका ।
मरकताचा ध्वज देखा । लोला पताका शोभती ॥ १३ ॥
ज्वाळमाळाकिंकणी । घंटा वाजती गजरें करोनी ।
खणणिला रत्नाभरणीं । श्रीरामालागूनी आणिला ॥ १४ ॥
तं रथं समुपादाय मातलिः शक्रसारथिः ।
अभ्यद्रवत काकुत्स्थमवतीर्य त्रिविष्टपात् ॥१॥
अब्रवीदग्रतो रामं सप्रतोदो रथे स्थितः ।
प्रांजलिर्मातलिर्वाक्यं सहस्त्राक्षस्य सारथिः ॥२॥
सूर्यप्रभेसमान । सायुध रथ सांगत्राण ।
मातलि घेवोनि आला जाण । रघुनंदन जेथें होता ॥ १५ ॥
हातीं आसूड वागोरी असतां । रथाखालीं नुतरतां ।
नमन केलीं रघुनाथा । अति चतुरता सारथ्याची ॥ १६ ॥
मातलीचे निवेदन व युद्धसाहित्य समर्पण :
सारथ्याची धर्म ऐसा आहे । रणामाजी निघोनि पाहे ।
साश्वरथ सोडूं नये । नमिता होये वरुनचि ॥ १७ ॥
ऐक स्वामी रघुनाथा । तुझा अवतार सुरकार्यार्था ।
वधावया लंकानाथा । रणा तत्वतां आलासी ॥ १८ ॥
देव घातले बांदवडीं । देखोनि त्यांची करुणा गाढी ।
धांविन्नलासी निजप्रौढी । अति कडाडीं रघुनाथा ॥ १९ ॥
रणामाजीं लवडसवडी । निवटिल्या राक्षसकोडी ।
नाचविली रणधांगडी । अर्धघडी न लागतां ॥ २० ॥
आतां निवटिल्या रावण । मग आमचें कार्य कोण ।
साह्य न होऊंचि रघुनंदन । सहस्रनयना अति लज्जा ॥ २१ ॥
म्हणोनि दास्यालागीं तत्वतां । रथ पाठविला रघुनाथा ।
यावरी बैसोनियां आतां । लंकानाथा निवटावें ॥ २२ ॥
रावण रथी राम पदाती । हें न साहेचि देवांप्रती ।
म्हणोनियां रघुपती । रथ तुजप्रती पाठविला ॥ २३ ॥
तुज न लागे रथ सारथी । निजांगें करोनि ख्याती ।
निवटावया लंकानाथाप्रती । निमेषगती लागेना ॥ २४ ॥
ऐसें जाणतसों सकळिक । तरी इंद्र सेवेलागीं देख ।
रथ पाठवी सुरनायक । बैसोनि दशमुख निवटावा ॥ २५ ॥
तुज विजयालागीं रघुपती । सकळ शस्त्रास्त्रसंपत्ती ।
पाठविली अमरपती । लंकापती निवटावया ॥ २६ ॥
इदमैंद्रं महाचापं कवचं चाग्निसन्निभम् ।
शराश्चादित्यसंकाशाः शक्तयो विमलाः सिताः ॥३॥
आरुह्य च रथं राम राक्षसं जहि रावणम् ।
मया सारथिना सार्धं महेंद्र इव दानवान् ॥४॥
हें घे इंद्राचें महाधनुष्य । शत्रुनिर्दळणीं कर्कश ।
ओढी काढोनि सावकाश । दशमुखास निवतावें ॥ २७ ॥
अग्निप्रभेसमान जाण । हें घे अंगत्राण ।
आंगी घालोनि आपण । शत्रुनिर्दळण करावें ॥ २८ ॥
सूर्यप्रभेसमान शूर । रुक्मपुंखी सपरिकर ।
चापीं सज्जोनि वेगवत्तर । दशवक्त्र निवटावा ॥ २९ ॥
अति मोहका विमलशक्ती । रणीं दुर्धर शत्रुघाती ।
तुज पाठविल्या अमरपती । रघुपति महावीरा ॥ ३० ॥
मजसमवेत रघुपती । बैसोनियां इंद्ररथीं ।
महेंद्र निवटी दानवपंक्ती । तेंवी लंकापती निवटावा ॥ ३१ ॥
रामाची मनःस्थिती, बिभीषणाची विनंती :
ऐकतां मातलीचें वचन । हांसोनि बोले रघुनंदन ।
रथसारथियाचें कार्य कोण । मजलागून रणरंगी ॥ ३२ ॥
रावण बापुडें मशक । दहा मुखांचें किडें देख ।
त्यासाठी काय साधक । न लागतां निमेख निवटीन ॥ ३३ ॥
म्हणोनि राम हास्यवदन । तें जाणोनियां चिन्ह ।
पुढें झाला बिभीषण । अति विचक्षण बोलका ॥ ३४ ॥
जाणे श्रीरामाचें बळ । रणसंग्राम रणशीळ ।
न लागतां अर्ध पळ । राम निवटील रावणासी ॥ ३५ ॥
तरी इंद्राचें मनोगत । रक्षावें जी निश्चित ।
म्हणोनियां अति विनीत । स्वयें प्रार्थित श्रीरामा ॥ ३६ ॥
करकमळ जोडूनि पाहीं । मस्तकांजळी लवलाहीं ।
लागला श्रीरामाच्या पायीं । विनंती कांही परिसावी ॥ ३७ ॥
रथारुढ रघुपती । रणामाजी रणख्याती ।
करितां देखावा अति प्रीतीं । ऐसें चित्तीं बहुतांचे ॥ ३८ ॥
राम अलंकारा भूषण । राम रथा रथगति जाण ।
सस्त्रास्त्रांचे मारकपण । स्वयें आपण श्रीराम ॥ ३९ ॥
ज्यासी नाहीं नांवरुप । वेदांसी न कळे स्वरुप ।
तेणें आम्हांसाठी धरोनि रुप । भक्तसंकल्प पुरवित ॥ ४० ॥
निजभक्तांचें मनोगत । संरक्षावें यथातथ्य ।
हें श्रीरामाचें निजव्रत । निश्चितार्थ वेदवाणी ॥ ४१ ॥
आपुले निजच्छंदे । निजभक्त कल्पिती विनोदें ।
तितुकें अंगीकारी स्वानंदें । अद्वैतद्वंद्वें घेवोनी ॥ ४२ ॥
लाडकिया भक्तांची स्थिती । युक्तायुक्त नेणती ।
तरी अंगीकारी रघुपती । भक्तप्रीतीं भूलला ॥ ४३ ॥
अनावरासी अधिष्ठान । सर्वगतासी आवाहन ।
चिदंबरा प्रावरण । मूर्ख जन कल्पिती ॥ ४४ ॥
अधिष्ठानासी आसन । कल्पिती अबळ भक्तजन ।
तथापि लाजेना रघुनंदन । पीतवसन अंगीकारी ॥ ४५ ॥
श्रीरामा सकळांचा शेवट । त्यासीही कल्पिती कुकुट ।
आभाळासी मळवट । श्रवणपाठ अश्रोत्रा ॥ ४६ ॥
विश्वमुखासी संख्यात्मक । वाणीचें कल्पिती मुख ।
एक्या अवदानें तृप्ति देख । मानिती आवश्यक नित्यतृप्ता ॥ ४७ ॥
विश्वबाहूसी परिमित हात । विश्वहृदय हृदयीं रिघत ।
स्रक् चंदनादि समस्त । भोग अर्पिती निजावडीं ॥ ४८ ॥
ज्यामाजी अनंत ब्रह्मांड खेळे । तो भक्तभावार्थमेखळे ।
माजी सकळां आकळे । निजभक्तलळे पाळित ॥ ४९ ॥
श्रीराम सकळांची गुह्यराशी । झांकावया त्याच्या गुह्यासी ।
पीतांबर अर्पिती प्रेमेंसीं । येरु आवेशीं ओढित ॥ ५० ॥
आचरण कल्पिती चरण । जें त्रिवेणीचें जन्मस्थान ।
तेथें घालिती वाणीचें जीवन । चरणक्षाळण करावया ॥ ५१ ॥
श्रीराम लेणियांचें लेणें । त्यासी देती रत्नभूषणें ।
त्या अंगिकारिसी प्रेमें जेणें । रथ भावें तेणें अंगिकारीं ॥ ५२ ॥
सुग्रीव, अंगद आणि मारुती वगैरेंची विनंती :
म्हणोनि घातलें लोटांगण । देखोनि राम हास्यवदन ।
वेगें उठोनि आपण । हृदयीं धरोन आलिंगिला ॥ ५३ ॥
अति चतुर बोलका होसी । म्हणोनि धरिला पोटासीं ।
अंगीकारोनि वचनासी । आरोहणासी सरसावला ॥ ५४ ॥
तंव सुग्रीव राजा सुबुद्धी । अलंकार अर्पिलें उदधी ।
ते आणिले तेच संधीं । स्वामी हे आधीं अंगीकारीं ॥ ५५ ॥
तंव अंगदही उठावला । लोटांगण घालोनि वहिला ।
श्रीराम स्वयें विनविला । ऐकावें बोला सकाळांच्या ॥ ५६ ॥
तव विनविलें मारुती । जे विनविताती जुत्पती ।
तें ऐकावें रघुपती । वचन मानिती श्रीराम ॥ ५७ ॥
श्रीरामांचा अंगीकार व तेजस्विता :
अंगीकारोनि भूषणां । रथासी घालोनि प्रदक्षिणा ।
नमन करोनियां जाणा । केलें आरोहणा रथावरी ॥ ५८ ॥
इत्युक्त्वा स परिक्रम्य रथं तमभिवाद्य च ।
आरुरोह रथं रामस्तदा लक्ष्म्या विराजयन् ॥५॥
ततोऽभवन्महद्युद्धं सर्वेषां रोमहर्षणम् ।
राघवस्य महाबाहो रावणस्य च रक्षसः ॥६॥
सालंकार रघुपती । बैसतांचि इंद्ररथीं ।
बाणली वीरश्री पुरती । दुर्धर शक्ती भासत ॥ ५९ ॥
वानरांचा आनंद व त्यांचे श्रीरामास वंदन :
प्रकास पडला सोज्ज्वळ । दिशा उजळल्या सकळ ।
उजळलें नभोमंडळ । सुर सकळ आनंदले ॥ ६० ॥
रथचक्रांचा घडघडाट । वारुंचा वाजिन्नला साट ।
हाक फुतली अचाट । रजें अंबर कोंदलें ॥ ६१ ॥
भारें मेदिनी दाटली । वराहाची दाढ तडकली ।
फडा शेषाची दडपली । लवविली मान कूर्मे ॥ ६२ ॥
होतें सुरवरांचे चित्तीं । तें संपादिलें रघुपतीं ।
आनंदमय झाली वृत्ती । तेणें डुल्लती आनंदें ॥ ६३ ॥
रणीं विराजमान रघुपती । तेणें आनंदमय झाली वृत्ती ।
हनुमान येवोनि शीघ्रगती । जीवें रघुपती ओंवाळिला ॥ ६४ ॥
इटिमिटी घे बिभीषण । अंगदें केलें निबलोण ।
सुग्रीवें येवोनियां जाण । श्रीरामचरण वंदिले ॥ ६५ ॥
नळ नीळ जांबवंत । जुत्पती हरिखले समस्त ।
पर्वत घेवोनि झेलित । रावणघात करावया ॥ ६६ ॥
श्रीरामांचे क्रोधाविष्करण :
युद्धीं जिंकोनि परशुरामासी । रामें पाठवितां तपासी ।
क्रोध होता तयापासी । तो श्रीरामासीं अर्पिला ॥ ६७ ॥
श्रीराम शांतीचें कल्याण । त्यासीं क्रोध कैंचा जाण ।
परशुरामें अर्पिला आपण । तेणें रघुनंदन सक्रोध ॥ ६८ ॥
जमदग्नीच्या तपःसामर्थे । परशुरामाच्या पुरुषार्थे ।
अनुसरोनि श्रीरामातें । राक्षसनिधनातें खवळला ॥ ६९ ॥
तेणें क्रोधें रघुविर । दिसे जैसा काळग्निरुद्र ।
तैसा भासत भ्यासुर । दशवक्त्र निवतावया ॥ ७० ॥
रामरावणांचे अस्त्र युद्ध :
तैसाच रावण महावीर । क्रोधें खवळला दशवक्त्र ।
सिंहनादें गर्जे थोर । रहंवर प्रेरिला ॥ ७१ ॥
पाचारोनि श्रीरामासी । बाण वर्षला वेगेंसी ।
मेघीं आच्छादिलें पर्वतासी । तेंवी श्रीरामासी झांकिलें ॥ ७२ ॥
श्रीरामें करोनियां लाघव । बाणें बाण निवारिले सर्व ।
तेणें क्षोभोनि दशग्रीव । मानी अपूर्व लघुवेग । ॥ ७३ ॥
मग विचारिलें मानसीं । अहाच कळी न चले यासीं ।
मग समंत्र अस्त्रातें हातवसी । श्रीरामासी भिडवया ॥ ७४ ॥
अभिमंत्रोनि पन्नागास्त्र । रुक्मपुंख काढिले शर ।
संख्यारहित अनिवार । चापीं सत्वर सज्जिले ॥ ७५ ॥
तें सधान देखोनि दुरोनी । श्रीराम नेटका विंदानी ।
गरुडास्त्र योजिलें गुणीं । केली भंगाणी पन्नगांची ॥ ७६ ॥
निरसोनि पन्नगांचे भार । गरुडें गिळिले विखार ।
झडपूं लागला निशाचर । करीत संहार सैन्याचा ॥ ७७ ॥
राक्षसमुंडें धरणीहूनी । गरुड खुडोनि ने गगनीं ।
चकित झाला दशाननी । अभिनव करणी देखोनी ॥ ७८ ॥
अत्यंत क्षोभला लंकापती । अग्निशस्त्र काढिलें निगुतीं ।
अभिमंत्रोनि मंत्रोक्तीं । लाविलें सीतीं अति वेगें ॥ ७९ ॥
गुणीं ओढोनि कानाडी । बाण सोडितां झडाडी ।
डोळियां पडली झांपडी । अग्नि धडाडी देखिला ॥ ८० ॥
भडके उठले प्रबळ । ज्वाळीं व्यापिलें अंतराळ ।
गरुड जाळिले सकळ । अग्नि प्रबळ खवळला ॥ ८१ ॥
शिखा वाढल्या अलोलिक । जाळूं पाहती सत्यलोक ।
तें देखोनि रघुकुळटिळक । सत्वर देख सरसावला ॥ ८२ ॥
भडभडां जळती वानर । ते स्मरती श्रीरामचंद्र ।
सैन्य निमालें समग्र । अझूनि विचार तो कायी ॥ ८३ ॥
म्हणोनि खवळला रघुपती । कंकपत्री बाण निगुतीं ।
काढोनि लाविला सीतीं । मंत्रशक्तीसमवेत ॥ ८४ ॥
बाणीं योजिलें पर्जन्यासी । क्षणें विझविलें अग्नीसी ।
त्याहीमाजी युक्ति कैसी । वानरांसी उल्हास ॥ ८५ ॥
अमृतवृष्टि वानरां । तेचि राक्षसां वज्रधारा ।
श्रीराम लाघविया खरा । वानरभारा वांचविलें ॥ ८६ ॥
एकेचि संधानें रघुपती । नवल केली युद्धख्याती ।
एका मुक्ति एका विश्रांति । समान प्राप्ती अरिमित्रां ॥ ८७ ॥
पर्जन्यवृष्टि वज्रधारा । तेणें मोक्ष निशाचरां ।
तेचि अमृतवृष्टी वानरां । नवल रघुवीराचें करणे ॥ ८८ ॥
नाम स्मरतां रघुवीर । ताप निमाला समग्र ।
वानर विश्रांति बाह्यांतर । करीत भुभुःकार ऊठिले ॥ ८९ ॥
भुभु या शब्दाचा अर्थ । पुनः पुनः रघुनाथ ।
अनिमेषें जें स्मरत । ते नित्यमुक्त संसारीं ॥ ९० ॥
त्यांसी वर्तती देहगेहीं । संसारभय अणुमात्र नाहीं ।
सकळ विषयांच्या ठायीं । निर्विषय पाहीं विचरत ॥ ९१ ॥
हा वानरांचा निश्चय पूर्ण । म्हणोनियां रामस्मरण ।
अहर्निशीं करिता जाण । क्षण क्षण सावध ॥ ९२ ॥
येरीकडे रावणकटक । पर्जन्यें निमालें सकळिक ।
वज्रपाय थेंबुटा एकैक । लागतां देख निमतातई ॥ ९३ ॥
ऐसें बहुसाल सैन्य मरतां । अति चिंता लंकानाथा ।
जें तें शस्त्र जातें वृथा । श्रीरघुनाथा केंवी जिंको ॥ ९४ ॥
रावणाने वाय्वस्त्र सोडल्यावर मारुतीचे वायूला आव्हान :
अति वृष्टि व्हावया दूरी । रावण वाय्वस्त्र प्रेरी ।
हाक देवोनि दशशिरी । रणामाझारीं गर्जत ॥ ९५ ॥
मेहुडें उडालें तत्काळ । वायु सुटला प्रबळ ।
उडवित आला वानरदळ । गोळांगूळ त्रासिले ॥ ९६ ॥
दोहीं डोळां भरली धुळी । गात्रें कांपती चळचळीं ।
नेट न धरवे पायांतळीं । वानर अंतराळीं उडविले ॥ ९७ ॥
आवर्त सुटला भारी । वानर भ्रमती गगनांतरीं ।
तें देखोनि कपिकेसरी । कोपेंकरीं खवळला ॥ ९८ ॥
करोनि नामाचा भुभुःकार । पुढें होवोनि हनुमान वीर ।
पितृस्नेहें कळवळिला थोर । काय उत्तर बोलत ॥ ९९ ॥
वायु हनुमंताचा पिता । तेणें त्यासी तो म्हणे ताता ।
वैभव नेणतां रघुनाथा । निजघाता पावसी ॥ १०० ॥
श्रीरामें सोडोनियां बाण । उडविलें शून्याचें शून्यपण ।
तेथें तुम्हांसी वांचवी कोण । गमनागमनसंचार ॥ १ ॥
तूं आमुचा निजपिता । म्हणवोनि भीड रघुनाथा ।
नाहीं तरी करिता तुझ्या घाता । क्षणही तत्वतां लागेना ॥ २ ॥
ताता पूर्वसंकल्प तुझा । जे सेवेलागीं रघुराजा ।
युद्धीं भिडतां राक्षससमाजा । प्रतिकूळ सहजा मी त्यासीं ॥ ३ ॥
तें तूं नाठविसी जरी । श्रीरामाच्या बाणदारीं ।
तुझी होईल बोहरी । क्षणमाझारी प्रभंजना ॥ ४ ॥
वायुचे उपशमन व प्रतिक्रिया :
ऐकतां हनुमंताचें उत्तर । मंत्रदेवता वेगवत्तर ।
येवोनि नमिला रघुवीर । फिरली सत्वर रावणावरी ॥ ५ ॥
सोडून वानर सकळ । आकळिले राक्षसदळ ।
आवर्त सुटला सबळ । प्राणांत केवळ मांडला ॥ ६ ॥
वायुबळें सबळ प्राण । तो वायु क्षोभला आपण ।
आतां राक्षसां राखे कोण । दशानन सचिंत ॥ ७ ॥
उफराटें झालें कोडें । माझींचि शस्त्रें मजकडे ।
फिरोनियां वाडेंकोंडे । सैन्य निवाडें निवटीत ॥ ८ ॥
तें देखोनि श्रीरामासी । हांसों आलें निजउल्हासीं ।
अतर्क्य युक्ति हनुमंतासी । म्हणोनि पोटेंसीं धरियेला ॥ ९ ॥
रावणाचे आश्चर्य व पर्वतास्त्रप्रयोग :
येरीकडे वीर रावण । मरतां देखोनियां सैन्य ।
वायु निवारावया आपण । पर्वतास्त्र पूर्ण आड घाली ॥ ११० ॥
तेणें बुजोनि सांडिला वारा । सावध करितां निशाचरां ।
श्रीराम लाघविया खरा । योजिलें वज्रास्त्रा विनोदें ॥ ११ ॥
श्रीराम वज्रास्त्र आणि विषुचिका सोडतात :
सोडूनि विषूचिकास्त्र । त्यांत योजिले वज्रास्त्र ।
वज्रें पर्वत करोनि चूर । रणीं समग्र त्रासिले ॥ १२ ॥
विषूचिकेचें बळ दुर्धर । घोळसिला राक्षसभार ।
तरळा झालिया वेगवत्तर । वीरें वीर पडियेले ॥ १३ ॥
त्याचे परिणम :
हागी ओकी सुटली रणीं । वीर सरती दोहीं वदनीं ।
वस्त्रें घाणती पोहणीं । उठली घोंगाणी रणरंगी ॥ १४ ॥
एक गडबडां लोळती । एक डोळे वटारिती ।
एक हात पाय ताणिती । सकळ जुत्पती हांसती जेव्हां ॥ १५ ॥
हांसतसे बिभीषण । हांसतसे लक्ष्मण ।
हांसतसे वायुनंदन । नवल काय श्रीरामीं ॥ १६ ॥
हरिखल्या वानरकोडी । राम निजयोद्धा निजगडी ।
रणीं नाचविली रणधांदडी । राक्षसकोडी निवटिल्या ॥ १७ ॥
तेणें खळवळिला रावण । ते विषूचिका धांवोन ।
वेगीं आली ठाकून । दशानन जेथें होता ॥ १८ ॥
तेणें झाला वमनोद्गार । ताणताती वीसही नेत्र ।
वमनउसळीची धार । लागली थोर दशमुखा ॥ १९ ॥
विकळ होतां दशानन । वेगें स्मरला त्रिनयन ।
तेणें विषुचिका निरसोन । केलें सावधान रावणा ॥ १२० ॥
उभयतांचे झालेले अस्त्रयुद्ध :
सवेंचि खवळोनी दशशिर । एके वेळे शस्त्रसंभार ।
वर्षता झाला अपार । श्रीरघुवीर लक्षोनी ॥ २१ ॥
दंडास्त्र आणि खंडास्त्र । वितंडास्त्र आणि प्रचंडास्त्र ।
घातनास्त्र आणि पातनास्त्र । दशवस्त्र वर्षला ॥ २२ ॥
एके वेळे शस्त्रकल्लोळ । रणीं उठला हलकल्लोळ ।
खळबळिलें वानरदळ । प्रळयकाळ मांडला ॥ २३ ॥
शस्त्रें कडाडिलीं आकाशीं । अग्निज्वाळा ।
दशदिशीं । प्रळय मांडिला सकळांसी । अंतकासी आकांत ॥ २४ ॥
वानर पळती दशदिशा । एकाचा दाटला घसा ।
एकीं सांडियेला धिंवसा । रणीं लंकेशा देखोनी ॥ २५ ॥
घालिती येरयेरां मिठी । झोंबती हनुमंताचे कंठी ।
आम्हां सोडवी रणसंकटी । प्राण कंठी उरलासे ॥ २६ ॥
जरी प्रार्थू श्रीरामासी । तरी भीड न वचे आम्हांसी ।
प्रार्थोनियां राघवासी । अस्त्रघातासी निवारीं ॥ २७ ॥
ऐसें बोलोनि वानरवीर । भयातुर झाले समग्र ।
मिळोनि जुत्पती थोर थोर । देती धीर कपींसी ॥ २८ ॥
तें देखोनि रघुनाथ । क्रोधें झाला पैं कृतांत ।
निवारावया अस्रघात । लाघव करित तें ऐका ॥ २९ ॥
संधानामाजी संधान । करिता झाला रघुनंदन ।
अस्त्रें अस्त्र निवारुन । धनुष्य जाण छेदिलें ॥ १३० ॥
अदंडें दंडिलें दंडासी । अखंडें खंडिलें खंडासी ।
संजीवनें घातनासी । अस्त्रें अस्त्रासी दंडिलें ॥ ३१ ॥
रावणशस्त्रें अति अवघड । वितंडास्त्र आणि प्रचंड ।
त्यावरी घातलें अकांडकांड । केले खंडविखंड पैं तेणें ॥ ३२ ॥
राम रावणाची धनुष्ये तोडतात :
राम धनुर्वाडा विचक्षण । दारुणास्त्रें निवारुन ।
रावणाचे धनुष्य जाण । न लागतां क्षण छेदिलें ॥ ३३ ॥
अद्वैत साधोनि विंदान । पातनासी केलें पतन ।
पतनी पडावया जाण । रितें गगन असेना ॥ ३४ ॥
तेणें तळमळी रावण । वृथा गेलें अस्त्रसंधान ।
हातींचें छेदिलें धनुष्यबान । राम दारुण रणयोद्धा ॥ ३५ ॥
रागें दोनी हात चुरी । आणिक धनुष्य दिधलें करी ।
तें छेदिलें झडकरीं । बाणधारीं श्रीरामें ॥ ३६ ॥
आणीक धनुष्य आणवित । तेंही छेदी श्रीरघुनाथ ।
संख्या झाली शतें शत । धनुष्यें समस्त वेंचिली ॥ ३७ ॥
तेणें तळमळी दशाननी । वायां गेली उग्र करणी ।
शंख करी दशवदनीं । राम रणीं नाटोपे ॥ ३८ ॥
हरिखेला वानरभार । अवघे करिती भुभूःकार ।
स्वर्गी मिळोनी सुरवर । जयजयकार करिताती ॥ ३९ ॥
दुष्ट दुराचारी रावण । श्रीराम रणयोद्धा दारुण ।
अप्रतिम मल्ल दोघे जण । दोघे विचक्षण रणरंगी ॥ १४० ॥
त्यांचें पहावया रण । यक्ष गंधर्व सिद्ध चारण ।
स्वर्गी मिळाले सुरगण । पुष्पवृष्टी जाण तिहीं केली ॥ ४१ ॥
वानर नाचती पैं रणीं । उडती उलट्या किराणीं ।
श्रीराम विजयी रणांगणीं । दशवदनी निवटिला ॥ ४२ ॥
अवघे करिती जयजयकार । नामें गर्जती वानर ।
तेणें दुखावला दशशिर । लाज थोर पैं झाली ॥ ४३ ॥
रावण गुरुदत्त परिघाचा प्रयोग करितो :
दांत करकरां खात । रागें दोनी हात दुरित ।
परिग घेतला गुरुदत्त । लक्षून रघुनाथ हाणावया ॥ ४४ ॥
तंव गुरुचाही निजगुरु । राम परात्पर सद्गुरु ।
तयावरी शस्त्रसंहारु । मूर्ख दशशिर करुं पाहे ॥ ४५ ॥
तरी नीतीची नीति रघुनंदन । राम शास्त्रीं शास्त्रार्थ पूर्ण ।
गुरुनाम ऐकतां जाण । शस्त्रप्रहार आपण आवरिला ॥ ४६ ॥
जगद्गुरु जनीं जनार्दन । व्यापक गुरुनामें म्हणेन ।
तें ऐकतां रघुनंदन । अवज्ञा हेळण न करीचि ॥ ४७ ॥
जेथें गुरुआज्ञापरिपाळण । तेथें सर्वदा विजय पूर्ण ।
गुरु संरक्षिता आपण । निजगणा विघ्न शिवों नेदी ॥ ४८ ॥
देवादिकांना चिंता : परिघ सोडितां रावण । कडाडिलें त्रिभुवन ।
आकांतले सुरगण । विमानें तुटोन पडों पाहती ॥ ४९ ॥
उमा शंकरातें आकळी । दिग्गजांची बैसलीं टाळीं ।
प्रळयकाळा दांतखिळी । झांपडी पडली सुरसिद्धां ॥ १५० ॥
इतुकें देखोनि विंदान । उगाच पाहतो रघुनंदन ।
गुरुअवज्ञा न करीच जाण । शस्त्रें दारुण असतांही ॥ ५१ ॥
परिघ येवोनि तत्वतां । ओवाळोनि रघुनाथा ।
ध्वजीं आदळोनि अवचितां । पडिला खालता आज्ञाबळें ॥ ५२ ॥
परिघ ज्ञाता संपूर्ण । उभयआज्ञा संरक्षण ।
इंद्राचा ध्वज छेदून । तळीं आपण पडियेला ॥ ५३ ॥
तंव झाला हाहाकार । खळबळिला वानरभार ।
सुरवरां आकांत थोर । चिंतातुर सहस्राक्ष॥ ५४ ॥
सकळीं संतोष मानिला होता । राग निवटील लंकानाथा ।
बंदिमोचन समस्तां । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥ ५५ ॥
तें झालें वाताहत । परिघ पातला कंदन करित ।
केंवी वांचेल रघुनाथ । थोर आकांत सकळिकां ॥ ५६ ॥
ध्वज तोडोनियां तरी । परिघ परतो हा झडकरी ।
श्रीराम वांचे जीवें जरी । तरी मारील रावणा ॥ ५७ ॥
श्रीराम रणदिवाकर । रणीं उगवतां प्रकाशकर ।
रावणराहु वेगवत्तर । येवोनि सत्वर गिळियेला ॥ ५८ ॥
आमची पुण्यसामग्री जितकी । श्रीरामा पावों असकी ।
राम पडिला रावणमुखीं । तो एकाएकीं सुतावा ॥ ५९ ॥
ऐसे झाले चिंतातुर । तंव परिघें वेगवत्तर ।
नमियेला श्रीरामचंद्र । अस्त्रा अस्त्र श्रीराम ॥ १६० ॥
राम शस्त्रास्त्रांचें निज । राम मंत्रांचें निजबीज ।
राम वीराधिराज । राम सहज परब्रह्म ॥ ६१ ॥
परिघाचे श्रीरामांस नमन :
राम चैतन्याची मूर्ती । राम शस्त्राची मारक शक्ती ।
तो राम असतां रथीं । रावण तें किती बापुडें ॥ ६२ ॥
परी कृपाळु भक्तजना । खेळवीतसे रावणा ।
हावभरी जाणा । दशवदना निवटील ॥ ६३ ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामरथींचा ध्वज जाण ।
वेगें छेदोनि रावण । करीत गर्जन ऊठिला ॥ १६४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रघुनाथध्वजच्छेदनं नाम षष्टितमोऽध्यायः ॥ ६० ॥
ओंव्या ॥ १६४ ॥ श्लोक ॥ ६ ॥ एवं ॥ १७० ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय साठावा