संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा

जानकीचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांचा सर्वत्र जयजयकार :

बिभीषण राज्यधर । देखोनि वानर निशाचर ।
अवघीं केला जयजयकार । नामें अपार गर्जती ॥ १ ॥
नामें कोंदलें पाताळ । नामें व्यापिलें जगतीतळ ।
नामें कोंदलें नभोमंडळ । ब्रह्मांडगोळ व्यापिला ॥ २ ॥
नामें गर्जती माकडें । वर्णिती रामाचे पवाडे ।
नाचती प्रेमें वाडेंकोडें । बिभीषणापुढें अति प्रीतीं ॥ ३ ॥
श्रीराम दत्त तेजाकार । रावणमुकुट परिकर ।
आणोनि बाणें सुग्रीव वीर । धरिलें छत्र रामदत्त ॥ ४ ॥
तेणें शोभा अत्यद्‍भुत । बिभीषण राज्यमंडित ।
ते देखोनि सुर समस्त । सुमनें वर्षत अति प्रीतीं ॥ ५ ॥
करोनियां जयजयकार । नामें गर्जती सुरवर ।
नभीं सिद्धांचा जयजयकार । रामचरित्र अनुपंअ ॥ ६ ॥

राजा बिभीषण सर्वांसह श्रीरामवंदनासाठीं निघाला :

हनुमंतादि सुग्रीव वीर । सकळ वानरांचा भार ।
बिभीषण राज्यधर । निशाचर समवेत ॥ ७ ॥
श्रीरामनामालागीं जाणा । परम आल्हाद बिभीषणा ।
वानरराक्षसांची सेना । समीप घेउनि वंदना चालिला ॥ ८ ॥
ध्वजपताकामंडित । मत्तगज अश्वरथ ।
वीर चालिले असंख्यात । अति हरिखत रामनमना ॥ ९ ॥
गजस्कंधी बिभीषणा । पाठीसीं सखा सौ‍मित्र जाण ।
हनुमान अति विचक्षण । दोहीं नाहीं सैन्य सज्जिलें ॥ १० ॥
यथाक्रमें परिकर । दोहीं भागीं विचित्र ।
दक्षिणांगीं सुग्रीव वीर । अति मनोहर वेत्रपाणि ॥ ११ ॥
वामांगी चालत हनुमंत । जो श्रीरामाचा आप्त ।
श्रीरामाआज्ञा तेथ । पुढें चालत जुत्पती ॥ १२ ॥
वाद्यें विचित्र अति गजरीं । भोंगळा काहळा निशाण भेरी ।
विराणीं वाजती अति कुसरीं । ध्वनीं विचित्र त्यांमाजी ॥ १३ ॥
वाद्यांचा नाद गंभीर । भाट गर्जती अपार ।
अवघे करिती जयजयकार । आले रघुवीरवंदना ॥ १४ ॥
राज्याभिषिक्त बिभीषण । देखोनियां रघुनंदन ।
आनंद उथळला पूर्ण । तेणें त्रिभुवन कोंदलें ॥ १५ ॥

लक्ष्मणाने बिभीषणाला श्रीरामांच्या चरणांवर घातले :

हातीं धरोनि बिभीषण । पुढें झाला सुमित्रानंदन ।
श्रीरामचरणा वंदन । करवी आपण अत्यादरें ॥ १६ ॥

स तान्गृहीत्वा दुर्धर्षो राघवाय न्यवेदयत् ।
मांगल्यं मंगलं सर्वं लक्ष्मणाय च वीर्यवान् ॥१॥
कृतकार्यं समृद्धार्थं दृष्ट्वा रामो बिभीषणम् ।
यावच्चंद्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी ॥२॥
यावद्रामकथा लोके तावद्राज्यं बिभीषणे ।
प्रतिजग्राह तत्सर्वं तस्यैव प्रियकाम्यया ॥३॥
उवाचेदं वचो रामो हनूमंतं प्लवंगमम् ।
अनुज्ञाप्य महाराजमिमं स्ॐय बिभीषणम् ॥४॥
प्रविश्य नगरीं लंकां कुशलं ब्रूहि मैथिलीम् ॥५॥

आनंदित होऊन श्रीरामांनी बिभीषणाला आशीर्वाद दिला :

जैसें श्रीरामाचें मनोगत । तैसें सुमंगल वेदोक्त ।
देखोनियां रघुनाथ । आनंदभरित पैं देखा ॥ १७ ॥
अति दुर्धर रावण । क्षणें निवटोनियां जाण ।
अभिषेकिला बिभीषण । श्रीरघुनंदन सुखमय ॥ १८ ॥
राज्यलंकृत बिभीषण । देखोनियां रघुनंदन ।
अति आल्हाद पावोन । आशीर्वचन पैं देत ॥ १९ ॥
विपायें ऐसें घडों शके । जैं भानूतें तम जिंके ।
तरी बिभीषणा निकें । अक्षयी सुखें राज्य भोगीं ॥ २० ॥
चंद्र संतप्त होय आगीं । अथवा प्रळय जावो भंगीं ।
तथापि बिभीषणा जगीं । अभंग भोगीं निजराज्य ॥ २१ ॥
बैसका सांडी कुळाचळा । पृथ्वी जाय रसातळा ।
तरी जो श्रीरामें स्थापिला । तो अक्षयी झाला बिभीषण ॥ २२ ॥
जंववरी श्रीरामकीर्ती । शाश्वत आहे त्रिजगतीं ।
तंववरी सुखसंवित्ती । अक्षयस्थितीं राज्य करीं ॥ २३ ॥
जंववरी श्रीरामनामकीर्ती । जंववरी श्रीरामभक्ती ।
जंववरी श्रीरामाची ख्याती । तंव राज्यस्थिती बिभीषणा ॥ २४ ॥

बिभीषणाला लंकेत नेऊन ही वार्ता जानकीला सांगण्यास रामांनी मारुतीला सांगितले :

ऐसे देवोनि आशीर्वचना । सवेंचि सांगे वायुनंदना ।
हनुमंता सर्वज्ञा । लंकाभुवना नेईं यासी ॥ २५ ॥
सप्राकार सतोरण । अति मंडित लंकाभुवन ।
महोत्सवें वायुनंदन । राजा बिभीषण प्रवेशवीं ॥ २६ ॥
निर्दळूनि रावणासी । अभिषेकिलें बिभीषणासीं ।
गुढी उभवोनि जानकीसी । हे वार्ता तिसी सांगावी ॥ २७ ॥
ऐकोनियां श्रीरामाज्ञा । उल्लास वायुनंदना ।
मस्तकीं वंदोनियां वचना । घाव निशाणा घातला ॥ २८ ॥

सर्वानी वाजतगाजत बिभीषणाला लंकेत नेला :

नळनीळादि जुत्पती । सुग्रीव राजा वानरपती ।
अंगदेंसहित मारुती । अति प्रीतीं निघाला ॥ २९ ॥
वाद्यें लागलीं विचित्रें । ध्वनि उठला अति गजरें ।
हरिखें नाचती वानरें । माथां पुच्छाग्रें उभवोनी ॥ ३० ॥
उपायनें बळिदानें । राक्षस आणिती सन्मानें ।
प्रीतीं घालिती लोटांगणें । बिभीषण संतुष्टे ॥ ३१ ॥
सुरासुरीं यथेष्ट । वानर हावोनियां भाट ।
श्रीरामगुण उद्‌भट । कीर्ति अचाट वर्णिती ॥ ३२ ॥
अति गजरें राज्यमंडित । चौघे प्रधान समवेत ।
वानरमांदी अपरिमित । लंकेआंत प्रवेशले ॥ ३३ ॥

लंकेत गेल्यावर मारुतीसह बिभीषण सीतेला नमन करण्यास जातो :

प्रवेशोन लंकाभुवन । बिभीषण अति विचक्षण ।
रामांगनेलागीं नमन । करावया आपण चालिला ॥ ३४ ॥
प्रवेशोनि अशोकवनीं । देखोनियां जनकनंदिनी ।
नमन करावयालागूनी । सकळां मनीं उत्साहो ॥ ३५ ॥
पुढें देखोनि जानकीसी । सुख दाटलें हनुमंतासी ।
लोटांगण अति प्रीतीसीं । घालोनि चरणांसीं लागला ॥ ३६ ॥

मारुतीला पाहून जानकीला परमानंद , परस्परांचे दृढलिंगन :

देखोनियां हनुमंतासी । अति आल्हाद जानकीसी ।
उचलोनि अति प्रीतीसीं । सर्वभावें आलिंगिला ॥ ३७ ॥
महार्णवांतून बाळक । सुटोनियां एकाएक ।
मातेंसीं भेटतां आवश्य्क । सप्रेम देख आलिंगी ॥ ३८ ॥
तेंवी पुत्रस्नेहें हनुमंता । आलिंगितां जनकदुहिता ।
आनंद दाटला चित्ता । सप्रेमता सद्‌गदित ॥ ३९ ॥
श्रीरामभक्ति सुखापुढें । पुत्रस्नेह तें बापुडें ।
जानकिया प्रेमपाडें । निजनिवाडें आलिंगिला ॥ ४० ॥
प्रेमाश्रूकरोनि जाण । हनुमंतासी अभिषिंचन ।
जानकियें करोनि पूर्ण । अमृतहस्तेंकरोनी कुरवाळी ॥ ४१ ॥

जानकीला हनुमंताचे प्रांजळ निवेदन :

वंदोनियां चरण । दोन्ही करसंपुट जोडून ।
विनविता झाला आपण । प्रीती करुन हनुमंत ॥ ४२ ॥
निर्दाळावया रावण । श्रीरामा आला शरण ।
श्रीरामभजनार्थ जाण । केलें निर्दळण स्वकुळाचें ॥ ४३ ॥
अति गूढ मारका युक्ती । सांगोनियां श्रीरामाप्रती ।
मारविला लंकापती । विजयी रघुपती जेणें केला ॥ ४४ ॥
तो हा राजा बिभीषण । श्रीरामें अभिषेकून आपण ।
तुज करावया नमन । प्रीती करोन पाठविला ॥ ४५ ॥
या बिभीषणाचे संगतीं । विजयी तुझा श्रीरघुपती ।
अक्षयी विजयस्थिती । ऊर्मिलापती जाण माते ॥ ४६ ॥
विजयी सुग्रीव कपिराजा । विजयी अंगद युवराजा ।
विजयी सेनापति वोजा । विजयी रघुराजा याचेनि ॥ ४७ ॥
नळनीळादि जांबवंत । वानरवीर विख्यात ।
रणयोद्धे रणोन्मत्त । विजयी समस्त याचेनी ॥ ४८ ॥
ऐसें बोलोनि हनुमंत जाण । हाती धरोनि बिभीषण ।
नमस्कारिले श्रीचरण । प्रीतीं करोन जानकीचे॥ ४९ ॥

जानकीकडून बिभीषणाला प्रेमाश्रूंचे सिंचन,
नंतर सर्व वानरवीरांचे जानकीला नमन :

येरी उचलोनि त्वरित । प्रीतीं मस्तक अवघ्राणित ।
प्रेमाश्रुसिंचने तेथ । अभिषेकित बिभीषण ॥ ५० ॥
तैसाचि सुग्रीवराजा जाण । हनुमान भेटवी आपण ।
येरी प्रीती उठवोन । केलें अवघ्राण मस्तकीं ॥ ५१ ॥
तंव अंगद पुढें झाला । तोही प्रीतीनें आश्वासिला ।
नीळें नमस्कार केला । कुरवाळिल अमृतहस्तीं ॥ ५२ ॥
तंव पुढें झाला जांबवंत । सुषेण दधिमुख तेथ ।
जानकीतें नमस्कारित । अति विनीत रामप्रेमें ॥ ५३ ॥
येरी निजकृपा अवलोकन । सकळां देवोन समाधान ।
हनुमंतासी आज्ञापन । केलें आपण जानकियें ॥ ५४ ॥

प्रथम बिभीषणाला लंकाभुवनात नेण्याची हनुमंताला सीतेची आज्ञा :

श्रीरामें अभिषेकिला । निजराज्य हा पावला ।
अनुग्रहें विराजला । निजभुवना वहिला प्रवेशवी ॥ ५५ ॥
लाहोनियां आज्ञापन । हनुमान अत्यंत सज्ञान ।
बिभीषण आपण । राज्यभुवन प्रवेशविलें ॥ ५६ ॥
सिंहासनादि सकळ भोग । श्रीरामकृपा अव्यंग ।
बिभीषण पावला सांग । सुख अभंग उथळलें ॥ ५७ ॥
सर्वथा जें दुष्प्राप्य राज्य । तें श्रीरामकृपा निज ।
बिभीषण पावोनि सहज । नाचत भोज आनंदें ॥ ५८ ॥
दुकाळिया जेवी मिष्टान्न । अवर्षणीं वर्षे घन ।
सुकतया अंकुरा जाण । होय संपूर्ण अमृतवृष्टी ॥ ५९ ॥
गतायुषा जोडे आयुष्य । रंका इंद्रपद सावकाश ।
तैसें जालें बिभीषणास । श्रीरामास विनटतां ॥ ६० ॥

वानरप्रमुखांनी सीतेला नेण्याविषयी मारुतीला सांगितला,
परंतु राजाज्ञा नसल्यामुळे त्याचा नकार :

येरीकडे मारुती । विनविते जाले कपिपती ।
झाली सकळ कार्याची स्थिती । सीता सती नेवों आतां ॥ ६१ ॥
ऐकोनि तयांचें वचन । हनुमान नेदी प्रतिवचन ।
तेणें खवळले कपिगण । कोल्हाळ संपूर्ण आदरिला ॥ ६२ ॥
सकळ भोग आदिकरोनी । राजोपचार देवोनि पाणी ।
पादत्राणही सांडूनी । एकली वनीं प्रवेशली ॥ ६३ ॥
श्रीरामसेवलागीं देखा । सांडणें केलें शरीरसुखा ।
ते जानकी सत्वर देखा । रघुकुळटिळका भेटवावी ॥ ६४ ॥
आम्हीं विनवितां सकळ जन । तूं न देसी प्रतिवचन ।
काय तुझें आहे मनोज्ञ । तें संपूर्ण चिन्ह लक्षेना ॥ ६५ ॥
तंव भावार्थाचा मेरु । जो आज्ञेचा किंकरु ।
श्रीरामहृत्कमलमधुकरु । हनुमान वीरु विनवित ॥ ६६ ॥
स्वमुखें श्रीरघुनाथ । बोलिला नाहीं इत्थंभूत ।
अथवा नाहीं संकेत । ते जानकी तेथें आणावी ॥ ६७ ॥
याकरितां माझे चित्त । जालें अतिशये भ्रमित ।
कांही योजेना निश्चितार्थ । राहिलों निवांत म्हणवोनी ॥ ६८ ॥
नकलतां या अर्थासी । म्यां काय सांगावें तुम्हांसी ।
म्हणोनि निवांत मानसीं । तंव तुम्हांसी क्षोभ आला ॥ ६९ ॥

हे ऐकून जांबुवंत पुढे होऊन रामाची मूकसंमती असल्याचे सांगतो :

याकरितां ऐकोनि वचनार्थ । पुढें जाला जांबवंत ।
लक्षोनियां हनुमंत । स्वयें बोलत आवेशें ॥ ७० ॥
हनुमंता सकळाविखीं । तुज व्युत्पत्ति आहे निकी ।
स्त्रीपुरुषांची उखीविखी । अनोळखी ते तुज ॥ ७१ ॥
स्वमुखें श्रीरघुपती । केंवी सांगे तुम्हांप्रती ।
मज भेटवावी सीतासती । म्हणोनि काकुळती तंव नये ॥ ७२ ॥
आपुलेठायीं आपण । विचार करावा पूर्ण ।
जानकीलागीं रघुनंदन । तनुसंकीर्ण पैं झाला ॥ ७३ ॥
जीलागीम् वधिला विराधू । खर दूषण त्रिशिरा बंधू ।
त्यांचा क्षणें केला वधू । तो निजवधू केंवी सांडी ॥ ७४ ॥
जीलागीं मारीचासी । चर्म काढिलें कंचुकीसी ।
जिचेनि उद्धार जटायूसी । त्या जानकीसी केंवी सांडी ॥ ७५ ॥
जीलागीं वनोवन । हिंडता झाला रघुनंदन ।
तीतें सांडील आपण । सर्वथा जाण हें न घडे ॥ ७६ ॥
वाळी वधोनियां देखा । सुग्रीव जीलागीं केला सखा ।
ते जानकीतें देखा रघुकुळटिळकातें न सांडवे ॥ ७७ ॥
तुम्ही आम्ही सकळ वानर । जिचेनि व्याजें श्रीरामकिंकर ।
ते सीता सती सुंदर । श्रीरघुवीर केंवी सांडी ॥ ७८ ॥
जिचेनि शुद्धीसी रघुपती । तुंतें पाथविलें मारुती ।
शोधितां लंका पालथी । केली निश्चिती जीलागीं ॥ ७९ ॥
जीलागीं सागर गांजिला । शिळासेतु बांधिला ।
लंकेचा निरोध केला । रावण वधिला जीलागीं ॥ ८० ॥
जिचेनि सुर तहतीस कोडी । त्यांची सुटली बांधवडी ।
निजराज्याची उभवोनि गुढी । स्थापिला निरवडी बिभीषण ॥ ८१ ॥

सीता – रामाची ताबडतोब भेट करावी :

ते सती जनकदुहिता । सांडणे नघडे सर्वथा ।
सावध होई हनुमंता । भेटवीं सीता श्रीरामा ॥ ८२ ॥
आमचें सेवेचें पैं देख । हेंचि फळ अलौकिक ।
दोघां करावया मेळ एक । विचार आणिक असेना ॥ ८३ ॥
तिये वेळे निश्चित । स्वयें बोलिला श्रीरघुनाथ ।
जानकीये सांगावें हर्षित । जें लंकानाथ निवटिला ॥ ८४ ॥
याचे पोटीं ध्वनित । बोलोनि गेला रघुनाथ ।
सकळ झाला कार्यार्थ । भेटवा निश्चित जानकी ॥ ८५ ॥
हा अर्थ न कळे पैं तुज । स्वयें झालासि निर्बुज ।
भेटावया रघुराज । जनकात्मजा चालों द्या ॥ ८६ ॥
ऐकोनियां ते वचन । हनुमान घाली लोटांगण ।
तुम्हांहूनि अधिक ज्ञान । सर्वथा जाण मज नाहीं ॥ ८७ ॥
बहुतांच्या मनासी आलें । तें मज सर्वथा मानलें ।
उचित पाहिजे केलें । तेंचि वहिलें करावें ॥ ८८ ॥
हनुमंताचेनि वचनें । हरिखलीं वानरगणें ।
देत नामांची किराणें । रामांगने नेवो पाहती ॥ ८९ ॥

विज्ञापयति वैदेहीं सुग्रीवोऽथ प्रणम्य च ।
द्रष्टुमिच्छति भर्ता त्वां रामो धर्मभृतां वरः ॥६॥
सुस्नातालंकृतामेव संयुक्तां प्रतिकर्मणा ॥७॥

बीभीषणादि सर्वजण सीतेला वंदन करुन तिला रावण ठार झाल्याचे सांगतात :

सकळ वानरांचा वर । किष्किंधेचा राज्यधर ।
पुढें होवोनि सुग्रीव वीर । नमन सत्वर पैं केलें ॥ ९० ॥
अति विनति अत्यंत प्रीती । लोटांगणीं पुढतपुढती ।
अति मधुर वचनोक्ती । जानकीप्रती विनवित ॥ ९१ ॥
ऐकें जानकिये माते । श्रीरामवियोगें व्रतस्थें ।
जाळूनि सांडिलें देहभावातें । श्रीरामातें आठवितां ॥ ९२ ॥
त्यजिलें अन्न जीवन । त्यजिलें फळभोजन ।
त्यजिले भोग गहन । श्रीरघुनंदनवियोगें ॥ ९३ ॥
त्यजिले वस्त्रालंकार । त्यजिले अभ्यंगपरिकर ।
माथां वळला जटाभार । वल्कलांबरपरिधान ॥ ९४ ॥
रुधिर शोषलें समस्त । मांस आटलें जेथींचें तेथ ।
चर्म झालें अस्थिगत । श्रीरघुनाथवियोगें ॥ ९५ ॥
ऐसी उग्र तपश्चर्या । अतिअटक सुरवर्या ।
तेणें तेजें रघुवर्या । संताप सबाह्य झाला असे ॥ ९६ ॥
जानकीवियोगविरहें पूर्ण संतप्त रघुनंदन । करोनियां सेतुबंधन ।
वीर रावण निर्दाळिला ॥ ९७ ॥

सीताभेटीशिवाय रामांची शांती नाही :

राक्षस कुळनिर्दळण । तुजलागीं केलें जाण ।
लंके राजा बिभीषण । झाला संपूर्ण तुझेनि धर्मे ॥ ९८ ॥
अति दुर्जय त्रिजगतीं । विस्तारली श्रीरामकीर्ती ।
तथापि श्रीरामविश्रांती । नपवे निश्चितीं तुजवीण ॥ ९९ ॥
बिभीषण राज्यधर । प्रवेशला लंकापुर ।
श्रीरामें आज्ञोत्तर । तुज सत्वर पाठविलें ॥ १०० ॥
माझे वियोगें गांगली । सीता अत्यंत कष्टली ।
अस्थिमात्र असे उरली । वेडी झाली मजलागीं ॥ १ ॥
म्हणवोनियां तुजपासीं । वेगें पाठविलें आम्हांसी ।
बिभीषण स्थापावा लंकेसी । आणि जानकीसी आणावें ॥ २ ॥

सालंकृत होऊन श्रीरामदर्शनास सत्वर निघावे :

वंदोनि श्रीरामाज्ञापन । विलंब न करावा आपण ।
वेंगीं घ्यावें रामदर्शन । म्हणोनि चरणां लागला ॥ ३ ॥
करावीं अभ्यंगमार्जनें । दिव्यवस्त्रें परिधानें ।
विचित्र अलंकारभरणे । सुमनचंदनें अंगीकारीं॥ ४ ॥
स्वामीचिया दर्शनासी । मलिन वेषें केंवी जासी ।
अंगीकारावें विनंतीसी । म्हणोनि चराणांसी लागला ॥ ५ ॥

श्रीरामदर्शनाशिवाय तैलाभ्यंजनादि गोष्टीला सीतेचा नकार :

ऐकोनि त्याच्या वचनासी । हांसूं आलें जानकीसी ।
जवळी असोन अहर्निशीं । रामभजनासी अनोळख ॥ ६ ॥
श्रीरामेंविण जें अन्न । तें केवळ विष्ठाभोजन ।
तांबूल तें रुधिरपान । साचार जाण सुग्रीवा ॥ ७ ॥
श्रीरामावीण उदकपान । तें मरणप्रद विष दारुण ।
जीवन त्यातें म्हणे कोण । सत्य जाण सुग्रीवा ॥ ८ ॥
श्रीरामवासावाचून । इतर वास परिधान ।
तेणें व्यभिचार घडला पूर्ण । व्यभिचारिणी ते नारी ॥ ९ ॥
श्रीरामतेजाहून इतर । अलंकार जे रत्‍नाकार ।
शरीरीं केवळ तो भार । खदिरांगार तैसे ते ॥ ११० ॥
सुमनमाळा परिकर । ते माळा नव्हती सूचिकाग्र ।
अभ्यंग चंदन परिकर । ते लेप साचार विष्ठेचे ॥ ११ ॥
ऐसें बोलतां जानकीसी । स्वेदाश्रु रोमांच सर्वांगासी ।
जानकीची निष्ठा कैसी । देहांत भोगासीं आतळतां ॥ १२ ॥
इतर जे रामसेवक । श्रीराम भजनीं अति दक्ष ।
जानकी त्यांचा आचार्य देख । निष्ठा अलोलिक दाखविली ॥ १३ ॥

सीतेची रामांवरची अतूट निष्ठा पाहून सर्वांनीं तिला लोटांगण घातले :

देखोनि तिच्या निश्चयार्था । आनंद सकळांचियां चित्ता ।
लोटांगणीं सादरता । चरणीं माथा ठेविला ॥ १४ ॥
श्रीराममहिमा अगाध । तैसीच जानकी अगाधबोध ।
निष्ठा अति विशुद्ध । सामर्थ्य शुद्ध जानकीचें ॥ १५ ॥
ऐसें करोनियां स्तवन । विनविते झाले सकळही जन ।
जैसें तुझें मनोज्ञ । तैसें निर्गमन करी माते ॥ १६ ॥
कायसी आमची युक्ती । जे विनंती करुं तुजप्रती ।
जैसी तुझी मनोवृत्ती । तैसिये स्थिती भेट रामा ॥ १७ ॥

पालखीतून रामदर्शनार्थ सीतेने यावे अशी
बिभीषणाची विनंती ऐकून त्याला सीतेचे समर्पक उत्तर :

म्हणोनि राहिलों निवांत । तंव बिभीषण शरणागत ।
शिबिकेसहित आला तेथ । आरोहण तेथे करीं माते ॥ १८ ॥
देखोनि त्याच्या आदरासी । जानकी बोले प्रतीतीसी ।
तूं जाणता भजनधर्मांसीं । व्रत पाहसी तूं माझें ॥ १९ ॥
पारखा पायीं राम सांपडे । तरी साधक कां शिणती बापुडे ।
ऐसें सर्वथा नघडे । जें राम सांपडे परके पायीं ॥ १२० ॥
प्रवहणावरी यात्रा करित । यात्रा श्रेय तें पैं नेत ।
कर्ता लटिकाची वल्गत । अभिमान वसत लौकिकीं ॥ २१ ॥
श्रीरामाची निजप्राप्ती । प्रवहणाची नलगे गती ।
परपायीं रघुपती । न भेटे निश्चिती कोणाही ॥ २२ ॥
पुढिलाचेनि भोजनें । तृप्ति नपवे निजप्राणें ।
तेंवी जाण परचरणें । रघुनंदन भेटेना ॥ २३ ॥
श्रीरामाची अंतरस्थिती । तो केंवी गावे प्रवहणगती ।
म्हणोनियां मुनिपंक्ती । नातळती यानासीं ॥ २४ ॥

असे बोलून सीता पायीच निघाली :

ऐसें बोलोनियां सती । मस्तकांजली विनय वृत्ती ।
उठोनियां अति प्रीती । सहजस्थिती चालिली ॥ २५ ॥
पदसंचाराच्याठायीं । धरे सबाह्य राम पाहीं ।
देखोनियां लवलाहीं । देह देहीं नाठवे ॥ २६ ॥
जेंवी वायूचें चळण । सर्वत्र विचरे गगन ।
परी अंशही नव्हे मिन्न । गगनीं गनन होऊन राहे ॥ २७ ॥
जानकीच्या पाउलाची मोहर । लघुत्वें अति अरुवार ।
शून्यत्व सांडोनि साचार । पदसंचार श्रीरामें ॥ २८ ॥
अति अरुवार हंसगती । सवें हरिगणांची संपत्ती ।
शीघ्र आली सुवेळेप्रती । निकटवर्ती श्रीरामा ॥ २९ ॥

श्रीरामदर्शनानें जानकीची झालेली भावावस्था :

देखोनियां श्रीरामचरण । आलें जानकींसीं स्फुरण ।
वेळोवेळां बाहुस्फुरण । रोमांची पूर्ण उभविली गुढी ॥ १३० ॥
अंतरी सुखोर्मी दाटली । ते बाह्य चिद्रत्‍नें प्रकट झाली ।
अंगींची कांचोळी उतटली । पताकीं वहिली मंडित ॥ ३१ ॥
जेंवी सूर्योदयीं कमळिणी । त्यजोनियां संकोच रजनी ।
अति संतोष विकासनी । दिनमणी देखोनियां ॥ ३२ ॥
तेंवी सूर्यवंशदिनमणी । अद्वयाब्जविकासिनी ।
श्रीराम देखोनियां नयनीं । जनकनंदिनी विकासत ॥ ३३ ॥
सुप्रसन्न मुखकमळ । मुखचंद्र अति निर्मळ ।
टवटवीत तनु सोज्वळ । जनकबाळ सतेज ॥ ३४ ॥
होतां सूर्याकांतीं वैश्वानर । भासे सकळां गोचर ।
पचनवेव्हार संपादी ॥ ३५ ॥
तेंवी देखतां रघुत्तम । जानकीची शोभा परम ।
भासे अति मनोरम । विश्रामधाम जगाचें ॥ ३६ ॥
पुढें देखोनि राघव । अति आवेशें भरला जीव ।
समर्पीन सर्व भाव । म्हणोनि हाव उथळली ॥ ३७ ॥
म्हणे भाग्य आलें फळा । षण्मासांचा वियोग गेला ।
नमावया घनसांवळा । जनकबाळा अभिमानली ॥ ३८ ॥

सीता समोर येताच रामांनी दुरसीकडे तोंड फिरवले. त्यामुळे सीता दुःखी :

संमुख घालितां लोटांगण । न पाहेचि रघुनंदन ।
पूर्व सांडूनि अपूर्व जाण । करी वदन पश्चिमेकडे ॥ ३९ ॥
उठोनि पाहे रामवदन । संमुख न दिसे रघुनंदन ।
स्वयें दक्षिणेकडे होऊन । केलें नमन श्रीरामा ॥ १४० ॥
वाम सव्य दश दिशे । नमन करितां आवेशें ।
संमुख राम न दिसे । अति निःश्वासें स्फुंदत ॥ ४१ ॥

अथैतां बाष्परुद्धाक्षीं संमुखें नाभ्यलोकयत् ।
अथ सा भूमिजा दुःखस्वरेण महताऽरुद्त ॥८॥
बाष्पव्याकुळताम्राक्षी मध्ये तेषां वनौकसाम् ।
तस्या विलपितं दृष्ट्वा सर्वे ते हरियूथपाः ॥९॥
रुरुदुर्जातसंतापाः शोकव्याकुललोचनाः ।
मुखं वस्त्रेण संच्छाद्य सौ‍मित्रिर्जातसंभ्रमः ॥१०॥

श्रीराममुखदर्शन न झाल्यामुळे सीता स्वतःलाच दोष देऊन विलाप करिते :

अतिदुःखेंकरुनि जाण । अश्रुपूर्ण आरक्त नयन ।
स्फुंदस्फुंदोनि करी रुदन । विमुख रघुनंदन मज झाला ॥ ४२ ॥
दीर्घस्वरें आक्रंदत । मज न पाहे रघुनाथ ।
वृथा वांचोनि काय येथ । निंद्य जीवित रामविण ॥ ४३ ॥
जेव्हांच वियोग् रामासी । तेव्हांच सांडावें देहासीं ।
पापिणी मी ऐसी कैसी । देहभारेंसीं वांचलें ॥ ४४ ॥
पृथ्वीयेमाजि पाहीं । पापें आहेत जीं कांही ।
श्रीरामवियोंगें सर्वही । माझ्या देहीं आदळलीं ॥ ४५ ॥
महापातकियाचें मुख । सवर्था राम न पाहे देख ।
मी केंवी आलें संमुख । प्राण निःशेख नव्हे माझा ॥ ४६ ॥
पापांमाजि महापातक । मज घडलें आत्यंतिक ।
सौ‍मित्र शापिला देख । श्रीराम विमुख तेणें झाला ॥ ४७ ॥
अत्यंत अनुज आणि सखा । तो म्यां अभिशापिला देखा ।
कोण सुख रघुकुळटिळका । कासया मुखा अवलोकी ॥ ४८ ॥

जानकीची मूर्च्छा, वानरांमध्ये हाहाकार :

म्हणोनियां दीर्घस्वरीं । आक्रंदतसे सुंदरी ।
स्वयें पडतां धरेवरी । केला वानरीं हाहाकार ॥ ४९ ॥
जीलागीं रघुनंदन । हिंडता झाला वनोवन ।
जीवीण न रुचे अन्नजीवन । समुद्रा पालाण जीलागीं ॥ १५० ॥
लंकेलागीं करोनि पूर्ण । दारुण येथ रणकंदन ।
जीलागीं वधून रावण । राजा बिभीषण जीलागीं केला ॥ ५१ ॥
ते जवळी आलिया पाठीं । राम न पाहे दृष्टी ।
स्फुंदत पडलीसे गोरटी । श्रीराम पोटीं कठिण भारी ॥ ५२ ॥

लक्ष्मणही शोकमग्न :

देखोनि जानकीची अवस्था । सौ‍मित्र वोसंडला चित्ता ।
निजपालवें तत्वता । होय झांकिता निजवदन ॥ ५३ ॥
पालवें झांकोनियां वदन । सौ‍मित्र करीतसे स्फुंदन ।
अति कठिण रघुनंदन । अंतरचिन्ह कळो नेदी ॥ ५४ ॥

श्रीरामांना विनवणी करण्यासाठीं उपस्थितांपैकी सर्वजण व स्वर्गातील देवही तेथे येतात :

श्रीराम नेदी समाधान । तेणें आवेशें पैं जाण ।
विनवावया रघुनंदन । अवघेजण सरसावले ॥ ५५ ॥
अश्रु परिमार्जुन हातें । जानकीचेनि पक्षें तेथें ।
सकळ दुखावले निजचित्तें । विनवूं पाहती श्रीरामा ॥ ५६ ॥
तंव स्वर्गीहून अवलीळा । आला सुरगणांचा पाळा ।
सिद्धगंधर्वयक्षमेळा । रघुकुळपाळा विनविती ॥ ५७ ॥
एका जनार्दना शरण । जानकी देखोनियां जाण ।
राम झाला उदासीन । कांही वचन बोलेना ॥ ५८ ॥
पुढें दिव्य अद्‍भुत । जानकीये घेईल रघुनाथ ।
श्रोतीं अवधान द्यावें तेथ । कथा अद्‍भुत रामायणीं ॥ ५९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
जानकीआगमनं नाम सप्तषष्टितमोऽध्यायः ॥ ६७ ॥
ओंव्या ॥ १५९ ॥ श्लोक ॥ १० ॥ एवं ॥ १६९ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सदुसष्टावा