भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंधरावा
अकंपन व वज्रदंष्ट्र यांचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
धूम्राक्षं निहतं श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
क्रोधेन महताविष्टो निःश्वसन्नुरगो यथा ॥१॥
दीर्घमुष्णं च निःश्वस्य क्रोधेन कलुषीकृतः ।
अब्रवीद्राक्षसं क्रूरं वज्रदंष्ट्रं महाबलम् ॥२॥
गच्छ त्वं वीर निर्याहि राक्षसैः परिवारितः ।
जहि दाशरर्थि रामं सुग्रीवं वानरैः सह ॥३॥
तथे त्युक्त्वा द्रुततरं मायावी राक्षसेश्वरः ।
निर्जगाम बलैः सार्धं बहुभिः परिवारितः ॥४॥
धूम्राक्ष राक्षस बळवंत । त्याचा हनुंमतें केला घात ।
तें ऐकोनि लंकानाथ । क्रोधान्वित अति दुःखें ॥ १ ॥
धूम्राक्षाचें युद्धमरण । ऐकोनि स्वयें रावण ।
सर्पप्राय फुंपावे पूर्ण । क्रोधें प्राण त्यजूं पाहे ॥ २ ॥
रावणाने वज्रदंष्ट्रास पाठविले :
धीर वीर महाशूर । वज्रदंष्ट्र निशाचर ।
त्यासी सांगे दशशिर । युद्धा सत्वर निघावें ॥ ३ ॥
रणा जावोनि आपण । मारावे राम लक्ष्मण ।
अंगद सुग्रीव कपिगण । हनुमान साधन धरावा ॥ ४ ॥
राक्षसांचा दुर्धर भार । सबळ सेनेसीं सपरिवार ।
सहराम मारावे वानर । लहान थोर शोधूनी ॥ ५ ॥
वज्रदंष्ट्राचे ससैन्य प्रयाण :
ऐकोनि रावणाचें वचन । वज्रदंष्ट्र उल्लासोन ।
वंदोनियां दशानन । निघे आपण संग्रामा ॥ ६ ॥
मुकुट कुंडलें बाहुभूषणें । केयूरन्वित करकंकणें ।
अंगत्राण शिरस्त्राणें । करत्राणें गोधांगुळी ॥ ७ ॥
वज्रदंष्ट्र वीर दारुण । लेवोनियां रणाभरण ।
सज्जोनियां धनुष्यबाण । निघे आपण संग्रामा ॥ ८ ॥
वाजी पदाती खर उष्ट्र । वाहनारुढ निशाचर ।
रथ ध्वजी मत्त कुंजर । सैन्यसंभार सज्जूनी ॥ ९ ॥
विचित्र पताका कडकडाट । रथ चालिले धडधडाट ।
विचित्रध्वज अति वरिष्ठ । वीर उद्भट चालिले ॥ १० ॥
हेमाभरणीं सालंकृत । ध्वजपताकीं रथ शोभत ।
वज्रदंष्ट्र् बैसला तेथ । दक्षिणावर्त साधूनी ॥ ११ ॥
गदापरिघबाणयुत । खड्गतोमरशूळहस्त ।
एक वीर मुशलान्वित । एक झेलित मुद्गल ॥ १२ ॥
वोडणखर्गें महावीर । एक पायींचे धनुर्धर ।
पायदळाचे मोगर । वीर झुंजार गर्जती ॥ १३ ॥
वीरांअंगी आंगवण । कांसा घातल्या नानावरण ।
अंगप्रत्यंगीं रणाभरण । उल्लास पूर्ण युद्धाचा ॥ १४ ॥
दोहीं बाहीं गजथाट । गजयोद्धे वीर उद्भट ।
शूळ त्रिशूळ तोमर निकट । गजघट चालविती ॥ १५ ॥
गजयुद्धाच्या व्युत्पत्ती । त्या दाविती गतिविगति ।
परसैन्या लाविती ख्याती । दाविती युद्धीं रणमारें ॥ १६ ॥
अश्वगजरथघडघडाट । वीरीं वीरांचा कडकडाट ।
दक्षिणद्वारें सैन्यसंघात । वज्रदंष्ट्र निघाला ॥ १७ ॥
निःसृतो दक्षिणद्वारादंगदो यत्र यूथपः ।
तेषां निष्काममाणानामशुभं समजायत ॥५॥
अंगद यूथप दक्षिणद्वारीं । सैन्य निघतांचि बाहेरी ।
तेथें जाली नवलपरी । निशाचरीं अशुभार्थ ॥ १८ ॥
उलूक तळपोनि अंबरीं । बैसला वज्रदंष्ट्रावरी ।
भालू भुंकती उंच स्वरीं । निशाचरीं अशुभार्थ ॥ १९ ॥
वज्रदंष्ट्र वीर जेठी । अपशकून नाणी दृष्टीं ।
युद्धा निघे उठाउठीं । कडकडाटीं ससैन्य ॥ २० ॥
वानर राक्षस सैन्याचे युद्ध :
अंगदाचें वानरवीर । युद्धा मिसळले सत्वर ।
राक्षस हाणिती हतियेर । बहुप्रकारें वानरीं ॥ २१ ॥
मृदंग शंख भेरी गहन । काहळा वीणा आणि विषाण ।
रणीं त्राहाटिलें निशाण । आलें स्फुरण उभयदळीं ॥ २२ ॥
राक्षस हाणिती हतियेर । घाय चुकविती वानर ।
बाहुबळें निशाचर । रणीं सत्वर उपटिती ॥ २३ ॥
वानर आणि निशाचर । युद्धा मिसळले दुर्धर ।
घाय हाणिती निष्ठुर । येरयेरां नोकोनी ॥ २४ ॥
शस्त्रें हाणितां निशाचर । गगनीं उसळती वानर ।
घाय टाळूनि कपींद्र । करिती विचित्र तें ऐका ॥ २५ ॥
धनुष्याचीं तोडिती शितें । आंसडोनि घेती शस्त्रांते ।
निःशस्त्र करोनि राक्षसांतें । मुष्टिघातें मारिती ॥ २६ ॥
बाहुबळें महावीर । झोंबी घेताती दुर्धर ।
मल्लयुद्धींचा प्रकार । चमत्कार दाविती ॥ २७ ॥
मुष्टिघात तळवेघात । चरणघात बाहुघात ।
वानर खवळले रणांत । करिती घात राक्षसां ॥ २८ ॥
गुडघ्यां खांदें कोंपरीं । तडवे हाणिती परस्परीं ।
धडका हाणोनियां उरीं । महामारी राक्षसां ॥ २९ ॥
रणीं वानर वृक्षहस्त । रथी सारथी साश्वरथ ।
अवघ्यां करोनि एकघात । वीर कुंथत पाडिले ॥ ३० ॥
वानर गगनीं उसळोन । शिळा पर्वत पाषाण ।
टाकोनियां करिती चूर्ण । रण कंदन राक्षसां ॥ ३१ ॥
भग्नजानु भग्नकटी । वीर पाडिले कोट्यनुकोटी ।
वज्रदंष्ट्रेंदेखोनि दृष्टी । रणसंकटीं क्षोभला ॥ ३२ ॥
वानरीं मारिले निशाचर । वाहती रुधिराचे पूर ।
देखोनि वज्रदंष्ट्र वीर । रथ सत्वर प्रेरिला ॥ ३३ ॥
स्वयें वज्रदंष्ट्र आपण । सज्जोनियां धनुष्यबाण ।
साटोपोनि रणांगण । वानर सैन्य विधिलें ॥ ३४ ॥
रणोन्मत्त अति दुर्धर । बाण न गणिती वानर ।
तिहीं वेढिला वज्रदंष्ट्र । शिळा शिखरदुमपाणि ॥ ३५ ॥
रणीं नाटोपती वानर । चिंतानिमग्न वज्रदंष्ट्र ।
सर्वसंहारक जें अस्त्र । अति दुर्धर योजिलें ॥ ३६ ॥
वज्रदंष्ट्राच्या सर्वसंहारक अस्त्राचा प्रभाव :
तो बळवंत अस्त्रवेत्ता । करावया वानरांच्या घाता ।
होय अस्त्रातें सोडिता । साटोपता समंत्र ॥ ३७ ॥
अस्त्रविद्येचें बळ गाढें । मागील मागे पुढील पुढें ।
वानरां भेटलें कुर्हाडें । चहूंकडे रणमार ॥ ३८ ॥
अस्त्रविद्येचिया बाणीं । वानर पाडिले रणांगणीं ।
एक उफळतां गगनीं । पाडी विंधोनी साटोपें ॥ ३९ ॥
जेंवी पाहोनि प्रळयांत । अंतक करी जीवघात ।
तेंवी वानरां रणार्वत । असे करित वज्रदंष्ट्र ॥ ४० ॥
देखोनि वानरांच्या भारा । क्रोधें कांपतसे थरथरां ।
सज्जोनियां बाणधारा । रणीं वानरां निवटित ॥ ४१ ॥
अस्त्रविद्येचिये बाणीं । वानरसेना भंगली रणीं ।
अंगदें देखिली दुरोनी । आला गर्जोनी साटोपें ॥ ४२ ॥
भंगली देखोनी कपिसेना । अंगद कोपला चौगुणा ।
वृक्ष उपटोनियां जाणा । राक्षससेना निर्दाळी ॥ ४३ ॥
अंगदाचा आवेश व राक्षसांची दाणादाण :
सिंह देखतांचि दृष्टीं । मृगें पळती बारा वाटीं ।
अंगदवृक्षघायासाठीं । राक्षसकोटी निमताती ॥ ४४ ॥
बळें हाणितां वृक्षघातीं । राक्षसशिरें पडती क्षितीं ।
रुधिराचे पूर् वाहती । अंगदें ख्यातीं लाविली ॥ ४५ ॥
जे जे युद्धा संमुख येती । वृक्ष हाणितां रणीं पडती ।
वृक्ष घेवोनियां हातीं । अति आघातीं मारित ॥ ४६ ॥
जेंवी प्रळयकाळींचा वन्ही । वाढे उदक निर्दाळूनी ।
तेवी राक्षस निर्दाळूनी । अंगद रणीं खवळला ॥ ४७ ॥
मूळ छेदल्या वृक्ष लवंडती । तेंवी राक्षस पाडोनि क्षितीं ।
गज रथ अश्व सारथी । वृक्षघातीं शतचूर्ण ॥ ४८ ॥
भंगिले रथ ध्वज विचित्र । युद्धें मारिले छत्रधार ।
छत्रभंगें अलंकार । हार केय़ूर लोळती ॥ ४९ ॥
मुकुट कुंडले सशिरें । बाहु लोळती सर्पाकारें ।
करकंकणें केयुरें । शस्त्रे वस्त्रें लोळती ॥ ५० ॥
लोळती वस्त्रें अलंकार । तेणें शोभे भूमि विचित्र ।
शरत्काळीं जेंवी नक्षत्र । निशिं सचंद्र शोभत ॥ ५१ ॥
रणीं मारितां निशाचर । वाहती रुधिरांचे पूर ।
तेणें भूमि भयंकर । अति दुस्तर भासत ॥ ५२ ॥
तुटोनि दूर गेलीं शिरें । अरुंडें लोळती शरीरें ।
गजकलेंवरें महाथोरें । अंगदवीरें पाडिलीं ॥ ५३ ॥
अंगदाचा पराक्रम :
देखोनि अंगदाच्या मारा । पळ सुटला निशाचरां ।
अवघीं कांपती थरथरां । धीर वीरां न धरवे ॥ ५४ ॥
लागतां वायूचा आघात । मेघमंडळ हताहत ।
तेंवी राक्षस समस्त । रणीं पळत अति धांके ॥ ५५ ॥
राक्षसांचें सबळ दळ । अंगदें मर्दिलें सकळ ।
वज्रदंष्ट्रा महाबळ । कोपें प्रबळ चालिला ॥ ५६ ॥
इंद्रचापसमदुर्धर । विस्फारोनि धनुष्य घोर ।
नादें कांपे चराचर । महावीर वज्रदंष्ट्र ॥ ५७ ॥
इंद्रचापी नाद दुर्धर । तैसा धनुष्यीं टणत्कार ।
लक्षोनि वानरांचा भार । शर दुस्तर सोडिले ॥ ५८ ॥
वज्रदंष्ट्रासवें शुर । निधडे भरंवशाचे वीर ।
रथीं बैसोनि अपार । युद्धा दुर्धर मिसळले ॥ ५९ ॥
युद्धा मिसळतां निशाचर । कपिसेना दुर्धर वीर ।
युद्धा खवळले वानर । साश्व रहंवर उपडिती ॥ ६० ॥
वानरसैन्याचिया कोटी । रणीं पावल्या उठाउठीं ।
राक्षसांच्या झोंटमिठी । रणीं सनिष्ठीं भिडती ॥ ६१ ॥
राक्षसांचे निधडे वीर । त्याहून बळवंत वानर ।
युद्ध करिती घोरांदर । योद्धे दुर्धर पाडोनी ॥ ६२ ॥
राक्षस भिडती सर्वांगें । वानर न सरतीच मागें ।
पाय हाणितां पैं रागें । करिती अष्टांगें शतचूर्ण ॥ ६३ ॥
बाणशूळत्रिशूळ घात । वृक्ष शिळां गिरी पर्वत ।
परस्परें घाय हाणित । रुधिरोक्षित महावीर ॥ ६४ ॥
अदट दाटुगीं वानरें । राक्षसांची छेदिती शिरें ।
बाहुभंगे निशाचरें । अवनीं रुधिरें वाहती ॥ ६५ ॥
वानर रणीं पडतां जाण । लाविती श्रीरामचरणरेण ।
तेणें घाय कानपोन । उठती गर्जोन संग्रामीं ॥ ६६ ॥
वानर वर्षती पर्वत । तेणें शस्त्रें चूर होत ।
राक्षस वीर पडिले बहुत । पर्वतपातमहामारें ॥ ६७ ॥
शिळाशिखरपर्वतपात । तेणें राक्षसां प्राणांत ।
बोंब उठली सैन्यांत । रणकंदनार्थ राक्षसां ॥ ६८ ॥
रणीं पडले अति दुर्धर । काक बक श्येन घार ।
वृक जंबुक श्वान सूकर । मांस रुधिर भक्षिती ॥ ६९ ॥
शिरें गेलीं पैं तुटोनी । कबंधें धांवती रणीं ।
भूतें नाचती गर्जोनी । घेती धणीं मांसाची ॥ ७० ॥
राक्षसांचे भुजाभार । तुटोनि पडिले कर शिर ।
तेणें रणभूमि भयंकर । अति दुर्धर भासत ॥ ७१ ॥
युद्धीं खवळोनी वानर । रणीं पाडिले निशाचर ।
निशाचरीं करोनि मार । रणीं वानर पाडिले ॥ ७२ ॥
वानर पडतां निर्वाण झुंजें । सवेंचि उठती रामपदरजें ।
राक्षस पडती युद्धव्याजें । रणसमाजें प्राणांत ॥ ७३ ॥
श्रीरामबळें वनचर । रणीं उद्भट वानरवीर ।
धाकें पळती निशाचर । राक्षसभार भंगले ॥ ७४ ॥
वानरांच्या रणसंत्रासीं । भय घेवोनि राक्षसीं ।
वज्रदंष्ट्राचे पाठीसीं । चळकापेंसीं निघाले ॥ ७५ ॥
वज्रदंष्टा सांगती सकळ । वानरांचे प्रब बळ ।
तुम्ही येथोनि शिघ्र काढा पळ । शिळा कपाळ भेदिती ॥ ७६ ॥
पर्वतांच्या घायें जाण । शस्त्रें तितकीं होती चूर्ण ।
आडवें न चले वोडण । वृथा प्राण कां देतां ॥ ७७ ॥
स्वबलस्य च घातेन अंगदस्य बलेन च ।
राक्षसः क्रोधमाविष्टो वज्रदंष्ट्रो महाबलः ॥६॥
विस्फार्य च धुनर्घोरं शक्राशनिसमप्रभम् ।
वानराणामनीकानि प्रकिरन्शरवृष्टिभिः ॥७॥
वज्रदंष्ट्रांचा कोपयुक्त प्रतिकार :
राक्षसांचे दीन वदन । सैन्य भंगलें देखोन ।
वज्रदंष्ट्र कोपायमान । धनुष्यबाण साज्जिले ॥ ७८ ॥
राक्षसांचें रणमर्दन । वानरीं केलें कंदन ।
तें वज्रदंष्ट्रे देखोन । ताम्रनयन क्षोभला ॥ ७९ ॥
धनुष्य घेवोनिया जाण । कंकपत्री सतेज बाण ।
करीं वानरां विदारण । खोंचोनि बाण सर्वांगीं ॥ ८० ॥
वृक्ष शिळा शिखरें पर्वत । बाणीं तोडिले समस्त ।
वानर पाडिले बहुत । क्षत विक्षत शरघातें ॥ ८१ ॥
बाणलाघवी विद्या पूर्ण । सात पांच नव जण ।
घायें पाडी आठ जण । केलें कंदन वानरां ॥ ८२ ॥
घायीं अडकले असतां शर । संमुख भिडती वानर ।
रामनामें बळ थोर । वज्रदंष्ट्र विस्मित ॥ ८३ ॥
देखोनि बाणमहामार । रणीं भंगले वानर ।
अंगदापासीं सत्वर । आले समग्र ठाकोनी ॥ ८४ ॥
जेंवी झाल्या व्यसन प्राप्त । पित्यापासीं ये अपत्य ।
तेंवीं अंगदापासीं त्वरित । आले धांवत वानर ॥ ८५ ॥
मोडलीं वानरांची सेना । वाळिसुतें देखोनि नयना ।
कोंप आला चौगुणां । घ्यावया प्राणा तयाच्या ॥ ८६ ॥
अंगद क्रोधें ताम्राक्ष । येवोनि वज्रदंष्ट्रासंमुख ।
पुनःपुन्हा पाहोनि मुख । मारु निःशंक चालिला ॥ ८७ ॥
निशाचर मज मारिती । हें भय नाहीं अंगदा चित्तीं ।
करावया राक्षसांची शांती । भद्रजाती खवळला ॥ ८८ ॥
देखोनि अंगद महावीर । शिष्टाईचा हा वानर ।
येणें गांजिला दशशिर । निशाचर कांपती ॥ ८९ ॥
वज्रदंष्ट्राचे व अंगदाचे युद्ध :
देखोनियां वाळिकुमर । खळबळिला राक्षसभार ।
तेव्हा अंगदासमोर । वज्रदंष्ट्र स्वयें आला ॥ ९० ॥
मदोन्मत्त गज केसरी । दोघे भिडती तैशियापरी ।
घाय हाणिती नाना कुसरीं । शिरीं उदरीं तळपोनी ॥ ९१ ॥
वज्रदंष्ट्रें धांवोनी । घाय हाणितां पडला अवनीं ।
अंगद उसळला गगनीं । उडी टाकोनी मारावया ॥ ९२ ॥
वज्रदंष्ट्र स्वयें आपण । वर्मस्थान लक्षोन ।
वर्षे शतसहस्र बाण । घ्यावया प्राण अंगदाचा ॥ ९३ ॥
अंगद बाणें रुधिरोक्षित । रणभैरव रणोन्मत्त ।
तैसा रणरंगीं डुल्लत । करावया घात राक्षसां ॥ ९४ ॥
वज्रदंष्ट्राचे जे बाण । अंगदासीं तृणासमान ।
त्याचा घ्यावयासी प्राण । आला गर्जोन साटोपें ॥ ९५ ॥
त्याचा करावया चूर । सहस्रशाखांचा तरुवर ।
रागें उपटोनि दुर्धर । रणी सत्वर सोडिला ॥ ९६ ॥
आलें देखोनियां झाड । राक्षसां थोर हडबड ।
घायें करी हो निवाडा । हाडेंहाड फोडूनी ॥ ९७ ॥
हडबडिलें राक्षससैन्य । वज्रदंष्ट्र सावधान ।
कैसें केलें रणकंदन । निवारण वृक्षाचें ॥ ९८ ॥
देखोनि वृक्षाचें पतन । वज्रदंष्ट्र सावधान ।
गदा साटोपें घेऊन । रथावरुन उडाला ॥ ९९ ॥
वज्रदंष्ट्र महाबळी । गदाघातें वृक्ष निर्दळी ।
छेदोनि पाडिला भूतळीं । पिटिली टाळी राक्षसीं ॥ १०० ॥
समापतंतं तं दृष्ट्वा रथादाप्लुत्य वीर्यवान् ।
गदापाणिरसंभ्रांतः पृथिव्यां समतिष्ठत ॥८॥
अंगदेन शिला क्षिप्ता गत्वा तु रणमूर्धनि ।
वज्रदंष्ट्रस्य शिरसि पातयामास वानरः ॥९॥
अंगदाचा वज्रदंष्ट्रावर शिलाघात :
अंगद वीर तेचि काळीं । उडोनियां अंतराळीं ।
दीर्घ घेवोनिंया शिळी । घाली कपाळीं वज्रदंष्ट्रा ॥ १ ॥
श्लाघोनि जंव बैसला रथांवरी । तंव शिळा बैसे येवोनि शिरीं ।
कासावीस होत चांचरी । कष्टेंकरी पळाला ॥ २ ॥
शिळा पडतां रथावरी । रथ सारथी शस्त्रसामग्री ।
सचक्र सांटा अंक धुरी । केली चकचुरी ध्वजेंसीं ॥ ३ ॥
शिळेतळीं निजशरीर । चुकवोनि वांचला वज्रदंष्ट्र ।
तेणें कोपला वानर । पर्वत थोर उचलिला ॥ ४ ॥
नाना वृक्ष सुशोभित । उपटिला उचलोनि पर्वत ।
वज्रदंष्ट्रावरी घालित । क्रोधान्वित अंगद ॥ ५ ॥
घायापाठीं घायासी । येतां राक्षस कासाविसी ।
निवारण नाठवे त्यासी । तंव पर्वत शिसीं वाजला ॥ ६ ॥
पर्वत पडतांचि सबळ । त्याचे फुटोनियां कपाळ ।
जाला अशुद्धें बंबाळ । मूर्च्छा तत्काळ त्या आली ॥ ७ ॥
गदा टेंकोनि दोही हातीं । मूर्च्छापन्न पडला क्षितीं ।
मुहूर्त एक मूढमती । कांहीं स्फुर्ति स्फुरेना ॥ ८ ॥
वज्रदंष्ट्र पडतां अवनीं । बोंब उठली राक्षससेनीं ।
वानर नाचती रणांगणीं । पाडिला रणीं वज्रदंष्ट्र ॥ ९ ॥
उत्साह आणि आकांत । दोहीं दळांमाजी होत ।
मूर्च्छा भंगूनिया त्वरित । सावचित्त तो झाला ॥ ११० ॥
वज्रदंष्ट्राचा गदाघात :
वज्रदंष्ट्र सावध होत । गदा घेवोनि क्रोधान्वित ।
लक्षोनियां वाळिसुत । त्याच्या वधार्थ धाविन्नला ॥ ११ ॥
गदा घेवोनि क्रोधेंकरीं । अंगद ताडिला उरावरी ।
तो न डंडळी तिळभरी । जेंवी कां गिरि पर्जन्यें पैं ॥ १२ ॥
डंडळेना वाळिसुत । वृथा गेला गदाघात ।
अंगदें उडोनि धरिला हात । आला प्राणांत करावया ॥ १३ ॥
मल्लयुद्ध मुष्टिघात :
हाणों येतां मुष्टिघात । मल्लविद्या आकळित ।
वज्रदंष्ट्र क्रोधान्वित । अनुलक्षित मारावया ॥ १४ ॥
बळें निमटोनियां गळा । परस्परें लाविती कळा ।
लाता देतां हृदयकमळा । लागे डोळां अर्धचंद्री ॥ १५ ॥
सवेंचि होवोनि सावचत्ति । आघातघात उलटघात ।
चिकाट्या तळीं तळघात । घायें वर्मस्थ हाणिती ॥ १६ ॥
वानर आणि निशाचर । जाले घायीं अति जर्जर ।
सर्वांगीं वाहे रुधिर । येरां येर न ढळती ॥ १७ ॥
किंशुक फुलले वसंतात । तैसे दोघे रणीं आरक्त ।
युद्धश्रमें श्रमभूत । तरी भिडत साटोपें ॥ १८ ॥
अंगदें उडोनि ते काळीं । सुशोभित पुष्पीं फळीं ।
वृक्ष उपडोनि समूळीं । रणकल्लोळीं पातला ॥ १९ ॥
अंगदाचें बळ वितंड । वृक्ष देखोनि प्रचंड ।
राक्षसाचें बळदंड । खंड विखंड हो सरलें ॥ १२० ॥
वज्रदंष्ट्र सावचित्त । वोडणखड्गा घाली हात ।
वोपत्रिप तळप देत । करावया घात अंगदा ॥ २१ ॥
अर्धचंद्र दृढ वोढण । ज्वाळमाळारत्नभूषण ।
धडकधडकूं दे किराण । दावी आंगवण वज्रदंष्ट्र ॥ २२ ॥
एक वोढणखडगहस्त । दुजा वीर वृक्षहस्त ।
निर्वाणींचे घाय देत । निजविजयार्थ साधावया ॥ २३ ॥
भैरव चर्ची सिंदूर । तैसे रक्तें आरक्त वीर ।
धांवती येरयेरांसमोर । घाय निष्ठुर हाणोनी ॥ २४ ॥
अंगदाचा वृक्षघात । राक्षसांचा खर्गघात ।
दोघे पडले मूर्च्छागत । सावचित्त संग्रामीं ॥ २५ ॥
संग्रामी अति भ्रांत । दोघे घायीं जर्जरित ।
रणीं पडले मुर्च्छित । तोही वृत्तांत अवधारा ॥ २६ ॥
दोघे वीर महाहठी । रणीं बैसले मेटीखुटीं ।
घुर्मी बाष्प दाटलें कंठीं । नेत्रवाटी बहु विकळ ॥ २७ ॥
अंगदवीर मूर्च्छेआंत । रामनामें सावचित्त ।
वज्रदंष्ट्राचा केला घात । निमेषांत तो ऐका ॥ २८ ॥
वृक्षघाय गेला व्यर्थ । तेणें अंगद क्रोधान्वित ।
सर्प जैसा दंडाहत । तैसा धांवत साटोपें ॥ २९ ॥
अंगद वीर निधडा जाण । वज्रदंष्ट्रासी सावधान ।
स्वयें करोनि आपण । केलें हनन गर्जोनी ॥ १३० ॥
निर्मलेन सुघौतेन खड्गेनास्य महच्छिरः ।
जघान वज्रदंष्ट्रस्य वालिसूनुर्महाबलः॥१०॥
वज्रदंष्ट्राचा स्वतःच्याच खडगाते घात :
वज्रदंष्ट्राचें खर्ग थोर । अति निर्मळ सतेज धार ।
अंगदें हिरोनि सत्वर । छेदिलें शिर तयाचें ॥ ३१ ॥
अंगद वीर अति विख्यात । त्याच्या शस्त्रें त्याचा घात ।
करोनियां मस्तकपात । रणीं गर्जत हरिनामें ॥ ३२ ॥
अंगद वीर अति निधडा । धायें शिर उडविलें पुढां ।
अशुद्ध वाहे भडभडां । केला नितोडा राक्षसां ॥ ३३ ॥
वज्रदंष्ट्राचा केला घात । राक्षससैन्य भयभीत ।
अवघे पळती भयान्वित । वानरीं अंत पुरविला ॥ ३४ ॥
मुकुट कुंडलें शस्त्रास्तें । अनर्घ्य भूषणें विचित्रें ।
सांडोनि पळती निशाचरें । लंकाद्वारी आकांत ॥ ३५ ॥
वज्रदंष्ट्र वधाने राक्षसांचा आकांत व वानर सैन्यात हर्ष :
एक रडत एक पडत । एक अत्यंत चरफडत ।
एक पाणी पैं मागत । खुणा हातें दावूनी ॥ ३६ ॥
एक हुंबतें हुंबतें । एक कुंथतें कण्हतें ।
एकाची लोंबतीं अंतें । लंकेशातें निंदिती ॥ ३७ ॥
चोरोनियां सीता सुंदरी । आम्हांसी केली महामारी ।
धाड आणिली लंकेवारी । होत बोहरी राक्षसां ॥ ३८ ॥
राक्षससैन्य समस्त । पळोनि गेलें लंकेआंत ।
विजयी जाला वाळिसुत । रगुनाथकृपेनें ॥ ३९ ॥
मारोनिंया वज्रदंष्ट्र । विजयी जाला वाळिकुमर ।
वानरांसी हर्ष थोर । सुखें निर्भर अंगद ॥ १४० ॥
मारोनियां वृत्रासुर । शोभे जेंवी सुरेश्वर ।
तैसा शोभे अंगद वीर । सपरिवार वानरीं ॥ ४१ ॥
अंगदाचें सबळ बळ ।वानर वानिती सकळ ।
श्रीरामदर्शना प्रेमळ । आला निजदळसमवेत ॥ ४२ ॥
संमुख देखोनि रामचंद्र । अवघीं केला जयजयकार ।
श्रीरामनामाचा गजर । नमस्कार घातला ॥ ४३ ॥
वंदोनियां रामचरण । अभिवंदिला लक्ष्मण ।
सुग्रीवासी लोटांगण । बिभीषण वंदिला ॥ ४४ ॥
प्रेमे वंदिला हनुमंत । नळनीळादि जांबवंत ।
वानरसमुदाय समस्त । अभिवंदित अंगद ॥ ४५ ॥
राजकुमर बळवंत । सत्वगुणी अति समर्थ ।
अंगद वीर विख्यात । स्वयेंवानीत श्रीराम ॥ ४६ ॥
अंगदे केलें रणविंदान । झालें वज्रदंष्ट्रहनन ।
पुढें येईल अकंपन । तेंही रण अवधारा ॥ ४७ ॥
सुग्रीव वीरें समराआंत । वज्रदंष्ट्राचा केला घात ।
हे ऐकोनि लंकानाथ । क्रोधान्वित स्वयें जाला ॥ ४८ ॥
वज्रदंष्ट्र हत श्रुत्वा वालिपुत्रेण रावणः ।
बलाध्यक्षमुवाचेदं कृतांजलिमुपस्थितम् ॥११॥
शीघ्रं निर्यांतु दुर्धर्षा राक्षसा घोरदर्शनाः ।
अकंपनं पुरस्कृत्य सर्वशस्त्रास्त्रकोविदम् ॥१२॥
ततो नानाप्रहरणा भीमाक्षा भीमदर्शनाः ।
निर्ययू राक्षसा मुख्या बलाध्यक्षप्रणोदिताः ॥१३॥
रावणाचा क्रोध व अकंपनाची रणावर रवानगी :
अति क्रोधें दशाननं । पाचारोनी अकंपन ।
तूं तंव वीरपंचानन । रणप्रवीण रणयोद्धा ॥ ४९ ॥
सौमित्रेंसहित श्रीराम । रणीं मर्दून प्लवंगम ।
माझे निढळींचा पुशीं घाम । प्रिय परम मज करी ॥ १५० ॥
ऐकोनि रावणाचें वचन । गर्जिन्नला अकंपन ।
वानरेंसीं राम लक्ष्मण । न लागतां क्षण निवटीन ॥ ५१ ॥
आलिया सुरासुरगण । मागें न सरें मी अकंपन ।
राम लक्ष्मण बापुडे कोण । वानर तृण मजपुढें ॥ ५२ ॥
ज्याचे देखतां दशन । भयानक अति दारुण ।
धाकेंचि वीर सांडी प्राण । अत्युग्र सैन्य सज्जिलें ॥ ५३ ॥
ज्याचें देखतां विकट वदन । सैन्य पडे मूर्च्छापन्न ।
ऐसें दुर्धर सज्जोनि सैन्य । अकंपन निघाला ॥ ५४ ॥
कात्या त्रिशुळ तोमर । गदा मुद्गल परिघ घोर ।
झेलीत शस्त्रसंभार । निशाचर निघाले ॥ ५५ ॥
अकंपनाअंगीं आंगवण । सबळ बळाचा गर्व पूर्ण ।
रावणें देवोनि सन्मान । करावया रण धाडिला ॥ ५६ ॥
रथमास्थाय विपुलं तप्तकांचनभूषणम् ।
अकंपनस्तु तैर्घोरेराक्षसैः सह निर्ययौ ॥१४॥
तस्य निर्धावमानस्य संरब्धस्य युयुत्सया ।
अकास्माद्दैन्यमागच्छद्धयानां रथवहिनाम् ॥१५॥
प्रस्फुरन्नयनं चास्य सव्यं युद्धाभिकांक्षिणः ।
तानुत्पातान्धःकृत्वा निर्जगाम निशाचरः ॥१६॥
शस्त्रास्त्रीं रथ सज्जून । रथीं बैसला अकंपन ।
कवच कुंडलें तप्तकांचन । विजराजमान महावीर ॥ ५७ ॥
अकंपन महावीर । स्वभावें क्रूर आणि अत्यंग्र ।
घेवोनि निशाचरांचा भार । युद्धा सत्वर निघाला ॥ ५८ ॥
अकंपनास अपशकून :
रथ चालता घडघडाट । शुद्ध भूमिका मार्ग सपाट ।
चहूं वारुवां वळली भेट । मारितांही साट न उठती ॥ ५९ ॥
वारुवें दातीं धरली भोये । उठवितां न उठवी पाहें ।
अकपनें धरिलें भये । करावें काये नाठवे ॥ १६० ॥
संचित होतां मुख्य धुर । अशुभें लवे वाम नेत्र ।
भयभीत निशाचर । दुश्चिन्हें थोर देखोनी ॥ ६१ ॥
साटोप धरोनियां पोटीं । वारु उठवी जगजेठी ।
त्यांची थापटोनियां पाठी । रथ सन्निष्ठिं सज्जिला ॥ ६२ ॥
वारु करोनि सुप्रसन्न । रथीं बैसला अकंपन ।
सवेग करितां रथाभिगमन । पुढें दुश्चिन्ह देखिलें ॥ ६३ ॥
वृक जंबुक सिंह व्याघ्र । ऊर्ध्वमुख विवर्णस्वर ।
शब्द वदती अत्युग्र । पक्षीही क्रूर शब्द करिती ॥ ६४ ॥
निधडा वीर अकंपन । शूर पुरुषार्थी पंचानन ।
उत्पात सांडिले हेळसून । करावया रण निघाला ॥ ६५ ॥
शंके देखोनि जो उत्पात । अंगीं नाहीं पुरुषार्थ ।
जय न पवे युद्धांत । जो भयभीत अपशकुनें ॥ ६६ ॥
अकंपन वीर उद्भट । करोनि वाढिवेचा नेट ।
रथ प्रेरिला घडघडाट । अति कडकडाट युद्धाचा ॥ ६७ ॥
तस्य निर्यातमानस्य राक्षसः सह राक्षसैः ।
बभूव सुमहान्नादः क्षोभयन्निव सागरम् ॥१७॥
तेन सब्देन वित्रस्ता वानराणां महाचमूः ।
दुमशैलप्रहाराणां योद्धं समवतिष्ठताम् ॥१८॥
तेषां युद्धं महाघोरं बभूव कपिरक्षासाम् ।
रामरावणयोरथें समरे त्यक्तजीविनाम् ॥१९॥
अन्योन्यं रजसा तेन कौशेयारुणपांडुना ।
संवृत्तं धूमधूम्रेण ददृशुस्ते रणजिरम् ॥२०॥
न ध्वजो न पताका वा चर्म वा तुरगोपि वा ।
आयुधं स्यंदनं वापि ददृशुस्तेन रेणुना ॥२१॥
वानर आणि राक्षसांचा रणसंग्राम :
वीरीं करोनि रणशृंगार । मुकुतकुंडलें कवच वीर ।
अकंपनासवें दुर्धर भार । निशाचर चालिले ॥ ६८ ॥
सिंहनादें गिरागजर । गर्जत येतां राक्षसभार ।
तें देखोनि कपिकुंजर । युद्धा सत्वर मिसळले ॥ ६९ ॥
शिळा शिखरें वृक्ष पर्वत । वानर भिडती युद्धाआंत ।
घायें राक्षसां करिती घात । सैन्यकंदनार्थ मांडिला ॥ १७० ॥
त्रिशुळ कात्या शक्ति तोमरे ।राक्षसें घेवोनि हतियारें ।
रणीं खोंचली वानरें । वाहत रुधिर भडभडां ॥ ७१ ॥
रावणाच्या निजकार्यार्थ । राक्षसीं वेंचिता जीवित ।
वानरीं करोनि पर्वतघात । असंख्यात मारिले ॥ ७२ ॥
वानरी करोनि युद्ध निर्वाण । श्रीराम काजी वेंचितां प्राण ।
त्यांसी न बाधी जन्म मरण । नामस्मरण करितांचि ॥ ७३ ॥
वानर घायीं होतां निर्बुज । लाविती श्रीरामचरणरज ।
घाय पानपोन होती नीरुज । कपिसमाज गर्जती ॥ ७४ ॥
करितां रामनामस्मरण । नामें वानरां बळ संपूर्ण ।
नामबळें करोनि कंदन । बळवाहन गर्जती ॥ ७५ ॥
वीरां वानरां करितां रण । रणीं उठले रजःकण ।
रवि बिबेंसीं झांकती किरण । आपणाआपण न देखती ॥ ७६ ॥
ध्वजपताकांसीं न दिसे रथ । अश्व सारथि वीर विख्यात ।
मुख्य अकंपन तटस्थ । सैन्य समस्त केंवी देखे ॥ ७७ ॥
निशाचर देखती रातीं । ऐसी सर्वत्र वदंती ।
तेही करोनि सामान्य शक्ती । देखणी स्थिति वानरां ॥ ७८ ॥
श्रीराम दीप्तीची निजदिप्ती । श्रीराम स्वयें तेजोमूर्तीं ।
त्याचेनि तेजें जप्तती । देखणी शक्ती वानरां ॥ ७९ ॥
वानरांअंगी सिद्ध उड्डाण । त्यांवरी आलें देखणेपण ।
रणीं केले कंदन । सावधान अवधारा ॥ १८० ॥
ऐतस्मिन्नंतरे वीरा वानराश्च महाबलाः ।
संरब्धाः परमं क्रुद्धाश्चक्रुर्यद्धमनुत्तमम् ॥२२॥
ते मुष्टिभिर्महावेगा राक्षसानां चमूमुखे ।
कन्दनं सुमहच्चक्रुर्लीलया हरिपुंगवाः ॥२३॥
शब्दश्च सुमहांस्तेषां नर्दतामभिधावताम् ।
श्रुयते तुमुलो तुमुलो युद्धे न रुपाणि चकाशिरे ॥२४॥
तदा च रक्षोगणमुन्नदंतं संभ्रांतनागाश्वरथं विकृष्टम् ।
महोदधेः पूरमिवानुरुपं निशाचराणां बलमाबभासे ॥२५॥
राक्षस सैन्याची दैना :
रणीं रज दाटलें दुर्धर । तये संधीं वानरवीर ।
राक्षसां केला दुर्धर मार । शिळाशिखर द्रुमपाणी ॥ ८१ ॥
निशाचरीं सूनी दृष्टी । वानरवीर वळोनि मुष्ठी ।
मारिती राक्षसांच्या थाटी । रणीं सन्निष्ठीं गर्जोनि ॥ ८२ ॥
कोपोनियां अति दुर्धर । रणीं खवळले वानर ।
करितां शिळाशिखरमार । निशाचर भंगले ॥ ८३ ॥
वोडण खडण शूर दुर्धर । पर्वतघातें करिती चूर ।
वानरीं भंगिलीं हतियेरें । निशाचर मर्दूनी ॥ ८४ ॥
रणीं राक्षसां होतां घात । त्यांसी प्रतिकूळ महावात ।
तोच वानरां अनुकूळ होत । श्रीरघुनाथाचेनि साह्यें ॥ ८५ ॥
असुर वानर करितां रण । उठले होते रजःकण ।
अशुद्धें वाहतां रणांगण । रज दारुण उपशमलें ॥ ८६ ॥
बळें उन्नद्ध राक्षसभार । वानरीं करितां पर्वतमार ।
रथाश्व गज सारथी वीर । निशाचर कळकळती ॥ ८७ ॥
मंदरें मंथितां सागर । क्षोभला गर्जे अति दुर्धर ।
कपि मथितां राक्षसभार । निशाचर कळवळती ॥ ८८ ॥
भंगले देखोनि रक्षोगण । तीव्र कोपला अकंपन ।
धनुष्यीं सज्जूनियां बाण । सांगे आपण सारथ्या ॥ ८९ ॥
मर्दूनि राक्षसांचे भार । गर्जत उभे वानरवीर ।
शीघ्र प्रेरीं रहंवर । कपिकुंजर वधावया ॥ ९० ॥
तत् दृष्ट्वा सुमहत्कमं कृतं वानरसत्तमैः ।
क्रोधमाहारयामास युधि तीव्रमकंपनः ॥२६॥
दृष्ट्वा तत्कर्म शत्रूणां सारथिं वाक्यमब्रवीत् ।
तत्रैव त्वरितं याहि सारथे यत्र वानराः ॥२७॥
एते हि वलिनो ध्नन्ति सुबहून्राक्षसानणे ।
एकान्निहन्तुमिच्छामि समरश्लाघिनो ह्यहम् ॥२८॥
ततः प्रजविताश्वेन रथेन रथिनां वरः ।
हरीनभ्यहनत्क्रोधात्किरन्बाणानकंपनः ॥२९॥
न शेकुर्वानराः स्थातुं किं पुनर्योद्धुमाहवे ।
अकंपनशरैर्भग्ना दुदुवुः सर्ववानराः ॥३०॥
अकंपनाच्या बाणवृष्टीने वानरसैन्याची दैन्यावस्था :
ऐकोनि अकंपनवचन । सारथियें रथ प्रेरुन ।
जेथे वानर करिती रण । तेथें आपणा आणिला ॥ ९१ ॥
अकंपन महावीर । बाणीं व्यापलें अंबर ।
उडोनि जातां पैं वानर । केला मार शरघातें ॥ ९२ ॥
शिळा शिखरें द्रुम पाषाण । शराग्रें करोनि शतचूर्ण ।
सपिच्छी विंधोनियां बाण । वानर सैन्य त्रासिलें ॥ ९३ ॥
वाम सव्य दशदिशीं । निघों जातां वानरांसी ।
बाण भेदिती सपिच्छी । रणभूमीसीं राहवेना ॥ ९४ ॥
जैसी पर्जन्याची वृष्टी । त्याहून सवेग शरसुटी ।
वानर बाणीं होवोनि हिंपुटी । उठाउठीं पळाले ॥ ९५ ॥
रावणाच्या कटकाआंत । अकंपन वीर विख्यात ।
कायसी वानरांची मात । रणीं रघुनाथ मारीन ॥ ९६ ॥
रणीं उभा अकंपन । गर्जतसे अति श्लोघान ।
पळतां देखोनि वानरगण । हनुमान आपण चालिला ॥ ९७ ॥
रामनामें स्वयें गर्जत । वानरां नाभीकार देत ।
करावया अकंपनाचा घात । आला हनुमंत साटोपें ॥ ९८ ॥
समीक्ष्य हनुमान्ज्ञातीनुपतस्थे महाबलः ।
तं महाप्लवंग दृष्ट्वा सर्वे ते प्लवगर्षभाः ॥३१॥
समेत्य समरे वीराः सहिताः पर्यवारयन् ।
अकंपनस्तु शैलाभं हनूमन्तमवस्थितम् ॥३२॥
महेंद्र इव धाराभिः शरैरभिववर्ष ह ।
अचिंत्तयित्वा बाणौघान्शरीरे पतितान्कपिः ॥३३॥
अकंपनवधार्थाय मनो दघ्रे महाबलः ।
शालमुत्पाटयामास गिरिशृंगमिव स्थितम् ॥३४॥
समुद्यम्य महाशालं भ्रामयामास मारुतिः ।
भ्रामयन्त स चिच्छेद शरैः शालमकम्पनः ॥३५॥
हनुमान व अकंपनाचे युद्ध :
येतां देखोनि हनुमंत । पळाते वानर समस्त ।
स्वयें परतले युद्धार्थ । बळोन्मत्त हनुमंत ॥ ९९ ॥
मेरुशिखरासमान । हनुमान आला देखोन ।
अकंपन कंपायमान । दुर्धर विघ्न आलें ॥ २०० ॥
राक्षसांचा कंदकुदळ । मुख्य हनुमान अतिबळ ।
यासीं करोनि रणकल्लोळ । गोळांगूळ मारीन ॥ १ ॥
आजि मरणें कां मारणें । ऐसें निर्वाणयुद्ध करणें ।
रणीं गर्जोन सत्राणें । निर्वाणबाणें विधित ॥ २ ॥
जेंवी मेरुच्या शिखरा । मेघ वर्षती मुसळधारा ।
तैसे बाण पैं कपींद्रा । विंधी वानरां सर्वांगीं ॥ ३ ॥
अकंपनाची शरसुटी । हनुमंतासीं पुष्पवृष्टी ।
बाणांतें न गणी जगजेठी । शंका पोटीं असेना ॥ ४ ॥
गिरिशिखरेंसीं समान । शालवृक्ष उपटून ।
मारावया अकंपन । हनुमान जाण चालिला ॥ ५ ॥
बळें हाणितां शालवृक्ष । अकंपन अति दक्ष ।
हातींच्या हातीं छेदिला देख । साधोनि लक्ष संग्रामीं ॥ ६ ॥
बळें हाणितां अत्यद्भुत । वृक्ष छेदिला हातांत ।
तेणें हनुमान अति विस्मित । वीर विख्यात अकंपन ॥ ७ ॥
हनुमंताचा आघात । निवारुं शके इंद्रजित ।
अकंपन वीर विख्यात । केला घात शालवृक्षा ॥ ८ ॥
बळें हाणितां मारुती । वृक्ष छेदिला हातींच्या हातीं ।
अकंपनाची रणव्युत्पत्ती । सुर वानिती स्वर्गस्थ ॥ ९ ॥
विध्वस्तं कर्म तद् दृष्ट्वा हनूमान्प्रेक्ष्य विस्मितः।
स गृहीत्वा गिरेःशृंगं जवेनाभिससार तम्॥३६॥
दुरादेव महाबाणैरर्धचंद्रैर्व्यदारियत् ।
तं पर्वताग्रभाकाशे रक्षोबाणविदारितम् ॥३७॥
विकीर्णं पतितं दृष्ट्वा हनुमान्क्रोधमूर्च्छितः ।
सोऽश्वकर्ण समासाद्य रोषदर्पान्वितो हरिः ॥३८॥
तूर्णमुत्पाटयामास महागिरिमिवोचितम् ।
तं गृहित्वा महाकायं भ्रामयामास संयुगे ॥३९॥
प्रधावन्नुरुवेगेन बभंज तरसा द्रुमान्॥४०॥
अकंपनाचा प्रतिकार व दर्पोक्ती :
अकंपनें छेदिला शालद्रुम । कपीचें वृथा गेलें कर्म ।
तेणें हनुम्यासीं विस्मय परम । दृढ विक्रम अकंपनां ॥ १० ॥
घाये मारावया अकंपन । गिरिशिखर घेवोनि जाण ।
हनुमान धांवला आपण । शिखरें प्राण घ्यावया ॥ ११ ॥
शिखर हाणितां हनुमान वीर । लघुलाघवें विंधोनि शर ।
शतधा छेदिलें शिखर । बळें दुर्धर अकंपन ॥१२ ॥
अकंपन छेदितां शिखर । राक्षस करिती जयजयकार ।
बळ वानिती ऋषीश्वर । स्वर्गी सुरवर वानिती ॥ १३ ॥
अर्धचंद्रबाणाच्या झडाडां । शिखर छेदूनि पाडितां पुढां ।
हनुमान विस्मित जाला गाढा । निर्वाणनिधडा अकंपन ॥ १४ ॥
देखोनि अकंपनाची ख्याती । बाणलाघवी शीघ्रगती ।
राक्षसांमाजी अति पुरुषांर्थी । त्यासी मारुती मारुं पाहे ॥ १५ ॥
अकंपनाचा घ्यावया प्राण । वृक्ष उपटोनि अश्वकर्ण ।
हनुमान धांवोनि आपण । वृक्ष भवंडोनि हाणित ॥ १६ ॥
अश्वकर्णाच्या आघातीं । लघुलाघवें हाणी मारुती ।
वृक्ष सोडिले नेणों किती । पडावया क्षिती अकंपन ॥ १७ ॥
बाणलाघवी अकंपन । चमत्कारें शर विंधोन ।
वृक्ष छेदितां अश्वकर्ण । छेदी आन आन द्रमा ॥ १८ ॥
वृक्ष छेदोनि पाडितां तळीं । अकंपन दे आरोळी ।
आल्हाद राक्षसांच्या दळीं । पितिळी टाळी सकळिकीं ॥ १९ ॥
सुरासुर नर वानर । अवघे आश्चर्य मानिती थोर ।
अकंपन निधडा वीर । स्वयें समग्र मानिती ॥ २२० ॥
हनुमंताचे तीन विक्रम । अकंपनें केलें निर्धर्म ।
तेणें कपीसीं सुखसंभ्रम । आल्हाद पूर्ण युद्धाचा ॥ २१ ॥
अकंपना तुझी युद्धख्याती । रणीं तुष्टलों मी मारुती ।
तुज मी न मारीं युद्धावर्तीं । जाय लंकेप्रती विजयेंसीं ॥ २२ ॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । हास्य करी अकंपन ।
जंव तुझा घेतला नाहीं प्राण । तंववरी जय मज नाहीं ॥ २३ ॥
आधीं मारीन हनुमंता । मग मारीन सौमित्रिरघुनाथां ।
अंगद सुग्रीव जांबवंता । मारीन समस्तां वानरां ॥ २४ ॥
इतुकें केलिया रणकंदन । माझ्या अंगी विजय पूर्ण ।
ऐसें ऐकताचि वचन । हनुमान दारुण क्षोभला ॥ २५ ॥
हनूमान्परमकुद्धःश्चरणैः कंपयन्महीम् ।
जघान समरे क्रुद्धान्पदातींश्चापरान्बुहून् ॥४१॥
तमापतंतं संरब्धं राक्षसानां भयावहम् ।
ददर्शकंपनो वीरश्चुक्रोधन ननाद च ॥ ४२ ॥
स चतुर्दशभिर्बाणैर्विशिखैर्मर्मभेदिभिः ।
निर्बिभेद महावीर्यं हनुमंतमकंपनः ॥४३॥
स तथा तेन विद्धोऽपि बहुभिर्मार्गणैः शितैः ।
हनूमान् ददृशे वीरो रुधिरेण समुक्षितः ॥४४॥
उत्पाट्य सहसा वृक्षं कृत्वा वेगम्नुत्तमम् ।
शिरस्यभिजघानाशु राक्षसेंद्रकंपनम् ॥४५॥
अकंपनाचा वध :
हनुमान रागें धांवतां पाहीं । राक्षससैन्य रगडी पायीं ।
पुच्छघायें वीर पाडित ठायीं । अकंपन पाहीं कोपला ॥ २६ ॥
चौदा बाणीं त्वरित । हृदयीं विंधिला हनुमंत ।
तेही बाणीं कपि उन्मत्त । क्रोधान्वित चालिला ॥ २७ ॥
वृक्ष उपटोनि सत्राण । मस्तकीं टाकितां संपूर्ण ।
रथा सारथ्यासहित जाण । सांडिला प्राण अकंपनें ॥ २८ ॥
राक्षसांचे पलायन व रावणास क्रोध व चिंता :
अकंपने सांडितां प्राण । धाकें पळती रक्षोगण ।
त्यांसी वानरीं केलें कंदन । रणमर्दन राक्षसां ॥ २९ ॥
वोडण खड्ग धनुष्यबान । सांडोनि अलंकार आभारण ।
राक्षस घेवोनि पळती प्राण । रणीं अकंपन पाडिला ॥ ३० ॥
राक्षस अति भयें पळत । लंकाद्वारीं विमर्द होत ।
वानर आले रे मारित । बोंब सांगत नगरस्थां ॥ ३१ ॥
पुढें पळत मागें पाहत । अवघे आलें लंकेआंत ।
रावणासी स्वयें सांगत । केला घात अकंपना ॥ ३२ ॥
घायाळ आले कुंथत । ते सांगतीं निजवृत्तांत ।
एकला येवोनि हनुमंत । केला घात सर्वांचा ॥ ३३ ॥
हें ऐकोनि लंकानाथ । करावया राक्षसांचा घात ।
मुळीं लागला हनुमंत । चिंताग्रस्त रावण ॥ ३४ ॥
समेत्य हरयः सर्वे हनुमंतमपूजयन् ।
सोऽपि प्रहृष्टस्तान्सर्वान्वानरान्प्रत्यपूजयत् ॥४६॥
मर्दूनि राक्षससैन्य । करितां रामनामगर्जन ।
परतले वानरगण । उल्लास पूर्ण विजयाचा ॥ ३५ ॥
वानर मिळोनि समस्त । लोटांगण नमनयुक्त ।
अवघीं पूजिला हनुमंत । यशवंत रणरंगी ॥ ३६ ॥
निगर्वी वीर हनुमंत । अंगद सुग्रीव जांबवंत ।
नळनीळादि महंत । वानर समस्त वंदिले ॥ ३७ ॥
घालोनियां लोटांगण । वंदिले श्रीराम लक्ष्मण ।
जयजयकारें गर्जे गगन । हर्षें त्रिभुवन कोंदले ॥ ३८ ॥
एकाजनार्दना शरण । स्वयें हनुमंत आपण ।
अकंपनातें निर्दळून । श्रीरामचरण वंदिले ॥ ३९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडें एकाकारटीकायां
वज्रदंष्ट्रअकंपनवधो नाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥
ओव्या ॥ २३९ ॥ श्लोक ॥ ४६ ॥ एवं ॥ २८५ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara