भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा

द्वंद्वंयुद्ध वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

बिभीषणाला अंगदाने आणलेल्या मुकुटाचे अर्पण :

सभेंत गांजूनि रावणातें । अंगदे आणिल्या मुकुटातें ।
श्रीरामें आपुल्या निजहातें । बिभीषणातें वाहिला ॥ १ ॥
मुकुट बाणतां बिभीषणासीं । देखोनि उल्लास वानरांसी ।
राजशोभा शोभली त्यासीं । श्रीरामासीं आल्हाद ॥ २ ॥

ददृशुर्वानरा वीरा भीषणं च बिभीषणम् ।
मुकुटेन प्रभासंतं त्रिकूटमिव मंदरम् ॥१॥
रामस्तु बहुभिर्हृष्टैर्विनदद्‌भिः प्लवंगमैः ।
वृतो रिपुवधाकाक्षी युद्‍धायैव प्रवर्तत ॥२॥

मुकुट बाणतां बिभीषणासीं । कैसी शोभा आली त्यासी ।
जेंवी मंदराद्रि रत्‍नशिखरेंसीं । शोभा तैसी बिभिषणा ॥ ३ ॥
मस्तकीं बाणतांचि मुकुट । जैसा जाला राज्यपट ।
तैसा दिसताहे तेजिष्ठ । अति वरिष्ठ बिभीषण ॥ ४ ॥
बिभीषण आज्ञेचें भय भारी । जेंवी राजमुद्रा बाणली शिरीं ।
ऐसा देखोनि वानरीं । नवलपरी तिहीं केली ॥ ५ ॥
मिळोनियां वानरवीरीं । रामाज्ञा वंदूनि शिरीं ।
छत्र धरोनि बिभीषणावरी । जयजयकारीं गर्जती ॥ ६ ॥
नवछत्र रावणावरी । झडपून आणिलें वानरीं ।
धरोनि बिभीषणावरी । जयजयकारीं गर्जती ॥ ७ ॥
बिभीषण देखोनि छत्रांकित । अति उल्लासें उल्लासित ।
स्वयें जाला श्रीरघुनाथ । नामें गर्जत वानर ॥ ८ ॥
सत्यसंकल्प श्रीरघुनाथ । बिभीषण जाला राज्यप्राप्त ।
वानर आल्हादें नाचत । स्वयें गर्जत हरिनामें ॥ ९ ॥

बिभीषणाचा छत्र स्वीकारण्यास नकार :

छत्र नसतां रघुनाथा । मज धरुं नये सर्वथा ।
स्वामिमर्यादा संरक्षिता । अति ज्ञाता बिभीषण ॥ १० ॥
छत्र ठोवोनियां दुरी । गदा घेवोनियां करीं ।
मिळोनि सुग्रीवामाझारीं । नमस्कारीं श्रीरामा ॥ ११ ॥
बिभीषण निजव्युत्पत्ती । अंगदाची शौर्यशक्ती ।
अंगदाची अगाध ख्याती । अनुवादे कीर्ति आल्हादें ॥ १२ ॥
ज्याचें बंदीं सुरगण । तोही आक्रमून रावण ।
चरणीं दशकंठ मर्दून । मुकुट हिरोन आणिला ॥ १३ ॥
ऐसी करावया ख्याती । त्रिलोकीं कोणा नाहीं शक्ती ।
अंगदाची अगाध कीर्तीं । सुर वानिती स्वर्गस्थ ॥ १४ ॥
अंगदाची वीरवाढिव । वानर करिताती भाटिव ।
गुण अनुवादे श्रीराघव । भाग्यवैभव अंगदा ॥ १५ ॥
शिष्टाई न मानीच रावण । तेणें क्षोभला रघुनंदन ।
करावया रिपुदलन । रणगर्जनें चालिला ॥ १६ ॥

उत्तरं द्वारमागत्य रामः सौ‍मित्रिणा सह ।
आवृत्य वलवांस्तस्थौ सुग्रीवश्च महाबलः॥३॥
गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
भीमो दधिमुखश्चैव केसरी पनसस्तथा॥४॥
एतस्मिन्नंतरे चक्रुः स्कंधावारनिवेशनम्॥५॥

रामचंद्रांचे सुग्रीवासह लंकेच्या उत्तर द्वाराजवळ आगमन :

लंकाउत्तरद्वाराजवळीं । राम आला महाबळी ।
सौ‍मित्रही आला तत्काळीं । शस्त्रसमेळीं सन्नद्ध ॥ १७ ॥
गेला देखोनि रघुनाथ । सुग्रीव जो कां वानरनाथ ।
कपिसमुदायासमवेत । आला तेथ अति शीघ्र ॥ १८ ॥
सन्नद्ध बद्ध गदापाणी । बिभीषण आला तत्क्षणीं ।
भिडावया रणांगणीं । रामाज्ञेलागूनी तिष्ठत ॥ १९ ॥
गेला देखोनि रघुनाथ । नळ नीळ जांबवंत ।
अंगदादि हनुमंत । वानर समस्त स्वयें आलें ॥ २० ॥
आपुलाल्या निजकोटीं । वानरवीर जगजेठीं ।
राहिले पैं नेहटानेहटीं । युद्धसन्निष्ठीं सन्नद्ध ॥ २१ ॥
गज गवाक्ष गवय जाण । शरभ ऋषभ गंधमादन ।
भीम दधिमुख सुषेण । केसरी दारुण रणयोद्धा ॥ २२ ॥
वीर वानर जो कां पनस । युद्धालागीं अति कर्कश ।
करावया राक्षसांचा नाश । अति उल्हास युद्धाचा ॥ २३ ॥
हे अकराही वीर जाण । युद्धार्थीं अति दारुण ।
तिहीं केलें जें विंदान । करावया रण तें ऐका ॥ २४ ॥

राक्षसांवर हल्ला :

लंकादुर्गाहून उंच पर्वत । वानरीं आणोनियां त्वरित ।
अकरा वीर वेघोनि तेथ । राक्षसांत मांडिला ॥ २५ ॥
तें देखोनि वानर । अवघीं आणोनि गिरिवर ।
त्यांवरीं वेंघोनि सत्वर । राक्षसमार मांडिला ॥ २६ ॥
लंकाचौपासीं वानर । पर्वताग्रीं महावीर ।
करीत रामनामाचा गजर । आले दुर्धर युद्धार्थ ॥ २७ ॥
लंकेआंत अति आकांत । देखोनियां लंकानाथ ।
करावया वानरांचा अंत । स्वयें धाडित निजयोद्धे ॥ २८ ॥

रुद्‍धां तु नगरीं श्रुत्वा जातक्रोधो निशाचरः ।
विधानं द्विगुणं कृत्वा प्रासादं चाप्यरोहतः॥६॥
ते हयैः कांचनापीडैर्गश्चाद्‍भुतदर्शनैः ।
रथैश्चादित्यसंकाशैः कवचैश्च मनोरमैः॥७॥
विनिर्जग्मुर्महावीरा नादयंतो महीतलम् ।
राक्षसा भीमकर्माणो रावणस्य जयैषिणः॥८॥
वानराणामपि चमूर्महती जयमिच्छताम् ।
युद्धतां तु तदा तेषां वानराणां महात्मनाम्॥९॥
राक्षसां च बभूवाथ बलकोपसुदारुणः॥१०॥

रावणाची प्रतिकारार्थ आज्ञा :

वानरीं रोधिलें लंकाभुवन । ऐसें ऐकोनि दशानन ।
कराया वानरांसीं रण । युद्धार्थीं आपण स्वसैन्य धाडी ॥ २९ ॥
देखोनियां वानर प्रबळ । त्यांहूनि द्विगुणित राक्षसदळ ।
नावनिगे वीर सकळ । रणकल्लोळ करुं धाडी ॥ ३० ॥
अश्वसैन्य सहपरिवारीं । सुवर्णाभरणें त्यांमाझारी ।
हो हो मा मा जी जी करीं । वीर संभारीं चालिलें ॥ ३१ ॥
गजसैन्याचे पैं थाट । मदोन्मत्त अति उद्‌भट ।
दंती मणिबंध तिखट । ते गजघंट असंख्य ॥ ३२ ॥
सन्नद्ध बद्ध शस्त्रास्त्रीं । चालिल्या रथांचिया हारी ।
ध्वज पताका त्यांवरी । खळकती झालरी मोत्यांच्या ॥ ३३ ॥
अढाऊ चव्हाण कोयतकार । सेळीं साबळी धनुर्धर ।
आले पायाचे मोगर । वीर दुर्धर गर्जती ॥ ३४ ॥
रत्‍नें मुक्ताफळें हिरा । कवचें बाणलीं महावीरां ।
अश्वीं झळकती पाखरा । शस्त्रसंभारें लखलखित ॥ ३५ ॥
राक्षसवीर आतुर्बळी । दिधली सिंहनादें आरोळी ।
निधा उठला पाताळीं । नाद निराळीं कोंदला ॥ ३६ ॥
देखोनि राक्षसांचा भार । युद्धा खवळले वानर ।
रामनामाचा गजर । दिधला भुभुःकार महावीरीं ॥ ३७ ॥
लंकाद्वारीं राक्षसकोटी । दोही सैन्यां दृष्टादृष्टी ।
सुटली शस्त्रास्त्रांची वृष्टी । कांपत पोटीं यमकाळ ॥ ३८ ॥
राक्षसवीर स्वयें गर्जती । विजयी आमुचा लंकापती ।
वानर रामनामें गर्जती । रघुपति निजविजयी ॥ ३९ ॥
वीरां वानरां होत मेळ । रणीं उठिला हलकल्लोळ ।
खवळला रणवेताळ । रणगोंधळ नाचत ॥ ४० ॥
एक हाणिती शक्तीशुळें । दुजे हाणिती शालताळें ।
एक वर्षती शरजाळें । दूजे अंतराळें महाशिळा ॥ ४१ ॥
एक हाणिती चेंडूचक्रें । दुजे हाणिती शिळाशिखरें ।
एक हाणिती तोमरें । वृक्षाग्रें पैं एक ॥ ४२ ॥
वीर वर्षती विचित्र बाण । वानर वर्षती पाषाण ।
परिघ हाणितां दारुण । तत्काळ मरण राक्षसां ॥ ४३ ॥
करितां शस्त्रास्त्रीं घात । वानर वर्षती पर्वत ।
अश्वगजां चूर होत । रथ मोडत ध्वजेंसीं ॥ ४४ ॥
वानरवीर भद्रजाती । पुच्छीं बांधोनियां हस्ती ।
बळें उपडितां क्षिती । असंख्य मरती पायांचे ॥ ४५ ॥
निधडे वीर पडिले ठायीं । पायींचे रगडिले पायीं ।
वानरां शिवणें नाहीं भुयी । मारीत पाहीं गगनस्थ ॥ ४६ ॥
वानरवीरीं घालोनि उडी । रथ भंगिले कोट्यनुकोटी ।
रणीं मर्दिली रणघोडीं । गजकरवडी पाडिल्या ॥ ४७ ॥
राक्षसीं वानरांचा करितां घात । कपि उसळती गगनांत ।
तेथोनि करिती पर्वतपात । वीर मारित असंख्य ॥ ४८ ॥
वानर धायवट होत । श्रीरामपदरजें पायवणी सेवीत ।
सवेचि येवोनि युद्धाआंत । वीर मारीत रणमारें ॥ ४९ ॥

श्रीरामनामस्मरणाने पुनः युद्धास प्रवृत्त :

वानरवीर पडतां रणीं । रामनामाच्या स्मरणीं ।
मरण पळे त्यांपासूनी । उठती रणीं रणमारा ॥ ५० ॥
श्रीराम असतां पाठीसीं । भय नाहीं वानरांसी ।
रणीं मर्दूनि राक्षसांसी । अति संत्रासीं त्रासिले ॥ ५१ ॥
करितां रामनामस्मरण । तेथें रिघों न शके मरण ।
तो श्रीराम असतां जाण । वानरां निधन असेना ॥ ५२ ॥
न चले आंगिक निजबळ । सस्त्रास्त्रें सुटलीं सकळ ।
वानरवीर अति प्रबळ । राक्षसदळ भंगलें ॥ ५३ ॥
मारितां राक्षसांच्या श्रेणी । अशुद्ध वाहों लागलें धरणीं ।
जाली मासांची चिडाणी । उरले जे रणीं ते पळताती ॥ ५४ ॥
मोडलें देखोनि निजसैन्यासी । कोप आला इंद्रजितासी ।
तोही निघाला युद्धासीं । अति आवेशीं सन्नद्ध ॥ ५५ ॥

एतस्मिन्नंतरे तेषामन्योन्यमभिधावताम् ।
राक्षसां वानराणां च द्वंद्वयुद्धमवर्तत ॥११॥

चोवीस जण वानरवीर । चोवीस योद्धे निशाचर ।
द्वंद्वयुद्ध घोरांदर । सविस्तर अवधारा ॥ ५६ ॥
इंद्रजित आणि अंगद । दोघा जणा द्वंद्वयुद्ध ।
प्रजंघ अतिक्रुद्ध । करित युद्ध संपातीसीं ॥ ५७ ॥
अतिकाय रावणपुत्र । विनीत आणि रंभुवानर ।
या दोघांसी युद्ध दुर्धर । करी सत्वर अति युक्तीं ॥ ५८ ॥
महोदर आणि सुषेण । मकराक्ष जांबुवंतेंसी रण ।
विद्युज्जिव्हा शातबळी जाण । गजप्रतापनां द्वंद्वयुद्ध ॥ ५९ ॥
जांबवंताचा बंधु धूम्र । त्यासीं कुंभकर्णपुत्र ।
देवांतक रावणकुमार । गवाक्ष वीर तेणेंसीं ॥ ६० ॥
सारण आणि कपि ऋषभ । त्रिशिरा आणि शरभ ।
नरांतकपुत्र प्रगल्भ । पनस स्वयंभ तेणेंसीं ॥ ६१ ॥
अकंपन आणि कुमुदहारी । धूम्राक्ष आणि केसरी ।
महापार्श्व गंधमादनावरी । शुकरणाग्रीं वेगदर्शीं ॥ ६२ ॥
जंबुमाळीसीं हनुमान आपण । मित्रघ्नेंसीं बिभीषण ।
निकुंभ नीळेंसीं महारण । तपन तो जाण नळासीं ॥ ६३ ॥
प्रघसा सुग्रीवासीं रण । विरुपाक्ष आणि लक्ष्मण ।
अशनिप्रभा द्विविदकंदन । वज्रमुष्टि पूर्ण मैदासीं ॥ ६४ ॥
ऐसे चोवीसही जोडे । युद्धा मिसळले गाढे ।
युद्ध केलें पडिपाडें । निजनिवाडें अवधारा ॥ ६५ ॥
वाजंत्र्यांच्या निजगजरीं । ढोलनिशाण टमकी भेरी ।
सिंहनाद करोनि वीरीं । परस्परीं मिसळले ॥ ६६ ॥
इंद्रजित अतिविंदानी । अंगद लक्षोनियां रणीं ।
शस्त्रास्त्रें वर्षोनि बाणीं । येरें चुकवोनी सांडिलीं ॥ ६७ ॥
अंगदाच्या हृदयभेदा । करावया सोडिली दुर्धर गदा ।
गगना उसळला योद्धा । घावो नुसता तळीं गेला ॥ ६८ ॥

इंद्रजित अंगद यांचे द्वंद्वयुद्ध :

तेथोनि घालोनियां उडी । सारथीसहित मारिली घोडीं ।
रथ भंगिला कडाडीं । छत्रें मोडिलीं पुच्छाग्रें ॥ ६९ ॥
इंद्रजित धाकें घालिता उडी । वानर मुकुटातें आसुडी ।
सवेंचि देतां पैं थापडी । आली भवंडी प्राणांता ॥ ७० ॥
पूर्वील हनुमंत आघात । तेणें इंद्रजित नित्य धाकत ।
पुढती अंगदाचा घात । आला प्राणांत रोकडा ॥ ७१ ॥
वानरें केला अस्ताव्यस्त । मोखळे केशीं आणि विरथ ।
पळों जातां लंकेआंत । लज्जान्वित इंद्रजित ॥ ७२ ॥
पळोनि जातां इंद्रजितासी । अंगदें धांवोनि धरिला केशीं ।
येरें कापूनि बुचड्यासी । अंतर्धानेंसीं पळाला ॥ ७३ ॥
रणीं वानरासीं संमुख । युद्धीं माझें न सरेचि मुख ।
इंद्रजितासी परम दुःख । पोटीं आणिक तेणें धरिलें ॥ ७४ ॥
करोनियां निःसीम युद्ध । रामलक्ष्मणादि कपि सन्नद्ध ।
अवघियां करीन शरबद्ध । ऐसें विरुद्ध मनीं धरिलें ॥ ७५ ॥

अन्य वीरांची द्वंद्वयुद्धे :

येरीकडे द्वंद्वयुद्ध । वीरां वानरां अति उन्नद्ध ।
आयणीपायणीचे बाध । तेंही युद्ध अवधारा ॥ ७६ ॥
प्रजंघ वीर ती बाणीं । संपाती कपि विंधिला रणीं ।
तेणें ते बाण चुकवूनी । अश्वकर्णीं ठोकिला ॥ ७७ ॥
अश्वकर्णाऐसीं पत्रें पूर्ण । तो वृक्ष म्हणती अश्वकर्ण ।
तेणें तो वृक्ष ठोकून । मूर्च्छापन्न प्रजंघ ॥ ७८ ॥

अतिकाय आणि रंभु यांचे द्वंद्वयुद्ध :

अतिकायसुत रावणी । रंभु विनीत वानर दोनी ।
पाचारुनि रणांगणीं । अमितां बाणीं विंधलें ॥ ७९ ॥
वंचूनि त्याचे बाण दुर्धर । कोपें खवळले वानर ।
वर्षले शिळा पर्वत घोर । केले चकचूर राक्षस ॥ ८० ॥
अतिकाय पर्वतपातीं । धनुष्य भंगून ठेंचला लातीं ।
रथ भंगून सारथी । पडिला क्षितीं मूर्च्छित ॥ ८१ ॥
महोदरें रणीं सुषेण । हृदयीं विंधिले पांच बाण ।
तेणें त्याचा जावा प्राण । रामस्मरणें जाण वांचला ॥ ८२ ॥
करितां रामनामस्मरण । आलें चौगुणें स्फुरण ।
पंच योजनें शिळा दारुण । घाली सुषेण त्यावरी ॥ ८३ ॥
महोदरें लवडसवडी । लंकेमाजी घातली उडी ।
रथ सारथी मारिलीं घोडीं । सैन्य शिळेबुडीं असंख्य ॥ ८४ ॥
मकराक्ष खरात्मज । जांबवंत ऋक्षराज ।
दोहींसीं युद्धाचें व्याज । रणसमाज रणमारें ॥ ८५ ॥
जांबवंत घेवोनि वृक्ष । रणीं ठोकिला मकराक्ष ।
येरें छेदोनियां देख । बाण असंख्य वर्षला ॥ ८६ ॥
जांबवंतें करतळीं । हाणोनि पाडिला सभामंडळीं ।
रावणाच्या पायांजवळी । मूर्च्छासमेळीं मकराक्ष ॥ ८७ ॥
जांबवांतें करांगुळीं । मर्दून सैन्य केली रांगोळी ।
रथसूताश्वसमेळीं । मेळविला धुळी मकराक्ष ॥ ८८ ॥
विद्युज्जिव्ह राक्षस बळी । बाणीं विधिला शतबळी ।
अश्वपर्णवृक्ष पैं कपाळीं । हाणोनि तळीं पाडिला ॥ ८९ ॥
गज आणि प्रतपन । दोघीं केलें दुर्धर रण ।
वाम पार्श्वी गजासी जाण । शूळें संपूर्ण खोंचिलें ॥ ९० ॥
गज क्षोभला दुर्धरशक्ती । शालवृक्ष घेवोनि हातीं ।
हाणून लघुलाघवगतीं । पाडिला क्षितीं प्रतपन ॥ ९१ ॥

कुंभ – धूम्राक्ष द्वंद्वयुद्ध :

कुंभ जो कां कुंभकर्णकुमर । जांबवंतबधु धूम्राक्ष वीर ।
दोघां द्वंद्वयुध दुर्धर । येरां येर नाटोपती ॥ ९२ ॥
दोघे वीर आतुर्बळी । रणीं विचरत सैन्यमेळीं ।
गदापट्टिशतोमरत्रिशूळीं । शालताळीं वानर ॥ ९३ ॥
धूम्रें हाणितां पायावरी । कुंभ मूर्च्छित जाय चांचरी ।
सेवकीं नेला लंकेमाझारीं । जाली महामारी राक्षसां ॥ ९४ ॥

देवांतक व गवाक्षाचे द्वंद्वयुद्ध :

देवांतक जो रावणी । गवाक्ष विंधिला पांच बाणीं ।
तेणें ठेंचून पाय पाषाणीं । तत्क्षणी मोडिले ॥ ९५ ॥
गवाक्ष कोपोनि वानर । शालवृक्ष उपडोनि थोर ।
रागें हाणों जातां रावणपुत्र । तेणें तो सत्वर छेदिला ॥ ९६ ॥
आणिक विंधितां नव बाण । गवाक्षें वरिचेवरी झेलून ।
मग शिळा शिखरें वर्षोन । केलें कंदन देवांतका ॥ ९७ ॥
धनुर्बाण शस्त्रें सारथी । अश्वरथ उपडिला क्षितीं ।
देवांतक वीर पदाती । मुष्टिघातीं मिसळला ॥ ९८ ॥
उरीं शिरीं खांदां कोपरीं । दंडीं मुंडपीं थडका उरीं ।
तडवें हाणोनि परस्परीं । चक्राकारीं भवंडिले ॥ ९९ ॥
दोघे पुरुषार्थी दादुले । उसण्याघाई भिडिन्नले ।
दोघे श्रमस्वेदें क्लिन्न जाले । दोघे पडिले मुर्च्छित ॥ १०० ॥

सारण, ऋषभ व त्रिशिरा यांचे युद्ध :

सारणें वीरें युद्धावरी । ऋषभ पाचारिला रणाग्रीं ।
एकाएकीं उरावरी । शालवृक्ष ठोकिला ॥ १ ॥
वृक्ष आदळतांचि उराडीं । दोहीं डोळां आली भोवंडी ।
जावोनि अडखळे गडबडीं । पडली मुरकुंडी सारणाची ॥ २ ॥
मेघवर्ण कुंजरावरी । त्रिशिरा बैसोनियां गजरीं ।
वेगें येवोनि शरभावरी । तोमरें शिरीं ताडिला ॥ ३ ॥
तोमर लागावा जों शिरीं । घाव चुकविला लाघवेंकरीं ।
सप्तपर्ण तरुसंभारीं । गजकुंभावरी ताडिला ॥ ४ ॥
गज हाणितां कुंभावरी । वृक्ष आदळला त्रिशिरावरी ।
दोघे जावोनि चांचरी । धरेवरी लवंडले ॥ ५ ॥

नरांतक व पनस, अकंपन व कुमुद यांचे द्वंद्वयुद्ध :

नरांतक रावणसुत । पनस वानर विख्यात ।
त्यासीं युद्धकंदनार्थ । बाणीं विंधित ऊठिला ॥ ६ ॥
येतां देखोनि त्या बाणासी । पनस उडाला आकाशीं ।
तेथोनि सोडितां पर्वतासी । कासाविसी नरांतक ॥ ७ ॥
वर्षतां शिळसंपातीं । शिरींचा मुकुट क्षितीं ।
रथींचा मारिला सारथी । घोडे रथ नेतीं सुनाट ॥ ८ ॥
घोडी रथ नेला लंकाभिमुख । नरांतक झाला विमुख ।
कटकीं वाजली एकचि हाक । तें परम दुःख नरांतका ॥ ९ ॥
अकंपनें कुमुदासीं । परिघें हाणितांचि शिसीं ।
मेटें वळलीं वानरांसीं । मग भूमीसीं बैसला ॥ ११० ॥
सवेंचि उठोनि उठा उठीं । अकंपनें देखोनि दृष्टीं ।
कुमुदें हाणितां मुष्टी । पडिला सृष्टीं निर्जीव ॥ ११ ॥
धूम्राक्ष आणि केशरी । युद्ध करितां चक्राकारीं ।
एक वर्षे शरधारीं । शिळाशिखरीं पैं दुजा ॥ १२ ॥
केसरी उडोनि प्रत्यक्ष । पायीं धरोनि धूम्राक्ष ।
बळें भोंवंडोनि देख । अधोमुख पाडिला ॥ १३ ॥
महापार्श्व गंधमादन । दोघीं युद्ध केले दारुण ।
शस्त्रास्त्रीं बाण पाषाण । रणकंदन अत्युग्र ॥ १४ ॥
गंधमादनें लवडसवडी । महापार्श्वावरी घालोनि उडी ।
बळें झोंबून कडाडीं । तडाफोडी तो केला ॥ १५ ॥
पुच्छें आकळोनि स्पष्ट । नखीं नांगरिलें पोट ।
दांतीं करांडिला कंठ । रणीं यथेष्ट गांगिला ॥ १६ ॥
वेगदर्शी वीर वानर । शुक लाघवी निशाचर ।
दोघां युद्ध घोरांदर । अति दुर्धर तीहीं केलें ॥ १७ ॥
वेगदर्शी स्वयें उडोन । रथ उपटितां जाण ।
अश्व सारथि जाले चूर्ण । शुक पळोन स्वयें गेला ॥ १८ ॥

तपन व नळ यांचे द्वंद्वयुद्ध :

तपन आणि वानर नळ । दोघीं युद्ध केलें तुंबळ ।
नळें थाप देवोनि सबळ । डोळे तत्काळ फोडिले ॥ १९ ॥
तपन जालें आंधळें । युद्ध करीना मागें पळे ।
पडिलें रणमीसीं लोळे । मग तें नळें उपेक्षिलें ॥ १२० ॥
पूर्वी जंबुमाळी जाण । हनुम्यानें मारिला आपण ।
त्याचा सूड घ्यावया पूर्ण । जंबु आन स्वयें आला ॥ २१ ॥
जंबु झाला पैं रथस्थ । रथव्युत्पत्ती दावी समस्त ।
तेणें तीं बाणीं हनुमंत । हृदयाआंत विंधिला ॥ २२ ॥
हनुमंत वज्रदेही । बाण विंधिल्या नव्हे कांही ।
ते बाण उसळोनियां पाहीं । जंबूच्या देही खडतरले ॥ २३ ॥
तयाच्या लघुलाघवाआंत । रथीं येवोनि हनुमंत ।
तळप्रहारें शिरःपात । जंबु रणांत पाडिला ॥ २४ ॥
मित्रघ्न चापविंदानी । बिभीषण विंधिला बाणीं ।
बिभीषणें गदा हाणोनी । पाडिला धरणीं मित्रघ्न ॥ २५ ॥
सैन्य त्रासित घसाघस । अति बळी वीर प्रघस ।
स्वयें जिणावया सुग्रीवास । रणभिवेष युद्धार्थीं ॥ २६ ॥
प्रघस जंव सोडी बाण । तंव सुग्रीवें आपण ।
वृक्ष घेवोनि सप्त पूर्ण । घेतला प्राण प्रघसाचा ॥ २७ ॥
सुग्रीवाच्या घायापुढें । प्रघस कायसें बापुडें ।
घायें चूर केलीं हाडें । अशुधद उडे आकाशीं ॥ २८ ॥

विरुपाक्ष-लक्ष्मणाचे युद्ध :

विरुपाक्ष आणि लक्ष्मण । दोघीं आरंभिलें लाघवी रण ।
लक्ष्मणें विंधोनि बिकट बाण । घेतला प्राण बाणें एकें ॥ २९ ॥

वज्रमुष्टी मैद व द्विविद् यांचे युद्ध :

वज्रमुष्टीसीं कपि मैद । दोघां जालें दुर्धर युद्ध ।
घाय हाणोनि विविध । रणविमर्द तिहीं केला ॥ १३० ॥
वज्र मुष्टी सुनी दृष्टी । मैंद हाणितां निजमुष्टीं ।
घायें पाडियेला सृष्टीं । जेंवी धूर्जटी त्रिपुरातें ॥ ३१ ॥
द्विविद अशनीपडिपाडीं । युद्धीं द्विविदें मारिली घोडीं ।
रथ मोडितां कडाडीं । पाडिली मुरकुंडी अशनिप्रभा ॥ ३२ ॥

निकुंभ व नीळ यांचे तुंबळ युद्ध :

निकुंभ आणि सेनानी नीळ । दोघां जाहलें तुंबळ ।
निकुंभें सोडूनि शरजाळ । निळासी तत्काळ उपहासी ॥ ३३ ॥
तूं तंव वानर बापुढें । केंवी राहसी मजपुढें ।
रणीं मारीन रोकडें । निजकुर्‍हाडें सोडिलें ॥ ३४ ॥
निकुंभाचे सतेज शर । पुच्छें छेदोनि समग्र ।
घेवोनि त्याचें रथचक्र । छेदोनि शिर पाडिला ॥ ३५ ॥

यज्ञकेत, शतघ्न, रश्मिकेत व यज्ञकोपन यांचे आगमन :

रावणाच्या सैन्याआंत । चौघे जण वीर विख्यात ।
दृष्टीं नाणितां लंकानाथ । बळोद्‍भुत अति बळी ॥ ३६ ॥
गाढी बळाची आंगवण । वानरवीर अति दारुण ।
अवघे लेखिती तृण । श्रीरामीं रण करुं आले ॥ ३७ ॥
यज्ञकेत आणि शतघ्न । रश्मिकेत यज्ञकोपन ।
चौघे वीर अति दारुण । रामीं रण करुं आले ॥ ३८ ॥
चौघें जण येतां देख । हनुमान म्हणे हे रंक मशक ।
मी असतां सिद्ध सेवक । धुरेसंमुख केंवीं येती ॥ ३९ ॥
मारावया चौघे जण । हनुमंतासीं आंगवण ।
सवेग करितां उड्डाण । गेलें किराण सत्यलोका ॥ १४० ॥
लघुलाघवी चौघे जण । विकट विचित्र विंदान ।
श्रीरामासीं विंधोन बाण । रणागर्जन तिहीं केलें ॥ ४१ ॥
धन्य धनुर्वाडा श्रीरामचंद्र । त्यांचे निवारोनियां शर ।
चौघांचेही छेदोनि शिर । रणीं महावीर मारिले ॥ ४२ ॥
वेगविंदानी श्रीरघुनाथ । परतोनि ये हनुमंत ।
तंव चौघांचाही करोनि घात । केलें विपरीत तें एका ॥ ४३ ॥
शिरें छेदितां आवेशीं । वेगें उडाली आकाशीं ।
गगनीं भेटलीं हनुमंतासी । गुह्य त्यापासी सांगत ॥ ४४ ॥
सवेग हस्ते श्रीरघुनाथ । शिरें छेदोनि केलीं मुक्त ।
तुझा अबळ पुरुषार्थ । आता कां व्यर्थ धांवसी ॥ ४५ ॥
ऐकोनि शिरांचे वचन । निराळीम् हनुमान लज्जायमान ।
वंदोनि श्रीरामचरण । जीवें निंबलोण स्वयें केलें ॥ ४६ ॥
हनुमान म्हणे मी शीघ्रगती । ऐसा गर्व होता चितीं ।
त्याहून श्रीराम शीघ्रहस्ती । वानूं किती पुरुषार्थ ॥ ४७ ॥

भल्लैः खङ्गेर्गदाभिश्च शक्तितोमरसायकैः ।
अपविद्धैश्च भग्नैश्च रथैः सांग्रामिकैर्हयैः ॥१२॥
निहतैः कुंजरैर्मत्तैस्तथा वानरराक्षसैः ।
चक्राक्षयुगदंडैश्च भग्नैर्भूतलमाश्रितैः ॥१३॥
बभूवादौ घनं घोरं गोमायुगणसंकुलम् ।
कबंधानि समुत्पेतुस्तस्मिन्युद्धे सुदारुणे ॥१४॥

असंख्य शस्त्रास्त्रांचा खणखणाट :

खड् भाले शूळशक्तीं । गदातोमरबाणगुप्तीं ।
रथ भंगिले नेणों किती । निमाले हस्ती असंख्य ॥ ४८ ॥
रथ मोडितां कडाखीं । सारथ्यांची मारिलीं घोडीं ।
सांग्रामिक हय कोडी । रणीं पडिपाडीं पाडिले ॥ ४९ ॥
रुधिराची नदी दुर्गम । मांसशोणिताचा कर्दम ।
वृकव्याघ्रादि गृध विहंगम । मांसें सुगम भक्षिती ॥ १५० ॥
शस्त्रास्त्रेंसीं सन्नद्ध । रणीं उठले कबंध ।
करावया दुर्धर युद्ध । रणीं विविध धांवती ॥ ५१ ॥
कोटिसैन्य पडिल्याअंतीं । शस्त्रें घेवोनियां हातीं ।
शिरेवीण धडें धांवती । कबंध म्हणती त्या नांव ॥ ५२ ॥
एका जनार्दना शरण । जाले द्वंद्वयुद्ध दारुण ।
पुढील कथा रणविंदान । युद्धदारुण अवधारा ॥ ५३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्‍कांडे एकाकारटीकायां
द्वंद्वयुद्धनिरुपणं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
ओव्या ॥ १५३ ॥ श्लोक ॥ १४ ॥ एवं ॥ १६७ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय नववा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *