संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा

दशरथाचे समाधान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम व जानकी यांची युती कशी दिसली :

जेंवी सुवर्ण आणि कांती । प्रभा आणि दिप्ती ।
तेंवी सीता आणि रघुपती । स्वयें शोभती निजतेजे ॥ १ ॥
कापूर आणि दृती । प्रकाश आणि ज्योती ।
भानु आणि दिप्ती । तेंवी भासती एकरुप ॥ २ ॥
साकरेमाजी गोडी देखा । सागरीं लहरींच्या झुळुका ।
तेवी माजी रघुकुळटिळका । जनकदुहिता शोभत ॥ ३ ॥
धात्याआंगी सावित्री । उमा शंकरजानूवरी ।
रमा समीप मुरारी । तेंवी रावणारीजवळी जनकत्मजा ॥ ४ ॥
जानकीयुक्त रघुनाथ । देखोनियां अति मंडित ।
सदैव त्रैलोक्यीं समस्त । आनंदभरित पैं जाले ॥ ५ ॥

दिव्याच्या परिक्षेत सीता उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांनाच आनंद, देवांची पुष्पवृष्टी :

दिव्या उतरली जानकी । तेणें आनंद सकळिकीं ।
वानर नाचती हरिखीं । पुच्छ मस्तकीं उभवोनी ॥ ६ ॥
घालिती उलटीं कोल्हाटे । वृक्ष झेलिती वाडेंकोडें ।
एक झेलिती पर्वतखडे । हरिखें माकडें नाचती ॥ ७ ॥
नळनीळादि जांबवंत । हनुमान आणि सुग्रीव तेथ ।
येवोनि नमिला रघुनाथ । आनंदभरित सकळिक ॥ ८ ॥
बिभीषणादि प्रमुख । सकळीं नमिला रघुकुळटिळक ।
सुर नर आनंदले आवश्यक । पुष्पवृष्टी देख तिहीं केली ॥ ९ ॥
वानरराक्षसांचिये स्थानीं । माजि श्रीराम चूडामणी ।
समवेत जनकनंदिनी । पुष्पींकरोनी मंडित ॥ १० ॥

दशरथ व देवादिकांना श्रीरामांचे नमन व
सीतेला दिव्य करावयास लावले त्याचे स्पष्टीकरण :

सकंळ सभा पुष्पमंडित । देखोनियां रघुनाथ ।
मस्तकांजुळी अति विनीत । स्त्वन करित देवांचें ॥ ११ ॥
लोटांगण अति प्रीतीसी । ब्रह्मया आणि शंकरासी ।
इंद्रादिकां सकळांसी । नमन सावकांशी पैं केलें ॥ १२ ॥
लोटांगण दशरथासी । करुन विनवी सकळांसी ।
क्षमा करावी मानसी । सर्वथा उदासी न व्हावें ॥ १३ ॥
उल्लंघोनि तुमच्या वचनासी । दिव्य मागितलें जानकीसीं ।
कोप न करावा तद्विषीं । माझें विनंतीसी परिसावें ॥ १४ ॥

अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता ।
अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥१॥

स्त्रियांचे स्वाभाविक सप्तदोष कोणते ? :

भलतिया स्त्रियेचे देहीं । करणी न करितां कांही ।
स्वाभाविक गुण पाहीं । ऐका तेही सांगेन ॥ १५ ॥
अनृताची ओतिली राशी । सत्य येवों नेदी दृष्टीसी ।
रिघोनि पतीच्या मानसीं । स्वेच्छा आणिकांसी विचरत ॥ १६ ॥
मनीं उद्यमाची ऐसी हांव । जे आकळीन ब्रह्मांड सर्व ।
तदर्थींचे युक्तिगौरव । अपार धांव मनाची ॥ १७ ॥
साहस करणें बहुत । तदर्थी शक्ति अद्‍भुत ।
इकडील तिकडे पर्वत । ठेवितां चित्त कष्टेना ॥ १८ ॥
बैसका सांडावी पर्वतीं । उलथों शके क्षिती ।
तरी विषयो धरिला चित्तीं । तो न सांडी भयलज्जा ॥ १९ ॥
हिताहित विचार । करणें नाहीं साचार ।
लोभें ओतिलें शरीर । क्रिया अपार मूर्खत्वाची ॥ २० ॥
ममतेचें तरी अधिष्ठान । आचार तितका लोभजन्य ।
सहसा उपरित नाहीं जाण । अपार श्रवण जरी केलें ॥ २१ ॥
कल्पपर्यंत गंगेप्रती । असतां पाषाणाची स्थिती ।
तिळही न भिजे निश्चिती । तेंवी श्रवणस्थिती स्त्रियांची ॥ २२ ॥
शौक त्यांचें केंवी सांगें । मद्याचा घट जेंवी गंगे ।
बुडवितांही सर्वांगें । नव्हे वेगे पैं शुद्ध ॥ २३ ॥
बाह्य दाविती आचार । अंतरीं वासना विचित्र ।
अहर्निशीं कामाचार । वृत्ति अपार सैरा विचरे ॥ २४ ॥
दयेचा तरी गंध नाहीं । कठिणताचि ओतिली देंही ।
विषयविषाद होतां पाहीं । डसे लवलाहीं घटीसीं ॥ २५ ॥
माता पिता अथवा पुत्र । भ्रतार हो कां सहोदर ।
खुती चुकतां अणुमात्र । घात सत्वर करुं पाहे ॥ २६ ॥
ऐसे स्त्रियेच्या देहीं । सहज गुण असती पाहीं ।
जनासी विश्वास न मने कांही । बहु उपायीं झाडा देतां ॥ २७ ॥
जानकीची निष्पापस्थिती। मीच जाणतों अंतरवृत्ती ।
इतरांसी यावया प्रतीती । दिव्य निश्चिती घेतलें ॥ २८ ॥
कपटबुद्धी दशग्रीवें । नेली होती कामभावें ।
तो परिहार केंवी संभवे । म्हणोनि दिव्यें अंगीकारिली ॥ २९ ॥
निष्पाप जाणावया जानकीसी । तुम्हींच प्रेरिलें दिव्यासी ।
अधिष्ठानत्रय अंतरवासी । निजव्रतासी प्रेरक ॥ ३० ॥
तुमचे आज्ञेवांचून । नाहीं करीत उदकपान ।
कोप न करावा आपण । आज्ञापन हें तुमचें ॥ ३१ ॥
केंव्हां आज्ञापिलें आम्हीं । तरी सांगेन ऐका स्वामी ।
इंद्रियांचें निर्गमागमीं । चळक तुम्हीं सर्वथा ॥ ३२ ॥
कार्य कारण कर्तव्यता । मज तों नाहीं सर्वथा ।
तुम्हीं प्रेरुनि तत्वता । जनकदुहिता शुद्ध केली ॥ ३३ ॥
पृथक् पृथक् सांगों नांवें । तरी सर्वज्ञ तुम्हीं स्वभावें ।
मज सर्वथा उपसाहावें । निजगौरवें क्षमावंती ॥ ३४ ॥

श्रीरामांच्या निवेदनाने संतुष्ट होऊन सर्वांनी त्यांची स्तुती वर्णिली :

ऐकोनि श्रीरामवचना । आश्चर्य जालें सुरगणा ।
घालोनियां लोटांगणा । रघुनंदना विनवित ॥ ३५ ॥
जयययाजी विशदबोधा । विमलकीर्ति विद्यारविंदा ।
विश्वात्म्या विश्ववृंदा । विश्वातीता विश्वेशा ॥ ३६ ॥
विद्याअविद्यातीत । सकळशास्त्रां आदिभूत ।
शास्त्रीं संपादितां अर्थ । तो तू निश्चित श्रीरामा ॥ ३७ ॥
सर्वांतर्यामी शाश्वत । सकळ जाणता अंतर्व्रत ।
जनापवाद इत्थंभूत । स्वामी यथार्थ संपादिला ॥ ३८ ॥
जिचेनि नांवे विश्वमुक्त । जे रामीं नित्य रत ।
प्रातःस्मरणीं नित्य स्मरत । तिचा भावार्थ प्रकट केला ॥ ३९ ॥
इतर सकळ साधकांसी । आचार्या जाली परियेसी ।
निष्ठेची परी आहे ऐसी । दृढत्वें जगासी उपदेश ॥ ४० ॥
अमलकीर्ति श्रीरघुनाथ । निर्मळ जानकीचें आचरित ।
सृष्टींत तुम्ही दोगे मंडित । कीर्ति अद्‍भुत त्रैलोक्यीं ॥ ४१ ॥

सीता लक्ष्मीर्भवान्विष्णुर्देवश्चकायुधः प्रभुः ।
वधार्थे रावणस्येह प्रविष्टो मानुषीं तनुम् ॥२॥
तदिदं नस्त्वया कार्यं कृतं धर्मभृतांवर॥३॥

आपण उभयतां साक्षात् लक्ष्मीनारायण आहात :

अस्मत्कार्यालागीं स्वामी । पूर्वी प्रार्थिलें होतें आम्ही ।
ते प्रार्थनेच्या उपक्रमीं । अवतार तुम्हीं दोघीं धरिला ॥ ४२ ॥
तें संपादावया इत्थंभूत । लक्ष्मी ते सीता निश्चित ।
आम्हांलागी कष्टली बहुत । कर्म देहांत आचरली ॥ ४३ ॥
मनीं न धरवे धरितां । चळकांप बोलतां चित्ता ।
तें कर्म जनकदुहिता । चळकांप बोलतां चित्ता ।
तें कर्म जनकदुहिता । सुरकार्यार्था आचरली ॥ ४४ ॥
तूं श्रीविष्णु परमात्मा । मनुष्यनाट्या रघूत्तमा ।
अवतरोनि मेघश्यामा । राक्षसाधमा निवटिलें ॥ ४५ ॥
राज्यभोगा देवोनि पाणी । दुस्तर निष्ठा अंगीकारुनी ।
वनवासी जालां वनीं । पावन अवनी करावया ॥ ४६ ॥
निजांगें साहोनि कष्ट । कर्म केलें पैं अचाट ।
निवटिला दशकंठ । सुरसंकट निरसिले ॥ ४७ ॥
एकद्विषयीं दातारा । माथां घ्यावें उपकाराअ ।
सृष्टिरक्षणीं कळवळा पुरा । तुज रघुवीरा पहिलेंची ॥ ४८ ॥
तूं सकळांचा आदिकर्ता । तूं सकळां प्रतिपाळता ।
सृष्टिघातका लंकानाथा । क्षणें रघुनाथा निवटिलें ॥ ४९ ॥
हें नवल नव्हे जगजेठी । तुझी विक्षेप भ्रुकुटी ।
क्षणें निवटील सकळ सृष्टी । मारितां दशकंठी नवल कोण ॥ ५० ॥
अनायासें रघुनाथा । कीर्ति केली जे तत्वता ।
उद्धारावया लोकां समस्तां । जाली सर्वथा जगद्वंद्य ॥ ५१ ॥

इममार्षं स्तवं दिव्यमितिहासं पुरातनम् ।
ये नराः कीर्तयिष्यंति नास्ति तेषां पराभवः ॥४॥

तुझा दास रघुनाथा । वाल्मीक अनागतवक्ता ।
तेणें गायिली जे कां कथा । ते यथार्थता संपादिला ॥ ५२ ॥
रामकथेवीण जगतीतळ । जालें होतें शून्यमंडळ ।
तें वसविलें सकळ । कीर्ति मंगळ करोनियां ॥ ५३ ॥

श्रीरामकथेचा महिमा :

श्रीरामकथा विशुद्ध । ज्याचे वाचेसी ये सिद्ध ।
तो पावे अगाध बोध । परमानंद श्रीरामें ॥ ५४ ॥
जो परिसे एकाग्रचित्ते । निमग्र होय निजार्थे ।
श्रीराम स्वयें तयातें । निजनिश्चितें स्वयें उद्धरी ॥ ५५ ॥
उद्धरी हा उद्‍गार पाहों । स्वयें न साहे रामरावो ।
अर्थ सबाह्य स्वयमेवो । आविर्भावो रामाचा ॥ ५६ ॥
अर्थरुप रघुनंदन । श्रोता वक्ता सबाह्य पूर्ण ।
स्वयें कोंदे पैं आपण । स्वानंदघन पूर्णत्वें ॥ ५७ ॥
असो श्रोत्यावक्त्याची कथा । रामकथेचा आदर धरितां ।
कळिकाळातें हाणोनि लाता । निजमुक्तता पाविजे ॥ ५८ ॥
कथेच्या ठायीं आदर । तरी श्रोते वक्ते जे नर ।
त्यांसी अनुमोदितां साचार । स्वयें रघुवीर सोडवी ॥ ५९ ॥
ऐसें देवोनि आशीर्वचन । देंवीं स्तविला रघुनंदन ।
रामें घालोनि लोटांगण । सकळ सुरगण वंदिले ॥ ६० ॥
करोनि सकळांचें स्तवन । सुखमय श्रीरघुनंदन ।
पुढें देखोनि हताशन । करी विनवण तयची ॥ ६१ ॥

भगवन्हव्यवाडीश लोकपावन पावक ।
शृणु मेऽस्याः परित्यागे कारणं त्वं विभावसो ॥५॥
जानाम्येनामहं साध्वीमनुरक्तां जितेंद्रियाम् ।
दृढव्रतसमाचारामात्मनः कर्मसंयताम् ॥६॥

श्रीरामांकडून अग्नीची प्रार्थना व वंदन :

जेंवी कोणी प्राकृत जन । येरयेरांच्या उपकारें पूर्ण ।
परस्परें करिती स्तवन । तेंवी रघुनंदन विनवित ॥ ६२ ॥
ऐकें स्वामी हताशा । सकळजठर निवासा ।
कर्मसाक्षी कर्माध्यक्षा । सकळपाळका जठराग्नी ॥ ६३ ॥
सकळलोकपावना । ऐकें स्वामी हुताशना ।
जनकजेच्या महिमाना । सावधान परिसावें ॥ ६४ ॥
साध्वी परम पतिव्रता । अनुरक्त सती सीता ।
जितेंद्रिय पैं सर्वथा । हें मी तत्वता जाणतसें ॥ ६५ ॥
जानकीच्या सत्वेंकरुन । पतिव्रता सतीत्व पूर्ण ।
निजसामर्थ्ये अति दारुण । स्वयें जाण आभासे ॥ ६६ ॥
ते जानकीच्या संदेहो । मज सर्वथा नाहीं पहा हो ।
लोकप्रतीतीचा निर्वाहो । निःसंदेहो पैं केला ॥ ६७ ॥
जानकी पतिव्रता पूर्ण । तथापि तुवां रक्षिली जाण ।
सर्वांगें उडी घालितां आपण । व्हावें दहन तेणें काळें ॥ ६८ ॥
तुवां रक्षिली साचार । तेणे वांचली सुंदर ।
मज भेटली सत्वर । हा उपकार पैं तुझा ॥ ६९ ॥
तुझेनि धर्मे हुताशनीं । भेटली जनकनंदिनी ।
म्हणोनियां लोटांगणी । घाली आपण श्रीराम ॥ ७० ॥

सीतास्पर्शाने अग्नीचे धन्योद्‍गार व रामांना वंदन :

तें देखतां हुताशन । आनंदमय होवोनि पूर्ण ।
लोटांगणीं रघुनंदन । स्वयें आपण विनवित ॥ ७१ ॥
ऐकें स्वामी रघुनाथा । निष्पाप तुझी निजशक्ति सीता ।
तिचेनि धर्मे तत्वता । नित्यमुक्तता मज आली ॥ ७२ ॥
सीतेचेनि स्पर्शे सांग । त्रिविधताप जाला भंग ।
निमाला माझा सकळ दाघ । सुख अभंग पावलों ॥ ७३ ॥
अहं दुष्ट रावणमेळें । रजोरागें अत्यंत काममेळें ।
विषयभोगीं दृढ काटळे । जग भेदिलें दोहीं सवां ॥ ७४ ॥
तितुके विटाळाचे मेळे । धुतां अत्यंत कष्ट जाले ।
बोली न बोलवे बोलें । देह जाले जर्जर ॥ ७५ ॥
ते सकळ कष्ट स्वामी । जानकीच्या पदसंगमीं ।
सकळ निस्तरलो आम्ही । जे कृतश्रमी न वचती ॥ ७६ ॥
जानकीचे पाय देखतां । सकळ मळाची क्षाळणता ।
स्वयें जाली रघुनाथा । बहुत आतां काय सांगूं ॥ ७७ ॥
जानकीचे पाय देखतां । सकळ मळाची क्षाळणता ।
स्वयें जाली रघुनाथा । बहुत आतां काय सांगूं ॥ ७७ ॥
माते जानकीचे संगतीं । सकळ मळाची जाली शांती ।
माझी उजळली निजदीप्ती । स्वप्रकाशस्थिती पावलों ॥ ७८ ॥
अभक्तांचा जठरपाक । करितां श्रमलों होतों देख ।
जानकीसंगें अलौकिक । विश्रांतिसुख पावलों ॥ ७९ ॥
ऐसी जानकीची स्तुती । करोनि नमिला रघुपती ।
तंव पुढें होवोनियां पशुपती । स्वयें विनंति करितसे ॥ ८० ॥

शंकरश्चापि भगवान्प्रहृष्टेनान्तरात्मना ।
पुष्कराक्ष महाबाहो कृतं कर्म महत्वया ॥७॥
दिष्ट्या शत्रुर्हतः पापः सुराणां रावणस्त्वया ।
दिष्ट्या सर्वस्य लोकस्य प्रवृद्धं दारुणं तमः ॥८॥
त्वत्तेजसा विनिहतं राम रावणजं भयम् ।
आश्वास्य भरतादींश्च कौसल्यामभिवाद्य च ॥९॥
कैकेयीं च सुमित्रां च देवीं लक्ष्मणमातरम् ।
प्राप्य राज्यं प्रियं देव्या नंदयित्वा सृह्यज्जनम् ॥१०॥

श्रीशंकरकृत रामस्तुती :

शंकर म्हणे रघुनाथा । भाग्य फळासी आलें आतां ।
निवटिलें लंकानाथा । सुरां समस्तां सोडविलें ॥ ८१ ॥
मेघहुडे येवोनि दारुण । जेंवी आच्छादिती रविकिरण ।
तेंवी दुरात्मा रावण । सकळ सुरगण अवरोधी ॥ ८२ ॥
बंदीं घातली सुरमांदी । तो दुष्ट दुरात्मा दुर्बद्धी ।
क्षणें वधिला बाणसंधी । कृपानिधी रघुनाथा ॥ ८३ ॥
तुझ्या निजप्रतापकिरणें । उजळलीं सकळ भुवनें ।
उठविलें रावणाचें ठाणें । सुरगणा सोडविलें ॥ ८४ ॥
तेणें आनंद सकळां । स्वस्थ स्थापिलें सुरकुळा ।
आलिंगिली जनकबाळा । अभिनव लीळा दावूनी ॥ ८५ ॥
दिव्य घेवोनि रघुपती । विस्तारिली अभिनव कीर्ती ।
शेखीं विचारितां निश्चितीं । अग्निदिप्ती तेही तूं ॥ ८६ ॥

आता अयोध्येत सत्वर जाऊन भरतादि सर्वांना
संतुष्ट करण्याची रामांना श्रीशंकरांची विनंती :

चरित्र केलें अत्यद्‍भुत । यश जोडिलें ब्रह्मांडांत ।
आतां न रहावे येथ । जावें त्वरित अयोध्येसी ॥ ८७ ॥
तुझेनि व्रतें व्रतस्थ । बहु कष्टला भरत ।
जटा वळलियां अद्‍भुत । देह समस्त वाळिविला ॥ ८८ ॥
तुझ्या पादुका रघुनाथा । नित्य वंदित भरत माथां ।
चित्तीं चिंतितां रघुनाथा । उसंत भरता असेना ॥ ८९ ॥
इंद्रिया नित्य दास्य परम । वाचेसी नित्य रामराम ।
हृदयीं श्रीरामाचें प्रेम । भक्तोत्तम पैं भरत ॥ ९० ॥
श्रवणीं नित्य रामकथा । नेत्रीं दृश्य तत्वता ।
न देखे वांचोनि रघुनाथा । उसंत भरता पैं नाहीं ॥ ९१ ॥
करीं पादुका पूजितां । अति उल्लास भरता ।
अहर्निशीं रघुनाथा । बहु आस्था भेटीची ॥ ९२ ॥
त्यासी द्यावें समाधान । तैसाचि दुसरा शत्रुघ्न ।
अवस्था भरताची समान । समाधान द्यावें त्यासीं ॥ ९३ ॥
माता कौसल्या सुमित्रा । कैकेयी परम पवित्रा ।
जिणें धाडोनि वनांतरा । दशशिरा मारविलें ॥ ९४ ॥
आणिकही दशरथकांता । तुजलागीं आस्थाभूता ।
त्यांसी भेटोनि रघुनाथा । सुख समस्तां पैं देयीं ॥ ९५ ॥
पितृदत्त निजराज्या । भोगीं अभंग रघुराजा ।
सिंहासनमंडित वोजा । निजभाजासमवेत ॥ ९६ ॥
अयध्येचे जन समस्त । तुझेनि वियोगें संतप्त ।
अति दुःखें पैं दुःखित् । आठवित श्रीरामा ॥ ९७ ॥
भरतादि सकळ लोक । तुजलागीं त्यक्तोदक ।
जेंवी मेघालागीं चातक । तेंवी सकळिक तुजलागीं ॥ ९८ ॥
त्यांसी देवोनि समाधान । आनंदवावे सकळजन ।
मधुर गिरा प्रसन्न वदन । ऐसें त्रिनयन बोलिला ॥ ९९ ॥
इक्ष्वाकुकुळवर्धना। सूर्ववंशनिजमंडना ।
तिघां मातांसी करोनि नमता । अश्वमेधयज्ञा संपादीं ॥ १०० ॥
करोनि सकळ दिग्विजयो । सुखी करीं समुदावो ।
अगाध दानें देवोनि पहा हो । सुखी भूदेवो स्वयें करीं ॥ १ ॥
राज्य करोनि अविच्छिन्न । सकळां द्यावें समाधान ।
नगरी विमानीं घालून । करावें गमन निजधामा ॥ २ ॥
जैसी केली विज्ञापना । तैशा स्थिती रघुनंदना ।
संपादोनि अविच्छिन्ना । यश त्रिभुवना संपादीं ॥ ३ ॥

दशरथाचें आगमन :

पैल पिता दशरथ । तुझी भेटी आकांक्षित ।
अनुमोदोनि त्वरित । मनोगत संरक्षीं ॥ ४ ॥
तुझी निजकीर्ति ऐकतां । उत्तम लोक दशरथा ।
प्राप्त असतां रघुनाथा । सांडूनि तत्वता येथें आला ॥ ५ ॥
श्रीरामदर्शनापुढें । स्वर्गसुख तें बापुडें ।
परतलोया रामाकडे । सुखसुरवाडें भोगिजे ॥ ६ ॥
ऐकतां पुत्रातां निजकीर्ती । आनंद दशरथाचे चित्तीं ।
राम सौ‍मित्र सीता सती । पाहूं निश्चिती तेणें आला ॥ ७ ॥
त्यासीं करोनि नमन । द्यावें पित्यासीं समाधान ।
ऐकोनि शंकरवचन । दशरथ आपण नमियला ॥ ८ ॥

दशरथाला श्रीरामदिकांचे साष्टांग प्रणिपात :

अंतरिक्ष गगननांतरी । ना समीप ना दूरी ।
राम पित्यातें नमस्कारी । सीतासुंदरीसमवेत ॥ ९ ॥
सौ‍मित्रें घातलें लोटांगण । तेणें दशरथा आनंद गहन ।
खोचोनि अंतरिक्ष विमान । मधुरवचन अनुवादे ॥ ११० ॥

विमानशिरस्थस्य प्रणाममकरोत्पितुः ।
दीप्यमानं स्वयं लक्ष्म्या दिवाकरमिवोदितम् ॥११॥
लक्ष्मणेन सह भ्रात्रा ददर्श पितरं प्रभुः ।
आसीनमासने दिव्ये दिव्याभरणभूषितम् ॥१२॥
हर्षेण महताविष्टो विमानस्थो महिपतीः ॥१३॥

श्रीराम, सीता व लक्ष्मणाला पाहून दशरथाचा आनंदोत्सव :

देदिप्यमान विमानीं । मोक्षलक्ष्मी करोनी ।
दशरथ मंडित गगनीं । जेंवी दिनमणी आकाशीं ॥ ११ ॥
अर्धागी सीतासमवेत । विराजमान रघुनाथ ।
बंधुही लक्ष्मण तेथ । नमन करित पैं तिघें ॥ १२ ॥
तें देखोनि निजमानसीं । आनंद जाला दशरथासी ।
विमानीं नाचत हरिखेंसी । निजपुत्रांसी देखलिया ॥ १३ ॥
चिद्रत्‍नांचे अलंकार । विमानीं मंडित नृपवर ।
हरिखें नाचत सत्वर । निजशरीर विसरोनी ॥ १४ ॥
नाम स्मरतां श्रीरघुनाथ । देहत्यागें वैकुंठांत ।
निमेष न लागतां प्राप्त । जालें त्वरित श्रीरामें ॥ १५ ॥
ज्याचेनि नामें निर्मुक्त । तो पुत्रत्वें नित्य क्रीडत ।
माझे घरीं अहोरात्र । भाग्य अद्‍भुत पैं माझें ॥ १६ ॥
ब्रह्मादिकां लक्षा नये । तो पुत्रत्वें मजघरीं पाहें ।
निजानंदें क्रीडताहे । नवल काये सांगों मी ॥ १७ ॥

पूर्वकृत्यांबद्दल दशरथाचे अनुतापाचे बोल :

तथापि केवढें औद्धत्य । पुत्रत्वें आज्ञापोनि तेथ ।
वना धाडिला रघुनाथ । निंद्य जगांत पैं जालों ॥ १८ ॥
स्त्रियेचिया वचनासाठीं । राम लाविला दिक्पटीं ।
लौकिकीं विस्तारिली गोष्टी । निंद्य ललाटीं पीटलें ॥ १९ ॥
परि ते हित जालें बहुतां । संपादिलें सुरकार्यार्था ।
द्विजां जाली सुखावस्था । आल्हादें वसतां जनस्थानीं ॥ १२० ॥
राक्षस जे कां विश्वघातक । निवटोनियां सकळिक ।
देवाचा जो देवघातक । सकळघातक रावण ॥ २१ ॥
देवद्रोही विश्वद्रोही । ब्राह्मद्रोही ।
तो रावण निवटोनि पाहीं । त्रैलोक्य सर्वही सुखी केलें ॥ २२ ॥
सुखी केले सुरवर । सुखी केले यक्ष किन्नर ।
सुखी केले वीर वानर । दसवक्त्र निवटिला ॥ २३ ॥
कैकेयीचें वचन निष्ठुर । त्रैलोक्यासी उपकारकर ।
सकळां जाले सुख अपार । बंदी समग्र सोडविले ॥ २४ ॥

मनातील शल्य नाहीसे झाल्याबद्दल दशरथाला परमानंद :

माझे हृदयीं होती गोष्टी । कैकेयी दुराचारिणी मोठी ।
राम लाविला दिक्पटीं । सीता गोरटीसमवेत ॥ २५ ॥
तें शल्य माझ्या हृदयींचें । आजि निरसोन गेलें साचें ।
चरित्र देखोनि श्रीरामाचें । आलें त्रैलोक्यींचें गौरव ॥ २६ ॥
तुम्हां त्रिवर्गातें देखोनि दृष्टी । आनंद उथळला पोटीं ।
एकला न माये सकळ सृष्टी । एवढी मज पुष्टी आलीसे ॥ २७ ॥
सीता सौ‍मित्र श्रीरघुनाथ । विजयी त्रिवर्ग पैं येथ ।
देखतांचि अत्यद्‍भुत । आनंदभरित मी जालों ॥ २८ ॥
कैकेयीवचन शल्यदुःखा-। पासूनि आजि सुटलों देखा ।
देखिलिया रघुकुळटिळका । अनंत सुखा पावलों ॥ २९ ॥
श्रीरामा ऐक सावधान । धन्य भ्राता सौ‍मित्र जाण ।
तुझें निजदास्य करोन । कीर्ति पावन त्रैलोक्यीं ॥ १३० ॥
धन्य पतिव्रता सीता । तुझेनि दास्यें निष्पापता ।
तुझेनि धर्मे रघुनाथा । जगद्वंद्य माता जगाची ॥ ३१ ॥
जितेंद्रिय सीता सती । निर्दोष यश त्रिजगतीं ।
अनुरक्त बंधु ऊर्मिलापती । स्वयें रघुपती घेवोनि जावें ॥ ३२ ॥
वेदमंत्री अभिषेक । आपण करोनि सावकाश ।
सुख द्यावे बंधु भरतास । शत्रुघ्नास सुख देई ॥ ३३ ॥

भरतस्तु विनीतस्ते शत्रुघ्नो दयितो मम ।
भ्रातृभिः सह राज्यं च दीर्घमायुरवाप्नुहि ॥१४॥
इति ब्रुवाणं पितरं रामः प्रांजलिरब्रवीत् ।
भोस्तातानुगृहीतोस्मि यत्प्रीतो मे भवान्गुरुः ॥१५॥
इदमेकं त्विहेच्छमि भवातो हि वरं हितम् ।
दीयमानमभिप्रेतं ममानुग्रहकारणात् ॥१६॥

“भरतादि अयोध्येतील नागरिकांस संतुष्ट करावे”-दशरथ :

भरत अत्यंत अनुरक्त । श्रीरामवियोगें व्रतस्थ ।
माथां जटाभार अद्‍भुत । प्रावरण निश्चित वल्कलें ॥ ३४ ॥
त्यजिला आहार विहार । सेजार केवळ वनचर ।
भूमिशयनी निरंतर । निजशरीअर वाळविले ॥ ३५ ॥
भक्तिप्रतापें अति अद्‍भुत । भक्त अनुरक्त विरक्त ।
नित्य रामनाम स्मरत । वीर विख्यात पैं भरत ॥ ३६ ॥
श्रवणी रामकथाचरित्र । रामरुप चराचर ।
नेत्रीं देखतां रघुवीर । वाग्व्यापार रामनामाचा ॥ ३७ ॥
श्रीरामवियोगें तापला । तपश्चर्या कृश जाला ।
तैसाचि शत्रुघ्न निविळला । प्रियकर भला पैं माझा ॥ ३८ ॥
तैशाच तिघी तुझ्या माता । श्रीरामवियोगें व्रतस्था ।
बहुत शिणल्या रघुनाथा । भेटी तत्वता त्यांसी द्यावी ॥ ३९ ॥
अयोध्येचे सकळ जन । नित्य चिंतिती रघुनंदन ।
नाठवे अन्न जीवन । अवस्था पूर्ण लागली ॥ १४० ॥
जेंवी पर्जन्येंवीण धान्य । तृषित प्राणी जीवनेंवीण ।
क्षुधाक्रान्त स्मरे अन्न । तेंवी जन अयोध्येचे ॥ ४१ ॥
त्यांसी द्यावें समाधान । पुत्रवत्प्रजापालन ।
सुखें करावें आपण । बंधूसीं जाण समवेत ॥ ४२ ॥
निजराज्य भोगीं अक्षयी । ऐसें दशरथ बोलतां पाहीं ।
तिघे जाले सुखमयी । नमिला पाहीं निजजनक ॥ ४३ ॥

“आपल्या पुण्याईमुळेच आम्ही यशस्वी झालो !”
असे राम दशरथास वंदन करुन सांगतात :

घालोनियां लोटांगण । मस्तकांजली विनीत वचन ।
ताता तुझेनि धर्मेकरुन । सकळ कल्याण पावलों ॥ ४४ ॥
आमचें जें कां उत्काटाचरित । तो तुझा प्रताप निश्चित ।
तुझेनि धर्मे आम्ही सनाथ । ख्याती अद्‍भुत पावलों ॥ ४५ ॥
तूंचि आमचा निज पिता । सद्‍गुरु तूंचि तत्वता ।
तुझेनि सकळ कृतार्थता । बहुत आतां काय सांगूं ॥ ४६ ॥
स्वामींनीं आज्ञापिलें ज्या रीती । मी संपादीन त्याच स्थिती ।
चिंता न करावी निश्चिती । अनुज्ञास्थिती संपादीन ॥ ४७ ॥
हेंचि उत्तरोत्तर मागत । तुमच्या अनुग्रहें निश्चित ।
तेणें सकळार्थ संपादत । आमुचें वृत्त तें किती ॥ ४८ ॥
सकळांचे निजानुमतें । सपादिले सावचित्तें ।
तुझें अंतरंग निश्चितें । तें सर्वार्थें निजपुज्य ॥ ४९ ॥
सखा विनीत बंधु भरत । शत्रुघ्न तुझा परम आप्त ।
राजपत्‍न्या तिघी तेथ । संतोषमुक्त करीन ॥ १५० ॥

आपल्या आज्ञेप्रमाणेच सर्वांना संतोषवीन, राम :

चिंता न करावी जी ताता । आज्ञेप्रमाणें यथार्थता ।
संपादीन मी सर्वथा । न करीं चित्ता विक्षेप ॥ ५१ ॥
पावोनियां उत्तम लोकासी । ममता नसावी मानसीं ।
तुम्हां शिष्टांची वचनें ऐसीं । सकळ लोकांसी उपदेश ॥ ५२ ॥
पावोनियां उत्तम लोक । अहंममता धरिता देख ।
पुण्य वेंचे निःशेख । आवश्यक भूतळा येती ॥ ५३ ॥
म्हणोनियां पुण्यश्लोक । अहंममता निःशेष ।
सांडोनियां उत्तम लोक । अक्षयी सुख भोगिती ॥ ५४ ॥
ज्यांसीं गत्यंतराचें दुःख । तेही अहंममता निःशेख ।
सांडोनियां आवश्यक । ब्रह्मसुख भोगिती ॥ ५५ ॥
जेथें नाहीं मीतूंपण । लोकलोकांतर नाहीं जाण ।
तेथें गत्यंतर गणी कोण । गमनाभिमान साडुनी ॥ ५६ ॥
यालागीं चतुरीं । अहंममता सांडोनि दूरी ।
स्वयें ब्रह्मसाक्षात्कारीं । पावती उरी नुरवोनी ॥ ५७ ॥

रामांच्या प्राजंळपणाने दशरथ संतुष्ट तो रामनाममहिमा सांगतो :

ऐकतां श्रीरामवचन । दशरथ जाला सुखायमान ।
सांडोनियां निजाभिमान । ममता पूर्ण सांडिली ॥ ५८ ॥
अहंममता सांडितां तेथ । पूर्णब्रह्म रगुनाथ ।
ऐसा बाणला निश्चितार्थ । आनंद अद्‍भुत उथळला ॥ ५९ ॥
पुत्रस्नेह सांडोनि तेथ । बद्धांजलि अति विनीत ।
सांगता जाला निजवृत्तांत । हृद्रत जें होतें ॥ १६० ॥
पुत्रवियोगें रघुनाथा । तुझ्या नामाची दृढता ।
लागली अनिवार चित्ता । राम स्मरता देहांत ॥ ६१ ॥
नामाचें फळ अलौकिक । नामें पावे उत्तम लोक ।
भोग भोगितां सकळिक । नाम निःशेख न विसरें ॥ ६२ ॥
नामें जाला साक्षात्कार । प्रत्यक्ष भेटलासी तूं रघुविर ।
ताप निमाला समग्र । नाम साचार परब्रह्म ॥ ६३ ॥
उत्तम लोकीं असतां । ममता होती रघुनाथा ।
पुत्र भेटावे तत्वता । ऐसीं चिंता अनिवार ॥ ६४ ॥
नावडें वैकुंठ कैलास । स्वर्गभोग पैं निःशेष ।
ममता होती बहुवस । ते अशेष निमाली ॥ ६५ ॥
देखतां श्रीरामाची मूर्ती । ममता निमाली निश्चिती ।
निःशेष हारपली प्रकृती । चैतन्यस्थिती बाणली ॥ ६६ ॥
निमालें मीतूंपण । मावळलें दशरथपण ।
मावळले श्रीरामपण । ब्रह्म परिपूर्ण अद्वय ॥ ६७ ॥
एका जनार्दना शरण । पितापुत्रांचें दर्शन् ।
अहंममता सांडून । ब्रह्म परिपूर्ण प्रबोधिलें ॥ १६८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे । एकाकारटीकायां
दशरथसमाधानं नाम एकोनसप्ततित्मोऽध्यायः ॥ ६९ ॥
ओंव्या ॥ १६८ ॥ श्लोक ॥ १६ ॥ एवं ॥ १८४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकूणसत्तरावा